Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिग्नल होणार का डिजिटल..?

$
0
0

रोज आपण काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडतो. प्रत्येकाचा सिग्नलसोबत संबंध येतो. तो आपणास थोडा वेळ थांबायला सांगतो. मात्र, काही नागरिक त्याचे ऐकत नाही, तर काही खूप कटाक्षाने नियम पाळतात. जे नागरिक सिग्नल तोडतात त्यांना शोधणे थोडे कठीण आहे. म्हणून सिग्नल डिजिटल करणे काळाची गरज आहे. प्रत्येक सिग्नलवर उत्तम प्रतीचा कॅमेरा बसवायला हवा, जेणेकरून सिग्नल जम्प करणारा, तसेच हेल्मेट न वापरणारा दिसेल. गाडीचा नंबर दिसायला हवा यासाठी एक संगणक कक्ष असावा, जो पूर्ण शहराच्या रहदारीवर लक्ष ठेवू शकेल. मग त्यांना आरटीओच्या साह्याने शोधून त्यांचाकडून दंड घेतला पाहिजे.

- सुरेश शेखरे

महावितरणकडून ग्राहकांची फसवणूक

मी नाशिकरोड येथील ड्रीम फ्लॉवर सोसायटीत भाड्याने राहत असलेल्या घरी मेमध्ये आलेल्या बिलामध्ये मागील व चालू रीडिंग सारखे ११६५८ असून, एकूण वीजवापर १२९ युनिट्स दाखविण्यात आले व त्याप्रमाणे बिल आकारण्यात आले. जून महिन्यात आलेल्या बिलामध्ये पुन्हा मागील रीडिंग ११६५८ व चालू रीडिंग १९८८२ दाखवून एकूण २२४ युनिट्सप्रमाणे बिल आकारण्यात आले. १०९ युनिट्स जास्तीचे लागले व त्यामुळे स्लॅब बदलून दरही वाढला. अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे.

- विनोद तिलगुळे

घोटी परिसरात पाऊस

पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटी व इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भावली, दारणा व वैतरणा धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तालुक्यात संततधार सुरू असून, निसर्गाने असा हिरवा शालू पांघरला आहे.

- किरण घायदार

नाशिकच्या पासधारकांसाठी स्वतंत्र बोगी

नाशिक- मुंबई अपडाउन करणाऱ्या चाकरमान्यांसाठी चांगली सुविधा झाली आहे. नाशिकच्या पासधारकांसाठी स्वतंत्र बोगी सुरू करण्यात आली आहे. मासिक पास ६३५ रुपये आहे. पंचवटी (एमएमटी) पासधारकांसाठी ही बोगी असेल आणि ही बोगी फक्त नाशिकरोडलाच उघडली जाईल ही चांगली बाब आहे.

- योगेश गांगुर्डे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका सत्ताधाऱ्यांकडून पार्किंगचे ‘पझल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतूक व पार्किंगची समस्या दिवसेंदिवस त्रासदायक होत असताना प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पार्किंग प्रकल्पावरून ताणाताण सुरू आहे. रोटरी पार्किंगला प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रशासनाने पझल पार्किंगचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी काही ठिकाणी रोटरी पार्किंगचा आग्रह धरला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा रोटरी पार्किंगसाठी चाचपणी सुरू केली आहे. महापौरांनी पार्किंगचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले असून, कमी कालावधीची निविदा काढली जाणार आहे.

महापालिकेत सध्या पार्किंग प्रकल्पावरून खेळ सुरू आहे. आयुक्तांनी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १२ ठिकाणी रोटरी पार्किंगचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी निविदाही मागवल्या होत्या. परंतु, तीनवेळा निविदा काढूनही ठेकेदारांचा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे प्रशासनाने पझल पार्किंगचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी काही ठिकाणी पझल, तर काही ठिकाणी रोटरी पार्किंगचा प्रस्ताव ठेवला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा प्रस्तावाची फेरफार सुरू केली आहे. अशोकस्तंभ येथे दोन रोटरी पार्किंग करता येतील, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. बारा ठिकाणी जागेचे माप घेवून कुठे पझल व कुठे रोटरी पार्किंग करायची याचा आढावा घेतला जाणार आहे. पार्किंगसाठी सरकारने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे, तर पालिकेने पाच कोटी राखीव ठेवले आहेत.

देखभाल, दुरुस्ती चार वर्षे

रोटरी पार्किंगच्या प्रस्तावात पार्किंगची देखभाल व दुरूस्ती ही एक वर्षासाठीच ठेकेदाराला करायची होती. त्यामुळे ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता या अटी व शर्तींमध्ये बदल करण्यात आला आहे. ठेकेदाराला मेकॅनिकल पार्किंगची देखभाल व दुरुस्ती ही चार वर्षांपर्यंत करावी लागणार आहे. त्यामुळे ठेकेदाराला फायदा होणार असून, ग्राहकांनाही चांगली सुविधा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी तपासणी कुठे रे भाऊ?

$
0
0

प्रयोगशाळांबाबत नागरिक अनभिज्ञ

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केलेल्या असल्या तरी गेल्या वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील अवघ्या २५ नागरिकांनी आपल्याकडील पाण्याचे नमुने तपासणी करून घेतले आहे. यावरून जिल्ह्यातील नागरिक या प्रयोगशाळांबाबत अनभिज्ञ असल्याची बाब उघड झाली आहे.

राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अखत्यारीत पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागीय स्तरावरील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेसह जिल्हा स्तरावरील एक व उपविभागीय स्तरावरील सहा अशा सात पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र या प्रयोगशाळांबाबत जिल्ह्यातील नागरिक अनभिज्ञ असल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे.

नायट्रेटचे वाढते प्रमाण

जिल्ह्यातील शेती व्यवसायासाठी रासायनिक खतांचा वापर काही वर्षांत भरमसाठ वाढला असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील पाण्याच्या स्रोतात नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, अशा स्रोतांतील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने त्याचा दुष्परिणाम नागरिकांसह शेतकऱ्यांकडील पशुधनाच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. उघड्यावरील गटारी व शेतात पिकांवर फवारणाऱ्या रासायनिक औषधांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्याचे तपासणीत समजले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनतपासणीचा विक्रम!

$
0
0

टीम मटा

बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी बुधवारी पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला. शहरात एका दिवसात तब्बल ३० हजारांहून अधिक वाहने तपासण्यात आली. त्यापैकी दोन हजार वाहनधारकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी दिली.

