Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फूटपाथ झालेत गायब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील मुख्य रस्त्यांवरील फूटपाथ फेरीवाले आणि व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने पादचाऱ्यांसाठीचे फूटपाथच दिसेनासे झाले आहेत. या व्यावसायिकांवर पालिकेचा अतिक्रमण विभागही मेहरबान असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही पायदळी तुडविले गेल्याचे चित्र सध्या नाशिकरोडमध्ये बघायला मिळत आहे.

शहरातील सर्वच रस्त्यांना पालिकेने फूटपाथ तयार केलेले आहेत. नागरिकांना सुरक्षितपणे पायी चालता यावे यासाठी फूटपाथ केलेले असले तरी सध्या या फूटपाथचा वापर फेरीवाले, व्यावसायिक आणि दुकानदारांकडून केला जात आहे. सर्वच रस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्याने शहरात फूटपाथ दिसेनासे झाले आहेत. शहरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांचे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकलेली आहे. असे असतानाही नाशिकरोडमधील फूटपाथची परिस्थिती बघता न्यायालयाच्या निर्देशांना पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केराची टोपली दाखवली असल्याचे उघड झाले आहे.

हे रस्ते फूटपाथलेस..

बिटको चौक ते शिवाजी पुतळा

शिवाजी पुतळा ते देवी चौक आणि बसस्थानक

बसस्थानक ते शिवाजी पुतळा व महात्मागांधी टाऊन हॉल

बिटको चौक ते दुर्गादेवी गार्डन

वास्को चौक ते मस्जिद

मुक्त‌िधाम चौक ते मनपा शाळा क्र.१२५

संपूर्ण जेलरोड,

बिटको चौक ते दत्तमंदिर

वाहनबाजारचालक शिरजोर

शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवरील फूटपाथवर दुकानदारांनी आपले व्यवसाय थाटलेले आहेत. याशिवाय जेलरोडला फूटपाथवरच वाहनबाजार आहेत. दुकानदार आणि वाहनबाजार चालकांच्या या मुजोरीमुळे मुख्य रस्त्यांवरील रहदारीलाही अडथळा निर्माण होत आहे. या दुकानांत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने मुख्य रस्त्यांवरच पार्क केली जातात. परिणामी सार्वजनिक वाहतुकीचा फज्जा उडत आहे.

नगरसेवकांचेही अतिक्रमण

मुक्त‌िधामभोवतीच्या सर्व रस्त्यांवरील फूटपाथ हॉटेल व्यावसायिकांसह इतर विक्रेत्यांनी गिळंकृत केलेले असल्याने या रस्त्यावर दररोज सायंकाळी वाहतुकीचा खेळखंडोबा होताना दिसून येतो. या रस्त्यावरील फूटपाथवरच व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. विशेष म्हणजे मुक्तिधाम चौकातील फूटपाथवरील काही टपऱ्या चक्क आजी-माजी नगरसेवकांच्याच आहेत. त्यांनी या व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील फूटपाथवरील अतिक्रमणाबाबत पालिका प्रशासन मूग गिळून आहे. सामान्य नागरिकांचे मात्र फूटपाथअभावी हाल सुरू आहेत.

हप्ते वसुली जोरात

फूटपाथवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक आणि फेरीवाल्यांकडून काही माजी नगरसेवक हप्ते वसुली करीत असल्याचीही या व्यावसायिकांत चर्चा आहे. बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरातील हातगाडे व इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण प्रवाशांसाठी प्रचंड तापदायक झालेले आहे. मात्र, वाहतूक शाखेचे कर्मचारीही हप्ता मिळत असल्याने या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडूनही या गंभीर प्रश्नाची दखल घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.

सध्या धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. हॉकर्स झोनचा प्रश्नही मिटलेला नाही. शहरातील फूटपाथवरील व्यावसायिकांची लवकरच एक बैठक बोलावली जाणार असून, त्यांना बिटको रुग्णालयाजवळील जागेत स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्याय मिळवून देणे कर्तव्यच

$
0
0

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘प्रत्येक घटकास न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य न्यायाधीश आणि वक‌लिांनी पार पाडावे. यातूनच सर्वसामान्यांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होतो. आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक न्यायाधिशासह वक‌लिांनीही प्रयत्नशील रहायला हवे,’ असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

नाशिक वकील संघ आणि सर्व तालुका वकील संघांच्यावतीने आयोज‌ति केलेल्या नवनियुक्त न्यायमूर्तींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी गवई बोलत होते. हा कार्यक्रम गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी सकाळी पार पडला. यावेळी अॅड. इंद्रभान रायते यांचे मालकी हक्कासंबंधीचा शोध या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच नाशिक वकील संघाच्या www.nashikbarassocitaion.co.in या संकेतस्थळाचा शुभारंभही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेले संदीप शिंदे, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आणि औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण ढवळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी गवई यांच्यासह मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, अत‌रिीक्त महाअधिवक्ता अनिल सिंग, औद्योगिक प्राधिकरणचे अध्यक्ष शशिकांत सावळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सतीष देशमुख हे उपस्थित होते. लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेल्या न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम आहे. या विश्वासास पात्र ठरण्यासाठी सजग आणि प्रयत्नशील कामगिरी महत्त्वाची असल्याचे न्यायमूर्ती गवई यांनी यावेळी स्पष्ट केले. नाशिक जिल्हा कोर्टास नव्याने अड‌ीच एकर जागा मिळाली असून, तिथे बांधकाम व्हावे यासाठी आम्ही सदैव पाठीशी राहू, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, न्यायमूर्ती मोरे यांनी कोर्टातील प्रलंब‌ति खटल्यांवर प्रकाश टाकला. प्रलंब‌ति खटले निकाली काढण्यासाठी न्यायाधिशांसह वक‌लिांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत मोरे यांनी व्यक्त केले. कोर्टात आलेल्या नागरिकांना जलद तसेच स्वस्त न्याय देण्यासाठी प्रयत्न झाल्यास सर्वसामान्यांचा या यंत्रणेवरील विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होईल, असे मोरे यांनी स्पष्ट केले. सत्कारमूर्ती म्हणून उत्तर देताना न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आजवर काम करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या तसेच न्यायदान क्षेत्रात काम करीत असताना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचे आभार मानले. आजच्या कार्यक्रमानिमित्त नाशिकशी असलेले नाते आणखी दृढ झाल्याची भावना न्यायमूर्ती देव यांनी व्यक्त केली. नाशिकमध्येच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या आणि सध्या औरंगाबाद खंडपीठात काम पाहत असलेल्या न्यायमूर्ती ढवळे यांनी सुध्दा आपल्या यशात सर्वांचा वाटा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. नाशिक कोर्टास जागा मिळवून देण्यासाठी न्यायमूर्तींनी प्रयत्न केल्याची आठवण करून देत ठाकरे यांनी त्यांनी त्यांचे आभार मानले. व्यासपीठावर वकील संघाचे उपाध्यक्ष प्रकाश आहुजा, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, महाराष्ट्र व गोवा वकील बार असोसिएशनचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, अॅड. अविनाश भीडे, वकील संघाचे सचिव अॅड. जालिंदर ताडगे, खजिनदार अॅड. संजय गिते यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व तालुका वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड. जयंत ढोमसे यांनी केले. या सत्कार सोहळ्यास जिल्ह्याभरातील वकील मोठ्या संख्येने हजर होते.

