Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बाइक मेंटेनन्स वर्कशॉपसाठी तरुणांची झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी, याविषयी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे शनिवारी १५ जुलै रोजी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक रोडवरील मोहरीर यामाहा शोरूममध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वर्कशॉप होणार आहे. हा कार्यक्रम कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे. वर्कशॉपमध्ये नोंदणी करण्यासाठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या वर्कशॉपसाठी मोजक्याच जागा शिल्लक असून, बाइकप्रेमींनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे करण्यात आले आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वांत जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. कधी गाडी स्लीप होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते. त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. हीच अडचण ओळखून ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी मोफत आहे, तर इतरांसाठी २०० रुपये आकारण्यात येणार आहेत. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

यामाहा बाइकसाठी ऑफर

तुमची यामाहा कंपनीची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लबचे सदस्य असाल, तर तुम्हाला नियमित बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता कीर्तनालाही अभ्यासाची चौकट

$
0
0

नाशिक : काव्य, संगीत, अभिनय व नृत्य या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या भक्तिरसपूर्ण कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. ही परंपरा आजच्या पिढीलाही ज्ञात व्हावी, तसेच भविष्याच्या दृष्टीनेही तिचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी कीर्तनाला आता वेगवेगळ्या संस्थांनी दूरस्थ अभ्यासक्रमाच्या चौकटीत समाविष्ट केले आहे. नाशिकमध्ये अखिल भारतीय कीर्तन संस्था, मुंबई यांच्याकडून तीन वर्षांचा दूरस्थ अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येत आहे. आळंदीत कीर्तनाचे शिक्षण देणाऱ्या कीर्तनशाळा, वर्गांची संख्या मोठी असून, आता राज्यभर असे अभ्यासक्रम सुरू करण्याला प्राधान्य मिळत असल्याचे यानिमित्त दिसून येत आहे.

पूर्वी कीर्तनाचे एका तपस्येप्रमाणे त्यातील बारकावे जाणून घेत अध्ययन केले जात. बदलत्या काळात वेळेअभावी किंवा पूरक परिस्थितीअभावी इतके वर्ष यासाठी देणे शक्य नाही. असे असले तरी, प्राचीन काळापासून आज आधुनिक काळापर्यंत कीर्तन आपले वैशिष्ट्य टिकवून आहे. या कीर्तनाचा प्रचार आजच्या पिढीपर्यंत होण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


नाशिकमध्येही कीर्तनवर्ग

नाशिकमध्ये श्रीसंत निवृत्तीनाथ किर्तन महाविद्यालयाद्वारे कीर्तनाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, प्रतिसादाअभावी तसेच जागा, मान्यता अशा अनेक अडचणींमुळे हे महाविद्यालय बंद पडले. सद्यःस्थितीत अखिल भारतीय कीर्तन संस्था यांचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम नाशिकमध्ये सुरू होत आहे. याशिवाय श्रमिकनगर, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, सिन्नर अशा ठिकाणी कीर्तनाचे वर्ग आयोजित केले जातात.


नव्या पिढीवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्यात अध्यात्माची गोडी निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे अभ्यासक्रम उपयुक्त असतात.

- भाऊसाहेब गंभीरे, कीर्तनकार


एखाद्या व्यक्तीकडे बोलण्याचे चातुर्य असेल, त्याला चौकस ज्ञान असेल अशांना कीर्तनातील मुलभूत बाबी समजण्यासाठी हे अभ्यासक्रम पुरेसे आहेत. लोकांवर संस्कार करणे, नैतिक शिक्षण देण्यासारख्या बाबी यातून पूर्ण होतील.

- हभप डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर


कीर्तन ही शिकण्यापेक्षा आचाराची निष्ठापूर्वक अनुभवाची जाणीव आहे. आवड असणाऱ्यांसाठी असे छोटे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील. कीर्तनाचा प्रचार प्रसार आजच्या पिढीपर्यंत होण्यास मदत होईल.

- डॉ. यशवंत पाठक, संत साहित्याचे अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरे बापरे..रस्त्यातच उतरला करंट!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भूमिगत विद्युत तारांमुळे चक्क रस्त्यातच करंट उतरल्यामुळे सिडकोत एका गायीचा मृत्यू झाला. या गायीची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलेलाही शॉक लागला. भूमिगत तारांच्या निकृष्ट कामांमुळेच हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अनेक दिवसांपासून सिडकोतील विद्युत तारा भूमिगत करण्याची मागणी नागरिकांसह नगरसेवकांकडून वारंवार होत होती. मात्र, आता भूमिगत केलेल्या तारांमधून रस्त्यात साचलेल्या पाण्यात करंट उतरल्यामुळे नागरिकांचा जीवच धोक्यात आला आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे या ठिकाणी असलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तेथून जात असलेल्या एका गाईचा या पाण्याला स्पर्श झाला आणि ती जागीच मरण पावली. या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने स्थानिक नगरसेवक शाम साबळे यांना घटनास्थळी बोलाविले. नगरसेवक साबळे यांनी महानगरपालिका व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून याबाबत जाब विचारला. यावेळी मृत गायीचे पूजन करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या पायात चप्पल नसल्याने त्या महिलेलाही विजेचा धक्‍का लागला. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.


असून अडचण, नसून खोळंबा

सिडको परिसरात वीज वितरण कंपनीच्या असलेल्या विद्युत तारा घरांच्या वर अगदी जवळ असल्याने गच्चीवर या वायरींना स्पर्श होऊन अनेकजणांना जीव गमवावा लागला आहे. यावर उपाय म्हणून महावितरण व महानगरपालिका यांनी संयुक्‍तरित्या परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पवननगर येथील भाजी मार्केटच्या मागील बाजूकडील रस्त्यावरील विद्युत तारा भूमिगत करण्यात आल्या. मात्र, या तारा भूमिगत करताना त्या योग्य प्रकारे खड्डा खणून योग्य अंतरावर पुरण्यात न आल्याने बऱ्याचदा या तारा रस्त्यावरून दिसून येत होत्या. याचदरम्यान या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने हा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास नागरिकांना वाटला होता. मात्र, रस्ता करतानाही संबंधित ठेकेदाराने या गोष्टीकडे लक्ष न दिल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

महावितरण, मनपाचे दुर्लक्ष भोवले

काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या काही भागांमध्ये विद्युत पुरवठा येत असल्याचे नागरिकांनी महानगर पालिका व वीज वितरण कंपनीला कळविला होते. मात्र, या दोन्ही संस्थांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले. घटना घडलेल्या ठिकाणी भूमिगत केलेली वायर तुटलेली असून, तेथे डागडुजी म्हणून लोखंडी पाइप लावण्यात आला असल्याचेही नागरिकांनी सांगितले.



महानगरपालिका व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाविले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी एक तासानंतर घटनास्थळी आले. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वर्षभरापूर्वीच झालेल्या या कामामुळे नागरिकांचे प्राण जाणार असतील, तर संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

- शाम साबळे, नगरसेवक


तारा भूमिगत करताना वापरण्यात आलेली वायर योग्य दर्जाची नसल्याने हा प्रकार झाला आहे. यापूर्वीही रस्त्यात विद्युत पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या, मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.

- योगेश गांगुर्डे, नागरिक


वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यात अर्धवट खड्डा खणून या तारा भूमिगत केल्या आहेत. आज एका गायीचे प्राण गेले आहेत. लहान मुले किंवा सायंकाळची वर्दळ असती तर मोठी जीव‌ितहानी झाली असती.

