Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गांधीनगरला रामलीलेची जय्यत तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
सर्व धर्मियांचा सहभाग असलेल्या गांधीनगरमधील रामलीलेच्या रंगीत तालमींना सुरुवात झाली आहे. नवरात्र काळात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत रामलीला सादर करण्यात येते. गांधीनगरच्या रामलीला मैदानावर सादर होणाऱ्या रामलीला व रावणदहनासाठी येथील कलावंतांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
समितीचे यंदाचे ६२ वे वर्ष असून दसऱ्याच्या दिवशी होणारा रावणदहन हे येथील मुख्य आकर्षण आहे. गांधीनगर येथे सार्बोजनीक दुर्गापूजा समितीतर्फे बंगाली बांधवांचा साजरा होणारा दुर्गा पूजा महोत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या महोत्सवाला ६४ वर्षांची परंपरा असून यंदाही महोत्सवाच्या तयारीला सरुवात झाली आहे. यासाठी मंडप उभारणीच्या काम सुरू झाले असून दुर्गामातेची मोठी व आकर्षक मूर्ती साकारण्यात मूर्तिकार मग्न आहेत.

दुर्गा मंदिराची रंगरंगोटी
नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक मंडळांकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नाशिकरोडची ग्रामदेवता समजल्या जाणाऱ्या दुर्गा उद्यान येथील देवी मंदिराची साफसफाई, रंगरंगोटी, मंडप उभारणी आदी कामे सुरू झाली आहेत. बाजारात घट व पूजेचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. देवीची मूर्ती बनविणारे मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवित आहेत. घटासाठी लागणारे दगडी दिवे तयार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस कर्तव्य मेळाव्यास आज प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी व व्यावसायिक गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा १५ वा महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याचा बुधवारी (दि. १३) महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) येथे सांयकाळी चार वाजता प्रारंभ होणार आहे.
या कर्तव्य मेळाव्यामध्ये घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, कम्प्युटर स्पर्धा, श्वान स्पर्धा, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडिओग्राफी, विज्ञानाची तपासास दमत अशा सहा स्पर्धा प्रकारमध्ये स्पर्धा घेतल्या जाणार आहे. वरील स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची आगामी आखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड करण्यात येत. या उपक्रमाची १९५३ मध्ये सुरुवात झाली तेव्हापासून दरवर्षी अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. सदर स्पर्धेमध्ये देशातील सर्व राज्यातील पोलिस दले तसेच केंद्रीय पोलिस संघटना आपले संघ पाठवून आपल्या व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवतात. महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये महाराष्ट्र पोलिस दलाची कामगिरी ही उत्रोत्तर उत्कृष्ट राहिलेली आहे. महाराष्ट्रातून नऊ पोलिस आयुक्तालये, नऊ पोलिस परिक्षेत्रे, राज्य राखीव पोलिस गट, बिनतारी संदेश विभाग, फोर्स वन मुंबई व गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, असे एकूण २३ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. अंदाजे या स्पर्धेसाठी तब्बल ४५० स्पर्धक सहभागी होणार आहे.

महाराष्ट्र अव्वल स्थानी
स्पर्धेचा प्रारंभ १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून, समारोप १८ सप्टेंबर रोजी सांयकाळी ४ वाजता होईल, असे महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या आयोजन समितीने कळवले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये म्हैसूर, कर्नाटक येथे झालेल्या ६० व्या आखिल भारतीय कर्तव्य स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्तम कामगिरी केली. पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र संघाने देशामध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला. यात तीन सुवर्ण, दोन रजत आणि तीन कांस्य पदाकांचा समावेश आहे. तसेच सांघिक कामगिरीमध्ये फिरता चषक पटकावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन समितीच्या उमेदवारांची आज बैठक

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ३३ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित सात जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या सात जागा लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेची माह‌िती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी त्यांच्या दालनात बुधवारी (दि. १३) सकाळी साडेदहा वाजता बैठक घेणार आहेत.
अवघ्या पाच दिवसांनी म्हणजेच १७ सप्टेंबरला जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होणार आहे. मतदानाची तसेच मतमोजणीची ठिकाणेही जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी उमेदवारांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. सात जागांसाठी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा
तालुक्यातील वीरगावपाडे (ता. बागलाण) येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थ्यांचा मंगळवारी दुपारी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सतीश रंजन बागूल (९, रा. मळगाव, ता. बागलाण) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. याच आश्रमशाळेतील दोन मुले जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन-तीन दिवसांपासून दोन्ही विद्यार्थ्यांना ताप, खोकला, उलट्यांचा त्रास होत होता. वास्तविक या विद्यार्थ्यांना तत्काळ औषोधोपचार करणे आवश्यक होते. मात्र, आश्रमशाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप आहे. अखेर सतीश बागूलसह अंकुश सोनवणे व सोपान भोये यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी आणण्यात आले.
या विद्यार्थ्यांना अधीक्षक डी. एस. सोनार यांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच खालावल्याने विद्यार्थ्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सतीशचा मृत्यू झाला.

