Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लूटमार, घातपातासाठी लोहमार्गावर दगड?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मुंबईला रेल्वे रुळावर लोखंड, दगड, जिलेटिनच्या कांड्या ठेऊन घातपाताचे प्रयत्न वारंवार होत असताना हे लोण आता ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचले आहे. मुंबई-भुसावळ मार्गावरील खेरवाडी ते ओढा (ता. निफाड) दरम्यानच्या लोहमार्गावर घातपात, तसेच लूटमार करण्याच्या इराद्याने सुमारे १५ किलो वजनाचा दगड ठेवलेला असावा, असा अंदाज आहे.

लासलगाव येथून मुंबईला जाणारी हावडा कुर्ला एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १२.४५ वाजता खेरवाडी-ओढा रेल्वे स्टेशनदरम्यान पोल क्र २०२/४ या ठिकाणी सुमारे १५ किलो वजनाचा दगड रेल्वे रुळावर ठेवलेला होता. हा दगड रेल्वेचालकाच्या लक्षात आल्याने त्याने ब्रेक लावला. तरीही रेल्वेचे चाक गेल्याने दगडाचे दोन तुकडे झाले. एक तुकडा इंजिनच्या जाळीवर येऊन पडल्याने जाळीचा काही भाग तुटला. रेल्वे थांबवल्यानंतर घाबरलेला रेल्वेचालकने खाली उतरून परिस्थितीचा अंदाज घेतला.


खेरवाडी-ओढादरम्यानच्या रुळाची पाहणी

शनिवारी सकाळी रेल्वे पोलिस, सायखेडा पोलिस आणि एटीएस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकही आणले. परंतु, सुगावा लागला नाही. हे प्रकरण नाशिक रोड रेल्वे स्टेशनला वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सायखेडा पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एस्क्रोत लवकरच साडेनऊ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय कंपनीच्या जळगावमध्ये असलेल्या हॉटेलची विक्री करण्यात आली असून, यापोटी मिळणारी तब्बल साडेनऊ कोटी रुपयांची रक्कम लवकरच इस्क्रो खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. या व्यवहारापोटी मिळालेली जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम इस्क्रो खात्यात जमा झाली आहे.

जळगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मैत्रेय कंपनीचे हॉटेल असून, ते कंपनीने ११ कोटी रुपयांना विक्री केले आहे. या व्यवहारासाठी पोलिसांनी कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. नोटाबंदीपूर्वीच हा व्यवहार झाल्याने ६१ लाख रुपयांची आगाऊ रक्कमही इस्क्रो खात्यावर वर्ग झाली होती. मात्र, नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर हा व्यवहार अडकून पडला होता. जवळपास दोन महिन्यांच्या अंतराने व्यवहारास गती मिळाली असून, लवकरच उर्वरित साडेनऊ कोटी रुपयांची रक्कम इस्क्रो खात्यात वर्ग होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एस्क्रो खात्यातील उपलब्ध पैसा लक्षात घेता, पोलिस वाटपाचे नियोजन करीत आहे. मागील सहा महिन्यांत इस्क्रो खात्यातून आतापर्यंत नऊ हजारपेक्षा अधिक गुंतवणूकदारांना सात कोटी रुपयांचा परतावा करण्यात आला आहे. सध्या खात्यात एक कोटी रुपये असावेत. त्यामुळे जळगाव येथील हॉटेल विक्रीतून येणाऱ्या साडेनऊ कोटी रुपयांकडे पोलिसांसह ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. पैसे जमा झाल्यास जिल्ह्यातील मैत्रेय ठेवीदारांना दिलासा मिळू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
ओढा-खेरवाडीदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर सुमारे पंधरा किलोचा दगड ठेऊन घातपाताच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार १० फेब्रुवारीला मध्यरात्री उघडकीस आला. रेल्वेला घातापात करण्याचा अलिकडील काळातील असा हा चौथा प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. नाशिकरोड, भुसावळ, मनमाड, इगतपुरीससह सर्वच स्थानकांमधील सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.
ओढा ते खेरवाडीदरम्यान कि.मी. क्रमांक २०२/६ ते २०२०/८ यांच्यामधील रुळावर रेल्वेला अपघात होईल, अशा पध्दतीने दगड ठेवलेला होता. यावेळी शाल‌िमार एक्सप्रेस मुंबईला जात होती. चालकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने ब्रेक लावेपर्यंत गाडीखाली येऊन दगडाचे तुकडे झाले. आरपीएफचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सुरेशचंद्र, पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, उपअधीक्षक विशाल गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाचे एस. एम. बच्छाव, आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, के. डी. मोरे, संजय गांगुर्डे आदींनी रेल्वेमार्गाची तसेच परिसराची पाहणी केली. भुसावळहून श्वानपथकाने येऊन तपास केला. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून रेल्वेमार्गावर रात्री गस्त घालून या प्रकारांना आळा घालणे गरजेचे झाले आहे.
षडयंत्र नाशिकपर्यंत
घातपाताचे कटकारस्थानचे लोन आता महाराष्ट्रात पसरल्याचे नाशिकजवळील घटनेने स्पष्ट झाले आहे. रेल्वे मार्गावर लोखंड, दगड आणि जिलेटिनच्या कांड्या ठेऊन घातपताचे प्रयत्न गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. उरण येथे रुळावर मोठा लोखंडी खांब ठेवण्यात आला होता. आंध्रप्रदेशात हिराखंड एक्सप्रेस घसरुन ३९ ठार तर ४३ जण जखमी झाले होते. त्याआधी नोव्हेंबरमध्ये कानपूरजवळील पुखारण येथे इंदूर-पाटणा एक्सप्रेसचे १४ डबे घसरून १५० जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पाकच्या आयएसआय गुप्तहेर संघटनेचा एजंट शमशूल होडाला नुकतीच नेपाळमधून अटक करण्यात आली होती. तो रुळावर स्फोटके ठेऊन घातपात करण्यासाठी सुपाऱ्या देत होता. बिहारमध्ये मोती पासवान, उमा शंकर पटेल आणि मुकेश यादव यांना अटक केल्यानंतर शमशूल रेल्वे घातपातासाठी सुपाऱ्या देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

