Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

२५ लाखांचे फटाके जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर शिवारातील शिवाजीनगर येथील एका शेतात दडवून ठेवलेला तब्बल २५ लाख रुपये किमतीचा धोकादायक फटाक्यांचा साठा पोलिसांनी सोमवारी सांयकाळी जप्त केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरात पहिल्यांदाच एवढा मोठा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, पोलिस चौकशी करीत आहेत.

गंगापूर शिवारातील शिवाजीनगर येथील शेतात फटाक्यांचा मोठा साठा दडवून ठेवल्याची माहिती गंगापूर पोलिसांना समजली. त्यानुसार, पोलिसांनी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एस. देवीकर यांच्या पथकाने राजाराम पाटील यांच्या शेतात छापा मारला. यावेळी पोलिसांना शेतात दडवून ठेवलेला तब्बल २५ लाख रुपये किमतीचा साठा आढळून आला. पोलिसांनी लागलीच हा मुद्देमाल जप्त करीत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. या अधिकाऱ्यांनी सर्व साठ्याचे परीक्षण करून आपला अहवाल ​दिला. शहरात फटाक्यांचा अवैध साठा ​आणि विक्रीस बंदी असून, छोट्या विक्रेत्यांना विकण्यासाठी फटाके आणण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. फटाक्यांचा अवैध साठा आणि विक्री ही शहरातील बऱ्याच वर्षांपासूनची समस्या आहे. या प्रकरणी थेट हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या बाबात सुप्रीम कोर्टाने देखील मार्गदर्शक तत्त्व आखून दिली आहे. मात्र, या नियमांची शहरात सर्रास पायमल्ली होते. या पार्श्वभूमीवर शहरालगत मोठा साठा करून त्याचा आवश्यकतेनुसार पुरवठा केला जात असावा. दरम्यान, या प्रकरणी शेतमालकाशी कोणताही संपर्क झाला नसून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देवीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापती, उपसभापतींची आज निवड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाभरातील पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांची मंगळवारी निवड होत आहे. निवडून आलेल्या सदस्यांमधून नूतन सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे. तालुक्यातील ग्रामीण राजकारणात ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीकडे लागले आहे. ज्या ठिकाणी बहुमत आहे तेथे पक्ष कुणाला उमेदवारी देतो यासाठी सोमवारी उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. तर ज्या ठिकाणी रस्सीखेच होती तेथे शेवटच्या क्षणापर्यंत सदस्य एकमेकांकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यातील पंचायत समितीत शिवसेनेचे ६० सदस्य निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ३२ तर भाजपाचे २७ सदस्य निवडून आले आहेत. पंधरा ठिकाणी होणाऱ्या या निवडणुकीत १० ठिकाणी स्पष्ट बहुमत आहे. तर चार ठिकाणी कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे तेथे तडजोडीचे राजकारण करून सभापतीपद राखण्यासाठी चढाओढ होती. सात तालुक्यांत शिवसेनेचा सभापती व उसभापती होणार आहे. तर तीन ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्याची चिन्हे आहेत. माकपला सुरगाणाबरोबरच त्र्यंबकेश्वरची सत्ता मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १५ पंचायत समित्यांमधून शिवसेनेचे ७ ठिकाणी सभापती होणार आहेत. त्यात नांदगाव, येवला, सिन्नर, निफाड, पेठ, दिंडोरी, इगतपुरी येथे स्पष्ट बहुमत आहे. तर राष्ट्रवादीकडे कळवण, नाशिक व माकपचे सुरगाणा, तर भाजपकडे सटाणा येथे स्पष्ट बहुमत आहे. मात्र, मालेगावमध्ये भाजप, देवळ्यामध्ये राष्ट्रवादीला संधी आहे. त्यात चांदवड येथे दोघांना समान संधी आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व जण एकत्र येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीला गरज ‘थर्ड पार्टी ऑडिट’ची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर व अंबड येथे दिलेल्या भूखंडांचे गैरप्रकार चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. एकीकडे नवीन उद्योग नाशिकला यावे यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे सातपूर येथील ११८१ व अंबड औद्योगिक वसाहतीतील १६०१ भूखंडात नेमके चाललेय काय हे सांगण्यासाठी आता थर्ड पार्टी ऑडिट करण्याची वेळ आली आहे.

एमआयडीसीने ज्या उद्देशासाठी भूखंड दिले त्याचा वापर काही उद्योजक करीत नसल्याची बाब समोर आली आहे. या भूखंडांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणावरूनच भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला असून, त्याची माहिती आता एमआयडीसी गोळा करीत आहे. दुसरीकडे हाच प्रश्न उद्योजक इंदरपालसिंग साहनी यांनी उपस्थित करून एमआयडीसीकडून भूखंड वाटपात अनियमिततेचे आरोप केला. त्यानंतर उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी त्यावर पलटवार करीत साहनी यांनी केलेल्या गैरप्रकारचे पितळ उघडे पाडले. त्यानंतर उद्योजक राजेंद्र छाजेड यांनीही काही उद्योजकांनी पैशाच्या बळावर १५ ते २० भूखंड खोटे प्रकल्प अहवाल सादर करून पदरात पाडून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यात त्यांनी हेच भूखंड आज दरमहा भाडे आकारून लहान उद्योजकांना दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एमआयडीसी आहे त्याच प्लॉटमध्ये जर असे उद्योग चालत असतील, तर नवीन उद्योगांसाठी सरकार कोणत्या तोंडाने नवीन जागा देईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारवाईचा अभाव

कोणताही विषय एमआयडीसी गांभीर्याने घेत नसल्याचे अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. एमआयडीसीमधून कागदपत्र गहाळ झाल्यानंतर एमआयडीने पोलिस स्थानकात केवळ पूर्तता म्हणून तक्रार केली, पण पुढे याप्रकरणात कोणतीच कारवाई केली नाही. त्याचप्रमाणे साहणी प्रकरणातही नोटीस पाठवून एमआयडीसीने दीड कोटीची नोटीस पाठवली पण पैसे न भरल्यानंतर तो भूखंड ताब्यात घेतला नाही.

पारदर्शकता हवी

मुंबईत मेमध्ये होणाऱ्या मेक इन नाशिक कार्यक्रमात नाशिकचे औद्योगिक महत्त्व सांगण्यासाठी एमआयडीसीने प्रेझेन्टेशन तयार केले आहे. पण त्याअगोदरच प्लॉट गैरवापरच्या विषयावर तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला जाताना एमआयडीसीने पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे.

एमआयडीसीची भूमिका बोटचेपी

विशेष म्हणजे एमआयडीसीने घेतलेली बोटचेपी भूमिकासुध्दा नाशिकच्या विकासाला पुरक नसल्याचा रोष व्यक्त होतांनाचे चित्र आहे. या प्लॉटबाबत असलेली अनियमितता दूर करण्यासाठी एमआयडीसीला सर्व्हे करून अहवाल तयार करण्याचे आदेश दिल्यानंतरही गेल्या महिनाभरात पुरेसे सर्व्हअर नसल्याचे कारण देत हा अहवाल लांबवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे आज सत्तारोहण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर व उपमहापौर पदाची आज, मंगळवारी (दि. १४) निवडणूक होत असून, या निवडणुकीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. भाजपकडून महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी, तर काँग्रेसकडून आशा तडवी रिंगणात आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपकडून प्रथमेश गिते तर राष्ट्रवादीकडून सुषमा पगारे रिंगणात आहेत.

भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने भानसी व गिते यांचा विजय निश्चित असून, मंगळवारी त्यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, गोदाकाठी प्रथमच कमळ फुलल्याने महापौरपदाचा सोहळा ऐतिहासिक करण्याची तयारी भाजपने केले आहे. त्यासाठी शहरात भाजपकडून मोठे शक्त‌िप्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी प्रदेशपातळीवरील काही नेतेही हजेरी लावण्याची शक्यता आहे. सोबतच पारदर्शक कारभाराची शपथही घेतली जाणार असून, शहर हिताच्या काही घोषणा भाजपकडून केल्या जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला १२२ पैकी ६६ जागांवर विजय मिळाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पालिकेवर प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली असून, भाजपचाच महापौर व उपमहापौर निश्चित आहे. पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत १५ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे नवीन महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ही १४ मार्च रोजी होत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता हा निवडणुकीचा कार्यक्रम होणार असून, पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. हे काम पाहणार आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, त्यानंतर मतदानाला सुरुवात होणार आहे. महापौर व उपमहापौरपदासाठी हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. एक वाजेपर्यंत ही निवडप्रक्रिया संपणार आहे.

भाजपतर्फे महापौर पदासाठी सलग पाचव्यांदा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी या उमेदवार आहेत. तर उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेले माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते रिंगणात आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महापौरपदासाठी काँग्रेसकडून आशा तडवी, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे रिंगणात आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे तर शिवसेना, मनसे तटस्थ राहणार आहेत. त्यामुळे भानसी व गिते यांच्या निवडीची औपचारिकता शिल्लक असून, मंगळवारी ती पूर्ण होणार आहे.

रामभूमीतील पहिले सत्तारोहण

आतापर्यंत शिवसेनेसोबत दुय्यम भूमिकेत असलेल्या भाजपला महापालिकेत प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे रामभूमीतला हा पहिलाच सत्तारोहण सोहळा संस्मरणीय करण्याची तयारी भाजपने केली आहे. या सोहळ्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रदेशपातळीवरील संघटनात्मक नेते उपस्थित राहणार आहेत. पंचवटीतल्या स्वामी नारायण मंगल कार्यालयात सर्व नगरसेवक एकत्र जमणार असून, तेथून भगव्या रंगाचा पोषाख करून सर्व नगरसेवक भव्य रॅलीने रामायण बंगल्यावर दाखल होतील. तेथून पायी सभागृहात पोहचणार असून, पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. ढोल, ताशे तसेच फटाक्यांच्या आतशबाजीत रामायण बंगल्यावर भगवा झेंडा फडकवला जाणार आहे.

सेना-मनसे तटस्थ

भाजपकडून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, पक्षाचा आदेश असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अर्ज माघारी घेण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे निवडणूक होणार आहे. परंतु, या निवडणुकीत शिवसेना व मनसे तटस्थ राहणार आहेत. शिवसेनेचे ३५ आणि मनसेचे ६ असे तब्बल ४१ नगरसेवक मतदानाच्या वेळेस अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध आघाडी असा थेट सामना होणार असल्याने, भाजपचा एकतर्फी विजय होणार आहे.

नगरसेवकांना पारदर्शकतेचे धडे

पारदर्शक कारभारावरून मुंबई महापालिकेत शिवसेनेला घेरणारा भाजप नाशिकमध्ये पारदर्शक कारभाराची सुरुवात पहिल्याच दिवसापासून करणार आहे. सत्तारोहणानंतर लगेच भाजपच्या नगरसेवकांना पारदर्शक कारभाराचे धडे दिले जाणार आहेत. तसेच पालिकेच्या कारभारात रुढ असलेल्या काही बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. पहिल्या महासभेचे इतिवृत्त दुसऱ्या महासभेत लगेच मंजूर केले जाणार आहे. तसेच पहिल्या दिवशी शहरहिताच्या महत्वपूर्ण घोषणा भाजपकडून केल्या जाणार असून, त्यांच्या अंमलबजावणीचे फर्मान काढले जाणार आहे.


पालिकेतील संख्यांबळ

भाजप- ६६

शिवसेना- ३५

काँग्रेस - ६

राष्ट्रवादी- ६

मनसे- ५

अपक्ष- ३

आरपीआय- १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डफाच्या नादावर नाचले वीर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रात प्रमुख असलेल्या सणांपैकी धूलिवंदन हा सण उत्साहात साजरा झाला. सकाळी बालगोपाळांनी होळीची राख एकमेकांच्या अंगाला फासून धूलिवंदन साजरे केले अन् दिवसभर रंग खेळून धमाल केली. सायंकाळी गंगाघाटावर पारंपरिक डफाच्या नादावर वीर नाचविण्यात आले.

दुपारी बुधवार पेठेतून दाजीबा वीर निघाल्यानंतर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घरातील वीरांचे टाक खोबऱ्याच्या वाटीत घेऊन वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. विविध वेशभूषा केलेल्या बालगोपाळांनी गोदाघाटाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. वाजतगाजत आणलेल्या देवाच्या टाकांना रामकुंडावर विधिवत स्नान घालून होळीभोवती नाचविण्यात आले.

बाशिंगे वीराचे आकर्षण

होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला मानाच्या बाशिंगे वीरांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. यामागे आख्यायिकाही असून, त्यानुसार हे बाशिंगे वीर नवसाला पावणारे असल्याने त्यांची घरोघरी मनोभावे पूजा केली जाते. बुधवार पेठेतून दुपारी ४ वाजता बाशिंगे वीरांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर सुवासिनींनी वीरांची मनोभावे पूजा करीत दर्शन घेतले. यावेळी संबळ वाद्याच्या तालावर वीर नृत्य करीत असतो आणि त्याच्यापुढे भाविकही नृत्य करीत असतात. दारापुढे वीर येताच महिला त्यांचे हळद-कुंकू लावून औक्षण करतात आणि पायावर पाणी टाकून दर्शन घेतात.

असे होतात विधी

बाशिंगे वीराची मिरवणूक बुधवार पेठेतून निघून दूध बाजार, मेनरोड, रविवार कारंजामार्गे रामकुंडावर जाते. तेथे विधिवत पूजा करण्यात येते आणि तेथून पुन्हा परतीच्या मार्गाने बुधवार पेठेत येते. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. बाशिंगे वीराला देवाचे वस्त्र परिधान केल्यानंतर त्याच्या डोक्यावर देवाचा मुकुट चढविला जातो आणि आकर्षकरीत्या बाशिंग बांधले जाते. डोक्यावरील मुकुट आणि बाशिंग दोरखंडाच्या सहाय्याने कमरेच्या भोवती बांधलेले असते. दोन्ही हातांच्या मनगटांना आणि गळ्यात फुलांच्या माळा असतात. तसेच, अंगाला नवरदेवाप्रमाणेच हळद लावण्यात आलेली असते. मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून हा वीर नृत्य करीतच मार्गक्रमण करीत असतो. मध्यरात्रीनंतर मिरवणुकीचा समारोप होतो. बऱ्याचदा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत ही मिरवणूक सुरू राहते.

