Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाल्यांशी संवाद वाढविणे गरजेचे

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पालकांनी कॉलेजात शिकणाऱ्या आपल्या पाल्यास मित्र समजावे. त्यांना भेडसणाऱ्या अडचणी आणि समस्या यावर चर्चा करायला हवी. आपला मुलगा योग्य दिशेने वाटचाल करतो आहे किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी त्यांच्याशी कायम संवाद साधत राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांनी केले.

येथील एस. व्ही. के. टी. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पाल्यांच्या पालकांची सहविचार सभा पार पडली. त्यावेळी प्राचार्य डॉ. मेधणे बोलत होते. यावेळी मंचावर प्रा. विलास सैदपाटील, प्रा. सुनीता आडके, प्रा. डी. एस. शिंदे आदी उपस्थित होते.

आपल्या पाल्याचे वर्तन आणि मित्र याविषयी माहिती मिळवायला हवी. जेणेकरून शैक्षणिक प्रगतीत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. शिक्षकावर मर्यादा येतात. त्यामुळे पालकाची जबाबदारी वाढते, असही डॉ. मेधणे यांनी सांगितले. यावेळी पालकांमधून संगीता खैरनार, दत्तात्रय भुजबळ, प्रकाश निसाळ आदींनी आपले कॉलेजप्रती मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून बोलतांना प्रा. डॉ. सुहास फरांदे यांनी शिक्षक महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांचे पालक बनून भूमिका बजावत असतात. कौटुंबिक वातावरणात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता यावे, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व प्रास्ताविकातून प्रा. एस. के. पगार यांनी सभेचे उद्दिष्ट व आयोजनामागील हेतू सपष्ट केला. प्रा. विलास सैदपाटील यांनी आभार मानले. सहविचार सभेस पालकांसह विद्यार्थी व प्रधयापक वर्ग उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मजुराचा मृतदेह दडविण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतात मशागतीचे काम करीत असतांना ट्रॅक्टरच्या शॉफ्टवर उभ्या असलेला मजुराचा तोल गेल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या मजुराचा मृतदेह चक्क दोन दिवस शेतात दडवून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार येवला तालुक्यातील मानोरी येथे समोर आला. येवला तालुका पोलिसात याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मानोरी येथील शिवाजी सोमनाथ तिपायले हे गेल्या शनिवारी (दि. ७) रात्री साडेदहाच्या सुमारास शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागत करीत होते. शेतातील पांडुरंग नावाचा कामगार (वय २९) ट्रॅक्टरच्या शॉप्टवर उभा होता. तिपायले हे ट्रॅक्टर चालवित होते. काम सुरू असताना पांडुरंग अचानक खाली पडल्याने त्याचा उजवा पाय रोटाव्हेटरमध्ये अडकला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तिपायले व त्यांचे सहकारी कृष्णा शेळके यांनी जखमी पांडुरंगला त्यांच्या मारुती कारमध्ये (एमएच १५ बीवाय ७८१६) टाकून नाशिक येथे उपचारासाठी घेवून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच पांडुरंगाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. नंतर या दोघांनी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पांडुरंगचे प्रेत मानोरी येथील शेतातच दडपून ठेवले. या घटनेबाबत गावातील पोल‌सिपाटील आप्पासाहेब शेळके यांनी तिपायले यांना फोन करून पांडुरंगाच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तेव्हा तिपायले यांनी पांडुरंगवर नाशिक येथे उपचार सुरु असल्याचे खोटे सांग‌तिले. मात्र इकडे पांडुरंगचे प्रेत फुगल्यामुळे तियापले यांनी सोमवारी (दि.९) दुपारी तील वाजता पोल‌सिपाटलांना फोन करुन पांडुरंगचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर मंगळवारी येवला रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मानोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोल‌सिांनी घटनास्थळी केलेला पंचनामा तसेच साक्षीदारांची विचारपूसमध्ये तिपायले आणि शेळके यांनी संगनमत करुन प्रेताचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याने उघडकीस आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षबागा पाण्याखाली!

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील जवळपास सर्व गावांमध्ये आठ दिवसांपासून पावसाचा तडाखा कायम असून, ढगफुटीसारख्या पावसाने शेतकऱ्यांची पुरती झोप उडवली आहे. द्राक्ष, भाजीपाला व खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुसळधार पावसाने द्राक्षबागेत उताराच्या दिशेने पाणी वाहत जमिनीतील माती, पिके वाहून गेली. द्राक्षबागांना नाले, ओहोळचे स्वरूप प्राप्त झाले होते.

काढणीला आलेले सोयाबीन, भात, मका, भुईमूग आदी खरिपाची पिके, कोबी, टोमॅटो, भाजीपाला पाण्यात गेला आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतातील पाणी काढण्यापासून तर चिखलात फवारणी करण्यासाठी द्राविडी प्राणायाम सुरू आहे. पावसामुळे वीजपंप बंद असतानाही ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. औषध फवारणीचा, लोडशेडिंगचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सरकारकडून कोणताही मदतीचा हात, धीर वा दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

वाहतूक मार्ग बंद

कोराटे, मोहाडी, आक्रळे, वनारवाडी आदी भागांत तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील पाणी थेट रणतळ परिसरात नाशिक- कळवण रस्त्यावर येत चार वेळा रस्ता बंद झाला, तर दिंडोरी- मोहाडी रस्त्यावर कोराटे शिवारातही नाल्याला मोठा पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे तीन वेळा वाहतूक बंद झाली. बाणगंगा नदीला तीन वेळा मोठा पूर आल्याने मोहाडी-जानोरी रस्ता काही काळ बंद राहिला. शिंदवड परिसरातही मोठे नुकसान झाले आहे.

पंचनामे करण्याची मागणी

सध्या दिंडोरी तालुक्यातील काही द्राक्षबागा फुलोरा येण्याच्या अवस्थेत असल्यामुळे कूज होण्याची शक्यता आहे, तर सतत बरसणाऱ्या पावसामळे द्राक्षाची पाने जास्त काळ ओली राहिली. त्यामुळे डावणी, करपा वाढणार आहे. परिसरात टोमॅटो पिक जोमदार होते. मात्र, पावसामुळे या पिकाचेही नुकसान झाले आहे. तालुक्यात आता सोयाबीन, उडीद, मूग ही पिके काढणीला आली आहेत. रोजच्या पावसामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे सरकार, आता तरी पावशील का!

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातून गेलेल्या नाशिक-औरंगाबाद महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. बांध‌काम विभागासह अनेक मंत्र्यांना याबाबत निवेदन देवूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा शेतकरी संघाच्या वतीने शुक्रवारी नैताळे येथे महामार्गावरच सत्यनारायणाची पुजा मांडण्यात आली. विशेष म्हणजे महामार्गावरील खड्ड्यांमध्येच प्रसाद सोडून, हे सरकार आता तरी पावशील का, अशी साद घालण्यात आली. या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात चांगलीच चर्चा झाली.

