Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तीन वर्षांत राज्याचे ‘सिंचन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

आजपर्यंत पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे नियोजन प्रगतीपथावर आहे. सुमारे २ हजार ६५ कोटी रुपयांचे ८३ लघुप्रकल्प येत्या दीड वर्षात पूर्ण करू, याप्रमाणेच उर्वरित मध्यम व मोठे मिळून एकूण १०४ सिंचन प्रकल्प तीन वर्षांत पूर्णत्वाला जातील, अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आरोग्य विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अधिकाधिक सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राने १० हजार कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. सिंचन प्रकल्पांसाठी पुरेसा निधी असल्याने राज्यात दीड लाख हेक्टर जमिन क्षेत्र हे ओलीताखाली आणण्याचे उद्द‌ष्टि आहे. येत्या दोन वर्षांत राज्यातील प्रत्येक बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहचविण्याचे सरकारचे नियोजन आहे.

अर्थसंकल्पातील तरतूद, प्रधानमंत्री कृषी सिंचनाद्वारे मिळणारा १७ हजार कोटी रुपयांचा निधी आणि केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मान्यता मिळालेला १० हजार कोटी रुपयांचा निधी असे एकत्रित निधीसहाय्य सिंचनाच्या उद्द‌ष्टिाच्या पाठीशी उभे आहे.

भाजप प्रवेशासाठी कुणालाही ऑफर नाही!

भाजपात येण्यासाठी ऑफर मिळाल्याचा दावा औरंगाबादेतील एका आमदारांनी केला असल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना महाजन यांनी अनभिज्ञता दर्शविली. असा कुठलाही प्रकार कानावर नसल्याचे सांगत आमचा पक्ष गल्ली ते दिल्ली सध्या भक्कम स्थितीत असल्याने आम्हाला असल्या ऑफर्स कुणापुढेही ठेवण्याची गरज नाही. याऊलट स्वत:हून पक्षात यायला बाहेरील अनेक दिग्गज तयार आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे. तेथेच विचार करताना आम्हाला वेळ घ्यावा लागतो, तर भाजप इतरांना कशासाठी ऑफर देणार, असाही प्रतिसवाल महाजन यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छता अभियानात माळेगाव प्रथम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील जिल्ह्यातील पहिले पाच लाखाचे पारितोषिक सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांकाचे तीन लाखांचे पारितोषिक दिंडोरी तालुक्यातील अवनखेड व तृतीय क्रमांकाचे दोन लाखाचे पारितोषिक नाशिक येथील दरी ग्रामपंचायतीला मिळाले. बुधवारी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

जिल्हा परिषदेतर्फे गायकवाड सभागृहात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हा व तालुकास्तरीय पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिलत सांगळे या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल कदम, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन.बी. उपस्थित होते. २५ हजाराचा विशेष पुरस्कार चांदवडच्या शिरसाणे, कळवण तालुक्यातील पाळे बु. ,देवळा तालुक्यातील कणकापूर यांना देण्यात आले.

इगतपुरी - उभाडे - बोरटेंभे - पिंपळगाव डुकरा

सिन्नर - माळेगाव - विंचुरदळवी- भाटगाव

निफाड - आहेरगाव - विष्णूनगर - शिवरे

देवळा - कणकापूर - सावकी लो. - भऊर

बागलाण - दहिंदुले - रातीर - जोरण

मालेगाव - सातमाने - निमगांव खु.- मांजरे

दिंडोरी - अवनखेड - लखमापूर - जऊळके वणी

कळवण - पाळे बु.- आठंबे - मानुर

सुरगाणा - धोडांबे - प्रतापगड - रंगतविहिर

नाशिक - दरी - ओढा - वाडगाव

त्र्यंबकेश्वर - कोटंबी हरसुल - अंबई - हिर्डी

पेठ - आडगाव भुवन - बोरवट - हनुमंतपाडा

चांदवड - शिरसाणे- हिरापूर- डोंगरगाव

नांदगाव - गंगाधरी - बोराळे - दहेगाव

येवला - एरंडगाव - बल्हेगाव - नांदुर

हागणदारी मुक्त तालुका पुरस्कार

देवळा, कळवण, नाशिक, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून जनतेची दिशाभूल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

भाजप सरकार पैशांचा वापर करून जाहिरातबाजीने जनतेची दिशाभूल करीत असल्याचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी तथा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथे केला. नगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला. त्यात पाटील यांनी कार्यकर्त्यांना मागर्दशन केले.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे येथे राजकीय धुराळा उडत आहे. कार्यक्रर्त्यांना मार्गदर्शन करतांना पाटील म्हणाले, माजी सार्वजन‌कि बांधकाम मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी चौपदरी रस्त्यासह विकासकामे केली आहेत. तसेच नोटाबंदीनंतर आयकर खात्याने पुरोहितांवर केलेल्या कारवायांचा राष्ट्रवादीने विरोध करत आवाज उठवला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून चरित्रसंपन्न उमेदवार देऊन निवडणूक

लढव‌लिी जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

आघाडीबाबत मौन

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होईल की नाही याबाबत त्यांनी स्पष्ट मत न देता सर्वानुमते वरिष्ठ पातळीवर हे ठरविण्यात येईल असे सांग‌तिले. तालुक्याचा आणि शहराचा आढावा घेत असतांना त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या आणि विविध सेलप्रमुखांच्या अल्प उपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान या बैठकीसाठी कार्यकर्त्यांसह पदाधिकारी दुपारी एक वाजेपासून वेटिंगवर होते. ती बैठक चार वाजता सुरू झाली. जयंत पाटील यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, शहराध्यक्ष मनोज काण्णव, अरूण मेढे, जिल्हायुवक अध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत आज बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिकपाठोपाठ आता मालेगाव शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील एकूण ९ मंदिरांच्या व्यवस्थापक व विश्वस्तांसोबत आयुक्त धायगुडे यांनी बैठक घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र बैठकीत रात्री उशिरापर्यंत कुठलाही निर्णय न झाल्यामुळे गुरुवारी शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी, मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत ही मंदिरे तशीच असल्याने गुरुवारी पालिका प्रशासनाकडून अधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात येवून अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

