Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

करमणूक कर नाही, तर निवडणूक नाही!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhav

नाशिक: कोणत्याही स्वरूपाची थकबाकी असलेल्या उमेदवारास सार्वजनिक निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येत नाही. तसा कायदाच असून, याचा आधार घेत करमणूक कर थकवणाऱ्या १२ जणांच्या नावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका प्रशासनाला दिली आहे. यापैकी इच्छुक उमेदवारांना ना हरकत दाखला देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाश‌िंग बांधून तयार आहेत. महापालिका निवडणुकीवेळी आपल्या नावे थकबाकी राहणार नाही, याची दक्षता उमेदवारांकडून घेतली जाते. बऱ्याचदा महापालिकेशी संबंध‌ित थकबाकीचा विचार यात केला जातो. मात्र, या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल विभागाकडे थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या नावांची यादीच महापालिकेला सादर केली आहे. केबल ऑपरेटर, सभागृह किंवा मनोरंजनाची इतर सुविधा संबंध‌ितांकडून पुरवली जाते. मात्र, त्यापोटी करमणूक कर भरला जात नाही. थकबाकीदारांचा आणि थकबाकीचा आकडा मोठा असून, त्यापैकी कोणी इच्छुक उमेदवार ना हरकत दाखला घेण्यासाठी आला तर तो त्यास देऊ नये, असे महसूल विभागाने महापालिकेला कळवले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार, अनिल (छोटू) गांगुर्डे, नैना नीलेश सहाणे, नीलेश सहाणे, फम‌िदा जब‌िर खान, अनंत औटे, मुकुंद भास्कर बागूल, राम दशरथ खांदवे, ज्ञानेश्वर रामनाथ नागरे, सुनीता सुभाष घुबाडे, बजरंग नामदेव शिंदे, शश‌िकांत हरिभाऊ जाधव, शिवाजी देशमुख आणि सुनील आबा जाधव अशी थकबाकीदारांची नावे आहेत.

दाखल्यांसाठी २३०४ अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार यापैकी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांना ‘ना हरकत दाखला’ दिला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. बुधवारपर्यंत दोन हजार ३०४ जणांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना हरकत दाखल्यासाठी अर्ज सादर केले. त्यापैकी दोन हजार २३७ दाखले तयार असून, जवळपास एक हजार ९०० दाखले वितरीत करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये उमेदवारीचा तिढा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची घटिका येऊन ठेपली असतानाही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांसाठी उमेदवारांची निवड ही अग्निपरिक्षा ठरली आहे. उमेदवारीसाठी लॉबिंग, दबाव, शक्तिप्रदर्शन, इशारे आदींमुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मनसे वगळता अन्य पक्षांकडून यादी जाहीर होऊ शकली नाही. भाजप व शिवसेना या दोन पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस असून, बंडखोरांचीही मोठी भीती या दोन्ही पक्षांना आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरून रात्री उशिरापर्यंत युती आणि आघाडीमध्ये खल सुरू होता. बंडखोरीच्या भीतीने भाजपने तर थेट एबी फॉर्म उमेदवारांच्या हातात टेकवण्याचा निर्णय घेतला आहे, तर सेनेनेही शुक्रवारचाच दिवस निवडला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून कमीत कमी बंडखोरी होईल, याची दक्षता संगनमताने घेण्यात आल्याची चर्चा आहे.

मनसेने मात्र पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली असून, उर्वरित यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत महापौर अशोक मुर्तडक यांचा पत्ता मात्र कापण्यात आला आहे. दुसरीकडे शक्तिहीन झालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीचा घोळ अजून सुटला नसून निवडक प्रभागांमध्ये अजूनही तिढा आहे. त्यामुळे उमेदवार यादी तर दूरच, अजून आघाडीचीही घोषणा झाली नसल्याने इच्छुक सैरभैर झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारचा दिवस निर्णायक ठरणार असून, बंडखोरी टाळण्याचे सर्वांत मोठे आव्हान शिवसेना, भाजपसमोर राहणार आहे.

मनसेच्या यादीत महापौरांचे नाव नाही!

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवार निवड ही इतर पक्षांसाठी डोकेदुखी ठरली असतानाच मनसेने सर्वप्रथम ५४ उमेदवारांची यादी जाहीर करून धक्का दिला आहे. मनसेतर्फे गुरुवारी पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात विद्यमान आठ नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांच्यासह सुरेखा भोसले, अनिल मटाले यांचा समावेश आहे. बंडखोरांची वाट न पाहता मनसेने यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. असे असले तरी पहिल्या यादीत महापौर अशोक मुर्तडक व शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोघांच्या नावाचा समावेश नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेत इनकमिंग; बंडाळीचा धोका

सर्वाधिक इनकमिंग झालेल्या शिवसेनेसाठी उमेदवारांची निवड ही अग्निपरिक्षा ठरली असून, गुरुवारीही पक्षाची अंतिम यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे भाजपप्रमाणेच शिवसेनेलाही बंडाळीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे आयारामांमुळे पक्षाची डोकेदुखी वाढली असताना शेवटच्या क्षणापर्यंत पक्षात इनकमिंग सुरू होते. अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. चव्हाण यांच्या प्रवेशावरून तीन दिवसांपूर्वीच राडा झाला होता. मात्र, देवानंद बिरारींची दिलजमाई करण्यात पक्षाला यश आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात बंडाळी रोखण्यात यश आले असले तरी यादी जाहीर झाल्यानंतरचा बंडोबांचा उद्रेक पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या मुखपत्रातून शुक्रवारी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

भाजपमध्ये राडेबाजी सुरू

महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या भाजपला निवडणुकीपूर्वीच निष्ठावंतांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी व निष्ठावंतांची नाराजी ओढवू नये म्हणून भाजपने यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारीच भाजपमध्ये उद्रेक पाहायला मिळाला. काही निष्ठावंतांनी पालकमंत्र्यांना घेराव घालत उमेदवारीसाठी आग्रह धरला. निष्ठावंतांनीच भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड भाजपपुढचे सर्वांत मोठे आव्हान असून, निष्ठावंतांचा रोष कायम राहिला तर सत्तेचे स्वप्न निवडणुकीपूर्वीच भंगण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत यादी अंतिम करण्याचे काम सुरू होते. काही निवडकांना एबी फॉर्मचे वाटपही सुरू करण्यात आले आहे.

आघाडीचा घोळ संपेना

शिवसेना, भाजपचा घोळ संपला नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा तिढाही कायम आहे. जागावाटपाचे अंतिम सूत्रही निश्चित झाले नसल्याने आघाडीचे इच्छुक सैरभैर झाले आहेत. काही प्रभागांमध्ये उमेदवारही नसताना दोन्ही पक्षांनी निवडक जागांवर एकत्रित दावा ठोकल्याने शेवटपर्यंत आघाडीचा घोळ संपत नसल्याचे चित्र आहे. काही इच्छुकांनी काँग्रेस कार्यालयात जाऊन एबी फॉर्मची मागणीही केली. मात्र, पक्षाकडून अजून यादी अंतिम झाली नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले, तर राष्ट्रवादीतही तिढा कायम होता. राष्ट्रवादीने प्रभाग १२ मधील एका जागेवर दावा केला, तर काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनीही दावा केल्याने आघाडीचा तिढा कायम आहे. आघाडीकडूनही शुक्रवारीच थेट उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नेत्यांकडून घोडेबाजार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्म देणे भाजपच्या चागंलेच अंगलट आले आहे. मनसे आणि शिवसेनेतून ऐनवेळी पक्षात आलेल्यांना पायघड्या घातल्याने भाजपला निष्ठावंतांच्या रोषाचा सामना करावा लागला असून, पक्षात मोठ्या प्रमाणावर बंडाळी उफाळून आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सानप यांना पक्ष कार्यालयात घेराव घालण्यात आला.

