Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘सावाना’त १७ लाखांचा भ्रष्टाचार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेमध्ये १७ लाख ५ हजार १५२ रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, ही रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, तसेच फसवणुकीसंदर्भात संबंधितांविरुध्द दिवाणी व फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी असा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या तीन निलंब‌ित पदाधिकाऱ्यांचे आजीव व प्राथमिक सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, असा ठरावही या सभेने मंजूर केला.

२९ जानेवारी रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मिलिंद जहागिरदार, स्वानंद बेदरकर आणि प्रा. विनया केळकर यांच्यावर सभासदत्व निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. हे सभासदत्व आता कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करून सभेला सुरुवात झाली. प्रथम मागील सभेचे इतिवृत्त पी. वाय. कुलकर्णी यांनी वाचून दाखवले. ते मंजूर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी नूतनीकरण कामात झालेली अनियमितता आणि गैरव्यवहार याचा उल्लेख करीत ‘आम्ही पारदर्शी अहवाल’ सादर करीत असल्याचे सांगितले. पाच वर्षांपूर्वी ५ तारखेला निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे त्याच तारखेला मुदतीच्या आत हा अहवाल सादर करीत असल्याचे सांगत, जो चुकला तो चुकला, परंतु अध्यक्ष म्हणून चुका समोर आणणे हे आपले काम आहे, असेही अध्यक्ष प्रा. औरंगाबादकर म्हणाले.

मुक्तद्वार विभागाचे ८० हजार, वॉल कंपाऊंड जाह‌िरातींचे २२ हजार ६६० तसेच वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाह‌िरातींचा खर्च एक लाख ३४ हजार ३५५ रुपये आणि दोन लाख ५५ हजार रुपये अशा सहा लाख रुपयांचा खर्च मिलिंद जहागिरदार यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशा स्वरुपाची नोटीस त्यांना बजावली होती. त्यांनी त्यास कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे याबाबत आपले काहीही म्हणणे नाही, अशा आशयाचे पत्रही अध्यक्ष औरंगाबादकरांनी जहागीरदार यांना दिले. त्यानंतर सरकारी मान्यताप्राप्त व्हॅल्युअर आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांचा या नूतनीकरण कामाबाबत अहवाल अॅड. श्रीधर व्यवहारे यांनी प्रेझेंटेशनसह सादर केला. त्यात त्यांनी पुढील आक्षेप नोंदवले- कामामध्ये अनियमितता, जागेवर जाऊन मोजमाप करून सविस्तर अभ्यास, आर्किटेक्ट असावा आर्ट कन्सल्टंट नसावा, प्रोजेक्टचे प्लॅनिंग नाही, कामाचे अंदाजपत्रक नाही, कामाचा आराखडा नाही, कामाची निविदा देण्यात आलेली नाही, २० ते ३५ टक्के लेबर कॉस्ट होते ती मटेरिअलपेक्षा १३० टक्के जास्त लागली. त्यातही ज्या माणसांनी हे काम केले त्यांना खुलासा देण्यासंदर्भात सावानात पाचारण केले असता यापैकी एकही जण तेथे आला नाही. यातून निलंबीत केलेले पदाधिकारी दोषी असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

सभेत त्यानंतर सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पां. भा. करंजकर म्हणाले की, १७ लाख ही केवळ रक्कम दिसते आहे. त्यापेक्षाही मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. हा निधी जमा करून खर्च केला असता तर बरे झाले असते. ‘सावाना’चाच पैसा खर्च करण्यात काय हशील, असेही करंजकर म्हणाले. यावेळी एन. एम. आव्हाड यांनी ‘सावाना की साखर कारखाना’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच वाचनालय ही पवित्र संस्था आहे. तेथे असे प्रकार घडू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली. जो भ्रष्टाचार झालाय, तो हेतूपुरस्सर केला गेला आहे. डिझाइन करप्शन आहे, असेही ते म्हणाले.

या सर्व प्रकारावर माजी कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी तोफ डागली. ते म्हणाले की, एका वृत्तपत्रात जाह‌िरात आली आहे. ती संस्थेच्या विरोधात आहे. अॅड. विनयराज तळेकर हे सावानाच्या पॅनलवर असून त्यांनी संस्थेच्या विरोधात वकीलपत्र घेतले. त्यामुळे त्यांची सनदच रद्द झाली पाह‌िजे. अध्यक्षांवर प्रेशर आणले गेल्याचेही बेणी म्हणाले. काही पदाधिकारी अद्याप तळ्यात-मळ्यात आहेत. त्यांना कुणाच्या बाजूने उभे रहावे हे कळत नसल्याचे सांगत बेणी यांनी संस्थेच्या तिजोरीत हा पैसा परत आला व न्यायालयाने जहागीरदार व त्यांच्या सहकाऱ्यांवर कडक कारवाई केली, तरच आम्हाला समाधान मिळेल असेही सांगितले. डॉ. अभय राजे यांनी कार्यकारिणीला दोषी धरत जहागीरदारांचा मनमानी कारभार कार्यकारीणीने थांबवायला हवा होता, असे सांगतानाच जहागीरदारांनी जातीय तेढ वाढविण्याचे काम केले असून, यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा काढून टाकल्याचा पुनरूच्चार केला. कोनश‌िला पायात का बसवली, याबाबतही त्यांनी पुन्हा विचारणा केली. या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच कार्यकारिणीने त्यांचे सभासदत्व रद्द करावे असे सांगितले.

सभेत पाच ठराव

सभेत एकूण पाच ठराव करण्यात आले. त्यापैकी २९ जानेवारीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, नुकसानीची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यासाठी दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात यावी, जहागीरदार, बेदरकर व प्रा. केळकर यांचे आजीव व प्राथमिक सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, अॅड. विनयराज तळेकर यांनी संस्थेविरूध्द वकीलपत्र घेतल्याने त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनकडे वाचनालयाने तक्रार करावी आणि अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकरांचे अभिनंदन असे ठराव सभेत करण्यात आले.

नूतनीकरणातील जादा खर्च

फॅब्रिकेशन कामातील तफावत -४,८१,९६८

रंगकाम मजुरीपोटी जादा दिलेली रक्कम- ४, १४, ८५४

सुतारकामाच्या प्लायमधील ५० टक्के खर्चाची तफावत- ७,८७,०९४

नूतनीकरण कामात झालेला एकूण संशयास्पद खर्च -१६,८३,९१६


शाहू खैरेंची एण्ट्री!

पिंपळपारावर अनोख्या मैफल घडवून आणणारे व सांस्कृतिक क्षेत्रात ओळख निर्माण केलेले नगरसेवक शाहू खैरे यांचे वाचनालयात आगमन होते आणि चर्चेला एकच उधाण येते. नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे शाहू खैरे हे वाचनालयाच्या पायऱ्या चढल्याने आणि निवडणुका मार्चमध्येच असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यातच माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यादेखील नव्यानेच सभासद झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

..हे तर भ्याड अध्यक्षांचे कारस्थान!

