Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अपंग युनिटमध्ये भ्रष्टाचार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील अपंग युनिट बंद झाल्यानंतर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत सामावून घेण्यासाठी सरकारने आदेश दिले होते. मात्र कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्या करण्यात आलेल्या नाहीत. धुळ्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची हीच परिस्थिती असून, प्रत्यक्षात कोणतेही काम आदेशाप्रमाणे झालेले नाही, असा धुळे जिल्हा परिषदेच्या बैठकीत सदस्य किरण पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी यासंदर्भात चौकशी समिती नियुक्त केल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि. १०) अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती मधुकर गर्दे, नूतन पाटील, लीलावती बेडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे उपस्थित होते.

बैठकीत अपंग युनिटचा विषय सदस्य किरण पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी, गतिमंद मुलांच्या बुद्धीमत्तेनुसार त्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्या यासाठी राज्यात अपंग युनिट स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. मात्र कालांतराने हे युनिट बंद झाले. त्यामुळे युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामावून घेण्याच्या सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोप किरण पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे याप्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी त्यांनी केली. बैठकीत तसा ठराव जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारित करून चौकशी समितीमध्ये सदस्य किरण पाटील, मधुकर गर्दे, विलास बिरारी यांचा समावेश केला आहे.



नोकरीसाठी लाखो रुपये

जिल्ह्यातील अपंग युनिट सद्यस्थितीत बंद आहे. मात्र अपंग युनिटमध्ये सामावून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. लाखो रुपये देऊनही युनिट बंद पडलेले आहे. तर कर्मचारी सेवेपासून वंचित झाले. ज्यांनी कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये नोकरीस लावण्यासाठी घेतले ते मालामाल झाले आहेत. त्यामुळे सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी अपंग युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांचा वेतनासाठी पंचायत समितीत ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे. आर्थिक कोंडी होत असल्याने संतप्त शिक्षकांनी बागलाण पंचायत समितीच्या लेखा अधिकारी शार्दूल यांना घेराव घालून आवारात भर उन्हात बसून आंदोलन छेडले.

सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक व्यवहारामुळे शिक्षकांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार होत नव्हेत. यामुळे बागलाण तालुका शिक्षक प्राथमिक शिक्षक समिती, बागलाण तालुका राष्ट्रवादी प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने लेखा विभागाचे अधिकारी यांना घेराव घालण्यात आला. पगार होत नसल्यामुळे शिक्षकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. कर्जाचे हप्ते, दवाखाना, लग्न समारंभासाठी पैशांची चणवण भासत आहे. लवकारात लवकर पगार व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आंदोलनात प्राथमिक शिक्षक संघटनाचे सरचिटणीस नितीन सोनवणे, शांतराम बधान आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येत्या २४ मे रोजी महापालिकेसाठी मतदान होत असून, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत भीमराज दराडे यांनी मार्गदर्शन केले. बुधवारी हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. शहरातील दीपक व मोहन चित्रपटगृहात दोन सत्रात हे प्रशिक्षण पार पडले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रवींद्र जगताप, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, नायब तहसीलदार गिरीश वाखारे आदी उपस्थित होते.

प्रशिक्षण कार्यक्रमात आयोगाकडून तयार करण्यात आलेली मतदान प्रकियेसंबंधीची ध्वनीचित्रफीत दाखव‌िण्यात आली. दराडे यांनी मतदानपूर्व तयारी, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाची कामे याविषयी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. यात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई यांचे जबादारी व करावयाची कामे यांची माहिती दिली. या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शंकांचेही निरसन करणत आले. या प्रशिक्षणासाठी सर्व केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे आज शुभमंगल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस नेते व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांची नात व इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांची जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असलेली कन्या नयना गावित या गुरुवारी बोहल्यावर चढणार आहेत. अवघ्या ५० दिवसांपूर्वीच त्या जिल्हा परिषदेची पहिल्यांदा पायरी चढल्या व त्यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. त्यानंतर आज त्यांच्या गळ्यात लग्नाची माळ पडणार आहे. अवघ्या पन्नास दिवसांत कौटुंबिक व जिल्हा परिषद अशी दुहेरी जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे.

