Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

त्र्यंबकेश्वरचे पेड दर्शन हायकोर्टात

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरात २०० रुपये देणगी दर्शनाकडे मुंबई धर्मादाय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात २०० रुपयांत थेट दर्शनाची व्यवस्था विश्वस्तांनी केली आहे. या विरोधात मंदिराच्याच विश्वस्त ललिता शिंदे यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात तक्रार केली आहे.

या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे, की अशा प्रकारे भाविकांना २०० रुपये शुल्क आकारून थेट दर्शन देणे हे रांगेतील भाविकांवर अन्यायकारक आहे. देवाच्या दारी गरीब- श्रीमंत भेदभाव करणारे आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुरातत्त्व खात्याचे अंतर्गत प्राचीन स्मारक म्हणून घोषित झालेले स्थळ आहे. येथे १९८५च्या पुरातत्त्व खात्याच्या कायद्याप्रमाणे दर्शनासाठी शुल्क आकारणे गैरवाजवी आहे. अशा प्रकारे येथे पेड दर्शन म्हणून घेऊ नये.

पेड दर्शनाविरुद्ध वेळोवेळी मागणी केलेली असताना पेड दर्शन कायम राहिल्याने विश्वस्त शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर न्यायालयाने मुंबई धर्मादाय आयुक्तांना चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. आता त्र्यंबकेश्वर येथील २०० रुपयांबाबत विश्वस्त काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलेसाठी वाहिलेला ‘राजा’

0
0

एखादी व्यक्ती कलाकार नसते, परंतु कलेविषयी तिला प्रचंड तळमळ असते. कलाकाराला व्यासपीठ मिळावे यासाठी पदरमोड करून ती प्रयत्न करीत असते. कलाकाराची कला जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी त्या व्यक्तीची अव्याहतपणे घडपड सुरू असते. असाच एक नाशकातील अवलिया म्हणजे राजा पाटेकर. या व्यक्तीला कलेची जाण तर आहेच, त्याचबरोबर दुसरा कलाकार मोठा व्हावा, ही त्याची तळमळ आहे. राजा पाटेकर यांनी स्वतःच्या जागेत कलादालन सुरू केले असून, ते सर्व कलाकारांना मोफत उपलब्ध करून दिले जाते. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांची सुरू असलेली कलेची धडपड तरुणांनादेखील लाजवणारी आहे.

राजा पाटेकर यांचा जन्म नाशिक शहरात झाला. शालेय शिक्षण पेठ विद्यालयात पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘आयटीआय’मध्ये टर्नरचा कोर्स करून अंबड भागात स्वतःची फॅक्टरी सुरू केली. या ठिकाणी देशातील मोठ्या कंपन्यांची जॉबची कामे ते करीत होते. वडील संगीत इंडस्ट्रीमधील प्रख्यात व्हॉयोलिन वादक असल्याने त्यांच्यावर संगीताचे संस्कार घडत गेले. याच काळात त्यांनी विविध गुरूंकडून गिटार, व्हॉयोलिन, तबला अशा विविध वाद्यांचे प्रशिक्षण घेतले. व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कलेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. नाशिक हे कलेचे माहेरघर, मुंबई-पुण्याखालोखाल नाशिकमध्ये सांस्कृतिक वातावरण चांगले आहे. मात्र, कलेला व्यासपीठ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा पुरेशा नाहीत. ज्या आहेत, त्या अत्यंत खर्चिक आहेत. उभरत्या कलाकारांना तेथे आपली कला सादर करणे शक्य होत नाही. त्यामुळेच नाशिक शहरातील चित्रकला, शिल्पकलांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. शिक्षणमहर्षी वा. गो. कुलकर्णी यांनी १९४० मध्ये चित्र-शिल्पांचे रोपटे लावले. कलानिकेतनची स्थापना करून चित्रकला महाविद्यालय सुरू केले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कलाशिक्षक तयार झाले. काही प्रमाणात शिल्पकार तयार होऊन आपापल्या क्षेत्रात नावारुपाला आले. याच काळात नाशिक शहरात आर्ट गॅलरीची गरज भासू लागली. सार्वजनिक वाचनालयात असलेली आर्ट गॅलरी पाडून टाकल्याने चित्रकारांना प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. राजू खुळगे, बाळ नगरकर हे राजा पाटेकरांचे खास मित्र. त्यांच्या बरोबर राहून चित्र कसे पाहावे याचे ज्ञान प्राप्त झाले. कलाकारांची कलाप्रदर्शनाची अडचण ओळखून आपल्या बंगल्यात असलेल्या जागेवर त्यांनी आर्ट गॅलरी तयार करण्याचा निश्चय केला. दि. ७ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी आपल्या जागेत पहिले प्रदर्शन भरविले. कला चांगली असेल, तर ती पाहण्यासाठी लोक कुठूनही येतात, या उक्तीनुसार या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनांचा सिलसिला सुरू झाल्यानंतर त्यांनी सावंत बंधू, स्नेहल एकबोटे, नयन नगरकर, शिल्पकार संदीप लोंढे, यतीन पंडित, आर्किटेक्ट संजय पाटील, शिवाजी तुपे, अशा एक ना अनेक कलाकारांची प्रदर्शने भरवली. आजपर्यंत या ठिकाणी शंभरावर प्रदर्शने झाली आहेत. त्याचप्रमाणे तीसच्या वर गाण्यांच्या मैफली झाल्या आहेत. या कलादालनाला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर, श्रीकांत जाधव, शार्दुल कदम, जोत्स्ना कदम, अनिल अवचट, राज ठाकरे, शिल्पकार सदाशिव मराठे आदींनी भेट देऊन राजा पाटेकरांचे कौतुक केले आहे. आज नाशिकमधील निःस्वार्थी कलेचा उपासक म्हणून राजा पाटेकरांचा लौकिक आहे. त्यांनी अनेक चित्रकार-शिल्पकारांवर लघुपट तयार केले असून, विविध फेस्टिवलमध्ये सादर केले आहेत. राजा पाटेकर हे रसिक तर आहेतच, शिवाय ही कला विविध माध्यमांद्वारे प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवायची याचे कसबदेखील त्यांच्याकडे आहे. त्यासाठी ते सोशल मीडियाचादेखील खुबीने वापर करीत असतात. काळानुसार त्यांनी स्वतःला तयार केले आहे. आपल्या यशात ज्येष्ठ चित्रकार सी. एल. कुलकर्णी व ज्येष्ठ गायक शंतनू गुणे यांचा मोठा हात आहे, असे ते आवर्जून सांगतात.



नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग,

तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉटल क्रशिंगद्वारे रेल्वे प्रवाशांची कमाई!

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

रेल्वे स्थानक आणि रेल्वेमार्गांवर प्रवाशांकडून प्लास्टिकच्या बाटल्या फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नामी उपाय म्हणून रेल्वेने बॉटल क्रशिंग मशिन प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकात बसविले आहे. बाटल्या फेकण्याएवजी या मशिनमध्ये टाकल्यावर त्यांच्या चिप्स तयार होतात. बदल्यात प्रवाशाला पाच रुपयांचे कूपन मिळत आहे. नाशिकमधील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता येथेदेखील हे मशिन बसविण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.