नाशिकरोडलाही हवी सुरक्षा

नाशिकरोड रेल्वेस्थानकात महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा भिंत घालणे गरजेचे आहे. फक्त मुख्य प्रवेशव्दारातच स्कॅनिंग मशिन व मेटल डिटेक्टर आहेत. नागरिक त्यांना टाळून रेल्वेत बसतात. तिकीट बुकींग, आरक्षण, पार्सल कार्यालय, सिन्नरफाटा, मालधक्का आदी ठिकाणी मेटल डिटेक्टर नाही. स्वतंत्र श्वानपथक नाही. सीसीटीव्हींची संख्या कुंभमेळ्यात शंभरावर होती. आता ते काढून घेण्यात आले. सीसीटीव्ही कक्षालाही कुलूप असते. सिन्नरफाटा प्रवेशव्दारावर बंदोबस्त नसतो. काही कर्मचारी प्लॅटफार्म एकपर्यंत वाहने नेतात. त्याचा फायदा घेऊन अतिरेकी विस्फोटकांचे वाहन नेऊ शकतात. रेल्वे सुरक्षा दल तसेच रेल्वे पोलिस यांचे बळ मर्यादीत आहे. स्थानकाच्या मुख्यप्रवेशव्दारासह सर्वत्र वाहने पार्किंग केलेली असतात. नाशिकरोड स्थानकात शिस्त आणि सुरक्षा वाढविण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरी लढाई आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांना सोमवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेऊन विजयाचा मार्ग सुकर करावा, यासाठी जिल्ह्यात दबाव, दादागिरी, सौदेबाजी आणि आश्वासनांच्या खैरातीचे राजकारण तापले आहे. निवडणुकीच्या रिंगणात कोण असणार, याचा फैसला होणार असून, गट आणि गणांमधील लढतींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेतील ७३ गट आणि पंचायत समितीमधील १४६ गणांसाठी २१ फेब्रुवारीला मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीच्या निकालातून उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. अर्ज छाननीमध्ये जिल्हा परिषद गटांत ३०, तर गणांमध्ये ५९ अर्ज बाद झाले आहेत. आता १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीसाठी एक दिवसाची अन् त्यातही केवळ चारच तासांची मुदत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गट आणि गणांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, त्यामुळे दावेदार उमेदवारांचे विजयाचे गणित अवघड होऊन बसले आहे. प्रबळ नसलेल्या इच्छुकांनी माघार घ्यावी, यासाठी पक्षीय, तसेच अन्य उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केले त्या दिवसापासूनच साम-दाम-दंडची नीती अवलंबली जाऊ लागली आहे.

सोमवारी सकाळी ११ ते दुपारी तीन असे चारच तास माघारीची मुदत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये गर्दी उसळण्याची शक्यता असून, गोंधळ अथवा अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. माघारीसाठी जे इच्छुक राजी झाले, अशांना सर्वप्रथम निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उभे करण्याची रणनीती प्रबळ दावेदारांकडून अवलंबण्यात आली आहे.

आजच चिन्हवाटप

सकाळी ११ ते दुपारी तीन अशी अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. दुपारी तीनपर्यंतच माघार अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इच्छुकांच्या मदतीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात पाच ते सहा अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत. माघारीचा अर्ज उपलब्ध करून देण्यापासून तो भरून देणे, ओळखपत्राचे अॅटेस्टेशन करून देणे यांसारख्या कामात हे कर्मचारी मदत करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरची वाटचाल जलसमृद्धीकडे

$
0
0

पुरेसा पाऊस अन् जलयुक्तमुळे तालुका प्रथमच टँकरविना

नाशिक : जलयुक्त शिवारसारखी महत्त्वाकांक्षी योजना सिन्नर तालुक्याला पावल्याची ‌चिन्हे असून, तालुक्याची वाटचाल जलसमृद्धीच्या दिशेने सुरू झाली आहे. वर्षानुवर्षे बाराही महिने तहानलेली गावे आणि वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत होते. मात्र, यंदा टँकर गायब झाले असून, अनेक ठिकाणी भूजल पातळीत झालेली वाढ सिन्नरकरांसाठी वरदान ठरू लागली आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी तालुका अशी सिन्नरची ओळख बनली आहे. गेल्या सात वर्षांहून अधिक काळ तालुक्यातील काही भागात रहिवाशांना बाराही महिने दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत. तालुक्यातील १५ ते २० गावांचा अविभाज्य भाग असलेल्या १५३ वाड्यांची सर्व भिस्त टँकरवरच होती. परंतु ही परिस्थिती बदलत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला आहे. तालुक्यात दुष्काळी क्षेत्रात पहिल्या टप्प्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. सुदैवाने चांगला पाऊस झाल्याने पावसाचे पाणी अडविणे आणि जिरविणे शक्य झाले. डुबेरे गावालगतच्या शेंदरी आणि ब्राह्मणदरा या पाझर तलावांमधील गाळ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत काढल्याने पाणीसाठवण क्षमता वाढली. त्यामुळे परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत नाही. टँकरचीही सध्या आवश्यकता नसल्याची माहिती निमगाव येथील ग्रामस्थ नवनाथ सानप यांनी दिली.

सात महिन्यांपासून टँकरला सुट्टी

२०१४ मध्ये सप्टेंबर हा एकच महिना टँकरविरहित गेला. ऑक्टोबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत ४ गावे आणि ६६ वाड्या तहानलेल्या होत्या. त्यामुळे तेथे १० टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू होता. सप्टेंबरमध्ये तालुकावासीयांची तहान भागविण्यासाठी टँकर वर्षाऋतूसह वर्षभर धावत होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये १० गावे आणि ५३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, ऑगस्ट २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत एकही गाव अथवा वाडी, वस्तीवर टँकर सुरू नाही.

गेली सात वर्षे तालुक्यात कुठे ना कुठे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावाच लागत असे. शक्यतो डिसेंबरनंतर हमखास काही गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यंदा मात्र ऑगस्ट २०१६ पासून तालुक्यात टँकर पूर्णत: बंद झाले आहेत.

- मनोज खैरनार, तहसीलदार, सिन्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींच्या वसुलीचा निवडणुकीमुळे खोळंबा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पदवीधरपाठोपाठ महापालिकेच्या निवडणुकीचा फटका पालिकेचा बसला आहे. कर्मचारी निवडणूक कामासाठी पळविल्याने ऐन वसुलीच्या हंगामात घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत २३ कोटी १० लाख रुपयांची वसुली बुडाली आहे.
सध्या महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून, पालिकेची पूर्ण यंत्रणाच निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आली आहे. पालिकेच्या सर्वच विभागांवर निवडणुकीची जबाबदारी टाकली असली तरी, घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे १३७ कर्मचारी हे गेल्या चार महिन्यांपासून निवडणुकीच्या प्रक्रियेत गुंतले आहेत.
वसुलीत १५ कोटींची घट
चालू वर्षी महापालिकेने घरपट्टीतून दीडशे कोटी तर पाणीपट्टीतून ७० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु, चालू वर्षी १० फेब्रुवारीपर्यंत ५० टक्केही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. गेल्या वर्षी घरपट्टीतून पालिकेला ८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु, यावर्षी त्यात १५ कोटी ९ लाखांची घट होऊन घरपट्टीची वसुली ही ६९ कोटी झाली आहे. पाणीपट्टीच्या वसुलीची तर दयनीय अवस्था आहे. गेल्या वर्षी २७ कोटी ८४ लाख रुपये मिळाले होते. मात्र, चालू वर्षी २० कोटी ७ लाखांचीच वसुली झाली आहे. ऑनलाइन भरणा मात्र सुरू आहे. एप्र‌िल, मे व जूनमध्ये दिलेल्या पाच, तीन व दोन टक्के सवलतीतून सर्वाधिक साठ टक्के महसूल जमा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या भात्यात सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी महापालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांची कुंडली सादर केली. कोणावर किती आणि कोणते गुन्हे दाखल आहेत, याची माहितीही मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. महापालिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्वच पक्षांनी गुन्हे असलेल्या उमेदवारांना पसंती दिली आहे. यात शिवसेना आघाडीवर असून, त्याखालोखाल काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा क्रमांक दिसतो.

