Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘सतगुरू नानक प्रगटिया…’

$
0
0

नाशिक ः शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुन्ध जग चानण होया…’ या व अन्य भजनांचे स्वर शनिवारी शहर परिसरात गुंजले. शीख समाजबांधवांकडून त्यांचे तन्मयतेने श्रवण केले गेले. शहरासह पंचवटी, नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदी उपनगरांतील श्री गुरुद्वारांमध्ये गुरू नानक यांच्या ५४८ व्या जयंतीनिमित्त गुरू ग्रंथ साहिबचे पारायण करण्यात आले. विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांसह पंजाबी बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी लंगर (भोजन)चेदेखील आयोजन करण्यात आले होते.

---

देवळाली कॅम्पमध्ये विशेष अरदास


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सर्वधर्मीय एकोप्याने नांदणाऱ्या देवळाली कॅम्पमधील वडनेररोडवर असणाऱ्या श्री गुरुद्वारामध्ये गुरू ग्रंथ साहिबचे अखंड पारायण करण्यासह विविध उपक्रम झाले. येथे भव्य लंगर (भोजन)चेदेखील आयोजन करण्यात आले होते. दिल्लीचे गायक भाई बलजितसिंग यांनी विशेष अरदास सादर करीत भाविकांना मंत्रमुग्ध केले.

कार्तिक पौर्णिमेला श्री गुरू नानक देवजी यांचा जन्मदिन प्रकाश पूरब दिन म्हणून साजरा केला जातो. येथील गुरुद्वारात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पोथी पूजन, आसा की वार कीर्तन, अखंड पाठ का भोग, लहान मुलांसाठी विशेष कीर्तन आदींबरोबरच मुख्य असलेले ग्रंथी ग्यानी सुरेंद्रसिंग यांनी ग्रंथ साहिबचे पाठ केले. गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष कर्नल जसवंतसिंग लबाना, सुरेंद्रसिंग अहलुवालिया, पी. एस. चढ्ढा, परमजितसिंग कोचर, प्रदीप गुरव आदी उपस्थित होते. गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी व सर्व सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील होते. दुपारपासून सुरू असलेल्या लंगरचा सुमारे तीन हजारांहून अधिक सर्वधर्मीयांनी लाभ घेतला.

--

बाबा जोधासिंग दरबार

येथील प्रसिद्ध बाबा जोधासिंग दरबार (सिंधी गुरुद्वारा) येथे मंडळाने विशषे कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सिंधी बांधवांच्या वतीने या गुरुद्वारामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात महिलांचा मोठा सहभाग असतो. अंकिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोनिका कटारिया, साक्षी नागदेव, लता चावला, आरती निहलानी, वर्षा चावला, सोनिया भागचंदानी,रचना कारडा, हर्षा चावला, रोशनी नागपाल आदींनी संयोजन केले. या कार्यक्रमास नगरसेवक भगवान कटारिया यांनी भेट दिली.

---

नाशिकरोडला सर्वधर्मीयांचा सहभाग

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड येथील गुरुद्वारात गुरू ग्रंथ साहिबच्या पठणासह विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले. दुपारनंतर लंगरचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा सर्वधर्मीयांनी लाभ घेतला.

येथील गुरुद्वारात शीखबांधवांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. गुरू नानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि. ३० ऑक्टोबरपासून परिसरात रोज सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. शीखबांधव भजन, कीर्तन सादर करीत त्यात सहभागी झाले. ही फेरी दत्त मंदिर, मोटवानीरोड, कोठारी कन्या शाळामार्गे तेथील झुलेलाल मंदिरात गेली. धन धन बाबा दीपसिंग सोशल ग्रुपतर्फे जेलरोडच्या सिंधी कॉलनीतील गुरुद्वारात शनिवारपासून सकाळी साडेदहा व सायंकाळी साडेसात वाजता बीबी परमजित कौर यांचे कीर्तन सुरू झाले आहे.

--

कारागृहात प्रतिमापूजन

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातदेखील विविध कार्यक्रम झाले. कारागृहातील सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमास अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस. बी. कोकणे, एस. पी. सरपाते, बी. एन. मुलानी, पी. आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. अधीक्षक साळी यांनी प्रतिमापूजन करून मार्गदर्शन केले. यावेळी बंदिवानदेखील उपस्थित होते.

---

पंचवटीत विविध कार्यक्रम

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. कीर्तन, भजन, प्रवचन आणि लंगर आदी कार्यक्रमांत शीख बांधवांनी सहभाग घेतला. या जयंती उत्सवासाठी गुरुद्वाराची सजावट करण्यासह रोषणाईदेखील करण्यात आली होती. विविध सामाजिक उपक्रमांसह रक्तदान शिबिरदेखील घेण्यात आले. त्यात सर्वधर्मीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

---

भक्ती अन् मानवतेचा मार्ग अनुसरण्याचा संदेश


म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

शहरातील शिंगाडा तलाव परिसरातील गुरुद्वारामध्ये शनिवारी गुरू नानक जयंतीनिमित्त झालेल्या कीर्तनाद्वारे गुरू नानक देवांनी सांगितलेल्या भक्तीच्या आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले. येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारपासून सुरू असलेल्या गुरू ग्रंथ साहिब अखंड पाठाची शनिवारी सकाळी नऊ वाजता समाप्ती झाली. त्यानंतर दिवसभरात देशाच्या विविध भागांतून आलेल्या मान्यवरांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळाला. हरदीपसिंगजी, तसेच लुधियाना येथील गुरुचरणसिंगजी रसिया, फरिदकोट येथील गुरुमत विचार ग्यानी लखवीरसिंगजी यांच्या कीर्तनात भाविक तल्लीन झाले होते. दुपारी, ‌तसेच रात्री गुरुका लंगरचा लाभ भाविकांनी घेतला. दि. ३१ ऑक्टोबर आणि त्याआधी चिमुकल्यांसाठी गुरुबानी पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आल्याची माहिती कुलवंतसिंग बग्गा यांनी दिली. या कार्यक्रमाच्या न‌िमित्ताने समाजातील सर्व स्तरांतील बांधव एकत्र येतात. भजन-कीर्तनात दंग होतात, तसेच लंगरचा आस्वाद घेतात, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मध्यरात्री बाराच्या सुमारास येथील कार्यक्रमांची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जमिन विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

मुंबई येथील वकील विमलभूषण भटनागर यांची इगतपुरी शहराजवळील शेत जमीन अडीच वर्षांपूर्वी परस्पर विक्री करणाऱ्या ९ संशयित आरोपींपैकी एका मुख्य आरोपीला तब्बल अडीच वर्षानंतर मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने इगतपुरी शहरात खळबळ उडाली आहे.

