Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चाळीसगावला कही खुशी कही गम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

तालुक्यात झालेल्या ७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तालुक्यात दोन्हीही प्रमुख पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपला संमिश्र यश मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे तालुक्यात विजयी उमेदवारांकडे खुशी तर पराभूत उमेदवांरांकडे 'गम' असे वातावरण दिसून आले. निवडणुकीत भाजपला ४५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळाल्याचा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष के. बी. साळूंखे यांनी केला. तर निवडणुकीत ६५ टक्के जागा निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शश‌िकांत साळूंखे यांनी केला आहे.

तालुक्यात मतदान झालेल्या ७७ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६९ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक व तीन ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक ४ ऑगस्ट रोजी पार पडली. मतमोजणीस गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शहरातील हिरापूर रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालयात सुरुवात झाली. निवडणुकीनंतर काही ठिकाणी वाद झाल्याने मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. निकालानंतर कोणताही वाद उद्भवू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणीसाठी २५ टेबल लावण्यात आले होते. १६०च्या वर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ३५० पोल‌िस व होमगार्ड कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ताफा बंदोबस्तासाठीतैनात करण्यात आला होता. शहराला लागून असलेल्या टाकळी प्र. चा. येथील निवडणुकीत मोठ्या संख्येने तरुण उमेदवार उतरले होते. त्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथे भाजपचे पंचायत समिती सदस्य जगन महाजन यांच्या पॅनलने १५ पैकी ११ जागा मिळवत सत्ता काबीज केली. वाघळी ग्रामपंचायतही आधी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. या निवडणुकीत भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे यांच्या पॅनलने १५ पैकी ११ जागा मिळवत सत्ता खेचून आणली. वाघळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात मूळ वाघळीचे असलेले व जळगावचे आमदार सुरेश भोळे उतरले होते. त्यांनी निवडणुकीत गावच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‍लोकसंघर्ष मोर्चाची आदिवासी मंत्र्यांकडे धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल नंदूरबार जिल्ह्यात तळोदा आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत सुमारे १८ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार शिष्यवृत्ती वाटपाबाबत झाला आहे. या तथाकथित घोटाळ्याबाबत सखोल चौकशी करून न्याय द्यावा, असे साकडे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आदिवासी राज्यमंत्री राजे अमरीश अत्राम यांना घालण्यात आले. या संदर्भातील योजनांवर लक्ष केंद्रीत केल्यास राज्यभरातून आदिवासी विकास विभागाचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येईल, असा विश्वास लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केला.

मानव विकास निर्देशांकातही या आदिवासी बहुल तालुक्यांची स्थिती अत्यंत खालावली असल्याने येथील शैक्षणिक परिस्थितीही अत्यंत बिकट बनली असल्याबद्दलही संस्थेच्या वतीने खेद व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पूर्वी नंदूरबार आणि तळोदा असे दोनच प्रकल्प कार्यरत होते. नोव्हेंबर २०१३ मध्ये धुळे प्रकल्प सुरू झाला व तळोदा प्रकल्पातील शहादा तालुका नंदूरबार प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकल्पांनर सन् २०१२ ते सन् २०१४ या दोन वर्षांच्या कालावधीत तीन प्रशासकीय अधिकारी बदलून गेले. या अधिकारी वर्गांच्या कालावधीत उद्योजकतेशी निगडीत कोर्सेस चालविण्यात आले. या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात तळोदा प्रकल्प कार्यालयाने तुळजा भवानी महिला मंडळ, आष्टी (जि.बीड) या संस्थेला ६ कोटी ४२ लाखंची शिष्यवृत्ती, श्री स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेला १ कोटी ७१ लाखांची शिष्यवृत्ती ऑनलाईन पध्दतीने देणे बंधनकारक असताना ऑफलाईन पध्दतीने देण्यात आली, ही शिष्यवृत्ती थेट संस्थाचालकांच्या हाती देण्यात आली, शिवाय या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या विश्वासार्हतेबाबतही शंकाच आहे, संबंधित शैक्षणिक संस्थांच्या परवानग्या खऱ्या आहेत काय आदी मुद्दे यावेळी पत्रकार परिषदेत शिंदे यांनी उपस्थित केले. घोटाळा झालेल्या रकमेची एकूण किंमत सुमारे १८ कोटी असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

फाईल गहाळ

ऑफलाईन पध्दतीने पेमेंट करण्यात आलेली फाईलच गहाळ करण्यात आली असून, याबाबत दिलेले प्रस्ताव व इनस्पेक्शन फाईल हे सर्वच्या सर्व कागदपत्र गहाळ होणे ही बाबही संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीतील व्यवहारही संशयास्पद असल्याची शंका प्रतिभा शिंदे यांनी मांडली. ऑनलाईन पध्दतीने ९ कोटी १३ लाखांचे कॉम्प्युटर व हार्डवेअरच्या ज्या अभ्यासक्रमांसाठी देण्यात आले त्या अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रभाषा, वर्धा या एकाच विद्यापीठाच्या परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. ज्या अभ्यासक्रमांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे, ते विद्यार्थी अगोदरपासूनच इतर विद्यापीठांच्या शिष्यवृत्तीचे लाभार्थी ठरत असल्याने या ही शासनाच्या डोळ्यात केली जाणारी धूळफेक असल्याचे राज्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुरावात म्हटले आहे. या एकूण १८ कोटी रूपयांच्या तथाकथित शिष्यवृत्ती घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीतील खत प्रकल्प पुन्हा होणार सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीतील स्टेशनवाडी परिसरातील कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या स्टेन्चिंग ग्राऊंड व खत प्रकल्पाची पाहणी करत विविध भागातून जमा होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी आणि बंद खत प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे आदेश बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विलास पवार यांनी दिले आहेत.