गुन्हेगारीमुक्त राजकीय व्यवस्था उभी करण्याच्या वल्गना सर्वच पक्ष करतात. सध्या तर कोणत्या पक्षात किती गुंड याच्यावरच नेते भाषण करतात. महापालिकेचे काम पायाभूत सुविधा देण्याचे आहे. त्याबाबत जाणीवपूर्वक सर्वच पक्षांनी मौन स्वीकारले आहे. शहरातील गोदाप्रदूषण असो, की एसटीपीचा प्रश्न, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, पार्किंग, पूर्ण दाबाने पाणीपुरवठा, पावसाळ्यात ओसंडून वाहणारी पावसाळी गटार योजना याबाबत सध्या तरी राजकीय व्यासपीठावर मौन आहे. दरम्यान, गुन्हेगारीच्या मुद्द्यावर बाजार गरम असून, सर्व राजकीय पक्ष व अपक्ष असे मिळून तब्बल ८९ संशयित आरोपी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले दिसतात. काहींवर किरकोळ, तर काहींवर थेट खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. दुर्दैवाने सर्वच पक्षांनी यात आघाडी घेतली आहे. शिवसेनेने अशा २२ उमेदवारांना महापालिकेत पाठवण्याचा विडा उचलला आहे. भाजपकडे ११ उमेदवार आहेत. १२२ उमेदवारांची वानवा असलेल्या मनसेच्या गटात १०, तर रिपब्लिकन पक्ष, बसप व इतर छोट्या पक्षांच्या सहा उमेदवारांवर कोणते तरी गुन्हे दाखल आहे. पक्षांकडून डावलण्यात आलेले बंडखोर पक्षाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. अशा २२ बंडोबांवर विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

पक्षनिहाय गुन्हे दाखल असलेले उमेदवार

शिवसेना : अशोक सातभाई, संतोष साळवे, अंबादास ताजनपुरे, सत्यभामा गाडेकर, कैलास चुंबळे, प्रवीण तिदमे, सुधाकर बडगुजर, दिलीप दातीर, दीपक दातीर, प्रशांत दिवे, शैलेश ढगे, गिरीश मुदलियार, सुमन सोनवणे, सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, सुदाम डेमसे, अजय बोरस्ते, भगवान भोगे (शिवसेना पुरस्कृत), संजय चव्हाण (शिवसेना पुरस्कृत), सचिन मराठे, विशाल कदम, सिद्धेश्वर अंडे

भाजप : विशाल संगमनेरे, संभाजी मोरुस्कर, भगवान दोंदे, सुदाम कोंबडे, नरेंद्र पवार, हेमंत शेट्टी, दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, दामोदर मानकर, उद्धव निमसे, मुकेश शहाणे

मनसे : अतुल सानप, गणेश मोरे, अस्लम मणियार, पद्मिनी वारे, योगेश शेवरे, सत्यम खंडाळे, अशोक मुर्तडक, विशाल ऊर्फ बंटी कोळी, संदीप भवर, अनंत सूर्यवंशी

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : संदीप काकळीज, विकी खेलुस्कर, राजेंद्र महाले, संगीता आव्हाड, लक्ष्मण जायभावे, राहुल दिवे, शशिकांत उन्हवणे, चंद्रकांत साडे, विनोद सोळंकी, समीर कांबळे, हेमलता पाटील, शैलेश कुटे, वत्सला खैरे, गजानन शेलार, कविता कर्डक, गौरव गोवर्धने, सुफियान जीन, सचिन मंडलिक.

अपक्ष : संतोष कांबळे, पवन पवार, हरिश भडांगे, माधुरी भोळे, कुंदा सहाणे, रविकिरण घोलप, महेश आव्हाड, मधुकर हिंगमिरे, राकेश साळुंके, चांगदेव गुंजाळ, ईश्वर कदम, नासीर पठाण, मृणाल राजे घोडके, गंगूबाई गुडेकर, अरुण पाटील, अमर काळे, आकाश पवार, संतोष गायकवाड, पद्मा वाघ, सुरेश पाटील, ज्वाला शिंदे, गणेश धोत्रे.

अन्य पक्ष : सुनील कांबळे, बापू सोनवणे, संजय भालेराव, प्रकाश लोंढे, सीताराम ठोंबरे, दीपक डोके.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस मॅरेथॉनमध्ये ‘भोसला’चा ठसा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शांतता आणि शहराच्या सदृढ आरोग्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘नाशिक पोलिस २१ के मॅरेथॉन : रन फॉस पीस’ मध्ये सुमारे १५ हजार नाशिककरांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या मुख्य २१ किलोमीटर अंतराच्या पुरुष गटात भोसला कॉलेजचा धावपटू रणजित पटेल तर महिलांच्या गटात याच कॉलेजची संजीवनी जाधव हिने बाजी मारली. मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण ठरला तो हरियाणा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्राम सिंग व अभिनेत्री सायली भगत.

रविवारी पहाटे बोचऱ्या थंडीतही हजारो नागरिक गोल्फ मैदानावर हजर झाले होते. नाशिककरांनी गोल्फ क्‍लब मैदानावरील हिरवळीवर झुंबा डान्सचा आनंद घेतला. त्यानंतर पुरुष व महिलांच्या २१ कि. मी. अंतराच्या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्राम सिंग याने झेंडा दाखविला. त्यानंतर ६ वाजून ५० मिन‌िटांनी १० कि. मी. च्या महिला व पुरुष गटाला अभिनेत्री सायली भगत हिने हिरवा झेंडा दाखविला. सव्वासात वाजता ५ कि. मी. अंतराच्या महिला व पुरुष गटाला आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिच्या पुढाकाराने सुरुवात झाली. एकीकडे स्पर्धकांनी धावण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे मैदानावर झुम्बा डान्स, दोरीवरचा मल्लखांब, नाशिक ढोल पथकाकडून मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले गेले. दरम्यान, तरणतलाव येथे स्पर्धेकांना प्रोत्साहन देण्यासाठी पंजाबी भांगडा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा रंगारंग पारितोषिक वितरण सोहळा लागलीच पार पडला. विजेत्यांना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्‌, अप्पर पोलिस महासंचालक व शहराचे माजी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन्‌, संग्राम सिंग, सायली भगत, कविता राऊत, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, ग्रामविकास विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांच्या हस्ते पारितोषिकवितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलिस आयुक्तांनी या कार्यक्रमांचे श्रेय सर्व सहकाऱ्यांना व सामाजिक संघटनांना दिले. नाशिकमध्ये या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी ४२ किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन आयोजित करण्याचा संकल्प पोलिस आयुक्तांनी यावेळी मांडला.