पालकांचा संताप
वीरगावपाडे येथील आश्रमशाळेत अन्य १५ ते २० विद्यार्थांनाही असाच त्रास होत आहे. या आश्रमशाळेत एकूण ३५७ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक एस. एस. कापडणीस, शिक्षण विस्तार अधिकारी कळवण प्रकल्प मुसळे आदींसह पालक शाळेत उपस्थ‌ित होते. संतप्त पालकांनी संपूर्ण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्त तपासून देण्यात अक्षम्य हलगर्जीपणा

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
रुग्णाला रक्त देण्यापूर्वी त्या रक्ताच्या पिशवीची तपासणी आवश्यक असते. परंतु, सिव्हील हॉस्पिटलमध्ये रक्त तपासण्यात अक्षम्य हलगर्जीपणा केला जात असल्याचा प्रकार मंगळवारी पहावयास मिळाला. रक्ताच्या पिशव्या तपासण्यासाठी हॉस्प‌िटलमधील चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याला अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागत असल्याचे पहावयास मिळाले.
प्रसूतीनंतर महिलेला प्रसूती पश्चात विभागात ठेवण्यात येते. गरज भासल्यास या महिलांना रक्ताच्या पिशवीद्वारे रक्त पुरवठा करावा लागतो. त्यासाठी या रक्ताची तपासणी करणे आवश्यक असते. रक्तगट व तत्सम बाबी तपासून पहाव्या लागतात. त्यासाठी एक महिला कर्मचारी टोकरीमध्ये रक्ताच्या पिशव्या घेऊन आरएमओंच्या दालनात गेली. परंतु, तेथील अधिकारी कर्मचारी हरविलेली वस्तु शोधण्यात व्यस्त होते. तेथील नर्सनेही ही जबाबदारी झटकली. या महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी तिला अन्य एका अधिकाऱ्यांकडे पाठविले. परंतु, या अधिकाऱ्यानेही रक्त तपासून देण्यास नकार दिला. त्यानंतर तिने प्रशिक्षणार्थी नर्सेसकडून रक्त तपासून घेतले. परंतु, तोपर्यंत एक तास खर्ची पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचे २३ नवे इन्क्युबेटर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाच महिन्यात इन्क्युबेटर अभावी १८७ अर्भक मृत्यू प्रकरणाची महापालिकेनेही गंभीर दखल घेतली असून महापालिका हॉस्पिटलमध्येही इन्क्युबेटर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेच्या सहा रुग्णालयांमध्ये १७ इन्क्युबेटर असून त्यांची संख्या आता ४० वर नेण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.

महापालिका हॉस्पिटलमध्ये नव्याने २३ इन्क्युबेटर बसवले जाणार असून हॉस्पिटलमधील अर्भकांचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटर असतांनाही सिव्हिलमध्ये अर्भक पाठविण्याच्या सूचना देणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

सिव्हिलमधील नवजात अर्भकांची इन्क्युबेटर अभावी १८७ बालकांचे मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात सिव्हिलसह महापालिकेवरही दोषारोप केले जात आहे. सिव्हिलने इमारत बांधकामासाठी वृक्षप्राधिकरणाची परवानगी मिळाली नसल्याचा दावा करत, महापालिका हॉस्पिटलमधील अर्भकेही आमच्याकडे पाठविले जात असल्याचा आरोप केला होता. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सिव्हिलने केलेले आरोप हे पुराव्यानिशी फेटाळले. ऑगस्ट महिन्यात सिव्हिलमध्ये १२९ अर्भक दाखल करण्यात आले. त्यापैकी केवळ २२ अर्भक शहराच्या हद्दीतील होते. परंतु याच वेळी ग्रामीण भागातील काही अर्भके हे बिटको हॉस्पिटलमध्येही दाखल केले जातात असे सांगत, महापालिका मात्र भेदभाव करत नसल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. सोबतच आता महापालिका हॉस्पिटलमध्ये सध्या १७ इन्क्युबेटर आहेत. त्यापैकी १० इन्क्युबेटर एकट्या बिटको हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व सहा रुग्णालयांमध्ये नव्याने २३ इन्क्युबेटर बसवण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे सिव्हिलमध्ये शहरातील जाणारे अर्भक कमी होणार आहेत.