प्रशासन सज्ज

सर्वेक्षणानुसार शहरातील १७ मंदिरे २००९ नंतर अतिक्रमित जागेत असल्याचा अहवाल देण्यात आला होता. यातील सहा मंदिरे विश्वस्तांनी विधिवत हटविली होती तर दोन मंदिरांचे अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र उर्वरित ९ मंदिरे अनधिकृत धार्मिक स्थळे असून देखील हटविण्यात आले नव्हते. अखेर या ९ मंदिरांवर बुलडोजर चालवण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत याआधीही अनेकवेळा कारवाईची तयारी करण्यात आली होती. मात्र विविध कारणांनी या कारवाईला थोपविण्यात आले.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत गुरुवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादुरुस्त वाहनांचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनेक रस्ते नादुरुस्त वाहने उभी करण्याचे जणू हक्काचे ठिकाण बनत असून त्यामुळे रहदारीलाही अडथळा निर्माण होऊ लागला आहे. या वाहनांचा वाली कोण? आणि या वाहनांना हटविण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थ‌ित होऊ लागला आहे.
हल्ली वाहन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यामुळे घरोघरी आणि बहुतांश नागरिकांकडे किमान मोटारसायकल तरी असते. कार व तत्सम वाहने खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, ही वाहने जुनी झाली की कालांतराने अनेकदा नादुरुस्तदेखील होतात. अशा वाहनांची जागा मग नवीन वाहने घेतात. त्यामुळे जुन्या वाहनांना सांभाळायचे कसे? असा प्रश्नही उपस्थ‌ित होतो. ती उभी करण्यासाठी वाहन मालकांकडे पुरेशी जागाही नसते. अशा वाहनांसाठी सार्वजनिक रस्तेच आधार ठरू लागले आहेत. नादुरुस्त वाहनांचे इंजिन काम करीत नसले तरी त्यामधील अन्य स्पेअर पार्टस मात्र उपयुक्त असतात. म्हणूनच अशी वाहने सरसकट भंगार जमा करण्याऐवजी ती रस्त्यांवरच उभी करून त्यावर येता जाता लक्ष ठेवण्याचे प्रकारही निदर्शनास येऊ लागले आहेत.
सर्वच प्रकारची अनेक वाहने शहरातील रस्त्यांवर महिनोनमहिने बेवारस अवस्थेत पहावयास मिळतात. विशेष म्हणजे भंगार व्यावसायिकांनी किलोच्या भावाने खरेदी केलेली किंवा गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली वाहनेही सार्वजनिक रस्त्यांलगत उभी केली जात असून त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

सर्व्ह‌िस रोड बनले हक्काचे ठिकाण
वाहने उभी करताना वाहनमालक, भंगार तसेच गॅरेज व्यावसायिकांनी शहरातील सर्व्ह‌िसरोडचा अधिक प्रमाणात वापर केला आहे. पाथर्डी फाट्यापासून जत्रा हॉटेलपर्यंतच्या सर्व्ह‌िस रस्त्यावर अशी वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याखेरीज मुंबई नाका, शिंगाडा तलाव, एन. डी. पटेल रोड, नाशिक-पुणे, नाशिक-त्र्यंबक, नाशिक-औरंगाबाद अशा महामार्गावरही वाहने बेवारस अवस्थेत उभी केल्याचे पहावयास मिळते.

द्वारका, पंचवटीत सर्वाधिक वर्दळ
शहरातील रस्त्यांवर कारपासून रोडरोलरपर्यंतची वाहने अनेक महिन्यांपासून धूळखात पडून आहेत. काही ठिकाणी केवळ पत्र्याच्या सांगाड्याच्या रुपात ही वाहने तर काही वाहने इंजिनासह नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. विशेष म्हणजे द्वारका, पंचवटी यासारख्या वर्दळीच्या परिसरांतही अशी वाहने असून त्यामुळे वाहतुकीच्या समस्येलाही हातभार लागतो आहे. ही वाहने दुरुस्त करण्याचा खर्च अधिक असल्याने स्पेअर पार्टससाठी ती तशीच सांभाळली जात असल्याचेही सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरूणावर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. शिवाजीनगर परिसरात हा प्रकार घडला. तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चौघांना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आकाश पवार, सागर खाडे, विजय उर्फ पप्पू बागुल (रा. सर्व शिवाजीनगर) आणि कमलेश पाटील (रा. यशोधन अपा. गंगापूर) अशी अटक केलेल्या संशय‌ितांची नावे आहेत. किशोर प्रकाश पाटील (२८, रा. रु‌ख्मिणी मंदिराजवळ, शिवाजीनगर) या तरूणाने फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री तो घरी असताना संशय‌ितांनी संपर्क साधून त्याला बाहेर बोलावले. यावेळी आकाश पवार याने ‘‘तू मला ओळखत नाही का? माझ्या मित्रांना का नडतो?’’ असा प्रश्न करीत जुन्या भांडणाची कुरापत काढली. त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोटावर, छातीवर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. गंगापूर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून चारही संशय‌ितांना ताब्यात घेतले आहे.

सरस्वतीनगरला भरदिवसा चोरी
सरस्वतीनगर परिसरात भरदिवसा चोरीची घटना घडली असून ८४ हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे. मागील दरवाजातून घरात शिरलेल्या चोरट्याने रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुशांत तानाजी मगर (रा. श्रीपाद कॉलनी, आडगाव लिंक रोड, सरस्वतीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. दुशांत व त्याची आई मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यावेळी आईने पुढील दरवाजास आतून कडी लावून पाठीमागील दरवाजा ओढून घेतला होता. चोरट्यांनी मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधत कपाटातील अडीच हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ८४ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सावतानगरमध्ये मारहाण
कामावरून घरी परतणाऱ्या तरूणास रस्त्यामध्ये अडवून टोळक्याने बेदम मारहाण केली. सिडकोतील सावतानगर परिसरात ही घटना घडली. खिशातील २० हजार रुपयांची रोकड गहाळ झाल्याचे तरूणाने अंबड पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सुभाष मदन राठोड (२७, रा. गुरूदत्त चौक, सावतानगर) याने फिर्याद दिली आहे. तो सोमवारी (दि. १३) रात्री घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. सावतानगर येथील पिठाच्या गिरणीजवळ उभ्या असलेल्या टोळक्याने काही एक कारण नसताना राठोड यांचा रस्ता अडवून बेदम मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत राठोड यांच्या खिशातील २० हजार रुपयांची रोकड गहाळ झाली.