डफाची परंपरा कायम

गांधी तलाव, रामकुंड, गंगाघाटावर डफ वादकांना सोमवारी चांगली मागणी होती. गंगाघाटावर अनेक डफवादकांनी स्वयंस्फूर्तीने हजेरी लावून आपली कला सादर केली. डफाच्या तालावर वीरांनीही ताल धरला. तुटपुंजी बिदागी मिळूनही वादकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.

‘जय मल्हार’ची क्रेझ

मराठी मालिकांमधील पात्रांप्रमाणे वेशभूषा करण्याकडे अनेकांचा कल होता. जय मल्हार मालिकेतील खंडोबाची वेशभूषा अनेक लहानग्यांनी केली होती. त्याचप्रमाणे भगवान शंकर, गणपती, राम, हनुमान, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज आदींच्या ऐतिहासिक वेशभूषा केलेले वीर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.त शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषेदच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी सोमवारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचे वृत्त असून, यात आघाडीचे सूत्र ठरवण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर जाण्याचे संकेत दिल्यानंतर राजकीय घडामोडी वेगवान झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे २५ व राष्ट्रवादीचे १८ सदस्य निवडून आल्यामुळे दोन्ही पक्षांचे सदस्य एकत्र आल्यास ही संख्या ४३ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री नाशिकमध्ये येण्याच्या आत शिवसेनेने ही संधी साधत राष्ट्रवादीशी बोलणी केल्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरण बदलल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवडणूक झाल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे १८ व भाजपचे १५ सदस्य एकत्र येण्याची शक्यता होती. त्यानंतर माकप व अपक्षांशी बोलणी करण्यात आली होती, तर दुसरीकडे शिवसेनेने काँग्रेसबरोबर बोलणी करून सत्ता स्थापण्याचे संकेत दिले होते. शिवसेनेचे २५ व काँग्रेसच्या ८ सदस्यांबरोबरच अपक्ष व माकपच्या सदस्यांची व्यूहरचना आखण्यात आली होती. या दोन्ही घडामोडी झाल्यानंतर मुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला, तर अर्थसंकल्पीय अधिवशेनात भाजपशी जुळून घेतल्यामुळे पुन्हा भाजप व शिवसेनेच्या आघाडीची चर्चा सुरू झाली; पण या तिन्ही शक्यतेला छेद देत जिल्हा परिषदेतील दोन्ही मोठ्या पक्षांनीच आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी अधिकृतपणे त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

असे आहे बलाबल

शिवसेना २५

राष्ट्रवादी कॉँग्रेस १८

भाजप १५

कॉँग्रेस ०८

माकप ०३

अपक्ष ०४

एकूण ः ७३

संभाव्य समीकरणे

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड २१ मार्च रोजी

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बहुमतासाठी हवेत ः ३७ सदस्य

शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आल्यास ः ४३ सदस्य

भाजपचे काय आहेत मनसुबे?

एकीकडे राष्ट्रवादी व शिवसेनेचे एकत्र येण्याचे संकेत मिळाल्यानंतर भाजपनेही राष्ट्रवादीला बरोबर घेण्यासाठी थेट मुंबईत वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत राष्ट्रवादीला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. यात राष्ट्रवादी व भाजप एकत्र आल्यास राष्ट्रवादीला सभापती व भाजपकडे उपसभापती देण्याचे सूत्रही देण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन मंगळवारी दिवसभर नाशिकमध्ये तळ ठोकून असतील. त्यामुळे ते काय डावपेच आखतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काहीही होऊ शकते

जिल्हा परिषदेत एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे रोज नवनवीन गणिते मांडली जात असून, आघाडी व बोलणी होत आहे. त्यामुळे शेवटपर्यंत काहीही होऊ शकते असे संकेतही एका राजकीय नेत्याने दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराजांच्या लूकची तरुणाईला भुरळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पाश्चात्त्यांचे, चित्रपट कलाकारांच्या स्टाइलचे अनुकरण करणाऱ्या युवा पिढीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘लूक’चेही मोठे गारूड आहे. त्यामुळेच शहरी असो की, ग्रामीण भाग, तरुणांमध्ये शिवाजी महाराजांसारखी दाढी आणि कपाळावर चंद्रकोर असा लूक ठेवण्याकडे कल वाढत आहे. उद्या शिवजयंती असल्याने अनेक तरुणांनी महाराजांसारखी दाढी कोरून घेतली आहे.
फिल्मी सिताऱ्यांसारखी आपलीही हेअर स्टाइल असावी यासाठी तरुण पिढी आग्रही असतेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा ट्रेण्‍ड कमी होत असून महाराजांसारखी दाढी वाढवण्याकडे कल दिसून येत आहे. उद्या शिवजयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातल्या अनेक सलूनमध्ये अशा प्रकारची दाढी कोरण्यासाठी तरुणांच्या रांगा लागल्या आहेत. अचानक वाढलेल्या या ट्रेण्डमुळे सलून व्यावसायिकदेखील चक्रावून गेले असून, महाराजांसारखी दाढी कोरण्यात ते मश्गूल आहेत. अनेकांना शिवाजी महाराजांच्या रुपाची भुरळ पडली आहे. त्यांच्यासारखे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्यासारखा पेहराव करण्यातच आजची तरुणाई पुढे जाताना दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीचे सत्र थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात घरफोड्यांपाठोपाठ दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकींची चोरी झाल्याची बाब समोर आली असून, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोमनाथ बाळू पवार (रा. जुना कथडा) हा युवक १ मार्च रोजी पंचवटी कॉलेजमध्ये गेला होता. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची पल्सर (एमएच १५ डीक्यू ३४१७) चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.

