Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रेसमधील भंगाराला आग

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमधील भंगार गोडाऊनमधील साहित्याला आज सायंकाळी पावणे सातच्या सुमारास आग लागली. प्रेसच्या दोन आणि महापालिकेच्या चार अशा सहा बंबांनी तासभरात आग आटोक्यात आणली. आगीत जीवितहानी झाली नाही. वित्तीय हानी किती झाली याबाबत मा‌हिती मिळाली नाही.

आगीचे कारण समजू शकलेले नाही. उपनगर पोलिस, जलद कृती दलाचे कमांडो, औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान मदतीला होते. अग्न‌िशमन दल आणि पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी - नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये दहा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंतच्या नोटांची छपाई केली जाते. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास चौथ्या विंगमधील भंगारच्या गोडाऊनला आग लागली. येथे नोटांच्या शाईचे कॅन्स, नोटांचे कार्टेज कटिंग, जुने फर्निचर, पोती, फळ्या, प्लायवूड आदी असल्याने आगीने लगेचच रौद्र रुप धारण केले. सुरक्षा दलाच्या जवानांनी वरिष्ठांना ही घटना कळवली.

पोलिसांची एण्‍ट्री

प्रेसची स्वतःची सुरक्षा यंत्रणा व दोन अग्न‌िशमन बंब आहेत. त्यामुळे बाहेरचे पोलिस, अग्न‌िशमन दलाला येथे परवानगी नाही. मात्र, आगीने गंभीर स्वरुप धारण करू नये म्हणून प्रेस प्रशासनाने उपनगर पोलिस व मनपाच्या नाशिकरोडच्या अग्न‌िशमन दलाला पाचारण केले. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन व त्यांचे सहकारी तातडीने रवाना झाले. गोंधळ होऊ नये म्हणून जलद कृती दलाचे पंधरा कमांडो घेऊन विशेष वाहन आले. मात्र, त्यांना आत सोडण्यात आले नाही. अग्न‌िशमन दलाच्या शहरातील आणखी दोन बंबांना बोलावण्यात आले. प्रेसचे दोन बंबासह सहा बंबांनी आग आटोक्यात आणली.

अलर्टकडे दुर्लक्ष

प्रेसचे दरवर्षी सुरक्षा आडिट होते. त्यावेळी टीमने पाहणी केली असता भंगाराबद्दल आक्षेप घेऊन आपल्या अहवालात भंगार हटविण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच आगीची घटना घडली, असे सूत्रांनी सांगितले. आता जेसीबी बोलावून दबलेले पोते व अन्य साहित्य हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढिल्या कारभाराला बसणार चाप

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागातील पाचही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या कार्यालयांतील ढिल्या कारभाराच्या चटक्यांनी विभागीय आयुक्तालयासह सामान्य नागरिकांची सुरू असलेली होरपळ विभागीय आयुक्तांनी चांगलीच मनावर घेतली आहे. विभागातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या कार्यालयांतील कामकाजाचे ‘वर्क ऑडिट’ करण्यासाठी थेट आयुक्तालयातून पाच शिलेदार रवाना केले आहेत. पाचही जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासनाच्या सुस्त कामकाजाचा वस्तुनिष्ठ आढावा या पाच शिलेदारांकडून विभागीय आयुक्तांना लवकरच मिळणार असून, त्यानंतर कामकाजात हलगर्जीपणा दिसून आलेल्या अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयांतील कामकाज गतिहीन व दिशाहीन झाल्याचे स्वतः विभागीय आयुक्तांनीच सोदाहरण उघड केले होते. सामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्तालयापर्यंत आल्या होत्या. याशिवाय काही अर्धन्यायिक प्रकरणांत स्थानिक अधिकाऱ्यांनी नियमबाह्य निर्णय दिल्याचेही यापूर्वीच उघड झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी काही महिन्यांपूर्वीच आयुक्तालयात विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी व इतर अधिकाऱ्यांची कार्यशाळाच घेतली होती. स्थानिक पातळीवरील गतिमान व पारदर्शी प्रशासनाला खीळ बसल्याचा फटका विभागीय आयुक्तालयाला कसा बसला, याबाबतही त्यांनी या कार्यशाळेत भंडाफोड केला होता. त्यानंतर प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याच्या त्यांनी कडक सूचना दिल्या होत्या. मात्र, आतापर्यंत स्थानिक प्रशासकीय कामकाजांत अपेक्षित सुधारणा न झाल्याचे उघड झाल्याने विभागीय आयुक्तांनी आता ‘वर्क ऑडिट’चे हत्यार उपसले आहे.

अशी होणार तपासणी

जिल्ह्यातील सर्व पाचही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या कार्यालयांच्या प्रशासकीय कामकाजातील नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी लागलेला वेळ, इतर फायलींवर निर्णय घेण्यासाठी लागलेला वेळ, शासकीय कामकाजासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराची आवक- जावक नोंद या बाबींची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तालयातून उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. या पाच अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यांच्या अहवालाच्या अभ्यासाअंती पुढील कारवाईचे नियोजन ठरणार आहे.

या आहेत त्रुटी

स्थानिक पातळीवरील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांत कामकाजाच्या बाबतीत समन्वयाचा अभाव, फायली चार-पाच महिन्यांपर्यंत निर्णयाविनी पडून राहणे, शासकीय कार्यालयांत रेकॉर्ड न ठेवणे, पत्रव्यवहाराची पाकिटे फोडून त्यातील पत्रे वाचण्याकडे दुर्लक्ष करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस निर्णय घेण्याबाबत बोटचेपी भूमिका घेणे या त्रुटी पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयांच्या कामकाजात आढळून आलेल्या आहेत.

झिरो पेंडन्सीसाठी आयुक्त आग्रही

विभागातील पाचही जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयांत झिरो पेंडन्सीसाठी विभागीय आयुक्त महेश झगडे आग्रही आहेत. एकविसाव्या शतकात प्रशासकीय यंत्रणेची भूमिका सेवादात्याची असणार आहे. त्यामुळे सर्व स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने आपल्या मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता विभागीय आयुक्तांनी अग्रस्थानी ठेवली आहे. सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या मासिक कामकाजाचा तपशीलवार अहवालही सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

.अन् सर्व विद्यार्थी सुखरूप उतरले खाली!

0
0

चामरलेणीवर शाळकरी मुलाला वाचवितांना युवक जखमी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

चार शाळकरी मुलांना चामरलेणीवर चढण्याचे धाडस चांगलेच महागात पडले असते. चढताना एकाचा तोल गेला अन् वाचवा... वाचवा... असे ओरडत इतर विद्यार्थ्यांनी एकच कल्लोळ केला. त्यांचा आवाज ऐकून दोन कॉलेज तरुण मदतीसाठी पुढे सरसावले खरे, पण मदत करताना त्यातील एकाचा पाय मुरगळल्याने हाड मोडले. अखेर कमांडो पथक, अग्निशमन दल, स्थानिक गिर्यारोहक पथक आदींनी तब्बल पाच तास शर्थीचे प्रयत्न करीत सर्व विद्यार्थ्यांना दोरीच्या साह्याने सुखरूप डोंगरावरून खाली उतरवले.

