Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकरोड जेलमध्ये कैद्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या मोहनगिरी उर्फ गौतम काशिनाथ जोशी (७१, मूळ रा. सुरेंद्रनगर, उत्तरप्रदेश) या वृद्ध कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. जेलच्या स्वच्छतागृहाच्या बॅरेकमध्ये त्याने गळफास घेतला.

आत्महत्या केलेला गौतम जोशी हा कैदी बारा वर्षांपासून एका खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. लवकरच त्याची सुटका होणार होती. मराठवाड्यातील किनवट येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. जेलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील झाडांची तो विशेष काळजी घेत असे. ‘बाबा’ या नावाने तो जेलच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिचित होता. गेल्या काही वर्षांत त्याच्या वर्तनात सुधारणा झाली होती. तरीही त्याने आत्महत्या केल्याने जेल प्रशासनाने आश्चर्य व्यक्त केले आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्या करण्याची शक्यता जेल प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. यापुर्वी २ सप्टेंबर रोजी डॅनी उर्फ हरपालसिंग कृपालसिंग चौधरी (३१, मूळ रा. धोरणगढा, पोस्ट वीर, ता. रुबास, जि. भरतपूर, राजस्थान) या कैद्यानेही आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कादवा प्रतिष्ठानतर्फे २४ जणांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कादवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कादवा गौरव आणि साहित्य पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या २४ मान्यवरांना शाल, स्मृतीचिन्ह व रोख रुपये देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत महामिने, महापौर रंजना भानसी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वल झाले. कादवा दिवाळी अंकाचे संपादक विजयकुमार मीठे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी साहित्य, संस्कृती, चित्र, शिल्प, नृत्य नाट्य, पत्रकारिता, उद्योग या क्षत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कारार्थीच्या वतीने कवी किशोर पाठक व ऐश्वर्य पाटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला सन्मान

- गावाकडचे आयडॉल सन्मान : बापूसाहेब गायकवाड, विलास देशमुख, प्रीतम देशमुख
- सहयोग सत्कार : विजय काश्मिरे, नरेद्र शालिग्राम, कृष्णकुमार सोनवणे
- वाङमय पुरस्कार : प्रतिभा जाधव, एकनाथ आव्हाड, संदीप देशपांडे, रावसाहेब जाधव, ऐश्वर्य पाटेकर, दत्तात्रय झनकर, सुशिलकुमार शिंदे, किरण सोनार, किशोर पाठक
- कादवा गौरव पुरस्कार : वैभव वडजे, राजेंद्र गांगुर्डे, डी. के. चौधरी, राजेश सावंत, यशवंत पवार, नानासाहेब बोरस्ते, यू. पी. मोरे, अशोक गायकवाड, श्रीराम शेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांसोबत संयुक्त पथक

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटवल्यानंतर महापालिकेने या भागात पुन्हा भंगार बाजार सुरू होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अंबड-लिंक रोडवर भंगार बसणार नाही यासाठी महापालिका आणि पोलिसांचे संयुक्त पथक तयार केले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे.

अंबड लिंक रोडवर पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर थेट कारवाई केली जाणार आहे. तसेच भंगार बाजार व्यावसायिकांना आरक्षित झोनप्रमाणे नियमानुसार परवानग्या दिल्या जातील, असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत भंगार बाजारावर कारवाई केली जात आहे. जानेवारीमध्ये या बाजाराचे अतिक्रमण काढण्यात आले. साडेसातशे दुकाने हटवल्यानंतर पुन्हा सात महिन्यांत तेथे बाजार उभा राहिला. त्यामुळे महापालिकेने दुसऱ्यांदा अतिक्रमण मोहिमे अंतर्गत भंगार बाजारावर कारवाई सुरू केली आहे. रहिवाशी क्षेत्रात भंगार बाजार सुरू करता येत नाही. तरीही दुसऱ्यांना भंगार बाजार उभा राहिल्याने महापालिकेने त्यावर गुरूवारपासून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा हा बाजार येथे सुरू होऊ नये यासाठी महापालिकेडूनच काळजी घेतली जाणार आहे.

अंबड-लिंक रोडवर पुन्हा भंगार बाजार सुरू होऊ नये याच्या पाहणीसाठी पोलिस आणि महापालिकेचे संयुक्त पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कृष्णा यांनी दिली आहे. दिवाळीनंतर पोलिस आयुक्तांशी चर्चा करून या पथकाची निर्मिती केली जाणार असून हे पथक या भागात नियमीत गस्त घालणार आहे. तसेच या ठिकाणी कोणी पुन्हा भंगार व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर थेट कारवाई केली जाईल. प्रसंगी थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे भंगार दुकाने सुरू करणे अवघड होणार आहे.

नियमानुसार परवानग्या

भंगार बाजार व्यावसायिकांना यापूर्वी चुंचाळे शिवारात भंगार व्यवसायासाठी जागा देऊ केली होती. परंतु त्यांनी जागा घेण्यास नकार दिला. आता त्यांनी झोनप्रमाणे अर्ज केल्यास परवागी देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडावी लागेल. मात्र, पुन्हा त्याच जागेवर व्यवसाय सुरू करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त कृष्णा यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुलींनो तुमच्या पेहरावाकडे द्या लक्ष’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

महाराष्ट्राचे मन जिवंत असले पाहिजे. कारण महाराष्ट्राचा इतिहासच नऊवारीने घडवला आहे. म्हणून आपण आपल्या पेहरावाकडे लक्ष दिले पाहीजे. समोरच्याने आपल्याकडे बघितल्यानंतर त्याला त्याची माय आठवली पाहीजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी केले.

येथील सटूआई माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकारातून आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.

आपण जीवन कंठत असताना काट्यांची दोस्ती करायला हवी, त्यामुळे येणाऱ्या संकटाची उंची निश्‍चित कमी होते. प्रत्येकाने आयुष्याशी जगायला शिकले पाहीजे. प्रेम असं करा की त्यातून त्याग आपल्याला शिकता येईल. प्रत्येक आईने आपल्या मुलांमध्ये संस्कार आणि नितीमुल्य रुजवावे, मुलांना देशप्रेम शिकवावे. त्यामुळे देश व गावातील मातीशी आपल्या मुलांचा ऋणानुबंध राहील.