निष्ठावंतांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सानप यांना कार्यालय सोडण्याची वेळ आली. दरम्यान, भाजपने २५ ते ३० लाख रुपये घेऊन उमेदवारी विकल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला असून, उमेदवार पाडण्याचा इशारा दिला आहे. तसेच यावेळी काही इच्छुकांनी अश्लिल भाषेत शिव‌ीगाळही केली. त्यामुळे भाजप कार्यालयाला पोलिस संरक्षण पुरवावे लागले.

राज्यातील सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांचा ओढा होता. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी थेट मुख्यमंत्र्याकडून लॉबिंग केले होते. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक मारामारी होती. भाजपने सातशे इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. परंतु, बंडाळी होण्याची शक्यता असल्याने अखेरीस उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्मच देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय भाजपच्या चांगलाच अंगलट आला. पालकमंत्री महाजन व सानप यांच्यावर उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचे आरोप करण्यात आले. सकाळी ११ वाजता कोणाला उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. त्यामुळे उमेदवारी डावलण्यात आलेल्या इच्छुकांनी भाजप कार्यालय गाठले. भाजपकडून प्रभाग क्र. ३१ मधून इच्छुक असलेल्या शांता देवचंद दोंदे, प्रभाग क्र. १६ मधील रवींद्र भालेराव यांच्या मातोश्री सुश‌िला भालेराव, बापू लोंखडे, मनीषा भालेराव यांनी पक्ष कार्यालय गाठले. यावेळी सानप यांनीही कार्यालयात प्रवेश केला. त्यामुळे या इच्छुकांनी त्यांना गराडा घालत जाब विचारला. आम्हाला उमेदवारी का दिली नाही, असा सवाल करण्यास सुरुवात केली.

सानप यांना शांताबाई दोंदे, सुश‌िला भालेराव यांनी आक्रमक भाषेत सुनावत घेराव घातला. पक्षाच्या पडत्या काळात आम्ही काम केले. परंतु, ऐनवेळी तुम्ही दुसऱ्यालाच उमेदवारी का दिली, असा सवाल करत आम्ही पक्षाचा उमेदवार पाडू, असा सरळ इशाराच दिला. तसेच पैसे घेऊन तिकीटवाटप केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पक्ष कार्यालयात मोठा गोंधळ होण्यास सुरुवात झाल्याने सानप यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. सानप गाडीत बसल्यानंतरही इच्छुकांची आरोपबाजी सुरूच राह‌िली. त्यामुळे भाजप कार्यालयात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनाच संरक्षणासाठी उभे रहावे लागले.

आत्मदहन करेल किंवा भोसकेन

भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी पक्षाला गंभीर स्वरुपाचे इशारे दिले. शांता दोंदे यांनी तर पैसे घेवून उमेदवारी वाटप केल्याचा आरोप करत उमेदवारी मिळाली नाही तर आत्मदहन करेल असा इशारा दिला. तसेच एकएकाला भोसकण्याची धमकीही त्यांनी यावेळी दिली. प्रभाग क्र. ३१ मधून त्यांच्या पतींना उमेदवारी हवी होती. परंतु, ती न मिळाल्याने त्यांचा जीभेवरील तोल सुटला. भाजपच्या नेत्यांनी एक कोटीपर्यंत पैसे घेतल्याचा आरोप केला. त्यांची ही दमबाजी चर्चेचा विषय बनली होती.

..अन् कोसळले रडू!

उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांना भाजप कार्यालय ते महाजन यांचे निवासस्थान अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. प्रभाग क्र.२९ मध्ये भाजपकडून डॉ. सोनल मंडलेचा यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु, ऐनवेळी त्यांच्या प्रभागात संगीता बरके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे डॉ. सोनल मंडलेचा व्यथ‌ित झाल्या. त्यांनी महाजन यांचे निवासस्थान गाठून आपली कैफियत मांडली. परंतु, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना महाजन यांच्या निवासस्थानाबाहेरच रडू कोसळले. त्यामुळे त्यांचे समर्थक चिडले. त्यांनीही शिव्यांची लाखोली वाह‌िली.


भाजपच्या नेत्यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे. ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला आहे. मला उमेदवारी मिळाली नाही तर आत्मदहन करेन किंवा एकेकाला आता भोसकेन.

शांता दोंदे, इच्छुक



पक्षात नव्याने आलेल्यांना तत्काळ उमेदवाऱ्या दिल्या आहेत. परंतु, पक्षासाठी योगदान असलेल्यांना नाकारले आहे. त्यामुळे तिकीटवाटपात मोठा घोडेबाजार झाला आहे. आम्ही पक्षीय पातळीवर याची तक्रार करणार आहोत.

-सुश‌िला भालेराव, इच्छुक


भाजपने घोडेबाजार करून उमेदवारी दिली आहे. आम्ही पक्षाचे निष्ठावंत असून अनेक वर्षांपासून काम करत आहोत. गरीबांना उमेदवारी टाळली. निष्ठावंतांना डावलणे भाजपला महागात पडणार असून, पक्षाच्या उमेदवारांना आम्ही मतदान करणार नाही.

- बापू लोखंडे, इच्छुक


पक्षासाठी ज्यांनी काम केले त्यांना उमेदवारी नाही. सर्व्हेक्षण करून तरी उमेदवारी दिली पाह‌िजे. रात्री अडीच वाजेपर्यंत माझी उमेदवारी फिक्स होती. परंतु, ऐनवेळी बाहेरच्या उमेदवारांना तिकीट दिले गेले.

-डॉ. सोनल मंडलेचा, इच्छुक


चार महिन्यांपासून काम करत आहोत. हा पैशांचा घोळ आहे. २५ ते ३० रुपये लाख घेऊन तिकीटवाटप केले आहे. चांगले उमेदवार यांना नको आहेत. मोदींनी यांना हेच सांग‌ितले का? आमचा राजकारणावरचा विश्वास उडाला आहे. राजकारणासारखे दुसरे गलिच्छ काम कोणतेच नाही.

-भगवान मराठे, इच्छुक उमेदवार समर्थक


उमेदवारी देताना निवडून येणे हा निकष लावण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते असे आरोप करणारच आहेत. उमेदवारी देतानाचा निर्णय संगनमताने घेतला आहे.

-आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस कार्यालयाला टाळे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर विकास आघाडीच्या माध्यमातून गेले सहा महिने प्रचार करणाऱ्या उमेदवारांना ऐनवेळी पुरस्कृत करून निष्ठावंतांना डावलल्याचा प्रकार काँग्रेस पक्षातही घडला आहे. शहराध्यक्ष शरद आहेर यांनी इतरांकडून पैसे घेऊन निष्ठावंतांशी गद्दारी केल्याचा आरोप करीत प्रभाग क्रमांक पाचमधील संतप्त कार्यकर्त्यांनी एम. जी.रोडवरील काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकले. शहराध्यक्ष हटावच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

अन्य पक्षांप्रमाणेच काँग्रेस पक्षातही तिकीटवाटपावरून नाट्य घडले. निवडणुकीपूर्वीच अर्जुन गांगुर्डे, उद्धव निमसे यांसारख्या पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. मात्र, अनेक निष्ठावान कार्यकर्ते अजूनही काँग्रेससाठी झटत आहेत. शिवसेना आणि भाजपपेक्षा काँग्रेसमध्ये चुरस कमी असली, तरी तेथेही तिकीटवाटपावरून गोंधळ सुरू असल्याचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाहावयास मिळाले. प्रभाग क्रमाकं पाचमध्ये पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग बोडके यांच्या पत्नी शोभा उमेदवारीच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. बोडके कुटुंबीयांतील एकास उमेदवारी दिली जाणार असून, पक्षचिन्हासह अर्ज भरा, असे शहराध्यक्षांनी आम्हाला सांगितले. मात्र, ऐनवेळी विमल पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याचे समजताच बोडके कुटुंबीय आणि कार्यकर्ते संतप्त झाले. जाब विचारण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या शहर कार्यालयात धाव घेतली. मात्र, शहराध्यक्षांसह तिकीटवाटपात महत्त्वाची भूमिका बजावणारे पदाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकले.

‘तुम्ही अर्ज भरा, त्यावर चिन्ह टाका, सकाळी तुम्हाला एबी फॉर्म दिला जाईल,’ असे सांगण्यात आल्याचा दावा बोडके कुटुंबीयांनी केला आहे. पक्षाचे कार्यालय असताना लक्झरियस हॉटेलमध्ये तिकिटे निश्चित करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पक्षात एजंटगिरी सुरू असून, धनशक्तीपुढे जनशक्तीला नमविले जात असल्याबाबत निषेध नोंदविण्यात आला. पैसे घेऊन उमेदवारी देणाऱ्या शहराध्यक्षांचा धिक्कार असो, निष्ठावंतांवर अन्याय करून पळणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

---

शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकिटे वाटल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. आम्हाला आश्वासनांवर झुलवत ठेवून पक्षाने ऐनवेळी आमच्याशी दगाबाजी केली आहे. गतवेळी पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांवर पक्षाने अधिक विश्वास दाखविला हे दुर्दैव आहे.

-जगदीश बोडके

---

बोडके यांनी केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. प्रभाग पाचमध्ये काँग्रेसला एकच जागा मिळाली असून, तीन जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या आहेत. त्यांनी तेथे काही उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. काँग्रेसने विमल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. बोडके यांनी गैरसमजातून आरोप केले असून, पैसे घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

-शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत गुद्दागुद्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी महापौर विनायक पांडे यांचे पुत्र ऋतुराज पांडे आणि भावजयी कल्पना पांडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरुन शुक्रवारी शिवसेनेत राडा झाला. याच प्रकरणातून महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना बेदम मारहाणही झाली. तसेच २५ लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप पांडे यांनी केला आहे. मात्र, हे आरोप बोरस्ते यांनी फेटाळून लावले आहेत.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेतील बंडाळी उफाळून आली. माजी महापौर विनायक पांडे आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यात बाचाबाची आणि त्यानंतर हाणामारीही झाली. तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसके सॉलिटेअरमध्ये हा प्रकार घडला. पांडे यांचे पुत्र ऋतुराज पांडे यांना प्रभाग १३मधून तर त्यांच्या भावजयी तथा विद्यमान नगरसेवक कल्पना पांडे यांना प्रभाग २४मधून उमेदवारी नाकारण्यात आल्याची बाब पांडे यांच्या निदर्शनास आली. हीच बाब लक्षात घेऊन पांडे हे त्यांच्या समर्थकांसह हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे आले. त्याठिकाणी बोरस्ते यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय करंजकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पांडे यांनी बोरस्ते यांना उमेदवारी नाकारण्याबाबतचे कारण विचारले. याचवेळी पांडे आणि बोरस्ते यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. बोरस्ते यांचे कपडेही या झटापटीत फाटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच, बोरस्ते यांच्या चेहऱ्यावर मोठे व्रण निर्माण झाल्याचेही दिसून आले. या साऱ्या प्रकारानंतर पांडे हे हॉटेलमधून बाहेर पडले. त्याचवेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. शिवसेनेमध्ये चुकीचा पायंडा पडत असून निष्ठावंतांना उमेदवारी नाकारली जात असल्याचा आरोप पांडे यांनी यावेळी केला.


पोलिसांकडून धरपकड

शिवसेनेच्या दोन गटात वाद तसेच हाणामारी होत असल्याची बाब पोलिसांना कळताच मोठा पोलिस बंदोबस्त हॉटेलच्या बाहेर तैनात झाला. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली. आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांनी पोलिस व्हॅनमध्ये बंदिस्त केले. याप्रसंगी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, एसीपी राजू भुजबळ यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून अनुचित प्रकार घडू दिला नाही.


बोरस्तेंचा तातडीने खुलासा

बाचाबाची आणि मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर बोरस्ते यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन झाल्या प्रकाराचा खुलासा केला. आमच्यात केवळ बाचाबाची झाल्याचे त्यांनी कबूल केले. तसेच शिवसेना पक्षप्रमुखांसमक्ष चुंभळे कुटुंबियांचा प्रवेश झाल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खासदार, आमदार, संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या पॅनलने उमेदवारी निश्चित केली असून, पैसे घेतल्याचा आरोपही सपशेल खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पांडे यांच्या पक्षनिष्ठेविषयी मी अधिक न बोललेले बरे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. याप्रसंगी नगरसेवक विनायक खैरे हे यावेळी उपस्थित होते.


शिवसेनेमध्ये शिस्त अधिक महत्त्वाची आहे. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट देऊन सामान्य कार्यकर्त्यांना कसे डावलता येईल? पांडे यांनी केलेले आरोप निराधार आहेत. पुत्रप्रेमापोटी त्यांनी विविध आरोप केले असले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही.

- अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना


गेल्या ३८ वर्षांपासून मी शिवसेनेत आहे. तरीही माझ्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली. चुंभळे कुटुंबियांकडून २५ लाख रुपये घेऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यात आली आहे. अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांच्या कारभारामुळे शिवसेनेला मोठा फटका बसत आहे.

- विनायक पांडे, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुमखुमी!

$
0
0

खुमखुमी!

कुठल्याच बाबतीत मागं नसल्याचं नाशिकनं पुन्हा एकदा दाखवून दिलं होतं... ऐतिहासिक आणि धार्मिकतेबरोबरच राजकीय हाणामाऱ्यांचं शहर हे नवं बिरुद चिकटलं होतं... शहराच्या नसानसांत पॉलिटिक्स भिनलं असल्याचं सिद्ध झालं होतं... तिकिटासाठी प्रत्येक जण वाट्टेल त्या थराला गेला होता... शिव्यांची लाखोली, राडेबाजी, धक्काबुक्की, रेटारेटी, आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक असं सारं एकाच वेळी दिसून आलं होतं...

प्रत्येकालाच खुमखुमी असल्याचं दिसून आलं होतं... कार्यकर्त्यांना पुढं करून पेटवलं जात होतं... कुणाला स्वतःसाठी, कुणाला पत्नीसाठी, मुलासाठी, तर अजून कुणासाठी काहीतरी हवंच होतं... मला नाहीतर त्यालापण नाही, त्याला दिलं तर मलाही हवंच, या न्यायानं कुठं कुणाचं डोकं फुटलं होतं, तर कुणाचा डोळा... कुठं एबी फॉर्म पळवला गेला, तर कुठे तो फाडून टाकण्यात आला... सत्तेच्या हव्यासापोटी कपड्यांबरोबरच माणुसकीही टराटरा फाडून टाकण्यात आली होती...