सावतानगर येथील लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत असलेले आर्यन गिते, नयन रोकडे, रोहन शेळके आणि आदित्य खैरनार हे चार शाळकरी मुले सोमवारी (दि. २७) सकाळी आठच्या सुमारास चामरलेणी येथे गेले होते. आर्यन हा देशपातळीवरचा सायकलपटू असून, त्याच्यासोबत तिघे सायकल सराव करीत चामरलेण्याच्या पायथ्याशी आले. सरावानंतर चामरलेणी डोंगरावर चढण्याचा त्यांनी बेत आखला. चौघांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. अर्ध्यावर डोंगर चढून गेल्यावर आर्यनचा तोल गेला. त्याचा पाय घसरला. तो खाली पडणार असे त्याच्या तिघा मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी, वाचवा...वाचवा... असे मोठ्याने ओरडत मदतीसाठी हाका दिल्या. त्याच वेळी येथे फिरायला आलेल्या के. के. वाघ कॉलेजमधील देवेंद्र जाधव व सौरभ पाटील यांनी तो आवाज ऐकला. ते आवाजाच्या दिशेने डोंगरावर चढून गेले. त्यांनी अडकलेल्या या शाळकरी मुलांना खाली उतरविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी वाळलेल्या गवतावर देवेंद्रचा पाय घसरला. त्याच्या उजव्या पायाच्या घोटाचा भाग पिळला गेल्याने घोट्याजवळील हाड मोडून तो जखमी झाला. या मुलांनी पुन्हा आरडाओरडा सुरू केला. तेव्हा परिसरातील ग्रामस्थांनी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधत मदतीची मागणी केली.

पाच तास शर्थीचे प्रयत्न

म्हसरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्यासह पोलिस कर्मचारी, कमांडो पथक, अग्निशमन दल, स्थानिक गिर्यारोहक पथक आदींनी तब्बल पाच तास शर्थीचे प्रयत्न केले. अडकलेल्या या शाळकरी व कॉलेज विद्यार्थ्यांना दोरीच्या साह्याने सुखरूप डोंगरावरून खाली आणले. बचावकार्य संपताच जखमी देवेंद्र जाधव यास रुग्णवाहिकेतून त्वरित रुग्णालयात पाठविण्यात आले. सर्व शाळकरी मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सुरक्षारक्षकांचा आयुक्त घेणार आढावा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील खासगी सुरक्षा रक्षकांबाबत नगरसेवकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा सुरक्षारक्षकांचा आढावा घेणार आहेत. काही सुरक्षारक्षकांकडून अरेरावी केली जात असून, सर्वसामान्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे यात किती सुरक्षारक्षक कुठे व किती प्रमाणात ठेवायचे, या निर्णयाची फेरतपासणी केली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची जाचातून सुटका होण्याची शक्यता आहे.

दोन आठवड्यांपासून सहा बंदूकधाऱ्यांसह सुरक्षारक्षक सेवेत दाखल झाले आहेत. मात्र, सर्वसामान्यांचा कायम राबता असलेल्या महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र सुरक्षा बलातील रक्षकांची नागरिकांना वागणुक देण्याच्या पद्धतीवरून वाद निर्माण झाला आहे. नगरसेवकांसह सर्वसामान्यांची अडवणूक केली जात आहे. गेल्या आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांना ओळखपत्राशिवाय प्रवेश न देण्याची भूमिका घेतल्यानंतर त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. त्यामुळे या वादातून मार्ग काढण्यासाठी सुरक्षारक्षकांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर सुरक्षारक्षकांची नियुक्ती कुठे व किती प्रमाणात करायची याबाबतचा फेरआढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना भाजीपाला भेट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बागायती व सुपीक जमिनी महामार्गातून वगळण्यात याव्यात, या मागणीसाठी शिवडेसह सिन्नर, इगतपुरी तालुक्यातील समृध्दीबाध‌ित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले. भेटीपूर्वी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना भाजीपाल्याच्या दोन टोपल्या भेट दिल्या.

‘समृध्दी महामार्ग रद्द करा’ अशा टोप्या घेऊन आलेल्या या आंदोलनकर्त्यांसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पण, १० ते १५ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपले प्रश्न शांततेत मांडल्यामुळे पोलिसांनाही दिलासा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याअगोदर हे शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना भेटले. त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना भेटण्याची मागणी केली. त्यानंतर काही मिनिटांत जिल्हधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. यावेळी समृध्दीबाध‌ित शेतकऱ्यांनी आमच्या जम‌िनी बागायती आहेत. त्यातून आम्ही एका एकरमध्ये १० ते १२ लाख रुपये उत्पन्न घेतो. त्यामुळे समृध्दी महामार्गातून मिळणाऱ्या पैशांपेक्षा तो जास्त मिळणार आहे. हा पैसा आमचा कष्टाचा आहे. त्यातून आम्हाला समाधान मिळणार असल्याचे सांगून या बाध‌ित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व आपण शेतीला भेट देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी १६ महिन्यापासून आम्ही आंदोलन करत असून, त्याची दखल घेत नसल्याची खंतही जिल्हाधिकारी यांच्याकडे व्यक्त केली. आमच्या शेतात पिकणारे टमाटे परदेशात निर्यात केले जातात. त्यामुळे इतर ठिकाणच्या टमाट्यांपेक्षा आम्हाला दुप्पट भाव मिळत असल्याचे सांगितले.

या आंदोलनात समृद्धी महामार्ग बाध‌ित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, सिन्नर तालुकाध्यक्ष सोमनाथ वाघ, इगतपुरीचे भास्कर गुंजाळ, रावसाहेब हारक, शांताराम ढोकणे, अरुण गायकर, उत्तम हारक, भागवत गुंजाळ, रतन लांगडे, शिवाजी भोसले, विजय कडू, शिवाजी पवार, दौलत दुभाषे, सोमनाथ तातळे, लातू तातळे, बबन वेलजाळी, सुचेंद्र मिळले, विलास आढाव, किशन वाघचौरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची अनास्था

नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या बाध‌ित जमिनींना भेट देण्याची विनंती केली होती. त्यांच्यासमोर आम्ही आमचे प्रश्न मांडले. पण, मुख्यमंत्री आले नाहीत व त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांबद्दल अनास्था आहे का, असा प्रश्नही या शेतकऱ्यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवाव्यात व बाध‌ित शेतीला भेट देण्याची विनंती करावी, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई मेन्स एप्रिलमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या महत्त्वाच्या कॉलेजांमध्ये प्रवेशांसाठी आवश्यक असणारी जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स २०१८च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली असून, ८ एप्रिल रोजी ही परीक्षा पद्धतीने होणार आहे. बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बी. टेक अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण असून, एक डिसेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे.