नयना गावित या पहिल्यांदाच निवडून आल्या व पहिल्याच टर्ममध्येच त्यांना उपाध्यक्षपदाची संधी काँग्रेसतर्फे मिळाली आहे. त्या उच्चशिक्षित असून, त्यांनी इंग्रजी विषय घेऊन एम. ए. केले. त्यानंतर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात त्या एमबीएचे शिक्षण घेत असतानाच त्यांचे विरार येथील विवेक राजेंद्र मिश्रा यांच्याशी सूर जुळले. विवेकचा मीड‌िया व जाहिरातींचा व्यवसाय असून गोरेगाव येथे त्यांचे कार्यालय आहे. तर नयना गावित यांना राजकीय वारसा असून त्यांचा कल राजकारणाकडे आहे. अवघ्या ३० वर्षांच्या असलेल्या नयना गावित यांनी यूपीएससी परीक्षेची तयारीसुध्दा सुरू केली होती. त्यामुळे त्या पुढील काळात नेमके कशात करिअर करतात, हे पाहणे औ‌त्सुक्याचे ठरणार आहे.

वाडीवऱ्हे गटातून निवड

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा काँग्रेस पक्षाचे खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांच्या नात तर इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश गावित यांच्या त्या कन्या आहेत. नुकत्याच जिल्हा परिषदेत त्या वाडीवऱ्हे गटातून काँग्रेसकडून निवडून आल्या. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्याकडे आली. त्यांनी देवमोगरा माता सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर व इगतपुरी येथे केलेल्या कामांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

दिग्गजांची हजेरी

केंद्रीय मंत्र‌िपद भूषवणारे आजोबा व आमदार असलेल्या आईबरोबरच स्वतः जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असल्यामुळे या गावित यांच्या लग्नसोहळ्यास दिग्गजांची हजेरी राहणार आहे. ठक्कर डोम येथे या लग्नाची धूमधडाक्यात तयारी सुरू असून, त्यात सर्वपक्षीय नेते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक मदतीसंदर्भात आज फैसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक मदत करण्याबाबतचा चेंडू मुख्यमंत्र्यांनी सहकार सचिवांकडे टोलवला आहे. राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात सहकार सचिव, शिखर बँकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी मुंबईत संचालकांची बैठक होणार आहे. या बैठकीत आर्थिक निधीच्या मदतीबाबत फैसला होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळविण्यासाठी अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह संचालक मंडळाने मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात अध्यक्षांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत गाऱ्हाणे मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांचे ऐकून घेत गुरुवारी सहकार सचिव, नाबार्ड आणि शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याच्या सूचना केल्या. राज्य सहकारी बँकेकडे जिल्हा बँकेचे राखीव असलेले तीनशे कोटी रुपये द्यावेत, अशी विनंती यावेळी केली. परंतु, मुख्यमंत्र्यांनी ही मागणी टोलवली असून, आता गुरुवारच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे शेतकऱ्यांसह संचालकांच्या नजरा लागून आहेत. जिल्हा बँकेकडे नोटबंदीत जमा असलेल्या ३४२ कोटींच्या नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. त्यामुळे या नोटा तातडीने बदलून द्या, अन्यथा राजीनामे देऊ, अशी धमकी दराडे यांनी मुख्यमंत्र्यांसह आरबीआयला दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या कामांना मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या विकासासाठी १३७ कोटींचा निधी दिल्यानंतरही विकासकामांना अद्याप चालना मिळालेली नाही. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी प्रशिक्षणाहून परतताच स्मार्ट सिटीच्या कामाला चालना दिली आहे. स्मार्ट सिटीच्या प्रभारी सीईओपदी असलेले प्रशासन उपायुक्त विजय पगार यांच्याकडे आता स्मार्ट सिटीचा पूर्ण प्रभार दिला आहे. तर प्रशासन उपायुक्त पदाचा पदभार हरिभाऊ फडोळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. एसपीव्हीच्या बैठकीत मंजूर केलेल्या १६ कोटींच्या रामवाडी येथील हनुमान घाट पुलाच्या निविदा आठ दिवसांत काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच काल‌िदाससाठी मंजूर केलेला निधीही पालिकेकडे वर्गीकृत करण्याचे आदेशही दिले आहेत.