तत्त्व, निष्ठा, विचार एका मिनिटांत बदले होते... अखेरच्या काही मिनिटांत इकडचा माणूस तिकडे झाला होता... एक झेंडा पायदळी तुडवत दुसरा खांद्यावर घेण्यात आला होता... संक्रांतीला पंतगोत्सवात दिसणार नाही अशी काटाकाटी शहरानं एका दिवसात अनुभवली होती... अर्थात, इथं नायलॉनचा मांजा नसला तरी खोलवर घाव अनेकांना काही तासांत मिळाले होते… किंवा त्यांनी ते इतरांना दिले होते... ज्यांना घाव मिळाले नाहीत, त्यांना ते कधी आणि कसे द्यायचे याची पक्की शिकवणही मिळाली होती... पुढच्या वेळची पायाभरणी इथंच तर झाली होती...

संक्रांतीला महिना उलटल्यानंतरही अनेकांवर खरीखुरी संक्रात आली होती... तिकिटं फायनल झाल्यानं आता इथून पुढं इलेक्शनचा रंगमंच आणखी पुढं सरकणार होता... या नाट्याचा पहिला प्रयोग शुक्रवारी खऱ्या अर्थानं शहरवासीयांनी पाहिला होता... सच्चा कलाकार या राजकीय रंगमचावरून केव्हाच हद्दपार केला गेला होता... आणखी २० दिवसांत बरेच प्रयोग बघायला मिळणार होते...

-संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड प्रभागात उमेदवारांची दमछाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक मनपाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकरोड प्रभागातून एकूण ३१८ उमेदवारांनी ५०३ उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना-भाजपसह इतर पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची एबीफॉर्ममुळे दमछाक झाली.

नाशिकरोड प्रभागातील एकूण सहा प्रभागांतील २३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात इच्छुकांनी कार्यकर्त्यांसह गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांमध्ये नवख्यांची मोठी संख्या आहे. प्रभाग २१ डमधून शेख गुलाम गौस बाबुलाल यांच्या उमेदवारीच्या रुपाने एमआयएम या पक्षानेही प्रथमच नाशिकरोड प्रभागात एंट्री केली.

शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्मची मोठी प्रतीक्षा करावी लागली. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंतच होती. परंतु, प्रभाग २० अ मधून अनिल बहोत (काँग्रेस), संजय अढांगळे (राष्ट्रवादी) व प्रभाग २२ अ मधून गुंफाबाई भदरंगे (आरपीआय) या तीन उमेदवारांना आपले एबी फॉर्म मुदतीत सादर करता आले नाही. त्यांचे अर्ज स्वीकारले गेले असले तरी त्यांच्यावर मुदतीनंतर आलेले अर्ज असा शेरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मारला असल्याने या उमेदवारांना अपक्ष उमेदवारी करावी लागणार आहे. परिणामी या प्रभागांतून संबंधित पक्षांचे पॅनलही कोलमडले आहे. पूर्वाश्रमीचे मनसेचे नगरसेवक अशोक सातभाई व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अॅड. सुनील बोराडे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेची उमेदवारी दाखल केली. परंतु, या दोघाही उमेदवारांनी पक्षाचा एबी फॉर्म सादर केल्याने या दोघांपैकी कुणाची उमेद्वारी अधिकृत समजायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा प्रस्थापितांना ‘दे धक्का’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सैराट उमेदवारी वाटप केल्याने त्याचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे. भाजपने विद्यमान दोन नगरसेवकांसह दोन आयात नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे. भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ पाटील, तसेच आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केला आहे. विद्यमान नगरसेविका सविता दलवाणी यांनाही उमेदवारी नाकारली आहे.

पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भाजपने उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात निष्ठावंतांना डावलले. अनेक प्रस्थापितांनाही दणका देत घरचा रस्ता दाखवला. भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ पाटील यांचाही पत्ता कट केला, तर विद्यमान नगरसेवक सविता दलवाणी, परशुराम वाघेरे यांना तिकीट नाकारले. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नगरसेविका लता दिनकर पाटील व मनसेतून आलेल्या सुनीता मोटकरी यांनाही तिकीट नाकारले आहे. तसेच आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे यांचाही पत्ता कापून कात्रजचा घाट दाखवला आहे.

गिते, सानप, हिरेंची चलती

भाजपच्या यादीत माजी आमदार वसंत गिते, बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे या तिघांच्या समर्थकांनाच उमेदवारी वाटपात झुकते माप देण्यात आले आहे. त्यामुळे गिते, सानप हिरे या तिकडीची भाजपाच चलती असल्याचा संदेश गेला आहे. सिडको व सातपूरमध्ये अपूर्व हिरेंच्या समर्थकांना अधिक तिकिटे देण्यात आली आहेत. मध्य नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांना डावलून थेट वसंत गितेंचा शब्द अंतिम मानण्यात आला आहे. गिते समर्थकांना तर नाशिकरोड, सिडको, मध्य नाशिकमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. सानप यांनाही झुकते माप दिले आहे.

भाजपकडून चार गुंड पावन

भाजपने एकीकडे निष्ठावंतांना डावलले असताना दोन गुन्हेगारांना थेट, तर दोघांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देऊन त्यांना पावन केले आहे. प्रभाग 28 मधून याग्निक शिंदे, प्रभाग ४ मधून हेमंत शेट्टी यांना, तर रम्मी राजपूत यांची बहीण सीमा राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. तसेच पप्पू (धनंजय) माने यांच्या पत्नी प्रियंका माने यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपनेही गुन्हेगारांना आपले केल्याने इतरांपेक्षा वेगळे असल्याची भाजपची ओळख आता पुसली गेली आहे.

संघटनमंत्र्यांनी आमदाराला कोंडले!

भाजपकडून प्रभाग १४ मधून अलका मंडलिक यांना उमेदवारी हवी होती. पंरतु, त्यांच्याऐवजी हिना इनामदार यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयात गोंधळ घातला. एबीफॉर्म वाटप खोलीत प्रवेश करीत संघटनमंत्री काळकर यांनाच जाब विचारला. त्यांनी जवळपास तारभर गोंधळ घातल्याने काळकर संतापले. त्यामुळे त्यांनी मंडलिक यांना आवर घालण्याची गळ आमदार देवयानी फरांदे यांना घातली. मंडलिक या आमदार फरांदे यांचेही ऐकत नसल्याने काळकर अधिक संतप्त झाले. त्यांनी मंडलिक यांना बाहेर काढत शेजारच्या रुममध्ये कोंडले. सोबतच आमदार फरांदे यांना शांत करण्याचे आदेश देत त्यांनाही या रुममध्ये कोंडून ठेवले. तरीही मंडलिक कोणाचेच ऐकत नसल्याने सर्वांनीच हात टेकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयारामांसह विद्यमानांना उमेदवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्बबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेनेने इतर पक्षातून आलेल्या, तसेच स्वपक्षातील अशा एकूण २७ नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या नगरसेवकांना पुन्हा निवडून आणतानाच स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी ६२ ठिकाणी विजय प्राप्त करण्याचे कसब शिवसेनेला पेलावे लागणार आहे.