भटनागर यांना त्यांच्या मालकीची इगतपुरी शहराजवळ बोरटेंभे येथे गट क्रमांक ३६ ची ६१ गुंठे शेतजमीन विक्री झाल्याचा सातबारा मिळून आला. याबाबत त्यांना जमिनीची ३३ लाख ६५ हजारात परस्पर विक्री झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी ३० मे २०१५ मध्ये इगतपुरी पोल‌िस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ८ संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र यातील मुख्य संशयीत आरोपी परवेज गुलाम रसूल खान (रा. जोगेश्वरी) हा फरार होता. परवेजला एक नोव्हेंबरला अटक करण्यात आली.

दोनदा विक्री

अटक केल्यानंतर त्याने जो नवीन प्रताप घडवला ते ऐकून पोल‌िस देखील आश्चर्यचकीत झाले. फरार असताना परवेज खान याने पुन्हा एकदा आपल्या ५ साथीदारांना हाताशी घेतले. ज्या बोरटेंभे जमीन बनावट खरेदीच्या प्रकरणात तो संशयित होता ती जमीन पुन्हा एकदा ३० मार्च २०१७ रोजी ५ इसमांना विकली. त्याने ही जमीन अलोक महेंद्रकुमार पटेल (भिवंडी), दिनानाथ मिश्रा, प्रेम पांडे, सुरेंद्र पांडे, किरण मिश्रा (सर्व रा. ठाणे) यांना ३० लाख रुपयांना विकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिपंपांच्या विजेबाबत महावितरणला निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा वीजबिले थकल्याच्या कारणाखाली महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात येत आहेत. त्याबाबत छावा क्रांतिवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. अशाप्रकारे कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करणे बेकायदेशीर असून, ही मोहीम न थांबल्यास छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे महावितरणविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

महावितरणकडून सध्या वीजबिले थकल्याच्या कारणाखाली शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात आली असून, याबाबत छावा क्रांतिवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी महावितरणने या अनुदानातून शेतकऱ्यांकडील थकित वीज बिलांची वसुली करावी व यापुढे शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन घाटे, बापू आढाव, भाऊसाहेब लगरे, विनायक वाघमारे, बबलु शेख, महेंद्र भालेराव उपस्थित होते. शेतीमालाला सरकारने हमीभाव ठरवून दिला असून, प्रत्यक्षात बाजारात हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत आहे. हमीभाव व प्रत्यक्ष भाव यातील फरकाची रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली. काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यातून त्यांची सुटका करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानप्रश्नी ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांचा विरोध असलेल्या दत्तनगर येथील देशी दारूचे दुकान आता कायमचेच बंद करावे, यासाठी परिसरातील महिलांसह स्थानिक रहिवाशांनी शनिवारी अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान घेण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

चुंचाळे शिवारातील दत्तनगर भागात काही दिवसांपासून देशी दारूचे सुरू झाले आहे. या दुकानामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य व सुरक्षा धोक्यात आली असल्याने परिसरातील नागरिक व महिलांनी शनिवारी एकत्र येऊन अंबड पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करीत पोलिसांना निवेदन दिले. या दारू दुकानामुळे येथील महिलांना रस्त्याने जाणे-येणे अवघड झाले असून, मद्यपींमुळे महिलांना या एकमेव रस्त्याचा वापर करणेदेखील अवघड बनले आहे. अनेक वेळा मद्यपी मोठ्या आवाजात शिवीगाळ करून भांडणे करतात, परिसरात अस्वच्छता पसरवितात, त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. येथे दुसरा रस्ता नसल्याने नागरिकांना या दुकानाजवळील रस्त्याचाच वापर करावा लागत असतो.

अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना हे दुकान बंद करण्यासाठी व येथील समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले. यावेळी पोलिसांनी हे दुकान बंद करण्यासाठी परिसरातील नागरिकांचे मतदान घेण्याचे आवाहन महिलांनी केले. हे दुकान रीतसर परवानगीने सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले असून, या दुकानाच्या परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याबरोबरच नागरिकांच्या या विरोधाचा अहवाल तयार करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

---

दोन दिवसांपूर्वीच चाकूहल्ल्याची घटना

या दारू दुकानापासून काही अंतरावर दोन दिवसांपूर्वीच हाणामारी होऊन एकावर चाकूहल्ला झाला होता. सदर व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे शनिवारी परिसरातील महिला व रहिवाशांनी दुकानाच्या दिशेने धाव घेत दुकान कायमचे बंदच करायचे, असा पवित्र घेतला. महिलांनी घोषणाबाजी करीत हे दुकान बंद करण्याची मागणी केली. दरम्यान, अंबड पोलिसांनी मध्यस्थी करीत येथे मोर्चा काढून काहीही उपयोग होणार नसल्याचे सांगत दुकानदाराने रीतसर परवानगी घेत हे दुकान सुरू केले आहे, असे सांगितल्यानंतर महिला व नागरिकांनी थेट अंबड पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरपिसांनी खुलली पंचवटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हाती मोरपिसे दिसत असल्याने अन् या मंदिराबरोबरच कपालेश्वर, काळाराम मंदिर, सीतागुंफा येथेही भाविक दर्शनासाठी जात असल्यामुळे पंचवटी परिसर शनिवारी मोरपिसांनी खुलल्याचे चित्र दिसून आले.

कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मोरपिसे अर्पण करण्याची परंपरा असल्याने मोरपिसांना दोन दिवसांपासून प्रचंड मागणी आली होती. श्री काशी नाट्टकोटीईनगर छत्रम मॅनेजमेंट सोसायटीच्या पंचवटीतील कार्तिक स्वामी मंदिरात शुक्रवार (दि. ३)पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली होती. कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मी आणि कुबेर कार्तिक स्वामींच्या भेटीला येतात, अशी आख्यायिका आहे. या दिवशी दर्शन घेण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जात असल्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनसाठी आणि पूजेसाठी येत असतात. यावर्षीही भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनसाठी रांगा लावल्या होत्या.

कार्तिक पौर्णिमा शनिवारी सकाळी १० वाजून ५३ मिनिटांनी संपणार होती. त्यामुळे थंडीतही भल्या पहाटे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. कृतिका नक्षत्र रविवारी (दि. ५) रोजी मध्यरात्री १ वाजून ६ मिनिटांनी सुरू होते आणि रात्री १० वाजून ३१ मिनिटांनी संपते. या काळात भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. हा दिवस रविवारच्या सुटीचा दिवस असल्यामुळे अजून एक दिवस पंचवटी परिसर मोरपिसांनी फुलल्याचे दिसून येण्याची चिन्हे आहेत.

---


नाशिकरोड परिसरात दीपोत्सव

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती. महिला भाविकांचे प्रमाण लक्षणीय होते.

येथे सायंकाळी झालेला दीपोत्सव पाहण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुक्तिधाममध्ये अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. त्यात कार्तिक स्वामींची मूर्तीही आहे. मात्र, महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन फक्त कार्तिक पौर्णिमेलाच करता येते. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच महिला भाविकांनी येथे रांगा लावल्या होत्या. भाविकांकडून कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोरपीस अर्पण करण्यात आले. मुक्तिधाम मंदिर परिसर रोषणाईने उजळून गेला होता. मुक्तिधामच्या प्रवेशद्वारावर २५ बाय ५० फुटांची महारांगोळीदेखील काढण्यात आली होती. सायंकाळी या रांगोळीत चार हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. हे दृश्य नजरेत साठविण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

--

नवग्रह मंदिरात कार्यक्रम

देवळालीगावाशेजारील श्री अण्णा नवग्रह गणपती मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त अण्णा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम झाले. सायंकाळी साडेसातला दीपोत्सव झाला. तो दोन दिवस चालेल. आज, रविवारी (दि. ५) पहाटे पाचला महाभिषेक होईल. खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, सुप्रीम कोर्टातील वकील शेखर नाफडे, शिक्षणाधिकारी गोविंद, सुधीर अंबवणे, पंकज कवळी, वास्तुविशारद नितीन भोजने, प्रसाद पवार प्रमुख पाहुणे राहतील. साडेअकराला भजन व त्यानंतर कार्तिक स्वामी याग होऊन महाप्रसाद वाटपाने सांगता होईल. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंदिराच्या प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाइल अपलोडबाबत जिल्हा बँक अव्वल

$
0
0

धुळे जिल्हा बँक अध्यक्ष कदमबांडे यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

बँकेत कर्ज घ्यायला गेलेल्या शेतकऱ्याला बहुतेक वेळा वाईट अनुभव येतो, कर्जासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. मात्र धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याला अपवाद ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तत्काळ कर्ज मिळावे यासाठी परिश्रम घेतले.

या अथक परिश्रमामुळेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १०० टक्के यशस्वी फाइल अपलोड करणारी राज्यातील पहिली बँक ठरली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कर्जात गुंतलेल्या शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बँकेने थकबाकीदार, नियमित फेड करणारे सभासद, पुनर्गठण केलेले सभासद आदींना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी युद्ध पातळीवर परिश्रम घेतले.

बँकेने पीक कर्जासाठी सर्वाधिक कर्जपुरवठा करीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहकार खात्याच्या मार्गदर्शनाखाली सतत चार महिने नियमित कामकाज केले. त्यामुळे राज्याच्या सर्व जिल्हा बँकांमध्ये कर्जमाफीचा डाटा यशस्वीपणे अपलोड करण्यात बँकेचा प्रथम क्रमांक आला आहे. राज्य सरकारचा निर्णय जिल्हा बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँकेने जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांची अचूक माहिती मागवून घेत तज्ज्ञ एजन्सीला कर्जमाफी यादीचे काम देऊन बँकेच्या मुख्यालयात ४५ कर्मचाऱ्यांकडून कामकाज

करवून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीतील पैसे ७८ खात्यांत वर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुबईमध्ये महिना ५० लाख रुपये वेतनाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल पावणेतीन कोटी रुपये उकळणाऱ्या भामट्यांनी हे पैसे देशभरातील १९ बँकांमधील ७८ खात्यांत वर्ग केल्याची बाब सायबर पोलिसांनी शोधून काढली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, संशयित देशातील कोपऱ्यातून फसवणुकीचा उद्योग करीत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी दीपक दिगंबर पाठक (रा. पिंपरीकर हॉस्पिटलजवळ, गोविंदनगर) यांची फसवणूक केल्याचा प्रकार ऑक्टोबरच्या शेवटी उघड झाला होता. गुजरातमधील एका मल्टिनॅशनल कंपनीत पाठक कार्यरत असलेल्या आणि नाशिकशी संबंधित असलेल्या पाठक यांना दुबईमध्ये चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी देत असल्याची बतावणी करून भामट्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला होता. १६ मे ते ५ जुलै या काळात संबंधितांनी विदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याची ग्वाही देत पाठक यांच्याकडून वेळोवेळी तब्बल पावणेतीन कोटी रुपये उकळले. पैसे भरूनही नोकरी मिळण्याच्या हालचाली होत नसल्याने अखेर पाठक यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याबाबत बोलताना कुटे यांनी सांगितले, की संशयिताने देशातूनच हा उद्योग केला असून, पाठक यांनी दिलेले पैसे त्याने देशभरातील १९ बँकांमधील ७८ खात्यांत वर्ग केले आहेत. दिलेले पैसे, वर्ग झालेले पैसे यांचा हिशेब जुळवणे हेदेखील मोठे काम असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे कुटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाठक यांनी एवढी मोठी रक्कम कशी दिली, यावरही कुटे यांनी प्रकाश टाकला. फिर्यादी पाठक यांनी भरलेल्या सर्व रकमेचा तपशील दिला असून, रिटर्न्स भरल्याचे पुरावे सादर केले आहेत. यातील काही रक्कम त्यांनी नातेवाइकांकडून घेतल्याचे सांगितले. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कुटे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाभानगरमध्ये भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा रोकड आणि दागिने असा तब्बल सव्वा दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना भाभानगर परिसरात गुरूवारी घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुराग प्रमोद पटवर्धन (रा. सारसबाग सोसा. नवशक्ती चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पटवर्धन कुटुंबीय गुरूवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