- विक्रम जाधव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत वीजतारा ऐरणीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारा भूमिगत नसल्याने यापूर्वी अनेक अपघात होऊन बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यावर उपाय म्हणून या तारा भूमिगत करण्यावर नगरसेवकांसह नागरिकांनी भर दिला. मात्र, आता या भूमिगत केलेल्या तारासुद्धा प्राणघातक ठरू लागल्याचे गुरुवारी झालेल्या गायीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अधोरेखित झाले अाहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी धास्तावले असून, या कामाचा दर्जा का बघितला जात नाही, असा सवाल सिडकोवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

सिडकोने उभारलेल्या सहा योजनांमधील घरकुलांची रचना विचारात घेऊन असंख्य नागरिकांनी सिडकोकडून मिळालेल्या घरांच्या मागे-पुढे असलेल्या जागेत वाढीव बांधकाम सिडकोच्या परवानगीने केले आहे. या बांधकामांनंतर परिसरातून गेलेल्या विद्युत तारा या अक्षरशः घरांच्या गच्चीवर हातात येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या तारांचे स्थलांतर होणे आवश्यक झाले होते. मकरसंक्रांतीच्या काळात तर किमान दोन ते तीन जणांचे प्राण या तारांमुळे जात असल्याने मागील पाच वर्षांपासून सिडकोतील तारा भूमिगत करण्यासाठी प्रभागांमधील प्रत्येक स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेतला. सिडकोतील बऱ्याचशा प्रभागांमधील विद्युत तारा या नगरसेकवांनी भूमिगत करवून घेतल्या. मात्र, आता याच भूमिगत केलेल्या तारांमुळेच रस्त्यात विजेचा प्रवाह उतरून प्राणहानी होऊ शकते, असे आढळल्याने भूमिगत केलेल्या ताराही कितपत सुरक्षित आहेत याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यात अर्धवटप्रकारे खड्डा खणून या तारा भूमिगत केल्या आहेत. गुरुवारी एका गायीचे प्राण गेले असून, या ठिकाणी लहान मुले किंवा सायंकाळची वर्दळ असती, तर मोठी हानी होऊ शकली असती. या प्रकाराकडे महापालिका व वीज कंपनीने गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे.

-विक्रम जाधव, स्थानिक नागरिक

--

वीजतारा भूमिगत करताना वापरलेली वायर योग्य दर्जाची नसल्याने गुरुवारचा प्रकार झाला आहे. यापूर्वीही रस्त्यात विद्युत प्रवाह उतरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. महापालिका व वीज वितरण कंपनीच्या टोलवाटोलवीत नागरिकांच्या जिवाशीच खेळ सुरू आहे.

-योगेश गांगुर्डे, स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगअभावी पर्यटनास ब्रेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील वाहनतळ अपूर्ण पडत आहे. त्यामुळे हे वाहनतळ पूर्ण भरून शहरातील मुख्य रस्त्यावरही वाहने उभी केली जातात. शहरातील ठाराविक मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. तसेच परराज्यातून येणारे भाविक वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने केवळ त्र्यंबकच्या मंदिरात भेट देवून माघारी परततात. शहरातील इतर स्थळांना भेट देण्यासाठी ते टाळाटाळ करतात. त्यामुळे येथील पर्यटनावर त्यचा विपरीत परिणाम होत आहे. नगरपरिषदेने वाहनांच्या पार्किंगसाठी पुरशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

त्र्यंबक शहरापासून जव्हार रोडकडे वाहनतळ बनविण्यात आले आहे. मात्र हे वाहनतळ आता अपूर्ण पडत आहे. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही भाविक शहरातील रस्त्यावर वाहने पार्क करतात. अनेक भाविक वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मंदिर आणि तेथूनच परत फिरतात. वाहनातून उतरताच थेट दर्शनबारीत पोहचतात. परिणामी दर्शनास गर्दी होते. तीन चार तास रांगेत उभे राहून थकल्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील अन्य महत्त्वपूर्ण स्थळांना भेटी न देताच ते माघारी परततात.

भाविक, प्रवाशी वाहनतळाच्या जवळ बसूनच जेवण करतात. त्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. हागणदारी मुक्त शहराचा गाजावाजा करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाने वाहनतळाच्या बाजूचा रस्त्याला भेट द्यावी, अशी खोचक टीका नागरिकांनी केली आहे. मूळ पार्किंगच्या ठिकाणी जागा नसल्यामुळे शहरात होत असलेल्या अवैध पार्किंगचा रहिवाशांनाही सतत त्रास होत असतो. नगरपालिका शहराच्या प्रवेशद्वारजवळ प्रवेश फी म्हणून पैसे घेते. मात्र शहरात या वाहनांना कसे आणि कुठे उभे करायचे याबाबत हात झटकण्यात येतात अशी टीका येथे येणारे पर्यटक आ‌ाणि रहिवासी करीत आहेत.

एकाच रस्त्यावर व्यवसाय तेजीत

वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मंदिर या रस्त्यावर सर्व गर्दी एकवटते. केवळ याच परिसरात व्यवसायाला तेजी असते. शहरात इतरत्र कायम शुकशुकाट असतो. व्यवसायाच्या स्पर्धेत जेथे गर्दी तेथे दुकानांचे भाडेही इतर भागापेक्षा अधिक आह. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची समस्या वाढली आहे. संत निवृत्त‌िनाथ मंदिर यात्रा पटांगण वाहने उभी करण्यासाठी वापरल्यास गर्दी विखुरली जाऊ शकते. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी याबाबत दखल घ्यावी आणि वाहनतळाचे सुयोग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

येथे होऊ शकते पार्किंग

नगरपालिका,पोल‌िसांनी वाहने उभी करण्यासाठी निवृत्त‌िनाथ मंदिर परिसरात, अल्पबचत भवन पटांगण, भूमीअभिलेख कार्यालयाजवळ असलेली मोकळी जागा तसेच तलाठी कार्यालया समोरील जागा आदी परिसरात प्रायोग‌िक तत्त्वावर वाहने उभी केल्यास सामस्या सुटू शकते.

तीन कोटी पाण्यात

सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वर येथे वाहनतळ उभारण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र अवघ्या दीड वर्षांत या वाहनतळाची दूरवस्था झाली आहे. येथे पाण्याचा निचरा करण्यासाठी तयार केलेल्या गटारींवर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी अनेक ठिकाणी उखडली आहे. यामुळे काही प्रवाशांना जखमा होतात. तर काहींच्या वाहनांचेही नुकसान होते. तसेच या जाळींखाली अन्नपदार्थांसह कचरा साठल्याने दुर्गंधी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोकनगरला डेंग्यूचे दहा रुग्ण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेकडून वारंवार स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत असूनदेखील अशोकनगरला पुन्हा डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. एकाच आठवड्यात किमान दहा जणांना डेंग्यू झाल्याने महापालिकेच्या मलेरिया व आरोग्य विभागाकडून फवारणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

जाधव संकुल, राज्य कर्मचारी वसाहत, निलकंठेश्वरनगर आदी भागात डेंग्यूची लागण झाली आहे. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता मोहीम काही भागांतच राबविण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. डेंग्यू सदृश आजाराच्या साथीने रहिवाशी भयभीत झाले आहेत. महापालिकेने पुन्हा मलेरिया विभागाकडून औषध फवारणी करावी अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.


