Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गणेशोत्सव इकोफ्रेंडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत येत नसल्याने नसल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा (पीओपी) शाडू मातीच्या मूर्तींना गणेशोत्सवात अधिक मागणी राहू शकते. ‘पीओपी’ही स्वस्त होणार असले तरी सूज्ञ नाशिककर शाडू मातीला प्राधान्य देत असल्याने यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे वातावरण राहणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गणेशाची स्थापना होणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली असून शाडूमातीच्या गणेशाची अधिक चलती आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी शाडू माती ही ‘जीएसटी’च्या कक्षेत नाही. तर मातीशिवाय अनेक मूर्तिकार ‘पीओपी’पासूनदेखील मूर्ती तयार करतात. या ‘पीओपी’च्या मूर्ती तयार करण्यासाठी टेराकोटा व शरीराच्या प्लास्टरसाठी लागणाऱ्या सामानाचा उपयोग सर्वाधिक होतो. ‘जीएसटी’पूर्वी टेराकोटासह प्लास्टरसाठीच्या सामानावर साडेचौदा टक्के व्हॅट होता. आता टेराकोटापासून तयार करण्यात आलेल्या अन्य वस्तू ‘शोभेच्या वस्तू’ अर्थात लक्झरी श्रेणीत येत असल्याने त्यावर २८ टक्के जीएसटी आहे. मात्र, मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे हे टेराकोटा व ‘पीओपी’चे कच्चे सामान पाच टक्के जीएसटीच्या श्रेणीत आहे.

यानुसार गणेशमूर्ती तयार करण्यासाठीचे ‘पीओपी’चे सामान आता तब्बल साडेनऊ टक्क्याने स्वस्त झाले आहे. तरीही १ जुलैपासून कलरचे भाव मात्र वाढल्याने मूर्ती मागच्या वर्षीपेक्षा महाग होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षांच्या अनुभवानुसार शाडू मातीच्या मूर्तींनाच अधिक मागणी असते. मात्र, शाडूच्या मातीचीही कमतरता भासत असल्यामुळे कारागिरांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

शाडू माती साठविण्याकडे कल

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नेहमीच केले जात असल्याने आणि शाडूच्या मातीपासून तयार झालेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सल्ला पर्यावरणवादी देतात. कारागिरांवर शाडू माती मूर्ती बनविण्यासाठी दबाव असतो. मात्र, शाडूच्या मातीची कमतरता जाणवत असल्याने कारागिरांसमोर यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिकची शाडू माती उपलब्ध करण्याकडे कारागिरांचा जोर आहे. माती साठवण्याकडे कल वाढला आहे. या मातीवर जीएसटी लागू नसल्याने यंदाच्या वर्षी शाडू मातीच्याच अधिक मूर्ती राहतील, असा अंदाज बांधला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारूबंदीचा एल्गार पोहोचला जगभर

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

‘दारुड्या भावा, आम्ही तुझ्या आया-बहिणी आहोत. आम्हाला दारूच्या दुकानाचा खूप त्रास होतो. या दुकानामुळे आमची मुले खाली खेळू शकत नाहीत. महिला मुक्तपणे फिरू शकत नाहीत, आंदोलनास पाठिंबा द्या’ अशी साद खुद्द मद्यपींनाच घालून फेम थिएटरमागील दारूच्या दुकानासमोर महिलांचे दररोज सायंकाळी धरणे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी हे आंदोलन फेसबुकद्वारे चक्क जगभर लाइव्ह केले गेले. आता तरी येथील समस्या सुटू शकेल, असा आशावाद आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केला.

नाशिक-पुणे महामार्गावरील फेम (विजय-ममता) थिएटरमागील भर वस्तीतील हे दुकान हटविण्यासाठी महिलांना उपनगर पोलिस ठाण्यावर धडक मारली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, कार्यवाही झालेली नाही. आता या महिला दररोज सायंकाळी दुकानासमोर धरणे आंदोलन करीत आहेत. डॉ. स्नेहल पाटील, वैशाली दारोले, नीलम पगारे, मेघा थूल, ज्योती चांदवानी, डॉ. स्नेहल पाटील, समाधान पगारे, संजय दारोले, मुक्तार शेख, नाझिया शेख, जगदीश चांदवानी, कुंदन घडे, नाना पाटील आदींचा त्यात समावेश आहे.

--

कार्यवाहीबाबत दुर्लक्ष

उपनगरच्या नगरसेविका सुषमा पगारे, युगांतर प्रतिष्ठानचे प्रमुख रवी पगारे यांनी फेसबुकच्या माध्यमातून नागरी प्रश्नांवर अनोखे आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार फेम टॉकीजमागील दारूचे दुकान हटविण्याचा प्रश्न घेऊन त्यांनी श्रीगणेशा केला. आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना फेसबुकच्या माध्यमातून जगभर लाइव्ह करण्यात आल्या. कार्यवाही होत नसल्याने या महिलांनी नगरसेविका सुषमा पगारे यांच्या सहकार्याने आपले ठिय्या आंदोलन थेट फेसबुकवर जगभर लाइव्ह पोहोचविले आहे.

--

स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

फेम थिएटरमागील महादेव पार्क सोसायटी परिसरात महाराणी वाइन्स हे दुकान सुरू झाले असून, नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. नागरिकांनी सांगितले, की सह्यांची मोहीम राबवून उपनगर पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन दिले आहे. दुकान सुरू करताना सोसायटीच्या रहिवाशांची परवानगी घेण्यात आली नाही. मद्यपींकडून महिला, विद्यार्थी यांना त्रास होत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे दोन मंदिरे, महिलांचे सभागृह, हॉस्पिटलही आहे. नियम धाब्यावर बसवून येथे दारूचे दुकान सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनचे अध्यक्ष महंत डॉ. बिंदू महाराज यांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यांनीही हे दुकान बंद करण्याची सूचना केली आहे.

--

शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील दारूच्या दुकानांना मान्यता मिळणार असल्याचे समजते. कॉलनीतील दारूची दुकाने लोकवस्तीत नकोत, ती हायवेवर न्यावीत यासाठी शासनाकडे मागणी करणार आहोत. न्यायालयीन स्तरावरही लढा देणार आहोत.

