Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उत्पादनांची नव्हे, दराची चिंता

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक


देशाला कृषी उत्पादनाच्या उद्दिष्टाची चिंता नाही तर कृषी मालाला भाव कसा चांगले मिळेल, याची चिंता असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांनी व्यक्त केली.

अंबड येथील द ताज गेट वे हॉटेल येथे बाँबे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्र‌िजच्या अॅग्र‌िकॉर्प-२०१७ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत न‌िती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांनी मार्गदर्शन केले. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्र‌िजचे महासंचालक विजय श्रीरंगन, सहसंचालक एस. जयकुमार, समिती सदस्य राजन राजे, एस. के. गोयल आणि समिती सदस्य चेतन डेढिया उपस्थित होते.

देशांतर्गत शेतमालाच्या उत्पादनाला आणि व्यापाराला एक ठोस दिशा देण्याची गरज असून, शेतमालाच्या किमतीचा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रचलित बाजारव्यवस्थेत बदलत्या काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. प्रचलित बाजारव्यवस्थेचे आयुष्य आता संपले असून, सध्याचा जमाना मॉडर्न व्हॅल्यू चेनचा आहे. व्हॅल्यू चेन अर्थात मूल्यवर्धित सेवांच्या शृंखलेचा आहे. आणि तसेच बदल बाजारव्यवस्थेत गरजेचे असल्याचेही डॉ. रमेश चंद म्हणाले.

डॉ. चंद यांनी या परिषदेतून कृषी मालाला चांगला भाव मिळेल यासाठी रोड मॅप देण्याचे आवाहनही केले. हा रोड मॅपवर निती आयोगात चर्चा करून धोरणात काय बदल करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे शेतमालाच्या किंमती प्रत्येक राज्यानुसार बदलताना दिसतात. किंमतीतील हा बदल कशामुळे निर्माण होतो, याचाही विचार होणे आवश्यक आहे. बाजार समिती कायद्यात सुधारणांचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला. परंतु या सुधारणा काही राज्यांमध्ये अंमलात आल्या नाहीत.

काही राज्यांमध्ये या सूचनांच्या अंमलबजावणीकडेही म्हणावे तसं लक्ष दिले गेले नाही. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत महाराष्ट्र नेहमी अग्रेसर रहात आला आहे. महामँगो, महाग्रेप, सह्याद्री फार्मिंग, जैन इरिगेशन अशी काही उदाहरण यासंदर्भात देता येतील, असे प्रयत्न व्यापक स्वरुपात होण ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

परिषदेचा उद्देश

या परिषदेत बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्र‌िजतर्फे संचालक विजय श्रीरंगन यांनी स्वागत करतांना परिषद घेण्यामागील उद्देशही स्पष्ट केलाकृषी क्षेत्रातील उत्पादकांपासून सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी एक सशक्त मुल्य शृखंला (व्हॅल्यु चेन) तयार करणे, या शृंखंलेमध्ये अधिकाअधिक गुंतवणूक व्हावी यासाठी मार्ग सुचविणे, उत्पादकांची माहिती देणे. त्याचप्रमाणे शेतकरी, शेतीमाल उत्पादक संस्था, लघू व मध्यम संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, बँका, वित्तसंस्था, आणि राज्य व केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांना एकत्र आणण्यासाठी एकच व्यासपीठ तयार करणे हे या मागील उद्दिष्ट आहे. जैन इरिगेशनचे डॉ. डी. एन. कुलकर्णी यांनी या परिषदेचे महत्व सांगितले. ईपीसी इंडस्ट्रीजचे संजीव मोहिनी यांनी प्रेझेंन्टेशन सादर केले.

राज्य सरकारच्या कृषी विभागाचे सचिव डॉ. एस. के. गोयल, निचेम सोल्युशनचे सीईओ रंजन राजे, सह्याद्रीचे विलास शिंदे, महाफेडचे योगेश थोरात, नाबार्डचे डॉ. यू. एस. सहा, वरुण अॅग्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर मनिषा धात्रक यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करार शेती धोरण पंधरा दिवसांत

$
0
0


नाशिक : शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी करार शेतीबाबतचे धोरण निती आयोगाने तयार केले असून, येत्या पंधरा दिवसांत ते राज्यांना सादर केले जाईल, अशी माहिती न‌िती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी दिली. कृषी क्षेत्रात महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रातील मार्केटिंग, करार शेती आणि संधोधनात चांगले काम केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

देशाच्या व्यापार धोरणात लवकरच काही महत्त्वाचे बदल केले जाणार असल्याचे सूतोवाच चंद यांनी केले. प्रामुख्याने आयात-निर्यातीसंदर्भातील निकषांचा विचार हे धोरण आखताना केला जात असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आपल्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती फ्युचर ट्रेडिंग तसेच पिकांच्या भविष्यातील किमती आधीच ठरवता येतील काय, याविषयीच्या शक्यतांचा अभ्यास करणार असल्याची माहितीही चंद यांनी दिली. सध्या देशातील मोठ्या शहरांमध्ये चांगल्या शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी गावाबाहेर पाठवावे, असा सल्लाही चंद यांनी दिला.