राष्ट्रमाता जिजाऊ, जनाबाई, मुक्ताबाई, सावित्रीबाई फुले यांनी नऊवारीतूनच आपल्याला शिकवण दिलेली असल्याची आठवण त्यांनी करुन दिली. स्त्रियांना स्वत:बरोबरच दुसऱ्यांचेही जीवन उभे करता आले पाहीजे. न सांगता कळते ती मुलगी असते, म्हणून कुटुंबाला आधार देण्याची तिची भूमिका महत्त्वाची. देश व कुटुंब घडवितांनादेखील स्त्रीची भूमिका महत्वाची आहे. सद्यस्थितीत देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या टाळण्यासाठी स्त्रीनेच कुटुंबाचा आधार म्हणून आता उभे राहिले पाहीजे असे त्यांनी नमूद केले. आपली परंपरा वाटून खाण्याची आहे, म्हणून वाटून खा. हिसकावून खाऊ नका असा सल्ला देतांनाच जीवनामध्ये दुसऱ्याला माफ करायला शिका असे आवाहन त्यांनी केले. गायत्री रामहरी कुंदे हीने सिंधुताईंचा जीवन परिचय करुन दिला. मनोज वाजे यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी सिंधुताईंचा आमदार राजाभाऊ वाजे, पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायणशेठ वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या मतदार याद्यांमध्ये गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नोव्हेंबरमध्ये त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून, आपली नावे तपासण्यासाठी नागरिकांची नगरपरिषदेत गर्दी होत आहे. मात्र याद्यांमधील घोळ, नावांची फेरफार पाहून मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या मतदार याद्यांवर १७ ऑक्टोबर पर्यंत नागरिकांना हरकती सूचना घेण्याची संधी आहे. ३१ ऑक्टोबर रोजी अंत‌िम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. नगर परिषदेत सतरा सदस्य आहेत. या १७ वॉर्डांचे ८ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभाग रचना तयार करतांना जनगणना २०११ च्या लोकसंख्येचा आधार घेण्यात आला आणि त्या प्रमाणात नकाशावर प्रभाग आखण्यात आले आहेत. मतदार याद्या जाहीर झाल्या असून, त्यामध्ये काही प्रमाणात असमतोल दिसून येत आहे. प्रभाग रचना लोकसंख्येच्या आधारावर झालेली आहे. तथापि प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वाधिक मतदार संख्या आहे. तसेच प्रभाग क्रमांक आठमध्ये तीन सदस्य असतांना मतदार संख्या मात्र तीसऱ्या क्रमांकाची आहे.



अशी आहे मतदार सख्या

एकूण मतदार संख्या १०६४१

महिला मतदार ५४२३

पुरुष मतदार ५१९१

प्रभाग एक क्रमांक मतदार संख्या १३९७

प्रभाग क्रमांक २ मतदार संख्या ११५९

प्रभाग क्रमांक ३ मतदार संख्या १०२३

प्रभाग क्रमांक ४ मतदार संख्या १०३२

प्रभाग क्रमांक ५ मतदार संख्या १६९८

प्रभाग क्रमांक ६ मतदार संख्या १२२३

प्रभाग क्रमांक ७ मतदार संख्या १५६०

प्रभाग क्रमांक ८ मतदार संख्या १५२२

याद्यांमध्ये घोळ तसाच

नागरिक मतदार याद्या तपासून पाहात आहेत. प्रारूप मतदार यादीची किंमत प्रत्येकी १५० रुपये आहे. पहिल्याच दिवशी या मतदार याद्यांसाठी ५० नागरिकांनी मागणी अर्ज दाखल केले आहेत. अनेकांना यात आपले नावे सापडत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मयत आणि दुबार नावे देखील या याद्यांमध्ये आहेत. या याद्यांमध्ये लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींचीही नावे असल्याने महिला मतदार संख्या अधिक असल्याची चर्चा आहे.

‘त्यांची’ नावे याद्यांमध्येच

नोकरी निम‌ित्त आलेले त्र्यंबक शहरात आले आणि काही कालावधीनंतर शहर सोडून गेले अशा नोकरदारांचीही नावे अद्याप कायम आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काही उमेदवारांना ती सोईची असली तरी इतरांची मात्र डोकेदुखी ठरवणारी आहेत. येथील सामाज‌िक कार्यकर्ते समता परिषद पदाधिकारी दिलीप पवार यांनी येथे रहिवाशी नसलेल्या बाहेरील मतदारांची शोध मोहीम हाती घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही जोरदार कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड आणि सातपूर या एमआयडीसींना जोडणाऱ्या महत्त्वाच्या अंबड लिंकरोडवर ३० वर्षांहून वसलेल्या भंगार बाजारावर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार कारवाई करण्यात आली. खाडी भागातील मोठमोठ्या भंगाराच्या दुकानातील साहित्य हटविण्याचेच काम दिवसभर सुरू होते.
महापालिकेच्या कारवाईत पावसाने काही काळ व्यत्यय आणला; मात्र पाऊस थांबल्यानंतर पुन्हा मोहीम जामाने हाती घेण्यात आली. महापालिका व पोलिस यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे सहा पथकांच्या सहाय्याने अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. पहाटे साडेसात वाजेताच मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या भागात रबर, प्लास्टिक, लोखंड, ट्रम यांचीच सर्वाधिक भंगार दुकाने आहेत. रस्तेच नसल्याने भंगार वाहून नेणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागली.

१३० ट्रक साहित्य जप्त
महापालिकेच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या अंबड लिंक रोडवरील अनधिकृत बाजारावरील कारवाईत १३० ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आले. यात लोखंड, पत्रे, लाकूड यांचा समावेश आहे. तर डेब्रिज आणि कचऱ्याचे ४१ ट्रक जप्त करण्यात आले. जप्त माल महापालिकेच्या खतप्रकल्पात जमा करण्यात आला. कारवाईच्या पहिल्या दिवशी जवळपास १६९ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले होते. ते साहित्य सातपूर क्लब हाउसमध्ये ठेवण्यात आले असून त्याचा लिलाव केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाई मानसिक तणावाखाली

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com
Tweet : jitendratarte@MT
नाशिक : चुकीच्या जीवनशैलीच्या परिणामी भारतामध्ये शेकडा ६ ते ८ टक्के लोक कुठल्या ना कुठल्या मानसिक व्याधीला बळी पडताहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक प्रमाण हे युवकांचे आहे. योग्य वेळी पुरेसे उपचार न मिळाल्याने युवकांच्या या मानसिक आजारांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असल्याचे निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) एका अभ्यासात पुढे आले आहेत.