सीबीएसईकडून दरवर्षी जेईई ही परीक्षा घेण्यात येते. देशातील मोठमोठ्या संस्था, महत्त्वपूर्ण इंजिन‌ीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जेईई उत्तीर्ण होण्यासाठी मोठी मेहनत घेतली जाते. इंजिनीअरिंगसह फार्मसी, आर्किटेक्टर आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना यातून संधी मिळत असते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयएसएमसारख्या मोठ्या संस्थांची दारे विद्यार्थ्यांना खुली होतात. मेन्स उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. विद्यार्थ्यांना www.jeemain.nic.in या वेबसाइटवर १ जानेवारी २०१८पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

आधार क्रमांक अनिवार्य

राज्य मंडळांच्या परीक्षांपासून इतर केंद्राच्या महत्त्वाच्या परीक्षांचे अर्ज करताना विद्यार्थ्यांना आधार कार्ड क्रमांक त्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेईई मेन्सची ऑनलाइन अर्जप्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा अर्ज करताना आधार कार्ड क्रमांक अर्जात भरणे विद्यार्थ्यांना अनिवार्य असणार आहे. परीक्षेतील घोळ टाळण्यासाठी व विद्यार्थ्याच्या ओळखीबाबत पारदर्शकता राहण्यासाठी आधारकार्ड क्रमांक जोडणीस प्राधान्य दिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांना हटविण्यासाठी प्राचार्य रस्त्यावर!

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शहरातील नावाजलेल्या कॉलेजच्या प्रवेशद्वाराबाहेरच टवाळखोरांची रोजच जत्रा भरत असल्याचे दिसून येते. त्यांचा जाच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याने याबाबत पालकांनी अनेकदा कॉलेजकडे तक्रारी केल्यानंतर टवाळखोरांना हटविण्यासाठी सोमवारी चक्क प्राचार्यांनाच पुढाकार घेत रस्त्यावर उतरावे लागले.

विशेष म्हणजे संबंधित कॉलेजच्या समोरच सरकारवाडा पोलिस स्टेशन व पोलिस चौकी असतानादेखील टवाळखोरांवर वचक नसल्याचा आरोप पालकांनी केला. त्यामुळेच टवाळखोरांविरोधात खुद्द प्राचार्यांनाच रस्त्यावर उतरावे लागल्याने असल्याने पोलिस नेमके करतात तरी काय, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. याप्रश्नी पोलिस आयुक्तांनीच लक्ष घालावे, अशी मागणीही प्राध्यापकांसह पालकांनी केली आहे.

शहरातील नामांकित असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या गंगापूररोडवरील केटीएचएम कॉलेजसमोर रोजच टवाळखोरांची गर्दी होत असते. कॉलेज प्रशासनाकडून अनेकदा टवाळखोरांना हटविण्याचे कामही केले जाते. परंतु, अनेकदा टवाळखोरच शिक्षकांना अरेरावीची भाषा वापरत असल्याने शिक्षकांवर माघार घेण्याची वेळ येते. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनादेखील टवाळखोर जुमानत नसल्याची माहिती प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांना मिळ्ताच त्यांनी स्वतः कॉलजेच्या प्रवेशद्वारावर उभे राहत टवाळखोरांना हटकण्यास प्रारंभ केला. कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखवूनच प्रवेश करावा, असे आदेशही त्यांनी दिले. या प्रकाराची कुणकुण लागताच टवाळखोर पसार झाले.

दरम्यान, पालकांनीदेखील आपली मुले शिक्षण घेत असलेल्या संस्थेशी संपर्कात राहावे. घरातून मुले शाळा अथवा कॉलेजला जाताना नेमकी कुठे जातात याची माहितीही पालकांनी घेण्याची गरज प्राध्यापकांनी प्रतिपादित केली.

--

धडक कारवाईची गरज

केटीएचएम कॉलेजसमोरच सरकारवाडा पोलिस स्टेशन आणि पोलिस चौकी अाहे. मात्र, तरीदेखील अनेक टवाळखोर कॉलेजच्या गेटवर उभे राहत छेडछाड करीत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे विद्यार्थिनींना मोठी गैरसोय सहन करावी लागते. मात्र, असे प्रकार असूनदेखील पोलिस नेमके करतात काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या कॉलेजसह इतर कॉलेजांच्या परिसरात आढळणाऱ्या टवाळखोरांवर धडक कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग सभा केवळ चहापानापुरतीच!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील समस्यांबाबत प्रभाग सभेत आवाज उठवूनदेखील काहीही उपयोग होत नाही. प्रभाग सभा केवळ नाश्ता व चहापानापुरतीच मर्यादित राहिली असल्याचा आरोप करीत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अधिकारी कामे करीत नसल्याचे सांगून आपापल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचला.

सिडको प्रभागाची सभा सोमवारी प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, नीलेश ठाकरे, श्याम साबळे, भगवान दोंदे, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, चंद्रकांत खाडे, दीपक दातीर, हर्षा बडगुजर, पुष्पा आव्हाड, संगीत जाधव, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, सुवर्णा मटाले, किरण दराडे, रत्नमाला राणे, कावेरी घुगे, कल्पना पांडे, प्रतिभा पवार यांच्यासह विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत व महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक श्याम साबळे यांनी घंटागाडी ठेकेदार मनमानी करीत असून, त्यांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय होऊनही प्रशासनाने त्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. प्रभागात नियमितपणे घंटागाडी येत नसल्याचे सांगून, संबंधित ठेकेदार आता काही नगरसेवकांना गाठून त्यांना पैशाची लालच दाखवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखविणारा हा ठेकेदार निश्चितच अधिकाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रभागातील ड्रेनेजच्या समस्यांबाबत विभागाकडे तक्रारी करूनही काहीही उपयोग होत नाही. अधिकारी लक्ष देत नसल्याने आता अधिकाऱ्यांच्याच अंगावर ड्रेनेजचे पाणी टाकण्याचा इशारा नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी दिला. आयुक्‍तांनी अतिक्रमणे हटविण्याबाबत आदेशित केलेले असतानाही सिडकोच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नगरसेविका कल्पना पांडे यांनी केला.

नीलेश ठाकरे यांनी आरोग्याबाबत व घंटागाडी ठेकेदाराबाबत केलेल्या सूचनांचे पालन होत नाही. आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर ते आमच्या हातात नाही, असे उत्तर संबंधित अधिकारी देत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकंदरीतच विविध समस्या सिडकोत प्रलंबित असूनही सिडकोतील कोणत्याच विभागाचे अधिकारी काम करीत नसल्याचा आरोप सर्वच नगरसेवकांनी यावेळी केला. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

--

दूषित पाण्यामुळे रोगराई

नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी नाल्यांमध्ये केमिकलयुक्‍त पाणी कोठून येते याचा अधिकाऱ्यांनी शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. या दूषित पाण्यामुळे सिडकोत साथीचे रोग वाढले असल्याचा आरोप केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून कंपन्यांविरोधात ही कारवाई का राबविली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पवननगर येथील नव्याने करण्यात आलेला रस्ता खोदण्यात आला असून, त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. अशा पद्धतीने नवीन रस्ते अधिकारी फोडणार असतील, तर त्यांच्या पगारातूनच ही भरपाई केली पाहिजे, असे मतही बडगुजर यांनी व्यक्‍त केले.

