Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अन् जाहिरातबाजी थांबली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील बस स्टॉपच्या निवारा शेडवरील खानावळीचा जाहिरात फलक अखेर हटविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे करन्सी नोट प्रेससमोरील निवारा शेडमधील पोस्टाची पेटीदेखील काढण्यात स्थलांतरित करण्यात आली आहे. याबाबत ‘मटा’मध्ये नुकतेच छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन ही कार्यवाही करण्यात आल्याने फुकटची जाहिरातबाजी थांबल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या परिसरातील निवारा शेडचे विद्रुपीकरण दूर करून त्यांची दुरुस्ती करण्याची मागणीदेखील परिसरातून करण्यात येत आहे.

जेलरोड येथील महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्राशेजारील बस स्टॉपवर प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. मात्र, परिसरातील एका खानावळ मालकाने मोठा बोर्ड करून तो या बस स्टॉपच्या निवारा शेडवर लावला. त्यात पत्ता व फोन नंबरही दिला होता. या फलकामुळे हा बस स्टॉप आहे, की हॉटेल असा प्रश्न प्रवाशांना पडत होता. हा फलक कोसळून प्रवासी जखमी होण्याचीही भीती होती. ‘मटा’मध्ये याबाबत छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हा फलक हटविण्यात आला आहे.

--

पोस्टानेही केली कार्यवाही

जेलरोडला करन्सी नोट प्रेससमोरील बस स्टॉपवर बस कधीच थांबत नसल्याच्या तक्रारी आहेत. या निवारा शेडमध्ये भाजीविक्रेते आपल्या वस्तू त्यात ठेवतात. या शेडमध्येच पोस्टाची पेटीदेखील लावण्यात आलेली होती. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत ‘मटा’मध्ये छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध होताच ही पेटी संबंधित विभागाने काढून घेतली आहे. नाशिकरोडचे पोस्टमास्तर सुधाकर जाधव यांनी कर्मचारी पाठवून ही पेटी काढली आणि शेजारी असलेल्या प्रेसच्या जाळीवर बसविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारवाई घटली; दंडात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक विभागाच्या नुकत्याच सुरू झालेल्या चार कार्यालयांनी कामकाजास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम दिसून येत असून, रोजच्या कारवाईचा आकडा पावणेसहाशेच्या घरात पोहचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कारवाईचा आकडा खूपच कमी असून, दंडाचा आकडा मात्र तुलनेने जास्त आहे.

पोलिस स्टेशनच्या धर्तीवर वाहतूक शाखेचा विस्तार करण्यात आला असून, शहरात चार वाहतूक कार्यालये सुरू झाली आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या दुप्पट झाली असून, कारवाईचे प्रमाणदेखील वाढले आहे. गुरुवारी (दि. ६ जुलै) वाहतूक शाखेने ५७० बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यापूर्वी दिवसभरात फारतर ३०० केसेस होत होत्या. मात्र, गतवर्षीचा विचार करता यंदा कारवाईत मोठी घट झाल्याचे दिसते. गतवर्षी वाहतूक शाखेने एक लाख १२ हजार ३८ केसेस करून एक कोटी १८ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. तेच यंदा मात्र ६१ हजार १०६ केसेस झाल्या आहेत. दंडाचा आकडा मात्र एक कोटी ४९ लाख ३६ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचला. दंडाच्या रकमेत झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. वाहतूक शाखेच्या एकूण कामगिरीबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, पूर्वी केंद्रीय पध्दतीने काम होत होते. आता चार विभागीय कार्यालये सुरू झाली असून, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. ही विभागीय कार्यालये पोलिस स्टेशन धर्तीवर सुरू झाली असून, संबंध‌ित पोलिस निरीक्षकांना हद्द तसेच कारवाईची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, द्वारका, त्र्यंबकरोड किंवा फारतर रविवार कारंजा परिसरात कारवाई करणारे वाहतूक पोलिस या भागातून बाहेर पडले आहेत. ठराविक भागात वर्षानुवर्षे नियमबाह्य वाहतूक करणारे वाहनचालक यामुळे कारवाईच्या टप्प्यात पोहचल्याचा दावा पाटील यांनी केला. इंदिरानगर अंडरपासचा प्रश्न जवळपास मार्गी लागला आहे. द्वारकेचा प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरू असून, जेहान सर्कल तसेच एबीबी सर्कल काढून तिथे सिग्नल्स बसवण्यात आले. वाहतूक विभागाच्या आणखी काही योजना प्रस्तावीत असून, यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर संक्रात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.


..तर करा तक्रार

वाहतूक विभागातच ठिय्या मांडून आर्थिक देवाण-घेवाण करण्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आता सर्वच कर्मचारी नवीन असून, सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही वाहतूक पोलिसांकडून अनधिकृत पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी असतील तर नागरिकांनी लागलीच त्याची तक्रार करावी. वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याविषयी कारवाई करतील, असे पोलिस उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.


गतवर्षीच्या केसेस- १,१२,०३८

चालू वर्षीच्या केसेस- ६१,१०६


गतवर्षीचा वसूल दंड - १,१८,८४,७००

चालू वर्षीचा दंड- १,४९,३६,८००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चासाठी दिंडोरीत बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

येत्या ९ ऑगस्टला मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चा होणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी दिंडोरी तालुक्यातून रणशिंग फुंकण्यात आले आहे. या मोर्चात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गनिमी काव्याने या मूक मोर्चाद्वारे सरकारला अंतिम इशारा देण्याचा इरादाही सकल मराठा समाजाने घेतला आहे.