स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश होऊन आठ महीने झाले तरी, विकासकामांचा श्रीगणेशा झालेला नाही. स्मार्ट सिटीसाठी स्थापन केलेल्या नाशिक म्युनिस‌िपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीची दोनदा बैठक झाली आहे. परंतु, या कंपनीला अद्यापही पूर्णवेळ सीईओ, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि इतर तांत्रिक पदांवर अधिकारी मिळालेले नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटीचे कामकाज जवळपास ठप्पच होते. केंद्र व राज्य सरकारने नाशिकच्या स्मार्ट सिटीला पहिला हफ्ता म्हणून १३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर होऊन आता मह‌िना लोटला असला तरी, एकाही विकासकामाचा शुभारंभ झालेला नाही. त्यातच आयुक्त अभिषेक कृष्णा हे मह‌िनाभर प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे स्मार्ट चे कामकाज जवळपास ठप्पच होते.
एसपीव्हीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या दुसऱ्या बैठकीत २६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात गोदावरी नदीवर रामवाडीजवळील हनुमानघाट पूल बांधण्यासाठी १६ कोटी मंजूर केले आहेत. स्मार्ट सिटी कंपनीकडे अद्याप तांत्रिक पदे भरली नाहीत. त्यामुळे महापालिकेकडूनच हे काम करून या कामाच्या निविदा आठ दिवसांत काढण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. तसेच महाकवी काल‌िदास कलामंद‌िराच्या नूतनीकरणासाठी तातडीने मंजूर सहा कोटींचा निधी पालिकेकडे हस्तांतरीत केला जाणार आहे. त्यामुळे हे दोन प्रोजेक्ट तातडीने मार्गी लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडजवळ अपघात; दोन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-मालेगाव मार्गावरील दहेगाव शिवारात बुधवारी मध्यरात्री ट्रक व ट्रेलर यांची समोरासमोर धडक झाल्याने ट्रक चालक जागीच ठार झाला. या अपघातामुळे कुंदलगाव व दहेगाव मार्गावर वाहतूक खोळंबली असताना रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकवर आयशर वाहन जाऊन आदळल्याने झालेल्या दुसऱ्या अपघातात आणखी एक जण ठार झाला. या दोन्ही अपघातात एकूण तीन जखमी झाले. जखमींवर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे इंदोर पुणे महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली. बचाव कार्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी चांदवड पोल‌िस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोल‌िसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे मनमाड मालेगाव मार्गावरील दहेगाव शिवारात (एचआर ६१ बी ५०२२) ट्रक मालेगावहून मनमाडकडे जात असताना मनमाडहून मालेगावकडे जाणाऱ्या ट्रेलरशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक चालक समीरउल्ला एजाजुद्दीन (मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला. दहेगाव शिवारात पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले. दरम्यान या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका ट्रकवर आयशर गाडी जाऊन आदळली.या अपघात सावन भावत (वय २२ रा. इंदूर) हा जागीच ठार झाला असून, त्याचा साथीदार जखमी झाला. पोलिसांनी काही तासात वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी चांदवड पोल‌िस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या अपघातात तीन जण जखमी झाले असून, एका जखमीने अपघातानंतर पळ काढल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. या दोन्ही अपघातात जखमी झालेल्यात खुर्शीद अहमद व विजय किनाट या दोघांचा समावेश असून मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी (दि. ९) सायंकाळी ओव्हरटेक करताना टाटा सुमो वाहन उभ्या असलेल्या डंपरवर आदळल्याने याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ऐंशी फुटी रोडलगत फिरदोस नगरातील नवविवाहित जोडप्यासह नातेवाईक मंडळी मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पीरबाबा दर्गावर दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला. यामध्ये सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर सुमो वाहन आदळले आणि तब्बल शंभर फुटांपर्यंत पलटी घेत गेले.