मेडिकल दुकानदारास मारहाण
चॉकलेटचे पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने दुकानात शिरून मेडिकल दुकानदारास मारहाण केली. कामटवाडा परिसरात ही घटना घडली असून अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
अभिषेक सुदाम जायखेडकर (रा. बंदावणेनगर, कामटवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे कामटवाडा परिसरात सदगुरू नावाचे मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स आहे. दर्शन दोंदे व त्याच्या काही साथीदारांनी मंगळवारी (दि. १४) रात्री किंडर जॉय नावाचे चॉकलेट खरेदी केले. जायखेडकर यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. त्यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने शिवीगाळ करीत दुकानात शिरून जायखेडकर यांना जबर मारहाण केली.

बिबट्याचा जनावरांवर हल्ला

देवळाली कॅम्प : दारणा गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार अनेक नागरिकांना अनुभवला आहे. बिबट्याकडून परिसरातील पाळीव जनावरांवर हल्ला केला जात आहे. तरी या घटनांची वन विभागाने लवकर दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शेवगे दारणा येथील ढोकणे आणि पाळदे वस्तीवर भरत ढोकणे आणि ज्ञानेश्वर पाळदे यांचे वासरू व पारडू मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने फस्त केले. यानंतर परिसरात बिबट्यांची दहशत पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याला लवकर जेरबंद करावा अशी मागणी भाजप सरचिटणीस शरद कासार यांच्यासह किरण पाळदे, ज्ञानेश्वर पाळदे, नारायण पाळदे, भरत ढोकणे, अनंत कासार आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याच्या विकासाला मिळणार ड्रायपोर्टने बूस्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत मंगळवारी नाशिक जिल्ह्यात ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टला मान्यता दिली. निफाडमध्ये होणाऱ्या या ड्रायपोर्टमुळे येथील विकासाला चालना मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्याचे भाग्य बदलणारा हा प्रोजेक्ट निफाड तालुक्यातील निफाड साखर कारखान्याच्या अतिरिक्त जागेवर साकारणार आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याकडे सध्या २६३ एकर जागा आहे. यामध्ये कारखाना ३० एकर जागेवर, कर्मवीर वाघ शैक्षणिक संकुल २७ एकर जागेवर आणि कर्मचारी वसाहत व इतर अशी ३० एकरच्या आसपास जागेवर आहे. ९० ते १०० एकर जमीन यात अडकली आहे. उर्वरित १६० एकर जमिनीवर हा प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे.

आठ महिन्यांपूर्वी या जागेचा सर्व्हे झाला आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्ग अवघा एक किलोमीटर अंतरावर, ओझर विमानतळ कार्गो हब १० किलोमीटरवर आणि कारखान्याच्या जागेला खेटून असलेला मुंबई-भुसावळ रेल्वेमार्ग. अशा सुविधांमुळे या ड्रायपोर्टचे महत्त्व अधिक वाढणार आहे. या सर्व बाबी उपयुक्त आणि सोयीच्या असल्याने या जागेची निवड झाली आहे. सध्या निफाड कारखान्याची सर्व जमीन नाशिक जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. या प्रोजेक्टचा सर्वात जास्त फायदा करखान्याला होऊ शकतो. राज्य व केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याने थकीत कर्ज व व्याज यावर धोरणात्मक निर्णय होऊन कारखानाही लवकर सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.

रोजगार निर्मिती

शेतीत अग्रेसर असणाऱ्या निफाड तालुक्याला शेतीमाल निर्यातीचाही फायदा होणार आहे. याशिवाय तालुक्यात रोजगाराच्या सुविधाही वाढणार आहेत. शिवाय रस्त्याची कामेही मार्गी लागतील. एका अंदाजानुसार या पोर्टवरून वर्षाला अडीच लाख कंटेनर एक्स्पोर्टसाठी या परिसरातून धावतील. त्यामुळे कारखाना परिसरातील गावांचाही कायापालट होईल. या प्रोजेक्टसाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक सरकार करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑस्ट्रेलियातील गुंतवणुकीसाठी प्रयत्न

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुलेट जनरल टोनी हबेर, वरिष्ठ व्यापार व गुंतवणूक आयुक्त जॉन मॅड्यू यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वास सरमुकादम, अंजली पाटकर, सागर नागरे, वनिता घुगे यांनी भेट घेतली. या भेटीत भारत व ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांममध्ये व्यापार-व्यवसाय व गुंतवणूक वाढावी याविषयावर चर्चा केली.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. तसेच भारतात महाराष्ट्रात व्यापार व उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी असून अन्नप्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात, अ‍ॅग्रिकल्चर क्षेत्रामध्ये मोठ्या संधी असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुलेट जनरल टोनी हबेर व वरिष्ठ व्यापार व गुंतवणूक आयुक्त जॉन मॅड्यू यांनी यावेळी ऑस्ट्रोलियातील व्यापारी-उद्योजक व गुंतवणूकदारांना माहिती देऊन भारतात महाराष्ट्रात येण्यासाठी प्रोत्साहीत करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे ऑस्ट्रोलियातील व्यापारी व उद्योजकांच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरला भेट आयोजित करू असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत यश