दिंडोरी येथील कै. पोपटराव जाधव संकुल येथे सकल मराठा क्रांती मोर्चाची मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासंदर्भात बैठक रविवारी (दि. ९) पार पडली. यावेळी आमदार सीमा हिरे, छावाचे करण गायकर, गणेश कदम, चंद्रकांत बनकर, तुषार जगताप, योगेश नाटकर, डॉ.अमोल वाजे, योगेश निसाळ आदींनी मार्गदर्शन केले. मुंबई मोर्चात दिंडोरी तालुक्यातून सर्वाधिक समाजबांधव सहभागी होती, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

दिंडोरी तालुक्याच्या प्रत्येक गावात मोर्चाच्या नियोजनाच्या बैठका घेण्यात येणार असून, यात प्रामुख्याने मराठा आरक्षण, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, कोपर्डीतील घटनेतील आरोपींना कठोर शासन, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व समाजाने एकत्रित येत मोर्चा शिस्तबद्ध, शांततेत, आदर्शवत काढावा यासाठी सर्व समाजबांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीचे नियोजन सोमनाथ जाधव, रवी जाधव, गंगाधर निखाडे, संदीप जगताप, सुजित मुरकुटे, रावसाहेब बोरस्ते आदींनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोक अदालतीत २१४२ प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित तसेच दावापूर्व प्रकरणांपैकी दोन हजार १४२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात न्यायालयीन प्रलंबित एक हजार ९८ आणि दावापूर्व एक हजार ४४ प्रकरणांचा समावेश आहे. लोक अदालतीमध्ये प्रलंब‌ित सहा हजार ७१० प्रकरणे आणि दावापूर्व दाखल अशी एकण १२ हजार ९१२ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

दूरध्वनी कंपन्या, वाहतूक पोलिस व बँक वसूली अशा दाखलपूर्व खटल्यात एकुण ७४ लाख २८ हजार ५११ रूपये तर मोटार अपघातातील नुकसान व दंडापोटी तीन कोटी २९ लाख ५४ हजार १०३ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये एकूण चार कोटी तीन लाख ८२ हजार ६१४ रुपयांची वसुली झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या हस्ते या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद््घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. एम. बुके यांनी केले. जिल्हा न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी लोकअदालतीचे महत्त्व विशद केले. न्यायमूर्ती शर्मा यांनी मार्गदर्शन केले, तर मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डोके यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा कोर्टातील वकील, समाजसेवक, पक्षकार, अधिकारी उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पेट्रोलिंगचा ‘वॉच’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूर व सरकारवाडा पोलिस स्टेशनमार्फत पेट्रोलिंगसाठी महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गंगापूररोड व कॉलेजरोड भागात महिला पेट्रोलिंग पथके तैनात करण्यात आल्याने टवाळखोरांवर कारवाईला आणखी वेग येणार आहे. नव्याने रुजू झालेल्या महिला पोलिसांनी धूम स्टाइलने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. दुचाकीस्वारांच्या धूम स्टाइलचा त्रास महिला पेट्रोलिंगमुळे थांबणार असल्याने विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक नवीन प्रयोग अंमलात आणले आहेत. त्यात गंगापूररोड व कॉलेजरोड भागात धूम स्टाइल वाहने चालविणाऱ्या टवाळखोरांचा नेहमीच त्रास अनेकांना सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या तरुणींना टवाळखोरांचा नाहक त्रास सहन करावा लागत असे. त्यातच पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई केली जात असताना अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जात होते. त्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी महिला पेट्रोलिंग पथकच गंगापूररोड व कॉलेजरोडवर तैनात केले आहे. नव्याने रुजू झालेल्या महिला पोलिसांकडून टवाळखोरांची झाडून तपासणी केली जात असल्याने अनेकांची त्याचा धसका घेतला आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी दामिनी पथक म्हणून पोलिस महासंचालकांनी सुरू केले होते. परंतु, कालांतराने ते बंद करण्यात आले होते. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या गंगापूररोड व कॉलेजरोड भागात महिलांची समस्या पाहता महिला पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू केल्याने टवाळखोरांवर नक्कीच आळा बसेल, अशी अपेक्षा विद्यार्थिनींकडून व्यक्त केली जात आहे. गंगापूर व सरकारवाडा पोलिस स्टेशनलाच नव्हे तर सर्वच पोलिस स्टेशनला महिला पेट्रोलिंगची व्यवस्था पोलिस आयुक्तांनी द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

--

गंगापूररोड व कॉलेजरोड भागात महाविद्यालयांच्या वेळेत नेहमीच दुचाकी टवाळखोरांचा धूम स्टाइलचा त्रास सहन करावा लागतो. महिला पोलिसांचे पेट्रोलिंग पोलिस आयुक्तांनी सुरू केल्याने धूम स्टाइल वाहने चालविणाऱ्यांना नक्कीच ब्रेक लागणार आहे.

-सविता महाले, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगगड समस्याग्रस्त

$
0
0

घाट रस्त्यांवर कठडे दुरुस्तीसह प्लास्टिकमुक्ती सुरू ठेवण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून, पर्यटनाच्या दृष्टीने ही सुखद बाब आहे. मात्र वाढत्या गर्दीप्रमाणे गडावर समस्याही वाढताना दिसत आहेत. कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून, पर्यटनाच्या दृष्टीने ही सुखद बाब आहे. मात्र वाढत्या गर्दीप्रमाणे गडावर समस्याही वाढताना दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्यांची पुरती वाट लागली असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतमार्फत वसूल केला जाणारा कर महिनाकाठी २ लाखांपर्यंत येऊन पोहोचल्याने आगामी काळात अंतर्गत रस्ते विकासाला चालना मिळावी, ही अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