माजी पोलिस आयुक्तांचा सहभाग

शहराचे माजी पोलिस आयुक्त आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी २१ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी ते खास आले होते. त्यांच्या सहभागामुळे इतर पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पळण्यासाठी बळ मिळाले. दुसरीकडे अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पत्नी नल‌िनी यांनीही १० किलोमीटर कापले.


ज्येष्ठांचाही उत्साह

तीन किलोमीटर अंतर स्पर्धेमध्ये सर्वाध‌िक सहभाग वयस्कर नागरिकांचा दिसून आला. अगदी ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृध्दांनी सहभाग घेत कार्यक्रमात बहार आणली. यंदाची स्पर्धा नियोजनाच्या दृष्टीने उत्तम होती. स्पर्धेतील ही व्यावसायिकता कायम राहिल्यास नाशिकचे नाव आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहचेल, अशी प्रतिक्रिया नाशिक रनर्स संघटनेचे सचिव व धावपटू महेंद्र छोरीया यांनी व्यक्त केली.


अधिकाऱ्यांचा झिंगाट डान्स

गोल्फ क्लब मैदानावर सकाळपासून उत्साह ओसंडून वाहताना दिसला. इस्पॅलियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्ट‌िक बॅण्डवरून काही गीते वाजवली. तालरूद्र नाशिक ढोल आणि पोलिस बॅण्डने सादर केलेले फ्यूजन सर्वांची वाहवा मिळवून गेले. रामराज्य नाशिक ढोलच्या पथकांनी आपली कला सादर केली. डे केअर सेंटर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांज आणि ढोलवादनात सहभाग नोंदवला. दरम्यान, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीदेखील झिंगाट, शांताबाई यांसारख्या गाण्यांवर डान्स करीत आपल्यातील सुप्त गुणांचा परिचय दिला.


स्पर्धेचा निकाल

२१ किमी अर्ध मॅरेथॉन ः पुरुष ः वयोगट १८ ते ४०- १) रणजित पटेल, २) नीरजकुमार, ३) गुरुमित सिंग, ४) दिनकर महाले, ५) रोहिदास भोंबे. वयोगट ४१ ते ५०- १) भास्कर कांबळे, २)पांडुरंग पाटील, ३) भारत राजपूत, ४) भिकू खैरनार, ५) महेश कुमार, वयोगट ५१ पुढील- १) वसंत आहेर, २)उदय महाजन, ३) संजय शिंपणकर, ४) चंद्रकांत पाळदे, ५) जयंत कंसारा. महिला ः वयोगट १८ ते ३५- १) संजीवनी जाधव, २) पुजा राठोड, ३) मंजू सहाणी, ४) निवृत्ता धाबड, ५) अंजली सहाणी. वयोगट ३६ ते ४५- १) शोभा देसाई, २) अश्‍विनी देवरे, ३) श्‍वेता भिडे, ४) कल्याणी टोकेकर, ५) मनिषा रौंदळ. ४५ पुढील- १) नीलीमा अल्फान्सो, २) बुला मॉन्डल.


१० किमी पुरुष वयोगट १८ ते ४० - १ )किसन तडवी, २) गिरीश वाघ, ३) दिनकर लिलके, ४) सुरेश वाघ, ५) सुनील कुमार. वयोगट ४१ पुढील- १ )विश्‍वास चौघुले, २) सम्राट गुप्ता, ३) लक्ष्मण यादव, ४) तरुण कुमार, ५) प्रसन्न. महिला वयोगट १८ ते ३५- १) पूनम सोनवणे, २) आरती पाटील, ३) श्रद्धा वामन, ५) वर्षा चौधरी. वयोगट ३६ पुढील - १) मितल नारंग, २) स्मिता सौदागर, ३) सुमन हटकर, ४) कीर्ती ब्राह्मणकर, ५) मीनल तांबट.


५ किमी पुरुष वयोगटः १८ ते ४०- १) अश्‍विनी कुमार, २) निशांत गोसावी, ३) बालाजी कांबळे, ४) सागर घोडके, ५) भागीनाथ गायकवाड. वयोगट ४० पुढील - १) रवींद्र आहेर, २) शंकर सुतार, ३) रमेश बधाने, ४) दिनकर शेळके, ५) संतोष जाधव. महिला वयोगट १८ ते ३५ - १) सायली मेंगे, २) योगिता गवळी, ३) वनीता ठोंबे ४) लक्ष्मी दिवे, ५) सारीका मोजड. वयोगट ३६ पुढील- १) श्रेया कुलकर्णी, २) राजेश्री जारतोरकर, ३) सुचित्रा पालवे, ५) अश्‍विनी कुलकर्णी


३ किमी पुरुष (सीन‌िअर सिट‌िझन)-१) बाळासाहेब पवार, २) तानाजी भोर, ३) नाना कुराडे, ४) पुरूषोत्तम गुप्ता, ५) विकास जोग. महिला (सीन‌िअर सिट‌िझन) - १) मनोरमा कुलकर्णी, २) कल्पना म्हाडकर, ३)मीनल सोनवणे, ४) सुनंदा सावंत, ५) उषा साबळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला उमेदवारीने निफाड गट लक्षवेधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निफाड तालुक्यात राजकीय वारसा सांगणाऱ्या अमृता पवार, मंदाकिनी बनकर, किरण थोरे या नशीब आजमावत आहेत. दिवंगत डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार, माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या पत्नी किरण थोरे अशा या महिला प्रतिनिधींची नावे आहेत.

त्यापैकी मंदाकिनी बनकर आणि किरण थोरे या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी अमृता पवार या निफाड राजकारणात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे निफाडचे देवगाव, विंचूर, पालखेड गट लक्षवेधी ठरणार आहे. या तीनही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या असून यातील मंदाकिनी बनकर आणि अमृता पवार लढवत असलेल्या पालखेड व देवगाव हे गट सर्वसाधारण आहेत. तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवण्याचे आवाहन त्यांच्यासमोर आहे. किरण थोरे या विंचूर गटात महिला राखीव जागेवर उभ्या आहेत. निफाडच्या राजकीय आखाड्यात देवगाव गटातून राजकीय वारसा घेऊन अमृता पवार उमेदवारी करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहे. पंढरीनाथ थोरे यांच्या होम पीचवर त्यांच्या पत्नी व विद्यमान आरोग्य सभापती किरण थोरे निवडणुकीच्या मैदनात उतरल्या आहेत. माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर पुन्हा एकदा पालखेड गटातून उमेदवारी करत आहेत.



