Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘समृद्धी’साठी दर निश्च‌ित

$
0
0

बागायती जमिनीला दुप्पट दर


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहुचर्चित समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी संपादित करताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी द्यावयाचे दर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केले. मात्र हे दर काही गावांतील शेतकऱ्यांना अमान्य असून, आज (दि.८) सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

सिन्नर तालुक्यात जिरायती जमिनीसाठी कमीत कमी ४० लाख ९९ हजार रुपये, तर जास्तीत जास्त ८४ लाख ७१ हजार रुपये दर निश्च‌ित करण्यात आले आहेत. इगतपुरीत हाच दर ४३ लाख २० हजार ते ८४ लाख ६८ हजार रुपये एवढा निश्च‌ित झाला आहे. विशेष म्हणजे बागायती जमिनींसाठी या दरांच्या दुप्प्ट दर दिले जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांचा दरपत्रकाला विरोध

समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींचे प्रति हेक्टरी दर जिल्हास्तरीय समितीने जाहीर केले असले तरी ते मान्य नसल्याची भूमिका काही गावांमधील शेतकऱ्यांनी घेतली आहे. आज, शनिवारी विरोध दर्शविणाऱ्या सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये सरकारची अंत्ययात्रा, मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, दरपत्रकांची होळी करून निषेध नोंदविण्यात येणार आहे. सिन्नर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही निदर्शने करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याने दोन वासऱ्यांच्या फडशा पाडला. म्हाळसाकोरे ते कोमलवाडी रस्त्यालगत भरत गणपत मुरकुटे हे आणि सोमनाथ सखाहरी पडोळ हे शेतात वस्ती करून राहतात. मुरकुटे आणि पडोळ यांच्या वस्तीत अवघ्या २०० फुटाचे अंतर आहे. दोघांच्याही घराच्या जवळ असलेल्या शेडमध्ये गायी व वासऱ्या बांधलेल्या होत्या. गुरुवारी रात्री बिबट्याने आधी मुरकुटे यांच्या शेडमधील वासरीवर हल्ला करून तिला तिला केले. त्यानंतर उसाच्या शेतात नेले.त्यानंतर पडोळ यांच्या डमधील वासरीलाही ठार करून तिलाही उसाच्या शेतात नेले. या दोन्ही वायऱ्या शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आल्या. मुरकुटे आणि पडोळ कुटुंबाने लागलीच याबाबत वन विभागाला कळव‌िल्यानंतर परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी पंचनामा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांचा श्वास गुदमरलेलाच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महापालिकेच्या नाशिक पूर्व भागातील औरंगाबाद रोडवरील नैसर्गिक नाल्यांचा कोंडमारा केलेला आहे. यामुळे मागील वर्षी तसेच याही वर्षी पाणी दुकाने आणि घरांमध्ये शिरण्याचे प्रकार घडले. पावसाच्या पाण्याला मार्ग काढून देताना सर्वांचीच दमछाक झाली. या मार्गावरील १३ नाल्यांपैकी ११ नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे ते बुजले आहेत.
सराफ बाजारात पाणी शिरल्यानंतर नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची महापालिका प्रशासनाने घोषणा केली असली तरी अजून औरंगाबाद रोडच्या दोन्ही बाजूंच्या नैसर्गिक नाल्यांच्या बाबतीत कुणावरही कारवाई झालेली नाही. औरंगाबाद नाका ते मानूर शिवार या पाच किलोमीटरच्या औरंगाबाद मार्गावर १३ नैसर्गिक नाले आहेत. त्यातील ११ नाल्यांच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे. या नाल्यांच्या जुन्या खुणा केवळ रस्त्याचे काम करताना येथे पाइप टाकून केलेल्या मोऱ्यांमुळे लक्षात येते. अन्यथा या भागातून नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह होता, हेदेखील कुणाला कळले नसते.
मुंबई-आग्रा महामार्गाकडून औरंगाबाद रोड आणि औरंगाबाद रोडकडून गोदावरी नदीपात्राकडे असा उताराचा भाग आहे. या उताराच्या भागात हे नैसर्गिक नाले होते. हा भाग शेतीचा असताना नाले मोकळे होते. कितीही पाऊस झाला तरी या नाल्यांनी पाणी वाहून जात असल्यामुळे पिकांचे कधी नुकसान होत नव्हते. नांदूरनाका येथील नाल्याला तर मोरीही शिल्लक ठेवण्यात आली नाही. त्यामुळे जोराचा पाऊस झाल्यावर नाक्यावर पाण्याचे तळे साचते ही समस्या गंभीर झालेली आहे. नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण काढून त्यांचा श्वास मोकळा केला नाही तर भविष्यात पाण्याचा निचरा होण्याची समस्या अत्यंत गंभीर होईल. नांदूरनाका परिसरातील पाणी काढून देण्यासाठी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साह्याने नाला करावा लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृतच्या हालचाली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली तरी, चार मह‌िने होऊनही स्वीकृत सदस्यपदी निवड करता आलेली नाही. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने स्वीकृतचा प्रस्ताव थंड बस्त्यात ठेवण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने स्वीकृतसाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेत स्वीकृतसाठी पाच सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आयुक्तांनी महापौरांसह सभागृहनेता, गटनेत्यांची बैठक येत्या ११ तारखेला बोलावली आहे. या बैठकीत निवड प्रक्रियेची औपचारिक माहिती दिल्यानंतर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. परंतु, स्वीकृतसाठी अटी व शर्तींमुळे भाजपसह शिवसेनेची मात्र अडचण होणार आहे.
महापलिका निवडणुकीत भाजपने ६६ जागा जिंकून एकहाती बहुमत मिळवले, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. केंद्र-राज्यासह नाशिक महापालिकेतही भाजपची सत्ता आल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, सत्तेचा लाभ घेण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांच्या गणसंख्येवर स्वीकृत सदस्य निवडण्याची पद्धत आहे. त्यामुळे सध्याच्या संख्याबळानुसार पालिकेत भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य निवडले जाऊ शकतात. परंतु, भाजपमध्ये स्वीकृत सदस्य होण्यासाठी मोठी स्पर्धा असून, तीन जागांसाठी जवळपास दीडशे जण इच्छुक आहेत. भाजपमध्ये तीन जागांसाठी जवळपास १६० पेक्षा जास्त जण इच्छुक आहेत. प्रशासनाने लावलेल्या अटी शर्तींतून निम्मे इच्छुक कमी होणार आहेत. शिवसेनेतही दोन जागांसाठी तीस ते चाळीस जण इच्छुक आहेत.

या क्षेत्रातील हवेत

- विधी, शिक्षण, अभियांत्र‌िकी, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातून निवड
- संबंधित क्षेत्रातील किमान पाच वर्षे अनुभव
- याबाबत कागदोपत्री पूर्तता आवश्यक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांतील पेट्रोलवर डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

इंदिरानगर भागातील बऱ्याच इमारतींत उभ्या असलेल्या वाहनांमधून पेट्रोल काढल्याच्या तक्रारी येत असतानाच आता सिडको व अंबड औद्योगिक वसाहतीतही मोठ्या प्रमाणावर पेट्रोल व डिझेलची चोरी होत असल्याचे दिसून आले आहे. उभ्या असलेल्या गाड्यांना खोट्या चाव्या लावून, तसेच पाइप कापून त्यातील पेट्रोल व डिझेल काढून घ्यायचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे नागरिकांना आर्थिक झळ बसण्यासह नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. याबाबत पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सिडको व इंदिरानगर भागात सध्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधील पेट्रोल, डिझेल काढण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांतूनदेखील इंधनचोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मागील आठवड्यातच इंदिरानगर पोलिस ठाण्यात काही नागरिकांनी याबाबत तक्रार अर्जसुद्धा दिले आहेत. परिसरात पेट्रोल व डिझेलची चोरी करून त्याची विक्री करणारी ही मोठी टोळीच कार्यरत असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्‍त केला असून, यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अंबड औद्योगिक वसाहतीत राज्यासह राज्याबाहेरील अनेक वाहने कंपन्यांना लागणारे साहित्य घेऊन येत असतात. कंपनीत हे साहित्य उतरविणे किंवा पुन्हा भरणे यासाठी बराच वेळ लागत असल्याने या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर गाड्या उभ्या असल्याचे दिसते. आशा गाड्यांमधील डिझेल काढून त्याची विक्री केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. अनेकदा परराज्यांतील वाहनचालक असल्याने त्यांना धमकी देऊन सर्रासपणे गाड्यांमधील डिझेल काढले जात असल्याचेही काही नागरिकांनी सांगितले.

