Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘अशोका’ची अशीही रस्ता सुरक्षा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभर महामार्ग विकसित करण्यात आघाडीवर असलेल्या अशोका बिल्डकॅान कंपनीने आपला २३ व्या वर्धापन दिन रस्ता सुरक्षा मोहीम घेऊन साजरा केला. याचा औपचारिक शुभारंभ नाशिकमध्ये करुन देशभरातील टोलनाक्यावर या मोहिमेला सुरुवात केली. या शुभारंभाच्या कार्यक्रमात कंपनीने पाच हजार हेल्मेटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची सुरुवात पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया, मॅनेजिंग डायरेक्टर सतीश पारख यासह मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमात कर्मचारी ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून रस्ता सुरक्षेचे काम करणार असून त्यांना एक हेल्मेट देण्यात येणार आहे. त्यानंतर हे कर्मचारी ते गरजु वाहनचालकांना देऊन त्याचा प्रचार करणार आहे. ही सुरक्षा मोहीम महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथेही घेण्यात आली. तेवीसाव्या वर्धापनदिन अशोका बिल्डकॉनने रस्ता सुरक्षितता या विषयाला समर्पित करून त्या अंतर्गत आपले प्रकल्प व टोलनाक्यांच्या ठिकाणी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात मोटारसायकल चालवताना हेल्मेट आणि कार चालवतांना सीटबेल्टचा वापर करावा, या जनजागृतीला प्राधान्य देण्यात आला. नाशिकमध्ये कंपनीने पाच हजारांपैकी १,१५० हेल्मेट वाटप केले.

हेल्मेट घालणाऱ्यांना चॉकलेट

अशोकातर्फे देशातील चौदा टोल नाक्यांच्या ठिकाणी कामकाज चालते. त्याठिकाणी दररोज हजारो वाहनचालक ये-जा करतात. हेच लक्षात घेऊन तेथे टोलचे कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घातलेल्या चालकांना गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन नियम पाळल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते नियमित हेल्मेट वापरण्याचे तसेच गाडीवर पाठीमागे बसणाऱ्याने हेल्मेट घालण्याची विनंती केली. अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख प्रास्ताविक करताना म्हणाले, अपघातात कुठल्याही एका व्यक्तीचे प्राण गमावणे हे देशासाठी हानिकारक असेच आहे. रस्ता विकसित करण्याच्या क्षेत्रात आम्ही आघाडीवर असून, रस्त्यावर जाणाऱ्यांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देत आहे. किंबहुना या विषयांकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी कार्यालयांच्या छत्रछायेखाली डेंग्यू!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांना खबरदारीच्या उपायांबाबत जागरूक करणारी सरकारी यंत्रणा स्वतः मात्र बेफिकीर असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयासह राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, एसटी महामंडळ कार्यालय, इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. सरकारी कार्यालयांच्या छत्रछायेखाली आढळलेल्या डेंग्यूमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, महापालिकेने या सर्वांना नोटिसा काढल्या आहेत. ज्यांच्यावर ५० लाख लोकसंख्येच्या आरोग्याचा भार आहे, त्या जिल्हा रुग्णालयातही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने ही गंभीर बाब मानली जात आहे.

शहरातील संभाव्य डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील घरे, शासकीय कार्यालयांची नुकतीच तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेत या धक्कादायक बाबी समोर आल्या असून, नागरिकांच्या घरांसह सरकारी कार्यालयांमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाकडूनच डेंग्यूबाबत जनजागृती मोहीम राबवली जात असून, नागरिकांना डेंग्यूबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, रुग्णालयाच्या आवारातील स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे तपासणी मोहिमेतून उघडकीस आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्हा रुग्णालयासोबतच इंडिया सिक्युरिटी प्रेस, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, एसटी महामंडळाचे पंचवटी आणि एनडी पटेल रोडवरील कार्यशाळा कार्यालयातही डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेने या कार्यालयांनाही नोटिसा बजावल्या असून, नागरिकांना आवाहन करतानाच स्वतःही स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे.

स्वच्छता अभियान नावालाच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिले असून, सरकारी कार्यालयांसह नागरिकांनाही स्वच्छतेचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानालाच या सरकारी कार्यालयांनी हरताळ फासला आहे. या कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा झाल्याने ही कार्यालये नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र आहे.

दंडाची नाही तरतूद!

नागरिकांच्या घरात आणि सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या तर मुंबई महापालिकेत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, नाशिक महापालिकेत अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय झाला नसल्याने आरोग्य विभाग हतबल आहे. त्यामुळे नागरिकांना व सरकारी कार्यालयांना केवळ नोटिसा देण्यापलीकडे काहीच करता येत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा पोल‌‌िस ठाणी होणार ‘आयएसओ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पोल‌सि ठाण्याची दुरवस्था लक्षात घेता नागरिकांना योग्य सेवा-सुविधा पोल‌सि ठाण्यातून मिळायला हव्यात यासाठी ‘स्मार्ट पोलिसिंग’ उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मालेगाव विभागातील सहा पोल‌सि ठाण्यांना आयएसओ प्रमाणित करण्या साठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. आजादनगर, आयशानगर, तालुका, मालेगाव कॅम्प, शहर आणि छावणी पोलिस स्टेशन यांचा त्यात समावेश आहे.

येथील अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शहरातील पोल‌सि ठाण्यांची भौतिक अवस्था बदल्यासाठी तसेच नागरिकांना पोल‌सि स्टेशनमधून योग्य सोई सुविधा मिळाव्यात यासाठी हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आल्याचे पोद्दार यांनी सांगितले. आयएसओ प्रमाणित पोल‌सि स्टेशनचा प्रयोग या आधी देखील वैजापूर, कोल्हापूर येथे राबविण्यात आला आहे. मालेगाव विभागातील सहा पोल‌सि ठाणी यासाठी निवडण्यात आली आहेत. यासाठी आयएसओ संस्थेचे लेखापरीक्षक देखील बोलावण्यात आले असून, दोन दिवसांपासून त्याची कार्यवाही सुरू आहे.