-सुषमा पगारे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकासह महामार्गाची कोंडी लवकरच फुटणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाच्या तांत्रिक चुकीमुळे द्वारकेसह विविध ठिकाणी तयार झालेली कोंडी आता फुटणार आहे. द्वारका चौकातील अंडरपाससह येथील अतिक्रमणामुळे तयार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथील अतिक्रमण व हनुमान मंदिर हटविले जाणार आहे. येथील सब-वे वाढवून फ्री लेफ्ट तयार करून नाशिकरोडकडील वाहनांना बायपास दिला जाणार आहे. सोबतच पंचवटी कॉलेजसमोर बायपास, लेखानगर येथे युटर्न, कमोदनगर येथे सब-वे अशा विविध कामांसाठी ६७ कोटी रुपयांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

शहरातून जाणारा उड्डाणपूल तांत्रिक चुकांमुळे नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरला आहे. विशेषतः द्वारका येथील वाहतुकीचा व्यवस्थित अभ्यास न करताच उड्डाणपुलाचे डिझाईन करण्यात आल्याने येथील कोंडी कायम आहे. लेखानगर, पंचवटी कॉलेज, स्प्लेंडर हॉल, स्टेट बँक चौक, अशा जवळपास बारा ठिकाणी तांत्रिक चुकांमुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला होता. यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या पुलातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली होती. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात खासगी सल्लागार कंपनीकडून सर्व्हेक्षण केले होते. त्यात आढळलेल्या त्रुटी दूर केल्यास वाहतुकीची साडेसाती कमी होईल, असा दावा करण्यात आला होता. गडकरी यांनी या कामांना आता मंजुरी दिली असून, त्यासाठी ६७ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. फरांदे यांनी दिली आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या महिन्यात ही कामे सुरू होणार आहेत.

मंजूर कामे व निधी

पंचवटी कॉलेजसमोर सबवे - दीड कोटी, कन्नमवार नवीन पूल - ८ कोटी, द्वारका कोंडी फोडण्यासाठी - १ कोटी, इंदिरानगर येथील जाळी काढणे - २० लाख, कमोदनगर सबवे - १.५ कोटी, लेखानगर येथे युटर्न - १ कोटी, स्टेट बँक चौक येथे सबवे- १.५ कोटी, गॅबरील कंपनीजवळ एंट्री पॉईंट - ६० लाख

विल्होळी येथे गाड्यांसाठी भुयारी मार्ग - १२ कोटी

नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या कामांसाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. प्रयत्नांना यश येऊन द्वारकेसह या महामार्गावरील कोंडी आता फुटणार आहे.

- देवयानी फरांदे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुठे पाणी, तर कुठे देव पाण्यात

0
0

टीम मटा

तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर ‌जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाचे पुनरागमन झाले. शुक्रवारी दिवसभर इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा भागात चांगला पाऊस झाला. याउलट मालेगाव, बागलाण, नांदगाव, देवळा, चांदवड, येवल्यात मात्र अद्यापही पावसाने पाठ फिरवली आहे. कसमादे पट्ट्यात शेतकऱ्यांनी पावसासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.

गोदाकाठच्या गावांना अलर्ट

निफाड ः तालुक्यात पावसाचे गुरुवारी रात्रीपासून पुनरागमन झाले. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. गोदावरी व कादवा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांनी दिला आहे.
या पावसामुळे मका, सोयाबीनला जीवदान मिळाले आहे. तालुक्याती काही भागातील शेतात पावसाचे पाणी शिरले होते. निफाड, विंचुर, लासलगाव, पालखेड, शिरवाडे वणी, सायखेडा, चांदोरी, सुकेणे, पिंपळगाव, कुंदेवाडी, उगाव या भागात संततधार पाऊस झाला. दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या तडाख्यात सापडणाऱ्या सायखेडा पुलाच्या कठड्याला पाणवेली अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह पुलाजवळ मंदावला आहे. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. दारणा आणि गोदावरी नदीला पाणी आल्यामुळे नांदूरमध्यमेशवर धरण ओहरफ्लो झाले आहे.

नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी, दारणा नदीला पूर आला. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीला जायकवाडीच्या दिशेने सकाळी ११ वाजता ३७ हजार ५२१ क्यूसेक, दुपारी १२ वाजता ५० हजार २८ क्यूसेक तर दुपारी एकनंतर २२ हजार ३८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दिंडोरीत पिकांना मिळाले जीवदान

दिंडोरी ः गेल्या पंधरा दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस परतल्याने तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील नदी, नाले वाहू लागले असून, धरणसाठ्यातही वाढ होत आहे. १५ जुलैपर्यंत गतवर्षीपेक्षा निम्माच पाऊस पडल्याने अजूनही शेतकरी चिंतेत आहे.

तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. तालुक्यात पेरण्या पूर्ण आटोपल्या असून, बहुतांश भागात भाजीपाल्याची लागवड झाली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी खरीप व भाजीपाला पिके संकटात सापडली होती. मात्र या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
दारणा, भाम, वाकी नद्यांना पूर

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. इगतपुरी, घोटी परिसरासह पूर्ण तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. या जोरदार पावसामुळे दारणा, वाकी, भाम या नद्यांना पूर आला आहे. दारणा नदीचे पूरपाणी परिसरातील शेतांमध्ये शिरल्याने भात पिकांचे नुकसान झाले. इगतपुरी तालुक्यात २४ तासात १९३ मि.म‌ि. पावसाची नोंद झाली.
त्र्यंबकमध्ये मुसळधार

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गुरुवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी वेग कायम ठेवला. शुक्रवारी पहाटे पासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. गुरुवार सायंकाळपासून ते शुक्रवार सकाळपर्यंत परिसरात १२५ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी सकाळी तेली गल्ली, मेनरोड आदी भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. गटारी नाल्यांतून पाणी बाहेर फेकले जात असल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. नीलगंगा बाजेने येणाऱ्या प्रवाहात लालमाती वाहून आल्यामुळे मेनरोडवर चिखल झाला होता. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी मनेरोड आणि परिसरात पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेतली.

चांदवड, नांदगावमध्ये दमदार पावसाची गरज

मनमाड ः शहरासह चांदवड व नांदगाव तालुक्यात पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागात समाधान पसरले आहे. भ‌िजपावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, दुबार पेरण्यांचे संकट तुर्तास टळले असले तरी दमदार पावसाची गरत आहे.

कळवणमध्ये संततधार

कळवण ः शहर व तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. लहान मोठ्या धरणांच्या क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तालुक्यात आतापर्यंत सरासरी १२५.७९ म‌ि.म‌ि. पावसाची नोंद आहे. गुरुवारी रात्रीपासून तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली. कळवण शहरात ५३ मिम‌ि पाऊस झाला असून, तालुक्यातील नवी बेज परिसरात ११, मोकभनगी भागात केवळ तीन मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील आभोणा परिसराती ७५ मिम‌ि, कनाशी ५१, दळवट ६० मिमि पावसाची नोंद झाली आहे. चनकापूर धरणक्षेत्रातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

येवल्यात तुरळक सरी

येवला ः गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने तालुक्यात काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. यामुळे शेतकरी सुखावला आहे. पिकांना जीवदान मिळाले आहे. जूनमध्ये दमदार श्रीगणेशा केल्यानंतर दहा पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र पावसाने पुनरागमन केल्यामुळे दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळले आहे.

मालेगावात लपंडाव

मालेगाव : गेल्या महिन्यातील जूनच्या दुसऱ्या पंधरवाडापासून शहर व तालुक्यात पावसाने दडी मारली असून, जुलै अर्धा संपला तरीही पावसाचा लपंडाव सुरूच आहे. शहर व तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाचे ढग दिसत असले तरी पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तालुक्यात अनेक गावांतील पेरण्या खोळंबल्या आहेत.