उपचारांअभावी मानसिक व्याधींमध्ये भरडल्या जाणाऱ्या घटकांमध्ये ग्रामीण युवकांचे प्रमाण जास्त आहे. पारदर्शी संवादाचा अभाव, न्यूनगंड, आत्मविश्वासाची कमतरता किंवा मार्गदर्शकाची अनुपलब्धता यासारख्या कारणांमुळे या युवकांची जास्त घुसमट होते आहे.

जगभरात तब्बल १२ टक्के मृत्यू हे मानसिक आजारांमुळे होत असल्याचेही वास्तव या अहवालात आहे. तरुणांमधील नैराश्या मागे बेरोजगारी, प्रेमभंग, एकतर्फी प्रेम,परीक्षेतील अपयश, पालकांच्या अपेक्षापूर्तीचे ओझे, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जबाबदारीचे ओझे आणि व्यसन यासारखी प्राधान्याची कारणे आहेत. मानसिक आजारांची वाढती व्याप्ती गांभीर्याने विचारात घेत ‘डब्ल्यूएचओ’ने यंदा आरोग्य दिनापासून ‘लेट्स टॉक ऑन डिप्रेशन’ असे घोषवाक्यच जाहीर केले आहे.

महिलांचे वाढते प्रमाण

नैराश्याला बळी पडणाऱ्या एकूण घटकांमध्ये युवकांचे प्रमाण जास्त आहे. या युवकांमध्येही महिलांचे प्रमाण जास्त आहे. नैराश्याचा सामना १५ टक्के तरुण करताहेत. यात ४० टक्के पुरूष तर ६० टक्के महिलांचा समावेश आहे.

का येते डिप्रेशन?

भोवतालच्या नकारात्मक परिस्थितीचा परिणाम शरीरावर अन् मेंदूतील रसायनांवर होतो. या रसायनांचे असंतुलन होऊन नैराश्य उद्भवते. ही रसायने न्युरोट्रान्समिटरचे काम करतात. सिरोटोमीन आणि नॉरअॅपिनेफ्रीन ही दोन प्रमुख रसायने भावना, शारीरिक क्रिया, नैसर्गिक क्रिया, वागणुकीवर नियंत्रण ठेवतात. त्याचे असंतुलन झाल्यास नैराश्य येते. व्यसनाधिनता,सामाजिक संबंधांचा अभाव, बेरोजगारी, कामाचा अतिताण, निद्रानाश, प्रदीर्घ आजारपण यासारख्या कारणांनी नैराश्याची जोखीम वाढते. नवी पिढी टेक्नोसॅव्ही होत असली तरी मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होणे घातक ठरत आहे. सोशल मीडियातल्या व्हर्च्युअल फ्रेंडशिपमध्ये भाव-भावनांचे आदानप्रदान होत नाही. त्यामुळे हल्लीची तरुण पिढी अधिक एकलकोंडी होत असल्याचेही निष्कर्ष आहेत.

हरवतो आहे संवाद

एकत्र कुटूंब पद्धतीवर झालेला आघात संवाद संपवत असल्याचे समाजशास्त्रज्ञ सांगतात. त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात आई आणि वडिलांच्या नोकरीमुळे मूल अनेकदा एकटे पडते. परिणामी नात्यांमधला घटता संवाद मानसिक आजारांना जन्म देतो. योग्य वेळी लक्ष दिले न गेल्यास दहा वर्षात हा मानसिक आजार प्रमुख तीन आजारांपैकी बनू शकतो, असाही इशारा ‘डब्ल्यूएचओ’ देते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुद्देमाल मालकांकडे सुपूर्द!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुन्ह्याचा यशस्वी तपास करून चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेला तब्बल ५६ लाख ६८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ७८ पीडितांना सभारंभपूर्वक परत करण्यात आला. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. चोरी झाली की चोरट्याचा माग केव्हा लागेल हे सर्वसामान्यांना उगमत नाही. दुसरीकडे तपास लागलेला मुद्देमाल केव्हा हातात पडेल, याचीही शाश्वती नसते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून तक्रारदारास समारंभपूर्वक मुद्देमाल वितरीत केला जातो. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, गुन्ह्याचा तपास करण्यात नाशिक शहरासह ग्रामीण पोलिस दल अग्रेसर आहे. या वर्षात चेन स्नॅचिंगच्या ८३ घटना घडल्या आहेत. यातील ७० गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. चोरी, अथवा इतर मालमत्तेचे गुन्हे घडणे ही तक्रारदारासाठी त्रासदायक बाब ठरते. परंतु, अनेकदा कोणताही पुरावा समोर येत नाही. पुरावाच नसल्याने तपास कामावर परिणाम होतो, हे नागरिकांनी समजून घ्यावे. यासाठी नागरिकांचा पोलिसांशी संवाद असणे आवश्यक आहे. हा प्रयत्न पोलिस सतत करीत असून, नागरिकांनी त्यास प्रतिसाद द्यावा. गुन्हे रोखणे ही सामुदायिक जबाबदारी असल्याचे पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले. आमदार बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे यांनी उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, सरकारी वकील पंकज चंद्रकोर, पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त सचिन गोरे, डॉ. राजू भुजबळ, अशोक नखाते, अजय देवरे, मोहन ठाकूर यांसह सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

पोलिस मित्रांचा सत्कार

आठ लोकांचे प्राण वाचविणारे जीवरक्षक गोविंद तुपे, गणेश शिंदे तसेच प्रवाशाची विसरलेली बॅग आणि किंमती ऐवज परत करणारा रिक्षा चालक म्हणून छोटू ओंकार पाटील आदींचा यावेळी पोलीस मित्र म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करणारे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

गांवकरी ठेवीदारांना दिलासा

गांवकरी प्रकाशन संस्थेविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात कोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा आदेश दिला होता. त्यानुसार ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने पैसे परत करण्याची सुरूवात झाली असून, आजच्या कार्यक्रमात ७८ ठेवीदारांना १५ लाख तीन हजार हजार ३३३ रूपयांचे डीडी देण्यात आले. अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे परत मिळाल्याची सुरूवात झाल्याने गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वकिलास तत्काळ जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीस लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. राजेंद्र खंदारे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला. याच प्रकरणातील आणखी एक संशयित तसेच मनसेचे शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकाच गुन्ह्यातील दोन संशयितांना वेगवेगळा न्याय मिळाल्याने हा विषय सर्वसामान्यांच्या औत्सुक्याचा ठरला आहे. दरम्यान, या सुनावणीवेळी वकिलांनी कोर्टात गर्दी केली होती.

