Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फटाके स्टॉल्सची संख्या ४०० वरून १००

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

दिवाळी धूमधडाक्यात साजरी करायची तर फटाके हवेतच. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी यंदाही विविध प्रकारचे स्टॉल्स बाजारपेठेत दाखल झाले असून, उद्यापासून शहरात ठराविक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल्स लागणार आहेत. विशेष म्हणजे यंदा स्टॉल्सची संख्या ४०० वरून १०० वर आली असून, फटाक्यांच्या किमती गेल्या वर्षीएवढ्याच असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

प्रकाशाची उधळण करणाऱ्या दीपावलीला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. दिवाळीत नवीन कपडे जसे हवेत तसे बच्चे कंपनीला फटाकेही हवे असतात. मात्र, शहरात अजूनपर्यंत कुठेच फटाक्यांचे स्टॉल्स लागलेले नाहीत. त्यामुळे यंदा फटाके फोडण्याचा आनंद लुटता येणार की त्यापासून वंचित राहावे लागणार, याची चिंता नागरिकांना सतावत होती. महापालिकेने दोनच दिवसांपूर्वी शहरातील विविध भागांमधील फटाके स्टॉल्ससाठी लिलावप्रक्रिया राबविली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने फटाक्यांचे स्टॉल्स थाटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोल्फ क्लब मैदान, डोंगरे वसतिगृह, मुंबई नाका येथील संदीप हॉटेलसमोरील मैदान, पवननगर, नाशिकरोड, पंचवटीतील तपोवन, सातपूर येथील क्लब हाऊस मैदान अशा ठिकाणी स्टॉल्स उभारणीचे काम सुरू आहे. रविवारी दुपारनंतर फटाक्यांची दुकाने थाटली जाणार आहेत. यंदा फटाके विक्रीसाठी परवानग्या, वितरणाची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. परवानगी मिळेल याची शाश्वती नसल्याने लिलावप्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांची संख्याही रोडावली. पाऊस, जाचक अटी आणि फटाके विक्रीसाठी उणेपुरे चारच दिवस मिळत असल्याने यंदा अनेक व्यावसायिकांनी फटाके विक्रीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शहरातील फटाके स्टॉलधारकांची संख्या ४०० वरून शंभरापर्यंत आल्याची माहिती फटाके विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.

व्यवसायातील अनिश्च‌िततेमुळे फटका

निवासी क्षेत्रामध्ये फटाके विक्रीला मज्जाव करण्याचे आदेश कोर्टाने दिल्याचा परिणाम यंदा प्रकर्षाने जाणवू लागला आहे. फटाके स्टॉल्सना कुठे परवानगी द्यावी व कुठे नाकारावी हे निश्च‌ित होण्यास काही दिवसांचा कालावधी गेला. त्यामुळे महापालिकेकडून व्यावसायिकांना परवानग्या देण्यास विलंब झाला. मंदीचे वातावरण, पावसाचे सावट आणि फटाके विक्रीसाठी मिळणारा अल्प कालावधी यामुळेही यंदा फटाके स्टॉल्सची संख्या रोडावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे तालुक्यातील अजनाळे येथील वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १४) घडली आहे. गंभीर बागूल असे शेतकऱ्याचे नाव आहे.

परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाल्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असल्याचे सांगण्यात येत आहे. परतीच्या पावसाने शेतातील कापूस व बाजरी पिकांचे नुकसान झाले असून, तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. यामुळेच वृद्ध शेतकरी गंभीर बागूल (वय ७०) यांनी घराच्या शेजारी असलेल्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी आणि परतीच्या पावसात शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले. यात बँकेचे कर्ज या सर्व कारणांमुळे वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभरातील रेडिएशन तज्ज्ञांची मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवघेण्या कॅन्सर आजाराशी मुकाबला करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेऊन माहितीची आदानप्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात देशभरातील जवळपास ३०० तज्ज्ञांनी हजेरी लावली. एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, तसेच अखिल भारतीय रेडिएशन टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

‘आधुनिक रेडिएशन थेरपीतील अचूकता- एक आशेचा किरण’ या राष्ट्रीय चर्चासत्राची सुरुवात मानवता कॅन्सर सेंटर येथे शनिवारी सकाळी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आली. कॅन्सर आजाराबाबत सतत बदलणाऱ्या उपचारपद्धतीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर्स, रेडिएशन टेक्नॉलॉजिस्ट, तसेच उपचारासंबंधी काम करणाऱ्या इतर तज्ज्ञांना माहीत हवी. याच दृष्टीने दरवर्षी भारतात या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येते. मुंबईवगळता उर्वरित महाराष्ट्रात प्रथमच या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मोहन पुंडलिक यांनी सांगितले. ही परिषद दोन दिवस चालणार असून, रविवारीदेखील देश-परदेशातील अनेक तज्ज्ञ आपल्याकडील आधुनिक माहितीची देवाणघेवाण करणार आहेत. या चर्चासत्रासाठी संपूर्ण भारतातून व परदेशातून ३५० रेडिएशन ऑन्कोलॉजी, रेडिएशन फिजिक्स आणि रेडिएशन प्रोटेक्शन या विषयातील निष्णात व तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या माध्यमातून उपस्थितांना रेडिएशन थेरपीतील गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार मापदंड जाणून घेण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे डॉ. राज नगरकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच या चर्चासत्रात तज्ज्ञ रेडिओथेरपी टेक्नॉलॉजिस्ट व विद्यार्थ्यांच्या पेपर व पोस्टर्सचे प्रेझेंशन व मार्गदर्शनदेखील करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेसाठी डॉ. राज नगरकर, डॉ. स्मिता शर्मा, डॉ. अजित सिंग, डॉ. विजय पालवे, डॉ. प्रकाश पंडित, डॉ. अप्पारी श्रीधर, अनिता फणसाळकर, रशीद बी. एम. हजर होते.

सुविधांची वानवा

देशभरात अवघे साडेचारशे रेडिएशन सेंटर्स आहेत. विविध कारणांमुळे कॅन्सरचा प्रसार झपाट्याने होत असून, रेडिएशन सेंटर्सची संख्या आजमितीस बाराशेच्या आसपास हवी. नाशिकसह देशभरात कॅन्सर होणाऱ्यांमध्ये तरुण, तसेच युवकांची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास असून, ही चिंतेची बाब असल्याचे डॉ. नगरकर यांनी स्पष्ट केले. तंबाखूबंदीसारख्या मोहिमा तीव्र व्हाव्यात आणि दुसरीकडे आरोग्यविषयक सजगता व्यापक व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडब्लूडीचे तीन इंजिनीअर कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यासाठी ठेकेदाराकडून सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपये स्वीकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तीन इंजिनीअरला कोर्टाने १७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या तिघांना अँटिकरप्शन ब्युरोच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली होती. दरम्यान, संशयितांच्या संपत्तीचा शोध घेण्याचे काम सुरूच असून, एसीबीने मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आणलेली नाही.