आतापर्यंत सरासरीच्या १०८ मिम‌ि इतका पाऊस झाला असून, गेल्या पंधरा दिवसात फक्त ९ मिम‌ि पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांनी शेतातील ओलचा अंदाज घेवून पेरण्यांना सुरुवात केल्याने जून अखेर ७५ टक्के पेरण्य पूर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे. येत्या दोन दिवसात पाऊस झाला नाही तर संकट गडद होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेड इन चायना’ला नेटिझन्सकडून दणका

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

भारत आणि चीनचे सध्याचे संबंध सध्या जगभरात चर्चेचा विषय झाले आहेत. भारत-चीनच्या सीमेवरून चीनने घेतलेला पवित्रा मोडीत काढण्यासाठी भारतीय सैन्य दल प्रयत्नशील आहे. त्यांना साथ देत नेटिझन्सनेदेखील ‘मेड इन चायना’ला नाकारून चीनला धडा शिकविण्याची मोहीम हाती घेतली आहे. नेटिझन्सनी चीनच्या वस्तूंविरोधात अनोखी मोहीम सुरू केली अाहे. चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची ऑनलाइन मार्केटमधून ऑर्डर दिली जात असून, या वस्तू पॅकिंग होऊन डिलिव्हरीसाठी यायच्या अगोदरच ती ऑर्डर रद्द केली जात आहे. नेटिझन्सचा हा नवा फंडा चायनामेड वस्तूंच्या ऑनलाइन व्यवहारांना चांगलेच नुकसान पोहोचविताना दिसत आहे.

ऑनलाइन शॉपिंगसाठी असणा-या अनेक वेबसाइटवरून चिनी बनावटीचे मोबाइल, टॉइज, इलेक्ट्रिकल व फॅन्सी वस्तू ऑर्डर केल्या जात आहेत. विशेष म्हणजे ही ऑर्डर केल्यानंतर भारतात वस्तू आल्याचे स्टेटस नेटिझन्सला आल्यावर वस्तूची डिलिव्हरी होण्याअगोदर वस्तूची ऑर्डर रद्द केली जात आहे. ‘सध्या भारत-चीन बॉर्डरवरून चीनची असलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. म्हणून ही ऑर्डर आम्ही रद्द करीत आहोत,’ असे कारण नेटिझन्स कॅन्सल रिझनमध्ये देत आहेत. त्यामुळे चीनमधील ऑनलाइन बाजारपेठांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. यासोबतच ‘चीनला आर्थिकदृष्ट्या झोपवण्याची वेळ आली आहे. चीन भारताची सीमारोषा हळूहळू काबीज करू पाहतोय. गुप्तपणे पाकिस्तानलाही मदत करतोय. तेव्हा आता ही शेवटची वेळ आहे. चीनला गाडून टाकण्यासाठी यापुढे कोणीही चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी करू नये,’ असे मेसेजदेखील व्हायरल केले जात अाहेत.

..

यूसी ब्राउझर अनइन्स्टॉल!

मोबाFल व कॉम्प्युटरवर इंटरनेट सर्फिंगसाठी काहीअंशी यूसी ब्राउझर वापरले जाते. मात्र, ते चीनमध्ये तयार झाले असून, त्याचा सर्व डेटा अॅक्सेस चीनमधूनच होतो. जर भारतीयांनी यूसी ब्राउझर वापरणे बंद केले, तर चीनचे मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे हे ब्राउझर वापरू नका, अनइन्स्टॉल करा, असा मेसेज पाठवत यूसी ब्राउझर अनइन्स्टॉल करून चीनचा निषेध केला जात आहे.

--

चीनमध्ये तयार होणाऱ्या असंख्य वस्तू भारतात वापरल्या जातात. मात्र, चीनच्या सध्याच्या कुरापती पाहता चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणेे गरजेचे आहे.

-साक्षी पाटील, विद्यार्थिनी

--

सर्वच भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. जेव्हा चिनी वस्तूंचा भारतातील खप कमी होईल, तेव्हाच असे घुसखोरीचे प्रकार बंद होतील.

-कैवल्य एखंडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीच्या पुस्तकांचा तुटवडा

0
0

शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पुस्तके नाहीत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता नववीचा अभ्यासक्रम या वर्षापासून बदलला असून, सुधारित पुस्तके तयार करण्यात आली आहेत. मात्र, शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व पुस्तके पडली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सातवीच्या पुस्तकांचे वाटप वेळेत पूर्ण झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पहिल्या दिवशी त्यांच्या हातात पुस्तके असावेत, या उद्देशाने पहिल्याच दिवशी वाटप करण्यात आले. नववी व दहावीची पुस्तके विद्यार्थ्यांना खरेदी करावे लागतात. मात्र, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप सर्व विषयांची पुस्तके मिळालेली नाहीत. बीजगणित, भूमिती, विज्ञान या पुस्तकांचा तर शहरात प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे मागणी असूनही पुस्तक विक्रेत्यांना ती पूर्ण करता येत नसल्याचे उदाहरण आहे.

राज्यभरात हीच परिस्थिती

नाशिकसह मुंबई, पुणे, औरंगाबाद असे राज्यभर नववीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याची परिस्थिती आहे. मराठी माध्यमाचा स्टॉक आहे. मात्र इंग्रजी माध्यमाची पुस्तके नाहीत. सध्या सेमी इंग्रजीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याने इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांना मोठी मागणी आहे. तसेच सुधारित अभ्यासक्रमांची पुस्तके कशी असणार, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

नववीच्या इंग्रजी माध्यमातील गणित, विज्ञान पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, आम्हालाच मर्यादित स्टॉक मिळत असल्याने मागणी पूर्ण करता येत नाही.

- अतुल पवार, अध्यक्ष, नाशिक बुक सेलर्स असोसिएशन

सर्व पुस्तके विक्रेत्यांच्या मागणीनुसार आम्ही उपलब्ध करून दिली आहेत. कुमारभारतीच्या पुस्तकांची कमतरता होती, तीदेखील आता मिटणार आहे. बाकी सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. ज्या विक्रेत्यांकडे तुटवडा असेल त्यांनी ती घेऊन जावीत.

- लक्ष्मण डामसे, भांडार व्यवस्थापक, बालभारती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वितीय वर्षे इंजिनीअरिंग प्रवेशाबाबत संभ्रम

0
0

डिप्लोमाचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

डिप्लोमा इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर डिग्री अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डीटीई म्हणजे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयानुसार प्रथम वर्ष इंजिनीअरिंगमध्ये नापास झालेल्या विद्यार्थांच्या रिक्त जागांवर डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिले जातात. परंतु, गेल्या वर्षी असा निर्णय असतानाही विद्यार्थांना प्रवेशापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे उत्तम गुण मिळूनही विद्यार्थांच्या मनात अशा प्रकारच्या निर्णयांमुळे प्रवेशाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

सर्वसाधारण नियमानुसार प्रथम वर्ष इंजिनीअरिंगमध्ये नापास झालेल्या विद्यार्थांच्या रिक्त जागांवर थेट द्वितीय वर्षासाठी डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थांना प्रवेश दिले जातात. परंतु, या वर्षापासून नापास विद्यार्थांच्या रिक्त जागांवर प्रवेश दिले जाणार नाही, असा नियम करण्यात आल्याने थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगसाठी कमी प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करून लवकरात लवकर थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आमदार सीमा हिरे यांच्याकडे संबंधित विषयाचे निवेदन दिले असून, याविषयी त्या शिक्षणमंत्र्यांशी बोलणार आहेत. यावेळी गुरुमाउली इंजिनीअरिंगचे संचालक तुषार काळोगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. जास्त जागा उपलब्ध नसल्याने चांगले मार्क्स मिळूनही अॅडमिशनबद्दल शंका वाटू लागली आहे.

