Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्या’ लिफ्टचे आता व्हीसीद्वारे उद््घाटन!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील रेल्वे स्टेशनवरील दोन नव्या लिफ्टचे उद््घाटन करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू येत्या रविवारी (दि. ३०) येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. बिझी शेड्युलमुळे त्यांचा पदस्पर्श पुण्यभूमी नाशिकला होणार नाही. ते ओझरहून व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे लिफ्टचे उद््घाटन करतील, असे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी या लिफ्टची चाचणी करण्यात आली. दरम्यान, येथील सरकत्या जिन्यांचा प्रश्नही प्रभू यांनी मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, लासलगावच्या ओनियन कोल्ड स्टोअरेजचे भूमिपूजनही रेल्वेमंत्री ३० तारखेला व्हिडीओ कान्फरसिंगद्वारे करण्याची शक्यता आहे. राज्यात प्रथमच असे कोल्ड स्टोअरेज उभे राहणार आहे. कोल्ड स्टोअरजेची क्षमता दोन हजार टनांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यातील कांदा, डाळिंब, आंबा, द्राक्ष आदी उत्पादकांना त्याचा लाभ होणार आहे. येथे प्री-कूलिंग चेंबर, राइपनिंग आदी सुविधा असतील. २९ जुलै रोजी दुपारी बाराला प्रभू धुळ्यात मनमाड-धुळे-इंदूर मार्गाचे भूमिपूजन करतील. मात्र, ३० जुलैला शिर्डी-मुंबई रेल्वेगाडीच्या फेऱ्या वाढविण्यासाठी ते प्रत्यक्ष जाऊन गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ताई, मला कार्टूनचीच राखी आण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भावा-बहिणीच्या नात्याला आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली असून, विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. या सणाचे बच्चेकंपनीला विशेष आकर्षण असल्याने यंदाही वर्षभर गाजलेले गेम, चित्रपट अन् कार्टून्सच्या राख्यांची क्रेझ चिमुकल्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे चिमुकलेही ताईकडे कार्टूनच्या राखीचा आग्रह धरत आहेत.

राखीपौर्णिमेनिमित्त आपल्या भावाला आकर्षक व नवीन पद्धतीची राखी घ्यावी, याकडे महिला, मुलींचा कल असतो. त्यानुसार बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये लुंबा, लटकन, भय्या-भाभी, जर्दोसी वर्क, स्टोन राखी, तसेच खास बच्चेकंपनीसाठी बाहुबली, मोटू-पतलू, डोरेमॉन, टेडी बीअर, मारियो आदी कार्टून्ससह घड्याळ, ब्रेसलेट आदी प्रकारच्या राख्यांचा समावेश आहे. दोऱ्यात गुंफलेल्या साध्या राख्या १५ ते २० रुपयांपासून, तर आकर्षक कलाकुसर, साहित्य वापरलेल्या राख्या ६० रुपयांपासून पुढील किमतींत उपलब्ध आहेत. हजार रुपयांपर्यंतच्या राख्याही बाजारात असून, चांदीच्या राख्यांची चलतीही कायम आहे.

अनेक युवती, महिलांना आपल्या भावासाठी दुसऱ्या गावी किंवा देशात राखी पाठवायची असल्याने राखीपौर्णिमेच्या आठ-पंधरा दिवसांपूर्वीच राख्या खरेदीला सुरुवात केली जाते. अशा महिलांची राख्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी पुढच्या आठवड्यापर्यंत वाढेल, असे मत विक्रेते व्यक्त करीत आहेत.

ऑनलाइन शॉपिंगचा आधार

ज्या बहिणी आपल्या भावापासून दूर राहतात अशांना ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइट्सद्वारे राखी पाठविणे सोपे होत आहे. कोणत्याही ठिकाणी राख्या पाठविण्याचा पर्याय बहुतांश वेबसाइट्सने उपलब्ध करून दिला असल्याने त्यांना आधार मिळत आहे. याशिवाय मिठाई, चॉकलेट्स, राखी यांचे एकत्रित पॅकेजेसही येथे उपलब्ध अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांत कांद्याचे भाव दुप्पट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारच्या तुलनेने कांद्याच्या दरात ३४० रुपयांची तर १७ जुलैच्या तुलनेत ७५२ रुपयांची भाव वाढ झाली. गुरुवारी कांद्याला जास्तीत जास्त १४५१, सरासरी १२५० तर कमीत कमी ६०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. अवघ्या दहा दिवसात कांद्याचे भाव दुप्पट झाल्याने शेतकरी आनंदात आहेत.

१७ जुलैपासून उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. कांद्याने एक हजारीचा जरी टप्पा पार केला असला तरी आज मिळत असलेल्या भावाबाबत शेतकरी समाधानी नाहीत. मार्च ते एप्रिल महिन्यापासून शेतकरी उन्हाळ कांदा विक्री करीत आहेत. मात्र उत्पादन खर्चही निघणार नाही असा ४०० ते ५०० रुपयांचा भाव आतापर्यंत मिळत आला आहे. आज कांद्याने या हजारीचा टप्पा जरी पार केला आहे. मात्र ते भाव न परवडणारे आहेत. कारण आधीच कांदा चाळीत साठवून वजनात घट झाली आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बराच कांदा सडला आहे. त्यामुळे झालेले नुकसान पाहता कांद्याला दोन हजाराहून अधिक भाव मिळाला तरी शेतकऱ्याचे नुकसान भरून निघणार नाही, अशी प्रति‌क्रिया बाजार समितीचे संचालक अशोक गवळी यांनी दिली.

...तरच भाव टिकून राहतील

सध्या देशांतर्गत दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान इ. राज्यात कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त असलेला पाकिस्तानचा कांदा आयात न केल्यास शेतकऱ्यांना झालेला तोटा भरून निघेल, असे मत कांदा निर्यातदार व्यापारी मनोज जैन यांनी व्यक्त केले.