निफाड ते नाशिक या मार्गावर असणाऱ्या खड्डयांकडे लक्ष वेधण्यासाठी असे आंदोलन करण्यात आल्याचे संघाचे जिल्हाध्याक्ष राजेंद्र बोरगुडे यांनी सांगितले. नाशिक-औरंगाबाद या महामार्गावर नैताळे ते शिवरे फाटा व नैताळे ते बोकडदरे दरम्यान मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. सर्वच प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार, सार्वजनिक बाधकाम विभाग निष्क्रिय झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारसह या विभागाला जाग यावी म्हणून बळीराजा शेतकरी संघाने नाशिक-औरंगाबाद या महामार्गावरच पूजा मांडून गांधीगिरी मार्गाने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी नैताळे येथील खड्ड्यांमध्ये महापूजा मांडून गोविंदराव घायाळ व त्याच्या पत्नी सरला घायाळ यांना पुजेसाठी बसविण्यात आले. विधिवत पूजा केल्यानंतर महामार्गावरील खड्ड्यांना प्रसाद अर्पण करण्यात आला. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनाही प्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रतन बोरगुडे, सदाशिव कोटकर, दत्तात्रेय भवर, रवींद्र बोरगुडे, महेश बोरगुडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टेंडर काढूनही समस्या जैसे थे

बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक-औरंगाबाद हा चौपदरीकरण मार्ग पिंपळसपासून येवल्यापर्यंत बांधकाम विभागाकडे हस्तांतरित आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची डागडुजी व दुरुस्तीच झाली नाही. परतीच्या पावसामुळे आता रस्ता पूर्ण उखडला आहे. निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी या प्रश्नाबाबत चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर निघाले. मात्र ठराविक ठिकाणी खड्डेच बुजले गेले. उर्वरित खड्डे तसेच का ठेवले, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्ग अक्षरशः एखाद्या कपड्याप्रमाणे जागोजागी फाटला आहे. बांधकाम विभाग खड्ड्यात मुरुम टाकून खड्डे बुजाव‌िण्याचा प्रयत्न करीत आहे. या विभागाला जागे करण्यासाठी ही पूजा केली.

- राजेंद्र बोरगुडे,

जिल्हाध्याक्ष, बळीराजा शेतकरी संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझे जातवैधता प्रमाणपत्र वैधच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विश्वास सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी त्यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत माजी मंत्री मधुकर पिचड आणि अॅड. पद्माकर वळवी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. वैधानिक प्रक्रियेनुसार एखाद्या व्यक्तीच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत जातप्रमाणपत्र पडताळणी समिती निर्णय घेत असून, या समितीने २००२ मध्ये ठाकूर या आदिवासी जमातीचे वैधता प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे संबंधित आरोपात तथ्य नसून, माझ्या बहिणीचे आजमितीस कोणत्याही न्यायालयामध्ये जमातीसंदर्भात प्रकरण प्रलंबित नाही. त्यामुळे संबंधित आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने, एखाद्या व्यक्तीने दावा केल्यास तो आदिवासी आहे किंवा नाही या संदर्भात पडताळणी समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत अर्जदाराने दाखल केलेल्या विविध पुराव्यांची पोलिस खात्याच्या दक्षता समितीमार्फत सखोल चौकशी करून त्यांची सत्यता पडताळूनच आपला अहवाल समितीला सादर करते. या समितीतील तज्ज्ञ अधिकारी संपूर्ण कागदपत्रे व पुराव्यांची तपासणी करूनच वैधता प्रमाणपत्र देते. त्यानुसार ३० ऑक्टोबर २००२ रोजी कायदेशीर नियमानुसार समितीने ठाकूर या आदिवासी जमातीचे वैधता प्रमाणपत्र दिले असून, संबंधितांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या सुविधेने महिला हैराण

0
0

सिन्नर बस स्टँड

--

अपुऱ्या सुविधेने महिला हैराण

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नरच्या हायटेक बस स्टँडवर दररोज बारा ते पंधरा हजार प्रवाशांची ये-जा असून, त्या प्रमाणात या ठिकाणी शौचालयाची सुविधा अपुरी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून सिन्नर येथे हायटेक बस स्टँड तयार करण्यात आले. बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या या बस स्टँडवर प्रवाशांच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या शौचालयांची सुविधा अपुरी आहे.

आधुनिक बस स्टँडमध्ये पुरुष व महिलांसाठी प्रसाधनगृहाची वेगवेगळी व्यवस्था असून, ही सुविधा अत्यंत तोकडी पडत आहे. सिन्नरच्या बस स्टँडवर दररोज सात ते आठ हजार विद्यार्थी व सात ते आठ हजार प्रवासी असे जवळपास पंधरा हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी एकच प्रसाधनगृह असून, बस स्टँडच्या एकाच बाजूला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे बस स्टँडच्या दोन्ही बाजूस ही व्यवस्था असणे गरजेचे आहे. प्रसाधनगृहात पुरुष व महिलांसाठी निःशुल्क सेवा देण्याचे नियोजन असताना महिलांकडून पैशाची मागणी केली जाते. बऱ्याच वेळा त्यासाठी महिलांची अडवणूक केली जाते. हा प्रकार रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडे यंत्रणा नसून, त्यामुळे महिला प्रवाशांची लुबाडणूक केली जाते. स्वच्छतागृहे योग्य वेळी स्वच्छ केली जात नसल्याने या ठिकाणी मोठी दुर्गंधी पसरलेली असते. अक्षरशः नाक मुठीत धरून या ठिकाणी जावे लागते. या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करून देणे आवश्यक असून, या ठिकाणी दुर्गंधीमुक्त वातावरणाची गरज आहे.

--

सिन्नर बस स्टँड महाराष्ट्रात एक मॉडेल म्हणून प्रसिद्ध असताना या ठिकाणची स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने या हायटेक बस स्टँडच्या दृष्टीने ही गोष्ट लाजीरवाणी आहे.

-मेघा दराडे, प्रवासी

--

महिलासांठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नसताना या ठिकाणी पैसे आकारले जातात. पैशासाठी महिलांची अडवणूक केली जाते. या ठिकाणी मोठ्या अक्षरात तसा बोर्ड असणे गरजेचे आहे.

-मंगल गोसावी, प्रवासी


-----------


मनमाड बस स्टँड

--

स्वच्छतागृहात जाण्याचीच अडचण

--

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येथील बस स्टँड परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह असले, तरी त्या ठिकाणी जाणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे हे स्वच्छतागृह असून, नसल्यासारखेच आहे. पुरुषांना टाळून आतमध्ये जाण्याचा खडतर मार्गच महिलांना अवलंबावा लागत आहे.