देवेंद्र सखाराम पवार (वय ३५, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर), सचिन प्रतापराव पाटील (वय ४२, असिस्टंट इंजिनीअर), तसेच अजय शरद देशपांडे (वय ४५, ब्रँच इंजिनीअर) अशी या तीन संशयितांची नावे आहेत. एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचे अंतिम बिल मंजूर करून अदा करण्यासाठी संशयितांनी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी तीन लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना जेरबंद केले. या तिघांना आज जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. बचाव पक्षातर्फे अॅड. एम. वाय. काळे, श्रीधर माने यांनी, तर सरकारी पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी बाजू मांडली. बचाव पक्षातर्फे वेगवेगळे युक्तिवाद करून संशयितांना पोलिस कोठडी गरजेची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले, तर संशयित आरोपींच्या आवाजाचे नमुने तपासणे बाकी असून, त्यांच्याकडील शासकीय कागदपत्रे तपासायची असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. लाचखोरीच्या या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्याचीही चौकशी होणे महत्त्वाचे ठरते. संशयित आरोपींनी अपसंपदा जमा केल्याचा संशय सरकारी पक्षाने व्यक्त केला. तीन इंजिनीअरच्या घरात झडती सुरू असून, त्यांच्या मालमत्तेचा तपशील संकलित केला जातो आहे. यात चौकशी करता यावी म्हणून अॅड. मिसर यांनी संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने संशयितांना चार दिवसांची म्हणजे १७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

चर्चेला उधाण

संशयितांना शुक्रवारी दुपारी अटक केल्यानंतर एसीबीने संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या घराची झडती सुरू केली. या झडतीत नक्की पुढे काय आले याविषयी एसीबी मूग गिळून बसली आहे. अधिकृतपणे एसीबी माहिती समोर आणत नसल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, संशयितांना कोर्टात हजर करण्यात आले त्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. पोलिसांनीही या दृष्टीने मोठा बंदोबस्त कोर्ट परिसरात तैनात ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीमियम दरवाढीला शेतकऱ्यांचे समर्थन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रस्तावित प्रीमियम दरवाढीला बांधकाम व्यावसायिकांकडून विरोध होत असताना आरक्षित जागांच्या मोबदल्यात टीडीआर घेतलेल्या शेतकऱ्यांनी मात्र या दरवाढीचे जोरदार समर्थन केले आहे. प्रीमियमचे दर वाढल्यास टीडीआरचेही दर वाढणार असून, शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणार आहे. मात्र, बिल्डर लॉबीच्या दबावाखाली प्रस्तावित दरवाढ रद्द केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी प्रतिनिधींकडून देण्यात आला आहे.

बिल्डर लॉबीला साथ देणारे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप व राष्ट्रवादीचे जयंत जाधव हेच आमच्या आत्मदहनाला जबाबदार असतील, असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे. त्यामुळे प्रीमियमचे राजकारण पुन्हा तापणार आहे. महापालिका क्षेत्रात शेतकऱ्यांनी जमिनीच्या बदल्यात टीडीआर विकत घेतले आहेत. महापालिकेनेही शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात टीडीआर दिले आहेत. परंतु, सध्या टीडीआरचे दर कमी झाल्याने शेतकऱ्याचा दर मातीमोल झाला आहे. टीडीआरचे दर कोसळल्याने अन्याय झाल्याची भावना जागामालक शेतकऱ्यांमध्ये आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी रहिवासी वापरासाठी ७० टक्के, तर व्यावसायिक वापरासाठी ८० टक्केप्रमाणे दरवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने शासनास सादर करण्यात आला आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना त्यास विरोध करीत आहेत. त्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. बिल्डर लॉबीच्या दबावापोटी आमदार सानप व जाधव यांच्याकडूनही विरोधी सूर आळवला जात आहे. प्रीमियम दरवाढीने केवळ टीडीआर लॉबीचे भले होणार हे साफ खोटे आहे, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. हा आरोप करणाऱ्यांनी टीडीआर घेणाऱ्यांपैकी बांधकाम व्यावसायिकांच्या नावे किती जमिनी आहेत व शेतकऱ्यांच्या नावे किती आहेत, याचे सातबारा उतारे तपासण्याची गरज असल्याचे या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

चाळीस टक्के प्रीमियम अर्थात, अतिरिक्त बांधकाम क्षेत्र महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना विकण्याच्या शासननिर्णयापूर्वी टीडीआरला एबीसीडी झोन होता. तेव्हाही बांधकाम व्यावसायिकच फायद्यात होते. आता शासनाच्या निर्णयामुळेही त्यांचाच फायदा आहे. आरक्षणात जमिनी देणारा शेतकरीच तोट्यात आहे. घरे महागणार ही बाब खोटी असून, शेतकऱ्यांचा टीडीआर मातीमोल भावात लाटण्याचा डाव बिल्डर लॉबीने आखल्याचा आरोपही प्रसिद्धिपत्रकान्वये करण्यात आला आहे. संदीप जाधव, सचिन काठे, सुभाष नागरे, छबू नागरे, सुनील कोंबडे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रीमियमचा वाद पुन्हा पेटणार आहे.

---

शेतकऱ्यांच्या मागण्या...

--

-क्रेडिट बाँडची योजना लागू करावी.

-भूसंपादनापोटी रोखीने मोबदला द्यावा.

-टीडीआर विक्री आयकर कक्षेतून बाहेर काढावी.

-कलम १२७ च्या नोटिसीसाठी दहा वर्षांची अट रद्द करावी.

-टीडीआरवरील पायाभूत सुविधा अधिमूल्य रद्द करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादच जागवू शकतो उमेद

$
0
0

‘युवक’ या शब्दातच अफाट ऊर्जा सामावली आहे. असे असतानाही कुटुंबपद्धती, समाजव्यवस्था आणि शिक्षणपद्धती या तीन मुख्य व्यवस्थांचा बिघडता समतोल युवकांचे भावविश्व ढवळून काढत आहे. परिणामी युवकांची दोलायमान मनोवस्था हा प्रश्न एक सामाजिक समस्येचे रूप तीव्रतेने धारण करीत आहे. संवाद आणि आशावादी दृष्टिकोनाच्या प्रयत्नपूर्वक पेरणीतून या समस्येवर नक्कीच तोडगा निघू शकतो, असा आशावाद ‘मानसिक आरोग्य' या विषयावरील राऊंड टेबल चर्चेत सहभागी तज्ज्ञांनी शनिवारी मांडला.

गेल्या आठवड्यापासून युवामनाचे धुमसते भावविश्व उलगडून दाखविणारी ‘मना सज्जना’ ही वृत्त मालिका ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये सुरू करण्यात आली आहे. या वृत्त मालिकेवर आधारित मानसिक आरोग्य या विषयाच्या अनुषंगाने चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात मानसशास्त्राच्या प्राध्यापिका आणि पंचवटी कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वार, संमोहनतज्ज्ञ आणि समुपदेशक डॉ. शैलेंद्र गायकवाड, सायकॉलॉजिस्ट असोसिएशनच्या नाशिक शाखेचे सचिव आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उमेश नागापूरकर आणि कॉर्पोरेट ट्रेनर व समुपदेशक शंतनू गुणे या मान्यवरांनी सहभाग घेत अभ्यासपूर्ण निरीक्षणे आणि उदाहरणे मांडत युवकांच्या मनोवस्थेवर भाष्य केले.

