Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आवक वाढल्याने सीताफळ झाले स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्यवर्धक असलेल्या सीताफळांची आवक वाढली असून, दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आवक वाढल्याने बाजारात चाळीस रुपये किलो दराने सीताफळांची विक्री होत आहे.

कमी खर्चात पुरेसे उत्पादन देणारे फळ म्हणून सीताफळ ओळखले जाते. सीताफळाचा हंगाम जून ते जानेवारीदरम्यान तीन बहरांत असतो. जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो. जून ते ऑक्टोबरचा बहर बाजारात आला असून, उत्पादन वाढीमुळे दरात घसरण झाली आहे. नाशिकमध्ये अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील सर्वाधिक सीताफळ विक्रीसाठी येत आहेत. क्वालिटीनुसार सीताफळांची दर मिळत असला तरी किरकोळ बाजारात चाळीस रुपये दराने विक्री होत आहे.

सीताफळ लागवड ही शेतक-यांसाठी फायद्याची ठरते. सीताफळाला औषधे फवारणी आणि खतांसाठी फारसा खर्च नसतो. यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. याबरोबरच बाजारात सफरचंद, पेरू, केळी, किवी, स्ट्रॉबेरी, चिक्कू यांची आवक कायम असून, दर जैसे थे आहेत. स्ट्रॉबेरी यंदा आवक थोडी कमी झाल्याने दर वाढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेपू, वांगे, भेंडी, टोमॅटो खाताहेत ‘भाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने आवक मंदावली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असून, सर्वसामान्यांचे बजेटही वाढले आहे. नवीन माल बाजारात येईपर्यंत भाजीपाल्याचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर वाढले आहेत. टोमॅटो, शिमल मिरची, भेंडी, वांगे शेपू या भाज्या भाव खात आहेत.

ऑक्टोबमध्ये परतीचा पाऊस रेंगाळल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाला. यामुळे बाजार समितीत आवक मंदावली आहे. याशिवाय मुंबईमध्ये चांगला दर मिळत असल्याने तेथे नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठवला जात आहे. चांगली मागणी असल्याने गुजरातमध्‍येही भाजीपाला जात आहे. यामुळे स्‍थानिक बाजारातही दरवाढ झाली आहे. भेंडी सर्वाधिक भाव खात असून ६० ते ७० रुपये किलोदराने विक्री होत आहे. शिमला मिरची ५० ते ६०, वांगे ५० ते ६०, टोमॅटो ४० ते ५० किलो दराने विक्री होत आहेत. आणखी पंधरा दिवस तरी ग्राहकांनी चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे.

पालेभाज्यांचा दरदिलासा

गेल्या आठवड्यापेक्षा भालेभाज्यांच्या दरात थोडी घसरण झाली आहे. कोथिंबीरच्या जुडीचे दर ८० ते १५० रुपयांपर्यंत गेले होते. त्यात थोडी घसरण होऊन दर ३० ते ६० रुपयांपर्यंत म्हणजे निम्म्याने कमी झाले आहेत. मात्र मेथी, शेपू व कांदापात यांचे दर जैसे थे आहेत. ‌नवीन आवक सुरू झाल्यावर दर कमी होतील. ‌शिमला मिरचीचे दर वाढले आहेत.

बाजार समिती लिलावातील दर

भाजीदर (रुपये किलो) : टोमॅटो - ४० ते ५०, वांगी- ५० ते ६०, फ्लॉवर- ३०,कोबी- ४० ते ५०, शिमला मिरची- ५० ते ६०,दुधी भोपळा- १० रु. नग, कारली-३० ते ३५, दोडका-३० ते ४०, गिलके-४०, भेंडी-६० ते ७०, गवार-५०, काकडी-३०, मिरची-४० ते ५०, कोथिंबीर-३० ते ६०, मेथी-२० ते २५,
शेपू-२० ते ३०, कांदापात-१५ ते २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जत्रा लिंकरोडवर कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेला जत्रा हॉटेल-नांदूर लिंकरोड हा वाहतुकीचा मुख्य केंद्र ठरत आहे. मात्र, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील कॉलनीरोड आणि मुख्य वळणांवर गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जत्रा लिंकरोड औरंगाबाद महामार्ग व रेल्वे स्टेशनला जोडणारा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवाय छोटे-मोठे अपघातदेखील रोजच होत असतात. या रस्त्यावर व्यावसायिकांचे झालेले अतिक्रमण आणि रस्त्यावर केली जाणारी बेशिस्त पार्किंग ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावर लॉन्स आणि हॉटेल्सची संख्याही अधिक आहे. लग्नसराईत तर वाहने थेट रस्त्यावर उभी असतात. या गर्दीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

--

या आहेत समस्या

जत्रा चौफुली येथील वाहतूक कोंडी, रस्त्यावर केली जाणारी अनधिकृत पार्किंग, चेंबरचे ढापे आणि रस्त्यांची लेव्हल योग्य नसल्याने चेंबर टाळण्याच्या नादात अपघात होतात. सर्रासपणे भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनधारकांवर काेणाचेही नियंत्रण नसल्याने अपघातांत भर पडत आहे.

--

उपाययोजना गरजेच्या

येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, रस्त्याच्या कडेच्या अनधिकृतपणे उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करावी, कॉलनीरोड व मुख्य रस्त्यावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत. रस्त्यावरील चेंबर आणि खड्डे यांची दुरुस्ती करणेही गरजेचे आहे.

---

जत्रा लिंकरोडवर वाहनांचा वेग प्रचंड असतो. या ठिकाणी मोठा रहिवासी भाग आहे. त्यामुळे कॉलनीरोड मोठ्याप्रमाणात जोडले असल्याने स्थानिक नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार गतिरोधक टाकण्यात यावेत.