मनमाड बस स्टँडमधून दररोज शेकडो महिला प्रवासी प्रवास करतात. नोकरदार, शालेय, कॉलेजच्या विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांसाठी बस स्टँडमध्ये स्वच्छतागृह आहे. मात्र, या स्वच्छतागृहासमोरच मालेगाव, तसेच नाशिककडे जाणाऱ्या बसेस उभ्या राहत असल्याने तेथे पुरुष प्रवासी मोठ्या संख्येने उभे असतात. त्यामुळे स्वच्छतागृहात जाणे गैरसोयीचे वाटत असल्याच्या तक्रारी नोकरदार महिलांकडून कानी पडतात. त्याचबरोबर महिला स्वच्छतागृहाकडून पलीकडे जाण्यास रस्ता असल्याने स्वच्छतागृहात जाणे जिकिरीचे वाटते, असाही सूर आहे. समोरच्या भिंती व परिसराचा वापर पुरुष लघवी करण्यासाठी करीत असल्याचे आढळून येते. या गोष्टी सोडल्या, तर महिला स्वच्छतागृह, तेथील स्वच्छता याबाबत महिलांच्या तक्रारी नसल्याचे दिसून येते. स्वच्छतागृह अथवा गैरसोयींबद्दल अद्याप एकाही महिलेने लेखी तक्रार केलेली नसल्याचे मनमाड बस डेपोचे अधिकारी गुंड सांगतात. स्वच्छतागृहाचा ठेका ज्यांच्याकडे आहे त्यांना शुल्क न आकारणे, स्वच्छता ठेवणे, पाण्याची व्यवस्था करणे याबाबत डेपो प्रशासन वेळोवेळी लेखी सूचना देत असल्याचा दावाही त्यांनी केला.

--

मनमाड बस स्टँडमध्ये स्वच्छतागृहाच्या भागातच पुरुष प्रवासी उभे राहत असल्याने स्वच्छतागृहात जाणे अडचणीचे होते. याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी किंवा मालेगाव, नाशिककडे जाणाऱ्या बसेस थोड्या बाजूला उभ्या कराव्यात.

-राणी भालेराव, प्रवासी

-----------

विंचूर बस स्टँड

--

महिलांसाठी शौचालयच नाही


म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असणाऱ्या आणि १५ हजार लोकसंख्या असलेल्या विंचूर शहर बस स्टँडमध्ये महिलांसाठी शौचालयच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. आजूबाजूच्या खेडेगावांतून शाळा, कॉलेजात येणाऱ्या मुलींना बस स्टँडमध्ये आल्यानंतर स्वच्छतागृह नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

महिलांसाठी येथे फक्त प्रसाधनगृह आहे. त्याची स्वच्छताच केलेली नाही. नाकाला रुमाल लावूनच महिलांना तेथे जावे लागते असते, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. स्वच्छतेअभावी या प्रसाधनगृहाची बिकट अवस्था झाली आहे. प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, त्यात प्रवेश करताच उग्र दुर्गंधीमुळे प्रवासी नाकाला हात लावत सरळ बाहेर पडतात. स्वच्छतागृहात साफसफाईच होत नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पाय ठेवायलाही स्वच्छ जागा नसल्याने महिलांना या स्वच्छतागृहाच्या बाहेर आडोसा शाेधावा लागतो. शौचालय बांधण्याची मागणी दूरच राहिली असून, किमान प्रसाधनगृह तरी स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे, असा सवाल विद्यार्थिनींनी केला आहे.

--

महामार्गावर एवढे मोठे गाव आहे. शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात. मात्र, येथे महिलांसाठी शौचालयच नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे महिलांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

-सुनंदा सरकटे, प्रवासी


------------

स्वच्छतागृह इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगावमध्ये बस स्टँडमधून दिवसभरात फारफार तर ८० ते १०० महिला प्रवास करतात. शनी मंदिर थांबा असल्याने स्टँडमध्ये फारशा महिला येत नाहीत. ज्या येतात त्यात विद्यार्थिनींचे प्रमाण मोठे आहे. जुन्या स्वच्छतागृहात अस्वच्छता, गैरसोय याबाबतच्या तक्रारी काही प्रवाशांकडून केल्या जातात. आता नांदगावमध्ये इंडियन ऑइल कंपनीने नवे स्वच्छतागृह बांधून दिल्याने महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न मार्गी लागल्यात जमा आहे. मात्र, त्याचे उद्घाटन लवकर व्हावे, अशी मागणी आहे. जोपर्यंत नवीन इमारतीचा उपयोग सुरू होत नाही, तोपर्यंत जुन्या स्वच्छतागृहावर विसंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. काही गैरसोयीदेखील स्वीकाराव्या लागतात, अशा विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया आहेत. नांदगाव डेपो व्यवस्थापन स्वच्छतेबाबत काळजी घेते व पाण्याचीही व्यवस्था आहे. नवे स्वच्छतागृह लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे बेलदार यांनी दिली आहे.

---

स्वच्छतागृहाच्या ठिकाणी फारच गैरसोय आहे. नवे स्वच्छतागृह बांधले आहे. पण, ते सुरू झालेले नाही. कुठल्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे?

-सायली वाघ, प्रवासी

-----------

चांदवड बस स्टँड

--

असून अडचण, नसून खोळंबा


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मुंबई-आग्रा हायवेवर असलेल्या चांदवडसारख्या शहरातील बस स्टँडच्या ठिकाणचे महिला स्वच्छतागृह म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती आहे. गाजरगवताने वेढलेल्या या स्वच्छतागृहाची असुरक्षितता या ठिकाणी अंधार असल्यानेही वाढली आहे. असुरक्षित वातावरणातच महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे.

परिसरातील शाळा व कॉलेजात जाण्यासाठी हजारहून अधिक विद्यार्थिनी, तसेच इतर तरुणी व महिला प्रवासी येथील बस स्टँडमध्ये येतात. या ठिकाणी जुने स्वच्छतागृह आहे. पाण्याची व्यवस्था आहे, स्वच्छताही ठेवली जाते, असे सांगितले जाते. त्याचबरोबर इंडियन ऑइल कंपनीच्या सौजन्याने नवे स्वच्छतागृह उभारण्यात आले असून, ते उद्घाटन होण्यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांची सोय झाली आहे. सायंकाळी बस स्टँड परिसरात अंधार असतो. महिला सुरक्षिततेसाठी ते योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. दरम्यान, स्वच्छता, पाणी व्यवस्था व निःशुल्क सेवा या बाबी मनमाड, नांदगाव, चांदवड बस स्टँडवरील महिला स्वच्छतागृहांत असल्याचे सांगितले जात आहे.

--

पुरेशा प्रकाशव्यवस्थेची गरज

चांदवड बस स्टँड परिसरात सायंकाळनंतर अंधार असतो. एखादी बस आल्यानंतर बसमधील महिलेला स्वच्छतागृहापर्यंत जाणे अंधारामुळे गैरसोयीचे होते. या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था व्हावी.