चर्चासत्राचे आयोजन

या कार्यक्रमानंतर हिंदू वारसा कायदा कलम ८ व सुप्रीम कोर्टाचा उत्तमसिंग निवाडा आणि मिळकतीचा शोध अहवाल या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या विषयावर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुधाकर आव्हाड, सदस्य असलेले अॅड. आशिष देशमुख आणि निफाड येथील अॅड. अण्णासाहेब भोसले यांनी मार्गदर्शन केले. हिंदू वारसा कायदा स्वातंत्र्यानंतर अस्तित्त्वात आला असून, यामुळे संपत्ती लयास जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तर, मिळकतीचा शोध अहवाल या विषयावर अॅड. इंद्रभान रायते, औद्योगिक प्राधिकरणाचे अध्यक्ष शशिकांत रायते, अॅड. नंदकिशोर भुतडा, उत्सव हेळंबकर, अॅड. अविनाश भिडे, राजेश खर्चे, अॅड. जयंत जायभावे या तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली. टायटल व्हिरिफिकेशन करताना वक‌लिांनी समोरच्या व्यक्तीकडूनच प्रतिज्ञापत्र घेऊन दोन वेळेस जाहिरात प्रसिध्द करूनच पुढे जावे, असे मत मांडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटकांतून ज्येष्ठांच्या भूमिकांना कात्री!

$
0
0

नाशिक ः हौशी राज्य नाट्य स्पर्धांचा बिगूल वाजला आणि रंगकर्मींची एकच धावपळ सुरू झाली. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तालमींचे चीज होण्याची वेळ आली असल्याने रंगकर्मी अत्यंत उत्साहात आहेत. परंतु, या सर्व गर्दीत सीनिअर कलाकारच दिसत नसल्याचे चित्र आहे. सध्या सादर होणाऱ्या नाटकांच्या संहितांमधून सीनिअर कलाकारांच्या भूमिकांनाच कात्री लावण्यात आली असून, त्यांनी जायचे कुठे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य नाट्य स्पर्धा गाजवत असलेले सीनिअर्स सध्याच्या नाटकांच्या गर्दीत कुठे नजरेस पडत नाहीत. त्याचे कारण म्हणजे नाटक लिहिणारे, नाटकाचे दिग्दर्शन करणारे आणि प्रस्तुती करणारे एकूणच सर्वजण तरुण तुर्क असल्याने त्यांच्या कलाने संहिता लिहिली जाते, दिग्दर्शन केले जाते. त्यामुळे सीनिअर कलाकाराला या सगळ्यात कुठेच वाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

वयाची पन्नाशी ओलांडलेले पात्र नाटकातून गायब झाल्याने हा प्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. कोणत्याच नाटकात आजी, बाबा किंवा त्या वयाचे कलाकार नकोच असतात. त्यांना टाळून संहिता लिहिली जात असल्याने त्यांचा समावेश तेथे होतच नाही. मग सीनिअर्स फक्त मार्गदर्शनापुरतेच राहतात. तेथेही त्यांच्याकडून दोन-चार टिप्स शिकायच्या तर यंगिस्तानला ते नको असते. त्यामुळे या कलाकारांना राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा असूनही शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

संहितालेखन तरुणांच्या हाती

नाटकाची संहिता लिहिणारा मोठा वर्ग तरुण आहे. त्याला नाटकात फक्त ग्लोबलायजेशन, डिजिटायजेशन आणि यंगिस्तानच्या भोवती फिरणाऱ्या बाबी दाखवण्यातच रस असतो. किंबहुना परीक्षक त्यालाच भुलतो असा समज त्यांनी करून घेतल्याने लिहिताना पात्र निवडीच्या वेळी केवळ तरुण-तरुणी यांच्यापुरतेच नाटक मर्यादित ठेवले जाते. या नाटकांमध्ये पन्नाशीच्या वरचा कलावंत औषधालाही सापडत नाही.

नाटकातील सामाजिकतेवर प्रश्नचिन्ह

नाटकांचे विषय पाहता ग्लोबल संकल्पनेवर अधिक भर दिला जातो. त्यात एखादे हसते खेळते कुटुंब, घरातील चार-दोन मोठी माणसे, पारावर गप्पा मारणारे वृद्ध, घरात काठी टेकत येणारी आजीबाई या भूमिका लिहिल्याच जात नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी सीनिअर कलाकार केवळ तरुणाईचे नाटक पाहण्यात समाधान मानत असून, त्यांची अभिनयाची भूक मात्र भागत नाही.

ज्यांना नाटकाचे वेड आहे ते वयाकडे बघत नाहीत. परंतु, नाटक आता प्रोफेशनल होत चालले आहे हेदेखील खरे आहे. नाटकाची गरज जशी असेल तसे पात्र निवडले जातात. अर्थात पन्नाशीच्या पुढे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यावर इतरही जबाबदाऱ्या असतातच. त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही म्हणूनही पुढे ते बायकॉट झाले असतील.

- हेमंत देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामटवाड्यात आत्महत्या

$
0
0

कामटवाड्यात आत्महत्या

नाशिक : कामटवाडे परिसरातील तुळजाई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तुळशीदास किसन क्षीरसागर यांनी (वय ५७) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. क्षीरसागर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांना कामटवाडे परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

मेरी-दिंडोरीरोडवरील तलाठी कॉलनी परिसरातील शिवनगर येथील तुळजाभवानी निवास येथे राहणाऱ्या तेजस्विनी प्रकाश राठोड (वय १८) या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तेजस्विनीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी प्रकाश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार मेतकर करीत आहे.

कुऱ्हाडीने वार

घरगुती वादातून एकाने दुसऱ्याच्या पायावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मखमलाबाद गाव परिसरातील कोळीवाडा येथे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य संशयितास अटक केली असून, रमेश कारभारी झोले असे संशयिताचे नाव आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी पंडित रामभाऊ झोले (वय ५०) हे त्यांचा पुतण्या अतुल यास काही समजावून सांगत होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अतुलच्या वडीलांना ही बाब आवडली नाही. रमेश झोले यांनी थेट कुऱ्हाड घेऊन रामभाऊ यांच्या पायावर वार केला. यात रामभाऊ गंभीर जखमी झाले. घटनेचा अधिक तपास पीएसआय सावळा करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांत दुर्दशेचा ‘बहर’

$
0
0

नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

शहरातील उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा ठेका दिलेला असतानाही या उद्यानांच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या शहरातील उद्यानांत दिसून येत आहे. बहुतांश उद्यानांची देखभालच होत नसल्याने जणू या उद्यानांत दुर्दशेचा बहरच आल्याची स्थिती आहे.