यामुळे वाढला भाव

दक्षिणेकडील राज्यात साधारण कांदा ऑगस्ट मध्ये येतो. यंदा तेथे कांद्याची लागवड कमी आहे. त्यामुळे तेथील मागणी वाढली. मध्य प्रदेश सरकारने तेथील ८० लाख क्विंटल कांदा लगेच विक्री करून टाकला. जो कांदा यापूर्वी चार महिने टिकत असतो तो कांदा सव्वा महिन्यात विकला गेला.तसेच जास्त पावसामुळे गुजरातसह इतर राज्यातील कांदा लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता सर्वेक्षण पावले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. खासगी एजन्सीने आतापर्यंत २ लाख ७५ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात तब्बल ५२ हजार मालमत्ता नव्याने आढळून आल्या आहेत. अजून जवळपास तीस टक्के मिळकतींचे सर्वेक्षण बाकी आहे. त्यातून ३० ते ३५ हजार मालमत्ता आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात नव्याने जवळपास ९० हजार मालमत्ता पालिकेच्या दप्तरी वाढणार असून, त्यातून २० ते २५ कोटींचा धनलाभ होणार आहे.

महापालिकेच्या दप्तरी सद्यस्थितीत सुमारे चार लाख मालमत्तांची नोंद आहे. परंतु शहराचा वाढता विस्तार पाहता मालमत्तांची संख्या जास्त असल्याचा पालिकेला अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होऊ शकतो. त्यासाठीच महापालिकेने मिळकत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी नवी दिल्लीच्या जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेकडून गेल्या डिसेंबरपासून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

डिजिटल कामकाज

सर्वेक्षणात मिळकती वगळल्या जाऊ नयेत, यासाठी रस्तेनिहाय व जनगणनेनिहाय छोटे ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. सदरचे ब्लॉक हे जिओ ग्राफिकल नकाशांशी संलग्न करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक मिळकतीचे जीआयएस मॅपिंग व ब्लॉकनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये चार लाख मिळकतींचे सर्वेक्षण केले जात असून, सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्रुटी असलेल्या मिळकतधारकांना नोट‌िसा बजावल्या जाणार आहेत.

कंपनीच्या वतीने हायटेक पद्धतीचा वापर होणार आहे. त्यात टॅबद्वारे सर्वेक्षण केले जाणार असून, प्रत्यक्ष मालमत्तेची मोजमाप ऑनलाइन पद्धतीने टॅबवरच केली जाणार आहे. यावर महापालिकेचाही वॉच असणार आहे.

नव्याने नोंद केली जाणार

स्मार्ट सिटी समावेश झाल्यानंतर पालिकेने उत्पन्न वाढीसाठी विविध पर्याय शोधले आहेत. त्यात मालमत्ता सर्वेक्षणाचाही समावेश आहे. या सर्वेक्षणात निवासी व व्यावसायिक मालमत्तांची नोंद केली जाणार आहे. निवासी व व्यावसायिक मालमत्तांना वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यामुळे या वाढीव ९० हजार मालमत्तांमध्ये व्यावसायिक वापराच्या मिळकतीही अधिक आहेत.

असे झाले सर्वेक्षण
सहा महिन्यात २ लाख ७५ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण
५२ हजार मालमत्ता नव्याने आढळल्या
या मालमत्तांचा अद्यापही पालिकेकडे नोंद नाही
या नव्या मालमत्ता पालिकेच्या नोंदीवर येणार
अजून सव्वा लाख मालमत्तांचे सर्वेक्षण बाकी
अजून ३० ते ३५ हजार मालमत्तांची नोंद होणार
नवीन मालमत्तांचा आकडा ९० हजारावर जाण्याची शक्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीकरांच्या सेवेत हायड्रॉलिक व्हॅन

$
0
0

अग्निशामक व्हॅनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे असणारी सध्याच्या अग्निशमन गाडीच्या दिमतीला आणखी एक अत्याधुनिक तंत्रज्ञान संपूर्ण हायड्रॉलिक टेक्नॉलॉजी असलेली ५० लाख रुपये किमतीची अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. त्याचे नुकतेच उपाध्यक्ष दिनकर आढाव, सर्व नगरसेवक व सीईओ विलास पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

गतवर्षी याबाबत नवीन वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार हे अत्याधुनिक वाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरिकांच्या सुविधेसाठी आणले आहे. हे वाहन पुणे येथील हायटेक कंपनीचे असून, या टाटा १६१३ गाडीवर विदेशी पद्धतीचे तंत्रज्ञान व हायड्रॉलिक सुविधा देण्यात आली आहे, अशी माहिती हायटेक कंपनीचे व्यवस्थापक सुनील कदम व तानाजी टेळे यांनी दिली.

ही अग्निशमन गाडी विविध सुविधांसोबतच पूर, अतिवृष्टी, भूकंप अशा परिस्थितीतदेखील उपयोगी येऊ शकते. या गाडीचा खरेदीचा ठराव बोर्डाच्या बैठकीत गतवर्षी करण्यात आला होता. 'मटा' ने वेळोवेळी याबाबत बातम्या प्रकाशित केल्या होत्या. देवळालीकरांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आगामी काळात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास सिद्ध असल्याचे अग्निशमन अधिकारी सतीश भातखळे यांनी सांगितले. या लोकार्पण सोहळ्यास उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, सीईओ विलास पवार, उमेश गोरवाडकर, अग्निशमन वाहन चालक जयवंत गोडसे यांसह अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांसह कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.


ही आहेत वैशिष्ट्ये

पाच हजार लिटर पाणीक्षमता

दोन विविध उपयोगी पंप

१२० मीटरपर्यंत लांब पाइप

एकूण ६० मीटरपर्यंत पाण्याचा मारा करणारे २ नोझल

फोम सिस्टिमने परिपूर्ण

११ मीटरपर्यंत हायड्रॉलिक शिडी

डी-वॉटरिंग सिस्टिम

आपत्कालीन घोषणा सुविधा

विनावीज वापरता येणारे हत्यारे

जनरेटर सुविधा उपलब्ध

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांची थट्टा

$
0
0

दिव्यांगांसाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात मोठे रणकंदन झाले. महापालिकेने दिव्यांगांसाठीचा निधीही खर्च केला नसल्याचे उघड झाले. आमदार बच्चू कडू थेट महापालिका आयुक्तांवरच धावून गेले. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग, अंध व्यक्तींसाठी शासकीय निकषांप्रमाणे सुविधाच नसल्याची बाब समोर आली आहे. या धक्कादायक वस्तुस्थितीवर टाकलेला फोकस...