२५ हजार कोटींची तरतूद

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रासाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारचा वाटा १५ हजार कोटी, तर राज्य सरकारांचा वाटा १० हजार कोटींचा असेल. येत्या तीन वर्षांत कृषी क्षेत्रात हा पैसा ओतला जाईल. तसेच यापैकी २० टक्के रक्कम व्हॅल्यू चेन अर्थात मूल्यवर्धित सेवांवर खर्च केली जाणार असल्याची माहिती चंद यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांचा टीव्हींवर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर परिसरात चोरट्यांनी घरफोडीमध्ये महागडे टीव्ही लंपास केले. विश्वासनगर आणि माळी कॉलनीमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी तीन टीव्ही चोरून नेले. त्यात एकाच इमारतीतील दोन ठिकाणांचा समावेश आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सातपूरमधील विश्‍वासनगर येथील एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून चोरट्याने दोन टीव्ही चोरून नेले. नानासाहेब ज्ञानदेव गवळी (रा. उमाकुंज अपार्टमेंट, विश्‍वासनगर, सातपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गवळी यांच्याच इमारतीत राहणारे समाधान पुंडलिक पाटील हे दोन्ही कुटुंबीय ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दोन्ही बंद घरे फोडून एलसीडी व एलइडी टीव्ही चोरून नेले. तिसरी घटना माळी कॉलनीत घडली. रामराव तुकाराम वानखेडे (रा. श्रीराम बंगला, माळी कॉलनी) यांचे घर ६ ते १३ नोव्हेंबर बंद असताना चोरट्यांनी लोखंडी कुलूप तोडून हॉलमध्ये लावलेला एलइडी टीव्ही चोरून नेला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक जाधव आणि चव्हाण करीत आहेत.

उघड्या घरातील दागिने लंपास
घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना वडाळारोड भागात घडली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुवर्णा प्रशांत खैरनार (रा. व्हिस्टा फेज, आरविंग, वडाळारोड, इंदिरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरीची घटना ८ ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली. सकाळच्या सुमारास खैरनार कामानिमित्त इमारत उतरून खाली गेल्या. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील रोकड व दागिने असा सुमारे ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक निकम करीत आहेत.

मायलेकीचा विनयभंग
कौटुंबिक वादातून नातेवाईक असलेल्या दोघांनी माय-लेकींचा विनयभंग केल्याची घटना वडनेर गावात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये संशयितांविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण (पोस्को) व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
जगदिशसिंग यादवराम यादव (६०) व सरबत्ती जगदिशसिंग यादव (५५, रा. वडनेरगाव) अशी संशयितांची नावे आहेत. पीडित महिला दिल्ली येथील असून, ती आणि तिची १२ वर्षीय मुलगी संशयितांच्या घरी २२ एप्रिल ते १६ जून २०१७ दरम्यान राहत असताना ही घटना घडली होती. नातेवाईक असलेल्या जगदिशसिंग यादव याने अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून लज्जास्पद उद्‌गार काढून वाईट नजरेने पाहिले. तर महिलेचा हात धरून दोघांनी अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास महिला उपनिरीक्षक तेली करीत आहेत.

९३ हजार रुपयांची डिकीमधून चोरी
काम आटोपून मैदानावर फिरण्यासाठी गेलेल्या नोकरदार महिलांच्या दुचाकींच्या डिक्कीतून तीन पर्स चोरट्यांनी हातोहात लांबविल्या. हा प्रकार गोल्फक्लब मैदानावर घडला असून, तीन पर्समध्ये तब्बल ९३ हजार रुपयांची रोकड होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फिरदोस शेख (रा. पखालरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेख एका बँकेत नोकरीस असून, त्या व त्यांच्या सहकारी नेहमीप्रमाणे बुधवारी (दि. १५) सायंकाळी फिरण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर पोहचल्या होत्या. दोघा महिलांनी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास पश्चिम प्रवेशद्वारावर आपल्या (एमएच १५ जीसी ०११८ आणि एमएच १५ ईके ८४५७) दुचाकी पार्क केल्या. चोरट्यांनी या दोन तसेच अन्य एका महिलेच्या दुचाकीची डिक्की तोडून पर्स चोरी केल्या. यामध्ये सुमारे ९३ हजाराची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. घटनेचा अधिक तपास हवालदार ठाकुर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटमार करणारा तरूण जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परप्रांतीय तरूणाचा रस्ता अडवून लुटमार करणाऱ्या संशयित आरोपीस भद्रकाली पोलिसांनी अटक केली. लुटमारीची घटना शालिमार परिसरात भरदिवसा घडली होती. जावेद महम्मद शेख उर्फ डेग्या (२२ रा.रसुलबाग कब्रस्थान, खडकाळी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

गंगापूररोडवरील मते नर्सरी परिसरात राहणारे भागिरथ पन्नालाल जांगिड (३५, मूळ रा. लक्ष्मणगढ, जि. सिकर, राजस्थान) या परप्रांतीय तरूणास शनिवारी शालिमार परिसरात डेग्याने लुटले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शालिमार बस थांबा भागात रस्ता अडवून कुठलेही कारण नसताना बेदम मारहाण करीत खिशातील सुमारे १५ हजार रुपयांचा मोबाइल संशयिताने पळविला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. उपनिरीक्षक अनमोल केदार यांना मिळालेल्या माहितीवरून डेग्यास अटक केली असून त्याच्या ताब्यातून मोबाइल हस्तगत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाला अखेर आली जाग

$
0
0

अक्षय सराफ, कॉलेज क्लब रिपोर्टर

संदीप फाउंडेशनच्या कॉलेजसमोर सोमवारी (दि. १३) झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर ग्रामीण पोलिस तसेच कॉलेज प्रशासनाला जाग आली. कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस शिक्षण संस्थेच्या गेटसमोर कॉलेज आणि पोलिसांनी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.

त्र्यंबक रोडवर संदीप फाउंडेशन, सपकाळ नॉलेज हब, ब्रह्मा व्हॅली, विद्यामंदिर या शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमधून ६००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. याठिकाणी सकाळी साडेनऊ ते साडेदहा तसेच सायंकाळी साडेचार ते साडेपाच या कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस कॉलेज बसेस तसेच वैयक्तिक वाहनाने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे रस्त्यावर मोठी गर्दी होते.