या अपघातातील सर्व मृत हे धुळे शहरातील राहणारे आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये महिला, मुली आणि मुलांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ हिरे मेडिकल कॉलेज आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी महामार्गावर उभ्या असलेल्या डंपर चालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अट्टल चोरट्यांना अटक

जळगाव : जिल्हा पेठ परिसरातील चोपडा मार्केटमधील सिगारेटच्या गोडावून मधून चोरट्यांनी २६ जानेवारीला ५२ लाख ९६ हजार रुपये किमतीचे ६७ सिगारेटचे बॅाक्स चोरून नेले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी पनवेल येथून तीन संशयितांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नंदुरबारला लवकरच वैद्यकीय कॉलेज

$
0
0

महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; पहिल्या दिवशी विक्रमी गर्दीचा अंदाज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात लवकरच शासकीय वैद्यकीय कॉलेज कार्यान्वित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे महाआरोग्य शिबिर ऐतिहासिक असून, नंदुरबार जिल्ह्यातील या शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्याकडून वीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येत असून, केंद्राच्या माध्यमातून पन्नास खाटांचे रुग्णालयदेखील सुरू होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे आदिवासी जिल्ह्यातील नागरिकांना आता मुंबई, पुण्यात उपचार घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

खान्देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, तसेच आदिवासी भागातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी दि. ३० एप्रिल ते २ मेपर्यंत तीनदिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मोदी मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघूवंशी, माजी वैद्यकीय मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले की, राज्यात आतापर्यंत झालेल्या महाआरोग्य शिबीरांपैकी नंदुरबार शहरातील आरोग्य शिबिर हे ऐतिहासिक झाले आहे. शिबिरात ज्या रुग्णांनी तपासणी केली आहे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक, मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांची आवश्यकता असल्यास सरकारकडून मोफत उपचार देऊन बरे केले जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या नागरिकांनी महाशिबीरात तपासणीसाठी हजेरी लावली आहे. या जिल्ह्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘संख्यात्मक आणि गुणात्मक आघाड्यांवर सर्वोत्तम’

खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबिर हे संख्यात्मक आणि गुणात्मक या आघाड्यावर सर्वोत्तम ठरल्याचा दावा वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘मटा’शी बोलताना केला. त्यांनी सांगितले की, महाआरोग्य शिबिरात सकाळपासूनच गर्दी झालेली दिसून आली. आतापर्यंत राज्यात वीस जिल्ह्यांमध्ये असे शिबिरे घेण्यात आली मात्र सर्वात जास्त्‍ा प्रतिसाद हा सातपुडा भागातील लोकांनी दिला आहे. रविवारी (दि. ३०) सकाळी अकरा वाजेपर्यंत शिबिरात एक लाखांहून अधिक नागरिकांनी तपासणीसाठी हजेरी लावली. तर दोन लाख रुग्णांपेक्षा जास्त तपासणीसाठी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गर्दीचा अंदाज लावणे कठीण होत आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याशेजारी असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेशातूनदेखील हजारो नागरिक शिबिरात तपासणीसाठी आले होते.

रुग्ण तपासणीचे नऊ डोम

याप्रसंगी २० प्रमुख आजारांबरोबरच ‘आयुष’मधील उपचार येथे असल्याने रुग्णांना आपल्या गरजेनुसार उपचार घेण्यासाठी त्या-त्या डोममध्ये गर्दी करत होते. आयुषसाठी असलेल्या डोममध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांना उपचार करत होते. यासाठी कर्मवीर व्यं. ता. रणधीर आयुर्वेद कॉलेज, शिरपूर, श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक कॉलेज आणि आर. डी. चोरडिया हॉस्पिटल, चांदवड (नाशिक) येथील डॉक्टर उपस्थित होते. प्रत्येक डोममध्ये प्रामुख्याने ग्रंथीविकार, मेंदुविकार, मनोविकारर, बीएमडी (हाडाचाठिसूळपणा) श्वसनविकार, हृद्यविकार, कर्करोग त्वचाविकार, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, मॅमोग्राफी, कान-नाक-घसा यासह शस्त्रक्रियासाठीच्या विविध आजारांसाठीच्या तपासणी करण्यात येत होत्या. यासाठी मुंबई मधील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट, केईएम, जे. जे. हॉस्पिटल, हिंदुजा, लीलावती, पुणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव येथील नामांकित डॉक्टर, विविध जिल्हा रुग्णालयांची वैद्यकिय तज्ज्ञांचे पथक हजर राहून उपचार करत होते. कोट्यवधी रुपयांची औषधे कंपन्या व रुग्णालयांनी

