Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चांदवड नगरपरिषदेची महावितरणपुढे शरणागती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
लाखो रुपयांची थकबाकी भरण्याकडे कानाडोळा होत असल्याने महावितरण कंपनीने कायदेशीर प्रयत्न करताच चांदवड नगरपरिषदेने पथदीपांच्या थकीत वीज बिलापोटी ४० लाख १८ हजार रुपयांचा भरणा केला. लाखो रुपयांचे वीज बील थकविणाऱ्या चांदवड नगरपरिषदेस महावितरणपुढे अखेरीस शरणागती पत्करावी लागली.

नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे १ हजार ५७३ ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे १९ कोटी ८५ लाख रुपये थकबाकी आहे. तर जिल्ह्यात पथदीपांचे ३ हजार ३५१ ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे वीज देयकांची सुमारे ७६ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. चांदवड नगर परिषदेला पथदीपांसाठी एकूण १८ मीटरमधून वीजपुरवठा केला जातो. नगर परिषदेकडे पथदीपांची जवळपास ८३ लाख रुपयांची थकबाकी होती. महावितरणच्या चांदवड उपविभागीय कार्यालयाने थकीत रकमेचा भरणा व्हावा, यासाठी जानेवारीपासून नगर परिषदेकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुसार नगर परिषदेने मार्च महिन्यात ४२ लाख ७५ हजार रुपयांचा भरणा महावितरणकडे केला होता. त्यानंतरही उर्वरित थकबाकी भरावी यासाठी नगर परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नगर परिषदेने सततच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत उर्वरित ४० लाख १८ हजार रुपयांचा धनादेश नुकताच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. नगर परिषदेचे अध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगरसेवक रवींद्र अहिरे, जगत राऊत, कार्यालयीन अधीक्षक संजय गुरव, लेखापाल संदीप महाले, कार्यकारी अभियंता मधुसूदन वाढे, उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे आदी यावेळी उपस्थित होते.

चांदवड नगर परिषदेप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत रकमेचा भरणा करून महावितरण कंपनीला सहकार्य करावे आणि भविष्यातील कटू कारवाई टाळावी.
- दीपक कुमठेकर,
मुख्य अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीप मिळाली अन् लूट केली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या गणेश शांताराम उकाडे या वाहतूक पोलिसांस लूट आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. टीप मिळाली म्हणून कारवाई करण्यासाठी गेलो असल्याचा लंगडा युक्तिवाद या कर्मचाऱ्याने केला. मात्र, स्थानिक पोलिसांना कारवाईची कोणतीही माहिती दिली नाही. दुसरीकडे, सराईत गुन्हेगाराला सोबत ठेवल्याने उकाडेचा उद्देश स्पष्ट होतो. उकाडेवर निलंबनाच्या कारवाईसह आणखी काय कारवाई करता येईल, याबाबत शहर पोलिस विचार करीत आहे.
बारागाव प्रिंपी (‌ता. सिन्नर) येथे राहणाऱ्या उकाडेने आपले साथिदार शांताराम उगले, (रा. कानडी मळा, सिन्नर) आणि समाधान दिनकर ढेरिंगे (रा. पळसे, फुलेनगर, ता. जि. नाशिक) याच्यासमवेत २५ ऑगस्ट रोजी सिन्नर येथे आलेल्या सराफ व्यावासायिकाकडील एक लाख रुपये लुटले होते. कोल्हापूर जिल्हातील हातकणंगले तालुक्यातील ईपरी येथील राजेंद्र बाळगोंडा पाटील व त्यांचा मुलगा मनीष राजेंद्र पाटील सिन्नर येथील काम आटोपून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने निघाले त्यावेळी हा प्रकार घडला होता. सिन्नर-पुणे हायवेवर रौनक लॉन्सजवळ उकाडेसह त्याच्या साथिदाराने पाटील यांची कार थांबवून दमबाजी केली. तसेच नाशिक येथील क्राइम ब्रँचमध्ये आणण्याचा बहाणा केला. हॉटेल शाहूजवळ संशयित आरोपींनी पाटील पिता-पुत्राकडील एक लाख रुपयांची रोकड काढून पोबारा केला होता. सध्या पोलिस कोठडीत असलेल्या संशयितांकडे चौकशी सुरू आहे. याबाबत अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले, की संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. एक टीप मिळाली होती. त्यानुसार दोघांना चौकशीसाठी नाशिकला घेऊन चाललो होतो, असा थातुरमातून बचाव उकाडेने केला. मात्र, सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद झाला आहे. याच गुन्ह्यातील ढेरिंग हा संशयितही सराईत गुन्हेगार असून, उधारीच्या पैशातून त्याने एकाकडील दुचाकी आणली होती. याच दुचाकीवर संशयितांनी गुन्हा केला. यापूर्वी फसवणुकीचे असे काही प्रकार घडले आहेत काय? याचाही तपास सुरू आहे. मात्र, एकंदरीत संशयितांची कार्यपध्दती पाहता त्यांनी दोन ते तीन घटना केल्या असल्याची शक्यता गायकवाड यांनी व्यक्त केली.

कडक कारवाईचा इशारा
पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर सोमवारी (दि. २८) निलंबनाची कारवाई केली जाईल. मात्र, हा गंभीर प्रकार निलंबनापुरता मर्यादित राहू नये, संशयितांविरोधात आणखी काय कडक कारवाई करता येईल याचा विचार केला जात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले. प्रामाणिकपणे काम व्हावे, यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात. मात्र, तरीही काही व्यक्ती कायद्याच्या चाकोरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात किंवा जातात. ‘सापडला तो चोर’ असे मानले जाते. आणखी काही असे असतील की ते अशा घटनांमधून धडा घेत नाही. त्यामुळे या प्रकरणातील संशयितासच्या गुन्ह्यास प्रमाण मानून कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेअरी फार्म’च्या कामगारांना तात्पुरता दिलासा

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प
ब्रिटिशकाळापासून लष्करांतर्गत असलेले ‘डेअरी फार्म’ संपुष्टात येणार असून शेकडो कामगार रस्त्यावर येणार आहेत. अहमदनगर येथील संतोष सकट या कंत्राटी कामगाराने थेट भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय (एमओडी) विरोधात मुंबई हायकोर्टात दावा दाखल केला आहे. या दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश नरेश पाटील व न्यायाधीश झेड. ए. हक यांनी याबाबत कोर्टाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कामगार व डेअरी फार्म सुरूच ठेवण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. त्यामुळे डेअरी फार्ममधील कामगारांचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