शिवसेनेने आपल्या पक्षाचे विद्यमान नगरसेवक मनीषा हेकरे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सचिन मराठे, मंगला आढाव, शैलेश ढगे, शोभना शिंदे, अशोक सातभाई, सूर्यकांत लवटे, नयना घोलप, सुनीता कोठुळे, केशव पोरजे, कल्पना पांडे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, डीजी सूर्यवंशी, वंदना बिरारी यांना पुन्हा संधी दिली आहे. इतर पक्षातून सेनेत दाखल झालेले विद्यमान नगरसेवक संजय चव्हाण, अरविंद शेळके, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, कल्पना चुंभळे, रमेश धोंगडे, रंजना बोराडे, नंदिनी जाधव, यतीन वाघ, योगिता आहेर यांना उमेदवारी बहाल केली आहे.

तर, काही विद्यमान नगरसेविकांऐवजी त्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेने रिंगणात उतरविले आहे. त्यात नगरसेवक सुरेखा नागरे यांचे पती गोकुळ नागरे, सुमन ओहोळ यांचे पती विजय ओहोळ, नगरसेवक गणेश चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण, शिवाजी चुंभळे यांचे पुतणे कैलास चुंभळे यांना उमेदवारी दिली आहे.

सारेच आयाराम खूश

निवडणुकीपूर्वी विविध पक्षातून शिवसेनेत दाखल झालेल्या आयारामांना सेनेने खूश केले आहे. त्यामु‍ळेच सर्वांना उमेदवारी देऊन शिवसेनेने वेगळा संदेश दिला आहे.

निष्ठावंत कार्यकर्ते नाराज

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेल्या अनेकांना संधी दिलेली नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीच्या तोंडावर दाखल होऊन उमेदवारी दिलेल्यांचा प्रचार आम्ही करायचा का, असा सवालही काही कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

चुंभळे, चव्हाणांना दोन तिकिटे

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले शिवाजी चुंभळे यांच्या कुटुंबातील दोघांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यात विद्यमान नगरसेवक कल्पना चुंभळे आणि त्यांचे पुतणे कैलास चुंभळे यांना प्रभाग २४ मधून तिकीट देण्यात आले आहे. तर, गुरुवारीच शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक संजय चव्हाण यांना प्रभाग ३० मध्ये, तर त्यांची कन्या डॉ. स्नेहल यांना प्रभाग १३ मध्ये उमेदवारी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पांडेंचा निर्णय उद्धवांकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी महापौर विनायक पांडे यांचे चिरंजीव ऋतुराज यांच्याकडे शिवसेनेबरोबरच भाजपचाही एबी फॉर्म असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी (४ फेब्रुवारी) होणार असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग १३ मधून ऋतुराज पांडे यांना उमेदवारी देण्यावरून शिवसेनेत शुक्रवारी मोठा राडा झाला. हॉटेल एसएसकेमध्ये झालेल्या बाचाबाची आणि हाणामारीवेळी काही कार्यकर्त्यांनी पक्षाचे एबी फॉर्म पळवून नेल्याचे सांगितले जात आहे. त्यास महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दुजोरा दिला आहे. शिवसेनेने नकार दिल्याने ऋतुराज यांनी भाजपच्या वतीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी भाजपचा एबी फॉर्म प्राप्त केला. मात्र, पळवून नेलेल्यापैकी एक शिवसेनेचा एबीफॉर्म ऋतुराज यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात विनायक पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल स्विच ऑफ होता. सेनेच्या अधिकृत यादीत ऋतुराज यांचे नाव नसून, त्यांनी भाजप व शिवसेना यांचा एबी फॉर्म सादर केला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ते आता कुणातर्फे निवडणूक लढविणार याबाबत साशंकता आहे. मात्र, शिवसेनेचा एबी फॉर्म आणि ऋतुराज यांची शिवसेनेकडील उमेदवारी याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी घेणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवार, कार्यकर्त्यांमुळे वाहतूक खोळंबली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात शुक्रवारी प्रचंड गर्दी झाली होती. कार्यालयासमोरील रस्त्यावर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहने उभी केल्याने वाहतूक दुपारी तीनपर्यंत खोळंबली होती. काहींनी कार्यालयाच्या आवारातही वाहने उभी केल्याने प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासून गर्दी केली होती. सर्वच उमेदवारांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणून शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे बिटको ते देवळालीगाव दरम्यानची वाहतूक सकाळी अकरा ते दुपारी तीन दरम्यान खोळंबली होती. महापालिकेच्या कार्यालयासमोरच दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यात आली होती. काही भाईंनी परवानगी नसताना वाहने महापालिकेच्या आवारात उभी केली. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी ती हटवून बॅरिकेडस् लावली.

नुसती घोषणाबाजी

महापालिकेचे आवार आणि आतील गॅलऱ्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणदणून गेले होते. सगळे नियम, आचारसंहिता धाब्यावर बसवून अनेक उमेदवार अर्ज भरण्यासाठी येत होते. उमेदवारांसह मोजक्याच प्रतिनिधींना मुख्य प्रवेशव्दारातून आत सोडण्याचे नियोजन होते. मात्र, प्रत्येक उमेदवार कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह आत घुसू लागल्याने नेत्यांच्या दादागिरीपुढे व्यवस्थाच कोलमडून पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युद्धाला तोंड फुटले...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याचा घाट राजकीय पक्षांच्या चांगलाच अंगलट आला. परिणामी, नेत्यांना मारहाण, घेराव, धमक्या, एबी फॉर्मची पळवापळव, पैशांचे आरोप, बंडखोरी अशी जोरदार धुम्मस रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या अभूतपूर्व गोंधळात पक्षांच्या अधिकृत याद्या जाहीर झाल्या तरी त्या निर्दोष नव्हत्या. पक्षाने अधिकृत उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक नगरसेवकांनी सरड्याप्रमाणे रंग बदलत, थेट दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाऱ्या पदरात पाडून घेतल्या. त्यामुळे शुक्रवारचा दिवस अभूतपूर्व गोंधळाने गाजला असून, भाजप, शिवसेनेत उमेदवारीसाठी हाणामाऱ्या सुरू असताना दुसरीकडे सर्वच पक्षांना पूर्ण उमेदवारही मिळाले नसल्याचे चित्र होते. त्यामुळे या तिन्ही पक्षांवर अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याची वेळ आली.

महापालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता. गेल्या सात दिवसांत मनसे वगळता शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी यादी जाहीर केली नाही. मात्र, शेवटच्या क्षणी यादी जाहीर केल्यावरून शिवसेना व भाजपमध्ये आगडोंब उसळला. शिवसेनेने माजी महापौर विनायक पांडे यांचा पत्ता कट केल्याने त्यांनी थेट महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनाच मारहाण केल्याने शिवसेनेला गालबोट लागले, तर दुसरीकडे भाजपमध्येही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊन पक्षातील नेत्यांवर घोडेबाजार केल्याचे आरोप झाले. उमेदवारी नाकारल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आमदार बाळासाहेब सानप यांना घेराव घातला.