ही आहे वस्तुस्थिती

देशात दररोज अडीच कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. जगात रेल्वेच्या जाळ्याबाबत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका प्रथम, चीन द्वितीय आणि रशिया तिसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेत रेल्वे खासगी क्षेत्रामार्फत चालवली जाते. तेथे प्रतिकिलोमीटर रेल्वेमार्गावर १३७३ लोकसंख्येचा बोजा आहे. चीनमध्ये रेल्वे सरकारी आहे. तेथे रेल्वेमार्गावर हाच बोजा ११ हजार २१८ प्रवासी इतका आहे. रशियातही रेल्वे सरकारी मालकीची आहे. तेथे रेल्वेमार्गावर लोकसंख्येचा बोजा प्रतिकिलोमीटर १६६९ आहे. मात्र, भारतात हाच आकडा १८ हजार ३९० इतका प्रचंड आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे स्थानकात दररोज हजारो टन कचरा फेकला जातो. एकट्या नवी दिल्ली स्थानकात दररोज २००० किलो कचरा संकलित केला जातो.

असे आहे मशिन

स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत रिसायकल मशिन रेल्वे स्थानकावर बसविण्यात येत आहे. कचरा सफाईतून कमाई हे त्याचे वैशिष्ट्य आहे. पर्यावरणाची हानी टाळणे आणि स्थानक स्वच्छ ठेवणे, हा त्याचा उद्देश आहे. हे मशिन एटीएमसारखे आहे. पाण्याची रिकामी बाटली मशिनमध्ये टाकल्यावर बाटलीचे तुकडे होऊन ते पेटीत जमा होतात, तर समोरून डिस्काउंट कूपन येते. प्रवाशाला त्याच्या इच्छेनुसार पाच रुपयांचे डिस्काउंट किंवा मोबाइल रिचार्ज कूपन मिळते.

मशिनची कमाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत हे मशिन तयार करण्यात आले आहे. एका रिसायकल मशिनची किमत सात लाख रुपये आहे. दिवसाला पाच हजार बाटल्यांचे चिप्स करण्याची त्याची क्षमता आहे. मशिन सुरू झाल्यावर बारा सेकंदांत बटण दाबावे लागते. त्यानंतर बाटलीचा बारकोडचा एरिया वर करून बाटली मशिनमध्ये टाकली जाते. बाटलीचे स्कॅनिंग होते व नंतर बाटली कट होऊन सहा सेकंदांत तिच्या चिप्स तयार होतात. त्यापासून कार्पेट, पिशव्या, कपडे बनविता येतात. पाच हजार बाटल्या क्रश झाल्यानंतर मशिन स्वच्छ केले जाते.

दहा स्थानकांवर बसविणार

ज्या स्थानकांवर प्रचंड गर्दी असते तेथे प्रथम हे मशिन बसविले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात हे मशिन बसविण्यात आले आहे. सुरुवातीला पश्चिम रेल्वेच्या दहा स्थानकांवर वीस मशिन्स बसविले जाणार आहेत. मुंबई सेंट्रल, वांद्रा लोकल, वांद्रा टर्मिनस, गोरेगाव, अंधेरी, सांताक्रूज, बोरिवाली, भायंदर या स्थानकांचा त्यात समावेश असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.


स्वच्छतेबाबत नाशिकरोड रेल्वे स्थानक देशात सहावे आहे. हे स्थानक चोवीस तास स्वच्छ ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कमर्चारी राबत असतात. मात्र, तरीही मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या दिसते. त्यामुळे येथे या मशिनची आवश्यकता आहे.

-अपेक्षा रकिबे, विद्यार्थिनी


रेल्वे सुरू झाल्यावरही प्रवासी मार्गावर दुतर्फा बाटल्या फेकतात. त्यामुळे नाशिकमध्ये बॉटल क्रश मशिन बसविण्याची गरज आहे. स्थानकाबरोबरच शहरातील गर्दीच्या ठिकाणीही असे मशिन बसविल्यास प्रदूषणाची समस्या निकाली निघेल.

-भरत जाधव, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियामुळे मिळाले बाळाला दूध!

0
0

चिंताक्रांत आईबाबा अन् चिमुकलीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन गुजरात ते तिरुवनवेली असा लांबचा प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याने बाळासाठी सोबत घेतलेले दूध नासले. त्यात रेल्वेत दुधाची सोय नाही आणि रेल्वे थेट रत्नागिरीला थांबणार असल्याने बाळाला दूध मिळणार कसे?, या प्रश्नाने त्याचे आई-बाबा अस्वस्थ झाले. नेहा बापट या महिलेने ही व्याकूळता पाहून सोशल मीडियावर दूध मिळविण्यासाठी आवाहन केले. कोकण रेल्वेने दखल घेत बाळासाठी कोलाड या रेल्वे स्थानकावर दुधाची व्यवस्था केली. दूध मिळाल्यानंतर रडणारे बाळ आणि त्याच्या दुधासाठी चिंतेत असलेले त्याचे आई-बाबा या दोघांच्याही चेहऱ्यावर मग हास्य फुलले.

कार्तिकी नावाची पाच महिन्यांची चिमुकली आपल्या आई-बाबांसोबत हापा तिरुवनवेली या रेल्वेने प्रवास करीत होती. कार्तिकीला दूध देण्यासाठी तिच्या आईने पर्समधून बाटली काढली, तर दूध नासल्याचे लक्षात आले. आता रेल्वे थेट रत्नागिरीला थांबणार मग दूध कसे मिळणार? या प्रश्नाने पालकांना ग्रासले. यावेळी रेल्वेने प्रवास करणाऱ्या नेहा बापट यांनी फेसबुकवर आवाहन करून मित्र-मैत्रिणींना आर्त साद घातली. मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रातील मित्रांनी चिमुकलीच्या दुधासाठी प्रयत्न सुरू केले. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर दुधासाठी मोहीम सुरू झाली. रत्नागिरीच्या अनघा निकम-मकदूम, प्राजक्ता ओक देवळाली कॅम्पचे रेल्वे समिती पदाधिकारी रतन चावला, नाशिकचे नितीन पांडे यांच्यासह सर्व मित्रांनी प्रयत्न केले. कोकण रेल्वेलाही ट्विट करण्यात आले. अखेर कोलाड रेल्वे स्थानकावर दूध घेऊन रेल्वेचा माणूस तयार असेल असा संदेश अनघा यांना आला. त्यांनी तो नेहा बापट यांना दिला व सर्वांच्या जीवात जीव आला. कोलाड स्थानकावर ट्रेन थांबली आणि कार्तिकीला दूध मिळाले.