संरक्षण मंत्रालयामार्फत नुकत्याच जाहीर केलेल्या आदेशानुसार देशभरातील ३९ डेअरी फार्म बंद करण्यात येणार आहेत. देशाच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये हे डेअरीफार्म मार्च २०१८ पर्यंत चालू राहावे, यासाठी ३३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हाच धागा पकडून कोर्टात संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात दावा दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाने याबाबत स्पष्ट केले, की संरक्षण मंत्रालयाचे आदेश केवळ महाराष्ट्राच्या पुण्यातील पिंपरी, खडकी, अहमदनगरमधील भिंगार आणि नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे असणाऱ्या डेअरी फार्म पुरताच लागू आहेत. महाराष्ट्रातील या डेअरी फार्ममध्ये एकूण ४ हजार जनावरांच्या देखभालीसाठी सुमारे ५०० तात्पुरत्या कामगार कार्यरत आहेत.

जनावरे विकण्याची तयारी
दिल्ली येथील संरक्षण विभागाच्या मुख्यालयातून डायरेक्टर जनरल मिलिटरी फार्म (भारतीय सेना) यांच्या आदेशाने एकूण २५ हजार २२७ जनावरे विक्री करण्याबाबत देशभरातील विविध वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ३७ शहरांमधील पशुसंवर्धन/दुग्धोत्पादन करणाऱ्या दुग्ध सहकारी लष्करी शेतीमध्ये असलेल्या १४ हजार ७८९ दुभत्या गायी, ८ हजार ५३५ कालवड तर १ हजार ९०३ वासरू यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशेच्या नोटांसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दोनशे रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेच्या दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या कार्यालयांसह ठराविक बँकांमध्ये शुक्रवारपासून (दि. २५) उपलब्ध करून देण्यात आल्याने आता नाशिकमध्ये त्याची उत्सुकता आहे. मात्र, या नोटा नाशिकला कधी उपलब्ध होणार याचे बँक अधिकाऱ्यांकडेही उत्तर नाही. नाशिकच्या एटीएममध्ये या नोटा येण्यास सुमारे दीड महिन्याचा काळ उलटणार आहे. त्यासाठी एटीएमचे कॅलिब्रेशन करावे लागणार आहे.
नोटाबंदीनंतर नव्याने जारी करण्यात आलेल्या दोन हजाराच्या नोटा ‘एटीएम’मध्ये येण्यास बराच काळ लागला. दोनशेच्या या नोटाही ‘एटीएम’मध्ये लवकर मिळणार नाही. नाशिक जिल्ह्यात विविध बँकेचे तब्बल ८०० हून अधिक आहे. त्यातील ‘एटीएम’मध्ये बदल करण्यास वेळ लागणार आहे. त्यातील काही ‘एटीएम’ बंद आहेत. त्यामुळे आहे त्या ‘एटीएम’मध्ये या नोटा टाकण्यास वेळ जाणार आहे. दोनशेच्या नोटांचा आकार नव्या पाचशे रुपयांच्या नोटेपेक्षा थोडा छोटा आहे. त्यामुळे दोन हजार व पाचशेच्या नोटाबरोबर आता या दोनशेच्या नोटा असणार आहे. एक हजाराच्या नोटांचा कप्पा खाली असल्यामुळे येथे या नोटा टाकण्याची शक्यता आहे. बँकामध्येही या नोटा येण्यास किमान महिनाभराचा तरी कालावधी लागणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिकच्या अनेक बँकामध्ये शुक्रवारी मात्र त्यासाठी विचारणा झाली. पण बँकेच्या अधिकाऱ्यांना या नोटा केव्हा मिळणार याची माहिती नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देणे अवघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दरोडेखोरांची टोळी जिल्हाभरात कार्यरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
निफाड तालुक्यातील विंचूर येथे झालेल्या दरोडा प्रकरणातील सहाही जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहे. ही टोळी अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यात दरोडा टाकल्यानंतर पुन्हा त्या भागात फिरकायचे नाही, असा नियम टोळीतील सदस्य पाळत होते. या टोळीतील दोन सदस्यांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांनी पंचवटीतही दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.
विंचूर येथील शकुंतला दरेकर यांच्या घरासह आणखी तीन ठिकाणी शनिवारी (दि. २६) पहाटे दोनच्या सुमारास चार जणांच्या टोळीने शस्रांचा धाक दाखवून दरोडा टाकला. मरळगोई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना समजताच जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, तसेच लासलगाव पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने गस्त सुरू केली. विंचूर-येवला रोडवर हॉटेल अपना समोर एक तवेरा उभी असल्याचे पोलिसांना दिसली. येथे राहुल खंडु तावरे (रा. भोसरी, खंडोबामाळ, पुणे) आणि अंकुश सुभाष लोळगे (रा. साईनाथ हॉस्पिटल, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली. दरोडा टाकून परत आल्यानंतर लागलीच पळून जाण्याचा त्यांचा बेत होता. याबाबत अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले, की संबंधित टोळीतील सर्व सदस्यांची नावे व पत्ते मिळाली आहेत. संशयिताच्या तपासासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. संशयित पैठण, नेवासा, शेवगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणावरील रहिवाशी असून, त्यांच्या घरातील महिला व मुले सोडून सर्वच सदस्य फरार असल्याचे तपासात आढळून आले. टोळीतील सर्व सदस्य सराईत गुन्हेगार आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात एकाच जेलमध्ये राहत असताना यांची एकमेकांशी ओळख झाली असावी.

एका जिल्ह्यात दरोडा घातल्यानंतर तीन ते चार महिने त्या भागात जायचे नाही, अशा पध्दतीने टोळीचे काम सुरू होते. संशयितांनी पंचवटीतही टाकल्याची कबुली दिली असून, त्याचीही चौकशी सुरू असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. सर्व संशयितांच्या अटकेनंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या दरोड्याच्या घटनांवर प्रकाश पडू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथिंबीर जुडीला एक रुपयाचा दर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाळ्यात उच्चंक गाठणारी कोथिंबीर चक्क एक रुपये जुडी अशा भावात विकली गेली. गणेशोत्सव सुरू असताना भाजीपाला महागणार असे वाटत असताना जिल्ह्यात अनेक भागात पावसाच्या सरीवर सरी पडत असल्याने कोथिंबीर भिजण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा भाज्या लवकर खराब होत असल्याने त्यांची मागणी कमी होते, त्यामुळे कोथिंबीरचे भाव गडगडले आहेत. पावसाचा जोर चांगला राहिल्यामुळे त्याचा फटका शेतमालाला बसला आहे. बाजार समितीत रविवारी झालेल्या पालेभाज्या लिलावात बाजारभाव घसरले. रविवारी हजार रुपये शेकड्यावरुन थेट शंभर रुपये शेकड्यावर दर घसरले.