मटाने खत प्रकल्प बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर 'सीईओ' पवार, आरोग्य निरीक्षक सतीश भातखळे यांच्यासह बोर्डातील अधिकारी यांनी खत प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. खत प्रकल्प सुरू करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील १ अधिकारी, ५ कर्मचाऱ्यांसह १ जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले आहे. जेसीबीच्या सहाय्याने कचरा गोळा केला जात असून कचरा विघटनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ७० एक्कर परिसरात असणाऱ्या कचरा डेपोमध्ये शहरभरातून रोज १२ घंटागाड्या कचरा अस्ताव्यस्त टाकतात.

प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट

घंटागाड्यांमधून येणाऱ्या कचऱ्याचे प्लॅस्टिक, सुका व ओला कचरा अशा पद्धतीने वर्गीकरण केले जात आहे. तसेच स्टेशनवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आरोग्य विभागाने खत प्रकल्पाच्या चारही बाजूने व रस्त्याच्या दुतर्फा 'बीएससी' पावडर तर माश्यांसाठी 'न्यूऑन' औषधांची फवारणी केली जात आहे.

स्टेन्चिग ग्राउंड येथील कचऱ्याची दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. खत प्रकल्पाबाबत कार्यवाही सुरू आहे.

- युवराज मगर, सहाय्यक आरोग्य निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेमागे साडेसाती?

$
0
0

मध्य प्रदेशातील अपघातानंतर प्रशासनाचीच उडाली झोप

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

गेल्या वर्षभरात रेल्वेला सातत्याने अपघात होत असल्याने रेल्वेबरोबरच कुंभमेळा प्रशासन, छोटे-मोठे व्यावसायिक आदी सर्वांनी देव पाण्यात ठेवले आहेत. कुंभमेळा काळात रेल्वेपुढे विघ्न उभे राहिले तर काय, या एकाच विचाराने त्यांची झोप उडाली आहे. अवघ्या काही दिवसांवर कुंभमेळा आला असतानाच मध्य प्रदेशात भीषण रेल्वे अपघात झाल्याने सर्वांच्या चिंतेत भरच पडली आहे.

मध्य प्रदेशातील इटारसी जंक्शनमधील रुट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) या कंट्रोल केबिनला १७ जून रोजी आग लागली होती. त्यामुळे नाशिक, नागपूरमार्गे धावणाऱ्या चार हजारावर गाड्या रद्द झाल्या होत्या. या केबिनद्वारे सर्व दिशांचे व सर्व मार्गावरील सिग्नल नियंत्रित केले जातात. दोन हजार अभियंते आणि अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस झटून काम केले, तेव्हा तब्बल दीड महिन्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली. रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी दुर्घटना होती. तशी दुर्घटना पुन्हा कुंभमेळा काळात घडली तर रेल्वे आणि भाविकांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यानंतर इगतपुरीजवळ जून व जुलैमध्ये रेल्वेगाडी घसरली. फेब्रुवारी २०१४ मध्येही असाच अपघात होऊन तीन जण ठार झाले होते. भुसावळजवळ रेल्वे इंजिनला आग लागली होती. आता मध्य प्रदेशात पुन्हा रेल्वे अपघात झाल्याने नाशिकमार्गे धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. मुंबई अप व डाऊन रेल्वेमार्गावर तीन महिन्यात सहा वेळा छोटेमोठे अपघात होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे.

खर्च भरून निघणार का?

कुंभमेळ्यासाठी सुमारे ८० लाख भाविक नाशिकला येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. देशभरातून येणारे बहुसंख्य भाविक आणि पर्यटक यांची मदार रेल्वेवरच आहे. या भाविक पर्यटकांच्या सवेसाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च होणार असून यातून रेल्वेच्या पदरात १० हजार कोटींचे उत्पन्न पडण्याचा अंदाज 'असोचेम'ने वर्तविला आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने चौथा फ्लॅटफार्म, पादचारी पूल आदी सुविधांसह सुरक्षा यंत्रणेवर मोठा खर्च केला आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांवरच रेल्वेचे महसूलाचे सगळे गणित अवलंबून आहे. तथापि, इटारसी स्थानकात लागलेल्या आगीमुळे चार हजार गाड्या रद्द होऊन रेल्वेला सुमारे दीड हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातून नफा तर सोडा परंतु, खर्च तरी भरून निघणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनानेही कोट्यावधी रुपये कुंभमेळ्याच्या तयारीवर खर्च केला आहे. त्यांची भिस्तही बऱ्याच अंशी रेल्वेवरच अवलंबून आहे. रेल्वे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सातत्याने घेतलेल्या बैठका, दौरे त्याची साक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए विद्यार्थ्यांसाठी विशेष प्लेसमेंट

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

सीए उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी विशेष प्लेसमेंट कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सीए संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध कोर्सेस आणि अभ्यासिका याबद्दलची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कोचिंग क्लासेससाठी ३ वर्षांसाठी सब कमिटीचीही नेमणूक करण्यात येणार आहे.