तर कठोर कारवाई

महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटर असतांनाही, सिव्हिलमध्ये अर्भके रेफर करणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांवर यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे. आपल्यावरील जबाबदारी टाळण्यासाठी असे प्रकारचे अर्भक सिव्हिलकडे रेफर केल्याचे आढळल्यास संबंधित डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांवर निलबंनाच्या कारवाईसह कठोर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

सिव्हिलचा दावा खोटा

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या नवजात बालकांच्या कक्षासाठी झाडे तोडण्याची परवानगी वृक्षप्राधिकरण देऊ शकत नाही, याची माहिती महापालिकेने ७ जून रोजीच कळवली होती, असा दावा आयुक्तांनी केला आहे. हायकोर्टाच्या आदेशान्वये एखाद्या इमारतीसाठी वृक्ष तोडायचे असतील तर त्यासाठी हायकोर्टाची परवानगी आवश्यक असल्याचे आदेश दिले आहेत. तशी तोंडी माहिती सहा महिन्यांपूर्वी तर अधिकृत पत्र सिव्हिल सर्जन यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सिव्हिलचा दावा खोटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसाद हिरेंविरुद्ध बंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे हे बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेत नाहीत. तसेच संचालक मंडळाला विश्वासात न घेता कामकाज करीत असल्याचा आरोप करीत बाजार समितीच्या सदस्यांनी त्यांचे अधिकार काढून घेण्याबाबत पत्र दिले आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेत सभापती प्रसाद हिरे यांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकत्र येत बंड पुकारले. त्यामुळे बाजार समितीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. मंगळवारी संचालक मंडळाची

मासिक सभा होती. या सभेच्या अजेंड्यावर नियमित कामकाजासंबंधीचे विषय होते. सभेला सभापती प्रसाद हिरे यांच्यासह संचालक अद्वय हिरे, गोरख पवार, गोविंद खैरनार, संग्राम बच्छाव, संजय घोडके आदींसह १८ सदस्य उपस्थित होते.

सभेतून हिरेंचा काढता पाय

सभेदरम्यान मात्र उपस्थित संचालकांनी सभापती संचालकांना विश्वासात न घेता कामकाज करीत आहेत. शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत, असा आरोप करीत सत्ताधारी शिवसेना व विरोधी भाजपचे सदस्य एकवटले. यामुळे सभापती हिरे यांनी सभेतून काढता पाय घेतला. प्रसाद हिरे सभेतून गेल्यानंतर उपस्थित संचालकांनी हिरे यांचे अधिकार काढून घेत उपसभापती सुनील देवरे यांच्याकडे ते देण्यात यावे, असे पत्र बाजार समिती प्रशासनास दिले.

प्रसाद हिरे एकाकी

कृउबामध्ये सेना व भाजपचे सामान ८-८ सदस्य असून, सभापती प्रसाद हिरेंना गळाला लावून शिवसेनेने सत्ता मिळवली होती. मात्र आता काँग्रेसचे प्रसाद हिरे एकटे पडले आहे. त्यांना पाठिंबा देणारे भुसे समर्थक संचालक व विरोधात असलेले अद्वय हिरे समर्थक संचालक यांच्यात झालेल्या दिलजमाईबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याबाबत दूरध्वनीवरून प्रसाद हिरे व अद्वय हिरे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.

‘त्या’ भूखंडावरून वाद?

याबाबत बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांनी ‘मटा’ला सांगितले की, सभापती हे संचालक मंडळाला विश्वासात घेत नाहीत. नियमित मासिक सभा होत नाहीत. त्यामुळेच आज मासिक सभेत प्रसाद हिरे यांच्या विरोधात सर्व १७ संचालक विरुद्ध सभापती असे चित्र निर्माण झाले. तसेच बाजार समितीच्या मालकीचा एक भूखंड सभापती यांनी व्यापारी असो. देवू केल्याचा देखील आरोप देवरे यांनी केला. हा भूखंड देण्याच्या हिरे यांच्या निर्णयच त्यांच्या विरोधात झालेल्या बंडामागील कारण असल्याच बोलले जात आहे.

प्रशासनासमोर पेच

बाजार समितीतील या अंतर्गत राजकारणात प्रशासनाची गोची झाली आहे. सभापतींचे अधिकार काढून घेण्याचा विषय मासिक सभेच्या अजेंड्यावर येणे अपेक्षित असते. तसेच तो ठराव बहुमताने मंजूर व्हावा लागतो. तसा विषय मंगळवारी झालेल्या मासिक सभेच्या अजेंड्यावर नव्हता. मात्र मासिक सभेत सभापतींच्या विरोधात सर्व संचालक गेल्यामुळे याबाबत काय निर्णय घायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नसती उठाठेव तर्फे ‘पितरांचा महोत्सव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्राद्ध कर्म करून लोकांऐवजी उपाशी गरजवंतांना एक घास द्या, या संकल्पनेतून नसती उठाठेव मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी (दि. १६) पितरांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गंगापूर रोड येथील नरसिंह नगरमधील हनुमान मंदिरात सकाळी ९ ते दुपारी २ या काळात हा कार्यक्रम होणार आहे.
नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे २००९ पासून पितरांचा महोत्सव हा उपक्रम आगळ्यावेगळ्या स्वरुपात राबविला जातो. आपल्या पूर्वजांविषयी प्रत्येकाच्या मनातच आदरयुक्त भावना असते. ही भावना प्रकट करण्यासाठी पितृपक्षात पूर्वजांचे स्मरणार्थ श्राद्ध कर्म करून लोकांना बोलवून जेवण देतात आणि पिंडदान करतात. तसेच पितरांच्या स्मरणार्थ काही दान करायला उद्युक्त होतात. हीच भावना लक्षात घेऊन मंडळाने श्राद्ध कर्म करून लोकांना जेवण देण्याबरोबरच उपाशी व गरजू लोकांसाठी एक घास या उफक्रमास द्या असे आवाहन लोकांना केले आहे. परिसरातील व्यक्तींकडून धान्य किंवा रोख रक्कम दान म्हणून स्वीकारली जाते.