सार्वजनिक वाचनालयाच्या विशेष सर्वसाधारण सभेत जे निर्णय घेऊन आमची बदनामी करण्यात आली, ते पूर्णत: खोटे व बेकायदेशीर आहे. वाचनालयाचे अध्यक्ष हे स्वत:च खुलेआम लबाड्या करीत असून, आमच्यावर कारवाई केल्याचा आणलेला आव मोठा बनाव आहे. आम्हाला दिलेली सदस्यत्व स्थगितीची पत्रे हीच बेकायदेशीर असल्याचा स्वच्छ निर्णय गोरवाडकर समितीने दिल्याने आमच्यावर लादण्यात आलेले निलंबन आणि आज झालेल्या सभेतील कामकाज आणि निर्णय पूर्णत: घटनेची पायमल्ली करणारे आहे असल्याची प्रतिक्रिया सावानाचे माजी पदाधिकारी मिलिंद जहागीरदार यांनी दिली.

आमचे हात स्वच्छ आहेत. त्यामुळेच गेले काही महिने खूप शोधाशोध करूनही औरंगाबादकर आणि त्यांच्या गैरकारभारात त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना आमच्या कारभारात खोट सापडत नाही. म्हणूनच बनावट कागदपत्रे आणि बनावट अहवाल तयार करून आमच्या विरोधात बदनामीचे कुभांड रचले गेले आहे. आम्हाला पूर्णत: निर्दोष ठरविणारा गोरवाडकरांचा अहवाल औरंगाबादकरांना अडचणीचा ठरल्याने तो फेटाळून लावत इतर सर्व खोटे अहवाल गेल्या सभेत ठेवण्यात आले. आजदेखील स्वत:ला सोयीचा ठरणारा एकतर्फी आणि म्हणूनच खोटा अहवाल जनतेसमोर आणून आमची बदनामी करण्यात आली आहे. गव्हर्नमेंट अॅप्रूव्ह्ड व्हॅल्युअर आर्किटेक्ट ह्या शब्दांचा बागुलबुवा उभा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आजच्या सभेत झाला आहे. परंतु, त्याला काहीही अर्थ नाही. ज्यांना सरकारी कामांची आवश्यकता असते ती मंडळी सरकारकडे अर्ज करून गव्हर्नमेंट अॅप्रुव्ह्ड होतात. याचा अर्थ ते न्यायाधीश होत नाहीत, असेही जहागीरदार, स्वानंद बेदरकर व प्रा. विनया केळकर यांचे म्हणणे असून, चौकशी करण्यासाठी औरंगाबादकरांना नाशिकमध्ये आर्किटेक्ट सापडले नाहीत. त्यासाठी त्यांना मनमाडमधून आर्किटेक्ट आयात करावे लागले. कारण यांना पाहिजे तसा अहवाल, चौकशी न करता लिहून देणारा आर्किटेक्ट नाशिकमध्ये मिळणे अवघडच होते. असेही त्यांनी पत्रकात नमूद केलेले आहे.

ज्या अहवालांवरून आमच्याकडून रक्कम वसूल करण्याचे आणि त्यासाठी आमच्यावर कारवाई करण्याचे आजच्या सभेत ठरविले आहे, ते अहवालच मुळात सर्वथा खोटे असून, उलट आम्ही नूतनीकरणाच्या कामात सावानाचे लाखो रुपये वाचवले आहेत. नूतनीकरणाच्या झालेल्या सर्व खर्चाला कार्यकारिणीने विचारपूर्वक मंजुरी दिली आहे आणि त्यापैकी कित्येक सभांना स्वत: अध्यक्ष उपस्थित होते. आम्ही कोणतेही घटनाबाह्य काम केलेले नाही आणि आणि सावानाचे एकही रुपयाचेही नुकसान आमच्या हातून झालेले नाही हे त्रिवार सत्य आहे.

आमच्यावर सतरा लाखांचा आरोप ठेवण्यासाठी ह्यांच्याकडे काहीही पुरावा नाही. कारण असे काही प्रत्यक्षात घडलेलेच नाही. तसेच आमचे सभासदत्व रद्द करण्याचाही या सभेला घटनेप्रमाणे काहीही अधिकार नाही. परंतु अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबरील लोक या सर्व गोष्टी बेकायदेशीररीत्या करीत आहेत. आम्हाला त्यांच्या एकेका कृत्याविरुद्ध न्यायालयात दाद मागावी लागत आहे. न्यायालयामध्ये दिरंगाई होऊ शकते यावर यांचा पूर्ण विश्वास असल्याने व यांच्याकडे नीत‌िमत्ता नसल्याने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घडवून आणलेले नाट्य आहे. त्यासाठी कुठलाही विधीनिषेध न ठेवता सावानाबाह्य शक्तींचीसुद्धा कुमक घेण्यात आलेली आहे. कार्यकारिणीमध्ये आमच्याकडे बहुमत असल्याने हा अध्यक्षांकडून पाठीत वार करण्यात आलेला आहे. आम्हाला निवडणूकच लढवता येऊ नये यासाठी आजच्या सभेत आमच्यावर ठपका ठेऊन औरंगाबादकरांनी ते स्वत: भ्याड असल्याचा पुरावाच दिला आहे, असेही जहागीरदार यांचे म्हणणे आहे. पत्रकावर प्रा. विनया केळकर, स्वानंद बेदकर यांचीही स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवकेमुळे येवला बाजार समिती हाऊसफुल्ल

$
0
0

पुन्हा कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी नाराज

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या काही दिवसांत लाल कांदा आवकने बाजार समित्या गजबजून गेल्या असतांनाच कांदा लिलावासाठी बाजार समिती शुक्रवारी (दि. ३) अगदी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजार समितीची वाट धरल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती अक्षरशः हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसले.

येवला बाजार समितीच्या मुख्य आवारात बाराशेच्या आसपास ट्रॅक्टर्स कांदा लिलावासाठी दाखल झाल्याने आवारात ट्रक्टर्स मावेनासे झाले होते. शनिवारीदेखील कांदा घेऊन आलेल्या पिकअप रिक्षांमुळे बाजार समिती तुडुंब भरली होती. येवल्यात शुक्रवार व शनिवार या दोनच दिवसांत तब्बल ८२ हजार क्विंटलच्या वर लाल कांद्याची आवक झाली.

रविवारच्या (दि. ५) साप्ताहिक सुटीमुळे या शुक्रवारी, शनिवारी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला अन् साहजिकच प्रचंड कांदा आवक झाल्याचे चित्र येवल्यात समोर आले. शनिवारीदेखील पुन्हा भाव पडल्याने कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे चेहरे पडले होते. येवला बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ५४३ (सरासरी ५००) असा बाजारभाव मिळाला होता. शनिवारी तो किमान ३०० ते कमाल ५२० (सरासरी ४९० रुपये) असा झाला.

दोन लाख क्विंटल आवक

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात शुक्रवारी, जवळपास अकराशे ते बाराशे ट्रॅक्टर्समधून ४० हजार क्विंटल, तर अंदरसूल उपबाजार आवारात सहाशे पिकअप रिक्षांमधून जवळपास १० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. शनिवारी येवला आवारात सुमारे ९०० पिकअप रिक्षांमधून जवळपास १२ हजार क्विंटल, तर अंदरसूल उपबाजार आवारात ७०० ट्रॅक्टर्समधून सुमारे २० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. चालू सप्ताहात येवला मुख्य आवार व अंदरसूल उपबाजार आवारात तब्बल एकूण १ लाख ९५ हजार ७३१ क्विंटल इतकी लाल कांद्याची आवक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारीही मिळाले लर्निंग लायसन्स

$
0
0

आरटीओचे कामकाज सुटीच्या दिवशीही सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक काळात सुटीमुळे नागरिकांची झालेली गैरसोय टाळण्यासाठी पेठरोड येथील नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय रविवारी (५ मार्च) देखील सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे नियोजित वेळी लर्निंग लायसन्स न मिळू शकलेल्या १२५ नागरिकांच्या हाती रविवारी लर्निंग लायसन्स पडले.