यात्रोत्सव काळापुरता गडावर प्लास्टिकमुक्ती न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी वर्षभर व्हायला हवी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. नांदुरी ते गड या घाटरस्त्यांवर सातत्याने कोसळणाऱ्या दरडींची कायमस्वरूपी काळजी व्हायला हवी. भाविक व पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा प्रभावी होणे गरजेचे असून, धोकादायक वळणांवर काढण्यात येणाऱ्या सेल्फीवर आळा घालण्यासाठी पर्यायी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्याची वेळ आली आहे. यासारख्या समस्यांनी सप्तशृंग गडाला ग्रासल्याचे चित्र आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावर दर्शनासाठी हजारो भाविकांनी श्री गुरुपौर्णिमा व रविवारची सुट्टीचा समन्वय साधत आपली हजेरी लावली. गड परिसरात पावसाच्या सरी कोसळत असल्याने ठिकठिकाणी विलोभनीय धबधबे असतात. पर्यटनाच्या माध्यमातून देवीदर्शन घेणाऱ्या अनेकांना अशा वातावरणात याठिकाणी 'सेल्फी'घेण्याचा मोह आवरता येत नाही. काही तरुण-तरुणींकडून तर घाटरस्त्यावरील वळणावर असलेल्या सुरक्षा कठड्यावर चढत सेल्फी घेण्याची हौस असते. मात्र अनेक ठिकाणी ढासळलेले दगड, पोखरले गेलेले संरक्षक कठडे हे अत्यंत धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्यासाठी सुरक्षा यंत्रणा कार्यरत होणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार

सातत्याने आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला अत्यावश्यक सेवा देताना उत्पन्नाअभावी अडचणी येत होत्या. याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रतिमाणसी २ रुपये इतका नाममात्र कर वसुलीचा अधिकार मिळाला आहे. यामुळे गड ग्रामपंचायतीला महिनाकाठी २ लाखांचे उत्पन्न सुरू झाले आहे. हा पैसा आगामी काळात स्थानिक पातळीवर विकासकामांसाठी उपयोगात येऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वात अवघड काम गडावर होतांना दिसत असते. सातत्याने पडणाऱ्या दरडी व त्यामुळे कोंडली जाणारी वाहतूक व्यवस्था मोकळी करण्यासाठी हा विभाग सतत कार्यमग्न असतो.

नांदुरी ते गड या घाट व वळण रस्त्यावर अजूनही दरड कोसळणे सुरूच आहे. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, केवळ प्रसंगानुरूप दगड बाजूला करून रस्ता वाहतूक सुरळीत करण्याचे काम बांधकाम विभागाकडून होत असते. पर्यटन विभागानेही याबाबत लक्ष घालणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदन आमुचे गुरुजनांना...

$
0
0

टीम मटा

जीवनाच्या वाटेवर रस्ता दाखविणाऱ्या गुरूंबद्दल कृतार्थ भाव व्यक्त करण्यासाठी रविवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शहर परिसरात गुरूं, आई-वडिलांचे पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शाळांसह संगीताच्या क्लासमध्येही गुरुपूजन सोहळा रंगला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबाची फुले दिली, तर संगीताच्या क्लासमध्ये संगीतरुपी गुरुदक्षिणा देण्यात आली. शहरातील मंदिरांमध्येही सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. शहर परिसरातील उपनगरांमध्येदेखील विविध कार्यक्रम झाले.

--


भाविकांनी फुलली मंदिरे

एकमुखी दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फुलांची सजावट अन् रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते. पहाटे लघुरुद्राभिषेक झाल्यावर सकाळी ८.३० वाजता दत्तगुरूंची आरती आणि महावस्त्र अर्पण करण्यात आले. दुपारी १२ वाजता माध्यान्ह पूजेला तीर्थ-महाप्रसाद, तर सायंकाळी भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला. रात्री १० वाजता महाआरती आणि १०.३० वाजता पालखी सोहळा झाला. इतर वेळी असणाऱ्या गर्दीपेक्षा रविवारी दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कपालेश्वर मंदिराजवळील दत्त मंदिरातदेखील गुरुपौर्णिमेचा सोहळा रंगला. अनेक भाविकांनी दत्तगुरूंना वाहण्यासाठी विविध प्रकारची फळे आणली होती. या ठिकाणी साखर-फुटाण्यांचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला. दत्त मंदिरांप्रमाणेच साईबाबा मंदिरातदेखील गुरुपौर्णिमेचा सोहळा रंगला. गंगेवरील साईबाबांच्या मंदिरात सकाळपासूनच गर्दी झाली होती. सकाळच्या आरतीच्या वेळी अनेक भाविकांनी दर्शन घेतले. शनिवारी रात्रीच या मंदिराला रोषणाई करण्यात आली होती.

गोदाघाटावरील ढगे महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भजनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी हरिपाठ, गुरुपौर्णिमेचे प्रवचन आणि बाबांची प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद व गोपाळकाल्याचे वाटप करण्यात आले.

यशवंतराव देवमामलेदार पटांगणावरील परमपूज्य सदगुरू श्री गजानन महाराज गुप्ते समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यात सकाळी ७ वाजता श्रींच्या समाधीस रुद्राभिषेक व महापूजा, सकाळी १० वाजता ध्यानधारणा व नामजप, ११ वाजता प्रवचन, १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरू गजानन महाराज गुप्ते, सद्गुरू दादा महाराज चिटणीस आणि भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा उत्सवात शेकडो भाविक सहभागी झाले होते.

समर्थ रामदास स्वामी स्थापित टाकळीच्या गोमय मारुती मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सकाळी ११ वाजता महापूजा, उद्धव महाराज समाधी दर्शन, त्यानंतर १२ वाजता महाआरती, तर १२.३० वाजता प्रसादवाटपाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी सायंकाळपर्यंत भाविकांची रीघ लागली होती. अनेकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दासबोधाचे पारायण केले. इंदिरानगर येथील गजानन मंदिरात गण गण गणांत बोते असा गजर करण्यात आला.

रा. स्व. संघातर्फे उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहराच्या विविध भागांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संघात व्यक्तीपेक्षा तत्त्व श्रेष्ठ हा विचार रुजविण्यासाठी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी संघाचे स्वयंसेवक कुठल्याही शिक्षकाचे पूजन न करता भगव्या ध्वजाचे पूजन करतात. या दिवशी दिल्या जाणाऱ्या गुरुदक्षिणेतून वर्षभरातील संघाच्या कार्यक्रमांचा खर्च भागविला जातो. संघाचे मुख्य कार्यालय असलेल्या तीळभांडेश्वर मंदिर येथील सोमेश्वर मंदिरात हा सोहळा झाला.