जाधव संकुल भागात अनेक मोकळे भूखंड आहेत. त्याठिकाणी सर्रासपणे कचरा टाकण्यात येतो. तसेच उघड्यावर नारळाच्या करवंट्या टाकण्यात येतात. त्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. पावसाळी गटारींच्या साचलेल्या ढाप्यांमध्येही डास तयार होतात. महापालिकेने संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे.

- सुभाष गुंबाडे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोध पर्यायाचा...

$
0
0

ठळक सांस्कृतिक घडामोडींचे ठिकाण म्हणजे शहरातील नाट्यगृहे. ही नाट्यगृहे व्यवस्थित असतील, तर कला, संस्कृतीला बहर येईल, अन्यथा ती कोमेजून जाण्याची शक्यता अधिक असते. सध्या नाशिकमधील दोन मोठी नाट्यगृहे डागडुजीच्या प्रक्रियेत आहेत. खरेतर अनेक वर्षांपासून अशा डागडुजीची गरज होती. १५ जुलैपासून महाकवी कालिदास कलामंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील इतर नाट्यगृहांकडे रसिक, प्रेक्षकांनी मोर्चा वळविला आहे. बुकिंग करणाऱ्या संस्थाही इतर पर्याय शोधत आहेत. कालिदासला पर्याय परशुराम साईखेडकर नाट्यगृह आहे. मात्र, त्याचेही काम सुरू होत असल्याने कालिदासला पर्याय असणाऱ्या नाट्यगृह व हॉल्सचा घेतलेला हा धांडोळा...

--

नाशिक हा आधुनिक महाराष्ट्राच्या सुवर्णत्रिकोणातला एक कोन. प्राचीन काळापासून महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या या शहराने साधारणपणे तीन दशकांपूर्वी विकासाची कास धरली अन् पाहता पाहता ते मुंबई-पुण्याच्या पंगतीत जाऊन बसले. अर्थात, नाशिक महानगराची वाटचाल विकासाच्या महामार्गावरून समर्थपणे सुरू असल्याचा जो बोलबाला आज सर्वत्र आहे, त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा वाटाही मोठा आहे. नाशिकने १९७० च्या दशकात विकासाच्या मार्गावरून वाटचाल सुरू केली आणि त्याला शहरी तोंडवळा प्राप्त होऊ लागला. यात बऱ्याच अंशी सांस्कृतिक परंपरेचा वाटा आहे. नाशिकमधील कोणताही मोठा पुरस्कार असो, कार्यक्रम असो प्रथम नाट्यगृहांची आठवण येते. जनस्थान, गोदागौरव यांसारखे मोठे पुरस्कार सोहळे, बॉलिवूडमधील कोणत्याही मोठ्या संगीतकाराची मैफल, मराठीतील नाटके, राज्यनाट्य स्पर्धा असे एक ना दोन कितीतरी कार्यक्रम या नाट्यगृहांमध्ये होतात. या नाट्यगृहांत स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून तर आताच्या अनेक दिग्गज नेते, अभिनेत्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यामुळे ही नाट्यगृहे जणू शहराचा सांस्कृतिक वारसाच बनली आहेत.

--

कालिदास : मागे वळून पाहताना…

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू म्हणून महाकवी कालिदास कलामंदिर या नाट्यगृहाची ओळख आहे. नगरपालिका असताना शहराचा वाढता विस्तार पाहता तत्कालीन प्रशासक रत्नाकर कुलकर्णी यांच्या पुढाकाराने महाकवी कालिदास कलामंदिर ३० मार्च १९८७ रोजी उभारण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या उपस्थितीत या दिमाखदार वास्तूचा उद्घाटन सोहळा पार पडला. शहराचे मध्यवर्ती ठिकाण, भव्य तीन मजली वास्तू आणि पार्किंगसाठी प्रशस्त जागा या वैशिष्ट्यांमुळे अल्पावधीतच आयोजकांची या नाट्यमंदिराला पसंती मिळू लागली. मुंबई, पुण्याच्या नाट्यगृहांशी बरोबरी करू शकेल, अशी कलामंदिराची क्षमता असल्याची पावती मिळू लागली. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच कुठलाही पुरस्कार सोहळा असो, राजकीय कार्यक्रम अथवा चर्चासत्र असो, सर्वांना ‘कालिदास’चा आधार वाटू लागला. कलामंदिराची आसनक्षमता ११२० असून, त्यातील काही जागा निमंत्रितांसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कलामंदिराचे भाडे कार्यक्रमानुसार आकारण्यात येऊन किमान तीन हजार, तर जास्तीत जास्त सहा हजार रुपये असे दर आहेत. चार सत्रांत नाट्यमंदिराचे काम चालते. आयोजकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन प्रत्येक कलावंतांसाठी मेकअप रूम, गेस्ट रूम, कलाकारांच्या आरामासाठी विशेष कक्ष, याशिवाय लहान मुलांमुळे कार्यक्रमाचा रसभंग होऊ नये यासाठी बालकक्षाचीही सुविधा येथे आहे.

---

वर्षभर राहणार बंद…

महाकवी काल‌िदास कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी प्रशासनाने येत्या १५ जुलैपासून या नाट्यगृहाचे बुकिंग बंद केले आहे. सुमारे वर्षभर नाट्यगृह बंद राहणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर नाट्यगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर नाट्यगृह आणि नाशिकरोडचे महात्मा गांधी नाट्यगृह या पाच नाट्यगृहांच्या जोरावर सध्या नाशिकची सांस्कृतिक परंपरा वृद्धिंगत होत आहे. या नाट्यगृहांच्या समस्याही आहेत. परंतु, किमान त्यांच्या असण्याने शहरातील मनोरंजन टिकून आहे. नाट्यगृहे व सांस्कृतिक सभागृह कक्षांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिर, दादासाहेब फाळके स्मारक, दादासाहेब गायकवाड सभागृह, तसेच तारांगण याचे काम देण्यात आले आहे. कक्षाची नियमावली तयार करण्यात आली असून, या सभागृहांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरूप देणे बंधनकारक करण्यात आले आहे. फाळके स्मारकासाठी आणखी दोन लिपिक देण्यात आले असून, हे स्मारक व दादासाहेब गायकवाड सभागृहाकडे दुरुस्तीसाठी लवकरच महापालिका मोर्चा वळविणार आहे.

