Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रभाग सभेत कंदील आख्यान

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील विविध नागरी प्रश्नांवर महापालिका प्रशासनाला धारेवर धरत शहराला अंधाराच्या साम्राज्यात ढकलणाऱ्या विद्युत विभागाच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी सोमवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी विभागीय अधिकाऱ्यांना थेट कंदीलच भेट दिला.

शिवसेनेच्या या अनोख्या कंदील आख्यानामुळे नाशिकरोड प्रभाग सभेमध्ये महापालिका अधिकारी व शिवसेना नगरसेवक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. पथदीपांच्या प्रश्नावर शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे चेहेरे मात्र उतरल्यासारखे दिसून आले.

नाशिकरोड येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात प्रभाग समितीची सभा सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी विद्युत, आरोग्य, स्वच्छता, उद्यान, बांधकाम, भुयारी गटार योजना अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ही सभा शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे गाजली.

प्रभाग क्रमांक १७ व १८ मधील बंद पथदीप दुरुस्त करण्याकडे महापालिकेचा विद्युत विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप करून विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी चांगलेच धारेवर धरले. बंद पथदीपांची लेखी तक्रार करा, अशी सूचना विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना केल्याने नगरसेवक भडकले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे, संतोष साळवे, सुनीता कोठुळे, रंजना बोराडे, जयश्री खर्जुल यांनी सभागृहातच विभागीय अधिकाऱ्यांना कंदील भेट दिला. जयश्री खर्जुल, सूर्यकांत लवटे, सीमा ताजणे यांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या.

--

भाजप नगरसेवकांचे मौन

या प्रभाग समिती सभेस उपस्थित असलेल्या भाजपच्या प्रा. शरद मोरे, अंबादास पगारे, सरोज अहिरे, पंडित आवारे, मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया या नगरसेवकांनी या खडाजंगीवेळी मौन बाळगले. त्यामुळे या प्रभाग सभेत भाजपचे नगरसेवक पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.

--

‘त्या’ विषयांवर चर्चाच नाही

या सभेसाठी नगरसेवकांना देण्यात आलेल्या विषयपत्रिकेवर सभेत कोणी चकार शब्दही काढला नाही. लाखो रुपयांच्या निधीची विकासकामे मंजुरीसाठी या विषयपत्रिकेत ठेवण्यात आली होती. परंतु, त्यातील एकाही विषयावर या सभेत नेहमीप्रमाणे चर्चा झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मन्सुरी कुटुंबीय देतात सलोख्याचा संदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

वर्षभरात साजरा होणाऱ्या प्रत्येक सण-उत्सवात हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देवून जातीय सलोखा निर्माण करण्यात येतो. तसेच पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर सण-उत्सवापूर्वी शांतता कमिटीची बैठक घेण्यात येते. आणि एकात्मतेसाठी प्रयत्न केले जातात. मात्र जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विटाई गावात लतीफ बशीर मन्सुरी या मुस्लिम कुटुंबाने हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन प्रत्यक्षात गणेशाची स्थापना करून घडविले आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून विटाई गावातील मन्सुरी कुटुंबात गणेशोत्सव विधीवत पद्धतीने साजरा केला जात आहे. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज धुप-आरती करून परिसरातील नागरिकांना प्रसादाचे वाटप केले जाते. 'वडील जे-जे करिती, त्यालाच नाम धर्म ठेवीती' या शब्दात गणेशोत्सवाचे वर्णन मन्सुरी यांनी केले. वडिलांच्या परंपरेनुसार हा वारसा जपत असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिनकर पाटलांचे प्रशासनाला डोस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेत भाजपला वारंवार अडचणीत आणण्याचा पत्रप्रपंच सभागृहनेते दिनकर पाटिल यांनी सुरू ठेवला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सोमवारी लेटरबॉम्ब टाकून त्यांनी शिस्तीचे धडे दिले. यासाठी त्यांनी प्रशासनप्रमुख असलेल्या आयुक्तांनाही मागे टाकत अधिकाऱ्यांसाठी ११ संतवचने लिहून दिली. यात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे असावे, याचे दाखले दिले असून ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ अशी वचने नमूद करण्यात आली आहेत.
दिनकर पाटील आणि वाद हे समिकरण जुळलेले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असतांनाही, प्रशासनाला वेळोवेळी आरसा दाखवण्यास ते मागे पुढे हटत नाहीत. विशेष म्हणजे पावसाळी गटार योजनेच्या चौकशीवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले होते. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटलांनी सोमवारी महापालिका उपायुक्तांसह विभाग प्रमुखांना पत्र पाठविले. यात अधिकाऱ्यांनी कसे वागावे, कसे कामकाज करावे, काय करू नये, जेवणाच्या वेळा कशा असाव्यात, अधिकाऱ्यांचे कर्तव्य काय, जनतेची सेवा कशी केली पाहिजे अशा प्रश्नांची सरबत्ती केली. आपण जनतेचे नोकर असल्याची जाणीवही अधिकाऱ्यांना करून दिली आहे. मनुष्य मेल्यावर सोबत काही घेऊन जात नाही असा दाखला देत अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार न करण्याचा सल्ला दिला आहे. जीवन जगायला काहीच लागत नाही. स्वतःमधील नकारात्मक विचार झटकण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे. पाटील यांच्या पत्रामुळे अधिकारी व कर्मचारी हे कामच करत नसल्याचे दिसून येत असून त्यांनी आपल्याच पक्षाच्या महापौरांना आरसा दाखवला आहे. त्यामुळे पाटील यांच्या पत्राची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिकारावर अतिक्रमण
गेल्या स्थायी समितीत आयुक्तांसह शहर अभियंत्यानी अधिकाऱ्यांचा वेळ हा कामांऐवजी पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटा मारण्यातच जात असल्याचे सांगितले होते. त्यांचा अप्रत्यक्ष रोख हा पाटील यांच्याकडे होता. सभापतींनी याबाबत अधिकाऱ्यांना गरज असेल तरच जाण्याची सूचना केली होती. त्यामुळे पाटील हे नाराज झाले असून त्यांनी दोन पावले पुढे जात थेट प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या भाषेतून कर्तव्याची आठवण करून दिली आहे. आपण भ्रष्टाचार करणार नाही आणि करू देणार नाही अशी क्लिनचीट स्वतःलाच मिळवून घेतली आहे. तसेच अधिकाऱ्यांना उपदेशाचे डोसे पाजून आयुक्तांच्या अधिकारावरच अतिक्रमण केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर भरतीच्या अटी शिथिल करण्यास नकार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील ३२ डॉक्टरांच्या भरतीसाठी असलेल्या नियमावलीत बदल करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागातील डॉक्टरांच्या पदासाठी शासकीय सेवेत तीन वर्षाच्या सेवेची अट कायम राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाला आता नियमानुसारच वैद्यकीयची पदे भरावी लागणार आहेत.
राज्य सरकारने वैद्यकीय विभागात ३२ डॉक्टरांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहीरातही काढली. परंतु, या पदांसाठी यापूर्वी शासकीय सेवेत तीन वर्षांचा कामाचा अनुभव असल्याची अट आहे. त्यामुळे या पदांसाठी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने तीन वर्षांची अट शिथिल करावी, असा प्रस्ताव सादर केला होता. डॉक्टरची पदवी मिळविलेल्यांना या पदावर भरती करण्यास परवानगी मागितली होती. या प्रस्तावाबाबत राज्य सरकारचे मार्गदर्शन अखेर प्राप्त झाले आहे. सरकारने नियमावलीत सूट देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. वैद्यकीय विभागाच्या भरती नियमावलीत बदल करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. त्यामुळे महापालिकेला आता नियमावलीनुसारच ३२ डॉक्टरांची भरती करावी लागणार आहे. त्यामुळे अनुभवी डॉक्टरांचा शोध महापालिकेला घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ

0
0

अक्षय सराफ, कॉलेज क्लब रिपोर्टर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे सर्व्हर डाउन व तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक विद्यार्थ्यांचे सोमवारपर्यंत परीक्षा अर्ज भरले न गेल्याने विद्यापीठाने तीन दिवस मुदतवाढ दिली आहे.
पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर तांत्रिक अडचणी व सर्व्हर डाउनची समस्या मंगळवार व बुधवारीही येत असल्याने इंजिनीअरिंगच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना या समस्येचा सामना करावा लागला. दरम्यान, या प्रकरणी परीक्षा विभागाचे बी. डी. देशमुख यांनी सांगितले, की आमच्याकडे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरतानाच्या अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. विद्यापीठाची वेबसाइट अजून पूर्णपणे अपडेट झाले नसल्याने ही समस्या उद्भवत होती. वेबसाइट सुरळीत चालू झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरले न गेल्याने मुदतवाढ दिली गेल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबलीकरण ही जबाबदारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
स्त्री सबलीकरण ही क्रांती नाही तर जबाबदारी आहे. महिलांनी आत्मविश्वास वाढवला, आपली तर्क बुध्दीचा वापर केला आणि समयसूचकता दाखवली तर महिलांकडे उठणारी बोटं आपोआप खाली होतील. समाजातच नाही तर कुटुंबातही यामुळे महिलेला सन्मान मिळू शकतो, असे मत मंजुषा चौघुले यांनी व्यक्त केले. अभिनेत्री आणि स्वरंक्षण तज्ज्ञ म्हणून चौघुले काम करतात.
शहर पोलिस दल आणि महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित महिला स्वसंरक्षण या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांनी आपले बदल घडवताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला चौघुले यांनी दिला. आत्मविश्वास, समयसूचकता, देहबोली अशा साध्या बाबीत सुधारणा करून आपले ध्येय साधता करता येते, हे त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. मुलांच्या संगोपनासाठी महिला करियरला मुठमाती देतात. त्यावेळी त्यांच्या मनात खदखद असते. कुटुंबासाठी आपण काहीच करीत नाही, याची जाणीव त्यांना टोचत असते. मात्र, मुलांचे योग्य संगोपन करणे हेही एक कामच असून, ते विनामोबादला करीत आपण करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची सवय कमी केल्यास आत्मनिर्भरता वाढते. आपल्या जीवनात पाच व्यक्ती अशा असाव्यात की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली साथ दिली पाहिजे. व्हर्चुअल मैत्री कामी येत नाही, याची मनाशी गुणगाठ ठेवा, असे चौघुले यांनी उदाहरणासह त्यांनी पटवून दिले. स्वसंरक्षणात महिलांकडून होणारा विरोध महत्त्वाचा असतो. मात्र, महिला याकडे दुर्लक्ष करतात. यावेळी स्वरक्षणासाठी वापरल्या कराटे, मार्शल आर्टसच्या बेसिक टिप्स महिलांना सप्रमाण दाखवून दिल्यात. कार्यक्रमास महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनीता सिंगल, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, आमदार देवयानी फरांदे, सिमा हिरे, महापौर रंजना भानसी, प्रज्ञा पाटील, नमिता कोहक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका अथरे यांच्यासह आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रस्ताविक केले. महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

व्हुर्च्युअल सिक्युरिटी समजून घ्या
फेसबुक, व्हॉट्सअॅप अथवा सोशल मीडियावरील मैत्रीचे बंध महिलांसाठी जीवघेणे ठरत आहे. सहज पाठवलेल्या फोटोंचा गैरवापर होतो. कोणत्याही परिस्थितीत महिलांनी आपले कोणतेही फोटो काढून देण्यास विरोध केला पाहिजे. किंबहुना आपणही तसे फोटो दुसऱ्यास पाठवयलाच नको. अगदी आपला मित्र, नवरा, प्रियकर कोणीही असो त्यास त्यावेळी विरोधच करायला हवा. यामुळे अगदी शाळकरी मुलींपासून तरुण मुलींनी आत्महत्या केल्या. बाथरुम सेल्फी, बेडरुम सेल्फी असे प्रकार महिलांची सुरक्षितता धोक्यात आणतात. त्यास महिलाच थांबवू शकतात, असे चौघुले यांनी काही ताज्या घटनांसह पटवून दिले.

पालक-पाल्य संवाद दृढ व्हावा
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सायबर सिक्युरीटी तसेच अल्पवयीन मुलींची मानसिकता यावर प्रकाश टाकला. शहरातून २०१६ मध्ये १३६ अल्पवयीन मुली घर सोडून पळून गेल्या. यातील १३१ मुलींना परत आणण्यात पोलिसांना यश आले. यंदाही सुमारे १०० मुली पळाल्या असून, त्यातील ८२ मुलींचा शोध लागला आहे. अल्पवयात कोणतीही समज नसताना मुलीच नाही तर मुलेही घर सोडतात. यासाठी पालकांचा आणि मुलांचा संवाद अधिक दृढ व्हायला हवा. तसेच आपला मुलगा किंवा मुलगी स्मार्टफोनमध्ये नक्की काय करते, याचा आढावा घ्यायलाच हवा, असे सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचे वेतन रखडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन फक्त आधार लिंक नसल्याने तसेच हजेरी अपटेड होत नाहीत म्हणून रखडले आहेत. सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांचे वेतन थेट बँकेत जमा होत असून, लवकरच सर्वांच्या वेतनात वाढ होणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले.
शहर पोलिस दल आणि महिला व बाल कल्याण विभागामार्फत आयोजित कार्यक्रमासाठी सिंगल उपस्थित होत्या. राज्यात दोन लाख सहा हजाराच्या पुढे अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना वेळेत आणि पारदर्शक पध्दतीने वेतन मिळावे केंद्र सरकारच्या पब्लिक फायनान्सल मॅनेजमेन्ट सिस्टिम (पीएफएमएस) या प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीद्वारे हे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. यासाठी आधारकार्ड लिंक करणे तसेच हजेरी अपटेड असणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये हे काम रखडल्याने सुमारे १० अंगणवाडी सेविकांना दोन महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत. वास्तविक ही तांत्रिक चूक असून, येत्या दोन दिवसात दोन्ही कामे पूर्ण झाल्यास ऑगस्ट महिन्याचे वेतनही खात्यात जमा होईल, असा विश्वास सिंगल यांनी व्यक्त केला. या खात्याकडे पुरेसा निधी असून, सरकार सकारत्मक पध्दतीने महिला सुरक्षेचा मुद्दा हाताळत असल्याचे त्यांनी सांगितले.