चांगली बाजूही अधोरेखित

नेहा बापट या जागरूक महिलेने फेसबुक फ्रेंड्सशी धावत्या रेल्वेतून साधलेला संवाद आणि त्यांच्या मित्र मैत्रिणींनी त्यांच्या संवादाला दिलेली साथ यामुळे बाळाला दूध मिळाले. सोशल मीडियाची चांगली बाजू पुन्हा नव्याने अधोरेखित झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातबाऱ्याची प्रतीकात्मक होळी

0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

गेल्या तीन वर्षांपासून कधी दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यातच यंदा शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात आहेत. सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने, सरकारचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सातबाऱ्याची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,’ ‘स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे’, ‘कर्जमाफी करा नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. महानगरप्रमुख नितीन रोठे पाटील, कार्याध्यक्ष शरद लभडे, हॉकर्स युनियनचे प्रमुख नीलेश कुसमोडे, मनोज भारती, योगेश कापसे, पुंडलिक चव्हाण, दीपक दहीकर, सचिन पवार, सचिन चौघुले, बाळासाहेब सोनवणे, दीपक मोरे, राजेश ढाकणे, शुभम सोनवणे, कैलास घन, धोंडिराम कोंबडे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी होळीत सातबारा उतारे टाकून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर कोयत्याने हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना कॉलेज रोडवरील इझीडे मॉलजवळील चहाच्या टपरीजवळ घडली. या प्रकरणी प्रज्वल राजेंद्र भामरे (वय १९, रा. १५, राजश्रीपाल, माऊली लॉन्सजवळ, कामटवाडे) याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आकाश आहेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रज्वल व त्याचे मित्र शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास टपरीवर चहा पीत असताना आकाश तिथे आला. तुम्ही एकटेच चहा काय पिता, अशी विचारणा करीत त्याने प्रज्वलकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. प्रज्वलने पैसे देण्यास नकार देताच आकाशने शर्टच्या आतील कोयत्यासारखे धारदार शस्त्र काढून प्रज्वलवर वार केला. प्रज्वलने डाव्या हातावर वार घेतल्याने त्याच्या हाताच्या पंजास जखम झाली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार बी. आर. बेळे तपास करीत आहेत.

चौघांकडून एकास मारहाण

गाडीचा कट का मारला, अशी कुरापत काढून रिक्षातील चौघांनी एकास लाथाबुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना १० मार्च रोजी सातपूर येथील हॉटेल अयोध्याजवळ रात्री पाऊणेनऊ वाजेच्या सुमारास घडली. उमेश अशोक चव्हाण (वय ३६, स्वामी विवेकानंदनगर, पाटीलनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी चव्हाण व त्यांच्या मित्राला गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एमएच १५/झेड ८७९८ या रिक्षामधील चौघांनी अडवले. शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने आणि फायटरने गंभीर दुखापत केली. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार सोर तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन करून ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी अंबड-सातपूर लिंक रोडवरील संजीवनगरमध्ये घडली. मंगेश आनंदा शेळके असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मंगेशने शनिवारी सायंकाळी घरात विषारी औषध सेवन केले. औषधाचा त्रास सुरू होताच कुटुंबीयांनी त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हवालदार भालेराव तपास करीत आहेत.

वृद्धाची आत्महत्या

कॉलेज रोड भागातील शिरीष मोरेश्वर खुलगे (वय ६५, रा. कॉलेज रोड) या वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खुलगे शनिवारी दुपारी घरात एकटे होते. त्यांनी दुर्धर आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

तरुणीची आत्महत्या

कोठुरे (ता. निफाड) येथील करुणा सागर पवार या २८ वर्षीय तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत निफाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. करुणाने शुक्रवारी, १० मार्च रोजी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबीयांनी तिला शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीबाबत आज फैसला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेला आता राजकीय घडामोडीला वेग आला असून पालकमंत्री गिरीश महाजन व विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर नाशिकला सोमवारी (दि. १३) येणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्येच भाजपाची रणनिती ठरणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर युतीमधील दोन्ही पक्षांचे मतभेद कमी झाल्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा शिवसेनेबरोबर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ही २१ मार्चला असून पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक १४ मार्चला आहे. त्यामुळे येथील सत्ता समीकरणात एकमेकांची गरज लक्षात घेऊन सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर या दोन्ही पक्षांधील दूरावा कमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर निवडणूक लढवण्यामुळे त्यांच्यातील दूरावा कायम होता. त्यामुळे निकालानंतर या दोन्ही पक्षात सत्ता स्थापननेबाबत कोणतीच बोलणी झाली नाही. महापालिकेत बहुमत मिळवल्याने भाजपला शिवसेनेची गरज नाही. पण जिल्हा परिषद व पंचायत समितीत दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज असल्यामुळे पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थित शिवसेनेबरोबर चर्चा होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २५ तर भाजपाला १५ जागा मिळाल्या. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांना सत्ता स्थापने सोपे होते. पण दोन्ही पक्षांनी राज्यात विरोधात असलेल्या पक्षांशी संधान बांधून आपली रणनीती ठरवली. पण गेल्या दहा-पंधरा दिवसात राजकीय दोन्ही पक्षातला दुरावा कमी झाल्यामुळे जिल्ह्यातही शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. पालकमंत्री महाजन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेऊन सदस्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेत शिवसेनेबरोबर युती करून सत्तेची समीकरण मांडले जाण्याची शक्यता आहे. तर पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी शिवसेनेची मदत काही तालुक्यात शिवसेनेकडून घेण्याचे समजते.

आज मुदत संपणार
जिल्हाभरातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची मुदत सोमवारी, १३ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे येथे नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून नूतन सभापती व उपसभापती निवड मंगळवारी, १४ मार्च रोजी होणार आहे. पंचायत समितीत ६० सदस्य शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ३२ तर भाजपाचे २७ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेकडे ७ ठिकाणी बहुमत आहे. तर राष्ट्रवादी व भाजपाला तीन ठिकाणी संधी आहे. तसेच माकपला दोन ठिकाणी सभापती मिळण्याची चर्चा आहे.

जि. प. निवडणूक २१ मार्चला
जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या पदाची २० मार्च रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी २१ मार्चला निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वात जास्त सदस्य शिवसेनेचे २५ निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेस १८, भाजपा १५, कॉँग्रेस ८, माकपा ३ व अपक्ष ४ असे एकूण ७३ सदस्य आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बहुमत हे ३७ सदस्यांचे आवश्यक आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी नाशिकला येणार असून यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय घेतले जातील.
- किशोर काळकर, विभागीय संघटनमंत्री, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिक्लेम नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला दणका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जन्मतः आजार असल्यामुळे तो पॉलिसी घेतल्याच्या पहिले दोन वर्षांसाठी कव्हर होत नसल्याचे कारण देत विमा दावा नाकारणाऱ्या मालेगावच्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दोन लाख देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये भरपाई व अर्जाचा खर्च ५ हजार असा एकूण १५ हजाराचा दंडही ठोठावला आहे.

मालेगाव येथील मनीष अश्विनकुमार बोहाडे यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी व इंडिया हेल्थकेअर सर्व्हिसेस (टीपीए) कंपनीविरुद्ध तक्रार ग्राहक न्यायमंचात दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले, की मी दोन लाखांचे विमा संरक्षण असलेली पॉलिसी घेतली होती. या पॉलिसीमध्ये मी, पत्नी व मुलगी यांच्या नावाचा समावेश होता. माझी मुलगी भूमिका हिच्यावर अंधेरी येथील लीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सायनस व्हेनोसिस डिफेक्ट या आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी २ लाख ५५ हजार इतका खर्च आला. ती रक्कम मिळवण्यासाठी दावा केल्यानंतर जन्मतः आजार असल्यामुळे पॉलिसी घेतल्याच्या पहिल्या दोन वर्षांसाठी कव्हर होत नसल्याचे कारण देत विमा दावा नाकारला.

