Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

खड्डे चुकवणे जीवावर बेतले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्यावर महिन्द्रा पिकअप मालवाहू गाडी (एमएच १८/एए ७५२१) पिंपळनेरहून साक्रीकडे जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना समोरील अॅपे रिक्षावर (एमएच १८/१९३६) वर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागे भरधाव येणारी विनाक्रमांकाची मोटारसायकल पिकअप गाडीवर आदळली.


मोटारसायकलचे पेट्रोल बाहेर आल्याने काही क्षणातच मोटारसायकलसह पिकअपला आगीने वेढले. यात मोटारसायकलवरील संतोष प्रकाश डांबरे (वय २५), एकनाथ अप्पा माळीच (३५, दोन्ही रा. चिकसे ता. साक्री) आणि अॅपे रिक्षामधील संतोष नाना मोरे (६५), वसंत राघो अहिरराव (६८, रा. धाडणे, ता. साक्री) हे मृत्युमुखी पडले. जखमींमध्ये वंदना उत्तम बोरसे (वय ३५), मंगलाबाई वसंत गायकवाड (४०), सयाजी कैलास पवार (१२), उत्तम मन्साराम बोरसे (४५), जिभाऊ मालजी पवार (४०), जंगलू रामजी मालचे (४०), अविनाश भटू भदाणे (३२, सर्व रा. धाडणे ता. साक्री) यांचा समावेश आहे.


वधू-वर जखमी

दुसरी घटना शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ घडली. टाटा सुमो वाहन ट्रकवर आदळल्याने सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले, तर आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वर आणि वधूचा समावेश आहे. या अपघातात साजिदाबानो मुमताज अली (वय१७, रा. अजमेरानगर, चाळीसगाव रोड), जमिनाबानो रज्जब अली (३५, रा. तला मशिदीजवळ वडजाई रोड), रोजीनाबानो युनूस अन्सारी (१२ रा.फिरदोसनगर तिरंगा चौक), आमिन अहमद रज्जब अली (रा.फिरदोसनगर तिरंगाचौक), अदनान कलीम अन्सारी (८, फिरदोसनगर तिरंगाचौक) सर्वजण धुळे शहरातील राहणारे आहेत. जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खत प्रकल्पावर प्लास्टिकपासून इंधननिर्मिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराची कोंडी करणाऱ्या खत प्रकल्पाची साडेसाती संपविणाऱ्या मेलहॅम आयकॉस या कंपनीने आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, खत प्रकल्पावरील प्लास्टिकपासून इंधननिर्मितीचा प्रस्ताव पालिकेला दिला आहे. नाशिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या एसपीव्ही कंपनीच्या अंतर्गत हा प्रस्ताव पालिकेला सादर केला आहे. वर्षभरात हा प्रस्ताव कार्यान्वित करून प्लास्टिकपासून निर्मिती होणारे इंधन हे पालिकेच्या डिझेल शवदाहिनीसाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या डिझेल शवदाहिनीवर होणारा खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे यासाठी संबंधित कंपनी पालिकेकडून एक रुपयाही मदत घेणार नाही. त्यामुळे पालिकेच्या खर्चातही बचत होऊन प्लास्टिकपासून होणारे प्रदूषणही कमी होणार आहे.

नाशिकची डोकेदुखी ठरलेला पाथर्डी येथील खतप्रकल्प हा पुण्याच्या मेलहॅम आयकॉस या कंपनीने तीस वर्षांसाठी चालविण्यास घेतला आहे. या कंपनीने खत प्रकल्प पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित केला असून, कचऱ्याचे ढीग कमी होण्यास मदत झाली आहे, तसेच येथे साठलेल्या कचऱ्याचे कॅपिंग करून दुर्गंधी कमी होण्यास मदत होत आहे. या खत प्रकल्पावर कचऱ्यासोबतच मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकही येते. या प्लास्टिकवर येथे प्रक्रिया करता येत नसल्याने कचरावेचक महिला येथील प्लास्टिक गोळा करून ते शहरात विकतात. त्यामुळे शहरातील प्लास्टिकचा कचरा पुन्हा शहरात परत जात असल्याने पालिकेचीच डोकेदुखी वाढली आहे.

प्लास्टिक कचऱ्याची ही डोकेदुखी आता वर्षभरातच कमी होणार आहे. मेलहॅम आयकॉस या कंपनीअंतर्गत तयार झालेल्या नाशिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या एसपीव्ही कंपनीने पालिकेला नवीन प्रस्ताव दिला आहे. खत प्रकल्पावर जमा होणाऱ्या प्लास्टिकपासून इंधन तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून, प्लास्टिकपासून तयार होणारे इंधन पालिकेच्या अमरधाममध्ये असलेल्या डिझेल शवदाहिनीसाठी वापरले जाणार आहे. त्यासाठी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून, ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या खर्चातही बचत होणार आहे. खत प्रकल्पावर यापूर्वीच ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प जीआयझेड कंपनीकडून साकारला जात आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे.

मानांकन सुधारणार

स्वच्छ शहरांसाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नाशिकचे मानांकन १५१ वर घसरले आहे. खत प्रकल्प बंद असल्याचा फटका बसला होता. मात्र, आता पुढील वर्षात होणाऱ्या सर्वेक्षणात खत प्रकल्पामुळे नाशिकचे मानांकन सुधारणार आहे. त्यासाठीचे नियोजन पालिकेने आतापासूनच केल्याचा दावा आयुक्त कृष्णा यांनी केला आहे.

प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करण्याचा प्रस्ताव नाशिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने पालिकेला दिला आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून, त्यातून तयार होणारे इंधन डिझेल शवदाहिनीसाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोवऱ्याची धार ते व्याख्यानमाला