-अनिता पाटील, प्रवासी

---

संकलन ः संदीप देशपांडे, सुनील कुमावत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी शॉपिंगचा सुपरवीकेंड सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसाने यावर्षीच्या दिवाळी खरेदीवर पाणी फेरले आहे. दिवाळी अवघ्या चार-पाच दिवसांवर येऊन ठेपली तरी अवेळी पडणाऱ्या पावसाने ग्राहक, विक्रेत्यांचा हिरमोड केला आहे. ऐन तोंडावर हा सण आल्याने दिवाळीपूर्वीच्या वीकेंडला म्हणजेच आज शनिवारी व उद्या रविवारी ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ असण्याची दाट शक्यता आहे.

दिवाळी जसजशी जवळ येऊ लागते तसतसा आपसूकच खरेदीचा माहोल सर्वत्र तयार होत असतो. नवीन कपडे, फटाके, फराळ, घर सजावटीचे साहित्य, रांगोळी आदी खरेदी करण्यासाठी उत्साह संचारतो. यंदा मात्र, चित्र काहीसे वेगळे दिसून आले. परतीच्या पावसाने शहर परिसरातच ठाण मांडल्याने ग्राहक, विक्रेते सर्वांच्याच उत्साहावर पाणी फिरले. मात्र, पावसाचे आव्हान स्वीकारुन खरेदीसाठी नाशिककर बाहेर पडू लागले आहेत. आज (१४ ऑक्टोबर) महिन्यातला दुसरा शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांना सुट्या असणार आहेत. तसेच औद्योगिक वसाहतींतील अनेक कंपन्यांनाही आज सुट्या आहेत. उद्या, १५ ऑक्टोबर रोजी रविवारची सुट्टी आहे. वीकेंडच्या लागोपाठ सुट्यांचा लाभ ग्राहक, विक्रेते करून घेणार असल्याचे चित्र सध्या शहरात आहे.

विक्रेतेही सज्ज

गेल्या काही दिवसांत ग्राहकराजाने पावसामुळे खरेदीकडे पाठ फिरवली आहे. विक्रेत्यांनी साठा करुन ठेवलेला माल पडून आहे. यामुळे विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे आता वीकेंडकडे विक्रेत्यांचे लक्ष असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते सज्ज झाले आहेत.

बाजारपेठ सजली

दिवाळीची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जात असलेल्या मेनरोड परिसरात दुपारपर्यंत खरेदीसाठी तुफान गर्दी असते. दिवाळीसाठी लागणारे साहित्य पणत्या, आकाशकंदिल, रांगोळी, सजावटीचे साहित्य, फुलमाळा, लायटिंग आदींची दुकाने थाटलेली आहेत. याशिवाय कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या कपडे, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारातील खरेदीने जोर पकडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारींनंतरही समस्या जैसे थे

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी प्रामुख्याने नगरसेवकांची असते. मात्र, नागरिकांकडून तक्रारी होत असतानाही त्यातील एकदेखील समस्या सुटत नसल्याने आता नागरिकांनी थेट प्रशासनाशीच पत्रव्यवहार सुरू केला असून, वेळप्रसंगी मोर्चा काढण्याचीही तयारी सुरू केली आहे.

चेतनानगर भागातील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेने पाण्यासाठी आंदोलन करून किंवा महापौरांनी इंदिरानगर परिसराच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आदेश देऊनदेखील काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नसून, नागरिकांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

चेतनानगर भागातील प्रियदर्शनी पार्क, सिद्धी, ध्रुव, श्यामतेज, राधाकृष्ण आणि परिसरातील रो-हाऊस भागात राहणाऱ्या नागरिकांनी विभागीय अधिकारी व पाणीपुरवठा विभागाला निवेदन देऊन थेट आता मोर्चा काढण्याचाच इशारा दिला आहे. या भागातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, मुबलक पावसाने सध्या धरणसमूह ओव्हर फ्लो असतानाही या परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

--

महापौरांना सांगूनही मिळेना पाणी

पाण्याच्या समस्येबाबत नगरसेवकांची भेट घेतली असून, त्यांनी महापौरांशीसुद्धा याबाबत चर्चा केली आहे. मात्र, तरीदेखील ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्‍त केले आहे. दोन वेळेस पाणी देण्याची घोषणा करणाऱ्या नेत्यांनी आता एक वेळेस तरी पूर्णपणे पाणी द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. नगरसेवक व महापौरांना सांगूनही समस्या सुटत नसल्याने आता थेट प्रशासनाशीच पत्रव्यवहार करून येथील समस्या लक्षात आणून देण्यात येत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही या समस्या सुटल्या नाहीत, तर थेट मोर्चा काढू, असा इशाराही प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर श्रद्धा बेंडाळे, वासुदेव बारीक, मनीषा चव्हाण, वैशाली पाटील, गजानन पाटील, युवराज निकम, हितेंद्र भाळे, सरोज घरत, रामभाऊ जगताप, इंद्रायणी पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.

--

अस्वच्छतेने आरोग्य धोक्यात

या परिसरात अनेक रिकामे भूखंड असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर गवत साचलेले अाहे. त्यामुळे या भागात डासांचे प्रमाणही वाढले आहे. सध्या पावसामुळे या ठिकाणी चिखल व पाण्याचे डबके तयार झाले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. एकीकडे पाणी नसताना दुसरीकडे आरोग्याचाही प्रश्न उभा राहिल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी सदनिका घेतल्या असून, नियमितपणे महापालिकेचे कर भरले जात असतानाही सेवा का मिळत नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

--

ना पाहणी, ना निराकरण...

चेतनानगर भागातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या भागातील भाजपाच्या नगरसेविकेने काही महिन्यांपूर्वी थेट मोर्चा काढून आंदोलन केले होते. त्यानंतर या भागाची पाहणी करून ही समस्या सोडविण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, ना ही पाहणी झाली, ना समस्या सुटली. त्यामुळे आता नगरसेवकांचा प्रशासनावर वचक राहिलेला नसून, नागरिकांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून, प्रशासन याकडे लक्ष का देत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शोध २५ वर्षांपूर्वी हरवलेल्या आईवडिलांचा!

0
0

ashwini.kawale@timesgroup.com
Tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : चिंच तोडण्यासाठी भरदुपारी पाच व सात वर्षांची दोन भावंडे घराबाहेर पडली. मात्र, वडिलांच्या धाकाने पुन्हा घरी परतलीच नाहीत. आईवडिलांपासून तुटलेल्या या निरागस भावंडांना एकमेकांचा आधार होता; पण नियतीला तेही मंजूर नव्हते. काही दिवसांतच या भावंडांचीही ताटातूट झाली. या घटनेला आता २५ वर्षे लोटली आहेत. भाऊ, आईवडिलांची आठवण तिला कासावीस करीत आहे. एका अनावर ओढीने आता ती आईवडील, भावाचा शोध घेत आहे. ही करुण कहाणी आहे लखविंदर कौर बलदेव सिंग हिची. सध्या ती नाशिकमध्ये वास्तव्यास आहे.