वारंवार आवाहन करूनही वाहनधारक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत ही वस्तुस्थ‌िती आहे. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलिस बुधवारी रस्त्यावर उतरले. सकाळपासूनच शहरातील बहुतांश रस्त्यांना छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस आणि त्या त्या पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्तपणे मोहीम राबविली. हेल्मेटशिवाय वाहने चालविणारे, लायसन्स, आरसी बुक व तत्सम आवश्यक कागदपत्रे सोबत न बाळगणारे आणि वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहनधारकांवर दंडात्मक व तत्सम कारवाई करण्यात आली.

अनेक ठिकाणी वाहनचालक पोलिसांशी वाद घालत होते, तर काही ठिकाणी पोलिसांना विनवणी केली जात होती.

मुंबई नाका येथे हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांकडून एका कागदावर `हेल्मेट डोक्यावर घालण्यासाठी असते` असे शंभर वेळा लिहून घेण्यात आले.

काही ठिकाणी दुचाकीस्वारांना हेल्मेट आणण्यासाठी अवधी देण्यात आला.

हेल्मेट हे पोलिसांसाठी परिधान करायचे नसते, तर ते वाहनचालक व त्याच्या कुटुंबासाठी परिधान करायचे असते, असे प्रबोधनही करण्यात आले.

सातपूर परिसरात नियम न पाळणाऱ्यांच्या दुचाकी गाड्या जप्त.

काही ठिकाणी पोलिसांचे चिरीमिरीचे व्यवहार सुरू असल्याचा वाहनधारकांचा आरोप

नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प परिसरात २७५ वाहनधारकांकडून ६० हजार रुपये दंड वसूल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये हलक्या सरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही दिवसांपासून अदृश्य झालेल्या पावसाने बुधवारी रात्री पुन्हा नाशिककरांना दर्शन दिले. गुरुवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. विविध परिसरात सोसाट्याचा वाराही सुटला होता. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरात विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.

आठवडाभरापूर्वी सलग दोन ते तीन दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली होती. पावसाच्या या पुन्हा लागलेल्या चाहुलीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५१९१.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही टक्केवारी ३१.१५ एवढी आहे. कळवण, देवळा, मालेगाव, सटाणा, चांदवड, नांदगाव या तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. देवळा तालुक्यात केवळ १७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ३७८ मिलिमीटर आहे. पावसाअभावी ग्रामीण भागात पेरण्या खोळंबल्या असून, जेथे पेरण्या झाल्या आहेत तिथे दुबार पेरणीचे संकट आहे. अल्प पर्जन्यमानाचा परिणाम जिल्ह्यातील धरणसाठ्यावरही झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७५८५ दशलक्ष घनफूट म्हणजेच २७ टक्के एवढाच जलसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दहशतवाद्यांना गोळ्या घाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकऱ्यांना कर्जमाफीची सरकारने घोषना केल्यानंतरदेखील अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा कोरा करून कर्जमुक्तीसाठी अधिवेशनात मुद्दा मांडल्याशिवाय राहणार नाही. तर अमरनाथ येथील यात्रेकरूंवर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला केला आता त्यांना गोळ्या घाला. तरच देश सुरक्षित राहील, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला उद्देशून सांगितले. ठाकरे बुधवारी (दि. १२) धुळे जिल्हा शिवसेनेकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी धुळे जिल्हा शिवसेनेकडून ठाकरेंना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १ लाख ५१ हजारांचा धनादेश देण्यात आला.

शेतकरी मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुखांनी शेतकरी कर्जमुक्तीसह देशाच्या संरक्षणा मुद्दयांवर आपल्या शैलीतून आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, शिवआरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. माधुरी बाफना, महानगरप्रमुख सतीश महाले, उपजिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, राजेंद्र पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने कर्जमाफीवर शेतकऱ्यांना कवड्या टाकून कर्जमाफ करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शिवसेना राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करेल व तशी नोटीस प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरावर लावल्याशिवाय शिवसेना राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

आपला देश हिंदुत्ववादी राष्ट्र असल्याने शिवसेनेकडून राष्ट्रपतिपदासाठी मोहन भागवतांचे नाव सुचविण्यात आले होते, याचाही त्यांनी उल्लेख केला. एकीकडे शेतकऱ्यांचा छळ तर दुसरीकडे भारतात पाकिस्तान यात्रेकरूंवर हल्ला करीत आहे. आता पाठीवरचे वार घेण्यापेक्षा गोळ्या घालून संपवल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही, असे त्यांनी केंद्र सरकारला उद्देशून सांगितले. तसेच आता शेतकऱ्यांनी संपुर्ण कर्जमुक्तीशिवाय शांत बसायचे नाही. हे सर्व केल्याशिवाय आता शिवसेना शांत बसणार नाही. आता सर्वकाही अंगावर झेलायला तयार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीत अजूनही बदल शक्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राने लागू केलेल्या जीएसटीमध्ये बदल होऊ शकतो. आपण आपल्या अडचणी, सूचना द्या. त्या मी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवेन, असे सांगत केंद्रीय संरक्षणमंत्री राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यापारी, उद्योजकांना दिलासा दिला. मी केंद्राचा प्रतिनिधी म्हणून आलो असून, माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही अडचणी असतील, त्या सोडविण्याचा मी प्रयत्न करीन. त्यासाठी व्यापारी, उद्योजक व जीएसटीअंतर्गत येणाऱ्या सर्वांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. जीएसटी आयुक्तालयात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