नाशिकरोड प्रभागातील १२२ पैकी एक-दोन उद्यानांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व उद्यानांची केवळ कागदोपत्री देखभाल सुरू असल्याचे चित्र आहे. उद्यानांच्या या दुर्दशेमुळे दिवाळीच्या सुटीत बच्चेकंपनीला उद्यानांत खेळण्याच्या आनंदापासून वंचित राहावे लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

नाशिकरोड प्रभागात एकूण १२२ उद्याने आहेत. या उद्यानांपैकी लोकमान्य उद्यानासारख्या एक-दोन उद्यानांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व उद्यानांची दुर्दशा झाली आहे.या उद्यानांच्या देखभालीचा ठेका डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी एका मजूर सहकारी संस्थेला दिलेला आहे. मात्र, प्रत्यक्षात येथील उद्यानांची दुरुस्ती होत नसल्याने शहरातील उद्यानांना अवकळा आली आहे. बहुतांश उद्यानांत काटेरी झाडे-झुडपे, गवत वाढले असल्याने अशा उद्यानांत पाय ठेवायलाही जागा राहिलेली नाही. काही उद्याने तर मद्यपींचा अड्डा बनली असून, काही उद्यानांना कायमचे टाळे ठोकण्यात आले आहे. याशिवाय काही उद्यानांना कचराकुंडीचे स्वरूप आले असून, भटक्या जनावरांचाही कायम वावर असतो. उद्यानांच्या या दुर्दशेमुळे शहराच्या बकालपणातही वाढ झाली आहे.

--

खेळण्यांची दुरुस्तीच नाही

शहरातील ज्या मोजक्या उद्यानांत लहानग्यांसाठी खेळण्या उपलब्ध आहेत त्या खेळण्याची सध्या मोडतोड झालेली आहे.या खेळण्यांची दुरुस्तीच होत नसल्याने तुटलेल्या खेळण्यामुळे लहान मुलांसाठी या खेळण्या धोकादायक ठरु लागल्या आहेत.काही उद्यानांतील खेळण्यांची चोरीही झालेली आहे.

--

गवत अन् झुडपे फोफावली

ठेकेदाराकडून उद्यानांची देखभाल दुरुस्ती वाऱ्यावर सोडण्यात आलेली असल्याने बहुतेक उद्यानांत काटेरी झाडे-झुडपे आणि रानगवत वाढले आहे. त्यामुळे या उद्यानांचा वापरच थांबला आहे. काही उद्यानांत उंदीर, घुशी अन् सापांसारख्या प्राण्यांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.

--

मद्यपींच्या रंगतात मैफली

शहरातील काही उद्यानांत मद्यपींच्या मैफली दररोज रंगताना दिसत आहेत. अशा उद्यानांत मद्याच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून येतात. मद्यपींच्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा उद्यानांच्या परिसरातील पथदीपही मद्यपींनी फोडलेले आहेत. त्यामुळे या उद्यानांच्या परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने या भागातून ये-जा करणेदेखील अवघड बनले आहे.

--

अतिक्रमणांचा विळखा

शहरातील काही उद्याने अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेली आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील नेहरू गार्डनव्यतिरिक्त उर्वरित एकाही उद्यानाच्या अतिक्रमणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे काही उद्यानांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री राहिलेले आहे. काही उद्यानांना व्यावसायिकांच्या टपऱ्यांचा विळखा पडलेला आहे. या व्यावसायिकांकडून उद्यानात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो.

---

नागरिक म्हणतात...

--

चेहेडी गावात मोठे उद्यान आहे. मात्र, या उद्यानाला कायमच टाळे असते. याच उद्यानात ग्रीन जिम आहे. परंतु, शेजारीच सार्वजनिक शौचालय असल्याने दुर्गंधीचा त्रास होतो. त्यामुळे हे उद्यान केवळ शोभेचे बाहुले बनले आहे.

-नितीन बोराडे, नागरिक

--

देवळालीगावातील उद्यानांची देखभालीअभावी दुरावस्था झाली आहे. काही उद्यानांत स्थानिकांकडून अतिक्रमण केले गेले आहे. वडारवाडीतील उद्यानाचा तर उकिरडाच झाला आहे. येथे काटेरी झाडे वाढली असून, खेळणीही तुटली आहेत.

-किशोर वाघ, नागरिक

---

लोकप्रतिनिधी म्हणतात...

-

शहरातील उद्यानांच्या दुरवस्थेबाबतचा विषय महासभेवर विषय घेतला असून, त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल मागविला आहे. याप्रश्नी कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली जाणार आहे.

-सत्यभामा गाडेकर, नगरसेविका

--

परिसरातील सर्व उद्यानांची लवकरच पाहणी केली जाणार आहे. सध्याच्या ठेकेदाराकडून उद्यानांची देखभाल नियमानुसार केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. आयुक्तांच्याही ते निदर्शनास आणून दिले जाईल.

-पंडित आवारे, नगरसेवक

--

उद्यानांच्या देखभालीचे काम ठेकेदाराकडून वेळवेळी होत नाही. स्थानिक नगरसेवकांनीही या प्रश्नाची दखल घेतली पाहिजे. सर्व उद्यानांची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल.

-केशव पोरजे, नगरसेवक

नाशिकरोड प्रभागात उद्यान विभागाकडे केवळ दहा कर्मचारी असल्याने त्यांना सर्वच उद्यानांच्या देखभाल व्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येत नाही. ठेकेदारानेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

-सरोज अहिरे, नगरसेविका

---

अधिकारी म्हणतात...

शहरातील उद्यानांची ठेकेदारामार्फत नियमितपणे साफ सफाई केली जाते. गवत काढण्यासह वेळेवर पाणी देणे, झाडांची निगा राखणे अशा स्वरुपाची कामे ठेकेदाराकडून केली जातात. काही उद्यानांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झालेले असेल, तर त्याची ठेकेदाराकडे चौकशी केली जाईल.

-बी. टी. कटारे, उद्यान निरीक्षक, नाशिकरोड प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पमधील विकासकामांना खीळ

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे हौसनरोड व आनंदरोडसह आठवडेबाजारातील जुने शौचालय पाडण्याबाबत चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांचा प्रतिसादच मिळत नसल्याने बोर्डाचा खर्च वाया जात असून, याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून टेंडर रकमेत बदल करणे अनिवार्य झाले आहे किंवा वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून यातून उपाय शोधणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाने वॉर्ड क्रमांक ३ मधील हौसनरोडवरील प्राथमिक मुलींची शाळा तोडून मटेरिअलसह घेऊन जाण्यासाठी कमीत कमी रक्कम ८ लाख ९० हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. याच वॉर्डातील आठवडेबाजारातील जुने सार्वजनिक शौचालय पाडून मटेरिअलसह घेऊन जाण्यासाठी १ लाख १७ हजार रुपयांची, तर वॉर्ड १ मधील आनंदरोडवरील प्राथमिक मुलांची शाळा पाडून मटेरिअलसह घेऊन जाण्यासाठी २१ लाख ८० हजार रुपयांचा निविदा प्रसिद्ध केली. सदर शाळा पाडणे व मटेरिअल घेऊन जाणे यासाठी बोर्डात मंजुरी देताना तांत्रिकदृष्ट्या पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला. बोर्डाचे सदस्य व गॅरिसन इंजिनीअर यांच्या सल्ल्यानंतर रकमेबाबतचा ठराव करण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत चार वेळा जाहीर निविदा प्रसिद्धीस देत करून ऑनलाइन पद्धतीने टेंडर मागवूनदेखील किंमत जास्त असल्याच्या कारणास्तव कुणीही निविदा भरण्यास पुढे आलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडलेल्या आनंदरोडवरील शाळेतील इमारतीमधील सागवानी दरवाजे, खिडक्या, लोखंडाचे साहित्य यांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे असे काम करणारे कंत्राटदार हे काम घेण्यास पुढे येत नसल्याचे बोलले जात असून, बोर्डाचे हे काम कित्येक महिन्यांपासून लालफितीत अडकले आहे.