लखविंदर कौरची ही कहाणी एका चित्रपटाला शोभेल अशी आहे. साधारण १९९१-९२ मधील ही घटना आहे. नांदेडमधील उन्हाळ्याचे दिवस होते... बाहेर प्रचंड ऊन. दुपारची वामकुक्षी घेताना वडिलांनी मुलांना तंबीच दिली, की कोणीही उन्हात घराबाहेर पडायचं नाही; पण वडिलांचा डोळा लागला नि मुलांच्या बाललीला सुरू झाल्या. मोठ्या बहिणीने सांगितले, जा चिंचा घेऊन या. बहिणीचा आदेश शिरसावंद्य मानत पाच वर्षांची लखविंदर आणि सात वर्षांचा कवतार चिंचा तोडण्यासाठी घराबाहेर पडले; पण घरी परतण्यास उशीर झाला. वडिलांचा धाक इतका, की ती दोन्ही भावंडे घरी न परतता चक्क एका ट्रेनमध्ये बसली आणि इथेच या भावंडांचं घर कायमचं सुटलं.

लखविंदर आणि कवतार या दोन भावंडांचा ट्रेनमधील अनोळखी प्रवास सुरू झाला. दोघेही कमालीची भेदरली होती. ही मुले भिवंडीत येऊन पोहोचली. ही दोघेही पोलिसांच्या हाती लागली आणि त्यांची रवानगी बालगृहात झाली. या भावंडांनी दिलेल्या पत्त्यावर पोलिसांनी शोधाशोध केली; पण हाती काहीही लागले नाही. लखविंदर कौरची रवानगी भिवंडीहून पैठण, राहुरी आणि नंतर नाशिक अशी झाली. कुटुंबातील एकमेव जिवाभावाचा जो भाऊ सोबत होता, त्याची साथही भिवंडीतच सुटली. आईवडिलांनंतर झालेली ही दुसरी ताटातूट लखविंदर कौरला कायम अस्वस्थ करीत राहिली.

इकडे लखविंदर नाशिकमध्ये शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहात दाखल झाली. दहावीपर्यंत तिने शिक्षण घेतले. पुढे आयटीआय, शिवण क्लास करून स्थैर्य मिळवले. कालांतराने नाशिकमधील रिकी धोंड यांच्याशी तिचा विवाह झाला. मात्र, कुटुंबाची आठवण तिला आजही स्वस्थ बसू देत नाही. आईवडील, भावंडे यांचे नाव निघताच त्यांच्या अनावर ओढीने लखविंदरच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. दीड महिन्यापूर्वी तिने कुटुंबाचा शोध घेण्याचा चंग बांधला. ‘एकच धर्म मानवधर्म’ या सामाजिक संस्थेच्या प्रमुख सुलक्षणा आहेर यांच्या मदतीने तिने आता कुटुंबाची शोधयात्रा आरंभली आहे.

भावाचे ते शब्द...

लखविंदर आठवीत असताना २००२ मध्ये भाऊ कवतार याचा एकदा शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहात फोन आला- ‘‘मी भिवंडीत आहे. पुण्यात नोकरीला लागल्यानंतर तुला घेऊन जाईन.’ भावाच्या या आश्वासक शब्दांनी तिला कुटुंबाची कमालीची ओढ लागली; पण भाऊ कधीच तिला घ्यायला आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीमियम दरवाढीवर खल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील अन्य महापालिकांप्रमाणेच नाशिक महापालिकेने शहरातील प्रीमियम दरवाढीसंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. विकासकामांसाठी निधी आवश्यक असतो. त्यामुळे महापालिकेला उत्पन्नाची साधने वाढवावी लागतात. आम्ही प्रीमियम दरात वाढ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून, त्याबाबत शासनच अंतिम निर्णय घेईल, असे स्पष्टीकरण आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे.

महापालिकेने शहरात बांधकाम व्यवसायासाठी लागणारा प्रीमियमचा दर ४० टक्क्यांवरून ८० टक्के केला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी शासनाकडे पाठविला आहे. त्यावरून शहरातील बांधकाम व्यावसायिक संतप्त झाले असून, या निर्णयाने शहरातील घरांच्या किमती वाढतील, असा आरोप क्रेडाईसह चार संघटनांनी केला आहे. टीडीआर लॉबीसाठीच हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना आयुक्त कृष्णा यांनी प्रीमियम दरवाढीचे समर्थन केले आहे. विकासकामांसाठी महापालिकेला निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रीमियम दरवाढ हासुद्धा उत्पन्नाचा मार्ग आहे. नाशिक महापालिकेनेच नव्हे, तर राज्यातील अन्य महापालिकांनीही अशा प्रकारचा प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय हा सरकारचे घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

---

घरकुलाचा अहवाल मागविला

शिवाजीवाडी घरकुल प्रकरणात उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्याकडून फक्त अहवाल मागविला आहे. त्यांच्या अहवालानंतरच अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बहिरम यांच्याकडून केल्या जाणाऱ्या चौकशीला पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे.

-----------------------

ग्राहक पंचायतीचे मुख्यमंत्र्यांना साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या नवीन विकास आराखड्यानुसार बांधकामासाठी सध्या आकारण्यात येणाऱ्या प्रीमियम एफएसआयच्या दरात मोठी वाढ करण्याच्या हालचाली सुुरू आहेत. अशा स्थितीत या विषयात त्वरित हस्तक्षेप करून हा दरवाढीचा प्रस्ताव अमान्य करावा आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळवून द्यावा, असे साकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय सहसचिव आणि राज्याच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे सदस्य प्रा. दिलीप फडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे घातले आहे.

प्रा. फडके यांनी म्हटले आहे, की शहर विकास आराखडा फेब्रुवारीत मंजूर झाल्यानंतर जुलै महिन्यात सरकारने प्रीमियमचे दर निश्चित केले. नगररचना संचालक कार्यालयाकडून दहा ते पंधरा टक्के दर प्रस्तावित केले असताना जुलैमध्ये सरकारकडून ४० टक्के दर निश्चित झाला. हा दर निश्चित होऊन दोन महिने उलटत नाहीत, तोच महापालिकेने निवासी दरांत ७० टक्के, तर औद्योगिक प्रीमियमच्या दरात ८० टक्के म्हणजे दुप्पट दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, असे झाल्यास नाशिकमधील घरांच्या किमतीत प्रचंड वाढ होऊन घराचे स्वप्न भंग होण्याची धास्ती नाशिकमध्ये घर घेणाऱ्या सर्वसामान्यांना वाटते. ही दरवाढ झाल्यास बांधकामावरील खर्च प्रचंड वाढून आपोआप घरांच्या किमती साधारणतः एक हजार रुपये चौरस फूट इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्याचा सर्वांत मोठा फटका घर खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांनाच बसणार हे उघड आहे. विशेषत: २०२२ पर्यंत सर्वांना परवडतील अशा घरांची सोय व्हावी, असे उद्दिष्ट केंद्र आणि राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यामध्ये या अनावश्यक प्रीमियमच्या दरवाढीमुळे अडचणी निर्माण होणार आहेत, असेही त्यांना म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृहातील सीसीटीव्हीस‌ शिवसेनेचा विरोध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालिकेच्या सभागृहात होणारी कोंडी व वारंवार होणाऱ्या गोंधळावर सत्ताधाऱ्यांनी अफलातून पर्याय शोधून काढला आहे. सभागृहात प्रथमच आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. सत्ताधारी या सीसीटीव्हीचा वापर विरोधकांच्या गोंधळाचा पुरावा म्हणून करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभागृहात या तिसऱ्या डोळ्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला आहे. सीसीटीव्ही मुख्यमंत्र्यांच्या रिमोट कंट्रोलसाठी आणि नगरसेवकांना नजरकैदेत ठेवण्यासाठी केला जाणार असल्याचा आरोप करत, महासभेचे थेट प्रक्षेपण करण्याचेच आवाहन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केले आहे.