$
0
0

सिन्नर फाटा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत नाशिकरोडच्या श्रीमती र. ज. चौहाण हायस्कूलच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. हा संघ विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर खो-खो च्या जिल्हास्तरीय स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धेत १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या खो-खो स्पर्धेत नाशिकरोडच्या श्रीमती र. ज. चौहाण हायस्कूलच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात विजय संपादन केला. या संघाने मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या संघाचा एक डाव व दहा गुणांनी पराभव केला. संघातील ईश्वरी बोराडे, अनुष्का मानकर, तनिष्का भाबड, अनघा ढोकणे या खेळाडूंच्या प्रभावी खेळाच्या जोरावर या संघाने विजय मिळवला. या विजयी संघाला क्रीडा शिक्षक प्रद्युम्न जोशी, कैलास आरोटे, जयश्री उदार व गणेश ढोमसे आदींचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मंदिरे हटविली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्याबाबत बुधवारी झालेल्या मंदिर विश्वस्त व पालिका प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्याने गुरुवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीतनंतर पालिका प्रशासनाकडून शहरात कारवाई सुरु करण्यात आली. यात पाच मंदिरे हटव‌ण्यिात आली. उर्वरित मंदिरे हटव‌ण्यिाबाबत शुक्रवारी काय कारवाई होते, याकडे लक्ष असणार आहे.

विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर महापालिका उपायुक्त अंबादास गरकल, राजू खैरनार, विलास गोसावी, डॉ. प्रदीप पठारे, अग्निशामक अधीक्षक संजय पवार, प्रभाग अधिकारी पंकज जगताप आदींसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोयगाव परिसरातील अनधिकृत मंदिर हटवले. त्यानंतर भायगाव भागातील अजोंदे बाबा मंदिर काढताना स्थानिकांनी विरोध केल्याने कारवाई थांबण्यात आली. अखेर विरोध वाढल्याने येथील कारवाई थांबण्यात येवून शहरातील मोची कॉर्नरवरील शीतल माता मंदिर हटवण्यासाठी पथक दाखल झाले. मंदिर विश्वस्तांकडून मात्र विविध पूजा करून मंदिर हटवण्यास सुरुवात करण्यात आली होती. तर आय टी आय कॉलेज समोरील अंबिका माता मंदिरातील मूर्ती देखील विधिवत पूजा करून हटवण्यात आले. द्याने, सायने एमआयडीसी व दरेगाव परिसरातील मंदिरे देखील हटवण्यात आली आहेत.

मोसम पुलावरील मंदिराचा तिढा कायम

गुरुवारी झालेल्या बैठकीत मोसमपूल परिसरातील शनी मंदिर व महादेव मंदिराचा प्रश्न वादग्रस्त ठरला. पालिका प्रशासनास मंदिर जुना आग्रा रोड वर की डीपी रोडवर येते याबाबतचे समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. तर मंदिर विश्वस्तांकडून मंदिर डीपीरोड अथवा आग्रा रोडवर येत नसल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाग्राममध्ये टॉवरचा घाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गोवर्धन येथील रखडलेल्या कलाग्राम केंद्राच्या जागेवर चक्क खासगी मोबाइल टॉवर उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्याला स्थानिकांनी विरोध केला असून, याबाबत पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता उत्पन्नाचे साधन म्हणून खासगी मोबाइल टॉवरला परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ज्या गोवर्धन ग्रामपंच्यायतीच्या भागात टॉवरचे काम होत आहे, तिची साधी परवानगीदेखील घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकारानंतर हाट बाजाराच्या धर्तीवर कलाग्राम केंद्राचे काम गोवर्धन ग्रामपंचायचीच्या जागेवर सुरू केले होते. तब्बल ११ कोटी खर्च करूनदेखील आजही कलाग्राम केंद्र पूर्णत्वास आलेले नाही. आता या जागेवर खासगी मोबाइल टॉवर उभारण्याचा घाट घातला जात असून, सरकारी जमिनींवर खासगी भाडेकरू टाकण्याचे काम पर्यटन विकास महामंडळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कुठल्याही प्रकारची दाट लोकवस्ती नसतानाही उभारल्या जाणाऱ्या टॉवरला ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबत प्रशासनाकडे जाब मागणार असल्याचे गोवर्धनचे प्रभारी सरपंच बाळासाहेब वायचळे यांनी सांगितले. अगोदरच गोवर्धन ग्रामपंचायतीची अनेक एकर जागा शासनाने, तसेच काही खासगी विकसकांनी बळकावल्या असल्याने यातील उर्वरित ३२ एकर जागेवरदेखील अनेकांचा डोळा असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेला अगदी लागून असलेल्या गोवर्धन शिवारात काही वर्षांपूर्वी खासगी विकसकांनी जागा मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यात अनेकांनी यश मिळविले. अनेक शासकीय विभागांनीदेखील काही एकर जागा ग्रामस्थांचा विरोध झुगारून हस्तांतरित केल्या होत्या. याअंतर्गतच कलाग्राम केंद्रासाठी गोवर्धन ग्रामपंचायतीची तब्बल सहा एकर जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिली गेली. या जागेवर ११ कोटी रुपये खर्च करून केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून महिला बचतगटासांठी कलाग्राम केंद्र उभारण्याचा प्रारंभ करण्यात आला होता. परंतु, तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ उलटूनदेखील कलाग्राम केंद्राचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच केंद्र शासनानेच संबंधित स्कीम बंद केल्याने पुढील निधी उपलब्ध न झाल्याने काम बंद असल्याचे पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे कलाग्राम केंद्र धूळ खात पडून असल्याची स्थिती आहे.