पालकांची सजगता, जबाबदारी महत्त्वाची

माणसाचे मन बळकट करण्यासाठी कुटंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि शिक्षणपद्धती या तीन घटकांची भूमिका प्रमुख असते. दुर्दैवाने बदलत्या सामाजिक प्रवाहांमुळे नेमक्या याच व्यवस्था लक्ष्य ठरत आहेत. याचा थेट नकारात्मक परिणाम युवकांच्या मनोभूमिकेवर होतो. आपल्या पाल्याच्या मानसिकतेवर अशा बाह्य घटकांचे आघात होऊ नयेत, यासाठी त्याला लहानपणापासूनच योग्य प्रमाणात शिस्त आणि संस्कारांद्वारे नीतिमूल्ये, जाणीव, संवेदना, भावना आणि चांगले तत्त्व जोपासणारे प्रमुख शिक्षण देण्याची जबाबदारी ही समाजातील कुठल्याही घटकांपेक्षा पालकांचीच जास्त आहे. आजमितीस मानसिक अस्वास्थ्याचा विषय सर्व स्तरांतील युवकांना स्पर्श करतो. त्यासाठी शहरी-ग्रामीण किंवा मध्यम-उच्च, शिक्षित-अशिक्षित असा भेदाभेद करता येत नाही. केवळ तंत्रज्ञान मानवाच्या अंगठ्यात सामावणे म्हणजे प्रगती, अशी चुकीची व्याख्या करू नये. माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्याचे संस्कार देण्यारी नीतिमूल्ये आणि तशा प्रकारच्या शिक्षणातूनच युवकांच्या मनाला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य प्राप्त होऊ शकेल. याशिवाय समाजात जशी डॉक्टर्स, शिक्षक यांसारख्या घटकांची आवश्यकता असते, तसेच आजमितीस समुपदेशही तितकेच गरजेचे झाले आहेत. मात्र, समाज हे स्वीकारत नाही. ही मानसिकता बदलून समुपदेशकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. युवकांच्या मनाची घालमेल थांबविण्यासाठी समुपदेशकांची मदतही प्रसंगी घ्यायला हरकत नसावी. जसे डॉक्टरांकडे कुटुंब मित्रत्वाच्या नात्याने बघून त्यांचे मार्गदर्शन घेते, तसेच मनाचे आरोग्य जपण्यासाठी समुपदेशकांची मदत घेणे गैर नाही.

-शंतनू गुणे, कॉर्पोरेट ट्रेनर आणि समुपदेशक

---

‘आयक्यू’सोबतच ‘इक्यू’देखील मोलाचा

मानवी जीवनात शरीराचे आरोग्य जितके महत्त्वाचे असते, त्याहूनही जास्त मूल्य मानसिक आरोग्याचे असते, याची म्हणावी तशी जाणीव आपल्या समाजात नाही. दुर्दैवाने या जाणिवेअभावी अलीकडील काळात युवावर्गही ताण-तणाव, नैराश्य, अपेक्षाभंग, स्पर्धा आदी भावनांमधून येणाऱ्या मानसिक आजारांचा सामना करीत आहे. विशेष म्हणजे याला अल्पशिक्षित युवकांपासून उच्चभ्रू समाजातील उच्चशिक्षित युवकांचाही अपवाद नाही. नव्या पिढीमध्ये होत असलेल्या आर्थिक सुबत्ता आणि सुखवस्तू जीवनाच्या परिणामी भौतिकवाद किंवा उपभोगवादी जीवनशैलीचे दुष्परिणाम मोठ्या स्तरावर जाणवत असल्याचे काही सर्वेक्षणांतील नोंदी सांगतात. यश म्हणजे केवळ भौतिक समृद्धी नाही, याची जाणीव युवकांना करून देण्याचा संस्कार पालक, शिक्षक, समाज आदी घटकांनी शक्य तितक्या अगोदरपासून करायला हवा. इंटरनेट, स्मार्ट फोन्ससारखी नवमाध्यमे आणि व्यसनाधीनतेसारखे घटक तरुणाईवर नकारात्मक प्रभाव टाकत आहेत. युवकाचे व्यक्तिमत्त्व केवळ ‘आयक्यू’ (इंटेलिजन्स कोशंट)वर तोलले गेले, तर ती बाजू अपूर्ण राहील. ‘आयक्यू’सोबतच पाल्याचा ‘इक्यू’ (इमोशनल कोशंट)ही अतिशय मोलाचा आहे. तो विकसित करण्यावर युवकांशी संबंधित प्रत्येक घटकाने मेहनत घ्यायला हवी. डॉक्टरांनी अभ्यासलेले शरीरशास्त्र जसे शरीराचे रोग दूर करण्याची क्षमता बाळगते, तसेच समुपदेशकांनी अभ्यासलेले मानसशास्त्रही मनाचे आजार दूर करण्याची क्षमता ठेवते, हे गरजूंनी अनुभूतीने समजावून घ्यायला हवे. समुपदेशकांची मदत घेण्याची मानसिकता बाळगली, तर मानसिक आजारांमुळे दबले जाणारे असंख्य युवकच समाजासाठी निश्चित विधायक कार्य उभारू शकतील.

-डॉ. मृणाल भारद्वाज, उपप्राचार्या, पंचवटी कॉलेज

---

तरुणाईचे आदर्श पाहावेत पडताळून

आदर्श म्हणजे तरुणाईच्या भाषेत ‘आयडॉल्स’ हे कुमार वयापासून, तर तारुण्यावस्थेपर्यंत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. केवळ पुस्तकांचे वाचन करणारा, मोठी संशोधने मांडून पुरस्कार मिळविणारा माणूसच आदर्श म्हणून असावा असे नाही, तर युवकाचा मानसिक कल ज्या क्षेत्रात आहे मग ते क्रीडा, कला किंवा संस्कृती अशी वेगवेगळी क्षेत्रे असो, त्या-त्या क्षेत्रातील आदर्शांची पेरणी त्याच्या जीवनात केली जायला हवी. आदर्शांच्या संकल्पनाच चुकीच्या पद्धतीने युवकांकडून स्वीकारल्या जातात. मग अंधानुकरणाने सोशल मीडियाचा गैरवापर, व्यसनाधीनता, गुंडगिरीसारख्या मानसिकतेला बळी पडून उत्कृष्ट करिअर धोक्यात आल्याची उदाहरणेही असंख्य आहेत. नवमाध्यमांचा प्रवाह आधुनिक जीवनातून दूर लोटणे शक्य नसले, तरीही त्याचा अनुकूल उपयोग करून घेणे आपल्याच हाती आहे, याचे धडे तरुणाईला मिळणे गरजेचे आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव भोवतालच्या जगावर पडावा ही माणसाची आंतरिक उर्मीच त्याला सोशल माध्यमातून झळकवते. पण, प्रभाव निर्माण करण्याची पद्धत जर अभ्यास, नैतिक मार्गावर आधारित असेल, तर तो माणूस आदरास पात्र ठरतो. मात्र, या आधारावर त्याला मोठे आणि प्रभावी बनता आले नाही, तर तो ज्या चुकीच्या माध्यमांचा अवलंब करू पाहतो, त्यातून त्याची वाटचाल मानसिक विकारांच्या दिशेकडे होऊ शकते. याला युवक अपवाद नाहीत. माणूस हा आदर्शांवर जीवनाचा प्रवास करीत असतो. त्यासाठी युवकांच्या जीवनात असणारे आदर्श पडताळून पाहणे गरजेचे ठरते.