--

नोंदीअभावी निर्ढावले चोरटे

बऱ्याचदा पेट्रोल व डिझेलची चोरी झाल्यावर त्याची नोंद पोलिसांत काय करायची म्हणून कोणीही पोलिसांना ही माहिती देत नसल्याचे दिसते. त्यामुळे चोरटे चांगलेच निर्ढावले असून, चोऱ्यांच्या प्रकारांत वाढ झाली आहे. झटपट व कमी श्रमात पैसा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हे प्रकार केले जात असल्याचे दिस असून, अंबड पोलिसांनी या पेट्रोल व डिझेल चोरीच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे. या टोळीचा त्वरित छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधू-महंतांनी सांगितले वृक्षारोपणाचे महत्त्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पिंपळद येथील जुना आखाड्याच्या जागेत गुरूपौर्णिमा उत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी आखाडा परिषदेचे महामंत्री व जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक हरेगिरी महाराज यांनी दोन हजार वृक्ष लागवडीच्या संकल्प सोडला. उप‌स्थित साधुमहंतांनी पुराणातील दाखले देत वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

महंत हरेगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मधुर फळे देणारी दीर्घायुषी झाडे लावून आपण आपल्या गुरूप्रती श्रद्धाभाव व्यक्त करीत आहोत. तसेच त्र्यंबकनगरी ही गौतमऋषींनी वसवलेली आहे. पुराणकथेचा दाखल घेतल्यास येथे आधी शेतकरी होते. तम्हणून आपणही येथे शेती आणि वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

महामंडलेश्वर शिवगीरी महाराज यांच्यासह गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या एन. सी. सी. व गाईड विद्यार्थिनी आणि शिक्षिका उपस्थित होत्या. महामंत्री हरिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांनी शेतीचे विविध प्रयोग यशस्वी केले याचा दाखला दिली. तसेच जुना आखाड्याच्या पिंपळद येथील जागेत नंदनवन फुलविण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांनी उपस्थितांना त्र्यंबकेश्वर येथे वृक्षारोपण करण्याची महती स्पष्ट केली. त्र्यंबकेश्वर हे गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात येते. येथे पाऊस चांगला झाला तर संपूर्ण दक्षिण भारताला तो उपयुक्त ठरतो. म्हणून येथील वनसंपदा वाढवली पाहिजेे, असे त्यांनी सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेला नाशिकची चाके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रेल्वे मोटार निर्मिती करणाऱ्या एकलहरेतील रेल्वे ट्रॅक्शन कारखाना विस्तारीकरणाचे संकेत मिळाले आहेत. कारखान्याच्या वीस एकर जागेत ५२ कोटींचा नवा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यात रेल्वेची चाके आणि अॅक्सल तयार केले जाणार आहेत. विस्तारीकरणाचा प्रस्ताव मध्य रेल्वेला पाठविण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्प उभारणीस सुरुवात होईल.
हा प्रकल्प झाल्यास आऊटसोर्सिंगची कामे रेल्वेला करावी लागणार नाहीत. उत्पादन खर्चात कपात होईल. तसेच सुमारे पाच हजार जणांना रोजगार मिळेल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी ‘मटा’ ला दिली. मध्य रेल्वेचे मुख्य वीज अभियंता अग्रवाल यांच्यापर्यंत हा प्रस्ताव पोहचला आहे. तो मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याकडे जाईल. खासदार गोडसे यांनी अग्रवाल यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्वरित रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याची सूचना केली. देशातील रेल्वे ट्रॅक्शनचे प्रमुख घनशाम सिंग यांनीही नवीन प्रकल्पास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
युनियनचे प्रयत्न
एकलहरे ट्रॅक्शन कारखान्याला गेल्या महिन्यात दिल्लीतील रेल्वे बोर्डाचे सदस्य घन्यशाम सिंग आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी भेट दिली होती. त्यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने त्यांना विस्तारी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. या दोघांनी युनियनचे सचिव भारत पाटील, उपाध्यक्ष, पी. एम. जाधव, अनिल दराडे, मनोज नागरे यांच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. विस्तारीकरणासाठी ही युनियन २२ वर्षापासून प्रयत्न करत आहे. विस्तारीकरणानंतर कारखान्यात चार वर्कशॉप होणार आहेत.
खासदार हेमंत गोडसे कारखाना विस्तारीकरणासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. रेल्वे बोर्ड सदस्य नवीन टंडन यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. रेल्वे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गोडसे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. कारखाना विस्तारीकरणामुळे सुमारे पाच हजार जणांना रोजगार मिळेल. रेल्वेचा आऊटसोर्सिंगचा खर्च वाचेल. कारखाना विस्तारीकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम मध्य रेल्वेच्या मुख्य विद्युत अभियंत्यावर सोपविण्यात आले होते. तत्कालीन रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी १९८१ साली अडीचशे एकर जागा अधिग्रहित करुन एकलहरे रोडवरील हा कारखाना सुरू केला. येथे पाचशे कामगार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉडर्न प्रणवचा संबळावर ठेका!

$
0
0

नाशिक ः ढोलकी आणि संबळ वाजलं आणि पावलं थिरकली नाही असं सहसा होत नाही. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीत लोकसंगीताचा ताल अगदी खोलवर मुरला आहे. या तालाला तोलून धरलयं संबळ या चर्मवाद्याने! आज पालक आपल्या पाल्यांना टीव्हीवरील रिअॅलिटी शोसाठी तयार करू इच्छितात. त्यातही गायनालाच जास्त पसंती असते. वादन असलं तरी ‘संबळ’ या वाद्याकडे अजूनही मागासलेपणानं पाहिलं जातंय. मात्र, ओझरच्या प्रणव कोंटुरवार तरुणानं हे वाद्य कला आणि करिअर म्हणून निवडलंय. लोककला लोप पावत असताना केवळ गुरुंच्या सांगण्यावरून संबळ हे करिअर निवडून त्याने आपल्या गुरूंना अनोखी गुरूदक्षिणा दिली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुण डॉक्टर, इंजिनीअर आणि त्याही पलिकडं वेगवेगळ्या क्षेत्राकडं वळत असताना प्रणवनं लोककलेला प्राधान्य दिल्याने त्याचे वेगळेपण उठून दिसते.

ओझरसारख्या जागतिक नकाशावर लढाऊ मिग विमानाचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या पण छोटयाशा गावात हा मुलगा प्रणव जन्मला, वाढला. गावात खंडोबाचं मंदिर, दरवर्षी भरणारी जत्रा. खंडोबा म्हणजे जागरण-गोंधळ, वाघ्या- मुरळी, संबळ या सगळ्या लोककलांत त्याचं बालपण समृद्ध झालं. लोकसंगीत अंगात भिनलं आणि त्याला या लोककलेनं आकर्षित केलं. अनेक गोंधळी गीतात वाजणारं संबळ त्याच्या मनाला भुरळ घालू लागलं. पण शिक्षण अर्धवट सोडून कसं चालेल? त्यातही वडील संजय कोंटुरवार हे माध्यमिक शिक्षक! मग शिक्षकाचं पोरगं शिकलं नाही तर लोक काय म्हणतील? असं बाकीच्यांनी भरीस घातलं. पण संजय कोंटुरवार हे हाडाचे कलाशिक्षक. त्यांनी प्रणवला संबळ वादक, सुप्रसिध्द ढोलकीवादक गणेश डोकबाणे यांच्या सुपुर्द केलं आणि तुम्ही याचे गुरू, याला सांभाळा म्हणत लोककलेसाठी आपल्या मुलाला तयार करण्याची परवानगी डोकबाणे यांना देऊन टाकली.