ही कामे रखडली

आनंदरोड मैदानावरील शाळेच्या जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे, तर हौसनरोडवरील शाळेच्या जागी व्यापारी संकुलात ९० गाळे व सामाजिक सभागृह उभारले जाणार आहे. आठवडेबाजारात नवीन शौचालय उभारण्यात येणार आहे. मात्र, जुन्या इमारतीची पाडण्याची प्रक्रिया रेंगाळल्यामुळे वरील तीनही ठिकाणी होणारी विकासकामे खोळंबली आहेत.

---

निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन निविदा येणे आवश्यक असते. आतापर्यंत एकत्रित तीन निविदा न आल्याने वारंवार निविदा प्रसिद्धीस द्यावी लागत आहे.

- उमेश गोरवाडकर, कार्यालय अधीक्षक, कॅन्टोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारुला महिलांचे नाव द्या

$
0
0

गिरीश महाजनांचे वादग्रस्त वक्तव्य

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दारूची विक्री वाढण्यासाठी त्यास महिलांचे नाव दिले तर त्याची विक्री निश्चित वाढेल. त्यामुळे साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ ठेवण्याचा अजब सल्ला महाजन यांनी भर सभेत दिला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास शनिवारी प्रारंभ झाला, त्या कार्यक्रमात महाजन बोलत होते.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामासह शहादा शनिवारी येथे संगणकीकृत ऊस वजन काटा पूजन कार्यक्रमप्रसंगी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, सरकारसाहेब रावल, आत्माराम बागले आदी उपस्थित होते. त्यावेळी महाजन यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

नेमके वक्तव्य

कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती दिली. त्यात त्यांनी आपल्याकडे डिस्ट्रिलरी प्रकल्प आहे मात्र मद्याची विक्री कमी होत असल्याचे सांगितले. त्यानंतर मंत्री महाजनांनी याच मुद्द्याला अनुसरून, “राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होत असते, त्यांच्या कारखानानिर्मित दारूचे नाव ‘भिंगरी’ आहे. तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव ‘ज्यूली’ असे आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते. ही वस्तुस्थिती आहे. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे अनेक गुटख्याचे प्रकार बंदी असताना विकले जातात. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ करावे.”, असे विधान केले.

जळगावात निषेध

जिल्हा महिला राष्ट्रवादीने रविवारी शहरातील शिवतीर्थ मैदानासमोरील जी. एम. फाउंडेशन या कार्यालयाच्या बाहेर या विधानाचा निषेध केला. तसेच, त्यांच्या प्रतिमेला जोडेदेखील मारले. महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या महाजनांनी महिलांची माफी मागावी, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणीही महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पना पाटील, सरचिटणीस मिनल पाटील, माजी शहराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अ‍ॅसिड टाकण्याची तरुणीला धमकी

$
0
0

सटाणा : सटाण्यातील एका तरुणीला नगरदेवळा (जि. जळगाव) येथील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून माझ्याशी लग्न कर नाहीतर चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकून देण्याची धमकी दिली. तसेच तिच्या दुचाकीसह घरमालकांची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना सटाणा शहरातील नामपूर रोडच्या श्रमिकनगरमध्ये घडली. या तरुणीने सटाणा पोलिसात त्या तरुणाविरुद्ध फिर्याद दिली असून, अरूण ज्ञानेश्वर पाटील असे या तरुणाचे नाव आहे. तो फरार झाला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे सटाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गच्चीवरच्या बागेला ‘खतपाणी’

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

जल, जंगल, जमीन आणि नागरिक हे निसर्गाचे सूत्र आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून मानवाला कायम काही तरी मिळतच असते. पण, त्याचा सदुपयोग करणे मानवजातीला शक्य होत नाही. आजच्या बदलत्या लाइफ स्टाइलमुळे तर निसर्गाकडे मानवाचा कानाडोळा होत आहे. मात्र, आपल्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ निसर्गासाठी काढणे खूप गरजेचे आहे. घरच्या घरी निसर्ग साकारायचा झाल्यास गच्चीवरची बाग हा खास प्रकल्प आहे, असा सल्ला निसर्गसंवर्धक संदीप चव्हाण यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांना दिला.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे रविवारी (दि. ५) रोजी ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हे वर्कशॉप पार पडले. या वर्कशॉपसाठी मोठ्या संख्येने ‘मटा’च्या वाचकांनी हजेरी लावली होती. घरी उपलब्ध असलेल्या जागेत नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली रसायनमुक्त फळे, भाज्या तयार करण्याचे तंत्र यावेळी उपस्थिताना सांगण्यात आले. तसेच, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात सहजसोपी बाग फुलविण्याच्या खास टिप्सदेखील देण्यात आल्या. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, की गच्चीवरची बाग ही एक इव्हेस्टन्मेंट आहे. आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात जगण्याचा आनंद यातून मिळतो. निसर्ग माणसाच्या जवळ येण्यासाठी आसुसला आहे. त्यामुळे त्याला स्थान भेटल्यास तो कुठेही फुलतो. गच्चीवर किंवा घरच्या मोकळ्या जागेत भाजी, फळे, फुले यांचे पीक घेतल्यास आपल्याला त्याच खूप लाभ होतो. त्यासाठी खर्च अगदी अत्यल्प आहे. मात्र, त्याचे फायदे अनेक आहेत. तुम्ही योग्य तंत्र शिकल्यास घरच्या घरी कोणतेही पिके घेणे सहज शक्य आहे. वांगे, बटाटे, कांदे, मोगरा, गुलाब, अडुळसा, भोपळा अशी अनेक पिके घरी घेता येतात. सोबतच चव्हाण यांनी उपस्थितांना घरच्या बागेत झाडे कशी लावावी, त्यांची निगा कशी राखावी, तसेच त्यासाठीचे खत कसे तयार करावे, याचीही प्रात्यक्षिके करून दाखविले. उपस्थितांच्या गार्डनिंगसंदर्भातील अनेक शंकांचे निरसनही यावेळी कररण्यात आले.

.....

यामुळे फुलेल गच्चीवरची बाग

..

अशी बनवावी कुंडी

नारळाची करवंटी, तेलाचा पत्र्याचा डबा, जुने शूज, बाटली, लाकडी बॉक्स, चहाचा कप, तांब्या, बादली, प्लास्टिकचा टब अशा अनेक टाकाऊ वस्तूंपासून कुंडी बनवून गच्चीवरची बाग साकारता येऊ शकते.

..

अशी भरावी कुंडी...