--

विनापरवानगी उभारणी अनधिकृत

आता या कलाग्राम केंद्राच्या जागेवरच खासगी मोबाइल टॉवर उभारण्याचा घाट पर्यटन विकास महामंडळाकडून घातला जात आहे. एकीकडे ११ कोटी रुपये खर्चूनही कलाग्राम केंद्र सुरू झाले नसताना येथील जागेवर मोबाइल टॉवरला पर्यटन विभाग परवानगी देतोच कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता उभारण्यात येत असलेला मोबाइल टॉवर अनधिकृत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे पर्यटन विकास महामंडळाला आर्थिक उत्पन्न सुरू व्हावे या हेतूने मोबाइल टॉवरला परवानगी दिली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, आज सरकारी मालमत्तेत खासगी टॉवरला दिली, पुढे उर्वरित जागाही खासगी विकसकाला दिली तर नवल वाटू नये, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. येथे खासगी मोबाइल टॉवरला परवानगी दिलीच, कशी याबाबत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे येथील प्रभारी सरपंच वायचळे यांनी सांगितले.

--

लोकवस्तीत टॉवरला विरोध

सातपूर व गंगापूररोड भागात वाढत्या लोकवस्तीत अनेक ठिकाणी मोबाइल टॉवरची मागणी कंपन्यांनी केली आहे. परंतु, मोबाइल टॉवरला महापालिकेतूनच विरोध होताना दिसतो. दुसरीकडे लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी मोबाइल टॉवरला परवानगी कशी, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर महापालिकेने दोन महिन्यांत मोबाइल टॉवरला परवानगी नाकारली, तर सदर कंपनी कुणाचीही परवानगी न घेता टॉवर उभारू शकते, असे म्हटले आहे. असे असतानादेखील महापालिकेचे काही अधिकारी कंपन्यांना ताटकळ ठेवतात. वाढलेली लोकवस्ती पाहता महापालिका आयुक्तांनी गरजेच्या ठिकाणी व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असलेल्या प्लॉटधारकांच्या घरांवर मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

--

कलाग्राम केंद्राच्या जागेवर टॉवरची उभारणी होत असल्याची माहिती मिळाली आहे. विनापरवानगी उभारण्यात येत असलेला टॉवर अनधिकृत असून, याबाबत प्रशासनाला जाब विचारणार आहे.

-बाळासाहेब वायचळे, प्रभारी सरपंच, गोवर्धन

--

तीन वर्षे उलटूनही कलाग्राम केंद्र पूर्ण झाले नाही. आता त्याच कलाग्राम केंद्राच्या जागेवर खासगी मोबाइल टॉवर उभारणे चुकीचे आहे. याला ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे.

-पी. के. जाधव, माजी सरपंच, गोवर्धन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे संग्रहालयासाठी प्रवेशशुल्क

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोड परिसरातील इतिहास उद्यानातील जागेमध्ये असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवकालीन शस्त्र संग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे देण्यात आली आहे. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या ठरावाद्वारे महापालिकेने ही जबाबदारी या संस्थेकडे पुढील दहा वर्षांसाठी दिली आहे. त्यामुळे नाशिककरांना संग्रहालयात जाण्यासाठी प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे.

जुना गंगापूर नाका परिसरातील इतिहास उद्यानात हे शिवकालीन शस्त्र संग्रहालय आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला होता. याच्या उभारणीसाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानातील पुरातन शस्त्रांचे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे इतिहास संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवशाहीर पुरंदरे यांच्यासमोर मांडला होता. जागेची पाहणी करून शिवशाहीर पुरंदरे यांनीही या प्रकल्पास होकार दिला होता.

सेवा अटोमोटीव्हने सीएसआर फंडामधून चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करीत पुढाकार घेतला आहे. या मिळकतीवर मूळ हक्क मात्र मनपाचाच राहणार आहे. उद्यान परिसरात ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाशी संबंधित दुकाने व व्यवसाय चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी १० रूपये तर त्यापेक्षा मोठ्या वयोगटासाठी २० रूपये प्रति व्यक्ती असे दर आकारले जाणार आहे. संग्रहालयास भेट देणाऱ्यांसाठी दुचाकी पार्किंगकरिता ५ रूपये तर चारचाकीकरिता १० रुपये प्रतितास या दराने भाडे आकारले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला कांदा @ ३७५०

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या भावाने यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला असून उन्हाळ कांद्याला तब्बल ३७५० व लाल कांद्याला ३६५० रुपये क्विंटल इतका भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मनमाड, नांदगाव बाजार समितीत देखील कांद्याला चांगला भाव असल्याने मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. चांदवड बाजार समितीत गुरुवारी उन्हाळी कांद्याच्या भावाने उंची गाठत

३५०० ची सीमारेषा ओलांडत ३७५० पर्यंत मजल मारली. लाल कांद्याने ३६५० इतका भाव मिळवला. भाव वाढल्याने समितीत ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या होत्या. चांदवड समितीत गुरुवारी ११ ते १२ हजार क्विंटल आवक झाल्याचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी सांगितले. या मोसमातील कांद्याच्या दराचा हा उच्चांक आहे. मनमाड बाजार समितीत देखील कांद्याने चांगलाच भाव खाल्ला. येथे ३४०० रुपये क्विंटल इतका भाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन क्लिफहँगरमधील सायकलिस्ट्सचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे ते गोवा या ६४३ किलोमीटर अंतराच्या डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेत सहभागी झालेल्या सायकलिस्ट्स आणि त्यांच्या क्रू मेंबर्सचा नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेत सहभागी होऊन जागतिक स्तरावरील अवघड समजली जाणाऱ्या रेस अॅक्रॉस अमेरिका म्हणजेच रॅम स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या मोहिंदरसिंग भराज, किशोर काळे, विजय काळे, तसेच स्पर्धा पूर्ण करणारे नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, संजय मोकळ, नीलेश वाकचौरे, डॉ. संजय विखे यांना यावेळी

गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात स्पर्धकांनी आपले अनुभव सांगितले. नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, की चार महिन्यांच्या सरावानंतर अशा स्पर्धेत सहभागी होणे माझ्यासाठी अभिमानास्पद असून, नाशिकचे वातावरण बघूनच सायकलिंगची आवड निर्माण झाली. मोहिंदरसिंग यांचे क्रू म्हणून गेलेले प्रसिद्ध सायकलिस्ट्स डॉ. महेंद्र महाजन यांनी सायकलिंग स्पर्धेत सहभागी होताना असलेल्या मानसिक स्थितीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धकांच्या अनुभवातून कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनाच प्रेरणा मिळाली. पुढच्या वर्षी डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेत जास्तीत जास्त नाशिक सायकलिस्ट्सना सहभागी होण्यासाठी या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा घ्यावा, असे आवाहन नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट्सचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे शुभम देवरे, अविनाश दवांगे, विकास दवांगे या बंधूंसह सर्व क्रू मेंबर्सचाही सत्कार करण्यात आला.