वेतनवाढीसह इतर लाभ
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक समिती नियुक्त केली असून, मानधनवाढ समितीच्या बैठकीत यावर सकारत्मक चर्चा झाली आहे. यास मंजुरी मिळाल्यानंतर मानधन वाढ होईलच पण निवृत्तीवेतन, विमा, इतर भत्तेही लागू होतील. अंगणवाडी सेविकांवर ग्रामीण भागाची मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांबरोबर स्तनपान करणाऱ्या माता, गर्भवती महिला यांच्या आरोग्याची काळजी अंगणवाडी सेविका घेतात. सरकार तुमच्या प्रश्नांबाबत सकारत्मक असताना बहिष्कारासारखे आयुध वापरले गेल्यास त्याचा फटका ग्र्रामीण भागाला बसत असल्याची खंत सिंगल यांनी व्यक्त केली.

माझी कन्या भाग्यश्री
सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनाही कन्याच आहे. दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांचा वारसाही त्याच्या मुलीच पुढे नेत आहेत. मुली मुलांपेक्षा कमी नाही. तरीही मुलांच्या जन्मांना प्राधन्य दिले जात असल्याने सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. एकच मुलगी असलेल्यांना ५० हजार तर दोन मुली असलेल्या प्रत्येकी २५ हजार असे ५० हजार रुपये सरकार देते. हे पैसे थेट मुलींच्या नावे बँकेत जमा होत असल्याने त्याची शाश्वती कायम राहते. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि प्रसार तसेच प्रचार करावा, असे आवाहन सिंगल यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसबीआय’कडून ज्येष्ठांची पिळवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भारतीय स्टेट बँकेकडून (एसबीआय) ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन खात्यात किमान पाच हजार रुपये ठेवण्याचा तगादा लावला जात आहे. ज्यांच्या खात्यात अशी रक्कम नसेल त्यांच्या खात्यातून परस्पर ११५ रुपये वजा करून घेतले जात आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतरही बँक अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

‘एसबीआय’चे ग्राहक असलेले पी. टी. गवळी हे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडचे पेन्शनर आहेत. या फंडाच्या पेन्शनसाठी ‘एसबीआय’च्या नाशिक शाखेत २०१६ मध्ये ५०० रुपये भरून त्यांनी पेन्शन खाते सुरू केले. त्यावेळी किमान ५०० रुपये किमान भरुन पेन्शने खाते उघडता येत होते. किमान बॅलन्स २५० ते ५०० रुपये खात्यात ठेवण्याचा नियम होता. तसेच त्यांचे खाते सुरू होते. बँकेने एप्रिल २०१७ पासून पेन्शनच्या बचत खात्यात पाच हजार रुपये ठेवण्याची सक्ती केली आहे. तसेच किमान बॅलन्स पाच हजार रुपये न ठेवल्यास ११५ रुपये पेन्शन खात्यातून परस्पर रक्कम काढून घेतली जाते. गडकरी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये हयातीचा दाखला दिला. तरीही त्यांची एप्रिल २०१७ पासून आजपर्यंत पेन्शन जमा झालेली नाही. याबाबत बँकेने काही कळवण्याची तसदीही घेतलेली नाही. मात्र, बॅँकेने एप्रिल २०१७ पासून पेन्शन जमा न करता बॅलन्स कमी असल्याने दरमहा ११५ प्रमाणे तीन ते चार महिन्याचे चार्जेस आकारून त्यांचा बचत खात्याचा बॅलन्स झिरो केला. याबाबत त्यांनी चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

गडकरी यांना दरमहा मिळणारी पेन्शन एक हजार रुपयाच्या आता आहे. ‘एसबीआय’च्या नियमानुसार पेन्शन न काढायची म्हटल्यास पाच हजार बॅलन्स ठेवण्याची पाच ते सहा महिने पेन्शन काढता येणार नाही. पेन्शनधारकाची आर्थिक परिस्थिती व जमा होणारी पेन्शन विचारात घेऊनच बॅलन्स आकरणे संयुक्तिक ठरेल. कमकुवत घटकांना व ज्येष्ठ नागरिकांना ‘एसबीआय’ने त्रास देऊ नये. पंतप्रधानांच्या जनधन खात्याप्रमाणेच ज्येष्ठांचे खाते झिरो बॅलन्स करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

बँक अधिकारी हतबल
याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा निर्णय धोरणात्मक आहे. या प्रश्नी आम्ही काहीही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. बँक अधिकाऱ्यांच्या या हतबलतेमुळे ज्येष्ठांना न्याय कोण देणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बँकेकडून असमाधानकारक वागणुक मिळत आहे. बँक मनमानी कारभाराने अन्याय करीत आहे. ‘एसबीआय’ने ज्येष्ठांना झिरो बॅलन्सची खाती उघडून द्यावीत.
- पी. टी. गडकरी, ज्येष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संगीत मेळ्याची मेजवानी रंगतदार!