सोमवार पेठेत पारायण

वेलकम सहकार्य मित्रमंडळातर्फे विपुल पर्जन्यवृष्टीसाठी अहीर सुवर्णकार समाज कार्यालय येथे गजानन विजय ग्रंथ पारायण पठण करण्यात आले. त्यात सुमारे ४०० भाविकांनी सहभाग घेतला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्याताई पडवळ यांच्या मधुर वाणीने सोहळ्यातील रंगत वाढविली. पारायणाची सांगता गजानन महाराजांच्या आरतीने झाली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे आणि भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी आदींची उपस्थिती होती.


टाकळी, इंदिरानगरला रीघ

समर्थ रामदास स्वामी स्थापित टाकळीच्या गोमय मारुती मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सकाळी ११ वाजता महापूजा, उद्धव महाराज समाधी दर्शन, त्यानंतर १२ वाजता महाआरती, तर १२.३० वाजता प्रसादवाटपाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी सायंकाळपर्यंत भाविकांची रीघ लागली होती. अनेकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दासबोधाचे पारायण केले. इंदिरानगर येथील गजानन मंदिरात गण गण गणांत बोते असा गजर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजास पावसाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वरुणराजाने अवकृपा केल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. बी-बियाणे विक्रेत्यांसमोरही मोठे संकट उभे ठाकले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस न झाल्यास आहे ती पीके जळून जाण्याची भीती परिसरात व्यक्त होऊ लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी तालुक्यासह शहरात वरुणराजाने हजेरी लावली. यानंतर १० जूनपर्यंत दररोज अल्पशा प्रमाणात का होईना तालुक्यात ठिकठिकाणी वरुणराजाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकरी वर्गात आशेचा किरण निर्माण झाला होता. परिणामी, खरीपांची कामे शेतकऱ्यांनी वेगाने करण्यास प्रारंभ केला होता.

खरीपपूर्व मशागतीनंतर शेतकऱ्यांनी तालुक्यात मका, मुग, उडीद, तूर यासह कडधान्याची पेरणी करून सज्जता दर्शविली होती. मात्र १४ जूननंतर पावसाने दडी मारली असून, ती अद्याप कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले असून पेरणी केलेली पीके वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

तालुक्यात जून व जुलै महिन्यात अवघ्या १११ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून, गतवर्षीच्या तुलनेने हा पाऊस अधिक असल्याचे शासकीय आकडेवारी दाखवित असल्याने जनतेत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे खरिपाची पीके वाचविण्यासाठी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे. आधीच कर्जमाफीचे भिजत घोंगडे, त्यात महागडे बियाणे खरेदी करून केलेली पेरणी यामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अँटिक येझदी-जावा बाइक्सची क्रेझ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येझदी-जावा क्लबच्या वतीने पाचव्यांदा आयोजित अँटिक येझदी अन् जावा बाइक्सने नाशिककरांना रविवारी भुरळ घातली. राज्यभरातील विविध शहरांमधून या प्रदर्शनात अँट‌िक बाइक मॉडेल्ससह १०२ बाइकप्रेमी सहभागी झाले होते. पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद््घाटन करण्यात आले.

कॉलेजरोड परिसरातील श्रद्धा मॉल येथे या येझदी बाइकच्या प्रदर्शनाचे उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सध्या उत्पादनामध्ये नसणाऱ्या मात्र, एका कालखंडात रुबाबाचे दुसरे नाव असणाऱ्या येझदी-जावा गाड्यांची महती नव्या पिढ्यांच्याही नजरेसमोर यावी, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष अंबरीश मोरे यांनी दिली.

या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, शिर्डी, राहाता, शहापूर आदी परिसरातून बाइकप्रेमींनी बाइक्सचे मॉडेल सादर केले. महिंद्राने आता जावा ब्रँड विकत घेतला असून, २०१८ मध्ये जावा ३०० सीसी व ६०० च्या गाड्याही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने महिंद्राच्या वतीने नाशिक येझदी जावा क्लब आणि बेंगळुरू येथील येझदी जावा क्लबला नामांकन देण्यात आले.


‘झाडे लावा’ची थ‌िम...

‘वर्ल्ड जावा डे’ साजरा करताना सामाजिक थ‌िम घेण्याचीही परंपरा या क्लबने जपली आहे. यंदाही ‘झाडे लावा, झाडे वाचवा, झाडे जगवा’ या थ‌िमवर क्लबचे सदस्य मेहनत घेणार आहेत. यंदा यानिमित्त १०० झाडे लावण्यात येणार असून, ती जगविण्याचाही निर्धार क्लबच्या वतीने करण्यात आला आहे. रविवारच्या उपक्रमात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्लबच्या वतीने अंबरीश मोरे, विशाल फाळके आणि संकेत शेलार यांनी केले आहे.