काळी, लाल आणि खतमिश्रित माती कुंडी भरताना वापरावी. वाळवलेल्या किचन वेस्ट मटेरिअलपासून कुंडी तयार केल्यास उत्तम असते. कुंडीत मातीसोबत गावठी गायीचे वाळवलेले शेण किंवा शेणखत भरावे. झाडांचा सुकलेला पालापाचोळा, झाडांच्या वाळलेल्या काड्या, उसाचा चोथा, नारळाच्या शेंड्या यांचा वापर कुंडीतल्या मातीमध्ये करावा. कोणतीही कुंडी २ ते ४ इंचच भरावी. रोप लावल्यानंतर कुंडी २ ते ३ इंच रिकामी असायला हवी. अशा पूरक कुंडीत रोपांची वाढ लवकर होते.

...

अशी वाढवावीत झाडे

झाडांना रोज पाणी घालताना त्यांच्याशी संवाद साधण्याचे तंत्र आपण शिकायला हवे. झाडांची निगा राखत पाणी घालतेवेळी त्यांच्याकडे लक्ष देत वेस्ट मटेरिअल काढल्यास त्यांना आत्मसंवर्धन मिळते. हा प्रयोग कायम केल्यास झाडे नक्की वाढतात, असे शास्त्र सांगते. झाडांची माती महिन्यातून एकदा भुसभुशीत करीत खतपाणी केल्यास झाडांची वाढ लवकर व योग्य होते.

........


बागेचे व्यवस्थापन करतानाची न्यूट्रिशिअन पद्धत या उपक्रमाद्वारे शिकायला मिळाली. घरच्या घरी बागेच्या रुपातून खूप काही विकसित करता येते हे माहिती झाले. ‘मटा’च्या या उपक्रमातून गार्डनिंगचे तंत्र शिकायला मिळाले. असे स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे सर्वांमध्ये नक्कीच निसर्गाची गोडी निर्माण होऊ शकेल.

-डॉ. वसंत टिकेकर

...

गृहिणी फावल्या वेळात घरीच अनेक पिके घेत बाग फुलवू शकतात, हे या वर्कशॉपद्वारे समजले. बाग साकारणे हे एक कौशल्य असून, त्यामागचे अनेक समज-गैरसमज या उपक्रमाद्वारे दूर झाले. घरी बाग तयार करणे खूप अवघड असेल, असे वाटायचे. मात्र, या उपक्रमाच्या मार्गदर्शनातून सगळे सोपे करून सांगण्यात आले.

-ज्योती माळोदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य स्पर्धेत यंदा ‘महिलाराज’

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रावर आतापर्यंत लेखन आणि दिग्दर्शनात पुरुषांची मक्तेदारी दिसत होती. महिला किंवा मुली केवळ अभिनय करतानाच दिसायच्या, यंदा पहिल्यांदाच वेगळे चित्र दिसायला लागले आहे. माधवी शिंदे, शैलजा औटी व प्राची गोडबोले या तीन लेखिकांच्या संहिता आणि पल्लवी पटवर्धन व आरती हिरे या दोन दिग्दर्शिका नाटकांचे दिग्दर्शन करीत असल्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेत यंदा महिलाराज दिसणार आहे.

एक काळ असा होता, की नाटकात फारच कमी महिला किंवा मुली दिसायच्या. नाटकाची आवड असली, तरी घरातून परवानगी मिळत नसायची. नाटकाच्या तालमीसाठी उशिरापर्यंत वेळ देणे कित्येकींना शक्य नसायचे. तालमींना जाण्या-येण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. अशा अनेक कारणांमुळे महिला आणि मुलांचा नाट्य स्पर्धेतील सहभागही मर्यादित असायचा. त्यामुळे कमीत कमी स्त्री पात्रे असलेल्या नाटकांची निवड केली जायची. स्त्री पात्रांची अभिनयाच्या पारितोषिकांतदेखील स्पर्धा फारशी नसल्यामुळे त्यांना सहज बक्षीस मिळायचे.

मात्र, बदलत्या काळात मुली कला क्षेत्राकडे गांभीर्याने बघत असल्याचे जाणवू लागले. नाटकातील त्यांचा सहभाग वाढू लागला. पुरुष अभिनयाच्या पारितोषिकांपेक्षाही स्त्री अभिनयाच्या पारितोषिकांमध्ये स्पर्धा वाढलेली दिसते. राज्य नाट्य स्पर्धेच्या नाशिकच्या इतिहासात यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने महिला लेखिका आणि दिग्दर्शिका उतरल्या आहेत. ‘प्रयास’सारख्या नाटकात तर महिला दिग्दर्शिका आणि तब्बल पंधरा स्त्री पात्रे साकारली जाणार आहे. त्यात पहिल्यांदा नाटकात काम करणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्य नाट्य स्पर्धेत महिलाराज बघायला मिळणार आहे.

...

‘प्रयास’ ही महिलाप्रधान संहिता वाचनात आली. त्यात महिलांना समाजात वावरताना येणारे अनेक प्रकारचे अनुभव असल्याने ती भावली. अनेक पातळ्यांवर महिलांना होणारा त्रास, त्यांची घुसमट, त्यांचा संघर्ष आदी दाखविणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन तब्बल पंधरा स्त्री पात्रांना घेऊन करीत आहे.

-पल्लवी पटवर्धन, दिग्दर्शिका

--

लेखनाची आवड असली, तरी वेळ मिळत नव्हता. यापूर्वी एकांकिकांचे लेखन, त्यांचे प्रयोग केले आहेत. नाटकांत अभिनय केलेला आहे. अहिल्यादेवींचे चरित्र मनाला भावले, त्यावर नाट्य लेखन करण्याचे ठरविले आणि ही संहिता तयार झाली. माझे हे राज्य नाट्य स्पर्धेतील हे पहिलेच दोन अंकी नाटक आहे.

-माधवी शिंदे, लेखिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोडेनगर परिसराती दुकान फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खोडेनगर परिसरातील पखालरोडवरील श्रीनिवास टॉवर येथील बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ४१ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी राजीव मनोहर विश्वकर्मा (रा. प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरीची घटना शुक्रवारी रात्री साडेसात ते शनिवारी सकाळच्या दरम्यान घडली. दुकानात घुसलेल्या चोरट्यांनी पॅनोसोनिक कंपनीचा टीव्ही, दोन सायकलचे हेल्मेट, एक पेन ड्राइव्ह, एक सेट हॅण्डग्लोज व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहे.


ठार मारण्याचा प्रयत्न

भाईगिरी करतो, दुकानदारांकडे पैसे मागतो अशी बदनामी का करतो, याची विचारणा करीत दोघांनी एकाच्या डोक्यावर वार करीत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास किशोर सूर्यवंशी मार्गावरील चेतना व्यसन मुक्ती केंद्राजवळ घडली. शैलेश रमेश पाटील (वय ३०, रा. आर्य सोसा. जुईनगर, किशोर सूर्यवंशी मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेवेळी संशयित आरोपी सौनू उर्फ वैभव गजानन खिरकाडे (रा. श्रीधर कॉलनी, पेठरोड) आणि पुष्पक कैलास शिंगाडे (वय २२, शिवदर्शन सोसा. आरटीओ ऑफिससमोर, पेठरोड) या दोघांनी त्यास रस्त्यात गाठले. यावेळी खिरकाडेने पाटील यास तु माझी बदनामी का करतो, म्हणून विचारणा केली. तसेच याच वादातून खिरकाडेने चॉपर काढून पाटीलच्या डोक्यात सपासप वार केले. या दरम्यान शिंगाडेने देखील अॅक्टिव्हाच्या डिकीत ठेवलेला कोयता काढून पाटीलच्या डोक्यात मारला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बेडवाल करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुतूहलातूनच कलाकार निर्मिती