-डॉ. उमेश नागापूरकर, सचिव, नाशिक सायकोलॉजिस्ट असोसिएशन आणि समुपदेशक

---

संवाद आशावादी हवा

तुटत चाललेल्या कुटुंबपद्धतीच्या परिणामी मानवी नात्यांना भावनांचा ओलावा राहिलेला नाही. अशी कोरडीठाक पडणारी नाती एकलकोंड्या मनास जन्म देतात. बहुतांश टीन एजर्स युवकांच्या बाबतीत ही समस्या जाणवते. काल्पनिक जग आणि वास्तव यांच्यातील दरी न समजू शकल्याने अशा अनेक युवकांची पुढच्या टप्प्यात मानसिक कोंडी होते. या युवकांना पालक, शिक्षक आणि समाजाकडून सातत्याने काय करू नये, याच्याच सूचना आणि उदाहरणे दिली जातात. त्यांच्या नव्या कर्तृत्वास किंवा प्रयोगास चालना देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याऐवजी या गोष्टींना मारक ठरणाऱ्या सूचनांमुळे युवक नव्या प्रयत्नांपासून दूर राहतो. अनेकदा ही नैराश्याची नांदी असू शकते. अलीकडे अगदी सहज हाती मिळणाऱ्या व्हर्च्युअल माध्यमांचा सकारात्मक उपयोग कसा करावा, या माध्यमांच्या नकारात्मक प्रभावांपासून दूर कसे राहावे, याचेही शिक्षण आणि संस्कार पालक आणि शाळा या दोन्हीही घटकांनी देणे गरजेचे आहे. सुबत्ता, सत्ता आणि बुद्धिमत्ता या तीन घटकांचा योग्य समन्वय झाला, तर काहीतरी विधायक घडू शकते. पण, अलीकडे सर्वार्थाने संपन्न बनणाऱ्या समाजात या तीन घटकांचा ताळमेळच बसेनासा झाला आहे. या गैरसमन्वयाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर तरुणाईच्या मनावर पडत आहे. हे चित्र बदलण्यासाठी पालक आणि पाल्य, शिक्षक आणि विद्यार्थी याप्रमाणे प्रत्येक नात्यात सकारात्मक संवाद निर्माण होण्याची गरज आहे. या प्रकारच्या संवाद चळवळीस बळकटी मिळाल्यास युवकांची अफाट ऊर्जा देशासाठी उत्पादक अशा प्रकल्पांकडे वळविता येईल.

-डॉ. शैलेंद्र गायकवाड, संमोहनतज्ज्ञ आणि समुपदेशक

--

इंटर्नल परीक्षा अन् तणाव

----

ज्या वळणावर तरुणाईच्या आशा-आकांक्षांना धुमारे फुटावेत, त्यांच्या कर्तृत्वाच्या वाटा गवसाव्यात, नेमक्या त्याच वळणावर अनेकदा शिक्षण संस्था किंवा कॉलेजेसची चुकीची धोरणे तरुणाईच्या तणावास कळत-नकळत कारणीभूत ठरत असतात. नवी उमेद घेऊन फुलणारा कोवळा सुरवंट खुरटू नये, यासाठी विविध कॉलेजेसनेही कॅम्पसचे वातावरण योग्य तेथे खेळीमेळीचे करण्याची तीव्र आवश्यकता जाणवते.

----

शालेय वातावरण संपवून विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. सुरुवातीपासूनच त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवेशासाठी होणारी धावपळ, त्यापोटी होणारा त्रास, आवडत्या कॉलेजात प्रवेश मिळेल का, याबाबत नसणारी शाश्वती, अशी मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करून विद्यार्थी कसाबसा अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळवतो खरा. इथंपर्यंत ठीक असतं. कॉलेज डेज् एन्जॉय करण्याच्या या दिवसांना एव्हाना कुणाची तरी नजर लागली की काय, असे वाटायला लागते. इंटर्नल परीक्षेचे निमित्त होते. वर्षभर विद्यार्थी जे काही लेक्चर करतात त्यात खूप गोष्टी लक्षात येतात. ज्या अपेक्षेने तो प्रवेश घेतो त्यासंदर्भात अपेक्षाभंग व्हायला लागतात. या प्रवेशासाठी विद्यार्थ्याने अन् त्याच्या पालकांनी हरप्रकारच्या खस्ता खाऊन कशीबशी फी भरलेली असते. अशात अध्यापन पद्धतीतच विद्यार्थ्याला दोष जाणवत असेल, तर त्याला दर्जाहीनतेबाबत आवाज उठवावासा वाटतो. पण, विद्यार्थी कसा काही बोलणार? कारण, त्याच्या इंटर्नल परीक्षांचे मार्क्स कॉलेजच्याच हाती. या भीतीने आहे ती स्थिती अनेक जण निमूटपणे सहन करतात. मुँह माँगी फी भरूनसुद्धा कुणाला काही बोलण्याचा धर्म नाही. या चिडिचूप वातावरणातूनही अनेकांना नैराश्य येते. सुरुवातीला आवडणारे हेच कॉलेज आता नावडीचे होते. सर्व गोष्टी हक्काच्या असूनही मागता येत नाहीत. या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना समजत नाही करावं काय? कारण, बाहेरच्या क्लासेससाठी सगळ्यांकडेच पैसा नसतो.

जसं इयत्ता नववीच्या इंटर्नल्स बंद करून त्यांना फक्त थीअरी शंभर गुणांची देणार आहेत, तसाच विचार सर्व अभ्यासक्रमांच्या बाबतीत शिक्षणव्यवस्थेने विचार करावा. त्यामुळे कॉलेजचा गुणांक कदाचित कमी होऊ शकतो, पण कॉलेजमधून पास होणारे विद्यार्थी हुशारच असतील..!

-गणेश डोंगरे

-------

युवकांना आवाहन...