सर्वांनाच बंडखोरीची लागण

महापालिका निवडणुकीत मनसे वगळता सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. शिवसेना व भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. या पक्षांना त्यांची मनधरणी करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दीड हजार उमेदवार रिंगणात

महापालिका निवडणुका लढण्यासाठी इच्छुकांचे रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले आहेत. १२२ जागांसाठी जवळपास दीड हजार अर्ज दाखल झाले असून, ४,४८६ जणांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुमारे दीड हजार उमेदवारांनी २१६१ अर्ज दाखल केले. त्यामुळे महापालिकेसाठी एवढ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ता असूनही मनसेकडे उमेदवारांची वानवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी होऊ नये, यासाठी शिवसेनेसह भाजपने एबीफॉर्मचा घोळ शेवटच्या तासापर्यंत कायम ठेवला. शिवसेना-भाजपच्या पवित्र्यामुळे बंडोबांच्या प्रतीक्षेत असलेल्या इतर पक्षांना फटका बसला. सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १२२ उमेदवारही देता आले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १०३ जागांसाठी उमेदवार जाहीर केले.

पक्षाचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्या प्रभागातून अवघे दोन उमेदवार पुढे आले असून, प्रभाग १३ मधून विद्यमान नगरसेविका सुरेखा भोसले एकट्याच किल्ला लढवणार आहेत. पक्षाने पूर्ण क्षमतेने उमेदवार दिले नसून, पॅनल पूर्ण झालेल्या ठिकाणांसाठी पक्षाकडून काय रणनीती आखली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रभाग - वार्ड - नाव

प्रभाग १ : (अ) नंदा थोरात, (ब) जयश्री पवार, (क) सोमनाथ वडजे, (ड) तुषार उखाडे, प्रभाग २ : (अ) सुनिता खरे, (ब) विशाल कोळी, (क) अनंत सूर्यवंशी, (ड) सुवर्णा संधान, प्रभाग ३ : (अ) संदीप भवर, (ब) रेणुका घोडे, (क) ज्योती गांगुर्डे, (क) सोमनाथ बोडके, प्रभाग ४ : (ब) मंदा ओढाणे, (क) भास्कर लोणारे, (ड) अमर बोरसे, प्रभाग ५ : (अ) उल्हास धनवटे, (ब) नंदिनी बोडके, प्रभाग ६ : (अ) चित्रा तांदळे, (ब) शीतल थोरात, (क) छाया काकड, (ड) अशोक मुर्तडक
प्रभाग ७ : (अ) सत्यम खंडाळे, (ब) राणी देवरे, (ड) नितीन जाधव, प्रभाग ८ : (अ) मोनिका वझरे, (क) मोतीराम बिडवे, (ड) मनीषा साळवे, प्रभाग ९ : (अ) अंबादास आहिरे, (ब) जनाबाई दिघे, (क) हिना पथारीया, (ड) महेश आहेर, प्रभाग १० : (अ) फरिदा शेख, (ब) कलावती सांगळे, (क) सोपान शहाणे, (ड) अशोक नागरे, प्रभाग ११ : (अ) सविता काळे, (ब) योगेश शेवरे, (क) सलीम शेख, (ड) अलका निगळ, प्रभाग १२ : (अ) वनिता शेवाळे, (ब) अमर काठे, (क) पक्षा कांबळे, (ड) मिलिंद ढिकले, प्रभाग १३ : (क) सुरेखा भोसले, प्रभाग १४ : (अ) जयश्री साळवे, (क) रूपेश पहाडी, (ड) गोविंदा बिरूटे, प्रभाग १५ : (अ) लता काठे, (ब) स्मिता पाठक, (क) संदीप लेनकर, प्रभाग १६ : (अ) मेघा साळवे, (ब) हेमलता कडाळे, (क) नीलेश सहाणे, (ड) ऋषिकेश गायकवाड, प्रभाग १७ : (अ) प्रमोद साखरे, (क) शीतल आहिरे, (ड) प्रवीण पवार, प्रभाग १८ : (ब) सुलोचना बोराडे, (क) रोहिणी पिंगळे, प्रभाग १९ : (अ) विनायक पगारे, (ब) कल्पना बोराडे, (क) सचिन चव्हाण, प्रभाग २० : (ड) विक्रम कदम, प्रभाग २१ : (अ) प्रेरणा चंद्रमोरे, (ब) अस्लम मणियार, (क) संगीता क्षीरसागर, (ड) अशोक ठाकरे, प्रभाग २२ : (अ) तानाजी सकट, (ब) पुष्पा रोकडे, (क) कविता जाधव, (ड) जयराम हगवणे, प्रभाग २३ : (अ) रंजना जोशी, (ब) मंगला रोडकर, (क) कौशल पाटील, (ड). धीरज भोसले, प्रभाग २४ : (ब) योगेश जगताप, (ड) अक्षय खांडरे, प्रभाग २५ : (अ) अतुल सानप, (ब) सावित्री रोजेकर, (क) कांचन पाटील, (ड) अनिल मटाले, प्रभाग २६ : (ब) कामिनी दोंदे, (क) लता गोवर्धने, (ड) ज्ञानेश्वर बगडे, प्रभाग २७ : (अ) प्रशांत खरात, (ब) लक्ष्मण वाघ, (क) संगीता दातीर, (ड) बेबी दातीर, प्रभाग २८ : (अ) गणेश मोरे, (ब) अनिता दातीर, (क) लताबाई आगळे, (ड) शांताराम मटाले, प्रभाग २९ : (अ) वर्षा वेताळ, (ब) ज्योती शिंदे, (क) सागर कडभाने, (ड) नितीन माळी, प्रभाग ३० : (अ) निकितेश धाकराव, (ब) पद्ममिनी वारे, (क) हर्षा वाघ, प्रभाग ३१ : (अ) ज्योती गायकवाड, (ब) सुमन दहिया, (क) अर्चना जाधव, (ड) भाऊसाहेब तुंगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एबीफॉर्म फाडले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी विभागात एबीफॉर्मवरून प्रचंड गोंधळ उडाला. प्रभाग चारमध्ये शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार संतनाम राजपूत यांना एबीफॉर्म न मिळाल्यामुळे निवडणूक कार्यालयात जाऊन एबीफॉर्म हिसकावून फाडून टाकले. या गोंधळानंतर पक्षाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चार एबीफॉर्म देण्यात आले. पण वेळ संपल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे कोरे एबीफॉर्म ठेवून घेत कोणताच निर्णय दिला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या या चारही उमेदवारांवर अपक्ष लढण्याची वेळ येणार असल्याची चर्चा आहे.

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले सतनाम राजपूत यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. पण त्यांना एबीफॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार सविता बडवे यांचा एबीफॉम फाडून टाकला. त्यानंतर फाडलेल्या एबीफॉर्मची ती झेरॉक्स असल्याचे बोलले जात असले तरी हा एबीफॉर्मच होता असे शिवसेनेच्या इतर उमेदवारांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राजपूतसह त्यांच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. या प्रभागातून शिवसेनेतर्फे प्रतिभा घोलप, वर्षा पगारे, भगवान भोगे व सविता बिडवे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले होते. पण पक्ष कार्यालयातून केवळ सविता बडगे यांनी आपलाच फॉर्म आणल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. यासाठी भगवान भोगे यांना थेट नाशिकरोड गाठावे लागले. त्यावेळेस त्यांना तुमचे एबीफॉर्म बडवे यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी याबाबत बडवे यांना विचारल्यानंतर फॉर्म पोहोचले नसल्याचे समजल्यामुळे अजून गोंधळ वाढला. त्यात राजपूत यांना फॉर्म फाडून त्यात भर टाकली.