$
0
0

धनंजय गोवर्धने, चित्रकार

लहानपणी मे महिन्याची सुटी म्हणजे आनंद असे. तेव्हा सुटीत मनसोक्त खेळायला मिळणार याचा आनंद असे. तेव्हा फक्त जेवायला घरी जायचो. गोट्या, गिज्या (काड्यापेटीवरची चित्रं), सिगारेटची रिकामी पाक‌िटं, अंपल-चंपल, आंब्याच्या वाळलेल्या कोयी, भोवरे हे खेळ होते. भोवऱ्याला धार लावण्याची कानस माझ्याकडे होती त्यामुळे मित्रांच्या भोवऱ्याला धार लावून देण्याचा कार्यक्रम सुट्टीत ठरलेला. डबे घेऊन मित्रांसह सोमेश्वर, तपोवन किंवा शिवाजी उद्यानात जायचं असं ठरलेलं असे. पण थोडा मोठा झाल्यानंतर म्हणजे सातवीनंतरची सुटी काहीतरी शिकण्यासाठी पर्वणी असा विचार करून दरवर्षी सुटीत काहीतरी नवीन शिकत राह‌िलो. एके वर्षी गंगेवरती अहिल्याराम व्यायामशाळेत दीक्षित गुरूजींकडून सूर्यनमस्कार आणि योगासने शिकलो. लाठी चालविणेही शिकलो. पेठे हायस्कूलमध्ये असतानाही मे महिन्यात खूप नवे शिकायला मिळाले. एके वर्षी मेनरोडवरच्या गाडगीळ ब्रदर्स यांच्या दुकानामागील छापखात्यात बुकबाईंडिंग शिकता आले. मागील वर्षीच्या वह्यांमधील कोरी पाने फाडून त्यांची शिलाई करायची, बाईंडिंग क्लॉथला चरस लावताना त्याचा उग्र वास नाकात शिरायचा, त्रास व्हायचा पण नवे शिकत असल्याचा आनंद मोठा होता. त्यामुळे जुन्या पानांची एक जाडजूड वही शाळेत आणता येई आणि ही रफ वही गणित सोडविताना उपयोगी पडे. तेव्हा सायकल आणि स्टोव्हचा काळ होता. शाळेतल्या कार्यशाळेमध्ये स्टोव्हची दुरूस्ती आणि सायकलचे पंक्चर काढायला आम्हाला शिकविले होते. त्यामुळे आई स्वयंपाक करत असताना स्टोव्हचे नेपल बदलण्यापासून तर वायसर बदलण्यापर्यंतचे काम जमत होते. आईला मदत करायला आनंद वाटे. तेव्हा मे महिन्यात यशवंतराव महाराज पटांगणावर खळाळत्या गोदामाईच्या साक्षीने होणाऱ्या व्याख्यानमालेत तेव्हाचे दिग्गज विचारवंत, लेखक, साहित्यिक, अभिनेते, नेते या सर्वांना समक्ष अगदी जवळून बघण्याची पर्वणी आम्हा मुलांना असे. या सर्व दिग्गजांची छोट्याशा डायरीत स्वाक्षरी घेणे अन् गोड आठवण म्हणून ती जपून ठेवण्याचा आनंदही निराळाच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजार ‘जैसे थे’च!

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने पोलिसांच्या सहकार्याने जानेवारी महिन्यात अनधिकृत भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविले. शंभरपेक्षा अधिक भंगारांची दुकाने जमीनदोस्त केली. परंतु, अंबडलिंकरोडवरील अतिक्रमण हटले असले तरी भंगार बाजार मात्र ‘जैसे थे’च आहे.

अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आल्यानंतरही भंगार बाजार पुन्हा फोफावत असल्याने महापालिकेकडून कोर्टाचा अवमान झाल्याचा आरोप माजी नगरसेवक सचिन भोर यांनी केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक दिलिप दातीर यांनी भंगार बाजार हटविण्यासाठी तीव्र न्यायालयीन लढा दिला होता. त्यानंतर महापालिकेने पोलिसांकडून बळ उपलब्ध झाल्यानंतर भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविले होते. परंतु, ज्या मुद्यावरून भंगार बाजाराच्या विरोधात लढा दिला गेला ते साध्य झाले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने भंगार बाजाराकडे पुन्हा दुर्लक्ष करीत कारवाईची तलवार म्यान केली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सातपूर व अंबड एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्यावरच अनधिकृत भंगार बाजार ३० वर्षांहून अधिक काळापासून वसला होता. सर्वच राजकीय पक्षांनी अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत महापालिका व पोलिस प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली. महापालिकेने अनेकदा भंगार बाजार हटविण्याचा प्रयत्नही केले. परंतु, भंगार व्यावसायिकांच्या आर्थिक दबावापुढे प्रशासन कमी पडले. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी भंगार बाजार हटविण्यासाठी न्यायालयीन लढा उभारला. अखेर जानेवारी २०१७ मध्ये महापालिका आयुक्त अभिषेख कृष्णा यांनी धडाडी दाखवित पोलिस प्रशासनाच्या मदतीने शंभरपेक्षा अधिक भंगार दुकानांचे अतिक्रमण जमिनदोस्त केले. महापालिकेच्या या कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत झाले होते.

नगरसेवक गप्प का?

अतिक्रमण हटविले गेले असले तरी भंगार दुकाने पुन्हा दिसू लागली आहेत. महापालिकेने ठिकठिकाणी भंगार बाजारात नोटिसा चिकटवित परवानगी घेऊनच व्यवसाय सुरू करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोर्टानेही भंगार बाजारातील एकही वस्तू न ठेवता ती शहराच्या हद्दीबाहेर टाकण्याचे आदेश दिले होते. असे असताना भंगार बाजारात पुन्हा नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू झाले असताना स्थानिक नगरसेवक शांत का आहेत, असा प्रश्न माजी नगरसेवक भोर यांनी केला आहे.

भंगार बाजार हटविण्यासाठी शिवसेने पुढाकार घेतला होता. भंगार बाजाराचे अतिक्रमण हटवून सुमारे चार महिने झाले. या काळात भंगाराची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. शिवसेनेचे नगरसेवक आता या आंदोलनातून बाहेर पडले आहेत का?
- सचिन भोर, माजी नगरसवेक

भंगार बाजाराचे अतिक्रमण काढल्यानंतर मनपा आयुक्तांचा दौरा झाला होता. त्यांनी भंगाराचे साहित्य तात्काळ हटविण्याच्या सूचना दिल्या. मात्र, भंगार बाजार पुन्हा उभा राहत आहे. याबाबत आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.
- दिलीप दातीर, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाला प्रतीक्षा वीज जोडणीची!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागात वीज जोडणीसाठी अर्जधारक ५७ हजार ४४८ पैकी केवळ ९ हजार ६१६ इतक्याच शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने वीज जोडणी दिली आहे. उर्वरित तब्बल ४७ हजार ८३२ शेतकरी वीज पुरवठ्यापासून वंचित आहेत.

विभागीय कृषी सहसंचालकांनी सादर केलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील हजारो शेतकरी वर्षभरापासून अधिकृत वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. नाशिक जिल्ह्यात ३ लाख १२ हजार व नगर जिल्ह्यात ३ लाख ५७ हजार पंप जोडण्यांची संख्या आहे.

विहिरी, बोअरवेलकडे कल

विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वारंवार पाणीटंचाई निर्माण होत आहे. परिणामी शेतकरी शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी विहिरी व बोअरवेलचा आधार घेत आहे. नव्याने विहिरी व बोअरवेलची संख्या भरमसाट वाढल्याने वीज जोडणीसाठी अर्जांची संख्याही वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात वीज जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत. प्रलंबित अर्जांपैकी तब्बल ३९ हजार ९८९ अर्ज ३१ मार्च २०१६ पूर्वीचे आहेत. यातील १९ हजार ३४ शेतकरी एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत.

विभागातील कृषी पंप वीज जोडणी
विभागातील पाच जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत. ३१ मार्च २०१६ पर्यंत १९ हजार ३४ व त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंतचे पाच हजार २२७ अशा एकूण २४ हजार २६१ शेतकऱ्यांनी महावितरणकडे वीज जोडणीसाठीची सुरक्षा अनामत रक्कम जमा केली आहे. मात्र, त्यापैकी केवळ तीन हजार ६९० शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून तब्बल २० हजार ५७१ शेतकरी अजूनही वेटिंगवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाची वाढलेली तीव्रता आणि पाण्याचा कमी झालेला साठा यांच्यामुळे केवळ धरण परिसरातच भाजीपाला पिके घेतली जात आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणारा भाजीपाला त्र्यंबकेश्वर, दिंडोरी व इगतपुरी या तालुक्यातील गावांमधूनच येत आहे. इतर तालुक्यातील फळांच्या बागांसाठीच पाणी पुरविण्याचा वेळ येत असल्याने भाजीपाला उन्हाळी हंगामात पिके घेतली जात नाहीत.

उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासते. नेमक्या याच वेळी विहिरी आणि बोअरवेल यांच्या पाणी कमी पडते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सिंचनाची मोठी समस्या निर्माण होते. कालव्याखाली असलेल्या पिकांना मिळणाऱ्या पाण्याचे आवर्तनांमधील कालावधी मोठा असल्याने कालव्याच्या भरोशावर भाजीपाल्यासारखी पिके घेता येत नाहीत. त्यामुळे धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात उन्हाळ्यात भाजीपाल्याची पिके घेतली जातात.

उन्हाळ्यात तीव्र ऊन आणि वारा यांच्यामुळे फुल आणि कळी यांची गळ वाढते. ही गळ उत्पादनात घट आणते. उत्पादन कमी झाल्यामुळे सहाजिक भाजीपाल्याची आवक घटते. मागणी वाढलेली असल्याने बाजारभावांमध्ये वाढ होते. नाशिक बाजार समितीत शनिवारी फळभाज्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असल्याने शुक्रवार आणि रविवार फळभाज्यांची आवक प्रचंड वाढते. तेव्हा फळभाज्यांच्या दर खाली येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक, मोबाइल चोरीचे सत्र थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

रस्त्यावर लावलेल्या मोटारसायकल बोलता-बोलता गायब होण्याच्या घटना शहरात वाढत आहेत. शिवाय भरधाव येणारे चोरटे गाडीवरून येणारे पादचाऱ्यांच्या मोबाइललाही लक्ष करत असल्याच्या घटना घडत आहेत. शहरात बुधवारी विविध ठिकाणाहून तीन मोटारसायकल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या. महात्मानगर येथे नागरिकांनी एक मोबाइल चोरटा पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

शहरात काही दिवसांपासून चोरट्यांची वरचेवर हातसफाई वेगाने सुरू आहे. विविध ठिकाणाहूंन यात तीन दुचाकी लक्ष्य ठरल्या. उमेश निवळ यांची भद्रकालीतील फाळकेरोड परिसरात उभी केलेली काळ्या रंगाची ‌हिरो होंडा मोटारसायकल रात्री नऊ वाजेदरम्यान चोरट्यांनी चोरून नेली. भद्रकाली पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तर भाऊसाहेब बोराडे यांचीही हिरो होंडा स्प्लेंडर ही दुचाकी नाशिकरोड येथील साई संचित रुग्णालयातील पार्किंगमधून महिनाभरापूर्वी चोरट्यांनी नेली होती. याप्रकरणी मंगळवारी उपनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तर पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरातील अमित सुभाष चव्हाण यांची बजाज मोटारसायकल चोरीला गेली. पंचवटी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल चोरटा ताब्यात

महात्मानगर येथील रहिवासी सारंग पाटील हे मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला घराजवळील परिसरात मोबाइलवर बोलत असताना मागून बाइकवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. यावेळी पाटील यांच्यासह काही नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील तुळशीराम काशीनाथ चौधरी (२६, शांतीनगी झोपडपट्टी) हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. तुळशीदासकडून सॅमसंग कंपनीचा मोबाइल व बाइक ताब्यात घेण्यात आली.

कॉम्प्युटर चोरांना कोठडी

देवळाली कॅम्प : शताब्दी पॉलिटेक्निक कॉलेजमधून २५ कॉम्प्युटर्सची चोरी करणाऱ्या पाच तरुणांना कोर्टाने गुरूवारपर्यंतची (दि. ११) पोलिस कोठडी सुनावली. या तरुणांनी यापूर्वीही कॉलेजमध्ये चोरी केली आहे काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. आकाश शिंदे, सुनील गोरे, किरण सोनवणे, प्रसाद दळवी व विशाल उगले अशी पाचही संशयित तरुणांची नावे आहेत. ते सर्व जण २० वर्षांचे आहेत. यातील प्रसाद वगळता अन्य चौघे जण शताब्दी पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत. प्रसाद सिन्नरमधील विजयनगर येथील रहिवाशी आहेत.

पैशांसाठी विवाहितांचा छळ

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विवाहितांकडे सासरच्या लोकांनी पैशांची मागणी करून त्यांच्याजवळील दागिने व धन काढून घेतले, याप्रकरणी इंदिरानगर आणि अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नवीन नाशिक परिसरातील एका घटनेत जयश्री हंसराज पवार यांनी अंबड पोलिसात फिर्याद दिली आहे. पती हंसराज व सासरच्या सर्व नातेवाइकांनी वेळोवेळी पैशांसाठी शारिरीक व मानसिक छळ करून जवळचे दागिने काढून घेतल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वडाळा गावातील नाझिया परवेझ अन्सारी यांनी इंदिरानगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पती परवेझ व सासरच्या सर्व नातेवाइकांनी किरकोळ कारणांवरून निमित्त शोधत वेळोवेळी नाझिया यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे मिळविण्यासाठी त्यांचा शारिरीक व मानसिक छळही केला. त्यांच्याकडून दागिनेही काढून घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ओव्हरटेक केल्याने काकू-पुतण्यास मारहाण

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव चौफुलीजवळ दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका इर्टिका कारला पांढऱ्या रंगाच्या मारुती कारने ओव्हरटेक केले. यानंतर इर्टिकामधील चालक आणि इतर सात जणांनी मारुती कारमधील सागर पालवे व त्यांच्या काकूस शिवीगाळ करत गाडीवर हल्ला केला. पालवे व त्यांच्या काकूच्या डोक्यात दगड मारून यांना जखमी केले. काकूंची दहा तोळे तर सागर यांची सहा तोळे अशी एकूण १६ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सागर पालवे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडणाऱ्या मायलेकाला पोलिसांनी वाचविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आवर्तनाचे पाणी पाटाने जात असताना पालखेड पाटात बुडणाऱ्या दोन वर्षाच्या मुलासह आईला गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांनी जिवाची पर्वा न करता वाचवले. पोलिसांच्या या समयसूचकतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून गेल्या आठवड्यात पाच मेपासून येवला शहराला पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. पाणी चोरी होऊ नये, म्हणून पाटावर पोलिसांचा जागता पहारा आहे. दावचवाडी-पालखेड दरम्यान पाटाच्या दुरुस्तीचेही काम सुरू आहे. या कामासाठी पाटालगत तात्पुरता संसार मांडून काही मजूर रोज काम करीत आहेत. सिध्दपिंप्री येथील मजुरांचे कुटुंब या दावचवाडी-पालखेड गटाच्या कामासाठी आले आहे. या मजुरांच्या कुटुंबांपैकी मंगला देवीदास जाधव आपला दोन वर्षांचा ओमसोबत पाटावर पाणी घेण्यासाठी हंडा घेऊन आल्या. हंडा भरत असतांना ओम अचानक पाय घसरून पाटाच्या वाहत्या पाण्यात पडल्याचे मंगला यांच्या लक्षात आले. पोहता येत नसतानाही केवळ मुलाला वाचविण्यासाठी आईने वाहत्या पाण्यात उडी घेतली. मात्र, नंतर त्या मदतीसाठी आक्रोश करू लागल्या. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचारी विकास वाळुंज यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाटात उडी मारली. पाठोपाठ शिरीष गांगुर्डे यांनीही मायलेकाराला वाचविण्यासाठी आपल्या आपल्या सहकाऱ्याच्या मदतीसाठी पाण्यात उडी मारली. त्या दोघांनी मंगला आणि ओम यांना सुखरूप बाहेर काढले.