नाशिक सीए शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे नुकतीच झाली. यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासदांनी, दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व तसेच दिवंगत सीए सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सीए शाखेच्या सचिव रेखा पटवर्धन यांनी सभेचे प्रास्ताविक केले.

मागील वर्षाचे इतिवृत्त वाचन केल्यानंतर नाशिक सीए शाखेच्या उपस्थित सभासदांनी त्यास मंजुरी दिली. चेअरमन आनंद झवर यांनी आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये झालेल्या घडामोडीचे विवेचन केले तसेच पुढील वर्षात नियोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. नाशिक सीए शाखेच्या नियमित कामकाजाव्यतरिक्त आपल्या नाशिक सीए शाखेने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रम व सामाज्याशी असेलेली बांधिलकी याबद्दलची माहिती दिली. याच बरोबर येणाऱ्या ३१ तारखेला सीए 'आयपीसीसी'चा निकाल लागणार असून सर्व विद्यार्थ्यांना शुभेछा देण्यात आल्या. सदरच्या सभेसाठी नाशिक सीए शाखेचे कार्यकारणीचे पदाधिकारी सीए रवी राठी, सीए रेखा पटवर्धन, सीए विकास हासे, सीए मिलन लुणावत, सीए विक्रांत कुलकर्णी, सीए उल्हास बोरसे, सीए सारंग ढोके व तसेच सीए शाखेचे सभासद आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसी कंटेनरमधून मद्य वाहतूक

$
0
0

उत्पादन शुल्क विभागाकडून ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माशांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एसी कंटेनरमधून अवैध मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला. द्वारका परिसरात गुरूवारी पहाटे साडेचार वाजता कारवाई करण्यात आली. यापूर्वी विल्होळी येथेही अशाच प्रकारे मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरला पकडण्यात आले होते.

एका एसी कंटेनरमधून अवैध मद्याच्या वाहतूक होणार असल्याची माहिती मुंबईच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाचे निरीक्षक मुकुंद ​बिलोलीकर, सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे, जवान धनंजय भदरगे, प्रवीण झाडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी द्वारका परिसरात कंटेनर थांबवून वाहनाची तपासणी केली. त्यात त्यांना ४५ कॅरेट मासे आढळून आलेत. सकृतदर्शनी माशांचीच वाहतूक होत असल्याचे यातून स्पष्ट झाले. मात्र, अधिकाऱ्यांनी सर्व कॅरेट खाली उतरवले असता माशांखाली दडवून ठेवलेले बिग पिपल व्हिस्की तसेच न्यू बॉम्बे व्हिस्कीचे १ हजार २०० बॉक्स आढळून आले. अधिकाऱ्यांनी तत्काळ शमीरबाबू अश्वमद कुटी या वाहनचालकास तसेच पी. शाहीद हमजा या क्लिनरला अटक केली.

कंटेनर, व्हिस्की तसेच मासे असे मिळून ८६ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शेवाळे यांनी दिली. ही दारू बनावट असू शकते. तसेच ती मुंबई, नाशिक किंवा गुजराथ राज्यात नेली जात असावी, अशी शक्यता तपासाधिकारी शेवाळे यांनी व्यक्त केली. अटक करण्यात आलेल्या वाहनचालक आणि क्लिनरला मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेचा गंध नाही. त्यामुळे सध्या चौकशीत अडथळे येत असून जप्त करण्यात आलेली दारू मध्य प्रदेशातील असावी. ही दारू महाराष्ट्रात विकण्यास बंदी असून दुभाषिकाच्या मदतीने या टोळीपर्यंत पोहचण्याचा राज्य उत्पादन शुक्ल विभागाचा प्रयत्न आहे.

चोरीच्या विविध क्लुप्त्या

राज्य उत्पादक शुक्ल विभागाला चकविण्यासाठी तस्कर विविध मार्ग शोधून काढत असतात. माशांची वाहतूक हा त्यातला एक भाग आहे. काही महिन्यापूर्वी रत्नागिरी येथून ग्रॅस सिलिंडरमधून अल्कोहलची वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक झाली होती. तसेच, २३ फेब्रुवारी २०१५ रोजी याच भरारी पथकाने एक कंटेनर पकडला होता. यावेळी तब्बल ९३ लाख ३३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. जुन्या बारदाणा गोण्याची वाहतूक करण्याच्या नावाखाली तस्करी करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले होते. दरम्यान, भरारी पथकासह स्थानिक अधिकारीसुध्दा या कारवाया करतात. मात्र, त्यानंतर पुढे काय होते, याची माहिती समोर येत नाही. ड्रायव्हर किंवा मदतनीसांपेक्षा खऱ्या तस्कारावर कारवाई होणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेचा ठेका क्रिस्टललाच