स्पर्धा, ताण-तणाव, धावपळीची जीवनशैली या शब्दांमुळे मेटाकुटीस आलेल्या तरुणाईचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न आम्ही ‘मना सज्जना’ या मालिकेद्वारे करीत आहोत. या विषयावर अनेक तरुणांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत. तुमच्याही आयुष्यात कधीतरी करिअर, स्पर्धा, रिलेशनशिप, व्यसनाधीनता, अपयश अशा कुठल्याही मुद्याशी निगडित कसोटीचे क्षण असतीलच ना! मग या कसोटीला तुम्ही तोंड कसं दिलं? तुमच्या पदरी पडलेल्या नैराश्यावर तुम्ही मात करून पुढं यश कसं मिळवलं? ‘नाही रे’च्या खड्ड्यातून तुम्ही बाहेर कसे पडलात? असे तुमचे अनुभव लिहून पाठवा. तुमच्या योग्य अनुभवांना ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून प्रसिद्धी देण्यात येईल. अनुभवाच्या मांडणीत तुमची नावे आणि वैयक्तिक ओळख गुप्त ठेवण्यात येईल. चला, तर मग ‘पत्र नव्हे मित्र’ हे ब्रीद जपणाऱ्या ‘मटा’च्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आमच्या ई मेल आयडीवर मेल करा. ई मेल आयडी असा ः mataamanasajjana@gmail.com

--

(शब्दांकन ः जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारीच्या पाण्याचा रेल्वे पुलाला वेढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरे-जेलरोड रेल्वे पुलाखाली गटारीचे पाणी साचत असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. पूल खचून रेल्वे अपघातही होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जेलरोड परिसरातील नागरिकांना एकलहरे व सामनगावकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग पवारवाडीतून एकलहरेकडे जाण्यासाठी जवळचा आहे. तर दुसरा मार्ग नाशिकरोड सिन्नर फाटामार्गे आहे. मात्र, त्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. या पुलाचा परिसर पूर्वी निर्मनुष्य होता. अलिकडे त्या परिसरात नवीन वसाहती झाल्या आहेत. याठिकाणी ड्रेनेजची सोय नसल्याने परिसरातील घाण पाणी पुलाखाली वाहत येते. पुढे जाण्यासाठी त्याला अडथळे असल्याने पुलाखाली पाणी साचते. पुलाखालून फक्त दुचाकी जाऊ शकते इतकी पुलाची उंची असल्याने दोन दुचाकी समोरासमोर आल्यावर घाण पाणी अंगावर उडून वाद होतात. या पुलावरून मध्यरेल्वेच्या दररोज शंभरावर रेल्वेगाड्या धावतात. अनेक महिन्यांपासून घाण पाणी साचत असल्याने पुलाच्या पायालाही धोका निर्माण झाला आहे. दुर्घटना घडण्याआधीच या पुलाखालील पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ गटारीवरील अतिक्रमण हटवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील लोढा भवन परिसरातील गॅस एजन्सी समोरील गटारावरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शनिवारी काढले. या अतिक्रमणामुळे परिसरातील सांडपाण्याचा व पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे अतिक्रमण काढवे, अशी तक्रार नगरसेविका अ‍ॅड. ज्योती भोसले व परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती.

शहरातील साठफुटी रोड, एंडाईत मळा, बारा बंगला, जैन मंदिर व सन्मान हॉटेल परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी गटार टाकली आहे. ही गटार सटाणा-मालेगाव रस्त्यालगत असणाऱ्या मुख्य भुयारी गटारीला मिळते. परंतु भारत गॅस एजन्सी चालकाने या गटारीवर बांधकाम केल्याने गटार बुजली गेली. त्यामुळे या भागात पाण्याचे डबके साचले होते. परिणामी परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. गटारीवरील अतिक्रमण काढावे यासाठी मनपा प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. मात्र शहरात चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने या भागात तलाव साचला होता. यासंदर्भात पुन्हा महापालिकेकडे तक्रार केली होती. अतिक्रमण निर्मूलन विभागाने जेसीबीच्या सहाय्याने गटारावरील बांधकाम काढले. सांडपाण्याची गटार प्रवाही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चित्रा’ची बरसात, खरिपावर संक्रांत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेले दोन दिवस पडलेले कडक उन आणि पावसाची विश्रांती यानंतर शुक्रवारी दुपारी परतीच्या पावसाने येवला तालुक्याला चांगलाच दणका दिला. सकाळपासून नको नकोसं करणाऱ्या दमट वातावरणाने येवलेकरांना घामाघुम केले. दुपारी तीननंतर बरसलेल्या ‘चित्रा’ नक्षत्राने काढणीला आलेल्या खरीप पिकांवर एकप्रकारे संक्रांतच आणली आहे. येवला शहर-परिसरासह तालुक्यातील सर्वदूर या पावसाने कुठे एक तास तर कुठे दीड तास जोरदार झटका दिला. क्षणभर थोडीशीही उसंत न घेता या पावसाच्या अगदी जोरदार सरी अन् त्याही तब्बल तासभर बरसल्याने सगळीकडील शेतशिवारात पाणीच पाणी साचले. परतीच्या पावसाने तालुक्यातील विहिरींचा जलस्त्रोत उंचावण्यास मदत होणार असली, तरी झालेला पाऊस खरीप हंगामातील निघणाऱ्या पिकांना मारक ठरणार आहे.

मका, कपाशी, बाजरी आदी पिके या परतीच्या कचाट्यात सापडली आहेत. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पावसाने अचानक दिलेल्या तडाख्यात अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांची शेत तसेच खळ्यात काढून ठेवलेली मक्याची कणसे भिजली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात टाकलेल्या उन्हाळ कांद्यांच्या रोपांना देखील या पावसाचा जबर तडाखा बसला. महिनाभरापूर्वी महागाचे उन्हाळ कांदा बियाणे वाफ्यात टाकल्यानंतर या रोपांनी सध्या बऱ्यापैकी डोके वर काढले असतानाच या पावसामुळे वाफ्यात पाणी साचले. त्यामुळे ही रोपे सडण्याची धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे.

सगळीकडे पाणीच पाणी

शुक्रवारी दुपारी तब्बल तासाच्या वर बरसलेल्या परतीच्या पावसामुळे गावोगावच्या शेतशिवारात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच जमिनी उफाळू लागल्याने काळजी अधिकच वाढली आहे. येवला शहरात जोरदार सरी बरसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आले. डॉ. आंबेडकर व्यापारी संकुलातील पूर्वोत्तर गाळ्यांसमोर साचलेल्या पाण्यामुळे गाळेधारकांसह दुकानात येणाऱ्या ग्राहकांची देखील मोठी पंचाईत झाली.

सुरगाण्यात भाताचे नुकसान

सुरगाणाः मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे सुरगणा तालुक्यातील भात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन दिवसांवर येवून ठेपलेला दिवाळी सणावर या पावसाचे सावट पसरले आहे. बाजारात शांतता असल्यामुळे व्यापारीही अडचणीत सापडले आहेत.

दीपावलीला आदिवासी बांधव खूप महत्त्व देतात. कष्ट करून घरातील सर्व सदस्यांना नवे कपडे घेण्याची जबाबदारी कर्त्या पुरुषावर असते. त्यानुसार बहुतांश शेतमजूर तालुक्यातील शेतीची कामे संपवून घाटमाथ्यावर स्थलांतरित झाले आहेत. दुसरीकडे व्यापारी वर्गाने किराणा, कापड, फटाके व अन्य वस्तूंची दुकाने सजव‌िली आहेत. मात्र राजच पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेत शांतता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेय गुंतवणूकदार पुन्हा उतरले रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा. लि. कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करून चार महिने उलटले. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संप्तत गुंतवणुकदार महिलांनी शनिवारी शहरातून मोर्चा काढून सटाणा पोलिस ठाण्यावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त महिलांनी पोलिस ठाण्यासमोर एक तास ठिय्या देवून पोलिस प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजी केली.