$
0
0

अभिनेते दीपक करंजीकर यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक कलावंतातील कुतूहल त्याला कलाकार बनवत असते. एकदा की हे कुतूहल चाळवले की पुढील क्रिया आपोआपच व्हायला लागतात. सतत, निरंतर काम करत राहणे ही ऊर्जा प्रत्येकाच्या मनातल्या कुतूहलाचा निकाल असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह व सिनेअभिनेते दीपक करंजीकर यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करंजीकर यांच्या हस्ते रंगभूमीदिनानिमित्त करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात करंजीकर बोलत होते. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. करंजीकर पुढे म्हणाले, की रंगभूमीसाठी १७४ वर्षे एखादा दिन साजरा करणारा भारत हा एकमेव देश आहे. असे काम करणारी शाखा महाराष्ट्रात दुसरी नाही अशी कौतुकाची पावतीही करंजीकर यांनी दिली.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. नाट्य परिषदेतर्फे काही विशेष योगदान पुरस्कारही देण्यात आले. यात संजीवनी कुलकर्णी, रेखा नाडगौडा, विद्या देशपांडे व मीरा धानू यांचा समावेश होता. संजीवनी कुलकर्णी यांच्या वतीने सुमुखी अथनी यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच यावेळी दिवंगत रंगकर्मींच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रसाद रहाणे, मयुरी सिन्नरकर, पूजा साळवे, वैष्णवी भडकमकर, अक्षय तिवारी, विकास दातार, शुभदा भडकमकर यांचा समावेश होता. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांचा राज्य नाट्य स्पर्धेतल्या सुवर्णमहोत्सवी नाटकाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांचा पुरस्कार त्यांच्या कन्या नंदा रायते यांनी स्वीकारला. तसेच संगीत देवबाभळी या नाटकातील कलावंत रसिका नातू व शुभांगी सदावर्ते, विजय साळवे व महेश डोकफोडे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले. अदिती मोराणकर यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कारमूर्तींच्या वतीने बबनराव घोलप व सदानंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संगीत देवबाभळी या नाटकातील काही गीतांचे सादरीकरण झाले.

हे आहेत पुरस्कारार्थी

दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनय पुरूष ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, शांता जोग स्मृती पुरस्कार अभिनय स्त्री ज्येष्ठ रंगकर्मी नीता कोठेकर, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार दिग्दर्शन अतुल पेठेकर यांच्या वतीने राहुल डबीर यांनी, गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार प्रकाशयोजनेसाठी ज्येष्ठ रंगकर्मी सतीश सामंत, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारिता नंदकुमार टेणी, रामदास बरकले स्मृती पुरस्कार लोककला बबनराव घोलप यांना, वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार शीला सामंत यांना तर रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार नेपथ्यासाठी आनंद ढाकिफळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोकोचा इशारा

$
0
0

देवळा- सौंदाणा रस्त्याबाबत निवेदन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा ते सौंदाणा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत सदर रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.

देवळा ते सौंदाणा या रस्त्याच्या खड्ड्यांबाबत येत्या ११ नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषणासह रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा मेशीचे माजी सरपंच गंगाधर शिरसाठ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

तालुक्यातील देवळा-सौंदाणा रस्त्याची गेल्या एक वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच देवळा-सौंदाणा रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडल्याने दररोज अपघात होत आहेत, असे या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे. वाहनांना या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा लेखी तक्रारी करून डोळेझाक केली जात आहे. तरी येत्या सदरच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा दि. ११ नोव्हेंबरला बेमुदत उपोषण करून रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकात शेवटी देण्यात आला आहे.

पत्रकावर चिंतामण सावकार, वसंत शिरसाठ, काशिनाथ पवार, शांताराम निकम, रामदास निकम, विजय चव्हाण, सचिन राज, दावल बोरसे, विलास भंडारे, बापू गांगुर्डे, विजय कानडे, अनिल आहेर, राजेंद्र गुंजाळ, शाहू शिरसाठ, चिंतामण वाघ आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्त सैतानाचे नसतात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महागाईचे चटके तुम्हाला जाणवतील. मात्र, मोदीभक्तांना जाणवणार नाहीत. मुळात मोदी भक्तांना आपण भक्त मानत नाही. याचे कारण म्हणजे भक्त हे देवाचे असतात. सैतानाची भक्ती केली जाते का, अशी टीका करीत जेएनयू विद्यार्थी संघटनेचा युवा नेता कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदी यांना सैतान संबोधले.

सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेतर्फे तूपसाखरे लॉन्समध्ये येथे रविवारी कन्हैया कुमारची सभा झाली. जीएसटी, नोटाबंदी व सरकारच्या धोरणावरही हल्ला करत समानतेच्या अधिकाराचा मुद्दाही त्याने या वेळी उपस्थित केला. तब्बल अडीच तास चाललेल्या या सभेत विविध घोषणांनी परिसर दणाणला होता. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात व भाजपमध्ये भ्रष्टाचारीच नेत्यांना प्रवेश देतात, असाही प्रश्नही केला. या वेळी त्यांनी गॅसच्या १६ महिन्यांत वाढलेल्या किमतींबरोबरच महागाईचा मुद्दागी उपस्थित केला. ‘भाजप भ्रष्टाचारी है की मालूम नहीं, लेकिन बेइमान है’ असे सांगत निवडणुकीत दिलेले आश्वासन न पाळणे, मते घेऊन काम न करणे यांसारखे उदाहरण देत भाजपने घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल केला.

आपल्याला करमणूक जर करायची असेल तर आपण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐका. त्यातील विरोधाभास आपली चांगली करमणूक करेल, असे सांगत मोदींना चिमटाही काढला. पंतप्रधान मोदींवर टीका करतानाच कन्हैया कुमार म्हणाला, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वैचारिक मतभेद आहेत. त्यांच्या आईचा व कुटुंबीयाचा मी आदर करतो. मतभेद असावे, पण वैर नाही, ईर्षा नसावी.

कन्हैया यांनी आपल्या भाषणात काळाराम मंदिर आंदोलन, कुंभमेळा व नाशिकच्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेखही केला. या वेळी त्यांनी काळाराम आंदोलन डॉ. बाबासाहेबांनी का केले, त्यामागची भूमिका सांगून समानतेचा मुद्दा मांडला. देशद्रोहाच्या आरोपानंतर भाजपच्या एका नेत्याने कन्हैया चांगला मुलगा आहे, असे बैठकीत सांगितले. त्यावरून या बैठकीत भाजपमध्येच संघर्ष झाला. त्यामुळे अब हमारी बहस दुसरों की मैफल में है, असे सांगत त्यांनी आरोप करणाऱ्यांवर पलटवार केला.

कार्यकर्त्यांचे लाल टी शर्ट
सभेसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), छात्रभारती, महाराष्ट्र युवा परिषद, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), सम्यक विद्यार्थी आंदोलन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ), शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच, प्रगतिशील लेखक संघ यांनी संयोजन केले. या वेळी स्वयंसेवकांनी परिधान केलेले लाल टी शर्ट लक्ष वेधून घेत होते.