उपलब्ध केल्याचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितले. शस्त्रक्रिया नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे व त्याद्वारे कोणत्याही गंभीर व मोठ्या आजारांची निश्चिती झालेल्या रुग्णांची नोंद घेऊन त्याचा संगणकीय डाटा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दंतरुग्णांसाठी मोबाइल व्हॅन

येथील दंतरोग कॉलेज, धुळे, जिल्हा रुग्णालय धुळे, एसएमबीटी डेन्टल हॉस्पिटल संगमनेर (अहमदनगर) यांचे पथक दंत रुग्णांसाठी सज्ज होते. त्यासाठी विश्वास पाटील ओरल हेल्थ मोबाइल युनिट हजर होते. येथील ३ मोबाइल व्हॅनमधील दंत चिकित्सायंत्रणेद्वारे जवळपास २८ डेन्टीस्टचे पथक तात्काळ तपासणी व उपचार करत होते. याचबरोबर नेत्ररुग्ण तपासणीची व रुग्णांना मोफत चष्मा देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोनशे किलो भांग जप्त

$
0
0

धुळे : इंदूरकडून धुळ्याकडे खासगी कारमधून भांगची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वाहनाची तपासणी केली असता सोमवारी (दि. १) सायंकाळी एका इंडिगो (क्र. एमएच ३९ जे १४७८) कारमधून कोरड्या भांगची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या गाडीतून दोनशे किलो कोरडी भांग जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांकडून गाडीसह ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ रवींद्र राणा (रा. माधवपुरा पालाबाजार) आणि त्याचा जोडीदार राजेशभाऊ यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील राजेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला. चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे प्रेमराज पाटील यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर लिपिक बेडसेंचे निलंबन

$
0
0

शिक्षण उपसंचालकांकडून कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी गेल्या काही वर्षापासून खासगी व्यक्तीची कार्यालयातील कामांसाठी नियुक्ती केली होती. तर गेल्या काही वर्षांपासून बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक नियुक्तीचे प्रस्ताव मंजूर केले होते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक कागदपत्रांची अफरातफर करून आर्थिक फायदा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपिक बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘मटा’नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच बेडसे यांच्याविरोधात आमदार अनिल गोटेंसह शिक्षक संघटना व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी लिपिक रवींद्र बेडसे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यात लाच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कार्यालयातील लिपिक रवींद्र बेडसे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील पत्रव्यवहार, आमदार अनिल गोटे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केलेली तक्रार तसेच अनुसूचित जाती जमाती संघटना, नारायण पाटील, परशुराम पाकळे, संग्राम पाटील यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत लिपीक बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नेमण्यात आले आहे.

बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून जयहिंद शाळेतील शिक्षिका पुष्पा पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणदेखील सुरू केले होते. याप्रकरणी बेडसे यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय खेळाडूंना सवलतीचे गुण मिळावेत

$
0
0

धुळे : सरकार निर्णयानुसार ४२ खेळांव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने याबाबत इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरसकट सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा प्रशासनाला खेळाडूंनी दिले आहे.