बाजार समितीत दोन महिन्यांपूर्वी तब्बल १८७ रुपये प्रति जुडी असा कोथिंबीरने उच्चांक गाठला होता. दोन दिवसांपासून कोथिंबीरच्या भावात घसरण होत आहे. बाजारभाव मिळाल्याने शेतकयांचा उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्च खिशातून भरण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीच्या पातळीत पुन्हा वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पावसाने जोर धरल्यामुळे गंगापूर धरणातून ११ हजार क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. पावसाच्या सरी सतत कोसळत असल्याने नाले तुडुंब वाहू लागले आहेत. या पाण्यामुळे गोदावरीची पातळी वाढली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस यंत्रणा आणि अग्निशामक दल गोदाकाठच्या परिसरात थांबून आहेत.

त्र्यंबकेश्वर आणि धरण क्षेत्रात सतत पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शहरात पुराचे परिमाण म्हणून ओळखणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी गेले आहे. नदीकाठच्या टपऱ्या पुन्हा बाहेर काढण्यात आल्या आहेत. व्यावसायिकांना इशारा देण्यात आला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास नदीच्या पाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील नागरिक आणि व्यावसायिकांना सतर्क राहण्याच्या सूचना महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत.

उत्साहावर फिरले पाणी

सिडको ः गणेशोत्सवानिमित्त सिडको व इंदिरानगर परिसरात शेकडो गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले असले तरी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गणेशभक्तांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचाही हिरमोड झाला आहे.

सिडको व इंदिरानगर भागात अनेक गणेश मंडळांनी शुक्रवारी वाजतगाजत श्रीगणेशाची स्थापना केली. गणेशाची स्थापना करण्याबरोबरच भाविकांसाठी आकर्षक असे समाजप्रबोधनपर व मनोरंजनाचे देखावे तयार केले आहेत. त्यातच सिडको व इंदिरानगर भागातील काही मंडळांनी लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्याही आणल्या आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सिडको व इंदिरानगर भागात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे गणेशांचे देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दीच नव्हती. त्यातबरोबर सर्वच गणेश मंडळांनी विविध प्रकारची वाद्ये किंवा गाणे लावण्याची व्यवस्था केली होती. मात्र, पावसामुळे सर्वच मंडळांभोवती शांततेचे वातावरण दिसून येत आहे. गणेश स्थापनेपासूनच यंदा पावसाला सुरुवात झाल्याने हा पाऊस गणेश विसर्जनापर्यंत राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पावसाने सायंकाळी उघडीप घ्यावी, जेणेकरून भाविकांना गणेशांचे देखावे पाहता येतील, अशी भावना गणेश मंडळाच्या भक्तांनी व्यक्त केली आहे.

देवळालीत व्यवहार ठप्प

देवळाली कॅम्प : काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. रविवारी सायंकाळपासून जोर वाढला आहे. संततधारेमुळे बाजारपेठेत ग्राहकही तुरळक दिसत आहेत. गणेशोत्सवातही ग्राहक येत नसल्याने व्यावसायिक व दुकानदार त्रस्त झाले आहेत. सोमवारची सुरुवातच रिमझिम व संततधारेने झाली. नोकरदार आणि विद्यार्थ्यांची संततधार पावसामुळे सोमवारी तारांबळ उडाली. देवळालीत भूमिगत गटारांच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले असून, वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी डबकी साचली असून, संपूर्ण देवळाली जलमय झाली आहे. मुख्य रस्त्यांवर सतीश कॉम्प्लेक्स, संसरी नाका, सिलेक्शन कॉर्नर, आनंद रोड, लामरोडच्या विविध भागांत रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. एसव्हीकेटी महाविद्यालय परिसरात साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करणेदेखील अडचणीचे झाल्याचे पाहायला मिळाले. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे शहरवासीयांनी घराबाहेर जाणे टाळले आहे. जनरेटर व इतर उपयुक्त साहित्य भिजू नये म्हणून अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते काळजी घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला अपघातप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

भरधाव वेगात वाहन चालवतानाच ओव्हरटेक करतेवेळी कुठलेच भान न ठेवल्यास समोरच्या अनेकांच्या जीवावर बेतू शकते याचे उदाहरण म्हणजे रविवारी (दि. २७) सायंकाळी मनमाड-नगर राज्य महामार्गावर झालेला भीषण अपघात. क्रुझर, मारुती ओम्नी व्हॅन, बस व दुचाकी पल्सर या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघाताचे कारण ठरला तो पल्सर चालक. येवला शहर पोलिस ठाण्यात या अपघातप्रकरणी पोलिसांनी धनंजय धनराज कटारे (वय-३०, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) या दुचाकी पल्सर चालकास आरोपी केले असून, मोटार वाहन कायद्यान्वये कटारे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात कटारेदेखील गंभीर जखमी झाला असून, नाशिक शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नगर-मनमाड राज्य महामार्गावर झालेल्या या अपघातात क्रुझर येवल्याकडून मनमाडच्या दिशेने जात असताना समोरून मारुती ओम्नी व्हॅन, पल्सर व धुळे-पुणे एसटी बस येवल्याकडे येत होते. आपल्या एका मित्रासह येणाऱ्या पल्सर चालकाने भरधाव वेगात प्रथम एसटी बसला ओव्हरटेक केले. त्यानंतर तो मारुती व्हॅनला ओव्हरटेक करून भरधाव वेगात समोरून येणाऱ्या क्रुझरच्या ड्रायवर साईडला धडकला. पल्सर धडकणार असल्याने क्रुझर चालकाने एकदम ब्रेक दाबले. त्यात क्रुझरचे ड्रायव्हर बाजूचे पुढील चाक फुटल्याने ती समोरून येणाऱ्या मारुती व्हॅनवर धडकली. अपघातात ‘क्रुझर’मधील आदित्य बबन मरसाळे (वय-१२, रा.धुळे), महेश दिलीप राव (३५, रा. सुरत) व यश महेश राव (१०, रा.सुरत), तर संजय हरिभाऊ सोनवणे (३२) या मारुती ओम्नी व्हॅन चालकासह व्हॅनमधील निशांत मनोज तिवारी (२३), सुरेशचंद तेजबापु पोरवाल (३५), सिवा उर्फ मना आशुतोष तिवारी (१९) हे सात जण जागीच ठार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात नऊ तासांत १९८ मिमी पाऊस