जणू देवदूतच अवतरले

पोलिसांच्या रूपाने जणू देवदूत मदतीला धावून आल्याची भावना जाधव कुटुंबीयांनी घटनेनंतर व्यक्त केली. पाणीचोरी रोखण्यासाठी ड्युटीवर असलेल्या या कर्मचाऱ्यांनी वेळेचे गांभीर्य ओळखत केलेल्या प्रयत्नांचे परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयुष्याच्या सायंकाळी कौटुंबिक मतभेदांमुळे स्वतंत्र राहणाऱ्या ज्येष्ठाचे सर्वस्व लुटून मुजोरी करणाऱ्या पाच भामट्यांविरोधात अखेरीला तीन वर्षांनंतर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पैकी आरोपीला अटकही करण्यात आली असून त्यास बुधवारी कोर्टात हजर केले होते.

ज्येष्ठाची लाखो रुपयांची फसवणूक करून त्यांना घर, दागिने, पैसे आदी ऐवजांना गंडा घातल्याप्रकरणी दिगंबर भागुजी आव्हाड (अशोका मार्ग, साई मंदिराच्या समोर, नाशिकरोड) मोहिनी मैंद उर्फ नलिनी बहिवाल (उपनगर), जगदीश भोईर, सचिन आबड, पंढरीनाथ गिते या पाच जणांच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याबाबत ‘मटा’ने ६ फेब्रुवारी २०१६ रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. याबाबत हकीकत अशी की, गंगापूर रोडवरील नरसिंह नगरमध्ये दामोदर नारायण जोशी (८०) हे ज्येष्ठ कौटुंबिक मतभेदांमुळे एकटे राहतात. ते एलआयसीतून अधिकारी पदावरून निवृत्त झाले. वयोमानामुळे कामे होत नसल्याने त्यांना घरात मदतनीसाची गरज भासली. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रातून जाहीरातीद्वारे ‘घरकामासाठी बाई पाहिजे’ असा मजकूर प्रसिध्द केला. यानंतर कामासाठी काही इच्छुक महिला भेटून गेल्यानंतर एके दिवशी दिगंबर आव्हाड नावाच्या व्यक्तीने जोशी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधत आपल्या जाहिरातीतील अपेक्षांनुसार घरकामास महिला पाठवत असल्याचे सांगितले. त्या महिलेस जोशी यांनी परत पाठविल्यानंतर काही दिवसांनी आव्हाड हा जोशींकडे आला. जेवणाचे निमित्त करून तो त्यांना चारचाकीतून उपनगर येथील एका इमारतीत घेऊन गेला. तेथे त्यांना इतर आरोपींच्या सहाय्याने खोलीत डांबून ठेवत मारहाण सुरू ठेवली. चार महिन्यांच्या कोंडीनंतर एके रात्री दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन जोशी यांनी सुटका करून घेतली. मात्र, दरम्यानच्या कालावधीत त्यांच्याकडून घराच्या चाव्या, घराची कागदपत्रे आदी चीजवस्तू त्यांच्याकडून काढून घेण्यात भामटे यशस्वी झाले. यात १८ लाख ५५ हजार रुपये, दोन लाख रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिणे, २० हजार रुपयांचे चांदीचे भांडे, घराची कागदपत्रे, पॅनकार्ड, पासबुक, आधारकार्ड , एफडीच्या पावत्या आदी वस्तू भामट्यांनी लुबाडल्या. या प्रकरणी पोलिसात आपबिती सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास त्यावेळी टाळाटाळ झाली होती. दरम्यान, या प्रकरणी तपासातून आरोपींचे आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक पाडवी हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रीचे भारनियमन रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव गावठाण व शेती शिवार परिसरात महावितरण कंपनीच्या वतीने मध्यरात्री सुरू केलेले भारनियमन रद्द करण्यात आले आहे. या परिसरात महावितरणने मध्यरात्री १२ ते पहाटे साडेपाच या वेळेत भारनियमन केल्याने आडगाववासीय त्रस्त झाले आहे. याबाबत ‘मटा’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची महावितरणने दखल घेतली.

महापालिका हद्दीत २४ तास वीजपुरवठा देण्याचे ध्येय असतांना आडगावमध्ये महावितरणकडून भारनियमन केले जात होते. सोमवार, मंगळवार, बुधवारी असे तीन दिवस रात्री १२ ते पहाटे साडेपाच या यावेळेत वीजपुरवठा खंडित केला जात होता. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. वीज नसल्यामुळे नागरिकांना घरात झोपणे कठीण झाले होते. अनेकजन रात्री झोपण्यापूर्वी घरात फर्शीवर थंड पाण्याचा शिडकावा करतात त्यांनतर अंथरून टाकून झोपत आहेत. तर काही नागरिक घराच्या गच्चीवर तसेच गॅलरीत झोपतात. नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. शिवाय मध्यरात्री चोऱ्या होण्याची भीती असते. त्यामुळे मध्यरात्रीचे भारनियमन बंद करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली. भारनियमन रद्द झाेल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

जेलरोड पुलावर कचऱ्याबाबत फलक

नाशिकरोड : जेलरोडच्या गोदावरी नदीत कचरा टाकण्यास प्रतिबंध आहे, असा फलक महापालिकेने उभारला आहे. नदीत कचरा, मांगल्य टाकले जात असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर हा फलक लावण्यात आला आहे. संत जर्नादन स्वामी पुलाच्या सुरवातीला मुस्लिम कबरस्थान शेजारी हा फलक लावण्यात आला आहे. नदीत कचरा टाकून प्रदूषण करू नये, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचा हिरव्या रंगातील हा फलक लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन आयोगावरून श्रेयवादाची लढाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेसच्या कामगारांना अशक्य असलेला सातवा वेतन आयोग मिळाल्यानंतर श्रेयवादीची लढाई सुरू झाली आहे. यात एकमेकांना शह देण्यासाठी तब्बल ७० फुटांचा शुभेच्छा फलक उभारण्यात आला असून त्यावर थोडे थोडके नव्हे तर ६२१ जणांचे फोटो छापण्यात आले आहेत.

वेतन आयोग मिळाल्याबद्दल प्रेस मजदूर संघाच्या नेत्यांवर अभिनंदनाचा जणू वर्षावच केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या नेत्यांनी करन्सी प्रेससमोर जेलरोडला ७० फूट लांबीचे होर्डिंग्ज लावले आहेत. आजपर्यंत एवढा मोठा शुभेच्छा फलक नाशिकमध्ये अन्य कोणीही उभारला नव्हता. फलकावर खासदार हेमंत गोडसे यांच्यासह संघाचे नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्यासह विविध समित्यांचे सव्वासहाशे फोटो आहेत. वाहनचालक, पादचाऱ्यांचे लक्ष हा फलक वेधून घेत आहे. फलकावर आयोग मिळण्याचे श्रेय कामगारांना देण्यात आले आहे.