संतोष शांताराम तुपसाखरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करताच मनसेचे शहर सरचिटणीस तसेच मानाचा राजा गणपती मंडळाचा संस्थापक अध्यक्ष असलेल्या खंडाळेस पोलिसांनी अटक केली. गुरूवारी खंडाळेला कोर्टाने पाच दिवसांची कोठडी सुनावली. याच गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या अॅड. खंदारे यांनाही पोलिसांनी सायंकाळी अटक केली. त्यांना शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान असंख्य वकिलांनी गर्दी केली. सरकारी पक्षाने तपासासाठी संशयित खंदारे यांची सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत खंदारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर लागलीच बचाव पक्षाच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. संध्याकाळी उशिरा खंदारे यांना जामीनही मिळाला. पोलिस वरिष्ठ पातळीवर न्याय मागणार आहेत. दरम्यान, खंडाळेला पाच दिवसाची कोठडी तर खंदारे यांना लागलीच जामीन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीसाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शासनाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरसकट कर्जमाफी करून पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत. तसेच महागाईवरही नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शनिवारी शिवसेनेतर्फे सटाणा शहरात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शासनाने कर्जमाफीची घोषणा करून अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊले उचचली नाहीत. त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले. शिवसेनेतर्फे शहरात कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनही छेडण्यात आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

शिवसेना सटाणा शहराच्या वतीने कर्जमाफीबाबत राज्य शासनाच्या ढिसाळ नियोजनाच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकरी संघाच्या आवारातून राज्य महामार्गावरून ताहाराबाद चौफुली येथे मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात राज्य शासनाच्या कारभारावर टीका करणारे बोर्ड, बॅनर, झळकत होते.

बैलगाडी मोर्चा तहसील कार्यालयावर न नेता राज्य महामार्गावरील चौफुलीवर थांबवून रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. शहरातील आठवडे बाजार असल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी, बाजारहाट करणारे व्यावसायिक शहरात दाखल झाले होते. मात्र या आंदोलनामुळे राज्य महामार्गावरील अवजड वाहतूक खोळंबळी. आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या प्रसंगी समीर सावंत, लक्ष्मीनारायण भन्साळी, दिनेश भांगडीया यांची भाषणे झाली.

तहसील कार्यालयावर मोर्चान नेता पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांना आंदोलनस्थळी बोलावून निवेदन देण्यात आले. मोर्चात जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, शरद शेवाळे, मुन्ना सोनवणे, अनिल सोनवणे, लक्ष्मीनारायण भन्साळी आदींसह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारवर केली टीका

जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी राज्य सरकार टीका केली. कर्जमाफीची घोषणा करूनही कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे राज्यात २६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरसकट कर्जमाफी करून पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत, अशी मागणी केली.

महाराष्ट्र काळोखात!

ऐन सणासुदीच्या दिवसात शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्र लोडशेडिंगच्या काळोखात बुडाला आहे. महाराष्ट्रात विकासासोबतच प्रकाश ही थांबला असल्याची टीका शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी केली. राज्य शासनाने तातडीने दखल न घेतल्यास यानंतर शिवसेना आपल्या स्टाइलने आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी शिवेसना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सुरक्षेसाठी ‘स्वाभिमानी’चा भोंगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील महिला सुरक्षेसाठी आता स्वाभिमानी पक्षाने पुढाकार घेत महिलांसाठी ‘व्हॉइस ऑफ नीलम’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत जर पीडित महिलेला न्याय मिळाला नाही तर शहरात भोंगा वाजवला जाणार आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ हे प्रतीकात्मक आंदोलन असेल, असे स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांनी सांगितले.

स्वाभिमानी पक्षातर्फे महिला सुरक्षिततेचा मुद्दा हाती घेत ‘व्हॉइस ऑफ नीलम’ उपक्रम सुरू केला जात आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. कोतवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन या उपक्रमाची घोषणा केली. महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतात. मात्र, या महिला तक्रार देण्यास धजावत नाहीत किंवा कधी कधी त्यांना पोलिस यंत्रणेकडून सहकार्य मिळत नाही. याकरिता आता स्वाभिमानीने छेडछाडमुक्त नाशिक शहर या संकल्पनेतून महिला, तरुणींच्या मागे पक्षाची ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख भागात आम्ही भोंगा लावणार आहोत. अशा प्रकारे छेडछाड झाली, की या महिलांना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याबाबत पक्षाचे कार्येकर्ते सर्वतोपरी मदत करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार निवारणासाठी सहा कक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायकोर्टाने फटाके विक्रेते व ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने सहा विभागांत नागरिकांसाठी तक्रार नोंदणी व निवारण कक्ष स्थापन केले आहेत. ध्वनिप्रदूषण व रस्त्यावरील फटाके विक्रेत्यांसंदर्भात नागरिकांची काही तक्रार असल्यास त्यांनी थेट या तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करण्याचे आवाहन विविध कर विभागांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी सहा विभागांत सहा क्रमांक पालिकेने जाहीर केले असून, पालिकेच्या नाशिक अॅपवरही थेट तक्रार करता येणार आहे. आलेल्या तक्रारी पोलिस व विभागीय अधिकाऱ्यांकडे थेट पाठविण्यात येणार आहेत.

निवासी भागात ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेसंदर्भात हायकोर्टाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे, तसेच फटाके विक्रेत्यांना निवासी भागात फटाके स्टॉल्ससंदर्भात कठोर आदेश दिले आहेत. सोबतच दिवाळीच्या काळात काही विक्रेत्यांकडून थेट रस्त्यावरच मंडप टाकून साहित्याची विक्री केली जात असल्याने हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तयार केलेल्या मंडप धोरणाची पायमल्ली होती. उत्सवकाळात ध्वनिप्रदूषण व रस्त्यावरील तात्पुरत्या स्वरूपात मंडप व तत्सम रचना उभारण्यासंदर्भात याचिका क्र. १७३, २०१० अन्वये पालिकेला तक्रार नोंदणी व निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पालिकेडून केली जात असून, पर्यावरण व विविध कर विभागांच्या वतीने शहरातील पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर व नाशिकरोड अशा सहा ठिकाणी तक्रार नोंदणी व निवारण कक्ष उभारले आहे. या सहा विभागांच्या विभागीय कार्यालयात हा तक्रार निवारण कक्ष चोवीस तास कार्यरत असणार आहे.