ब्रिटिशकाळापासून प्रसिद्ध

येझदी अन् जावाच्या गाड्यांची चलती मुख्यत: ब्रिटिशकाळात होती. या कालावधीत या गाड्या आयात होत असत. यामध्ये जावा १५०, २५०, ३५० आणि ५०० सीसी, ओएचसी, ओगर, पेराक, सी-झेड ही मॉडेल्स भारतामध्ये उपलब्ध होती. इराणी बंधूंनी १९६०च्या दशकामध्ये या गाड्या मोठ्या प्रमाणावर आयात करण्यास सुरुवात केली होती. म्हैसूरच्या दिवाणांच्या प्रयत्नाने येथे नव्याने या गाड्यांचा सुरू झालेला प्रकल्प, कालांतराने जावाचे येझदीमध्ये झालेले रुपांतर अन् भारतामध्ये या गाड्यांची वाढलेली शान यामुळे एका कालखंडातील या गाड्या असंख्य बाइकप्रेमींमध्ये स्थान मिळवून आहेत. या रुबाबदार गाड्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकदारांची एकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देशातील ५० लाख गुंतवणूकदारांचे सात हजार कोटी रुपये मुदत संपल्यानंतरही परत न करणाऱ्या पॅनकार्ड क्लब कंपनीविरुध्द गुंतवणूकदारांनी लढा सुरू केला आहे. गुंतवणूकदारांच्या इन्व्हेस्टर्स अॅक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या ट्रस्टतर्फे उपनगर येथे कंपनीचे गुंतवणूकदार व मार्केटिंग एजन्टांचा राज्यातील पहिला मेळावा झाला. यावेळी ट्रस्टचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ट्रस्टचे अध्यक्ष ए. एस. पेडणेकर, विशाल बेर्डे, व्ही. पी. गोसावी, टी. सी. कलगुटकर, अरुण मोरे, विजय गावकर, एन. एम. लवंगरे आदी उपस्थित होते. उटगी म्हणाले की, हॉटेलिंग व रिसॉर्टसचा व्यवसाय करणाऱ्या पॅनकार्ड क्लब कंपनीने शेअर बाजारात नोंदणी न करताच गुंतवणूकदारांकडून एक हजारापासून लाखो रुपयांपर्यंतच्या ठेवी घेतल्या. तीन वर्षे तीन महिन्यांत दुप्पट, सहा वर्षे तीन महिन्यांत दुप्पट आणि नऊ वर्षांत तिप्पट पैशांचे आमिष दाखवले. बॅँकेपेक्षा जास्त व लवकर पैसे मिळत असल्याने देशातील ५० लाख, तर महाराष्ट्रातील २७ लाख गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. १९९७ ते २०१३ पर्यंत मल्ट‌िलेव्हल मार्केटिंग तत्वावर कंपनीची योजना व्यवस्थित सुरू होती. नंतर कंपनीने पैसे देण्याचे टाळले. त्याविरुध्द तक्रार केल्यानंतर सेबीने कंपनीची सामूहिक गुंतवणूक योजना बंद केली. मात्र, गुंतवणूकीचे ७०३५ कोटी रुपये परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी वरील ट्रस्ट स्थापन केली. गुंतवणूकदारांचे दावे भरुन मेळावे घेण्यास नाशिकमधून सुरुवात करण्यात आली आहे.


देशपातळीवर आंदोलन

हे आंदोलन देशपातळीवर नेले जाणार आहे. ऑगस्टअखेरीस एक लाख पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा मोर्चा सेबीवर नेण्यात येणार आहे. कंपनीची देश-विदेशातील मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी लवादाकडे केली असता लवादाने गुंतवणूकदारांच्या बाजूने निकाल दिला. सेबीने १९७ कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यात पॅनकार्ड क्लबचा समावेश आहे. सेबीने आदेश देऊनही कंपनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करत नाही.


नाशिककरांना फटका

पॅनकार्ड क्लबचे नाशिकमध्ये पाच हजार मार्केटिंग प्रतिनिधी असून, २५ कोटींची गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्रात २७ लाख गुंतवणूकदार असल्याने मेळावे घेऊन जागृती केली जाणार आहे. नाशिकमधून रविवारी त्याचा प्रारंभ झाला. गुंतवणूकदारांचे दावे भरुन घेऊन ते सेबीला देण्यात येणार आहेत. कायदेशीर व लोकशाही मार्गाने गुंतवणूकदारांनी लढा सुरू केला आहे. कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी आजच्या मेळाव्यात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात बाइक ठेवा तंदुरुस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसात गाडी अचानक बंद पडली तर संताप होतो. आपली गाडी तंदुरुस्त असावी यासाठी काय करता येईल, पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी, या विषयावर महाराष्ट्र टाइम्सतर्फे शनिवारी १५ जुलै रोजी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकरोडवरील मोहरीर यामाहा शोरूममध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वर्कशॉप होईल. हा कार्यक्रम कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वात जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. बाइक म्हणजे तरुणांचा जीव की प्राण. बाइक पावसात भिजल्यावर सर्वात जास्त अडचण निर्माण होते ती बाइक स्टार्ट करताना. कधी गाडी स्लपि होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते, त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी काय करावे सुचत नाही. गाडी गॅरेजला नेण्याशिवाय पर्याय नसतो. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी बाइक मेन्टेनन्सचे वर्कशॉप. यात तुम्हाला जाणून घेता येईल की पावसाळ्यात आपल्या बाइकची देखभाल कशी करायची? हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे तर इतरांसाठी २०० रुपये आकारण्यात येणार आहेत. मात्र, या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यामाहा बाइकसाठी ऑफर

तुमची जर यामाहा कंपनीची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लब सदस्य असाल, तर तुम्हाला रेग्युलर बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी रचले सरण

$
0
0

जमिनी संपादित केल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध करणाऱ्या शिवडे गावातील शेतकऱ्यांनी आता मरेंगे या मारेंगे अशी टोकाची भूमिका स्वीकारली आहे. जमिनींसाठीचे दरपत्रक जाहीर करून समृद्धी महामार्गाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणाऱ्या जिल्हा प्रशासनाला इशारा देण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील झाडांना गळफास लटकवून घेण्याचा इशारा देत सरण रचण्यास देखील सुरुवात केली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा विचार सोडावा, असा इशाराही देण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाचा तिढा सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. शेतकऱ्यांचा विरोध कायम असला तरी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी या महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींचे गावनिहाय दर जाहीर केले. थेट खरेदीचा पर्याय शेतकऱ्यांपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र शेतक-यांनी जमीन संपादनाला तीव्र विरोध दशर्वत जिल्हाधिकारी कार्यालयासमारे दरपत्रकारची होळी केली. यामुळे समृध्दी महामार्गाचा तिढा सुटू शकलेला नाही.

आम्हाला जमिनी द्यायच्याच नाहीत तर दरांचा विषय येतोच कोठे अशी भूमिकाही शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हा तिढा सहजासहजी सुटण्याची चिन्हे नसताना आता शिवडेतील शेतकरी अधिकच आक्रमक झाले आहेत. गावातील झाडांवर गळफास लटकवून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर गावात सरण रचण्यासही सुरुवात केली असून, सरकारने आमच्या जमिनी संपादित करण्याऐवजी पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. प्रशासनाने जमिनी संपादित करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू केली तर रचलेल्या चितेवर आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

समृद्धी महामार्ग आणि विकासाला आमचा विरोध नाही. परंतु, त्यासाठी आमच्या जमिनी घेऊ नयेत. पर्यायी मार्गाने सरकारने समृद्धी महामार्ग न्यावा. आमच्या जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू.