वृद्धाला फसविले

एटीएम कार्डला आधारलिंक करायचे असल्याचे सांगत चोरट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यातील साडेबारा हजाराची रोकड परस्पर चोरी केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ वामन बोरसे (६२ रा. समता कॉलनी, सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोरसे २९ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या घरात असतांना त्यांना एका महिलेचा फोन आला. सदर महिलेने बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड लिंक करायचे आहे. त्यासाठी बँक खात्याची माहिती घेत ओटीपी नंबर मिळवित ही फसवणूक केली. खात्यातील १२ हजार ५८७ रुपयांची रोकड काढून घेतल्याचे तक्रारीत

म्हटले आहे.

सोनसाखळी खेचली

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाळखी दुचाकीस्वारांनी तोडून नेल्याची घटना नरसिंहनगर भागात घडली. घटनेची गंगापूर पोलिसांनी नोंद केली आहे. विजया प्रभाकर ओतुरकर (७५ रा.सुखशांती अपार्ट. आनंदनगर, गंगापूररोड) यांनी तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंतिम प्रवास बंदोबस्तात...

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

उंटवाडी येथील स्मशानभूमीचा वाद चांगलाच चिघळला असून, शनिवारी येथे अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने पोलिस बंदोबस्तात येथे अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग उद्भवला. येथील स्मशानभूमीच्या वादामुळे काहींचा अंतिम प्रवासदेखील खडतर बनल्याचे या प्रकारावरून दिसून आले. त्यामुळे याप्रश्नी त्वरित तोडगा काढून मृतदेहांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

शनिवारी लिंगायत समाजाचे काही नागरिक अंत्यविधीसाठी या ठिकाणी मृतदेह घेऊन आल्यावर स्थानिकांनी अंत्यविधीस विरोध केल्याने अखेरीस या नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिस बंदोबस्तात हा अंत्यविधी पूर्ण केला. गेल्या तीस वर्षांपासून या ठिकाणी स्मशानभूमीचे आरक्षण असून, या स्मशानभूमीचा विकास केला पाहिजे, अशी मागणीही यावेळी लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली.

उंटवाडी येथील स्मशानभूमीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी या स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी प्रस्ताव देऊन हे काम मंजूर करून घेतले आहे. मात्र, भाजपच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांच्यासह काही स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध दर्शविला आहे. ही स्मशानभूमी तीस वर्षांपासून या ठिकाणी असून, केवळ सोयी नसल्यानेच तिचा वापर बंद झाला होता. त्यामुळे या ठिकाणी सुधारणा करण्याच्या निर्णयाचे संबंधितांनी स्वागत केले होते. मात्र, पुन्हा वाद निर्माण होऊन तो थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता.

या पार्श्वभूमीवर शनिवारी एका लिंगायत समाजबांधवाचे निधन झाल्यानंतर या समाजबांधवांनी येथे मृतदेह अंत्यविधीसाठी आणला. मात्र, काही स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन ही स्मशानभूमी बंद झाली असून, तिचा वापर करायचा नाही, असे सांगून अंत्यविधीस विरोध दर्शविला. त्यामुळे लिंगायत समाजबांधवांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी उंटवाडीतील स्मशानभूमीचे मागील तीस वर्षांपासून आरक्षण असून, केवळ सुविधा नसल्याने तिचा वापर बंद झाला होता, असे सांगून काही कागदपत्रे पोलिसांना सादर केली. त्यानुसार पोलिसांनीही बंदोबस्त देऊन येथील अंत्यविधी पूर्ण करविला.

--

सोक्षमोक्ष होणार केव्हा?

एकच प्रभागातील दोन नगरसेवकांची भिन्न मते निर्माण झाल्याने आता नागरिकांचीच नव्हे, तर मृतदेहाचीसुद्धा हेळसांड होत असल्याचे यावरून दिसून आले. त्यामुळे आता तरी या स्मशानभूमीचा विकास करून ती नागरिकांसाठी खुली करावी, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकारामुळे स्मशानभूमीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, या वादाचा सोक्षमोक्ष नेमका केव्हा अन् कसा लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

--

विरोधाभासी भूमिका

उंटवाडी स्‍मशानभूमीचा वाद हा ऑक्‍टोबर महिन्याच्या प्रारंभापासून सुरू झाला आहे. नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी या स्मशानभूमीच्या विकासाचा प्रस्ताव सादर केला आहे. स्मशानभूमीच्या विकासासाठी एक कोटी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी या स्मशानभूमीच्या विकासाला विरोध दर्शविला. त्यानंतर माजी नगरसेविका कांचन पाटील यांच्यासह उंटवाडी ग्रामस्थ, लिंगायत समाजबांधव यांनीसुद्धा या स्मशानभूमीचा विकास व्हावा यासाठी पत्र दिले आहे. या वादात थेट आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरसेवक बडगुजर यांच्याकडून जीवितास धोका असल्याची तक्रारही अंबड पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद मागील महिन्यांत चांगलाच गाजला होता.

या स्मशानभूमीसाठी उंटवाडीच्या असंख्य ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला असून, या ठिकाणी यापूर्वी अनेक विधी झाले असून, केवळ दुरवस्थेमुळे ही स्मशानभूमी बंद होती. आता तिचा विकास करावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे.

--

लिंगायत समाजातर्फे शनिवारी पोलिस बंदोबस्तात उंटवाडी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आल्याचे समजले. मात्र, आपण बाहेरगावी असल्याने नक्‍की काय प्रकार झाला याची माहिती मिळालेली नाही.