भाजप सत्तेत आल्यापासून महासभेत विरोधकांचाच वरचष्मा राह‌िला आहे. गेल्या अकरा महासभांमध्ये भाजपचे बहुमत राहिले तरी, विरोधक शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच वरचढ राहिले आहेत. अनेकदा सत्ताधाऱ्यांची कोंडी होऊन पालिकेत गोंधळ निर्माण झाला आहे. विरोधकांनी राजदंडही पळवण्याचा प्रयत्न केला. विरोधकांकडे अभ्यासू नगरसेवकांची संख्या असल्याने भाजपची अनेकदा सभागृहात फजितीही झाली आहे. विरोधकांचा सामना करण्यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांचा अभ्यासवर्ग घेतला असला तरी, त्याचाही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार होणारा गोंधळ आणि कोंडी फोडण्यासाठी आता थेट विरोधकांवरच तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवण्याचा पर्याय निवडण्यात आला. प्रशासनाच्या वतीने गुरुवारी पालिकेच्या महासभेत सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भातील निविदा काढण्यात आली आहे. सव्वादोन लाख रुपये खर्चून १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल

दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. नगरसेवकांवर विश्वास नसल्याने मुख्यमंत्र्यांना थेट रिमोट कंट्रोल ठेवायचा आहे. शहर असुरक्षित असताना शहरात सीसीटीव्हीची गरज आहे. परंतु, महासभेत गरज नसताना सीसीटीव्ही बसविले जात असल्याने थेट नगरसेवकांनाच कैद करण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. शिवसेनेच्या या निर्णयाला विरोध असून, महासभेत त्याचे पडसाद दिसतील, असा दावा त्यांनी केला आहे. तुम्हाला एवढा पारदर्शक कारभार हवा असेल, तर थेट महासभेचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिक करणार नांदगावात आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव शहर परिसरातील रस्त्यांवरचे खड्डे येत्या दहा दिवसात बुजले नाही तर आंदोलनाचा छेडण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ नागरिक संघ व विविध सामाजिक संस्थांनी दिला आहे. शुक्रवारी तहसीलदार चंद्रकांत देवगुणे व पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नांदगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत ज्येष्ठ नागरिकांना संवाद साधला.

नांदगाव शहरातील स्टेट बँक, गोदावरी हॉस्पिटल, गुप्ता लाँन्स, हुतात्मा चौक, माल धक्का, बस डेपो, कॉलेज रोड, मनमाड-मालेगाव मार्ग आदी भागात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे कोण दुरुस्त करणार आणि केव्हा करणार, असा प्रश्न नांदगावकरांना पडला आहे. काही दिवसांपासून हा प्रश्न नांदगांवकराना पडला आहे. या खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक संघाने उपस्थित केला.

शुक्रवारी तहसीलदार देवगुणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जेष्ठ नागरिक संघ व सर्व सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांनी येत्या दहा दिवसात रस्त्यातील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्त न झाल्याचे सत्यागह करण्याचा इशारा दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता पाटिल यांनी शुक्रवारपासूनच रस्त्यावर खडी टाकणार असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विभागाचा कर्मदरिद्रीपणा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कांदा साठवणुकीची सोय नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल किमतीत नाईलाजास्तव कांद्याची विक्री करावी लागत असली तरी दुसरीकडे राष्ट्रीय कृषिविकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठीचा कोट्यावधी रुपयांचा निधी प्रशासनाने खर्च केलेला नाही.

नाशिक विभागाला कांदा चाळी उभारणीसाठी मिळालेल्या २९ कोटी ९३ लाख ४५ हजारपैकी केवळ २१ कोटी ३५ लाख ८९ हजार रुपये इतका निधी खर्च करण्यात आला. उर्वरित ८ कोटी ५७ लाख ५६ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. कृषी विभागानेच कर्मदरिद्रीपणामुळे हजारो शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासूनही वंचित राहावे लागले आहे.

राष्ट्रीय कृषिविकास योजनेंतर्गत कांदाचाळ लाभार्थींची निवड करून शेतकऱ्यांना कांदाचाळ उभारण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. विभागात कांद्याचे भरमसाठ उत्पादन होते. मात्र, साठवणुकीच्या सुविधेअभावी शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने कांद्याची विक्री करावी लागते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. कांदा चाळ असेल तर शेतकरी मालाची साठवणूक करू शकतो. त्यासाठी राष्ट्रीय कृषिविकास योजनेतून निधीही दिला जातो.

अपयशामुळे निधीत कपात

२०१६-१७ या वर्षी विभागात ८५ हजार २८० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळी उभारण्याचे लक्षांक होते. त्यापैकी ६१ हजार ४१ मेट्रिक टन क्षमतेचे लक्षांक साध्य झाले. विभागात ३ हजार ३३२ इतक्या कांदा चाळी उभारण्यात आल्या. मात्र, लक्षांक साध्य करण्यात कृषी विभागाला अपयश आल्याने ८ कोटी ५७ लाख ५६ हजार रुपयांचा निधीही वापरात आला नाही. चालू वर्षासाठी निधीत कपात करून यंदा कांदाचाळी उभारण्यासाठी अवघ्या १७ कोटी ९३ लाख रुपये निधी वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

किचकट अटी; निधीही अल्प

कांदा चाळ उभारण्यासाठी अर्थसहाय्य मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे दिव्यच पार करावे लागते. त्यासाठीच्या अटी अत्यंत किचकट आहेत. चार वर्षांपूर्वीच्या दरांप्रमाणेच प्रति मेट्रिक टन ३ हजार ५०० हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान मिळते. एका शेतकऱ्याला केवळ २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठीच हा लाभ मिळतो. मात्र, कांदा चाळ उभारणीस महागाईमुळे प्रत्यक्षात चार पट जास्त खर्च येतो.