- सोमनाथ वाघ, शेतकरी शिवडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘योगाकडे करिअरच्या दृष्टीने बघा’

$
0
0

आधुनिक काळातही आपल्या क्षेत्रात आणि जीवनात प्रभुत्वाने जगण्यासाठी प्राचीन परंपरा असलेले योगशास्त्र निश्चितच आधारभूत ठरू शकते. त्यासाठी या प्राचीन शास्त्राकडे आधुनिक ‘करिअर’च्या दृष्टिकोनातून नव्या पिढीने बघायला हवे, असा संदेश श्री शारदा मल्टिपर्पज संस्था संचालित श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण, अनुसंधान आणि साधनापीठाच्या संचालिका सुलभा गवळी यांनी ‘मटा’ शी बोलताना दिला.

--

-योगशास्त्र ही नाशिकसारख्या शहरांना करिअरची नवी शाखा वाटते का? याबाबत आपला अनुभव काय?

-योगशास्त्राचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आजमितीस जागतिक स्तरावर स्वीकारले गेले आहे. देशात बेंगळूरू, बिहार यांसारख्या ठिकाणी जगातील नामांकित योग विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यामुळे हा विषय करिअरच्या दृष्टीने अगदीच नवखा नाही. तरीही नाशिकसारख्या छोट्या शहरांमध्ये यादृष्टिकोनातून जनजागृतीस मोठा वाव आहे. अनेक निमित्तांनी जागतिक स्तरावर झळकणारे नाशिक योग शिक्षणास अनुकूल असल्याचा प्रत्यय येतो आहे.

--

-आपल्या संस्थेतील अभ्यासक्रमांविषयी...

-योग शिक्षणाच्या प्रसारासाठी आमच्याकडे योगशास्त्र आणि संस्कृत या विषयातील एक वर्ष कालावधीचा स्वतंत्र पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रतेचे निकषही अनुक्रमे बारावी आणि दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पदव्युत्तर स्तरावर एम. ए. योगशास्त्र हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पदवी उत्तीर्ण किंवा योग पदविका उत्तीर्णांसाठी आहेत. या सर्व अभ्यासक्रमांना कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालय, नागपूर यांची व यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) यांची मान्यता घेण्यात आली आहे.

--

-आपल्याकडील अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य काय सांगता येईल?

-योग शिक्षणात संस्थेची वाटचाल नवी असली, तरीही या क्षेत्रातील सूक्ष्म घडामोडींचा अभ्यास करूनच हे मान्यताप्राप्त शिक्षण दिले जात आहे. यात गृहिणींपासून विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेणारे तरुण विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सनाही आमच्याकडील अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस थिअरी शिकण्यासाठी कॉलेजची उपस्थिती बंधनकारक आहे. इतर वेळी स्वयंअध्ययन पद्धतीचा समावेश अभ्यासक्रमात आहे. याशिवाय योग अभ्यासक्रमातील संस्कृत या विषयाचीही विशेष तयारी आमच्याकडे करून घेतली जाते.

--

-आगामी शैक्षणिक वर्षात संस्थेचे नियोजित नवीन प्रकल्प काय आहेत?

-आमची संस्था योग शिक्षणाअगोदरपासून रक्तपेढीच्या क्षेत्रात सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहे. आमच्या रक्तपेढीत काही थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त रुग्ण आहेत. या रुग्णांना सातत्याने रक्तबदलास सामोरे जावे लागते. या उपचारांदरम्यान त्यांची रोगप्रतिकारक क्षमता आणि आरोग्यस्तर उंचावण्यासाठी योगाच्या शास्त्रशुद्ध अंमलबजावणीचा उपयोग करण्याचा संशोधनाधारित प्रकल्प आम्ही घेऊ. याशिवाय ‘मधुमेहमुक्त भारत’ यासारख्या समाजोपयोगी संकल्पना आम्ही नाशिकमध्ये राबविणार आहोत.

--

-योग शिक्षणातील आव्हानांसंदर्भात काय वाटते?

-केवळ योगासने करणे म्हणजे योगशास्त्र असा चुकीचा समज समाजात रूढ होत आहे. व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्त्व आणि मनोविकास यांचा समतोल साधणारी योगशास्त्र ही एक स्वतंत्र जीवनशैली आहे, हा शास्त्रसिद्ध संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान योग शिक्षणात महत्त्वाचे वाटते. व्हर्च्युअल बनलेल्या नव्या पिढीला योगाच्या माध्यमातून योगशक्तीच्या रिअॅलिटीची अनुभूती देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

--

-योग अभ्यासक्रमांनंतर प्लेसमेंट्ससंदर्भात काय चित्र आहे?

-ज्यांना मनापासून योग या विषयात करिअर करण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी या विद्याशाखेत जागतिक स्तरापर्यंत संधी उपलब्ध आहेत. आधुनिक जीवनशैली ही प्रत्येकाच्या जगण्यातील समस्या झाली आहे. ही समस्या मन आणि शरीर या बाबींशी नाते सांगते, तर योगशास्त्र याच मुद्यांवर उपाययोजना देते. परिणामी, विविध गट, संस्था, समूह स्तरावर योगशिक्षकपदापासून या विषयात स्वत: कोच बनणे, वैयक्तिक जीवन सुदृढ ठेवण्यासोबतच संशोधनासही मोठा वाव आहे. भारतात मोठ्या शहरांपासून तर जगातील सर्वच उपखंडांमध्ये योगशिक्षकांना मागणी आहे.

_ _ _

-संस्थेचे नवीन व्हिजन?

