Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अध्यक्षपदासाठी सरकारला हवा मुदत

$
0
0

वक्फ बोर्ड प्रकरणी खंडपीठाकडून १५ दिवसांचा कालावधी

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

तब्बल सात वर्षांपासून रिक्त असलेले राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्षपद निवडीसाठी राज्य सरकारने आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काही अवधी मागून घेतला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात शासन नियुक्त दोन्ही सदस्यांसह अध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा, असा खंडपीठाने गुरुवारी आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणी १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

वक्फ बोर्डवर सध्या नऊ सदस्य निवडून आलेले आहेत. तर अन्य दोन सदस्य सरकारद्वारे नियुक्त केले जातात. मात्र, शासनाकडून दोन सदस्यांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. या दिरंगाईविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. वक्फ बोर्डमध्ये बार कौन्सिल, मुतवल्ली, अत्यअल्प दरगाह मशिदी उतपन्न गटातून निवडणुकीद्वारे सदस्य निवडले जातात. वक्फ बोर्डला अध्यक्ष मिळावे यासाठी राज्य सरकारकडून शासन नियुक्त सदस्यांची नियुक्ती लवकर व्हावी, अशी जनहित याचिकाकर्ते आणि वक्फ बोर्डचे सदस्य एम. एम. शेख यांच्यासह मुस्लिम धर्मियांची मागणी आहे. सुनावणी प्रसंगी राज्य सरकारच्या वतीने वक्फ बोर्डला अध्यक्षपद मिळवण्यासाठी शासननियुक्त सदस्यांची नियुक्तीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत मिळावी अशी बाजू मांडण्यात आली. न्यायालायानेही राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत दिली आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आरुढ झाल्यानंतर वक्फ बोर्डच बरखास्त करण्याचे हालचाली गतिमान झाल्याची कुजबुज लागताच वक्फ बोर्ड सदस्य संतप्त झाले. त्यांच्यापैकी काही जणांनी सरकार मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाचे अवमान करीत असल्याचा आरोप करीत त्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली. गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करून वक्फ बोर्डच्या अध्यक्षाची निवडणूक व शासननियुक्त सदस्यांची नियुक्तीसाठी राज्य सरकारने मुदत मागून घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थात महाराष्ट्राचेही ब्रॅण्डींग

$
0
0

पर्यटनवाढीसाठी सोशल मीडियाची घेणार मदत

प्रवीण बिडवे, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याचे ब्रॅण्डींग होत नाही अशी खंत थेट मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त झाल्याने प्रशासनाने नाशिकच्या ब्रॅण्डींगसाठी कंबर कसली आहे. कुंभमेळ्याच्या संकेतस्थळापाठोपाठ आता व्हॉटसअपसारख्या सोशल मीडियाद्वारे देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत येथील पर्यटनस्थळांची माहिती पोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे कुंभमेळ्यानिमित्त नाशिक महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत असल्याने राज्याचेही ब्रॅण्डींग करण्याची नामी संधी म्हणून प्रशासन त्याकडे पाहू लागले आहे.

महाराष्ट्र ही केवळ संतांची भूमी नाही. या भूमीला निसर्गाचेही भरभरून वरदान लाभले आहे. देवतांच्या आशीर्वादामुळे देवांची भूमी म्हणूनही राज्याचा लौकीक आहे. प्रत्येक बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा केवळ गोदावरी स्नानाच्या पर्वणीपुरताच न राहता पर्यटनाचीही पर्वणी ठरावा असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून येथील अर्थव्यवस्थेलाही बुस्टर मिळू शकेल असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त होतो आहे.

सिंहस्थ कुंभमेळानिमित्त सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी २१ फेब्रुवारी रोजी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. त्यामध्ये नाशिकचे ब्रॅण्डींग होत नसल्याची तक्रार साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. उज्जैन येथे पुढील वर्षी कुंभमेळा आहे. मध्य प्रदेश सरकारने त्याचे जोरदार ब्रॅण्डींगही सुरू केले आहे. परंतु, राज्य सरकारकडून ब्रॅण्डींग होत नसल्याने नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे की नाही, असा प्रश्न साधू तसेच भाविक विचारत असल्याची कैफियत महंतांनी मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडली. कुंभमेळ्याचे जोरदार ब्रॅण्डींग होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच त्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

त्याअनुषंगाने केवळ नाशिकचेच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचेच ब्रॅण्डींग करण्यासाठी प्रशासनाकडून पाऊले उचलली जाऊ लागली आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने देश विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या भाविकांना पर्यटनाच्या विविध पर्यायांची माहिती देऊन त्यांना पर्यटनासाठी प्रेरीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. देशभरासह विदेशातून आलेल्या

भाविक व पर्यटकांना उत्तर महाराष्ट्र व आसपासच्या पर्यटनस्थळांची, धार्मिक आणि पौराणिक स्थळांची माहिती प्रशासन पुरविणार आहे.

तर राज्यातून तसेच राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांना नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांबरोबरच साडेतीन शक्तीपीठे, अष्ट विनायक, त्र्यंबकेश्वरबरोबरच परळी वैजनाथ, ‌भिमाशंकर यांसारखी ज्योर्तिलिंग, सापुतारा, महाबळेश्वर, माथेरान, कोकण यांसारख्या नैसर्गिक पर्यटनस्थळांची माहिती पुरवून राज्याच्या पर्यटनस्थळांचे ब्रॅण्डींग करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. या माहितीचा प्रसार करण्यासाठी व्हॉटस अप हे सोयीचे साधन ठरू शकेल, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



व्हॉटसअपद्वारे थेट प्रचार!