सिडकोतील पवननगर भागात राहणारे योगेश रामचंद्र परदेशी यांची दुचाकी २ मार्च रोजी सकाळी गोळे कॉलनी येथून चोरीला गेली. अतुल अकौटन्सी या क्लासेसच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी (एमएच १५ सीबी ३९९८) चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

वाहनचोरीची तिसरी घटना नाशिकरोड उड्डाणपुलाखाली घडली. पळसे येथील गोरक्षनाथ बाबाजी सरोदे २९ जानेवारी रोजी कामानिमित्त नाशिकरोड येथे आले होते. उड्डाणपुलाखालील सुयोग टायर या दुकानासमोर त्यांनी लावलेली दुचाकी (एमएच १५ सीक्यू ७२१९) चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

चोरीची नोंद १५ दिवसांनी

वाहनचोरीच्या घटनांची तब्बल १५ दिवसांनी नोंद होत असून, क्राईम रेट कमी ठेवण्याचा पोलिस प्रयत्न करीत असल्याचे यामुळे स्पष्ट होते. गुन्हा दाखल नसल्याने तपास होत नाही. १५ दिवस चोरट्यांना मिळत असल्याने चोरीला गेलेली दुचाकी पुन्हा केव्हा परत मिळेल, याची शाश्वती दिसून येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन वाळू घाटांसाठी आज होणार लिलाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौण खनिजद्वारे मिळणाऱ्या महसुलाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करता यावे, यासाठी जिल्ह्यातील नवीन चार वाळू घाटांचे मंगळवारी (दि. १४ मार्च) लिलाव होणार आहेत. या लिलावातून जिल्हा प्रशासनाला ४० लाख रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

ई टेंडर आणि ई ऑक्शन प्रक्रियेद्वारे राबविल्या जाणाऱ्या वाळू लिलावांकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याचे यापूर्वी वारंवार निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील १५ पैकी नऊ घाटांचेच लिलाव झाले असून, सहा घाटांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली. त्यामध्ये निफाड तालुक्यातील तामसवाडी, सायखेड्यातील दोन, जळगाव एक आणि दोन, बागलाण तालुक्यातील धांद्री आणि मालेगाव तालुक्यातील वडनेर या घाटांचा समावेश आहे.

यंदा प्रथमच नाशिक तालुक्यातील लहवित येथील दारणा नदीपात्रातील ७०७ ब्रास वाळू घाटासाठी प्रशासनाने चार लाख ९४ हजार ९०० रुपये किंमत ठेवली आहे. माडसांगवी येथील वाळू घाटासाठी ५ लाख ५६ हजार ५०० रुपये बोली रक्कम ठेवली आहे. या घाटावर ७९५ ब्रास वाळूचा उपसा करता येईल असा प्रशासनाचा दावा आहे. कळवण तालुक्यातील गोसारणे येथील गिरणा नदीपात्रातील ५३० ब्रास वाळू उपशासाठी ३ लाख ७९ हजार ४८० रुपये रक्कम मिळणे प्रशासनाला अपेक्षित आहे. तर देवळा तालुक्यातील लोहणेर येथील गिरणा नदीपात्रातील १ हजार ६४३ ब्रास वाळू घाटाकरिता ठेकेदाराला २४ लाख ६७ हजार ७८६ रुपये प्रशासनाला द्यावे लागणार आहेत. या चारही वाळू घाटांच्या लिलावातून ३८ लाख ९८ हजार ६६६ रुपये रक्कम मिळेल, अशी प्रशासनाला आशा असून, ठेकेदार कितपत प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पर्यावरण विभागाच्या अटी आणि शर्थींना अनुसरून ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ठेकादारांना वाळूचे उत्खनन करता येणार आहे.

वाळूचे घाट आणि बोली रक्कम

लहवित - ४ लाख ९४ हजार ९००, माडसांगवी - ५ लाख ५६ हजार ५००, गोसारणे - ३ लाख ७९ हजार ४८०, लोहणेर - २४ लाख ६७ हजार ७८६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना औरंगाबाद हायवेवरील तपोवन क्रॉसिंग रोड येथे घडली. या प्रकरणी परप्रांतीय ट्रक चालकाविरुध्द पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ पंढरीनाथ शिंदे (वय ६१, रा. चेतनानगर, राणेनगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिंदे दिंडोरीरोडकडून हिरावाडीमार्गे द्वारकाकडे जात असताना अपघाताची घटना घडली. हायवेवरून दुचाकीने (एमएच १९ एजे ४०८९) जाणाऱ्या शिंदे यांना तपोवन क्रॉसिंग येथे आडगावकडून नाशिककडे भरधाव येणाऱ्या मालट्रकने (एमएच १८ एसी ७७८७) जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार शिंदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भूषण शिंदे यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक इम्रानखान जब्बार खान (रा. सोमखेडी, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याच्याविरुध्द पंचवटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याने मागितली इच्छामरणाची परवानगी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या महिन्यात शेतातील उभा कांदा जाळणारे नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी आता सरकारच्या अनास्थेमुळे मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. नुकसानभरपाई, शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल तर इच्छामरणाला तरी परवानगी द्यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

नगरसूल येथील शेतकरी डोंगरे यांनी गेल्या महिन्यात कांदा भावाच्या घसरणीमुळे उभे काढणीला आलेला पाच एकर कांदा पेटवून दिला होता. या घटनेनंतरही सरकारकडून कांद्याच्या भावाबाबत दखल घेतली जात नसल्याने सरकारच्या आडमुठेपणाच्या धोरणाला कंटाळून त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. डोंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे, की लहानपणी वडिलांची अचानक दृष्टी गेली, तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आहे. नांदगाव तालुक्यातील कोरडवाहू शेतीत उदरनिर्वाह होत नसल्याने डोंगरे कुटुंब सुमारे वीस वर्षांपूर्वी नगरसूल येथे नातेवाइकांच्या आश्रयाला आले. नगरसूल येथे नातेवाइकांची असलेली जमीन वाट्याने व काही शेतकऱ्यांची शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेतीव्यवसाय सुरू केला. सततचा दुष्काळ, नैसर्गिक हानी यामुळे शेती व्यवसायात फारसे उत्पन्न मिळाले नाही. मात्र, उदरनिर्वाहासाठी शेती हाच एक पर्याय असल्यामुळे शेतीवरच उदरनिर्वाह भागवत आहोत. मात्र, कधी दुष्काळ तर कधी गारपीट, तर कधी कोसळलेल्या शेतमालाचे बाजारभाव यामुळे मी व माझे कुटुंब कर्जबाजारी झालो. गेल्या वर्षी येवले तालुक्यात दुष्काळ पडल्याने पोटा पाण्यासाठी कन्नड तालुक्यात जाऊन भाड्याने जमीन घेऊन आठ एकर उन्हाळ कांदा लागवड केली. निसर्गाच्या कृपेने कांदा पीक चांगले येऊन उत्पादनही १०० टक्के निघाले. मात्र, कांदा बाजारात नेण्यापूर्वीच भाव घसरले. त्यामुळे संपूर्ण कांदा चाळीतच सडला व सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. गेल्या महिन्यात कांदा पेटवून दिला. इतके घडूनही राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील किंवा पक्षातील एकही पदाधिकारी धीर देण्यासाठी आला नाही. नुकसानभरपाई, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नसेल तर मला इच्छामरण घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी याचना डोंगरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीखत न देणाऱ्या बिल्डरला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सदनिकेचा ताबा देऊनही हस्तांतरण न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दणका देत दोन महिन्यांत खरेदी खत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिले आहेत. त्याचप्रमाणे सेवेत कमतरता केल्याचा ठपका ठेवत शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व तक्रार अर्जाचा खर्च पाच हजार असा एकूण १५ हजारांचा दंडही ठोठावला.