-सुधाकर बडगुजर, नगरसेवक, प्रभाग २५

--

आम्ही विकासाच्या विरोधात नाही, नागरिकांसोबत आहोत. शनिवारी आम्ही प्रभागात नव्हतो. या आंदोलनाची माहिती उशिराने मिळाली असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन केले आहे.

-भाग्यश्री ढोमसे, नगरसेविका, प्रभाग २५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारंगखेडा यात्रेचे पुष्करप्रमाणे ब्रँडिंग

$
0
0

पर्यटन विभागाकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नंदुरबार जिल्ह्यात भरणाऱ्या सारंगखेडा येथील यात्रेचे ब्रॅण्डिंग राजस्थानातील पुष्करच्या धर्तीवर करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन विभागाने घेतला आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यात्रेतील घोडेबाजर देशभर प्रसिद्ध आहे. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतील घोडे विक्रीसाठी येतात.

यात्रेची महती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी यासाठी त्याचे ब्रॅण्डिंग केले जाणार आहे. सारंगखेडा येथील पुरातन दत्त स्वामी मंदिराच्या यात्रोत्सवात हा घोडेबाजार भरतो. याठिकाणी यात्रेत हिंदी, मराठी चित्रपट कलाकारांचीही आवर्जून उपस्थिती असते. गेल्यावर्षी या यात्रेत तीन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी आले होते. पंधरा दिवसाच्या कालावधीत घोडेबाजारात सुमारे २५ ते ३० कोटींची उलाढाल होत असते. या घोड्यांच्या किमती ४० हजारांपासून सुरू होऊन थेट ४० लाखांपर्यंत असतात. तीन वर्षांपूर्वी यात्रेतील सर्वात जास्त किमतीचा घोडा अहमदनगर जिल्ह्यातील एका डॉक्टरांनी चक्क ५१ लाखांना खरेदी केला होता.

दत्त मंदिरापासून काही अंतरावरच मोकळ्या जागेत दरवर्षी हा घोड्यांचा बाजार भरत असतो. त्यात देशभरातून आलेल्या घोड्यांमध्ये सर्वात जास्त मागणी पंजाब येथील नुकरा आणि पाच कल्याणी जातीच्या घोड्यांना असते. देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, शामकर्ण, काळा पाच कल्याणी हे गुणवान घोडे सर्वांत मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदी करतात. तसेच त्यांच्या नाकावर पाढंरे चट्टे, दोन भवरी असलेले, पोटाखाली भवरा असलेले, गळ्यावर भोवरा असलेल्या घोड्यांनाही मागणी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववसाहतींत सुविधांची वानवा

$
0
0

नाशिकरोड परिसरातील नागरिक मुलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड शहराला लागून नव्या वसाहतींचा उदय झपाट्याने झाला असला तरी या नववसाहती अद्यापही मुलभूत नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या काही सुविधा आहेत. त्या अत्यंत सुमार दर्जाच्या असल्याने या नववसाहतींतील नागरिकांचे सध्या हाल सुरू आहेत. नाशिकरोडच्या पूर्व बाजूस सामनगाव रोड, नाशिक-पुणे महामार्ग, चेहेडी पंपिंग स्टेशन, खर्जुल मळा, जुना ओढा रोड, एकलहरे रोड याशिवाय देवळालीगाव, विहितगाव, वडनेर व पिंपळगाव खांब या भागातही नववसाहतींचे इमले उभे राहिलेले आहेत.

रेल्वेस्थानक जवळ असलेल्या भागात सिंहस्थानंतर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला मोठ्या प्रमाणात नववसाहतींचे जाळे विस्तारले आहे. या काळात येथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने या भागातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. मात्र या नववसाहतींना असुविधांचे ग्रहण लागलेले आहे. मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने या नववसाहतींतील रहिवाशांची गैरसोय होत आहे.

पथदीप वर्षानुवर्षे बंद अवस्थेत

या कॉलनी भागात पालिकेच्या अभ्यासिका, वाचनालये, व्यायामशाळा या उद्देशाने उभारलेल्या वास्तू गेल्या काही वर्षांपासून वापराविना पडून आहेत. या वास्तूंचा वापर टवाळखोरांकडून सर्रासपणे केला जात असल्याने स्थानिक रहिवाशी या टवाळखोरांच्या उपद्रवाने त्रस्त झालेले आहेत. पालिका प्रशासनालाही याचा विसरच पडलेला आहे. शहरातील विविध कॉलनीतील बहुतेक पथदीप वर्षानुवर्षे बंद आहेत. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत आहेत. तर पालिकेचा विद्युत विभाग साहित्य नसल्याचे कारण पुढे करून नागरिकांना झुलवत आहे. परिसरातील अंधाराचा फायदा घेत चोरांकडून घरफोडीचे सत्र या भागात सुरू आहे.

उघड्या नाल्यांची दुर्गंधी

वरील नववसाहतींत कचऱ्याची मोठी समस्या दिसून येत असून, मराठा कॉलनी, प्रेस्टिज प्राइड, प्रसादधुनी, चेहेडी पंपिंग स्टेशन, सामनगाव रोड, अश्विन कॉलनी, जुना सायखेडा रोड, खर्जुल मळा या भागातील नववसाहतींना कचऱ्याच्या दुर्गंधीचा विळखा पडला आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कचऱ्याचे संकलन होत असले तरी चौकाचौकात उघड्यावर पडून असलेल्या कचऱ्याची दुर्गंधी या नववसाहतींसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. याच परिसरात काही उघडे नाले उघडे असल्याने त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी वर्षभर वाहत असते.

रस्त्यांची कमतरता

मळे विभागातील कॉलनीत नागरिकांना खराब रस्त्यांचाच वापर करावा लागतो. काही रस्त्यांना रुंदीकरण व डांबरीकरणाची गरज आहे. मात्र स्थानिक नगरसेवक रस्त्यांच्या समस्येकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या दशकभरात उदयास आलेल्या विविध कॉलनीतील जनावरांचे गोठे स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या गोठ्यांच्या दुर्गंधीचा सामना रहिवाशांना करावा लागत असून, या गोठे मालकांकडून स्वच्छता राखली जात नसल्याने रहिवाशी त्रस्त झालेले आहेत.
कॉलनीतील नागरी सुविधांविषयी पालिका प्रशासन दखल घेत नसून, नगरसेवकही असंवेदनशील झालेले आहेत. कचरा, रस्ते, पथदीप आणि उघडे नाले या प्रमुख समस्यांनी रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील सर्वच कॉलनीतील रहिवाशी त्रस्त आहेत.