संदीप फाउंडेशन कॉलेजमध्ये जाताना व बाहेर येताना विद्यार्थ्यांना व कॉलेज बसला दुभाजक ओलांडून जावे लागते. यामुळे याठिकाणी जास्तच वाहनकोंडी होते. बांधकाम विभागातर्फे त्र्यंबक रोडवर पुढे शाळा किंवा कॉलेज असल्याचा फलक लावण्यात आला नाही तसेच गतिरोधकही नाहीत. वाहनचालकांच्या वेगाला पायबंद बसत नाही. यातून संदीप फाउंडेशन, सपकाळ कॉलेज या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. संदीप फाउंडेशनसमोर यापूर्वीही २-३ गंभीर अपघात घडले आहेत. मागील महिन्यातच ‘संदीप’मधील दोन विद्यार्थ्यांचा आपल्या गाडीवरून रस्ता ओलांडताना येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यात विद्यार्थी गाडीच्या चाकाखाली जाता जाता वाचला. अशा प्रकारचे अनेक गंभीर अपघात त्र्यंबक रोडवर घडले आहेत. परंतु, दोन दिवसांपूर्वीच्या घटनेत हर्षिका सुर्वे या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला. अशा प्रकारचे अपघात पुन्हा घडू नयेत यासाठी कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस कायमस्वरूपी एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, सूचना दिशादर्शक व गतिरोधक लावावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

त्र्यंबक रोड बनतेय अपघाताचे केंद्र

त्र्यंबक रोडवर काही दिवसांपासून अपघात वाढत आहेत. सोमवारच्या अपघातात संदीप फाउंडेशनमधील विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला. गेल्या महिन्यात दुचाकीवरून त्र्यंबक रोड ओलांडणाऱ्या ब्रह्मा व्हॅली इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अवजड वाहनाने धडक दिली होती. यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. तसेच मागील महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात बचावला होता.

त्र्यंबक रोडवरील कॉलेजसमोर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले आहेत. परंतु, कॉलेज सुटण्याच्या वेळेस वाहतूक कोंडी होते आणि यातूनच अपघात घडतात.
- स्वागत अहिरे, विद्यार्थी

त्र्यंबक रोडवरील अनेक कॉलेज जवळ गतिरोधक व सूचना फलक नसल्याने वाहनचालक व बसचालक वेगात गाड्या चालवतात. यामुळे वारंवार अपघात घडतात.
- मनोज पवार, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेसाठी मतभेद विसरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक पालिका प्रतिष्ठेची असून, तेथे नगराध्यक्षांसह संपूर्ण भाजपची सत्ता आणण्यासाठी आपापसातील मतभेद दूर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी इच्छुक उमेदवारांना केले. भाजपकडून त्र्यंबकेश्वर पालिकेतील १७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा १८ जागांसाठी ९० जणांनी अर्ज केले आहेत.

गुरुवारी त्र्यंबक येथे भाजपचा मेळावा झाला त्यावेळी महाजन बोलत होते. नगरपालिकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखतीकरिता पालकमंत्री गिरीश महाजन स्वतः उपस्थित होते. नांदेड, ठाणे महापालिका वगळता सर्व महापालिका, बहुतांश जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या त्र्यंबक आणि इगतपुरीच्या पालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

त्यासाठी पालकमंत्री यांच्यासह भाजप नेत्यांनी त्र्यंबक आणि इगतपुरी येथे ठाण मांडले आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेतांना पालकमंत्री महाजन यांनी तिकीट वाटप हे मेरीटप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी मिळाली नाही तर नाराज होऊ नका, पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहा, असे आवाहन केले. गुरुवारी सकाळपासून येथील बडा उदासीन आखाड्याच्या प्रांगणात इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थकांनी मुलाखतींसाठी गर्दी केली होती.

इच्छुकांचे ९० अर्ज

प्रभागातील १७ नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षांची एक अशा १८ जागांसाठी ९० अर्ज आले आहेत. सकाळी ११ वाजता पालकमंत्री येणार म्हणून येथे इच्छुक उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पालकमंत्री महाजन दुपारी दोन वाजता आले. उपस्थित महिलांना मार्गदर्शन केल्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या. सर्वप्रथम नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मुखाखत झाल्या. महाजन यांच्यासह आमदार बाळासाहेब सानप, संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, सचिन ठाकरे आणि सुनील बच्छाव आदींनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार शिवसेनेत

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक पालिका निवडणूक जवळ येताच शहरात पक्षांतराला वेग आला आहे. गुरुवारी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धनंजय तुंगार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही पक्षप्रवेश मुंबई येथे पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत झाले.

धनंजय तुंगार यांनी शिवेसनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. तर योगेश तुंगार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते पंजाचा तिरंगा हाती घेतला आहे. धनंजय तुंगार हे थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. सन २००७ आणि २०१२ य दोन पंचवार्षीकला ते अपक्ष नगरेसवक म्हणून निवडून आले होते. यापूर्वी ते काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. तथापि २०१५ मध्ये झालेल्या नगराध्यक्षांच्या निवडणूक पेचप्रसंगात ते भाजपमध्ये गेले होते. इगतपुरी नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक युवराज भोंडवे, नरेंद्र कुमरे, धनंजय पवार, नगरसेविका उज्वला जगदाळे, वसीम सय्यद, सीमा जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या बैठकीत गटबाजी चव्हाट्यावर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बुधवारी सायंकाळी घोटी येथे जिल्हा संपर्कनेते तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी दिसून आली. अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केल्याने बैठकीतले वातावरण तापले होते. दरम्यान, मोठा पक्ष असल्याने या बाबी होत असल्या तरी आगामी