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, सोमवारी नऊ तासांत १९७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून, त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर, पालखेडसह पाच धरणांमधून पाणी सोडण्यात आले असून, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १२ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ऐन गणेशोत्सवात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसाने शहरात आणि जिल्ह्यात मुक्काम ठोकला असून, पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील काही तालुक्यांमध्येही हीच परिस्थ‌िती आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावरही पाणी फिरले आहे. रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत सुमारे १९९ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्हाभर ढगाळ वातावरण असले तरी कधी पाऊस, तर कधी उघडिपीचा अनुभव जिल्हावासीय घेत आहेत. दिवसभरात त्र्यंबकेश्वरमध्ये ४७.०, पेठमध्ये ४४.५ मिमी पाऊस झाला. सुरगाण्यात २४.५, इगतपुरीत २२, कळवणमध्ये २०, सिन्नरमध्ये १४ मिलिमीटर पाऊस झाला. बागलाणमध्ये सात, येवला आणि देवळ्यात प्रत्येकी पाच मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक, मालेगाव आणि चांदवड तालुक्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सोमवारी पावसाने हजेरी लावली. केवळ नांदगाव तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यातील पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव तालुक्यातील ७७ गावांत 'एक गणपती'

$
0
0

खर्चाला फाटा देत दिला सामाजिक संदेश

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले असून, यंदाच्या वर्षी लहान मोठे सुमारे ५०० हून अधिक गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा करीत आहेत. यात मालेगाव तालुक्यातील ७७ गावांनी 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबवून सामाजिक एकतेचा आदर्श घालून दिला आहे. तसेच यावेळी पोलिस यंत्रणेकडून मालेगावी गणेश मंडळांसाठी विविध परवानगीसाठी 'एक खिडकी योजना' सुरू केली आहे. यामुळे विविध सणांच्या पार्श्वभूमीवर लागणाऱ्या परवानगी मिळण्यास सोपे जाणार आहे. याबाबत शहरातील विविध संस्था, मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाउस झाला नसल्याने ग्रामीण भागात शेतकरी चिंतातूर झाला आहे. काहीशी दुष्काळसदृश परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहेत. परिणामी, तालुक्यातील ७७ गावांनी गणेशोत्सवात अनाठायी खर्चाला फाटा देत 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. तसेच शहरातदेखील अनेक गणेश मंडळांनी गणेशमूर्तींची उंची कमी करून सामाजिक देखावेही साकारले आहेत.

एक खिडकी योजना

मालेगाव शहरात गणेशोत्सव तसेच बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केलेल्या सूचनेनुसार मालेगाव पोलिसांनी आता विविध परवानगी मिळणे सोपे व्हावे व कायदा सुव्यवस्था राखता यावी यासाठी 'एक खिडकी योजना' सुरू केली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक एस. टी. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली याचे काम सुरू करण्यात आले आहे. योजनेसाठी पोलिस प्रशासनासोबत, महसूल, महावितरण, महापालिका आदींचे प्रत्येकी एक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. गणेशभक्तांनी, नागरिकांनी या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी सेंटरमध्ये ‘भीख मांगो’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

उंटवाडी येथे असलेल्या सिटी सेंटर मॉलने वाहने पार्किंगचे दर अचानक वाढविले आहेत. याबाबत व्हॉट्सअॅपवर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने याची दखल घेत येथे ‘भीख मांगो’ आंदोलन करण्यात आले. पार्किंगचे दर वाढविण्याचा निषेध नोंदविण्यात आला.

वाढीव दर तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशीही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, मॉल प्रशासनाने शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेत पुढील दोन दिवसांत पार्किंगचे दर कमी करण्याचे आश्वासन दिल्याचे विद्यार्थी सेनेचे महानगरप्रमुख संदीप गायकर यांनी सांगितले.

मॉलमध्ये खरेदीसाठी अथवा चित्रपट गृहात येणाऱ्या ग्राहकांच्या पार्किंगची सोय विनामोबदला उपलब्ध करून देण्याचे काम मॉल व्यवस्थापनाचे असताना अनधिकृतपणे पैसै वसूल केले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने केला होता.

यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी चिल्लर गोळा करून मॉल व्यवस्थापनाकडे देऊ केली. मॉल व्यवस्थापनाकडून लवकरच पार्किंगचे दर कमी केले जातील असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. यानंतर विद्यार्थी सेनेच्या वतीने सिटी सेंटर मॉल व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार, राजेंद्र क्षीरसागर, अमोल सूर्यवंशी, देवा जाधव, स्वप्निल वाघ, शुभम थोरात, मयूर थोरात यांसह विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दरवेळी दुप्पट वाढ

सिटी सेंटरची उभारणी करताना येणाऱ्या ग्राहकांसाठी मोफत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, मॉल सुरू झाल्यावर काही महिन्यांनी वाहने पार्किंगसाठी दुचाकीला ५ रुपये व चारचाकीला १० रुपये आकारले जाऊ लागले. यानंतर पार्किंगच्या दरात पुन्हा वाढ करून दुचाकीला १० व चारचाकीला २० रुपये करण्यात आले. ही रक्कम ग्राहकांना जास्त वाटत असतानाच चालू महिन्यात वाहने पार्किंगच्या दरात मॉल व्यवस्थापनाने पुन्हा दरवाढ करून दुचाकीला २० तर चारचाकीला ४० रुपये असा दुप्पट दर लागू केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’मधून ड्रेनेजसाठी ८९ कोटी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेंतर्गत आतापर्यंत गंगापूर आणि पिंपळगाव मलनिस्सारण केंद्राच्या बांधकामासाठी निधी मिळाला आहे. अमृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात आता शहरातील सांडपाणी व्यवस्थेंतर्गत १६५ किलोमीटरची नवीन ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी निधी मिळणार आहे. सोबतच शहरातील काही जीर्ण ड्रेनेज लाइन बदलून त्या नव्याने टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने सरकारला ८९ कोटींचा आराखडा सादर केला असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