हल्ली प्रत्येकाच्या हाती मोबाईल असल्याने व्हॉटसअपसारख्या सोशल मीडियाद्वारे उत्तमरित्या ब्रॅण्डींग होऊ शकते, असा प्रशासनाला विश्वास आहे. पर्यटनात अभिरुची असलेल्या भाविकांना पर्यटनस्थळांची अचूक माहिती मिळावी यासाठी तसेच त्यांनी या स्थळांवर अधिक वेळ व्यतित करून पैसेही खर्च करावेत या अनुषंगाने व्हॉटस अपवरच लिंकींग देण्यात येणार आहे. माहिती प्रसारित करताना उच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली होणार नाही याची काळजी प्रशासन घेणार आहे. त्यासाठी व्यक्तीगत मोबाईल नंबर्स, ग्रुप नंबर्सवर पोस्ट पाठविता येतील का याचा विचार प्रशासन करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशाचा मार्ग होणार सुकर

$
0
0

वैद्यकीय शिक्षणासाठी नवे कॉलेज दिलासा देणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या विविध भागात पुढील शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठीचे एकूण २६ कॉलेज सुरु झाले तर वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांसाठीचा विद्यार्थ्यांचा प्रवेश सुकर होणार आहे. तसेच, प्रवेशासाठीची स्पर्धा वाढून वैद्यकीय शिक्षणाचा आर्थिक आलेखालाही वेसण बसण्याची चिन्हे आहेत.

वैद्यकीय शिक्षणासाठी सध्या राज्यात ३३१ कॉलेजेस कार्यरत आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या या कॉलेजेसमध्ये मेडिकलचे ३५, डेंटलचे २८, आयुर्वेदाचे ६२, युनानीचे ६, होमिओपॅथीचे ४५, फिजिओथेरपीचे ३०, ऑक्युपेशनल थेरपीचे ६, बीएस्सी नर्सिंगचे ७६, पीबीएस्सी नर्सिंगचे ३७, बीएएसएलपीचे ५ आणि ऑप्टीमेट्रीच्या एका कॉलेजचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी इच्छूक असताना प्रत्यक्षात कमी जागा उपलब्ध असल्यामुळे जागा वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठीच एका कॉलेजमध्ये मेडिकलच्या (एमबीबीएस) १०० जागा वाढवून त्या १५० करण्याचाही प्रस्ताव आहे. तर दुसरीकडे, राज्याच्या विविध भागात एकूण ३१ कॉलेजेस सुरु करण्याबाबतचे प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे आले. विद्यापीठाने या प्रस्तावांची शहानिशा करुन यातील पाच प्रस्ताव फेटाळले. तर एकूण २६ प्रस्तावांची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.

गेल्या काही वर्षात राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठीचे कॉलेजेस उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे आहे त्याच जागांमध्ये प्रवेश मिळविण्यसाठी मोठी चढाओढ होते. तर मॅनेजमेंटच्या जागांवर अक्षरशः बोली लावूनच प्रवेश दिला जात असल्याचे ओरड आहे. पालकांकडून बख्खळ पैसा घेऊन प्रवेश देण्याचा हा प्रकार गेल्या काही वर्षात धंदाच बनला आहे. या साऱ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी नवीन कॉलेज महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. कारण, मेडिकलचे ५, डेंटलचे १, आयुर्वेदच्या २, होमिओपॅथीचे २, फिजीओथेरपीचे ६, नर्सिंगचे ८ आणि बीपीएमटीचे २ कॉलेज राज्याच अस्तित्वात येतील.



सरकारची नैतिक जबाबदारी

गेल्या काही वर्षात राज्यात नवीन वैद्यकीय कॉलेजेस न येणे हे राज्य सरकारच्या निष्क्रियतेचे प्रतिक असल्याची प्रतिक्रीया तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. तर, नव्या कॉलेजेसच्या प्रस्तावावर सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. शिक्षणसम्राटांच्या दबावाखाली सरकार राजकीय इच्छाशक्ती दाखवत नसल्याचा आरोपही होत आहे. मात्र, आगामी काळाचा विचार करता सरकारने नैतिक जबाबदारी दाखवत यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होळी सण साजरा

$
0
0

शहरात पारंपर‌िक पद्धतीने होळी सण साजरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कल्पकतेने रचलेल्या गोवऱ्या, मध्यभागी ऊस, एरंडाच्या डहाळीला खोबऱ्याच्या वाट्यांचे बांधलेले तोरण, होळीची पूजा व होळी पेटल्यानंतरचा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात गुरुवारी होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

भारतीय परंपरेनुसार फाल्गुन पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमेनिमित्त देशभरात होळी सण साजरा केला जातो. सकाळपासून शहरातील चौकाचौकांमध्ये होळीची तयारी करण्यात आली. शहरातील पंचवटी, रामकुंड, सिडको, म्हसरूळ, नाशिकरोड, गंगापुर रोडी, कॉलेज रोड सातपूर, अशोक स्तंभ, जुने नाशिक अशा विविध भागांत होळीनिमित्त मोठ-मोठ्या होळ्या रचण्यात आल्या. यानिमित्त विविध ठिकाणी आकर्षक रंगानी गोवऱ्या सजवण्यात आल्या. त्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात होळी सण साजरा केला. काही ठिकाणी पर्यावरण प्रेमींनी प्रतिकात्मक होळीचे आयोजन करत पर्यावरण बचावचा संदेश दिला.

पंचवटी, दहीपुल, सिडको, सातपुर, नाशिक रोड अशा विविध ठिकाणी होळीसाठी लागणारे साहित्य, गोवऱ्यांच्या खरेदीसाठी बुधवारपासूनच नागरिक व विविध परिसरातील तरुणांनी गर्दी झाली होती. दहिपुल जवळील पटांगणात आदिवासी भागातून खास होळीसाठी गोवऱ्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. याठिकाणी टेम्पो, ट्रक, जीपमधून आणलेल्या गोवऱ्यांची ने आण दिवसभर चालू होती.

