Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कुल्फीतून ५५ जणांना विषबाधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील बहिराणे, चिराई व महड येथे कुल्फी खाल्याने जवळपास ५५ जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यात सर्वाधिक लहान बालकांचा समावेश आहे. त्यांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनील मोराणकर यांनी सांगितले.

बागलाण तालुक्यातील बहिराणे, महड, चिराई येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सायकलीवरून परप्रांतीय फेरीवाला कुल्पी विकण्यासाठी या परिसरात आला होता. वरील तीनही गावातील लहान, मोठ्यांनी सबंधित कुल्पी विक्रेत्यांकडून शुक्रवारी दुपारी मटका कुल्पी खाल्ली. त्यांनतर सायंकाळी त्यांना अचानक उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास जाणवू लागला. गावातील लोकांनी तत्काळ नामपूर रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून बाधितांना रात्री आठच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विषबाधित रुग्ण व कसांत त्याची वय सिंधुबाई अहिरे (५५), भरत अहिरे (३३), चेतन अहिरे (५), कुसुम अहिरे (४५), सोनाली आहिरे (२२), कल्पना खैरनार (२४), पृथ्वीराज खैरनार (४), नंद‌िनी निकुंभ (४०), सुनीता शिंदे (२२), हर्षदा शिंदे (६), निकीता अहिरे (१०), मनोहर धोंडगे (१०), प्रसाद धोंडगे (६), मेघशाम धोंडगे (५५), गिरीश धोंडगे (१२), भैरव धोंडगे (३), अमोल सोनवणे (५), गोकुळ सोनवणे (४) आदींना उपचारासाठी नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याशिवाय आणखी काही मुलांनादेखील विषबाधा झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची जायखेडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कुल्फी विक्रेता अखिलेश रामप्रसाद कुमावत यास ताब्यात घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समित्यांचा विकास आराखडा कागदावरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सहकार चेहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी आगामी पाच वर्षांसाठीचा आराखडा पणन महामंडळाला सादर करण्याचे निर्देश दिले. पण हे आराखडे नंतर कागदी घोडेच ठरले. त्यानंतर पुन्हा नियमात बदल केले. त्यामुळे या बाजार समितीची परिस्थिती दयनीय तर आहेच पण त्याकडे आजही सरकार गांभीर्याने बघत नाही. या आराखड्यात कृषी मालाची खरेदी-विक्री होणाऱ्या बाजार समित्यांनीही बदलांचा वेध घेत त्यांचा व्यवसाय विकास आराखडा तयार केला होता. पण त्यावर १० टक्केही काम झाले नसल्याचे समोर आले आहे.

२०१३ साली राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आगामी पाच वर्षांचा व्यवसाय विकास आराखडा (बिझनेस डेव्हलपमेंट अॅक्शन प्लॅन) तयार केला होता. त्यात उत्तर महाराष्ट्रातील ३८ बाजार समित्यांनी त्यांचे आराखडे पणन महामंडळाला सादर केले. हा आराखडा पणन मंडळाद्वारे राज्य सरकारला पाठविण्यातही आला. पण त्यानंतर त्यावर ठोस कामच झाले नाही. तोट्यात असणाऱ्या बाजार समित्यांना या आराखड्याचा विशेष फायदा झाला असता, पण सरकारी कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार घडला. याला चारवर्षे उलटली पण त्यावर ना विरोधक बोलले ना सत्ताधारीने कधी आवाज उठवला. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीनेही कधी याबद्दल कधी विचारणा केली नाही.

काय होते आराखड्यात?

प्रत्येक बाजार समितीकडे सद्यस्थितीत किती पायाभूत सुविधा आहेत, समितीची सद्यस्थिती काय आहे, उत्पन्नाचे स्त्रोत कुठले आहेत, बाजार समिती आगामी पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कुठल्या पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे, त्यासाठी त्यांच्याकडे निधी कोठून येणार आहे, यासह विविध बाबींवर प्रकाश टाकणारा हा आराखडा होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन महामंडळाकडे आराखडा पाठवला. पण नंतर दुष्काळ व बाजार समितीची आर्थिक स्थितीही खालावली. त्यामुळे हा विकास आराखडा कागदावरच राह‌िला.

-अशोक देसले, सचिव, कृऊबा, मालेगाव

सत्ता बदलली की पॉलिसी बदलते. त्यामुळे पाच वर्षाचा विकास आराखड्यात काही कामे झाली. आम्ही प्राथमिकतानुसार आराखडा तयार करतो व त्यावर काम करतो.

- योगेश अमृतकर, कृऊबा नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नास्तिकतेची लढाई समाजातील कट्टरतेविरुद्ध!

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्ञानावर आजवर धर्मसत्तेचे नियंत्रण राहिल्याने मानवी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ईश्‍वर ही मानवी कल्पना असल्याचे नास्तिकांचे ठाम मत असले, तरी नास्तिकांची लढाई धर्माविरुद्ध नसून धर्माच्या नियंत्रणाविरुद्ध, त्यातील कट्टरतेविरुद्ध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत इरफान इंजिनीअर यांनी केले.

विवेकधारा संघटनेच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित तिसऱ्या नास्तिक मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. नास्तिकांच्या ‘ब्राइट’ संघटनेचे संस्थापक कुमार नागे, निखिल जोशी, चैताली शिंदे, प्रमोद सहस्रबुद्धे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे, दीप्ती राऊत, उद्योजक संदीप भावसार आणि विवेकधाराचे प्रवर्तक अमित जोजारे विचारमंचावर उपस्थित होते.