--

सभांवरच टाकावा बहिष्कार

अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे ज्ञानच नसल्याचा आरोप नगरसेवक दीपक दातीर यांनी केला. अधिकाऱ्यांना वारंवार समस्या सांगूनही ते समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितले. आठ दिवसांत सिडकोतील समस्या सुटल्या नाहीत, तर सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे आयुक्‍तांना भेटून प्रभाग सभांवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे प्रतिपादन दीपक दातीर यांनी केले.

--

कठोर भूमिका का नाही?

एकदा प्रभाग सभेत सूचना मांडल्यानंतर दुसऱ्या प्रभाग सभेपर्यंत अधिकारी काम करीत नसल्याचे लक्षात येत असतानाही नगरसेवक अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका का घेत नाहीत, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनाच आता आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याने प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याचे दिसून येत असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

--

आरोग्यचे वाजले तीनतेरा

प्रभागांत घंटागाड्या नियमित आल्या पाहिजेत. घंटागाड्यांबाबत नगरसेवकांची तक्रार येता कामा नये, असे महापौरांनी आदेशित केलेले असतानाही आरोग्य विभागाचे अधिकारी हा आदेश जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय वरदहस्ताने आरोग्य विभागाच्या कामाचे तीनतेरा वाजले असल्याची चर्चा परिसरात होत आहे. एकीकडे स्वच्छता अभियान राबविणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनाच स्वच्छतेबाबत आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते, याबद्दलही आश्चर्य व्यक्‍त होत होते.


----

सत्ताधारी नगरसेवकांवर आली आंदोलनाची वेळ


म. टा. वृत्तसेवा, सिडको

अधिकारी काम करीत नसल्याचा आरोप करीत सिडकोतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनाच सोमवारी आंदोलन करावे लागले. कामे होत नसल्याने उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना शिडी आणि कुऱ्हाड भेट देऊन त्यांनी अनोखे आंदोलन केले.

अधिकारी कामे ऐकत नसल्याचा आरोप यावेळी या नगरसेवकांनी केला. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची ही अवस्था असेल, तर अन्य नगरसेवकांचे काय हाल असतील, सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक नसल्याचेच यावरून दिसून येत आहे, अशी चर्चा या आंदोलनामुळे परिसरात रंगली.

सिडकोतील उद्यान विभागाच्या कामावरून काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक बंटी तिदमे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. सिडकोतील उद्यान विभागाचे स्वतंत्र कार्यालयसुद्धा या ठिकाणी नसून, उद्यानाचे विभागाचे कर्मचारी काम करीत नसल्याचे वारंवार दिसून येते. नागरिकांच्या समस्या सोडविणे नागरसेवकांचे कामाच आहे. परंतु, या न सुटणाऱ्या समस्यांना ते लोकप्रतिनिधींनाच नागरिक जबाबदार धरत आहेत. अधिकारी काम करीत नसल्याने नागरिकांसमोर नगरसेवकांची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. यावेळी उद्यान विभागाचे आर. एम. पांडे व अनिल कदम उपस्थित होते.

--

कुऱ्हाड अन् शिडी

सिडकोच्या प्रभाग सभेत सोमवारी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह भाजपाचे राकेश दोंदे, नीलेश ठाकरे, छाया देवांग यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट लाकडी शिडी व कुऱ्हाड भेट देऊन परिसरातील झाडांच्या फांद्या काढण्याची विनंती केली. उद्यान विभागाच्या कामांबाबत आता नागरिकांनी तक्रारीसुद्धा करणे बंदच केले असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. झाडांची तोड करता येत नसली, तरी झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक असतानाही अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सापांचा मुक्त संचार

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील उड्डाणपुलाखालील नवले चाळीत विषारी साप व नागांची घुसखोरी सुरू झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या आठ दिवसांत सर्पमित्रांच्या मदतीने येथून सुमारे दहा साप पकडून निसर्गात सोडून देण्यात आले आहेत. परिसरातील गवत साफ करून सापांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रेस मेनगटजवळील प्रेसच्या मालकीच्या साडेतीन एकर जागेवर गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेच सापांचा वावर वाढल्याची रहिवाशांची तक्रार आहे. नाशिक-पुणे मार्गावर प्रेस मेनगेटवर पूर्वी प्रेस कामगारांसाठी चाळी होत्या. नेहरूनगरला वसाहत झाल्यानंतर या चाळी हटविण्यात आल्या. प्रेसचे महामंडळात रुपांतर झाल्यानंतर येथे मैदान तयार करण्यात आले. या मैदानावर २०११ पर्यंत प्रेसच्या खेळाडूंसाठी इनडोअर स्टेडियम तयार करण्याचे नियोजन होते. महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एस. एस. राणा यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले. त्यानंतर मैदानाकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रेस कामगारांतर्फे गणेशोत्सव, सभा, संमेलन व करमणूक कार्यक्रम नाशिकरोड पोलिस ठाण्याशेजारील मैदानात साजरे केले जातात.

पूर्वेकडील नवले चाळीकडील भागात आता पाच-सहा फूट उंचीचे गवत व काटेरी झुडपे उगवली आहेत. येथे अस्वच्छताही पसरली असून, त्यामुळे सापांचा वावर वाढला आहे. हे साप नवले चाळीतील नागरिकांच्या घरात घुसखोरी करत आहेत. जवळच पोलिस लाइन, शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. त्यांच्याही घरात सापांचा शिरकाव वाढला आहे.

--

मैदानाची करावी स्वच्छता

या मैदानातील काटेरी झुडपे, गवत काढून साफसफाई करावी, कचरा हटवावा व मैदान स्वच्छ ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी प्रेसकडे केली आहे. परंतु, कार्यवाही झालेली नाही. प्रेस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच सापांची समस्या निर्माण झाल्याची त्यांची तक्रार आहे. प्रेसने या मैदानाची साफसफाई करून स्टेडियम उभारावे, अशी मागणी गवळी समाजाचे अध्यक्ष जगन गवळी, दीपक नागमोती, महेश कोळसे पाटील, प्रकाश सानप, अशोक नेहे आदी रहिवाशांनी केली आहे.

--

नाशिकरोड प्रेस व्यवस्थापनाने नवले चाळीशेजारील आपल्या मालकीच्या साडेतीन एकर जमिनीची स्वच्छता करावी, गवत व काटेरी झुडपे काढावीत. विषारी सापांचा नवले चाळीतील रहिवाशांना दंश होण्याआधीच ही कार्यवाही त्वरित करावी. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.