शहरांतील विविध भागांतील वखारींमध्ये होळीसाठी लागणारी लाकडे खरेदीसाठी गर्दी झाली होती. शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर होळ्या पेटवण्यात आल्या. यामध्ये बाळगोपालांचा उत्साह मोठ्याप्रमाणावर दिसून आला. शहारातील विविध भागांतील सोसायटीमध्ये छोट्या स्वरुपात होळी पेटवण्यात आली.

अशीही होळी.....

सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने होळी निमित्त गोल्फ क्लब येथे सकाळी ७ वाजता रोप वाटपांचा कार्यक्रम राबवला. करंज, बेल, अडुळसा, आपटा, कांचन, पुत्रंजीवा, कैलासपती, गुलमोहर, अशोका आदी रोपांचे वाटप यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या सदस्यांचा अहवाल सादर

$
0
0

कारवाईकडे सर्वांच्या नजरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा पक्षाचा आदेश झुगारणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांसंदर्भातील अहवाल जिल्हाप्रमुखांनी गुरूवारी पक्षप्रमुखांकडे सादर केला आहे. त्यामुळे कारवाईचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत.

स्थायी समितीच्या सदस्यपदाची संधी इतर सदस्यांना मिळावी यासाठी शिवसेनेने सदस्यपदाची कालावधी दोन वर्षावरून एक वर्ष केला आहे. त्यामुळे सदस्य वंदना बिरारी आणि सचिन मराठे यांना पक्षाने सदस्यपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिला होता.मात्र या दोन्ही सदस्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. शिवसेनेच्या वतीने दोन्ही सदस्यांना राजीनाम्यासाठीही अल्टीमेटमही बजावण्यात आला होता. मात्र या सदस्यांनी पक्षादेश झुगारत राजीनामा देण्यास नकार दिला. त्यातच महापौरांनी आता केवळ दोनच सदस्यांच्या निवडीसाठी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे शिवसेनेला आता नव्या सदस्यांना संधी देणे शक्य नाही. सदस्यांच्या या प्रकाराची गंभीर दखल पक्षाने घेतली असून स्थायीच्या घडामोडी संदर्भात तीन दिवसात झालेल्या घडामोडींचा अहवाल पक्षाने तयार केला आहे. सदस्यांनी पक्षशिस्तीचा भंग केला असून त्यांच्या वर्तना संदर्भातील हा अहवाल गुरूवारी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. या सदस्यांवर कारवाईचा निर्णय आता पक्षश्रेष्ठींच घेणार आहे. त्यामुळे वरीष्ठांच्या आदेशाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉण्टेड आरोपी फरारी

$
0
0

पत्ते बनावट आणि जामिनदारही गायब;

१ हजार ३२० आरोपींचा शोध सुरू

अरविंद जाधव, नाशिक

ना‌शिक कोर्टाकडून जामिनावर सुटलेले तब्बल १ हजार ३२० संशयित आरोपी अनेक वर्षांपासून फरारी झाले आहेत. बहुतांश आरोपींचे पत्ते त्रोटक किंवा बनावट असल्याचे समोर आले असून जामिनदारही सापडत नसल्याने पोलिसांच्या शोध मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

साधारणतः एखादा गुन्हा घडला, की पोलिस त्याची नोंद करून संशयिताला अटक करतात. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येते. सुनावणीमध्ये आवश्यकतेनुसार संशयितास पोलिस कोठडी, न्यायालयीन कोठडी दिली जाते. किंवा संशयित आरोपींना कोर्टाकडून जामीन दिला जातो. जामीन देताना कोर्टाकडून काही अटी घालून दिल्या जातात. केस सुरू झाल्यापासून अंतिम निकाल लागेपर्यंत या अटी कायम असतात. जामिनावर सुटण्यासाठी संशयितांना जामिनदारही महत्त्वाचे ठरतात. सध्या, कोर्टाकडून जामिनावर सुटलेल्या तब्बल १ हजार ३२० संशयित आरोपींनी धूम ठोकली आहे. पोलिसांना गुंगारा देणारे हे आरोपी नाशिक शहरासोबत, जिल्ह्यातील, राज्यातील, परराज्यातील तसेच नेपाळ या परदेशातील देखील आहे. खून, हाणामाऱ्या, फसवणूक, चोरी, अपघात, हिंसाचार, वाहनचोरी अशा विविध गुन्ह्यात या आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील काही आरोपींवर १९९२ मध्ये गुन्हे दाखल झाले असून ते १९९४ पासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी अशा संशयितांची यादीच तयार केली असून वॉण्टेड आरोपींना शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकापूर्वी शहर पोलिसांनी अशा आरोपींची शोध मोहिम हाती घेतली होती. यात किमान १५० पेक्षा जास्त संशयितांना अटक करण्यात आली. त्याआगोदर हा आकडा १ हजार ५००च्या दरम्यान होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदिप दिवाण यांनी दिली.

वॉण्टेड आरोपींमध्ये बहुतांश शहराबाहेरचे म्हणजे परजिल्ह्यातील किंवा परप्रांतातील रहिवाशी आहेत. गुन्हा झाला त्यावेळी ते शहरात वास्तव्यास होते. किंवा शहरातील एखाद्या गुन्ह्यात त्यांना परराज्यातून अटक करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमध्ये चुकीचा तसेच अर्धवट पत्त्याची नोंद झाल्याने संशयितापर्यंत पोहचताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच काही प्रकरणात तर जामिनदारही बनावट असल्याचे समोर आले आहे. यापुढे वॉण्टेड आरोपींचे जामिनदार असलेल्या व्यक्तिकडे चौकशी केली जाईल, असे दिवाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वॉण्टेड आरोपींचा अनेक वर्षे शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही तर कोर्टातर्फे त्यांना फरार म्हणून घोषीत करण्यात येते. मात्र, या प्रक्रियेसाठी मोठा कालावधी लागतो.