विभागातील कांदा चाळीसाठी खर्च झालेला निधी

जिल्हा......कांदा चाळ लक्षांक.......कांदाचाळ साध्य......शिल्लक निधी (रुपये लाख)
नाशिक......२,२३४.९०..................१,५२७.२०.................७०७.७०
धुळे............५०९.५५....................४३०.९५..................७८.६०
नंदुरबार ..........८७.९३.....................४५.८२............४२.११
जळगाव.........१६१.०७..................१३१.९२............२९.१५
एकूण..........२,९९३.४५............२,१३५.८९............८५७.५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीने तोडले कुंपण

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर शेतकऱ्याने उभारलेले कुंपण शुक्रवारी तोडण्यात आल्याने जागेबाबतच्या वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

जानेवारी २०१७ मध्ये या जम‌िनीचे मूळ मालकांचे वारसदार मोरे कुटुंबीयांनी तारेचे कुंपण घातले होते. ही जागा बाजार समितीची असून, हे कुंपण तोडण्यात येईल, असा इशारा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र मोरे यांनी कोर्टाकडून स्थग‌ितीचे आदेश मिळवले होते. काही दिवसांपूर्वी या स्थग‌ितीबाबत बाजार सम‌ितीचे अपील न्यायालयाने मान्य केले. शुक्रवारी सकाळी बाजार समिती पदाधिकारी, संचालक आणि कर्मचारी आदींसह शेतकऱ्यांनी याबाबतच्या आदेशाची प्रत पोल‌िस ठाण्यात सादर केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांसह या जागेवरील कुंपण तोडण्यात आले. यावेळी शेतकरी मोरे कुटुंब‌ियांनी विनंती केली. मात्र ती अमान्य करण्यात आली. या जागेवर फुलमाळा विक्रेत्यांनी झोपड्या उभारल्या आहेत. त्या देखील हटविण्यात आल्या. या प्रसंगी सभापती शिवाजी चुंबळे, उपसभापती संजय तुंगार, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, रवी भोये, भाऊसाहेब खांडबहाले, विमल जुंद्रे, चंद्रकांत निकम, रूची कुंभारकर, पप्पू खंडारे, प्रवीण नागरे, सचिव निकाळे, अभियंता राहडे आदींसह मोठा जमाव उपस्थित होता. मोरे कुटुंब‌ियांच्या वतीने काम पाहात असलेल्या वकिलांनी याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांग‌ितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादकांचा रास्तारोको

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा बाजार समितीत गुरुवारच्या (दि. १२) तुलनेत कांद्याला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव कमी मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. बाजार समितीच्या गेटसमोरील कळवण-देवळा रस्त्यावर त्यांनी तासभर रास्ता रोको केला. बाजार समितीचे सभापती अशोक आहेर यांनी कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत दुपारच्या सत्रात कांदा खरेदी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दुपारच्या सत्रात कांद्याला सरासरी २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

दोन महिन्यांपासून कांद्याला १५०० ते २००० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळत होता. मागील पंधरा दिवसांपासून कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी २३०० ते २५०० तर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. आगामी काळात दिवाळीत बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव बंद राहणार असल्याने व दिवाळीला दोन पैसे मिळावे या उद्देशाने दोन दिवसांपासून कांद्याची प्रचंड आवक वाढली आहे. देवळा बाजार समितीत गुरुवारपर्यंत कांद्याला सरासरी २३०० ते २५०० रुपयांपर्यंत भाव होता; मात्र शुक्रवारी अचानक १८०० ते १९०० रुपयांनी कांद्याचे लिलाव सुरू झाल्याने शेतकरी संतापले .त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून बाजार समितीच्या गेटसमोरील कळवण-देवळा मार्गावर अचानक रास्तारोको आंदोलन छेडले. परिणामी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. यावेळी दूरपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली.

बाजार समिती पदाधिकाऱ्यांची शिष्टाई

बाजार समितीचे सभापती अशोक आहेर, सचिव दौलतराव शिंदे यांनी कांदा व्यापाऱ्यांची तातडीची बैठक घेत या प्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या तुलनेत देवळा बाजार समितीत कांद्याला भाव देण्यासाठी व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविल्यानंतर आणि तसा निरोप शेतकऱ्यांना दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. बाजार समितीत दुपारी तीन वाजता झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी २१०० ते २२०० रुपयांचा भाव मिळू शकला. दुपारच्या सत्रातील कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. आंदोलनात युवा शेतकरी महेंद्र आहेर, नाना मगर, विनोद देवरे, राजेश आहेर, उमेश आहेर, भाऊसाहेब देवरे, विजय सोनवणे, सुरेश जाधव, विश्वास पाटील आदींनी सहभाग घेतला.

शेतकऱ्यांना आस पाठबळाची

कसमादे परिसरातील शेतकऱ्यांना चार ते पाच वर्षांपासून अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. डाळिंब, टमाटे यांना कवडीमोल भाव मिळाल्याने संपूर्ण शेतकऱ्यांना आता कांद्यावरच एकमेव आशा उरली आहे. कांद्याला तुलनेत अधिक भाव मिळवून देण्यासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

देवळा बाजार समितीतील कांद्याला मिळालेला भाव

वार............ मिळालेला भाव..................झालेली आवक (क्विंटल)
- सोमवार ........ १५०० ते २८५५ (सरासरी २६००)........१० हजार
- मंगळवार ........ १३०० ते २७२७ (सरासरी २५५१) ........ ६ हजार
- बुधवार ........ १०५० ते २६४२ (सरासरी २४५१) ........ ७ हजार ५००
- गुरुवार ........ ११०० ते २६७० (सरासरी २४५१) ........ ९ हजार
- शुक्रवार ........ १००० ते २५०० (सरासरी २१५०) ........ १३ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाणेकरांचे आरोग्य अस्वच्छतेमुळे धोक्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहर स्वच्छतेच्या गप्पा मोठ्या प्रमाणात होत असल्या तरीही शहरातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः ढासळली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग, पाण्याचे डबके साचले आहेत. डास व मच्छरांची उपत्ती वाढून साथींच्या आजारांनी ठाण मांडले आहे. यामुळे शहरात व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. शहारातील ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून पाठ फिरवलेल्या वरूण राजाने परतताना शहराकडे मोर्चा वळवला आहे. शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. परिणामी शहरात सर्वत्र पाण्याचे डबके, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नववसाहतीत दुर्गंधी पसरली आहे. नववसाहतील अद्यापही बहुतांश भागात रस्ते कच्चे आहेत. त्यावर खड्डे पडल्यामुळे पाण्याचे डबके तयार होत आहेत. काही भागात तर गवताचे साम्राज्य वाढल्याने डासांची निर्मिती झाली आहे. परिणामी सांयकाळी शहरासह नववसाहतील डासांचा हल्ला होतो. यामुळे डेंग्यू, मलेरिया, थंडी, ताप असे आजाराचे प्रमाण वाढले आहे.पालिका प्रशासनाने सुरुवातीला शहरातील वसाहतीत वाढलेले गवत काढले. मात्र परतीच्या पावसाने ही समस्या जैसे थे झाली. बहुतांश ठिकाणी तणनाशक मारल्याने स्वच्छता दिसत असली तरी या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांना मिळणार सानुग्रह अनुदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. एक हजार रुपये अनुदान देण्यास महापालिका प्रशासनाने संमती दर्शविली आहे.