-सतीश माळोदे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार पार्किंगमधून त्र्यंबकेश्वरला चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरच्या वाहनतळावर गाड्या फोडण्याचे सत्र सुरू असून, नगरपालिका प्रशासन सर्रास दुर्लक्ष करीत आहे. दिवाळी संपताच पर्यटकांचा त्र्यंबकडे ओघ वाढला आहे. मात्र येथील पार्किंगमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची काच फोडून मोबाइल आणि रोकड लंपास करण्याच्या घटना दररोज घडत आहेत. बहुतांश पर्यटक जाण्याची ओढ असल्याने पोल‌िस तक्रार करीत नाहीत. तरी देखील गत आठवडयात तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. २३ ऑक्टोबर रोजी गुजरातहून आलेले जसवाल सींग आठवाल यांच्या कारची काच फोडून तीन महागडे मोबाइल व कागदपत्र पळवून नेले आहेत. २८ ऑक्टोबरला नाशिकचे ज्ञानेश्वर नानोटे यांच्या कारमधील मोबाइल चोरीस गेला आहे. ५ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसातला तवेरा गाडीतून ११ हजार रोख आणि ७० हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ग्रामस्थांच्या चर्चेनुसार सुटीच्या कालावधीत १० पेक्षा अधिक वाहनांच्या काचा फोडून मोबाइल पर्स चोरीस गेले आहे. त्र्यंबक पोल‌िसांनी तक्रार येताच धरपकड करत चोरीचा मोबाइल विकणारा आणि घेणारा अशा दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही संशयीत काळी पिवळी वाहन चालक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजूर बनून गेले अन् कैदी घेऊन आले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठवल्यानंतर सेंट्रल जेलच्या गेटवरच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस ग्रामीण पोलिस दलाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. तब्बल वर्षभर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मजूरांच्या वेशात बैलगाडीतून जाऊन साक्री तालुक्यातून अटक केली. त्यास नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.

वसंत पुंजाराम सोनवणे (४५ रा. भडाणे ता. सटाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २००५ मध्ये पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याच्याविरुध्द सटाणा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज पार पडले. कोर्टात सबळ पुरावे सादर झाल्याने सोनवणेस दोषी ठरवत कोर्टाने २५ ऑक्टोबर २०१६ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या आदेशानंतर कैदी पार्टीच्या पोलिसांनी त्यास नाशिकरोड सेंट्रल जेल येथे आणले. मात्र, तुरूंगात प्रवेश करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू असताना पोलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सोनवणेने धूम ठोकली होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये सोनवणेविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपी पसार झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. मात्र, वर्षभर पोलिसांना गुंगारा देण्यात सोनवणे यशस्वी ठरला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना नुकतीच यासंबंधी महत्त्वाची मिळाली होती. वसंत सोनवणे प्रतापपूर (ता. साक्री, जि. धुळे) येथे शेतमजूर म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस पथक प्रतापपूर येथे पोहचले. पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरलेल्या सोनवणेला कोणताही संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी शेतमजुरांचे कपडे घातले. यामुळे गाफील राहिलेला आरोपी पोलिसांच्या हाती लागला.

बैलगाडीतून पोहचले पोलिस

सोनवणेला अटक करण्याची चांगली संधी मिळाल्याने पोलिसांनी अगदी विचारपूर्वक सापळा रचला. रविवारी (दि. ५) हवालदार नामदेव खैरनार, दीपक आहिरे, अशोक जगताप, सुनील पानसरे, शिपाई प्रदीप बहिरम यांनी गावातच बैलगाडीची उपलब्धता केली. अगदी शेतमजुरांची वेशभूषा करीत परिसरात वावर ठेवला. या पथकाने रात्रीच्या सुमारास आरोपी राहत असलेल्या शेतात बैलगाडीवर जाऊन त्यास अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंद्रधनुष्य’चा आजपासून दुसरा टप्पा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा जिल्ह्यात ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३३७ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये १५९८ लाभार्थी बालकांना आणि २२३ मातांना लसीकरण केले जाणार आहे.

इंद्रधनुष्य मोहिमेचा दुसरा टप्पा राज्यभरात राबविला जात असून, या अंतर्गत ९ जिल्हे व १३ महानगरपालिका येत आहेत. यासाठी केंद्र सरकार, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना व राज्याचा आरोग्य विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे. ही

मोहीम १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, जन्मापासून लसीकरण न झालेली बालके यापूर्वी पूर्ण डोस न दिलेली बालके व लसीकरणापासून वंचित गरोदर मातांना लाभ मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आशा सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन वंचित माता व बालकांचे सर्वेक्षण करून यादी तयार करण्यात आली आहे. तसेच, मोहिमेच्या जनजागृतीसाठी गावांमध्ये शाळांच्या मदतीने रॅलीचे आयोजन बॅनर, पोस्टर, स्टीकर, होर्डिंग्ज व रेडिओ जिंगल्स याद्वारे प्रसिद्धी करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेदरम्यान वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, अतिदुर्गम भाग, डोंगराळ भाग व जोखीमग्रस्त भागावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मोहिमेत सगळयांनी सहभाग देऊन एकही बालक व माता लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षराजी अन् शहराचे असे व्हावे सौंदर्यसंवर्धन

$
0
0

दाद-फिर्याद

---

वृक्षराजी अन् शहराचे असे व्हावे सौंदर्यसंवर्धन


सुरेश देशपांडे, मटा वाचक

महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जुने नाशिक, सिडको व पंचक्रोशीतील गावे समाविष्ट आहेत. शहरातून अनेक महामार्ग जातात, तसेच जेथे वस्ती तेथे रस्ते आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या अखत्यारित शहरातील सार्वजनिक क्षेत्रावरील वृक्ष, रस्त्यांच्या दुतर्फा असलेेले जुने वृक्ष, अनेक हौसिंग सोसायट्यांमधील रस्त्याच्या कडेने लावलेले वृक्ष, उद्यानांतील वृक्ष आणि अनेकांच्या बंगल्यांच्या प्रांगणात लावलेली छोटी-मोठी शोभेची, सावली देणारी, फळे देणारी झाडे, परदेशांतून आणलेली झाडे येतात.