पथककडून ४० छापे

पोद्दार यांनी विशेष पोल‌सि पथकाने आजवर केलेल्या कार्यवाईची माहिती दिली. या पथकाने एकूण ४० छापे टाकले. एक कोटी ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ६९ आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको कार्यालय स्थलांतराचा प्रयत्न फसला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

सिडकोच्या सहाही योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याने आता सिडकोचे कार्यालयही औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सिडकोकडून सुरू आहे. या स्थलांतराला विरोध झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्रयांची भेट घेऊन स्थलांतर थांबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, असे असतानाही शुक्रवारी सिडको कार्यालयातील कागदपत्रे घेण्यासाठी आलेला ट्रक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे रिकामाचा माघारी धाडण्यात आला. आता कार्यालय स्थलांतराबाबत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्याची प्रकिया सुरू झाली असून, याबाबत आमदार सीमा हिरे यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटून हे कार्यालय स्थलांतरित करू नये, असे सांगितले होते. त्यानुसार कार्यालय स्थलांतराला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, सिडकोला कोणतेही लेखी आदेश प्राप्त न झाल्याने सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कार्यालय स्थलांतराची प्रक्रिया सुरूच होती. शुक्रवारी सायंकाळी औरंगाबद येथून सिडकोतील कागदपत्रे घेण्यासाठी एक ट्रक सिडको कार्यालयात दाखल झाला. याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी आमदार हिरे यांना कळविल्यावर त्यांनी तातडीने सिडको प्रशासक कांचन बोधले यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार थांबविण्यास सांगितले. त्यानंतर सिडकोच्या औरंगाबाद येथील कार्यालयातून आदेश आल्याने हे काम थांबविण्यात आले.

मात्र, सिडकोतील कार्यालयाचे स्थलांतर होणार नाही, असे सांगितले जात असतानाही सिडको कार्यालयाला याबाबत का आदेशित करण्यात आले नाही, हा मोठा प्रश्न असून, सिडकोकडून नागरिकांची अशाप्रकारे फसवणूक तर होत नाही ना, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आता खऱ्या अर्थाने सिडको कार्यालय स्थगितीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--

औरंगाबाद येथील प्रशासकाकांशी चर्चा केलेली आहे. कार्यालय स्थलांतरित न होण्यासंदर्भातील आदेश नाशिक कार्यालयाला पाठविणार असल्याचे त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले असूनही अद्यापही आदेश आलेले नाहीत. तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या असतील, तर त्या जाणून घेऊन लवकरात लवकर हे आदेश नाशिक कार्यालयात येतील यासाठी प्रयत्नशील आहे.

-सीमा हिरे, आमदार

--

एमडी व मुख्य प्रशासक यांचे आदेश असल्याने जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यालय स्थलांतरित होणार आहे. आमच्यापर्यंत अजूनही लेखी स्वरूपात कोणतेही आदेश स्थलांतर न कारण्यासंदर्भात आलेले नाहीत. मात्र, सायंकाळी उशिरा औरंगाबाद येथून आलेल्या संदेशाने हे स्थलांतर तूर्तास थांबविण्यात आलेले असून, पुढील आदेशाची वाट बघितली जात आहे.

-कांचन बोधले, प्रशासकीय अधिकारी, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणमंत्र्यांना देणार खर्चाचा हिशेब

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी पालिकेची झाडाझडती घेत पालिका घनकचरा व मलनिस्सारणावर बजेटच्या पंचवीस टक्के रक्कम खर्च करीत नसल्याचा ठपका ठेवला होता. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मात्र पालिका घनकचरा व मलनिस्सारणावर बजेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खर्च करत असल्याचा दावा केला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती कदम यांना दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोदावरी प्रदूषणासंदर्भात पर्यावरण प्रेमी यांनी पालिकेच्या कामकाजावर आक्षेप घेतला होता. कदम यांनी २५ टक्के बजेटचा खर्च मलनिस्सारण व घनकचऱ्यावर खर्च करतात का, असा जाब विचारला होता. त्यावर अधिकाऱ्यांना योग्य उत्तरे देता न आल्याने कदमांनी पालिकेची झाडाझडती घेतली होती. मात्र यावर आयुक्तांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले.


एमपीसीबीची जबाबदारी

गोदावरी प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या शहारातील उद्योजक व उत्पादकांनावर कारवाईची चालढकल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पालिकेवर केली आहे. पंरतु या उत्पादकांसह उद्योजकांवर कारवाईची जबाबदारी प्रदूषण महामंडळाचीच असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मातोश्री’ची विद्यार्थिनी प्रतीक्षा जिल्ह्यात प्रथम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी कॉलेजची सिव्हिल इंजिनीअरिंग विद्याशाखेतील प्रतीक्षा देवकर या विद्यार्थिनीने ८५.७० टक्के गुण मिळवून नाशिक जिल्ह्यात विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. याशिवाय या कॉलेजमधील २९४ विद्यार्थी विशेष तर २२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने या कॉलेजने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या कॉलेजमधील संगणक विभागाचा अंतिम वर्षाचा निकाल ९६ टक्के लागला असून, ऋतुजा मगर या विद्यार्थिनीने ७६.८६ तर पुजा डेर्ले हिने ७६.५६ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या विभागातील ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी विशेष तर १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. अणू विद्युत व दूरसंचार विभागाचा अंतिम विभागाचा निकाल ८९ टक्के इतका लागला असून, त्यापैकी ५० टक्क्याहून अधिक विद्यार्थी विशेष तर ३८ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या विभागात अभिजित लोखंडे या विद्यार्थ्याने ८०.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