निफाड तालुक्याला अध्यक्षपदाचा मान?

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला निघाल्याने मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पक्षांतर्गत राजकारणामुळे मंदाकिनी बनकर यांचे हुकले होते. यावेळी या तीन महिलांपैकी कुणाला एकाला तरी मिळाले तर निफाड तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळू शकेल. त्यामुळे या महिला उमेदवारांकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य महामार्गावर दररोजच दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब लागणाऱ्या रांगा, क्षणोक्षणी खोळंबणारी वाहतूक अन् या सर्व मोठ्या वाहतूक कोंडीतून सर्वांनाच मार्ग काढताना करावी लागणारी तारेवरची कसरत हे येवल्यातील चित्र कधी बदलणार, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

येवला शहरातून जाणारा मनमाड-नगर राज्य महामार्ग अन् त्यावर दिवसातील बऱ्याचदा होणारी वाहतूक कोंडी आता डोकेदुखीचा विषय बनला आहे. त्यातही नगर-मनमाड आणि नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गांचा शहरातील विंचूर चौफुलीजवळ असलेला संगम लक्षात घेता या महामार्गावरून धावणारी शेकडो वाहने, त्यातून होणारा वाहतुकीचा मोठा खोळंबा चिंतेचा विषय बनला आहे.

पोलिस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यावे

नगर-मनमाड राज्य महामार्गावरील येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजच कांदा, मका लिलावासाठी येणारे हजारो ट्रॅक्टर्स रस्त्यावर आडवेतिडवे आवागमन करताना महामार्गावरील अवजड वाहनांसह मार्गक्रमण करणाऱ्या अनेक वाहनांना बसणारा ‘ब्रेक’ यातून निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा निर्माण करतात. दररोजच समोर येणाऱ्या या वाहतुकीच्या महाकोंडीवर मार्ग काढून कोंडी दूर करण्यासाठी येवला शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने प्रभावी प्रयत्न होताना दिसत नाहीत.

शहर पोलिसांचा येवल्यातील विंचूर चौफुलीवर वाहतूक नियंत्रण कक्ष असून त्यात चार वाहतूक पोलिस तैनात केलेले आहेत. मात्र, त्यातील किती पोलिस सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुढे सरसावतात? हा मोठा विषय आहे. आता पोलिस यंत्रणेने या वाहतूक कोंडीकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. येवला शहरात भेडसावणारा हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी वाहतूक पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले उचलण्याची नितांत गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण परिवर्तन घडवणारी शिदोरी

$
0
0

पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शिक्षण ही आयुष्यात परिवर्तन घडवणारी शिदोरी आहे. दहावी बारावीचे वर्ष हे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. याच वयात काही करून दाखवण्याची जिद्द मनाशी बाळगा. विद्यालयातून निरोप नव्हे तर जिद्दीचे रोपटे घेवून जा आणि भविष्यात यशस्वी होवून त्याचा वटवृक्ष करा, असे प्रतिपादन येथील पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी केले.

येथील वर्धमान शिक्षण संस्थेच्या श्री र. वी. शाह विद्यालयात इयत्ता १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद पटनी हे होते. प्रताप शाह, गौतम रमेश शाह, गौतम शाह, प्राचार्य संजय बेलन, मुख्याध्यापक नितीन ठाकरे, पर्यवेक्षक के. पी. मुसळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते .

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यालयातील शिक्षकांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संगीत शिक्षक मंदार जोशी व विद्यर्थिनी स्वागतगीत सादर केले तर वैदेही दायमा व वैष्णवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व्ही. एन. कासार यांनी करून दिला तर आर. एल. फडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठेची चौरंगी लढत

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील साकोरा गट व गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा गट सर्वसाधारण राखीव असल्याने चुरस वाढली आहे. तर साकोरा गण इतर मागासवर्गीय महिला राखीव असल्याने या गणात ही अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

साकोरा जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या निवडणुकीत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या तालुक्यातील वर्चस्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला वरचष्मा तालुक्यात सिद्ध केला होता. या गटात गेल्या निवडणुकीत आमदार पंकज भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक महेंद्र बोरसे यांच्या पत्नी माधुरी बोरसे यांनी विजयश्री मिळवली होती. मात्र यंदा साकोरा गटात राष्ट्रवादीने तरुण अभियंता अमित पाटील या नव्या चेहऱ्यावर विश्वास टाकला आहे. नाराज महेंद्र बोरसे यांनी स्वतः या गटातून अपक्ष उमेदवारी जाहीर करून बंडाचे संकेत दिले आहेत. नांदगाव तालुक्यात या गटातील राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाकण्यासाठी शिवसेनेने फिल्डिंग लावली असून माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने साकोरा गटात दिलीप पगार यांना तिकीट दिले आहे. भाजपच्या एन्ट्रीने साकोरा गटात आता चौरंगी लढत अटळ मानली जात आहे.

खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे. परिवर्तन हाच अजेंडा घेऊन भाजप व सेना राष्ट्रवादी विरोधात उभे ठाकले आहेत. तीस हजार बावीस मतदार असलेला हा गट प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाला विजयी करतो याचा अंदाज वर्तवणे अशक्य आहे.


गणातही चुरस

साकोरा गणात प्रमुख राजकीय पक्षांसह राष्ट्रवादीने तिकीट कापलेल्या माधुरी बोरसे या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या सुंदराबाई खैरनार तर शिवसेनेच्या सुमन निकम व भाजपच्या ज्योती म्हस्के निवडणूक लढवत आहेत. गटाबरोबरच गणाची निवडणूकही चौरंगी व चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. पक्ष परिवर्तनाचा मुद्दा विकास कामे व नाते संबंध या गोष्टी या गटात प्रामुख्याने कळीचा मुद्दा ठरतील असे दिसते. वेहेळगाव गणात सेनेचे सुभाष कुटे भाजपच्या विजया भाबड व राष्ट्रवादीच्या नम्रता पगार यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निवडून येण्याची क्षमता’ हाच निकष

$
0
0

शैक्षणिक पात्रता व वय दुय्यम; केवळ १० पदव्युत्तर

तुषार देसले, मालेगाव

राजकारणात वय, शिक्षण यापेक्षाही पक्षांकडून निवडून येण्याची क्षमता हाच उमेदवारी देण्याचा ‘अर्थ’पूर्ण निकष झाला आहे. असे असले तरी मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि वय काय, असा प्रश्न या सुशिक्षित व तरुण मतदारांच्या मनात येत आहे. उमेदवारी देताना ज्येष्ठांना पहिली पसंती सर्वच पक्षांनी दिली आहे.