वॉण्टेड आरोपींना शोधण्याचे काम सातत्याने सुरू असते. मात्र, चुकीचे किंवा बनावट पत्ते अडचणीचे ठरतात. अनेकदा जामिनदार देखील सापडून येत नाहीत. सध्या पोलिसांनी वॉण्टेड आरोपींची यादी तयार केली असून त्यांच्या जामिनदारांकडे लक्ष वळवण्यात येणार आहे.

- संदीप दिवाण, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सज्ज व्हा, विमेन्स बाईक रॅलीसाठी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाइक रॅली म्हटलं की डोळ्यासमोर धूम करत फिरणारे पुरूष आपल्याला दिसतात. पण असंच चित्र महिलाही उभे करू शकतात. त्यासाठी फक्त सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. 'महिलादिना'निमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'विमेन्स बाइक रॅली'त तुम्हाला ही संधी मिळणार आहे. त्यासाठी आजच आपले नाव या रॅलीसाठी नोंदवा आणि बाइक रॅलीचा आनंद लुटा!

रविवारी (८ मार्च) बीवायके कॉलेजपासून सकाळी नऊ वाजता रॅली सुरू होणार आहे. तर मग तयार रहा आणि सहभागी व्हा बाइक रॅलीत. या माध्यमातून तुम्हाला स्वतःला शोधण्याची संधी तर मिळणारच आहे. महिला सक्षमीकरणाचा संदेश या माध्यमातून देता येणार आहे.

वेगळा अनुभव घ्याच!

गेल्या वर्षीही मी बाइक रॅलीचा अनुभव घेतला होता. महिला जर सगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे उचलत असतात तर त्यांनी आनंद लुटण्यात मागे राहू नये. बाइक रॅलीचा आनंद पुरूष जितक्या उत्साहाने घेतात त्याच उत्साहाने तुम्हीही या बाइक रॅलीचा आनंद घ्या. एक वेगळा अनुभव मिळणारच आहे. त्याचबरोबर पुरुषांची मक्तेदारी तोडण्याची देखली ही योग्य वेळ असणार आहे.

- अदिती नाडगौडा-पानसे, नृत्यांगणा

आजच करा नावनोंदणी...

नाव नोंदणीसाठी http://womenbikerally.mtonline.in या वेबसाइटला भेट द्या किंवा मोबाइलवर mtccNSK स्पेस तुमचं नाव टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा. किंवा ०२५३-६६३७९३७/३९ या क्रमांकावर तुम्ही नावनोंदणी करू शकतात. नावनोंदणी याच क्रमांकावर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका मालमत्ता गहाण ठेवणार

$
0
0

>>विनोद पाटील,नाशिक

आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेवर सिंहस्थ कामांसाठी स्वतःच्या मालमत्ता गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने सिंहस्थ कामांसाठी महापालिकेला २६० कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी दिलेली आहे. मात्र, महाराष्ट्र बँकेने शासनाच्या हमी पत्रासोबतच कर्जासाठी संपत्ती गहाण ठेवण्याची अट महापालिकेला घातली आहे. त्यामुळे महापालिकेने आता शहरातील महत्त्वाच्या १५ मालमत्तांची यादी तयार केली असून, त्या गहाण ठेवल्या जाणार आहेत. पंधरा वर्षासाठी या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या जातील.

सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असतांनाही सिंहस्थाच्या कामांना निधी नसल्याची ओरड होत आहे. त्यातच महापालिकेचा सिंहस्थ आराखडा ६६ कोटींनी वाढल्याने तो १०५२.६१ कोटींवरून १११९.२९ कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या कामांसाठी निधीसाठी कर्ज घेण्याची तयारी महापालिकेने केली. त्यास राज्य सरकारने मंजुरीही दिली आहे. सिंहस्थ खर्चाच्या नव्या सूत्रानुसार तीन चतुर्थांश खर्च राज्य सरकार, तर उर्वरित रक्कम महापालिका खर्च करणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या वाट्याला ४३० कोटींचा खर्च येणार असून, उर्वरित ६८९ कोटींचा भार शासन उचलणार आहे. आतापर्यंत शासनाने सिंहस्थासाठी अवघा २९७.१७ कोटींचा निधी पालिकेला दिला आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या कामासाठी महापालिकेला निधीची तातडीने गरज असून, या कर्जासाठी महाराष्ट्र बँकेकडे महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे.

महाराष्ट्र बँकेने १०.४० टक्के व्याजदराने महापालिकेला कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, कर्जासाठी शासनाच्या हमी पत्रासोबतच महापालिकेच्या मालकीची मालमत्ता गहाण ठेवण्याची अट घातली आहे. बँकेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, महापालिकेच्या मालकीच्या १५ प्रॉपर्टीजची यादी तयार करण्यात आली आहे. यात महापालिकेच्या मालकीच्या शहरातील महत्त्वाच्या जागा आणि क्रीडांगणांचाही समावेश आहे. कर्ज फेडण्यासाठी १५ वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, तोपर्यंत या मालमत्ता पंधरा वर्षे बँकेकडे तारण म्हणून राहणार आहेत. या मालमत्तांसंदर्भात निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार महापालिकेला राहणार नाही असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