काळात कार्यकर्त्यानी व पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून पक्षकार्यालयात झोकून द्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

बैठकीच्या प्रारंभीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या स्पष्ट भावना व्यक्त केल्या. त्यावर पाटील यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मौलिक सूचना केल्या. यापुढे पक्षवाढीसाठी व संघटनात्मक वाढीसाठी सर्वांनी पुढे येऊन मोर्चे बांधणी करावी, तातडीने सभासद नोंदणी हाती घेऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. महिला कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी, तातडीने नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जि. प. सदस्य उदय जाधव, प्रभारी तालुकाध्यक्ष उमेश खातले, पांडुरंग वारुंगसे, सुनील वाजे, बाळासाहेब गाढवे यांनी आपल्या परखड भावना व्यक्त केल्या. नामदेव वाघचौरे, हिरामण खोंसकर, विष्णुपंत म्हैसधुणे, रामदास घारे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, नाशिक शहराध्यक्ष अर्जुन टिळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, नंदन भास्करे आदी उपस्थित होते.

इगतपुरी नगरपालिका प्रभारी निरीक्षक म्हणून अर्जुन टिळे व विष्णुपंत म्हैसधुणे यांची नियुक्ती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोंदू बाबाच्या घरी झाडाझडती

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अर्धवट सोडलेली पूजा पूर्ण केली नाही तर तुझे वडील मरतील, पूजा करावीच लागेल; अन्यथा मंत्राच्या शक्तीने तुला व तुझ्या वडीलांना ठार मारेल, अशी भीती घालून १८ वर्षाच्या मुलीकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याच्या घरी सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने झाडाझडती घेतली. त्यात, पोलिसांनी पूजेसाठी वापरली जाणारे वेगवेगळी साधनसामग्री जप्त केली.

उद्यराज रामआश्रम पांडे (४९, रा. वांगणी, अंबरनाथ, जि. ठाणे) या भोंदुबाबास मंगळवारी (दि. १४) सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. पांडेला कोर्टाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील एका १८ वर्षीय मुलीने ओळखीच्याच घरात तब्बल १४ लाख रुपये आणि १५ तोळे सोने चोरी केल्याची घटना उघड झाल्यानंतर बाबाचे भिंग फुटले. ठाणे येथे राहणारा बाबा काही भक्तांच्या ओळखीमुळे पीडित कुटुंबियाच्या ओळखीचा झाला होता. याचा फायदा घेत बाबाने गृहकलह मिटवण्यासाठी एका मोठ्या पूजेचे सोंग उभे केले. या पूजेदरम्यान दिवा विझल्याचे नाटक करीत १८ वर्षीय मुलीला धमकी देत संशयित पांडेने पैसे उकळण्यास सुरुवात केली. हा घटनाक्रम लक्षात येताच सरकारवाडा पोलिसांनी बाबाच्या मुसक्या आवळल्या. बाबाला बुधवारी (दि. १५) घेऊन पोलिसांचे पथक ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे पोहचले. तेथे पूजेसाठी लागणारे काळे कपडे, काळेतीळ यासारखे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. विशेष म्हणजे यावेळी अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्यकर्ते पोलिसांच्या सोबत होते. त्यातील दोघांनी पंच म्हणून काम पाहिले.

अश्लिल फोटोचा तपास

संबंधित भोंदू बाबा विवाहित असून, पोलिसांनी झडती घेतली त्यावेळी त्याची पत्नी, चार मुलगे व एक मुलगी हजर होती. बाबाचा ठाणे येथे एक फ्लॅट असून, त्याचीही माहिती घेतली जाते आहे. दरम्यान, बाबाच्या मोबाइलमध्ये १५ ते २० युवती व महिलांचे अश्लिल फोटोग्राफ्स सापडले होते. पोलिस त्याचाही बारकाईने तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पित्याच्या हत्येचा तडीपाराकडून प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

तडीपार असल्याने केरळ येथे रहात असलेल्या समीर उर्फ सोनू निजामुद्दीन शेख याने १५ हजार रुपये दिले नसल्याचा राग धरत थेट पित्यालाच ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश न आल्याने नंतर त्याने स्वतःच्याच हातावर ब्लेडने वार करून घेतले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत मुलगा व वडील यांच्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वडाळा गावातील जय मल्हार कॉलनीत निजामुद्दीन कासमअली शेख हे कुटूंब राहते. त्यांचा मुलगा समीर उर्फ सोनू निजामुद्दीन शेख याला काही दिवसांपूर्वी परिमंडळ दोनच्या उपायुक्‍तांनी तडीपार केले. तेव्हापासून तो केरळ येथे राहत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी समीर आपल्या घरी आला. त्याने रात्री वडिलांकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, वडिलांनी पैसे नसल्याचे सांगत त्यास नकार दिला. समीरने वडिलांसह आई जुबेदा व बहीण साजिया यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. आईवडिलांनी विरोध केल्यावर त्याने गळा दाबून पित्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी साजियाने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनेची पोलिसांना तातडीने माहिती दिली. त्याचवेळी समीरने घरातील ब्लेडच्या सहाय्याने स्वत:च्या हातावर वार करून घेत तुम्हीच मला मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत करणार असल्याची धमकी दिली. इंदिरानगर पोलिसांनी पित्यासह समीर यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी समीर याच्याविरुद्ध वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच समीरनेही पित्याविरोधात इंदिरानगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. तू तडीपार आहे, व्यवस्थित रहा असे सांगून कुरापत काढत निजामउ्द्दीन यांनी कोयत्याने वार केल्याचा आरोप समीरने केला आहे. यामुळे इंदिरानगर पोलिस ठाण्यात पितापुत्राविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न
शहर पोलिसांकडून विविध ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जात होती. यापूर्वी, तडीपारीचे प्रमाण अधिक होते. सध्या पोलीसांकडून तडीपारीची प्रक्रिया राबविली जात नाही. तरी यापूर्वी तडीपार केलेले अनेक गुन्हेगार शहरात सर्रासपणे फिरत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. या प्रकाराने तडीपारांचा शहरात मुक्त वावर आल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पीएसआयसह पाच पोलिस निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलिस उपनिरीक्षकांसह एक सहायक पोलिस उपनिरीक्षक, हवालदार आणि एका महिला पोलिस शिपायास जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी गुरूवारी निलंबित केले. यात, मालेगाव तालुका, मालेगाव कॅम्प आणि नांदगाव पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिस उपनिरीक्षक संतोष प्रभाकर तिगोटे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपट भिका पाटील, यमुना रामदास बर्डे (सर्व नेमणूक, मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशन), हवालदार कैलास यशवंत जगताप (तत्कालीन नेमणूक मालेगाव तालुका पो. स्टे.) आणि पोलिस उपनिरीक्षक बी. यू. पद्मणे (नेमणूक नांदगाव पो. स्टे.) अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