माध्यमिकचं शिक्षण संपलं आणि प्रणवनं संबळ वादनाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. मुळात या वाद्याची गोडी आणि अंगातही लोकसंगीताचा ताल त्यामुळे अल्पावधीत त्याने आपल्या गुरूच्या आवडत्या शिष्यात स्थान मिळवलं. प्रणवनं निष्ठेनं त्यांच्याकडं आपलं शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण सुरू असतानाच प्रणव आणखी एक कला महाविद्यालयात शिकत होता, ती म्हणजे शिल्पकला! महाविद्यालय म्हटलं की, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आले. त्यातही कलेलाच वाहिलेलं महाविद्यालय असेल तर मग विचारायलाच नको. प्रणवला ही संधी मिळाली. त्यानं त्या संधीच सोनं केलं. पुढे अनेक महाविद्यालयात तो गोंधळी गीतावरील नृत्यस्पर्धेत संबळ वाजवताना दिसू लागला. लोकांनाही त्याचा ताल आवडू लागला. प्रणवचा हुरूप वाढत गेला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा महोत्सव असो अथवा जिल्हा परिषदेची अध्यक्ष चषक स्पर्धा, यात प्रणवचा संबळ वाजत राहिला. अरुण-राज प्रस्तूत ‘मायबाप’ कार्यक्रमातही त्याने संगीत साथ केलीय. ‘हंडाभर चांदण्या’ या गाजत असलेल्या नाटकाच्या गाण्यातही प्रणवचा संबळ दिलखुलास वाजला.

प्रणव अजूनही शिक्षण घेत असून आपल्या वादनात अधिक बारकावे तो शोधतो आहे. त्यासाठी त्याला पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीत जायची इच्छा आहे. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या तालमीत तयार होण्याचं त्याचं स्वप्न आहे. संबळ वादनाची लोककला लोप पावत असताना आपल्या गुरूंना अनोखी भेट म्हणून करिअरच संबळ वादनात करण्याचं ठरविणारा प्रणव कोंटुरवार त्यामुळे आज वेगळा ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरुबिन कौन बतावे बाट...

$
0
0


महाभारताची रचना करणाऱ्या महर्षी व्यास मुनींना वंदन करण्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यास पौर्णिमा साजरी केली जाते, तीच गुरुपौर्णिमा होय. उत्तम शिष्य घडवितानाच त्यांच्यातले अवगुण काढून चांगल्या गुणांना प्रोत्साहन देण्याचे काम गुरू करतात. आयुष्य जगण्यासाठीची वेगळी दृष्टी देतानाच शिष्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य गुरूंकडून अविश्रांतपणे सुरू असते. लहान-मोठ्या प्रसंगांपासून विविध प्रकारच्या कसोट्यांद्वारे शिष्याला पैलू पाडण्याचे गुरूंचे कार्य कायमच अलौकिक मानले जाते. गुरुपौर्णिमेनिमित्त अशाच गुरूंबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जागविलेल्या आठवणी त्यांच्याच शब्दांत...

--

द्रष्टे अन् सर्जनशील

माझे गुरू अंध असले, तरी त्यांची प्रतिभा फार मोठी होती. एकदा मी माझ्या गुरुंसोबत चालत होतो. त्याचवेळी आमच्या जवळून एक व्यक्ती गेली. तत्क्षणी गुरुजी मला म्हणाले, रेवणसिद्धा गेला का रे आपल्या जवळून. बघ बरं. मी त्या व्यक्तीला थांबवले आणि त्याकडे चौकशी केली, तर तो रेवणसिद्धाच होता. मी अाचंबित झालो आणि तत्काळ गुरूंना म्हणालो, आपण कसं ओळखलंत? त्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, काही नाही रे, ३० वर्षांपूर्वी तो असाच भेटला होता. त्याच्या पावलाची लय आणि वजन अजूनही माझ्या लक्षात आहे! हे उत्तर ऐकून मी थक्कच झालो.

कर्नाटकमधील गदडा येथे राहणारे पं. पुट्टराज गवई हे माझे गुरू. त्यांच्याविषयी काय, किती आणि कसं सांगायचं खरं तर हा प्रश्नच आहे. संगीत, कला आणि आध्यात्म यांचा ते सागरच होते. नाऊमेद कधी व्हायचं नाही, ही त्यांची शिकवण. सतत प्रयत्नरत राहण्याचा त्यांचा सल्ला आजही लख्ख आठवतो. सतत जागरूक राहणं हेच जिवंतपणाचं लक्षण असल्याचे त्यांनी शिकविले. शिष्याला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ते आग्रही असायचे. एखाद्या समस्येला, आव्हानाला समर्थपणे तोंड देण्याची शिकवण ते सतत द्यायचे. शिष्याने केवळ उत्तम शिष्यच नाही, तर उत्तम व्यक्तीही व्हावे यासाठी ते आग्रही होते. त्यांच्याकडे विविध बाबींविषयी असलेला दृष्टिकोन अतिशय व्यापक होता. रसिक म्हणून ऐका, रियाज करा आणि सादरीकरण करा, असे ते सतत सांगायचे. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मी किंमत दिली म्हणूनच मी आज जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच. कला जोपासण्यासाठी रसिक म्हणून ऐका, हे त्यांचे वाक्य आजही मी अनुसरतो आहे. त्यांचा वारसा पुढे ठेवण्यासाठी मला त्यांची शिकवणच कामी येत आहे. पुढे मी कोलकाता, पुणे आणि अन्य ठिकाणी संगीताचे धडे घेतले. गुरुजींमुळे माझा पक्का झालेला पायाच आज कलेची साधना करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. गुरुजींची आणखी एक मोठी आठवण आहे.

एका मैफलीसाठी विविध प्रकारचे ४०० तांबे एकत्र करण्यात आले होते. ती मैफल तब्बल चार तास चालली. श्रोते मंत्रमुग्ध झाले. मैफल संपली आणि ते सर्व तांबे परत देण्याची वेळ झाली. अनेकांनी तोंडात बोटे घातली काहींनी भुवया उंचावल्या. गुरुजींनी एक एक तांब्या हातात घेतला आणि तो वाजवून पाहिला. ज्याचा तो होता त्याच्याकडे एकेक सुपूर्द केला. संगीतातला डोळसपणा त्यांच्याकडे होता. प्रत्यक्षात दृष्टी नसली, तरी त्यांच्या अंगी जी प्रतिभा होती ती कल्पनातीतच म्हणावी लागेल.

(शब्दांकन ः भावेश ब्राह्मणकर)

--

निसर्ग हाच सर्वांत मोठा गुरू

निसर्गच्या सान्निध्यातूनच जगण्याची ऊर्जा मिळते. कोकिळेच्या एका मधुर स्वराने कवी सजग होतो, तर कधी धबधब्याच्या खळखळाटातून गाण्याची चाल मिळते. ढगांचा स्पीड नृत्य कलाकाराला एखादी जगावेगळी स्टेप शिकवून जातो. कलाकरांना मिळणारी चेतना निसर्गात ओतप्रोत भरली असून, यापेक्षा मोठा गुरू शोधून सापडत नाही.