या तक्रारीवर मालेगावच्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून युक्तिवाद करताना सांगण्यात आले, की पॉलिसी नूतनीकरण करण्यात खंड पडला. तक्रारदाराची मुलगी भूमिका हिच्या बाबतीत तक्रार निर्माण झाली. त्या वेळी विमा पॉलिसीचे दोन वर्षे पूर्ण झालेले नव्हते. तक्रारदाराने दाखल केलेली उपचारांची कागदपत्रे स्पष्ट करतात, की त्यांच्या मुलीला झालेला आजार कन्जनायटल हार्ट डिफेक्ट आहे. तिला असलेला आजार जन्मजात असल्यामुळे पॉलिसी क्रमांक ४.३ मध्ये दिलेल्या १९ क्रमांकाच्या आजारामध्ये समावेश होतो, ज्यासाठी पॉलिसी घेतल्यानंतर प्रथमच दोन वर्षे विमा लाभ देय नाही. त्यामुळे हा दावा फेटाळण्यात यावा.

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने निकाल देताना सांगितले, की कोणताही ठोस असा वैद्यकीय निष्कर्ष नसताना तक्रारदाराच्या मुलीचा आजार कन्जेनायटल म्हणजेच जन्मतः असल्याचा निष्कर्ष काढून विमा दावा नाकरणे सेवेतील कमतरता व अनिष्ट व्यापारी प्रथा आहे. त्यामुळे तक्रारदाराला पॉलिसीप्रमाणे दोन लाख अदा करावेत, त्याचप्रमाणे तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासपोटी १० हजार रुपये भरपाई व अर्जाचा खर्च ५ हजार असा १५ हजार रुपये देण्याचेही आदेश दिले. हा निकाल जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे- कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारू पिणार नाही, पिऊ देणार नाही!

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दारू पिऊन डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार अंगी रुजविण्याचा प्रयत्न करा आणि येत्या शिवजयंतीली दारू पिणार नाही आणि दुसऱ्यालाही पिऊ देणार नाही अशी शपथ घ्या, तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली असे होईल.

पंचवटी शांतता समितीच्या बैठकीत पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बैठकीस उपस्थितांनी शपथ घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी (दि. १५) तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी या त्यांच्या कार्याची आठवण देण्यासाठी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी साजऱ्या करायच्या असतात. या उत्सवांना विकृत स्वरुप येत आहे. त्यामुळे हे उत्सव समाजाच्या सुधारणासाठी करायचे की समाज बिघडविण्यासाठी करायचे, असा प्रश्न निर्माण होतो. उत्सवातून चांगलाच पायंडा पडायला हवा यासाठी निदान या दिवशी तरी चांगल्या रितीने कार्य घडून चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न व्हावा, या बाबतीत बर्डेकर यांनी विचार मांडले. उपस्थितांनी त्यांच्या विचाराला प्रतिसाद दिला.

बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात निस्वार्थ सेवा भावनेने काम केलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून प्रमाणपत्र देण्याची मागणी पद्माकर पाटील यांनी केली. अशा कार्यकर्त्यांच्या नावाची यादी पोलिस ठाण्याकडे पाठविली आहेत. पोलिस ठाण्यातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचवटीकरांनी सहकार्य केलेले आहे. पुढेही असेच सहकार्य मिळत राहिल असे नगरसेवक रुची कुंभारकर यांनी सांगितले. श्याम पिंपरकर, सचिन डोंगरे, लक्ष्मण धोत्रे, सुरेश मानसिंघानीया यांनी काही सूचना मांडल्या.

आजपासून कार्यक्रम
नाशिकरोड : नाशिकरोडला युवासेना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सोमवारपासून (दि.१३) कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक शिरीष लवटे, राजेश फोकणे यांनी दिली. नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा येथे सायंकाळी सहाला शिवचरित्रकार डॉ. विजय तनपुरे हे छत्रपतींची संगीत चित्रकथा शिवगर्जना या कार्यक्रमातून सादर करतील. संस्कृती महाराष्ट्राची हा ४५ कलावंतांचा मराठमोळ्या गीतांचा नृत्यमय कार्यक्रम दिग्दर्शक बाळा पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १४) सायंकाळी सहाला होईल. शिवाजी महाराज पुतळ्यास बुधवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते अभिषेक केला जाईल. त्यानंतर चेहडी येथून शिवपालखी निघेल. सायंकाळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाईल. शिवपुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाईल. आमदार योगेश घोलप, नितीन चिडे, नितीन खर्जुल, बाबा बच्छाव, योगेश गाडेकर जयंती समितीचे अध्यक्ष समर्थ मुठाळ, दीपक जाधव आदी संयोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडाला मिळेना प्रतिसाद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईसह मोठ्या शहरात प्रचंड मागणी असलेल्या म्हाडाच्या घरांकडे नाशिकमध्ये कुणी पहायला तयार नाही. ग्राहक मिळत नसल्याने ९८३ पैकी ८६१ घरे खाली पडून आहेत. विशेष म्हणजे या घरांच्या किंमती बाजारभावपेक्षा जास्त असल्याची ओरड असल्यामुळे म्हाडाने काही स्किममध्ये किंमत कमी करूनही आठ महिन्यात त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचेही समोर आले आहे.

म्हाडाच्या घरांच्या विक्रीत हरित लवादाचा अडसर होता. पण तो आता दूर झाला आहे. त्यामुळे अर्ज प्राप्त झालेल्या १२२ घरांसाठी आता म्हाडाच्या कागदपत्र पूर्ण करण्याच्या हाललाची सुरू झाल्या आहे. तर उर्वरित ८६१ घरांसाठी म्हाडाला पुन्हा किंमती कमी करावे लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर कोणत्याही राजकीय पक्ष वा नेत्यांनी या मुद्याकडे गांभिर्याने बघितले नाही. म्हाडाच्या या घराला मागणी नसल्यामुळे नवीन स्किमही रखडणार आहे.

नाशिक म्हाडाने शहरात विविध स्किम तयार केल्या काहींना चांगला प्रतिसाद मिळाला तर काही स्किम मात्र किंमती जास्त असल्यामुळे रखडल्या. म्हाडाने आडगाव, पंचक, मखमलाबाद, म्हसरूळ, पाथर्डी व येथे नव्याने साईड डेव्हल्प करून फ्लॅट बांधले. पण या स्किममध्ये फ्लॅटच्या किंमती बाजारभावापेक्षा जास्त असल्यामुळे त्याला प्रतिसादच मिळाला नाही. त्यानंतर आठ महिन्यापूर्वी ना नफा ना तोटा या तत्त्वावर सगळ्यांना घरे मिळावी यासाठी, म्हाडाने किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पन्न मर्यादा शिथिल केल्यामुळे त्यात कोणालाही प्लॅट घेता येणार असून प्रथम येईल त्याला प्राधान्य त्यात देण्यात आले. तरीही त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

असे आहेत म्हाडाचे फ्लॅट
टू बीएचके फ्लॅटमध्ये बाल्कनीसह बैठक खोली, दोन शयन कक्ष, त्यात एकाच अटॅच टॉयलेट, किचन व एक स्वतंत्र टॉयलेट बाथरुम, ग्रिलसह अॅल्युनियम स्लायडिंग खिडक्या, व्हिट्रीफाईड टाइल्स या सुविधा आहे. तर एक बीएचकेला १ शयनकक्ष कमी असणार आहे. तसेच प्रत्येक इमारतीत सोसायटी कार्यालय, दोन लिफ्ट, प्रशस्त जिन्यासह फायर फायटिंगची सुविधा, सामाईक कव्हर्ड पार्किंग, गार्डन, रस्ते व सामाईक संरक्षक भिंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदूला हुंदका अनावर

0
0

नाशिकमध्ये केले आजीच्या अस्थींचे विसर्जन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आईवडिलांच्या निधनाने पोरका झालेल्या चंदूला जिने सांभाळ केला, आईवडिलांचे प्रेम दिले त्या आजीच्या आठवणीने धुळ्याचा जवान चंदू चव्हाणला हुंदका अनावर झाला. अत्यंत शोकाकुल वातावरणात चंदूने आजीच्या अस्थींचे रविवारी दुपारी रामकुंडात विसर्जन केले.