- अभिजीत वाघ, विद्यार्थी

डीटीईने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे माझे मत आहे. नापास झालेल्या विद्यार्थांच्या रिक्त जागा तशाच ठेवून उरलेल्या जागांवर प्रवेश देण्याची पद्धत चुकीची आहे. अशा निर्णयामुळे डिप्लोमाला उत्तम गुण मिळूनही विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमधील प्रवेशापासून वंचित रहावे लागणार आहे.

- सौरभ भगत, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीच्या याद्या रखडल्या

0
0

सोसायटी सचिवांच्या संपामुळे अचूक आकडे मिळेनात

नाशिक : शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी देण्याच्या घोषणेला २० दिवस उलटूनही लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनी पुकारलेल्या संपामुळे रखडली आहे. तब्बल १८ दिवसांपासून राज्यातील २१ हजार विविध कार्यकारी सोसायटीचे ६५०० हून अधिक सचिव संपावर आहेत. त्यामुळे खरा आकडा पोहचत नसल्यामुळे शासनाचाही गोंधळ उडाला आहे. केवळ ढोबळ माहितीव्दारे शासन आकडेमोड करीत असून, खरा आकडा येईपर्यंत सचिवांचा संप मिटण्याची वाट बघावी लागणार आहे.

शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्याकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे ९५ टक्के कर्ज या संस्थेमार्फतच वाटप केले जाते. या सोसायट्यांच्या सचिवांनी पुकारलेल्या संपामुळे शासनाला मोठा फटका बसला असून, अचूक माहिती मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी पक्षांनी कर्जमाफीची यादी जाहीर करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पण या संपामुळे या याद्या शासनाकडे पोहचणे तूर्त अवघड आहे.

कर्जमाफी करण्याअगोदर शासनाने या विविध कार्यकारी सोसायटीकडून माहिती मागवली होती. त्यात ३१ मार्च २०१६, ३० जून २०१६ व ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा या संस्थांनी दिला. पण कर्जमाफीनंतर शासनाने विविध निकष लावल्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीचा आकडा हाच महत्त्वाचा असणार आहे. राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या संस्थेमार्फतच राज्यात कर्जवाटप केले जाते. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका असतात पण त्यांचा आकडा खूपच कमी असतो.

शेतकऱ्यांची कॅश बँक

शेती उपयुक्त अवजारे, खते, बी-बियाणे, औषधे यासाठी या संस्थांकडून दरवर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाते. या संस्था राष्ट्रीयकृत बँका व सरकारच्या योजना पोहचवण्याचे कामही मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही कॅश बँकच असते. पण या संस्थेचा कारभारच या सचिवांच्या संपामुळे बंद झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील संस्‍थांची आकडेवारी

नाशिक जिल्हा - ११००, गटसचिव - ३११, विविध कार्यकारी सोसायटीचे खातेदार - ७ लाख ९७ हजार ६९७, मार्चअखेर अपात्र खातेदार - १ लाख २० हजार

विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांना शासकीय वेतन द्यावे, त्याचप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे कर्जवाटपावर एक टक्का व्यवस्थापकीय अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्या आहेत. त्याचप्रमाणे विदर्भ व मराठवाड्यात कुठे दीड तर कुठे एक वर्षापासून पगार थकलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात तीन महिने पगार नाही. त्यामुळे आमच्या या मागण्या शासनान मान्य कराव्या. या मागणीसाठी आम्ही १८ तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे आंदोलन करणार आहोत.

- विश्वनाथ निकम, अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘फडणवीस वॉटर पार्क’

0
0

नाशिकः महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोरील त्र्यंबकेश्वर रोडवर व्हिक्टर कंपनीला लागून तळे साचले होते. साचलेल्या पाण्यात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. नाशिकला दत्तक घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा ‘फडणवीस वॉटर पार्क’ असा फलक झळकवत घोषणाबाजी केली. तसेच या साचलेल्या पाण्यात टायर टाकून पोहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी सेनेचे महानगरप्रमुख संदीप गायकर यांच्यासह विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी रस्त्यावर, ठेकेदार गायब

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नालेसफाईअभावी पहिल्याच पावसात शहराच्या उडालेली दैनेकडे प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी पुन्हा नाशिककरांना त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. पहिल्या पावसात केवळ काही भागापुरते मर्यादीत असलेले संकट शुक्रवारी संपूर्ण शहरभर दिसले. पावसामुळे सर्व रस्ते जलमय होऊन जागोजागी तलाव तयार झाले होते. भुयारी गटार आणि नालेही तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. परंतु, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह सर्व अधिकारी शुक्रवारी रस्त्यावर होते, तर दुसरीकडे नालेसफाईचा ठेका दिलेले ठेकेदार गायब असल्याचे चित्र होते.

शहरात नालेसफाईचा घोळ सुरू असतानाच, शुक्रवारी पुन्हा पावसाने झोडपून काढले. रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग न होताही गोदावरी दुधडी भरून वाह‌िली. शहरातील पाणी भुयारी गटारीऐवजी थेट नदीतच मिसळल्याने नदीला पूर आला होता. दिवसभर चालणाऱ्या पावसामुळे पाणी गटार-नाल्यांऐवजी रस्त्यानेच नदीला मिळत असल्याचे चित्र होते. सर्व नाले व गटारीही तुंबल्याने रस्तेच प्रवाहीत झाले होते. या पावासमुळे रस्त्याची धूळधाण उडाली असून शहराचा तलाव झाला होता. या बिकट परिस्थितीत नालेसफाईचे काम दिलेले ३१ ठेकेदार मात्र गायब होते. आयुक्त अभिषेक कृष्णा आणि सहा विभागीय अधिकाऱ्यांनी दिवसभर शहरात फिरून पावसाचा आढावा घेतला. तसेच शक्य त्या ठिकाणी पालिकेची यंत्रणा लावून रस्ते, नाले मोकळे केलेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. परंतु, ज्या ठेकेदारांना नालेसफाईचे काम दिले होते, ते ठेकेदार मात्र रस्त्यावर काम करतांना कुठेही दिसले नाही.