$
0
0

वॉटर ग्रेसला स्थायीचा पुन्हा दणका; राष्ट्रवादी पडली मनसेवर भारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वादग्रस्त वॉटर ग्रेस कंपनीबाबत आयुक्तांनी दिलेल्या पत्राचा आधार घेत आणि न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून स्थायी समितीने साधुग्राम स्वच्छतेचे कंत्राट पुन्हा क्रिस्टल कंपनीलाच देण्याचा निर्णय घेतला. सोबतच वॉटरग्रेस कंपनी पुन्हा न्यायालयात जावू नये म्हणून या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यासंदर्भात स्थायी समितीने २००९ मध्ये केलेला ठराव रद्द करण्यात आला. क्रिस्टलला तत्काळ कार्यादेश देण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. या कंपनीने दर कमी केल्याचा दावा करण्यात आला असून, मनसेबरोबरच्या भांडणात राष्ट्रवादीची सरशी झाली.

स्थायी समितीची सभा गुरूवारी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या उपस्थितीत झाली. अपेक्षेप्रमाणे सर्वप्रथम साधुग्रामच्या स्वच्छतेचा वादग्रस्त ठेक्याचा विषय चर्चेला आला. सदस्यांनी यावेळी वॉटरग्रेस संदर्भात प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने दाखविलेल्या नरमाईच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. आयुक्तांच्या पत्राने वॉटरग्रेसची स्थिती उघड झाली असून, त्यांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी राहुल दिवे यांनी केला. त्यामुळे क्रीस्टलला काम द्यावे अशी मागणी त्यांनी केली. तर आरोग्य विभागाच्या कारभारावर सुरेखा भोसले यांनी ताशेरे ओढले. आरोग्य विभाग ठेकेदारांसाठी काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील आरोग्याची स्थिती बघता तत्काळ ठेका देण्याची गरज असल्याची मागणी यंशवत निकुळे यांनी केली. संबंधित ठेकेदाराला स्थायी समितीने काळ्या यादीतून बाहेर काढण्यासाठी केलेला ठराव रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. सदस्यांनी वॉटर ग्रेसला केलेल्या मदतीवर आक्षेप घेतला. आयुक्तांनीच संबंधित ठेकेदार काळ्या यादीत असल्याचे स्पष्ट केल्याने आणि ठेकेदाराला पुन्हा न्यायालयात जाण्याची संधी मिळू नये म्हणून सभापतींनी त्याचा काळ्या यादीतून बाहेर काढण्यासंदर्बात १८ जून २००९ चा ठराव रद्द केला. त्यानंतर क्रीस्टलला काम देण्याचे आदेश दिले.

महिला सदस्यांकडून इंगा

स्थायी समितीत नेहमीच गप्प राहणाऱ्या महिला सदस्य गुरूवारी चांगल्याच आक्रमक होत्या. सभेत पहिल्या आसनावर बसून महिलांना लांब ढकलणाऱ्या सदस्यांनाच त्यांनी धडा शिकवला. स्थायीत महिलांची संख्या जास्त. मात्र, तेथे पुरूषांचेच चालत असल्याने त्यांनी एका सदस्याला पुढची जागा देण्यात चक्क नकार दिला. या सदस्याने अगोदर बसलेल्या सदस्यांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनीच तो हाणून पाडला. त्यामुळे अपमानास्पदरित्या या सदस्याला शेवटी जावून बसावे लागले. सभापती महिलांचा आवाज दाबू नका, असा इशाराही महिला सदस्यांनी दिला. पुरूष सदस्यांच्या बरोबरीने मते मांडून त्यांनी आपली आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक भूमिपुत्रांवरून वादंग

स्वच्छतेच्या ठेक्यासाठी संबंधित ठेकेदारांनी परप्रांतीय मजुरांना आणल्यावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. संबंधित कर्मचारीच आता साधुग्रामसह अनेक ठिकाणी घाण आहेत. या मजुरांमुळे अस्वच्छता पसरत आल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी ठेकेदारांना तंबी दिल्याचा दावा केला. या कामांवर स्थानिक भूमिपुत्रांना घेतले असते तर, चांगली स्वच्छता झाली असती, असा दावा सर्वच सदस्यांनी केला. परप्रांतीय मजुरांमुळेच नाशिकला धोका असल्याचा आरोपही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दिलीप धोंडगे भाषा सल्लागार समितीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समिती सदस्यपदी केटीएचम कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांची निवड झाली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी धोरण आखण्याच्या टप्प्यावर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

प्राचार्य डॉ. धोंडगे हे चार दशकांपासून साहित्य वर्तुळात कार्यरत आहेत. 'संत वाड्:मय आणि शैली विज्ञानाचे अभ्यासक' म्हणून त्यांचा राज्यास परिचय आहे. 'राज्य मराठी विकास संस्था', 'साहित्य अकादमी', दिल्ली या संस्थांच्या माध्यमातूनही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ते कार्यरत राहिले आहेत. अलीकडील कालावधीत भाषा विभागास स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा मिळाल्याने या माध्यमातून भाषिक धोरणांना विशेष गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्याचे भाषिक धोरण ठरविणे, मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी धोरण आखणे व राबविणे, त्यासाठी संशोधनाच्या प्रारूपाला गती देणे आदी उद्दिष्टे पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असल्याचा मनोदयही डॉ. धोंडगे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वादळी चर्चेनंतर २४ कोटी मंजूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे झाली असतांना पुन्हा जुन्याच रस्त्यांच्या डागडूजीच्या नावाखाली २४ कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावावर स्थायी समिती सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. मात्र, शहराची गरज लक्षात घेवून लुटूपुटूच्या वादळी चर्चेतही हा प्रस्ताव सभापतींनी मंजूर केला. शिवसेनेच्या सदस्यांनी प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी केली. मात्र, सभापतींनी तो मंजूर करीत प्रत्येक सदस्याला खडी, मुरूम उपलब्ध करून देण्यासह पुन्हा सदस्यांच्या तक्रारी आल्या तर बिल काढणार नाही, असा इशारा दिला आहे.

गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडूजीच्या विषयावर वादळी चर्चा झाली. सहा विभागासांठी २४ कोटी रुपयांच्या प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेतला. कुंभमेळ्याच्या नावाखाली सर्व शहरात डांबरीकरण झाले असतांना रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजण्याचा प्रस्ताव आलाच कसा, यावरच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नव्या रस्त्यांच्या कामांचे मेन्टेनन्स हे तीन वर्षे ठेकेदारानेच करावयाचे असते. तरीही हा प्रस्ताव आलाच कसा, असा सवाल शिवसेनेच्या शैलेश ढगे आणि संगीता फडोळ यांनी केला. शहरात सर्व्हेक्षण करून ही कामे घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले. रस्ते तीन वर्षांपूर्वीचेच असल्याचा दावा प्रशासनाने केला. अनेक सदस्यांनी हा विषय मंजूर करा. मात्र, आमच्या प्रभागाला प्राधान्य द्या अशी मागणी केली. संगीता गायकवाड यांनी विभागनिहाय निधी द्या अशी मागणी केली. मात्र, बांधकाम विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढत अखेर सभापतींनी विषयाला मंजुरी दिली.

आयुक्तांवर नेम

स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश व्हावा यासाठी महापालिकेचा कारभार हायटेक करण्याच्या प्रयत्न करणारे आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कारभारावर सभापती चुंभळे यांनी टीका केली. समस्या अॅपवर टाकून त्या सोडविण्याच्या भन्नाट कल्पना आयुक्त राबवतात. मात्र, त्याचा त्रास होत असल्याने ते बंद करा अशा सूचना सभापतींनी केल्या. खड्ड्यांमध्ये टाकली जाणारा मुरूम व खड्डे काही सदस्यांना विकायची नाही. त्याचे फोटो लोड झाले नाही, तर समस्या कायम ठेवायच्या का, असा सवाल करीत, आयुक्तांचा कारभार संशयास्पद होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अधीक्षक अभियंत्याचा दाखला देत, आयुक्त त्यांच्या पावलावर वाटचाल करीत असल्याचा टोलाही चुंभळे यांनी लगावला.

खुनेंची अनुपस्थिती

हा विषय चर्चेला येण्यापूर्वीच अधीक्षक-अभियंता सुनील खुने सभापतींच्या परवानगीने सभागृहाच्या बाहेर गेले. आयुक्तांनी बोलावल्याचे सांगून बैठकीच्या कारणामुळे ते पुन्हा आले नाहीत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. थोड्या काळासाठीच खुने बाहेर गेल्याचा दावा सभापतींनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेट’ आता थेट संगमनेरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यस्तरीय व्याख्याता पदासाठी यूजीसीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या 'सेट' परीक्षेचे केंद्र यंदा नाशिकमधून संगमनेर येथे हलविण्याचा अजब निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला. २९ ऑगस्टची कुंभपर्वणी संपताच पाठोपाठ ३० तारखेला नाशिक केंद्रातही ही परीक्षा होत आहे. पर्वणीदरम्यान शहराचे बदलते नियोजन लक्षात घेता विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा आठ दिवस पुढे ढकलण्याची मागणी होती. मात्र 'जखम मांडीला अन् मलम शेंडीला' या धोरणाने विद्यापीठाने केंद्रबदल करून विद्यार्थ्यांच्या गैरसोयीत भरच घातली आहे.

'सेट'साठी नाशिक केंद्रातून सुमारे सात ते आठ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पर्वणीच्या दरम्यान होणाऱ्या गर्दीच्या परिणामी या परीक्षार्थींची संभाव्य गैरसोय होण्याची शक्यता 'मटा' ने वर्तविली होती. कोट्यवधींच्या गर्दीत परीक्षार्थींची अधिकच परीक्षा बघितली जाऊ नये, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. आता परीक्षा केंद्रच संगमनेर येथे हलविण्यात आल्याने नाशिकमार्गे किंवा नाशिकहून जाणाऱ्या उमेदवारांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येत असली तरीही पुणे विद्यापीठाकडे या परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी आहे. सुमारे दीड वर्षानंतर या परीक्षेला मुहूर्त लागल्याने बहुतांश इच्छुक उमेदवार परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. जिल्ह्यासह परिसरातील उमेदवारांसाठी नाशिक केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र २९ ऑगस्ट रोजी नाशिक शहरात कुंभाची पहिली पर्वणी पार पडते आहे. या पर्वणीच्या दिवशी नाशिकमध्ये देश विदेशातून कोट्यवधी भाविक व पर्यटकांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी विविध रस्त्यांच्या नियोजनातही बदल करण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांवर 'नो व्हेईकल्स झोन' घोषीत करण्यात आले आहेत. या स्थितीत नाशिकमध्ये नवख्या असणाऱ्या हजारो उमेदवारांसमोर परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याचे मोठे आव्हान होते. संगमनेरच्या केंद्रावर पोहचतानाही तेच आव्हान कायम असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