आईवडिलांच्या निधनानंतर चंदू चव्हाण याला आजीने (लीलाबाई) माता-पित्याचे प्रेम देऊन सांभाळ केला. चंदू सैनिकात दाखल झाला आणि सर्जिकल स्ट्राइकनंतर अनवधानाने पाकिस्तानात गेला. ही माहिती कळताच आजीला मोठा धक्का बसला आणि त्यातच तिचे निधन झाले. चंदू सुरक्षित परत येईपर्यत तिच्या अस्थीचे विसर्जन न करण्याचा चंदूच्या नातेवाइकांनी निर्णय घेतला होता. चंदू भारतात सुखरूप परतल्यानंतर त्याच्या हस्ते नाशिकच्या रामकुंडात अस्थी विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. धुळ्याच्या पुरोहितांनी चंदू सुखरूप परत यावा यासाठी अनेक धार्मिक विधी केले. सरकारच्या प्रयत्नातून चंदू शत्रूच्या तावडीतून सुखरूप परतल्यानंतर रविवारी तो नाशिकला अस्थी विसर्जनासाठी आला होता.

‘आजीइतकेच भारतावर प्रेम!’

चंदूच्या पायाला दुखापत झालेली असल्याने त्याचा भाऊ भूषण चव्हाण याने त्याला आधार दिला होता. अस्थी विसर्जन करताना आजीच्या आठवणीने त्याचा शोक अनावर झाला. अस्थी विसर्जनानंतर रामकुंडात त्याने स्नान केले. ‘‘आईवडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजीने माया लावली, प्रेम दिले; तसेच माझे प्रेम भारतावर आहे. भारत देश महान आहे’’ असे सांगितले.

‘आजीचा चंदूवर खूप जीव होता...’

चंदूची आतेबहीण मंगला पाटील यांनी सांगितले, की चंदू लहान असताना आई-वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून आजीनेच चंदूचा सांभाळ केला. तिचा चंदूवर खूप जीव होता. तो पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या बातमीने तिला प्रचंड धक्का बसला. या धक्क्यानेच तिची प्राणज्योत मालवली. चंदू पुन्हा भारतात येईल, याची शक्यता नव्हती. हे दुःख तिला पेलवता आले नाही. चंदूला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई, सख्ख्या बहिणीनेच केला खून

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जेलरोडमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या संतोष उर्फ पप्पू यादव पाटील (वय ३८) या तरुणाचा खून झाला होता. या खुनाचे गूढ उकलले असून, आई, सख्ख्या बहिणीसह मावसभावाने त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या लालसेपोटी संतोषचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संतोष उर्फ पप्पू यादव पाटील याचा गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री जेलरोडच्या सायट्रिक पेपर मिल परिसरातील निंबाजीबाबा मंदिराजवळ डोक्यात दगड घालून खून झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले होते. संतोषची बहीण मनीषा विनायक पवार (रा. लोखंडे मळा, जेलरोड) हिने आपल्या भावाचा कुणी तरी खून केल्याची फिर्याद नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, तिचा हा बनाव अवघ्या चौथ्या दिवशीच तिच्या अंगलट आला. संतोषच्या खूनप्रकरणी एक संशयित नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या हाती लागताच संतोषच्या बहिणीच्या कटाचे बिंग फुटले. पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सावधपणे तपास करत संतोषच्या बहिणीच्या सांगण्यावरून संतोषचा प्रत्यक्ष खून करणाऱ्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

असे लागला शोध

संतोषचे मंगळवारी रात्री आईवडिलांशी दारूसाठी पैशांवरून भांडण झाले होते. त्यानंतर तो घरातून निघून गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी बुधवारी (८ मार्च) सकाळी संतोषचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. त्याची बहीण मनीषा विनायक पवार हिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. घटनास्थळीही पोलिसांना कोणताही धागा मिळाला नव्हता. मात्र, शनिवारी, ११ मार्च रोजी संतोषचा खून त्याची आई व बहीण मनीषाने मावसभाऊ गणेश बाळासाहेब ढमाले (रा. पवारवाडी) याच्यामार्फत केल्याचे समोर आले. ढमाले याने गुन्हेगार पंकज गायकवाड याला सुपारी देऊन संतोषचा खून केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना मिळताच त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजकर व गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांच्या साह्याने पंकज गायकवाड याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, संतोषची आई व बहिणीने संतोषचा मावसभाऊ गणेश ढमाले याच्यामार्फत सुपारी दिल्याची कबुली पंकजने दिली. पोलिसांनी गणेश ढमालेलाही ताब्यात घेतले. संतोषच्या खुनाची सुपारी संजय पंढरीनाथ पाटील व सुधीर सखाराम खरात (दोघेही रा. सम्राटनगर, जेलरोड) या दोघांना दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी संतोषला दारू पिण्यासाठी घरातून दूर नेऊन त्याचा गळा आवळून व नंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे उघड झाले आहे.

खुनामागे प्रॉपर्टीचे कारण

संतोषला दारूचे व्यसन होते. शिर्डी येथील प्लॉट व जेलरोडचे घर आपल्या नावे करून देण्यासाठी तो आपल्या आईवडिलांकडे कायम हट्ट धरत होता. संतोषचा लहान भाऊ राजू यादव पाटील वर्षभरापासून परागंदा झालेला आहे. संतोषचाही काटा काढल्यास ही सर्व प्रॉपर्टी आपोआप आपल्याला मिळेल या लालसेपोटी संतोषच्या आईलाही बहीण मनीषाने फूस लावून मावसभाऊ गणेश ढमाले याच्यामार्फत सुपारी देऊन सख्ख्या भावाचा खून केला.

लहान भावाचे काय?

संतोषचा लहान भाऊ राजू यादव पाटील हादेखील एक वर्षापासून परागंदा आहे. तो बेपत्ता झाल्याची तक्रारही उपनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. मात्र, अद्याप त्याच थांगपत्ता लागलेला नाही. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याचा शोध घेतलेला नाही. यावरून त्याचेही संतोषप्रमाणेच काही बरेवाईट झाले असण्याची शक्यता या प्रकरणानंतर चर्चेला आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात शिवसेनेचे सात सभापती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी १४ मार्च रोजी होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडीसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडीत १० ठिकाणी स्पष्ट बहुमत आहे, तर ४ ठिकाणी कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे या ठिकाणी तडजोडीचे राजकारण केले जाणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील पंचायत समित्यांवर सात तालुक्यांत शिवसेनेचा भगवा फडकणार आहे, तर भाजप व राष्ट्रवादीच्या ताब्यात तीन पंचायत समित्या येण्याची चिन्हे आहेत. माकपला सुरगाणाबरोबरच त्र्यंबकेश्वरची सत्ता मिळण्याची संधी आहे.