आणखी ५० कोटींचा प्रस्ताव

महापालिकेचा सिंहस्थ आराखडा जवळपास ६६ कोटींनी वाढला आहे. सिंहस्थाच्या भूसपांदनासाठी २०० कोटींचा निधी लागणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वाढीव भार सहन करणे पालिकेला सद्यस्थितीत शक्य होत नाही. त्यामुळे पालिकेने आणखी ५० कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळावी, अशी विनंती शासनाला केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक कोंडी विरोधात सोनवणेंचे उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील ताहाराबाद नाक्याजवळ उभ्या करण्यात येत असलेल्या रिक्षा तेथून हटविण्याबरोबरच अवैध वाहतुकीला आळा घालावा, या मागणीसाठी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश सोनवणे हे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात बेमुदत उपोषणास बसले आहेत. ताहाराबाद-नामपूर रस्ता हा वर्दळीचा असून तेथे उभ्या असलेलया रिक्षांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. रिक्षाचालक रिक्षामध्ये दहा ते पंधर प्रवासी कोंबून अवैध प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विनापरवाना अवैध वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५३ सहकारी संस्थांची लवकरच निवडणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील व गटातील ५३ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिली. गटातील ४७ सहकारी संस्थांखेरीज कार्यकारी पतसंस्थेच्या २, नागरी बॅँक ३ व शेतकी संघ अशा ५३ संस्थांची निवडणूक होणार आहे. येथील जनता बँकेचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात ५ एप्रिल रोजी मतदान होईल. तर, मामको बॅँकेची निवडणूक मे-जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. जनता बॅँकेसाठी ५ ते ९ मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. १0 मार्च रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी होईल. ११ ते २५ मार्चदरम्यान अर्ज मागे घेता येतील. १५ दिवसात अर्ज माघारीनंतर रिंगणात उरलेल्या उमेदवारांसाठी २६ मार्च रोजी चिन्हांचे वाटप होईल. ५ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येईल. ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. ही माहिती उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली.

मालेगाव उपविभागात मामको, जनता बॅँक आणि येमको या बॅँकाची निवडणूक होत आहे. मामको बॅँकेची निवडणूक मे अथवा जूनमध्ये होणार आहे. जनता बॅँकेसाठी जेएटी महिला महाविद्यालय मतदान केंद्रासाठी आरक्षण करण्यात आले आहे. ६ एप्रिल रोजी भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील झाडांचे पुन्हा सर्व्हेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

सिंहस्थाच्या विकासकामासाठी बाधक ठरलेल्या शहरातील २,६०९ झाडांच्या तोडणीची परवानगी महापालिकेला उच्च न्यायालयाकडून गुरूवारीही मिळाली नाही. उलट न्यायालयाने पुन्हा फेरसर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले असून तिसऱ्यांदा सर्व्हेक्षणासाठी वनसंरक्षकाच्या समितीला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची मदत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला आता पुन्हा फेरसर्व्हेक्षण अहवालाची वाट पहावी लागणार आहे.

सिंहस्थाच्या कामांसाठी नाशिक शहरात दोन हजार ६०९ वृक्षांची कत्तल करावी लागणार आहे. त्याविरोधात पर्यावरण वाद्यानी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने झाडांची कत्तल थाबंवली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. अनिल मेनन यांच्या पिठासमोर सुनावरणी सुरू आहे. या झांडाच्या संख्येबाबत आणि पर्यायी झाडे जगविण्याबद्दल पर्यावरणवादी आणि महापालिकेत वाद आहे. यासाठी दोनदा सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या झाडांच्या बदल्यात पर्यायी महापालिका १६ हजार झाडे लावण्यास तयारही आहे. आयुक्तांनी त्यांसदर्भात महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात शपथपत्रही दाखल केले आहे. त्यावर गुरुवारी (दि. ५) पुन्हा सुनावणी झाली. त्यात महापालिकेन अद्याप वृक्षप्रा‌धिकरण समितीही गठीत केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सोबतच न्यायालयाने आदेश देवूनही महापालिकेन शहरातील सर्व झाडांचे सर्व्हेक्षण केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

त्यामुळे वृक्षतोडीला परवानगी देण्यात येवू नये अशी मागणी पर्यावरणवाद्याकडून करण्यात आली. तर महापालिकेन सिंहस्थाची कामे असल्याने वृक्षतोडीला परवानगी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयाने सरकारी व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तूर्त तरी वृक्षतोडीला परवानगी दिली नाही. मात्र याऊलट विकासकामांआड येणाऱ्या झांडाचे पुन्हा फेरसर्व्हेक्षण करण्याचे आदेश वनसंरक्षक समितीला दिले असून त्यासाठी आरटीओंची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शहरातील वृक्षांचे पुन्हा सर्व्हेक्षण होणार असून सिंहस्थाची कामे मात्र रखडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इ ब्लास्ट २०१५’ मध्ये गर्व्हमेंट पॉलिटेक्निक प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मविप्र संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आयोजित राज्यस्तरीय 'इ ब्लास्ट २०१५' स्पर्धेत सामानगावच्या गर्व्हमेंट पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल विभागाने पहिला पुरस्कार मिळवला. तर, गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निकने दुसरा आणि के. के. वाघ पॉलिटेक्निकने तिसरा क्रमांक पटकावला. 'महाराष्ट्र टाइम्स' या स्पर्धेचा मीडिया पार्टनर होता. राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांचे १०० प्रकल्प स्पर्धेत सादर करण्यात आले होते.

इंजिनीअरिंग डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी यासाठी राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाने 'इ ब्लास्ट २०१५' या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले. त्यात मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स-टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगशी संबंधित प्रकल्पांवर आधारित मॉडेल प्रोजेक्ट मांडण्यात आले. स्पर्धेचे यंदाचे पहिलेच वर्ष असले तरी राज्याच्या विविध भागातून आलेल्या ४०० विद्यार्थ्यांचे १०० प्रकल्प सादर करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन एलएमसी मेंबर प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. आर. एम. चौधरी आणि प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार उपस्थित होते. प्राचार्य बी. एन. राजोळे यांनी प्रास्ताविक केले. तसेच, एकाच छताखाली वैविध्यपूर्ण संकल्पना व प्रोजेक्टस आणण्याचा उद्देश सफल झाल्याचे मत मांडले. ही स्पर्धा केवळ डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विकसित केलेल्या संकल्पना, त्यांचे कौशल्य प्रोजेक्टद्वारे मांडून देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून 'इ ब्लास्ट २०१५' उपयुक्त ठरल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. परीक्षक म्हणून बी. जे. पवार आणि एस. डी. निकम यांनी काम पाहिले. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर, विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात आल्याचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर पगार यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक अॅण्‍ड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख व्ही. एम. बिरारी आणि कम्प्युटर विभागाचे डी. एस. टर्ले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रा. रामप्रसाद थोरात, प्रा. प्रियंका पवार, प्रा. प्राजक्ता गांगुर्डे, प्रा. प्रमोद जाधव, के. एम. थोरात, आर. ई. अहिरे, व्ही. बी. निकम, पी. एस. भोज यांनी परिश्रम घेतले.