या तक्रार निवारण कक्षाकडे आलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी संबंधित पोलिस स्टेशनकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत. वाहतुकीशी संबंधित तक्रारी वाहतूक पोलिसांकडे पाठविल्या जातील, तर मंडप व स्टॉल्ससंदर्भातील तक्रारी विभागीय कार्यालयाकडे कार्यवाहीसाठी पाठविल्या जाणार आहेत. सोबतच नाशिक अॅपवरही नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत. पालिकेच्या संकेतस्थळासह टोल फ्री क्र. १८००२३३१९८२ या क्रमांकावरही तक्रारी नोंदवता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या तक्रार नोंदणी व निवारण कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व विविध कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभागनिहाय तक्रारींसाठी दूरध्वनी क्रमांक

नाशिक पूर्व २५०४२३३, नाशिक पश्चिम २५७०४९३, पंचवटी २५१३४९०, सिडको २३९२०१०, सातपूर २३५०३६७, नाशिकरोड २४६०२३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक रुपयाची नोट आली; पण गेली कुठे?

$
0
0

कोट्यवधींच्या संख्येने छपाई होऊनही दर्शनदुर्लभ

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

एक रुपयाच्या नोटांची छपाई नोटबंदी काळात पुन्हा सुरू झाली. त्यानंतर गेल्या वर्षभरात पुन्हा छपाई करण्यात आली. आताही ती सुरू आहे. मात्र, सामान्य नागरिकांना या नोटांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. एक रुपयाच्या कोट्यवधींच्या संख्येने छापलेल्या नोटा जातात कुठे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये एक रुपयाच्या नोटांची छपाई पुन्हा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे एक रुपयांच्या कोट्यवधी नोटा छापूनही सामान्यांना त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व हजाराच्या नोटांची छपाई होते. सरकारच्या धोरणामुळे एक रुपयाच्या नोटांची छपाई पंचवीस वर्षापूर्वी बंद होऊन नाण्यांचे उत्पादन सुरू झाले. सध्या एक, पाच, दहा रुपयांची नाणी बाजारात आहेत. कधी कधी एक रुपयाच्या नाण्याची तीव्र टंचाई जाणवते. नागरिकांनाच त्याचा फटका बसतो. ही अडचण लक्षात घेऊन एक रुपयाची नोट छपाई सुरू झाली आहे.

कामगारांना वितरण

प्रेस मजदूर संघाच्या प्रयत्नामुळे कामगारांना एक रुपयाच्या बंडलचे वितरण रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने केल्याची माहिती सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली. मात्र, दहा बंडलची मागणी करूनही एकच बंडल दिल्याने कामगारांनी व्यवस्थापन व बँकेप्रती नाराजी व्यक्त केली.

छपाईसाठी लक्ष्य

नाशिकरोड प्रेसमध्ये २६ वर्षांपूर्वी एक रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी नोटबंदीच्या काळात एक रुपयाच्या सुमारे वीस दशलक्ष नोटा चलनात पाठविण्यात आल्या होत्या. आता रिझर्व्ह बॅँकेने व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन एक रुपयाच्या नोटा पुन्हा छापण्याचे इंन्डेंट (आर्डर) प्रेसला दिले आहे. गेल्या मार्चपर्यंत एक रुपयाच्या तीनशे दशलक्ष नोटा छापण्यात आल्या होत्या. यंदा वेगळे लक्ष्य देण्यात आले आहे.

नागरिक ठेवतात जपून

स्टेट बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, या नोटा आम्ही व्यावसायिक व नागरिकांना वितरीत करतो. परंतु, नोटा मिळाल्यानंतर बहुतांश लोक त्या चलनात आणतच नाहीत. त्यामुळे त्यांचे दर्शन होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फेरीवाला’ने चलबिचल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डिसूझा कॉलनीतील जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन मैदानास लागून असलेल्या पाटचारीत व ओपन स्पेसमध्ये मुक्त फेरीवाला क्षेत्राला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. या मुक्त फेरीवाला क्षेत्रामुळे स्थानिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने हे क्षेत्र तातडीने रद्द करण्याची मागणी महापौरांसह आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

महापालिकेकडून सध्या मुक्त फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्राची निर्मिती केली जात आहे. मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांचे स्थलांतर लगतच्या मोकळ्या जागेवर केेले जात आहे. गंगापूररोडवरील डिसूझा कॉलनीत प्लॉट नंबर ४५३ मधील प्लॉट नंबर ११० मध्ये आणि त्या लगत असलेल्या पाटचारीमध्ये मुक्त फेरीवाला क्षेत्र करण्याचा निर्णय महासभेच्या ठरावानुसार केला आहे. परंतु, या जागेवर मुक्त फेरीवाला क्षेत्र करण्यासाठी महापालिकेने कोणतीही समंती घेतलेली नाही. टपरीधारक जागेची पाहणी करण्यासाठी आले असता स्थानिकांना ही बाब लक्षात आली. या भागात मुलांना मैदानाची आवश्यकता असताना व पाटचारी रस्ता हा केवळ सहा मीटर रुंदीचा असतानाही मुक्त फेरीवाला क्षेत्र करणे धोकादायक आहे. या क्षेत्रामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होऊन स्थानिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या क्षेत्रामुळे स्थानिकांना उपद्रव होणार असल्याने हा ठराव बेकायदेशीर आहे. मुक्त फेरीवाला क्षेत्रासाठी गंगापूररोडवरील सर्व्हे नंबर २३९ मध्ये जागा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटचारीच्या जागेवर मुक्त फेरीवाला क्षेत्र करू नये, अशी मागणी स्थानिकांनी महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्याकडे केली आहे.

--

निर्णय दबावाखाली...

गंगापूररोड ते जिल्हा टेबल टेनिस मैदानादरम्यानची जागा स्थानिक नागरिक क्रीडांगण म्हणून वापरत असताना स्थानिकांना विश्वासात न घेताच महापालिकेने घेतलेल्या निर्णयावर स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला असून, राजकीय दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे.