-गजानन चव्हाण, रहिवाशी,

कॉलनी परिसरातील रस्त्यांचे डिमार्केशन करीत अतिक्रमण काढणे, रस्ते रुंदीकरण, वीजवाहक तारा भूमिगत करणे, पथदीप दुरुस्ती ही कामे लवकरच मार्गी लागतील. पडून असलेल्या इमारतीही लवकरच सेवाभावी संस्थांना देण्यात येणार आहेत.

-पंडित आवारे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एव्हरेस्ट बेस’वर चिमुकल्यांची स्वारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हल्लीच्या युगात लहान मुले मोबाइल, कॉम्प्युटरसमोर बसलेली असल्याचे दिसून येते. मात्र, काही पालकांच्या जागरूकतेमुळे लहान वयातच मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात ट्रेकिंग करण्याची आवड निर्माण होत असल्याचीही उदाहरणे आहेत. नाशिकमधील साडेसहा वर्षांचा श्रीरंग व नऊ वर्षांची अयाना माने हे दोन चिमुकले त्यापैकीच असून, त्यांनी जगप्रसिद्ध एव्हरेस्ट बेस कॅम्प हा अत्यंत खडतर मानला जाणारा ट्रेक पूर्ण केला.

गेल्या महिन्यात पंचवीस भारतीय ट्रेकर्स या ट्रेकसाठी काठमांडू येथे गेले होते. मुंबई, नागपूर, बेंगळूरू, हैदराबाद, म्हैसूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून काही अनुभवी, तर काही नवखे ट्रेकर्स या ट्रेकमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये नाशिकमधील युरो किड्स इंटरनॅशनल प्री-स्कूलच्या मुख्याध्यापिका सुचित्रा माने, विश्वनाथ माने व त्यांची मुले श्रीरंग व अयाना सहभागी झाले होते. माने दाम्पत्य नियमित ट्रेकिंग करतात. यावेळी आपल्या मुलांनीही ट्रेकिंगमध्ये सहभाग घ्यावा, या भूमिकेतून त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिले. एव्हरेस्ट बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून १७ हजार ५९८ फूट (५ हजार ३६४ मीटर) उंचीवर आहे. दहा वर्षांखालील अतिशय मोजक्या मुलांनी ही ट्रेक पूर्ण केल्याचे माने दाम्पत्याने सांगितले.

हा सोळा दिवसांचा ट्रेक आहे. रोज किमान सहा ते सात तास चालावे लागते. जसजसे आपण समुद्र सपाटीपासून उंच जातो तसतसे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे श्वसनाचा त्रास, डोकेदुखी, मळमळ यांसारखा त्रास होताे. या सगळ्यावर मात करून या दोन चिमुकल्यांनी हा ट्रेक पूर्ण केला आहे. त्यांच्याबरोबर नागपूरची बारावर्षीय तानिया पटवर्धन व तेरावर्षीय रिया सोलंकी यांनीही हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला.

--

मुलांमध्ये कमालीची क्षमता असते. पालकांनी ती ओळखण्याची गरज असते. त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करून दिल्यास मुले उल्लेखनीय कामगिरी करू शकतात.

-सुचित्रा माने, पालक

--

या ट्रेकसाठी तीन महिन्यांपासून आम्ही मुलांची तयारी करवून घेतली होती. रोज सहा ते आठ किलोमीटर चालणे, जिन्यांची चढ-उतर आदी प्रकारांचा त्यात समावेश होता.

-विश्वनाथ माने, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुन्हेगारीमुक्त मालेगाव’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या आठवड्याभरात शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या असून, गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी आता मालेगाव पोल‌िस दलाच्या वतीने शनिवारपासून गुन्हेगारीमुक्त मालेगाव मोहीम सुरू करण्यात येत असल्याची माहिती येथील अपर पोल‌िस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत व गेल्या आठवड्यात झालेल्या गुन्हेगारी कारवायांचा आढावा घेण्यासाठी पोद्दार यांनी पोल‌िस उपाधिक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेबाबत बोलतांना पोद्दार म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत सराइत गुन्हेगारांवर नजरबंदी, अचानक तपासणी होणार असून, सर्व पोल‌िस ठाण्यातील १० प्रमुख गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सात झोपडपट्टी दादाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून, तूर्तास त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. २८ जणांवर तातडीने हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखेकडून ३६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव आहेत. शहरातील महसूल विभाग, स्थानिक गुन्हे शाखा व पोल‌िस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी पोलिसांकडून ही खास मोहीम राबविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळी मिरवणुकीने त्र्यंबकमध्ये उत्साह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शेकडो वर्षांच्या परंपरेने ग्रामदेवता महादेवीस सवाद्य मिरवणुकीने ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात शनिवारी बली अर्पण करण्यात आला. गावावरील अरिष्ट टळावे म्हणून सुमारे साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी पासून ही प्रथा सुरू आहे. कार्तिक पौर्णिमेस हा बळी अर्पण करण्यात येतो. यावर्षी शुक्रवारी आणि शनिवारी अशा दोन दिवस पौर्णिमा आल्याने शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कुशावर्त येथून बळीची सवाद्य मिरवणुक निघाली.

कुशावर्तावर पूजा विधी करून ग्रामस्थांनी जमा केलेला सुमारे सव्वाशे किलो तांदुळ शिजवला. तो बह्मवृंदांच्या मंत्रघोषात बैलगाडीत ठेऊन मंगलवाद्यांच्या गजरात शहराच्या उत्तरेस असलेल्या ग्रामदेवता महादेवीस अपर्ण करण्यात आला. या प्रसंगी बलीच्या प्रतिकात्मक म्हणून कोहळा हे फळ कापण्यात आले. येथील नरेंद्र पेंडोळे यांनी सहकारींच्या मदतीने हा तांदूळ शिजवून अर्पण केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरदवाडी’च्या देखभालीकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येथील सरदवाडी धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दूर्लक्ष झाले असून, धरणाचा भरावा काटेरी झाडे-झुडुपांनी वेढला आहे. पिचिंगदेखील उद्ध्वस्त झाल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. सांडवा फोडण्याचे प्रकार घडल्याने लाखो लिटर पाणी वाहून अपव्यय झाला आहे. पाटबंधारे विभागाने या बाबींकडे वेळीच लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.