या १५ तालुक्यांत मालेगाव, चांदवड, देवळा व त्र्यंबकेश्वर येथे तडजोडीचे राजकारण केले जात आहे. या सर्वांमध्ये मालेगाव येथील निवडणूक लक्षवेधी होणार असली तरी येथे भाजपने शिवसेनेवर कुरघोडी करत सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाला आपल्या गळाला लावले आहे. मालेगाव पंचायत समितीत १४ सदस्य असून, येथे शिवसेना व भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य निवडून आले आहेत, तर दोन सदस्यांमध्ये एक राष्ट्रवादी व अपक्षाचा समावेश आहे. ग्रामविकास राज्यमंत्री असलेल्या दादा भुसे यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक भाजपने हायजॅक केली असून, अद्वय हिरे यांनी भाजपची सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादी व अपक्ष सदस्याला आपल्याबरोबर घेतले आहे. मालेगावप्रमाणेच चांदवडमध्ये ८ सदस्य असून, येथे भाजपचे ३, राष्ट्रवादीचे २, काँग्रेसचा १ व शिवसेना २ असे बलाबल आहे. येथे भाजपने शिवसेनेच्या एका सदस्याला बरोबर घेऊन सत्ता स्थापण्याचे मनसुबे असले तरी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेने येथे मोट बांधली आहे. त्यामुळे येथे वरिष्ठ पातळीवर काय हालचाली होतात हे महत्त्वाचे आहे. देवळा येथे सहापैकी राष्ट्रवादीचे तीन सदस्य निवडून आले असून, येथे भाजपचे दोन व शिवसेनेचा एक सदस्य आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीला दोन्ही पक्षांतून एकाची मदत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये या तीन तालुक्यांपेक्षा विचित्र स्थिती असून, येथे सहा सदस्यांपैकी माकप दोन, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे माकपला मदत करण्याचा निर्णय राष्ट्रवादी व शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे येथे काँग्रेस व अपक्षही विरोधात बसणार नाहीत. त्यामुळे सर्वच पक्षाची येथे सत्ता असेल.

जिल्ह्यातील एकूण १५ पंचायत समित्यांमधून शिवसेनेचे ७ ठिकाणी सभापती होणार आहेत. त्यात नांदगाव, येवला, सिन्नर, निफाड, पेठ, दिंडोरी, इगतपुरी येथे स्पष्ट बहुमत आहे, तर राष्ट्रवादीकडे कळवण, नाशिक माकपचे सुरगाणा, तर भाजपकडे सटाणा येथे स्पष्ट बहुमत आहे. मात्र, मालेगावमध्ये भाजप, देवळ्यामध्ये राष्ट्रवादीला संधी आहे. त्यात चांदवड येथे दोघांना समान संधी आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व जण एकत्र येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे नगरसेवक ठरणार ‘लाभार्थी’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपने आता प्रत्येक सदस्याला सत्तेची पदे मिळतील असे सूत्र तयार केले आहे. त्याशिवाय, विधानसभा मतदारसंघनिहाय महत्त्वाची पदे देण्याचाही फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. पंचवटीला महापौर, नाशिक मध्यला उपमहापौर पद, नाशिकरोडला गटनेता हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे आता पश्चिम मतदारसंघात स्थायी समितीचे सभापतीपद दिले जाणार आहे. सत्तेचा समतोल साधण्यासाठी पाच वर्षांत ६६ नगरसेवकांना जवळपास ८८ पदांवर संधी मिळणार आहे.
मनसेच्या सत्ताकाळात विशिष्ट व्यक्तींनाच पदे दिले गेल्याने मनसेला त्याचा मोठा फटका बसला होता. सत्तापदे न मिळाल्यानेच अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळेच पक्षाला सत्ता गमवावी लागली. मनसेसारखी स्थिती होवू नये यासाठी भाजपनेच आता सत्ता समतोलाचा नवा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार निवडून आलेल्या सर्व ६६ सदस्यांना पदे दिली जाणार आहेत. महापौर व उपमहापौरपद सव्वा वर्षांसाठी असेल. त्यानुसार पाच वर्षांत आठ जणांना या पदांवर संधी मिळणार आहे. स्थायी समितीवर प्रत्येक वर्षी ५ सदस्य जाणार असून, ६६ पैकी ४५ नगरसेवकांना सदस्यपद मिळणार आहे. सोबतच पाच वर्षे पाच जणांना स्थायीचे सभापतीपद मिळणार आहे. शिक्षण समिती व महिला व बालकल्याण समितीवरही भाजपचे दरवर्षी पाच ते आठ नगरसेवक जाणार आहेत. तसेच वृक्षप्राधिकरणावरही भाजपचे दोन नगरसेवक दरवर्षी जाणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला भाजपकडून सत्तेची संधी दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘फायर सेफ्टी’चा तिढा सुटेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉस्पिटलमधील फायर सेफ्टीच्या मुद्द्यावरून महापालिका आणि खासगी हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबलेला नाही. फायर सेफ्टीचे निकष पूर्ण न केल्यास हॉस्पिटल्सच्या परवान्यांचे नूतनीकरण होऊ देणार नाही, असा महापालिकेचा पवित्रा आहे. तर फायर सेफ्टीच्या काही अटी ९० टक्के हॉस्पिटल्सना पूर्ण करता येणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रशासन कायद्याचा आधार घेत छोट्या हॉस्पिटलची लूट करीत असून, त्याचे सबळ पुरावे समोर येत आहेत. त्याआधारे संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दाद मागण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमान संघटनने दिली आहे.

कोलकत्ता येथील एएमआरआय हॉस्पिटलला ९ डिसेंबर २०११ रोजी लागलेल्या भीषण आगीत ८९ जणांना जीव गमवावा लागला होता. त्या दुर्घटनेनंतर केंद्र आणि राज्य सरकारने हॉस्पिटल्समधील फायर सेफ्टी यंत्रणा चोख ठेवण्याचे आदेश स्थानिक महापालिकांना दिलेत. त्यानुसार महापालिकेने शहरातील फायर सेफ्टीची १३ कलमी नोटीस धाडली होती. त्यात फायर ब्रिगेड विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे अशी एक प्रमुख अट आहे. हे प्रमाणपत्र असल्याखेरीज हॉस्पिटलांच्या परवान्यांचे नूतनीकरण होत नाही. २०१२ पासून हॉस्पिटल परवान्यांच्या नूतनीकरणाचे काम ठप्प झाले. मोठा डामडौल असलेल्या हॉस्पिटलने लाखो रुपये खर्च करून फायर सेफ्टी यंत्रणा कार्यान्वित केली. तसेच प्रमाणपत्र मिळवले. मात्र, छोटे हॉस्पिटल हे निकष पूर्ण करू शकत नसल्याने हा मुद्दा थंड बस्त्यात पडला आहे.