निवडणूक काळात आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली होती. उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या वाहनांची तपासणी करून त्यांना परवानगी देण्याची जबाबदारी पार पाडावी लागली. या कामासाठी आरटीओचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी तालुक्याच्या गावांनाही जात होते. त्यामुळे पेठरोड येथील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. २१ फेब्रुवारी रोजी महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी मतदान असल्याने या दिवशीदेखील सुटी देण्यात आली होती.

परिणामी या सुटीच्या कालावधीत ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणाऱ्या नागरिकांना लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या नागरिकांची परीक्षा घेणे आवश्यक असल्याने संबंधित कामकाज पाहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी कार्यालयात कामावर यावे, असे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी कार्यालयीन वेळेत लर्निंग लायनस परीक्षा तसेच लायसन वितरणाचे काम सुरू ठेवण्यात आले.

नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन रविवारी कामकाज सुरू ठेवण्यात आले. हा निर्णय आम्ही आमच्या स्तरावर घेतला. १२५ नागरिकांनी लर्निंग लायसन्ससाठी आज ऑनलाइन परीक्षा घेतली.

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदे वाचवण्यासाठी विकतचे पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळग्रस्त चांदवड तालुक्यात आता कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात विहिरी आटत चालल्याने कांद्याचे पीक वाचवण्यासाठी पैसे देऊन टँकरचे पाणी आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र आहे.

एकीकडे कांद्याचे भाव कोसळत असताना शेतात लावलेले कांद्याचे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चांदवड तालुक्यात निमोणसह विविध ठिकाणी विकत पाणी आणून कांद्याला दिले जात आहे. मार्चमध्ये ही अवस्था असल्याने पुढील दोन महिन्यात काय घडणार, या प्रश्नाने शेतकरी काळजीत सापडला आहे. चांदवड तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मार्च महिन्यातच कडाक्याच्या उन्हाने नागरिकांना त्रस्त केले आहे. त्यातच ग्रामीण भागात विहिरी व बोअरवेल आटत चालल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे सध्या निमोणसह तालुक्यात विविध भागात अनेकांनी कांद्याचे पीक घेतले आहे.

उन्हाळ कांद्याची लागवड बऱ्यापैकी आहे. त्या कांद्याला पाणी देण्यासाठी ५०० रुपये देऊन खासगी टँकरने पाणी आणले जात आहे. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर आहे, त्यांना २०० रुपये देऊन पाणी टँकरने आणावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कांद्याला मिळणारा भाव व कांद्यासाठी होणारा खर्च याचा मेळ बसत नसल्याने आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता पाण्यावरील खर्चाने भंडावून सोडले आहे. खर्च किती? पैसे मिळणार किती? आणि उरणार काय? या सर्व प्रश्नांनी शेतकरी ग्रासले आहेत. पुढील दोन महिने कसे काढायचे? या विवंचनेत शेतकरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष मतदार नोंदणीचा श्रीगणेशा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ऑल वूमेन्स बाइक रॅलीच्या ठिकाणी महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदार नोंदणीचे ५३९ अर्ज येथे जिल्हा प्रशासनाद्वारे वितरित करण्यात आले. त्यापैकी १५ महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह लगेचच अर्ज जमाही केले.

महिला दिनाचे औचित्य साधून यंदा प्रथमच जिल्हा प्रशासनाने महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासह तालुक्यांमध्येही हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा श्रीगणेशा रविवारी (दि. ५) भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्रवेशद्वारावर झाला. महाराष्ट्र टाइम्स आणि जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बाइक रॅलीतील सहभागी महिलांसाठी मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. या अभियानाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बहुतांश महिलांनी जिल्हा प्रशासनाच्या स्टॉलला भेट दिली. काही महिलांनी आमची मतदार नोंदणी पूर्वीच झाली असल्याचे सांगितले, तर काहींनी बाइक रॅलीच्या निमित्ताने मतदार नोंदणीचीही पर्वणी साधली. कुणी स्वत:साठी, कुणी बहिणीसाठी, कुणी मुलीसाठी, तर कुणी आपल्या अन्य नातलगांसाठी मतदार नोंदणी अर्ज घेतला. सकाळी पावणेआठ ते पावणेअकरा या तीन तासांत तब्बल ५३९ अर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार सुरेश कांबळे यांनी दिली. त्यापैकी १५ महिलांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडून अर्ज जमाही केले. हे अभियान यशस्वीतेसाठी अतुल पेठकर, अशोक संसरे, विनायक बोरसे, विजय वाघ आदींनी प्रयत्न केले.

येथे स्वीकारणार अर्ज

नवीन नावनोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६, मतदार ओळखपत्रातील नाव व पत्ता दुरुस्तीसाठी फॉर्म ८ आणि ८ अ बाइक रॅलीच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. बहुतांश महिलांनी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे आणली नव्हती. त्यांना आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिक तहसीलदार कार्यालयात अर्ज जमा करता येणार आहेत. अर्जासोबत अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्डची छायांकित प्रत, वीजबिल किंवा दूरध्वनी देयकाची छायांकित प्रत, १ जानेवारी २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण झाल्याबाबतचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माच्या दाखल्याची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची चाहूल

$
0
0

पंचायत समितीकडून आराखडा तयार; होळीपूर्वीच टँकरचे प्रस्ताव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

मार्च महिना लागताच त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. होळीपूर्वीच टँकरचे प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात यापूर्वी जानेवारी अखेरपासूनच सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र दोन महिने उशिराने सुरू झाले आहेत. हा परिणाम यावेळेस चांगला पाऊस आणि काही वर्षात जलसंधारणाची झालेल्या कामांमुळे आहे. वर्षानुवर्षे त्र्यंबकच्या काही भागात पाणीटंचाईचे संकट कायम राहिले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच त्र्यंबक पंचायत समितीकडे सोमनाथ नगर, मेटघर किल्ल्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरावर व दरी खोऱ्यातील भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो व सरळ वाहून जातो. त्र्यंबक पंचायत समितीने पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या टंचाई आराखड्यात तीन टप्पे करण्यात आले आहे.