फलकातूनच प्रत्युत्तर

सध्या सत्तेत नसलेल्या ‘आपला पॅनल’चे नेते रामभाऊ जगताप आणि अशोक गायधनी यांनीही प्रेस मजदूर संघाच्या या फलकाशेजारी आपल्यामुळेच आयोग मिळाल्याचा दावा करणारा फलक उभारला आहे. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थराज्यमंत्री अरुण राम मेघवाल आणि भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे फोटो आहेत. आपल्यामुळेच प्रेस कामगारांना सातवा आयोग मिळाल्याचा दावा आपला पॅनलने केल्याने जगदीश गोडसे यांच्या सत्ताधारी पॅनलने ७० फुटी फलकावर ‘घशात घातले दात फुकट श्रेय घेणाऱ्यांचे’ असे लिहिले आहे. या पॅनलने शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो लावला आहे. नाशिकच्या दोन खासदारांना दोन्ही पॅनलेने वाटून घेतले की काय असा प्रश्न या निमित्ताने प्रेस कामगारांसह नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींचा त्राता हरपला...

$
0
0

दीपक महाजन, कळवण

कळवण विधानसभा मतदार संघाचे तब्बल आठ वेळा प्रतिनिधीत्व करणारे आदिवासी आमदार व माजी मंत्री ए. टी. पवार तथा अर्जुनराव तुळशीराम पवार यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. यामुळे कळवण, पेठ, सुरगाणा तालक्यातील आदिवासी जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला. आदिवासींच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

एकाच मतदारसंघाचे सातत्याने नेतृत्व करीत विकासकामांसाठी पाठपुरावा करणारे व आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जलसिंचन, आरोग्य, दळणवळण ही महत्त्वाची कामे केवळ ‘हात जोडून’ पूर्ण करून घेणारे ‘एटी’ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कळवण तालुक्यातील दळवट येथील मूळ रहिवासी असलेल्या ए. टी. पवारांचे एम. ए. पर्यंत शिक्षण झाले होते. आपल्या कुटुंबात त्यावेळी ते एकमेव उच्चशिक्षित होते. त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला. साक्री तालुक्यातील चौधरी कुटुंबातील शकुंतला चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. विकास सोसायटी ते कॅबिनेट मंत्री असा ४५ वर्षांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे दुर्मिळ राजकारणी म्हणून त्यांनी इतिहास घडवला आहे.

...अन‍् स्वप्न साकार झाले

१९७८ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार ए. टी. पवार भारतीय क्रांती दलातून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यात ‘एटीं’नी बाजी मारली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असतांना राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम व दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून ‘एटीं’ची वर्णी लागली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद ‘एटीं’कडे चालून आले. तेव्हा पाणी या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांना वेळ नव्हता. कळवण, बागलाण हे तालुके दुष्काळाने होरपळत होती. रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, पुनद धरण झाले पाहिजे, चणकापूर उजवा कालवा काढावा या मागणीसाठी १६ ऑगस्ट १९७८ मध्ये कळवण तहसीलवर ‘एटीं’नी मोर्चा कडून शासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या मोर्चामुळे शासन व प्रशासन खडबडून जागे झाले. पाटबंधारे मंत्र्यांनी मोर्चाची दाखल घेतली. लघुपाटबंधारे योजना, पाझर तलाव यांचे सर्व्हेक्षण झाले. त्याकाळात आदिवासी बांधव सर्वेला विरोध करीत, अधिकारी वर्गाला दगड मारून हाकलून लावायचे. आज त्याच गावांना सिंचन योजना झाल्याने गावांचे रूप बदलले आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नसे त्यामुळे अशा गावांना मुली द्यायला आदिवासी बांधव तयार होत नसे. १९८० मध्ये ‘एटीं’नी पुनद धरणाच्या कामाचा प्रश्न पुढे केला. तत्कालीन पाटबंधारेमंत्री बी. जे. खताळ यांनी धरणाच्या जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे पाटबंधारे सचिव देऊस्कर यांना आदेश दिले. सुपले दिगर येथील जागा निश्चित करून पुनद धरणाला मंजुरी द्यावी, अशी शिफारस पाटबंधारेमंत्री खताळ यांनी मुख्यमंत्री अंतुले यांना केली. १९८१ मध्ये पुनद धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली. यात मुख्यमंत्री अंतुले यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. २००४ नंतर पुनदच्या कामास गती आली. शरद पवारांनी केंद्र सरकारकडून निधी मिळवून दिला. २००८ मध्ये पुनदचा घळभरणी कार्यक्रम तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, पाटबंधारेमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पुनदवर पार पडला अन् ‘एटीं’च्या प्रदीर्घ संघर्षांला यश मिळाले. याच प्रकल्पाला एटींचे नाव देण्यात आले असून हा प्रकल्प अर्जुन सागर या नावाने ओळखला जातो.

सोसायटी चेअरमन ते मंत्री

l दळवट आदिवासी वि. का. सोसायटीचे संचालक नंतर चेअरमन

l १९६७ ते १९७२ जिल्हा परिषद सदस्य व नंतर सभापती, शिक्षण आरोग्य, कृषी पशुसंवर्धन

l १९६८- जिल्हा परिषद अध्यक्ष, नाशिक

l ९ वेळा विधानसभा निवडणूक लढवली. १९८५ व २०१४ हे दोन अपवाद वगळता सतत विजय.

l १९७८ मध्ये नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले.

l महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात चार वेळा मंत्रीपद मिळवणारे एकमेव नेतृत्त्व

l युती शासनात व आघाडी शासनातही मंत्रिपद

l १९७८ चार महिने सार्वजनिक बांधकाम व दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री

l १९८३ ते १९८५ राज्यमंत्री आदिवासी विकास, स्वयंरोजगार

l १९९८ ते १९९९ कॅबिनेट मंत्री, आदिवासी विकास विभाग

l १९९९ पशुसंवर्धन, दुग्ध, वन खात्याचे राज्यमंत्री.

l २००४ पासून नाशिक जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.

l फेब्रुवारी २०१० मध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष

l पुनंद (अर्जुन सागर )प्रकल्पासह ३० लघुपाटबंधारे आणि १५० पेक्षा अधिक पाझरतलाव बांधले.

l आदिवासींना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शेकडो आदिवासी आश्रमशाळा सुरू केल्या.

l आदिवासींच्या चौफेर विकासासाठी स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालयाच्या निर्मितीचे श्रेय त्यांनाच जाते.

l आदिवासी आयुक्तालय नाशिकला आणले

l २९ व्या वर्षी दळवट गावाचे सरपंच

l कनाशी गटातून जि. प. निवडणूक लढवली

l जि. प. चे कृषी व पशुसवर्धन समिती सभापती

l काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना पक्षवाढीसाठी योगदान

l १९७२ मध्ये कळवण, सुरगाणा, पेठ या राखीव मतदार संघातून प्रथम विधानसभेवर

l १९८५ आणि २०१४ चा अपवाद वगळता कळवण विधानसभा आणि ए. टी. पवार हे जणू समीकरण तयार झाले.

l ८ वेळा विधानसभेवर, चार वेळा मंत्रीपद, आदिवासी विकास, वन, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम व समाजकल्याण आदी विभागाचे मंत्रिपद. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदही भूषविले.