अनेक सोसायट्यांतील वृक्षांना महापालिकेने दिलेले लोखंडी जाळीचे पिंजरे लावलेले आहेत. मात्र, अशा उंच वाढलेल्या वृक्षांकडे पाहत शहरातून फिरताना प्रामुख्याने खालील गोष्टी मला मी स्वतः सेवानिवृत्त वनाधिकारी आणि वृक्ष प्राधिकरण समितीचा माजी नियुक्त सदस्य असल्याने आढळून आल्या. त्यामुळे शहराच्या सौंदर्यवर्धनासाठी काही सूचना मला कराव्याशा वाटत आहेत. त्या अशा...

--

अ) शहरातील वृक्षांची स्थिती

-रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वृक्ष लगत असलेल्या विजेच्या खांबांवरील ट्यूब-फ्लडलाइट, स्ट्रीट लाइटभोवती विस्तारलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर हवा तसा प्रकाश पडत नाही.

-रस्त्यावर वृक्षांच्या फांद्या लांबवर पसरलेल्या असतात. त्या योग्य ठिकाणी छाटणे गरजेचे आहे.

-रस्त्याच्या कडेला उभे असलेले वृक्ष मोठे झाले, तरी त्यांना लहान असताना लावलले लोखंडी पिंजरे अजूनही काढलेले नाहीत. त्या पिंजऱ्यांचे गज-पट्ट्या वृक्षखोडात घुसून त्यांना उपसर्ग करीत असल्याची स्थिती आहे.

-पिंजरा वाकडा झाल्यामुळे त्यात लावलेली झाडे वाकडी झालेली असून, तशीच तग धरून आहेत.

-रस्त्याच्या कडेचे जुने वृक्ष निर्जिव झालेले असले, तरी त्या जागेवरच अनेक महिने कुजत उभे आहेत. त्यांना वेळेवर काढून घेऊन त्यांची विक्री करणे गरजेचे आहे.

-अनेक ट्री गार्ड रिकामे उभे आहेत. त्यात झाडे लावण्याची गरज आहे.

-रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावले असल्यास रोड डिव्हायडरवर विजेचे दिवे उभे असणे संयुक्तिक आहे. तसे करण्याचा नियम महापालिकेने करावा.

--

ब) सुटसुटीतपणासाठी हे करायलाच हवे

-शहरातील वाहतुकीची बेटे कधी रुंद, कधी अाकुंचित केली जातात. त्यामुळे सर्व रस्त्यांच्या अभ्यास करून त्यांच्या सौंदर्यवर्धनाचा दूरगामी आराखडा करण्यात यावा. हे काम टाउनप्लॅनिंग व उद्यान विभाग यांनी एकविचाराने एकदाच करावे. त्यामुळे पैसे वाचतील व सातत्यही राहील.

-शहरातील रस्त्यांवर, चौकांत, वळणांवर कुणाही थोर, प्रख्यात व्यक्तीचे पुतळे उभारू नयेत. ते उभारल्याने त्यांच्या जयंती, पुण्यतिथीला तेथे गर्दी वाढते. वाहनांना त्यांचा त्रास होतो व कचरादेखील वाढतो.

-शहरातील सर्व पुतळे महापालिकेने सन्मानपूर्व काढून त्यांची स्थापना शहरातील उद्यानांत करावी. विविध उद्यानांत एकेक पुतळा उभारावा व त्याची देखभाल त्या परिसरातील नागरिकांनी करावी.

-शहरात अनेक चौकांत कारंजे बसविल्यास त्याला नागरिकांचे सहकार्य लाभेल. कारंजाचा खर्च महापालिका किंवा उद्योग-कंपन्यांना देण्यासाठी विनंती करावी.

-शहरात चौकाचौकांत वाढदिवस वा अन्य शुभेच्छा फलक लावलेले आढळतात. असे प्रकार करणाऱ्यांकडून परवाना फी, तसेच दंड वसूल करावा.

-सर्व मोठ्या, उंच होर्डिंग्जना सीरियल नंबर्स द्यावेत व त्यांच्या नियमावली फीचा तक्ता प्रसिद्ध करावा.

-दिशादर्शक फलकांवरील मजकुरावर कोणी जाहिरातीचा कागद चिकटवला, तर ज्याची जाहिरात केली

गेली असेल, अशा घटकांकडूनच दंड वसूल करण्यात यावा.

-शहरात अनेक फ्लायओेव्हर उभे आहेत. त्यांच्यावरून खाली उतरण्याचा व वर चढण्याचा फलक वेगळ्या रंगांत सुस्पष्ट प्रिंटिंग केलेला असावा.

-प्रत्येक रस्त्यावर महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे फोन नंबर ठळकपणे दिसतील असे बोर्ड लावावेत.

-वाहतुकीचे नियम (सिग्नल तोडून वाहन हाकणे, चुकीच्या बाजूने वाहन नेणे) तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