घरफोडीच्या घटनेकडे दुर्लक्ष

मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत गायत्रीनगर येथील मेहता रेसीडन्सीतील फ्लॅट क्रमांक आठमध्ये १४ नोव्हेंबरच्या पहाटे पाऊणेतीन ते तीन वाजेच्या सुमारास घरफोडी झाली. चोरट्यांनी तब्बल चार लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. तीन चोरटे इमारतीत घुसून घरफोडीचा प्रयत्न करीत असल्याची बाब एका सजग नागरिकाने पाहून लागलीच पोलिस स्टेशनला माहिती कळवली. मात्र, सुरुवातीस फोनच रिसिव्ह करण्यात आला नाही. थोड्या वेळाने ठाणे अमलदाराने फोन घेऊन एक पथक घटनास्थळी रवाना केले. पीएसआय तिगोटे, एएसआय पोपट पाटील आणि शिपाई बर्डे हे घटनास्थळी पोहचण्यापूर्वी चोरटे पायी निघून गेले. घरफोडीचा एवढा प्रकार घडूनही कर्तव्यावरील पोलिसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली नाही. नाकाबंदी लावण्यासाठी प्रयत्न केला नाही. घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना संबंधित पोलिसांनी कर्तव्यात कसूर केला. या पार्श्वभूमीवर अपर पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर केला. तिघांवर निलंबनाची कारवाई करीत तिगोटेंची बदली नियंत्रण कक्षात तर दोघांची बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली.

गुन्हे तपासात दिरंगाई

नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पीएसआय बी. यू. पद्मणे यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली आहे. पद्मणे यांच्याकडे २०१५ पासून २०१७ या दोन वर्षाच्या कालावधीत भाग एक ते पाच २७, भाग सहाचा एक, नशाबंदीचे दोन आणि आकस्मात मृत्युच्या पाच गुन्ह्यांचा तपास सोपवण्यात आला. मात्र, या प्रलंबित प्रकरणांपैकी फक्त १५ गुन्ह्यांची माहिती त्यांनी वरिष्ठांना सादर केली. उर्वरित गुन्ह्यांच्या तपासाबाबत वेळोवेळी माहिती विचारूनही सादर होत नसल्याने प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम झाला. ही बाब गंभीर असल्याने अखेर पद्मणे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

हवालदार झाला फितूर

पोलिस खात्यात कार्यरत असताना खटल्यावर परिणाम होईल अशा पद्धतीने कोर्टात साक्ष फिरवल्याने मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत तत्कालीन हवालदार कैलास जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. कलम ३२८, ४२० अन्वये दाखल गुन्ह्याची मालेगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. २०११ मधील या खटल्याच्या सुनावणीत जगताप महत्त्वाचे साक्षीदार होते. मात्र, १७ डिसेंबर २०१६ रोजी साक्षी पुरावा नोंदवत असताना जगताप यांनी साक्ष फिरवली. त्यामुळे त्यांना फितूर घोषित करण्यात आले. खटल्यावरच परिणाम होण्याची शक्यता असल्याने खात्यातंर्गत चौकशी करण्यात आली. या अहवालानुसार जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करण्यात आली. मालेगाव शहरात घरफोडीचे प्रकार वाढत असताना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी सजगता दाखवयला हवी होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा परिणाम नागरिकांसह पोलिसांवर होतो. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची होती.
- संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकबाबत आदेशाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मंत्रालयापाठोपाठ जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या सरकारी कार्यालयांमध्ये आजपासूनच प्लास्टिक बाटल्या हटावची मोहीम राबविणे आवश्यक होते. मात्र, अशा बाटल्यांचाच सर्रासपणे वापर सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

राज्य सरकारने मंत्रालयात प्लास्टिक बाटल्यांना बंदी घातली असून, त्याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. सरकारने प्लास्टिकविरोधात अनेकदा मोहीम उघडली. मात्र, ठोस कार्यवाहीअभावी ही मोहीम बासनात गुंडाळली गेली. पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकबंदी आवश्यक असून, त्यासाठी आता सरकारनेच आश्वासक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयामध्येच सर्वप्रथम पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सला बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, सरकारी बाबूंचे घोडे सरकारी आदेशापुढे अडून बसले आहे. त्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी करणाऱ्या आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोहिमा राबविणाऱ्या जिल्हा प्रशासनाला आजपासूनच कार्यालयांना प्लास्टिक बॉटलमुक्त करण्यासाठी पुढाकार घेता आला असता. मात्र, तसे होऊ शकले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्रासपणे प्लास्टिक बॉटल्सचा वापर होत असल्याचे दिसून आले. प्लास्टिक बॉटल्सना लगेचच उपलब्ध होऊ शकेल असा पर्याय कोणता, हा सवाल अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे.