६२ व्या वर्षी मिळविले यश

मोहिंदरसिंग भराज यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण करीत रॅमसाठी पात्रता मिळविली. आपले अनुभव कथन करताना ते म्हणाले, की स्पर्धेच्या सुरुवातीच्या क्षणाला उभा होतो, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी टिप्पणी केली, की हे काका स्पर्धा पूर्ण करू शकतील का? तेव्हाच मनात आणले, की ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केल्यानंतर या तरुणांना भेटून आनंद साजरा करू. गेल्या चार वर्षांची मेहनत कामी आल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटीत प्रयत्नातून समस्या सुटतात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संघटीत प्रयत्न केल्यास व्यापारी व उद्योजकांचे प्रश्न निश्चितच सुटतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले. नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सरकारकडे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जाताना त्या संघटनेकडे सभासद संख्याबळ किती आहे हे बघितले जाते. त्यातूनच निश्चित अशी प्रश्नांची सोडवणूक होते. यासाठी संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचे काम हे जिल्ह्यातील अन्य संघटनांना दिशादर्शक असे आहे. या संघटनेने भावफलक योजनेसारखे राबवित असलेले काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही मंडलेचा यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत राठी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, की किरकोळ व्यावसाहिकांनीही आपल्या व्यवसायाच्या पद्धती या काळानुरुप बदलावयास हव्यात. ऑनलाइन शॉपिंग, मॉल, मोठे व्यवसाय, आधुनिक सुविधांचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करतात. अशावेळी आपणही आपल्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपला व्यवसाय वाढवला पाहिजे. यासाठी संघटनेने आपल्या सभासदांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करून तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण द्यावे. यावेळी किरकोळ किराणा व्यवसायात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सभासद दत्तात्रय चांदवडकर, मधूकर चांदवडकर, वेदप्रकाश अग्रवाल, दत्तात्रय धामणे यांचा संतोष मंडलेचा व हेमंत राठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष शेखर दशपुते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. प्रभाकर गाडे यांनी सहलीची माहिती दिली. एकनाथ अमृतकर यांनी आभार मानले. यावेळी शहरातील किरकोळ किराणा व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नारपार’ने शेतीचा विकास

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिडको

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नारपार-दमणगंगा व उर्ध्व गोदावरीच्या प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे शेतीचा लवकरच खऱ्या अर्थाने विकास होणार असल्याची माहिती माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी दिली. विशेष म्हणजे शासनाकडून ड्रायपोर्टच्या प्रकल्पालाही मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने १० हजार कोटींची मंजुरी दिली असून यात दमणगंगा, नारपारसह औरंगा व अंबिका खोऱ्याचा समावेश झाला आहे. या प्रकल्पाने वाया जाणारे पाणी वापरात येणार असून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी १९८० पासून सातत्याने पाठपुरावा केला जात असून माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांच्यापासून आजतागायत यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जात आहे. भाजप सरकारच्या काळात केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाला गती मिळाली आहे. येत्या तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असून पुढील ५ ते ७ वर्षात प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. तसेच मागील १५ वर्षात आयटी पार्कसह एकही मोठा प्रकल्प नाशिकच्या वाट्याला आला नाही. नाशिकमध्ये अत्याधुनिक सेवासुविधा पुरविण्यासह नवीन औद्योगिक प्रकल्प येणे अपेक्षित होते. नाशिकमध्ये एकही प्रकल्प साकारला गेला नसल्याची खंत आ. डॉ. अपूर्व हिरे यांनी व्यक्‍त केली.

नाशिकमध्ये ड्रायपोर्टच्या प्रकल्पाच्या सहाय्याने नाशिकला उभारणी आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. ड्रायपोर्टच्या उभारणीतून होणार्‍या सर्वांगिण विकासाचा आराखडा सादर केला असता ड्रायपोर्टच्या मागणीला गडकरी यांनी तत्पर प्रतिसाद देत नाशिकच्या ड्रायपोर्टला मंजुरी दिल्याची माहिती आमदार डॉ. हिरे यांनी दिली.
ड्रायपोर्टच्या उभारणीमुळे नाशिकसह जिल्ह्यातील द्राक्षे, कांदा, भाजीपाला, फळे तसेच गुलाब फुले, झेंडूसारख्या फुलांना तात्काळ बाजपेठ उपलब्ध होणार असल्याने त्याला योग्य भाव मिळण्याची शाश्‍वती असल्याचे डॉ. हिरे यांनी नमूद केले.

३७०० एकरवर उद्योग क्षेत्र

देशातील सर्वात जास्त विकासनिधी मिळविण्यात धुळे मतदारसंघाने आघाडी घेतली आहे. मतदारसंघात तब्बल २५ हजार कोटींची विकासकामे गतीमान झाली आहेत. मालेगावमधून ७ राष्ट्रीय महामार्ग जात असून लवकरच आठवा मार्गही मालेगावशी जोडला जाणार आहे. प्रत्येक रस्ता चौपदरी करणारे एकमेव शहर असून मनमाड-इंदूर रेल्वेला मिळालेल्या मंजुरीने पाणी, रस्ता व रेल्वेच्या समस्या निकाली निघाल्याची माहिती अद्वय हिरे यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय व राज्याच्या अनेक मंत्र्यांशी चर्चा केली असून रेल्वे, रस्ते व पाण्याची उपलब्धता झाल्याने ३७०० एकरवर भव्य उद्योग क्षेत्रची (एआयडीसी) उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षदावर कराव्या लागणार पाच शस्त्रक्रिया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अपघातात जायबंदी झालेल्या जेलरोडच्या कोयनानगर सोसायटीतील हर्षदा शिवकुमार माळवे हिच्यावर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात आईची प्रकृती गंभीर आहे. टाकळीतील नव्या पुलावर समोरून ओव्हरटेक करून आलेल्या पोलिसाच्या मारुती कारने (एमएच १५/एएस ९३८८) दिलेली धडक हर्षदाचे आयुष्य उद्‍ध्वस्त करणारी ठरली असून, तिच्या उपचारासाठी पाच लाखांवर खर्च आहे.