0
0

१९५३ सालाची गोष्ट. मी नुकताच नाशिकमध्ये आलो होतो. स्वातंत्र्य मिळाल्याने सर्वत्र देशभक्तीचे वातावरण होते. त्याचा परिणाम गणेशोत्सवावरही दिसून यायचा. प्रचंड उल्हासमय वातावण असायचे.
- विनायकदादा पाटील
१९५३ सालाची गोष्ट. मी नुकताच नाशिकमध्ये आलो होतो. स्वातंत्र्य मिळाल्याने सर्वत्र देशभक्तीचे वातावरण होते. त्याचा परिणाम गणेशोत्सवावरही दिसून यायचा. प्रचंड उल्हासमय वातावण असायचे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या एक महिना अगोदर चर्चांना उधाण यायचे. कोणत्या मंडळात कुठला देखावा सादर होणार याची सर्वांना उत्सुकता असायची. ही चर्चा गणेशोत्सव संपून गेल्यानंतरही होत असे; मात्र त्याचे स्वरुप वेगळे होते. कोणत्या मंडळाने चांगला देखावा केला हा त्यावेळचा विषय असे. त्याकाळी चित्रपट मोठ्यांच्या करमणुकीचा विषय होता. सर्वसामान्यांसाठी गणेशोत्सवाच्या काळात संगीत मेळे सादर व्हायचे. त्याकाळात नावाजलेली नट मंडळी या मेळ्यांमध्ये काम करीत होती. त्याचा अभिनय पाहणे ही मेजवानी असे. मेळ्यांमधून विविध विषयांवर प्रबोधन होत असे. पुढे-पुढे प्रबोधनाची जागा करमणुकीने घेतली आणि मेळे बंद झाले. नुकतेच स्वतंत्र्य मिळाले असल्याकारणाने देखाव्यावर देखील त्याचा प्रभाव होता. गांधी, नेहरू हे प्रत्येक देखाव्यात असणार असा जणू नियम होता. कधी-कधी गांधी आणि नेहरूंच्या मुखवट्यांऐवजी गणपतीचे मुखवटे लावले जात असे. यावेळी पीक, धान्य, पाणी अशा विषयांवरच्या देखाव्यांची चलती होती. कालांतराने देखाव्यांमध्ये तांत्रिक बाबींचा समावेश होऊ लागला. पुतळ्यांऐवजी हलते-चालते पुतळे आकाराला येऊ लागले. लहानपणी ते पहाताना मोठा औत्सुकतेचा विषय असायचा. यावेळी हत्ती सोंड फरवतो, कालिया मर्दन, राम-भरत भेट असे पौराणिक देखावे मोठ्या प्रमाणात तयार होत. यावेळी गणपती पाहणे हीदेखील पर्वणी असायची. मी खेड्यातून आलेलो होते. गणपती पाहण्यासाठी गावाकडून आलेला मंडळीचा डेरा माझ्याकडे असायचा. ग्रामीण भागात वीज नसल्याने त्यांना शहरातील गणपती मंडळांचे मोठे अप्रुप वाटायचे. घरात जणू महोत्सव भरायचा, मजा यायची. नंतर त्याला थोडे उत्सवी स्वरुप यायला लागले. त्यावेळी तांबट, भोईर, लोंढे यांच्या मूर्ती पाहणे हे भाग्याचे लक्षण होते. यावेळच्या मिरवणुका आठ ते दहा तास चालत. लेझीम, डंबेल्स असे विविध प्रकार त्यात समाविष्ट असायचे. त्यावेळी लोक एकत्र यावी हाच टिळकांचा उद्देश होता. आता संवादाची माध्यमे वाढली, बदलली. त्यामुळे संवादाची जागा अपप्रवृत्तींनी घेतली. आज मिरवणूक पहायला जाण होत नाही; परंतु ते डिजेचे रुप पाहून नकोसे वाटते. कुठेतरी या गोष्टीला आळा बसला पाहिजे, असे मला आवर्जून वाटते. त्याकाळी गणेशोत्सवाचा त्रास नव्हता. तर ते दहा दिवस संपू नये, असे सगळ्यांना वाटायचे. आजची परिस्थिती उलट आहे असे मला वाटते. कोणताही सार्वजनिक उत्सव हा सगळ्यांच्या आनंदाकरता असतो. काहींचा आनंद बहुतेकांना त्रास अशी अवस्था असेल तर प्रथेमध्ये कालसंगत बदल करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधेपणातच उत्सवाची मजा

0
0

- पुष्पाताई हिरे, माजी मंत्री

माझे माहेर कोकणातले. कोकणापासून मुंबईपर्यंत गणेशोत्सवाची मजा काही वेगळीच असते. आमच्या घरात या उत्सवात धम्माल असायची. नातलग, पाहुणे यांचा राबता असायचा. सर्वांसाठी उकडीचे मोदक केले जात. कांदा आणि लसून न वापरता स्वयंपाक केला जात असे. गणेशोत्सवकाळात मांसाहार वर्ज्य असे. अत्यंत सात्विकपणे हा उत्सव साजरा होत असे. त्यामुळे या उत्सवाच्या बाबतीत मी पूर्वीपासूनच अधिक हळवी आहे. माझे आजोबा तसेच वडील नोकरीनिमित्त नाशिकमध्ये आले. तेव्हापासून नाशिकमधील गणेशोत्सवाशी माझा संबंध आला. नाशिकमध्येही अत्यंत शांततेने, साधेपणाने आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असे. आताही होतो. नाही असे नाही. परंतु, काळानुरूप या उत्सवाचे स्वरुप आणि तो साजरा करण्याची पद्धती बदलली आहे. उत्सव संस्कृतीचे वाहक असतात. ते साजरे केलेच पाहिजेत. परंतु, त्याचे महत्त्व जपण्याची जबाबदारीही सर्वांचीच आहे. असे उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी प्राधान्याने घ्यायलाच हवी.
आमच्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मर्यादित होती. उत्सवात साधेपणा अधिक होता. त्यावेळी फारसा भपकेबाजपणा आणि धांगडधिंगाणा नव्हता. तो हल्ली अधिक असतो, असे वाटते. गणेशोत्सवाशी भाविकांच्या श्रद्धा जोडलेल्या असतात. श्रद्धेने वाहिलेले फुलही ईश्वराला प्र‌िय असते, असे मला वाटते. त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच हा उत्सव साजरा करायला हवा. भपकेबाजपणा. धांगडधिंग्यासाठी अन्य अनेक उत्सव आणि सण असतात. बाप्पाच्या उत्सवात तो टाळायला हवा, असे मला वाटते. उत्सव काळात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात. त्यांमध्ये कर्णकर्कश आवाजात लाउड स्पिकर वाजविले जातात. त्याचा त्रास वयोवृद्ध व्यक्ती, रुग्णांना अधिक होतो. आमच्यावेळी ही काळजी अधिक घेतली जात असे. आताही ती प्राधान्याने घ्यायला हवी. यंदा कोर्टाने डीजेच्या आवाजाबाबत अनेक मर्यादा घालून दिल्या ही स्वागतार्ह बाब आहे. गणेशोत्सव भक्तीपूर्वक साजरा करण्यास त्यामुळे नक्कीच हातभार लागेल.

(संकलन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच दिवसांचे बाप्पा निघाले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घराघरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाला मंगळवारी, पाचव्या दिवशी वाजतगाजत निरोप देण्यात आला. गणेशविसर्जनासाठी सायंकाळनंतर भक्तांनी गर्दी केली होती. गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवस, पाचव्या तसेच सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. पाचव्या दिवशी सायंकाळी विधिवत पूजा केल्यानंतर लहानथोरांनी गणरायाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत तरुण मंडळी गटागटाने जात होती.

पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी दुतोंड्या मारुतीपासून ते गोदावरी-कपिला त्रिवेणी संगमापर्यंत गोदाघाट परिसरात भाविकांची संध्याकाळी गर्दी झाली होती. गणेशभक्त आपल्या कुटुंब‌ियांसमवेत मोठ्या भक्तिभावाने गोदाघाटावर येऊन आरती करत गणेशमूर्तींचे विसर्जन करत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’, ‘अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला’, ‘एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार...’ असा जयघोष करत नदीपात्रात तरुणांनी उतरून बाप्पाला निरोप दिला. काही कुटुंब‌ियांनी गोदाघाटावर वाजत-गाजत जल्लोषात गणरायाची छोटेखानी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.