जीएसटी आयुक्त पी. आर. शर्मा, जीएसटी आयुक्त (अपील) मनोज कृष्णा, नगरसेवक शशिकांत जाधव, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, तसेच बांधकाम, किराणा, कापड, इलेक्ट्रॉनिक्स आदी व्यापारी- व्यावसायिकांच्या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले असून, त्यात जीएसटी हा सर्वांत महत्त्वाचा आहे. याची सुरुवात २००७ पासून सुरू झाली असली तरी खरा स्पीड या तीन वर्षांत पकडला. त्यामुळे हा कायदा सर्व पक्षांच्या सहकार्यामुळे लागू झाला. वन नेशन, वन टॅक्स, वन मार्केट असलेल्या या करपद्धतीमुळे देशाचा सर्वांगीण विकास होईल. राष्ट्रउभारणीसाठी सर्वांनी जीएसटीची अंमलबजावणी करायची आहे. त्यात तुमचा रोल महत्त्वाचा आहे, असे व्यापारी, उद्योजकांना त्यांनी सांगितले. जीएसटी कौन्सिलिंगच्या १७ बैठकी झाल्या. त्यामुळे त्यात बदल होऊ शकतो. त्यात आपण आपले प्रेझेंटेशन द्या, सूचना द्या, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी या टॅक्सला ‘गुड सिम्पल टॅक्स’ म्हणतात. यामुळे देशभरात असलेले विविध टॅक्स एका छताखाली आले आहेत. त्यामुळे ते सर्वांना सोपे झाले आहे. यामुळे उद्योगधंद्यांत वाढ व रोजगारनिर्मितीसह देशाच्या व्यापार व सेवाक्षेत्रात भरभराट येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी जीएसटी आयुक्त आर. पी. शर्मा यांनी जीएसटीसाठी काही दिवसांपासून आम्ही जनजागृती करून कार्यशाळा घेत असल्याचे सांगितले. ज्यांच्या काही अडचणी असतील, त्यांनी थेट कार्यालयात संपर्क साधावा. या अडचणी सोडवल्या जातील. त्यासाठी विविध ठिकाणी सेवा केंद्रे स्थापन केली आहेत. या वेळी त्यांनी प्रेझेंटेशन सादर करून त्यात जीएसटीबद्दल व नाशिक कार्यालयाबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. भामरे यांनी व्यापारी, उद्योजक, बिल्डरांसह विविध सेवा पुरवणाऱ्यांशी संवाद साधला. शेखर दशपुत्रे, अतुल पवार, बग्गा यांच्यासह व्यापाऱ्यांनी आपले प्रश्न मांडले.

सोच बदलो देश बदलेगा

जीएसटीसाठी कम्प्युटरवर एक माणूस ठेवावा लागेल व त्यासाठी १० हजार रुपये महिना भरावा लागेल, अशी समस्या कापड व्यापाऱ्यांनी मांडली. त्यावर संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी ‘सोच बदलो देश बदलेगा’ असे सांगताच एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांनी ‘सोच नहीं बदलेंगे तो जमाना बदलेगा’ असेही सांगून डिजिटल इंडियाचे दाखले दिले.

छोट्या हॉलमुळे अडचण

जीएसटीसाठी डॉ. सुभाष भामरे संवाद साधणार म्हणून सर्व क्षेत्रातील संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, जीएसटी कार्यालयाचा हॉल लहान होता. त्याची दखल घेत, यानंतर मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम घेण्याच्या सूचना डॉ. भामरे यांनी केल्या. या वेळी त्यांनी नाशिकचे कार्यालय चांगले काम करत असल्याची पुस्तीही जोडली.

गाइडलाइन स्पष्ट नाही

बांधकाम व्यवसायामध्ये आम्ही काम करतो; पण जीएसटीची गाइडलाइन आमच्या व्यवसायाबाबत स्पष्ट नाही. त्यामुळे आमचा गोंधळ उडतो. या गाइडलाइन स्पष्ट केल्या तर आम्हाला व्यवहार करणे सोपे जाईल. त्याचप्रमाणे आम्हाला अगोदर जे एक्झम्प्शन दिले आहे, त्याचा यात समावेश नाही.

- विलास बिरारी, बिल्डर असोसिएशन

ग्राहकांचा गोंधळ होतो

अगोदर घर विकत घेताना ग्राहकांना व्हॅट, सर्व्हिस टॅक्स माहीत होता. त्यामुळे त्यांचा गोंधळ होत नव्हता; पण आता गोंधळ होतो आहे. त्यामुळे त्याबाबतच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना महत्त्वाच्या आहेत. खरेदी-विक्रीत आताही एलटीबी घेतला जातो. त्याचप्रमाणे डेव्हलमेंट अॅग्रीमेंट करताना बिल्डरला सेटऑफ मिळेल; पण लँडहोल्डरला फायदे होणार नाहीत. त्यामुळे डेव्हलपमेंट बंद होईल.

- दीपक धारराव, बिल्डर असोसिएशन

कापडावर जीएसटी लागू करू नये

अगोदर कापडावर कोणताही टँक्स नव्हता; पण त्यावर जीएसटी लागू केला आहे. रोटी, कपडा और मकान आपण म्हणतो. कापड ही आवश्यक बाब आहे. जीएसटीमुळे छोट्या व्यावसायिकाला त्यातून फटका बसेल. त्यांना कम्प्युटमरवर एक माणूस ठेवण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येईल. एकच रिटर्न १७ ठिकाणी भरावे लागेल.

- दिग्विजय कापडिया, कापड असोसिएशन

प्रत्येकाचे वेगवेगळे सेमिनार घ्या

व्यापारी, उद्योजक व सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यामुळे रोज एकाचे सेमिनार घेऊन त्यांच्या अडचणी व त्यांचे प्रश्न समजावून घेतल्यास त्याचा जास्त फायदा होईल व त्याला प्रसिद्धी दिल्यास तो सर्वांपर्यंत पोहोचेल. माझा व्यवसाय एका छताखाली आहे. त्यामुळे मला जीएसटीतून जास्त पैसे मोजावे लागल्यास व्यवसायावर परिणाम होईल.

- शशिकांत जाधव, नगरसेवक, उद्योजक

सहा महिन्यांनंतर जीएसटी लागू केला असता

जीएसटीबाबत अनेकांचा गोंधळ आहे. हा कर लागू करताना घाई झाली आहे. त्यासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला असता व सर्व अडचणी आधी समजून घेतल्या असत्या, तर त्याचा त्रास झाला नसता. तो १ एप्रिल २०१८ मध्ये लागू करून त्याची अगोदर घोषणा केली असती तर सर्वांना त्याचा फायदा झाला असता.

- सोमेश्वर काबरा, कापड व्यापारी

एमआरपी बदलणे अवघड

स्पेअर पार्टच्या व्यवसायामध्ये १५०० वस्तू आहेत; पण नव्या करप्रणालीमुळे आम्हाला या सर्वांची एमआरपी बदलावी लागत आहे. त्यावर स्टीकर लावणेसुद्धा अवघड आहे. आमच्याकडे स्टॉक असलेला माल विकायचा आहे. त्यात अडचण येते. त्याचप्रमाणे शेतीसाठी असलेले ट्रॅक्टर व इतर साहित्य यांच्या स्पेअर पार्टवर जीएसटी कमी असावा. या नव्या करामुळे आम्हाला दुकानात जास्त काम करावे लागते. आमचे हॉलिडे बंद झाले आहे.

- इंदरपालसिंग चढ्ढा, अॅटो स्पेअर पार्ट व्यावसायिक

महिन्यातून तीन चलन भरणे अवघड

किराणा व धान्य व्यापाऱ्यांना महिन्यातून तीन महिने चलन भरणे अवघड आहे. आमच्याकडे अकुशल कामगार जास्त आहेत. यासाठी केंद्राने आम्हाला सवलत द्यावी. कृषी उत्पन्न बाजार समिती आकारत असलेला एक टक्का कर जीएसटी लागू झाल्यानंतर बंद करावा. यातून व्यापाऱ्यांची मोठी लूट होते.