चित्रकलेची ओळख आणि श्रीगणेश घरातच झाला. वडील चंद्रकांत वामन भालेराव चित्रकलेचे शिक्षक होते. त्यामुळे घरात ओघानेच चित्रकलेविषयी वातावरण निर्माण झाले होते. त्या वयात आईवडिलांसारखा गुरू मिळणे महत्त्वाचे असते. सुदैवाने मला ती संधी मिळाली. थोडासा मोठा झाल्यानंतर निसर्गचित्रकार शिवाजीराव तुपे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांच्यासह निसर्गात जाण्याची संधी मिळाली. निसर्गाचा आनंद घेताना त्याच भावनेने तो कागदावर कसा उतरवायचा, याचे मूळ त्यावेळी सापडल्याचे वाटते. एखाद्या ठराविक ठिकाणी समोर दिसणारा क्षण डोळ्यात समावून घेण्याची कला यानिमित्ताने शिकता आली. त्याचा पुढे कायमच मोठा उपयोग झाला. पुढील काळात वासुदेव कामत, जॉन फर्नांडिस यांसारख्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांनी निसर्गाकडे, तसेच जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची कला शिकविली. गेल्या काही वर्षांत चित्रकलेच्या माध्यमातून देश-विदेशांत काम करण्याची संधी मिळाली. चित्रकलेच्या माध्यमातून देश-परदेशांतील कलाकारांशी संबंध येतो. त्यांच्याकडून रोजच काही तरी शिकायला मिळते. अगदी शाळेतील लहान विद्यार्थ्यांची चित्रेही आपल्याला नवा दृष्टिकोन देतात.

कलेची उपासना हे नित्यकर्म आहे. ही उपसाना अखेरपर्यंत सुरू राहावी, हीच प्रत्येक कलाकराची अपेक्षा असते. मात्र, त्यासाठी तसा सहवास महत्त्वाचा ठरतो. अनेकदा हे काम निसर्गाच्या सान्निध्यात सहजगत्या होते. कलाकाराला निसर्ग समजावून घेता आला पाहिजे. निसर्ग जे शिकवतो, ते घरात बसून कागदावर उतरविणे शक्य नाही. लहानपणी आईवडील, शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षक आपले गुरू असतात. करिअर घडवतानादेखील गुरू आवश्यक असतो. हे गुरू आपल्यातील सकारात्मक; पण लपलेली तत्त्वे शोधण्यास मदत करतात. मात्र, निसर्ग या तत्त्वांना खतपाणी देऊन फुलविण्याचे काम करतो. निसर्गात हरवून कलेची साधना करण्याची कला निसर्गच देत असतो. त्यासाठी एक अनुभव घेणे क्रमप्राप्त आहे. निसर्गाशी तादात्म्य पावून हरवून जाण्यात जी मजा आहे, ती कशातच नाही!

(शब्दांकन ः अरविंद जाधव)

--

‘जेजे’चं आवारच गुरुस्थानी

खरंतर शिल्पकला या क्षेत्राशी माझा कधीच संबंध आला नव्हता. घरची पार्श्वभूमीदेखील तशी नव्हती. १९८७ साली पेठे विद्यालयातून दहावी पास झाल्यानंतर काय करायचे याबाबत माझ्यासह घरचांमध्येही संभ्रम होता. आपल्या मुलाने कलाक्षेत्रात काही तरी करावे अशी वडिलांची इच्छा होती, तर पोलिस खात्यात अधिकारी व्हायचं, अशी स्वतःची इच्छा होती. दहावी पास झाल्यानंतर सायन्सला प्रवेश घेतला. अकरावी पास झाल्यानंतरही दिशा सापडत नव्हती. त्यामुळे आयटीआयच्या पेंटर ट्रेडसाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टची जाहिरात एका वर्तमानपत्रात वाचायला मिळाली आणि तडक मुंबई गाठली. बरोबर फक्त स्वतः काढलेली चित्रे होती. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या आवारात प्रवेश करताच थोडंसं धस्स झालं. हे क्षेत्र नवीन होतं. मुंबई नवीन होती. येथे कसे होईल, काय होईल, अशी धाकधूक मनात होती. परंतु, जे. जे.च्या आवारात प्रवेश करताच डोक्यात घंटा वाजली. विचार पक्का झाला. येस, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं होतं तेच हे ठिकाण. आता काही तरी करून दाखवायचं या ध्येयानं पछाडलं. कमर्शिअल आर्टिस्ट होऊन नाव कमवायचं, असा निश्चय केला. मुलाखतीच्या वेळी बरोबर आणलेली चित्र पाहून तेथील शिक्षकांनी मला फाइन आर्टला जाण्याचा सल्ला दिला. बघता बघता फाउंडेशनची दोन वर्षे संपली. तोपर्यंत जे. जे.च्या आवारानं विचारांची शक्ती दिली होती. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला होता. माझ्या शिल्पकलेच्या प्रवासात एका व्यक्तीचाच हातभार लागला, असे म्हणता येणार नाही. ज्या-ज्या शिक्षकांनी मला घडवलं ते शिक्षक आपापल्या विषयात ग्रेटचं होते. त्यामुळे माझ्या शिल्पकलेमध्ये प्रत्येकाची छाप जाणवते. शिक्षण घेताना शिक्षक आणि विद्यार्थी असं नातंच नव्हतं. एकमेकाला रोज भेटलो नाही तर जीव कासावीस होऊन जायचा. माझ्या शिक्षणात एस. आर. पवार, एम. पी. पवार, मधुकर वंजारी यांचा मोलाचा वाटा आहे. जे. जे.मध्ये प्रत्येक शिक्षकांचे आणि मुलांचे चांगले जमायचे. रोज नवीन गोष्ट शिकायला मिळत असल्याने एक विचारधारा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. जे. जे.मधील शिक्षणात सौंदर्यशास्त्राचे शिक्षण आयुष्याला कलाटणी देऊन गेले. गजानन पाटील नावाच्या शिक्षकाने जे. जे.मधल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर जादू केली. सौंदर्य म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी होते, त्याचा प्रवास कसा असतो, या बाबी गजानन पाटील अतिशय खुबीनं शिकवत असतं. त्याच्या विचारांनी कामाला एक वेगळा आयाम मिळाला.

(शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक)

--

बाबाच माझे गुरू...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरू असतो; पण गुरू वडिलांच्याच रूपात मिळण्यासाठी खरोखरच भाग्य लागते आणि ते भाग्य मला लाभले. माझे बाबा प्रमोद भडकमकर मला गुरू म्हणून लाभले. जन्मापासून बाबांकडून काय घेतले तर ते म्हणजे फक्त संगीतच, म्हणजे तबला. ते बोल म्हणायचे व मी झोपायचे. पुढे पुढे तर ते बोल म्हटल्याशिवाय मी झोपतच नसे. अगदी लहानपणापासून ते रियाजासाठी बसले, की मी त्यांच्या आजूबाजूला असे.

खूप लहान असल्यापासून त्यांनी मला तबला शिकवायला सुरूवात केली. त्यांच्याकडून शिक्षण हे फक्त तबल्यावर बसल्यावरच नाही, तर कुठेही कधीपण मिळाले. जिथे रिदम मिळाला की ते काहीतरी म्हणत, शिकवत. मग ती ट्रेन असो किंवा गाडीचा हॉर्न किंवा अजून काहीही. प्रवासातही ते याचीच चर्चा करीत.

बाबांनी मला कधीच मुलगी म्हणून कसलीही सूट दिली नाही. ते म्हणायचे या वाद्याची जी डिमांड आहे ते तसेच वाजले पाहिजे. बाबांनी तबल्यातील अनेक गोष्टी शिकवल्या. तबला सुरात कसा लावायचा, कायदे कसे वाजले गेले पाहिजेत, रेला वाजवताना कशाची तयारी लागते, बंदिशी कशा वाजवायच्या, कोणत्या अक्षरावर वजन द्यायचे, बंदिशी दुसऱ्या तालात रचताना कशा रचायच्या, कायद्याच्या, रेल्याच्या बंदिशी कशा बांधायच्या, तिहाई कशी बांधायची हे मी त्यांच्याकडून शिकले.