यावेळी इंजिनीअर यांनी जगातील तत्त्वज्ञानाचे प्रवाह, धर्मसत्ता, नास्तिक विचारधारा याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले. ते म्हणाले, की जगात आदर्शवादी (आयडियालिस्ट) व भौतिकतावादी (मटेरियालिस्ट) असे तत्त्वज्ञानाचे दोन प्रवाह कार्यरत असून, त्यापैकी आदर्शवादी तत्त्वज्ञानाची विचारधारा ‘ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या’ अशी आहे, तर भौतिकतावादी विचारधारा अनुभवावर आधारित आहे. आदिम काळापासूनच आदर्शवादी विचारधारा उदयास आली. धान्य, पाणी, हवा देणारा निसर्ग हा अतिवृष्टी, दुष्काळासारखी संकटेही आणतो, ही गोष्ट तेव्हाच्या लोकांच्या आकलनापलीकडची होती. त्यामुळे निसर्ग प्रसन्न होतो तेव्हा तो सुख देतो आणि कोपतो तेव्हा संकटे आणतो, अशी समजूत रुढ झाली. मग निसर्गाची कृपा पदरात पाडून घेण्यासाठी कर्मकांडे होऊ लागली.

समाजातील एका विशिष्ट वर्गाने याला बळकटी दिली. प्रारंभी ३३ कोटी देव असल्याचे मानले जाऊ लागले, पुढे ही संख्या तीनवर व नंतर एकेश्‍वरवादावर येऊन ठेपली. ईश्‍वर ही संकल्पना दिवसेंदिवस बदलत गेली, हा ईश्‍वर ही मानवी कल्पना असल्याचा पुरावाच मानायला हवा.

पुरातन काळापासून ज्ञानावर धर्मसत्तेचे नियंत्रण राहिल्याने मानवी समाजाचे मोठे नुकसान झाले; अन्यथा सद्यस्थितीपेक्षा मानवाने अधिक प्रगती केली असती. मात्र, धर्मसत्तेविरुद्ध बोलणाऱ्यांना राक्षस वा कनिष्ठ जातीचे म्हणून हिणवले गेले. चार्वाक, बुद्ध, जैन या विचारधारेने हा समज खोडून काढत समाजाला तर्काच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला. धर्माचे केंद्र ईश्‍वर नव्हे, तर नैतिकताच असायला हवे. सध्याच्या काळात लोक असुरक्षित झाले असून, तर्कसंगत समाजनिर्मितीसाठी शोषितांचे जीवन सुसह्य करणे ही गरजेची बाब झाली आहे, असेही इंजिनिअर म्हणाले.

दरम्यान, अमित जोजारे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. श्यामला चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रसाद भट्टड यांनी जाहीरनाम्याचे वाचन केले. प्रियदर्शन भारतीय यांनी सूत्रसंचालन केले. भाविन पाटील यांनी आभार मानले.

धर्मनिरपेक्षता ही पाश्‍चात्त्य संकल्पना असल्याची टीका संघ व हिंदुत्ववादी नेहमी करीतात. मात्र, धर्मनिरपेक्षता व त्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये बौद्ध तत्त्वज्ञान व भारतीय श्रम परंपरेतून घेतल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही विदेशी नव्हे, तर संपूर्णत: भारतीय संकल्पना असल्याचे इंजिनिअर यांनी यावेळी स्पष्ट केले.

नास्तिकता जीवनशैली!

मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात निखिल जोशी व चैताली शिंदे यांच्या मुलाखतीतून नास्तिक जीवनशैलीचा प्रवास उलगडला. दीप्ती राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. नास्तिक व्यक्तींना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली मात यावर या मुलाखतीतून प्रकाश टाकण्यात आला. याच सत्रात कुटुंबातील नास्तिकता, भारतीय कायद्यात नास्तिकांना अपेक्षित बदल, बुद्धिप्रामाण्याचा प्रचार-प्रसार, नास्तिकतेशी सुसंगत जीवनपद्धती, संयुक्तिक काय? अज्ञेयवाद की नास्तिकता? या विषयांवर गटचर्चा झाली. चैताली शिंदे, निखिल जोशी, प्रमोद सहस्त्रबुद्धे, संदीप भावसार, लोकेश शेवडे यांनी चर्चेची सूत्रे सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेट्रीचंड उत्सवाचे बुधवारी आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

भगवान झुलेलाल यांचा जन्मदिन व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिंधी बांधवांच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या चेट्रीचंड उत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. २९) करण्यात आले आहे. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसाचे औचित्य साधून महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते यांचा सत्कार केला जाणार आहे.

भगवान झुलेलाल मंदिरात सकाळी आरती व अन्य कार्यक्रम पार पडतील. बुधवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होईल. सकाळी साडेदहा वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून दुचाकी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी साडे चार वाजता शालिमार येथील झुलेलाल मंदिरापासून रामकुंडापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी बेराणा साहेब पूजन केले जाणार असून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त रामकुंडावर रात्री आठ वाजता आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते तसेच अन्य मान्यवरांचाही सत्कार यावेळी केला जाणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधी पंचायत समितीचे अध्यक्ष नानिकराम मदनानी, नानीक मदनानी, दीपक पंजाबी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकअपसह कोंबड्यांची चोरी

$
0
0

नाशिक ः कोंबड्यांची चोरी झाल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. चोरट्याने पीकअप व्हॅनसह तब्बल दीड लाख रुपयांच्या कोंबड्यांची परस्पर विल्हेवाट लावली. मौसीन शेख अब्दुल शेख (शहाजनी मशीद, जीपीओ रोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तौफीक मो. हुसेन अख्तार याने तक्रार दिली आहे. २४ मार्च रोजी संशयित आरोपीकडे फिर्यादीने पीकअप व्हॅनमध्ये प्रत्येकी दोन किलो वजनाच्या ९०० कोंबड्या दिल्या होत्या. या कोंबड्या चालक शेखला गुजरात राज्यात घेऊन जायच्या होत्या. मात्र, रस्त्यातच शेखने कोंबड्याची परस्पर विल्हेवाट लावत पीकअप व्हॅनही पळवली. यापूर्वी, व टेम्पोमधील ४४ कोंबड्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी पळविल्याची घटना वडाळानाका भागात शनिवारी घडली होती.