- प्रफुल्ल संचेती, किराणा, धान्य व्यापारी असोसिएशन

शासकीय कंत्राटदारांचा गोंधळ

आमच्यापैकी बरेच उद्योग शासकीय संस्थेला पुरवठा करतात; पण त्यांच्याकडे अद्याप सर्क्युलर आले नाही. त्यामुळे अद्याप जुन्या पद्धतीने काम केले जाते. त्यामुळे त्याचा फटका बसतो.

- धनजंय बेळे, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको कार्यालय स्थलांतराला स्थगिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरात सिडकोने उभारल्या सहाही योजना आता महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या असल्याने सिडकोचे नाशिकमधील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी हे कार्यालय स्थलांतरित होणार नाही, असे आदेश दिले असल्याची माहिती आमदार सिमा हिरे यांनी दिली. या संदर्भात सिडको कार्यालयात कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झाले नसल्याने कार्यालय स्थलांतराची प्रक्रिया सुरूच असल्याचे दिसून आले.

सिडकोच्या योजनांच्या मिळकती हस्तांतरण करणे, बांधकाम परवानगी देणे हे सर्व अधिकार सिडको कार्यालयाकडे आहेत. त्यातच सिडकोची सहावी आणि शेवटची योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. पुढील कामे ऑनलाइन पद्धतीने करता येणे शक्य असून, नाशिकमधील सिडकोचे कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. १ ऑगस्टला कार्यालय स्थलांतरित होणारच या मुद्द्यावर सिडको प्रशासक ठाम होते. हेे कार्यालय स्थलांतरित झाले तर मिळकतींचे कागदपत्रे सहज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आमदार सिमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते. त्यांनी औरंगाबादचेच मुख्य कार्यालय नाशिकला स्थलांतरीत करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे कार्यालय स्थलांतर करण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, असे आदेश सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिले असल्याचे हिरे यांनी सांगितले.

स्थलांतराचे काम सुरूच

दरम्यान, नाशिकमधील सिडको कार्यालय स्थलांतराची प्रक्रिया सुरू ओह. कार्यालय स्थलांतराला स्थगिती मिळाल्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांना तसे कोणतेही आदेश मिळालेले नाही असे समजले. तसेच स्थलांतराचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माऊंट एव्हरेस्टपेक्षा ‘रॅम’ आव्हानात्मक!

$
0
0

कोणतीही अॅक्टिव्हिटी करायची असेल तर तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास आणि मनाची तयारी असेल तर जगातील कोणतेही काम तुम्ही साध्य करू शकता. पहिल्या वर्षी रॅम ही स्पर्धा केल्यानंतर मी काही ठिकाणी कमी पडलो. माझ्यात ज्या कमतरता होत्या त्या दुसऱ्या प्रयत्नात दूर केल्या, म्हणूनच मला यशाला गवसणी घालता आली. रेस अॅक्रॉस अमेरिका (रॅम) ही स्पर्धा वैयक्तिक गटात भारतात प्रथमच पूर्ण करण्याचा मान मिळवणारे ले. क. श्रीनिवास गोकुळनाथ यांच्याशी केलेली बातचीत..

सायकलची आवड कशी निर्माण झाली?

लहानपणापासून सायकलची ओढ प्रत्येकात असते. त्या वयात सायकलला हात लावला नाही असा मुलगा क्वचितच एखादा सापडेल. सायकलची आवड इतरांपेक्षा माझ्यात जरा जास्तच होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सायकलबरोबरच साहसी खेळांची आवड असल्याने ज्या ठिकाणी साहसी खेळाला वाव आहे, अशाच ठिकाणी करिअर करायचे, असा निश्चय केला. मी बंगळुरू शहरात सायकलवरच अनेक ठिकाणी जात असे. कॉलेजला गेल्यानंतर ही आवड जास्त बहरत गेली. त्यानंतर मी लांब पल्ल्याच्या राइड करू लागलो. कधी दोनशे किलोमीटर, तर कधी तीनशे किलोमीटर अशा अंतराच्या मोहिमा फत्ते केल्या. बंगळूरू- हैदराबाद, बंगळुरू- उटी या मार्गावर अनेकदा सहज म्हणून जात असे. अशारीतीने आवड निर्माण होत गेली.

रॅममध्ये सहभागी होण्याचा निर्णय कधी घेतला?

एकदा अशीच लांब पल्ल्याची रेस करत असाताना मनात विचार आला, किती दिवसांपर्यंत आपण असे करायचे. काही तरी मोठे काम आपल्या हातून घडले पाहिजे, म्हणून मी कन्याकुमारी ते लडाख ही सायकलयात्रा केली. १५ दिवस आणि १७ तासांत पूर्ण करणारा मी एकमेव भारतीय ठरलो. या यात्रेची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंददेखील झाली. त्यानंतर आपल्या वयाची चाळीस वर्षे पूर्ण होण्याच्या आत मोठी अचिव्हमेंट करायची, असा निश्चय केला व तयारीला लागलो. अनेक ठिकाणांहून माहिती जमा करीत असताना रेस अॅक्रॉस अमेरिका (रॅम) या मोहिमेत सहभागी व्हायचे, असा निश्चय करून त्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला २०१५ मध्ये यात सहभागी झालो. मात्र, यश आले नाही. माझ्यात असलेल्या त्रुटींचा अभ्यास करून मी पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला व २०१७ मध्ये पुन्हा सरावाला सुरुवात केली.

मोहिमेत सहभागी होण्याची तयारी कशा पद्धतीने केली?

स्पर्धेत बहुतांश लोक सांघिकरीत्या सहभागी होतात. मात्र, मी वैयक्तिक गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यासाठी अकरा महिने कसून सराव केला. ज्या गोष्टींची माझ्यात कमतरता होती, त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले. यासाठी मला आर्मीच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी मला सरावासाठी वेळ दिला. त्यामुळे मी हे साध्य करू शकलो. या स्पर्धेत यशस्वी व्हायचेच या निश्चयाने मी पछाडलो होतो. डेक्कन लतीफ हँगर यांचे यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेसाठी मला कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य कुणाकडून मिळाले नाही. पहिल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाले होते. दुसऱ्या वर्षीही पैसे उभे करायचे होते. मित्र, नातेवाइकांनी पैसे उभे करण्यासाठी खूप मदत केली. ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारखे होते. आजपर्यंत संपूर्ण जगात ही स्पर्धा पूर्ण करणारा मी २१६ वा आहे व भारतात पहिला आहे.