-जगन गवळी, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉनच्या मांजाला ‘ढील’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायालयाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली असतानादेखील नाशिक शहरातील काही भागांमध्ये या धोकादायक मांजाची खुलेआम विक्री होत असल्याची स्थिती आहे. प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संक्रांतीचा आनंद साजरा करण्याच्या हेतूलाच त्यामुळे हरताळ फासला जात असून, वेळीच या मांजाची विक्री रोखल्यास संभाव्य दुर्घटना टळू शकतील, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. विशे, म्हणजे बंदी घातलेल्या या मांजाची विक्री अव्वाच्या सव्वा दराने होत आहे. नायलॉनच्या मांजामुळे पशू-पक्षी, पर्यावरणास मोठी हानी होत आहे. अनेक वेळा नायलॉनमुळे अपघात झालेले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे नायलॉनच्या मांजावरील बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

इमारती, झाडांवर अडकलेला मांजादेखील तितकाच घातक आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात नायलॉन मांजानिर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यापाठोपाठ पोलिस आयुक्‍तालयातर्फे नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, असे असतानाही बंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. जुने नाशिक परिसरासह शहरातील बहुतांश पतंग व मांजा विक्रेत्यांकडे सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होत आहे. उलट बंदी असल्याने मांजाची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री होत आहे. यावर पोलिसांची भूमिका मात्र बघ्याचीच असल्याचे चित्र आहे. भद्रकालीतील काही दुकानांमध्ये होलसेल व्यापारीदेखील या मांजाची खरेदी करीत असून, ग्राहक पाहून मांजा दाखवला जात आहे.

--

येथे होतेय विक्री

शहरातील भद्रकाली, रविवार पेठ येथे या मांजाच्या विक्रीने जोर पकडला असून, मागील दरवाजाने याची ने-आण होताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने या मांजाच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना छुप्या मार्गाने होणाऱ्या विक्रीबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, त्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शहराच्या उपनगरांतही अशीच स्थिती दिसून येत आहे.

--

मांजाचा प्रकार आणि दर

--

प्रकार- दर

मोनोकाइट - १२० रुपये रीळ

मोनोगोल्ड - १०० रुपये रीळ

मोनोफिल - १५० रुपये रीळ

आयव्हीके - ७० रुपये रीळ

---

शंभरावर व्यक्तींना इजा

नायलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी शंभरच्या वर व्यक्ती जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत; परंतु नायलॉनचा मांजा वापरणारेही त्यापासून बोध घेत नाही व तयार करणारेही बोध घेत नाही. खासगी रुग्णालयांत या मांजामुळे जखमी झालेल्या शंभराहून अधिक रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. यात अनेकांच्या कान, नाक, गळा आणि हाताला इजा झाल्याचे आढळून आले होते. नायलॉनच्या मांजावरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अनेक स्वयंसेवी संघटनांनी पोलिसांना साकडे घातले होते. केवळ मनुष्यच नव्हे, तर पक्षीदेखील या मांजामुळे जखमी झालेले आहेत. नाशिकच्या पक्षीमित्र संघटनेने व नेचर क्लबने अनेक जखमी पक्षी रुग्णालयात दाखल केले होते.

--

सिडकोत बालिका जखमी

सिडको परिसरातील गणेश चौकात रहाणारी कल्याणी पाटील ही मुलगी आईसोबत दळण आणायला जात असताना अचानक नायलॉनचा मांजा खाली आला व त्याचा फास तिच्या गळ्याला बसला. त्यामुळे तिच्या गळ्याला मोठी जखम झाली अाहे. जिवावर बेतू शकणाऱ्या प्रकारानंतर नायलॉन मांजाच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरणाचा टक्का वाढला

0
0

तुषार देसले, मालेगाव

शहरातील लसीकरणाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता केंद्राच्या विशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान शहरात सध्या राबविले जात आहे. एकूण चार टप्पात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे दोन टप्पे पार पडले असून, लसीकरणाचे प्रमाण ६३ टक्क्यापर्यंत गेले आहे. शहरातील मुस्ल‌िमबहुल भागात लसीकरणास नकार देणाऱ्यांचे मत आता बदलत असल्याचे या आकडीवारीवरून दिसत आहे.

लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राज्यात ७ ऑक्टोबरपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य योजनेतंर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. मालेगावात राज्यस्तरीय शुभारंभ ८ ऑक्टोबर रोजी येथील सामान्य रुग्णालय प्रांगणात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला होता. यानंतर ८ ते १७ ऑक्टोबर दरम्यान पहिला टप्पा राबविण्यात आला. यात एकूण ३६२ सत्रात लसीकरण करण्यात आले. या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाने एकूण १४ हजार ८ बालकांना लसीकरण करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले होते. पालिकेच्या आरोग्यविभागने राबविलेल्या या मोहिमेत प्रामुख्याने मुस्ल‌िमबहुल पूर्व भागातील बालकांना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. यात ६ हजार २६१ बालकांना लसीकरण करण्यात यश आले असून पहिल्याच टप्प्यात लसीकरणाची टक्केवारी ४५ पर्यंत पोहोचली आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १६ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला. या टप्प्यात एकूण ११ हजार ४५७ बालकांपैकी ७ हजार ५४६ बालकांना लसीकरण करण्यात आले. या अभियानामुळे जेमतेम ३५ ते ४० टक्के लसीकरणाचे प्रमाण आता ६३ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.

अभियानाचे अद्याप दोन टप्पे बाकी असून डिसेंबर व जानेवारी २०१८ मध्ये होणार आहेत. त्यामुळे या पुढील दोन टप्प्यात लसीकरण करण्यास नकार देणा-यांचे मतपरिवर्तन घडवून त्यांच्या बालकांना देखील लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे असणार आहे.

गरोदर मातांना लसीकरण

विशेष मिशन इंद्रधनुष्य अभियानअंतर्गत ० ते २ वयोगटातील बालकांसह गरोदर मातांना देखील यात लसीकरण केले जाते. त्याअंतर्गत पहिल्या टप्यात १ हजार २५९ तर दुसऱ्या टप्प्यात एक हजार २२५ गरोधर मातांना लसीकरण करण्यात आले. पूर्व भागात बहुतांशी कामगार व मजुरी करणाऱ्या महिला असल्याने आरोग्य विभागाकडून त्यांना लसीकरण करण्यात येत आहे.

धर्मगुरूंची होतेय मदत

शहरातील पूर्व भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुस्ल‌िम बांधवांमध्ये लसीकरणबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी मुस्ल‌िम धर्मगुरूंची मदत घेतली जात आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या समवेत डॉ. पाडवी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मोहम्मद अब्दुल अझर यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अशी आहे यंत्रणा
१५ वैद्यकीय अधिकारी
६३ परिचारिका
१३२ आशा वर्कर्स
२१० अंगणवाडी सेविका
९ केंद्राद्वारे लसीकरण


इंद्रधनुष्य अभियान

पहिला टप्पा
४५ टक्के (१ हजार २५९ )
दुसरा टप्पा
६३ टक्के (एक हजार २२५)
६ हजार २६१ बालकांना लसीकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान गटात सोहम, तनय प्रथम

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथील शिक्षण मंडळ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञाननगरीमध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शन व गणित कार्यशाळेचा निकाल निुकताच जाहीर झाला. विज्ञान गटात सोहम सावंत, तनय पवार, उमेश गोसावी, तर गणित कार्यशाळेत अलिशा मणियार, प्राची गायकवाडने प्रथम क्रमांक मिळविला.

शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांची विज्ञान व गणित विषयातील गोडी बघून मुलांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर घालण्यासाठी प्रकल्प साकारत त्यांच्या बौद्धिक विकासाला वाढ देण्याचे कार्य केले आहे. २१ व्या शतकात भारताला प्रगत करण्यासाठी त्याची गरज असल्याचे प्रतिपादन मेळाव्याच्या समारोपप्रसंगी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य किशोर पवार, नगरसेवक भगवान कटारिया, कावेरी कासार, गंगाधर कुकडे, राधाकृष्ण गामणे, कचरू वीर, निवृत्ती रौंदळे, मधुकर कापसे, जितेंद्र भावसार आदी प्रमुख पाहुणे होते.

प्रवीण रोकडे यांनी प्रदर्शनातील प्रकल्पांचा अहवाल सादर केला. प्रदर्शनात ग्रामीण भागातील ६० शाळांनी सहभाग घेत १५० विज्ञान प्रकल्प, तर गणित कार्यशाळेत एकूण ४५ प्रकल्प सादर केले. प्रदर्शन व मेळाव्याच्या मुख्याध्यापक लता जोशी, रामदास जाधव, कैलास वाघ आदींनी संयोजन केले. मधुसूदन गायकवाड, कृष्णा लोखंडे, अनिल कवडे, सुनील कापसे, नीलेश गोसावी, अशोक बोराडे, संदीप गायकवाड, विशाल शिरसाठ, ललित भदे, विलास म्हसाळ, वैशाली गायकवाड, भारती चौधरी, सारिका भावसार, वैशाली मुठाळ आदींनी सहकार्य केले. पारितोषिक वितरणप्रसंगी गोविंद आहेर, शशिकांत वैद्य, रामदास आंबेकर, हसानंद निहलानी, चंद्रशेखर कोरडे, भगवान देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कल्चर क्लब’चे डिसेंबरमध्ये गेट टुगेदर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सभासदांसाठी डिसेंबर महिना मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. गेट टुगेदर, म्युझिकल प्रोग्रॅम समवेत स्नॅक्सचा आनंद असा हा महिना एन्जॉयमेंटचा राहणार आहे. या एन्जॉयमेंटमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कलचर क्लबचे सभासद होण्याची संधी चालून आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात म्युझिकल प्रोग्रॅमने होईल. यात मराठी भावगीते, हिंदी चित्रपटातील गाणी तसेच सोबत स्नॅक्स अशी मेजवानी सभासदांना मिळणार आहे. त्यामुळे आजच कल्चर क्लबचे सभासदत्व मिळवले तर तुम्हीही या वेगवगेळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकणार आहात. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी आधीच रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केवळ कल्चर क्लब सदस्यांसाठी असल्याने आजच कल्चर क्लबचे सभासद व्हा. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क -०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.comवर लॉग इन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे हडपणाऱ्यांना अटक करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हजारो गुंतवणूकदारांचे पैसे हडप करणाऱ्या मोतेवारांच्या नातेवाईकांना अटक झालीच पाह‌िजे, गुंतवणूकदारांचे पैसे तातडीने मिळालेच पाह‌िजे अशा मागण्या करत समृद्ध जीवन गुंतवणूकदार बचाव समितीच्या वतीने सोमवारी शहरात मोर्चा काढण्यात आला.

बी. डी. भालेकर मैदानापासून निघालेला मोर्चा शालिमार, महाबळ चौक, मेहेरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. संपूर्ण जिल्ह्यातून व महाराष्ट्राच्या काही भागातून आलेल्या मोर्चेकरांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून संस्थेचे ऑफिस बंद आहे. सरकारने संस्थेची मालमत्ता जप्त केली आहे. या संस्थेची जप्त केलेली मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्यात यावेत. त्याचप्रमाणे काही मालमत्ता या संस्थेच्या संचालकांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत. त्याच्यावरदेखील जप्ती आणावी. या योजनेमुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेनासा झाला असून, पैशांअभावी मुलींची लग्ने करता येत नाहीत. मागील अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालू, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्याबाबत काहीही झाले नाही. सरकारने संस्थेवर कारवाई केल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी राजरोस रस्त्याने फिरत आहेत. त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. संस्थाचालक एवढ्यावरच थांबलेला नाही, तर त्याने जेलमध्ये बसून नातेवाईकांमार्फत दुसऱ्या कंपन्यांची स्थापना केली आहे. यावरदेखील संबंध‌ित तपास अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व पुढे होणारी लोकांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ज्या गुंतवणूकदारांचे पैसे या घोटाळ्यात गेले, अशा गुंतवणूकदारांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकही मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात नाशिकरोडचे दोन तरुण ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सोनगिरी परिसरात ब्राह्मणवाडे-शिंदे रस्त्यावर बुलेटच्या अपघातात सुयश बाळासाहेब पाटील (वय २८) व विशाल विजय वाटपाडे (वय २४, दोघे रा. गणेशनगर, जेलरोड, नाशिकरोड) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

सुयश पाटील व विशाल वाटपाडे बुलेट मोटारसायकलने (एमएच १५/ जीबी ५०१६) नायगाव-शिंदे रस्त्याने जात असताना रात्री साडेआठच्या सुमारास सोनगिरी फाट्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. अपघातात दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शासकीय रुग्णवाहिकेशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. मात्र, या रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याने कुठलीही शहानिशा न करता मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे तणावाची परिस्थिती उद््भवली होती. तोपर्यंत एमआयडीसी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत वातावरण शांत केले व खासगी रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दोन गटांत हाणामारी

सिन्नर फाटा ः जागेच्या हद्दीवरून झालेल्या वादात सोमवारी कोटमगाव येथे दोन गटांत हाणामारी झाली. हाणामारीच्या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकरोडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्हीही गटांतील सात जणांविरोधात एकमेकांच्या तक्रारींवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्हीही गटांतील हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कोटमगावी तक्रारदार ज्ञानेश्वर गणपत म्हस्के आणि दुसरे तक्रारदार संतोष वाळू म्हस्के शेजारीशेजारी असून घराच्या जागेच्या हद्दीवरून या दोघांमध्ये काही वर्षांपासून वाद सुरू होता. सोमवारी अखेरीस या दोघांतील वाद विकोपाला गेल्याने दोन्हीही गटांत हाणमारी झाली. यात दोघेही जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर म्हस्के याच्या तक्रारीवरून वाळू रुंझा म्हस्के, राजु रुंझा म्हस्के, संतोष वाळू म्हस्के, विशाल म्हस्के यांच्या विरोधात, तर संतोष वाळू म्हस्के याच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर गणपत म्हस्के, विष्णू गणपत म्हस्के व सूरज म्हस्के यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गटांतील समर्थकांनी सोमवारी रात्री नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.

सोन्याची चेन लंपास

नाशिक ः कारची काच फोडून चोरट्यांनी शनिवारी हँडबॅग लंपास केली. बॅगेत दीड तोळे वजनाची सोन्याची चेन आणि मोबाइल असा सुमारे ३९ हजार रुपयांचा ऐवज होता. ही घटना वर्दळीच्या गंगापूररोडवर घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गौरव सुभाष राठोड (रा. वर्तकनगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी नातेवाइकांना भेटण्यासाठी राठोड शहरात आले होते. गंगापूर रोडवरील दिवट्याबुधल्या हॉटेलसमोर स्विफ्ट कार (एमएच ४६/ व्ही ९९८१) पार्क करून ते नातेवाइकाकडे मुक्कामी थांबले. या वेळी चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून हँडबॅग लंपास केली. हवालदार कोकाटे तपास करीत आहेत.