महापौरांचे सोपस्कार

शहरातील पावसाचा अंदाज घेतल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी सकाळी पालिकेत तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्कतेच्या व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. तसेच आपत्कालीन कक्ष सज्ज करण्याचे आदेश दिले. परंतु, एवढीच तत्परता ही नालेसफाईच्या चौकशीत दाखवली असती तर आज नागरिकांना काह‌िसा दिलासा मिळाला असता.


नालेसफाईच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने शहराची आज ही अवस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी आपसात भांडत बसण्यापेक्षा नागरिकांना त्रास होईल असा कारभार करू नये. या परिस्थितीवर लवकर तोडगा काढला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा खळाळली...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर व जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गोदावरी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच खळाळली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घोटी- सिन्नर रस्त्यावरील देवळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर सुरगाणा तालुक्यात बुडळी येथील पाझर तलाव फुटल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. रात्रीतून पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ४४८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जुलैचा पहिला पंधरवडा कोरडा जातो की काय, अशी शक्यता असताना जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटापासून बळीराजाची मुक्तता होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे सरकला असून, पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सक्रिय झाला असून, दोन दिवस मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाचा चांगला जोर आहे. पाण्याअभावी संकटात सापडलेल्या खरीप व भाजीपाला पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

धरणातून पाण्याचा विसर्ग

दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज दुपारी एकपर्यंत दारणा धरणातून ५१०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी चारनंतर १२ हजार ७५१ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारी पावसाचा जोर ओसरताच विसर्ग कमी करण्यात आला. गंगापूर धरणात पाण्याची पातळी वाढत असून शनिवारी येथून विसर्ग करावा लागेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तेथील पाण्याचा प्रवाह गोदावरीस येऊन मिळत आहे. त्यामुळे दिवसभरात सुमारे २० हजार क्युसेक इतके पाणी गोदावरीत येऊन मिळाले. त्यामुळे पुरसदृश स्थ‌िती निर्माण झाली.

पुलाला भगदाड; पाझरतलाव गेला वाहून

घोटी-सिन्नर मार्गावर देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला भगदाड पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तातडीने पुलाचे काम करण्याबाबत सूचना केल्या. सुरगाण्यात बुडळी येथील पाझर तलाव फुटल्याने पाणी परिसरातील शेतीत शिरून नुकसान झाले. सायखेड्यात पुलाला पाणवेलींचा विळखा पडल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला. स्थानिक प्रशासनाने तातडीने या पाणवेली हटविण्याचे काम हाती घेतले.

तीन तालुके कोरडेच

जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पावसाचा जोर असताना मालेगावसह तीन तालुके कोरडेच राहिले, तर कळवणसह तीन तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी दिवसभरात बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुके कोरडेच राहिले, तर देवळ्यात ३.२, चांदवडमध्ये १.२ आणि येवल्यात १ मिलिमीटर पाऊस झाला.

तालुकानिहाय शुक्रवारी झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पेठ ९६.२, इगतपुरी ८१, त्र्यंबकेश्वर ७८, सिन्नर ५४, सुरगाणा ४९, नाशिक ३३, निफाड २०, कळवण १०, देवळा ३.२, चांदवड १.२, येवला ०१, नांदगाव ००, मालेगाव ००, बागलाण ००.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर सिक्युरिटीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त तरूण वर्गासाठी विस्डम एक्स्ट्रातर्फे सायबर सिक्युरिटी या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आजच्या इंटरनेटच्या युगात आपली माहिती गोपनीय व सुरक्षित करण्याची गरज बघता सर्व पदवीधरांसाठी व उच्च पदवीधरांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत सायबर आयटी सिक्युरिटीचे अमर ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सायबर सिक्युरिटीबाबत सर्व शंकांचे निरासन केले. विस्डम एक्स्ट्रातर्फे आयोजित कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक संचालक संपत चाटे उपस्थित होते. तसेच शंकर जाधव, महाराष्ट्र उद्योजकता विकासचे अलोक मिश्रा, नाशिक पोलिसच्या दीपाली नेटके आदी यावेळी उपस्थित होत्या. निवेदिता करकडे यांनी आभार मानले. तसेच कार्यक्रमाचे आयोजनात विस्डम एक्स्ट्रातर्फे योगेश बोरसे व यश कडवे यांचा सहभाग होता. विस्डम एक्स्ट्रा प्रा. लि.च्या संचालिका दीपाली चांडक यांनी या कार्यशाळेकरिता १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदासच्या विलयाने बांधली मोट

0
0

नाशिक ः मरणात खरोखर जग जगते, अशी जुनी उक्ती आहे, ती खरी ठरली आहे महाकवी कालिदास कलामंदिराच्या जीर्णोद्धारामुळे. कालिदास कलामंदिर आता वर्षभर बंद राहणार ही भावना अनावर होऊन वेगवेगळ्या रंगकर्मींच्यावतीने ‘का‌लिदास’ला मानवंदना दिली जात आहे. वैयक्तिक हेव्यादाव्यांनी आणि गटातटाच्या राजकारणाचा शिक्का बसून नेहमीच चर्चेत राहत असलेले ३५ दिग्गज रंगकर्मी एका नाटकाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. कालिदासला मानाचा मुजरा करण्यासाठी का होईना, या कलावंतांची एकत्र मोट बांधण्याला यश आले आहे.

महाकवी कालिदास कलामंदिर १६ जुलैपासून बंद राहणार असल्याने कलामंदिराला मानाचा मुजरा करण्यासाठी नाशिककर कलावंत विविध नाटकांचे प्रयोग करीत आहेत. याच श्रृंखलेचा एक भाग म्हणून सुरभी थिएटर्सतर्फे ‘तीन पैशांचा तमाशा’ या सुप्रसिध्द नाटकाचा प्रयोग होणार आहे. विनोदाचे बादशहा पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून ज‌िवंत झालेले हे नाटक आहे.

शनिवार, १५ जुलै रात्री ९ वाजता कालिदास कलामंदिर येथे हे दोन अंकी नाटक होणार आहे. या नाटकाचे विशेष म्हणजे ३५ ज्येष्ठ व प्रथितयश कलाकार प्रथमच यात एकत्र येत आहेत. आपआपसातील भेद, तंटे बाजूला ठेवून कालिदास कलामंदिराच्या पुनरूज्जीवनाआधी त्याला मानाची वंदना देण्यासाठी कलाकार एकत्र येत असल्याने नाट्यवर्तुळात या नाटकाबाबत प्रचंड कुतुहल आहे.

या नाटकातून पैसा कमविणे हा उद्देश नसून सर्व रसिकांसाठी हे नाटक विनामूल्य ठेवण्यात आले आहे. नाटकाला कोणतेही ति‌कीट नाही. सर्व खर्च निर्माता व दिग्दर्शक राजेश शर्मा हेच उचलत असून नटेश्वराला नाशिककरांची श्रध्दा अर्पण करण्यासाठी या नाटकाची योजना असल्याचे मत शर्मा यांनी व्यक्त केले. या नाटकात केवळ संवाद नाहीत तर वाद्यवृंद आहेत, गाणे आहे. भरपूर तालीम केल्यानंतर हे नाटक प्रेक्षकांसमोर येत आहे.