दान देणाऱ्या व्यक्तीकडून सामूहिकपणे दान संकल्प विधी पुरोहितांमार्फत संपन्न केला जातो. आलेल्या रोख रकमेतून धान्य विकत घेऊन वेगवेगळ्या अनाथ व वृद्धाश्रम, मूकबधीर व अंध संस्थांना वाटप केले जाते. मागील वर्षी एकूण ५२ क्विंटल धान्य तेल व गुळाचे वाटप सिडको येथील दिलासा संस्था, नॅब संचलित अंधशाळा, गजानन आधाराश्रम खंबाळे, वैदिक ज्ञान विज्ञान संस्था केवडीबन, रामकृष्ण परमहंस आरोग्य संस्था त्र्यंबकेश्वर या संस्थांना देण्यात आले. मंडळाच्या कामास अधिकाधिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष बापू कोतवाल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारचे नाव खराब करता काय?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तुमची बदली करू का… प्रॉपर्टी चेक करू का…माझ्या मागे लागू नका…मी फार वाईट मंत्री आहे…सरकारचे नाव खराब करता काय…तुम्हाला शहर दिले आहे, ना मग काम का करत नाही…तुम्हाला ग्रामीण भागात पाठवू का…अशा शब्दात दस्तुरखुद्द उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कान टोचले.

येथील विभागीय आयुक्तालयाच्या नियोजन सभागृहात लोकप्रतिनिधींसमवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उर्जामंत्र्यांपुढे महावितरणच्या मुजोर व मनमानी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे धिंडवडे काढल्याने उर्जामंत्री संतापले.

शहरातील नागरिकांच्या वीज पुरवठ्याविषयक तक्रारींना महावितरणचे अधिकारी केराची टोपली दाखवितात, असाे आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला. त्यांनी थेट महावितरणच्या शहरातील दहा अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना सभागृहात पुढे बोलावत प्रश्नांची सरबत्ती केली.

३०डिसेंबरला पुन्हा येणार

नाशिक शहरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला. ३० डिसेंबरला आपण पुन्हा नाशिकला येणार तेव्हा या समस्या सुटल्या की नाही याची खात्री करू असा इशारा त्यांनी दिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकाची ५१ कोटींची फसवणूक

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
कंपनीत २५ टक्के भागिदारी देण्याचे आमिष दाखवून एका संशयिताने कागदपत्रांद्वारे गहान खत करीत दुसऱ्याच्या नावाने तब्बल ५१ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिसांनी संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

संजय नारायणप्रकाश अरोरा (रा. गणेश बाबानगर, द्वारका) यांनी फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०११ ते मार्च २०१६ या काळात संशयित अभिषेक बद्री जयस्वाल याने दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील श्री सप्तश्रृंगी इस्पात प्रा. लि. कंपनीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. जयस्वाल याने अरोरा यांना लखमापूर येथील कंपनीत २५ टक्के भागिदारी देण्याचे आमिष दाखव‌िले. त्यासाठी अरोरा यांच्याकडून त्यांची कागदपत्रे घेतली. त्याआधारे कर्जप्रकरणासाठी अर्ज केला. त्या कागदपत्रांवर अरोरा यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन गहाणखत तयार केले. त्याआधारे बँकेकडून सुमारे ५१ कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले. परंतु, त्यानंतर संशयितांनी कोणतीही कंपनी सुरू केली नाही. कर्ज थकवून आपली फसवणूक केल्याचा आरोप अरोरा यांनी केला आहे. त्यामुळे अरोरा यांनी गुन्हा दाखल व्हावा यासाठी कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. वाघ हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भक मृत्यू सकस आहाराअभावी!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या सकस आहार योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे अर्भक मृत्यूच्या प्रकरणावरून स्पष्ट होते. या अर्भकांची योग्य काळजी घेतली गेली असती तर ती मृत्यूच्या दारी पोहोचलीच नसती, असा ठपका ग्रामविकास राज्य मंत्री दादासाहेब भुसे यांनी ठेवला.