सिडकोत तरुणाची आत्महत्या

सिडकोतील सुभाषचंद्र चौकातील १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साकीब आयाज शेख (रा. सुभाषचंद्र बोस चौक) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. साकीबने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. हवालदार धरम तपास करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळगाव बहुला येथील एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली असून, या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नाना कडाळे (वय ५५, रा. पिंपळगाव बहुला) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कडाळे रविवारी त्र्यंबकरोडने घराकडे पायी जात असताना हा अपघात झाला. पिंपळगाव बहुला गावाजवळ भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हवालदार खरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ला आंतरराष्ट्रीय सन्मान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रशियन फेडरेशन, मॉस्को ह्या संस्थेतर्फे ‘युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल’मध्ये नाशिकच्या ‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ ह्या मराठी लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ या विभागात विजेता घोषित करण्यात आले आहे. वेळेनुसार विभागणी करुन दिलेल्या विजेत्यांच्या गटात चाळीस मिन‌िटांतल्या श्रेणीत हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला.

गेल्या काही वर्षांपासून अभिषेक कुलकर्णी आणि प्राजक्त देशमुख ही जोडगळी लघुपटक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत आहे. अभिषेक कुलकर्णी हा उत्तम फोटोग्राफर, छायांकनकार आणि दिग्दर्शक आहे, तर प्राजक्त देशमुख हे मराठी रंगभूमीवरचे परिच‌‌ित नाव आहे. ‘इन सर्च ऑफ विठ्ठला’ हा लघुपट रशियन फेडरेशन, मॉस्को या संस्थेतर्फे ‘युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल’मध्ये विजेता ठरलेला आहे. तसेच हॉलीवूड फिल्म कॉम्पिट‌िशन, लॉस एंजेलिस २०१७ मध्ये या लघुपटाची अधिकृत निवड झालेली आहे. ‘वारी’ या विषयावर केलेल्या लघुपटात आत्मशोधावर आधारित असलेल्या प्राजक्त देशमुख यांच्या मुक्त काव्याच्या आधारे आणि वारीतल्या दृश्यांची गुंफण करुन एक अमोघ असा अनुभव ह्या लघुपटातून दाखवला गेला आहे. याला तितकीच पूरक सांगीत‌िक साथ आनंद ओक आणि त्यांच्या स्पंदनच्या चमूने दिली आहे. लघुपटातले शब्द ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांचे आहेत.


दिग्दर्शक म्हणून प्रत्येक पुरस्कारासोबत जबाबदारी वाढत जातेय. पुढंचे काम आणखी वरच्या उंचीवर नेण्याचे चांगल्या अर्थाने दडपण आहे. प्राजक्त आणि मी अनेक विषयांवर चर्चा करीत असतो. लवकरच एक नव्या लघुपटाला आम्ही सुरुवात करणार आहोत. विठ्ठलाचा शोध आम्हाला वेगवेळे सन्मान मिळवून देतोय, हे खूप आनंददायी आहे. मी आणि माझी कारा फिल्म्सचे सगळे सहकारी या सन्मानाने भारावलो गेलो आहोत.

-अभिषेक कुलकर्णी, दिग्दर्शक, छायांकन

हे सगळं अविश्वसनीय आहे. आपली सृजनात्मक कामं ही सॅटेलाइटसारखी असतात, या मतावर मी आलो आहे. सॅटेलाइटमध्ये पृथ्वीची गुरुत्व शक्ती भेदण्यापर्यंतच इंधन असतं. एकदा ते भेदलं की पुढे ते त्याचं त्याचं फिरत राहतं आणि उंची गाठत राहातं. आम्ही या लघुपटासाठी घेतलेली मेहनत तशीच आहे. त्यामुळे वर्षभरानंतरही त्याला विविध सन्मान मिळताहेत. गेलं वर्ष भारतातले सन्मान मिळाले आणि आता हे परदेशी सन्मान. आमच्यामुळे नाशिकच्या नावाचा झेंडा सगळीकडे फडकतोय ही अभिमानाची गोष्ट आहे.

-प्राजक्त देशमुख, लेखक, पटकथा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी खर्चच होईना!

0
0

कैलास येवला, सटाणा

राज्य शासनाकडून आदिवासी भागातील जनेतेसाठी सुरू करण्यात आलेल्या मानव विकास कार्यक्रमांना सरकारी अनास्थेमुळे अल्प प्रतिसाद मिळत आहे. गरजवंतांपर्यंत संबंधित विभाग वेळेवर पोहोचत नसल्यामुळे या उपक्रमातील निधी तर पडून आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यासाठी तब्बल एक कोटी १४ लाख रुपये इतका निधी देण्यात आहे. मात्र या योजना अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. यातील ५४ लाख ९१ हजार रुपये पडून आहेत.

सन २०१७-१८ अंतर्गत बागलाण तालुक्याकरिता देण्यात आलेल्या निधी खर्च करण्यासाठी आर्थिक वर्ष संपुष्टात येत आहे. त्यामुळे सटाणा येथे झालेल्या बैठकीत या विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सबंधित योजना विभागाच्या प्रमुखांना धारेवर धरले. विद्यमान आमदार दीप‌िका चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

मानव विकास कार्यक्रम योजनेतंर्गत गर्भवती मातांची व बालकांची आरोग्य तपासणी करणे, द्रारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरीचे वाटप करणे, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये असलेल्या अभ्यासिकांसाठी खर्च देणे, बालभवन विज्ञान केंद्रास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान देणे, ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकल वाटप करणे, तसेच याच मुलींसाठी गाव ते शाळा वाहतूक बस सुविधेसाठी खर्च देणे यासाठी ‌िनधी देण्यात आला आहे. सन २०१६-१७ मध्ये बागलाण तालुक्यातील ८ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींसाठी गाव ते शाळा पर्यंतच्या प्रवासासाठी ६ बसेसकरिता ४२.२४ लाख रुपये परिवहन मंडळास देण्यात आलेले आहेत. सहा बसेस सुरू आहेत. मात्र गर्भवती मातांची व बालकांची आरोग्य तपासणी व औषधोपचारासाठी तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना दरमहा २ व ग्रामीण रुग्णालयात दरमहा १ याप्रमाणे आरोग्य शिब‌िरे आयोजित करण्यासाठी २७.५२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. मात्र ऑक्टोबरअखेर यातील केवळ १७.१९ लाख रुपयेच खर्च झाले. काही शिबिरे कागदारवरच होत असल्याची तक्रार आहे. तपासणीसाठी येणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनातही तफावत आहे.

साल्हेर आरोग्य केंद्र मागे

तालुक्यातील अकरा आरोग्य केंद्रापैकी बहुतांश आरोग्य केंद्रांनी कमी-अधिक प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत सदर योजना पोहोचविली आहे. साल्हेर या १०० टक्के आदिवासी असलेल्या भागातील सर्वच लाभार्थी या योजनेपासून वंचित असल्याचे निर्देशनास आले आहे.यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता बहुतेक लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. राष्ट्रीयकृत बँकांकडून ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधारकार्डचा आग्रह धरला जात असल्याने जनता या लाभांपासून वंचित आहे.