परीक्षेची तारीख बदला

परीक्षेचे केंद्र बदलण्याऐवजी विद्यापीठाने परीक्षा आठवडाभर पुढे ढकलणे आवश्यक होते, अशी मते परीक्षार्थ्यांनी व्यक्त केली आहेत. पर्वणीच्या काळात नाशिक शहर व परिसरातून बाहेर पडणे कठीण आहे. नाशिक केंद्र निवडणा-या उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीही संगमनेर सोयीचे नाही. सिंहस्थ काळात संगमनेरसाठी बस किंवा अन्य साधणे उपलब्ध होणेही कठीण आहे. त्यामुळे विद्यापीठाने आमचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षेची तारीख बदलायला हवी, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदित्य ठाकरे उद्या नाशिकमध्ये

$
0
0

नाशिकरोड : खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मंजूर विकास कामांचा प्रारंभ युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी (दि. ८) होईल. इगतपुरी-भावली-टाकेद-भंडारदरावाडी, भूगरमधील सावरकर वाडा नूतनीकरण, ब्राह्मणवाडे-जायगाव तसेच आडगाव-म्हसरुळ-गिरणारे या कामांचा शुभारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद रस्ते अखेर झाले खुले!

$
0
0

पोलिस प्रशासनाची तात्पुरती माघार; गर्दी वाढल्यास होणार पुन्हा बॅरिकेडींग

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंद केलेले तब्बल १५ रस्ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच साधुग्रामकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील बॅरिकेडींग काढून टाकण्यात आले असून गर्दीचे प्रमाण वाढल्यानंतर पुन्हा रस्ते बंद केले जातील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड तसेच साधूग्राममध्ये भाविकांच्या गर्दीत वाढ होते आहे. त्यामुळे पोलिसांनी पर्वणीच्या महिन्याभरापूर्वीच रामकुंड तसेच साधुग्रामकडे येणारे रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत पोलिसांनी औरंगाबादरोड, पंचवटीतील रस्ते बॅरिकेडींग टाकून अडवले. पोलिसांच्या या निर्णयाचा स्थानिक नागरिकांना फटका बसला. तब्बल तीन महिने रस्ते बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे जाब विचारण्यास सुरुवात केली. अगदी घराजवळील रस्त्याच्या पलिकडे जाण्यासाठी दोन ते चार किलोमीटर वळसा घालून जाण्याची वेळ स्थानिकांवर आल्याने पोलिस प्रशासनावर दबाव वाढला. सोशल मीडियावर सुध्दा त्याची चर्चा सुरू झाल्याने, बंद करण्यात आलेले रस्ते खुले करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला. बुधवारी सायंकाळपासून बंद केलेले रस्ते नागरिकांसाठी खुले झाल्याने परिसरातील म्हणजे हॉटेल मिर्ची, हॉटेल जत्रा, अमृतधाम, के. के. वाघ कॉलेज, औरंगाबाद नाका या ठिकाणी होणारी वाहनांची कोंडी कमी झाली.

श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका

पोलिस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. राजकीय व्यक्तींनी याबाबत कोणतेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. नागरिकांच्या होणाऱ्या धावपळीबाबत लोकप्रतिनिधींना काही वाटत होते तर चार दिवस त्यांनी विचारपूस का केली नाही, असा सवाल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला.

पर्वणीला अद्याप वेळ आहे. एवढ्या लवकर रस्ते बंद करून पोलिसांना तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्येत वाढ झाली.

- सुरेश देसले, नागरिक

पोलिस यंत्रणेला नेहमीच सहकार्य केले जाते. मात्र, प्रमुख रस्ते इतक्या लवकर बंद करताना पोलिसांनी परिसरातील सर्व नागरिकांना विश्वासात घेणे अपेक्षित होते.

- बापूसाहेब पवार, नागरिक

साधुग्राममध्ये शांतता तर रामकुंडावर थोडी फार गर्दी आहे. मात्र, प्रशासन नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. स्थानिकांचे सहकार्य हवे असल्यास प्रशासनाने जबरदस्ती करू नये.

- आत्मराम भावसार, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंसेवक विद्यार्थ्यांना कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना गंगापूर पोलिस स्टेशनमार्फत रोकडोबा मैदानावर प्रशिक्षण देण्यात आले. रोकडोबा व्यायामशाळेसमोर गर्दीचे व्यवस्थापन व स्वंयसेवकांची भूमिका स्पष्ट करण्यात आली.