एबीफॉर्मचा गोंधळ पक्षानेच वाढवला. शिवसेनेनेतर्फे कोरे फॉर्म देण्यात आले. त्याचा फटका बसला. आता अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात त्यावर ठरवावे लागेल.

- भगनान भोगे, शिवसेना उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने तिकिटं २ लाखांना विकली?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेसाठी पैसे घेऊन उमेदवारी दिली नसल्याचा दावा भाजप नेते करत असताना, चक्क भाजपच्याच कार्यालयात एकेका तिकिटासाठी दोन-दोन लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. भाजपचे निष्ठावंत उमेदवारीसाठी झगडत असताना भाजपचे सरचिटणीस नाना शिलेदार व कार्यालय सचिव अरुण शेंदूर्णीकर हे उमेदवारांकडून दोन-दोन लाख रुपये मागत असल्याचे एका व्हिडिओत दिसत आहेत.विशेष म्हणजे भाजपच्याच निष्ठांवतांनी भाजपची ही पोल खोल केली असून या व्हिडिओमुळे स्थानिक भाजप नेते आता अडचणीत सापडले आहेत. शहरातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून भाजप नेते 'नॉट रिचेबल' झाले आहेत, तर भाजपची अब्रू वेशीवर टांगली गेली असून आता हा निवडणुकाचा प्रमुख मुद्दा करण्याची तयारी मनसेने चालवली आहे.

महापालिकेसाठी निष्ठावतांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर, स्थानिक नेत्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप झाला होता. एकेका तिकिटासाठी ३० लाख रुपयांचा 'रेट' लावल्याचा दावा निष्ठावंतांनी केला होता. हे आरोप खोडून काढताना शहराध्यक्ष बाळासाहेब सानप व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नाकी नऊ आले होते.परंतु, आता पैसे घेऊन उमेदवारी वाटपाचा आरोप खरा ठरवणारा एक व्हिडिओच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ निष्ठावतांनीच व्हायरल केला असल्याने भाजपला मोठा झटका बसला आहे.

भाजपचे सरचिटणीस नाना शिलेदार व कार्यालय सचिव अरूण शेंदूर्णीकर हे इच्छुकांकडून दोन लाख रुपये मागत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. भाजप कार्यालयातीलच हा व्हिडिओ आहे. एबी फॉर्म वाटपापूर्वी दोन लाखाची रोकड किंवा दोन लाखांचा चेक जमा करण्यास सांगितले जात आहे. भाजपश्रेष्ठींनी निश्चित केलेली यादी समोर ठेवूनच ते पैसे मागत असल्याचे दिसत आहे. आत्ता पैसे नाहीत, असं म्हणणाऱ्यांना ते प्रशांत जाधव या व्यक्तीला भेटण्याचं फर्मान सोडत आहेत. विशेष म्हणजे प्रशांत जाधव यांच्याकडे एबी फॉर्म वाटपाचे काम होते. संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या आदेशानंतर जाधव हे एबी फॉर्मचे वाटप करत होते. त्यामुळे भाजपने थेट उमेदवारीसाठी पैसे घेतल्याच्या आरोपांना आता पुष्टी मिळत आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांच्या हाती आयतंच कोलित मिळालं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषदेसाठी १०६ अर्ज

$
0
0

म.टा प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याकर‌िता सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. शनिवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १०६ तर पंचायत समितीसाठी १५० अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारण्यात येणार असून, सोमवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७३ गट आणि १४६ गणांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असल्याने १ फेब्रुवारीपासून मतदार अर्ज स्वीकृती सुरुवात झाली. पहिले दोन दिवस बहूतांश उमेदवार अर्ज सादर करण्यासाठी तहसिल कार्यालयांकडे फिरकलेच नाहीत. २ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेसाठी दोन तर पंचायत समितीसाठी अवघे तीन अर्ज दाखल झाले. परंतु शुक्रवारी (दि. ३) अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली. शुक्रवारी जिल्हा परिषदेसाठी ३४ जणांनी तर पंचायत समितीसाठी ४५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर शनिवारी जिल्हा परिषदेसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०२ अर्ज सादर करण्यात आले आहेत. शनिवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी इगतपुरीत सर्वाधिक १९ अर्ज दाखल झाले आहेत. तर त्याखालोखाल दिंडोरीत १७, मालेगावात १३, येवला आणि निफाडमध्ये १२ जणांनी अर्ज सादर केले आहेत. पंचायत समितीसाठी सर्वाधिक २४ अर्ज निफाडमधून प्राप्त झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ‌जि. प. आणि प. स.साठी एकूण १७८६ ऑनालइन अर्ज आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको-द्वारका उड्डाणपूल कधी?

$
0
0

वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; अहवाल सादर करण्याचे केंद्राचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वर्दळ आणि प्रदुषणाने ग्रासलेल्या द्वारका-दत्तमंदिर मार्गाला न्याय हवा आहे. एकूण ५.९ किलोमीटरच्या या मार्गावर उड्डाणपूल (फ्लायओव्हर) त्वरित उभारावा, अशी मागणी जोर धरत आहे. हा उड्डाणपूल उभारण्यासाठी सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला नुकतेच दिल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नाशिक-पुणे मार्गावर नाशिकरोड ते द्वारकादरम्यान वाहतुकीची कोंडी होत असते. सिन्नर, नगर, पुणे, शिर्डीला जाणारे भाविक या मार्गाचा वापर करतात. सातपूर, अंबडला जाणाऱ्या नोकरदरांना हा जवळचा रस्ता आहे. नाशिकरोडचा संपर्क व व्यवहार प्रामुख्याने याच मार्गाने होतो. त्यामुळे रहदारी वाढून वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. या मार्गावर सेंट झेवियर्स, बिटको कालेज, के. जे. मेहता, महाराष्ट्र हायस्कूल आदी शैक्षणिक संस्था, गांधीनगर विमानतळ, बिर्ला हास्पिटल, पासपोर्ट ऑफिससारख्या संस्था आहेत. याशिवाय सराफी व अन्य व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. उपनगर, आंबेडकरनगर, दत्तमंदिर चौकांसारख्या बसस्टॉपमुळे कोंडीत भरच पडली आहे. द्वारका, आंबेडकरनगर, उपनगर, दत्तमंदिर आदी ठिकाणी होणाऱ्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. याशिवाय प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे.

तब्बल सहा सिग्नल

नाशिकरोड ते द्वारकादरम्यान वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सहा सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. साडेपाच किलोमीटरच्या या टप्प्यात बिटको चौक, उपनगर, आंबेडकरनगर, विजय ममता चौक, काठे गल्ली आणि द्वारका येथे सिग्नल सुरू करूनही वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. सिडको ते आडगाव उड्डाणपूल होऊनही ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता द्वारका-नाशिकरोड उड्डाणपूल तयार करून सिडको-आडगाव उड्डाणपूल त्याला जोडल्यास वाहतूक कोंडी सुटू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

उड्डाणपुलाचे फायदे

या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. उपनगर, घंट्या म्हसोबा, दत्तमंदिरचौक, बिटको चौक, सिन्नरफाटा येथे अनेक बळी गेले आहेत. नाशिकरोड-द्वारका उड्डाणपूल झाल्यास बाहेरगावच्या प्रवाशांचा वेळ व इंधन यांची बचत होईल. या मार्गावरील वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी टळेल. गंभीर झालेली प्रदूषणाची समस्या सुटण्यास मदत होईल. द्वारका, बोधलेनगर, घंट्या म्हसोबा, दत्त मंदिर चौक, बिटको चौक येथील अपघातांचे प्रमाण घटणार आहे. तसेच अनेक संसार उघड्यावर येणार नाहीत. वाहतूक पोलिसांवरील वाढलेला ताण कमी होईल. वादविवाद टळतील.