‘गुदमरतोय श्वास’ ही वृत्तमालिका अलीकडेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प‍्रसिद्ध केली. अर्भक मृत्यूच्या प्रकरणावर या मालिकेद्वारे प्रकाश टाकण्यात आला. बुधवारी नाशिकमध्ये या पार्श्वभूमीवर भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुशील वाघचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंढे आदी उपस्थ‌ति होते.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून पोषण आहाराच्या योजना गर्भवती महिला आणि स्तनदा मातांपर्यंत किती प्रमाणात पोहोचतात हा संशोधनाचा विषय असून प्राधान्याने त्यासाठी मोहीम राबवा, असे आदेश भुसे यांनी दिले. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व कळवण या दुर्गम तालुक्यांत माता व बालमृत्यू तसेच कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले. गरोदरपणापासूनच गर्भवती महिला व तिच्या बाळाच्या निकोप वाढीसाठी सकस आहार मिळण्याची दक्षता सरकारने घेतली आहे. त्यासाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते. अन्य एका योजनेद्वारे ६ महिने ते ६ वर्षेपर्यंतच्या बालकांना वर्षातून ३०० दिवस सकस आहाराचे पॅकेट पुरविली जातात. अंगणवाडीत न येणाऱ्या तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना सकस आहार घरपोच पोहोचविला जातो. प्रत्यक्षात तेवढ्या गरजूंपर्यंत हा आहार पोहोचतच नाही. बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. महिला व बालकल्याणमार्फत सकस आहार योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याचा ठपकाही या बैठकीत ठेवण्यात आला. गर्भवती महिलेची किमान चार वेळेस सोनोग्राफी होणे आवश्यक असतांना त्याप्रमाणे तपासणी होत नसल्याचा ठपकाही यंत्रणेवर ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळ्यांची आयोगाकडे तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी विकास विभागात विविध लेखन व शालेय साहित्य व रेनकोट खरेदीत मोठा घोटाळा झाला असून त्याच्या चौकशीसाठी समिती गठीत करावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे केली आहे.
आश्रमशाळा या भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्या असून ठेकेदारांकडून मुलांचे शोषण केले जात असल्याची तक्रार लकी जाधव यांनी आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साई याची भेट घेऊन केली. त्यासंदर्भातील निवेदन परिषदेतर्फे आयोगाला देण्यात आले. साई यांनी त्याची दखल घेऊन राज्य सरकारला त्यासंदर्भात आदेश देऊ, असे आश्वासन दिले.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे पथक तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव व दौलत मेमाने यांनी अध्यक्ष नंदकुमार साई व उपाध्यक्ष उईके यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आदिवासी विभागात झालेल्या भ्रष्टाचारांची तक्रार केली आहे. आश्रमशाळांची अवस्था खराब झाली असून आदिवासी मुलांवर अन्याय केला जात आहे. तर आश्रमशाळांच्या मुलांसाठी खरेदी केलेल्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी साई यांच्याकडे केली आहे. आदिवासी मुलांना लेखन व शालेय साहित्याचा पुरवठा करण्यात आला. परंतु, लेखन साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे पुरवण्यात आले तर शालेय पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपी देण्यात आल्या आहेत. जवळपास आठ कोटींच्या ठेक्यात घोटाळा करण्यात आला आहे. सोबतच आश्रमशाळांमध्ये पुरवठा करण्यात येणारे रेनकोट हे निकृष्ठ दर्जाचे असून याच्या किमती अव्वाच्या सव्वा लावण्यात आल्या आहेत. आदिवासी मंत्री, सचिव, आयुक्त यांच्यावरही कारवाई करावी तसेच धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेशाला विरोध करावा अशी मागणी केली आहे. साई यांनी विभागातील घोटाळ्यांच्या चौकशी संदर्भात आपण राज्य सरकारला पत्र लिहणार असल्याचे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

चौकशी गुलदस्त्यात
आदिवासी विकास विभागाने या अगोदरच रेनकोटची चौकशी सुरू केली आहे. परंतु, या चौकशीचे अहवाल अद्यापही आलेले नाहीत. तर लेखन साहित्याची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. लेखन साहित्य तपासूनच घेण्याचे निर्देश असतानाही, विभागातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर रेनकोट बाबतही असाच हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्यमंत्र्यासह राज्यपालांकडे तक्रार झाली आहे. आता थेट आयोगाकडेच याबाबत तक्रारी झाल्याने अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिलचा कारभार सुधारा, अन्यथा आंदोलन

$
0
0

म.टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सिव्ह‌लि हॉस्प‌टिलमधील कारभारात सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी प्रशासनाला दिला.