सरदवाडी धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर शिवनदीद्वारे हे पाणी देवनदीला मिळते. या धरणातून लोणारवाडी, जामगाव, पास्ते आणि सरदवाडी अशा चार गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे धरणाच्या पाण्यावरच या गावांची तहान भागत असते. तसेच सरदवाडी परिसरात पाण्याचा पाझर होत असल्याने शेतीसाठी धरण उपयोगी ठरते. ७० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता घटली आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून, त्या पार्श्वभूमीवर धरणात साठलेल्या प्रत्येक थेंबांचे जतन होणे, त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. धरणाच्या भरावाला मोठ्या प्रमाणात बाभुळ व अन्य काटेरी झुडपांनी वेढा घातला आहे. झुडपे वेळोवेळी काढण्याची गरज आहे. त्यामुळे भरावाला धोका पोहचत असून, गळतीचे प्रमाण वाढले आहे.

धरणाच्या भरावाला आतल्या बाजूने असलेली दगडी पिचिंग बऱ्याच प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. या गंभीर बाबींकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर बरेच दिवस सांडवा वाहत असतो. मात्र, पावसाळ्यानंतर काही दिवसातच धरणाचा सांडवा फोडण्याचा अज्ञात व्यक्तींनी खोडसाळपणा केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. विशेष म्हणजे असा प्रकार घडूनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोणीही याकडे फिरकले नाहीत. सांडवा फोडण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कन्हैयाकुमारची आज सभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा युवा नेता कन्हैया कुमाररी रविवारी सभा होणार आहे. याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेवरुन वाद होवू नये यासाठी प्रशासनाबरोबरच आयोजकांनी विशेष काळजी घेतली आहे. या सभेला जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित रहावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी विविध संघटनांनी त्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने तर कन्हैया यांच्या मतांविषयी संभ्रम असलेल्या युवकांनी सभेस आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

तूपसाखरे लॉन्समध्ये दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे. सभेत पाणी बॉटल्ससह कुठलेही साहित्य नेण्यास बंदी करण्यात आल्यानंतर माहितीसाठी सूचनांचे पोस्टरही तयार करण्यात आले. शिक्षण बाजार समितीने एक पत्रक काढत कन्हैयाकुमार विषयी अनेक वादही निर्माण केल्यामुळे त्याच्या विषयी अनेकांचा संभ्रम आहे. त्यामुळे सभेस उपस्थित राहून कन्हैयाकुमारचे मत समजून घ्या. त्यानंतर पुढील आठवड्यात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, छात्र भारती, एआयएसएफ व इतर संघटनांच्या वतीने खुल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पटलेल्या व न पटलेल्या अशा दोन्ही मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे डॉ. मिलिंद वाघ यांनी सांगितले. या सभेसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), छात्रभारती, महाराष्ट्र युवा परिषद, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), सम्यक विद्यार्थी आंदोलन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ), शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच, प्रगतिशील लेखक संघ इत्यादी आयोजक संघटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांवर इस्रोची मात्रा लागू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इस्रोमार्फत नाशिक जिल्ह्यात मोबाइल अॅपद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील (इस्रो) तंत्रज्ञांच्या मदतीने हे काम होत असून, सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे त्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक जिल्ह्यात होणारे असे सर्वेक्षण हा राज्यातील पहिलाच पहिलाच प्रयोग आहे. त्याअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सिन्नर तालुक्यातील नायगाव गटासाठी रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रस्तेदुरुस्तीच्या कामात पारदर्शकता यावी, हा उद्देश आहे. या अॅपमुळे रस्तेदुरुस्ती कामांचे प्राधान्यक्रम ठरविता येणार आहेत. त्याचप्रमाणे शासनाचा निधी योग्य कामासाठी खर्च व्हावा याचे नियोजनही यामुळे करता येणार आहे.

खासदार गोडसे म्हणाले, की खड्डेमय रस्ते सर्वांनाच अतिशय त्रासदायक ठरतात. शहरी व ग्रामीण भागातही त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. आज सगळीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. अशा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांची स्वतंत्र यंत्रणा साध्या पद्धतीने खड्ड्यांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करते. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही निधीची वानवा असते. अशावेळी सर्वाधिक खड्डे झालेल्या रस्त्यांना प्राधान्य मिळण्याची गरज आहे. मात्र, हे काम कागदावर अधिक प्रमाणात अवलंबून असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या भागातील रस्त्यांची किंवा खड्ड्यांबाबतची अचूक माहिती मिळत नाही. ही उणीव या तंत्रज्ञानाचा वापर करून दूर करता येणार आहे.
0000
जनता दरबारमधील तक्रारींची दखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या जनता दरबारात मांडण्यात आलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावरील तक्रारीची तत्काळ दखल घेऊन काम सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ओझर व पिंपळगाव येथील नॅशनल हायवे लगत नवीन सर्व्हिस रोड व फ्लायओवर्स च्या कामाबाबत जनता दरबारमध्ये तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर पालकमंत्री यांनी त्याची गंभीर दखल घेऊन त्याबाबत काम सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या.

जनता दरबारमध्ये केलेल्या सुचनेनंतर राष्ट्रीय राजमार्ग रस्ते प्राधिकरणचे व्यवस्थापक प्रशांत खोडस्कर यांनी ठेकेदारांना आदेश दिले. त्यानंतर ओझर व नाशिक येथील लेखानगर येथे तत्काळ रस्ता सफाइ करून सर्व्हिस रोडचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. आता प्लायओव्हरच्या कामही महिनाभरात केले जाणार आहे.