--

मार्केटची जागा योग्य

प्रसाद सर्कलच्या पुढे गंगापूररोडवर असलेल्या डाव्या बाजूने बऱ्याच टपऱ्या होत्या. त्या टपऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दोन वर्षांपूर्वी काढून टाकल्या. त्यावेळी टपरीधारकांनी महापालिकेकडे जागेची मागणी केली असता महापालिकेने त्यांच्याकडून डीपी प्लॅनमधील आरक्षण नंबर २३९ जे म्युनिसिपल मार्केटसाठी आहे, ती जागा टपरीधारकांना देऊ केली होती. सदरची जागा मुक्त फेरीवाला क्षेत्रासाठीही योग्य आहे. याच ठिकाणी अन्य मार्केटचेही आरक्षण असल्याने ही जागा मुक्त फेरीवाला क्षेत्रासाठी वापरली जाणे अपेक्षित आहे. परंतु, असे न करता केवळ डिसूझा कॉलनीतील नागरिकांना अडचणी उत्पन्न करण्यासाठी विषयांकित मिळकतीच्या ओपन स्पेसला लागून असलेल्या पाटचारीच्या जागेमध्ये फेरीवाला क्षेत्र करण्याचा जो घाट घातला जात आहे, तो सर्वस्वी चुकीचा व बेकायदेशीर असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेला झळाळी

$
0
0

दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; मरगळ होणार दूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुखमय जीवनाची मंगलकामना करणाऱ्या दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नाशिककर सरसावले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी कामगारवर्ग घराबाहेर पडल्याने मरगळलेल्या बाजारपेठेवर शनिवारी चैतन्याचा साज चढला. नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या असून, व्यापारीवर्गातही समाधानाचे भाव आहेत.

दिवाळी म्हणजे मांगल्याचा उत्सव. नवीन कपडे परिधान करण्याचा, गोडधोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारण्याचा हा सण. बच्चेमंडळींसाठी दिवाळी म्हणजे नुसती धम्माल. अशा या दिवाळीला मंगळवारपासून सुरुवात होत असून, बाजारपेठांनाही झळाळी चढली आहे. गुरुवारी (दि.१९) लक्ष्मीपूजन असून, दिवाळी साजरी करण्यासाठीची लगबग बाजारपेठेत पहावयास मिळू लागली आहे. कामगारवर्गाचा पगार झाला असून, अनेकांचा बोनसही जमा झाला आहे. बेमोसमी पावसामुळे बाजारपेठांची स्थ‌िती थबकल्यासारखी झाली होती. गेल्या आठवडाभरापासून आलेली ही मरगळ झटकून नाशिककर खरेदीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडले. शनिवारची सुटी खरेदीसाठी राखून ठेवणाऱ्या नागरिकांनी पावसाच्या धाकाने दुपारीच घराबाहेर पडण्यास पसंती दिली. पणत्यांपासून आकाशकंदिलांपर्यंत आणि रांगोळीपासून कपड्यांपर्यंत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये एकच गर्दी केली. लोक कुटुंबासह खरेदीला येत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. शालीमार, मेनरोड, एमजी रोड, रविवार कारंजा, पंचवटी अशा शहराच्या मुख्य बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या. पावसामुळे पुन्हा बाजारपेठेत येणे शक्य नसल्याने वसूबारसपासून भाऊबिजेसाठी आवश्यक त्या सर्वच वस्तू खरेदीला पसंती देण्यात आली. मेनरोड परिसरात तर गर्दीमुळे नागरिकांना पायी चालणेही मुश्क‌िल झाले.

या वस्तूंना मागणी अधिक

अभ्यंग स्नानासाठी उटणे, पूजेसाठी शिरई व आवश्यक पूजेचे साहित्य, लक्ष्मीची मूर्ती, पणत्या, आकाशकंदील, विविधरंगी रांगोळ्या, पर्स, पादत्राणे यांसारख्या वस्तूंच्या स्टॉल्सवर नागरिकांची अधिक गर्दी होते आहे. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदीसही लोक प्राधान्य देत आहेत.

तयार फराळाला मागणी

दिवाळीत फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे किराणामाल खरेदीसाठी रविवारकारंजा व शहराच्या अन्य परिसरांतही गर्दी वाढू लागली आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही तयार फराळाचे स्टॉल्स सजू लागले आहेत. चकली, चिवडा, चिटोरे, शंकरपाळे, शेव, करंजी, बेसन लाडू, अनारसे यांसारखे तयार खाद्य पदार्थ खरेदी करण्यास लोक पसंती देत असल्याचेही पहावयास मिळाले.

गर्दी अन् वाहतूक कोंडी

शहरात नाशिकरोड, सातपूर, ‌पवननगर, शिवाजी चौक, इंदिरानगर या परिसरांमधील बाजारपेठाही शनिवारी गर्दीने फुलून गेल्या. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत जाण्याऐवजी नागरिकांनी घराजवळील बाजारपेठेतच खरेदीला पसंती दिली. त्यामुळे उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून आले. वाहनांसह नागरिक बाजारपेठांमध्ये दाखल होत असल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंदुकांची तस्करी; तिघे जेरबंद

$
0
0

एटीएसकडून पिंपळगाव टोल नाक्यावर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परराज्यातून बंदुकांची तस्करी करणाऱ्या दोघांना तसेच, या बंदुकांची मागणी करणाऱ्या खरेदीदारास नाशिक दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. एटीएसच्या पथकाने पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

अभिदत्ता खंडेराव पाटील (वय २३), हितेश रतन देवरे (वय २४) दोघे रा. सिडको, नाशिक आणि पंकज गायकवाड (रा. नाशिकरोड, नाशिक) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शस्त्रांचा साठा येत असल्याची माहिती नाशिक एटीएस पथकाला मिळाली होती. संशयित आरोपींनी धुळे सोडल्यानंतर माहिती मिळाल्याने नाशिक एटीएसने शुक्रवारी रात्री पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर सापळा रचला. रात्री १२ ते एक वाजेदरम्यान एटीएस पथकाने काही संशयित दुचाकीचालकांची तपासणी केली. मात्र, फारसे काही हाती लागले नाही.

रात्री एक वाजेच्या दरम्यान टोलनाक्यावर आलेल्या पाटील व देवरे यांची दुचाकी थांबवून एटीएसच्या पथकाने तपासणी केली असता, त्यांना तीन देशी बनावटीच्या बंदुका तसेच, आठ जिवंत काडतुसे सापडून आली. पोलिसांनी लागलीच चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले. शनिवारी पहाटेपर्यंत चाललेल्या चौकशीत हा शस्त्रसाठा नाशिकरोड येथे राहणाऱ्या पंकज गायकवाडला सोपविण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास एटीएसच्या पथकाने त्यालाही नाशिकरोड येथे सापळा रचून अटक केली. या तिघांविरोधात मुंबईतील काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना कोर्टासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तस्करी कनेक्शन शोधणार

परराज्यातील हत्यार तस्करीचे कनेक्शन शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेकदा मध्य प्रदेश राज्यातील सैंधवा परिसरातून गावठी कट्टे नाशिकसह इतर ठिकाणी दाखल होतात. त्यामुळे घातपाताच्या दृष्टिकोनातून सदर घटनेचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृह बनले आडोशाची जागा

$
0
0

ठिकाण ः नामपूर बस स्टँड

--

स्वच्छतागृह बनले आडोशाची जागा

--

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील बस स्टँड आवारातील महिला शौचालयाची दुरवस्था झालेली असून, केवळ एक आडोसा म्हणून महिलांना त्याचा उपयोग करावा लागत लागत आहे. अनेक वेळा ग्रामीण भागातील महिला व त्या ठिकाणी दोन रुपये घेऊन स्वच्छता ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होत असते.