हॉस्पिटलमध्ये पाच महिन्यांत १८७ नवजात बालकांचा मृत्यू झाला असून, याचा निषेध राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली. कुपोषित, नवजात व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना संसर्ग होऊ नये याची अधिक काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एवढी मोठी घटना घडूनही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले सुद्धा नसल्याबाबत बलकवडे यांनी निषेध नोंदविला. दरम्यान स्वाइन फ्लू, डेंग्यू व अन्य साथींनी जिल्ह्यात थैमान घातल्याने त्यावरील लसी व औषधसाठा उपलब्ध करून

देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार, युवती जिल्हाध्यक्ष प्रतिक्षा बिल्लाडे, सुष्मा पगारे, समिना मेमन, शोभा साबळे, अनिता भामरे, माधुरी गायधनी, योगिता आवारे आदी उपस्थ‌ति होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीची वृद्धाला धमकी

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
वृद्धाला शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशोक यशवंत देशमुख (७०, रा. प्रभातनगर, म्हसरूळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिलिंद देशमुख आणि माधुरी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व फिर्यादी एकाच परिसरात राहतात. मिलिंद देशमुख यांची मुले कॉलनीतील रस्त्यावर सायकल खेळत होती. त्याचवेळी अशोक देशमुख औषधे घेण्यासाठी घराबाहेर पडले. मुले त्यांच्या वाहनासमोर आल्याने ते त्यांना ओरडले. येथे खेळत जाऊ नका असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी देशमुख यांना शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री घेणार नगरसेवकांची शाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत बहुमतात असूनही भाजपला अनुभवी व अभ्यासू नगरसेवकांअभावी अनेक वेळा नामुष्की पत्करावी लागत असतांनाच, पदाधिकाऱ्यांमधील विसंवादही वाढला आहे. बहुमत असतांनाही गेल्या सहा महिन्यांत घेतलेले अनेक निर्णय पक्षाच्या अंगलट आले आहेत. त्यामुळे भाजपने आता आपल्या नवख्या नगरसेवकांचा अभ्यासवर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांसह महत्त्वाचे पदाधिकाऱ्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत १७ सप्टेंबरपासून तीन दिवस सुशासनाचे धडे दिले जाणार आहेत. तीन दिवस हा प्रशिक्षण वर्ग चालणार असून, शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री व पालकमंत्री नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

महापालिकेत भाजपला बहुमत मिळवून सहा महिन्यातील कारभार हा वादानेच जास्त गाजत आहे. त्यातच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्येही विसंवाद वाढला आहे. भाजपमध्ये निवडून आलेले ६६ पैकी ४८ नगरसेवक हे इतर पक्षातून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे शिस्तीचा अभाव असून, अनेक नगरसेवक नवखे आहेत. अनुभवी नगरसेवक कमी असल्याने वेळोवेळी भाजपची कोंडी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित काम होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणतानाच कामकाज सुधारावे यासाठी मुख्यमंत्र्यानीही सूचना केली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवलेकरांना परतीच्या पावसाची आस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदा नक्षत्रामागून अनेक नक्षत्रे मोठी दडी मारणाऱ्या वरुणराजाने येवला तालुक्यासमोर अस्मानी संकट उभे केले आहे. जिल्ह्यातील पालखेड धरण समूह क्षेत्रातील दमदार पर्जन्यवृष्टीमुळे धरणसाठा उंचावला आहे. पालखेड डाव्या कालव्यामार्फत मिळालेल्या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाचा प्रश्न मार्गी लागला खरा, मात्र केवळ आभाळमायेवरच अवलंबून असलेली तालुक्याच्या उत्तरपूर्व पट्ट्यातील असंख्य गावे अन् येथील खरीप हंगाम पावसाच्या दडीमुळे संकटात सापडला आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील अनेक नक्षत्रे मोठी हुलकवणी देणाऱ्या वरुणराजाने येवला तालुकावासियांना ठेंगा दाखवणे सुरूच ठेवले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या सोंडेत न अडकलेला पाऊस तालुकावासियांची चिंता वाढवून जातानाच भाद्रपदातील सध्याच्या कमालीच्या उष्म्याने येवलेकरांना चांगलेच घामाघूम केले आहे. यंदा काही नक्षत्रांचा अपवाद वगळता इतर सर्वच नक्षत्रांनी येवला तालुक्याला मोठा दगा दिला. परिणामी दमदार पावसाअभावी तालुक्यासमोर चिंतेचे ढग घोंगावत आहेत. गेल्या महिन्यातील ३० तारखेला यंदा ‘गाढव’ वाहनावर स्वार होत प्रवेशकर्ते झालेले सूर्याचा ‘पूर्वा’ हे नक्षत्र मंगळवारी संपले. पूर्वाच्या पावसाने सोमवार व मंगळवारी रात्री येवला शहर व परिसरात हजेरी लावली. मात्र त‌िही जेमतेमच. तालुक्यातील महसूलची इतर मंडळे मात्र यात कोरडीच राहिली. एकंदरीत ‘पूर्वा’ जवळपास अगदी कोरडेठाक गेल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतेत पडला आहे. विशेषतः पालखेडचा कमांड एरिया नसलेल्या अन् सर्वस्वी आभाळमायेवर अवलंबून असलेल्या तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील बळीराजाची खरिपातील पिकांप्रतीची काळजी अधिकच वाढली आहे. तालुक्यातील यंदाच्या झालेल्या पावसावर नजर टाकली तर अद्यापपर्यंत तालुका वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या कित्येक मिलीमीटर पिछाडीवर आहे. परतीचा पाऊस देखील कुठलाही मागमूस दाखवत नसल्याने साहजिकच तालुक्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील निराशेच्या छटा अधिकच गडद झाल्या आहेत.