शहरासह तालुक्यातील गोरगरीब शेतमजूर, घरकाम करणाऱ्या शेकडो महिला व पुरुषांनी तीन ते चार वर्षांपूर्वी मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि. कंपनीच्या शहरातील शाखेत लाखो रुपयांच्या ठेवी जमा केलेल्या होत्या. मात्र ३ फेब्रुवरी रोजी संबंधित कंपनीने गाशा गंडाळून शाखा बंद केली. त्यांनतर ठेवीदारांनी कंपनीच्या वरिष्ठांकडे चौकशी केली असता व्याजासह पैस मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या आश्वासनाला दीड वर्ष उलटले. तरीही पैस न मिळाल्याने शेकडो ठैवीदारांनी सटाणा पोलिस ठाण्यात गेल्या ६ जुलैला कंपनीचे संचालक लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय तावरे यांच्या विरोधात सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संप्तत महिलांनी शनिवारी सटाणा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. महिलांच्या वतीने पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात राकेश सैंदाणे, महेंद्र अहिरे, प्रशांत शिरोडे, नटराज शिरोडे, जिजाबाई सोनवणे, आशा बागड, ज्योती ठाकरे, मीना धामणे, रुपाली धामणे, कुसुम सोनवणे, सविता सोनवणे आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड महिना आधीच आले ‘परदेशी पाहुणे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जागतिक पाणथळ क्षेत्र आणि महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी दिवाळीनंतर किंवा नोव्हेंबरमध्ये दाखल होणारे परदेशी पक्षी या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच दाखल झाल्याने पक्षीप्रेमींना सुखद धक्का बसला आहे.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी नोव्हेंबरच्या दरम्यान देश विदेशातील हजारो पक्ष्यांचे आगमन होते. यावर्षी ते दीड ते दोन महिने लवकर आगमन झाल्याने पक्षीप्रेमीही आनंदात आहेत. दीपावलीच्या सुटीत राज्यभरातील पक्षीप्रेमी पक्षीनिरीक्षण करण्यासाठी या अभयारण्यात येतात. स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाल्याने हा परिसर दिवाळी झाली की गजबजून जाईल.

युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका, शेजारील आशियाई देशातून नांदूरमध्यमेशवर अभयारण्यात पक्षी येतात. अमोल दराडे, प्रमोद दराडे, अमोल डोंगरे, रोशन पोटे, शंकर लोखंडे, प्रमोद चव्हाण, शंतनू चव्हाण हे प्रशिक्षित गाईड पक्षी प्रेमी व पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत.

हे पक्षी झाले दाखल

थापट्या, गढवाल, तरंगपक्षी, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, पिनटेल कोंबडक, मुर हेन, छोटा मराल, ऑस्प्रे, काईट, मार्श हॅरिअर, ईगल, पेटेंड स्टोर्क, प्लासगल, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, स्पून बिल, स्पोटेड ईगल ई.

सध्यापक्षांना नांदूरमाध्यमेश्वर धरणातील जलाशयात मोठ्या प्रमाणात कीटक, मासे हे खाद्य उपलब्ध आहे. शिवाय खाद्य मुबलक असून, ते खाण्यासाठी दुसरा कोणी स्पर्धक नाही असे पोषक वातावरण व परिस्थिती असल्याने पक्षी यंदा लवकर दाखल झाले आहेत.-अमोल दराडे, गाईड, नांदूरमध्यमेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक रुपयाची नोट आली; पण गेली कुठे?

$
0
0

कोट्यवधींच्या संख्येने छपाई होऊनही दर्शनदुर्लभ

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

एक रुपयाच्या नोटांची छपाई नोटबंदी काळात पुन्हा सुरू झाली. त्यानंतर गेल्या वर्षभरात पुन्हा छपाई करण्यात आली. आताही ती सुरू आहे. मात्र, सामान्य नागरिकांना या नोटांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. एक रुपयाच्या कोट्यवधींच्या संख्येने छापलेल्या नोटा जातात कुठे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये एक रुपयाच्या नोटांची छपाई पुन्हा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे एक रुपयांच्या कोट्यवधी नोटा छापूनही सामान्यांना त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व हजाराच्या नोटांची छपाई होते. सरकारच्या धोरणामुळे एक रुपयाच्या नोटांची छपाई पंचवीस वर्षापूर्वी बंद होऊन नाण्यांचे उत्पादन सुरू झाले.

सध्या एक, पाच, दहा रुपयांची नाणी बाजारात आहेत. कधी कधी एक रुपयाच्या नाण्याची तीव्र टंचाई जाणवते. नागरिकांनाच त्याचा फटका बसतो.
ही अडचण लक्षात घेऊन एक रुपयाची नोट छपाई सुरू झाली आहे.

कामगारांना वितरण
प्रेस मजदूर संघाच्या प्रयत्नामुळे कामगारांना एक रुपयाच्या बंडलचे वितरण रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने केल्याची माहिती सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली. मात्र, दहा
बंडलची मागणी करूनही एकच बंडल दिल्याने कामगारांनी व्यवस्थापन व बँकेप्रती नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते सुधारा, अन्यथा आंदोलन करू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न येत्या तीन दिवसात सोडवला नाही तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिला.

नांदगाव शहर व परिसरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता यशवंत पाटील यांची शिवसेना नेते सुहास कांदे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेट घेतली. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत त्यांना निवेदन दिले. येत्या तीन दिवसात रस्त्यांचे काम सुरू न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांदे व इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप, शहरप्रमुख किरण देवरे, जि. प. सदस्य रमेश बोरसे, पं. स. माजी सभापती विलास आहेर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक संघ व नांदगाव मधील सामाजिक संस्थांनीही या प्रश्नी सत्याग्रहाचा इशारा दिला आहे. परतीच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून, त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालताना मोठी कसरत करावी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबोलीत विद्यार्थ्यास बेदम मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अंबोली येथील कॉ. नानासाहेब मालुसरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील कॉ. नानासाहेब मालुसरे येथील माध्यमिक विद्यालयात इ. ९ वी शिकणारा सचिन बुधा जाधव यास दि. ११ ऑक्टोबरला शाळेतील गावित नामक शिक्षकाने मारहाण करून कोणाला सदर प्रकार सांगितला तर हातपाय तोडीन, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी बुधा दत्तू जाधव या विद्यार्थ्याच्या पालकाने रविवारी (दि. १५) त्र्यंबक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून, विद्यार्थ्यास उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या मुलास अगोदर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या गंभीर प्रकरणाने विद्यार्थी घाबरले असून, याप्रकरणी श्रमजीवी संघटनेमार्फत त्र्यंबक पोलिस स्टेशनला निवेदन देऊन शिक्षकांवर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर तुकाराम लचके, अशोक लंहागे, रामदास धात्रक, मनोज लहांगे, बालु तलपाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात रस्ते नागरिकांनी फुलले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली असून, दीपोत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे. मंगळवारी (दि. १७) धनत्रयोदशीपासून दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी घरोघरी निरनिराळ्या फराळाच्या वस्तू तयार करण्यासह साफसफाई केली जात आहे. याशिवाय शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या हातात पगार व बोनस आल्याने बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे शहरातील जुना आग्रा रोडला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले असून रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलले आहेत.