---

हे आहेत प्रमुख पर्याय…

शंकराचार्य संकुल, गंगापूररोड

विश्वास लॉन्स, सावरकरनगर

हिरा हॉल, हॉटेल एमराल्ड पार्क, त्र्यंबकरोड

आयएमए सभागृह, शालिमार

महात्मा फुले कलादालन, शालिमार

ज्योतिकलश सभागृह, राका कॉलनी

रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूररोड

अण्णासाहेब मुरकुटे सभागृह, गंगापूररोड

डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूररोड

जि. प. स्टेडियम कॉम्प्लेक्स, गंगापूररोड

कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड

पंचवटी वाचनालय सभागृह, पंचवटी

राजे छत्रपती संभाजी स्टेडियम, सिडको

---

नाट्यगृहे व सभागृहांचे फोन नंबर

कालिदास कलामंदिर (शालिमार) २५०२९३०

प. सा. नाट्यगृह (नेहरू उद्यानासमोर) २५८०७९०

पं. पलुस्कर सभागृह (पंचवटी) २५११५७४

दादासाहेब गायकवाड सभागृह (भाभानगर) २५०२९३०

आयएमए हॉल (शालिमार) २५०२७८७

निवेक (सातपूर) २३५०९७७

निमा हॉल (सातपूर) २३५३८७७

कुसुमाग्रज स्मारक (गंगापूररोड) २५७६१२४

शंकराचार्य संकुल (गंगापूररोड) २२३२०६२

रावसाहेब थोरात सभागृह (गंगापूररोड) २५७४५११

---

नाट्यगृहांची सद्यःस्थिती

--

महाकवी कालिदास कलामंदिर

ठिकाण : शालिमार

ताबा : नाशिक महापालिका

क्षमता : ११००

राखीव : २० सीट

सत्र : ४

वेळ : सकाळी ७.३० ते ११.३०, दुपारी १२ ते ४,

दुपारी ४.३० ते ८.३०, ९ ते ११.३०

डिपॉझिट : एका सत्रासाठी ५ हजार रुपये

भाडे : कार्यक्रमानुसार

(कालिदासची माहिती तुलनेसाठी दिली आहे.)

--

दादासाहेब गायकवाड सभागृह

ठिकाण : भाभानगर

ताबा : नाशिक महापालिका

क्षमता : २७५१

रिझर्व : २० सीट

सत्र : २

वेळ : सकाळी १० ते ३, दुपारी ५ ते १०

डिपॉझिट : एका सत्रासाठी १० हजार रुपये

भाडे : कार्यक्रमानुसार

--

पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृह

ठिकाण : पंचवटी कारंजा

ताबा : नाशिक महापालिका

क्षमता : १८५

राखीव : २० सीट

सत्र : ४

वेळ : सकाळी ७.३० ते ११.३०, दुपारी १२ ते ४,

दुपारी ४.३० ते ८.३०, ९ ते ११.३०

डिपॉझिट : एका सत्रासाठी ५०० रुपये

भाडे : कार्यक्रमानुसार

---

परशुराम साईखेडकर नाट्यगृह

ठिकाण : टिळक पथ

ताबा : सार्वजनिक वाचनालय नाशिक

क्षमता : ७४०

राखीव : ५ सीट

सत्र : ४

वेळ : सकाळी ९ ते १२ , दुपारी १२ ते ३,

दुपारी ३ ते ६, ६ ते ९

डिपॉझिट : एका सत्रासाठी ३ हजार रुपये

भाडे : कार्यक्रमानुसार

--

महात्मा गांधी सभागृह

ठिकाण : नाशिकरोड

ताबा : महापालिका

स्थिती : नाटकांसाठी बंद

--

शंकराचार्य संकुल

ठिकाण : गंगापूररोड

ताबा : शंकराचार्य न्यास

क्षमता : ४५०

सत्र : २

वेळ : अर्धा दिवस, पूर्ण दिवस

भाडे : अर्धा दिवसासाठी ‘जीएसटी’धरून ७०८०, पूर्ण दिवसासाठी १२,९८०

--

रावसाहेब थोरात सभागृह

ताबा : मविप्र संस्था

ठिकाण : गंगापूररोड

क्षमता : ७५०

सत्र : ३

वेळ : ३ तास

भाडे : तीन तासांसाठी १५ हजार, पूर्ण दिवसासाठी ३० हजार

-----------------------

मोठी नाटके आणू शकणार का?

कालिदास कलामंदिराला दादासाहेब गायकवाड सभागृह, परशुराम साईखेडकर नाट्यगृह, विश्वास लॉन्सवरील सभागृह ही सभागृहे पर्यायस्वरूप असल्याने वेळप्रसंगी तेथे नाटक करता येईल. परंतु, आम्ही सध्या अडकलोय ते जीएसटीमध्ये. २५० रुपये तिकीट लावून आम्ही मोठी नाटके आणू शकणार का, याचा विचार सुरू आहे. गायकवाड सभागृहात १२ ऑगस्टला एका हिंदी नाटकाचा शो लावण्याचा आमचा विचार आहे. २० जुलैलादेखील तेथे एक सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. हे यशस्वी झाल्यास पुढे विचार केला जाईल. १५ जुलैनंतर कालिदास बंद होत आहे. त्या तारखेला आमचाच शेवटचा शो आहे. एक शून्य तीन नावाचे नाटक तेथील शेवटचे नाटक ठरणार आहे. त्यानंतर पडदा उघडेल तो नव्या का‌लिदासमध्येच!

-जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक

---

पर्यायांचा होणार विचार

कालिदासला अनेक पर्याय आहेत. परशुराम साईखेडकर नाट्यगृह आहे. तेथे नाटक करू शकतो किंवा विश्वास लॉन्सवरील सभागृहासाठीही बोलणे सुरू आहे. काही लाखांत खर्च करून ते सभागृह तयार करण्यात येत आहे. ‘पसा’ला साऊंड व लाइटची अडचण आहे, तेथे प्रॉपर माणूस असेल, तर सारे काही शक्य आहे.

-राजेंद्र जाधव, नाट्य व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशांना आज दुपारपर्यंत मुदतवाढ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावीच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेने यंदा विनागोंधळ प्रक्रियेचे उद्दिष्ट बहुतांश पार पाडले असले तरीही अनेक स्कॉलर विद्यार्थ्यांना विनाअनुदानित जागांवर प्रवेश देण्याच्या धोरणाविरोधात पालक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनुदानित कॉलेजच्या अपेक्षेने काही पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द करून पुढील फेऱ्यांची वाट पाहणेच पसंत केले आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पूर्ण होणाऱ्या फेरीतील पहिल्या फेरीतील प्रवेशप्रक्रियेची मुदत आज (१४ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मंगळवारपासून पहिल्या गुणवत्तायादीतील अकरावीच्या प्रवेशांना सुरुवात झाली. बुधवारी एकूण १४,९६५ प्रवेशांपैकी सुमारे साडेदहा हजार प्रवेश पूर्ण झाले होते. गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत या संख्येपैकी सुमारे १४,८३२ प्रवेशांचा टप्पा पूर्ण झाला. पैकी ७,४७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होते, तर उर्वरित ७,४५४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश्चितीवर औपचारिक शिक्कामोर्तब बाकी होते. १५ ते १८ जुलै या वेळेत रविवार वगळता विद्यार्थ्यांना पसंतिक्रम भरावा लागणार असून, ज्यांनी अर्ज भरला नसेल अशा विद्यार्थ्यांना अर्जाचे दोन्हीही भाग भरावे लागतील. यानंतर २० जुलै रोजी दुसरी मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे.

अर्ज भरण्यात तांत्रिक अडथळे

प्रवेशांसाठी गुरुवारी कॅम्पसमध्ये तुरळक गर्दी होती. विद्यार्थ्यांनी बुधवारीच विशेष गर्दी केल्याने गुरुवारी व्यवस्थेवर जास्त तणाव राहिला नाही. मात्र, या प्रवेशाची वेबसाइट धीम्या गतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास उशीर लागत होता.