संपूर्ण जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी असो की अभ्यांगत सर्वांनाच पाणी पाजण्यासाठी सर्रास प्लास्टिक बॉटल्सचा वापर केला जातो. कार्यालयाच्या आवारातील नियोजन हॉल असो किंवा मध्यवर्ती सभागृह येथे विविध समित्यांच्या समन्वयाच्या बैठकी होत असतात. अशा प्रत्येक वेळी उपस्थ‌ितांना पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सचे वाटप केले जाते. कार्यालयामध्ये काही ना काही कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी प्लास्टिक बॉटल्स भरून ठेवलेल्या असतात. सरकारच्या आदेशामुळे या पाणी बॉटल्सचा वापर बंद करावा लागणार असला तरी पाणीवाटपासाठी कसला वापर केला जाणार, असा सवाल उपस्थ‌ित केला जाऊ लागला आहे. सरकारने गुटखाबंदी केल्यानंतरही वेगवेगळ्या मार्गांनी गुटखा ग्राहकांपर्यंत पोहोचतोच आहे. पाणी बॉटल्सला बंदी केली तरी त्याचा वापर खरोखरच थांबणार का, याची उत्सुकता त्यामुळे निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह कोर्ट परिसर, अन्य कार्यालयांमध्येही प्लास्टिक बॉटल्सद्वारेच अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांची तृष्णातृप्ती केली जात होती. मंत्रालयात प्लास्टिक बॉटल्सबंदीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी अन्य सरकारी कार्यालयांमध्ये ती केव्हा होणार याची प्रत‌ीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभय योजनेवर ‘पाणी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीचोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने दंडात्मक शुल्काद्वारे अनधिकृत नळजोडण्या नियमित करण्यासाठी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी अभय योजनेला मुदतवाढीनंतरही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

मुदतवाढीनंतरही शहरातून जेमतेम ७४६ अनधिकृत नळजोडणीधारकांनी या योजनेसाठी आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत. या योजनेच्या लाभासाठी दिलेल्या मुदतवाढीचा कालावधी येत्या २२ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळ कनेक्शन उघडकीस येण्याची प्रशासनाची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे.

पाणीचोरीचे प्रमाण रोखण्यासाठी तेलंगणामधील अब्दुल करीमनगरच्या धर्तीवर महापौर रंजना भानसी यांनी नाशिकमध्ये अनधिकृत नळजोडणीधारकांसाठी अभय योजना सुरू केली होती. प्रशासनाने ७ सप्टेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. या योजनेंतर्गत अनधिकृत नळजोडणीधारकांनी ७ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत महापालिकेकडे अर्ज करून विहित दंडात्मक शुल्काद्वारे नळजोडणी अधिकृत घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या योजनेंतर्गत निवासी वापराच्या अर्धा इंची नळजोडणीसाठी पाचशे रुपये दंडात्मक शुल्क आकारण्यात आले. या माध्यमातून सुमारे १० ते १५ हजार अनधिकृत नळजोडण्या नियमित करून होणारी पाणीचोरी रोखता येईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. मात्र, विहित कालावधीत अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी अवघे ४९४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे या योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, ही मुदत संपुष्टात येण्यासाठी जेमतेम पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अनधिकृत नळजोडणी नियमित करणाऱ्यांची संख्या जेमतेम ७४६ वर पोहोचू शकली आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी योजनेतील सहभागी मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोडणीधारकांची संख्या जेमतेम हजाराच्या आसपास पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेच्या आशेवरच पाणी फिरणार आहे.

---

५ ते ५० हजारांपर्यंत दंड

अभय योजनेची मुदत संपल्यानंतर शहरात अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम राबविली जाणार आहे. त्यात बेकायदा जोडणी आढळल्यास घरगुती नळजोडणीधारकांना पाच ते २५ हजार रुपये व बिगर घरगुती नळजोडणीसाठी दहा ते ५० हजार रुपये शुल्क व दंड आकारला जाणार आहे. रक्कम वसुलीसाठी अनधिकृत जोडणीधारकाच्या घरपट्टीवर बोजा चढविला जाणार आहे. नळजोडणीधारक व प्लंबरविरोधात पाणीचोरीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

--

सातपूरला धडक वसुली मोहीम

सातपूर : ज्या ग्राहकांनी वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही अशांकडून महापालिकेने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. घरपट्टी भरलेली नसेल, तर घरातील वस्तू जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पाणीपट्टी थकविली असल्यास तात्काळ नळ कनेक्शनच बंद करण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी सांगितले. महापालिकेच्या या धडक वसुली मोहिमेत ज्यांनी पाणीपट्टी अधिक थकविली असेल त्यांचे नळ कनेक्शन तात्काळ बंद करण्यात येत आहे. सातपूर विभागातील घरपट्टी, पाणीपट्टी व विविध कर भरणाऱ्या करदात्यांनी महापालिकेची थकीत बिले तात्काळ अदा करावीत अन्यथा धडक कारवाईला समोरे जावे लागेल, असे विभागीय अधिकारी गायकवाड यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट कुत्र्यांची मालेगावात दहशत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा व डुकरांनी थैमान घातले असून, या मोकाट कुत्र्यांनी गेल्या दोन दिवसांत शहरातील १५ जणांना चाव घेतला आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असून पालिकेकडून याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

शहरात गुरुवारी शाळेतून घरी परतत असताना चार तर घराच्या अंगणात खेळत असताना एका मुलीस मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली. तसेच शहरातील वेगवेगळ्या भागातील अकरा लोकांना देखील चावा घेतल्याचे समोर आले आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते व वसाहतीमध्ये मोकाट कुत्र्यांचे टोळके सर्रास फिरताना दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. कुत्रे आणि डुकरांचे मोकाट झुंड शहरात फिरत असतात. शहरातील प्रमुख रस्त्यांवर बहुतांशीवेळा सकाळी व सायंकाळी मोकाट कुत्र्यांचे झुंड फिरत असतात. याच वेळी रस्त्यांवर शाळेत जे जा करणाऱ्या विद्यार्थांची मोठी गर्दी असते.