तालुक्यातून गट आणि गणासाठी एकूण १६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यातील केवळ १० उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तर १६ उमेदवार हे पदवीधर आहेत. बाकी सर्वच उमेदवार जेमतेम १० वी १२ वी उत्तीर्ण झालेलेच आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जासोबत शैक्षणिक पात्रता नमूद केलेली असते त्यावरून ही माहितीसमोर आली आहे. जिल्हा व तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी ‘आम्हालाच निवडून द्या’ म्हणून मतदारांना गळ घालणाऱ्या उमेदवारांना तरुण मतदारांनी तुमची इयत्ता कोणती? असा प्रश्न केल्यास नवल वाटायला नको.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम तालुक्यात सुरू आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने एका गट गणातून ९ ते १० उमेदवार रिंगणात आहेत. मात्र त्यांची शैक्षणिक पात्रता पाहता तालुक्यातील सुशिक्षित तरुण मतदारांना यांना कसे निवडणूक द्यायचे, असा प्रश्न पडला आहे.

गटासाठी उमेदवारी करीत असलेल्यांमध्ये केवळ ३ उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. यात कळवाडी गटातील सेनेच्या अंजली कांदे, अपक्ष उमेदवार ज्योती देसले तर रावळगाव गटातील रिपाईचे प्रशांत गरुड यांचा समावेश आहे. पदवीधारक उमेदवार ५ असून यात भाजप, सेनेचे एक-एक तर ३ अपक्ष उमेदवार आहेत. गणातदेखील अशीच परिस्थिती आहे, पदव्युत्तर शिक्षण घेतले एकूण ७ उमेदवार असून यात भाजप राष्ट्रवादीचे २-२, तर सेना काँग्रेस अपक्षांचा एक-एक उमेदवार आहेत. पदवीधारक असलेले एकूण ११ उमेदवार असून यात सर्वाधिक ६ अपक्ष, भाजप ३, सेना २ असे आहेत. गट गणातून जेमतेम दहावी बारावी झालेल्या उमेदवारांची संख्या ५१ इतकी आहे. विशेष म्हणजे शाळेची वाटच न धरलेलेदेखील १२ उमेदवार रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूनबाईच खऱ्या वारसदार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यात राजकरणांच्या पिढीत सूनबाईच खऱ्या वारसदार ठरल्या आहेत, असे चित्र सध्या दिसून येत आहे. त्र्यंबक तालुक्यात अंजनेरी गट व गण आणि देवगाव गण या तिन्ही जागा महिला आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता मात्र आपण नाही तर आपली सूनबाई हा मार्ग राजकारण्यांनी निवडला आहे.

राजकारण्यांनी आपल्यानंतर थेट तिसऱ्या पिढीला राजकारणात आणताना सूनबाईंना उमेदवारी देऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. एका अर्थाने आरक्षणातून महिला सबलीकरणाचा प्रयोग यशस्वी होत आहे, असे म्हणावे लागेल. माजी जिल्हा परिषद सदस्य कमळू कडाळी यांच्या सूनबाई सविता कडाळी शिवसेनेच्या तिकिटावर तर ज्येष्ठ नेते पांडुरंग झोले यांच्या सूनबाई अलका झोले भाजपच्या चिन्हावर लढत देत आहेत. माजी सभापती देवराम भस्मा यांच्या सूनबाई मनाबाई भस्मा अंजनेरी गणात शिवसेनेची उमेदवारी करत आहेत. दिवंगत आमदार भाऊ सकु वाघ यांच्या सूनबाई हिराबाई शंकर वाघ या देवगाव गणात राष्ट्रवादीची उमेदवारी करत आहेत.

यापूर्वी २००७ च्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार दिवंगत शंकरराव झोले यांच्या सूनबाई माजी सभापती शोभा झोले यांच्याविरोधात लढत दिली होती. शोभा झोले यांनी यावेळेसदेखील अंजनेरी गटासाठी उमेदवारी अर्ज दिला आहे. तथापि, त्यांच्या सूनबाई अलका भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्याने येथे सासूबाईंची माघार होणार आहे. अंजनेरी गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार छाया बदादे पेगलावाडीचे राजकारणात सक्रिय असलेले बाळू बदादे यांच्या सूनबाई आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार शकुंतला डगळे सरपंच डगळेबाबांच्या सूनबाई आहेत.

राजकारण्यांच्या या हुशारीच्या खेळीने त्यांची तिसरी पिढी आता सक्रिय झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यातही महिला आरक्षणाने सूनबाईंना प्राधान्य मिळते आहे. एकुणच ‘शाब्बास… सूनबाई’ म्हणत यापुढे राजकीय वारसा जोपासला जाणार आहे.

हरसूल गटातही सूनबाईच

हरसूल पेठ भागात पूर्वापार राजकीय दबदबा असलेल्या दिवंगत काळुपाटील माळेकर यांच्या सूनबाई रूपांजली माळेकर यांना राष्ट्रवादीने हरसूल गटात पुरस्कृत केले आहे. राष्ट्रवादीचे विनायक माळेकर यांचा अर्ज ठेकेदारीच्या मुद्द्यांवर काँग्रेसचे उमेदवार देविदास जाधव यांनी हरकत घेतल्याने बाद ठरला व महिला आरक्षण नसतानाही आणखी एक सूनबाई पुढे सरसावल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या या पुरस्कृत उमेदवारासाठी काही उमेदवारांनी एक पाऊल मागे सरकण्याची शक्यता असल्याची चर्चा असून अपक्षाची ही लढत राष्ट्रवादी प्रतिष्ठा पणाला लाऊन लढणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅटमध्ये दारूचा साठा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खास निवडणुकीसाठी अवैध पद्धतीने मद्य तयार करून मोठा स्टॉक करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले. मद्य व एक चारचाकी वाहन असा तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे वाघाडी परिसरात गावठी दारू तयार करणारी ही टोळी या वेळी एका फ्लॅटमध्ये उद्योग करताना सापडली.

मोसीन माजीद खान पठाण (वय ३०), संजय बळी उर्फ कांबळे, बाळू पाटील, तेजस गायकवाड, माधव शेळके, शाहरूख सईद पठाण, सईद दाउद पठाण अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी मोसीन पठाण, शाहरूख पठाण, सईद पठाण या तिघांना ताब्यात घेतले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, तसेच मुंबई नाका पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास तिडके कॉलनीतील सिबल फर्निचरजवळील सुयश अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकला. येथे दिव- दमण येथून आणलेला तब्बल अडीच ते तीन लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला. कर चुकवून आणलेल्या मद्याच्या बाटल्या फोडून मद्य बादलीसारख्या भांड्यात टाकायचे. त्यानंतर काही रसायन मिक्स करून पुन्हा नव्याने दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरायचे, असा उद्योग येथे सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सर्व मद्यसाठा, तसेच एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.

याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की हा उद्योग केव्हापासून सुरू आहे हे आता सांगता येणार नाही. मात्र, संशयित हा सर्व खटाटोप निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून करीत असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीदरम्यान ड्राय डेच्या दिवशी किंवा इतर वेळी कार्यकर्त्यांना स्वस्तात मद्य पुरवता यावे, या दृष्टीने मोठा स्टॉक केला जात होता. मात्र, याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली.