नॉन ग्रँट आम्हालाही सांगा

पहिल्या गुणवत्ता यादीत रँकिंगमधील कॉलेजांचे मेरिट नव्वदीपार गेले आहे. या गुणवत्तेपर्यंत पोहोचणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतिक्रमातील कॉलेज मिळाले. मात्र, तेथे त्यांना नॉन ग्रँट जागा मिळाली. ही प्रक्रिया पारदर्शक असल्याबाबतचा दावा शिक्षण विभाग करत असला तरीही याबाबतची माहिती पालकांनाही मिळायला हवी, अशी मागणी पालकांच्या वतीने करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायरा बनल्या ‘त्यांचा’ आधार

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

मनमाडच्या अन्न धान्य महामंडळात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरीस असलेल्या सायरा कय्युम शेख या सर्वसामान्य महिलेने निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून चांदवड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एक लाख रुपये खर्च करून गरीब मुलीचे लग्न लावून दिले. एका सामान्य महिलेने स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्तपणे दाखवलेले औदार्य मनमाड शहर परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. मदतीची आवश्यकता आहे त्यांना सहानुभूतीचे शब्द नको तर प्रत्यक्ष कृतीतूनच मदत करायला हवी, असा संदेश सायरा शेख यांनी दिला आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील सायरा शेख यांच्या पतीचे निधन झाले असून, त्यांना एक विवाहित कन्या आहे. पतीचे निधन झाल्यामुळे शेख या त्यांच्या जागेवर अन्न धान्य मंडळात नोकरीला हेत्या. अनेक कष्टाची कामे करत कोणत्याही कामाची लाज न बाळगता त्यांनी नोकरी केली. काही दिवसांपूर्वीच त्या निवृत्त झाल्या. त्यांनी मंडळाकडून मिळालेल्या निवृत्तीच्या रक्कमेतून इतरांना मदतीचा हात देत सामाजिक भान जपले.

चांदवड येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी कळताच त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत केली. तसेच आपल्या घराजवळ राहणाऱ्या गरीब गवंड्याच्या मुलीचे लग्न लावून दिले. लग्नाचा सर्व खर्च सायरा यांनी केल्यामुळे त्यामुलीसह तिच्या गरीब पित्याच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली. स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगण्याचा मंत्र देणाऱ्या सायरा शेख यांचे कार्य समाजासाठी नक्कीच आदर्शवत आहे. मनमाड बचाव समितीने शेख यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला. या सत्कार सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपजिल्हा रुग्णालयाची भिंत खचलेलीच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाची संरक्षण भिंत कोसळून दोन वर्ष उलटले मात्र अजूनही या भिंतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेवारस जनावरे, भटक‌ी कुत्री सर्रासपणे ‌रुग्णालयाच्या आवारात भटकत असतात. ही भिंत तत्काळ उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निफाड उपजिल्हा रुग्णालय हे शहराच्या बाहेर नांदुर्डी रस्त्यावर आहे. रुग्णालयाच्या पश्चिम बाजूला शवविच्छेदन कक्ष आहे. या शवविच्छेदन कक्षाजवळील संरक्षण भिंत दोन वर्षांपासून पडलेली आहे. ही भिंत पडल्यामुळे शवविच्छेदन कक्षाची सुरक्षा धोक्यात आली आहे. येथे जर रात्री मृतदेह ठेवले तर त्यांची सुरक्षा कशी राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरात स्मशानभूमी आहे. जवळूनच विणता नदी वाहते. शिवाय कुत्री आणि डुकरांचाही मुक्त संचार असतो. त्यामुळे मृतदेहाची विटंबना किंवा मृतदेह बाहेर घेऊन जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. भिंत पडून दोन वर्ष उलटली तरीआरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे.

या भिंतीबाबतचा अहवाल आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविला आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने या काम रखडले आहे.

- डॉ. एस. आर. राठोड,
वैद्यकीय अधीक्षक, निफाड रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट नाशिकला बॅनरबाजीचे ग्रहण

$
0
0

वैभव देशमुख, मटा सिटिझन रिपोर्टर

भारतातील स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी योजनेत तिसऱ्या यादीत नाशिकने स्थान मिळविले हे खरे; परंतु, त्यासाठी नाशिक शहर या योजनेच्या निकषांमधेे तंतोतंत किंवा त्यांच्या जवळपास तरी पोहोचेल का हा प्रश्न सद्यःस्थितीवरून पडतो. असा प्रश्न उपस्थित होण्यास सकारात्मक, तसेच भरपूर नकारार्थी कारणेही असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. यात महत्त्वपूर्ण म्हणजे शहरात दाखल होताच विविध चौक, बस स्टॉप, इमारती, गार्डन, शाळा, तसेच कॉलेजची प्रांगणे व इतर बऱ्याच ठिकाणी झळकणारे अवैध बॅनर, होर्डिंग्ज यामुळे सर्वत्र शहर विद्रूप करण्याचा ठेकाच कुणीतरी घेतल्याचे जाणवते. शहराचा विकास करण्याच्या नावाने भीक मागून निवडून आलेले शहरातील विविध राजकीय पक्षांतील काही लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्या समर्थकांकडून वाढदिवस, जनतेच्या पैशातून जनतेसाठी केलेल्या कामांच्या उद्घाटनाच्या नावाखाली चमकोगिरी करताना हे राजकीय नेते आपले मूळ उद्दिष्ट विसरून आपली पाठ थोपटण्यात धन्यता मानत आहेत, ही शोकांतिकाच ठरावी. लोकोपयोगी निधी नेमका प्रभाग, शहरविकासासाठी, की चमकोगिरी करणाऱ्या गुंडांना पोसण्यासाठी आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. ही बाब कमी की काय, म्हणून शहरभर वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीप्रसंगी, तसेच सांस्कृतिक उत्सवाच्या नावाखाली जबरदरस्ती पावत्या फाडून त्या पैशातही होर्डिंगबाजी केली जात आहे. त्यामुळे स्मार्ट नाशिकला जणू बॅनरबाजीचेच ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला दरातील तेजी कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यानंतर बुधवारी रात्री काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने गुरुवारी बाजारात चांगली आवक होईल अशी शक्यता होती. मात्र, पाऊस ठराविक भागातच झाल्यामुळे आवक रोजच्या प्रमाणेच राहिली. त्यातच मुंबई आणि गुजरात या परपेठेत मागणी असल्याने गुरुवारी दुपारच्या लिलावात फळभाज्यांची तेजी कायम होती.

पहाटे, सकाळी आणि दुपारीही शहर परिसरातील भाजीबाजारातील विक्रेते भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजार समितीच्या आवारात येत असतात. येथे कमी दरात खरेदी केला माल किरकोळ बाजारात जास्त दरात विकला जात असल्याने ग्राहकाला तो जास्त दरात खरेदी करावा लागतो.