त्यातच राज्य सरकारने २०१३ मध्ये आणखी एक अद्यादेश काढून आवश्यकतेनुसार फायर एक्स्टिंग्युशर बसवून आग नियत्रंणात आणण्याची तरतूद योग्य असल्याचा निर्वाळा दिला. महापालिका प्रशासनाने फक्त ही यंत्रणा आएसआय प्रमाणित आहे किंवा नाही, हे पाहावे. योग्य प्रमाणित यंत्रणा असल्यास अ व ब प्रमाणपत्रांची सुध्दा आवश्यकता नसल्याचे या अद्यादेशात नमूद आहे. दुर्दैवाने महापालिका प्रशासनाने हा अद्यादेश दडवून ठेवला. दुसरीकडे परवाना नूतनीकरण केला नाही म्हणून हॉस्पिटल्सकडून दिवसाला ५० रूपये याप्रमाणे दंड वसूल केला. ही बाब बेकायदा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दंड वसुली थांबवण्यात आली. प्रशासनातील अधिकारी जाणूनबुजून या अद्यादेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांनी केला. अनधिकृतपणे पैसे घेण्यासाठी हे कारस्थान असून, त्याविरोधात पोलिसांकडे दाद मागण्यात येईल. आमचे पुरावे सक्षम असून, संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी विधीमंडळात पाठपुरावा केला जाणार असल्याचे कोतवाल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्या अखेर जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाला. त्यामुळे खडांगळी- वडांगळी परिसरातील नागरिकांनी निःश्वास सोडला आहे. अनेक दिवसांपासून तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले होते. बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले होते. या प्रकरणी वन विभागाने खडांगळी येथील शेतात पिंजरा लावला होता. भक्ष्याच्या आमिषाने आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सोमवारी सकाळी हा पिंजरा मोहदरी येथील उद्यानात ठेवण्यात येणार असून, त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशान्वये त्याची रवानगी करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आढळली पुरातन रहाड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात असलेल्या राहाडींमध्ये यंदा तांबट गल्लीतील पुरातन रहाड सुरू करण्यात येणार असून, ३९ वर्षानंतर ही रहाड खुली होणार आहे. त्यामुळे शनी चौक, गाडगे महाराज पूल, तिवंधा या रहाडींव्यतिरिक्त तांबट गल्लीतील चौथी रहाड सुरू होणार आहे.

तांबट गल्लीत पुरातन रहाड असल्याची माहिती परिसरातील कार्यकर्ते मनोज अंबादास लोणारी यांना मिळाली. अनेक पुरातन कागदपत्रे तपासून पाहिल्यानंतर या गल्लीत रहाड असल्याची त्यांची खात्री पटली. त्यानुसार जागेचा शोध सुरू केला. या ठिकाणी जुन्या जाणकार व्यक्ती राहत नसल्याने अनेकांच्या सांगण्यात तफावत येत होती. जागेविषयी संभ्रम होता. अनेकांकडून माहिती घेतल्यानंतर रहाड खोदण्याची जागा निश्च‌ित करण्यात आली व त्या ठिकाणी रहाडीचा शोध घेण्याचे ठरले. या कामासाठी अर्थिक पाठबळ आवश्यक होते. ही रहाड अनेक वर्षांनतर खोदली जाणार असल्याने सुरुवातीला जड जाणार होते. मनोज लोणारी यांनी रहाडीची माहिती या प्रभागातील नगरसेवक गजानन शेलार यांच्या कानावर घातली. त्यांनीही ही रहाड शोधण्यासाठी जो काही खर्च लागेल, तो करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार रविवारी सकाळी रहाड खोदण्यास सुरुवात झाली. अनेक फूट खाली गेल्यानंतरही रहाडीचा शोध लागत नव्हता. शेवटी १८ फुटांवर रहाडीचा शोध लागला. डांबरीकरणाची अनेक कामे झाल्यानंतर हा रस्ता उंच झाला होता. त्यामुळे रहाड शोधण्यास विलंब झाला. पेशवेकालीन रहाड सापडल्यानंतर येथील नागरिकांनी जल्लोष केला. ही १८ फूट लांबी, १८ फूट रुंद व १६ फूट खोल रहाड आहे. या रहाडीला दोन पायऱ्या आहेत. ४० ते ४५ वर्षांपूर्वी ही रहाड खोदण्यात आल्याचे जुने कार्यकर्ते सांगतात.

विधिवत पूजा होणार

मनोज लोणारी म्हणाले की, यंदाच्या वर्षापासून ही रहाड नियम‌ित उघडली जाणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी या रहाडीची विधीवत पूजा होईल. त्यानंतरच रहाडीत रंग खेळाखला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे शहरातील रहाडींवरदेखील गर्दी होणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. दुपारच्या सुमारास रहाडीच्या मानकऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजन करुन रंग खेळायला सुरुवात होणार आहे.

रहाडपूजेचा मान

पंचवटीच्या शनिचौकातील रहाडीचा मान रास्ते आखाडा तालिम संघाला, गाडगे महाराज पुलाजवळील रहाडीचा मान रोकडोबा तालिम संघाला तर तिवंध्यातील रहाडीचा मान मधली होळी तालिम संघाला आहे. येथील पदाधिकारी व मानकऱ्यांच्या हस्ते पूजन होऊन रंग खेळण्यास सुरुवात होईल. रंगपंचमीसाठी लागणारे रंग बाजारात उपल्बध झाले असून, पर्यावरणपूरक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक मंडळांनी फुलांपासून तयार करण्यात येणाऱ्या रंगाला प्राधान्य दिले आहे. दांगट गल्लीत केशरी रंगाची परंपरा आहे. त्यामुळे या ठिकाणी अष्टगंध वापरुन रंग तयार केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ हजार टीव्हींचे प्रक्षेपण होणार बंद!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेट टॉप बॉक्स बसविण्याचे वारंवार आवाहन करूनही केबल ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपत आहे. अजूनही जिल्ह्यातील १७ हजार ३३९ ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविले नसून, मुदतीपूर्वी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, तर अशा ग्राहकांचे प्रक्षेपण बंद केले जाणार आहे.