l समाजकल्याण राज्यमंत्री असताना आदिवासी विकास विभागाची निर्मिती करून नाशिक येथे मुख्य कार्यालय आणले.

l जागतिक बँकेच्या सहाय्याने तत्कालीन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या सहकार्याने ‘एटीं’नी कळवण येथे आधुनिक सोयी असलेले उपजिल्हा रुग्णालय उभारले.

l चणकापूर धरण, अर्जुनसागर(पुनद) प्रकल्प, धनोली प्रकल्प, भेगू, ओतूर, बोरदैवत, चिंचपाडा, गोबापूर, मार्कंडपिंप्री, मळगाव, नांदुरी या लघुपाटबंधारे योजनांसह छोटी मोठी अशी २३ धरणे पाझरतलाव बांधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीं’ची एग्झिट

$
0
0

आज दळवट येथे होणार अंत्यसंस्कार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी अहर्निश प्रयत्नरत असलेले अन् दुर्गम भागातील सिंचन व दळणवळणाच्या सुविधांसाठी भगीरथ प्रयत्न करणारे अर्जुन तुळशीराम उर्फ ए. टी. पवार (वय ७९) यांचे बुधवारी मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय क्रांती दल, काँग्रेस, भाजप अन् राष्ट्रवादी असा प्रवास करताना तब्बल आठ वेळा आमदारकी व मंत्रिपदे भूषवून ‘एटी’ हाच पक्ष असे समीकरणच त्यांनी नाशिक जिल्ह्यात घडविले होते. आज (ता. ११) सकाळी दळवट (ता. कळवण) या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून ए. टी. पवार यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी अलीकडेच राजकारणातून निवृत्ती घेतली होती. १ डिसेंबर १९३८ मध्ये ए. टी. पवारांचा जन्म झाला. राज्यशास्त्रातील एम. ए. ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दळवटच्या आदिवासी विकास सोसायटीचे अध्यक्ष झाल्यानंतर १९६७ ते १९७२ मध्ये ते जिल्हा परिषदेत सदस्य होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि नंतर शिक्षण, कृषी-पशुसंवर्धन सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ते आमदार म्हणून निवडून आले होते. १९७८ मध्ये त्यांनीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले. काँग्रेस, भाजप आणि नंतर राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांच्या मागे पत्नी शकुंतला, मुलगा नितीन, प्रवीण, स्नुषा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री, डॉ. भारती, कन्या गितांजली व डॉ. विजया, नातवंडे असा परिवार आहे.

‘पाणीदार’ कारकीर्द

आदिवासी विकास, पशुसंवर्धन व दुग्धविकास या खात्याबरोबरच तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. आदिवासी आयुक्तालय पुण्याहून नाशिकमध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आश्रमशाळांच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये शिक्षण पोचवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्याचे पाणीसंकट टळले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या उन्हाळ्यातील हंगामात येवला नगरपालिका, ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व इतर काही प्रासंगिक गावांसाठी पालखेडच्या वतीने सोडण्यात आलेले येवला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोमवारी बंद झाले. या आवर्तनातुन येवला पालिकेच्या शहरातील टप्पा क्रमांक दोन योजनेच्या ५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या साठवण तलावात ४० दशलक्ष घनफूट इतके पाणी मिळाले आहे. या पाण्यामुळे येवलेकरांची तहान भागणार आहे.

दरम्यान, पाणी आवर्तन बंद झाल्याने आवर्तनातील पाण्यासाठी गेली काही दिवस टाहो फोडणारी तालुक्यातील १६ गांवे वंचितच राहिली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालखेड डाव्या कालव्यामार्फत या महिन्याच्या सुरुवातीला येवला तालुक्यासाठी सोडण्यात आलेले पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन सोमवारी बंद झाले. या आवर्तनातून येवला शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या येवला पालिकेच्या टप्पा क्रमांक २ साठवण तलावात ४० दशलक्ष घनफूट इतके पाणी देण्यात आले. १६ वर्षांपूर्वी निर्मिती झालेल्या येवला पालिकेच्या या साठवण तलावाची एकूण साठवण क्षमता ५० दशलक्ष घनफूट असली तरी जवळपास सध्या या साठवण तलावात ४५ दशलक्ष घनफूट इतकी साठवण क्षमता आहे. मिळालेले पाणी बघता चालू आवर्तनात जवळपास ५ दशलक्ष घनफूट पाणी कमी मिळाले आहे. या पाण्यामुळे उन्हाळ्यातील उर्वरित काळात शहरासमोरील पाणीसंकट दूर टळण्यास मोलाची मदत होणार आहे. शहराला गेल्या अनेक महिन्यांपासून तीन दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. नुकतेच मिळालेले पाणी पुढील काळात अधिक दिवस पुरवता यावे या नियोजनातून तीन दिवसाआड पाणीपुरवठयाचा सध्याचा कालावधीच कायम ठेवला जाणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दरम्यान, पालखेडच्या दिल्या गेलेल्या पाणी आवर्तनातून तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजनेस मागणीनुसार पाणी मिळाले नसल्याचे पाणीपुरवठा योजना समितीचे म्हणणे आहे. मूळ योजना ३८ गावांसाठीची असली तरी गेल्या काही वर्षांत योजनेतील गावांची संख्या वाढत आहे. सध्या या योजनेतील ५० गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पालखेडच्या नुकत्याच मिळालेल्या आवर्तनातील पाण्यातून पुढील काळात योजनेतील गावांची तहान भागविण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचेही समिती पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्याच प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

महापौरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग एकमधील मोकळ्या भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने बघत तत्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रभाग एकमधील म्हसरूळ परिसरातील गुलमोहर कॉलनी, हरिहर नगर, वृंदावन नगर, स्वामी समर्थ केंद्र, गणेश नगर, स्नेहनगर येथील मोकळ्या भूखंडांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे अनियमितपणे येणाऱ्या घंटागाड्यांमुळे ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहरांसाठी केलेल्या सर्वेक्षणात गेल्या वर्षी ३१ व्या क्रमांकावर असलेल्या नाशिक शहराची १५१ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे नाशिक शहराबरोबरच प्रभागातील स्वच्छतेचे आव्हान महापौरांना पेलावे लागणार आहे.

म्हसरूळमधील कॉलनी परिसरातील नागरिक अनियमितपणे येणाऱ्या घंटागाडीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे जमा झालेल्या कचऱ्याची आजूबाजूच्या ठिकाणी विल्हेवाट लावतात. परिणामी परिसरात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य पसरते. शिवाय ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. कचरा उचलला जात नसल्याने कुजून दुर्गंधी पसरते. डासांचे प्रमाण व त्यामुळे रोगराई वाढत आहे.

कचरा जाळण्याचे प्रकार

अनेक दिवस कचरा उचलला नाही दुर्गंधी पसरते. परिणामी परिसरातील नागरिक स्वतः पुढाकार घेऊन कचरा जमा करून जाळून टाकतात. त्यामुळे आरोग्य विभागाने व नगररचना विभागाने समन्वय साधून महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर कंपाऊंड करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

डुकरे, मोकाट जनावरांचा सुळसुळाट

म्हसरूळबरोबरच ओंकारनगर परिसरातही अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. कचरा, अन्न उघड्यावर टाकल्यामुळे येथे मोकाट जनावरे, भटके कुत्रे यांचे प्रमाण वाढले आहे. ‌याशिवाय दोन वर्षांपासून या परिसरात अचानकपणे डुकरांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या मोकाट प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा नागरिक कचऱ्याची विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. डासांचे प्रमाण देखील वाढते आणि रोगराई पसरते. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.