-स्वच्छ परिसर, डेरेदार वृक्ष, रस्ते, मैदाने यासाठी प्रयत्न करणारी मंडळे, नागरिक, सोसायट्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे द्यावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांचा तिढा वाढला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील पालिकेच्या कारवाईचा त‌िढा अधिकच वाढला असून, कारवाईवरून सत्ताधारी व प्रशासन आमने-सामने आले आहे. धार्मिक स्थळांविरोधातील महापालिकेची कारवाई चुकीची असल्याचा आरोप करीत याविरोधात थेट कायदा हाती घेण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे आमदारांच्या उपस्थितीत महापौर रंजना भानसी यांनी आठ दिवसांत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. परंतु, प्रशासनाने हायकोर्टाचे आदेश असल्याचे सांगत, दोन दिवसांत काय ते पुरावे जमा करा. मात्र, कारवाई होणारच असा पवित्रा घेतला. फेरसर्वेक्षणाची मागणी प्रशासनानेच धुडकावून लावल्याने या कारवाईवरून शहरात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने २००९पूर्वीच्या धार्मिक स्थळांना कारवाईची नोटीस बजावली आहे. येत्या ८ नोव्हेंबरपासून १५० धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या धार्मिक स्थळांचे विश्वस्त, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापालिकेवर जोरदार हल्लाबोल करीत जाब विचारला. भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी आदींसह अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या निर्देशांनुसारच महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात कारवाई सुरू केल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी या बैठकीत केला. मात्र, न्यायालयाच्या निर्देशांची पुरेपूर अंमलबजावणी न करता पालिकेचे अधिकारी धार्मिक स्थळांवर सरसकट हातोडा मारत असल्याचा आरोप धार्मिक स्थळांचे विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. रस्त्याला अडथळा ठरत नसलेल्या तसेच १९६० पूर्वीच्या धार्मिक स्थळांनादेखील कारवाईच्या नोट‌िसा बजावण्यात आल्याने फेरसर्वेक्षण करून धार्मिक स्थळांना चुकीच्या कारवाईतून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेधही संतप्त कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला.

सर्वपक्षीय चर्वितचर्वण

धार्मिक स्थळांवर चुकीच्या पध्दतीने केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे शहरात दंगली उसळण्याचा धोका व्यक्त करीत फेरसर्वेक्षणानंतरच पुढील कार्यवाही करण्याची सूचना आमदार देवयानी फरांदे यांनी केली. यावेळी लोकांच्या आस्था, विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी न्यायालयीन आदेशांचा सन्मान राखून या प्रश्नावर तोडगा काढला जावा, अशी सूचना दिगंबर आखाड्याचे महंत शास्त्रीजी व महंत भक्तिचरणदास महाराज यांनी केली. रस्त्याला अडथळा न ठरणाऱ्या धार्मिक स्थळांवरील कारवाई निषेधार्ह असल्याने नमूद करीत आमदार सानप यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दहा दिवसांत फेरसर्वेक्षण करण्याची सूचना केली. मनसे गटनेते सलीम शेख यांनी प्रशासनाची कारवाई चुकीची असल्याचे दाखले देत न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी, नंदन भास्करे, आदींनी भूमिका मांडल्या. चर्चेअंती महापौर भानसी यांनी धार्मिक स्थळांच्या बाबतीत राजकारण न करता फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. फेरसर्वेक्षण करताना न्यायालयाकडून वेळ मागून घ्यावा तसेच स्थानिक नगरसेवक, धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि कार्यकर्त्यांची समिती नियुक्त करून हे सर्वेक्षण केले जावे, असे आदेशही महापौरांनी दिलेत.

प्रभारी आयुक्तांची भेट

यानंतर या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांची भेट घेतली. मात्र सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कारवाई क्रमप्राप्त असल्याचे नमूद करत १९६०पूर्वीच्या धार्मिक स्थळांचे पुरावे सादर केल्यास कारवाईतून ती धार्मिक स्थळे वगळण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच ही कारवाई दोन दिवसाच्या आत करा, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे फेरसर्वेक्षण होण्याची शक्यता कमीच असून, कारवाई अटळ मानली जात आहे.

विश्वस्तांचे आक्षेप

धार्मिक स्थळांचे सर्वेक्षणच चुकीच्या पद्धतीने

लोकमान्य धार्मिक स्थळांवरही कारवाई

कारवाईपूर्वी निर्णयाची प्रसिद्धी नाही

१९६० पूर्वीच्या धार्मिक स्थळांनाही नोट‌िसा

नोट‌िसा चिकटवताना त्यावर तारीख नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जिल्हा परिषदेचा निधी अन्यत्र वर्ग करू नका’

$
0
0

म. टा. प्रत‌निधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या हक्काचा सुमारे २७ कोटींचा निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वर्ग करण्याच्या हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केल्यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी खडबडून जागे झाले आहेत. जिल्हा परिषदेचा हा निधी इतरत्र वर्ग करू नये, अशी आग्रही मागणी या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे आदिवासी उपाययोजनेतील २७०२ लेखाशिर्षकातंर्गत मंजूर २७ कोटींच्या निधीबाबत चर्चा करण्यात आली. मंजूर झालेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जलयुक्तसाठी वर्ग केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. हा जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा निधी आहे. त्यांना विश्वासात न घेताच तो परस्पर वर्ग केल्यास आदिवासींवर अन्याय होईल, अशी भावना यावेळी काही सदस्यांनी व्यक्त केली. तसेच हा निधी वर्ग करू नये, अशी विनंतीही पदाधिकाऱ्यांनी केली. हा निधी जलयुक्त शिवारसाठी वर्ग करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून त्यांना देण्यात आली. निधी वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शिष्टमंडळात उपाध्यक्षा नयना गावित, सभापती सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, धनराज महाले, दीपक शिरसाठ, उदय जाधव आदींचा समावेश होता.