या निधीमुळे शहराच्या सांडपाणी व्यवस्थेत सुधारणा होऊन गोदावरीच्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. पिंपळगाव एसटीपी प्लँटचा तोडगा पंधरा दिवसांत सुटणार असल्याचेही कृष्णा यांनी सांगितले. राज्य सरकारने नुकतेच जेएनएनयूआरएम अंतर्गत मंजूर असलेल्या नाशिकच्या भुयारी गटार योजनेसाठी निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याअंतर्गत शहरातील सांडपाणी व्यवस्था सुधारण्यासाठी अमृत योजनेतून ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय झाला असून, त्यातून पालिकांना मदत केली जाणार आहे. अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात गंगापूर मलनिस्सारण केंद्रासाठी ४० कोटी रुपये पालिकेला मंजूर झाले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात पिंपळगाव मलनिस्सारण केंद्रासाठी ६५ कोटींचा निधी मिळाला आहे. सोबतच दोन उद्यानांसाठीही साडेसात कोटींचा निधी मिळाला आहे. आता तिसऱ्या टप्प्यात शहरातील सांडपाणी व्यवस्था सुधारण्यासाठी आराखडा सादर करण्याचा आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिला होता.

महापालिकेने शहरातील नव्या व जुन्या ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी तब्बल ८९ कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. त्यात जवळपास १६५ किलोमीटरच्या नवीन ड्रेनेज लाइन टाकल्या जाणार आहेत, तर काही भागातील जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाइन बदलून त्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील सविस्तर डीपीआर हा राज्य सरकारला सादर झाला असून, तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मलनिस्सारण कामांसाठी ८९ कोटी रुपये मिळाल्यास शहरातील नव्याने विकसित होणाऱ्या भागात ड्रेनेज लाइनचे काम केले जाणार आहे. सोबतच जुन्या झालेल्या ड्रेनेज लाइन ठिकठिकाणी फुटल्याने त्याचे थेट पाणी हे गोदावरीसह तिच्या उपनद्यांमध्ये जाते. त्यामुळे गोदावरीसह तिच्या उपनद्यांचेही प्रदूषण होते. या निधीने गोदावरीच्या प्रदूषणाचाही प्रश्न मिटणार आहे.

पिंपळगाव १५ दिवसांत मार्गी

पिंपळगाव मलनिस्सारण केंद्रासाठी ‘अमृत’मधून निधी मंजूर झाला आहे. मात्र, या केंद्रासाठीच्या जागेचा भूसंपादनाचा वाद सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला असून, त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पालिकेने भूसंपादनासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची चर्चा झाली आहे. केंद्रासंदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर करण्यात आल्याचे कृष्णा यांनी सांगितले आहे. यावर येत्या पंधरा दिवसांत अंतिम तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.


जुन्या ड्रेनेज बदलणार

अमृत योजनेतून शहरातील सांडपाणी व्यवस्था सुधारण्यासाठीचा डीपीआर राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. त्यात १८५ किलोमीटरची नवीन ड्रेनेज लाइन टाकण्यासह काही जुन्या ड्रेनेज लाइन बदलल्या जाणार आहेत. त्यासाठी ८९ कोटी रुपये मिळणार आहेत.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा जायकवाडीची चिंता मिटली

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७७ टीएमसी झाला असून, धरण ६६.३८ टक्के भरले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध होणे आवश्यक असले तरी तो आताच उपलब्ध झाला आहे. परिणामी, नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्याची आवश्यकता राहिली नसून, नाशिक, नगरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे. अर्थात, पाणी सोडावे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय गोदावरी खोरे मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळच घेणार असून, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

मराठवाड्याला गंगापूरसह मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यातील शेतकरी पाणी आवर्तनासाठी आंदोलन करीत असताना त्यांना डावलून दोन वर्षांपूर्वी मराठवाड्याला पाणी सोडण्यात आले. नाशिकमध्ये या निर्णयास मोठा विरोध झाला. यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने जायकवाडीच्या साठ्यात वाढ झाली आहे. नाशिकमधील गंगापूरसह पालखेड, दारणा धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याचा लाभही जायकवाडी धरणाला झाला. १ जून ते २८ ऑगस्ट या कालावधीत जायकवाडीला ४७ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे जायकवाडीतील पाणी पातळी वाढली आहे. सद्यःस्थ‌ितीत धरणात ६६.३८ टक्के पाणीसाठा आहे. धरणात २४ तासांत ३०.११६ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. धरणात १२ हजार ३०९ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने सध्या पाणी पोहोचत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावचा पाणीप्रश्न अखेर मार्गी

$
0
0

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावाचे विस्तारीकरण पूर्ण; राज्यमंत्री भूसेंच्या हस्ते जलपूजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावाचे विस्तारीकरण झाल्याने साठवण क्षमता दुपट्टीने वाढून ८७ दशलक्ष घनफूट इतकी झाली आहे. त्यामुळे चणकापूर धरणातील पाण्याची बचत होणार असल्याने शेतीसाठी हे पाणी देता येईल. खऱ्या अर्थाने मालेगाव शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागला असून, या वाढीव साठवण क्षमतेचा लाभ मालेगाव तालुक्यातील पंचक्रोशीलादेखील होईल, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावाचे ५ कोटी ८० लाख रुपये खर्चून विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्याचा जलपूजन समारंभ सोमवारी (दि. २८) पार पडला त्यावेळी राज्यमंत्री भुसे बोलत होते. यावेळी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती सलीम अन्वर, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसेविका ज्योती भोसले, जयंत पवार, बंडू बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.

तळवाडे साठवण तलावाचे विस्तारीकरण करण्यासाठी शेती महामंडळाची जमीन मिळावी यासाठी दादा भुसे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर शासनाकडून त्यासाठी शंभर एकर जमीन महापालिकेला मिळाल्याने विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागून साठवण क्षमता वाढली आहे. यंदाच्या पावसाने चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनाने हा संपूर्ण तलाव भरला आहे.