-तीर्थक्षेत्र म्हणून नाशिक शहराकडे बघण्याचा जगभरातील अभ्यासू नागरिकांचा दृष्टिकोन आहे. भौगोलिकदृष्ट्याही येथे योगाभ्यासाला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरनजीक अंजनेरी डोंगरांच्या कुशीत देश व विदेशांतील योगाभ्यासू साधकांसाठी आश्रमाच्या धर्तीवर प्रकल्प उभा करण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने जलदगतीने तयारी सुरू आहे. सद्यःस्थितीत तेथे आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

_ _ _

-योगशास्त्राकडे वळू इच्छिणाऱ्यांना काय संदेश द्याल?

-हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या योगशास्त्राचे महत्त्व आधुनिक चिकित्सेच्या कसोटीवरही जाणून घ्या. ‘रामकृष्ण मिशन’ला अपेक्षित असा शरीर व मनाने कणखर भारतीय नागरिक घडण्यासाठी तुमच्या जीवनशैलीला योगशिक्षणाची जोड द्या!

--

(शब्दांकन ः जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीचा दर अमान्य

$
0
0

इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध

म. टा. वृत्तसेवा, घोटी

महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादनासाठी हालचाली गतिमान केल्याचे चित्र आहे. त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध व हरकती दाखल असूनही प्रशासनाने जमिनीचे दर निश्चित केले आहे. एका बाजूला शासन व प्रशासनाने महामार्गासाठी हालचाली गतिमान केल्या तर दुसऱ्या बाजूला या महामार्गाला विरोध म्हणून सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. जमीन विकायची नाही त्यामुळे शासनाने कोणताही दर जाहीर केला तरी तो दर अमान्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. आज जमिनी दिल्या तर उद्या आमच्या भावीपिढीला उदरनिर्वाहाचे साधन काय, असा सवालही या शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे.

इगतपुरी तालुक्यातील २२ गावे व वाड्या पाड्याच्या बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाने जाहीर केलेल्या जमिनीचा दर अमान्य आहे. आमच्याच भागातून यापूर्वी लष्कर, पेट्रोल पाइपलाइन, धरणे, रस्ते विकास, वनविभाग आदी प्रकल्पांसाठी जमिनी शासनाने घेतल्या आहेत. त्यामुळे आताही पुन्हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे हे भूत या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आणून ठेवले आहे. या प्रकल्पाला जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे. यासंदर्भात अनेकवेळा शासन-प्रशासन प्रतिनिधींशी चर्चा, निवेदने, आंदोलने, घेराव, रस्ता रोको याच्या माध्यमातून प्रशासनाला जाणीव करून दिली आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्व गावे पेसा कायद्यात असल्याने या सर्व गावांनी समृद्धी महामार्गाला विरोध असल्याबद्दलचे व समृद्धी महामार्ग रद्द करण्याबाबत ग्रामसभांचे ठराव देण्यात आले आहे. पुढच्या पिढीला भूमिहीन करायचे नाही, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थ केंद्रांत गुरुवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची शनिवारी (दि. ८) गुरुपौर्णिमेला भाविकांच्या अमाप उत्साहात सांगता झाली. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे दिंडोरी येथील प्रधान केंद्रासह त्र्यंबकेश्वर समर्थ गुरुपीठासह देशभरातील हजारो समर्थ केंद्रांवर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

आषाढातील पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमेच्या मंगल दिनी संपूर्ण भारतभर गुरूंचे, आई-वडिलांचे, आदरणीय व्यक्तींचे पूजन केले जात असल्याने सेवामार्गातील लाखो सेवेकऱ्यांच्या दृष्टीने या उत्सवाचे महत्त्व आहे. शनिवारी पहाटेपासूनच भाविकांची केंद्रांच्या परिसरात लगबग होती. दिंडोरीत गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे, तर त्र्यंबकेश्वरी चंद्रकांतदादा मोरे यांनी गुरुपादुकांचे पूजन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोड्शोपचारे पूजन केले. यात सकाळी भूपाळी आरती साडेदहा वाजता नैवेद्य आरतीची सेवा सेवेकरी भाविकांनी रुजू केली. यानिमित्ताने सर्वच केंद्रांवर गर्दी असूनही कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धतेने सुरू होता. मुख्य उत्सवादरम्यान बालसंस्कार मार्गदर्शिका विवाहेच्छुक मुला-मुलींच्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

दिंडोरीत येथील गुरुपौर्णिमा उत्सवात नाशिकसह राज्यभरातील हजारो भाविक सहभागी झाले होते. मुख्य सोहळ्यादरम्यान गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे समाधानकारक पावसासाठी सेवेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सेवा करण्याचे सूचित केले. महाराष्ट्रात आजही अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी आत्महत्या कर्जमुक्तीतून देशाची मुक्तता व्हावी, यासाठी आपण सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थ
महाराजांना विनंती करू, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेतही रंगला सोहळा

अमेरिकेतही हा उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात अनिवासी भारतीयांसह स्थानिकांनीसुद्धा सहभाग नोंदवला. शिकागो, डेट्रॉइट, न्यू यॉर्क अशा शहरांत हा उत्सव साजरा झाला. नितीन मोरे हे सेवामार्गाचे प्रतिनिधी म्हणून तेथे हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकला गुरुजनांना नमन

$
0
0

गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात रविवारी (दि. ९) गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. वारकरी संप्रदायाचे आद्यसंस्थापक निवृत्तिनाथ महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे वारकरी भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.