अपघातात हर्षदाच्या कंबरेची दोन्ही हाडे, मांडीचे हाड मोडले आहे. दोन्ही मनगटांचा चुरा झाला असून, डाव्या पायावर खोलवर जखम झाली आहे. मांडी व लघवीच्या ठिकाणी गंभीर जखम झाली आहे. तोंडाला टाके पडले आहेत. आईचेही माकडहाड मोडले आहे. हर्षदावर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार असून, त्यासाठी पाच लाखांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे माळवे कुटुंब कोलमडले आहे. काका-काकूंनी पैन् पै जमवून आतापर्यंत एक लाख रुपयांचा खर्च केला आहे.

हर्षदाचे काय होणार?
हर्षदाची आई तीन घरी पोळ्या लाटते. वडिलांना नोकरी नाही. हर्षदा दुचाकी शो-रुममध्ये नोकरी करते. या नोकरीतूनच लहान भावाचा महाविद्यालयीन खर्च भागत होता. दोन्ही मायलेकी गंभीर जखमी झाल्याने या कुटुंबापुढे चरितार्थाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शस्त्रक्रियेसाठी पाच-सहा लाख जमवायचे कसे? असा प्रश्न कुटुंबापुढे आहे. त्वरित शस्त्रक्रिया झाली नाही तर हर्षदा कायमची अपंग होईल. या मायलेकींची चूक नसताना पोलिसाने चुकीच्या बाजूने येऊन धडक दिली. तो पोलिसानेही आता पाठ फिरवली आहे. हर्षदाचे पुढे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आयुक्तांकडून निराशा
हर्षदाचे काका-काकू मोठ्या आशेने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना १४ नोव्हेंबर रोजी भेटले. त्या पोलिसाने खर्च तरी उचलवा एवढीच अपेक्षा त्यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली. मात्र, आयुक्तांनी केवळ दोन मिनिटांत बोळवण केली. ‘‘मी काय करू? तक्रार नोंदवली का? कोर्टात केस चालवा. निकाल आल्यावर पैसे मिळतील,’’ असे सांगून आयुक्तांनी आमच्या जखमेवर मीठच चोळले, असे सांगताना हर्षदाच्या काकूला अश्रू अनावर झाले. न्यायासाठी मंत्रालयापर्यंत धडक मारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

गुणी खेळाडू
हर्षदाचे बारावीपर्यंतचे शिक्षण के. जे. मेहतामध्ये झाले. ती उत्कृष्ट सॉफ्टबॉल खेळाडू असून, तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे. पैसे नसल्याने बारावीनंतर छोटे-मोठे काम करीत तिने मुक्त विद्यापीठातून बी. कॉम. ची पदवी मिळवली. मोठी खेळाडू होण्याचे, भावाला इंजिनीअर करून कुटुंबाला सुदीन दाखविण्याचे तिचे स्वप्न होते.

पोलिसांची शिरजोरी
आडगाव पोलिसांच्या मनमानी कारभाराविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी आहेत. धडक देणाऱ्या त्या पोलिसाला उभे केल्यास आपण निश्चित ओळखू, असे हर्षदाने सांगूनही आडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला. गेल्या आठवड्यात नांदूरनाका येथे आडगाव पोलिसांनी एका कुटुंबाला मारहाण केली होती. आडगावच्या विहिरीत तीन तरुण पडले होते. पोलिसांनी दोघांना बाहेर काढले. तिसऱ्याला सोडून दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुलमी राजवट उलथवून टाकणारे ‘वंशभेद’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वत:मधल्या शारीरिक वैगुण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अंधश्रध्देपोटी गरीब महिलांना स्वत:च्या वासनेची शिकार बनविणारा जुलमी, क्रूर राजा आपली दहशत ठेवून असतो. परंतु, सहनशक्तीच्या पलिकडे छळ होतो त्यावेळी धुमसणारा विद्रोह राजसत्ता उलथवून टाकतो हे दाखवणारे नाटक म्हणजे ‘वंशभेद’.

सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत भगवान हिरे लिखित ‘वंशभेद’ हे नाटक गुरूवारी सादर करण्यात आले. एका छोट्याशा राज्यातला स्वत:ला सार्वभौम समजणारा राजा स्वत: नपुंसक असून आपल्याच राणीला वांझ ठरवून तिची सतत अवहेलना करीत असतो. त्याच्या या गैरसमजूतीला राजवैद्य आणि राजज्योतिषी खतपाणी घालतात. त्यामुळे तो राजा अंधश्रद्धेपोटी कुमारिकांवर जबरदस्ती करून स्वत:च्या राणीचा उपमर्द करीत असतो. त्याचे लांगुलचालन करणारे अमात्य व प्रधान त्याची मिंधेगिरी बजावत असतात. परराज्यातील गरीब जनतेला गुलाम करून त्यांच्यावर शारीरिक मानसिक छळ करून प्रचंड श्रमाची कामे करून घेत असतात. इतर नागरिकांनाही जाहीरपणे फाशी देणे, काळकोठडीत डांबणे, राजसत्तेविरूध्द बोलणाऱ्यांना ठार मारणे अशा शिक्षा राजा स्वत:ची दहशत कायम ठेवण्यासाठी देत असतो. याला महामंत्री अपवाद असतात. अशातच राणीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर तिला शोधत येतो. राणी समयसुचकतेचा वापर करते त्याला गुलामवस्तीत आणून ठेवण्याची सूचना करते. त्याला गुप्तपणे भेटते व ही राजसत्ता उधळून देण्याचा विचार सांगते. तो इतरांना त्यासाठी उद्युक्त करतो. राणी आपल्या प्रियकराबरोबर गांधर्व पद्धतीने विवाह करते आणि त्याच्यापासून गरोदर राहते. राजे नपुंसकत्व व राणीचे वांझ नसणे सिद्ध होते. पुढे खचलेल्या राजाला जनता पदच्युत करून प्रियकराला राजा म्हणून निवडते. अशा प्रकारे राणी वंशभेद करते. अशा आशयाची ही कथा होती.
नाटकाचे लेखन भगवान हिरे यांनी तर दिग्दर्शन मुकुंद कुलकर्णी यांचे होते. नेपथ्य प्रसून पाठक, योगेश चव्हाण यांचे तर प्रकाश योजना प्रबोध हिंगणे यांची होती. पार्श्वसंगीत फणिंद्र मंडलिक यांचे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा अपूर्वा शौचे-देशपांडे, गीतांजली घोरपडे, केशभूषा स्वाती शेळके यांची होती. निर्मिती सूत्रधार सुभाष पाटील तर निर्मिती प्रमुख जयप्रकाश जातेगावकर होते. नाटकात प्रशांत देशपांडे, पल्लवी ओढेकर, सुभाष पाटील, सागर संत, नीलेश कटके, सम्राट सौंदाणकर, गौरव वारे, रसिका पुंड, मंगेश मटाले, सुजय कुलकर्णी, सुरज जिरेपाटील, प्रियांका निगळे, संजय धुमाळ, विक्रम सोनवणे, तुषार नागपुरे, प्रियंका कुलकर्णी, शिरीष कठाळे, सृष्टी वाघमारे, पल्लवी कदम, रोशनी पन्हाळे, सागर निकुंभ, प्रवीण ठाकरे यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : तितिक्षा
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह
वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिपिकांनी टेक्नोसॅव्ही होण्याची आवश्यकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी, बारावीचे परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्याची प्रत्येक माहिती बारकाईने भरणे आवश्यक आहे. लिपिकांमार्फत हे काम होत असल्याने त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने तसेच बोर्डाच्या, सरकारी सर्व योजना आता ऑनलाइन प्रक्रियेतच समाविष्ट असल्याने लिपिकांनी टेक्नोसॅव्ही होण्याची गरज आहे. तरच शाळा, सरकारी कार्यालये पेपरलेसकडे वाटचाल करू शकतील, असे प्रतिपादन बोर्डाच्या विभागीय मंडळाचे सहसचिव मच्छिंद्र कदम यांनी केले.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर लिपिकांसाठी पहिली मार्गदर्शन सभा गुरुवारी रावसाहेब थोरात येथे झाली. यावेळी लिपिकांना कदम यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाइन अर्ज भरताना कोणत्याही चुका झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होऊ शकतो. त्यामुळे हे अर्ज लक्षपूर्वक भरणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मंडळ मान्यता वर्धित करणे, निवड व वरिष्ठश्रेणी शिक्षकांची नावे ऑनलाइन पद्धतीने भरणे, परीक्षा आराखडा, अभ्यासक्रम, बदललेले स्वरुप, मंडळाच्या विविध योजना आदी विषयांबाबत या सभेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विभागीय सचिव राजेंद्र मारवाडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, अनिल शहारे, मंडळाचे अधिक्षक ज्ञानेश्वर आंधळे, संगणक शाखा अधिक्षक डी. बी. कादळकर आदी उपस्थित होते.

चांदवडला आज सभा
चांदवड, सटाणा, देवळा, मालेगाव शहर, मालेगाव ग्रामीण, नांदगाव येथील लिपिकांसाठी शुक्रवारी (दि. १७) चांदवड येथील मनमाड रोडवरील ना. बा. जाधव माध्यमिक व उ. मा. विद्यालय येथे सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव येथे अशा प्रकारच्या सभा घेतल्या जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव बाजार समितीत दुपारनंतर लिलाव सुरळीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीचे पेमेंट अदा करण्यावरून झालेल्या वादातून व्यापाऱ्यास शेतकऱ्याकडून मारहाण करण्यात आली होती. या घटणेच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारी असो. ने पुकारलेला बंद अखेर संचालक व व्यापारी असो.च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला. गुरुवारी सायंकाळी चार वाजता लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली.

बुधवारी येथील बाजार समिती आवारात व्यापारी शशांक अग्रवाल व संवंदगाव येथील शेतकरी यांच्यात शेतमाल विक्रीचा धनादेश देण्यावरून वाद होवून व्यापाऱ्यास शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला होता. याघटनेनंतर संतप्त व्यापारी वर्गाने तडकाफडकी लिलाव प्रक्रिया बंद केली होती. अखेर सभापती प्रसाद हिरे व राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यापारी असो.चे अध्यक्ष भिका कोतकर यांच्याशी चर्चा करून लिलाव सुरू करावे अशा सूचना केली होती. यानंतर बाजार समिती आवारात असलेल्या शेतमालाचा लिलाव करण्यात आला होता. मात्र व्यापारी असो.कडून या मारहाणी निषेधार्थ गुरुवारी लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना याबाबत कल्पना नसल्याने गुरुवारी देखील शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणला होता. व्यापाऱ्यांकडून लिलाव बंद आसल्याने व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणाबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

व्यापाऱ्यांची चर्चा करण्यासाठी संचालक अद्वय हिरे, गोविंद खैरनार, काशिनाथ पवार यांची व व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर दुपारी लिलाव सुरू करण्यात आले.

शेतकऱ्यांनी हातघाईवर येवू नये. लिलाव व धनादेशाबाबत काही अडचणी असल्यास संपर्क करावा. शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे धोरण नाही. - भिका कोतकर,

व्यापारी असो, अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images