तीर्थक्षेत्र विकासावर भर

यावेळी बोलताना राज्यमंत्री दादा भूसे यांनी सांगितले की, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांना १५ कोटींचा निधीला मंजुरी मिळाली आहे. तसेच 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानासाठी १९६.२३ लाख, श्री क्षेत्र रोकडोबा देवस्थानसाठी १८८.०६ लाख तर श्री गोरक्षनाथ मंदिर गाळणेसाठी १५३.३३ लाख इतका निधी मंजूर झाला आहे, असेही भुसे यांनी सांगितले. या विकासकामांचा भूमिपूजन सोहळादेखील सोमवारी झाला. या कार्यक्रमाप्रसंगी शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरला संततधार सुरूच

$
0
0

गणेशभक्तांचा हिरमोड, बंधारे भरले

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सोमवार (दि. २८) सकाळपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने तलाव, बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत होते. दुपारी चार वाजेच्या दरम्यान मेनरोडवर गुडघ्याएवढे पाणी साचले होते. रस्त्यावरून वाहणारे पाणी नेमके त्याच वेळेस सोमवारची पालखी कुशावर्तावर स्नानासाठी निघाली होती. यावेळी गंगा गोदावरी भगवान त्र्यंबकेश्वरच्या चरणी आल्याचे हे दृश्य होते. येथील अहिल्या धरण ओव्हर फ्लो झालेले असून, पाऊस सुरूच असल्याने येथील सिंहस्थातील घाटाच्या वरच्या बाजूस पाणी लागले होते. गंगासागर तलाव भरून वाहायला लागला असून, सोमवारी दिवसभर वातावरणात काळोख दाटून राहीला होता.

घोटी-इगतपुरीत जोर'धार'

घोटी : घोटी परिसरात रविवारी (दि. २७) रात्रभर पाऊस झाल्यानंतर सोमवारी (दि. २८) दुपारी बारा वाजेनंतर इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यातील तिघांचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

त्र्यंबकेश्वर-पुणे या बसला रविवारी (दि. २७) मध्यरात्री झालेल्या अपघातात सटाणा येथील तिघेही प्रवाशी ठार झाले आहेत. सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दोन महिला तर विनय भास्कर खैरनार हा युवकदेखील या अपघातात मृत पावला आहे. त्याच्या वडीलांचे २ ऑगस्टला निधन झाले होते. या अपघातात येथील शोभा नंदू पगार (४५) या आपल्या मुलाने पुण्यात नव्यानेच बंगला बांधला असल्याने त्या बंगल्याच्या वास्तुशांती निमित्ताने पुण्‍याला आपल्या देराणी यमुना भिला पगार (५५) यांच्यासह निघाल्या होत्या. वास्तुशांती बरोबरच पुण्यात दोन ते चार दिवस मुक्काम करून पुण्याचे गणपती बघण्याची त्याची गेल्या कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. तीदेखील या निमित्ताने पूर्ण करण्याची त्यांची मानसिकता होती. मात्र त्र्यंबकेश्वर-पुणे या बसला झालेल्या अपघातात त्या मृत झाल्या. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घरी अपघाताचे वृत्त देण्यात आलेले नव्हते. रात्री उशिरापर्यंत मृतदेह उत्राणे येथे आणण्यात आले नसल्याने परिसरात शोकाकुल वातावरण आहे. या अपघातात सटाण्यातील विनय भास्कर खैरनार हा युवकदेखील मृत पावला आहे. तो सटाणा येथील सेवानिवृत्त तहसीलदार छोटू खैरनार यांचा पुतण्या असून, सासवडला नोकरीस आहे. सटाण्याहून जाताना तो नेहमीच याच बसने जाण्यासाठी सटाणा येथून निघत असे. मात्र रविवारचा दिवस त्याचा वैरी होऊन आला. याच महिन्यातील २ ऑगस्टला त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. विनयची पत्नीदेखील गर्भवती असून, खैरनार परिवारावर दु:खद प्रसंग ओढवला आहे. विनयचा मोठा भाऊ शिंपी काम करतो तर बहिणीचा विवाह झाला आहे.

त्र्यंबकचे प्रवाशी जखमी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथून रविवारी (दि. २७) रात्री नऊच्या सुमारास सुटलेल्या पुणे बसला मध्यरात्रीनंतर एक ते दीड वाजेच्या सुमारास नारायणगावजवळ अपघात झाला. या अपघातात सटाण्यातील दोन महिलांसह एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्र्यंबकेश्वरचे काही प्रवासी जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. २८) सकाळी या अपघाताची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन यंत्रणा कामाला लागली. अपघातात अंजनेरी येथील शाळेत शिक्षक नंदू पगार यांच्या पत्नी, काकू या मृत पावल्या आहेत. ही बस दररोज दुपारी १ वाजता त्र्यंबकला येते त्यानंतर रात्री नऊ वाजता ती त्र्यंबक स्थानकावरून रवाना होत असते.

पुणे येथील शिवाजी नगर आगाराची ही बस आहे. याव्यतिरिक्त पुणे येथून ये-जा करणाऱ्या आणखी दोन बस आहेत. कारवाई होणार का? : हा बस अपघात रस्त्यात टायर बदलत असलेल्या टेम्पोला धडक देऊन झाला. यामध्ये सात बस प्रवासी आणि टेम्पो चालक व क्लिनर यांचा मृत्यू झाला आहे. बसचालक बेदरकारपणे वेगाने वाहने चालवतात. तशात पुणे-मुंबई अशा लांब पल्ल्याचे चालक वेगाने वाहन चालवताना अपघातास कारण ठरत असतात. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अनेकवेळा बस चालकांनी वाहने पुढे काढत असताना आजूबाजूचा विचार करत नाही. त्यामुळे असे अपघात घडतात. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रार करूनही बस चालकांवर कारवाई होत नाही. तसेच त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायबुद्धीने पाणीवाटपाचा प्रश्न सुटावा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