निवेदनात, इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही शालेय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले आहे. सरावासाठी अभ्यासाचा वेळ खर्च केला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर इतर मुले आमची अवहेलना करतील, यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

यावेळी निवेदन देतांना जिल्ह्यातील खेळाडू ममता फटकाळ, दिपाली जोहरी, हर्षदा पाटील, रोहित गायकवाड, अश्विन पाटील, सोनू राजपूत आदी खेळाडू तथा क्रीडा शिक्षक मिनलकुमार वळवी, पंकज पाठक, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, प्रशिक्षक राकेश माळी, जगदीश वंजारी, जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपूर नगर परिषदेला ३ कोटींचे बक्षिस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरपूर नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी रुपयांचे बक्षिस देऊन गुरुवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांना मुंबई येथे गौरविण्यात आले.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली जात असून, सुरुवातीस संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत शिरपूर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातत्याने अतिशय चांगले काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार दि. २० एप्रिलला नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्याबाबत पहिल्या

नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट ब वर्ग नगर परिषदांमधून शिरपूर वरवाडे नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मुंबईला नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. याबद्दल शिरपूर शहरातील समस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी धुळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि. १०) बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर धुळ्यात येत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह पांझरा नदी काठावरील दुतर्फा रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. याशिवाय इतरही कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे.

साक्री रोडलगत सिंचन भवनामागे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच ७५ कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या पांझरा काठावरील दोन्ही बाजूच्या रस्ते कामाचाही शुभारंभ यावेळी करण्यात येणार असल्याचे आमदार गोटे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील डॉ. जगन्नाथ वाणींचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील विधायक चळवळीतील अग्रणी डॉ. जगन्नाथ वाणी (वय ८३) यांचे शनिवारी (दि. ६ मे) कॅनडामध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी १०.२२ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. कॅनडामधील कॅलगरी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ केले यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

खान्देशात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांनी डॉ. वाणी सर्वांना परिचित होते. त्यांना २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. ‘देवराई’ या मराठी चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यावर उपचारांनी मात करीत चार ते पाच वर्षे त्यांनी काढली. अशाही अवस्थेत ते मायदेशी येऊन संस्थेचे कामकाज पाहत होते. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत ते हिरिरीने सहभागी होत असत. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी कमलिनी वाणी यांचे निधन झाले. डॉ. वाणी यांच्या आजारपणात त्यांची बहीण पुष्पलता शिरुडे आणि बंधू चंद्रकांत केले नुकतेच त्यांना कॅनडात जाऊन भेटले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच डॉ. वाणी यांनी जगाचा निरोप घेतला.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले

डॉ. वाणी हे राष्ट्रसेवा दलाचे सैनिक होते. त्यांच्यावर सेवा दलातून झालेल्या संस्काराचे त्यांनी सोने केले. परदेशात स्थायिक असूनही मायदेशाकडे अर्थात धुळ्याकडे त्यांचे नेहमी लक्ष असे. त्यांनी स्थापन केलेली वैशिष्ट्यपूर्ण संस्था ही त्याचीच पावती आहे. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या रूपाने एक बहुआयामी व विधायक दृष्टीचे व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना खान्देशातून व्यक्त होत आहे.

डॉ. वाणींचा अल्प परिचय

- डॉ. वाणी यांनी शालेय शिक्षण धुळ्यात, उच्चशिक्षण पुण्यात व विद्यावाचस्पती ही पदवी कॅनडात घेतली.

- धुळ्यातील कृषी महाविद्यालय आणि पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील कालखंड सोडला तर त्यांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द कॅनडातच गेली.

- १९९६ मध्ये ते कॅलगरी विद्यापीठातून निवृत्त झाले.

- २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही विमाशास्त्रीय विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी चालना दिली.

- मनोरुग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात अनेक उपक्रम राबविले.

- का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, स्किझोफ्रेनिया सोसायटीची स्थापना त्यांनी पुण्यात केली.

- शारदा नेत्रालय, बधभ्र पुनर्वसन संस्था असे विविध उपक्रम सुरू केले.

- कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी संस्थेची स्थापना केली.

- कॅलगरीत जागतिक संगीत अभ्यासक्रमदेखील त्यांनी सुरू केला.

- कॅनडात महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली.