तबला हा सुंदर, आकर्षक कसा वाजवला जाईल, मुख्यत: गाण्याची साथ करताना कसा वाजवायचा या गोष्टीचा त्यांचा खूप अभ्यास होता. तोपण त्यांनी मला शिकविला. अनेक बारकावे बाबांनी मला शिकविले.

बाबा व्यक्ती म्हणून खूप सकारात्मक, मिस्किल, सर्जनशील, गमतीशीर होते. स्टेजवर वाजवताना नवीन काही सुचले तर तिथल्या तिथे वाजविणे, शिकविणे ते करीत असत. प्रत्येक प्रोग्रॅमला काही तरी नवीन करण्याचा त्यांचा अट्टाहास असायचा. त्यांच्यामुळे मला अनेक मोठ्या कलाकारांना भेटण्याची, त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. प्रत्येक कलाकाराचा तबला कसा ऐकायचा, गाणं कसं ऐकायचं, कुणाचे कुठले गुण घ्यायचे हे बाबांनी शिकवलं. रोज त्यांच्या बोलण्यात गुरुजींबद्दल (पं. सुरेशदादा तळवलकर) काही तरी असायचेच. माझं वय, शिक्षण व अनुभव सर्व कमी आहे; पण बाबांमुळे मला जे काही काही मिळालं ते सांगण्याचा हा प्रयत्न. या सर्व आठवणी खूप अविस्मरणीय आहेत, त्या बाबांशिवाय दुसरे कुणी देऊ शकत नाही, याची मला जाणीव आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार.

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)

००


गुरू गुण लिखा न जाई!

गुरू गुण लिखा न जाई!

सब धरती कागज करू, लेखनी सब बन राई

सात समुंद की मासी करू, गुरू गुण लिखा न जाई... ‍

एखाद्याचा आवाज खूप चांगला आहे, परिस्थ‌तिीही पूरक आहे, परंतु गुरू चांगला लाभला नाही, तर यशस्वी शिष्य घडू शकत नाही. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे. मी आज जो काही आहे केवळ गुरूंमुळेच.

विदर्भात माझे क्र‌ीडाशिक्षक देवराव भालेराव हे उत्तम बासरीवादक होते. त्यांची बासरी मी अत्यंत तन्मयतेने ऐकत असे. त्यांनीच माझी संगीतविषयक आवड ओळखली. त्याची जाणीवही करून दिली. मलाही याच क्षेत्रात पुढे जावेसे वाटू लागले. परंतु, संगीत हे करिअरचे क्षेत्र नाही, असे सांगून आईवडिलांनी विरोध केला. त्यामागे माझी काळजी अधिक होती. पं. भीमसेन जोशींची गाणी मी कितीतरी वेळा ऐकत असे. त्यांना भेटावे असे मनोमन वाटत होते. पुसद येथे एका कार्यक्रमात त्यांना भेटलो. त्यांच्याच हस्ताक्षरात त्यांच्या घराचा पत्ता घेतला. त्यांना भेटण्याचा दिवस आणि वेळही ठरली. वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडले. पुण्यात पोहोचलो. परंतु, त्या दिवशी पंडितजी भेटले नाहीत. असे तब्बल २० दिवस चालले. ते सांगतील त्या वेळेच्या दहा मिनिटे आधीच मी त्यांच्या दरवाजाजवळ पोहोचायचो. हे २० दिवस माझ्यासाठी कसोटीचे होते. विसाव्या दिवशी पंडितजींनी घरात बोलावून त्यांच्या रियाजाच्या खोलीमध्ये नेले. तुला येते ते गा, असे सांगितले. त्यांनी गायलेली एक रचना तंतोतंत गाण्याचा प्रयत्न केला. तू हे कोठून शिकलास, असे पंडितजींनी विचारले आणि त्यांच्याकडे माझे गाण्याचे शिक्षण सुरू झाले. पंडितजी गाणे शिकविण्यास तयार झाले, हे ऐकून कुटुंबीय आनंदित झाले. पंडितजींचा अधिकाधिक सहवास लाभावा म्हणून वडिलांनी मला पुण्यात ड्रायव्ह‌िंग क्लासही लावून दिला. पंडितजींच्या सूचनेनुसार नंतर मी त्यांच्याच मुलांसमवेत पं. रामभाऊ भाटे यांच्याकडे शिकलो. त्यांच्यामुळे माझ्यात अामुलाग्र बदल झाला. गाणे शिकत असलो, तरी चरितार्थाचा प्रश्न होताच. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर एसएनडीटीमध्ये नोकरीला लागलो. वीणा सहस्रबुद्ध आणि प्रभा अत्रे यांच्या सान्निध्यात आलो. त्यांच्यामुळे नाशिकमध्ये नोकरीची संधी मिळाली. गाणे शिकणे सोडू नकोस, असा सल्ला रामभाऊ भाटे यांनी दिला. मुंबईत पद्मविभूषण सी. आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलो. आज अधिष्ठाता ललित-कला विभाग, एसएनडीटी वूमेन्स युनिट, मुंबई विद्यापीठ या पदापर्यंत पोहोचलो आहे.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

०००

पतीरुपानेच लाभला गुरू

प्रत्येकाला आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याचा गुरू मिळत असतो. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन जीवनप्रवासाला दिशा देण्याविषयीचे मार्गदर्शन यातून मिळत असते. माझ्या आयुष्यात मात्र माझ्या पतींच्या रुपानेच मला गुरू लाभला. शिक्षण पूर्ण करण्यापासून प्राध्यापक होणे व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करीत माझे पती प्रा. देवीदास गिरी यांची मोलाची साथ मला लाभली.

बारावीपर्यंत अतिशय ग्रामीण भागात मी शिकत होते. बीएच्या प्रथम वर्षात शिकत असताना माझी व प्रा. देवीदास गिरी यांची ओळख झाली आणि काही महिन्यांतच आम्ही विवाहबद्ध झालो. माहेरी व्यवसायाने सोनार कुटुंब असल्याने शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मुलींच्या शिक्षणाबाबत तर ती अजिबातच नव्हती. त्यामुळे शिक्षणास ग्रामीण भागात विरोध होता. प्रा. गिरी यांच्याशी विवाह झाल्यानंतर मात्र सासरी चित्र अगदी उलट होते. शिक्षणासाठी अतिशय पूरक वातावरण होते. सासरे मुख्याध्यापक, दीर, नणंद प्राध्यापक असे चित्र होते. त्यामुळे लग्नानंतर मला माझे पती प्रा. गिरी यांनी पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. स्त्रीने घराबाहेर पडून काम केले पाहिजे, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे, अशी शिकवण मला त्यांनी दिली. त्यानंतर ओझर कॉलेजात मी बीएला मी प्रवेश घेतला. शिक्षणासाठी मिळत असलेल्या पतीच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी मराठी विषयात ओझर कॉलेजात, एमएला नाशिकरोड कॉलेजात पहिली आले. बीएडमध्येही पहिली आले. सेट पास झाले आणि एसएमआरके महिला कॉलेजात अर्ज केल्यानंतर नोकरीही मिळाली. एका ग्रामीण भागातील मुलीसाठी हा प्रवास स्वप्नवत होता. परंतु, माझ्या गुरूंमुळे अर्थात, माझ्या पतींमुळे मला हे यश मिळविता आले.

प्रा. गिरी संमेलन, कविसंमेलने, व्याख्याने यासाठी अनेक ठिकाणी मला घेऊन जायचे. चांगली भाषणे माझ्या कानावर पडावी, असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे माझ्यात बरेच परिवर्तन झाले. बायोडाटा तयार करणे, इंटरव्ह्यूला सामोरे जाणे हे टप्पेदेखील त्यांच्यामुळेच पूर्ण करू शकले. आता स्पर्धा परीक्षांवरील माझी पंधरा पुस्तके, दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. काही क्षण असेही आले की हे आपण करू शकू की नाही, असे वाटले. मात्र, गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. आपल्यात परिवर्तन होण्यासाठी एखादी व्यक्ती आपल्या मागे असावी लागते. मला घरातच गुरू मिळाला आहे. केवळ शिक्षणापुरताच नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मार्गदर्शन मला लाभत आहे.