निधी वर्गप्रकरणी लवकरच बैठक

नाशिक : जिल्हा परिषदेकडील लघू पाटबंधारे आदिवासी उपाययोजनेतील मंजूर निधी इतरत्र वर्ग करू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी पुढच्या आठवड्यात या विषयावर बैठक घेऊ, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हा परिषदेकडील लघू पाटबंधारे विभागाच्या ० ते १०० हेक्टर क्षमतेच्या आतील कामे करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. नाशिक जिल्हा परिषदेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात आदिवासी उपाययोजने अंतर्गत सिमेंट प्लग बंधारे बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदरचा निधी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वर्ग करण्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळेंचा अर्ज कोर्टाने फेटाळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना फेर मतमोजणीचा अधिकार नसल्याने त्यांना मनाई करावी, अशा आशयाचा धनंजय बेळे यांनी न्यायालयात केलेला अर्ज तिसरे दिवाणी सह न्यायाधीश एस. एस. सस्ते यांनी फेटाळून लावला. त्यामुळे धनंजय बेळे आणि भालचंद्र वाघ यांच्यात फेरमतमोजणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आज मंगळवार दि. ७ रोजी सकाळी ८ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळकपथ येथे फेरमतमोजणी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी ३ एप्रिल रोजी झाली होती. यावेळी १५ व्या क्रमांकाची मते मिळालेले धनंजय बेळे आणि १६ व्या क्रमांकाची मते मिळालेले भालचंद्र वाघ यांच्या मतांमध्ये केवळ एका मताचा फरक असल्याने भालचंद्र वाघ यांनी फेरमतमोजणी घ्यावी, असा अर्ज मतमोजणी झाल्यानंतर रात्री ९.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्याकडे दिला होता. या अर्जानुसार ७ एप्रिल रोजी फेरमतमोजणी आयोजित करण्यात आली होती. परंतु, दोघा उमेदवारांना एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा म्हणून एक महिना फेरमतमोजणी स्थगित करण्यात आली होती.

दरम्यान, बेळे यांनी फेरमतमोजणीला आव्हान देणारा अर्ज मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नाशिक यांच्याकडे दाखल केला होता. फेरमतमोजणी हा निवडणूक प्रक्रियेचाच एक भाग असल्याने आणि मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम, कलम ४१ अ, अन्वये निवडणूक विषयक निर्देश देण्याची तरतूद नसल्याने सहाय्यक धर्मादाय आयुक्त पंडित यांनी १२ ऑक्टोबर रोजी तो अर्ज फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता फेरमतमोजणी सुरू करण्यात आली. मात्र, बेळे यांनी नाशिक न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याची सुनावणी सुरू असल्याने दुपारी १२.२० च्या सुमारास न्यायालयाच्या निर्देशांनुसार फेरमतमोजणीचे काम थांबविण्यात आले होते. त्या दाव्याला दोन तारखा पडून सोमवारी सुनावणी होऊन बेळे यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

धनंजय बेळे यांनी केलेल्या निवडणूक अर्जामध्ये सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना निवडणूक विषयक कोणतेही अधिकारी नसल्याने त्यांना फेरमतमोजणी करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी केली होती. या अर्जावर न्यायालयाने तात्पुरता मनाई हुकुम दिला होता आणि हा अर्ज कायदेशीर दृष्ट्या कसा योग्य आहे, हे न्यायालयास युक्त‌िवादात सांगावे असे निर्देश सस्ते यांनी दिले होते. त्यानुसार २ नोव्हेंबर रोजी बेळे यांच्या वतीने अॅड. विनयराज तळेकर, निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्यावतीने अॅड. विलास लोणारी, भालचंद्र वाघ यांच्या वतीने अॅड. दौलतराव घुमरे आणि अध्यक्ष, सावाना यांच्या वतीने अॅड. अतुल गर्गे यांनी युक्त‌िवाद केला. अॅड. विनयराज तळेकर यांनी युक्त‌िवादात सांगितले की, या प्रकरणात नजरचुकीने निवडणूक अर्ज असे संबोधण्यात आले असून, तो नियमित दावा समजून नोंदविण्यात यावा. यासंबंधीत दोन्ही बाबींची चौकशी होऊन तो निवडणूक अर्ज दिवाणी दावा होऊ शकत नाही आणि निवडणुकीसंबंधी निवडणूक अर्जात केलेल्या मागण्या निवडणूक प्रक्रिया संपलेली नसल्यामुळे फेरमतमोजणी स्थगित करण्याचा अर्ज कायदेशीर होऊ शकत नसल्याने तो अर्ज फेटाळण्यात येत असल्याचा निर्णय दिवाणी सह न्यायाधिश सस्ते यांनी दिला. या पार्श्वभूमीवर सावाना निवडणूक फेर मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार टिळकपथ, नाशिक येथे फेरमतमोजणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूमाफियांचा तलाठ्यावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाळूवाहतूक रोखली म्हणून पाच जणांनी वडनेर दुमाला येथील तलाठ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी भाभानगर परिसरातील नागझी चौकात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणी तलाठी यादव विठ्ठल बच्छाव (वय ३७, रा. फ्लॅट क्रमांक ११, प्रथम अपार्टमेंट, अशोकामार्ग) यांनी तक्रार दिली आहे.

बच्छाव सोमवारी सकाळी काही कामानिमित्त नागझी चौकात आले होते. त्यांचा पाठलाग करीत आलेले अल्तसम शेख, झिया शेख आणि त्यांच्या तीन- चार साथीदारांनी अचानक बच्छाव यांच्यावर हल्ला चढवला. वाळू तस्करीबाबत सतत आमच्याच वाहनांवर कारवाई का करतो, अशी विचारणा करीत हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे बच्छाव यांनी पोलिसांना सांगितले. या हल्ल्यानंतर संशयित पसार झाले. बच्छाव यांना प्रदीप तांबे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन बच्छाव यांच्या प्रकृतीची चौकशी केली. काही दिवसांपूर्वीच तलाठी बच्छाव यांनी संशयित आरोपींची वाहने पकडून कारवाई केली होती. याचाच राग मनात धरून पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. दरम्यान या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अल्तमस शेख आणि झिया शेख यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

हल्लेखोरांचा तपास सुरू

संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. वाहनांवर झालेल्या कारवाईमुळे हल्ला झाल्याचे बच्छाव यांनी सांगितले असून, हल्लेखोरांचा माग काढण्यात येतो आहे.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यावर हल्ला