पश्चिम महाराष्ट्राच्या नद्यांच्या पाण्यावर गुजरातसह महाराष्ट्राचाही अधिकार आहे. ग‌िरणा आण‌ि गोदा ही तुटीची खोरी असून, हे पाणी गुजरातने नेले तर या खोऱ्यांमध्ये पाणीच राहणार नाही. या पाण्यात महाराष्ट्राला मुबलक वाटा मिळावा यासाठी जनरेटा सुरू झाला आहे. राज्य सरकारनेही गुजरातला पाणी देण्याचा निर्णय परस्पर न घेता जनमत व‌िचारात घ्यावे, असे प्रतिपादन ‘मेरी’चे माजी महासंचालक डॉ. दि. मा. मोरे यांनी सोमवारी नाशिकमध्ये केले. अपव्यय होणाऱ्या पाण्याच्या योग्य वापरासाठीदेखील सरकारचा पुढाकार गरजेचा आहे. न्यायबुद्धीने पाणीवाटपाचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे पी अँड टी कॉलनीतील अखिल भारतीय ब्राह्मण कार्यालयात विशेष सहविचार सभा झाली. सभेचे उद््घाटन मेरीचे महासंचालक डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, माजी आमदार नितीन भोसले, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, सरोजिनी तारापूरकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने जल व सिंचन आयोगाचा अहवाल ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वीकारला आहे. जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी या अहवालात गोदावरी खोऱ्यात ६६ टीएमसी, गिरणा खोऱ्यात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सुचविले होते. मुंबई शहरासाठीदेखील ४२ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, तर नर्मदा प्रकल्पाकडेही ३८ टीएमसी पाणी वळविता येईल, असा दावाही त्यामध्ये करण्यात आला. डॉ. चितळे यांच्या अहवालाची गेल्या १८ वर्षांत प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाण्याची आवश्यकता असताना शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणावर पाणी वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पाण्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या वादांवर आताच तोडगा काढायला हवा, असा सूर या सभेतून निघाला. महाराष्ट्राचे राज्यकर्ते जाणीवपूर्वक पाण्यावरील हक्क सोडत आहेत. पश्चिम खोऱ्यातील पाणी लिफ्ट करून गोदावरी खोऱ्यात आणण्याची गरज आहे. मात्र, केंद्रात, राज्यात आणि गुजरातमध्येही भाजपची सत्ता असून, गुजरातच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप माजी आमदार भोसले यांनी केला.

पाण्याच्या समन्यायी वाटपाबाबत चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात किती टीएमसी पाणी उपलब्ध होते व तूट किती आहे यावरदेखील चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा जयप्रकाश संचेती यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या अहवालातील आकडेवारी दिशाभूल करणारी असून, त्यामुळेच या प्रश्नातून मार्ग निघणे कठीण असल्याचा दावा संचेती यांनी केला. मराठवाड्याचे क्षेत्रफळ राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या २६ टक्के आहे. मात्र, इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्याला केवळ सहा टक्के पाणी मिळते. मराठवाड्याला १५० टीएमसी पाण्याची गरज असल्याची भूमिका एस. ए. नागरे यांनी या वेळी मांडली. मुंबईकडे मुबलक पाणीसाठा असून, मुंबईचेच लाड का पुरवायचे, असा सवाल त्यांनी उपस्थ‌ित केला. मराठवाड्याला ज‌िवंत ठेवायचे असेल तर १५० टीएमसी पाणी मिळायलाच हवे, अशी आग्रही भूम‌िका त्यांनी या वेळी मांडली. पश्चिम घाटाचे पाणी वाचविण्याबरोबरच मराठवाड्याच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समन्यायी वाटपातून सोडविणे गरजेचे असल्याचा सूर या विशेष सभेतून उमटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसबाबत आस्तेकदम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या सिटी बससंदर्भात महामंडळाने जबाबदारी झटकण्याची तयारी सुरू केली असतानाच आता महापालिकेनेही सिटी बससेवेबाबत आस्तेकदम धोरण स्वीकारले आहे. महापालिकेने सिटी बससेवेबाबत कन्सल्टंट नियुक्त केला असून, कन्सल्टंटच्या अहवालानंतरच अभ्यासाअंती महापालिका निर्णय घेणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केेेले आहे.

सिटी बससेवा चालविणे ही महापालिकेची ऐच्छिक जबाबदारी असून, महापालिकेसमोर याबाबत विविध पर्यायही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महामंडळाने कितीही प्रयत्न केले, तरी महापालिका सिटी बससेवेची व्यवहार्यता तपासूनच निर्णय घेणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या दबावतंत्राचा कोणताही उपयोग होणार नसल्याची चिन्हे आहेत.

शहरांतर्गत बससेवा सध्या राज्य महामंडळाकडून चालविली जात आहे. परंतु, ही सेवा तोट्यात असल्याचे सांगत महामंडळाने महापालिकेने बससेवा चालवावी किंवा तोटा भरून देण्याची मागणी केली आहे. परंतु, महापालिकेने याबाबत अद्याप आपले धोरण स्पष्ट केलेले नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या बससेवा चालविण्याबबत सक्षम नाही. त्यामुळे महामंडळाने बससेवेबाबत महापालिकेवर दबावतंत्र सुरू केले आहे. महामंडळाकडून काही बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असून, अचानक संप पुकारून नागरिकांना वेठीस धरले गेले.

एकीकडे महामंडळाने असे दबावतंत्र सुरू केले असतानाच महापालिकेने मात्र सिटी बससेवेबाबत आस्तेकदम चालण्याची भूमिका स्वीकारली आहे. सिटी बससेवा महापालिका चालवू शकते का, याची व्यवहार्यता तपासण्यासाठी महापालिकेने कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महासभेने ठरावही मंजूर केला असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. महामंडळाने हस्तांतरणासाठी दबाव वाढविला असला, तरी सिटी बससेवा चालविणे ही महापालिकेची ऐच्छिक जबाबदारी असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे. सिटी बससेवेबाबत पूर्णतः अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाकडून सुरू असलेल्या दबावतंत्रापुढे महापालिका झुकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


महापालिकेसमोर चार पर्याय

महापालिकेसमोर सिटी बससेवेबाबत चार पर्याय समोर असून, पहिल्या पर्यायात सिटी बससेवा महापालिकेने चालवावी, दुसऱ्या पर्यायात महापालिका ५० टक्के व महामंडळाने ५० टक्के खर्च करावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. तिसऱ्या पर्यायात बससेवेचे खासगीकरण करून केवळ त्या बसवरील कंडक्टर महापालिकेचा असावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. चौथ्या पर्यायात ‘एएसआरटी’अंतर्गत बससेवेचे आधुनिकीकरण करून बससेवा चालवावी, असा प्रस्ताव आहे. परंतु, अंतिम निर्णय व्यवहार्यता तपासून व अभ्यास करूनच घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

--

थेट मुख्यमंत्र्यांना साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी आमदार जयवंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आमदार जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शहर बससेवा महापालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर महापालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले जात आहेत. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नाईलाजास्तव रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.