हे कलावंत येणार एकत्र

नाटकाची निर्मिती व दिग्दर्शन राजेश शर्मा यांचे आहे. संगीत संयोजन राजन अग्रवाल, अजय गायकवाड तर नेपथ्य सुनील परमार यांचे आहे. प्रकाशयोजना विनोद राठोड यांची तर रंगभूषा माणिक कानडे यांची आहे. वेशभूषा प्रिया तुळजापूरकर यांची आहे. या नाटकात प्रशांत हिरे, सचिन शिंदे, श्रीपाद कोतवाल, विजय शिंगणे, योगेश वाघ, राजेश आहेर, डी. डी. पवार, शिवा देशमुख, किरण कुलकर्णी, सतीश वराडे, आनंद गांगुर्डे, राहुल काकड, राहुल सूर्यवंशी, महेश बेलदार, शुभम लांडगे, जयप्रकाश पुरोहित, राजू क्षीरसागर, लक्ष्मी पिंपळे-गाडेकर, कविता आहेर, पूनम देशमुख, कीर्ती नागरे, स्वाती माळी, तेजस्विनी गायकवाड, स्वराली हरदास, तेजस्विनी देव, स्वाती शेळके यांच्या भूमिका आहेत. नाटकाचे व्यवस्थापन नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव बघत आहेत.


सर्व कलावंतांना एकत्र करण्यामागे कालिदास ही वास्तू कारणीभूत आहे. या वास्तूने अनेकजणांना घडवले आहे. जुन्या वास्तूची जी सेवा केली त्यासाठी अभिवादन व नव्या वास्तूचे स्वागत करण्यासाठी ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाचा प्रयोग ठेवलेला आहे. त्या‌निमित्ताने सर्व एकत्र आले आहेत ही आनंदाची बाब आहे.

- राजेश शर्मा, निर्माता-दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंक्चरच्या ठिकाणी दुभाजक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिका हद्दीतील त्र्यंबकरोडवर गरज नसलेल्या ठिकाणी ठेवलेले पंक्चर पोलिसांच्या बॅरिकेडिंगचे दुभाजक लावून बंद करण्यात आले आहेत. यासंदर्भात ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वाहतूक पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ही कार्यवाही केली आहे. नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक पोलिसांनी अचानक दुभाजक टाकल्याने काही वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु, वाढलेल्या अपघातांची व्याप्ती बघता अतिरिक्त पंक्चरच्या ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांची कायमच मोठी गर्दी होत असते. त्यामुळे साहजिकच त्र्यंबकरोडवरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. परंतु, महापालिकेच्या हद्दीत असलेल्या त्र्यंबकरोडवर गरज नसलेल्या ठिकाणी पंक्चर ठेवण्यात आले होते. संबंधित पंक्चरच्या ठिकाणी रोजच अपघातांची मालिका सुरू होती. सातपूर औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या त्र्यंबकरोडवर झालेल्या अपघातांत अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. रोजच किरकोळ अपघात होत असल्याने ‘मटा’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वाहतूक पोलिस प्रशासनाने अतिरिक्त ठेवण्यात आलेल्या पंक्चरच्या ठिकाणी लोखंडी दुभाजक टाकले आहेत. अपघात होत असलेल्या त्र्यंबकरोडचे ग्रहण या दुभाजकांमुळे तरी सुटावे, असा आशावाद वाहनचालकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्र काळवंडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

संततधारेने गोदापात्राच्या उताराच्या दिशेने शहरातील पाणी वाहून जात असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. गटारींचे ओव्हर फ्लो झालेले चेंबर, तसेच नाल्यांचेही पाणी काही भागात थेट गोदापात्रात मिसळत असल्याने नदीचा प्रवाह काळाकुट्ट झाल्याचे दिसून आले.

पूरपरिस्थिती उद्भवल्यामुळे रामकुंड परिसर, तसेच गोदाघाटाच्या परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या वर्षीच्या पुराचा धसका घेतलेल्या व्यावसायिकांनी दुकाने उघडण्याच्या अगोदरच गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने दुकानदारांना आपापल्या दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी धावपळ उडाली होती. पावसाळी गटार, तसेच भुयारी गटारांचे घाण पाणी नदीपात्रात वाहून आल्याने या पाण्याला प्रचंड दुर्गंधी पसरली होती. मागील वर्षीही अशाच प्रकारे गटारीचे पाणी थेट नदीपात्रातून वाहत होते.

महिनाभरापूर्वी पडलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले होते. प्लास्टिकच्या पिशव्या गटारीत अडकल्याने ड्रेनेज, नाले तुंबले होते, तशीच स्थिती शुक्रवारीही दिसून आली.

पावसाळी गटार योजना आणि भुयारी गटार योजना या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. तरीही पावसाळी गटारी या भुयारी गटारींना जोडल्यामुळे भुयारी गटारीचे चेंबरचे ढापे निघून ते पाणी थेट गोदापात्रात येते. त्यामुळे या पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटते. ही परिस्थिती गेल्या तीन-चार वर्षांपासून उद्भवत आहे.

--

गोदावरी नदीला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतरच पूर येतो. सध्या धरणातून पाणी सोडले नसले, तरी पूर येऊ लागला आहे. गटारींच्या कामासाठी ८४० कोटी रुपये महापालिकेने खर्च केले आहे. त्या कामाचा बोऱ्या वाजला आहे. त्यामुळे गोदावरी गटारगंगा झाली आहे.

-देवांग जानी, गोदाप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबडला कारखाने जलमय

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहर परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी दुकाने, घरांत शिरल्याने शुक्रवारी रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अंबड औद्योगिक वसाहतीतदेखील काही कारखान्यांत पावसाचे पाणी शिरल्याने संबंधित कारखाने बंद ठेवण्याची स्थिती ओढावल्याचे दिसून आले. पावसाळी पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्रोत लुप्त झाल्याने पावसाचे पाणी कारखान्यांमध्ये जात असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. पावसाळ्याअगोदर असे पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच करण्यात आली नसल्याची बाबही यामुळे उघड झाली आहे.

दर वर्षी जोरदार पाऊस पडल्यावर अंबड औद्योगिक वसाहतीत कारखान्यांमध्ये पाणी शिरते. यावर ठोस उपाय करण्याची मागणी आयमाने महापालिकेकडे केली होती. परंतु, उपाययोजना न झाल्याने जोरदार पावसात वेगाने येणाऱ्या पाण्याला वाट मिळत नसल्याने ते थेट कारखान्यांमध्ये शिरत आहे. शुक्रवारी दिवसभर झालेल्या पावसाने अंबड एमआयडीसीतील इ व डी सेक्टरमधील कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने काही वेळ काम बंद ठेवावे लागले. आयमाचे संचालक सुदर्शन डोंगरे व दिलीप वाघ यांनी कारखान्यांचा पाहणी दौरा करीत जेसीबीच्या साहाय्याने पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली. पावसाळ्याअगोदर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली जात नसल्याने दर वर्षी कारखान्यांमध्ये पाणी शिरून मालकांना त्रास सहन करावा लागतो. यावर महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

--

अंबड औद्योगिक वसाहतीत वाढत्या कारखान्यांच्या जाळ्यात नैसर्गिक नाल्यांची सफाईच केली गेलेली नाही. त्यामुळे कारखान्यांत पाणी शिरते. पावसाळ्यापूर्वीच महापालिकेने याबाबत उपाययोजना केली पाहिजे.