दिवाळसणानिमित्त तीन हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, या मागणीसाठी महापालिका म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने तीन दिवसांपासून महापालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू होते. महापालिका आयुक्त धायगुडे व कामगारांचे शिष्टमंडळ यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. यात कामगारांना एक हजार रुपये अनुदान देण्यास संमती देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. कामगार सेनेचे अध्यक्ष भारत बेद यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकानुसार दिवाळीनिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासन ही रक्कम देण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला होता. याबाबत सोमवारपर्यंत (दि. १६) निर्णय न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

दोन दिवसात काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी आंदोलकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारापुढे रास्ता रोको आंदोलन केले. इमारती बाहेर बसून महापालिकेचे संपूर्ण कामकाज ठप्प केले. दरम्यान, महापालिका आयुक्त संगीत धायगुडे यांनी आपल्या दालनात आंदोलनकऱ्यांचे शिष्टमंडळ बोलवले. त्यांच्याशी चर्चा करून शेवटी एक हजार रुपयाचे अनुदान देण्याचे मान्य केले. यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

महापालिका तिजोरीत खडखडाट
महापालिका कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी आंदोलन केले. आयुक्त धायगुडे यांनी शिष्टमंडळपुढे स्पष्ट भूमिका घेत महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतांना अनुदान कसे द्यायचे? असा सवाल केला. महापालिकेचे उत्पन्न अत्यल्प असल्याने आर्थिक स्थिती बिकट असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक, मुख्याध्यापकांची उद्या पिंपळगावला बैठक

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

जिल्हा टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शिक्षकेत्तर संघ आदी घटकांची बैठक रविवारी (दि. १५) दुपारी दोन वाजता येथील पिंपळगाव हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे. आगामी शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

शिक्षक मतदारनोंदणी, निवडणुकीची दिशा व रूपरेषा ठरविण्यासह निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. तसेच उमेदवारीबाबत शिक्षक मतदारांचे मनोगत जाणून घेतले जाणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर असा शिक्षण मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून टीडीएफची अधिकृत उमेदवारी नाशिक जिल्ह्यालाच मिळावी, यासाठी विशेष नियोजन व व्यूहरचना केली जाणार आहे. जिल्ह्यातील टीडीएफची एक संघशक्ती विचारात घेता जिल्ह्याला उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे याबाबत आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि शिक्षक नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक संघाचे सभासद व शिक्षकेत्तर संघाच्या सभासदांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नानासाहेब बोरस्ते, शिवाजी निरगुडे, रवींद्र मोरे, फिरोज बादशाह, कैलास देवरे, गुफरान अन्सारी, कचेश्वर बारसे, गोरख सोनवणे, किशोर जाधव आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदूबाबांकडून श्रद्धेचे बाजारीकरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अंधश्रद्धा ही देशास लागलेली कीड आहे. देशात अंधश्रद्धा वाढत असल्याने भोंदूबाबांचा धंदा जोरात आहे. देवदेवतांच्या नावावर विविध प्रलोभने दाखवून श्रद्धेचे बाजारीकरण केले जात आहे. त्यासाठी जादूटोणा प्रतिबंधक कायदा प्रभावीपणे वापरला पाहिजे, असे प्रतिपादन जादूटोणा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी केले.

तालुक्यातील सवंदगांव येथील प्राथमिक शाळेत संत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक अण्णा चव्हाण, भगवान सोनवणे, चंदन गजेंद्र आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी अनेक प्रयोग दाखवून त्यामागील वैज्ञानिक सत्य सांगितले. प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहिली पाहिजे, तसे केल्यास अनेक समस्या सुटू शकतील. मंत्राने विंचू किंवा सापाचे विष उतरत नाही. अशावेळी संबंधित व्यक्तीस थेट दवाखान्यात न्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

जादूटोणा हा कायदा कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही. तो मानवी कल्याणासाठीच निर्माण करण्यात आला आहे. या कायद्याचा वापर केल्यास अनेक भोंदूबाबा गजाआड होतील. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात बुवाबाजीवर विश्वास ठेवला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारिरीक नुकसान होते. मात्र, भावनेचा विषय म्हणून त्याकडे लक्ष देणे टाळले जाते. आता त्यावर विचार करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
भगवान सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक चव्हाण यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोगांचा वाढता प्रकोप

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूसह विविध साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने दहा दिवसात वर्षभराचे रेकॉर्ड मोडले आहेत.

ऑक्टोबरच्या गेल्या ११ दिवसात डेंग्यू संशयित रुग्णांचा आकडा १०६ वर पोहचला असून ५८ रुग्णांचे अहवाल हे पॉझीटिव्ही आले आहेत. तसेच याच काळात स्वाइन फ्लूचे २२ रुग्ण पॉझीटिव्ह आले असून खासगी हॉस्पिटलमध्ये संशयितांचा आकडा मोठा आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षात स्वाइन फ्लू रुग्णांच्या मृत्यूने सत्तरी पार केली असून आतापर्यंतचे हे रेकॉर्ड मानले जात आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू व डेंग्यू संदर्भातील महापालिकेच्या उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत.

परतीच्या पावसाने साथीच्या आजारांना पूरक असे हवामान तयार झाल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्वाइन फ्लू व डेंग्यूने सप्टेंबरपेक्षाही जास्त फैलाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केला आहे. चालू महिन्यात ११ ऑक्टोबरपर्यंत महापालिका क्षेत्रातील २२ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यापैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. तर महापालिका बाह्य क्षेत्रातील नऊ जणांना लागण झाली असून त्यापैकी तिघांचा बळी गेला आहे. सप्टेंबर महिन्यात महापालिका क्षेत्रातील ४८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला. तर महापालिका बाह्य क्षेत्रातील ५७ जणांना लागण होऊन ७ जणांचा बळी गेला. १ जानेवारी ते ११ ऑक्टोबर या काळात स्वाइन फ्लू बळींची संख्या ७० वर पोहोचली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील ३० तर महापालिका बाह्य क्षेत्रातील परंतु शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ४० जणांचा समावेश आहे.

डेंग्यूचा वाढता विळखा

स्वाइन फ्लू प्रमाणात डेंग्यूही आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. डेंग्यूसंदर्भात महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या फेल ठरत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले. सप्टेंबरमध्ये डेंग्यू सदृश आजाराचे तब्बल २७२ रुग्ण आढळले. त्यापैकी १२२ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसाने डेंग्यू संशयितांची संख्या ही १०६ झाली असून त्यात ५६ जणांना डेंग्यूची लागण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images