पालखेडचे दान पदरात

पालखेडच दान पदरात पडताना गेल्या काही दिवसात तालुक्याच्या पश्चिम, दक्षिण व पूर्व भागातील पालखेड कमांड पट्ट्यात आवर्तनातून गावोगावचे बंधारे भरून मिळाले. या भागात पालखेडचे पाणी खळाळल्याने पाण्याचा झिरपा होताना साहजिकच कमांड एरियातील विहिरींचा जलस्रोत उंचावला गेला पालखेडच्या वितरिका क्रमांक ३३ ते ५२ पर्यंत सर्वांना पाणी मिळाले. कमांड एरियातील गावोगावचे पिण्याच्या पाण्याचे बंधारे तर भरून मिळालेच बरोबरच खरीपाचे आवर्तन देखील मिळाल्याने या भागातील खरिपाच्या पिकांना मोलाची मदत झाली आहे. मात्र, आभाळाची माया होत नसल्याने तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील शेतकरी महाचिंतेत आहेत.

उत्तर-पूर्व पट्टा धोक्यात

खरीप पाण्याअभावी संकटात सापडला असून, पाणी नसल्याने खरिपाची पिके कोमेजली आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे या भागातील मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादकता अन् उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. हे संकट दूर होण्यासाठी या भागातील शेतकरी परतीच्या पावसासाठी आकाशाकडे आशाळभूतपणे नजरा लावून बसला आहे.

परतीच्या पावसाकडे डोळे

येत्या बुधवारी (दि.१३) ‘बेडूक’ या वाहनावर स्वार होत सूर्याचा ‘उत्तरा’ नक्षत्र प्रवेशकर्ते होत आहेत. वरुणराजाची कृपादृष्टी होताना ‘उत्तरा’ दमदार व जोरदार बरसाव्यात, बेडकाने त्या बरसत्या पर्जन्यधारात डराव डराव करावे, अन् खरिपाचे संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी बाळगून आहेत. परतीचा दमदार पाऊस झाला तरच तालुक्यातील गावोगावच्या जलस्रोत उंचावून पुढील काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ‘लाभू दे आभाळाची माया, त्यातून भविष्यात दूर होईल टंचाईची काया’ अशीच आस बाळगत तालुक्यातील जनता परतीच्या पावसाकडे नजरा ठेवून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडला अपघातात सहा जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथून नाशिकला जाणाऱ्या येवला-नाशिक बसला रसलपूर फाटा येथे ट्रकची धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात बसच्या चालकासह सहा जण जखमी झाले आहेत.

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात झाला. नाशिक-औरंगाबाद रोडने निफाडकडून कोठूरे फाटाकडे ट्रक (डब्लू बी ११, डी १२८६) भरधाव वेगाने जात होता. या ट्रकच्या मागील बाजूने येवला-नाशिक ही बस जात होती. मात्र ट्रक चालकाने अचानाक ट्रक वळविल्याने मागून येणारी बस ट्रकवर आदळली. त्यामुळे बसचा पुढील भाग चेपला गेला. या अपघातात बसचे चालक सुरेश विंचू, बसचे वाहक विजय वाघ (रा. राजापूर, ता. येवला), अमोल बोरगुडे, (रा. नैताळे), वैशाली नीलेश मोरे (निफाड), जीवन गायकवाड (अंदरसूल), कैलास तांदळे (निफाड) सहा जण जखमी झाले. त्यांना निफाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. निफाड पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातामुळे निफाड-नाशिक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. बस आणि ट्रकच्या धडकेचा मोठा आवाज होताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले.त्यांनी बसमधील प्रवाशांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह आणला आश्रमशाळेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील वीरगांवपाडा शासकीय आश्रमशाळतील इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा स्वाइन फ्लूसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने संतापलेल्या आदिवासी बांधवानी त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह थेट वीरगावपाडा आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी रात्री ९.३० वाजता आणून ठवेला. जोपर्यंत दोषी अधिकारी व शिक्षकांवर कारवाई करून त्यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह शाळेतून न नेण्याचा इशारा दिल्याने मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री १२.३० वाजेच्या दरम्यान मृतदेह घेतला. यावेळी तीनशे लोकांचा जमाव उपस्थित होता. दरम्यान आश्रमशाळा अधीक्षक डी. एस. सोनार यांना चौकशीसाठी सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वीरगाव पाडे येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी सतीश बागुल याचा मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.