या आराखड्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देवगावच्या ढोलेवाडी, लचकेवाडी, खरशेतचे पांगूळघर जांभूळपाडा, सारवण, कसोली, मुरुमहट्टी, शेंद्रीपाडा, सादडपाडा, करंजपाणा, चौरापाडा, वळण सावरपाडा, बोरपाडा, डगळे वाडी, बोरीपाडा, भानसमेट, बोर्डींगपाडा, मेटघर किल्ला आदी २० गावे व ७७ वाड्यांचा समावेश आहे. अद्याप तिसऱ्या टप्प्यातील गावांचे प्रस्ताव आले नसले तरी एप्रिल मे पर्यंत येतीलच. दरम्यान, अशा परिस्थितीत या सर्व पाड्यांवर सध्याला अनेकठिकाणी विंधन विहिरींची उपाययोजना सुचविली आहे. तर ५ गावे ३० वाड्यांना टँकरने व ज्या ठिकाणी टँकर जात नाही तेथे बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार ‘प्रगतीत आहे’, ‘पाइपलाइनचे काम बाकी आहे’, ‘विद्युत पुरवठ्याचे काम बाकी आहे’ असे शेरे मारून वर्षांपासूनचे कामे अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाईवर उपाययोजना केवळ कागदावर न करता त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्र्यंबकेश्वरजवळील ग्रामस्थांसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्यास ही पाणाटंचाई जाणवणार नाही. आणि येणाऱ्या महिन्यांमध्ये पाणाटंचाई भेडसावणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेट्यांचा तुरा बाइकचा रुबाब!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरजरी नऊवारीचा साज जपत, मस्तकावरील फेट्याचा रूबाब सांभाळत विविधरंगी, विविधढंगी वेशभूषेसह संवेदनशील सामाजिक संदेशांमुळे रविवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ऑल वूमेन्स बाइक रॅली शहरात चर्चेचा विषय ठरली. भोसला कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास रविवारी हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या उपक्रमास बहार आली. अगदी कॉलेजकन्यकांपासून ते साठी उलटलेल्या आजीबाईंपर्यंत सर्वांनी विविध प्रकारच्या बाइकवर स्वार होत, आपल्यातला उत्साह, उमेद दाखवून दिली आणि जबरदस्त जल्लोष केला.

वेशभूषेसाठी पारंपरिक थीमसह वेस्टर्न लूकवरही भर देत अनेक महिला वूमेन्स डेनिमित्त आयोजित या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. हाती असणाऱ्या स्कूटीपासून, तर रॉयल एनफ‌ल्डिपर्यंत विविध गाड्या रुबाबदारपणे चालवत महिलांनी उत्साही जल्लोष केला. सीएचएमई सोसायटीच्या विद्या प्रबोधिनी शाळेच्या (कॉलेजरोडकडील गेट) मैदानावरून सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास या रॅलीला सुरुवात झाली. महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुम‌ति बग्गा, माजी मिस फेम‌निा उत्तरा खेर, आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, क्रीडा प्रशिक्षक विजयेंद्र सिंग, ब्रह्माकुमारी परिवारातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या उपक्रमात सहभागी महिलांनी त्यांच्या वाहनांची कल्पकतेने सजावट करत सामाजिक संदेशांचे फलक हाती घेतले होते. पारंपरिक वेशभूषेतील महिलांच्या सहभागाने या उपक्रमात रंगत आणली.

भोसला मिलिटरी कॉलेजपासून सुरू झालेल्या रॅलीचा कॉलेजरोडमार्गे डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूररोड, जेहान सर्कल, नवश्या गणपती, बारदान फाटा, साधना मिसळ, मोतीवाला कॉलेज, त्र्यंबकरोड, एबीबी सर्कल असे सुमारे बारा किलोमीटरचे अंतर पूर्ण करून पुन्हा भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानावर समारोप झाला.

संदेशांतून समाजप्रबोधन

घराच्या उंबरठ्यापासून तर प्रत्येक आघाडीवर लढणाऱ्या महिलांनी या उपक्रमात सहभागी होताना सामाजिक संवेदनाही जागविल्या. यावेळी ‘मुलगी वाचवा’, ‘पर्यावरण, पाणी वाचवा’, ‘वाहतूक नियम पाळा’, ‘सार्वजनिक स्वच्छता’ यांसारख्या विविध सामाजिक विषयांबाबत प्रबोधन करणारे संदेश दिले.

ड्रेसकोडने वेधले लक्ष

या उपक्रमात अनेक महिलांनी नावनोंदणी ही समूहानेच केली होती. समूहाने सहभागी होताना वेशभूषा, केशभूषा, ड्रेसकोडची थीम, सामाजिक संदेशांच्या संकल्पना यावेळी महिलांनी मांडल्या. यात ब्रह्माकुमारी परिवारातील साधक महिलाही सहभागी झाल्या होत्या. याशिवाय महिलांसाठी कार्यरत विविध संघटनाही रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. ग्रुपमधील महिलांच्या विविध ड्रेसकोडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

कॅप अन् फेट्यांची भुरळ

बाइक रॅलीत सहभागी अनेक तरुणी आणि महिलांनी छाप पाडण्यासाठी वेगवेगळे शिरस्त्राण परिधान केले होते. हेल्मेटसोबतच वेगवेगळ्या रंगांचे फेटे, राजस्थानी पगडी घालून महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. सोबतच पुणेरी पगडी, गांधी टोपी, ट्रॅव्हल कॅप, ट्रॅडिशनल रेट्रो कॅप यांचीही कमालीची चलती बाइक रॅलीत बघायला मिळाली. कॅप आणि फेट्यांमुळे प्रत्येकीचा लूक हटके दिसून येत होता.

हटके बाइक्सला पसंती

बाइक रॅलीमध्ये बुलेट, रॉयल एन्फिल्ड, यामाहा आरएक्स १०० या विंटेज बाइक्स आकर्षण ठरत होत्या. त्याचबरोबर रॅलीत सहभागी अनेक तरुणींनी यावेळी स्पोर्टस बाइकला पसंती दिली. कावासाकी निन्जा, यामाहा एफजी, करिझ्मा या बाइक्सवर स्वार होऊन तरुणींनी आपली वेगळी झलक दाखवून दिली. याचबरोबर गॅझेट क्लाउड ही ऑफ रोड बाइकही या रॅलीत आकर्षणाचा विषय ठरली. रोजच्या वापरातील मोपेड, बाइक्ससोबत गीअर बाइक्सचा अफलातून अनुभव घेत सर्वांनी बाइक रॅलीत कल्ला केला.

मराठमोळा तोरा...

नऊवार साडी, डोक्यावर फेटा, गॉगल, कोल्हापुरी चप्पल असा मराठमोळा तोराही यावेळी दिसून आला. बहुतांश महिला, तरुणींनी ही वेशभूषा साकार करून मराठी संस्कृतीचे दर्शन दाखवून दिले. विविधरंगी फेट्यांमधूनही महिलांची विविधतेत एकता यावेळी दिसून आली. महिला सक्षमीकरणासाठी भारतमाता, मदर तेरेसा यांच्या वेशभूषा महिलांनी साकारल्या होत्या. त्याचबरोबर एका चिमुकलीने गीता फोगट या कुस्तीपटूची वेशभूषा करून ‘छोरिया छोरों से कम नहीं’ असा फलक हातात घेऊन सामाजिक संदेश दिला.

नारीशक्तीचा दिला नारा

बाइक रॅली म्हणजे केवळ आनंद, उत्साह असे न माय़ता यापलीकडे सामाजिक जबाबदारीचे भानही महिलांमध्ये दिसून आले. आपल्या गीअर, मोपेड बाइक्स, टी-शर्ट, कॅपवर प्रत्येकीने संदेश लिहून आणला होता. तसेच, रॅलीमध्येही नारीशक्तीचा नारा या महिलांनी दिला. बेटी बचाओचा संदेश देण्यापासून ते सेफ ड्रायव्हिंग, पर्यावरण संरक्षण, सामाजिक विषयांना हात घालणाऱ्या घोषणा या महिला देत होत्या. या संदेशांनी बघ्यांची मने जिंकली.