--

दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहज वावरणे, प्रवास करणे, संवाद व संपर्क करणे शक्य व्हावे यासाठी अडथळाविरहित वातावरणनिर्मितीसाठी अपंगत्व सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने सुगम्य भारत अभियान (अ‍ॅक्सेसेबल इंडिया कॅम्पेन) राबविण्यात आले. परंतु, नाशिक शहरातील सरकारी कार्यालये मात्र या निर्णयापासून कोसो दूर असल्याचे प्रत्ययास आले आहे. खुद्द सरकारच्या निर्णयालाच अनेक कार्यालयांनी केराची टोपली दाखविल्याची स्थिती आहे.

--

आंतरराष्ट्रीय निकष बंधनकारक

दिव्यांग व्यक्तींना समान संधी उपलब्ध व्हावी, यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने एक ठराव संमत केला आहे. या ठरावाला सहमती दर्शविणाऱ्या सर्व सरकारांनी अडथळाविरहित वातावरणनिर्मितीसाठी योग्य पावले उचलावीत, असे त्यात सूचित केले आहे. भारतानेही या ठरावावर सही केली आहे. या ठरावानुसार अ‍ॅक्सेसेबिलिटी सुविधांची अंमलबजावणी करताना काही गोष्टी बंधनकारक आहेत. त्यात सुविधांचा योग्य विकास, प्रचार व नियंत्रण करण्याबरोबरच त्यांचा दर्जा राखणे आवश्यक आहे. खासगी कंपन्या याबाबत सार्वजनिक ठिकाणी सुविधा देत असतील, तर त्यांचा अ‍ॅक्सेसेबिलिटीच्या सर्व अंगांनी विचार करणे, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत लक्ष्य गटांना प्रशिक्षण देणे, आवश्यक माहिती स्पष्ट दिसेल व सहज वाचता येईल या आकारात उपलब्ध करणे, सार्वजनिक ठिकाणी अंधांसाठी ब्रेल सुविधा, व्यावसायिक साइन लँग्वेज भाषांतरकाराची नेमणूक करणे, सहज माहिती मिळेल यासाठी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे.

--

‘सुगम्य भारत’द्वारे प्रसार

दिव्यांग व्यक्तींसाठी कायदा (समान संधी, हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) १९९५ च्या कलम ४४, ४५ आणि ४६ मधील तरतुदीनुसारदेखील सरकारला दिव्यांग व्यक्तींसाठी सहज वावरणे, प्रवास करणे, संवाद व संपर्क करणे शक्य होण्यासाठी सुयोग्य रॅम्प, रेलिंग, आधारासाठी कठडे किंवा आधार, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान आदी सुविधा निर्माण करणे बंधनकारक आहे. या सर्व सेवा-सुविधांची निर्मिती व अंमलबजावणी व्हावी या हेतूने सुगम्य भारत अभियान राबविण्यात आले. दिव्यांग व्यक्तींबरोबरच या अभियानाचा लाभ ज्येष्ठ नागरिक, मुले आणि गरोदर महिलांनाही होणे अपेक्षित आहे.

--

नाशिकमध्ये निकषांना हरताळ

सुगम्य भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे, शाळा, दवाखाने, कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करणे व त्या ठिकाणाहून बाहेर पडणे केवळ दिव्यांग व्यक्तींनाच नव्हे, तर सर्वच व्यक्तींना सुकर होणे शक्य व्हावे यासाठी अडथळे दूर करणे अपेक्षित आहे. त्यात केवळ इमारतींचाच विचार नाही, तर फूटपाथ, उतार, वळणे व रहदारीला अडथळे निर्माण करणारे घटक दूर करण्याचाही विचार केलेला आहे. त्यासाठी सुयोग्य रॅम्प, रेलिंग, आधारासाठी कठडे किंवा आधार, पार्किंग आणि आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी सुविधांचा समावेश आहे. यामध्ये सुविधा निर्माण करण्याबरोबरच त्यांचे ऑडिट करणे व दर्जा राखणे समाविष्ट आहे. पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या शहरातील सरकारी इमारतींचे जुलै २०१६ पर्यंत पूर्णपणे अ‍ॅक्सेसेबल इमारतींत परिवर्तन करणे आवश्यक होते. परंतु, नाशिक शहरातील बहुतांश इमारती आजही या निकषांविनाच आहेत.

--

परिवहन सेवेतही सारे आलबेल!

सुलभ, सहज प्रवास व संपर्क केवळ दिव्यांगच नव्हे, तर सर्वांची गरज आहे. रेल्वे, विमान, बस, टॅक्सी व रिक्शा अशा सर्व प्रकारच्या प्रवास साधनातून दिव्यांग व्यक्तींना सुलभतेने प्रवास करणे शक्य व्हावे, यासाठी जमिनीचा पृष्ठभाग, पायऱ्या, रॅम्प, प्रवेशद्वार, पार्किंग आदींसंदर्भात विविध निकष निर्धारित आहेत. या अभियानांतर्गत देशातील सर्व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळांचे, अ आणि ब श्रेणीतील रेल्वे स्थानकांचे आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे अ‍ॅक्सेसेबिलिटी ऑडिट करण्यात येऊन टप्प्याटप्प्याने त्यांचे अ‍ॅक्सेसेबल स्थानकात रुपांतर करणे आवश्यक होते. यासाठीही २०१६ ची मुदत देण्यात आली होती. परंतु आजही परिवहन सेवेत दिव्यांगांसाठी सुलभता आलेली नाही.

---

प्रमुख आस्थापनांत वाट खडतर...