गौरी पटांगण, रोकडोबा घाट, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट, गोदावरी-कपिला संगम आदि ठिकाणी भाविकांनी पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सायंकाळनंतर गोदाघाटाकडे येण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यामुळे नदीकडे येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शहरातील नदीकाठी गणेशविसर्जनाची खास सोय करण्यात आली होती. विसर्जनासाठी हौद उभारण्यात आले आहेत. नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून अनेकांनी या हौदात गणेशाचे विसर्जन केले. तर, काहींनी नदीतील वाहत्या पाण्यात विसर्जन केले. तत्पूर्वी, येथेही विधिवत गणेशाची पूजा करण्यात येत होती. घरातही बादलीत गणेशाचे विसर्जन करण्यात आले. सोसायट्यांमध्ये बसविण्यात आलेल्या गणरायाला निरोप देण्यात आला. काही सोसायट्यांनी ढोलपथकाच्या साह्याने वाजतगाजत मिरवणूक काढली.

सुरक्षेची काळजी

गणेशविसर्जनावेळी भाविकांना सहकार्य करण्यासाठी अग्निशामक विभागातर्फे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही स्वयंसेवक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना सूचना देताना दिसत होते. नदीपात्रात कुणी उतरू नये, यासाठी ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले होते. निर्माल्य नदीपात्रात टाकले जाऊ नये म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे निर्माल्य संकलित करण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक आराखडा चार हजार कोटींचा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीकडे झेपावणाऱ्या नाशिक शहरातील संभाव्य वीस वर्षातील सार्वजनिक वाहतूक व दळणवळण आराखड्याचे दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने (यूएमटीसी) मंगळवारी सादरीकरण केले. सर्वंकष वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वीस वर्षांत ४,१३५ कोटी रुपये खर्चाची शिफारस करण्यात आली आहे. त्यात रस्ते विकासासाठी ७६०, तर बस व्यवस्थेसाठी तीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

लोकसंख्यावाढीच्या दृष्टीने शहरात हाय कपॅसिटी मास ट्रान्स्पोर्टवर भर देण्यासोबतच बसेसची संख्या वाढवणे, ट्रामची व्यवस्था, रिंग रोड पूर्ण करणे, फूटपाथ, सायकल ट्रॅकला प्राधान्य आदी सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील रस्त्यांची रुंदी वाढवण्यासह मिसिंग पॉइंट जोडण्यावर भर दिला आहे. बससेवा पीपीपी तत्त्वावर चालवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असून, लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरासमोर सध्या वाहतूक व पार्किंगचा सर्वांत मोठा प्रश्न असून, त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी गेल्या वर्षी एप्र‌िलमध्ये संबंधित कंपनीला शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून पुढील वीस वर्षांसाठी शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यात बीआरटीएसच्या चाचपणीसह मोनोरेलसंदर्भातही अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने गेले वर्षभर शहरातील सर्व रस्त्यांचा व पार्किंगच्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर आपला अहवाल तयार केला आहे. पालिकेत मंगळवारी शहरातील विविध घटकांसमोर कंपनीचे अधिकारी एस. रामकृष्ण यांनी सादरीकरण केले. त्यात शहराची वीस वर्षांची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून बसेसची संख्या वाढवण्यावर भर देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

शहराची सध्याची लोकसंख्या १७ लाख ४५ हजारांच्या आसपास असून, २०३६ मध्ये ती ३३.२२ लाख होईल, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे. सद्यःस्थितीत शहरातील सर्वाधिक समस्या ही वाहतूक आणि पार्किंगची आहे. त्र्यंबकरोड, गंगापूररोड, नाशिकरोड ते शालिमार हे तीन रस्ते सोडले तर इतर रस्त्यांवर वाहतुकीचा कोंडमारा होत आहे. त्यामुळे कंपनीच्या वतीने आगामी वीस वर्षांचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अधिक मजबूत करण्याची शिफारस कंपनी केली आहे. बससाठी मार्ग निश्चित करण्यासह बसेसची संख्या वाढविण्याची सूचना केली आहे. कंपनीने तयार केलेल्या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक आराखडाही तयार करून दिला आहे. खर्चासाठी चार फेज तयार केले आहेत. वीस वर्षांत शहर वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ४,१३५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार रस्ते विकासावर ७६० कोटी, पादचारी प्रकल्पांसाठी १८४ कोटी, बसव्यवस्थेसाठी २,९६१ कोटी, मालवाहतूक ९५ कोटी, इंटेलिजन्ट ट्रान्स्पोर्ट १३० कोटी आणि पार्किंगसाठी आगामी वीस वर्षांत साडेचार कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही रक्कम ही राज्य व केंद्र सरकारच्या निधीमधून करता येईल, अशी शिफारस केली आहे. सरकारच्या अमृत योजनेतूनही निधी मिळवण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच या आराखड्यात बीआरटीएस, मोनोरेलसंदर्भातही सूचना करण्यात आली आहे. प्रशासनाने त्यांच्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी केली तर वाहतूक कोंडीतून सर्वसामान्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे.

सीटी बससेवा पीपीपीवर

यूएमटीपीच्या अहवालात शहरातील सार्वजनिक बससेवा ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर चालवण्याची शिफारस करण्यात आली आहे. शहरात सध्या महामंडळाकडून ५०८ मार्गांवर २४३ बसेस धावतात. यातील ५० टक्के मार्गांवर तर दिवसातून एकच बस धावते. त्यामुळे शहरात बसेसची संख्या वाढवणे आवश्यक आहे. सध्या शहराला ६९८ बसेसची गरज आहे. २०३६ पर्यंत १३२९ बसेसची गरज पडणार आहे. पाच महत्त्वाच्या मार्गांवर बसेस चालवून खासगी प्रवासी वाहतूक ही तीनपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. सोबतच लहान बसेसचाही पर्याय ठेवण्यात आला आहे.

वाहने ७.३२ लाख

शहरात वाहनसंख्या वेगाने वाढत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. सध्या शहरात ७ लाख ३२ हजार वाहने असून, त्यात ७४.६ टक्के वाहने ही दुचाकी आहेत, तर १२.३ टक्के वाहने चारचाकी आहेत. बससेवा कमकुवत असल्याने खासगी वाहने वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शहर बससेवेकडून रोज केवळ १.२३ लाख प्रवाशांचीच वाहतूक होते. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे बससेवा वापरणाऱ्यांमध्ये घट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाढत्या खासगी वाहनांमुळे सध्या वाहतुकीची कोंडी, पार्किंगची अडचण, वाहतुकीचा वेग मंदावणे, चौकांची कोंडी, पादचाऱ्यांची अडचण, अवैध प्रवासी वाहतुकीला तोंड द्यावे लागत आहे.