लिलावातील गुरुवारचे दर

--

भाजीपाला- आवक (क्विंटलमध्ये) – दर (रुपये प्रतिकिलो)

टोमॅटो - २९५ – ३० ते ७०

वांगी – ११६ – ३० ते ४५

फ्लॉवर – २१७ – ३६ ते ६४

कोबी – ४३७ – ८३ ते १२५

ढोबळी मिरची – ९९ – ३३ ते ४५

दुधी भोपळा – ७ ते १०

कारले – ११६ – ३० ते ४१

दोडका – ९ – २५ ते ४५

गिलके – ७ – २७ ते ३०

भेंडी – १० – २८ ते ३३

काकडी – १९६- १७ ते ३०

---

पालेभाज्या – आवक जुडी - प्रतिजुडी दर

कोथिंबीर – ५० हजार – २० ते ६०

मेथी – १ हजार – १५ ते २७

शेपू – २७ – १७ ते ३५

कांदापात – १२ ते ३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विभागाने चढविला भ्रष्टाचाराचा कोट

$
0
0

नाशिक:

आदिवासी आश्रमशाळेतील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षी खरेदी केलेल्या रेनकोटच्या दरांमध्ये प्रतिनग तीनशे रुपयांची तफावत असल्याचे स्पष्ट होत आहे. नाशिकच्या कळवण या दुर्गम तालुक्यात एक रेनकोटचा १७९ रुपयांमध्ये पुरवठा झाला असताना नाशिक प्रकल्पात चक्क ४९७ रुपयांना पुरवठा करण्यात आला आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने आदिवासी विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कमी किमतीत चांगला पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला मात्र मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

पारदर्शक कारभाराचा ढोल वाजविणाऱ्या भाजपच्या सत्ताकाळात आदिवासींच्या विकासाला चालना मिळून भ्रष्टाचार थांबेल असे अपेक्षित होते. मात्र, आघाडीच्या काळातील भ्रष्टाचाराची मालिका सुखेनैव पुढे सुरूच आहे. गेल्या वर्षी आदिवासी विकास विभागाअंतर्गत ५४१ आश्रमशाळांमधील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना रेनकोटचा पुरवठा करण्यात आला. त्यासाठी प्रकल्पनिहाय निविदा मागविण्यात आल्या. राज्यस्तरीय स्पर्धा असली तरी ठेकेदारांचे रॅकेट असलेल्या या विभागात मुंबईतील एका ठेकेदाराने चक्क अव्वाच्या सव्वा दरात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचा पुरवठा केला. नाशिक, डहाणू, जव्हार, तळोदा, यावल या प्रकल्पांना पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोटच्या किमती अवाजवी आहेत. या प्रकल्पांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोटची किंमत ४८० ते ४९९ रुपयांपर्यंत आहे. मे. हुसैन ट्रेडर्स, मे. सुपर प्लास्टिक कॉर्पोरेशन, मेसर्स लकी प्लास्टिक मुंबई या कंपन्यांकडून हा पुरवठा करण्यात आला असून, त्यांची किंमत तीन कोटी ७२ लाख रुपये आहे.

एकीकडे या कंपन्यांनी ४८० ते ४९९ रुपयांमध्ये रेनकोटचा प्रतिनग दर दिला असताना दुर्गम भागातील कळवण प्रकल्पात नाशिकच्या के. के. कलेक्शन या कंपनीने मात्र पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १७९ रुपयांपर्यंतच्या दराने पुरवठा केला आहे. या ठिकाणीही निविदा मागवूनच काम झाले असून, त्यांचा पुरवठाही करण्यात आला आहे. कळवणमध्ये १९ हजार विद्यार्थ्यांना ३५ लाखात रेनकोटचा पुरवठा झाला असताना नाशिक प्रकल्पात १७ हजार विद्यार्थ्यांना ८५ लाख रुपयांमध्ये रेनकोट पुरवठा करण्यात आला आहे. राज्यभरातील २९ प्रकल्प कार्यालयांमधील पुरवठ्यात अशीच तफावत असून, यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे कमी दरात पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला अधिकारी व काही ठेकेदारांनीच त्रास दिला असून, पुरवठ्यासाठी त्याला चक्क कोर्टात जाऊन पुरवठा ऑर्डर घ्यावी लागली आहे. त्यामुळे ही खरेदी आता वादात सापडली आहे.

किमतीत तीनशेचा फरक

वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयांत रेनकोटच्या दरांमधील तीनशे रुपयांचा फरक संशयास्पद आहे. कळवणच्या आयएएस प्रकल्पाधिकारी डी. गंगाधरण यांनी पारदर्शीपणे खरेदीची प्रक्रिया राबवून प्रकल्पाला ५० लाखांचा फायदा करून दिला. मात्र, इतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी मात्र त्याच रेनकोटची खरेदी अव्वाच्या सव्वा दराने केली. त्यामुळे या रेनकोट खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात असून, त्याची सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डंपिंग ग्राउंड’पासून होईना पेलिकनची मुक्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पुण्याच्या एका कंपनीकडून सिडको भागात अबालवृद्धांच्या विरंगुळासाठी उभारलेले पेलिकन पार्क काही वर्षांपासून सर्वच सिडकोवासीयांची डोकेदुखी ठरत आहे. या पेलिकन पार्कमधील विविध खेळणी तर कधीच गायब झाल्या असून, या पार्कला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. यासंदर्भात ‘मटा’ने वर्षभरापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर काही सूत्रे हलली. मात्र, वर्षभरानंतरही या बहुचर्चित पार्कला आलेले डंपिंग ग्राउंडचे स्वरूप काही बदललेेले नाही.

सिडकोचे नेतृत्व सध्या सत्ताधारी भाजपच्या आमदार करीत असून, पेलिकन पार्कचा प्रश्न मार्गी लागल्याची घोषणा मागील महिन्यात सत्ताधारी आमदारांसह नगरसेवकांनी केली होती. मात्र, अजूनही पेलिकन पार्कच्या आवारात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याबाबत कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. सध्या पावसाळा सुरू असून, या ठिकाणी असलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे दिसत आहे.

सिडकोने नाशिक शहरात योजना उभारणीस सुरुवात केल्यानंतर मोरवाडीलगत सुमारे १७ एकरचा भूखंड पार्कसाठी राखीव ठेवला होता. हा भूखंड महापालिकेकडे विकसित करण्यासाठी हस्तांतर करण्यात आला. त्यानंतर महापालिकेने पुण्याच्या पुणे अॅम्युझमेंट पार्ककडून ही जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला. संबंधित कंपनीने या ठिकाणी पार्क उभारलासुद्धा. मात्र, हा पार्क काही काळच सुरू राहिला. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने एका वित्त संस्थेकडून कर्ज घेऊन ही जागाच गहाण ठेवली. मात्र, तरीही हा पार्क फार काळ सुरू राहिला नाही. अखेरीस हा पार्क बंद झाला. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने महापालिकेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यास सुरुवात केली. यामुळे वित्त संस्था, महापालिका व संबंधित ठेकेदार यांचा वाद थेट कोर्टात गेला. अनेक वर्षांपासून हा विषय न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाने या जागेसाठी जैसे थे असा आदेश दिला होता. त्यामुळे या जागेची देखभाल महापालिकेने करणे आवश्यक होते. मात्र, महापालिकेने या जागेकडे लक्ष न दिल्याने या ठिकाणी बसविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खेळणी एक-एक करून चोरीस जाऊ लागल्या. पार्कच्या संरक्षणासाठी लावलेले तारांचे कंपाउंडसुद्धा गायब झाले आणि या जागेवर कचराकुंडी तयार होण्यास सुरुवात झाली. महापालिकेची घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांनी याच खुल्या जागेत कचरा टाकण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला बकाल स्वरूप आलेले आहे.