-सुदर्शन डोंगरे, संचालक, आयमा

--

स्लम भागात घरांत पाणी

सातपूर भागात असलेल्या स्वारबाबानगर व संत कबीरनगर येथील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भरपावसात साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली. संत कबीरनगर या स्लम भागात भोसला शाळेच्या भिंतीलगत असलेल्या घरांमध्ये सर्वाधिक पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांना हाल सहन करावे लागले.

--

खासगी ठेकेदार गायब

सातपूर विभागात गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेज विभागात खासगी ठेकेदारांची मोठी चलती आहे. नेहमीच तत्परता दाखवीत ड्रेनेजचे चोकअप काढण्याची कामे मोठ्या झपाट्याने केली जातात. विशेष म्हणजे ड्रेनेज तुंबल्यावर खासगी ठेकेदार पैसे मिळत असल्याने तत्काळ कामे करीत असतात. परंतु, पावसाचे पाणी काढण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नसल्याचा आरोप ड्रेनेज विभागाच्या कामगारांनी केला आहे. नेहमीच ड्रेनेज चोकअप काढल्याची खोटी बिले सादर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही परिसरातून केली जात आहे. जेट मशिनने दिवसभरात चार किंवा पाच चोकअपच्या समस्या मिटत असताना दहा समस्या नक्की कशा सुटतात, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० टक्केच प्रवेश निश्चित

0
0

अकरावी प्रवेश; २२९३ कोटा प्रवेश निश्चित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी केंद्रियकृत प्रवेशप्रक्रियेची पहिली यादी १० तारखेला जाहीर झाल्यानंतर १४ तारखेपर्यंत ५० टक्केच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. १४ हजार ९६५ विद्यार्थ्यांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत जाहीर झाली होती, त्यापैकी ७ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे म्हणजेच ५० टक्क्यांच्या आसपास प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.

यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्जात विनाअनुदानित कॉलेजांची नावे दिली. परंतु, प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी या कॉलेजांची फी जास्त असल्याने विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलून घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे असे विद्यार्थ्यांचे पुढील यादीकडे लक्ष असणार आहे. १५ ते १८ जुलै (रविवार वगळून) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरणे आणि ज्यांनी अर्ज भरला नसेल त्यांना भाग १, २ भरण्याची मुदत देण्यात आली आहे. २० जुलैला दुसरी गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता वेबसाइटवर जाहीर होणार आहे. तसेच संबंधित ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेशही घेता येणार आहे.

एकूण प्रवेश १० हजार

पहिल्या गुणवत्ता यादीतील ७ हजार ७७४ व कोट्यातील ७ हजार ५९० जागांपैकी २२९३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. असे एकूण १० हजार ४७ विद्यार्थ्यांची अकरावीसाठी प्रवेशनिश्चिती झाली आहे.

अद्याप अर्ज केला नसल्यास

ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेचे अर्ज भरलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी १५ आणि १७ तारखेला बिटको, बीवायके व पंचवटी या कॉलेजांमध्ये प्रवेश अर्ज भरावे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी प्रथम अनुदानित कॉलेजांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रिय प्रवेश नियंत्रण समितीकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरण @ ६२ टक्के

0
0

पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

म. टा. प्रतिन‌िधी, नाशिक

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरसह बहुतांश तालुक्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढण्यास मदत झाली आहे. गंगापूर धरण निम्म्याहून अधिक भरले असून, पाणीसाठा ६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात धरणामधील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला. २४ तासांत २० टक्के पाणीसाठा वाढला असून, जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठाही ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

तब्बल १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाला. सायंकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस सुरूच होता. या पावसामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे. गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा २५५१ दशलक्ष घनफुटांवरून ३४०० दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका दिवसात ८४९ दशलक्ष घनफुटांनी पाणीसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ३६ वरून ४१ टक्क्यांवर पोहोचला. शुक्रवारी सकाळपर्यंत काश्यपीतील पाणीसाठा तीन टक्क्यांनी, गौतमी गोदावरीतील पाणीसाठा चार टक्क्यांनी, तर आळंदी धरणातील पाणीसाठा पाच टक्क्यांनी वाढला.

२४ पैकी १९ धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततधारेने गोदावरीला पहिला पूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून हजेरी लावणाऱ्या दमदार पावसामुळे बळीराजासह नाशिककरदेखील सुखावले आहेत. शहरात निर्माण झालेली पुरसदृश परिस्थ‌िती पाहण्यासाठी नागरिकांनी गोदाघाटासह सोमेश्वर परिसरात गर्दी केली. या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीपातळीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली असून, शहरासह आसपासच्या परिसराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरवास‌ियांच्या दिवसाची सुरुवातच पावसाच्या दर्शनाने झाली. गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ या २४ तासांत शहरात ७१.६ मिल‌िमीटर पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ३८.८ मिमी पावसाची नोंद झाली. नाल्यांमधील सांडपाणी नदीपात्रात मिसळल्यामुळे महापालिकेच्या पावसाळीपूर्व कामांचा पुन्हा एकदा फज्जा उडाला. पंचवटीत महापालिका कार्यालयासमोर झाड उन्मळून पडले, तर हनुमानवाडीतील नाल्यात शाळकरी मुलगा वाहून गेल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. परंतु, या घटनेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. गाडगे महाराज पुलाजवळून वाहून चाललेली दोन वाहने वाचविण्यात नागरिकांना यश आले. तर जुन्या नाशिकमध्ये एक वाडा कोसळला. दुपारनंतर मात्र पावसाने ब ऱ्यापैकी उघडीप दिल्याने जनजीवन पुर्वपदावर येण्यास मदत झाली.