नामपूर गाव हे भविष्यातील तालुक्याचे मुख्यालय मानले जाते. या ठिकाणाहून मालेगाव, तसेच साक्री या परिसराकडे बसेस जातात. त्यामुळे येथे कायम वर्दळ असते. मात्र, या बस स्टँडमध्ये आगारप्रमुख सटाणा येथून ये-जा करीत असल्याने त्यांच्या वेळेमुळे सफाई कामगार कधी असतात तर कधी नसतात. त्यातच सफाई कामगारांसोबत टिंगलटवाळी करणाऱ्या मुलांमुळे विद्यार्थिनींना या ठिकाणी जाणे गैरसोयीचे ठरते. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थिनींकडून करण्यात येत आहे. स्वच्छतागृहाजवळच साचलेल्या व निचरा न होणाऱ्या पाण्यामुळे येथे दुर्गंधी पसरलेली अाहे. मोकाट जनावरांचादेखील या ठिकाणी वावर असल्याने गैरसोयीत भरच पडत आहे.

--

नाईलाजाने करावा लागतो वापर

ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थिनीही या ठिकाणाहून मोठ्या संख्येने प्रवास करताना दिसतात. नामपूर बस स्टँडचे आवार मोठे असले, तरीही या बस स्टँडला संरक्षक भिंतच नाही. त्यामुळे बस स्टँडपासून काही अंतरावर असलेल्या स्वच्छतागृहात महिलांना जावे लागते. या स्वच्छतागृहात महिलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आकारले जातात. मात्र, पुरेशी स्वच्छता नसल्याने पैसे देऊनही असुविधेचा सामना महिलांना करावा लागतो. येथे लाइटची व्यवस्थाच नसल्याने सायंकाळनंतर महिलांना आणखी गैरसोयीला सामोरे जावे लागते.

---

नामपूर बस स्टँडवरील स्वच्छतागृह सर्व सोयी-सुविधांयुक्त करण्यासंदर्भात वारंवार प्रशानाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता केली होती. मात्र, नंतर दुर्लक्ष झाले.

-सुनीता पाटील, माजी जि. प. सदस्या

--

परिसरातून येणाऱ्या शालेय व कॉलेजच्या विद्यार्थिनींना अनेक वेळा स्वच्छतागृहाचा वापर करण्याची वेळ येते. मात्र, या ठिकाणी आकारण्यात येणारे पैसे व उपद्व्यापी मुलांमुळे जाता येत नाही.

-दीपाली कोर, विद्यार्थिनी

-------------

ठिकाण ः सटाणा बस स्टँड

--

पुरुषांना मोफत, महिलांना मात्र सशुल्क

--

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाराष्ट्र परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करून स्वच्छता अभियान राबविले असले, तरीही सटाणा आगारातील अस्वच्छतेची स्थिती जैसे थेच आहे. बस स्टँड परिसरातील स्वच्छतागृहात पुरुषांना मोफत, तर महिलांना दोन रुपये आकारून प्रवेश दिला जातो. त्यामुळे असंख्य महिलांना स्वच्छतागृहात जाण्याऐवजी बाजूला असलेल्या काटेरी झुडपाचा आडोसा करावा लागतो. परिणामी येथे अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण झाला आहे.

सटाणा बस स्टँड परिसरात पुरुष व महिलांची स्वच्छतागृहे शेजारी-शेजारीच आहेत. महिलांच्या स्वच्छतागृहात दोन रुपये घेण्यात येत असले, तरीही महिला मात्र या ठिकाणी आत जाण्यास कचरतात. महिलावर्गाकडून पूर्वी पैसे घेण्यात येत नव्हते. मात्र, आता दोन रुपये स्वच्छता कर रूपाने आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुरुषांकडून शुल्क घेतले जात नाही. त्यामुळे असा भेदभाव करण्याबाबत चौकशी केली असता यापुढील काळात महिलांकडूनदेखील कर आकारण्यात येणार नाही, असे उत्तर येथील सफाई कामगाराने दिले.

येथील स्वच्छतागृहाचा उपयोग सुशिक्षित महिला करीत असल्या, तरी त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, ग्रामीण भागातून येणाऱ्या बहुसंख्य ज्येष्ठ महिला या स्वच्छतागृहात जाण्याऐवजी बाजूला असलेल्या काटेरी झुडपाचा आडोसा करताना दिसतात. असा प्रकार या ठिकाणी होत असला, तरीही बस स्टँड प्रशासनाकडून यासाठी मनाई करणे अथवा सूचनाफलक लावण्याचाही तसदी घेण्यात येत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

--

सटाणा बस स्टँडमधील महिलांच्या शौचालयासाठी घेण्यात येणारे प्रतिमहिला २ ते ५ रुपये कोणत्या आधारावर घेण्यात येतात, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे असंख्य महिला त्याचा वापर टाळतात. याबाबत आगार व्यवस्थापकांशी चर्चा करणार आहोत.

-रुपाली कोठावदे, अध्यक्षा, इनरव्हील क्लब

--

ग्रामीण भागातून येणाऱ्या आमच्यासारख्या महिलांकडून या ठिकाणी कारण नसताना आकारण्यात येणारे पैसे चुकीचे ठरतात. पुरुषवर्गाला मोफत असताना महिलांकडूनच का पैसे आकारण्यात येतात? यासंदर्भात महामंडळ प्रशासनाने उपाययोजना करायला हवी.

-ललिता मुसळे, प्रवासी

---

संकलन ः कैलास येवला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानाची अखेर सफाई

$
0
0

सावरकरनगरातील छत्रपती शिवाजी उद्यानाने घेतला मोकळा श्वास

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

प्रभाग क्रमांक १ म्हसरूळ येथील सावरकरनगर कॉलनी परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानाला जंगल स्वरूप प्राप्त झाले असून, दुरवस्था झाल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. मनपा प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत या शिवाजी उद्यानाची त्याठिकाणी वाढलेले रानगवत काढून सफाई केली आहे.