आडगावात ट्रकची चोरी

आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनलसमोरील राजस्थान ट्रान्सपोर्ट येथे पार्क केलेली ट्रक चोरट्यांनी लंपास केला. आडगाव पोलिसांनी २० मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. किसानसिंग राजपूत (२६, ग्रामदेवराज, जोधपूर, राजस्थान) याने या प्रकरणी तक्रार दिल आहे. चोरट्यांनी घटनेच्या दिवशी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास १० चाकी ट्रक लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कार्यालयातच घुसखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शरणपूररोडवरील जुने पोलिस आयुक्तालयात काही नागरिकांनी घुसखोरी करीत कार्यालयाच्या काचा फोडल्या. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. संबंधित नागरिकांना पोलिसांनी लागलीच अटक करीत त्यांची जामिनावर सुटका केली.

जुने पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत सध्या, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. ही जागा एका ख्रिश्चन मिशनरीच्या मालकीची असून, या बाबत पोलिस आणि संबंधितांमध्ये भाडेकरार झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा भाडेकरार काही वर्षांपूर्वी संपुष्टात आला. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गंगापूररोडवरील पोलिस मुख्यालयाच्या जागेवर पोलिस आयुक्तालयाची इमारती बांधली. मात्र, पोलिस आयुक्तालय स्थलांतरीत होऊनही पोलिसांनी शरणपूररोडवरील जागा खाली केली नाही. या पार्श्वभूमीवर, शनिवारी (२५ मार्च) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऑस्टो स्कूल मागे, मिशनमळा येथे राहणाऱ्या लता अनिल मकासरे, मंदा प्रमोद मकासरे, मंदाकिनी मनोवेल हिवाळे, प्रमिला बाळासाहेब व्हसाळे, संगिता अनिल गायकवाड, राजेश तिमती गायकवाड, सुनील राठोड, मासापा बिचप्पा मिनगिरे, रिझवान चौधरी, जितेंद्र सुकलाल कौल तसेच राजकुमार पंडित आदींनी पोलिस उपायुक्ताच्या कार्यालयावरच मोर्चा काढला. यावेळी सर्वांनी ‘राहण्यासाठी घर पाहिजे’ अशा घोषणा देत थेट पोलिस कार्यालयातच ठाण मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यालयाची खिडकी तोडून नुकसान केले. यानंतर, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे आदींनी संबंधितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करीत जामिनावर सुटका करण्यात आली.


दोन ठिकाणी घरफोडी

बंद घराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी घरातील मुद्देमाल चोरी केल्या प्रकरणी अंबड आणि उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. उत्तमनगर येथील एन ५३, एसएफ ६३/६५ येथे राहणाऱ्या दत्तात्रय किसन सोपे यांच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी २५ मार्चच्या मध्यरात्री साडेतीन ते साडेपाच वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराच्या मागील दाराला छिद्र पाडून आतील कड्या उघडल्या. यानंतर, घरातील लोखंडी कपाटत ठेवलेले चार तोळे वजनाचे मंगळसूत्र, एक तोळ्याची सोन्याची चेन कानातील कर्णफुले तसेच पाच हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरी केला. अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय गांगुर्डे करीत आहे. दरम्यान, उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सायखेडारोडवरील विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या मंगेश संपतराव थेटे यांचेही घर चोरट्यांनी फोडले. २३ ते २४ मार्च दरम्यान हा प्रकार घडला. चोरट्यांनी थेटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले ६० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच एक मोबाइल चोरी करून नेला. घटनेचा अधिक तपास पीएसआय एस. बी. पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकदारांची दुहेरी फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेला हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटचा (एचओआय) मुख्य सूत्रधार आणि संचालक विनोद पाटील याने फरार झाल्यानंतर दिल्लीतील एका कंपनीचे तब्बल तीन कोटी रुपयांचे शेअर्स विकण्याचे कंत्राट घेतले होते. यातील पावणेदोन कोटी शेअर्स त्याने पूर्वीचाच गुंतवणुकदारांना विकले. एकदा फसवणूक झाल्यानंतर पुन्हा शेकडो गुंतवणुकदारांनी पाटीलकडून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स घेतले. ‘एचओआय’च्या घोटाळ्यानंतर आणखी फटका गुंतवणुकदारांना बसला आहे.

‘एचओआय’ कंपनी डबघाईस आल्यानंतर मुख्य संचालक विनोद पाटील फरार झाला. तब्बल सहा महिने तो मुंबईतील मलाड येथे उमेश संपत शिंदे असे नाव बदलून राहिला. या काळत त्याने दिल्लीतील दी व्हीनस फॅब्रिक या कंपनीच्या संचालकाची भेट घेतली. तुमच्या कंपनीचे तीन कोटी शेअर्स विक्री करून देतो, त्या मोबादल्यात कमिशन देण्यात यावे, अशी अट त्याने कंपनीसमोर ठेवली. सदर कंपनीने त्यास हिरवा कंदील दर्शविला. यानंतर, पाटीलने ‘एचओआय’च्या गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. गुंतवणुकदाराला जेवढे पैसे घ्यायचे त्याच्या १० टक्के शेअर्स विकत घ्यावे लागतील, अशी अट त्याने ठेवली. ‘पैसे परत मिळतील’ या अपेक्षाने गुंतवणूकदारांनी सरासरी ४०० रुपये दराने शेअर्स खरेदी केले. तब्बल एक कोटी ८२ लाख शेअर्स पाटीलने गुंतवणुकदारांच्या गळी उतरवले. मात्र, हा प्रकार सुरू असतानाच आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्यात. सध्या, ४०० रुपये शेअर्सची किंमत १७४ रुपये इतकी झाली असून, यात गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

ओळख बदलून दोन कंपन्या सुरू

संशयित विनोद पाटीलने साधारणतः चार वर्षांपूर्वी हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट (एचओआय) या गुंतवणूक कंपनीची स्थापना केली होती. यानंतर, त्याने परदेशात, जमिनीत तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा व्याजाचे अमिष गुंतवणूकदारांना दाखवले. मात्र, काहीच दिवसात कंपनीचे व्यवहार गोत्यात आले. गुंतवणुकदारांनी तगदा व पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर पाटील मुंबईत फरार झाला. मात्र, फसवणुकीच्या एवढ्या मोठ्या प्रकारानंतरही तो थांबला नाही. तिथे त्याने ऑरेंज कॅपिटल आणि आणखी एक गुंतवणूक कंपनी सुरू केली. यासाठी त्याने मलाडमध्ये एवर शाईन या इमारतीत एक गाळा भाड्याने घेतला होता. मागील दोन महिन्यांपासून गाळामालक पोलिस व्हेरीफिकेशन आणि करारासाठी मागे लागूनही पाटीलने यात चालढकल केली.