येथील संत जनार्दनस्वामी आश्रम आणि स्वामी समर्थ गुरूपीठात अनुयायांनी आपली उपस्थिती दिली. त्र्यंबकेश्वर येथे गुरुपौर्णिमानिमित्त सदगुरूंचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी शिष्यांची मांदियाळी अनुभवयास आली. गणपतबारी येथे असलेल्या श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात सकाळपासूनच शिष्यांनी हजेरी लावल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. महंत शंकरानंद सरस्वती, भगवान बाबा आणि गणेशानंद महाराज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पेगलवाडी तळवाडे फाटा येथील देवबाप्पा माऊली धाम आश्रम येथेदेखील हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आले. महामंडलेश्वर डॉ. रघुनाथ महाराज यांच्या देशविदेशातील हजारांच्या संख्येने शिष्यांनी याप्रसंगी हजेरी लावली. काशिनाथ महाराज, संदीप महाराज जाधव आदींसह भाविकांनी येथे आलेल्या भक्तांचे स्वागत केले. देवबाप्पा माऊली फरशीवाले महाराज यांनी शिष्यमंडळास आशीर्वाद दिले. सोबतच जनार्दन स्वामी आश्रम, स्वामी समर्थ केंद्र, संत गजानन महाराज मंदिर, डॉ. बिंदूजी धाम आश्रम, बेझे येथील महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे रामशक्ती पीठ आश्रम, नीलपर्वत जुना आखाडा दत्त मंदिर आदी ठिकाणी उत्सव पार पडला.विद्यार्थ्यांना वह्या वाटप

स्वामी सागरानंद महाराज आश्रमात गुरूकुल संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज रामशक्तीपीठ आश्रम यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबत महंत शंकरानंद महाराज, श्रीनाथ महाराज उपस्थित होते. येथील गंगाद्वार पायथ्याशी असलेल्या अटल आखाड्यातील महंत उदयगीरी महाराज यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएचआर’विरुध्द आरोपपत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (बीएचआर) संचालक आणि काही कर्मचाऱ्यांविरोधात सोमवारी जिल्हा कोर्टात दोषारोपत्र दाखल करण्यात आले.

शहरातील गुंतवणुकदारांचे सात कोटी तर राज्यात असंख्य ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये या बँकेत अडकून पडले आहेत. पुणे येथील सीआयडीमार्फत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नाशिक शहर व राज्यातील शेकडो गुंतवणुकदारांचे हजारो कोटी रुपये या पतसंस्थेत अनेक वर्षांपासून अडकून पडल्यामुळे ठेवीदार हवालदील झाले होते. त्यामुळे ठेवीदार संघटनेचे राज्य संघटक श्रीकृष्ण शिरोडे यांनी याप्रकरणी पाठपुरावा सुरू ठेवला. दरम्यान, फिर्याद दाखल झाल्यापासून ९० दिवसाच्या आत सीआयडीने कायदेशीर तरतुदीप्रमाणे आरोपपत्र दाखल केल्याने ठेवीदारांनी ये समाधान व्यक्त केले आहे. पुण्याचे सीआयडी अधिकारी भोईर आणि सहकाऱ्यांनी हे आरोपपत्र दाखल केले. यावेळी ठेवीदार श्रीमती चंदावरकर, सुरेश कुलकर्णी, पंढरीनाथ शिंदे, साहेबराव म्हसे आदींसह असंख्य ठेवीदार उपस्थित होते, असे शिरोडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोमध्ये घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील पाटीलनगरमध्ये चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा सुमारे तीन लाख ८० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र सिताराम पगारे (रा. नाईकनगर, पाटील नगर) यांनी फिर्याद दिली. पगारे कुटुंबीय १ ते ९ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या टेरेसवरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाट उघडून सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा तीन लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरी केला.

ऑनलाइनद्वारे चोरी

काळेनगर येथील एका महिलेच्या बँक खात्यातील ३० हजार रुपयांची रोकड भामट्यांनी ऑनलाइन पध्दतीने चोरी केले. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी फोनवरून बँक खात्याची सविस्तर माहिती मिळवून रोकड परस्पर काढून घेतली. अभिनंदन सोहनलाल पंडित (रा. काळेनगर) यांच्या तक्रारीनुसार, पंडित यांच्या पत्नी सुब्बावती यांचे अॅक्सिस बँकेत बचत खाते आहे. चोरट्यांनी बँकेतून बोलत असल्याचे सांगून सर्व माहिती मिळविली. ३० हजार रुपयांची रोकड ऑनलाइन काढून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल पळविला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरासमोरील रस्त्यावर मोबाइलवर बोलत व्यक्तीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना साईनाथनगर भागात घडली. या प्रकरणी विजय निफाडे (रा. अमृतवर्षा कॉलनी, साईनाथनगर) या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विजय आपल्या घरासमोरील रस्त्यावर मोबाइलवर बोलत असताना चोरट्यांनी संधी साधली. काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एका आरोपीने विजयच्या हातातील सुमारे दहा हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

अपघातात तरुणाचा मृत्यू

नाशिक : भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची घटना राजीवनगर वसाहत परिसरात झाली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. बाबासाहेब वामन भदरंगे (३०, रा. राजीवनगर वसाहत, इंदिरानगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गर्दुल्यांवर कारवाई

सातपूर : नं‌दिनी नदी परिसर व भाजीपाला मंडईच्या छतावर गोंधळ घालणाऱ्या गर्दुल्यांवर वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश सोनावणे यांनी सोमवारी धडक कारवाई केली. तसेच मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्यांनाही पोलिसांनी कारवाईचा दणका दिल्याने टवाळखोरीला चाप बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवरून युवती बेपत्ता

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गाडीमध्ये चढताना आपली १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ज्योती प्रकाश कुलकर्णी (५२, रा. रेल्वे ट्रॅक्शन कॉलनी, एकलहरे) यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी मधुकर करोशिया (२८, क्रांतीनगर, मनमाड) याच्यावर संशय व्यक्त केला आहे.

कुलकर्णी या १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचोऱ्याला जाण्यासाठी कन्या वैष्णवी व मुलगा अभिषेक यांच्यासह नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आल्या. कामयानी एक्स्प्रेसमध्ये चढताना गर्दीमुळे वैष्णवी त्यांना दिसली नाही. परिसरात व नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांत बेपत्ताची तक्रार दाखल. या प्रकरणी त्यांनी मधुकरवर संशय व्यक्त केला आहे. सहाय्यक निरीक्षक नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. सोनवणे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images