पशुवैद्यकीय अधिकारीच नाही

शहरात रोजच मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याचा घटना घडत असून पालिका प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही उपाय योजना केल्या केल्या नाहीत. पालिकेकडून कुत्री पकडण्यासाठी स्वतंत्र वाहन व पथक तयार करण्यात आलेले असले तरी कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिकेला यश आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरच्या धुळीने पीके धोक्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसंवत

कृषी उत्पन्न बाजार सम‌तिीच्या मुख्य कार्यलयाकडे जाणाऱ्या जोपुळरोडची अत्यंत वार्इट अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळमुळे जोपुळरोड, चिचंखेडरोड परिसरातील नागरिकांचे आणि शेतीचेही आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील नागरिक व शेतीच्या आरोग्याचा विचार करून तातडीने जोपुळरोडचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.

पिंपळगाव बाजार समीतीत सध्या टोमॅटोचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे जिल्हाभरातून येणाऱ्या हजारो वाहनांची जोपुळ रस्त्यावर दिवसभर ये-जा सुरू असते. टोमॅटोच्या वाहनांबरोबर दररोज परप्रांतात टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या शेकडो अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. मात्र हा रस्ता पूर्ण उखडला आहे. त्यामुळे धुळ, माती सतत उडत असते. या खड्ड्यांमध्ये टाकलेल्या मुरूममुळे अवघा रस्ता धुळीने व्यापला आहे.

रस्त्या लगतच्या द्राक्षबागा, डाळिंब, वांगी, शेवगा, भाजीपाला आदी प‌किांवर याचा विपरित परिणाम होत आहे. दररोजच्या त्रासामुळे या भागातील शेतकरी, नागरिक वैतागले आहेत. पिंपळगाव बाजार सम‌तिीने संपूर्ण जोपुळ रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, चिंचखेड चौफुलीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.

या धुळीमुळे रस्त्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. या धुळीमुळे माझी शेवगा बाग, वांगी, द्राक्षाची रोपे नुकसानग्रस्त झाली आहेत. तर द्राक्षबांगांचा दर्जाही धुळीमुळे घसरला आहे.

- शामराव विधाते, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बागलाणमध्ये केवळ दहा जणांना कर्जमाफी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होत असला तरीही बागलाण तालुक्यात आतापर्यंत केवळ दहा शेतकऱ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही १२ हजार ३४० लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्यभर मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. यासाठी कर्जघेतलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन माहिती भरून देण्यासाठी सोसायटी, तहसील आदी ठिकाणी उंबरठे झिजवावे लागले. आज ना उद्या कर्जमाफी मिळेल या भाबड्या आशेवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन माहिती भरणे, आपल्याकडील असलेल्या कर्जाची परतफेड करणे आदी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. यामुळे आपल्या नावाची कर्जमाफी आज होईल उद्या होईल या आशेवर त्यांनी सोसायटी, जिल्हा बँका तसेच तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात खेटे मारणे सुरू केले.

या योजनेची कर्जमाफी पात्र लाभार्थी यादी तयार करून संबंधित यादीची लेखापरिक्षण ५ विभागातून एम. के. घुगे, आर. डी. पाटील, आर. वाय. जाधव, आर. एम. गांगुर्डे, के. ए. कापडे यांच्या मार्फत करून घेतली. यानुसार तालुक्यातील १५ शाखा, १०१ संस्था, एकूण लाभार्थी संख्या १२३५०, शाखा संस्था १२३५० यांच्याद्वारे पूर्ण छाननी केली.

सभासद डबल अकॉऊंट करण्यात आल्याने त्यातून ३१ सभासद कमी करण्यात झाले. तसेच १२३८१ वरून १२३५० अंतिम लाभार्थी यादी राज्य शासनाला सादर करण्यात आली आहे. सदरच्या यादीबाबत अजुनही विविध तांत्रिक मुद्याची चौकशी व छाननी सुरू असुन आजपावेतो या यादीमधील अवध्या १० लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला असल्याने उर्वरित लाभार्थी वर्गास लाभ मिळावा यासाठी तातडीने गती देण्याची मागणी शेतकरी बांधवाकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या प्रश्नांवर मंत्रालयात बैठक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात राज्यभरात तीव्र असंतोष असल्याने जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. दादा भुसे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