सायकल वाटपही रखडले

घर ते शाळा ० ते ५ किलोमिटर अंतरावर राहणाऱ्या ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकलसाठी प्रत‌ि लाभार्थ्यांस तीन हजार रुपये देण्यात येतात. बागलाणमध्ये सन २०१७-१८ करिता ५१ शाळांमधून ६६६ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. यासाठी १९.९८ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत केवळ नामपूर शाळेतील १८ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले आहेत.

बाळंत महिला प्रतीक्षेत

आदिवासी भागातील अनुजाती व अनुसुचित जमातीसह द्रारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुड‌ित मजुरीचे वाटप धीम्या गतीने सुरू आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ३२९५ पात्र लाभार्थ्यांपैकी अवघ्या ७९२ लाभार्थ्यांनाच निधी मिळाला आहे. ७९२ लाभार्भी महिलांना ३०.३४ लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चालकामुळे बचावले विद्यार्थी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील औंदाणे गावात सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास थांब्यावर बसच्या प्रतिक्षेत असलेली १५ शाळकरी मुले मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे बालबांल बचावली.

विंचुर-शहादा-प्रकाशा महामार्गावर वसलेले औंदाणे गाव हे सटाणा शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर आहे. या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. यानंतर इयत्ता ५ वीपासून तर उच्चशिक्षणासाठी विद्यार्थी सटाणा येथे दररोज बसने ये-जा करतात. या गावासाठी अधिकृत बस थांबा नाही, की बसेस थांबण्यासाठी निवाराशेड नाही. परिणामी शालेय विद्यार्थी महामार्गाच्या कडेला बसेसची प्रतिक्षेत असतात. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही मुले या महामार्गावर बसच्या प्रतिक्षेत उभे होते. सुरतकडून सिन्नरकडे ट्रक (जीजे ०५ वायवाय ८०४३) २४ टनांचे लोखंडी पत्रे घेऊन जात होता. त्याचवेळी सटाण्याकडे येणाऱ्या बसने या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे थांबा घेतला. शालेय विद्यार्थी यावेळी बसमध्ये चढतच असताना समोरून देखील भरधाव ट्रक आला. मागून येणाऱ्या ट्रकचालकाने प्रसंगावधान आळखून काही सेकंदाआधीच ब्रेक दाबल्याने ट्रक महामार्गावर पलटला. यामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर ट्रक चालकास कोणतीही इजा झाली नसून, क्लिनर गंभीर जखमी आहे. ट्रकचालक कमलेश पवार यांच्या चाणाक्षपणामुळे १५ विद्यार्थी बचावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद मार्ग हस्तांतरणास नकार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेठरोडची देखभाल आपण करीत असल्याचे सांगत महापालिकेने पेठरोड हस्तांतरणाची तयारी दर्शवली असून औरंगाबाद रोडबाबत नकार कळविला आहे. औरंगाबाद रोडची देखभाल दुरुस्ती खर्चिक असल्याने महापालिकेने हा रस्ता आमच्याकडे नकोच, असा पवित्रा घेतला आहे.
दारू दुकांनाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयातून सुटका करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी व मद्यविक्रत्यांनी केलेले अतातायी प्रयत्न आता महापालिकेच्या अंगलट येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशातून पळवाट काढण्यासाठी पेठरोड आणि औरंगाबादरोड महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु, हा निर्णयच आपल्या क्षेत्रात लागू होत नसल्याने महापालिकेनेही हात झटकले आहेत.
महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पेठरोड आणि औरंगाबाद रोड महापालिकेकडे अवर्गीकृत करण्याचा निर्णय सरकारने घेत त्यासंदर्भातील पत्र महापालिकेला प्राप्त झाले होते. पेठरोडची देखभाल व दुरुस्ती ही महापालिकेकडूनच केली जात आहे. मात्र, औरंगाबाद रोडची देखभाल व दुरुस्ती महापालिकेकडे नसतांनाही हा रस्ता हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला होता. दारू दुकाने व बारमालकांना दिलासा देण्यासाठी या दोन्ही रस्त्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. परंतु आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा महापालिका क्षेत्रासाठी लागू होत नसल्याने महापालिकेनेही आस्तेकदमचे धोरण स्वीकारले आहे. पेठ रोडची देखभाल दुरुस्ती महापालिकाच करत असल्याने हा रस्ता ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. मात्र, औरंगाबाद रस्त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग यापूर्वी करत होता. त्यामुळे यापुढेही आपण हा रस्ता ताब्यात घेणार नसल्याचे महापालिकेने सार्वजनिक बांथकाम विभागाला कळवले आहे.

चारशे कोटींची गरज
औरंगाबाद रस्ता ताब्यात घेतला तर त्याच्या भूसंपादनासाठी तसेच नवीन रस्ता तयार करण्यासाठी जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटींचा आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे ही आर्थिक बाब सध्या परवडणारी नसल्याने महापालिकेने हा रस्ता हस्तांतरणाला विरोध केला आहे. त्यामुळे औरंगाबाद रस्त्याची देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाला करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथदर्शी वीज निर्मिती कार्यान्वित

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन सरकार आणि भारत सरकार यांचे संयुक्त प्रयत्नातून नाशिकमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती हा पथदर्शी प्रकल्प बुधवारपासून कार्यान्वित होणार आहे. जर्मनीच्या जीआयझेड कंपनीकडून लाभलेल्या तांत्रिक व आर्थिक सहकार्यातून या प्रकल्पामधून दरमहा एक लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा प्रारंभ होणार आहे.

सदर प्रकल्पासाठी आठ कोटी इतका खर्च अपेक्षित असून जीआयझेडकडून महापालिकेस सहा कोटी ८० लाख रुपये अनुदान मिळाले आहे. तर उर्वरित रक्कम प्रकल्प उभारणी कंपनी करणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नसून केवळ सहा हजार चौरसमीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर प्रकल्प उभारणीचे काम मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंन्ट प्रा. लि. बंगलोर यांच्यामार्फत करण्यात आले आहे. दहा वर्षांसाठी संपूर्ण प्रकल्प चालविणे, देखभाल व दुरुस्ती करणेचे काम सदर कंपनी मार्फत करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारा ओला कचरा (हॉटेल वेस्ट व भाजीपाला वेस्ट) व मलजल वाहतुकीची जबाबदारी सुद्धा कंपनीची राहील. सदर कंपनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून वीज निर्मिती तयार होणाऱ्या वीजेतून नाशिक महापालिकेस दरमहा सुमारे ९९ हजार युनिट इतकी वीज पुरविणार आहे. सदर प्रकल्पात तयार झालेली वीज महावितरण कंपनीच्या पॉवर ग्रीडला जोडण्यात येणार असून जेवढी वीज पॉवर ग्रीडमध्ये टाकण्यात येईल तेवढे युनिट महापालिकेस इतर वीज देयकातून सूट मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images