मालेगाव येथील रवींद्र मत्सागर व लोकश्वरी रवींद्र मत्सागर यांनी प्रेमसुख मिश्रीलाल चोरडिया, जिनेंद्र चोरडिया, जितेंद्र चोरडिया यांच्याविरुध्द ग्राहक न्यायमंचात तक्रार केल्यानंतर हा निकाल देण्यात आला. या तक्रारीत मत्सागर यांनी म्हटले आहे, की मी ४३ लाखांला फ्लॅट विकत घेतला. त्याचा विक्री करारनामा दुय्यम निबंधकांकडे नोंदवण्यात आला. करारनाम्यानुसार चोरडिया यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. पार्किंगसाठी दीड लाख इतकी वाढीव रक्कम घेतलेली आहे. त्याचप्रमाणे १४८० चौरसफूट इतके क्षेत्र न देता ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोडिंग देऊन प्रत्यक्षात १३३२ क्षेत्र देऊन ५ लाख ६५ हजार ७२ रुपयांची रक्कम जादाची वसूल केली आहे. स्टॉप गॅप अॅरेजमेंट म्हणून १० लाख ६ हजार रक्कमदेखील स्वत.च्या सोयीसाठी घेतली. मात्र त्यानंतर ती परत केली नाही. सदनिकेचा ताबा देऊनही हस्तांतरण केले नाही. त्यामुळे जादाची वसूल केलेली १७ लाख २१ हजार ७२ रुपये परत मिळावे व एक महिन्याच्या आत अंतिम हस्तांतरण दस्त मिळावे, अशी मागणी केली.

या तक्रारीनंतर युक्तिवाद करताना चोरडियांर्फे सांगण्यात आले, की आम्ही बांधकाम व्यावसायिक नाही. आमच्या प्लॉटवर सदनिका बांधून त्यांच्या वापरासाठीच्या सदनिकांव्यतिरिक्तच्या सदनिका विकलेल्या आहेत. सदनिकेची किंमत ४३ लाख ठरली होती. ती मत्सागर यांनी एकरक्कमी दिलेली नाही. त्याचप्रमाणे अतिरिक्त सुविधा हव्या म्हणून त्यांनी सात लाखांचा स्वतंत्र करारनामा केला आहे. पार्किंगसाठी दीड लाख रक्कम घेतली नाही. तसेच विक्री केलेल्या सदनिकेच्या व्यवहारात कोणतीही फसवणूक केलेली नाही. या दोन्ही बाजू ऐकून ग्राहक न्यायमंचाने निकाल दिला. चोरडिया यांनी दोन महिन्यांच्या आता खरेदीखत करून द्यावे व शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व तक्रार अर्जाचा खर्च पाच हजार असे एकूण १५ हजार अदा करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळेः रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धिंगाणा घातल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. त्यांच्या मारहाणीत डॉक्टर रोहन मामूनकर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्यानं, त्या फूटेजच्या आधारे पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा २० वर्षांचा तरुण दुचाकी अपघातात जखमी झाला होता. त्याला धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण तो वाचू शकला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय बिथरले आणि त्यांनी या मृत्यूचं खापर डॉक्टरांवर फोडत हॉस्पिटलमध्ये धुडगूस घातला. ऑपरेशन थिएटरमध्ये तोडफोड करत त्यांनी डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. त्यात डॉ. रोहन मामूनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.


या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉक्टरांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत निर्माण करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे तसेच डॉक्टरांवरील हल्ला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोलिसांनी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी नऊ जणांची रवानगी १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.


मारहाणीच्या घटनेनंतर स्थानिक डॉक्टरांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. या मारहाणीचे पडसाद राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये उमटू लागलेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाई निवारणासाठी वॉटर सिक्युरिटी प्लॅन

$
0
0

नाशिक विभागातील ४४५६ गावांचा समावेश

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पाणीटंचाईतून मुक्तता मिळविण्यासाठी राज्याच्या पाणीपुरवठा खात्यामार्फत जलस्वराज्य अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक टंचाईग्रस्त गावांचा शोध घेऊन त्या गावांसाठी येत्या वर्षभरात वॉटर सिक्युरिटी प्लॅन तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. नाशिक विभागातील ४४५६ विहिरींना निरीक्षण विहिरी म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने मान्यता दिली असून, या विहिरींचे वॉटर ऑडिट प्रत्येक महिन्याला केले जाणार आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दरवर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण होते. अशा गावांना शासन टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरवते. त्यामुळे शासनाने जलस्वराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच गावांतील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर शास्त्रीय पद्धतीने उतारा शोधण्याचे निश्चित केले आहे.

तालुकास्तरावर प्रशिक्षण

निरीक्षण विहिरींच्या पाण्याचे ऑडिट करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात विभागातील ५४ तालुक्यांतील प्रत्येक गावातील जलसुरक्षकाला निरीक्षण विहिरीच्या पाण्याच्या पातळीची नोंद घेण्याची पद्धती, त्याची विहित रजिस्टरमध्ये करावयाची नोंद व हा संपूर्ण डाटा जिल्हास्तरावर पाठविणे, या कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वस्तुस्थिती होणार उघड

निरीक्षण विहिरींची संख्या वाढल्याने आता पाण्याच्या उपलब्धतेची खरी माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे टंचाई असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. शिवाय नंतरच्या काळात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वॉटर सिक्युरिटी प्लॅनही तयार केला जाणार आहे.

एक गाव एक निरीक्षण विहीर

प्रत्येक गावात कमीतकमी एक निरीक्षण विहीर असे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक विभागात ४४५६ इतक्या निरीक्षण विहिरी भूजल सर्वेक्षण विभागाने निश्चित केल्या आहेत.

निरीक्षण विहिरींच्या कमी संख्येमुळे अडचण

भूजल पातळी निश्चित करण्यासाठी नाशिक विभागात आतापर्यंत केवळ ७२१ विहिरींना मान्यता होती. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या निरीक्षणांती काढलेले निष्कर्ष व प्रत्यक्ष स्थिती यात मोठी तफावत निर्माण होत असे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवितांना नियोजनापेक्षा जास्त खर्च होत असे. या ७२१ विहिरींना १९७५ साली मान्यता दिलेली होती.

नाशिक विभागातील निरीक्षण विहिरींची संख्या केवळ ७२१ होती. आता ही संख्या ४४५६ इतकी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील वॉटर ऑडिट करणे सोपे जाणार आहे. नेमकी वस्तुस्थिती समजून गावनिहाय वॉटर सिक्युरिटी प्लॅनही तयार करता येईल. त्यासाठीचे प्रशिक्षण तालुकास्तरावर येत्या महिन्यात दिले जाणार आहे.”

- अनिल वाघमारे, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळांमधील भ्रष्टाचाराला चाप

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

आदिवासी आयुक्तालयाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शालेय साहित्यासह वस्तूंची थेट खरेदी आता बंद होणार आहे. या वस्तूंच्या बदल्यात एकत्रित रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा केली जाणार आहे. १५ जूनला शाळेत प्रवेशोत्सव होणार असून, त्याच दिवशी या सर्व वस्तू शाळेत आणणे विद्यार्थी व पालकांना बंधनकारक करण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे. पैसे खात्यात देऊनही वस्तू खरेदी न करणाऱ्या विद्यार्थ्याला थेट प्रवेश नाकारण्याचाही इशारा विभागाने दिला आहे. या निर्णयामुळे विभागातील जवळपास तीनशे कोटींच्या खरेदीतील भ्रष्टाचाराला चाप लागणार आहे.