--

विभागीय महसूल आयुक्त कार्यालय

या कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाला सुविधा देता येणे शक्य आहे. परंतु, येथे सरकारी नियमांनाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. येथे पाचही जिल्ह्यांतून नागरिक आपल्या मागण्या घेऊन येतात. प्रत्येक वेळी दिव्यांगां जिने चढून जाणे जिकिरीचे ठरते. या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था करता येणे शक्य आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही केलेली नाही. या ठिकाणी जिने चढून जाताना कठडे तयार केले आहेत. परंतु, अंधांना या ठिकाणी वावरताना मोठ्या प्रमाणात अडचण येते. येथील भिंतींवर ब्रेल लिपीत मार्गदर्शक सूचना लावणे आवश्यक आहे. परंतु, तसेदेखील करण्यात आलेले नाही.

--

जिल्हाधिकारी कार्यालय

हे कार्यालय स्वातंत्र्यपूर्व काळातील इमारतीत असल्याने या ठिकाणी दिव्यांगांसाठी आधुनिक सुविधा नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील या ठिकाणी सुविधा देण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. या ठिकाणच्या पायऱ्या उंच असल्याने सामान्य व्यक्तीलाही चढताना धाप लागते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दिव्यांगांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. अनेकदा कुणाच्या तरी मदतीने वरील कार्यालयात गेल्यावर अधिकारी हजर नसल्यास मनस्ताप सहन करावा लागत असल्याची स्थिती आहे.

...

अदिवासी विकास भवन

राज्याच्या अतिदुर्गम भागातून या ठिकाणी नागरिक येत असतात. त्यात दिव्यांगांचादेखील मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. परंतु, दिव्यांगांच्या बाबतीत या कार्यालयात मोठी उदासीनता दिसून येते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथे दिव्यांगांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. एखाद्या दिव्यांग व्यक्तीला आयुक्तांना भेटायचे झाल्यास त्याला दोन माणसांनी उचलून न्यावे लागते. २०१६ मध्ये सरकारने दिव्यांगांसाठी काही कायदा केला होता, असा येथील अधिकाऱ्यांना मागमूसदेखील नसल्याची स्थिती आहे.

...

जिल्हा परिषद

या कार्यालयाच्या आवारात कायमच प्रचंड गजबज असते. येथे सामान्य माणसांनाही चालणे अवघड होते, तर दिव्यांगांचा विचारच न केलेला बरा. या ठिकाणी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेले जिने अत्यंत अरुंद असून, वर जाण्यासाठी लहान जागेतून मार्ग काढावा लागतो. येथे कामासाठी आलेल्या दिव्यांगांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्थादेखील नाही. याच आवारात समाजकल्याण विभागाचे कार्यालय आहे. परंतु, या ठिकाणीही दिव्यांगांचा विचार केलेला नाही. जिल्ह्याच्या अनेक भागातून येथे दिव्यांग विविध दाखल्यांसाठी येतात. परंतु, त्यांना जागेअभावी फूटपाथवरच अधिकाऱ्यांची वाट पाहत बसावे लागत असल्याचे दृश्य दिसून येते. जिल्हा परिषदेच्या मागील बाजूस नवीन इमारत बांधण्यात आली. परंतु, या ठिकाणीदेखील दिव्यांग व अंधांचा विचार झालेला दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग इमारती बांधतो, परंतु तेथे दिव्यांगांचा विचार मात्र होत नसल्याची स्थिती आहे.

...

महापालिका

नाशिक महापालिकेच्या बहुतांश इमारतींमध्ये दिव्यांगांचा विचार झालेला दिसत नाही. अनेक इमारती जुन्या असल्याने तेथे बदल करणेदेखील शक्य नाही. महापालिकेचे राजीव गांधी भवन वगळता सर्वच विभागीय कार्यालयांत सारखीच परिस्थिती आहे. राजीव गांधी भवन येथेही अंधांसाठी ब्रेल लिपीत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना विचारपूस करीतच काम मार्गी लावावे लागते. महापालिकेच्या कोणत्याही दवाखान्यात अपंगांसाठी व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. नाशिकरोडचे बिटको रुग्णालय तर सर्वच बाबतीत चर्चेत असते. या ठिकाणी लिफ्ट नसल्याने, तसेच ओपीडीमध्ये येणाऱ्या दिव्यांगांना बसण्यासाठीही पुरेसे जागा नाही.

...

रेल्वे स्टेशन

नाशिकरोड येथील रेल्वे स्टेशनच्या परिसरात दिव्यांगांना काहीअंशी सुविधा देणयात येत आहेत. रेल्वे स्टेशनच्या बाहेर दिव्यांग्यांसाठी रॅम्प तयार करण्यात आला असून, एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोन लिफ्टचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, त्या अद्यापही कार्यान्वित झालेल्या नाहीत. येथील सरकते जिने तयार करण्याचे नियोजन अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. या ठिकाणी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर उपलब्ध आहेत. मात्र, अंधांना सुविधा देण्यातबाबत उदासीनता आहे. येथील भिंतीवर ब्रेल लिपीत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने अंधांना विचारपूस करीतच मार्गक्रमण करावे लागत आहे.

...


विभागीय संदर्भसेवा व सिव्हिल हॉस्पिटल

विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात बांधकाम करताना दिव्यांगांच्या वावराचा खऱ्या अर्थाने विचार केला गेलेला दिसतो. या ठिकाणी वावरताना फारसा त्रास होत नसल्याचे असंख्य दिव्यांगांचे म्हणणे आहे. अशीच परिस्थिती सिव्हिल हॉस्पिटलमध्येदेखील आहे. दोन्ही ठिकाणी लिफ्ट असल्याने चढ-उतार करण्यास अडचण येत नाही, त्याचप्रमाणे प्रवेशद्वारातून आत येण्यासाठी केलेला रॅम्प सोयीचा ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’व्हायचंय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक युवतीमध्ये काहीतरी खासीयत असते. मग ती एखादा कलागुण असो, आकर्षक व्यक्तिमत्त्व असो किंवा छाप पाडणारी संवादशैली असो. या कलागुणांच्या जोरावर सिनेमा, मालिका, नाटक किंवा मॉडेलिंगमध्ये नाव कमावण्यासाठी त्या पात्र ठरतात. अशाच गुणांना व्यासपीठ देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने दर वर्षी ‘श्रावणक्वीन’ ही पर्सनॅलिटी काँटेस्ट आयोजित केली जाते. या व्यासपीठाने आतापर्यंत अनेक प्रतिभावान चेहरे दिले असून, या वर्षी तुमचेही नाव या यादीत येऊ शकते. त्यासाठी ‘श्रावणक्वीन’च्या प्राथमिक फेरीसाठी आजच नावनोंदणी करा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयारीला लागा.