(शब्दांकन ः अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातवर्षीय समीहनची ‘कळसूबाई’वर स्वारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील रांगड्या सह्याद्री रांगेतील ५ हजार ४०० फूट असे सर्वांत उंच असलेले कळसूबाई शिखर सात वर्षांच्या समीहन पत्की या चिमुकल्याने लीलया सर केले आहे. एकदा तरी या एेतिहासिक शिखराच्या माथ्यावर आपला माथा टेकवावाव, अशी प्रत्येक गिर्यारोहकाची सुप्त इच्छा असते. पावसाळ्यात तर त्यावर चढाई करणे अवघडच असते. पण, समीहनने त्याची आई शलाका व वडील प्रसाद पत्की यांचा बरोबरीने ही मोहीम फत्ते केली आहे.

समीहनला ट्रेकिंगचे आकर्षण असून, या आधी त्याने आपल्या आई-वडिलांबरोबर पांडवलेणी, चामरलेणी व अंजनेरी या पर्वतांवर चढाई केली आहे. ट्रेकिंगला जायच असेल, तर सर्वांत आधी समीहन उठून तयार असतो. ट्रेक करताना त्याला सगळ्यांचा पुढे राहणे व टीमला लीड करणे आवडते. कळसूबाईलाही तो त्याचे फुटबॉल प्रशिक्षक जगदीश खाडे यांचा बरोबरीने सर्वांत पुढे होता, असे त्याच्या पालकांनी सांगितले. मुसळधार पाऊस, गर्द धुके व प्रचंड वारा अशा आव्हानात्मक परिस्थितीत त्याने हे शिखर सर केले.

--

‘बंदे में है दम...’

शिखराच्या शेवटच्या ५०० फुटांवर प्रचंड वारा होता. मोठ्यांनाही स्वतःचा तोल संभाळण कठीण जात होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिखर सर करण्याची समीहनची जिद्द वाखाणण्यासारखी होती. हळूहळू मार्गक्रमण करीत सर्वांनीच कळसूबाई शिखरावर माथा टेकला. सकाळी ९ वाजता सुरू केलेली चढाई दुपारी सव्वाबारा वाजता पूर्ण झाली. सव्वातीन तास चढाई करूनही समीहनचा उत्साह तेवढाच होता. ज्या उत्साहात चढाई केली, तेवढ्याच उत्साहात सगळ्यात पुढे राहून तीन तासांत तो पर्वत उतरला. उतरताना इतर ट्रेकर्सकडून ‘बंदे में दम है’, ‘यू मोटिवेटेड मी’ यांसारख्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया ही खूपच बोलक्या होत्या. भविष्यात महाराष्ट्रतील इतर पर्वतही सर करायचा समीहनचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नाशिक सायकलिस्ट'चे अध्यक्ष जसपाल बिर्दींचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

सायकल चळवळीत मोठे योगदाने देणारे 'नाशिक सायकलिस्ट'चे अध्यक्ष जसपाल बिर्दी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. मुख्य म्हणजे सायकलवर नितांत प्रेम करणाऱ्या बिर्दी इगतपुरी-नाशिक या मार्गावर सायकलिंग करतानाच हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली.

बिर्दी शनिवारी सकाळी सायकलिंगसाठी निघाले, नाशिक-इगतपुरी-नाशिक असा सायकल प्रवास करत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांचे निधन झाले.

सायकलिंगच्या प्रचारासाठी प्रचंड परिश्रम करणारे अशी जसपाल यांची ओळख होती. नाशिक-पंढरपूर सायकलवारीचे, दिव्यांगांसाठी सायकल राईड, महिला सक्षमीकरणासाठी महिला रॅली असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या निधनामुळे सायकलिस्ट समुदायाला मोठा धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'समृद्धी' विरोध तीव्र; दरपत्रकाची होळी

$
0
0

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने क‌ितीही दर दिला तरी समृद्धी महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही, असा पवित्रा घेत संतप्त शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकांची शनिवारी होळी केली. सरकारने जमिनी संपादनाचा प्रयत्न केला तर तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाद्वारे त्यास उत्तर दिले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे समृद्धीचा लढा चिघळण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सरकारला जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. परंतु वडिलोपार्जित जम‌िनी देण्यास शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला असतानाच शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने गावनिहाय जिरायत जमिनींना दिल्या जाणार असलेल्या मोबदल्याचे दरपत्रक जाहीर केले. परंतु सरकार आणि जिल्हा प्रशासन आता पैशांचे प्रलोभन दाखवू लागल्यामूळे शेतकरी संतापले आहेत. दरपत्रक जाहीर झाल्यानंतरची भूमिका ठरविण्यासाठी शनिवारी दुपारी आयटकच्या सीबीएस येथील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीला किसान सभेचे राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, सोमनाथ वाघ, कचरू डुकरे पाटील, भास्कर गुंजाळ, शहाजी पवार आदी उपस्थ‌ित होते. कुठल्याही परिस्थ‌ितीत सरकारला समृद्धी महामार्गासाठी जमिनी द्यायच्या नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

त्यानंतर सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जमले. तेथे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जमिन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, देणार नाही देणार नाही समृद्धीसाठी जमिनी देणार नाही, सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. सरकारने जमिनी घेण्याचा प्रयत्न केलाच तर स्वत:ला संपविण्याची आणि इतरांनाही संपविण्याची तयारी असल्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.

१२ जुलैपासून गावोगावी बैठका

सरकार आणि जिल्हा प्रशासनाने जमिनींसाठी जाहीर केलेले दरपत्रक अमान्य असल्याचे शेतकरी संघर्ष कृती समितीने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत असे सांगणारे सरकार शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार, असा सवाल आंदोलकांनी उपस्थ‌ित केला आहे. १२ ते १४ जुलै या कालावधीत सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यामुळे समृद्धी विरोधातील लढ्याला बळ मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी संघटीत आहेत. पर्यायी मार्गाबाबतचे धोरण शेतकऱ्यांनी सरकारला सांगितले असून, त्याचा विचार व्हायला हवा. दरपत्रकाशी शेतकऱ्यांना घेणे देणे नाही. सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादीत करण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये. - राजू देसले, समन्वयक जमिनी बचाव कृती समिती

हाय कोर्टात सिन्नर तालुक्यातील १५ आणि इगतपुरी तालुक्यातील १६ याचिका दाखल आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दरपत्रक जाहीर करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत कुठलीही भूसंपादनाची कार्यवाही करू नये. - अॅड. रतनकुमार इचम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते, पार्किंगकोंडी फोडणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या महापालिकेतील कारकिर्दीला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत असून, कृष्णा यांना गेल्या वर्षभरात शहर विकासाची कोंडी फोडण्यात यश आले आहे. शहराची विकास प्रक्रिया रोखलेल्या कपाट प्रश्नांची कोंडी त्यांनी वर्षभरात फोडली असून, कपाट घंटागाडी, खतप्रकल्पांसह जवळपास पंधरा प्रकल्प मार्गी लावले आहेत. तसेच त्यांच्याच कारकिर्दीत शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली असून, शहर विकासाचा तुंबलेला बॅकलॉग त्यांनी वर्षभरात भरून काढला आहे. येत्या काळात पार्किंग, रोड सेफ्टी, फुटपाथ या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी `मटा`ला सांगितले.