आदिवासी विभाग आणि भ्रष्टाचार असे समीकरण झाले असून, कोणत्याही योजना असो वा खरेदी असो, त्यात भ्रष्टाचार हा ठरलेलाच असतो. लोकप्रतिनिधी, ठेकेदार व बाबूंमधील संगनमतामुळे या योजना व त्यांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहोचतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध खरेदीमुळे आदिवासी विभाग राज्यभर गाजत असतो. विविध योजनांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता थेट अनुदान हे लाभार्थ्याच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पहिली अंमलबजावणी आदिवासी विभागाने पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विभागाच्या ५३७ शासकीय आश्रमशाळा असून, त्यात जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दरवर्षी विभागाकडून जवळपास तीनशे कोटींच्या आसपास खर्च केला जातो.

या तीनशे कोटींतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश, स्वेटर, रेनकोट, बूट, मोजे या वस्तूंची थेट खरेदी केली जाते. या वस्तूंच्या खरेदीत दरवर्षी मात्र मोठा घोळ केला जातो. ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून संगनमताने यात मोठा गैरव्यवहार केला जातो. त्यामुळे दरवर्षी खरेदींमधील भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर वस्तू, तसेच सुविधा मिळत नाहीत. काही वेळेस तर न्यायालयाच्या वादात या खरेदी अडकून दोन ते तीन वर्षे विद्यार्थ्यांना साहित्यही मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी निधी असूनही वनवास येतो. त्यामुळे आदिवासी विभागाने या सर्व वस्तूंची खरेदी थेट न करता त्यांच्या बँक खात्यात देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आदिवासी आयुक्तालयाने हा प्रस्ताव तयार करून मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला असून, त्याला मंजुरी मिळणार आहे. या निर्णयाने भ्रष्टाचाराची साखळीच तुटून पडणार असून, विद्यार्थ्यांना वेळेवर साहित्य, तसेच वस्तू मिळणार असून, विभागाची बदनामीही थांबणार आहे.

खरेदीची नियमावली

एक मे रोजी आश्रमशाळांचा निकालाच्या दिवशी पालकांना शाळेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या शालेय साहित्य व वस्तूंची यादी दिली जाणार आहे. त्यानंतर एक जून रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर सर्व वस्तूंचे एकत्रित पैसे थेट जमा केले जाणार आहेत. पालकांनी १५ दिवसांत आपल्या पसंतीच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्यानंतर १५ जून रोजी प्रत्येक आश्रमशाळेत प्रवेशोत्सव होणार असून, त्या दिवशी या सर्व वस्तूंच्या खरेदीचे पुरावे मुख्याध्यापकांकडे सादर करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना या वस्तू आणल्या नाहीत तर प्रवेश नाकारला जाईल, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवीस वर्षांनी महापौर-उपमहापौर बिनविरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या आतापर्यंत सहा पंचवार्षिक निवडणुका झाल्या असून, गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौर व उपमहापौरपदाची निवडणूकही बिनविरोध होण्याची ही पहिलीच घटना घडली आहे.
आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत कुठल्याच पक्षाला मिळालेले नाही. २००२ मध्ये भाजप व शिवसेना युती अपवाद वगळता एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची संधी प्रथमच भाजपला लाभली आहे. आतापर्यंत शहराला चौदा महापौर मिळाले आहेत. पंधरावे महापौर व उपमहापौरपदासाठी बिनविरोध झालेली निवड ही या निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत झालेल्या सहा पंचवार्षिक निवडणुकांमध्ये प्रथमच असे झाले आहे. १९९२ मध्ये काँग्रेसच्या कै. शांताराम बापू वावरे यांच्या विरोधात त्यावेळी भाजपचे कै. बंडोपंत जोशी यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर दुसऱ्या वर्षी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे डी. जी. पेखळे यांनी निवडणूक लढविली होती. काँग्रेसच्या पंड‌ितराव खैरे यांच्या विरोधात भाजपचे कै. बंडोपंत जोशी व शिवसेनेचे शिवाजी निमसे यांनी निवडणूक लढविली होती. शहर विकास आघाडीचे कै. उत्तमराव ढिकले यांच्या विरोधात प्रकाश मते यांनी निवडणूक लढवली होती. १९९६ मध्ये काँग्रेसचे प्रकाश मते यांच्या विरोधात कै. उत्तमराव ढिकले यांनी निवडणूक लढवत त्यांना एकतर्फी आव्हान दिले होते. सन १९९७ मध्ये शिवसेनेच्या वसंत गिते यांच्या विरोधात काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील निवडणूक लढवली होती.
शिवसेनेच्या पाठिंब्यावर महापौरपदाची निवडणूक लढविलेले अशोक दिवे यांच्या विरोधात काँग्रेसचे राजेंद्र जाधव मैदानात होते. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा भोसले यांनी महापौर पदाची निवडणूक लढविली होती. २००२ मध्ये शिवसेनेचे दशरथ पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे त्र्यंबकराव गायकवाड यांनी निवडणूक लढविली होती. २००५ मध्ये बाळासाहेब सानप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार यांनी महापौर पदाची निवडणूक लढविली होती.
शिवसेनेच्या पाठिंब्यावर महापौर पदाची निवडणूक लढविलेल्या विनायक पांडे यांच्या विरोधात काँग्रेसचे उत्तमराव कांबळे यांनी निवडणूक लढविली होती. सन २००९ मध्ये शिवसेनेच्या नयना घोलप यांच्या विरोधात काँग्रेसच्या माया दिवे उभ्या होत्या. २०१२ मध्ये मनसेचे अॅड. यतीन वाघ यांच्या विरोधात माकपचे अॅड. तानाजी जायभावे उभे होते. तर अशोक मुर्तडक यांच्या विरोधात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविली होती.
यंदा प्रथमच महापौर पदावर विराजमान झालेल्या भाजपच्या रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या इतिहास नव्या इतिहासाची नोंद झाली आहे.

जिंदाबाद’च्या घोषणा

राधाकृष्णन् बी. यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. दहा वाजता भाजपचे सर्व नगरसेवक पंचवटीतील स्वामी नारायण मंदिरात एकत्र जमले. तेथे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना पारदर्शक कारभाराचे धडे दिल्यानंतर महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवक बसने रामायण बंगल्यावर दाखल झाले. अकरा वाजता भाजपचे सर्व नगरसेवक ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा देत सभागृहात दाखल झाले.