चेक बाऊन्सप्रकरणी कारवाईची शक्यता

गुंतवणूक कंपन्या थाटणाऱ्या विनोदने दुसरीकडे परदेशी पर्यटकांसाठी गाईड म्हणून काम केले. यासाठी पाटीलने एका ब्रोकरकडून कार खरेदी केली. आगाऊ रक्कम म्हणून त्याने एक लाख रुपयांची रोकड दिली तर एक लाख रुपयांचा चेक दिला. हा चेक ‘एचओआय’ कंपनीच्या खात्याशी निगडीत होता. त्यामुळे सहाजिकच तो वठला नाही. आता या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन पाटीलवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली पाटीलने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष तक्रारदार समोर आला नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी जाचातून मोहाची फुले ‘मुक्त’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोहफुलांना सरकारी जाचातून मुक्त करण्यात येत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात त्याचा फायदा होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत नुकतेच मोह फुले हे वनोपज वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात आदिवासी बहुल भागात मोह वृक्षांची संख्या जास्त आहे. यापासून तयार होणारे वनोपज मोह फुले हे खाद्य पदार्थ असून त्यापासून शेतीपूरक व्यवसायही करता येतो. त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. राज्यात मोहफुलांची शेती केली जाते. त्यापासून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून याची बाजारपेठही तयार राज्यात इतर ठिकाणी झाली आहे. अशीच व्यवस्था जिल्ह्यातही करून तेथील आदिवासीनाही त्याचा फायदा मिळणार आहे. मोह फुलांवरील कायदेशीर बंधनामुळे त्याचा व्यवसायासाठी वापर होत नव्हता. त्याचा फायदाही स्थानिकांना होत नव्हता. यासाठी ‘मोह फुले’ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार मोह फुलांच्या वाहतुकीसाठी वाहतुकीचे नियम लागू राहणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, मोह फुले साठवणूक क्षमतेबाबतची बंधने शिथिल करणे व व्यापार खुला करणे याबाबतची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लवकरच करण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात एक लक्ष टन उत्पादन असून त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. मोहा फुलापासून शेतीपूरक जोडधंदा केल्यास सरबत, मुरब्बा, जामजेली, सॉस, चटणी आणि लाडू आदीसारखे पदार्थ बनविता येतात. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना हर्ब प्रकल्पात अशी कामे सुरू आहेत. अशीच कामे नाशिक जिल्ह्यामध्येही होऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूकमोर्चातून चपराक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘या ठिकाणी सिग्नल बसविले असते तर माझ्या भावांनो मी आज तुमच्यात असते’, ‘आई तू घरी का नाही आलीस परत?’ अशा हृदयाला हात घालणाऱ्या फलकांद्वारे गंगापूररोड परिसरातील रहिवाशांनी ढिम्म प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर आणखी बळी जाऊ नये, यासाठी सिग्नल बसवा तसेच आवश्यक उपाययोजना तातडीने करा, अशी आर्त विनवणी अपघातातील मृत महिलांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्तांसह स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली.

अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवर जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाघ गुरूजी शाळेजवळील चौफुलीवर गुरूवारी झालेल्या अपघातात एका प्राध्यापिकेने जीव गमावला. अशाच एका अपघातात नीलिमा चौधरी या महिलेनेही अलिकडेच जीव गमावला. गंगापूर रोडवरील या जीवघेण्या अपघातांची मालिका थांबावी, अशी परिसरातील रहिवाशांची आंतरिक तळमळ आहे. म्हणूनच रविवारी सायंकाळी मृत महिलांच्या नातलगांसह शेकडो रहिवाशी रस्त्यावर उतरले. जेहान सर्कल चौकात हे सर्व लोक एकत्रित जमले. त्यामध्ये महिला आणि तरुणींचेच प्रमाण अधिक होते. रस्त्यावर पडलेली माती बाजूला करीत त्यापैकी काही जणांनी सिग्लनची प्रतिकृती हाती धरली. तर अन्य नागरिक मानवी संवेदना जागविणारे फलक हाती घेऊन शांतपणे उभे राहीले. सायंकाळी या चौकात मोठी वर्दळ असते. हे नागरिक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांनी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याची काळजी घेतली.

लेवा सखी मंडळाच्या महिला तसेच परिसरातील रहिवाशी हाती फलक घेऊन शांतपणे थांबल्या होत्या. अशा किती बहिणी आणि भाऊ आपण अपघातांमध्ये गमावणार आहोत, किती जणांचे संसार उघड्या डोळ्यांनी उध्वस्त होताना पहाणार आहोत, असा सवाल या महिला आणि तरुणी अबोलपणेच करीत होत्या. ‘प्रिय मोना तुला जगायचे होते ना?’, ‘पुन्हा अशी कोणी मोना जाऊ नये’, ‘आई तू घरी का आली नाहीस ग परतून’, यांसारख्या फलकांद्वारे आता तरी वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असा संदेश प्रत्येक वाहनधारकाला दिला जात होता. आमदार सीमा हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यावेळी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांना घेराव

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल जेहान सर्कल चौकात आले. त्यांना नागरिकांना गराडा घातला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी सिंगल यांच्याशी संवाद साधला. यापुढे पुन्हा अशा प्रकारे कुणाचा अपघाती मृत्यू होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, असे आर्जव केले. पोलिसांकडे अधिकार आहेत. त्यांनी त्याचा प्रभावीपणे वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सिग्नल, सीसीटीव्ही बसविण्याची कामे प्रस्तावित आहे. याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा करू, अशी ग्वाही सिंगल यांनी दिली.