शिफारशी

शहर बसेसची संख्या वाढवणे, हजार लोकसंख्येमागे चार बसेस, बसेस,ऑटोसाठी स्वतंत्र रुट हवेत, २५ वाढीव चौकांसाठी सिग्नल बसवणे, पादचाऱ्यांसाठी १५० किमी पदपथ, किमान ९३ किमीचा सायकल ट्रॅक, शहराच्या सीमेवर ट्रक टर्मिनस तयार करणे, रिंगरोडची पूर्तता करणे, रस्त्यांची रुंदी वाढवणे, सिग्नलची संख्या वाढवणे, ४० ठिकाणी पे अँड पार्किंग, रस्त्यांमधील त्रुटी कमी करा, याबाबत धोरणे ठरवा, जमीन वर्गीकरण आणि वाहतूक, सार्वजनिक वाहने, पादचारी व सायकल, रस्ते विकास, मालवाहतूक, रहदारी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान

या आहेत शिफारशी

रस्ते सुधारणा आवश्यक

शहरातील महत्त्वाचे ६० व अन्य ५९ किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण या आराखड्यात सुचविण्यात आले आहे. सोबतच ५८ किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला आहे. रिंग रोड प्रकल्पात २ ब्रिजेसचाही समावेश केला आहे. त्यामुळे रहदारीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल.

दिवसा मालवाहतूक बंद

शहरात येणाऱ्या मालवाहतुकीला सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत बंदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सोबतच शहराबाहेर ट्रक टर्मिनल्स उभारण्यात यावे. या मालाची चढ उतरण, गॅरेज, ड्रायव्हरसाठी थांबा, बुकिंग काऊंटरची व्यवस्था करावी अशा सूचना केल्या आहेत. सध्या आडगाव येथेच ट्रक टर्मिनल्स असून, चेहेडी व मानूर परिसरात ट्रक टर्मिनल्स करण्याची शिफारस केली आहे.

पार्किंगही पीपीपीवर

शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पे अँड पार्कची व्यवस्था करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट, तसेच स्मार्ट कार्डद्वारे शुल्क आकारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सोबतच महत्त्वाच्या स्ट्रीट पार्किंग व्यवस्था करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीयपंथीयांवर धर्मांतराचा दबाव

0
0

धुळ्य ात पोलिस अधीक्षकांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात दोन धर्मातील तृतीयपंथीयांमध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाद सुरू आहेत. या वादाचे रुपांतर गणेश चतुर्थीच्या दिवशी हाणामारीत झाले. याप्रकरणी हिंदू धर्मातील तृतीयपंथीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सोमवारी (दि. २८) त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख एम. रामकुमार व जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले आहे. तसेच त्यांच्याकडून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनदेखील करण्यात आली.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात धर्मांतरासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात येत असून, धर्मांतर केले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे, असे नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिस प्रशासनाने वेळीच घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी हिंदू तृतीयपंथीयांनी केली आहे. अन्यथा शहरात दोन गटांत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनाद्वारे मांडण्यात आले आहे.

शहरातील मालेगावरोडलगत यल्लमादेवी मंदिरात हिंदू तृतीयपंथी पार्वती परशूराम जोगी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यात उज्जैन, इंदूर येथील पिठाधीश्वर किन्नर आखाडाचे आम्ही सदस्य असून, हिंदू तृतीयपंथी म्हणून धुळे शहरातील मालेगाव रोडलगत यल्लमादेवी मंदिरात वास्तव्याला आहेत, असे म्हटले आहे. यल्लमादेवीचे पुजारी म्हणून आमचा पूर्वापार मान असून, आजच्या स्थितीत सातवी पिढी कार्यरत आहे. हिंदू धर्मातील असल्याने सण उत्सवाच्या काळात जोगवा मागून पोट भरत असतो. आमचा पंधरा जणांचा गट असून, कोणालाही त्रास न देता अनेक वर्षांपासून आम्ही जीवन जगत आहोत, असेही शेवटी या निवेदनात नमूद केले आहे.

दोषींवर कारवाई करावी

शहरातील देवूपर भागातील भांडपुरा भागात दुसऱ्या धर्मातील तृतीयपंथी राहतात. त्यांचा वीस जणांचा गट असून, हे तृतीयपंथी गेल्या तीन-चार वर्षांपासून हिंदू तृतीयपंथीयांना त्रास देत असून, दुसरा धर्म स्वीकारण्यास दबाव टाकत आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापासून धर्मांतरासाठी अधिक दबाव वाढला आहे. तसेच कपाळावर कुंकू लावण्यासही हरकत या तृतीपंथींयांनी घेतली आहे. शिवाय हिंदू धर्मातील कोणत्याही कार्यक्रमात हे तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे उकरण्याचा प्रयत्न करतात. तसेच लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी अवाजवी पैसे मागतात. तरी याप्रकरणाचा तपासाची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबादला बिबट्याचे ठसे

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दहा दिवसांपूर्वी मेरी परिसरात बिबट्या दिसल्याने पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे लक्षात आल्याने मेरीत वन विभागाने पिंजरा लावला. बिबट्याची ही भीती दूर होते न होते तोच मखमलाबाद परिसरातील रहिवाश्यांना सोमवारी (दि. २८) रात्री दोन बिबटे दिसल्याची चर्चा सर्वत्र पसरली. मंगळवारी या परिसरात पायाचे ठसे आढळल्याने बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. येथे पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.

मखमलाबाद येथील गंगावाडी परिसरातील किरण पिंगळे यांच्या घराजवळील जक्कीशेठ कोकणी यांच्या शेतात दोन बिबटे जात असल्याचे नागरिकांना दिसले. ही माहिती संजय फडोळ यांनी वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली, मात्र तोपर्यंत बिबटे पसार झाले होते. ज्या भागात बिबटे दिसले त्या भागात मंगळवारी पाहणी केली असता बिबट्यांच्या पायाचे ठसे दिसले. बिबट्या दिसल्याने या भागात मंगळवारी दिवसभर बिबट्याच्या पायांची ठसे दिसत असलेल्या भागात नागरिकांची गर्दी झाली होती. पायांच्या ठशामुळे या भागात बिबट्यांचा वावर असल्याचे निश्चित झाले आहे. मेरी परिसरापाठोपाठ याही भागात बिबट्यांचा वावर असल्याने येथील रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वस्तांचीच अनास्था

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतुकीसह पार्किंगच्या समस्येवर नेहमीच ओरड करणाऱ्या शहरातील लोकप्रतिनिधींना वाहतूक व पार्किंगसंदर्भात गांभीर्य नसल्याचे मंगळवारी दिसून आले. शहराचा वीस वर्षांच्या सर्वंकष वाहतूक आराखड्याचे सादरीकरणासाठी महापालिकेतील ११२ नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. आराखड्याच्या सादरीकरणासाठी पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, शहर विकासाची जबाबदारी असलेल्या विश्वस्तांनीच या सादरीकरणाकडे पाठ फिरवल्याने केवळ राजकारणातच रस असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे या आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या महापालिका आयुक्तांसह पोलिस आयुक्त व महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनीही बेफिकिरी दाखवल्याने या आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित केली आहे.

दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने (यूएमटीसी) मंगळवारी सर्वंकष वाहतूक आराखड्याचे महापालिकेत सादरीकरण केले. त्यासाठी शहरातील विविध संस्था, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, पोलिस आयुक्त, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना आमंत्रित करण्यात आले होते. भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका दीक्षा लोंढे, अर्चना थोरात, नगरसेवक जगदीश पाटील, शहर अभियंता यू. बी. पवार या वेळी उपस्थित होते. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, मनसे गटनेते सलीम शेख, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे आदी गैरहजर होते.

शहराचे व्हिजन ठरवणारी बैठक बारा वाजेला आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी ही बैठक तब्बल तासाभरानंतर सुरू करण्यात आली. तरीही या महानुभावांनी बैठकीकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे नाशिक दत्तक घेतलेल्या भाजपच्या ६६ पैकी केवळ तीनच नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावून शहराप्रती असलेले आपले प्रेम दाखवून दिले.

पदाधिकाऱ्यांची शेवटी हजेरी

महापौर, उपमहापौरांसह आयुक्तांची वाट पाहत सादरीकरण तब्बल एक तास उशिराने सुरू करण्यात आले. बैठकीला उपस्थित काही पदाधिकाऱ्यांनी आरडाओरड सुरू केल्याने कार्यक्रम सुरू केला. मात्र, शेवटपर्यंत महापौर, उपमहापौर व आयुक्तांची वाट पाहण्यात आली. कार्यक्रम संपत आल्याचा संदेश गेल्यानंतर महापौरांनी शेवटी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आयुक्तांनीही अखेरच्या क्षणी हजेरी लावली. तोपर्यंत सर्व उपस्थित नागरिक बैठकीतून निघून गेले होते.

म्हणे रिंगरोड नाही!

शहर वाहतूक आराखडा सादर करणाऱ्या दिल्लीस्थित यूएमटीसीने आराखडा सादर करताना नवा जावईशोध लावला. शहरात रिंग रोड अस्तित्वात असतानाही, रिंगरोड नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे हा अहवाल एकाच ठिकाणी बसून तयार केला की काय, अशी चर्चा बैठकीतील उपस्थितांमध्येच सुरू झाली. सिंहस्थात तयार केलेल्या रिंगरोडचा विसर यूएमटीसी कंपनीला पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात अखेर रस्ताकामाला सुरुवात

0
0

मोतीबाग नाका ते अल्लमा पुलाचे डांबरीकरण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील मोतीबाग नाका ते अल्लमा पुलादरम्यान असलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने याबाबत वांरवार नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी मंडळांनी केली होती. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने २६ जुलै रोजी वृत्तही प्रसिद्ध केले होते. अखेर प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत या रस्त्याचे काम सुरू केले आहे.

येथील अलम्मा पूल-मोतीबाग नाका ते नवी वस्ती दरम्यानच्या रस्त्यावर चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. पालिकेकडून अमृत योजनेंतर्गत शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. त्यावेळी या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, यामुळे रस्ता रहदारीसाठी धोकादायक झाला होता. याबाबत पालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांना विचारणा केली असता, रस्ता मनपा हद्दीत असला तरी काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे असे तोकडे उत्तर मिळाले होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या परिसरातील नागरिकांचे हाल होत होते. शाळकरी मुले, पालक, स्कूल बसचालक यांनादेखील मनस्ताप सहन करावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, पावसामुळे रस्त्यावर साचलेले चिखल, माती हटवण्यात आली आहे. लवकरच डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे उपाभियंता राहुल पाटील यांनी सांगितले.

शहरात १८.५० कोटींची कामे

मोतीबाग नाका ते अल्लमा पुलादरम्यान २० फूट रुंद व ५०० मीटर लाब असा हा रस्ता होणार आहे. तसेच, मोतीबाग नाका ते नवी वस्ती दरम्यानच्या रस्ताकामाला देखील सुरुवात होणार असल्याचे पाटील यांनी मटाशी बोलताना सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १८.५० कोटी रुपयांची रस्त्याची कामे शहरात होणार असून, त्या अंतर्गत या रस्त्याचे देखील काम होते आहे.

सांडपाणी व्यवस्था

शहरातील बहुतांशी प्रमुख रस्त्यालगत सांडपाणी व्यवस्थेचा अभाव आहे. ज्या रस्त्यालगत सांडपाण्याच्या गटारी आहेत, त्यादेखील कचऱ्याने तुंबलेल्या असतात. त्यामुळे रस्त्यांवर हे सांडपाणी साचते. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते झाले तरी त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पालिका प्रशासनाने पार पाडावी, अन्यथा रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य कायमच राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. शहरात मंगळवारी पावसाने पूर्णत: विश्रांती घेतली. त्यामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. धरणांमधून मात्र पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे.

गणेशाचे आगमन झाल्यापासून शहरात आणि जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता. ‌त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे गोदावरी व तिच्या उपनद्यांमधील पाणी पातळी वाढली. धरणांमधील पाणी पातळीदेखील वाढल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यात २६ ऑगस्टला ३०७, २७ ऑगस्टला ११६, २८ ऑगस्टला २०५, तर २९ ऑगस्टला ३७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत अवघा ३४.८ मिमी पाऊस झाला. सुरगाण्यात सर्वाधिक १४.३, बागलाणमध्ये १०, इगतपुरीत पाच, चांदवडमध्ये २.३, मालेगावात दोन, तर निफाडमध्ये १.२ मिमी पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर, नाशिकसह अन्य सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. शहरातही २७ ऑगस्टला १८.४ मिलिमीटर पाऊस झाला होता. २८ ऑगस्टला सहा मिमी, तर २९ ला शून्य मिमी पावसाची नोंद झाली.