कृतीत रुपांतर व्हावे

गेल्यावर्षी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्वारका ते दत्त मंदिर चौकादरम्यान उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी खासदार गोडसे यांनी केली होती. केंद्रीय रस्ते महामार्ग विभागाला याबाबत पत्रही पाठवले होते. ५ नोव्हेंबरला केंद्रीयमंत्री गडकरी नाशिकला आले असता गोडसे यांनी उड्डाणपुलाचा विषय मांडला. त्यावर द्वारका ते दत्तमंदिर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करत उड्डाणपुलाचा सुमारे पाचशे कोटींचा खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच उड्डाणपुलाचा सविस्तर अहवाल बनविण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहे. हा अहवाल केवळ अहवाल न राहता त्याचे कृतीत रुपांतर व्हावे, अशी मागणीही आता केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोऱ्या फॉर्ममुळे शिवसेनेचे चारही उमेदवार अपक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील प्रभाग चारमध्ये शिवसेनेच्या चार उमेदवारांनी वेळ संपल्यानंतर कोरे एबी फॉर्म सादर केल्यामुळे या उमेदवारांवर आता अपक्ष निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. या प्रभागात छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदारांना कोणतीही सवलत दिली नाही. त्यामुळे त्‍यांचा हिरमोड झाला.

प्रभाग चारमध्ये एबीफॉर्म वाटपावरून चांगलाच गोंधळ उडाला होता. या प्रभागातून इच्छुक असलेले उमेदवार संतनाम राजपूत यांना एबीफॉर्म न मिळाल्यामुळे निवडणूक कार्यालयात जाऊन एका उमेदवाराकडून एबीफॉर्म हिसकावून फाडून टाकले होते. असे घडूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणतीच सवलत दिली नाही. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळूनही या सर्वांना आता अपक्ष म्हणून वेगवेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे.

या प्रभागातून शिवसेनेतर्फे प्रतिभा घोलप, वर्षा पगारे, भगवान भोगे व सविता बडवे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले होते. पण पक्ष कार्यालयातून केवळ सविता बडवे यांनी आपलाच फॉर्म आणल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर राजपूत यांनी बडवे यांचाही एबीफॉर्म फाडून टाकला. ही गोष्ट पक्षाकडे गेल्यानंतर त्यांनी नवीन चार कोरे एबीफॉर्म पाठवले. पण त्यावेळेस एबीफॉर्म स्वीकारण्याची मुदत निघून गेली होती. या सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कोरे फॉर्म दिल्यामुळे हा गोंधळ अधिक वाढला. या सर्व प्रकारानंतर उमेदवारांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर संताप व्यक्त केला. केवळ नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे हा गोंधळ झाला.

महापालिकेच्या या निवडणुकीत सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उशिरा सर्व उमेदवारांना एबीफॉर्म दिले. त्यामुळे अनेकांची धावपळ झाली. त्यात शिवसेनेच्या महानगरप्रमुखांना मारहाण झाल्यामुळे या एबीफॉर्मचा गोंधळ आणखी वाढला. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारच्या या उमेदवारांना हा फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरसाठी उद्या अंबडला मतमोजणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

प्रतिष्ठेच्या बनलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदानानंतर आता मतमोजणीकडे पाचही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. उद्या, सोमवारी अंबड एमआयडीसीतील वेअर हाऊस येथे सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ३० टेबल्स आणि सुमारे शंभरावर कर्मचारी येथे उपस्थित असणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी यंदा चांगलीच घसरली. विभागात अवघे ५४ टक्के मतदान झाले. यात नाशिकमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे ४८ टक्के मतदान नोंदविले गेले. नंदुरबारसह धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यात नाशिकपेक्षा जास्त मतदान झाले. यामुळे उपलब्ध टक्केवारीवर विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचे समर्थक गुंतले आहेत. या मतदारसंघात एकूण १७ उमेदवार रिंगणात असले तरीही राष्ट्रीय पक्षांचे तीन उमेदवार आहेत. यातही मुख्य लढत ही काँग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे व भाजपचे डॉ. प्रशांत पाटील यांच्यात होत आहे. यामुळे आता मतदानाच्या उपलब्ध आकडेवारीच्या समीकरणांवर कार्यकर्त्यांचे विश्लेषण सुरू आहे.

मतमोजणी केंद्रातील पूर्वतयारीचा आढावाही विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी घेतला. यावेळी त्यांच्या समवेत उपआयुक्त ज्ञानेश्वर खिल्लारी, संजय कोलते, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, तहसीलदार एस. डी. मोहिते, गणेश राठोड आदी उपस्थित होते. दरम्यान आज (५ फेब्रुवारी) पुन्हा मतमोजणीसाठी आढावा घेण्यात येणार आहे.

पाचही जिल्ह्यांसाठी रचना

शहरातील अंबड येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी ३० टेबल्सची रचना पाचही जिल्ह्यांसाठी असणार आहे. यात प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी कार्यरत राहतील. याप्रमाणे प्रत्यक्षात मतमोजणीसाठी टेबलवर सुमारे ९० कर्मचारी नियुक्त आहेत. विभागातील एकूण ३५३ मतदान केंद्रांची मतमोजणी येथे होईल. या मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी २०० कोटी

$
0
0

केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद; उद्योगक्षेत्राला फायदा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिककरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी नुकतीच दिली.

या रेल्वे मार्गासाठी राज्य व केंद्र सरकारचा प्रत्येकी ५० टक्के सहभाग राहणार आहे. त्यामुळे केंद्राने तरतूद केल्यानंतर राज्यानेही आपल्या अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद करावी, अशी मागणी करणारे पत्र खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी, अशी मागणी गोडसे यांनी गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पावेळी केली होती. त्यानुसार त्या अर्थसंकल्पात नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मान्यता देण्यात आली होती. सोबत टोकन रक्कम म्हणून एक कोटीचा निधीही देण्यात आला होता.

त्यामुळे या रेल्वेमार्गाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. हा अहवाल मार्च २०१७ अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती उपमुख्य अभियंता म्हस्के यांनी दिली आहे. या अहवालास तयार झाल्यानंतर वित्त व प्रशासकीय मान्यता लागणार आहे.

आता ही प्रक्रिया झाल्यानंतर येणाऱ्या आर्थिक वर्षात या कामासाठी निधीची तरतूद कमी पडू नये, अशी मागणीही गोडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

राजधानी गाडी हवी

या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेमार्गाने दिल्लीला जाणारी राजधानीसारखी जलद एक्स्प्रेस मिळावी. ती मिळाल्यास ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, भुसावळ या शहरांना लाभ मिळेल. तसेच नाशिक-भुसावळ दरम्यान तेजस किंवा हमसफर ही गाडी सुरू करावी, नाशिक रेल्वे कारखान्याचे विस्तारीकरण व्हावे, या मागण्याही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

रेल्वे मंत्रालयाने देशभरातून ४०० रेल्वे स्थानके विकसित करण्याचे ठरविले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात २५ रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात जून-जुलैमध्ये नाशिक रेल्वेस्थानक विकसित करण्याची घोषणा होईल, असा विश्वास वाटतो.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images