सतर्कतेचा इशारा

मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे नाले, ओढे, ओहोळ, छोटी-मोठी गटारे, नदीपात्रात पुराचे पाणी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी. लहान मुले, विद्यार्थी, नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी जाऊ नये. तसेच नदीकाठावर आणि पुलांवर गर्दी करू नये. सर्व प्रकारच्या विद्युत तारा व विद्युत खांबांपासून दूर रहावे. पाण्यातील विद्युत खांब, तारा व विद्युत उपकरणांना हात लावू नये तसेच सेल्फीच्या मोहापासून स्वत:ला सावरावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

येथे साधा संपर्क

नागरिकांनी गरज भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष (टोल फ्री-१०७७, दूरध्वनी -२३१५०८०/ २३१७१५१), नाशिक शहर पोल‌िस नियंत्रण कक्ष-(टोल फ्री क्र.-१००, दूरध्वनी-२३०५२३३/२३०५२०१/२३०५२००), पोल‌िस नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष (दूरध्वनी : २३०९७१५/२३०९७१८/२३०९७००/२३०३०८८ या क्रमांकावर संपर्क साधावा. शहरात पाणी साचणे, तुबंणे, वृक्ष किंवा इमारत कोसळणे, सर्व प्रकारचा शोध व बचावासाठी नाशिक महापालिका नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्र. २२२२४१३/२५७१८७२) अग्निशमन विभाग (दुरध्वनी क्र. २५९०८७१/२५९२१०१/२५९२१०२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

पंचवटीत झाड पडले

पंचवटी ः महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयासमोरील मखमलाबाद रस्त्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कडुनिंबाचे झाड उन्मळून पडले. झाडाखाली उभ्या असलेल्या दोन चारचाकी आणि एका दुचाकी वाहनावर ते पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. झाडामुळे विजेच्या तारा तुटल्या. त्या तारा रस्त्यावर पडल्या होत्या. विद्युतपुरवठा सुरू असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. विद्युत पुरवठा खंड‌ित करेपर्यंत येथील नागरिकांना घराबाहेर पडू दिले नाही. त्यामुळे अनर्थ टळला. पहाटेच्या सुमारास कडूनिंबाचे झाड पडल्याची माहिती उद्यान निरीक्षक राहुल खांदवे यांना कळविण्यात आली. माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. झाड वाहनांवर पडले त्यापेक्षाही येथील विद्युत पोलवर पडून झाडामुळे तारा तुटल्या होत्या. या तारा रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहात पडल्या होत्या. येथील विद्युत पुरवठा खंडित केल्याशिवाय पर्याय नसल्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलण्याचे टाळले. त्यामुळे येथील नागरिकांचा संताप अनावर झाला होता. मुर्तडक यांनीही संपर्क साधून या कर्मचाऱ्यांना खडसावले. विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर येथील झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या. झाडाखाली अडकलेल्या स्व‌िफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे.

कंपन्यांमध्ये शिरले पाणी

सातपूरः अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांत पावसाचे पाणी शिरल्याने काम बंद करण्याची वेळ आली. पावसाळ्याअगोदर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात न आल्याने कारखान्यांमध्ये पाणी शिरत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. पावसाचे पाणी कारखान्यात शिरल्याने आयमाचे संचालक सुदर्शन डोंगरे व दिलीप वाघ यांनी जेसीबीच्या सहाय्याने पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली.

विभागीय कार्यालय तळ्यात

जोरदार झालेल्या पावसाने सातपूर विभागीय कार्यालय परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. बैठकीला आलेल्या नगरसेवकांनादेखील पाण्यातून कार्यालयात जाण्याची वेळ आली. पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने तळे साचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव ढगा परिसरात झालेल्या पावसाने नंदिनी नदीला पूर आला होता.


नंदिनीलगतच्या रहिवाशांना हलविले

सिडको/इंदिरानगर ः मुसळधार पावसामुळे सिडको व इंदिरानगर भागातील रस्त्यांवर पाणी साचून ड्रेनेजच्या ढाप्यांमधून पाणी रस्त्यावर येत होते. नंदिनीला पूर आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने त्रिमूर्ती चौक परिसरातील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. सिडकोत ड्रेनेज चोकअप झाल्याने ते दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून सुरू होते. तळघरांत दुकाने असलेल्यांचे मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनकोट नमुने तपासणी संशयास्पद?

0
0

औषधे तपासण्याच्या कंपनीत रेनकोटची गुणवत्ता तपासली,

नाशिक : आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांना अव्वाच्या सव्वा दरात पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोट लॅबमधील नमुने तपासणीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या लॅबमधून रेनकोटचे नमुने तपासण्यात आले, ती लॅब ही फार्मास्युटीकल प्रॉडक्ट तपासणीसाठी आहे. त्यामुळे या रेनकोटची गुणवत्ताही संशयास्पद असून, त्यांचीही पुन्हा नव्याने तपासणी करण्याची आवश्यकता आहे. रेनकोट तपासणी फॉर्मास्युटीकल लॅबमधून कशी होऊ शकते, असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

आदिवासी विभागात कोणत्याही वस्तू अथवा साहित्याचा पुरवठा करायचा असेल, तर प्रथम निविदा प्रक्रियेतून जावे लागते. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंपन्यांना आपल्या वस्तू व साहित्य हे सरकारी वा निमसरकारी लॅबमधून तपासणी करून घ्यावे लागते. सरकारने सूचविलेल्या लॅबमधून या वस्तूंची निविदेत दिलेल्या अटींप्रमाणे तपासणी करून घेतली जाते. परंतु, या तपासण्या लॅबही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ठेकेदार आपले नमुने पास व्हावेत, यासाठी लॅबही मॅनेज करीत असल्याचे रेनकोट प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. नाशिक विभागात पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोटची तपासणी ही गोरेगाव येथील पॅरालॅब प्रा. लिमिटेड येथून करण्यात आली आहे. परंतु, सदर लॅबमध्ये फार्मास्युटीकल, फुड्स, पेस्टीसाईड, कॉस्मेटीक, केमिकल्स या उत्पादनांची तपासणी केली जाते.

रेनकोट नमुने तपासणीचा या लॅबशी कोणताही संबंध नाही. परंतु, विभागातील ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून या लॅबमधून आपले नमुने पास करून आणले आहेत. त्यामुळे एकूणच या रेनकोटची गुणवत्ताही संशयास्पद असल्याने सर्वच मामला गोलमाल असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नमुने तपासणी ही विभागामार्फतच केली जाते. सर्व प्रकल्प कार्यालयांनी नमुने तपासणीसाठी एकच लॅब निवडल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रेनकोटची खरेदी ही ठेकेदारांना समोर ठेवूनच केल्याचे या सगळ्या प्रकारावरून दिसून येत आहे. रेनकोटची खरेदी आणि नमुने तपासणी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

लॅबचे गोलमाल उत्तर

संबंधित लॅबच्या संचालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी गोलमाल उत्तरे दिली. कंपनीचे संचालक सेहूल मेहता यांनी सध्या आमच्याकडे तांत्रिक व्यक्ती उपलब्ध नसल्याने तपासणी बंद असल्याचे सांगितले. ती तपासणी कधीपासून बंद आहे, यावर स्पष्ट उत्तर देणे त्यांनी टाळले. संबंधित लॅबचा संगणक बघून तारीख सांगतो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. रेनकोटची तपासणी केली जाते काय अशी विचारणा केल्यावर नंतर फोन करतो असे सांगून त्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे एकूणच या तपासणीवर संशय बळावला आहे.

रेनेकोटची खरेदी आणि नमुने तपासणी ही एकूण सर्व प्रक्रियाच संशयास्पद आहे. ठेकेदार आणि अधिकारी हे मिळून विभागाची लूट करीत असून, या सर्व प्रकाराची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. दोषींवर आदिवासी विकास मंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे.

- रवींद्र तळपे, माहिती अधिकार कार्यकर्ता, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images