यंदाच्या वर्षी मंगळवारी (दि. १७) धनत्रयोदशी, बुधवारी (दि. १८) नरक चतुर्दशी, गुरुवारी (दि. १९) लक्ष्मीपूजन तर शुक्रवारी (दि. २०) दीपावली पाडवा आणि दि २१ रोजी भाऊबीज साजरी होणार आहे. तर विशेष म्हणजे यंदा शासकीय कर्मचार्‍यांना सलग पाच दिवस सुट्ट्या असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठ पाच कंदील, जुना आग्रा रोड, फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा या परिसरात तात्पुरता स्वरुपात आकाशकंदील, पणत्या, शोभेच्या फुलांच्या माळा, रांगोळी, लहान मुलांसाठी कपडे यासह विविध आकर्षक वस्तूची दुकाने थाटण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजारात मावेना गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी खरेदीचा आनंद नागरिकांना लुटता यावा यासाठी पावसानेही रविवारी सुटी घेतली. सगळे नाशिक शहरच जणू खरेदीसाठी रस्त्यांवर उतरले अन् त्यामुळे बाजारपेठेलाही बूस्ट मिळाला.

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते. हा आनंद द्विगुणीत करायचा तर नवनवीन कपडे, फटाके, मिठाई यांची खरेदी हवीच. त्यासाठी नाशिककरांनी जणू रविवारची सुटी राखूनच ठेवली होती. धाकधुक होती ती पावसाची. परंतु पाऊसही आज नाशिककरांवर मेहेरबान झाला. दिवाळीच्या उत्साहात आपले विघ्न नको म्हणून त्यानेही रविवारी फुल डे सुटी घेतली. सकाळपासूनच आकाश निरभ्र राहिल्याने नाशिककरांना खरेदीचे वेध लागले. खरेदीच्या माध्यमातून आनंदाची लयलूट करण्यासाठी अबालवृध्दांची पाऊले घरांबाहेर पडली. शहराच्या उपनगरांमधील बाजारपेठा असोत किंवा मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठा सर्वत्र उत्साहाला भरते आले. सोमवारी वसुबारस असून दिवाळीचा हा पहिला दिवस. दिवाळी उद्यावर येऊनही बहुतांश नागरिक सणासाठी आवश्यक खरेदी करू शकले नाहीत. रविवारी खरेदीएवढेच महत्वाचे काम श‌िल्लक ठेवणारे शहरवासी कुटुंबासह बाजारपेठांमध्ये दाखल झाले. त्यामुळे रविवार कारंजा, मेनरोड, एमजी रोड, शाल‌िमार, कॉलेजरोड, गंगापूर रोड, शरणपूर रोड, तिबेट‌ियन मार्केट यांसारख्या बाजारपेठा गर्दीने ओसंडल्या. विशेषत: कपड्यांच्या दुकानांमध्ये अधिक गर्दी असल्याचे पहावयास मिळाले. लहानगे, तरुणाई, महिला खरेदीसाठी अधिक उत्सुक असल्याचे दिसून आले. वसुबारसला संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा केली जाते. ह्या दिवसापासूनच अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. त्यामुळे अंगणाची शोभा वाढविणाऱ्या विविधरंगी रांगोळ्यांपासून डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आकाशकंदीलांपर्यंत आवश्यक त्या सर्वच वस्तुंची खरेदी करण्यास पसंती देण्यात आली. शिरई, पणत्या, लाह्या बत्तासे, लक्ष्मी पूजनाचे साहित्य अशा छोट्या-मोठ्या वस्तूंसह इमिटेशन ज्वेलरी, पर्सेस, पादत्राणे यांसारख्या अनेक वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचे पहावयास मिळाले. फराळाचे सर्वच तयार पदार्थ बाजारपेठेत मिळत असले तरी त्यापैकी काही निवडक पदार्थच खरेदी करण्यास नागरिकांकडून पसंती दिली जात आहे.

ऑनलाइन शॉपिंग तेजीत

बाजारपेठांमध्ये जाऊन हव्या त्या वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल असला तरी ऑनलाइन मार्केटलाही भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. विविध ऑनलाइन शॉप‌िंग कंपन्यांनी अनेक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग करून थेट घरपोच वस्तू मागविण्यावरही तरुणाईने भर दिला आहे. मोबाइल व तत्सम गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कुकिंग वेअर्स यांसारख्या व‌स्तूंना विशेष मागणी आहे. कॅशबॅक ऑफरमुळेही ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे.


वाहतुकीचा फज्जा अन् रस्ते बंद

खासगी वाहनांसह नागरिक बाजारपेठांमध्ये दाखल होत असल्याने शहरातील मुख्य व उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली. गर्दीमुळे लोकांना पायी चालणे मुश्क‌िल होत असताना वाहनांमुळे गोंधळात अधिकच भर पडली. रविवार कांरजा, मेनरोड, दहीपूल, एमजी रोड या परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक आण‌ि पोलिसांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे पोलिसांनी काही रस्त्यांवर वाहनांना मज्जाव केला. रेडक्रॉस सिग्नल ते मेनरोड, नेहरू गार्डन ते शालिमार, रविवार कारंजा ते सराफ बाजार असे अनेक रस्ते दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. तसेच खरेदीसाठी पायीच जाण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या सुटकेसाठी शनैश्वराला साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

ज्यांनी विकासाची गंगा तालुक्यात आणली...नस्तनपूर तीर्थक्षेत्राचा कायापालट केला ज्यांना राजकीयदृष्ट्या सूडबुद्धीने डांबण्यात आले आहे. ते माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना संकटातून मुक्त कर, असे साकडे माजी आमदार अनिल आहेर यांच्यासह भुजबळ समर्थकांनी रविवारी (दि. १५) श्री क्षेत्र नस्तनपूर येथे श्री शनैेश्वराला घातले. यावेळी शनैेश्वराला महाअभिषेक व महाआरती करून छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करण्यात आली.

रविवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोनशे आदिवासी मुलांना कपडे तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भास्कर कदम होते. यावेळी शनेश्वर ट्रस्टचे पदाधिकारी अनिल आहेर यांनी छगन भुजबळ याना राजकीय दृष्टिकोनातून तुरुंगात डांबण्यात आल्याचा आरोप केला. कार्यक्रमात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील यांची भाषणे झाली. यावेळी नरेंद्र सोनवणे, डॉ. शरद आहेर, विजय चोपडा, राजेंद्र गायकवाड, प्रताप गरुड उपस्थित होते.

अवयवदानाचा संकल्प

सटाणा : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. १५) महात्मा फुले समता परिषद बागलाण व आश्रय फाउंडेशनच्यावतीने अवयवदान मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी नेत्रदानाचा संकल्प करून अवयवदानाचा संकल्पाचा शुभारंभ केला. कार्यक्रमात भारत खैरनार, संदीप सोनवणे, वैभव गांगुर्डे, दत्तू बैताडे, प्रकाश अहिरे यांनी अवयवदानाचा संकल्प केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुबारस ः गोधनाप्रति कृतज्ञता...