प्रशासनाचे दुर्लक्ष

गत दोन ते तीन दिवसांपासून या विद्यार्थ्यांना ताप, खोकला, उलट्यांचा त्रास होत होतो. असे असताना या विद्यार्थ्यांना तत्काळ औषोधोपचार करणे आवश्यक होते. मात्र आश्रमशाळा प्रशासनाने दोन दिवस या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप आहे. दोन दिवस उलटल्यावर सतीश बागुलसह अंकुश सोनवणे व सोपान भोये यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपाचारा दरम्यान सतीशचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स हाऊसिंग फेस्ट’ शनिवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना आपल्या बजेटमधील घरे, रो-हाउसेस, फ्लॅट्स, प्लॉट्स यासारख्या प्रॉपर्टीजची माहिती एकाच ठिकाणी मिळविण्याची संधी चालून आली आहे. टाइम्स ग्रुपतर्फे आयोजित येत्या १६ व १७ सप्टेंबरला ग्रीन व्ह्यू हॉल, हॉटेल एमरल्ड पार्क, त्र्यंबक रोड येथे ‘टाइम्स हाऊसिंग फेस्ट नाशिक’ होणार आहे.

‘टाइम्स हाऊसिंग फेस्ट नाशिक’ या प्रॉपर्टी प्रदर्शनातून ही संधी उपलब्ध झाली आहे. शहर व परिसरातील नामांकित बांधकाम विकसकांचे प्रकल्प एकाच ठिकाणी या प्रदर्शनातून पाहता येणार आहे. नवरात्रोत्सव, दिवाळी असे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सण उत्सवाच्या या काळात ग्राहकांचा गृहखरेदीकडे मोठा ओढा असतो. तसेच बांधकाम विकसकांकडूनदेखील वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्सची बरसात सुरू करण्यात आली आहे. जीएसटी नाही, पाच ते दहा लाख रुपयांची सूट, कार फ्री अशा अनेक आकर्षक ऑफर्सचा यात समावेश आहे. नोटबंदी व रेराच्या अवलंबानंतर रिअल इस्टेट मार्केट डळमळीत झाले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रिअर इस्टेट मार्केटमध्ये चांगले दिवस पुन्हा आणण्यासाठी एक पाऊल उचलण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये सुमारे १७ बिल्डर्स शंभरपेक्षा जास्त प्रोजेक्ट घेऊन सहभागी होणार आहेत.

येथे साधा संपर्क
बारा लाखांपासून दोन कोटी रुपयांची घरे, रो हाऊसेस शिवाय प्लॉट्स, व्यावसायिक जागा या प्रदर्शनात बघण्यास मिळणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी व आपला स्टॉल बुक करण्यासाठी हेमंत पाचपुते (९४२२९४४४८४) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळेला १८पर्यंत पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नोकरीचे आमिष दाखवून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेकडो तरुणांची आर्थिक फसवणूक करणारा लासलगाव येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा संस्थापक सतीश काळे याला पोलिसांनी सापळा रचून अटक केले. निफाड न्यायालयाने त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोल‌सि कोठडी सुनावली आहे.

फसवणूक केलेल्या मनमाड येथील एका तरुणाने रविवारी (दि. १०) लासलगाव पोल‌सि स्टेशनला काळे विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी लासलगाव येथील संस्थेच्या मूळ शाखेसह जिल्ह्यातील ९ शाखांवर छापा टाकून कारवाई केली. तेव्हापासून काळे फरारी झाले होते. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास विंचुर बसस्थानक परिसरात त्याच्या मोबाइल लोकेशनवरून त्याला पोलिसांनी अटक केली होती.

लासलगाव पोलिसांनी सतीश काळे याला निफाडच्या न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी पक्षाचे वकील अॅड. व्ही. एन. हाडपे यांनी अधिक तपासासाठी काळे याला दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायमूर्ती यांनी सहा दिवसांची कोठडी सुनावली. काळे सध्या लासलगाव पोलिसांच्या ताब्यात आहे.

दरम्यान काळे सापडल्यानंतर पोल‌सि गुंतवणूकदार आणि नोकरीच्या आमिषाने फसलेले तरुण यांच्या आर्थिक फसवणुकीचा कसा आणि किती गांभीर्याने तपास करतात हे येत्या काही दिवसात होणाऱ्या कारवाईतून समोर येईल. ढोकळेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून काळे याने राज्यभरातील हजारो तरुणांनी नोकरीचे आमिष देवून फसविले आहे.

३८ तक्रारी दाखल

ढोकेश्वेर मध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार व नोकरीच्या आमिषाने पैसे भरलेल्या तरुण यांना सतीश काळेला अटक झाल्याचे समजल्यानंतर लासलगाव पोल‌सि स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल करण्याससाठी धाव घेतली आहे. मंगळवार व बुधवारी अनेक ठिकाणचे गुणवणूकदार व पैसे भरलेले तरुण लासलगाव पोलिस स्टेशनला आले होते. मंगळवारपर्यंत ३८ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images