ग्रुप्समुळे दिसले एकीचे बळ

बाइक रॅलीत आकर्षणाचा महत्त्वाचा भाग ठरला तो महिलांचे विविध ग्रुप्स. या ग्रुपमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीपासून ते पन्नाशी ओलांडलेल्या महिलांचा सहभाग होता. या प्रत्येक ग्रुपने आपले वेगळेपण दाखवून देण्याचा प्रयत्न यावेळी केला. प्रत्येक ग्रुपने आपली एकी दाखवून स्त्रिया सक्षम आणि खंबीर असल्याचे दाखवून दिले. वेगवेगळे ग्रुप्स असले, तरीही महिला सक्षमीकरणासाठी एकत्र येऊन एकीचे बळ महिलांनी दाखवून दिले.


झुम्बा डान्स अन् कौतुक

या रॅलीच्या समारोपाच्या सत्रात झुम्बा डान्स आकर्षण केंद्र ठरला. सहभागी सर्वच महिलांनी झुम्बाच्या तालावर ठेका धरत जोरदार जल्लोष केला. यावेळी रॅलीत सहभागी महिलांचे उत्कृष्ट पोशाख, उत्कृष्ट वाहन सजावट, चांगले सामाजिक संदेश आदी वर्ग करून त्यांच्यातील निवडक महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.


बक्षिसांद्वारे कौतुक...

रॅलीत सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बक्षिसे यावेळी देण्यात आली. यामध्ये सर्वांत जास्त वय असलेल्या प्रमिला पाटील यांना विशेष बक्षीस देण्यात आले. तसेच, ब्रह्माकुमारी ग्रुपलाही वेशभूषा आणि सामाजिक संदेशाबद्दल बक्षीस देण्यात आले. यावेळी ‘टाइम्स ग्रुप’च्या नाशिक रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या ठरल्या बेस्ट

बेस्ट वेस्टर्न कॉश्च्युम - जुईली पानसे

बेस्ट ट्रेडिशनल कॉश्च्युम - ईशा कुमावत

बेस्ट डेकोरेटेड हेल्मेट - डॉ. मनीषा रौंदळ

बेस्ट डेकोरेटेड बाइक - दीप्ती पुराणिक

बिगेस्ट ग्रुप - ठेवा संस्कृतीचा ग्रुप

बेस्ट मेसेज - आय अॅक्टिव्ह ग्रुप

---

मान्यवरांकडून दाद

‘महाराष्ट्र टाइम्स’चा हा उपक्रम म्हणजे महिलांसाठी जणू एक पर्वणीच असते. मी तर म्हणेण, फक्त महिला दिनानिमित्त नाही तर विविध कारणांनी महिलांनी एकत्र यावे, जेणेकरून खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण होईल. ‘महाराष्ट्र टाइम्स’वर्षभर असेच उपक्रम राबवावेत, असे मनापासून वाटते.

- अशोक मुर्तडक, महापौर

महाराष्ट्र टाइम्सची वूमेन्स बाइक रॅली म्हणजे एकप्रकारे नाशिकच्या महिलांसाठी एक सणाचा आणि आनंदाचा माहोल असतो. त्याचमुळे महिलांच्या एकीचे दर्शन आपल्याला घडते. इतक्या महिलांना एकत्र आणण्याचे काम सोपे नसते. भविष्यातही ‘मटा’ने असेच उपक्रम घेऊन महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

- गुरुमित बग्गा, उपमहापौर

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या इतक्या मोठ्या उपक्रमात सहभागी होऊन खूप छान वाटले. अगदी सर्वच वयोगटांतील सहभागाने महिलांची एकी दिसून आली. अनेक मुली स्वतः सजून आल्या होत्या. काहींनी आपली बाइक सजवली होती, हे बघून महिला कुठेच मागे राहिलेल्या नाहीत हे दिसले.

- मोनिका आथरे, धावपटू

नाशिकच्या मुलींमधील स्पार्क बघता पुढील वर्षी मोपेडपेक्षा गीअर बाइक्सची संख्या जास्त असेल यात शंका नाही. ‘मटा’ बाइक रॅलीच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. नवीन ओळख होते, अनेकांना नवीन मैत्रिणी भेटतात, सोबतच ऑफीस आणि घरच्या कामातून काही तरी हटके करायला मिळते, हे या वूमेन्स बाइक रॅलीमुळे शक्य होते.

- उत्तरा खेर, माजी मिस फेमिना

--


सहभागींचे बोल...

बाइक रॅलीने आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले असून, सामाजिक संदेश देण्यासाठी व सामाजिक उपक्रमांसाठी ‘मटा’ची वूमेन्स बाइक रॅली’ एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या रॅलीत सर्व महिला एकमेकींची तारीफ करीत प्रोत्साहित करत होत्या. वूमेन्स युनिटीची पॉवर या रॅलीतून नक्कीच सर्वांना समजली आहे.

- जयश्री पेखळे

यंदा बाइक रॅलीत सहभागी होण्याचे दुसरे वर्ष होते अन् पुढील वर्षीही नक्की येणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हायला हवे. बाइक रॅलीमुळे उत्साह दुणावतो हे नक्कीच. बाइक रॅलीत नारीशक्तीचा जल्लोष वाखाणण्याजोगा होता. अनोखा महिला दिन साजरा करता आल्याने ‘मटा’ला खूप धन्यवाद.

- दीप्ती भुतडा

महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीसाठी आधीपासूनच खूप उत्सुक होते. रॅलीचा एकूणच अनुभव खूप छान, रिफ्रेशिंग अन् जबरदस्त होता. रोजच्या धावपळीतून उसंत काढत महिला बाइक रॅली एन्जॉय केली. महिलांसाठी बाइक रॅली क्वचितच असते. वुई आर स्पेशल ही जाणीव नव्याने झाली.

- डॉ. रुपाली खैरे

आम्ही या बाइक रॅलीमधून ब्रेस्ट कॅन्सरबाबतचा सामाजिक संदेश देत रॅली फुल टू एन्जॉय केली. वूमेन्स बाइक रॅलीमुळे आम्हाला एक नवा प्लॅटफॉर्म मिळाला आणि यातून समाजात एक नवी चेतना निर्माण होऊ शकेल. महिलांना एकत्र आणणारे चांगले व्यासपीठ ‘मटा’ने उपलब्ध करून दिले असल्याचे मला वाटते.

- स्नेहल पुराणिक

‘मटा’च्या वूमेन्स बाइक रॅलीमध्ये आम्ही ग्रुपने खूप धम्माल केली. जागतिक महिला दिनानिमित्त बाइक रॅली घेऊन सामाजिक संदेश देण्यासाठी एकत्र आल्याने अभिमान वाटला. महिलांसाठी असे व्यासपीठ कायम उपलब्ध करून देण्यात यावे.