तुमचा दिनक्रम कसा होता?

पहाटे चार वाजता माझा दिवस सुरू व्हायचा. सकाळी ७.३० पर्यंत मुंबई- आग्रा रोडवर सायकलचा सराव करत होतो. त्यानंतर ८ वाजता ऑफिसला जाणे, २.३० वाजता ऑफिसहून परत येणे, ३.३० वाजता पुन्हा सायकलिंगला सुरुवात करणे, संध्याकाळी ६.३० पर्यंत पुन्हा सराव असा दिनक्रम होता. शेवटी काही वेळा तर सतत २० तास सायकलचा सराव केला होता. माझ्या यशात माझ्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. तिने माझे घर सांभाळले, अनेकदा मला प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी हे करू शकलो.

पुढे काय करायचे आहे?

माझ्यापुढे सर्वांत महत्त्वाचा कर्जाचा प्रश्न आहे. स्पर्धेसाठी घेतलेले कर्ज फेडायचे आहे. त्यानंतर जगात अशा अनेक रेस आहेत, त्यात सहभागी व्हायचे आहे. सायकल माझी पॅशन आहे. रॅमच्या ३६ वर्षांच्या इतिहासात माझ्याइतके टायमिंग कुणीही दिलेले नाही. रेस अॅक्रॉस अमेरिका ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यापेक्षा जास्त आहे.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना काय सांगाल?

तुमच्यात पॅशन असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, मन लावून काम केले तर तुम्हाला निश्चित फळ मिळणार आहे. स्वतःवर भरोसा ठेवा. निगेटिव्ह विचार मनातून काढून टाका. हो, मी मिळवणारच हे ध्येय उराशी बाळगले तर तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणसाठी टँकर सुरू करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील चालू हंगामात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील जनतेस दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील १४ गावांत पाणीटंचाई असून, तेथील बंद करण्यात आलेले टँकर पूर्ववत करण्यासाठी आमदार दीपीका चव्हाण यांच्या मागणीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मंजुरी दिली आहे. ३१ जुलैपर्यंत तालुक्यातील या गावांना टँकर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बागलाणचे प्रातांधिकारी यांना दिले आहेत.

बागलाण तालुक्यात जुलै महिना सुरू होवून देखील पाऊसाने अवकृपा केली आहे. परिणामी तालुक्यातील खिरमाणी, सारदे, राहुड, इजमाने, रामतीर, अजमीर सौंदाणे, चौगाव, सुराणे, बहिराणे, देवळाणे, भाक्षी, कातरवेल, नवेगांव, महड या गावांसाठी टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. हे टँकर सुरू करण्यासाठी आमदार चव्हाण यांनी तहसीलदारांकडे मागणी करूनही त्यांनी वरीष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला नाही. यामुळे चव्हाण यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांपुढे हा प्रश्न मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या कामांवर भाजपकडून पाणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपने विद्यमान नगरसेवकांचा ७५ लाखांच्या नगरसेवक निधीचा हट्ट पुरव‌ण्यिासाठी चक्क मनसेच्या काळात मंजूर झालेल्या दोनशे कोटींच्या कामांना कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेने सत्ताधारी भाजपच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे.

मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी यासदर्भात आयुक्तांना पत्र देवून ही कामे रद्द करू नये, अशी मागणी केली आहे. ही कामे रद्द करण्याऐवजी या कामांच्या वर्क ऑर्डर तत्काळ काढाव्यात असेही शेख यांनी म्हंटले आहे.

सध्या नगरसेवक निधीचे कवित्व पालिकेत सुरू असून, ४० लाख आणि ७५ लाखांचा वाद सुरू आहे. नगरसेवकांना ७५ लाख निधी हवा असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्पीलओव्हर कमी करून द्यावा, अशी मागणी प्रशासनाने केली आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आता मनसेच्या काळात मंजूर झालेली दोनशे कोटींचे विकास कामे रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे मनसेच्या काळात शहरातील या सर्व विकासकामांना महासभेने व स्थायी समितीने मंजुरी दिली असून, केवळ वर्कऑर्डरच्या निघणे बाकी आहे. मात्र आता ही कामे रद्द झाल्यास भाजपला नव्याने विकास कामे घेवून ती आपल्या नावावर नोंदविता येणार आहेत. भाजपच्या या खटाटोपावर मनसेने आक्षेप घेतला आहे.

हवे तर श्रेय घ्या…पण कामे सुरू ठेवा

मनसेचे गटनेते शेख यांनी आयुक्तांना पत्र देवून या कामांचे कार्यारंभ आदेश तातडीने देण्याची मागणी केली आहे. सदर कामे ही नागरी हिताचे आहेत. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांनी ती महासभा, स्थायीत मंजूर करून घेतली आहे. परंतु याच कामांसाठी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक हट्ट धरत आहेत. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास त्यांनी या कामांचे श्रेय घ्यावे, परंतु ती रद्द करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.


राज ठाकरे घेणार समाचार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत आहेत. भाजपकडून मनसेचा विकास पुसण्याचे जे काम सुरू आहे, त्याचा ते समाचार घेणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. दिल्ली ते गल्ली भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून जुन्याच कामांचे श्रेय घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भाजपचा हा प्रयत्न नाशिकमध्ये मात्र हाणून पाडला जाईल, असा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाकडून सासूसह मेहुणीच्या मुलाची हत्या

$
0
0

सासरा गंभीर जखमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कौटुंबिक कारणावरून एकाने सासूसह मेहुणीच्या आठ वर्षीय मुलाची हत्या केली. ही घटना आज, गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रामवाडी परिसरातील निर्जन स्थळी घडली. हल्लेखोर जावई पसार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

मंदाबाई दशरथ खराटे (५५), नैतिक विशाल लिलके (८) असे हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या दशरथ खराटे यांनी सांगितले की, म्हसरूळ परिसरातील गंधारवाडी येथे राहणाऱ्या खराटे कुटुंबियांचा जावई असलेला मोतीराम बदादे आज दुपारच्या सुमारास घरी आला. त्याने तिथे सासू मंदाबाई आणि खराटे यांच्या मुलीचा मुलगा नैतिक यास सोबत घेतले. दुचाकीवर बसवून तो त्यांना चोपडा लॉन्सरोडवरील रामवाडी परिसरातील पेट्रोलपंपासमोरील निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने धारदार शस्त्राने दोघांचा खून केला. यानंतर तो पुन्हा घरी आला. तिथे त्याने मंदाबाई व नैतिक यांना काहींनी मारहाण करीत लूट केल्याची खोटी गोष्ट सांगितली. या दोघांना वाचवण्यासाठी दशरथ खराटे संशयित आरोपी मोतीराम बरोबर निघाले. मोतीराम त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन आला. खराटे पुढे चालत असताना पाठीमागून मोतीरामने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. मोतीराम हल्ला चढवत असताना खराटे यांनी काही वार चुकवले. तसेच रस्त्याला येऊन सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या दिशेने पळायला सुरुवात केली. या दरम्यान, मोतीराम तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती प्रश्नी आज होणार सुनावणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहारांच्या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी संचालकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर या प्रकरणी आता शुक्रवारी (दि. १४) सुनावणी होणार आहे.