आता तर ठिकठिकाणचे बांधकामाचे साहित्य, पाडलेल्या वास्तूंचे साहित्य सर्रासपणे येथे आणून टाकले जात आहे. त्यामुळे पेलिकन पार्कची पुढची जागा डंपिंग ग्राउंड होत आहे, तर पेलिकन पार्कचा कचरा डेपो होत आहे. महापालिका निवडणुकीनंतर स्थानिक नगरसेवक व आमदारांनी थेट मंत्रालयात बैठक घेऊन पेलिकन पार्कच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे दाखवून दिले होते. मात्र, प्रत्यक्षात आजही परिस्थिती जैसे थे असून, दिवसेंदिवस येथील कचऱ्याचे ढिगारे वाढत असल्याचे दिसत आहे. पेलिकनच्या जागेचा कायापालट होणे आता गरजेचे झाले आहे. या जागेतील अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी अनेक अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


किमान स्वच्छता तरी व्हावी

सिडकोतून नितीन भोसले हे मनसेचे आमदार असताना महापालिकेत मनसेचीच सत्ता होती व या प्रभागाचे नेतृत्वसुद्धा मनसेचे नगरसेवक करीत होते. मात्र, तरीही हा प्रश्न मार्गी लागला नाही. आताही भाजपचे आमदार आहेत व नगरसेवकही भाजपचेच आहेत. आताही पेलिकनचा विकास होणार असे दर्शविले जात असताना किमान येथील स्वच्छता तरी सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर्सचा पीएफ कार्यालयावर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सेवानिवृत्तांना अनेक अडीअडचणींना समोरे जावे लागत असल्याने गुरुवारी पेन्शनधारकांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर धडक मोर्चा काढत हल्लाबोल केला. पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने पेन्शनधारक मोर्चात सहभागी झाले असल्याने पोलिसांनाही मोर्चावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. क्षेत्र‌िय व्यवस्थापक एम. एस. अशरफ यांना निवेदन देत सरसकट साडेसहाहजार रुपये पेन्शन देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी केली. हजारोंच्या संख्येने आलेल्या पेन्शनधारकांमुळे पीएफ कार्यालय गजबजून गेले होते. यावेळी पेन्शनधारक, पोलिस, पीएफ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वादविवादही झडले.

भारतात पेन्शनधारकांच्या यादीत नाशिक विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. नाशिक विभागात एक लाख ३२ हजार पेन्शनधारक आहेत. त्यातच हयातीचा दाखला वेळेवर न दिल्यास पेन्शन बंद होण्याची टांगती तलवार असते. पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनने पीएफ कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी ११ वाजताच आयटीआय सिग्नलच्या बाजूला असलेल्या उद्योग भवनासमोर नाशिक विभागातून आलेल्या पेन्शनधारकांनी पीएफ कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी क्षेत्र‌िय प्रबंधक अशरफ यांना दिलेल्या निवेदनात सरसरट साडेसहा हजार रुपये पेन्शन द्यावी, यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे जिल्हा सचिव सुधाकर गुजराथी यांनी सांगितले.


या आहेत मागण्या

- सरसकट साडेसहा हजार पेन्शन द्यावे

- पेन्शनवर महागाई भत्ता मिळावा

- पेन्शनधारकांच्या फंडात सरकारने ८.३३ टक्के रक्कम भरावी

- पेन्शनर्सना दोन वर्ष वेटेजसचा लाभ मिळावा

- हायर सॅलरी- हायर पेन्शनची सुविधा द्यावी

- कमी पेन्शन असलेल्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा


वाहतूक खोळंबली

पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पेन्शनधारक मोर्चात सहभागी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही काळ रस्ता बंद झाल्याने वाहनचालकांना हाल सहन करावा लागले. यानंतर सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश सोनावणे, राजेश आखाडे यांसह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन करत पेन्शन धारकांना बाजूला केला. यानंतर एकाबाजूने वाहने सोडण्यात आली.


बँकांचा असहकार

ज्येष्ठांना बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप यावेळी ज्येष्ठांनी केला. अनेकदा पेन्शनधारकांना हवी असलेली माहिती दिली जात नसल्याचेही सांगितले. चेकबुक घेतल्यास पेन्शनधारकांच्या खात्यावर किमान पाच हजार रुपये जमा ठेवणे सक्तीचे करण्यात आल्याने अडचण होत असल्याचीही समस्या पेन्शनधारकांनी मांडली. त्यातच नव्याने आधार कार्ड लिंकिंग करताना बँकांकडून सहकार्यच केले जात नसल्याची कैफियतही ज्येष्ठांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशकात पावसाचा कहर; गोदावरीला पूर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

गुरूवारी रात्रीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने नाशिकला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाने नॉन स्टॉप बॅटींग सुरू ठेवल्याने गोदावरी नदीला पूर आला असून दुतोंड्या मारूतीच्या कमरेपर्यंत पाणी आल्याने नाशिकची दाणादाण उडाली आहे. याशिवाय दारणा आणि भाम नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने नाशिककर हवालदिल झाले आहेत.

काल रात्रीपासूनच नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नाशिकमधील सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. इतकंच नाही तर शहरातील गटारी आणि नाल्यांचे पाणीही थेट नदीपात्रात मिसळत आहे. पूरपरिस्थिती उद्भवल्याने स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. रामकुंड आणि नदीकिनारी पाण्याची दुर्गंधी वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

देवळाली कॅम्पसह ग्रामीण भागात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. तर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नाशिकरोडलाही रात्रीपासून संततधार सुरू होती. सकाळी अधूनमधून या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. दिंडोरी तालुक्यात रात्रीपासून पावसाने जोर धरला. तालुक्यात पावसाअभावी खरीप व भाजीपाल्याचे पिके संकटात सापडली होती. त्यांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. त्यामुळे टोमॅटोची लागवड आता जोर धरणार आहे.

उद्या मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे दोन दिवस नदी आणि नाल्याच्या परिसरात फिरकू नये, असं आवाहन या विभागाने केलं आहे.

असा झाला दिवसभरात पाऊस

> नाशिकमध्ये ४८.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली

> इगतपुरी येथे १९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली

> पेठमध्ये ८३ मिमी तर त्र्यंबकमध्ये १२५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली

> सुरगणा येथे १११ मिमी तर कळवण येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रमंतीसाठी गेलेले विद्यार्थी घरी परतले

$
0
0

दिंडोरी : दिंडोरीच्या एका शाळेतील नववीच्या वर्गातील चार विद्यार्थी शाळा व क्लासला जातो असे सांगून गुरुवारी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती. मात्र, ही मुले स्वत:हून सुखरूप रात्री उशिरा घरी परतल्याने पालकांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला. ते चौघे शाळेला दांडी मारून सापुतारा फिरण्यासाठी गेले होते.

दीपक कडाळे, कुलदीप देशमुख, जीवन बल्हाळ, अमोल चौधरी अशी बेपत्ता झालेल्या चौघा विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांच्यापैकी अमोल आणि कुलदीप हे दोघेजण दिंडोरी येथील खासगी क्लासमध्ये गेले होते. क्लास संपल्यानंतर शाळेत न जाता दिंडोरी बसस्टँडवर आले. त्यांना तेथे दीपक आणि जीवन हे दोघे भेटले. वणी येथे फिरायला जायचे आणि शाळा सुटेपर्यंत घरी परतायचे असे त्यांचे ठरले होते. बसने वणी येथे आल्यानंतर त्यांनी सापुतारा येथे जाण्याचे ठरविले. सापुतारामध्ये फिरल्यानंतर त्यांनी दीपक कडाळेचा नातेवाईक काम करीत असलेल्या ढाब्यावर जायचे ठरविले. पण त्यांना तो ढाबा सापडला नाही. त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. सापुतारा येथील बसस्टँडवरून गुजरात डेपोच्या नाशिक बसने ते रात्री १२ वाजेच्या सुमारास दिंडोरी येथे पोचले.