जेहान सर्कल ते शहीद चौकापर्यंत कॅन्डल मार्च
मार्चमध्ये महिला, तरुणींचा लक्षणीय सहभाग
प्रतिकात्मक सिग्नलची उभारणी
हृदयाला हात घालणाऱ्या घोषवाक्यांद्वारे जनजागृती
सफेद कपडे परिधान करून बहुतांश नागरिक रस्त्यावर
मूकमोर्चाद्वारे निषेध
गंगापूर रोडवर सिग्नल्स, दुभाजकांची मागणी
पोलिस आयुक्तांना मृत महिलेच्या कुटुंबीयांचा घेराव
पुन्हा कुणाचा जीव जाऊ नये, अशी अपेक्षा
वाहतूक नियोजनासाठी कठोर पाऊले उचलण्याची नागरिकांची मागणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-सुमोचा अपघात

$
0
0

चार जणांचा मृत्यू, सुरत-नागपूर महामार्गावरील घटना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत-नागपूर महामार्गावरील तालुक्यातील मुकटी गावाजवळ रविवारी (दि. २६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी झाले आहेत. सूरत-नागपूर महामार्गावरील खड्डे वाचवताना भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या सुमो गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेनंतर सुमोचा संपूर्ण चक्काचूर झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

गुजरात राज्यातील सूरत शहरातील सिद्दी कुटुंबीय सूरतहून पारोळा येथे साखरपुड्यासाठी जात होते. मुकटी गावाजवळ त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये २ महिलांसह २ लहान मुलींचा समावेश आहे. मृत फरजाना बानो सिद्दी (२२), सुमय्या इब्राहीम सिद्दी (१२), फरहद इसा सिद्दी (६), शहाजा बानो सिद्दी (२४) या चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींवर शहरातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत मुकटी गावाची जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेजवळ पूल असून त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. ते वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक सुमोवर आदळला. यामुळे ही दोन्ही वाहने ५० फूट खोल शाळेजवळील पुलाच्या खाली कोसळली. सुमोमध्ये ११ जणांचा समावेश होता. ते पारोळ्याला नातेवाईकांकडे जात होते.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

अपघातानंतर मुकटी गावातील संतप्त गावकऱ्यांनी यावेळी महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन दोन्ही बाजूंनी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील खड्डा वाचविण्याच्या नादात हा अपघात घडला असून, महार्गावर झालेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असल्याचा माहिती गावकऱ्यांनी दिली. या अपघाताला जबाबदार म्हणून राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाला दोषी ठरवण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. महामार्ग प्राधिकरणाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दोन अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पोलिसांसमक्ष तत्काळ खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वेळीच खड्डे बुजवले गेले असते. तर निष्पाप बळी गेला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलन करणाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट्स टाळा

$
0
0

उद्योगजगतात यशस्वी व्हायचे, तर कष्टांना पर्याय नाही. महिलांनी वेळेचे व्यवस्थापन आत्मसात केल्यास त्या उद्योगात निश्चितच यशस्वी होऊ शकतात. फक्त त्यासाठी आपले उद्दिष्ट स्पष्ट असायला हवे. शॉर्टकट्सचा वापर करून कुणी यशस्वी उद्योजक बनू शकत नाही, असा कानमंत्र दिलाय ‘वाइनलेडी’ म्हणून लौकिक प्राप्त करणाऱ्या आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील यांच्याकडून गौरविल्या गेलेल्या उद्योजिका अचला जोशी यांनी.

--

महिला उद्योजिका, तेही वाइन इंडस्ट्रीत, हे कसे जमले?

उद्योजकांत महिला आणि पुरुष असा भेद तितकासा योग्य वाटत नाही. उद्योग कोणताही असो तो करण्याची आंतरिक तळमळ असायला हवी. कधीतरी वाइनची चव चाखली होती. भेट म्हणून मिळालेल्या आणि काहीशा तुरट असलेल्या द्राक्षांची चव या वाइनसारखीच होती. म्हणूनच त्यापासून वाइन बनवून पाहिली. मी बनविलेल्या वाइनची चव त्या वाइनच्या चवीशी मिळतीजुळती होती. त्यातून माझा आत्मविश्वास दुणावला. कुटुंबांत, तसेच नातलगांत डॉक्टर्स, इंजिनीअर्स, लेखक आणि कलावंत असताना मी वाइनसारख्या उद्योगात उतरणे इतरांसाठी थोडे धक्कादायक होते. त्यातूनही प्राध्यापक म्हणून नोकरीची संधी चालून आली असताना ती सोडून मी उद्योगाकडे वळले. कारण, माझे मन मला सांगत होते, की आपण या उद्योगात यशस्वी होऊ शकतो.

--

उद्योगाकडे वळण्यासाठी काय पूर्वतयारी हवी?

उद्योगाकडे वळणाऱ्या व्यक्तीला आपण कोणते प्रॉडक्ट बनविणार आहोत हे नीट माहिती असायला हवे. उद्योगात उतरायचे म्हणजे तुम्हाला मुळात मनापासून तो उद्योग करावासा वाटला पाहिजे. अन्य कुणी करतोय म्हणून आपणही करू असे म्हणून उद्योग करता येत नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असायला हवी. कोण काय म्हणेल यापेक्षा आपल्याला काय वाटते हे अधिक महत्त्वाचे असते. त्याशिवाय उद्योगात पाय घट्ट रोवता येत नाहीत. एकदा आपण निर्धार केला, की येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे आणि त्यामधून मार्ग काढण्याचे बळही आपल्याच आत्मविश्वासातून मिळत जाते.

--

उद्योगाकडे महिलांचा ओढा कमी का?