नोटिसांमुळे बाजार समिती बरखास्त होण्याची शक्यता वाढली. संचालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर त्यावर सुनावणी होणार होती. तिनदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजार समितीच्या संचालकांना निघालेल्या नोटिसांमुळे बाजार समिती बरखास्त होते की काय अशी शक्यता निर्माण झाली असताना दुसरीकडे बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यास विरोधक संचालकांना यश मिळाले आहे. देविदास पिंगळे यांच्या विरोधात ४ जुलै रोजी बाजार समिती कार्यालयात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नव्या सभापतीच्या निवडीसाठी आदेश मिळतील या आशेवर बसलेल्या संचालकांना मात्र अजून कोणतेचे आदेश मिळालेले नाही. त्यामुळे सभापतीच्या निवडीचा विषय तुर्तास बाजूला पडला आहे.

निर्णयाची प्रतीक्षा

बाजार समितीच्या संचालकांना जिल्हा उपनिबंधकांना पाठविलेल्या नोटिसांना लेखी स्वरुपात म्हणणे मांडल्यानंतर १९ जूनला सुनावणी होणार होती. ती २१ जून होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर २७ जूनला पुढील तारीख देण्यात आली. आता ही सुनावणी १४ जुलैला होणार आहे. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे हे या प्रश्नी काय निर्णय देतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामराज्य फक्त कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामराज्य फक्त कागदावरच असल्याचे कोर्टाने ताशेरे ओढलेले असताना कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणाला गुरुवारी १३ जुलै रोजी वर्ष पूर्ण झाले. या प्रकरणी अद्याप निकाल लागलेला नाही. महिला अत्याचारांवरील आतापर्यंतच्या सर्व प्रकरणातील आरोपींवर लवकर खटले दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अमानुष पद्धतीने हत्येच्या प्रकरणाला येत्या १३ जुलै रोजी वर्ष पूर्ण झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस सुरू असूनही या प्रकरणी निकाल लागलेला नाही. उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारण्यासारखंच असतं. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणी हे सिद्ध होत आहे, ही खेदाची बाब आहे. केवळ कोपर्डीच नाही तर त्यानंतर अनेक अत्याचारांची साखळीच सुरू झाली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिलांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. अपहरण करून बलात्कार केल्याच्या तीन घटना मुंबईत एका आठवड्यात घडल्या. धावत्या गाडीतही महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. शारीरिक शोषण किंवा बलात्काराच्या घटना सरकारला धक्कादायक वाटत नाही इतके सरकार स्त्रियांच्या बाबतीत असंवेदनशील झाल आहे.

उच्च न्यायालयानेही महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून राज्य सरकारला फटकारले आहे. रामराज्य फक्त कागदावरच दिसतंय. प्रत्यक्षात मात्र महिला सुरक्षेबाबत सरकार उदासीन असल्याचं परखड मत हायकोर्टाने व्यक्त केले. केवळ उपाययोजना नको, ठोस पावले उचलावीत असे कोर्टाने राज्य सरकारला सुनावले आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार, पुष्पलता उदावंत आदींसह महिला उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री अपयशी

कोर्टाने महिला सुरक्षेसह विविध मुद्यावर ताशेरे ओढले जात असताना गृह खात स्वतःकडे बाळगून असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मूग गिळून बसले आहेत. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याबाबत मुख्यमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत. तरीही गृहखात्याला स्वतंत्र मंत्री देण्याबाबत ते नकारात्मक आहेत, असा आरोपही ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस’च्या पत्रकात करण्यात आला आहे.

पीडितेला श्रद्धांजली
समर्थ महिला मंडळातर्फे कोपर्डी प्रकरणातील पीडितेसह अमरनाथ हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना चिंतामणी मंगल कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी यावेळी आमदार सीमा हिरे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे, मंगला निकम, विजया राऊत, पुष्पावती भामरे, संगीता शिंदे, ललिता हिरे आदी उपस्थित होत्या. रश्मी हिरे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासाका’ला हमीची अट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक साखर कारखान्याचा (नासाका) बॉयलर पुन्हा पेटण्यासाठी सर्व संचालक मंडळाच्या वैयक्तिक व सामूहिक थकहमीची अट राज्य सहकारी बँकेने घातली आहे. ‘नासाका’च्या संचालक मंडळाने राज्य बँकेची अट अंशत: मान्य केली आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात ‘नासाका’चे बॉयलर धगधगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

‘नासाका’ आर्थिक मदतीप्रश्नी गुरुवारी सकाळी मंत्रालयात सहकार राज्यमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नासाका संचालक मंडळ प्रतिनिधींची बैठक झाली. ‘नासाका’चा पुन्हा येरे माझ्या मागल्या होऊ नये, म्हणून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी बैठकीतही सावध पवित्रा घेतला. ‘नासाका’चा चेंडू पुन्हा एकदा प्राधिकृत संचालक मंडळाच्या कोर्टात टोलावला आहे. आमदार बाळासाहेब सानप यांच्या शिष्टाईतून ‘नासाका’ची चाके पुन्हा सुरू होण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राज्य सरकारने आश्वासन दिलेल्या ‘नासाका’सह राज्यातील अन्य कारखान्यांना मदतीसाठी कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. मुंबईत सहकार राज्यमंत्र्यांच्या दालनात गुरुवारी आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर पुन्हा बैठक झाली. यावेळी राज्य सहकारी बँकेचे चेअरमन सुकदेव यांच्यासह साखर आयुक्त कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नासाकाला आर्थिक मदत देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली.