पाऊस सुरू असल्याने ते दिंडोरी बस स्टँडवर थांबले. घरी गेल्यावर पालक मारतील या भीतीने ते घरी जाण्यास तयार नव्हते. पण तळेगाव येथील अमोल चौधरी खासगी गाडीने रात्री साडेबारा वाजता घरी पोचला. पालक त्याची वाट पाहत होते. अमोलचे वडील सुदाम चौधरी यांनी अमोल घरी आल्याचे पोलिसांना फोन करून कळविले. अन्य तिघांचा पोलिसांनी शोध घेतला. अमोलने ते तिघे दिंडोरी बसस्टँडवर असल्याचे सांगितले. पोलिसांच्या मदतीने अखेर सकाळी सहा वाजता सर्व विद्यार्थी आपआपल्या घरी पोहचले. यासाठी दिंडोरीचे निरीक्षक मधुकर गावित, उपनिरीक्षक पी. यू. पाटील, सहायक डी. एन. आव्हाड, एन. आर. वाघ, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृउबा सभापतींची २० जुलै रोजी निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणल्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी येत्या २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात येणार आहे. या सभेत सभापती आणि उपसभापती यांची निवड करण्यात येईल. पत्रात निवडणुकीचा कार्यक्रमही देण्यात आला आहे.

बाजार समितीच्या १३ संचालकांनी सभापती पिंगळे यांच्या विरोधात अविश्वासाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यामुळे या ठरावाला मंजुरी मिळविण्यासाठी बाजार समितीच्या संचालकांची सभा चार जुलै रोजी बोलवली होती. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पिंगळे यांच्या विरोधात १५ संचालकांनी मत दिल्याने त्यांच्यावर विश्वासाचा ठराव बहुमताने मंजूर झाला.

या रिक्त पदासाठी सभा बोलावण्यात येणार असल्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी संचालकांना पाठविले आहेत. अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे शिवाजीराव चुंभळे हे सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांपैकी १५ जिंकून पिंगळे यांच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळविले होते. चुंभळे यांच्या पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. अविश्वास ठरावात पिंगळे पॅनलच्याच संचालकांनी चुंभळे यांना पाठबळ दिले. त्यामुळे चुंभळे यांचे आता बळ वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्याची आवक घटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक शुक्रवारी दुपारी लिलावाच्या वेळी घटली. मात्र, मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची मागणी कमी झाली. परिणामी गुरुवारच्या (दि. १३) तुलनेत भाजीपाल्याच्या भावात घसरण झाली.

पहाटेच्या किरकोळ विक्रीच्या बाजारासाठी गुरुवारी काढण्यात आलेला शेतमाल आला असल्याने त्यावेळची आवक बऱ्या प्रमाणात होते. दुपारी लिलावासाठी शेतातून सकाळी भाजीपाला काढून आणण्यात येतो. मात्र, रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाल्याची काढणी करणेच शक्य झाले नाही. परिणामी भाजीपाल्याची आवक प्रचंड घटली. आवक कमी असली तरी ज्या भागात भाजीपाला पाठवायचा त्या भागातही जोरदार पाऊस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जास्त प्रमाणात भाजीपाल्याची खरेदी केली नसल्याने गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी दरात घसरणच झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेला हॅट्स ऑफ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘प्रतीक्षा, मी परिस्थितीने गांजलेली आहे, शारीरिक व्याधींनीही त्रस्त आहे. या सर्वांतून डोके वर काढून पाहताना मला मोकळा श्वास घेण्याची फार उर्मी दाटते. ‘मटा’ नेहमी वाचते; त्यात हेल्पलाइनविषयी वाचले. तुम्हाला मदत करून मोकळा श्वास घेता येईल असे वाटले, तुम्हा सर्वांच्या गरिबीची गाथा वाचली. फारच वाईट पण तुमची शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र हॅटस ऑफच’ या भावना आहेत निवृत्त शिक्षिका लीला भोसले यांच्या.

‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहेच त्यातच एका ‌आजींचे आलेले हे सुंदर शब्दचित्र. शारीरिक व्याधींनी अत्यंत त्रस्त झालेल्या या आजींना असलेल्या वाचनाच्या आवडीतून त्यांनी ‘मटा’ वाचायला घेतला आणि त्यांना हेल्पलाइनची माहिती मिळाली. त्यातून त्यांना प्रतीक्षा गायकवाडची कथा अधिक भावली. कारण त्यांनाही तिच्याएवढीच नात आहे; नातीच्या सोबतीने त्यांचा काळ अत्यंत मजेत जातो. असे असताना आपल्या नातीच्या वयाचीच एक मुलगी शिक्षणासाठी असा संघर्ष करतेय हे त्यांच्या ठळकपणे लक्षात आले. त्यांनी तिच्यासाठी आर्थिक मदत तर दिलीच; परंतु या शब्द ओल्या भावनाही पाठवल्या आहेत. त्या म्हणतात, ‘मटा हेल्पलाइन म्हणजे पवित्र गोदामातेचा प्रवाह आहे. या प्रवाहात आपलाही एक थेंब असावा, या भावनेतून प्रत्येकाने मदत केली आहे. माझी पेन्शन आजारातच खर्च होत असून अनेक आजारांना व उपचारांना सामोरे जाताना मी त्रासलेय; परंतु मदतीच्या या हाकेला ओ देऊन मी स्वत:चेच समाधान करीत आहे. मला त्यामुळे पराकोटीचा आनंद होतोय.’

आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या परंतु सरस्वतीचा वरदहस्त डोक्यावर असलेल्या गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव या दहाजणांपर्यंत हे दान पोहोचविण्यासाठी ‘मटा’ कटिबध्द आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी दान जमावे, यासाठी हे आवाहन करण्यात येत आहे. त्यांची पुढील वाट सुकर व्हावी, म्हणून नाशिककरांनी सढळ हाताने मदत करावी.

दानशूरांना हाक

‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमांतर्गत दानशूर नाशिककरांना हाक देण्यात आली. अत्यंत दानवंत हात लाभल्याने या दानपात्राला चांगले वजनही येत आहे. धनादेश स्वीकारत या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाचा मार्ग ‘मटा’ने बऱ्याच अंशी सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी ‘मटा’ला शहरातील अनेक प्रसिध्द ठिकाणहून हेल्पबॉक्स ठेवण्याची विनंती करण्यात आली. परंतु, ‘मटा’ने काही ठिकाणे निवडत तेथे बॉक्स ठेवले व आर्थिक मदत गोळा केली.

शिवगिरी हास्यक्लबच्या शुभेच्छा

शिवगिरी हास्य क्लबच्या वतीने या विद्यार्थ्यांना करण्यात आलेली मदत वाखाणण्यासारखी आहे. विशेष म्हणजे त्यांनी ज्या पाकिटात मदत दिली आहे, ते उल्लेखनीय आहे. पांढऱ्या कोऱ्या पाकिटावर सुंदर फुले चितारण्यात आली आहे. त्याला डिझाइन करण्यात आलेले असून सुंदर टिकल्या चिकटवण्यात आल्या आहे. हाताने तयार केलेल्या पाकिटात थरथरत्या हाताने तयार केलेले चेक पाहताना या दहा विद्यार्थ्यांना मिळालेला आशीर्वाद लक्षात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images