विद्युत विभागाचा निकाल ८५ टक्के लागला. या विभागातील ४१ विद्यार्थी विशेष तर ४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ८५.५३ टक्के गुण मिळविणारी शितल कहांडळ प्रथम तर ७५.२६ टक्के गुण मिळवून रोहित परदेशी या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला. मेकॅनिकल विभागाचा निकाल ८३ टक्के लागला. या विभागातील ७६ विद्यार्थी विशेष तर ८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विभागात ७७.४६ टक्के गुण मिळवणारा अक्षय भोळे प्रथम आला आहे. तर माहिती तंत्रज्ञान विभागाचा निकाल ८१.३९ टक्के लागला असून, विशेष श्रेणीत १९ टक्के तर ४५ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या विभागात ७५.१४ टक्के गुण मिळवणारा शेहजाद शेख हा विद्यार्थी प्रथम आला. स्थापत्य विद्याशाखेचा निकाल ८० टक्के लागला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन समित्यांसाठी सात अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नव्याने तयार करण्यात आलेल्या तीन समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी तीन समित्यांसाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. शहर सुधार समितीच्या सभापतीपदासाठी भगवान दोंदे, विधी समितीसाठी शीतल माळोदे, तर आरोग्य समिती सभापती पदासाठी सतीश कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, आरोग्य समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपच्या शांता हिरे आणि मनसेच्या योगेश शेवरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे उपसभापत‌ी पद मनसेला मिळण्याची शक्यता आहे. सातपूर प्रभाग समितीच्या सभापत‌िपदाचा मोबदला मनसेला मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेत सत्ताधारी भाजपने शहर सुधार, विधी व वैद्यकीय आणि आरोग्य या तीन समित्यांची नव्याने निर्मिती केली आहे. या समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवड २४ जुलैला होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात ‘शहर सुधार’ च्या सभापत‌ी पदासाठी भगवान दोंदे, तर उपसभापत‌ी पदासाठी स्वाती भामरे यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहे. ‘वैद्यकीय व आरोग्य’च्या सभापत‌ी पदासाठी सतीश कुलकर्णी यांनी तर उपसभापत‌ी पदासाठी शांता हिरे यांनी अर्ज दाखल केले. विधी समितीच्या सभापत‌ी पदासाठी शीतल माळोदे यांनी तर उपसभापत‌ी पदासाठी राकेश दोंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या तीनही समित्यांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. विरोधात असलेल्या शिवसेनेने अल्पमतामुळे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीनही समित्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्यची शक्यता आहे.

दोस्ताना सलामत

मनसेच्या वतीने वैद्यकीय व आरोग्य समितीच्या उपसभापती पदासाठी योगेश शेवरे यांनी अर्ज दाखल केला आहे. सातपूर प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी मनसेने आपले मत भाजपच्या पारड्यात टाकले होते. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा सभापती झाला होता. त्यामुळे त्याचा मोबदला म्हणून मनसेला वैद्यकीय व आरोग्य समितीचे उपसभापती पद दिले जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी शांता हिरे यांनीही अर्ज दाखल केला आहे. पंरतु, त्या माघार घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपचा सातपूरमधील दोस्ताना पालिका मुख्यालयातही सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा, भाम, वाकीला पूर

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा, भाम व वाकी या नद्यांना या महिन्यात दुसऱ्यांदा पूर आला आहे. अवघ्या चोवीस तासांत १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान या पुरस्थितीमुळे घोटी-सिन्नर महामार्गावरील पुलाच्या कामामुळे पर्यायी मार्ग असलेल्या घोटी-खैरगाव या रस्त्यावरही पुराचे पाणी आल्याने हा मार्गही ठप्प झाला आहे. त्यामुळे घोटी-सिन्नर महामार्गावरिल वाहनांना आता साकुर फाटामार्गे वळविण्यात आले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे दारणा, वाकी, भाम व भावली या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

दारणा ८२ टक्के भरले

इगतपुरी तालुक्यात यावर्षी जुलैमध्येच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ दिवस आधीच भावली धरण ओसंडून वाहू लागले. दारणा धरणही जवळपास ८२ तर कडवा धरणातही ८० टक्के पाणीसाठा आहे. मुकणे व वाकी या धरणातही अनुक्रमे ३२ व २९ टक्के पाणीसाठी आहे.

दारणा धरणातून गेल्या आठ दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. शुक्रवारीही दारणा धरणातून १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर कडवा धरणातून १४०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. तालुक्यात चोवीस तासांत १४३ मिमी तर शुक्रवारपर्यंत २०३० मिमी पावसाची नोंद आहे. एकूण पावसाच्या तुलनेत ६० टक्के पाऊस झाला आहे.

पर्यायी मार्गही पाण्यात

घोटी-सिन्नर महामार्गावरील पुलाला भगदाड पडल्यामुळे अवजड वाहतूक साकुर फाटा ते व्हिटीसी कंपनी व साकुर फाटा ते मुंढेगावमार्गे वळविण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी देवळे खैरगाव, शेणवडघोटी मार्ग सुरू आहे. मात्र पावसामुळे शेणवड मार्गावरील मोरीवरही शुक्रवारी पुराचे पाणी आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्ली-कर्नाटकचा संघ आघाडीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र फेन्सिग असोसिएशन आणि के. एन. डी. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय तलववारबाजी स्पर्धेत दिल्ली आणि कर्नाटकच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.