- गौरी मेतकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईपीओएस कार्यान्वयाचे आव्हान

$
0
0

पुरवठा सचिव पाठक यांनी घेतला आढावा; मार्चअखेरपर्यंतचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे स्वस्त धान्य वितरणातील काळाबाजार थांबेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी व्यक्त केला. ही यंत्रणा नाशिक विभागात तीन टप्प्यात कार्यान्वित होणार असून, मार्चअखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यातही सुरू करा, असे आदेश पाठक यांनी दिले. परंतु, इंटरनेट कनेक्शनसह अनेक अडचणींमुळे हे उद्दिष्ट कसे साध्य करणार याची चिंता पुरवठा अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे.

पुरवठा विभागाच्या ई-पीओएस या ऑनलाइन प्रणालीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पाठक रविवारी नाशिकमध्ये आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही आढावा बैठक झाली. यावेळी पुरवठा विभागाचे उपायुक्त रघुनाथ गावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके तसेच अन्य जिल्ह्यांचे पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकारी उपस्थित होते.

पाठक म्हणाले, सरकारी गोदामांमधून धान्याच्या उचलीबाबत ग्रुप एसएमएस केले जातात. यापुढे जाऊन आता कार्डधारकाने किती धान्याची उचल केली, याबाबतचा एसएमएसही त्याला प्राप्त होईल. स्वस्त धान्य दुकानदाराने गोदामातून किती धान्याची उचल केली याची नोंद ई-पीओएस मशिनमध्ये ऑनलाइन केली जाईल. मार्च अखेरपर्यंत बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरीत करता यावे, यासाठी ई-पीओएस मशिनचा वापर सुरू करण्यात आला आहे.

नाशिक विभागात ही प्रणाली तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून ,पहिल्या टप्प्यात नंदुरबारमध्ये ही प्रणाली विकसित करण्याचे आव्हान आहे. दुसऱ्या टप्प्यात जळगाव तर तिसऱ्या टप्प्यात नाशिक, अहमदनगर आणि धुळे या तिनही जिल्ह्यांत ही प्रणाली कार्यान्वित करावी लागणार आहे. तांत्रिक अधिकाऱ्यांचे ई-पीओएस मशिनचे प्रशिक्षण पूर्ण करणे, हे मशिन कार्यान्वित करतेवेळी येणाऱ्या अडचणी दूर करणे, कार्यान्वित रेशन दुकानांची संख्या, एकूण शिधापत्रिकांची संख्या, शिधापत्रिकांवरील सदस्य संख्या इत्यादींचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना आढावा बैठकीत पुरवठा अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

रेशन दुकानदार होणार बँक एजंट

रेशन दुकानदारांवरील अनेक निर्बंधांमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य गमावण्याची भीती वाटू लागली आहे. म्हणूनच बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी (बिझनेस करस्पाँडन्स) म्हणून काम करण्याची संधी रेशन दुकानदारांना केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या ठेवी गोळा करणे, कर्जदार शोधणे व कर्जवसुलीसारखी कामे ते करू शकणार असून, त्यावर त्यांना मानधन मिळणार आहे.

२५ दिवसांत कशी होणार सेवा सुरू?

ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा मिळत नाही. विभागात नंदुरबार आणि नाशिक हे आदिवासीबहूल जिल्हे आहेत. तेथील अनेक गावांपर्यंत पायाभूत सुविधादेखील पोहोचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे तेथे अवघ्या २५ दिवसांत इंटरनेट सेवा कशी पोहोच करणार असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. त्याबाबतचा सविस्तर आढावा केंद्र सरकारला सादर केला असून, अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सरकारी स्तरावर सुरू असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अबब! सहा हजार जागांसाठी १९ हजारांवर अर्ज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (आरटीई)अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील १३ हजार पालकांनी तब्बल १९ हजार ९७८ अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे. एकापेक्षा जास्त शाळांसाठी प्रवेश अर्ज दिल्याने ६,३८० जागांसाठी तिप्पट अर्ज प्राप्त शिक्षण विभागाकडे आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने लॉटरी पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे भविष्य ठरणार आहे.

नर्सरी व पहिलीसाठी आरटीई प्रक्रिया राबविण्यात येते. गरजू व वंचित बालकांसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना सामावून घेण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. गेल्या वर्षी जिल्हाभरात ५,९०० जागांसाठी ही प्रवेशप्र्रक्रिया ३७३ शाळांमध्ये राबविण्यात आली. यंदा शाळा नोंदणी संख्येत वाढ झाल्याने प्रवेशांच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत. राज्यभरात नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम शाळा नोंदणी पूर्ण झाल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक अग्रेसर ठरला आहे.

आज पहिली सोडत

आरटीई प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी शिक्षण विभाग सोडत पद्धतीचा अवलंब करणार आहे. त्यानुसार सोमवारी (६ मार्च) शासकीय कन्या विद्यालयात दुपारी एक वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीत नाव आलेल्या पालकांनी साइटवरूनच अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून प्रिंट काढून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रवेशाबाबत पालकांना काही तक्रार असल्यास महापालिका प्रशासन अधिकारी व ग्रामीण क्षेत्रात गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइकर्णींनी जिंकली मने

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नऊवारी साडी, डोक्यावर फेटा, डोळ्यांवर गॉगल अन् हातात बुलेट, निंजा अशा बलदंड गाड्या... महिला आणि मोपेड यांचे समीकरण मोडीत काढत नाशिककर महिला या गाड्या शिताफीने चालवत ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘ऑल वूमेन्स बाइक रॅली’त सहभागी झाल्या होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानापासून ही रॅली काढण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या रॅलीत दिमाखदारपणे बाइक्स चालविणाऱ्या महिलांनी नाशिककरांचा संडे स्पेशल केला.


उत्साहामुळे चैतन्य

मराठीबाणा जपत त्याला दिलेली साहसाची जोड आकर्षक ठरत होती. पारंपरिक पोषाखाबरोबरच लेदर जॅकेट्स, शूज अशा आधुनिक पोशाख केलेल्या महिलादेखील दिमाखाने रॅलीत सहभागी झाल्या होत्या. अठरा वर्षांच्या तरुणींपासून अगदी वयाची साठी पार केलेल्या महिलांच्या उत्साहामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. मोपेड, बुलेट, स्पोर्टस बाइक असो वा मॉडिफाइड बाइक, महिला तितक्याच शिताफीने त्या चालवू शकतात, याचे दर्शनच त्यांनी यावेळी घडवले.


सेल्फीची भुरळ

रॅलीत नऊवारी, पैठणी, फेटा, पगडी यांसह जिन्स अन् टी शर्टपर्यंत विविधांगी ड्रेसकोडमध्ये सहभागी महिला अन् युवतींना सेल्फी घेण्याची भुरळ पडली. काहींनी बाइकवर स्वार होत सेल्फीचा आनंद लुटला. या माहोलमध्ये निमंत्रित पाहुणे असलेले महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांनाही सेल्फीचा मोह आवरला नाही.