गेल्या वर्षी ७ जुलै रोजी तत्कालीन आयुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली झाली होती. त्यांच्या जागेवर अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती झाली होती. कृष्णा यांचे आगमन होण्यापूर्वीच शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कपाटांचा प्रश्न चिघळलेला होता. तर एनजीटीने शहरातील बांधकामांवर बंदी घातली होती. घंटागाडी, खतप्रकल्प, वृक्षलागवड, उद्याने असे महत्त्वाचे प्रश्न वादग्रस्त बनले होते. परंतु, प्रत्येक गोष्टीत सोल्यूशन असते अशी भूमिका कृष्णा यांनी पदभार घेताच व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी वर्षभरात काम करत विकास मार्गात अडथळा ठरणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावले आहेत. स्मार्ट सिटीतील समावेशापाठोपाठ घंटागाडी योजना, भंगार बाजार हटवणे, खत प्रकल्पाचे खासगीकरण, मालमत्तेचे सर्व्हेक्षण, उद्यानांची देखभाल दुरुस्ती, एकवीस हजार वृक्षलागवड व वृक्षगणना, ऑटो डीसीआर यंत्रणा, वेस्ट टू एनर्जी, कौशल्य विकास कार्यक्रम, मालमत्ता सर्वेक्षण, ऑनलाइन नागरी सेवा केंद्र, अमृत गार्डन, गोदावरी स्वच्छता, कपाट, असे शहर विकासाला चालना देणारे प्रकल्प मार्गी लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ग्रामसेवक निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

कर्तव्यात कसूर करत असमाधानकारक कामकाज केल्याचा ठपका ठेवत इगतपुरी तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले. तसेच तालुक्यांतर्गत बदल्यांचे समुपदेशक देण्यात येवूनही कार्यभार हस्तांतरित न केल्याचा ठपका ठेवत नऊ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी हे आदेश दिले.

म्हसुर्ली येथील ग्रामसेवक शिवाजी रौंदळ यांना ग्रामसभेस गैरहजर, आंगणवाडी बांधकाम न करता अपहार प्रकरणी, मुरंबीचे ग्रामसेवक सोमनाथ धूम यांना कुरुंगवाडी ग्रामपंचायतीचा कार्यभार हस्तांतरित न करणे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कामे असमाधानकारक केले याप्रकरणी, तसेच लक्ष्मीनगर येथील ग्रामसेविका श्रीमती अनिता कुटेमाटी यांनी कर्तव्यात कसूर, ग्रीनआर्मी अंतर्गत केलेल्या कामाची नोंद न करणे आदींमुळे निलंबित करण्यात आलेे.

नऊ ग्रामसेवकांना नोटिसा

मे अखेरिस तालुक्यांतर्गत बदल्याचे समुपदेशन देवूनही कार्यभार हस्तांतरित न केल्याच्या कारणावरून टाकेदचे ग्रामविकास अधिकारी रामदास इंगळे यांच्यासह ग्रामसेवक संदीप वासवे (इंदोरे), प्रकाश कवठेकर (कोरपगाव), राजेंद्र जाधव (खैरगाव), सुभाष ठाकरे (धामणी), नलिनी घुले(अडसरे बु), अनिता कुटेमाटी (लक्ष्मीनगर), जयश्री भोईर (ओंडली), लता हिले (गरुडेश्वर) यांना कारणे दाखवा नोट‌सिा बजावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी गायकवाड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड यांची, तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पाळदे यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखालील सहकार पॅनलने श्री व्यापारी पॅनलचा २०-१ असा पराभव करून सत्ता मिळवली आहे.

जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. अध्यक्षपदासाठी गायकवाड आणि उपाध्यक्षपदासाठी पाळदे यांचेच उमेदवारी अर्ज आले. त्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे करे यांनी जाहीर केले. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा नीळकंठ करे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी उपाध्यक्ष अशोक चोरडिया, संचालक निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, अशोक सातभाई, डॉ. दत्तात्रय पेखळे, डॉ. प्रशांत भुतडा, रामदास सदाफुले, कमल आढाव, रंजना बोराडे, श्रीराम गायकवाड, अशोक चोरडिया, रमेश धोंगडे, सुनील चोपडा, सुनील आडके, जग्गनाथ आगळे, वसंत अरिंगळे, प्रकाश घुगे आदी उपस्थित होते. बँकेच्या सभासदांनी जो विश्वास दाखविला त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. बँकेला लवकरच शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी सर्व संचालक प्रयत्न करतील, असे आश्वासन दत्ता गायकवाड यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवन पवार अखेर रिपाइंत ‘पावन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवक पवन पवार यांना भाजपने नाकारल्यानंतर मित्रपक्ष असेल्या रिपाइंने शनिवारी पक्षात प्रवेश देऊन पुनर्वसन केले. अकरा महिन्यांपूर्वी अपक्ष नगरसेवक असलेल्या पवार यांना भाजपने प्रवेश दिला. मात्र, महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांची कोंडी झाली होती. पवार यांनी महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली. पण, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी रिपाइंत प्रवेश करण्यासाठी हालचाली केल्या. मात्र, येथेही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. अखेर आज रिपाइंने त्यांना प्रवेश दिला.

महिनाभरापूर्वीच पवार यांच्या रिपाइंत प्रवेशाच्या चर्चेमुळे धुसफूस सुरू झाली होती. त्यावेळी प्रकाश लोंढे यांच्या विरोधकांनी एकत्र येत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष म्हणून पवार यांच्या नियुक्तीचा ठराव करीत शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या होत्या. रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या वादावर पडदा टाकून जिल्हाध्यक्षपदी प्रकाश लोंढेच असल्याचे स्पष्ट केले होते. त्या वादावर आता पडदा टाकून पवार यांना प्रवेश दिला आहे.यावेळी काकासाहेब खंबाळकर, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.


भूतकाळाशी देणेघेणे नाही

पवन पवार काल काय होते याच्याशी देणेघेणे नाही. त्यांनी आता रिपाइंत प्रवेश केला असून, ते लोकशाही मानणारे असतील, असे सांगत जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी आज केवळ पक्ष प्रवेश असल्याचे सांगितले. विरोधी पक्षाचे लोक वावड्या उठवत असून, रिपाइंची जिल्ह्यात जोरात घोडदौड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रिपाइंने पवन पवारबरोबरच देवळाली कॅम्प येथील जमील सय्यद व प्रा. प्रताप मेंढेकर यांनाही प्रवेश दिला. पवन पवार यांच्या प्रवेशासाठी नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशीर झाल्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७ उमेदवारांचा फैसला मंगळवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक बार असोसिएन निवडणुकीस अवघे काही तास शिल्लक असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने निवडणुकीचा फिव्हर चांगलाच वाढला आहे. या निवडणुकीसाठी ५७ उमेदवार नशिब आजमावत असून, तीन हजार ५६ मतदार उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. मंगळवारी मतदान होणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.७) जिल्हा कोर्टात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात निवडणूक लढवणाऱ्या सत्ताधारीसह विरोधकांनी एकत्र बसून आपआपले विचार मांडले. यावेळी दोन्ही बाजुंनी आश्वासनांचा पाऊस पडला. वकीलांच्या दैनंदिन समस्या सोडव‌ण्यिासह जिल्हा कोर्टास भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, अद्ययावत लायब्ररी, वकिलांसाठी बार रूम, नवीन वकिलांना सोयी-सुविधा याबरोबरच न्यायालयात मोफत वायफाय अशी विविध आश्वासने देण्यात आली.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष का. का. घुगे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, माजी अध्यक्ष भास्करराव पवार, माजी जिल्हा सरकारी वकील वसंत पेखळे यांनी ही विशेष सभा आयोजीत केली होती. दैनंदिन समस्यांवरील उपाययोजनांबाबत मतदारांना माहिती देण्यात आली.