विजेते प्रकल्प

कम्प्युटरच्या आधारे विद्युत ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण करण्याचा प्रकल्प सामानगावच्या गर्व्हमेंट पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मोटोरॉईज्ड पेन्ड्युलम पंपचे मॉडेल साकारले होते. के. के. वाघ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी वायरलेस को मॉनिटरिंगचे मॉडेल विकसित केले होते. उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या ब्रह्मा व्हॅली पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी स्मार्टकार्डवर आधारीत रेशनिंग व्यवस्था तर महावीर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी वाया जाणाऱ्या प्लास्टिकपासून डिझेल ऑईल तयार करण्याचा प्रकल्प सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदीच्या प्रश्नपत्रिकेवरून मंडळाचा सावळा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गुरुवारी हिंदीच्या पेपरला एका केंद्रावर प्रश्नपत्रिका कमी पडल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवांमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंडळाच्या या सावळ्या गोंधळात संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दहावीच्या परीक्षेत नाशिक शहरातील एका परीक्षा केंद्रावर संपूर्ण हिंदीच्या प्रश्नपत्रिका कमी पडल्या. कारण, संपूर्ण हिंदीच्या प्रश्नपत्रिका असल्याचे स्टीकर असलेल्या पाकिटात संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या. विद्यार्थ्यांना दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका देण्यात येत असल्याने या दहा मिनिटातच नियमात राहून संपमर्ण हिंदीच्या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स करून त्या विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या. हे प्रकरण जणू दाबण्याचाच प्रकार मंडळाने सुरू केल्याचा संशय येत आहे. प्रश्नपत्रिका कमी पडून झेरॉक्स काढाव्या लागल्या आणि त्या वितरीत केल्याचे मंडळाच्या विभागीय अध्यक्षांनी मान्य केले आहे. मात्र, असा काही प्रकार झाला नसल्याचे सचिवांचे म्हणणे आहे. त्यामुळे मंडळाच्याच अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर प्रश्नपत्रिका दिल्याचे सचिवांनी सांगितले असले तरी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक प्रश्नपत्रिका त्या केंद्रावर गेल्याच कशा, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. असा प्रकार घडणे दुरापास्त असले तरी या सर्व प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचे काय?

प्रिंटींग जेथे झाली तेथेच प्रश्नपत्रिका पाकिटात सील करण्यात आल्या. संपूर्ण हिंदीच्या पाकिटात संयुक्त हिंदीच्या प्रश्नपत्रिका निघाल्याने एकप्रकारे हा पेपर फुटला आहे. मात्र, पेपर फुटला नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता संयुक्त हिंदीची प्रश्नपत्रिका बदलणार की फुटलेलीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका केंद्राच्या ठिकाणी संपूर्ण हिंदीच्या ऐवजी संयुक्त हिंदीची प्रश्नपत्रिका आढळून आली. त्यामुळे संपूर्ण हिंदीच्या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना देण्यात आली. या प्रकरणात प्रेसचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. यासंदर्भात आमच्या अध्यक्षांकडे सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष

एका केंद्रावर प्रश्नपत्रिका कमी पडल्या म्हणून दुसऱ्या केंद्राच्या ठिकाणी असलेल्या आणून व्यवस्था करण्यात आली. बाकी काहीच घडले नाही.

- आर. आर. मारवाडी, सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात राज्य सरकारने सुप्रिम कोर्टात दाखल केलेली फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रंथपालांना आता पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील पदवीधर ग्रंथपालांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदवीधर वेतनश्रेणीच लागू करावी, यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. यापैकी सचिन दिवेकर यांच्यासह काही ग्रंथपालांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या बाजूने हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने सुप्रिम कोर्टात दाद मागितली होती. गेल्या वर्षी २४ जानेवारीस सुप्रिम कोर्टाने ही याचिका फेटाळली. त्यानंतरही राज्य सरकारने त्याची दखल न घेता गेल्या वर्षीच ८ मार्च रोजी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालापासून ३0 दिवसांच्या आत याचिका दाखल करण्यासाठी मुदत असताना राज्य सरकारने ४१ दिवसांनी दाखल केल्याने फेटाळली आहे.

सुप्रिम कोर्टानेही आमच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी कोर्टाचा आदेश शिरसावंद्य मानत ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी.

- विलास सोनार, ग्रंथपाल विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रायकॉममधील कामगारांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस इंडस्ट्रियल भागात असलेल्या ट्रायकॉम इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीतील कामगारांनी सुविधा मिळत नसल्याने कामबंद आंदोलन पुकारले आहे. कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्‍थापन केवळ तारीख देण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून ३०० पेक्षा अधिक कामगार ट्रायकॉम कंपनीत काम करीत आहेत. मात्र, कामगारांना कामगार कायद्यातील सवलतीपांसून वंचित रहावे लागत आहे. याबाबत अनेकदा कामगार उपायुक्तांकडे तक्रार करून देखील कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. यामुळे कामगारांनी महिला कामगारांसह कामबंद आंदोलन पुकारले आहे. वेतन वेळेवर अदा करावे व वेतनवाढ करार तत्काळ लागू करावा, अशी मागणी कामगारांनी कंपनी व्यवस्‍थापनाकडे केली आहे.

कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची मागणी अमान्य केल्याने कामगारांनी शुक्रवारी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनी व्यवस्थापन मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.

या सुविधांचाही अभाव

ट्रायकॉम कंपनीत शेकडोच्यावर महिला काम करीत असताना त्यांना पिण्याचे पाणी व शौचालयाची सुविधा देखेली कंपनी व्यवस्थापनाने दिलेली नाही. याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयात तक्रार करून देखील कंपनी व्यवस्थापनावर कार्यवाही होत नसल्याची खंत महिला कामगार व्यक्त करीत आहेत.

ट्रायकॉम कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे भविष्य निर्वाह निधी व कामगार विमा रुग्णालयाचे पगारातून कपातीतील पैसै गेले कुठे असा सवाल देखील कामगार उपस्थित करीत आहेत. याबाबत कामगारांनी अनेकदा कंपनी व्यवस्थापनाकडे मागणी करून देखील कामगारांचा पीएफ व इएसआससीचे पैसे भरण्यात आले नसल्याचे तक्रार कामगारांनी केली आहे. यासाठी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चला मिरवूया बाइकसंगे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नारीशक्तीला सलाम करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या नावनोंदणीला नाशिककर महिलांनी तुफान प्रतिसाद दिला. ही रॅली रविवारी म्हणजे आठ मार्चला बीवायके कॉलेजच्या मैदानापासून सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

काळाप्रमाणे बदलणारी महिला आणि तीची खास मैत्रिण म्हणजे तीची बाइक. मग तिच्यासह मिरविण्याची संधी कोण सोडणार? त्यामुळेच 'मटा'च्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली आहे.

महिलांसाठी बाइक रॅलीची ही सुंदर संधी मटाने उपलब्ध करुन दिली आहे. ही रॅली महिला सक्षमीकरणाचेच एक प्रतिक आहे. ये नाशिककर महिलांनी निश्चितच सहभागी व्हायला हवे.

मृणाल दुसानीस, अभिनेत्री

मुलींना सतत एका मर्यादेतच पाहण्याची सवय समाजाला लागली आहे. ही सवय मोडून काढण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम व्हायलाच हवेत. मटाने हा खूप चांगला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुली आणि महिलांनी नक्कीच याचा लाभ घ्यायला हवा.

संस्कृती खेर, अभिनेत्री

रॅलीदरम्यान तुमचे लायसन्स तुमच्याबरोबरच असू द्या

हेल्मेट असेल तर ते निश्चित परिधान करा

ही रॅली असणार आहे रेस नाही. त्यामुळे सांगितलेल्या स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवा.

रॅलीचा मार्ग ज्या पध्दतीने दिला आहे त्यानुसारच गाडी चालवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस, गारपिटीचा सोमवारी दणका?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला सोमवारी (ता.८) व मंगळवारी (ता. ९) गारपीट व अवकाळी पावसाच्या आपत्तीला सामोरे जावे लागू शकते. हवामान खात्याने तसा इशारा दिला आहे. या नव्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

गेल्याच आठवड्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्र अवकाळी पाऊस व गारपिटीला सामोरे गेला आहे. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या आपत्तीसाठी सज्ज राहावे लागणार आहे. आठ आण‌ि नऊ मार्चला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा परिसरात पाऊस किंवा गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लक्षद्व‌िप ते मालदीवदरम्यान हवेच्या वरच्या थरात प्रतिचक्रीवादळ घोंघावत असून, त्यामुळे येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येणार आहे. फेब्रुवारी अखेरीस झालेल्या पावसाने द्राक्ष, कांदा, गहू तसेच भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू असतानाच प्रशासकीय यंत्रणेला नव्याने पंचनामे करावे लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामाई घेणार मोकळा श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

दक्षिण गंगा म्हटल्या जाणाऱ्या गोदावरी आता मोकळा श्वास घेऊ शकणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदावरीला तिचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी नदीपात्रालगतच्या अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी नाशिक महापालिका तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिका दिले आहेत.

गोदावरीच्या प्रदूषणाची दखल थेट मुंबई हायकोर्ट आणि पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने घेतल्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठीच गोदापात्रालगतची अतिक्रमणे काढण्याचे फर्मान महापालिकेला देतानाच जिल्ह्यातील नदीकाठालगत ब्लू आणि रेड लाइन आखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. याबाबत एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

गंगापूर धरण ते नांदूरमध्यमेश्वर यादरम्यान गोदावरी नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. गोदामाई प्रदूषणमुक्त व्हावी आणि तीने मोकळा श्वास घ्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित तसेच अन्य काही जणांनी हायकोर्टात जनहित तर, त्र्यंबकेश्वरच्या गोदावरी प्रदूषणप्रश्नी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (नीरी) सल्लागार म्हणून नेमणूक केली. तसेच, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून त्याचा अहवाल दर दोन महिन्यांनी कोर्टास देण्याचे निर्देशित केले आहे.