- विशाल भोसले, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामराज्यात ‘शबरी’ला घडला वनवास

$
0
0

तीन वर्षांपासून कर्जवाटप ठप्प, महामंडळाची थकबाकी ८५ कोटींवर

नाशिक : राज्यातील सुशिक्षित व बेरोजगार आदिवासी युवकांचा बेरोजगारीचा वनवास संपविण्यासाठी स्थापन केलेले शबरी वित्त व विकास महामंडळ हेच रामराज्यात वनवासात असल्याचे चित्र आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून या महामंडळातून एकाही आदिवासी बेरोजगार युवकाला कर्ज उपलब्ध होऊ शकलेले नाही. महामंडळाच्या थकीत कर्जाची रक्कम ही ८५ कोटींवर पोहोचल्याने सरकारने या महामंडळाची नवीन कर्जहमी घेण्यास नकार दिला आहे. तसेच, वसुलीची प्रक्रियाही ठप्पच आहे.

सन २०००पासून आदिवासी युवकांना शबरी वित्त व विकास महामंडळामार्फत रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासह विविध प्रकारचे अर्थसहाय करण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, सन २००८ पासून या महामंडळाच्या कारभाराला उतरती कळा लागली. महामंडळ राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचे साधन बनले. सन २००८ मध्ये शासनाने कर्जदारांचे जवळपास २४ कोटींचे व्याज माफ केले. त्याचाही काही उपयोग झालेला नाही. या थकीत कर्जामुळे महामंडळाची थकबाकी आता ८५ कोटींपर्यत पोहचली असून, महामंडळ डबघाईला आले आहे.

डॉ. गावितांची उधळपट्टी भोवली

डॉ. विजयकुमार गावित हे आदिवासी विकास मंत्री असतांना त्यांनी मोठ्या प्रमाणावर शबरीमार्फत आदिवासी तरुणांना वाहनांचे वाटप केले होते. मागेल त्याला कर्जहमी दिल्याने सन २००५ ते २००८ या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप झाले. परंतु, त्याची वसुली झाली नसल्याने येथूनच महामंडळाची आर्थिक स्थिती ढासळण्यास सुरुवात झाली. आता न्या. गायकवाड चौकशी समितीत शबरीमार्फत वाटप केलेले साहित्य व वाहने ही अनेकांना भेटलीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शबरीच्या वनवासात डॉ. गावितांचाही वाटा मोठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’चे अनोखे वस्तूसंग्रहालय

$
0
0

रमेश पडवळ

पावणेदोनशे वर्षाचा इतिहास असलेले सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) वाचकांसाठी पंढरी ठरली आहे. वाचनालय म्हटले की आपण पुस्तकांपुरताच विचार करतो. मात्र नाशिकशी नाळ जोडायला लावणाऱ्या दुर्मिळ अशा वस्तुंच्या संग्रहासाठीही सावानाने मोलाची कामगिरी केली आहे. प्रत्येक नाशिककरानं सावानाचे वस्तुसंग्रहालयातील दिव्य सोहळा अनुभवायलाच हवा. सावानाच्या इमारतीसमोरील पाषाणातील दोन मूर्ती आपल्याला संग्रहालयाकडे खेचून नेतात. दुर्मिळ नकाशे, मूर्ती, चित्र, काष्ठशिल्प, शस्त्र, नाणी, शिलालेख अन् ऐतिहासिक वस्तूंनी सावानाच वस्तूसंग्रहालय गजबजलेलं आहे. संग्रहालयाची सुरुवात नाशिकच्या दुर्मिळ चित्रांतून होते. शहरातील दिग्गज चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचा पहिल्या हॉल मोहरलेला आहे. याच हॉलमध्ये दुर्मिळ नकाशाचेही दर्शन होते. शंभर दीडशे वर्षांपूर्वीचे नाशिक कसे होते हे यातून अनुभवायला मिळते. दुसऱ्या हॉलमध्ये प्रवेश करताना डाव्या हाताला भिंतीवर नाशिक रागमाला या पेशवाईतील ऐतिहासिक चित्र डोळ्यांमध्ये सोन्याची रांगोळी काढतात. तर उजव्या हाताला प्राचीन खेळ, वस्तू व धातू व पाषाणातील शिल्पांचा आविष्कार अनुभवायला मिळतो. बुद्धमूर्ती समोरून तर हलवतच नाही. थोडं पुढे गेल्यावर नाणी संग्रह, शिलालेख व इतिहास गाजविणाऱ्या शस्त्रांची मांडणी केलेली शोकेस आपल्याला खिळवून ठेवतात. काष्ठशिल्पातील दरवाजा आपल्याला तिसऱ्या हॉलकडे घेऊन जातो. खरं तर हा तिसऱ्या हॉलचा प्रवेशद्वार नाही मात्र तसा भास नक्की होतो. रागमालेचा आविष्कार अनुभवत आपण तिसऱ्या हॉलमध्ये दाखल होतो. येथे देवनगरी अवतरल्याचा भास होतो. दुर्गा, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश असे सारेच देवांच्या लहान मोठ्या मूर्ती आपल्याला खिळवून ठेवतात. तर ज्येष्ठ रामभाई बटाविया यांनी कंबोडिया, नेपाळ, श्रीलंकेसह विविध देश आणि वाराणसी, अलाहाबाद, अमृतसर, श्रीनगर, बेंगळूरू, सिमला, हरिद्वार, हृषीकेश अशा असंख्य शहरांतून जमविलेल्या आणि जीवापाड जपलेल्या १६१ मूर्तीचा सोहळा सावाना संग्रहालयाला दान केला. हा छंद अनुभवताना डोळ्यांची पारणे फिटतात. नटराज, हनुमान, डाकिणी, विष्णू-लक्ष्मी, खंडोबा-म्हाळसा, महिषासुरमर्दिनी, दुर्गा, मुरलीधर, उमामहेश्वर आलिंगन मूर्ती, वीरभद्र, गंगा, भूदेवी, शंकराचे तांडवनृत्य अशा अनेक विविध धातूच्या मूर्ती आहेत. सुटीमध्ये पालकांनी चिमुकल्यांसह हा खजिना नक्की पहायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत पाण्याचा अपव्यय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
सध्या इंदिरानगर भागात पाण्यासाठी नगारिकांना वणवण करावी लागत असतानाच हाकेच्या अंतरावर असलेल्या सिडकोत मात्र लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सिडकोतील पवननगर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मुख्य पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी रस्त्याने वाहून गेले आहे. या प्रकारामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यात अक्षरशः तळेच साचले होते. पवननगर येथील प्रभाग २५ मधे पवननगर ते रायगड चौक या मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम यापूर्वीच होणे अपेक्षित असतानाही ते न झाले नव्हते. आता ते सुरू असताना मुख्य पाइपलाइनच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याने रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
त्यातच पवननगर भाजी मार्केटमुळे व मध्यवर्ती व्यापारी बाजारपेठेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे ठेकेदाराने एका बाजूचा रस्ता पूर्ण करणे अपेक्षित होते आणि त्यानंतरच दुसरी बाजू खोदण्यास सुरुवात करायला पाहिजे होती. मात्र, दोन्ही बाजू खोदून ठेवल्याने या ठिकाणी वाहतुकीचे बारा वाजले आहेत. नागरिकांना हा रस्ता न झाला तर बरे, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असल्याने या कामाची पूर्तता लवकरात लवकर करावी अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यापूर्वीच या ठिकाणी असे तळे साचल्याने भविष्यात या रस्त्याचे काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रस्त्याचे काम सुरू होऊन महिना झाला आहे. या भागातील व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले आहेत. तसेच धूळ, माती व आता चिखलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन सदर काम लवकर पूर्ण करावी ही अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार असून यंदाही पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा बालभारतीचा मानस आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकूण ९९ लाख ३० हजार ३४६ पाठ्यपुस्तकांच्या प्रतींचे वाटप करण्यात येणार आहे.
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असावा, यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पुस्तकांअभावी अडचण होऊ नये, या उद्देशाने पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप करण्याला प्राधान्य दिले जाते. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी गेल्या महिन्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती पुणे कार्यालयाचे विभागीय कार्यालय, पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, लेखानगर, नाशिक यांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून विद्यार्थीसंख्या मागविण्यात आली होती. त्यानुसार नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार तसेच महानगरपालिका नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव यांना शालेय वर्ष २०१७-१८ साठी एकूण ९९ लाख ३० हजार ३४६ प्रती पाठ्यपुस्तकांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. हा पुरवठा तालुकास्तरापर्यंत करण्यात येणार असून ४० तालुके व ४ महानगरपालिका असा एकूण ४४ ठिकाणी पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
बालभारती नाशिक भांडाराच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदा व महानगरपालिका यांना पुस्तक पुरवठा वेळेत पूर्ण करण्यासाठी बालभारती नाशिक कार्यालयाने सर्व संबंधित शिक्षणाधिकारी तसेच त्यांच्या प्रतिनिधी यांची सभा घेऊन पुरवठ्याचे नियोजनही तयार केले आहे. याशिवाय, राज्य सरकारच्या वतीने नेमलेले वाहतूक ठेकेदार ओंकार लॉजिस्टीक, पुणे यांच्यामार्फत अंबड बालभारती नाशिक या गोदामातून ११ मेपासून पुस्तक पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे यांनी दिली आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
आदिवासी
तालुक्यांना प्राधान्य
आदिवासी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके देण्याचा विभागीय कार्यालयाचा प्रयत्न आहे. अशा तालुक्यांचे नियोजनही करण्यात आले असून येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पुस्तकांअभावी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे दुर्गम अशा आदिवासी तालुक्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक डामसे यांनी सांगितले आहे.
या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत आठवीपर्यंतची पुस्तके मोफत देण्यात येतात. त्यानुसार सातवीच्या पाठ्यपुस्तकांची कामे अजून सुरू आहेत. येत्या काही दिवसांतच ही पुस्तके उपलब्ध होतील, असे बालभारतीच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधुनिक भगीरथ!