बैठकीप्रसंगी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळात राजेंद्र दिघे, भरत शेलार, संजय शेवाळे, किशोर सोनजे, अनिल जगताप आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. चर्चेत प्रामुख्याने वरीष्ठ व निवड श्रेणी बाबतीत लावलेल्या जाचक अटीमुळे सदर निर्णय रद्द करण्यात यावा, सर्वसाधारण बदल्यांच्या २७ फेब्रुवारीच्या शासननिर्णयात असलेल्या त्रुटी दुरुस्ती करण्यात याव्यात, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी यासह संगणक परीक्षेसाठी मार्चपर्यंत मुदतवाढ मिळावी या मागण्या करण्यात आल्या. भुसे यांनी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.बैठकीस कैलास पगार, नामदेव बच्छाव, मिलिंद भामरे, गिरीश सूर्यवंशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकरोड अपघात; तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकरोडवरील मायको सर्कलजवळ गुरुवारी रात्री (दि. १६) असलेल्या धामणकर कार्नरजवळ दुभाजकाला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चालक तरुणाचा मृत्यू झाला. सागर घाटोळ (२५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सागरच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले आहे. आता मुलाचाही अपघाती मृत्यू झाल्याने जन्मदेत्या आईने कुणाकडे पाहून जगायचे असा भावनिक सवाल सागरच्या कुटुंबीयांनी केला आहे. सातपूर गावातील काही तरुणांनी जेवणासाठी शहरातील एका हॉटेलात जाण्याच हट्ट धरला. मात्र हॉटेलात जाणे या तरुणांसोबत असलेल्या सागरच्या जिवावर बेतले. जेवणासाठी जात असतांना मायको सर्कलच्या पुढे असलेल्या धामणकर कार्नरजवळ दुचाकी स्लिप झाली. दुभाजकाला गाडी धडकल्याने सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने सागरचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजबिलांवरून नांदगावात रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वीज कंपनीकडून भरमसाठ विजेची बिले येत आहेत. तसेच महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव येथे वीज कंपनीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वीज नसताना बिले कशी पाठवली जातात असा सवाल करत शिवसेनेने वीज प्रश्नी रस्त्यावर उतरून असंतोषाला वाट करून दिली. या आंदोलनामुळे नांदगाव-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

शिवसेनेतर्फे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढविण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली शेतकऱ्यांना थकीत रकमेचे हफ्ते करून देण्याची मागणी करण्यात आली. रोहित्र बंद असल्याने पिके जळाली त्यामुळे आधीच हवालदिल शेतकऱ्यांना वीज बिले आकारून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप कांदे यांनी केला. आंदोलनात ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, राजाभाऊ जगताप, मयूर बोरसे व शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक व्यवस्थेला धडक देणारे ‘तितिक्षा’

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गरीबीचे चटके सहन करून झोपडपट्टीतील जीवन तसेच सामाजिक व्यवस्थेला धडक देणाऱ्या पाच महिला व एक पुरूष यांची संवेदनात्मक कथा म्हणजेच ‘तितिक्षा’. सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत डॉ. समीर मोने लिखित ‘तितिक्षा’ हे नाटक सादर करण्यात आले.

तितिक्षा म्हणजे भल्या-बुऱ्याचा विचार न करता सहन करण्याची ताकद. ही सहनशीलता महिलांच्या अंगी उपजत असते. या व्यवस्थेने तशी सोयच करून ठेवलेली आहे. नवरा नावाचे रसायन आणि त्याच्यावरील अपार प्रेमासाठी वाट्टेल तो त्रास सहन करण्याची किमया महिलांमध्येच असते. एका पत्र्याच्या झोपडीत राहणाऱ्या सहा जणांभोवती या नाटकाची कथा फिरते. घराची मालकीण शांताबाय बब्बनला तिच्या जाळ्यात ओढते. त्याच्याबरोबर विविध कौटुंबिक वातावरणातील महिला या पत्र्याच्या घरात निवाऱ्याला येतात. त्यांच्या व्यथा, हाल, अपेष्टा आणि त्यांच्यावर अंकुश ठेऊन असलेली शांताबाय हे एक अडाणी पण करारी व्यक्तिमत्त्व. खिसे पाकिट मारणारी पम्मी, वेश्या व्यवसाय करणारी मालन हे अगोदरच पत्र्याच्या घरात राहतात. तेथे अनुराधा येते, तिच्या नवऱ्याला एड्स झालेला असतो. त्यामुळे ती घराबाहेर निघते. आंधळी, वेडी बब्बनची बहीण किरण बाळंतीण झाल्यावर तिला नवऱ्याने टाकून दिलेले असते आणि या सर्व पोरींच्या परिस्थितीचा फायदा शांताबाय घेते. पम्मीला पिकपॉकेटिंगला लावणारी शांताबाय बब्बनला तिचा नवरा म्हणूनच वापरते. नवऱ्याला सुधार केंद्रात टाकलेले असल्याने त्याला पैसे द्यायला लागतात. म्हणून मालन वेश्या व्यवसाय करते. लग्नाआधी एड्स असलेला नवरा पदरात पडलेली अनुराधा आणि बहिणीला बरे करण्यासाठी शांताबायची गुलामी करणारा बब्बन अशा पात्रांभोवती कथानक फिरते; मात्र मध्येच शांताबायचा नवरा परत येतो, ती बब्बनला त्याचा खून करायला लावते; मात्र त्याची बहीण घरातून निघून गेली म्हणून बब्बन तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. अशा आशयाची तितिक्षा नाटकाची कथा होती.

कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले. निर्मिती प्रमुख राजू नाईक, भिमराव कोते तर दिग्दर्शन रविकांत शार्दुल यांचे होते. लेखन डॉ. समीर नारायण मोने यांचे हाते. नेपथ्य व संगीत विनय कटारे, निषाद जोशी यांचे तर रंगभूषा माणिक कानडे, प्रकाशयोजना विनोद राठोड, वेशभूषा भावना कुलकर्णी यांची होती. रंगमंच व्यवस्था विलास नलावडे, अभिजित शार्दुल, आबासाहेब थोरात, प्रसाद जोशी तर विशेष सहकार्य मायको एम्प्लॉईज फोरमचे होते. नाटकात दीपक चव्हाण, शब्दजा वेलदोडे, प्रज्ञा गोपाळे, भावना कुलकर्णी, पूजा सोनार, स्वप्ना शार्दुल यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : ये मामला गडबड है
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह
वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images