पोशाख, संदेश, बाइक्सचे वैविध्य

केवळ मौज म्हणून नव्हे तर अनेकींनी या रॅलीतून सामाजिक संदेशही दिले. ‘हेल्मेट इज माय क्राऊन’, ‘साँसे हो रही है कम, आओ पेड लगाये हम’, ‘महिलाओं को दे शिक्षा का उजियारा, पढ लिखकर करे रोशन जग सारा’ आदी वेगवेगळ्या विषयांवरील प्रभावी सामाजिक संदेशही महिलांनी दिले. अनेकींनी तर वेशभूषादेखील संदेश दर्शविणाऱ्या परिधान केलेल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण रॅलीभर नजर जाईल तेथे पोशाख, संदेश, बाइक्स यांच्यातील वैविध्यच बघायला मिळाले होते. नारी शक्तीचा विजय असो, अशा घोषणा देत आपल्या एकजुटीचे बळही त्यांनी दाखवून दिले. भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानावर पूर्ण झालेल्या या रॅलीच्या शेवटी झुम्बा इन्स्ट्रक्टर प्रज्ञा तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी झुम्बा डान्सचा आनंदही लुटला. बक्षीस वितरणाने रॅलीचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षण संस्थेचे स्थलांतर

$
0
0

तत्कालीन शिक्षण उपसंचालकांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे बनावट कागदपत्रांद्वारे शैक्षणिक संस्थेचे स्थलांतर केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यासह ११ जणांविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात कागदपत्र शिंदखेडा, शहादा, धुळे आणि नंदुरबार पंचायत समिती व शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यात असून, यामुळे सरकारची फसवणूक झाली आहे. धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक प्रमोद पाटील यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?

१७ जुलै २००७ ते ५ ऑगस्ट २०१६ या कालावधीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चौगाव येथील महात्मा फुले युवक विकास मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काकरदे येथे स्थलांतरीत करण्यात आले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष रमेश बाबुराव सोनवणे, कार्याध्यक्ष चारुशिला रमेश सोनवणे, उपाध्यक्ष अन्नपूर्णा आसाराम पाटील, मंगला रमेश सोनवणे, सचिव पितांबर ताराचंद खैरनार, सदस्य प्रमिला सूर्यकांत चव्हाण, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी धुळे व शिरपूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी जी. के. साळुंखे, डी. बी. पाटील, तत्कालीन सेवानिवृत्त प्रभारी शिक्षणाधिकारी जे. के. ठाकूर, तत्कालीन सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, तत्कालीन निवृत्त शिक्षणाधिकारी दिनेश लाला साळुंखे या ११ जणांनी संगनमताने २००७ ते २००९ याकाळात बनावट कागदपत्र तयार केली होती. विद्यालयाच्या स्थलांतरासाठी संस्थेच्या लेटरहेडवर प्रमिला चव्हाण यांना सचिव दाखवून प्रस्ताव सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजेरीपत्रकावर खाडाखोड करणारा लिपिक बडतर्फ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कामावरील हजेरीपत्रकात खाडाखोड करून काम न करता आर्थिक फायदा घेतल्याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यालयातील लिपिकाला बडतर्फ करण्यात आले आहे.

धुळे विभागीय कार्यालयातील लिपिक व्ही. बी. येलेकर यांनी कामावरील त्यांच्या हजेरीपत्रकावर जानेवारी २००७ ते डिसेंबर २००९ या दोन वर्षांच्या कालावधीत रजा असा शेरा असताना, व्हाइटनरचा वापर करून खाडाखोड केली. तसेच काम न करता ३८,०१२ रुपयांचा आर्थिक फायदा घेतला. त्यामुळे येलेकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कामात अफरातफर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी चौकशीअंती ते दोषी असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संप मागे घ्या; अन्यथा गुन्हे दाखल करणार

$
0
0

धुळे मनपा कर्मचारी आंदोलनाबाबत आयुक्तांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेत गेल्या तीन दिवसांपूर्वी कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष अतिक्रमण विभागातील लिपिक प्रसाद जाधव यांना आयुक्तांनी निलंबित केले होते. याबाबत कर्मचारी समन्वय समितीतर्फे शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आयुक्तांच्या मनमानी कारभारामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याचे कर्मचारी समन्वय समितीचे म्हणणे आहे. तर आयुक्त संगीता धायगुडे यांनी अखेर शनिवारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारून, आणि संप मागे न घेतल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा कर्मचारी समन्वय समितीला दिला आहे.

सोमवारी वाद उफाळणार?

मनपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून कामगारांच्या विविध मागण्यांवरील आंदोलनातून आयुक्त विरुद्ध कर्मचारी संघटना असा संघर्ष सुरू झाला आहे. कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव यांना निलंबित करण्यात आले. यासोबतच निलंबनानंतर संपात सामील कामगारांचे दोन दिवसांचे वेतन कपातीचे आदेशही आयुक्तांनी दिले. यानंतरही समन्वय समितीने कामबंद आंदोलन आणि मनपा आवारात धरणे आंदोलन सुरू केले. शुक्रवारी सहाय्यक उपायुक्त अविनाश जाधव यांनी कर्मचाऱ्यांना जाधव यांचे निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शनिवारी आयुक्तांनी याप्रकरणी कोणतेही आदेश काढले नाहीत उलट कर्मचाऱ्यांना दंड आकारून सोमवारी कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले आहे. यामुळे मनपा आयुक्त व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये सोमवारी मोठा वाद उफाळण्याची निर्माण शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार परिचारकांच्या पुतळ्याचे दहन

$
0
0

धुळ्यात शिवसेनेकडून कारवाई करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भारतीय सैनिकांचा आणि त्यांच्या पत्नीचा अपमान करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आमदार प्रशांत परिचारकांची राजकारणातून हकालपट्टी करा तसेच त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करीत शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २०) भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचा प्रतीकात्मक पुतळा शहरातील महाराणा प्रताप चौकात जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

आमदार परिचारक हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. सोलापूर येथे भाजप आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत त्यांनी असभ्यपणे हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एकाही नेत्याने आमदार परिचारकांना थांबविले नाही. त्यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली नाही. भारतीय सैनिक आणि त्यांच्या पत्नीबाबत वक्तव्य करून त्यांनी भारतीय सैनिकांचा आणि तमाम महिला वर्गाचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. झाल्याप्रकाराबाबत आमदार परिचारक यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्य हे त्यांची विकृत मानसिकताच दाखविते. अशा लोकांना घेवून भाजप नितीमत्तेचे धडे कोणत्या तोंडाने लोकांना देत आहे, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

भाजपने आपल्या पक्षाची अब्रू वाचविण्यासाठी परिचारक यांची आमदारकी काढून घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महेश मिस्तरी, सुनील बैसाणे, भटू गवळी, पंकज गोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजापुढे ठेवला तरुणाने नवा आदर्श

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार येथील विशाल शिरीष वारुळे याने साखरपुड्यातच लग्न लावून आपल्या समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. शहरातील शिरीष ताराचंद वारुळे यांचा मुलगा विशाल वारुळे यांचा साखरपुडा नाशिक येथील रहिवासी सुनील उमाजी वाघ यांची कन्या दीपाली हिच्याशी नाशिक येथे आयोजित केला होता.