बीवायके, आरवायके, एनबीटी, भोसला या कॉलेजेसमधील तीनशे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. त्यांची रंगीत तालीम बुधवारी रोकडोबा पटांगणावर घेण्यात आली. स्वयंसेवकांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश काळे, रमेश यादव यांनी माहिती देऊन प्रशिक्षण घेतले. यावेळी त्यांना शाहीस्नानाच्या वेळी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण कसे करावे, गोदापात्रात आंघोळीसाठी जास्त वेळ थांबणाऱ्या भाविकांना सुरक्षित बाहेर कसे काढायचे, भाविकांचा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी दोरखंडाचा वापर कसा करावयाचा, काही भाविकांना प्रथमोपचाराची गरज भासल्यास अॅम्ब्युलन्सपर्यंत कसे पोहचवायचे आदी बारकावे समजावून सांगण्यात आले.

असे असेल आपातकालीन मार्ग

पिंपळपार-गाडगे महाराज धर्मशाळेमार्गे थेट टाळकुटेश्वर अमरधामकडे जाणारा रस्ता हा आपत्कालीन सेवेसाठी राखीव आहे. त्यामुळे या रस्त्याने, अग्निशामक, रुग्णवाहिका, पोलिस वाहने ये-जा करणार आहे. मोदकेश्वर मंदिराच्या परिसरात रुग्णवाहिका सज्ज राहणार असून त्या ठिकाणापर्यंत गरजू भाविकांना पोहचविण्याची प्रथम जबाबदारी स्वयंसेवकांची राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचे पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोख बंदोबस्त तैनात करूनही साधुग्राममध्ये जबरी चोऱ्या होत असल्याने पोलिसांची नाचक्की होत आहे. साधुग्राममध्ये पोलिसांचा वावर वाढूनही चोऱ्या रोखण्यात अपयश येत असल्याने आता साध्या वेषातील पथक तेथे तैनात केले जाणार आहे.

गेल्या आठवड्यात साधुग्राममध्ये जबरी चोऱ्यांच्या दोन घटना घडल्या. त्यामध्ये दीड लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप, महागडे मोबाइल चोरीस गेले आहेत. या गुन्ह्यांतील संशयितांचा शोध पोलिस अद्याप घेऊ शकलेले नाहीत. साधुग्राममध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे. तरीही चोरटे पसार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. साधुग्राममध्ये भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. चैन स्नॅचिंग, पाकीटमारी, बॅग लिफ्टींग सारख्या घटना रोखण्यासाठी साध्या वेषातील पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे. या पथकामध्ये दोन अधिकारी आणि आठ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌शिकमध्ये अद्यापही रिमझिमच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात पावसाची रिमझिमच हजेरी आहे. त्यामुळे अजूनही नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये केवळ ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, जोरदार पाऊस नसल्याने ग्रामीण भागात तीव्र चिंतेचे वातावरण आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस सक्र‌िय होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात असले तरी ना‌शिकमध्ये अद्यापही पावसाचा जोर वाढलेला नाही. येत्या काही दिवसात पावसाची जोरदार हजेरी लागली नाही तर दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेस्ट कंट्रोलचा ठेका फेटाळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात अनेक त्रुटी असल्याचे सांगत स्थायी समितीने सुमारे २० कोटीचा ठेका फेटाळून लावला आहे. विश‌िष्ट ठेकेदाराला समोर ठेऊन ठेका तयार करण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला असून, फेरनिवीदा काढण्याचा आदेश सभापतींनी दिला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील धूर फवारणी अडचणीत आली आहे. दरम्यान, पाणीगळती रोखण्यासाठी पाण्याचे लेखा परीक्षण करण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचा प्रस्तावही मंजूर केला.

शहरात तीन वर्षासाठी पेस्ट कंट्रोलचा ठेका मे.दिग्वीजय एंटरप्रायजेस या कंपनीला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला होता. पेस्ट कंट्रोलसाठी तीन वर्षात ठेकेदाराला तब्बल १९ कोटी ८० लाख रुपये दिले जाणार होते. मात्र सदस्यांनी या निव‌िदा प्रक्रियेवरच आक्षेप घेतला. या प्रस्तावात अनेक त्रुटी असून, ठेकेदाराला साडेचार कोटीचा लाभ अधिक पोहचवण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे फेरनिव‌िदा काढण्याची मागणी सदस्यांनी केली. सोबतच सध्याचे पेस्ट कंट्रोल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतल्यात दहा कोटीतच काम होईल, असा दावा सदस्यांनी केला आहे. त्यामुळे सभापतींनी आरोग्य विभागाचा प्रस्ताव फेटाळून लावत नव्याने फेरनिव‌िदा काढण्याचे आदेश दिले. तर पाणी लेखा परीक्षण, पाणी गळती रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा भूकंपाचा धक्का