उद्घाटन कार्यक्रमांनंतर मिनी गटाच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. यामध्ये मुलांच्या फॉईल या सांघिक प्रकारात दिल्लीने महाराष्ट्राचा १५ विरुद्ध ११ असा चार गुणांनी पराभव करून विजय संपादन केला. याच गटात केरळ संघाने मध्यप्रदेशचा १५ विरुद्ध ४ गुणाने पराभव करून विजयी सलामी दिली. मिनी मुलींच्या सांघ‌िक सॅबर या प्रकारात कर्नाटक विरुद्ध मणिपूर या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कर्नाटक संघाने शेवटच्या काही मिनिटांत चांगला खेळ करून हा सामना १५ विरुद्ध १४ अशा अवघ्या एक गुणाने जिंकून विजय मिळविला. मात्र, त्यानंतर दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात मणिपूर संघाने जोमाने खेळ करून हा सामना १५ विरुद्ध १ अशा मोठ्या फरकाने जिंकून विजय साजरा करीत आपले आव्हान कायम राखले. मध्य प्रदेशच्या मुलींच्या संघानेही कर्नाटक संघाबरोबर खेळ करताना चांगला समन्वय राखत हा सामना १५ विरुद्ध ११ अशा गुणांनी जिंकून संघाला पुढे जण्यासाठी महत्वाचे पाऊल टाकले. दिवसभर साखळी सामने होणार असून, त्यानंतर आज बाद पद्धतीचे सामने होणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप बनकर त्यांच्या हस्ते झाले. खेळाडूंना संबोध‌ित करता‌ना बनकर म्हणाले की, तलवारबाजी हा खेळ फार पूर्वीपासून ऑल‌िम्पिकमध्ये आहे. त्यामुळे या खेळावर लक्ष केंद्रीत केल्यास भारताला पदके मिळू शकतील. यासाठी नाशिकचा प्रयत्न चांगला असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी तर सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले.


स्पर्धेचा निकाल

फॉईल मुले

१) दिल्ली विजयी विरुद्ध महाराष्ट्र (१५-११ )

२) केरळ व‌िजयी विरुद्ध मध्यप्रदेश (१५-०४)

३) गुजराथ विजयी विरुद्ध महाराष्ट्र (१५-०९)

सॅबर मुली

१) कर्नाटक विजयी विरुद्ध मणिपूर (१५-१४)

२) दिल्ली विजयी आंध्रप्रदेश (१५-१०)

३) मणिपूर विजयी विरुद्ध दिल्ली (१५-०४)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालानंतरच ‘द्वारका’चा निर्णय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

द्वारका चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण काढून तेथे यू-टर्नद्वारे वाहतूक वळवण्याच्या विषयावर शुक्रवारी पालिका आयुक्त, आमदार देवयानी फरांदे व अतिक्रमण धारकांची बैठक झाली. या बैठकीत गाळेधारकांनी अतिक्रमण काढून घेतल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास कोर्टाच्या निकालानंतर कारवाई केली जाईल, असे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘द्वारका’ची कोंडी फुटण्यासाठी कोर्टाच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

या बैठकीत ‘द्वारका’ची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेची जागा रिक्त करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. येथील हनुमान मंदिराचे स्थलांतर करणे, भुयारी मार्ग वाढवणे आणि पुण्याकडून येणारी वाहने यू-टर्नने मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आमदारांनी ठेवला. त्यावर येथील व्यावसायिकांनी अतिक्रमण काढल्यास हे काम तातडीने सुरू करता येईल, असे आयुक्तांनी सांग‌ितले. परंतु, गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. तो मागे घ्यावा, असे सांगण्यात आले. परंतु, गाळेधारक तयार नसल्याने आयुक्तांनीही न्यायालयाच्या निकालानंतर बघू, असे सांगितले.


‘न्हाई’ची ना-हरकत हवी

द्वारकाची कोंडी फोडण्यासाठी पुणे व धुळ्याकडून येणारी वाहतूक यू-टर्नने वळविण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांनी या कामाची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (न्हाई) ना-हरकत दाखला मागितला आहे. मुंबईकडून येणारी वाहतूक टाकळीरोडने वळवायची आणि पुण्याकडील वाहतूक मुंबई नाक्याकडे वळवण्याचा विचार सुरू आहे. परंतु, त्यासाठी बॅरिकेट्स तोडावे लागणार आहेत. त्यासाठी परवानगी मिळाल्यास पालिका द्वारकाची कोंडी फोडण्यासाठी चाचपणी करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या होता येणार कल्चर क्लबचे सदस्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सने घरबसल्या उपलब्ध करुन दिली आहे. खास तुमच्यासाठी तुमच्या आग्रहास्तव मटा कल्चर क्लबचे फॉर्म तुम्हाला घरबसल्या मिळणार आहेत.

‘मटा कल्चर क्लब’तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन केले जाते. मग ते हॅप्पी स्ट्रीट, श्रावण क्विन असो किंवा नाटक. त्याचबरोबर झुंबा डान्स, खाऊचा डब्बा, कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किट्टी पार्टी, गानतंत्र, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निवल, सहल, मँगो फेस्टिवल, नवरंग नवरात्रीचे, मंगळागौर, एज्युकेशनल सेमिनार, क्विझ कॉन्टेस्ट, संगीत मैफिली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद तुम्हाला वर्षभर घेता येतो. तसेच तुमच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘मटा कल्चर क्लब’ व्यासपीठही उपलब्ध करून देते. नाटकांसारख्या कार्यक्रमांमध्ये ‘मटा कल्चर क्लब’ सदस्यांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल, तर आजच ‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य व्हा. हे सदस्यत्व तुम्हाला घरबसल्या घेता येईल.

फक्त इतकेच करायचे...