केबलचालक ग्राहकांची लूट करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सरकारने सेट टॉप बॉक्स बसविण्याची मोहीम हाती घेतली. सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी किमान दीड ते दोन हजार रुपयांचा भुर्दंड ग्राहकांना बसत असल्याने तेदेखील असे बॉक्स बसविण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. म्हणूनच सुरुवातीला महानगरांत, नंतर नगरात, त्यानंतर ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये आणि शेवटी कमी लोकवस्तीच्या छोट्या गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. ३१ डिसेंबर ही त्यासाठी अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. परंतु, ही मोहीम १०० टक्के यशस्वी होत नसल्याने ही मुदत तीन महिन्यांनी वाढविण्यात आली. जिल्ह्यात ३७ हजार ५७० ग्राहकांकडे केबल प्रक्षेपण दिसते. त्यापैकी २० हजार २३१ ग्राहकांनीच सेट टॉप बॉक्स बसविले आहेत. परंतु, अजूनही १७ हजार ३३९ ग्राहक म्हणजेच सुमारे ४५ टक्के ग्राहकांनी बॉक्स बसविलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानासाठी दोन पॅनलमध्ये लढत?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत रोजच नवीन ट्विस्ट येत असून, आता अध्यक्षपदासाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र यातील तीन नावे एकाच गटाची असून, चौथे नाव मात्र जनस्थान ग्रुपमधून आलेले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे मावळली असून सरळसरळ दोन पॅनल होण्याची दाट शक्यता आहे.
अध्यक्षपदासाठी आतापर्यंत चार नावे आली असून प्रभाकर कुलकर्णी, विलास औरंगाबादकर आणि मधुकर झेंडे हे जवळपास एकाच गटाचे असून चौथे नाव सुरेश गायधनी मात्र दुसऱ्या गटाचे आहेत. शहरातील नावाजलेला व्हॉटस अॅप ग्रुप ‘जनस्थान’मधून सुरेश गायधनी यांचे नाव आलेले असून, त्यांचे एक वेगळे पॅनल होण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदासाठी १० अर्ज दाखल झाले आहेत. त्यात नानासाहेब बोरस्ते, रमेश जुन्नरे, प्रभाकर कुलकर्णी, कांतिलाल कोठारी, यशवंत पाटील, अरूण नेवासकर, धनंजय बेळे, आकाश पगार, किशोर पाठक व भालचंद्र वाघ यांची नावे आहेत. कार्यकारिणीसाठी एकूण ९९ अर्ज दाखल झाले असून, त्यातही मोठी नावे आहेत.
यंदाच्या निवडणुकीत अत्यंत कमी म्हणजे बोटावर मोजण्याइतक्या महिला आपले नशीब आजमवत असून त्यातही काही परिचित चेहरे आहेत तर काही चेहरे रूळलेले आहेत. अर्ज विक्री आणि स्वीकृतीची मुदत संपली असून आता अर्ज छाननीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

छाननीच्या वेळेबाबत वाद

अर्ज छाननी गुरूवार, १६ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. इतर कोणत्याही संस्थांची निवडणूक होते तेव्हा अर्ज छाननीची वेळ सकाळची किंवा दुपारची ठेवण्यात येते. मात्र, सावानाने अर्ज छाननीची वेळ सायंकाळी ६ ते ८ अशी ठेवली आहे. आठ वाजेनंतर कोण हरकत घेणार व दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ मार्च रोजी रंगपंचमीची सुटी आहे. त्यामुळे तो दिवसही वाया जाईल, या कारणाने काही सभासदांमध्ये नाराजी आहे.

गायधनींचे वाचनालयाला पत्र
प्रशांत जुन्नरे यांच्याकडून पैसे घेतले व ते वाचनालयात भरले नाही, असा ठपका सुरेश गायधनी यांच्यावर सावाना अध्यक्षांनी ठेवला होता. मात्र, याला सविस्तर उत्तर गायधनी यांनी दिले होते. तरीही त्यांचा अध्यक्षपदाचा अर्ज भरून घेऊ नये अशी लेखी सूचना अध्यक्षांनी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना केली असल्याचे गायधनी यांचे म्हणणे आहे. छाननीमध्ये हा अर्ज या प्रकरणावरून बाद करण्यात येईल व त्यानंतर बोलायची संधी देणार नाही अशी काही खेळी अध्यक्ष खेळत असल्याचेही गायधनी यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी वाचनालयाला पत्रदेखील दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक काळात अशाप्रकारे रक्कम दाखवून निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा विचार तर नाही ना? परस्पर हा निर्णय घेण्यापूर्वी कार्यकारी मंडळाला विश्वासात घेतले होते का? या पत्राचा आधार घेऊन काही गैरप्रकार तर करणार नाहीत ना, अशी शंका येत असल्याचेही गायधनी यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, गोदावरीश्‍ाी नाते जोडूया...

0
0

‘मटा’तर्फे १९ मार्चला तपोवन मल-जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीला लाभलेल्या पौराणिक व धार्मिक महत्त्वामुळे नाशिककरांचे गोदेशी एक वेगळचं नातं जडलं आहे. मात्र गोदेत सांडपाणी व मैलापाणी मोठ्या प्रमाणात मिसळले जात असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. हे लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र टाइम्स’ने जागतिक पाणी दिनानिमित्त १९ मार्चला, रविवारी ‘सांडपाण्याचे नेमके काय होते’ हे समजून घेण्यासाठी तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्राला भेटीचे आयोजन केले आहे. यावेळी महापालिकेचे अधिकारी व पाण्याशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींशी संवादही साधता येणार आहे.

‘गोदावरीशी नाते जोडूया’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र टाइम्स, नाशिक महापालिका व इंडियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, मोहाली यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोहाली येथील इंडियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या संस्थेच्या विद्यार्थीनी शिल्पा डहाके म्हणाल्या, शहरातील नदी-नाल्यांमध्ये गेल्या काही दिवसात मलजलचा प्रश्न गंभीर होत असताना महापालिका पाण्याच्या पुनर्वापरावर भर देत आहे. नदी-नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरात यावे यासाठी नाशिक महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र ही जबाबदारी फक्त महापालिकेची नाही. गोदावरीच्या प्रदूषणाची समस्या फक्त नदीपात्रापुरती मर्यादीत आहे असा आपला समज असतो. मात्र गोदावरीच्या प्रदूषणाचा आपल्या प्रत्येकाच्या घराशी संबंध आहे. घरातील सांडपाणी व मैलापाणी नदी पात्रात थेट जाऊ नये म्हणून महापालिकेतर्फे शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना समजून घेतल्यास शुद्धीकरण प्रकल्पांवर होणार खर्च व आपल्या घरातून बाहेर पडणारे सांडपाणी कमी कसे करता येईल याबाबत जनजागृती होण्याची गरज या भेटीतून समजून घेतली जाणार आहे.’ कमीत कमी सांडपाणी घरातून बाहेर पडल्यास तसेच नाशिककरांमध्ये पाण्याचा वापर व प्रदूषणाबाबत जनजागृती झाल्यास अनेक समस्या सुटू शकतात, असेही डहाके यांनी सांगितले.

जलशुद्धीकरणाची प्रक्रिया

तपोवनातील मलजलशुद्धीकरण प्रक्रियेचा प्रकल्प पाहण्याची संधी या उपक्रमातून मिळणार असून, घरातून जाणारे सांडपाणी कसे एकत्रित केले जाते. त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रकल्पात कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते, या प्रक्रियेचे टप्पे, त्यातून तयार होणारा मिथेन वायूचा वापर, शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर तसेच साठलेल्या गाळाचा वापर याबाबत माहिती व प्रकल्पाचे सादरीकरण महापालिकेचे अधिकारी करणार आहेत.

यूएन-वॉटर पोर्टलवर नाशिक

‘द युनायटेड नेशन’च्या यूएन-वॉटरची यंदाच्या जागतिक पाणी दिनानिमित्त सांडपाणी व त्यावरील प्रक्रिया ही संकल्पना आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या ‘सांडपाण्याचे नेमके काय होते’ या उपक्रमाची यूएन-वॉटर पोर्टलवर नोंद केली जाणार आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनात नाशिक महापालिका व विविध संस्था संघटनांकडून सुरू असलेल्या कामाची नोंदही या पोर्टलवर होणार असल्याचे शिल्पा डहाके यांनी सांगितले.

भेट कधी व कुठे ?

तपोवनातील मल-जलशुद्धीकरण प्रकल्प

वेळ : सकाळी ९ वाजता.

नाव नोंदणीसाठी संपर्क : ७०८७१९०७३८ / ८३८००९८१०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images