श्रावणक्वीनचे यंदाचे सातवे वर्ष आहे. ही केवळ ब्यूटी काँटेस्ट नाही, तर पर्सनॅलिटी काँटेस्ट आहे. व्यक्तिमत्त्व, प्रतिभा, कलागुण, हजरजबाबीपणा आणि बुद्धिमत्ता या जोरावर प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जाणार आहेत. या निकषांमुळे केवळ मॉडेलिंग क्षेत्रातच नाही, तर गायन, अभिनय, नृत्य या क्षेत्रातही मुलींसाठी श्रावणक्वीनच्या व्यासपीठामुळे करिअरचे दालन खुले होते. दिग्गज परीक्षक आणि ग्रूमिंग एक्सपर्टमुळे स्पर्धकांना कलाकार म्हणून स्वतःला नव्याने शोधण्याची संधी मिळते. सध्या सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये नाशिकच्या कलाकारांनाही मोठे प्राधान्य दिले जाते. मॉडेलिंगमध्ये नाशिकने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलींना स्वतःला सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. केवळ गायन, नृत्य किंवा अभिनय याच कला नाही, तर नकलाकार, रांगोळीकार, चित्रकार, अँकर, शिल्पकार अशा कोणत्याही कला दोन मिनिटांच्या टॅलेंट राउंडमध्ये सादर करण्याची परवानगी आहे. ओळख, टॅलेंट राउंड आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जातील.

--

अशी करा नावनोंदणी

नावनोंदणीसाठी अटी फक्त दोनच, १८ ते २५ वयोगट आणि अविवाहित असणे. आता प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणी कशी करायची? तर, www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर जाऊन ‘पार्टिसिपेट नाऊ’वर क्लिक करा. इथला फॉर्म भरल्यानंतर सोबत फोटो आणि दोन मिनिटांच्या व्हिडिओचीही लिंक अपलोड करायची आहे. यामध्ये तुमची ओळख आणि स्पर्धेमध्ये भाग का घेत आहात, हे सांगणे अपेक्षित आहे. स्पर्धेचे नियम साइटवर दिलेले आहेत. त्याशिवाय फोटो आणि व्हिडीओ अपलोड कसे करायचे, याचीही माहिती तिथे आहे. जास्तीत जास्त लाइक्स मिळण्यासाठी तुमचे प्रोफाइल शेअर करायचे आहे. हे लाइक्स आणि आमच्या परीक्षकांचा कौल यावर स्पर्धकांची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या व्हा कल्चर क्लब सदस्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मटा कल्चर क्लबचे सदस्य होण्याची संधी सर्वांना घरबसल्या चालून आली आहे. खास सर्वांच्या आग्रहास्तव आता मटा कल्चर क्लबचे फॉर्म घरबसल्या मिळणार आहेत.

मटा कल्चर क्लबतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात. हॅप्पी स्ट्रीट्स, श्रावण क्वीन असो किंवा नाटक असो, त्याचबरोबर झुम्बा डान्स, खाऊचा डबा अशा विविध कार्यशाळा, कल्चर क्लब सदस्यांचे गेट टू गेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किटी पार्टी, गानतंत्र स्पर्धा, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निव्हल, सहल, मँगो फेस्टिव्हल, नवरंग नवरात्रीचे, मंगळागौर, एज्युकेशनल सेमिनार, क्वीझ कॉन्टेस्ट, संगीत मैफली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद सर्वांना वर्षभर घेता येतो. सामान्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मटा कल्चर क्लब व्यासपीठही उपलब्ध करून देते. नाटकांसारख्या कार्यक्रमांमध्ये मटा कल्चर क्लब सदस्यांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल, तर आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

फक्त इतकेच करायचे...

तुम्हाला तुमच्या घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा बीसीसीएलच्या नावे चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्या. चेकच्या मागे तुमचे नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. तुमचा चेक क्लीअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ः ७०४०७६२२५४, ६६३७९८७.

--
सदस्य होण्यासाठी...

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाडी कर्मचाऱ्यांचा घाणीतून ‌होतोय प्रवास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या सातपूर गावात असलेल्या भाजी मंडईशेजारी घंटागाडी कर्मचाऱ्यांना घाणीतून प्रवास करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे तब्बल २० वर्षांहून अधिक दिवसांपासून सातपूर गावातील महादेवनगरकडे जाणारा रस्त्याच महापालिकेने केला नसल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. महापालिकेने भाजी मंडई शेजारील रस्ता तत्काळ करावा, अशी मागणी रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

सातपूर गावात भव्य अशी भाजी मंडई महापालिकेने उभारली आहे. परंतु, भाजी मंडईतील विक्रेत्यांकडून उघड्यावरच कचरा टाकला जात असल्याने त्याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो. त्यातच घंटागाडी कर्मचाऱ्यांनादेखील कचरा संकलन करताना याच घाणीतून प्रवास करण्याची वेळ येत आहे. परिसरात साचलेल्या या कचऱ्यामुळे काही ठिकाणी वेळेवर कचरा उचलला नाही, तर आरोग्य अधिकाऱ्यांकडून घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात येते. सातपूर गावाच्या महादेवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रोजच भाजी विक्रेत्यांचा कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी, विभागीय अधिकारी यांनी संयुक्त दौरा करीत भाजी मंडईशेजारील रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सातपूर गावातील भाजी मंडईच्या शेजारीच भाजीपाला विक्रेत्यांकडून कचरा टाकला जातो. तरी त्यांच्यांवर कारवाई केली पाहिजे.