तुम्हाला घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा BCCL च्या नावाचा चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्या. चेकमागे तुमचं नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. तुमचा चेक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. तेव्हा आजच तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधा आणि ‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य व्हा. अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोकडून आर्थिक लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडको प्रशासनाच्या वतीने बांधकामासाठी ना हरकत परवाना देताना नागरिकांची अार्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी असून, एका परवान्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली जात आहे. ही रक्कम अधिकृत असली, तरीही अन्यायकारक असून, याबाबत सिडको प्रशासनाने तोडगा काढावा आणि अार्थिक लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिक सिडको गृहनिर्माण योजना १९८२ साली अस्तित्वात आली. या योजनेंतर्गत ३० हजार बांधीव घरे व अनेक वाणिज्य वापराचे गाळे, तयार करण्यात आले. सिडको प्रशासनाने उच्च, मध्यम व अल्प उत्पन्न अशी वर्गवारी करून सामान्य लोकांना मालमत्ता हस्तांतर केली आणि आजपर्यंत लोकांकडून कराराप्रमाणे मोठ्या प्रमाणात महसूल वसूल केला. या ठिकाणी ९० वर्षांचे करार करण्यात आलेले असून, सद्यःस्थितीत सुमारे तीन लाख नागरिक कायमस्वरूपी स्थायिक झालेले आहेत. परंतु, सिडको प्रशासन वेळोवेळी अचंबित करणारे निर्णय घेत असून, जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत असते. सिडको प्रशासनाने बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेच्या नगररचना विभागाकडे वर्ग केला आहे व फक्त ना हरकत देण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आहे. परंतु, त्याकरिता सिडको प्रशासन तब्बल ५५ हजार रुपये अाकारणी करीत असून, त्यामुळे जनतेला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नाशिक शहराची मेट्रो सिटीकडे होणारी वाटचाल लक्षात घेऊनही सिडको प्रशासन कात टाकण्यास तयार नाही. कोणताही नवीन प्रकल्प राबविण्याचे नियोजन दिसत नसून, नाशिक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून प्रशासकही पूर्णवेळ नाहीत. अशा अवस्थेत येथील नागरिकांना त्यांची कामे करणे अतिशय कठीण व त्रासदायक झाले आहे. घरे, जागा, हस्तांतर करणे, त्यावर गृहकर्ज घेण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे, बांधकाम परवाणगी घेणे आदी गरजेची कामे करणे कठीण झाले आहे. अशा सर्व बाबींमुळे नागरिकांना अार्थिक झळ बसण्यासह मानसिक ताणही सहन करावा लागत आहे.

--

पारदर्शी कारभाराची अपेक्षा

परिसरातील रहिवाशांत सिडको प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी असून, या कार्यालयाने पारदर्शी कारभार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाशिक शहर जोमाने प्रगती करीत असताना नाशिकमधील कार्यालयाकडून पुरेसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. यासंदर्भात कोणताही प्रतिनिधी अांदोलन करीत नाही किंवा जाब विचारत नाही, ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रियादेखील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

सिडको विभागात नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन या समस्या सोडविण्यास उत्सुक नाही. जागा हस्तांतराचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपये मागितले जातात ही अन्यायकारक बाब आहे. प्रशासनाने कार्यवाही करावी.

-जी. के. मनियार, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, बनवू या चॉकलेट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेळोवेळी बहुविध उपक्रमांची पर्वणी देणाऱ्या मटा कल्चर क्लबतर्फे पॅरेंट्स डेनिमित्त येत्या रविवारी (दि. २३) चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले अाहे. या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर्स आणि बंपर प्राइज जिंकण्याची संधीही सहभागींना मिळणार आहे.

चॉकलेट हा जसा लहान मुलांचा आवडीचा विषय असतो, तसा तो मोठ्यांचाही वीक पॉइंट ठरताना दिसतो. त्यामुळे सर्वांनाच आवडणारी चॉकलेट्स घरच्या घरी बनविता आली तर..? सर्वांची हीच आवड ओळखून मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत निर्माण उपवन, काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ पंचवटी, नाशिक या ठिकाणी करण्यात आले आहे. सीमा गवारे पाटील या चॉकलेट कसे बनवायचे, चॉकलेटचे फिलिंग कसे करायचे, तसेच चॉकलेट रॅपिंग, टेम्परिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, चॉकलेट ब्राऊनीज वर्कशॉपमध्ये बनवून दाखवणार आहेत. हे वर्कशॉप सर्वांसाठी मोफत राहणार आहे. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन गरजेचे असून, त्यासाठी ७०४०७६२२५४ अथवा ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

सेल्फी पाठविणाऱ्यांना सुसंधी

पॅरेंट्स डेनिमित्त ज्यांनी सेल्फी पाठविले आहेत त्यांनी चॉकलेट मेकिंग वर्कशॉपला उपस्थित राहावे. भाग्यवान ५० जणांना हेल्थ चेकअप व्हाउचर्स चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमध्ये दिले जातील. या वर्कशॉपमध्ये रेफ्रिजरेटर, म्युझिक सिस्टिम यांसारखे बंपर प्राइज जिकंण्याचीही संधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनमाड-इंदूर’ रेल्वेमार्गाला अखेर मुहूर्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मनमाड-इंदूर या बहुप्रतिक्ष‌ति रेल्वेमार्गाला अखेर मुहूर्त लागला असून, येत्या शनिवारी (दि. २९) रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा धुळे दौरा निश्चित झाला आहे. यामध्ये धुळ्यात रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक होणार असून, याचवेळी मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजनही केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

प्रस्तावित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळविली आहे. या मार्गाची पुढील प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. भामरे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना धुळे भेटीसाठी आग्रह करीत होते. गेल्या तीस वर्षांत जिल्ह्यात देशातील सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वेमंत्री आहेत जे धुळेकरांना गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या स्वप्नपूर्तीची भेट देण्यासाठी धुळ्यात येत आहेत. त्यासाठीच डॉ. सुभाष भामरे यांनी सुरेश प्रभू यांना प्रत्यक्ष धुळे येथे येऊन समस्त धुळेवासियांना ही अमूल्य भेट द्यावी म्हणून आग्रह धरला. या आग्रहामुळे रेल्वेमंत्री प्रभू धुळ्यात येणार आहेत.

या धुळे बैठकीदरम्यान संबंधित रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या विषयांसंदर्भात प्रगतीचा आढावा घेणार आहेत. तसेच मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना सूचनादेखील करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ बाजार ‘व्हेईकल फ्री’?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सराफ बाजार, फुलबाजार आणि भद्रकाली परिसरातील वर्दळीची कोंडी फोडण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसोबत आमदार देवयानी फरांदे आणि व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीत सराफ व्यावसायिकांनी हा भाग ‘नो व्हेईकल’ आणि ‘नो हॉकर्स झोन’ करण्याची मागणी केली. फुलबाजारासह किरकोळ विक्रेत्यांसाठी हाटबाजार तयारी करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर आता महापालिका, पोलिस आणि स्थानिक व्यावसायिकांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

सराफ बाजार, फुलबाजार आणि भद्रकालीतील काही परिसरात मोठी कोंडी निर्माण होते. त्यामुळे या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका आयुक्त, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, आमदार फरांदे व सराफ व्यावसायिकांची एकत्र‌ित बैठक झाली. त्यात व्यावसायिकांनी हा भाग ‘नो व्हेईकल झोन’ करण्यासह येथील हॉकर्सधारकांना स्थलांतरित करण्याची मागणी केली. उत्सवाच्या काळात येथे मोठी गर्दी होते. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र ‘हाटबाजार’ असावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी शहर अभियंत्यांना जागा शोधण्याच्या सूचना केल्या. तसेच येथे ज्या हॉकर्सधारकांची नोंदणी झाली असेल, त्यांना तत्काळ स्थलांतरीत करण्यात यावे, असे आयुक्तांनी सूचित केले. फुलबाजारही गणेशवाडीत हलविण्याची सूचना करण्यात आली.

हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ करण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे. पालिकेने या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून दिल्यास पोलिस त्याची अंमलबजावणी करतील, असे पाटील यांनी सांग‌ितले. त्यामुळे या बाजाराची कोंडी फोडण्यासाठी एक संयुक्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यात महापालिका, पोलिसांचे प्रतिनिधी आणि व्यावसायिक असतील. ही समिती या भागातील कोंडी फोडण्यासंदर्भातील अहवाल देणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीला प्रमोद कुलथे, राजेंद्र ओढेकर, प्रसाद आडगावकर, मेहुल थोरात, गिरीश टकले, अमर सोनवणे आदी व्यावसायिक उपस्थित होते.

इलेक्ट्रिक वाहने चालवा

हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ केल्यास नागरिकांनी परिसरात फिरण्यासाठी अडचण होणार आहे. त्यामुळे या भागात बॅटरीवर चालणारी वाहने सुरू करावीत, असा प्रस्ताव आमदार फरांदे यांनी ठेवला. परंतु, या ठिकाणी येणाऱ्या वाहन चालकांची वाहने कुठे पार्क करायची हा मोठा प्रश्न असणार आहे. या भागात अगोदरच पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. हॉकर्स आणि फुलविक्रेते येथून हलण्यास तयार होणार नाहीत. त्यामुळे या समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रविवार असूनही होणार प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अकरावीची दुसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश सुरू असून आज (२३ जुलै) रविवार असूनदेखील कॉलेजांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तीन ते चार दिवसांचाच कालावधी असल्याने रविवारीदेखील प्रवेशप्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय प्रवेश नियंत्रित समितीने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अकरावीची ऑनलाइन प्रक्रिया आतापर्यंत सुरळित सुरू असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येऊ नये यासाठ केंद्रीय प्रवेश नियंत्रित समितीकडून दक्षता घेतली जात आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार नियोजित वेळेतच प्रवेशप्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी ही समिती प्रयत्नशील आहे. त्यामुळे ज्युनिअर कॉलेजांमध्ये रविवारच्या सुटीच्यादिवशी देखील प्रवेशप्रक्रिया राबवावी अशा सूचना या कॉलेजांना देण्यात आल्या आहेत.
सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीतील या विद्यार्थ्यांना २४ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
९ हजार ७४३
प्रवेश निश्चित
अकरावीचे शनिवार सायंकाळपर्यंत ९ हजार ७७३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यामध्ये आर्टस शाखेच्या १ हजार ९१२, कॉमर्स शाखेच्या ३ हजार ३८८, एमसीव्हीसी शाखेच्या ३०४ व सायन्स शाखेच्या ४ हजार १३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अद्याप अर्ज भरला नसल्यास

ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेचे अर्ज अद्याप भरलेले नाही अशा विद्यार्थ्यांना २६ आणि २७ तारखेला बिटको, बीवायके व पंचवटी या कॉलेजांमध्ये भाग १ व भाग २ भरावे असे आवाहन केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडून करण्यात आले आहे. तसेच या दरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीक्रमदेखील भरता येणार आहे. २९ जुलैला तिसरी यादी जाहीर करण्यात येणार असून ३१ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान या यादीतील प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याच्या विद्यार्थ्यांवरच अन्याय!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एप्रिल २०१७ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या लॉ विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या वार्षिक परीक्षेतील गुणदानामध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी मागवून पडताळणी केल्यानंतर यातील एकूण बेरजेतच मोठी गफलत असल्याचा प्रकार उघड होतो आहे.
एप्रिलमध्ये लॉच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात १० जूननंतर जाहीर झाला. या निकालात विद्याशाखेतील विद्यार्थी थोड्या गुणांहून मोठ्या प्रमाणात अनुत्तीर्ण झाले होते. यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे फोटोकॉपीजची मागणी केली. या फोटोकॉपी नुकत्याच विद्यार्थ्यांच्या हाती पडल्या असून त्याचा पडताळणी केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या आतील भागात देण्यात आलेले बरेच गुण मुखपृष्ठावरील एकूण गुणांमध्ये मिळविले नसल्याने विद्यार्थ्यांना पडलेल्या एकूण गुणांपेक्षा कमी गुणांचे दान झाल्याच्या काही केसेसही विद्यार्थ्यांनी ‘मटा’कडे मांडल्या आहेत.
यामध्ये बीएसएल एलएलबी, बीए एलएलबी आणि एलएलबी या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही उत्तरपत्रिकांमध्ये तर विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते उत्तर तपासून त्याला गुणही देण्यात आले आहेत मात्र मुखपृष्ठावर त्या प्रश्नाचे उत्तरच विद्यार्थ्याने लिहिले नसल्याच्या अजब खुणा तपासणीसाने केल्या आहेत.

दरवर्षीची डोकेदुखी
विद्यापीठातून लॉ विद्याशाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर वारंवारअन्याय होत असल्याचा प्रकार दरवर्षीच्या निकालात प्रत्ययास येतो आहे. यापूर्वीही विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी यात लक्ष घातले होते.
तात्पुरता हे प्रकरण सुरळीत झाल्यानंतर आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था झाली आहे. यंदा कॉन्स्टिट्यूशन, हिस्ट्री ऑफ कोर्ट, कॉन्ट्रॅक्ट या विषयांचे अनुत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे.