परतफेडीची हमी घ्या

आधीचे मोठे आर्थिक कर्ज असलेल्या ‘नासाका’ला आणखी आर्थिक मदत करता येणार नाही, अशी भूमिका राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. ‘नासाका’च्या प्राधिकृत संचालक मंडळाने वैयक्तिक व सामूहिक स्वरुपात आर्थिक मदतीची परतफेडीची हमी दिल्यास बँक आर्थिक मदत करू शकेल, असा तोडगा यावेळी काढण्यात आला. या बैठकीस उपस्थित असलेले ‘नासाका’चे चेअरमन तानाजी गायधनी, संचालक प्रकाश घुगे, अरुण जेजुरकर, नंदू हांडे आदींनी या तोडग्यावर सहमती दर्शविली. यामुळे यंदा ‘नासाका’चा बॉयलर पेटण्याची शक्यता वाढली आहे.

कारखाना बुडविणाऱ्यांकडे दुर्लक्ष

‘नासाका’चे आर्थिक कंबरडे मोडल्याची जबाबदारी निश्चित करण्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला नाही. ‘नासाका’ची आर्थिक स्थिती डबघाईस येण्याची कारणे शोधून त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार मंत्र्यांनी पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने यापुढेही ‘नासाका’चे भविष्य अंधकारमयच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परतफेडीच्या हमीवर राज्य सहकारी बँकेने सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘नासाका’ला आर्थिक मदतीस संमती दिली आहे. या विषयावर पुढील नियोजनासाठी येत्या आठवडाभरात सहकारमंत्री, पालकमंत्री व नासाका संचालक मंडळाची पुन्हा बैठक होणार आहे.
- बाळासाहेब सानप, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्हेगारांना दिलेला ‘लाइक’ भोवला!

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

पेठरोडला मे महिन्यात झालेल्या खूनातील फरारी संशयिताचा वाढदिवस साजरा होतो, तो फेसबुकवरून व्हायरल केला जातो, त्याला तुफान लाइक्स मिळतात. यावरून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचे फॅन्स असल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये राजकीय नेते आणि नगरसेवकही आहे. अशा लाइक्स दिल्याने त्यांना आता पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. फेसबुकवर संशयिताचे फोटो लोड करणारे आणि त्यांना लाइक करणाऱ्यांना हे प्रकरण चांगलेच भोवणार आहे.

पेठरोड येथील नवनाथनगर येथे राहणारा किरण निकम या तरुणाची १९ मे रोजी रात्री धारदार शस्त्रांच्या साह्याने हत्या झाली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी संतोष उघडे, गणेश उघडे, संतोष पगारे, बंडू मुर्तडक यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष उघडे फरार होता. पंचवटी पोलिसांना त्याच्या मागावर होते. असे असताना त्याचा वाढदिवस नुकताच मोठ्या थाटात सेलिब्रेट करण्यात आला. त्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले, त्याला खूप लाइक्सही मिळाले. या फोटोसोबत स्लोगन लिहिण्यात आले आहेत. याची माहिती मिळताच असे फोटो सोशल मीडियावर कुणी अपलोड केले, त्या फोटोंना कुणी लाइक्स केले, वाढदिवसाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणी-कुणी शुभेच्छा दिल्या, याचा तपास करण्यासाठी पोलिस शोध घेत आहेत.

सोशल मीडियावरील फोटोंना लाइक्स करणाऱ्यांमध्ये काही नगरसेवक, नगरसेवकांचे नातेवाइक, सामाजिक क्षेत्रातील तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कॉलेज स्टुडन्टस् यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांशी अशा प्रकारे स्नेहाचे संबंध ठेवणाऱ्या आणि लाइक्स देणाऱ्यांना पंचवटी पोलिस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. उठसूट कुणाच्या फोटोंना लाइक्स करणे किती महागात पडते याची जाणीव या प्रकरणामुळे अनेकांना झाली आहे. या लाइक्स करणाऱ्यांमध्ये आणि वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये विविध पक्षांचे नगरसेवक तसेच त्यांच्या नातेवाइकांचा समावेश आहेत. त्यामुळे या हा लाइक्सचा विषय राजकीय गोटातही रंगू लागला आहे.

उत्सुकता कारवाईची

पंचवटीतील काही नगरसेवकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यातील सत्ताधारी भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी हा जालिंदर उगलमुगले याच्या खून प्रकरणामुळे जेलमध्ये आहे. आता संतोष उघडे वाढदिवस सेलिब्रेशन फेसबुक प्रकरणात कुणाचे नावे पुढे येते तसेच त्यांचे पुढे काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासूसह मेहुणीच्या मुलाची हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सासूसह मेव्हणीच्या अवघ्या आठ वर्षाच्या मुलाची हत्या करून जावई फरार झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी घडली. संबंधित हल्लेखोर जावयाने सासऱ्यालाही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकार केल्याने सासरा बचावला. हा सर्व थरार दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास रामवाडी परिसरातील कोशिरेमळा जवळील चौघुले पेट्रोलपंपासमोरील निर्जन भागात घडली.

मंदाबाई दशरथ खराटे (६०, मूळ रा. गाजरवाडी, ता. नाशिक, हल्ली पाथर्डी फाटा) आणि नैतिक विश्वास लिलके (८, रा. कोचरगाव, ता. दिंडोरी, हल्ली पाथर्डीफाटा) असे हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. मोतीराम बदादे (रा. गंगा म्हाळुंगी, हल्ली तळेनगर, रामवाडी) असे हत्या करणाऱ्या संशयित जावयाचे नाव आहे. दशरथ सोनू खराटे (६५) असे हल्ल्यातून वाचलेल्या सासऱ्याचे नाव आहे.

बदादे हा गुरूवारी सकाळी पाथर्डी फाटा येथील सासऱ्याच्या घरी पोहचला. त्याने आमीष दाखवून सासू मंदाबाई व आजी-आजोबांकडे शिक्षणासाठी असलेला साडूचा मुलगा नैतिक यास सोबत घेतले. या दोघांना दुचाकीवर घेऊन तो गेला. त्याने दोघांची हत्या केल्याची माहिती हत्याकांडात बचावलेल्या दशरथ खराटे यांनी पोलिसांना दिली. खराटे दाम्पत्यास सहा मुली असून बदादे हा जावई शहरातील रामवाडी भागात राहतो. खराटे कुटुंबाने बदादेला वेळोवेळी आर्थिक मदत केली. त्याने एक व्यवसाय थाटला होता. मात्र, अपयश आल्याने तो कर्जबाजारी झाला. कौटुंबिक वाद किंवा आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

आर्थिक कारणातून हत्या?

काम नाही त्यात हातउसनवार घेतलेले पैसे मागणाऱ्यांच्या तगादा सुरू झाल्याने मोतीराम वैतागला होता. मोतीरामने सासऱ्यांकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, खराटे कुटुंबीय काम करून पोट भरते. जावयाचा तगादा वाढल्याने त्यांनी हातउसनवार करून वीस हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानुसार रोकड घेऊन तो गेला होता.