कमला सिंह, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामनगावला ८३ टक्के मतदान

$
0
0

सिन्नर फाटा : सामनगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी झालेल्या सार्वत्रिक मतदानात ८३ टक्के मतदान झाले. निवडणुकीत २,३०६ पैकी १,९१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण पाच वॉर्डांमधून १३ जागांपैकी दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. दोन जागांसाठीचे उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरले. त्यामुळे उर्वरित नऊ जागांसाठी शुक्रवारी शांततेत मतदान झाले. या नऊ जागांसाठी दुरंगी लढत झाली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने या ग्रामपंचायतीसाठी ८३ टक्के मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी प्रकरणातील दोन सराईत जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
म्हसरूळ परिसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात एलईडी टीव्हीसह ७० हजार रुपयांच्या साड्यांचा समावेश आहे. दरम्यान संशयितांच्या अटकेने आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता, पोलिसांनी व्यक्त केली.
मंगेश बाजीरव दळवी उर्फ मंग्या (१८) व बबल्या रघुनाथ वळवी (१९, रा. दोघे रा. अंबिकानगर झोपडपट्टी, पेठरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनी म्हसरूळ परिसरात घरफोड्या केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
या दोघांनी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून, चोरलेला एलईडी टीव्ही आणि दुकान फोडून लंपास केलेल्या सुमारे ७० हजार रुपयांच्या साड्या असा ९० हजाराचा ऐवज काढून दिला. संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने अनेक गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार येवाजी महाले, संजय राऊत, पोलिस नाईक किशोर रोकडे, राजू टेमगर, मंगेश दराडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामटवाड्यात तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सातपूर-अंबड लिंकरोडवरील कामटवाडा दत्तनगर भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
तबरेज मैनुद्दीन खान (२०, रा. मिश्रा चाळ, दत्तनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरूवारी चार वाजेपूर्वी आपल्या घरात तबरेजने गळफास लावून घेतला होता. घटनेचा अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममधून रोकड लांबविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरातून चोरलेल्या हॅण्ड बॅगमधील एटीएम कार्डचा वापर करीत भामट्यांनी ३७ हजार रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली. याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सरिता मनोज कोठारी (रा. श्री बिल्डींग, आर्टलरीरोड नाशिकरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कोठारी यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. २६) चोरट्यांनी रोकड काढून घेतल्याची घटना घडली. त्यापूर्वी, चोरट्यांनी कोठारी यांच्या घरात प्रवेश करीत बैठकरूममध्ये टांगलेली हॅण्ड बॅग चोरून नेली. बॅगेत विविध बँकाचे एटीएम आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यातील एका एटीएम कार्डचा वापर करीत चोरट्यांनी बँक खात्यातील ३७ हजार रुपये परस्पर काढून घेतले. बँक खात्यातील पैसे काढून घेण्याचा प्रकार मोबाइलवर येणाऱ्या एसएमएसमुळे उघडकीस आला. यानंतर कोठारी यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गोसावी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी बिल्डरपुत्रास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांच्या मुलास अटक केली. संशयित तरुणाने लग्नास टाळाटाळ करून दमदाटी केल्यानंतर पीडित तरुणीने गंगापूर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून लागलीच तरुणास अटक केली.
शक्ती श्यामराव निकुंभ (२८, रा. श्रीरंगनगर पेट्रोलपंपाजवळ, विद्याविकास सर्कल) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गोविंदनगर भागात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. संशयित आणि पीडित तरुणी कॉलेजमध्ये मित्र झाले. २०११ पासून संशयिताने तरुणीस लग्नाचे आमिष दाखविले. तसेच, स्वत:च्या घरी तसेच दोन वेगवेगळ्या कारमध्ये वेळोवेळी पीडित तरुणीच्या इच्छेविरोधात बलात्कार केला. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्या विवाहासाठी वराचा शोध सुरू केला. यामुळे तरुणीने संशयीताकडे विवाहासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, संशयिताने लग्नास नकार देत थेट दमदाटी केली. तसेच तरुणीस मारहाण केली. फसवणूक झाल्याने तरुणीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयित तरुणास अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक धनेश्वर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार कडूंवरील दाखल गुन्हा मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आमदार बच्चू कडू यांच्यावर आकसापोटी महापालिका आयुक्तांनी नोंदविलेला गुन्हा मागे घ्यावा तसेच अपंगांसाठीचा निधी हा केवळ सरकारी सेवेतील अपंगांवर खर्च न करता तो सर्व स्तरातील अपंगांवर खर्च केला जावा, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेने केली आहे.
विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अपंग बांधव सहभागी झाले. गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. पावसाची तमा न बाळगता अपंग बांधव गोळा झाले. त्र्यंबक नाकामार्गे चालत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. अपंगांच्या या मोर्चाकडे नागरिकांच्या नजरा खिळल्या. जिल्हधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मूकमोर्चा पोहोचला. महापालिकेत अपंगांच्या विविध मागण्या ठामपणे मांडत असताना महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अंपग बांधवास अपमानास्पद वागणूक दिली. तसेच आमदार बच्चू कडू यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा यावेळी निषेध करण्यात आला.