पुरुषांच्या तुलनेत म्हणाल तर हे प्रमाण निश्चितच कमी आहे. पण, काळानुसार म्हणाल तर ते वाढले आहे. पूर्वी उद्योग हा महिलांचा प्रांत नव्हता. परंतु, आता उद्योग क्षेत्रात अनेक महिला उतरल्या आहेत. बचतगट वा तत्सम माध्यमांतून महिलांमधील उद्यमशीलतेला व्यासपीठ मिळाले आहे. अजूनही महिलांना पुरुषी अहंकाराचा सामना करावा लागतो, हे वास्तव आहे. विशेषत: मध्यमवर्गीयांत हा त्रास अधिक जाणवतो.

--

लोणची, पापडांपुरतेच महिलांचे उद्योग मर्यादित का?

मला कुणावर टीका करायची नाही. परंतु, बचतगट हे उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे खूप चांगले व्यासपीठ आहे. बचतगटांशी अनेक महिला जोडल्या जाताहेत. त्या माध्यमातून त्यांचे उद्योगात पाऊल पडतेय हीपण सकारात्मक बाब आहे. लहान प्रमाणात सुरू केलेला उद्योगच कालांतराने बहरतो. मात्र, उद्योग मोठा करण्यासाठीचे व्हीजन बचतगटांमधील महिलांनी बाळगायला हवे. पापड, लोणची असोत किंवा अन्य कोणतेही उत्पादन, त्यामध्ये पर्फेक्शन मिळवायला हवे. ते मिळविले, की आत्मविश्वास दुणावण्यास मदत होईल.

--

बचतगट यशस्वी महिला उद्योजक घडवू शकतात का?

का नाही? निश्चितच घडवू शकतात. प्रत्येक महिलेच्या मनात एक राजहंस असतो, असे मी मानते. महिला म्हणजे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असते. उद्यमशील महिलांसाठी बचतगट हे उत्तम व्यासपीठ आहे. त्यांनी या व्यासपीठाचा उपयोग करून घ्यायलाच हवा. आपल्यातील सामर्थ्य ओळखून एकमेकींना सहकार्य करायला हवे. त्यातूनच उद्योग बहरत जातो आणि आपलीदेखील प्रगती होते.

--

भांडवलाच्या कमतरतेमुळे महिला मागे राहतात असे वाटते?

उद्योगासाठी भांडवल हवेच. परंतु, ते खूप हवे असे मात्र नाही. भांडवलाची कमतरता हा उद्योजक बनण्यात कधीच अडथळा ठरू शकत नाही. जेवढे भांडवल उपलब्ध आहे तेवढ्यातच उत्पादन घेण्यास सुरुवात करा. हळूहळू पै-पै जोडून त्यामध्ये वृद्धी करा. टाइम मॅनेजमेंट महिलांत अंगभुत असते. ते महिलांना अधिक चांगले जमू शकते. १० मिनिटांत जे खाऊन संपते ते जेवण बनविण्यासाठी दिवसभर रांधणे योग्य नव्हे. महिला प्रामाणिक असतात. बुद्धिवान असतात. या गुणांचा त्यांनी योग्य पद्धतीने वापर करून घ्यायला हवा.

--

वाइनला आपल्याकडे अजूनही तेवढी समाजमान्यता नाही?

वाइन म्हणजे फळांच्या रसाचा अत्युच्च अाविष्कार आहे. रेड वाइन हृदयाला चांगली असते. तिच्या योग्य सेवनामुळे रक्ताभिसरणाला मदत होते. आरोग्याला हितकारक ठरणाऱ्या वाइनला युरोपात लोकमान्यता मिळाली आहे. परंतु, अजूनही आपल्याकडे ती मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचलेली नाही. वाइन म्हणजे दारू हा गैरसमज दूर होण्याची आवश्यकता आहे.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अमेरिकेतील स्टीम लर्निंग या शिक्षण प्रणालीचा वापर करून मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी शाळेत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आविष्कार लॅबच्या माध्यमातून डॉ. विजय भटकर यांचे सहकारी सौरभ तिवारी यांनी इयत्ता इयत्ता पाचवी व नववीच्या विद्यार्थ्यांकडून इलेक्ट्रॉनिक कंट्रोल डिव्हाइस सर्किट तयार करून घेत त्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.

भारतीय शिक्षण पद्धतीत या प्रणालीचा अवलंब करुन विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या संकल्पनेतून प्रयत्न सुरु केले आहेत. या स्टीम लर्निंग शिक्षण प्रणालीचा उपयोग करुन घेण्यासाठी विद्यार्थीदेखील उत्सुक असल्याचे या शाळेत दिसून आले. मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत तंत्रज्ञानाचे महत्व पटवून सांगितले. या शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, हेदेखील यावेळी सांगण्यात आले. तसेच संस्थेतर्फे राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. या प्रसंगी डॉ. अश्विनकुमार भारद्वाज, संस्था सचिव ज्योती कोल्हे, अनिल दंडगव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात मालेगावचे तापमान सर्वाधिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ मालेगाव

नाशिक जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येही तापमानाने चाळ‌िशी ओलांडली आहे. मालेगावमध्ये रविवारी राज्यात सर्वाधिक म्हणजे ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, त्या खालोखाल चंद्रपूरमध्ये ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईतही पारा वाढत असून ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. एकूणच राज्याचे तापमान पाहता, मार्चचा शेवटचा आठवडा आणखीच ‘ताप’दायक ठरण्याची चिन्हे आहेत.

मालेगाव ः शहर व तालुक्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी तापमानाचा पारा ४२.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. यंदाचे हे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने शहरवासीयांनी वाढलेला उन्हाचा तडाखा लक्षात घेत घराबाहेर जाणे टाळले. त्यामुळे सकाळी रस्त्यांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. मात्र, दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा अधिकच वाढल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. वाढत्या उन्हामुळे शहर व तालुक्यात कांजण्यासारखे आजारदेखील वाढले आहेत.