- जनजागृतीसाठी ‘देवराई’, ‘एक कप च्या’ आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

- अनेक ग्रंथ प्रकाशन, अनेकविध पुरस्कार हे त्यांचे संचित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसंग्रामचा इशारा

$
0
0

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा उधळून लावणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी निवेदन देऊन दिला. तसेच शहराचे आमदार अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसंग्राम पक्षाने प्रसिद्धपत्रक काढून राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे. कोणाला व्यासपीठावर बसवायचे हा आमचा निर्णय असल्याचे त्यात म्ह‌टले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सोमवारी (दि. ८) जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आमदार गोटेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुंडाला व्यासपीठावर बसविल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. याला उत्तर म्हणून लोकसंग्राम पक्षाने एक प्रसिद्धपत्रक काढले आहे. यात व्यासपीठावर कोणाला बसवायचे हा आमचा अधिकार आहे. तुमचा काय संबंध? असे म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोरेंवर निशाणा साधला आहे. ‘सभा उधळायला दोन पायावर याल आणि जाताना कशावर जाल?’ याचा विचार करा, असेही यात म्हटले आहे. पत्रकावर दिलीप साळूंखे, अमोल सूर्यवंशी, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अपघातांत ९ ठार, १७ गंभीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत नऊ जण ठार, तर १७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. साक्री तालुक्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्याजवळ विचित्र असा तिहेरी अपघात झाला. यात चार जण ठार झाले. तर धुळ्याजवळील गुरुद्वाराजवळ झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी पिंपळनेरहून साक्री जात असताना रस्त्यावर असलेले खड्डे चुकविताना समोरून येणाऱ्या रिक्षावर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागून भरधाव वेगाने आलेली मोटारसायकल आदळली. त्या धडकेने मोटारसायकलच्या टाकीतून पेट्रोल पडून आग लागली. या आगीमु‍ळे मोटारसायकल व पिकअप गाडी जळाली. तर दुसरा अपघात टाटा सुमो ट्रकवर आदळल्याने झाला. या अपघातात सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले. यात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे चुकवणे जीवावर बेतले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्यावर महिन्द्रा पिकअप मालवाहू गाडी (एमएच १८/एए ७५२१) पिंपळनेरहून साक्रीकडे जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना समोरील अॅपे रिक्षावर (एमएच १८/१९३६) वर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागे भरधाव येणारी विनाक्रमांकाची मोटारसायकल पिकअप गाडीवर आदळली.


मोटारसायकलचे पेट्रोल बाहेर आल्याने काही क्षणातच मोटारसायकलसह पिकअपला आगीने वेढले. यात मोटारसायकलवरील संतोष प्रकाश डांबरे (वय २५), एकनाथ अप्पा माळीच (३५, दोन्ही रा. चिकसे ता. साक्री) आणि अॅपे रिक्षामधील संतोष नाना मोरे (६५), वसंत राघो अहिरराव (६८, रा. धाडणे, ता. साक्री) हे मृत्युमुखी पडले. जखमींमध्ये वंदना उत्तम बोरसे (वय ३५), मंगलाबाई वसंत गायकवाड (४०), सयाजी कैलास पवार (१२), उत्तम मन्साराम बोरसे (४५), जिभाऊ मालजी पवार (४०), जंगलू रामजी मालचे (४०), अविनाश भटू भदाणे (३२, सर्व रा. धाडणे ता. साक्री) यांचा समावेश आहे.


वधू-वर जखमी

दुसरी घटना शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ घडली. टाटा सुमो वाहन ट्रकवर आदळल्याने सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले, तर आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वर आणि वधूचा समावेश आहे. या अपघातात साजिदाबानो मुमताज अली (वय१७, रा. अजमेरानगर, चाळीसगाव रोड), जमिनाबानो रज्जब अली (३५, रा. तला मशिदीजवळ वडजाई रोड), रोजीनाबानो युनूस अन्सारी (१२ रा.फिरदोसनगर तिरंगा चौक), आमिन अहमद रज्जब अली (रा.फिरदोसनगर तिरंगाचौक), अदनान कलीम अन्सारी (८, फिरदोसनगर तिरंगाचौक) सर्वजण धुळे शहरातील राहणारे आहेत. जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांताधिकारी, तहसीलदारांविरूद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