दिव्यांगाना व्यापारी गाळे, हॉकर्स झोनमध्ये जागा मिळावी, २८ ऑक्टोबर २०१५ च्या सरकारी अध्यादेशात अपंगांना शालेय शिक्षण, उच्च शिक्षण व खेळाडूंसाठी जिल्हास्तरापासून ते आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत शिष्यवृत्ती देण्यात यावी, घरकुला योजनेसाठी प्राधान्यक्रमाने अर्थसाहाय्य व उदरनिर्वाहासाठी व्यवसाय साहित्य खरेदीचा निधी थेट बँक खात्यात जमा करावा, नागरी वाहतूक सवलत, बसस्थानकात व्हिलचेअर उपलब्ध करून देणे, दिव्यांग कल्याण योजनांसाठी खर्च करण्यात यावा, अपगांना बेरोजगार भत्ता मिळावा, वयोमानानुसार निवृत्तीवेतन मिळावे, अपंगांसाठी रात्रनिवारा व्यवस्था करावी, अपंगांसाठी विशेष सुविधांच्या व्यायामशाळा असाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सविता जाधव, चंद्रभान गांगुर्डे, राजेंद्र आहेर, शेरूभाई मोमिन, सलीम काजी, भाऊसाहेब पवार, प्रकाश सरोदे आदी सहभागी झाले.

अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच यावे
अधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यासाठी प्रवेशद्वारावर यावे, असा निरोप आंदोलकांकडून पाठविण्यात आला. अपंग बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसमोरील मोकळ्या आवारात येण्याची तयारी निवासी उपजिल्हाधिकारी‌ रामदास खेडकर यांनी दर्शविली. परंतु, त्यांनी प्रवेशद्वारावरच यावे, यासाठी आंदोलकांनी बराचवेळ तेथे ठिय्या मांडला. त्यांची समजूत काढण्यात आल्यानंतर खेडकर यांच्या दालनात येऊन त्यांना निवेदन दिले.

दप्तर दिरंगाईची कारवाई करा
अपंग निधी संदर्भात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई करावी. लोकप्रतिनिधींनी योग्य वागणूक न देणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या जिल्हा शाखेने केली आहे. आमदार बच्चू कडू निधी खर्चाबाबत भूमिका मांडत असताना महापालिका आयुक्तांनी अरेरावीची तसेच असभ्य भाषा वापरली. त्यामुळे कडू संतापले, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. अरेरावी करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राजू देसले, भास्करराव शिंदे, विजय दराडे, देविदास भोपळे, दत्तात्रय गांगुर्डे आदींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता शनिवारी दुपारही लिलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी दुपारी बंद झालेले लिलाव आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शनिवार, २९ जुलैपासून लिलावासाठी फळभाज्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
नाशिक कृषी उत्पन्न बाजारात समितीत रोज दुपारी होणारे फळभाज्यांच्या लिलाव शनिवारी घेण्यात येऊ नये. शेतकऱ्यांनी या दिवशी फळभाज्या लिलावासाठी आणू नये असे आवाहन हमाल-मापारींनी केले होते. शनिवारी साप्ताहिक सुट्टी द्यावी यासाठी त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना पत्रही दिले आहे. तेव्हापासून शनिवारचे लिलाव बंद झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शनिवारी दुपारचे लिलाव बंद असल्याने शुक्रवारी आणि रविवारी फळभाज्यांची आवक वाढत होती. या दोन दिवशी बाजारात फळभाज्यांचे लिलाव घसरण्याचा अनुभव शेतकऱ्यांना सातत्याने येत होता. ही बाब काही शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्या निर्दशनास आणून दिली. या दिवशी बाजारात शेतमाल वाहनातून उतरविण्यात येणाऱ्या हमालांवर दबाव टाकण्यात येत असल्याच्या तक्रारीही मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हे शनिवारीचे लिलाव पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न बाजार समितीने केला आहे. त्याला हमालांनीही प्रतिसाद दिल्याने हे लिलाव पुन्हा सुरू होणार आहे.

मुंबईतील वाशी मार्केट रविवारी बंद राहत असल्याने शनिवारीच्या फळभाज्यांना फारशी मागणी नसते. त्यामुळे शनिवारी बाजार सुरू झाला तरी फारसा फरक पडले असे वाटत नाही.
- जगदीश अपसुंदे, संचालक, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटाद्वारे वाचवले लाखो रुपये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
साफसफाईचा खर्च कमी होणार असून वाहन प्रवेश फीमध्ये वाढ होणार असल्याने बाजार समितीचा वर्षभरात लाखो रुपयांचा फायदा होणार असल्याचा दावा सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड, दिंडोरीरोड आणि नाशिकरोड येथील मार्केटमध्ये वाहन प्रवेश फी तसेच साफ-सफाई कामाच्या सिलबंद निविदा बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जाहीर करण्यात आल्या. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत बाजार समितीचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाल्याचे समोर आले आहे.
पेठरोडच्या बाजारातील साफसफाईच्या कामाचे कंत्राट मागील वर्षी प्रतिमहा एक लाख ८८ हजार रुपये देण्यात आले होत‌े. पुढील वर्षासाठी याच कामाचे कंत्राट प्रतिमहा एक लाख ६ हजार रुपये देण्यात आले. यामध्ये बाजार समितीचा ८२ हजार रुपयांचा प्रत्येक महिन्याला फायदा होणार आहे. दिंडोरी रोडवरील मार्केटमध्ये मागील वर्षी साफसफाई कामाचे कंत्राट ४ लाख ९६ हजार असा देण्यात आले होते. ते यंदा ४ लाख २५ हजार रुपयांना देण्यात आले. यामध्ये समितीला प्रतिमहा ७१ हजार रुपयांचा फायदा होणार आहे. म्हणजे वर्षभरात १८ लाख ३६ हजार रुपये इतकी बचत होणार आहे.