आठवडाभराचे तापमान

२७ मार्च ः ४२, २८ मार्च ः ४२, २९ मार्च ः ४३, ३० मार्च ः ४३, ३१ मार्च ः ४२, १ एप्रिल ः ४२

नाशिक @ ४०.१

नाशिक ः शहरासह जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली. तापमानाचा पारा वाढल्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. शनिवारी ३८.४ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेले तापमान रविवारी ४०.१ अंशांवर पोहोचले. किमान तापमान २०.० अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. मालेगावपाठोपाठ आता नाशिकच्या तापमानाचा पाराही ४० अंशांच्या पुढे सरकला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षयरोगास प्रतिबंधाचा निर्धार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दि. २१ ते २७ मार्चदरम्यान क्षयरोग सप्ताहांतर्गत महापालिकेचा वैद्यकीय विभाग व महापालिका टीबी कंट्रोल सोसायटीतर्फे, तसेच विविध संस्था, कॉलेजेसतर्फे महापालिका कार्यक्षेत्रात जनजागृतिपर उपक्रम घेण्यात येत आहेत. त्याद्वारे क्षयरोगावर मात करून त्याला प्रतिबंध करण्याचा निर्धारही करण्यात येत आहे.

पंचवटीतील हिरावाडी भागातील सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयातर्फे दि. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त परिसरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीचे उद्घाटन महापालिका वैद्यकीय विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण भोये, एनयूएचएम नोडल आफिसर डॉ. विजय देवकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, टीबी कन्सल्टंट डॉ. अनिरुद्ध कडू, तसेच सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य व अध्यक्षा डॉ. हिमगौरी आहेर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

प्रभात फेरीत प्रबोधनपर चित्ररथाचा समावेश करण्यात आला होता. हा चित्ररथ शहर परिसरात फिरविण्यात आला. त्याद्वारे जनजागृती करण्यात आली. त्यात एनएमसी टीबी कंट्रोल सोसायटीचे कर्मचारी, तसेच सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. क्षयरोगासाठी काम करणारे विविध ‘एनजीओ’देखील या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते.

विविध शाळा व कॉलेजांतदेखील क्षयरोग जनजागृती सप्ताहांतर्गत क्षयरोगावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. क्षयरोगावर शहरातील गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील आम्रपाली झोपडपट्टी व फुलेनगर झोपडपट्टी येथे क्षयरोगाबाबत माहिती देऊन समुपदेशन करण्यात येत आहे. येथील कुटुंबांतील सदस्यांना क्षयरोगाची लक्षणे आढळून आली, तर त्यांची ताबडतोब तपासणी करून निदान करण्यात येत आहे.

--

पथनाट्याद्वारे प्रबोधन

क्षयरोग या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराबाबत प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात शहर परिसरात ठिकठिकाणी पथनाट्य सादर करून क्षयरोगाचे दुष्परिणाम, क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासोबतच त्याच्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात प्रबोधन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनता नदीतून बेसुमार वाळूउपसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शहराच्या उत्तरेला असलेल्या विनता नदी पात्रातून रात्री बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. महसूल यंत्रणेचे या अवैध उत्खननाकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. या अवैध उत्खननामुळे परिसरातील शेतीसाठी असलेल्या पाइपलाइन उघड्या पडल्या आहेत.

निफाड येथे विणता नदीपात्र सध्या कोरडेठाक पडले आहे. या पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. वाळू उपसा इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की, या नदीपात्रातून पासआउट केलेल्या शेतीपंपाच्या पाइपलाइन उघड्या पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या नदीपात्रातून दररोज रात्री बारा वाजेनंतर १० ते १२ ट्रॅक्टर वाळू उपसा होत असल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे वाळू उपसा होत असताना महसूलच्या अनेक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी फोन केले. परंतु त्यांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. निफाड परिसरात कुंदेवाडी, रौळस या गावांजवळून वाहणाऱ्या कादवा नदीतूनही बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.

...म्हणून अधिकारी धास्तावले

गेल्या आठवड्यात ओझर येथे वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीने तलाठी व कोतवाल यांना मारहाण केल्याने महसूल यंत्रणा कार्यवाही करण्यासाठी धजावत नाही. या दहशतीचा परिणाम अवैध वाळू उपसा विरोधात कारवाई करण्यावर झाला आहे. आणि महसूलचे वरिष्ठ अधिकारीही कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आळंदी’साठी ४.३५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आळंदी मध्यम प्रकल्पाच्या धरण आणि दोन्ही कालव्यांच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत करावयाच्या सुमारे ४.३५ कोटींच्या कामास राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यातील १० हजार हेक्टर जमीन क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

आळंदी माध्यम हा २७.४८ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा प्रकल्प असून त्याच्या मुख्य धरणाचे काम १९८३ तर कालव्याची कामे १९९३ मध्ये पूर्ण झाली. हा प्रकल्प १९९४ मध्ये सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आला. या प्रकल्पाचे क्षेत्र ६,२९६ हेक्टर असून कालवे वितरकांची लांबी सुमारे ४६.५ किलोमीटर आहे. प्रकल्पाचे बांधकाम ३०-३५ वर्षे जुने असल्याने धरण व कालव्याच्या भरावाचे मजबुतीकरण करावे, सेवापथ आणि बांधकमांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर करावा, असा आग्रह परिसरातील शेतकऱ्यांनी धरल्यानंतर आमदार बाळासाहेब सानप यांनी याबाबत जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणूनच सरकारने हा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आनंदात आहेत.

आळंदी धरण व कालव्यांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर झाल्याने आडगाव, दरी, मखमलाबाद, मातोरी, चांदशी, म्हसरुळ, सय्यद पिंपरी, जलालपुर आदी परिसरातील आणखी ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याबद्दल शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला असून आमदार सानप यांचे आभार मानले आहे. या दुरुस्तीमुळे गळतीलाही मोठ्या प्रमाणात लगाम बसणार असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकविरा देवीचा चैत्रोत्सव आजपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवीचा चैत्र नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सवाला आज (दि. २८) पासून सुरुवात होत आहे. सकाळी विधीवत पुजा-विधी व शिखरावरील कळसपूजन, ध्वजारोहण करून गुढीपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता पालखी पूजन होऊन मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी वाजतगाजत काढण्यात येणार असल्याचे मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी सांगितले आहे.