मतदारांना दिले आश्वासन

अध्यक्षपदासाठी उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांकडून पार्किंग प्रश्न, पोलिसांकडून मिळालेले जागेवर तयार होणाऱ्या इमारतींमध्ये वकिलांसाठी बाररुम, विमा, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, नवीन वकिलांसाठी स्टायपेंड, नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. तर काहींनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत बदल घडवण्याचे आवाहन केले. दरम्यान, ही निवडणूक ११ जुलै रोजी पार पडणार असून, इच्छूक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी सोशल मीड‌यिावरील संदेशांच्या वापराबरोबरच पत्रकांचा वापर करीत खासगी गाठीभेटींवर जोर दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजबिलाचा ‘शॉक’

$
0
0

उपनगर वीज ग्राहकास वापर कमी असूनही जास्तीचे बील

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वीज मिटर रिडिंग चुकीचे झाल्याने घरगुती वीज ग्राहकाला भरमसाठ रकमेचे वीज बील देऊन महावितरणने संबधित वीज ग्राहकाला हाय व्होल्टेजचा शॉक दिला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात महावितरणच्या मोबाइल अॅपवर या प्रकाराविषयी वीज ग्राहकाने केलेल्या तक्रारीला महावितरणकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. चुकीचे वीजमिटर रिडिंगमुळे वाढीव वीजबील येणे व त्याबद्दलच्या वीज ग्राहकांच्या तक्रारींकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याची प्रचिती शहरात वीज ग्राहकांना वारंवार येत आहे.

उपनगर कॉलनीत वास्तव्यास असलेल्या विलास सोनार यांना महावितरणने जून महिन्यासाठीचे १३२० युनिट वापरल्याचे वीजबिलाचा मोबाइलवर एसएमएस पाठविला आहे. प्रत्यक्षात वीज मीटरमध्ये वापरलेल्या युनिटमध्ये मात्र मोठी तफावत दिसून आली. १३२० युनिट वापरल्याचा मेसेज पाहून विलास सोनार यांना जणू काही हाय व्होल्टेज शॉकच

बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ग्रामपंचायतींमधून स्वस्त धान्य वितरण

$
0
0

बचतगटांची मक्तेदारी लवकरच संपुष्टात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन धान्य दुकान वाटपाच्या नियमनात सरकारने आमूलाग्र बदल केले आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना रेशनची दुकाने चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बचतगटांची मक्तेदारी संपुष्टात येणार असून, नागरिकांनाही हेलपाट्यांपासून मुक्तता मिळणार आहे.

पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रेशन धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आधारसीडिंग, बायोमेट्रिक प्रणालीसारख्या उपाययोजना हाती घेतल्या असून, जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक पॉस मशिन्सही वितरीत करण्यात आले आहेत. एवढ्यावरच न थांबता सरकारने आता रेशन धान्य वितरण प्रणालीत असलेली बचतगटांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठा विभागातर्फे ग्रामीण भागात वितरीत केले जाणारे धान्य प्राधान्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नोंदणीकृत स्वयंसहायता बचतगट तसेच, नोंदणीकृत सहकारी संस्थांकडेही धान्य वाटपाची जबाबदारी दिली जाऊ शकणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या संस्था तसेच, सरतेशेवटी महिला स्वयंसहायता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्थांना दुकानांचे वाटप करता येणार आहे.

सुप्रीम कोर्टानेही १० फेब्रुवारी रोजी दिलेल्या एका निकालात रेशन दुकानांचे जाहीरनामे काढताना त्यामध्ये क्रम ठरवून दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतींना त्यामध्ये अग्रकम देण्यात आला आहे. बायोमेट्रिक तसेच, ग्रामपंचायतींवर सोपविलेली जबाबदारी यामुळे धान्याच्या काळ्याबाजाराला चाप बसणार आहे.

वितरण नवीन कायद्यानुसारच

जिल्हा पुरवठा विभागाने गतवर्षी जिल्ह्यातील रद्द झालेले, विविध कारणांनी बंद पडलेले किंवा राजीनामा दिलेले असे एकूण ३१९ रेशन दुकानांचे जाहीरनामे काढले. परंतु, त्यापैकी अवघ्या ११० दुकानांसाठी प्रशासनाला अर्ज प्राप्त झाले. अजूनही जिल्हास्तरीय समितीकडून दुकानांचे वाटप बाकी असून, त्यामुळेच अर्ज आलेली दुकाने वगळता अन्य दुकानांचे वितरण करताना पुरवठा विभागाला आता सरकारच्या नवीन कायद्याचा आधार घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैधमापन विभागाची ‘सोशल’ धूळफेक

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

जीएसटीच्या नावाखाली काही ठिकाणी छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारून फसवणूक केली जात आहे. असा प्रकार करणाऱ्याविरुद्ध ग्राहकांनी वैधमापन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन वैधमापन विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात वैधमापन विभागाने तक्रार दाखल करण्यासाठी जाहीर केलेला ई-मेलच अवैध असून, व्हॉट्सअॅप क्रमांक बंद, तर फेसबुक पेजवर कोणताच प्रतिसाद ग्राहकांना मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर काही व्यापारी जीएसटीच्या नावाखाली वस्तूंची जास्त रक्कम आकारत ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याच्या अनेक घटना सध्या घडत आहेत. वस्तूंवर छापण्यात आलेल्या मूळ रकमेपेक्षा अधिक रक्कम आकारण्यात येत असल्याची बाब वैधमापन विभागाच्या लक्षात आली. त्यानंतर जास्त रक्कम आकारणाऱ्या व्यापाऱ्यांसंदर्भातील तक्रारी दाखल करण्यासाठी वैधमापन विभागाकडून सोशल मीडियाच्या आधारे तक्रार दाखल करण्याच्या सुविधा ग्राहकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. यात ग्राहकांनी Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या फेसबुक पेजवर, ९८६९६९१६६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अथवा वैधमापन विभागाच्या dclmms_complaints@yahoo.com या ई-मेलवर किंवा ०२२-२२६२२०२२ या हेल्पलाइन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन वैधमापन विभागाने ग्राहकांना केले आहे.

तुम्हीच सांगा तक्रार कशी करायची?

फेसबुक पेजला टॅग करीत पाणी बॉटल, अंडी, खाद्य पदार्थ, पॅकिंग किराणा माल, तसेच इतर वस्तू यावर मूळ रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सोबतीला बिलदेखील तक्रारदारांनी जोडले आहे. पण, विशेष बाब म्हणजे या तक्रारींना फेसबुक पेजवर वैधमापन विभागाकडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया मिळालेली नाही. ‘आपका व्हॉट्सअॅप नंबर बंद हैं, कंप्लेंट कैसे करे?’, ‘तुमचा ई-मेल नॉट फाउंड येतोय, तुम्हीच सांगा आम्ही तक्रार

कशी करायची?’ असा सवाल तक्रारदारांनी वैधमापन विभागाला फेसबुकवर विचारला आहे. वैधमापन विभागाने सोशल मीडियाच्या आधारे तक्रार दाखल करा, असे सांगून ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याची भावना तक्रारदारांमध्ये आहे.


तक्रारदारांचा होतोय हिरमोड

तक्रारींसाठी देण्यात आलेला ई-मेल उपलब्ध नसल्याचे दिसून आले असून, या ई-मेलवर तक्रार दाखल केल्यानंतर not found email address असे प्रत्युत्तर तक्रारदारांना येत आहे. तसेच, तक्रारीसाठीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाचे लास्ट सीन ९ एप्रिल २०१७ असून, त्यानंतर हे व्हॉट्सअॅप उघडलेच गेले नसल्याचे समोर आले आहे. फेसबुक पेजवर अद्याप एकही तक्रार दिसत नसून, काही तक्रारदारांनी फेसबुक पेजला टॅग करत काही तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याचप्रमाणे हेल्पलाइन नंबर लागतच नसल्याच्या, तसेच उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तक्रारदारांचा हिरमोड होताना दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images