$
0
0

नाशिक : नाशिक शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर गुरुवारी पहाटे सहा वाजून २ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिकच्या भूकंप वेधशाळेत या भूकंपाची त‌िव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. यासंबंध‌िची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. गेल्या महिन्यातही पेठ तालुक्यात भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर आता पुन्हा नोंद झाली आहे. मात्र, गुरुवारचे हे धक्के कुठल्या भागात होते, हे अद्याप कळू शकलेले नाही. तशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्पलाइनची मिळणार २४ तास सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने २४ तास सेवा देणारी हेल्पलाइन सुरु केली आहे. या हेल्पलाइनचा प्रचार, प्रसार महापालिकेने सुरु केला असून, सिंहस्थात येणाऱ्या भाविक, भक्त आणि पर्यटकांना याचा विशेष उपयोग होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ झाला आहे. साधुग्राममध्ये आता साधू, महंतांचे आगमन होऊ लागले आहे. येत्या १९ ऑगस्टला आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्टला पहिले शाहीस्नान आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थाचे मोठेच आकर्षण संपूर्ण जगभरात आहे. यंदाच्या सिंहस्थात जवळपास एक कोटी भाविक येतील, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. त्यादृष्टीने सिंहस्थाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पर्वणीच्या दिवशी किंवा सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविक, भक्त आणि पर्यटकांना येणाऱ्या विविध अडी-अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेली माहिती देण्यासाठी नाशिक महापालिकेने हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आठवडाभर आणि २४ तास असलेल्या या सुविधेचा विशेष फायदा होण्याची अपेक्षा महापालिकेला आहे. मिझ सोल्यूशनच्या मदतीने महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेचेही सहकार्य लाभले आहे. हेल्पलाइनचा क्रमांक ८३९०३००३०० किंवा ०२५३-६६४२३०० किंवा २२२६१०० असे आहेत. भाविकांना किंवा पर्यटकांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास तसेच माहिती द्यायची असल्यास या क्रमांकावर संपर्क साधता येईल. हेल्पलाईनचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमए अभ्यासात देसलेंच्या कविता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवनविषयक तत्वज्ञान आशयसंपन्न कविता आणि गझलांमधून सशक्तपणे मांडणारे नाशिक जिल्ह्यातील गझलकार व साहित्यिक कमलाकर देसले यांच्या कवितांचा समावेश उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (उमवि) एम. ए. अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

सुमारे २५ वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून साहित्यामध्ये त्यांचे योगदान आहे. सन् २०१५-१६ पासूनच्या एम. ए. द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात 'खानदेशातील मराठी साहित्य' हा वैकल्पिक विषय सुरू करण्यात आला. 'उमवि'ने या वर्षी पहिल्यादाच खानदेशातील मराठी साहित्य हा विषय सुरू केला. यात कथा, कविता, कादंबरी, नाटक आदी साहित्य प्रकारांचा समावेश आहे. यासाठी खान्देशातील लक्षवेधी व साहित्यात बहुमोल योगदान असलेल्या लेखक कवींची निवड करण्यात आली आहे. कविता या साहित्यप्रकारात मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील कवी गझलकार यांच्या ५ कवितांची निवड झाली असून विद्यापीठाने त्याची अधिकृत घोषणा नुकतीच केली आहे. कवी देसले यांची 'ज्ञानिया तुझे पायी' हा कविता संग्रह आणि 'काळाचा जरासा घास' हा गझलसंग्रह अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

'गझलनामा'साठी प्रस्तावना लेखन

गझल या काव्यप्रकाराबद्दल अधिक तंत्रशुद्ध माहिती विद्यापीठ स्तरावरून विद्यार्थ्यान पर्यंत पोहोचावी या उद्देशाने खान्देशातील तीन गझलकार राजा महाजन, वा. ना. आंधळे आणि वा. न. सरदेसाई यांचे 'गझलनामा' हे संपादित पुस्तक डॉ. शिरीष पाटील, प्रा. नामदेव कोळी यांनी संपादित केले. या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. या संपादित गझलसंग्रहाची अभ्यासपूर्ण अशी प्रदीर्घ प्रस्तावना लेखन कवी देसले यांनी लिहिली आहे. त्यात गझलेचा इतिहास, गझल लेखन तंत्र, खानदेशातील गझल परंपरा व गझलेची आस्वादक समीक्षा यात अंतर्भूत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये २४ तास रुग्णसेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या सर्व साधू-महंत आणि लाखो भाविकांसाठी तपोवनात सिंहस्थ रुगणालय सज्ज झाले असून प्रत्यक्ष सेवेला सुरुवातही करण्यात आली आहे. २४ तास सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

सर्व सेक्टरचे हे हॉस्पिटल मुख्य केंद्र असून यात ६० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. मेडिसीन विभाग असून मागणी केल्याप्रमाणे सध्या सर्व प्रकारच्या औषधांचा साठा या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. रक्त, लघवी आदी तपासणी साठी स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहेत. दिवसरात्र सेवा पुरविण्यासाठी प्रशासनाने ६ वैद्यकीय अधिकारी आणि ६३ लोकांचा स्टाफ नियुक्त केला आहे. सर्व ठिकाणाहून पेशंट आणण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून १०८ नंबरच्या १०५ रुग्णवाहिका दोन दिवसात याठिकाणी येणार आहेत, अशी आहिती विभागाचे प्रमुख डॉ. हिरामण कोकणी यांनी दिली.

साधुग्राममधील प्रत्येक सेक्टरमध्ये एक वैद्यकीय केंद्र तयार करण्यात आले आहे. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे. सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत एक आणि दुपारी तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत एक असे वैद्यकीय अधिकारी याठिकाणी उपलब्ध असतील. या केंद्रात प्रत्येक ठिकाणी तीन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images