दि. २८ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान चैत्र नवरात्रोत्सव आणि दि. ९ एप्रिल ते ११ एप्रिलदरम्यान चैत्र यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. दि.११ एप्रिललादेखील श्री एकविरा देवीची पालखीसह मिरवणूक काढून यात्रेला सुरुवात होईल, असे मंदिर संस्थानाकडून कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवनात हवा सकारात्मक दृष्टिकोन’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक


संध्या छाया ज्येष्ठ नागरिक बहुद्देशीय मंडळाच्या वतीने गोविंदनगर ये‌थील जिजाऊ वाचनालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे होते. डॉ. पवार यांनी जीवनातील हास्याचे महत्त्व तीन साधूंच्या कथेतून विशद केले. आयुष्याचे रंग इंद्रधनुष्यासारखे असतात. त्या रंगांचा आस्वाद प्रत्येकाने घेतला पाहिजे. आहार, विहार आणि व्यायाम केला पाहिजे. मनसोक्त पर्यटन केले पाहिजे. निसर्गाच्या सा‌न्निध्यात आपण आपल्या चिंता, व्यथा, व्याधी, ताणतणाव विसरून जातो. जे करायचं राहून गेलं ते ही आपण आनंदासाठी करू शकतो. शेरोशायरीच्या माध्यमातून जीवनाचे अनेक पैलू डॉ. पवार यांनी विनोदी शैलीत उलगडून श्रोत्यांना मंत्रमुगध केले.

पायात काटे रुतून बसतात, हे अगदी खर असतं, आणि फुले उमलून येतात, हे काय खरं नसतं? या मंगेश पाडगावकरांच्या ओळी सांगून जगायचं कसं याच रहस्य त्यांनी सांगितलं. जवळपास दोनशे श्रोत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या प्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस प्राचार्य पवारांच्या उपस्थितील साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. चिंतामण सावकार, यशवंत पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत:मधील उद्योजकाचा शोध घ्या

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुमच्यातल्या प्रत्येकात एक चांगला उद्योजक दडला आहे. उद्योजकतेमधील क्षमता समजावून घ्या. आपल्यातील क्षमतांचा पूर्ण वापर करण्याची संधी उद्योजकता माणसाला देते. इतर कुठलाही पर्याय ही संधी तुम्हाला देत नाही. माणूस अखेरपर्यंत त्याच्यात दडलेल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करतच नाही. त्याच्या याच नकारात्मक कृतीमध्ये त्याचे अपयश दडलेले असते. त्यावर मात करा अन् स्वत:तील चांगल्या उद्योजकाला प्रोत्साहन द्या, असा सूर करिअर विषयक चर्चासत्रातून उमटला.

जागर मनाचा आणि सोहम क्लासेस यांच्यावतीने ‘करिअरच्या अलिकडे आणि पलिकडे’ या करिअरविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शंकराचार्य न्यास येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी करिअर समुपदेशक शंतनू गुणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. तर उद्योजक अश्विन कंडोई व डॉ. महेश संघवी यांच्याशी मुलाखतकार गिरीश पगारे यांनी साधलेल्या संवादातून करिअरचे मंत्र उलगडत गेले.

यावेळी गुणे म्हणाले, ‘विद्यार्थी दशेपासूनच आपण आपले ध्येय निश्चित करण्यावर भर द्यायला हवा. अलिकडे देशभरात कॉर्पोरेट क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रूजते आहे. अशावेळी देश विदेशातून डोळे दीपवून टाकणारी गुंतवणूक उच्चशिक्षित व बुध्दिमान युवकांना नोकरीच्या चांगल्या संधी देत आहेत. या स्थितीत उच्च पॅकेजची नोकरी म्हणजे करिअर अशी व्याख्या करून तरूण भर उमेदीत त्यांचे आयुष्य पणाला लावून देतात. मात्र, या वळणावर या क्षेत्रातील धोके लक्षात घेऊन आपण उद्योजकतेचा पर्याय निवडू शकतो. हा पर्याय तुमच्या आयुष्याला सुरक्षितता प्रदान करून जाईल. केवळ तुमचे वैयक्तिक आयुष्यच नाही, तर तुमच्या सोबतीला अनेकांच्या आयुष्याची चांगली घडी बसविण्याची क्षमताही उद्योजकतेत दडली आहे. याशिवाय येणाऱ्या नव्या पिढ्यांनाही तुम्ही उद्योजकतेचा मोठा वारसा देऊन जातात असा मुद्दा मांडतानाच गुणे यांनी यशस्वी उद्योजकतेसंदर्भात उदाहरणेही मांडली.

अश्विन कंडोई यांनीही त्यांच्या मुलाखतीदरम्यान यशस्वी उद्योजकतेच्या टीप्स व उद्योग घडण्याचा प्रवास मांडला. तर डॉ. संघवी यांनी विद्यार्थ्यांना केवळ थिअरीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थीदशेतच आपापल्या क्षेत्रातील प्रात्यक्षिक अनुभवांचाही जगण्यासाठी आधार घ्या, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रास्ता रोको प्रकरणी चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

धुळे : धुळे तालुक्यातील मुकटी गावालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रविवारी (दि. २६) सुमो आणि ट्रक यामध्ये झालेल्या अपघातानंतर मुकटी गावातील ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली होती.

आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून, शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश केलेल्या जमावबंदीचे उल्लंघन करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांपैकी चाळीस जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी बी. बी. चौधरी यांनी फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात मुकटी येथील उमाकांत पाटील, सुदाम पाटील, हर्षल साळुंखे, शरद साळुंखे, भरत साळुंखे यांच्यासह अन्य जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images