निफाड ः खेरवाडी येथे अवैध दारू विक्री तपासणी करण्यासाठी आलेले उत्पादन शुल्क कर्मचारी दीपक नेमणगर यांच्यावर सोमवारी दुपारी दगडांचा मारा केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोदाकाठ भागात अवैध दारू विक्रीने उच्छाद मांडला असून, आठवड्यापूर्वीच या भागातील सर्वपक्षीय सरपंच व नागरिकांनी उपोषण केले होते. उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी नेमणगर खेरवाडी येथे आले असताना त्यांच्यावर आवारे यांच्या घराजवळ दगडांचा मारा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री महाजनांच्या प्रतिमेला शेण फासले

$
0
0

राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दारूला महिलांचे नाव दिले तर अधिक खप होईल, असे जाहीर सभेत व्यक्तव्य करून महिलांचा अवमान करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोमवारी (दि. ६) शहरातील महाराणा प्रताप चौकात मंत्री महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेण लावून चपलांचा मारा महिलांनी दिला.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मंत्री महाजन भाषण करताना, साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या दारूच्या ब्रॅन्डला महिलांचे नाव दिल्यास त्याचा जास्त खप होईल, असा उघड सल्ला दिला होता. त्यामुळे महिलांविषयी असे बेताल वक्तव्य करून मंत्री महाजन यांनी महिला वर्गाचा अवमान केला आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण लावून चपला मारण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, प्रियंका पाटील, सुमित्रा चौधरी, राधिका ठाकूर, भारती पवार, वंदना पाटील, सुवर्णा बेहरे, मालती पाडवी, इंदूबाई वाघ उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन गाळ्यांप्रश्नी तोडगा नाहीच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉलच्या जागेत नवीन गाळे तयार करून ते जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना खुले करून देण्याचा बाजार समितीचा विचार आहे. मात्र, अपुरी जागा आणि वाढीव भाडेपट्टी यामुळे हे गाळे घेण्यास व्यापारी तयार नाहीत. सोमवारी (दि. ६) रोजी बाजार समिती संचालक आणि व्यापारी यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिंडोरीरोडवरील भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होणाऱ्या मार्केटमध्ये १२ बाय २५ फूट आकाराचे गाळे उपलब्ध करून देण्यात येणार असून, एका गाळ्याला १५ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार असल्याचे बाजार समितीने ठरविले आणि बाजार समितीतील व्यापाऱ्यांना तशा नोटिसा पाठविल्या. त्यानंतर काही गाळे सील करण्यात आले होते. तेव्हा व्यापाऱ्यांनी दुपारचे लिलाव बंद पाडले होते. त्यानंतरही या विषयावर काहीच तोडगा निघाला नाही. यावर चर्चा करण्यासाठी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय झाला नाही.

या बैठकीत गाळ्याचा आकार कायम ठेवून भाडे १२ हजार रुपये करण्यात येईल, त्यामुळे बाजार समितीचा महसूल वाढेल, असे चुंभळे यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना या गाळ्यांची जागा कमी पडेल, त्यांना जास्त गाळे घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे गाळ्यांचे भाडे ७ हजार रुपये ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. संचालक मंडळाने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कोणताही ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार निधीचा फुटेना भोपळा!

$
0
0

१५ पैकी १२ आमदार उदासीन; चव्हाण, गावित, वाजे खर्चात आघाडीवर

नाशिक : शासनाच्या विविध योजनांमधून मतदारसंघाच्या विकासासाठी जिल्ह्यातील आमदारांनी निधी खर्चात आघाडी घेतली असली तरी हक्काच्या आमदार निधीच्या खर्चात मात्र उदासीनता दाखवली आहे. जिल्ह्यातील पंधरा आमदारांना प्रत्येक दोन कोटी याप्रमाणे ३० कोटी रुपयांचे वितरणही झाले आहे. प्रत्यक्षात ऑक्टोबर अखेरपर्यंत यातील केवळ पाच कोटी ७२ लाखांचाच खर्च झाला आहे. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी सात महिन्यांत आपला शंभर टक्के निधी खर्च केला आहे. सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, इगतपुरीच्या निर्मला गावित यांनी ५० टक्के निधी खर्च केला आहे. अन्य बारा आमदारांनी मात्र निधी खर्चात उदासीनता दाखवली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ, अनिल कदम, डॉ. राहुल आहेर यांच्या खाती अद्यापही भोपळा असल्याचे नियोजन विभगाच्या आकडेवारी दिसून येत आहे.

राज्यातील आमदारांना आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी दरवर्षी दोन कोटींचा निधी दिला जातो. या विकास निधीतून मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, शाळा दुरुस्ती, आरोग्य सुविधांवर खर्च केला जातो. मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीनुसार या आमदार निधीच्या खर्चासाठी आमदारांकडून कामे सुचवल्यानंतर नियोजन विभागाकडून निधी खर्चाबाबत पाठपुरावा केला जातो. यंदाही जिल्ह्यातील पंधरा आमदारांना प्रत्येकी दोन कोटी याप्रमाणे ३० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सात महिन्यांत जिल्ह्यातील पंधरापैकी तीनच आमदारांनी आमदार निधी वापरात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे बागलणाच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी सात महिन्यांतच आपला संपूर्ण निधी खर्ची पाडला आहे. त्या पाठोपाठ इगतपुरीच्या निर्मला गावित यांनी एक कोटी १९ लाख, तर सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी एक कोटी तीन लाखांचा निधी वापरला आहे. दीड वर्षांपासून छगन भुजबळ हे कारागृहात आहेत. त्यामुळे माजंरपाडासाठी कारागृहातूनच प्रयत्न करणाऱ्या भुजबळांचा आमदार निधी खर्चात अडचणी येत असून, पुत्र पंकज भुजबळ यांच्या खात्यावर खर्चाचा भोपळाच आहे.