वाळू ठेकेदार आणि बेजबाबदार महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावातील युवकाचा तापी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला होता. हा मृत्यू अवैध वाळू उत्खननामुळे झाला असल्याचा दावा करून शिंदखेडा न्यायालयाने प्रांताधिकारी, दोन तहसीलदार, दोन तलाठी, दोन मंडलाधिकारी आणि तीन वाळू ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

तापी नदीलगत शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथे वाळू ठेका मंजूर आहे. यासह ठेकेदारांनी शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील तापी नदी पात्रालगत अवैधपणे वाळूचे उत्खनन सुरू केले. परिणामी ५० फूट मोठा खड्डा तयार होऊन पाणी साचून त्यात पडून अक्कडसे येथील सतीश छोटू सैंदाणे (वय १९) हा तरुण मृत झाला होता. त्यामुळे संबंधित तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी वाळू उपशाबाबत अटीशर्तीचा भंग होत असतांना, अधिकाऱ्यांकडून देखरेख, कर्तव्यबजावणीत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याकडे फिर्यादीने न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार किशोर भगवान कोळी यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकारी, ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. ठेकेदाराने वाळूच्या ठेक्याची जागा आणि त्यांनी केलेल्या उल्लंघन, अटीशर्तीचा भंग याबाबतही तपास करून लवकरच दोषींना अटक करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक देविदास भोज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेक‌िंगचे ट्रेनिंग सेंटर अधांतरीच!

$
0
0

नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे राज्य सरकारच्या २०१२ च्या क्रीडा धोरणानुसार स्थापन होणाऱ्या पहिल्या ट्रेकिंग ट्रेनिंग सेंटरचे काम गेल्या चार वर्षांपासून रख़डले आहे. दोन कोटी रुपये खर्चानंतरही विविध अडथळ्यांमुळे चार वर्षांपासून हे काम रखडल्याचे समोर आले आहे. सरकारचे कोट्यवधी रुपये पडून असल्याने क्रीडाप्रेमींनी चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात साहसी खेळांना चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे अंजनेरी येथे राज्यातील पहिले ट्रेकिंग ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने पर्यटन विभागाला दोन कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला. यासाठी अंजनेरी येथे ६ एकर जागा निश्चित करण्यात आली. यातील तीन एकर जागा तालुका क्रीडा संकुलासाठी व तीन एकर जागा ट्रेकिंग सेंटरसाठी आरक्षित करण्यात आली. तत्काल‌िन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूम‌िपूजन करण्यात आले. या क्रीडा संकुलात ऑड‌िटोरियम, म्युझियम, प्रशिक्षणासाठी आलेल्या खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था, उपहार गृह अशी दालने बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे केंद्र २०१३ मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे त्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे सेंटर पर्यटन विभागाला हस्तांतरीत करण्यात येणार असून, त्यानंतर क्रीडा विभागामार्फत तेथे प्रशिक्षण सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या सेंटरचे काम रडतखडतच सुरू आहे.
या जागेमध्ये राज्याचे अॅडव्हेंचर स्पोर्टस सेंटर स्थापन करण्याची बाब प्रस्तावित आहे. सदर जागेपासून साधारण चार ते पाच किमी अंतरावर बॅकवॉटर उपलब्ध असल्याने वॉटर स्पोर्टस उपक्रम आयोजित करणेदेखील शक्य होणार आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, या प्रकल्पाचे काम काही दिवस कॉन्ट्रॅक्टरच्या दिरंगाईमुळे थांबले असल्याचे सांगण्यात आले. दोषी कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. अंदाजे दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आमच्या अख्यत्यारित असलेले तालुका क्रीडा संकुल आम्ही कार्यान्वित केले आहे. ट्रेन‌िंग सेंटरबाबत काहीही सूचना नाही. एमटीडीसीकडून आमच्याकडे हस्तांतरीत करणार असा प्रस्ताव होता. हे राज्य सरकारच्या अख्यत्यारित असल्याने वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तेच याबाबत सांगू शकतील
- संजय सबनीस,
जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images