विसर्ग सुरूच

धरणांमधील पाणीसाठा मर्यादित ठेवता यावा यासाठी पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दारणातून २७००, गंगापूरमधून २६८५, कडवातून १४८४, वालदेवीतून २४१, आळंदीतून ४४६, कश्यपीतून २७५, गौतमीतून २०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालखेडमधून ३,८०३ क्युसेकने, तर नांदूरमध्यमेश्वरमधून १८,९३० क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांदादर स्थैर्यासाठी निर्यात चालूच ठेवा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कांदा पिकावर निर्यातमूल्य लावण्याच्या केंद्र शासनाकडून हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. निर्यातमूल्याबबात शासनाने निर्णय घेतल्यास एक-दीड महिन्यात येणाऱ्या खरीप कांद्याला भाव मिळणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी निर्यात चालू ठेवण्याची मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी अथवा निर्यातमूल्य वाढविण्याचा निर्णय घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येवला प्रांताधिकारी भीमराज दराडे व तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकीने संकटात सापडला होता. मागील वर्षी चांगला पाऊस होताना भरपूर उत्पादन निघूनही सातत्याने पडलेल्या भावामुळे शेतकरी हैराण झाला आहे. अद्याप शेतकऱ्याला या कर्जमाफी घोषणेतील एक दमडीचा लाभदेखील मिळाला नाही, याकडेे निवेदनाद्वारे लक्ष वेधलं आहे.

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पा. झांबरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संध्या पगारे, बापूसाहेब पगारे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

आयातमुळे घसरण

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी उधार उसनवार करीत व कर्ज काढून तूर, कापूस, सोयाबिन, कांदा, गहू यासारखी पीक घेऊन भरपूर उत्पादन घेतले. मात्र, शेतमालाला भाव नाही. अशातच सरकारने आपल्या देशात भरपूर गहू, तूर पीक आले असतानाही बाहेरील देशातून आयात करून शेतीमालाचे भाव पाडले. शासनाच्या या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकला, मोदक मेकिंगची पर्वणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव आबालवृद्धांचा आवडीचा सण. या उत्सवाचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी ‘मटा कल्चर क्लब’तर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, तसेच खास महिलांसाठी मोदक मेकिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या रविवारी (दि. ३ सप्टेंबर) पार्कसाइड होम, बळीराजा मंदिराजवळ, आडगाव नाका या ठिकाणी या दोन्ही स्पर्धा होणार आहेत. सणासुदीच्या काळात झटपट तयार होतील अशा विविध पाककृती कशा तयार करायच्या याविषयी डेमो वर्कशॉपसुद्धा दुपारी ३ वाजता पार्कसाइड होम या ठिकाणी होणार आहे. कोमल सूर्यवंशी या व्हेजी नगेट, इन्स्टंट चोको लावा केक, इन्स्टंट ब्रेड, दहीवडा या आणि अशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपी करून दाखविणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा आणि वर्कशॉपसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही.

--

स्पर्धेसाठीचे नियम...

पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा विषय गणेशोत्सव हा आहे. रविवारी दुपारी २ वाजता ही स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेचा कालावधी २ तास असेल. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

--

मोदक मेकिंगसाठी...

स्पर्धेला येताना स्पर्धकांनी मोदक बनवून आणावेत. मोदक स्पर्धकांनी स्वतः बनविलेले असावेत. स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार नाही. स्पर्धेसाठी मोदक तिखट किंवा गोड कुठल्याही प्रकारचे चालतील. ही स्पर्धा दुपारी २ वाजता सुरू होईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य असून, परीक्षकांचा निकाल अंतिम राहील. सायंकाळी ५ वाजता चित्रकला स्पर्धा आणि मोदक मेकिंग कॉम्पिटिशनमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क ः ०२५३-६६९७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे रद्दमुळे प्रवाशांची दैना

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनासह सहा डबे आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी पहाटे घसरले. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत ठप्प झाली होती. नाशिकरोडमार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल झाले. पंचवटी, मंगला, गोदावरीसह प्रमुख गाड्या रद्द करण्यात आल्या. भुसावळ-पुणेसह अन्य गाड्या दौंडमार्गे वळविण्यात आल्या. याशिवाय, मुंबईत पावसाचे थैमान सुरू असल्याने सर्व रेल्वेमार्गांवर पाणी साचल्याचा परिणामही रेल्वे वाहतुकीवर झाला

गेल्या रविवारी मेगा ब्लाकमुळे पंचवटी व गोदावरी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसांनी पंचवटीला पुन्हा विलंब झाल्याने प्रवाशांनी आंदोलन केले होते. आता पुन्हा अपघातामुळे गाड्या रद्द कराव्या लागल्या.

मंगळवारी मुंबईला जाण्यासाठी प्रवासी पहाटेपासूनच मनमाड, नाशिक, इगतपुरी आदी स्थानकांवर आले होते. मात्र, आसनगावजवळ दुरांतोला अपघात झाल्याचे वृत्त येताच मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. व्यावसायिक, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण यांना हिरमुसले होऊन घरी परतावे लागले. तिक‌िटाचे पैसे घेण्यासाठी सकाळी रांगा लागल्या होत्या. दहानंतर स्थानक निर्मनुष्य झाले होते. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्हाट्सअॅप, मोबाइलवर अपघाताचे वृत्त कळविल्याने मुंबईला जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी घरीच राहणे पसंत केले.

या गाड्या रद्द

राज्यराणी, पंचवटी इगतपुरीपासून परत आल्या. मुंबईला जाणारी भुसावळ, गरिबरथ, गोदावरी, सेवाग्राम, जनशताब्दी, नंदीग्राम आदी गाड्या रद्द करण्यात आल्या. मनमाडपासून इगतपुरीपर्यंत पोहोचलेल्या गाड्या या स्थानकातच थांबवण्यात आल्या. भुसावळ-पुणे गाडी कल्याणएवजी दौंडमार्गे वळविण्यात आली. निजामुद्दीन मंगला, दुरान्तो, हावडा, महानगरी, गोरखपूर, पुष्पक, तपोवन, तुलसी एक्सप्रेस या गाड्या मनमाड-दौंड मार्गे पुढे नेण्यात आल्या. सेवाग्राम आणि गरिबरथ गाड्या नागपूरला परत पाठवण्यात आल्या. काही प्रवाशांनी इगतपुरीपासून बस, टॅक्सी आणि खासगी वाहनाने कल्याण, ठाणे पर्यंत प्रवास केला. एसटी महामंडळानेही जादा बसची व्यवस्था केली होती.

स्टेशनमध्ये शुकशुकाट

नाशिकरोड स्थानक पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गजबजलेले असते. धावतपळत गाडी पकडणारे प्रवासी हे चित्र नित्याचेच असते. नाशिकरोड स्थानकावर शेकडो फेरीवाले, व्यावसायिक, शंभरावर रिक्षा व टॅक्सीचालक तसेच कुली अवलंबून आहेत. शहर वाहतूक बसही रेल्वेच्या वेळेनुसार अडजस्ट केलेल्या आहेत. रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे वरील सर्व घटकांना मोठा आर्थिक फटका बसला. स्थानकातील अधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, चहा विक्रेते, पेपरविक्रेते, रेल्वेस्थानकातील कँटिन या सर्वांचे नुकसान झाले. कायम गर्दी असलेल्या या रेल्वेस्थानकात शुकशुकाट होता. मनमाड, इगतपुरी स्थानकातही हेच चित्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images