गेल्या आठवड्यात 'मटा' ने सावरकर नगर येथील छत्रपती शिवाजी उद्यानाबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या उद्यानाची तातडीने स्वच्छता केली. येथील वाढलेले रानगवत आता काढण्यात आले असले तरी उद्यानाला झळाळी कधी मिळणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या उद्यानाच्या आजूबाजूच्या परिसरासह आवारात फोफावलेले रानगवत, चिखल अन् दलदल, कचऱ्याचे ढीग, प्रवेशद्वाराची झालेली दुरवस्था झाली होती. येथील मध्यवस्तीतल्या उद्यानाची अशी जंगलसदृश अवस्था होऊनदेखील परिसरातील लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या उद्यान विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे उद्यानाची स्वच्छता करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली होती. आता या उद्यानाची स्वच्छता झाली आहे. मात्र येथे तुटलेल्या अवस्थेत असलेल्या खेळण्यांना सुगीचे दिवस कधी येणार, परिसरातील रहिवाशांसह चिमुकल्यांसाठी हे उद्यान दुरुस्त होऊन कधी उपलब्ध होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पूर्णवेळ कर्मचारी नेमावा

उद्यानात ठिकठिकाणी कचऱ्याचे प्रमाण जास्त दिसून येत असून, उद्यानाच्या प्रवेशद्वारावर चिखल आहे. सोबतच येथील खेळण्यांची मोडतोड झालेली असून, ती खेळण्यायोग्य स्थिती नाही. तरी प्रशासनाने या उद्यानाची देखभाल करण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. येथे साफसफाई, देखभाल होत नसल्याने कर्मचारी तेथे आवश्यक आहे. सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने उद्यानात आजुबाजूच्या रस्त्याने वाहणारे पाणी जमा होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. उद्यानात लॉन्स तयार करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारदेत आईची मुलासह आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सारदे (ता. बागलाण) येथे दोन वर्षांच्या बालकासह आईने सासरच्या जाचास कंटाळून शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तणावपूर्ण परिस्थितीनंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर शनिवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेऊन खामलोण येथे दोघांवर अत्यंसंस्कार करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी सासू, सासरा व पती यांना अटक केली असून, सटाणा न्यायालयाने दि. १७ पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. जायखेडा पोलिसात भा.द.वि. कलम ३०६, ४९८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती मनोज रामराव धोंडगे, सासरे रामराव गजमल धोंडगे, सासू सरला रामराव धोंडगे यांनी विवाह झाल्यापासून सातत्याने पैशांची मागणी करीत अर्चना हिचा छळ करणे सुरूच ठेवले. या त्रासाला कंटाळून अर्चना मनोज धोंडगे (वय २५) हिने मुलगा नकुल मनोज धोंडगे (वय २) याच्यासह स्वतःच्या शेतातील शेततळ्यात गुरुवार, दि. १२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी या घटनेला वाचा फुटताच पोलिसांनी धाव घेतली.

अथक प्रयत्नांनतर दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढून नामपूर रुग्णालयात आणण्यात आले. तेथे दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात मृत अर्चनाच्या माहेरकडील नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत असल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर मध्यरात्री उशिरा पोलिस निरीक्षक कोळी यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शनिवार सकाळी आई व मुलावर खामलोण येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तरुणीचा गळा दाबून तिला संगमनेरजवळील चंदनापुरी घाटामध्ये फेकून दिल्याच्या गुन्ह्याचा तिढा शहर पोलिसांनी तब्बल नऊ वर्षांनंतर सोडविला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, ताब्यात घेतलेल्या दोघांनीही पोलिसांना एकमेकांविरुद्ध माहिती दिली. २००८ मध्ये पुणे येथील हडपसरमध्ये राहणाऱ्या अर्चना सोनवणे या तरुणीला नाशिकला जायचे सांगत संशयितांनी खून केला होता.

गुन्हे शाखेचे मध्यवर्ती युनिटचे पोलिस कर्मचारी संजय गामणे यांना या खुनाचे धागेदोरे मिळाले होते. त्यानुसार प्राथमिक चौकशी करून गुन्हे शाखेने सिडको येथे राहणाऱ्या प्रतीक राजेंद्र धरणे यास शिर्डीहून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तब्बल नऊ वर्षांपूर्वी झालेला खुनाचा प्रवास उलगडला. प्र​तीकचे अर्चनाशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच दोघांनी आळंदी येथे लग्न केले होते. लग्नानंतर अर्चना, तसेच प्रतीकचा सिडको येथे राहणारा मित्र विनीत झाल्टे व त्याचा मामा चंद्रकांत पिंपळसकर असे चौघे जण पुणे येथे एका घरात राहत होते. प्रतीक कामाला गेला, की अर्चना एकटीच घरी असायची. यादरम्यान विनीत आणि अर्चनाचे प्रेम बहरले. विनीतने अर्चनाशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले, तसेच तिला लग्नाचे आमिष दाखविले. या गोष्टीची माहिती प्रतीकला समजल्यानंतर दोघांत वाद झाला. विनीतला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने नाशिकला घरच्यांना विचारू, असे सांगत नाशिकला जाण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर चौघे नाशिकला येत असताना विनीतने चंदनापुरी घाटात थांबून अर्चनाचा गळा दाबला व त्याच्या मामाने पाय पकडले. मृत झाल्यानंतर अर्चनाला दरीत फेकून देण्यात आले. प्रतीकने एवढी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी विनीतला चौकशीसाठी बोलावले. मात्र, त्याने आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला. प्रतीक व अर्चनात प्रेमसंबंध होते. मात्र, अर्चना लग्नासाठी सारखा पाठपुरावा करीत होती. त्यातूनच प्रतीकने हा खून केल्याचे विनीतने स्पष्ट केले. दोघांनी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले. हा गुन्हा संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असल्याने क्राइम ब्रँचने दोघांना संगमनेर पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, अर्चनाच्या हत्येनंतर प्रतीक, विनीत व त्याचा मामा यांनी काहीच झाले नसल्याचा आव आणत दैनंदिन व्यवहार सुरू केले होते. मात्र, तब्बल नऊ वर्षांनंतर पोलिसांनी या खुनाच्या घटनेवरील पडदा दूर करण्यात यश मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images