$
0
0

विनायकदादा पाटील

`एटी` हे एक निगर्वी, साधे, मितभाषी असे व्यक्तिमत्त्व. त्यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांची जाण होती. ते सोडविण्याच्या पद्धतीही (प्रोसिजर) त्यांना अवगत होती. पाठपुरावा करण्यासाठी लागणारे सातत्य व संयमही त्यांच्याजवळ होता आणि यामुळेच क‍ळवण मतदारसंघाचा आमूलाग्र कायापालट ते करू शकले.

मतदारसंघातील कामे करीत असताना काही कायमस्वरूपी तसेच संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक असे धोरणात्मक निर्णय घेऊन `एटीं`नी ते राबवून दाखवले. त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे पश्चिमवाहिनी नद्यांना पूर्ववाहिनी करणे. पावसाचे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांमुळे लगेचच समुद्राला मिळत असल्याने त्याचा उपयोग व वापर मर्यादित होत असे. त्याच नद्यांना वळण देऊन पूर्ववाहिनी केल्यास ते पाणी अडवता येते, साठवता येते व अधिक मोठ्या भू-भागासाठी दीर्घकाळ वापरता येऊ शकते. तशी भौगोलिक परिस्थिती त्यांच्या मतदारसंघात होती. ‘नार पार व भेगू या पश्चिमवाहिनी नद्यांना वळण देऊन आपण पूर्ववाहिनी करू शकतो.’ हा त्यांचा विचार त्यांनी १९६७ सालापासून जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावर मांडायला सुरूवात केली. हाच प्रश्न १९७२ नंतर ते विधानसभेत मांडू लागले. सुरूवातीला ही कल्पना अवास्तव व स्वप्नरंजन आहे, असे वाटत होते. कालांतराने हा मुद्दा पटवून देण्यात ते यशस्वी झाले. पाटबंधारे खात्यातील इंजिनीअर्सच्या सहकार्याने त्यांनी तो तत्त्वातही बसवला व शासनाकडून त्याला आर्थिक पाठबळ दिले. भेगू नदीवरील इतर काही वळण बंधारे पूर्ण झाले असून, पश्चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला वहायला लावण्यात `एटी` यशस्वी झाले. नदीची दिशा बदलण्याचे काम पुराण काळात भगीरथाने केले होते. हेच काम वर्तमान काळात करून ते खऱ्या अर्थाने आधुनिक

भगीरथ झाले. त्यांच्या या दिशादर्शक कामाचे अनुकरण जेथे जेथे अशी भौगोलिक परिस्थिती आहे, तेथे भविष्य काळात होत राहील व ते मानव जातीला वरदान ठरेल.

अनेक पाटबंधाऱ्यांचे प्रकल्प राबवून पाणी नसलेल्या गावांना पिण्याचे पाणी दिले. शेतीला पाणी पुरवून आदिवासींची पीकपध्दती बदलली. पूर्वीचा कोरडवाहू शेती किंवा शेतावर मजुरी करणारा आदिवासी बागायतदार संपन्न झाला. आरोग्याच्या सेवाही त्याला उपलब्ध करून दिल्या. `एटीं`च्या प्रयत्नाने दुर्गम भागात रस्ते झाले. प्रत्येक गाव रस्त्याने जोडले गेले. गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एसटी बस धावू लागली. आश्रमशाळा, शाळा व महाविद्यालये सुरू करून शिक्षणाचीही व्यवस्था झाली.

‘सर्वांगिण विकास, सर्वांगिण विकास म्हणतात तो हाच. यासाठी प्रदीर्घ, जाणीवपूर्वक, जिव्हाळ्याने केलेले प्रयत्न आहेत अर्जुन तुळशीराम पवार या नेत्याचे. त्यांच्या अबोल स्वभावाने ते प्रसिद्धवंत झाले नाहीत. पण त्यांच्या कर्तृत्त्वाने

ते झाले आहेत कीर्तिवंत आणि हाती घेतलेली कामे यशस्वी केल्याने यशवंत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images