देशद्रोहाची चार्जशीट का दाखल करीत नाही?
भाजपचे देशात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व १८ राज्यांत सरकार असताना माझ्यावर आजपर्यंत देशद्रोहाच्या आरोपाची चार्जशीट का दाखल केली नाही, असा सवाल करत कन्हैया कुमारने भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली. माझ्या देशद्रोहोच्या आरोपाबद्दल मला सगळीकडे ऐकायला मिळते; पण सरकार कारवाई का करीत नाही, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.

कन्हैया म्हणाला....
- साडेतीन वर्षे झाली. साडेतीनच ना? बुरे दिन आसानी से कटते नहीं...
- हमारी लढाई सिद्धांतों की है, विचारों की है
- आप डंडा लेते हो, हापपँट पहनेते हो. लेकिन मंत्रिपद नारायण राणे को मिलता है!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयाला खोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील भाभानगर येथे महिला रुग्णालय उभारण्यावरून सध्या चांगलाच वाद रंगला आहे. मात्र, दुसरीकडे अंबड लिंकरोडवरील महापालिकेच्या आरक्षित जागेवर रुग्णालय उभारणीकडे कानाडोळा होत असल्याची स्थिती आहे. चुंचाळे शिवारातील तब्बल चार एकर जागा महापालिकेने रुग्णालयासाठी आरक्षित केलेली आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिसरातून केला जात आहे.

चुंचाळे शिवारात असलेल्या गट नंबर १२, १३ व १४ या ठिकाणी रुग्णालयाचे आरक्षण महापालिकेने टाकलेले आहे. त्यात १६ हजार चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या ताब्यात १० हजार चौरस मीटर जागा आली असून, उर्वरित जागा हस्तांतर करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी जागेची पाहणी केली होती. परंतु, त्यानंतर फारशी कार्यवाहीच न झाल्याने संबंधित जागेवर रुग्णालय उभारले जाणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत माजी नगरसेवक सचिन भोर यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुराव केला असल्याचे सांगितले. नगरसेवक भागवत आरोटे व नगरसेविका हर्षदा गायकर यांनीही आरक्षित असलेल्या जागेवर रुग्णालयाची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे.

---

एकीकडे वाद, दुसरीकडे उपेक्षा

शहरात आमदार प्रा. देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्यात भाभानगर येथे महिला रुग्णालय उभारण्यावरून वाद रंगला आहे. महापालिकेच्या हद्दीतच मध्यवर्ती भागात महिला रुग्णालयाची उभारणी व्हावी, असे आमदार फरांदे यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनेच आरक्षित केलेल्या अंबड लिंकरोडवर असलेल्या चार एकर जागेवर रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक भोर, नगरसेवक आरोटे व नगरसेविका गायकर यांनी केली आहे.

--

अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारात असलेल्या चार एकर जागेवर रुग्णालयाचे आरक्षण आहे. परंतु, अनेकदा मागणी करूनही रुग्णालय उभारण्यात आले नाही. सत्ताधाऱ्यांनी कामगारांसाठी रुग्णालायची उभारण्याची गरज आहे.

-सचिन भोर, माजी नगरसेवक

--

महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर तात्काळ रुग्णालय उभारण्यात यावे, याबाबत आयुक्तांकडे मागणी करणार आहोत. रुग्णालयाच्या उभारणी झाल्यास त्याचा निश्चितच सर्वसामान्य कामगारांना लाभ मिळणार आहे.

-हर्षदा गायकर, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्याच्या’ हाती १६ वर्षांनंतर बेड्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपहरण आणि बलात्काराच्या गुन्हा करून १६ वर्षांपूर्वी तो परागंदा झाला. देशभरात फिरून तो मुंबईमार्गे नाशिकमध्ये आला. येथे स्थिरस्थावर होण्याचा त्याचा प्रयत्न मात्र, नाशिक पोलिसांनी हाणून पाडला. पंजाब हायकोर्टाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाच्या उपस्थितीत आणि शहर पोलिसांच्या प्रयत्नाने मायलेकाची ताटातूट करणारा अखेर गजाआड झाला.

सुखदेव चनान सिंग (वय ४५, रा. ओहरपूर, पोस्ट तांडा. जि. होशियारपूर, पंजाब) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. साधारणतः १६ वर्षांपूर्वी तांडा पोलिस स्टेशनमध्ये सुखदेवविरोधात बलात्कार आणि अपहरणाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यानंतर तो फरार झाला. अपहरणाच्या घटनेत सुखदेवने एका १० वर्षांच्या मुलाला सोबत घेतले होते. २९ वर्षांचा सुखदेव त्यानंतर कोठे गेला, त्या मुलाचे काय झाले याची माहिती समोरच आली नाही. पंजाब पोलिसांचा तपास पुढे जात नव्हता. त्यामुळे अपह्त मुलाच्या आईवडिलांनी पंजाब-हरियाणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करीत तपासासाठी एक विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. या पथकास सुखदेव नाशिकमध्ये असावा, याची कुणकुण लागली. तपास पथकातील काही अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार यांच्यासह पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली. त्यानुसार तपासाची पुढील कामगिरी युनिट दोनचे सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपविण्यात आली. सुखदेव लहवित परिसरात असल्याचे पुरावे समोर आल्याने देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनचे पीएसआय राठोड व कर्मचारी तसेच, पोलिस पाटील संजय गायकवाड यांनी संयुक्तपणे माहिती संकलित केली. फरार सुखदेव लहवित गावातील गुरुद्वारा परिसरात सापडला. या पथकाबरोबर पंजाब पोलिसांचे पथकही होते. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, सुभाष डौले, एपीआय गंगाधर देवडे, पीएसआय विजय राठोड आदींनी केला.

त्या मुलाचे नक्की काय झाले?

सुखदेवच्या अटकेमुळे १६ वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या त्या १० वर्षांच्या मुलाचे नक्की काय झाले, हे पंजाब पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे. २९ वर्षांचा असताना सुखदेव फरार झाला होता. मात्र, त्यावेळी त्याचे लग्नही झालेले होते. सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला बोलावून घेतले. नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा सुखदेवचा प्रयत्न होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत महादीपोत्सव

$
0
0

घोटी : वासुदेव चौकातील गणपती मंदिराच्या परिसरात शनिवारी (दि. ४) त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ३३३३ पणत्यांचा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाआरती करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. घोटी शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या असलेल्या नक्षत्र मित्रमंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळीही हा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. शनिवारी (दि. ४) दुपारपासूनच या दीपोत्सवाची तयारी करण्यात आली होती. पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखालील नक्षत्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेउन एकूण ३३३३ पणत्यांचा दीपोत्सव सादर केला. याप्रसंगी गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच गणपती मंदिर परिसरात १५ फुटी भव्य रांगोळीसह ३३३३ पणत्यांचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला. या दीपोत्सवकरिता नक्षत्र मित्रमंडळाचे पंकज जाधव, पराग गवळी, प्रमोद सांगळे, विकास भगत, दिलीप पटेल, तुषार उगले, योगेश मुनोत, किरण कडवे, चेतन शहाणे, विक्रम जगताप, स्वप्नील शेलार, गौतम पोखरणा आदींनी विशेष प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आरक्षणाची ३४ गावांना प्रतीक्षा

$
0
0

जिल्हा प्रशासनासह पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे येवला तालुकावासीयांच्या नजरा

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची म्हणावी तशी न झालेली कृपादृष्टी, परतीच्या पावसानेदेखील चांगलीच पाठ फिरवताना सरासरी पर्जन्यमानात पिछाडीवर गेलेला तालुका म्हणजे येवला. सध्या ढासळलेली भूगर्भातील पाणीपातळी बघता येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील विशेषतः पालखेड डाव्या कालवा लाभक्षेत्रातील गावोगावच्या जनतेच्या नजरा या जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील प्रासंगिक पाणी आरक्षणाकडे लागल्या आहेत.