बाळू पाटीलचा सहभाग

पंचवटीतील वाघाडी परिसरात अवैध धंद्यांचे साम्राज्य निर्माण करणारा संशयित आरोपी बाळू पाटीलच्या एका अड्ड्यावर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकला होता. तेथे मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र, बाळू पाटील तेव्हा फरार झाला होता. या गुन्ह्यातदेखील बाळू पाटीलचे नाव पुढे आले असून, हा मद्यसाठा काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी तयार करण्यात येत होता का, याचा तपास पोलिसांनी करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय भत्त्यावरून काम बंद आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिका कर्मचाऱ्यांना बाराशे रुपये वैद्यकीय भत्ता देण्याचे धुळ्याच्या आयुक्तांनी मान्य केले होते. मात्र आता एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. प्रशासनाने आश्वासन काय दिले होते व प्रत्यक्षात मात्र काय देत आहे, यावरून संतप्त मनपा कर्मचारी संघटनेने सोमवारी (दि. १३) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या काम बंद आंदोलनामुळे सोमवारी, दिवसभर मनपातील सर्व कामकाज ठप्प झाले होते.

मनपा कर्मचारी संघटनेने शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेला कराच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. त्यातून मनपा कर्मचाऱ्यांना पाचवा, सहावा वेतन आयोग, वैद्यकीय भत्ता आणि फरकाची रक्कम देण्यासाठी साडेचार कोटी रुपये देणार असल्याचे आयुक्तांनी मान्य केले होते. त्याप्रमाणे फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणेही सुरू झाले आहे. मात्र, वैद्यकीय भत्ता बाराशे रुपयांऐवजी एक हजार रुपये देऊन दोनशे रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्याला कर्मचारी संघटनेने विरोध केला काम बंद आंदोलनाचा इशाराला दिला.

या आंदोलनावर मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी कर्मचारी समन्वय समितीला पत्र देऊन कर्मचाऱ्यांना वेतन फरकातील तीस हजार रुपये देण्याचे आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना दरवाढ लागू करण्याबाबत कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले होते. कर्मचाऱ्यांनी सोमवारी, काम बंद आंदोलन करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पत्रही देण्यात आले होते. तरीदेखील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन मनपाचे कामकाज ठप्प केले. सोमवारी, सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज ठप्प होते. अखेर याबाबत मनपाचा काय निर्णय होतो याकडे कर्मचारी संघटनेचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंसाठी सरकारचे धोरण योग्य नाही

$
0
0

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांची खंत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खेळाडू आणि खेळ या विषयीचे राज्य सरकारचे धोरण योग्य नसून त्याचा फटका मलासुद्धा बसला आहे. तसेच मी गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय आश्रमशाळेत क्रीडा शिक्षकांची नेमणूक करावी, या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया धावपटू कविता राऊत यांनी दिली. नंदुरबार येथे आयोजित क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी ही खंत व्यक्त केली.

राज्य सरकारचे खेळाडू विषयीचे धोरण हे बोटचेपीचे आहे. त्याचा अनुभव मला स्वतःला आला आहे. सरकारने नोकरी देताना मला तिसऱ्या वर्गात नोकरी दिली आहे. ही गोष्ट कोणत्याही खेळाडूसाठी योग्य नाही. सरकारचे खेळाडूच्या संदर्भातील धोरण उदासीन असल्याचेही राऊत यांनी सांगितले. आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात अनेक चांगले खेळाडू आहेत.

सरकारच्या दुर्लक्षानेच आदिवासी विद्यार्थी मागे

आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या अनेक शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षक नाही. त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही, क्रीडा प्रकारातही ते पुढे येत नाहीत. विविध खेळांच्या प्रशिक्षणापासून वंचित राहिल्याने अखेर जेमतेम दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेऊन कुठलाही कामधंदा या भागातील तरूण सुरू करतात. मात्र, जर आदिवासी विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्याला क्रीडा शिक्षकांकडून विविध खेळांचे प्रशिक्षण मिळाले. तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊन राज्याचा नावलैकिक होऊ शकतो. मात्र, शासनाने अद्याप याकडे लक्ष केंद्रित केले नसल्यानेच आदिवासी विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात पुढे येऊ शकत नसल्याचेही धावपटू राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फीवर!

$
0
0


सकाळी दहा वाजेपर्यंत लोळत पडण्याचा बाज्याचा प्लॅन फिस्कटला होता... सकाळी-सकाळी चित्रपटांच्या चालीवर सुरू झालेल्या प्रचारगीतांनी त्याच्या झोपेचा पचका झाला... कानांवर उशी दाबूनही काही फरक पडत नव्हता... गृहमंत्री गावी केल्यानं दिवस आरामात घालविण्याच्या विचाराला सुरूंग लागला गेला... बाज्यानं अखेर अंग मोडत अंथरूण सोडलं... त्यानं घराचं दार उघडलं तशी कडीला अडकवलेली चार-सहा पत्रकं धपकन खाली पडली होती... त्यांच्यावरचे रंग पाहून बाज्याचं डोकंच गरगरायला लागलं...

सोफ्यावर पडून पत्रकं न्याहाळत असतानाच दारावर थाप पडली... चड्डी-बनियनवर असलेला बाज्यानं पटकन टॉवेल गुंडाळत दाराकडं धाव घेतली... ``भाऊ लक्ष असू द्या``, असं म्हणत एक उमेदवार थेट घरात शिरला होता... पाठोपाठ काही वर्कर दारापर्यंत आले होते... मागे दोन महिला उमेदवार पाहून बाज्याला अवघडल्यासारखं झालं... पुढच्यांना बसा म्हणत तो आत पळाला आणि कपडे घालूनच बाहेर आला... सर्व नातीगोती, मुद्दे, व्होटबँक यावर चर्चा झाली... निशाणी लक्षात राहील याचं पक्कं आश्वासन घेतल्यानंतरच मंडळींनी खुर्च्या सोडल्या... बाज्याला रात्रीच्या रंगीतसंगीत पार्टीचंही निमंत्रण मिळालं होतं... उमेदवारांची बोळवण करण्यासाठी दारावर जातो कुठे, तोच याड लागलंय, याड चागलंय या गाण्याच्या चालीवरील प्रचाररथ येऊन ठेपला होता... शांताबाईचं नव्या स्वरूपातलं गाणं बाज्यानं कालच ऐकलं होतं... आता वेळ सैराटची होती... दिवसभरात कानांना आणखी काय काय सोसावं लागेल या विचारनं बाज्याच्या अंगावर काटा आला होता... कानाचा पडदा फाटतो की काय, असंही त्याला वाटून गेलं होतं...