केवळ नफ्याचा विचार नको

एसटी महामंडळाने शहरातील बस फेऱ्या कमी केल्यामुळे नादुरुस्त काम नसलेल्या ५० चालक व ५० वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतल्याने दि. २२ ऑगस्ट रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन करून शहर बससेवा बंद ठेवली. त्यामुळे शहरवासीयांची प्रचंड गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर केवळ नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्रम देऊन शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याकडे किंवा सदर सेवा महापालिकेकडे वर्ग करण्याबाबत आपण स्वतः लक्ष घालावे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससाठी ‘रास्ता रोको’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गेल्या काही महिन्यांपासून पळसे थांब्यावर थांबण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीच्या चालक-वाहकांना पळसे येथील विद्यार्थिनींनी सोमवारी चक्क रास्ता रोको करून चांगलाच हिसका दाखवला.

येथे बसेस थांबत नसल्याने पळसे येथील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाणे अवघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने अखेरीस सोमवारी येथील विद्यार्थिनींचा संयम सुटला आणि त्यांनी चक्क पळसे येथे महामार्गावर एसटी बसेस रोखल्या. या आंदोलनाची दखल आमदार योगेश घोलप यांनी घेत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी न लागल्यास परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

पळसे येथून नाशिकरोड येथे विविध शाळा व कॉलेजांत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पळसे येथे काही दिवसांपासून एसटी बसेस थांबत नाहीत. परिणामी पळसे येथील विद्यार्थिनींची नाशिकरोड येथे येण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. कित्येक विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकाराने त्रस्त झालेल्या विद्यार्थिनींच्या संयमाचा बांध अखेरीस सोमवारी दुपारी फुटल्याने त्यांनी थेट महामार्गावर उतरून एसटी बसेस रोखल्या. या प्रकाराने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु, या विद्यार्थिनींनी केवळ एसटी बसेस अडवून परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांच्या मनमानीचा निषेध नोंदवला.

या आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन विद्यार्थिची समजूत घातली व एसटीच्या अधिकाऱ्यांशी या प्रश्नावर चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. आमदार योगेश घोलप यांना या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनीही या विद्यार्थिनींसह नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली. पळसे येथे पोलिस कर्मचारी नेमण्याचे आश्वासनही नाशिकरोड पोलिसांनी दिले.

--

नियंत्रक आउट ऑफ स्टेशन

एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्याशी आमदार योगेश घोलप यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्या बाहेरगावी असल्याचे नेहमीचे उत्तर मिळाले. ज्या ज्या वेळी एसटीसंबंधित काही घटना घडतात त्या त्या वेळी विभागीय नियंत्रक कायमच बाहेरगावी कशा असतात, असा प्रश्न यावेळी उपस्थितांना पडला. त्यामुळे आमदार योगेश घोलप यांचा संताप अनावर झाला. येत्या आठवडाभरात शिंदे व पळसे येथील विद्यार्थ्यांच्या बससेवेचा प्रश्न न सुटल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

--

काही महिन्यांपासून पळसे बसस्थांब्यावर एसटी बसेस थांबत नाहीत. पंचवटी डेपोची विद्यार्थ्यांसाठीची बससेवाही चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नाशिकरोड येथील कॉलेजला जाण्यासाठी कित्येक तास महामार्गावर उभे राहावे लागते. महामंडळ आम्हाला पास देते, पण बसेस थांबत नाही.

-सविता गायधनी, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात इच्छुकांनी केला ‘श्रीगणेशा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुकांतील इच्छुकांसाठी गणेशोत्सवामुळे ‘श्रीगणेशा’ करण्याची चांगली संधी मिळाली आहे. चौकाचौकात गाठीभेटी, आरती, प्रसाद या निमित्ताने अनेक इच्छुकांनी जनमताचा अंदाज घेत आहेत. यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे या जनमानसातून काही इच्छुक कोणत्या पदासाठी निवडणूक लढवावी, याचाही अंदाज बांधतांना दिसत आहेत.

नगरपालिका निवडणुकीतील इच्छुकांसह विद्यमान पदाधिकाऱ्यांनी गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करून गाठीभेटीचा श्रीगणेशा केला आहे. लोकांची मत जाणून घेत असताना अनेकांना मतदारयाद्यांची प्रतीक्षा लागली आहे. २० जुलै २०१७ रोजी प्रभाग आरक्षण सोडत आणि २७ जुलै २०१७ ला प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

तथापि प्रभाग रचना निश्चित लक्षात येत नसल्याने मतदारयाद्या येतील तेव्हाच काय ते खरे, असे म्हणून अनेकांनी नगरपालिका व तहसील कार्यालयात चौकशीचा सपाटा लावला आहे.

इच्छुकांकडून बाप्पांना साकडे

साधारणतः महिन्याभरापासून वाढदिवस उत्साहाने साजरे होत आहेत. आता गणरायाच्या उत्सवाचे निमित्त मिळाले आहे. केंद्रात आणि राज्यात विजयाचे विक्रम करत असलेल्या भाजपकडे उमेदवारीसाठी सर्वांचाच ओढा आहे. त्याकरिता पक्षप्रवेश देखील घडत आहेत. यावेळी त्र्यंबक शहर विकास आघाडी स्थापन होत असल्याने त्याचा मोठा फटका भाजपला बसेल, अशी चर्चा सुरू आहे. वास्तविक शहरात भाजपच्या खालोखाल राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून येत असतात आणि काँग्रेसचे मतदारही आहेत. ठोस मतदार असलेली शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. या सगळ्या बाबींचा एकत्रित विचार करता भाजपला ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. तरी या गणेशोत्सवात सर्वच पक्ष कार्यात इच्छुक तिकिटाच्या ‘प्रसादा’साठी सकाळ-संध्याकाळ ‘आरती’ करीत बाप्पांना साकडे घालताना दिसून येत आहेत.

मतदारयाद्यांबाबत अफवा

काही दिवसांपूर्वी १६ ऑगस्टला मतदारयाद्या प्रसिद्ध होणार अशी अफवा पसरली होती. मात्र याद्या आणि निवडणूक कार्यक्रम सोबतच जाहीर होणार असल्याने त्यास अद्याप अवकाश आहे. नगराध्यक्षपद थेट मतदारांकडून निवड होणार असल्याने नगरसेवक की नगराध्यक्ष अशा द्विधा मनःस्थितीत अनेक उमेदवार सापडले आहेत. तर काही जनमताचा कौल आजमावून घेत आहेत. एकंदरीतच गणेशोत्सव हा निवडणूक इच्छुकांसाठी पर्वकाल ठरत असल्याची परिस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images