पदभारापूर्वीच राजीनामे

महापौर व उपमहापौरपदावर विराजमान होण्याआधीच भाजपने भानसी व गिते यांचे राजीनामे घेतले आहेत. महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचाच असल्याचे सांगत, पालकमंत्री महाजन यांनी दोघांकडून शंभर टक्के पारदर्शी कारभाराची अपेक्षा असल्याचे सांगून त्यांच्या कामात कुचराई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी दोघांनी राजीनामे दिल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी माध्यमांसमोरच राजीनामे फडकवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओळख नव्या महापौरांची...

$
0
0


• नाव- रंजना पोपटराव भानसी
•पत्ता- नाथकृपा, केतकी हौसिंग सोसायटी, दिंडोरी रोड म्हसरूळ, नाशिक
•जन्मतारीख- १९ जून १९६४
•जन्मस्थळ- पंचवटी, नाशिक
•शिक्षण- एस. एस. सी
•शाळा- श्रीराम विद्यालय पंचवटी

कौटुंबिक माहिती
•पती- पोपटराव बुधा भानसी (सेवानिवृत्त उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ )
•मुलगा- अतुल भानसी (पदवीधर)•मुली-
१. नीलिमा नवनाथ महाले (माजी आमदार धनराज महाले यांच्या पुतण्याशी विवाह)
२. पूनम उद्धव चौधरी (उध्दव चौधरी हे केंद्राच्या ह्युमन रिसर्च डिपार्टमेन्टमध्ये शास्त्रज्ञ आहेत)
•वडील- (कै.) कचरूभाऊ राऊत
•आई- (कै.) गंगूबाई राऊत
•बंधू-
१. विजय राऊत (माजी सरपंच, चेअरमन निगडोळ विविध कार्यकारी सोसायटी, दिंडोरी)
२. शांताराम राऊत (हेड मॅकेनिक, एसटी महामंडळ)
३. दिलीप राऊत (भाजप शहर उपाध्यक्ष, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता-सार्वजनिक बांधकाम विभाग)

आतापर्यंतचे महापौर
शांतारामबापू वावरे (१९९२- ९४)
पंडितराव खैरे (१९९४ ते ९५)
उत्तमराव ढिकले (१९९५ ते ९६)
प्रकाश मते (१९९६ ते ९७)
वसंतराव गिते (१९९७ ते ९८)
अशोक दिवे (१९९८ ते ९९)
डॉ. शोभा बच्छाव (१९९९ ते ०२)
दशरथ पाटील (२००२ ते ०५)
बाळासाहेब सानप (२००५ ते ०७)
विनायक पांडे (२००७ ते १०)
नयना घोलप (२०१० ते १२)
अॅड. यतीन वाघ (२०१२ ते १४)
अशोक मुर्तडक (२०१४ ते १७)
रंजना भानसी (२०१७)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहे दुरुस्त झालीच पाहिजेत!

$
0
0

नाट्यगृहे दुरुस्त झालीच पाहिजेत!

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने सुरू असलेल्या ‘मटा कॅम्पेन’मध्ये शहरातील नाट्यगृहांची सद्यःस्थिती असा विषय घेऊन रोजच एका नाट्यगृहाच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिराची दुरवस्था याद्वारे उघड झाल्यानंतर लगेचच त्याच्या कामाचे टेंडरही निघाले. त्याचप्रमाणे रावसाहेब थोरात सभागृह दुरुस्तीच्या मार्गावर आहे, इतरही सभागृहे लवकरच दुरुस्त केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. या कॅम्पेनविषयी सामान्य नागरिकाला काय वाटते, याविषयी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया...!

दुरुस्तीचा केला जावा ठराव

नाट्यगृहे हा विषय शहराच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यांची दुरुस्ती झालीच पाहिजे. महापालिकेने तसा ठरावा मंजूर करावा. कारण, शहरातील नागरिकांचे मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण म्हणजे नाट्यगृह असते. त्याची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे.

-दिगंबर देवढे

नाट्यगृहे म्हणजे जणू आत्माच

नाट्यगृहे हा शहरातील कला-संस्कृतीचा जणू आत्माच असतो. नाटक किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम बघणे ही लोकांची गरज असते, त्याशिवाय मनोरंजन होईलच कसे? त्यामुळे त्यांची दुरुस्ती तत्काळ केली पाहिजे. ‘मटा’ने हा विषय हाती घेतल्याबद्दल धन्यवाद.

-प्रदीप साळुंके

‘मटा कॅम्पेन’ सडेतोड

‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत नेहमीच नागरिकांच्या विषयाला हात घातला जातो. जेथे समस्या किंवा काही अडचण येते, तेथे बातमीच्या माध्यमातून ‘मटा’ उभा ठाकतो, हा नेहमीचा अनुभव आहे. आताही नाट्यगृहांची मालिका मी पाहतोय. हे कॅम्पेन सडेतोड झाले असून, नाट्यगृहे दुरुस्त करावीच लागतील.

-सागर पाटील

अपूर्णता मनाला खटकते

महाकवी कालिदास कलामंदिर हा आमच्या जवळचा विषय आहे. कारण, काही ना काही सादरीकरणाच्या निमित्ताने आम्ही नेहमी तेथे येत असतो. परंतु, येथील अपूर्णता मनाला खटकते. मात्र, आता ‘मटा कॅम्पेन’मुळे बदल होईल, असे वाटते.

-कैलास सलादे

‘त्यांच्या’ डोळ्यात घातले अंजन

नाशिक शहरातील नाट्यगृहे हा तसा संवेदनशील विषय आहे. कारण, सांस्कृतिक क्षेत्राकडे महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष होत असते. कलाकारांना काही सुविधा हव्या असल्यास अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. परंतु, ‘मटा’ने त्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे.

-आकाश बर्वे

मिनी थिएटर्सचा मुद्दा उचलावा

‘मटा’ने हे ‘कॅम्पेन’ हाती घेतले हे स्वागतार्ह आहे. मात्र, आता शहरात काही मिनी थिएटर्सची गरज आहे. त्यासाठी नव्याने आंदोलन करण्याची गरज आहे. प्रत्येक विभागात एक मिनी थिएटर असेल, तर त्या विभागातील रसिकांची भूक भागू शकेल.

-अमोल महाजन

आता परिस्थिती बदलेल

नाशिक शहरातील नाट्यगृहांचा प्रॉब्लेम मोठा होता. कारण, आम्ही जेव्हाही नाटक पाहण्यासाठी तेथे गेलो, तेव्हा केवळ दुरवस्थाच नजरेस पडली. कालिदास कलामंदिरही खराब स्थितीत आहे. मात्र, नाट्यगृहांची दुरवस्था या ‘मटा कॅम्पेन’मुळे आता परिस्थिती बदलेल.

-सचिन नवघिरे

शहरात नाट्यगृहे गरजेचीच

नाट्यगृहे ही शहराची गरज असते. कारण, शहरात कलाकार राहतात, मनोरंजनासाठी रसिकही राहतात. त्यामुळे शहरात नाट्यगृहे हवीच असतात. आपल्या शहरातील नाट्यगृहांची अवस्था सध्या फारशी चांगली नाही. परंतु, हा मुद्दा ‘मटा’ने उचलल्यामुळे यात बदल नक्कीच घडेल.