$
0
0

वसुबारस ः गोधनाप्रति कृतज्ञता...

देशातील सर्वांत मोठा सण म्हणून दिवाळी सण गणला जातो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असा आठवडाभर हा सण उत्साहात साजरा केला जातो. वसुबारसपासून सुरू होणाऱ्या या सणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. देशातील वेगवेगळ्या प्रांतांत हा सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रीयन संस्कृतीत मात्र वसुबारस म्हणजे गोधनाच्या पूजेपासून या सणाला प्रारंभ होतो.

अश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. दिवाळीची सुरुवात खऱ्या अर्थाने या दिवसाने घराघरांत केली जाते. गोधन पूजेचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. वसुबारसविषयी असलेल्या आख्यायिकेनुसार समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून वसुबारसचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता गोवत्स पूजा केली जाते. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढून दिवाळीस सुरुवात केली जाते. काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात, तर काही ठिकाणी गहू, मूग न खाण्याची प्रथा पाळली जाते. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. चांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

--

गायीच्या प्रतिकृतीची पूजा

शहरांचे विस्तारीकरण झाल्याने सर्वच सणांचे स्वरूप बदलले आहे. धार्मिक विधींमध्येही सध्या इन्स्टंट हा प्रकार फोफावला आहे. वसुबारससारखा सणदेखील याला अपवाद नाही. जवळपास गाय नसल्याने अनेकांकडून घरातच माती, पितळ, चांदीच्या गायींच्या प्रतिकृतींची पूजा करून वसुबारस साजरी केली जाते. काही ठिकाणी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय-वासराचे चित्र रेखाटूनही त्याची पूजा केली जाते.

--

लक्ष्मीचे व्हावे आगमन

ज्यांच्याकडे गाय-वासरे आहेत त्यांच्याकडे वसुबारस या सणाचे महत्त्व मोठे असते. सकाळीच गायींना स्वच्छ अांघोळ घालून, हळद-कुंकू लावून, अक्षता वाहून, तसेच फुलांच्या माळा घालून पूजले जाते. त्यानंतर गायींचे औक्षण करून पुरणपोळी, गुळाचा नैवेद्य दाखविला जातो. गायीला स्पर्श करून, तिला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला जातो.

--

सुख-समृद्धी नांदावी...

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा कृषिक्षेत्राशी जोडला गेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे, ज्या घरात गायी, वासरे आहेत ते घर म्हणजे लक्ष्मी जवळ असण्याचे प्रतीक पूर्वीपासून मानले जाते. आजही असे घर सधन समजले जाते. या गोधनाप्रति वसुबारसनिमित्त कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणूनच दिवाळीचा पहिल्या दिवसाचे स्थान गोवत्सला मिळाले आहे. गोधनाची पूजा करून घरात सुख-समृद्धी नांदावी, या उद्देशाने या सणाचे महत्त्व आजतागायत महाराष्ट्रीयन संस्कृतीत जपले गेले आहे.

--

वाढत्या शहरीकरणामुळे मध्यंतरीच्या काळात वसुबारसला प्रत्यक्ष गायीची पूजा करण्याचे प्रमाण कमी झाले होते. सद्यःस्थितीत गोशाळांविषयी माहिती सामान्यांमध्येही पोहोचल्याने महिलावर्ग गोशाळांमध्ये येऊन पूजा करतात.

-राजाभाऊ मोगल, विश्वस्त, मोरोपंत पिंगळे गोशाळा प्रकल्प

--

वसुबारसच्या दिवशी सर्व गायींना सकाळी अांघोळ घातली जाते. हळद-कुंकू वाहून त्यांची पूजा केली जाते आणि पुरणपोळी, गुळाचा नैवेद्य दाखविला जातो.

-पारसमल साखला, अध्यक्ष, गुरुगणेश आनंद गोशाळा, खंबाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत प्रवाशांना दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यालयाने प्रवाशांसाठी जादा बसेसची व्यवस्था केली आहे.

यासोबतच शनिवार (दि. १४) पासून तिकिटात दहा टक्के दरवाढ केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मालक-चालक संघटनेकडूनही दुप्पट भाडे आकारायला सुरुवात झाली असून, आता बसनेही भाडेवाढ केल्याने प्रवाशांना दिवाळीत त्रास सहन करावा लागणार आहे. दिवाळीच्या काळात सुट्या असल्याने निरनिराळ्या ठिकाणी नागरिकांच्या सहलीचे नियोजन असते. या वाढत्या गर्दीचा फायदा घेत अतिरिक्त कमाईसाठी यावर्षीही शहरातील सर्वच खासगी ट्रॅव्हल्स चालक-मालकांनी प्रवासी दरात दुप्पटीने वाढ केली आहे. दुसरीकडे ऐन दिवाळीत याच धर्तीवर दोन वर्षांपासून एसटी महामंडळानेदेखील दिवाळी कालावधीत यंदाही दि. १४ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत एसटी महामंडळाने भाड्याच्या दरांत दहा टक्के वाढ केल्याने दिवाळीत प्रवाशांना फटका बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वहस्ते साकारले आकाशकंदील

$
0
0

स्वहस्ते साकारले आकाशकंदील!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या काळात अंगण, परिसर उजळवून प्रकाशमय करणारे आकाशकंदील, दिवे नाशिककरांडून स्वहस्ते साकारण्यात आले. निमित्त होते महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या आकाशकंदील व दीया मेकिंग वर्कशॉपचे. कृषिनगर येथील समाजमंदिरात या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसह महिलावर्गाने या कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

दिवाळीसाठी अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र, तीच वस्तू घरी तयार केलेली असेल, तर त्याचा आनंद निश्चितच द्विगुणीत होतो. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांचा आनंद दिवाळीनिमित्त असाच द्विगुणीत व्हावा यासाठी ‘मटा’ने ही कार्यशाळा घेतली. नंदिनी रामचंदानी यांनी यावेळी आकाशकंदील, दीया मेकिंग व गिफ्ट बॉक्सविषयी मार्गदर्शन केले. सीडी, कॅँडल व सजावटीच्या साहित्याच्या आधारे दिवाळीसाठी खास दिवा तयार करण्यात आला. रंगीबेरंगी कागदांनी आकाशकंदील बनविण्यात आला. दिवाळी गिफ्टची मोठी क्रेझ असल्याने गिफ्ट बॉक्स सजावटदेखील यावेळी शिकविण्यात आली.


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

स्वतःच्या हातांनी बनविलेला आकाशकंदील घरी लावण्यात मोठा आनंद वाटत आहे. लहानपणी आकाशकंदील बनविला होता. त्यानंतर ‘मटा’च्या वर्कशॉपमध्येच तो बनविला.

- शिवानी देशपांडे

-----------------

आकाशकंदील विकत घेण्यापेक्षा स्वतः तयार केलेला आकाशकंदील लावणे समाधानकारक वाटते आहे. दीया प्लॅटर, गिफ्ट बॉक्स सर्वच शिकण्यात मजा आली.

- प्रणाली कर्डिले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images