बाज्याचं घर चौकातच असल्यानं पुढच्या बाजूनंही दोन रथ येऊन ठेपले होते... कुणाचंच धड काही ऐकू येत नव्हतं... गल्लीतली लहान पोरं मात्र ठुमके लावत होती... रथांमागं पळत होती... दारात पत्रकांचा खच, रस्तोरस्ती वाजणारे भोंगे, चित्रपटांच्या चालीवरची प्रचारगीते, उमेदवार

-वर्कर मंडळींचा आरडाओरडा यामुळे नुसताच कलकलाट झाला होता... यंदा इलेक्शनमध्ये रंगत दिसत नाही, असं गेल्याच आठवड्यात कुणी तरी बोलल्याचं बाज्याला आठवलं होतं... कदाचित या गजबजाटालाच त्याला रंगत म्हणायचं असेल असं बाज्याला मनोमन वाटलं होतं... शहराला इलेक्शन फिवर पुरता चढला होता... आता हा गजबजाट कधी एकदाचा थांबतो आणि त्यामुळं खराखुरा फिव्हर चढू नये ऐवढीच प्रार्थना बाज्यासह सारेच करीत होते...

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅरिकेडिंगने रोखला रस्ता!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील बिटको चौकातील नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपुलाखालील वळणरस्ता गेल्या काही महिन्यांपासून बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा फेरा मारून या परिसरातून ये-जा करावी लागत असल्याने गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नाशिकरोड रेल्वे स्टेशन, सिन्नर फाटा या बाजूकडून नाशिकरोड पोलिस ठाण्याकडे जाण्यासाठी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच उड्डाणपुलाखाली वळणरस्ता आहे. हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षेच्या कारणाखाली पोलिसांचे बॅरिकेडिंग लावून विनाकारण बंद करण्यात आला आहे. परिणामी बिटको चौक, जेलरोडकडून राजेंद्र कॉलनीकडे व शिवाजी पुतळा चौकाकडून नाशिकरोड पोलिस ठाण्याकडे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सिन्नर फाटा व रेल्वे स्टेशनकडून नाशिकरोड पोलिस ठाण्याकडे येणाऱ्या नागरिकांना थेट बिटको चौकातून माघारी यावे लागत आहे. जेलरोड व बिटको चौकाकडून राजेंद्र कॉलनीकडे येणाऱ्या नागरिकांना शिवाजी पुतळा अथवा विभागीय महसूल आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्याने वळसा घालून यावे लागत आहे. या फेऱ्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

वाहतूक पोलिस अनभिज्ञ

नाशिकरोड पोलिस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाखालील रस्ता बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आल्याबाबत वाहतूक पोलिस मात्र अनभिज्ञच आहेत. हा रस्ता बंद करण्याचे कारण वाहतूक पोलिसांना माहिती नसल्याचे स्थानिक वाहतूक पोलिसांनी सांगितले.

अनधिकृत पार्किंगवर मेहेरबानी का?

उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर दररोज शेकडो वाहने अनधिकृतरीत्या पार्क केलेली असतात. या मार्गाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्वच पोलिस कर्मचारी ये-जा करतात. मात्र, असे असूनही या अनधिकृत पार्क केलेल्या वाहनांकडे पोलिस डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पोलिसांना आयती ‘शिकार’

पोलिस ठाण्यासमोरील रस्ता बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आलेला असल्याने पोलिस ठाणे व आशानगरच्या दिशेने येणारे काही वाहनचालक विभागीय आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्यानेच वळण घेऊन उलट बाजूने येतात. अशा वाहनचालकांना पोलिस ठाण्याच्या जवळपास उभे असलेले वाहतूक पोलिस पकडतात व राँग साइडने आल्याबद्दल दंडात्मक कारवाई करतात. या प्रकारामुळे वाहनचालक वैतागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आय लव्ह नाशिक’ची साद

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्हॅलेंटाइन डेनिमित्त मंगळवारी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर राबविण्यात येणाऱ्या आय लव्ह नाशिक या उपक्रमात नाशिकचे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. रेल्वे स्टेशनवर अनेक ग्राफिटी रंगविण्यात येत असून, नाशिकरोडहून शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नयनरम्य नजारा असणार आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचा केवळ प्रियकर-प्रेयसी इतकाच मर्यादित अर्थ न राहता आपण आपल्या शहरावर तितकेच दाट प्रेम करू शकतो, हा संदेश देण्यासाठी हॅण्ड फाउंडेशनतर्फे आय लव्ह नाशिक या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समर्पक विषयांची निवड

रेल्वे स्टेशनवरच्या भिंती विविध ग्राफिटींनी रंगविण्यात येणार असून, त्यासाठी मोठ्या भिंतींची निवड करण्यात आली आहे. ग्राफिटीचे विषयही निवडण्यात आले आहेत. स्वच्छ भारत, स्वच्छ स्टेशन, नॅचरल हेरिटेज ऑफ नाशिक, नाशिकचे खरे हीरो, बालकामगारांबाबतची जागरूकता, सांस्कृतिक नाशिक, जवानांना अभिवादन, नाशिकची शक्तिस्थळे, स्त्रियांची सुरक्षितता, मुलगी वाचवा अशा विविध विषयांची निवड करण्यात आली असून, नाशिकच्या कलाकारांनी रेल्वे स्टेशनवर येऊन ग्राफिटी रंगवायची आहे.

नाशिकची स्ट्रेन्थ केंद्रस्थानी

व्हॅलेंटाइन्सच्या नावाने युवापिढी आपली भारतीय संस्कृतीला विसरून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करताना दिसते. या पार्श्वभूमीवर या दिवशी हॅण्ड (हेल्प, आर्ट, नॉलेज, ड्रीम) फाउंडेशनच्या वतीने नाशिकरोड रेल्वे स्टेशनला अधिक स्वच्छ करण्यासाठी आणि प्रवाशांना चित्रांद्वारे नाशिकचे महत्त्व समजावे, सामाजिक समस्यांबाबत प्रबोधन व्हावे, तसेच नागरिकांच्या कर्तव्याची माहिती होण्यासाठी स्थानकातील प्लॅटफॉर्म, भिंती आणि मोकळ्या जागांवर चित्रे काढण्यात येणार आहेत. रेल्वे स्टेशनवरून पर्यटक नाशिकमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे येथूनच त्यांना नाशिकची स्ट्रेन्थ समजली पाहिजे, असा या उपक्रमाचा हेतू आहे.

यांचा राहणार सहभाग

या उपक्रमात नाशिक शहरातील इंटेरिअर डिझायनर्सने यासाठी पुढाकार घेतला असून, त्याबाबत रेल्वे प्रशासनाची खास मान्यतादेखील घेतली आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकात कलाकुसर करण्यासाठी चित्रकला महाविद्यालय, के. के. वाघ ललित कला महाविद्यालय, केटीएचएम कॉलेज, मविप्र आर्किटेक्चर कॉलेजसह कैलास परदेशी, योगेश वालाडे हे चित्रकार सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images