-उमेश नवघिरे

‘कॅम्पेन’मुळे दुरवस्था प्रकाशात

पं. पलुस्कर नाट्यगृहाची अवस्था अत्यंत खराब आहे. विशेष म्हणजे येथे शेजारीच शौचालय उभारण्यात आले आहे. अनेक मद्यपी येथे अंगणात पहुडलेले असतात. त्यांचा काही बंदोबस्त करायला हवा. ‘मटा कॅम्पेन’मुळे या नाट्यगृहाच्या विविध समस्या प्रकाशात आल्या आहेत.

-विजय कदम

बदल आहेत अपेक्षित

मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकची नाट्यगृहे आहेत कुठे? तिकडे बटणांवर सगळा खेळ आहे, आपल्याकडे अजूनही दोऱ्यांवरच पडदे उघडझाप करतात. किमान ‘मटा’मुळे ही अवस्था समोर तरी आली आहे. आता त्यात तातडीने महत्त्वाचे बदल होणे अपेक्षित आहे.

-प्रशांत हाडोळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात भाजपने साधली संधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला असून, सभापत‌िपदासाठी भाजपच्या विमलबाई सोनवणे यांनी काँग्रेसच्या संजय जोपळे यांचा अकराविरुद्ध एक असा पराभव केला. तर उपसभापत‌िपदासाठी भाजपच्या शीतल कोर यांनी शिवसेनेचे कान्हू आहिरे यांचा अकराविरुद्ध एक असा पराभव केला. दोन्हीवेळा हात उंचावून झालेल्या मतदानादरम्यान उपस्थितांपैकी दोन सदस्य तटस्थ राहिले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिला.

येथील पंचायत समितीसाठी भाजपाच्या सर्वाधिक सात जागा निवडून आल्या आहेत. भाजपने बहुमतासाठी आदिवासी आघाडीच्या दोन्ही सदस्यांचा पाठिंबा घेवून एकत्रित गटनोंदणी केली. त्यामुळे सभापती, उपसभापत‌िपदी भाजपाच्याच उमेदवारांची वर्णी लागेल हे निश्चित होते. सभापतीपदासाठी विमलबाई मांगू सोनवणे यांनी तर काँग्रेसचे संजय जोपळे व अंतापूर गणाचे रामदास सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले. उपसभापत‌िपदासाठी भाजपच्या शितल जिभाऊ कोर यांनी आणि शिवसेनेचे ब्राह्मणगाव गणातील कान्हू आहिरे या दोघांनी अर्ज दाखल केले. माघारीच्या मुदतीत सभापत‌िपदासाठी रामदास सूर्यवंशी यांनी माघार घेतली. त्यांनतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यावेळी सभापत‌िपदासाठी भाजपच्या सोनवणे यांना अकरा मते मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईएसआयसी’त अपुरे कर्मचारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील औद्योगिक वसाहतींत काम करणाऱ्या लाखाभर कामगारांसाठी कामगार विमा योजना रुग्णालयात केवळ १५६ कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे या रुग्णालयात अनेक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने कामगारांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. शंभर बेडच्या कामगार विमा रुग्णालयात क्लास वन पोस्टचे केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी असून, सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच आहेत. ‘ईएसआयसी’कडून वेळोवेळी रुग्णालयात मंजूर असलेली पदे भरण्याबाबत मागणी करण्यात येते. परंतु, शासनाकडून त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक आमदार व खासदारांनादेखील येथील वस्तुस्थिती कळविण्यात आली आहे. (सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधाच ‘ईएसआयसी’मध्ये उपलब्ध नसल्याने नेहमीच रुग्णांच्या रोषाला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु, मंजूर पदे भरण्यात येत नसल्याने इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्याचा भार सहन करावा लागतो.) येथील गैरसोय टाळण्यासाठी कामगार विमा योजना रुग्णालयात मंजूर असलेली १६८ पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी अपेक्षा डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र शासनाने कामगार विमा योजना रुग्णालयाची सुविधा दिली आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून ‘ईएसआयसी’मध्ये डॉक्टर व डॉक्टरांना मदतनीस असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती झाली नसल्याने त्याचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कामगार रुग्णालयात लाखाच्यावर कामगार सभासद आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामगार सभासद असतानाही केवळ १५६ कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम करावे लागत आहे. त्यातच महत्त्वाच्या पदावर असलेले डॉक्टर सुटीवर गेल्यास त्याचाही ताण दुसऱ्या डॉक्टरांना सहन करावा लागतो. येथे मंजूर असलेली १६८ पदे भरण्यात येत नसल्याने कामगारांना अनेकदा सुविधा देताना येथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे.मात्र, तरीही आहे त्या कर्मचाऱ्यांकडून ‘ईएसआयसी’मध्ये कामगारांना आरोग्य सुविधा दिली जात आहे. डॉक्टरांवर अतिरिक्त भार येत असूनही एखाद्या कामगाराला वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला जातो. त्याचा त्रास डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याच्या संबंधितांच्या तक्रारी आहेत.

अतिदक्षता विभागच नाही

कामगार विमा योजना रुग्णालयात अतिमहत्त्वाचा असलेला अतिदक्षता विभागच (आयसीयू) उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर दुखापत झालेल्या कामगाराला खासगी रुग्णालयात हलविण्याची वेळ येते. यात एखाद्या वेळी संबंधित कामगाराकडे कागदपत्रांची पूर्तता नसल्याने खासगी रुग्णालयाकडून नाकारले जाते. अशावेळी कामगार व त्यांचे आप्तेष्ट कामगार रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरत असतात. शंभर बेडच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

१८ वर्षांपासून एकच अॅम्ब्युलन्स

या रुग्णालयासाठी १८ वर्षांपासून केवळ एकच अॅम्ब्युलन्स कार्यरत आहे. विशेष म्हणजे संबंधित अॅम्ब्युलन्सची अनेकदा दुरुस्तीदेखील करून झाली आहे. परंतु, तिचा कार्यकाळ पूर्ण होऊनही नवीन अॅम्ब्युलन्सला शासनाने मान्यताच दिलेली नाही. किमान सामाजिक संस्थांनी तरी पुढाकार घेत येथे अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कामगारवर्गातून होत आहे.

प्रमुख रिक्त पदे अशी

कामगार विमा योजना रुग्णालयाची भव्य इमारत सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत आहे. परंतु, अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांचा अतिरिक्त भार इतरांवर येत असतो. यात वैद्यकीय अधिकारी क्लास वन यांची ६ पदे तत्काळ भरण्याची गरज आहे. ईसीजी, एक्स-रे, लॅब आदी टेक्निशियनची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. वर्ग ३ मध्ये १२६ पदांची गरज आहे. परंतु, केवळ ४५ पदे भरण्यात आली असून, ८१ पदे रिक्त अाहेत. सफाई कर्मचारी व पहारेकरी यांचीही अनेक पदे रिक्त आहेत. क्लास ४ च्या १५६ पदांपैकी केवळ ७१ पदे भरण्यात आली असून, ८५ पदे रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images