युतीचे आमदारही पिछाडीवर

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महिला आमदारांनी खर्चात बाजी मारली असताना सत्तारुढ युतीचे आमदार मात्र पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांनी आतापर्यंत केवळ पाच लाखांचाच खर्च केला आहे. मंत्रिपदावर असतानाही त्यांना आपला निधी खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे. निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याही खात्यावर भोपळाच असून, देवळा-चांदवडचे डॉ. राहुल आहेर यांच्यासारख्या अभ्यासू आमदाराचीही तीच गत आहे. शहरातील आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, योगेश घोलप, देवयानी फरांदे यासुद्धा खर्चाबाबतीत पिछाडीवर आहेत. शहरातील चारही आमदारांनी मिळून आठ कोटींपैकी एकच कोटी खर्च केले आहेत.

पाच महिने शिल्लक

आमदारांना हा निधी वर्षभरासाठी दिला जातो. त्यामुळे उर्वरित आमदारांना निधी खर्चासाठी अजूनही पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आमदारांनी सुचवलेली कामे मंजूर होऊन निविदा प्रक्रिया तसेच प्रशासकीय बाबींसाठी जवळपास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे या आमदारांजवळ कमी वेळ शिल्लक आहे. यातील काही आमदारांनी कामे सुचवली असून, ती पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांतच शिल्लक निधी खर्चासाठी आमदारांना घाई करावी लागणार आहे. नाहीतर हा निधी परत जाण्याचाही धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाखादी’ यात्रा शनिवारी नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खादी उत्पादनांचा प्रचार व प्रसारासाठी राजभवन मुंबई ते राजभवन नागपूर अशी २१ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणारी ‘महाखादी’ यात्रा नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

खादी व ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देणेसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचामार्फत ‘महाखादी’ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, यात्रेचा शुभारंभ राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते नऊ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाला. खादी उद्योजकांना बाजारपेठ मिळावी व ग्रामीण भागातील उद्योग वाढून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी ‘महाखादी’ हा ब्रॅण्ड विकसित करण्यात आला आहे. यात्रेत खादी, मध तसेच ग्रामीण भागातील ग्रामोद्योगी कारागिरांनी तयार केलेली विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच चरख्यापासून सूत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण व्यवसायाची ओळख होण्यासाठी यात्रेस भेट देण्यासाठी पाठवावे.

- रमेश सुरुंग, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्लॅक स्पॉटवर वॉच

$
0
0

आरोग्य सभापतींचे सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आरोग्य विभागाने आता नामी उपाय शोधला आहे. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक असतील, त्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने तत्काळ करावी, असे आदेश आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी दिले आहेत. भारत प्रतिभूती मुद्रणालयाकडून (आयएसपी) स्वच्छतेचे आदेश पाळले जात नसतील, तर संबंधितांना नोटिसा देऊन तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मनपाच्या आरोग्य व वैद्यकीय समितीची सभा सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. या सभेत नेहमीप्रमाणे आरोग्याच्या प्रश्नावर सदस्यांनी आक्रमक होत, डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या आजारांच्या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीत सदस्य अंबादास पगारे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची साथ सुरू असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. इंडियन सिक्युरिटी प्रेसला दोन वेळा आरोग्य विभागाने पत्र देऊनही त्यांच्याकडून स्वच्छतेविषयीची दखल घेतली जात नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. गायकवाड यांनी संबंधित व्यवस्थापनाला पत्र देऊनही आत जाण्याची परवानगी दिली जात असल्याचे सांगितले. त्यावर संबंधित व्यवस्थापन दाद देत नसेल, तर थेट कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्याचे आदेश सभापतींनी यावेळी दिले.

डेंग्यू व स्वाइन फ्लूवरून सदस्यांनी डॉक्टरांकडून लूट केली जात असल्याचे सांगत आरोग्य विभाग फवारणी करीत नसल्याचा आरोप केला. खासगी डॉक्टर आणि लॅबकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याचे सदस्य पगारे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी एकाच रुग्णाचे दोन वेगवेगळ्या लॅबकडून आलेला अहवाल सभेत मांडला. लॅब आणि खासगी डॉक्टरांकडून रुग्णांची फसवणूक करून केवळ पैसे उकळण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर सभापती कुलकर्णी यांनी संबंधित लॅबवर कारवाई करण्यात येऊन खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची फसवणूक होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना दिले. दीपालीनगर, मातोश्रीनगरसह परिसरात अनियमित घंटागाडी येत असल्याची तक्रार सदस्या रुपाली निकुळे यांनी केली. यामुळेच अनियमितपणा वाढत असून, नगरसेवकांच्या तक्रारी आल्यास अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे सभापती कुलकर्णी यांनी सांगितले.

सहाही विभागीय स्वच्छता निरीक्षकांकडून ब्लॅक स्पॉटसंदर्भातील आढावा घेण्यात येऊन संबंधित ब्लॅक स्पॉटवर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश सभापतींनी आरोग्य विभागाला यावेळी दिले.

फॉगिंगच्या नावाने बोंबा!

शहरात सर्वत्र डेंग्यू आजाराने थैमान घातले असून, धूर फवारणीचा काहीच उपयोग होत नसल्याचा आरोप किरण गामणे, शांताबाई हिरे, अंबादास पगारे, रंजना बोराडे यांनी केला. आठ-आठ दिवस औषध व धूर फवारणी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. धूर फवारणीची केवळ शोबाजी होत असेल तर महापालिकेचा पैसा कशासाठी वाया घालवायचा असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांनी दररोज आपापल्या कार्यक्षेत्रातील एका प्रभागातील स्वच्छतेची पाहणी करून तसेच, नगरसेवकांना भेटून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे सिझलर मेकिंग वर्कशॉप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. येत्या शनिवारी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी कल्चर क्लबतर्फे सिझलर मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पी. अँड टी. कॉलनी, त्र्यंबक रोड या ठिकाणी होणार आहे.

अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झालेला पदार्थ म्हणजे सिझलर. हॉटेलमध्ये मिळणारे सिझलर आपल्यालाही बनविता आले पाहिजे, असे अनेकांना वाटते. येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता होणाऱ्या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्यांना सिझलरचे वेगवेगळे प्रकार शिकायला मिळणार आहेत. यात प्रामुख्याने चाट सिझलर, इटालियन सिझलर, मेक्सिकन सिझलर असे प्रकार शिकवले जाणार आहे. वंदना साधवानी या सिझलर्सचे विविध प्रकार शिकवणार आहेत. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मेंबरसाठी १०० रुपये, तर जे मेंबर नाहीत त्यांच्यासाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सरकारने दाखविले विकासाचे गाजर'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील भाजप सरकारला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र या तीन वर्षांत सरकारने फक्त घोषणाबाजी आणि आश्वासने देत जनतेला विकासाचे गाजर दाखविले आहे,असा आरोप धुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आला.

सोमवारी (दि. ६) राज्य सरकारने जनतेला दाखविलेल्या विकासाच्या गाजरचा निषेध करण्यात आला. यावेळी सरकारचा निषेध करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुखवटे लावत हातात गाजर धरून आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, प्रदेश सरचिटणीस सत्यजित सिसोदे, कुणाल पवार, महेंद्र शिरसाठ, कमलाकर गर्दे, मयूर ठाकरे, भटू पाटील, विनोद बच्छाव, सागर पाटील, कृष्णा गवळी, बंटी भदाणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलितांना सैन्यात अारक्षण मिळावे

$
0
0

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवलेंची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आम्हाला देशाच्या सीमेवर लढायला पाठवा आम्ही पाकिस्तानला वठणीवर आणल्याशिवाय परतणार नाहीत. अपघातात आणि हृदयविकाराने मरण्यापेक्षा देशाचे संरक्षण करताना आलेले मरण चांगले आहे. यासाठी दलितांना सैन्यात अारक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी पुन्हा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. सोमवारी (दि. ६) ते धुळे जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजना, एडीप योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी सकाळी जिल्ह्यातील दिव्यांगाना व्हीलचेअर, बैसाखी, ऐकू येण्याचे मशिन, टेट्रापॉड, ट्राइपॉड, वॉकिंग स्टिक, चष्मे, बत्तिशी आदी कृत्रिम साहित्य मोफत वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिपचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, खासदार डॉ. हीना गावित, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते.

रिपाईचा ८ नोव्हेंबरला 'व्हाइट-मनी डे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी विमुद्रीकरण जाहीर केले होते. त्यानंतर जनतेला थोडाफार त्रास सहन करावा लागला. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितल्यानुसार दर दहा वर्षांनी विमुद्रीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विमुद्रीकरणाला आमचा पाठिंबा असून, काँग्रेसकडून काळा दिवसाला आमचा विरोध आहे. रिपाईतर्फे यादिवशी 'व्हाइट-मनी डे' साजरा केला जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. माझे हार्दिक पटेलला खुले आवाहन आहे की, पाटीदार समाजाला न्याय आम्ही मिळवून देऊ. तेथे मी मध्यथी करण्यास तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी निष्फळ हवा पसरविण्याचे काम चालविले असून, येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आम्हाला चिंता नाही, असेही मंत्री आठवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमंग अॅपचा ‘पीएफ’धारकांना सहारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

केंद्र शासनाच्या भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने ‘पीएफ’धारकांसाठी घरबसल्या माहिती मिळण्याची व्यवस्था केली आहे. ‘पीएफ’धारकांनी उमंग अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यावर आपल्या खात्यातील माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे.

‘पीएफ’धारकांसाठी सुविधा उपलब्ध करतानाच पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला पीएफ कार्यालयात अथवा सर्वसामान्य सुविधा केंद्रात जमा करण्याचे आवाहन ‘पीएफ’चे क्षेत्रीय आयुक्त अर्शख खान यांनी केले आहे. पीएफ भरणाऱ्यांना अनेकदा घरगुती कामासाठी पैशाची गरज भासत असते. परंतु, स्वतःच्या मालकीचे असलेले पैसै काढण्यासाठी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात फेऱ्या मारण्याची वेळ कामगारांवर येत असते. यावर उपाय म्हणून ‘पीएफ’ने उमंग अॅपची अभिनव योजना आणली आहे. ‘पीएफ’धारकांनी त्यांच्या मोबाइलमध्ये उमंग अॅप डाऊनलोड केल्यास त्यांच्या खात्यावरील माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. उमंग अॅप डाऊनलोड करताना ‘पीएफ’धारकांनी त्यांची वैयक्तिक माहिती, तसेच आधार कार्ड लिंक करण्याची गरज असल्याचे खान यांनी पत्रकारांना सांगितले.

--

तालुका स्तरांवर सेवा केंद्रे

दरम्यान, पेन्शनधारकांना हयातीचा दाखल देण्यासाठी नाशिक विभागात व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यांमध्येही ‘पीएफ’च्या कामासाठी लागणारी सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे तालुका स्तरावरही पेन्शनधारकांनी त्यांचा हयातीचा दाखला जमा करावा, असे आवाहन खान यांनी केले आहे. सर्वसामान्य सुविधा केंद्रांची उभारणी नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर येथे करण्यात आली आहे. त्यांचा लाभ ‘पीएफ’धारकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

--

पेन्शनधारकांना अनेक बाबींसाठी पीएफ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. याकरिता नाशिक विभागात अनेक ठिकाणी सर्वसामान्य सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उमंग अॅप डाऊनलोड केल्यास तात्काळ पीएफची माहिती पेन्शनधारकांना जागेवरच मिळणार आहे. याकरिता केवायसी करणे गरजेचे आहे.

-अर्शद खान, क्षेत्रीय आयुक्त, भविष्यनिर्वाह निधी, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images