अन्यथा फोटोकॉपीजची होळी

विद्यापीठाकडे या प्रश्नांबाबत तक्रारी करून विद्यार्थ्यांच्या समस्या कायम राहत आहेत. या प्रकरणाची तड लागण्यासाठी नाशिकमधील विद्यार्थी लवकरच कुलगुरूंची वेळ घेऊन भेट घेणार आहेत. यानंतरही याप्रश्नी तोडगा न निघाल्यास सदोष फोटोकॉपीजची होळी करण्याचा इशारा अॅड. अजिंक्य गिते यांनी दिला आहे.

फोटोकॉपीच झाली गहाळ
नाशिकमधील एका लॉ शाखेच्या विद्यार्थ्याने ठरलेल्या मुदतीच्या आत फोटोकॉपीसाठी अर्ज केला होता. इतरच्या विद्यार्थ्यांची फोटोकॉपी आली व त्या विद्यार्थ्याची कॉपी न आल्याने त्याने विद्यापीठाकडे चौकशी केली. यावर तुमचे फी पेमेंटच पोहोच झाल्याची नोंद विद्यापीठात नसल्याने हा प्रकार घडल्याचे विद्यापीठाने सांगितले. मात्र या विद्यार्थ्यांकडे फी भरल्याच्या रीतसर पावत्या आणि आवश्यक तपशील आहे. याची दखल घेत आता नव्याने त्याला फोटोकॉपीच्या प्रक्रियेत समाविष्ट केले आहे. यासाठी अवघे दोन दिवस हाती असून आज रविवारच आहे.
-----
विद्यापीठ बदलाचा कल
लॉ विद्याशाखेबाबतचा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा अनुभव प्रतिकूल आहे. याला कंटाळून विद्यार्थी आता पुणे विद्यापीठाबाहेर प्रवेश घेत आहेत. विद्यार्थ्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेऊन नाराजी व्यक्त केली आहे.
------
उत्तरपत्रिका तपासणीनंतर अत्यंत अंधपणे या गुणांच्या बेरजा मांडण्यात आल्याचे फोटोकॉपी बघितल्यानंतर निदर्शनास येते. मी ही या प्रकाराचा बळी ठरलो आहे. गुणांची बेरीज ३८ होत असताना ती ३५ दर्शविण्यात आली आहे.
महेश गायकवाड, विद्यार्थी
सर्व उत्तरे तपासून त्यातील काहींचे गुणच त्यांना देण्यात आलेले नाहीत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणांची एकूण बेरीज चुकवून कमी गुण देण्यात आले आहेत. तर काहींनी उत्तरे सोडवूनही मुखपृष्ठावर तो प्रश्न अटेम्प्ट केलाच नसल्याच्या खुणा दिसताहेत - तुषार जाधव, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावच्या ‘तरुआई’ने जगव‌िली ५३८ झाडे

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

राज्यात नुकताच वन महोत्सव सप्ताह साजरा झाला. या सप्ताहांतर्गत चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. मालेगाव उपविभागीय वनक्षेत्रातही ९ लाखाहून अधिक वृक्ष लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केला. शासनाने राबविलेल्या या मोहिमेत शहरातील पर्यावरणस्नेहींनी एकत्र येत वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी सुरू केलेली ‘तरुआई’ ही चळवळ तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या दोन वर्षांत या चळवळीने तब्बल ५३८ झाडे लावली आणि जगविली सुद्धा. दोन वर्षांपूर्वी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी ओसाड जमीन आता या झाडांनी फुलली आहे.

तरुआई ही कुठलीही संघटना नाही किंवा एनजीओ नाही. तरुआई हा शहरातील पर्यावरणस्नेही नागरिकांचा गट आहे. या गटाने दोन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीला व्यक्तिगत छंदाला सर्वजनिक रूप देण्याचे ठरविले. आज त्याचे चळवळीत रुपांतरण झाले आहे. १२ जुलै २०१५ रोजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तरुआईच्या कामाचा श्रीगणेशा झाला. त्यावेळी खरे तर एका रोपट्यापासून सुरू झालेली ही चळवळ हरित मालेगावच्या दिशेने वाटचाल करेल असे कुणाला वाटले नव्हते. केवळ फोटोसेशन करून थांबणारा हा इव्हेंट नव्हता हे आज रस्त्यांच्या दुतर्फा, मैदाने, सरकारी कार्यालयातील झाडांकडे बघून लक्षात येत आहे.

श्रमसेवकांचा अविष्कार

शहरात कुणाचा वाढदिवस असेल किंवा आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्र‌ित्यर्थ काही करायचे असेल अशा अनेकांना तरुआईने सोशल मीडियावरून वृक्षदान करावे, ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रमदान करावे, असे आवाहन केले.

आज ३९४ हून अधिक कुटुंबांनी यासाठी योगदान दिले आहे. वृक्ष सुरक्षित राहावे यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने जाळी बनवल्या. गेल्या दोन वर्षांत याच हिरव्या जाळ्यांनी आणि वृक्षांनी मालेगाव शहरात काहीच होत नाही, हा समज चुकीचा ठरव‌िला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, धिंगाणा कराल तर...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात आषाढ अमावस्येला तळीरामांकडून उपद्रव होऊ नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे.
पावसाचा माहोल, रविवारची सुटी यांमुळे गटारी अमावस्येची रंगत अधिकच वाढण्याची शक्यता असून त्यातून दारू पिऊन धिंगाणा घालणे, मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरून गोंधळ घालणे, वेगात वाहने दामटविणे यासारखे प्रकार घडण्याची शक्यता अधिक आहे. अशा विघ्नसंतोषींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तळीरामांच्या बंदोबस्तासाठी शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिस तसेच साध्या वेशातील पोल‌िसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह सारख्या कारवायांबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
आषाढ अमावस्या अर्थात गटारीला शनिवारी (दि. २२) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास प्रारंभ झाला. रविवारी (दि. २३) रात्री सव्वातीनपर्यंत अमावस्या असणार आहे. त्यानंतर श्रावण महिनारंभ होणार आहे. श्रावण महिन्यात मद्य व मांसाहार व्यर्ज केला जातो. म्हणूनच आषाढ अमावस्येला मद्य व मांसाहाराची संधी साधली जाते. मात्र, अतिउत्साहातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरासह ग्रामीण भागातही चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
रविवारी शहरात त्र्यंबकरोड, आडगाव रोड, दिंडोरी रोड, पेठ रोड, मुंबई आग्रा महामार्ग तसेच पुणे रोड आदी ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी होणार आहे. विनापरवाना मद्यविक्री करणारे हॉटेल्स, ढाबे यांच्याबरोबरच विना परवाना मद्यप्राशन करणारे तळीरामांवरही कारवाई केली जाणार आहे.