जिल्ह्यात रस्त्यांच्या अनेक तक्रारी आहे. पण, त्याची दखल अधिकारी घेत नसल्यामुळे जनता दरबारमध्ये या तक्रारी करण्यात आल्या व त्याची दखल घेतली गेली. खरं तर प्रशासनाने हे स्वतःहून करणे आवश्यक असताना नागरिकांना वेठीस धरले जाते. त्यामुळे जनता दरबारमध्ये आम्ही तक्रारी केल्या व हा प्रश्न आता सुटला अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परांजपे, झाकोरकर यांना ‘पूर्णवाद’चा पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

सात्विकतेने भारलेले वातावरण आणि मंत्रोच्चारांचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात पूर्णवाद विद्या आणि कला पुरस्कारांचे रविवारी वितरण करण्यात आले. गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात हा सोहळा झाला.

पूर्णवाद परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वेदमूर्ती कै. प्रल्हाद गुरू पारनेरकर आणि कै. वेदशास्त्रसंपन्न पुरुषोत्तम काका भडकमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. यंदा पुण्याचे माधवशास्त्री परांजपे यांना डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते ‘वेदमूर्ती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इंदूरच्या कल्पना झाकोरकर यांना पूर्णवाद संगीत पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पूर्णवाद परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे यंदा ११ वे वर्षे होते. पुरस्कार वितरणाच्या मुख्य सोहळ्यानंतर कल्पना झाकोरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

आज म्हसरूळला कार्यक्रम

आज (दि. ६ नोव्हेंबर) निवृत्त न्यायाधीश प्रमोद घाटे यांना पूर्णवाद सत्यबोध समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. म्हसरूळ येथील शिवराम मंदिरात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थ‌ितीत आणि निवृत्त न्यायाधीश जयंत पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कै. प्रमोद भडकमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैष्णवी भडकमकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा तबला वादनाचा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा हजार दिव्यांनी झळाळले पिंपळगाव

$
0
0

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव बसवंत येथे शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विक्रमी ११ हजार पणत्यांचा दीपोत्सव झाला. यात ११ दीपस्तंभांचा समावेश होता. सरपंच आक्कासाहेब बनकर यांच्या हस्ते येथील संत जनार्दन स्वामींच्या पर्णकुटीसमोर हा दीपोत्सव झाला. जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा दीपोत्सव असल्याचा दावा भक्त परिवाराने केला आहे. पर्णकुटीशेजारीच हनुमान मंदिर, शनैश्वर मंदिर व सप्तशृंगीमातेचे मंदिर असून, वर्षभर शनैश्वराला भाविकांनी वाहिलेल्या तेलातून हा दीपोत्सव साजरा केला.

यावेळी आमदार दिलीप बनकर, संजय मोरे, गणेश बनकर, अल्पेश पारख, सत्यभामा बनकर, दीपक मोरे, दीपक विधाते, नानासाहेब देशमाने, नारायणराव विधाते, प्रकाश गोसावी, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब आंबेकर, उल्हास पाटील प्रमुख पाहुणे होते. अनिल पठाडे, राकेश आंबेकर, सचिन देशमाने, नंदकुमार सोनवणे, बबन विधाते, भाऊलाल वर्पे, गोकुळ घडोजे, अशोक शिंदे, सुभाष वाळेकर, कैलास भागडे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय कलगीतुऱ्यात अडकला उड्डाणपूल

$
0
0

अभिजित राऊत, आडगाव

गतवर्षी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून के. के. वाघ परिसर ते जत्रा हॉटेलपर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन गाजावाजा करीत उरकण्यात आले. त्यावेळी या कामाच्या मंजुरीच्या श्रेयवादावरून भाजप व शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर महापालिकेत भाजपला सत्ता मिळाली, पण येथील उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने या कामाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.

शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील अमृतधाम येथील फलकावर हा उड्डाणपूल चोरीला गेल्याची कोटी करण्यात आली असून, हा फोटो परिसरात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ५ नोव्हेंबर २०१६ रोजी के. के. वाघ परिसर ते जत्रा हॉटेलदरम्यानच्या उड्डाणपुलाचे घोषणाबाजीत उद्घाटन केले गेले. पण, वर्ष उलटले तरी उड्डाणपूल कुठे? ४१४ कोटी मंजूर झाले, पण उड्डाणपूल चोरीला गेला की काय, असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला असल्याचे या फलकावरील मजकुरात म्हटलेले आहे.

या रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. शिवाय हा रस्ता एक बाजूने औरंगाबाद महामार्ग, पुणे रस्त्याकडे जातो. त्यामुळे चारही बाजूंनी अवजड व मालवाहतूक गाड्यांची कायम वर्दळ असते. वाहनांचा वेग प्रचंड असल्याने बघता क्षणी गाडी अंगावर येते की काय, असा गोंधळ निर्माण होऊनदेखील बऱ्याचदा अपघात घडतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखे ठरत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

---

भूमिपूजनानंतर १५ अपघाती मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुली धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी रोज लहान-मोठे अपघात होतात. या अपघातांत काही लोक मुत्युमुखी पडतात, तर काहींना अपंगत्व येत आहे. मागील वर्षी मोठ्या दिमाखात हा भूमिपूजन सोहळा पार पडला असला, तरी तब्बल एक वर्ष उलटूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. या एका वर्षाच्या काळात परिसरात जवळपास १५ व्यक्तींचा अपघातांत बळी गेला असून, अजून किती बळी घेण्याची प्रशासन वाट बघत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

---

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या दिमाखात पुलाचे भूमिपूजन केले गेले. पण, वर्ष उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही. येथील काम तात्काळ सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्यात येईल.

-अमोल सूर्यवंशी, स्थानिक रहिवासी तथा शिवसेना पदाधिकारी

--

अपघात व वाहतूक कोंडीची दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी येथे उड्डाणपूल गरजेचा आहे. अनेक लोकांनी या परिसरात झालेल्या अपघातात जीव गमावला आहे. प्रशासन अजून किती बळी घेणार आहे. या पुलाचे काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे.

-अजित पाटील, स्थानिक रहिवासी

---

पाच वर्षांत परिसरात झालेले अपघात

--

वर्ष संख्या मृत जखमी

२०१३ ७८ २० ६४

२०१४ ९३ ३२ ६५

२०१५ ७८ ३९ ५२

२०१६ ७४ ४० ४२

२०१७ ३५ १५ ३१

एकूण ३५८ १४६ २५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images