अत्यल्प पावसामुळे येता उन्हाळा तसेच येणाऱ्या काळातील संभाव्य टंचाईची दाहकता कमी व्हावी, पाण्यासाठी वणवण नशिबी येऊ नये यासाठी पाणी आरक्षणावर नजरा ठेवून असलेल्या तालुक्यातील ३४ गावांनी गावातील बंधारे, साठवण तलाव भरून देण्याच्या मागणीचे ठराव ग्रामसभेत केले आहेत. या ३४ गावांकडून येवला पंचायत समितीकडे आलेले ठराव अन् तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेले प्रस्ताव लक्षात घेता या गावांसाठी यंदा एकूण ५५६.८६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण करण्याची मागणी आहे.

येवला तालुक्याचा उत्तर पूर्व भाग हा तर पाटपाण्याचा कुठलाही स्त्रोत नसलेला टंचाईग्रस्त भाग आहे. तर पालखेडच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या उर्वरित भागाची अवस्था म्हणजे मिळाले तर टंचाईवर काहीशी मात, नाहीतर संकटात अशीच. त्यामुळेच दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना लागला की, तालुक्यातील गावोगावच्या जनतेची दरवर्षी नजर असते ती जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांकडून मंजूर केल्या जाणाऱ्या पाणी आरक्षणाकडे. त्यासाठी तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस न झाल्याने पुढची चिंता लागून राहिलेल्या जनतेचे त्यामुळेच यंदा पाणी आरक्षणाकडे डोळे लागले आहेत. येवला तालुक्यातील पाटोदा, रायते, पारेगाव, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, बल्हेगाव/वडगाव बल्हे, पिंप्री, कोटमगाव बुद्रुक, कोटमगाव खुर्द, खामगाव, शेवगेधुळगाव, पुरणगाव, देवळाणे, सातारे, जऊळके, धामणगाव, भाटगाव, अंतरवेली, बोकटे, मातुलठाण, आंबेगाव, बदापूर, दुगलगाव, नागडे, पिंपळगाव लेप, अंदरसूल, पिंपळगाव जलाल, गवंडगाव, आडगाव चोथवा, नांदेसर, मानोरी, सुरेगाव रस्ता व अंगणगाव या ३३ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव करून यंदा गावासाठी पालखेड धरणातून पाणी आरक्षण ठेवण्याची मागणी केली आहे. तर तालुक्यातील मुखेड गावाने यंदाही नांदूरमध्यमेश्वर (दारणा) मधून गावासाठी पाणी आरक्षण मागितले आहे.

५५७ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी

वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा यंदा अत्यंत कमी झालेला पाऊस लक्षात घेता येत्या उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यामध्ये तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गावासाठी प्रत्यक्ष लागणारे पाणी व संभाव्य ५० टक्के तूट लक्षात घेऊन ३४ गावांमधील बहुतांशी गावांनी यंदा अधिक पाण्याची मागणी नोंदवली आहे. पालखेड धरणातून पाणी आरक्षण मागणाऱ्या येवला तालुक्यातील ३३ गावांनी एकूण ४९६.८६ दशलक्ष घनफूट इतके पाणी तर मुखेड गावाने नांदूरमध्यमेश्वरमधून ६० दशलक्ष घनफूट पाणी मागितले आहे. तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिकाचे कायमस्वरूपी पाणी आरक्षण व त्यातून मिळणारे पाणी वेगळे असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांतून २५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मशिनरी खरेदीसाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे २४ लाख ९५ हजार ४२८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दयानंद व्ही. शिरसाठ (वय ५०, रा. १११, हिरा निवास, डीजीपीनगर, कामटवाडा) आणि भरत मधुकर अत्तरदे (वर ३९, रा. फ्लॅट क्रमांक २७, आनंदघन कॉलनी, बुरकुले हॉलजवळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. या कंपनीचे मुंबई नाका येथील सुयोजीत सिटी सेंटर शॉप क्रमांक २, ३ आणि ४ येथे कार्यालय आहे. याच ठिकाणी मशिनरी खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी हर्षल कमलाकर शिंपी (रा. देवेंद्र हाइटस, हनुमानवाडी, पंचवटी) यांनी तक्रार दिली असून, घटनेचा अधिक तपास पीएसआय महेश हिरे करीत आहेत.

आडगावात घरफोडी

बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तीन तोळे वजनाची सोन्याची माळ, चांदीचा छल्ला तसेच जोडवे असा सुमारे ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी वैशाली शशिकांत पाटील (वय २९, रा. फ्लॅट क्रमांक ९, गोविंद प्लाझा, आडगाव शिवार) यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवारी भरदुपारी १२ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्यांनी पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेला मुद्देमाल लंपास केला. घटनेचा अधिक तपास पीएसआय सदाफुले करीत आहे.

एकाचा मृत्यू

भरधाव वेगात जाणाऱ्या पीकअपमधून पडून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहुल चौफुली सिग्नल, म्हसरूळ-लिंकरोड येथे झाली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पीकअप गाडी ही म्हसरूळ गावाकडून मखमलाबाद गावाकडे जाणाऱ्या लिंकरोडवरील राहू चौफुलीच्या सिग्नलजवळून भरधाव वेगात गेली. पीकअपमध्ये पाठीमागे बसलेला व्यक्ती तोल सुटून डांबरी रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास हवालदार भाऊसाहेब कारभारी शेळके करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताणतणाव मुक्तीसाठी ग्रामीण पोलिसांची सहल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलातील धावपळीमुळे तेथील ताणतणावाचा थेट परिणाम पोलिसांच्या कुटुंबावरही पडतो. कुटुंबासह कोठे फिरण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी एक नवीन उपक्रम राबवला असून, त्या अंतर्गत रविवारी पोलिस कुटुंबीयांना सप्तशृंगगडावर नेण्यात आले.

मोर्चे, आंदोलने, गुन्ह्यांचा तपास यात गुरफटलेल्या पोलिसांना कुटुंबासाठी वेळ देणे जिकरीचे बनते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संजय दराडे यांनी पोलिस कुटुंबीयांसाठी दर रविवारी फॅमिली ट्रीपचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. आठ विभागनिहाय दर रविवारी ही सहल आयोजित केली जाईल. रविवारी (दि.५ नोव्हेंबर) नाशिक ग्रामीण उपविभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी सहल आयोजित केली होते. उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडेसह पिंपळगाव बसवंत, ओझर, वाडीवऱ्हे, इगतपुरी, घोटी पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त असलेल्या ३५ पोलिस कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images