थेट जागेवर गुन्हा दाखल
ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईसाठी २० ब्रेथ अ‍ॅनालायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑन द स्पॉट गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. आधुनिक ब्रेथ अ‍ॅनालायझरमुळे मद्यपी वाहनचालकाची माहिती, त्याचा वाहन क्रमांक, लायसन्स क्रमांक, फोटो तसेच अल्कोहोलचे प्रमाण, कारवाई करणाऱ्या पोलिसाचे नाव रिपोर्टमध्ये येते. या रिपोर्टची जागेवरच प्रिंट काढून त्यावर मद्यपी वाहनचालकाची स्वाक्षरी घेण्यात येते व हाच रिर्पोट वैद्यकीय पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.

सेल्फीधारकांना कारवाईचा दणका
शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदावरी नदी तसेच निसर्गरम्य ठिकाणी जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. स्वत:चा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी अशा ठिकाणांवर पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठाणातील बांधकामांना दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठीची नियमावली जाहीर केली आहे. नाशिकमधील अनधिकृत बांधकामांनाही दिलासा मिळणार आहे. तसेच गावठाणातील बांधकामे नियमित होण्यास मदत होणार आहे.

अनधिकृत बांधकामे नियमित करणासाठी दहा टक्के हार्डशीप प्रिमियम आकारणी करण्यात आली आहे. दंडात्मक आकारणीमुळे पूर्ण इमारतच अनधिकृत ठरण्याचा धोका असल्याने या नियमावलीला व्यावसायिकांच्या प्रतिसाद अल्पसा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठीच्या नियमावलीवर हरकती मागवण्यास सुरूवात केली आहे. या नियमावलीवर एका महिना भरात हरकती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी
राज्य सरकारने राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या निर्णय घेतला होता. परंतु, हायकोर्टाने ताशेरे ओढताच बांधकामे अधिकृततेसाठी नियमावली तयार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, नियमावली तयार केली जात असून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांसाठी ती लागू केली जाणार आहे. त्यासाठी आता हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी नागरिकांना व बांधकाम व्यावसायिकांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत बहुतांश अनधिकृत बांधकामांची कोंडी सुटणार आहे. रहिवाशी, इंडस्ट्री, व्यावसायिक, शाळा यांच्यासाठी सुध्दा ही नियमावली लागू राहणार आहे. यात ओटे, इमारतींची उंची, बंद टेरेस, बंद बाल्कनी, साईड मार्जिनमध्ये झालेले बांधकाम, एफएसआयचे उल्लंघन, इमारतीची वापर, रस्ता रुंदीकरणामुळे अनधिकृत ठरलेली बांधकामे, जिना व पॅसेजमध्ये डिफरन्स, पार्किंगचे उल्लंघन यांचेही नियमितीकरण करता येणार आहे. या नियमावलीमुळे शहरातील कपाटकोंडी फुटणार असून सुमारे ७० टक्के अनधिकृत बांधकामे अधिकृत करता येणार आहे. परंतु त्यासाठी जबर दंड आकारण्यात आल्याने त्यावर हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बांधकाम व्यावसायिकांची कोंडी
या नियमावलीने अनधिकृत बांधकामाना दिलासा मिळणार असला अनधिकृत बांधकामे नियमित करताना तीन प्रकारचे दंड आकारले जाणार आहेत. त्यात हार्डशीप प्रिमिअम, अतिरिक्त एफएसआय, इन्फ्रास्ट्रक्‍चर यांचा समावेश आहे. जमीन मूल्याच्या दहा टक्के हा दर असणार आहे. दरांचा समावेश राहील. त्यामुळे बिल्डरांचे कंबरडे यामुळे मोडणार आहे. या तीन दरामुळे बिल्डींगच अनधिकृत ठरण्याचा धोका असल्याने बिल्डरांचा प्रतिसादावर प्रश्नचिन्ह आहेत. योजना अमलात आणताना स्थानिक प्राधिकरणाकडून प्रशमन (कंपाउंड) दर आकारले जाणार असल्याने बिल्डरांची कोंडीच अधिक होणार आहे.

नदी काठावरील बांधकामे अनधिकृतच
नियमावलीत अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी निकषही देण्यात आले आहेत. या निकषांचा सर्वाधिक फटका हा नदी व नाल्यामध्ये अतिक्रमण करून तयार केलेल्या बांधकामांना बसणार आहे. नाशिकमध्ये पूररेषेमुळे अडकलेल्या हजारो बांधकामाना त्याचा झटका बसणार आहे. २००८ पासून निळ्या व लाल पूररेषेतील बांधकामांना परवानगी दिली जात नाही. शासन दरबारी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नदी किनारी महापालिकेने स्टिल्ट बांधकामाला परवानगी दिली आहे. परंतु, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या योजनेतून निळ्या पूररेषेतील बांधकामे वगळण्यात आल्याने नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी धक्का मानला जात आहे. सोबतच हेरिटेज वास्तू, खेळाची मैदाने यावरील बांधकामे अधिकृत करता येणार नसल्याने हा मोठा झटका मानला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images