साखरपुडा समारंभाच्या कार्यक्रम होत असताना फक्त एक मंगळसूत्र व सात फेऱ्यांची कमतरता होती, अशी भावना वधू व वराकडील नातेवाईकांनी व्यक्ती केली. यावर मुलाचे वडील शिरीष ताराचंद वारुळे व मुलीचे वडील सुनील वाघ तसेच नंदुरबार येथील माजी नगरसेवक किशोर सोनवणे, प्रा.गोपाल शिरसाठ, तात्या मगर, नाशिक येथील राजेंद्र अहिरे यांच्या मध्यस्थीने साखरपुड्यात लग्न करण्याचा विचार केला आणि साखरपुडा कार्यक्रमातच विवाह सोहळा पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चांगले आरोग्य ही विकासाची गुरूकिल्ली’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या वतीने प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून चांगले आरोग्य हीच विकासाची खरी गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी लामकानी (ता. धुळे) येथे केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय, जळगावच्या वतीने लामकानी येथे राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जनतेने सुद्धा आरोग्याच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्याची गरज आहे. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील यांनी उपस्थितांना आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनोज सोनोने यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निमित्ताने सकाळी गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला सरपंच नाना पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला. रॅलीत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम चव्हाण, क्षेत्रीय प्रचार सहाय्यक उल्हास कोल्हे, आर. एम. सोनसळ उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावरील या अभियानास आता विविध राज्यातील ग्रामीण भागांत पोहचवण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचेही देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात बसेसमध्ये वायफाय हॉटस्पॉट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना खूश करण्यासाठी एसटीमध्ये प्रवास करताना मोफत वायफाय सेवेचा देणार असल्याची घोषणा परिवहन केली होती. त्याबाबत येत्या दहा दिवसांत धुळे आगारातील १३५ एसटी बसेसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवेचा लाभ मिळणार आहे.

एसटीच्या या वायफाय सेवेत सोशल मीडियाचा वापर प्रवाशांना करता येणार नाही. तर मराठी, हिंदी गीते, चित्रपट मालिकाचा या सेवेत लाभ होणार आहे. यामुळे एसटीकडे प्रवासासाठी नागरिकांची संख्या वाढणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. परिवहन महामंडळाच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारांतील सुमारे ९०० बसेसमध्ये वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यांत धुळे आगारातील १३५ बसेसमध्ये वायफाय सुविधा पुरविण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन लि. कंपनीचे कर्मचारी आगारात दाखल होऊन यंत्रसामग्री बसविण्याचे काम करत आहेत.

वायफाय कसे असेल?

मीडिया सोल्यूशन कंपनीकडून एसटीमध्ये हॉटस्पॉट डिवाइस बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सॅटेलाइटच्या माध्यमातून रेंज मिळविली जाणार आहे. वायफायचा कोड क्रमांक हा प्रत्येक प्रवाशाच्या सीटजवळ असेल तो आपल्या मोबाइलमध्ये प्रविष्ट केल्यास वायफाय सेवा मोबाइलमध्ये सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपात समाजवादीचे अनोखे आंदोलन

$
0
0

कार्यकर्त्याने साकारला पिसाळलेला कुत्रा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नागरिक सध्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील कुत्र्यांचा आणि डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या नगरसेवक आमिन पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनपात लक्षवेधी आंदोलन केले.

या अनोख्या आंदोलनात एका कार्यकर्त्याने अंगावरील कपडे काढून पिसाळलेल्या कुत्र्याची भूमिका मनपा आवारात साकारली. कुत्रे पिसाळल्यानंतर काय अवस्था होते याचे विविध प्रात्यक्षिके समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करून दाखविले आणि शहरातील समस्येची वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धुळे शहरात विविध ठिकाणी पिसाळलेल्या व रोगट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला, तरुणी व वृद्धांच्या अंगावर कुत्रे चावा घेण्यासाठी धाव घेतात. अशा घटना दररोज घडत आहेत. मनपाच्या यंदाच्या आर्थिक संकल्पात मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करणारे निवेदन महापौर कल्पना महाले यांना यावेळी देण्यात आले.

शहरातील नागरिकांच्या समस्येकडे मनपाचे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पक्षाचे नगरसेवक आमिन पटेल व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन मनपात केले. जर मनपाकडून येत्या आठ दिवसांत मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर यापुढे मनपातील अधिकाऱ्यांच्या दालनात पिसाळलेले व मोकाट कुत्रे आणून सोडण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवमोगरा देवीच्या यात्रेस सुरुवात

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा येथे तयारी जोरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्डीपाडा येथील देवमोगरा देवीचे मंदिर विसरवाडी गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ताही नाही. अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचे मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे. पायथ्यापासून सुमारे २६४० फूट अंतर पार करून या देवीच्या दर्शनाला जावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमधील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या आमावस्येला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरते, याची तयारी आता सुरू झाली आहे.

गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती नंदुरबारमधील बर्डीपाडा येथे पाहायला मिळते. तसेच आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडे घालायला या ठिकाणी येतात. कणीपूजन करून मंडल शिवारातील देव देवतांचे पूजन करतात. या यात्रेसाठी आदिवासी बांधव १५ दिवसांपासून तयारीला लागतात. मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात. मंदिराच्या पायथ्याशी सुरू होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेल्या कच्च्या रस्त्याची पायवाट आहे. तेथूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक मार्गस्थ होतात.

देवमोगरा देवीला आदिवासी भाषेत ‘याहा मोगी’ म्हटले जाते. ‘याहा’ म्हणजे आई असा अर्थ आहे. महादुष्काळात याहा मोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा, लोकमाता, कणी, कन्सरी आपली सर्व पालनहार संबोधून देवत्व बहाल केले. आदिवासी भाषेतच देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा-विधी होतात. आजही धान्य, वन भाजी, तांदळाची व ज्वारीची भाकरी आणि मव्हाच मद्य (दारू) असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी ग्रामदैवत देवमोगरा देवीची माहिती सांगतात.

प्रशासनाची उदासीनता

आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून, नवापूर तालुक्यातील आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग पहाडातून आणि दऱ्या, खोऱ्यातून, कच्या रस्ताने भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. येथेही सरकारी यंत्रणेची उदासीनता पाहायला मिळते. तरी देवदर्शनासाठी प्रवास सुखकर व्हावा, अशीच अपेक्षा आदिवासी बांधवांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विद्यापीठासाठी युवासेनेचा रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा न देणे आणि धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय याविरुद्ध युवासेनातर्फे बुधवारी (दि. १) पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती. या वेळी युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांच्यासह अनेक युवासैनिकांना पोलिसांनी कारवाई करीत अटक करून सुटका केली.

धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे निर्णय नेहमीच घेतले जात असून याविरुद्ध जिल्हा युवा सेनेने हे आंदोलन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. पारोळा चौफुलीवर हे रास्तारोको आंदोलन करून राज्य सरकारच्या धोरणाविरोधात युवकांनी घोषणाबाजी केली.

याआधीही युवासेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढून निवेदन दिले होते. कृषी विद्यापीठ धुळ्यात साकारून जिल्ह्याला न्याय देण्यात यावा, शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. हा निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र शहरात उभारले जावे, यासारख्या मागण्यासाठी युवासेनेने आंदोलन केले. यासाठी देवूपरातील सर्व्हे नं. १११ व ११२ या जागेचा मनपाने पुन्हा ठराव करून उपकेंद्रासाठी जागा देण्यात यावी. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महाराष्ट्र राज्यात एकच विद्यापीठ करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images