दरमहा लाख रुपयांची वाढ
पेठरोड मार्केटमध्ये वाहन प्रवेश फी कामाचे कंत्राट मागील वर्षी प्रतिमहा एक लाख ६ हजार रुपये प्रमाणे देण्यात आले होता. ते पुढील वर्षासाठी प्रतिमहा एक लाख ४७ हजार ८८० रुपये प्रमाणे देण्यात आले आहे. दिंडोरी रोड मार्केटमध्ये मागील वर्षी प्रतिमहा दोन लाख ११ हजार १६७ रुपये होते. ते यावर्षी २ लाख ६० हजार रुपये करण्यात आले आहे. यावरून बाजार समितीचे महिन्याकाठी ९१ हजार ६३ रुपयांनी उत्पन्न वाढणार आहे, असे चुंभळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारी कैद्याचा जेलमध्ये मृत्यू

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील आजारी असलेल्या ७० वर्षीय वृद्ध कैद्याचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. आण्णासाहेब विश्‍वनाथ चव्हाण असे या कैद्याचे नाव आहे. या कैद्याच्या पायाला जखम झाली होती. जखम गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट कामासाठी आयटी विभाग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्रशासकीय कामामध्ये स्मार्टपणा यावा, यासाठी जिल्हाधिकारी, तहसील आणि जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र आयटी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात चार तर राज्यात १५ आयटी तंत्रज्ञानातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग शास्त्रशुध्द व्हावा, यासाठी सरकारने राज्यभर ३०४ तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे. आतपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचे काम हे महसूल व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी करीत होते. पण या क्षेत्रातील ज्ञान असणारे तज्ज्ञ आता उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारच्या विविध योजना थेट जनेतेपर्यंत पोहविणे शक्य व्हावे, यासाठी या आयटी कक्षाचा उपयोग होणार आहे.

नव्याने सुरू करण्यात येणारे हा आयटी कक्ष इन्फास्ट्रक्चर प्रोजेक्ट, डाटा सेंटर, वाइड एरिया नेटवर्क, डिजिटल पेमेंट, आधारकार्ड, आपले सरकार तसेच सरकाराच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थींना थेट खात्यात मिळावे यासाठी उपयोगी ठरणार आहे. राज्य सरकारने विविध माहिती तंत्रज्ञान विषयक प्रकल्प सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा व तालुका स्तरावर हा आयटी कक्ष उपयोगी ठरणार आहे. या आयटी कक्षात प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट लीड, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर, सिनिअर नेटवर्क इंजिनीअर असणार आहेत. सरकारने गेल्या काही वर्षात सर्व काम डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यालयात अनेक बदल झाले पण त्यासाठी तज्ज्ञ इंजिनिअर नसल्यामुळे अनेकदा या कामात दिरंगाई व चुका होत असे. याचा सर्वाधिक त्रास सामान्यांना होत होता. पण आता असे चित्र बदलण्याची आशा निर्माण झाली आहे.

कामाला मिळणार गती
नव्या आयटी कक्षामुळे कामाचा वेग वाढून ऑनलाइन व सॉप्टवेअरच्या अडचणी आता सुटू शकणार आहेत. त्यासाठी हा कक्ष उपयोगी ठरणार आहे. या कक्ष स्थापन्यामागे सर्व डाटा एका क्लिकवर जलद गतीने उपलब्ध होण्याचा उद्देश राज्य सरकारचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळांच्या मुसक्या बांधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

येथील एमआयडीसीला लागून असलेल्या कामगार वस्तीत टवाळखोरांकडून बुधवारी मध्यरात्री आठ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. येथील टवाळखोरांच्या उपद्रवाचा पाढाच नागरिकांनी पोलिसांसमोर वाचल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले खरे. मात्र, या परिसरातील मोकाट टवाळखोरांना जरब बसावी, अशी कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

सातपूरच्या अनेक भागातही टवाळखोरांच्या जाचाला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावरदेखील पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. टवाळखोर बसत असलेल्या चौकांत नियमित पेट्रोलिंग केल्यास त्यांना नक्कीच आळा बसू शकेल, अशी भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

कामगारनगर भागात वाहने तोडफोडीची घटना झाल्यानंतर पोलिस उपायुक्त कोकाटे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी कामगारनगरमधील महिलांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तपासाची चक्रे फिरवून चार टवाळखोरांना ताब्यात घेतले. चारही टवाळखोर कामगारनगर भागातच वास्तव्यास असल्याचे तपास अधिकारी रवींद्र कऱ्हे यांनी ‘मटा’ला सांगितले. पोलिसांनी संबंधितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना जामीनदेखील मिळाला आहे. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्नदेखील उपस्थित होत असून, अशा टवाळखोरांविरोधात पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी, अशी मागणी कामगारनगरवासीयांकडून करण्यात येत आहे.

---

‘भाईं’च्या साथीने गँग

स्लम भागातील अनेक टवाळखोर रहिवासी भागात दहशत पसरविण्याचे काम करतात. यात काही बड्या भाईंची साथही त्यांना मिळत असल्याने प्रसंगी गँग तयार केली जाते. त्यानंतर दोन गटांत जोरदार हाणामाऱ्या झाल्यावर वाहने तोडफोडीसारख्या घटना घडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. कामगारनगर भागात वाहन तोडफोडीच्या झालेल्या घटनेतही टवाळखोरांमध्ये वाद झाला आणि मद्यच्या नशेत त्यांनी दिसेल त्या वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सातपूर भागात अनेक ठिकाणी चौकात उभे राहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासह गँग तयार करणाऱ्यांनाच ताब्यात घेतले पाहिजे, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

--

येथे आहे वाढता वावर

सातपूर भागात बारदान फाटा, मोतीवाला कॉलेज, धुव्रनगरच्या वळणावर, शिवाजीनगर, कार्बन नाका, जलनगरीरोड, श्रमिकनगर, हिंदी माध्यमिक विद्यालय, राधाकृष्णनगर, अशोकनगर बसथांबा, जाधव संकुल, आनंद छाया, स्वामी समर्थ केंद्रासमोर, सातपूर कॉलनी श्रीराम सर्कल, एमआयडीसीतील अनधिकृत हॉटेल्स आदी ठिकाणी रोजच मोकाट टवाळखोरांचा वावर असतो. त्यातील अनेक जण स्लम भागात राहणारे असतात. परंतु, भाईंच्या भाईगिरीसाठी रहिवासी भागात रोजच त्यांचा वावर असतो. विशेष म्हणजे कुठला उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी न करता केवळ दहशत पसरविण्याचे काम या टवाळखोरांकडून केले जाते. आयुक्त डॉ. सिंगल यांनी टवाळखोरांच्या अशा अड्ड्यांवर कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images