नदीपात्रालगत होणार मोजणी

त्र्यंबकेश्वरमध्ये नदीपात्र व त्यालगतच्या सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे हटविणे आवश्यक आहे. म्हणूनच गोदावरीच्या उगमापासून जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या नदीपात्र व त्यालगतच्या सरकारी जमिनींची तातडीने व नि:शुल्क मोजणी करावी, असे आदेश कुशवाह यांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिक्षकांना दिले आहेत. गोदावरी नदी बारमाही प्रवाहीत होण्यास मदत व्हावी म्हणून नदीच्या खोऱ्यात अॅक्विफर मॅपिंगची कार्यवाही तातडीने हाती घ्यावी आणि अॅक्विफर रिचार्ज करण्याबाबत उपाययोजना सूचवाव्यात, असे आदेशही भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटांवर उभारणार आयसीयू वॉर्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

सिंहस्थाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीला तातडीने उपचारांची गरज भासलीच तर त्याला गर्दीतून वाट काढत हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणे मोठे दिव्य ठरणार आहे. म्हणूनच शहरात उभारण्यात येणाऱ्या सात घाटांवर तात्पुरत्या स्वरुपातील तंबूतच अतिदक्षता विभाग उभारण्यावर जिल्हा प्रशासन भर देणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. आरोग्य सुविधांचे नियोजन करताना जिल्ह्यातील आरोग्य संस्था, रुग्णालये, सेवाभावी संस्था, वैद्यकीय महाविद्यालयांसोबत समन्वय स्थापित करणे हा या बैठकीचा उद्देश होता. बैठकीला आमदार डॉ. राहुल आहेर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉ. मनोज चोप्रा आदी उपस्थित होते.

आरोग्य सुविधांबाबत सहकार्य करण्यासाठी विविध संस्था आणि रुग्णालये पुढे येत असल्याने कुंभमेळ्यात भाविकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल, असा विश्वास डवले यांनी व्यक्त केला.

‍शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. सर्व संस्था आणि रुग्णालयांशी समन्वय राखण्यासाठी डॉ. रवींद्र चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुंभमेळा कालावधीत २४ तास वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आवश्यक यंत्रणा राबविण्यासाठी तीन नियंत्रण पथके तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिली. आरोग्य सुविधांचे नियेाजन करताना प्रत्येक मार्गावर रुग्णवाहिकांची सुविधा, संदर्भित करावयाच्या रुग्णालयांचा कृती आराखडा, तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबतचे नियेाजन आदी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

मोबाईल अॅप विकसित करणार

शहरातील आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवांची माहिती लोकांना सहजगत्या उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधांच्या मोबाईल अॅप्ससाठी रुग्णालयांनी संपर्क क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती समन्वयक अधिकाऱ्यांकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता तपासणी; नऊ संस्थांना साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सिंहस्थ कामांचा दर्जा आणि गुणवत्तेच्या तपासणीसाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील आठ नामांकीत तांत्रिक संस्थांना साकडे घातले आहे. यात आयआयटी पवईसह, सीओईपी पुणे व मेरी या संस्थांचाही समावेश आहे. या संस्थांच्या होकाराची महापालिका प्रशासनाला प्रतीक्षा आहे. दरम्यान, महापालिकेचा महसुली खर्च ३५ टक्क्यांवर गेल्याने नोकरभरती करण्यास आयुक्तांनी नकार दिला आहे. सफाई कर्मचा-यांची कामे आऊटसोर्सिंगने करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या वतीने सिंहस्थात करण्यात येत असलेल्या १०५२ कोटींचे रस्ते, साधुग्राम, गटारी आणि इलेट्रीकल्सच्या कामांच्या दर्जा व गुणवत्तेबददल सर्वत्र ओरड होत आहे. ठेकेदारांकडून करण्यात येत असलेल्या या कामांचा दर्जा निकृष्ठ असून, पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांनी या कामांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. गेडाम यांनी या कामांचा दर्जा तपासणीचा निर्णय घेतला असून, त्यासाठी राज्यातील नऊ तांत्रिक संस्थाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यात आयआयटी पवई, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टीट्यूट मुंबई, व्हीएनआयटी नागपूर, सीओईपी पुणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव, गर्व्हमेन्ट पॉलिटेक्निकल्स नाशिक, के. के. वाघ इजिंनिअरींग कॉलेज आणि मेरी या संस्थांचा समावेश आहे. सिंहस्थाची कामे तपासून त्यांचा दर्जा आणि गुणवत्तेचा अहवाल देण्याची विनंती आयुक्तांनी पत्राद्वारे केली आहे. या आठ संस्थापैकी जी संस्था काम करण्याची तयारी दर्शवेल, तिला या कामांच्या चौकशीचे काम दिले जाणार आहे. यासाठीचा आर्थिक मोबदलाही पालिकेच्या वतीने देण्यात येणार असून, निष्पक्ष अहवालाची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाणार आहे. या संस्थाच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारांसह अधिका-यामंध्ये खळबळ उडाली आहे.

नोकरभरतीला कायमस्वरूपी ब्रेक

नाशिक महापालिकेत सफाई कर्मचा-यांसह रिक्त असलेल्या जागांवर नव्याने सरसकट भरती करण्यास आयुक्तांनी नकार दिला आहे. पालिकेचा महसुली खर्च अगोदरच ३५ टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे नोकरभरतीचा अतिरिक्त बोझा आता महसुली खर्चावर टाणे शक्य नसल्याचे सांगत ज्या पदांच्या भरतीला कायदेशीर अडचण नसेल, अशी पदे भरण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. सोबतच सिंहस्थासह नियमीत साफसफाईसाठी लागणा-या ४,२०० सफाई कर्मचा-यांची कामे आऊटसोर्सिंगद्वारे केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नोकरभरतीला पूर्णतः ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

आणखी एक अतिरिक्त आयुक्त भरणार

नाशिक महापालिकेचा समावेश आता ब वर्गात झाला असून, शासकीय नियमानुसार पालिकेत दोन अतिरिक्त आयुक्त असणे आवश्यक आहे. पालिकेत सध्या एकच अतिरिक्त आयुक्त आहे. त्यामुळे शासनाकडून आणखी एक अतिरिक्त आयुक्तांची मागणी केली जाणार आहे. सोबतच विद्यमान उपायुक्तांपैकी एकाला बढती देण्यांसदर्भात शासनालाच विनंती केली जाणार असल्याची माहिती डॉ. गेडाम यांनी दिली आहे. त्यामुळे पालिकेला दोन अतिरिक्त आयुक्त मिळण्याची शक्यता आहे.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>