दशरथ खराटेंचे नशिब बलवत्तर

सासूसह निरागस बालकाची हत्या केल्यानंतर बदादे सासऱ्याच्या घरी परतला. रस्त्यात लूटमार झाल्याचे खोटे सांगत त्याने दशरथ खराटेंना सोबत घेतले. दोघे दुचाकीने कोशिरे मळा येथील निर्जनस्थळी पोहचले. झाडाझुडपातून वाट काढत आत गेल्यानंतर खराटेंना पत्नीसह नातवाचा मृतदेह दिसला. त्यांनी हंबारडा फोडला. यावेळी पाठीमागे असलेल्या मोतीरामने कोयत्याने खराटेंच्या डोक्यात वार केला. मात्र, खराटेंनी हा वार हातावर झेलला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी तेथून पळ काढला. त्यांनी थेट सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठले. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्यासह पंचवटी स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, आनंद वाघ आदी घटनास्थळी पोहचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बे‌शिस्तांना खाकीचा दणका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक पोलिसांनी गुरूवारी भर पावसात कारवाई केली. तब्बल १८ हजार पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करीत दोन हजार ३०० वाहनचालकांकडून दंड वसूल केला. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू असल्याने हा आकडा आणखी वाढू शकतो, असा दावा पोलिसांनी केला.

बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला आहे. शहरात ५२ ठिकाणी नाकेबंदी लावत ४०० पेक्षा अधिक पोलिसांनी २० हजारांवर वाहने तपासली. त्यात, आठ लाखाहून अधिक दंड जमा झाला. ही विक्रमी कारवाई करताना पोलिसांनी तत्पूर्वी एक मॅसेजही व्हायरल केला होता. सूचना देऊनही बेशिस्त वाहनचालक रस्त्यावर आल्याने पोलिसांनी कारवाई केली. असेच काहीसे चित्र शहरात दिसून आले. पोलिसांनी प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करीत बेशिस्त वाहनचालकांना संधी मिळू दिला नाही. याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की सायंकाळपर्यंत पोलिसांनी १८ हजारापेक्षा अधिक वाहनांची तपासणी केली. त्यापैकी दोन हजार ३०० वाहनचालकांकडून दंड वसूल केला. मागील वर्षभर वाहतूक पोलिसांनी नागरिकांचे प्रबोधन केले. वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी गुलाबपुष्प देऊन प्रोत्साहित केले. मात्र, प्रबोधनाने फरक पडत नसल्याचे दिसते. त्यामुळे आम्ही कडक कारवाई करण्याचे निश्चित केले. दोन दिवसात साडेचार वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत सातत्य राहणार आहे. नागरिकांनी सर्व कागदपत्रे जवळ बाळगून नियमांचे पालन करावे. तसेच, कारवाईबाबत काही तक्रार असल्यास पुराव्यानिशी तक्रार करावी, असे आवाहन पाटील यांनी केले. गुरूवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. अधुनमधून पावसाच्या सरीही बरसल्या. मात्र, पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली. रात्री उशिरा कॉलेजरोडवर पोलिसांचा फौजफाटा उतरला होता. त्यामुळे कारवाईचा आकडा आणखी वाढू शकतो, असे पाटील यांनी सांगितले.

पोलिस, वकिलास दंड

हेल्मेटशिवाय वाहने चालविणारे, लायसन्स, आरसी बुक व तत्सम आवश्यक कागदपत्रे सोबत न बाळगणारे आणि वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहनधारकांवर दंडात्मक व तत्सम कारवाई करण्यात आली. यात, एका पोलिसासह वकिलासही दंड ठोठवण्यात आला. आयुक्तालयात काम करणाऱ्या पोलिसाने झेब्रा क्रॉसिंग नियमाचे उल्लंघन केले होते. तर, बड्या वकिलाने कोर्टासमोर ‘नो पार्किंग’मध्ये मर्सिडीज उभी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा नदीवरील पुलाची आजपासून दुरुस्ती

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

घोटी-सिन्नर महामार्गावरील देवळे गावाजवळ दारणा नदीवरील पूल धोकादायक झाल्याने अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम उद्यापासून (दि. १४) हाती घेतले आहे. त्यामुळे किमान तीन आठवडे या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.

गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाची दूरवस्था झाली आहे. पुलाच्या बेरिंग उखडल्या आहेत. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती. मात्र तरीही या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच होती. त्यामुळे बांधकाम विभागाने दुर्घटना होण्याआधीच पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे.

अवजड वाहनांना घोटी-मुढेगाव-साकुर मार्गाद्वारे वळविण्यात येणार आहे. हलक्या स्वरुपाच्या वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने अथवा पुलावरूनच पर्यायी रस्ता सुरू करून सुरू ठेवणार असल्याचे वृत्त आहे. या पुलाच्या बेरिंग खराब झाल्यामुळे शुक्रवारपासून दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. पुलाच्या खराब झालेल्या बेरिंग बदलण्यात येणार आहेत. नवीन बेरिंग टाकून पूल मजबुतीसाठी हायड्रोल‌िक जॅकद्वारे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे घोटी-सिन्नर महामार्गावरील अवजड वाहने घोटी-मुढेगाव-साकुरमार्गे वळविण्यात येणार आहेत. हलकी वाहने मात्र याच पुलावरून एकेरी मार्गाने सुरू राहणार आहेत. या दुरुस्ती काळात वाहनधारकांनी सहकार्य करावे, पुलावरून जाताना सावकाश जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळ्यात पाणीटंचाई; आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

गिरणा नदीला पाणी असतानाही केवळ ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे देवळा शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्णतः विस्कळीत झाला आहे. येत्या दोन दिवसात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर नाशिक येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवराजे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण आहेर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वीस दिवसांपासून पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. देवळा नगरपंचातीची निर्मिती होऊन तब्बल दोन वर्षे झाली. मात्र स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अद्यापही नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाली नाही. त्यामुळे ठेकेदाराची मनमानी वाढली असून पाणीपुरवठा योजनेवर दुरुस्तीचा खर्च कुणी करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील उपनगरांमधील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उपनगरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा न झाल्यास पुढील काळात नगरपंचायतीचा कोणताही कर न भरण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.

पाणीपुरवठा योजनेवरील विद्युतपंप तीन दिवसांपासून नादुरुस्त आहेत. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ही दुरुस्ती रखडली आहे. याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.सध्या गिरणा नदीला आवर्तन सुटलेले आहे. मात्र केवळ ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे देवळावासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येत्या दोन दिवसात देवळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images