Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आठ दिवसांत १८४.६ मिमी पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले असून, नदीकाठची बाजारपेठ ठप्प झाली आहे. तसेच पावसाची संततधार कायम असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण ‌वाढले असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी १०.५ मिमी, तर आठ दिवसांत १८४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (दि. ३१) शहरात सकाळी ९२, तर सायंकाळी ८७ टक्के आर्द्रता होती. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर गारवा जाणवला. आठ दिवसांच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर कमी होता. काही ठिकाणी संततधार, काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी थोड्या वेळाच्या अंतराने पावसाची हजेरी लागत होती. याचा आठवडे बाजारावरही परिणाम जाणवला. गंगापूर धरण ८४ टक्के भरले असून, बुधवारी सकाळी ७ हजार ८३३ क्युसेकने होत असलेला पाण्याचा विसर्ग दुपारी चार वाजेच्या सुमारास कमी करण्यात आला. दुपारी चार नंतर ३ हजार १६८ क्युसेकवर हा विसर्ग नेण्यात आला. दरम्यान, आठवडाभरापासून शहरात कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातास निमंत्रण ठरत असून, रस्त्यावर पसरलेल्या खडींमुळे वाहने घसरण्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रफींच्या गीतांनी बहरली शाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुझे तेरी मोहब्बत का, सारे जमाने मे मोसम, आदमी मुसाफीर है, दिल का भवर अशा एकापेक्षा एक मोहम्मद रफी यांच्या गीतांनी बुधवारची सायंकाळ स्वरमय झाली. निमित्त होते सार्वजनिक वाचनालय नाशिक व आर एम ग्रुप यांच्यातर्फे 'यादे रफी' या कार्यक्रमाचे. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प. सा. नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गितो के स्वर तुट गये, मेरे दोस्त मुझे मेरा, आदमी मुसाफिर है, सज रही गली मेरा, जिया हो जिया कुछ बोल दो, तुमले ओ हसी, तेरे हाथो मे पहनाके, रात के हमसफर अशा बहारदार गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. दरम्यान, प्रमुख पाहुणे हसमुखभाई गांधी, आदिवासी विभागाचे माजी आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, एसीपी चंद्रकांत जोशी, उदयकुमार मुंगी आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गीतों के स्वर तुट गये या गीताने दीपक लोखंडे यांनी मैफलीचा प्रारंभ केला. प्रकाश साळवे यांनी कार्यक्रमाची निर्मिती होती. तर ध्रुवकुमार तेजाळे यांचे संगीत संयोजन केले. लोखंडे यांच्यासह श्रीकांत गायकवाड, राघवेंद्र अंकलगी, सार्थक खैरनार, कांचन गोसावी, समृद्धी गांगुर्डे, मीना परुळकर-निकम, साक्षी लोखंडे यांनी सुरेल गाणी सादर केली. त्यांना नितीन आढाव, अनोष आढाव, बाबा सोनवणे, संजय हिवराळे, सुधाकर अमृतकर, देवाशिष पाटील, गंगा हिरेमठ, फारुख पिरजादे, अभिजीत शर्मा यांनी साथ केली. प्रिती जैन यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये एसआरए लागू होणार

$
0
0

- मुख्य सचिव भूषण गगरानी यांची घोषणा

- मनपा आकृतिबंध १५ दिवसांत मंजूर होणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढत्या झोपडपट्ट्यांच्या संख्येला मर्यादित करून या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी नाशिकमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन कायदा अर्थात एसआरए योजना लवकरच लागू केली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव भूषण गगरानी यांनी दिले आहेत. आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. एसआरए योजना लागू करण्यासह महापालिकेचा आकृतिबंधही १५ दिवसांत मंजूर करण्याचे आश्वासन गगरानी यांनी दिल्याचे आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे, मिळकतींचा प्रश्न, शहरात क्लस्टर योजना लागू करणे, स्मार्ट सिटीविषयीचे प्रश्न यासह महापालिकेचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर आज, मंत्रालयात मुख्य सचिव गगरानी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी आमदार फरांदे, आमदार सीमा हिरे, आयुक्त राधाकृष्ण गमे, स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील, उद्योगपती संतोष मंडलेचा, विश्व हिंदू परिषदेचे कैलास देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पसपासून टपऱ्या दूर तरीही तंबाखूचा पूर

$
0
0

तंबाखूमुक्त कॅम्पस मोहीम हाती घेण्याची गरज

...

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

नाशिक : शहरातील शाळांभोवताली थेट पानटपऱ्यांचा वेढा नसला तरीही ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे बघून शालेय विद्यार्थी जीवनशैली स्वीकारतात, त्या कॉलेज कॅम्पसमध्ये तंबाखूविरोधातील उपक्रमांतर्गत धडक मोहीम आखण्याची आवश्यकता व्यक्त होते आहे. बहुतांश कॉलेज नजिकचे परिसर पानटपरीमुक्त असले तरीही अपवादाने काही ठिकाणी कॉलेजांजवळ या टपऱ्यांचे दर्शन घडते. प्रत्यक्षात टपऱ्या कॉलेजांपासून दूर असल्या तरीही काही विद्यार्थ्यांच्या खिशात तंबाखूजन्य पदार्थांचा पूर आहे, हे वास्तव अनेक कॅम्पसच्या रंगलेल्या बोलक्या भिंती अन् स्वच्छतागृहे नाकारत नाहीत.

शासनाच्या कायद्यानुसार कॉलेज कॅम्पसच्या परिसरातही तंबाखू विक्रीस बंदी आहे. या बंदीचे वरकरणी पालन होताना दिसत असले तरीही छुप्या पध्दतीने अनेक विद्यार्थ्यांजवळ तंबाखूजन्य पदार्थ कॅम्पसमध्ये सहजगत्या आढळून येत आहेत. याबाबत कॉलेज प्रशासनांनीच समन्वयाने मोहीम उघडण्याची गरज पालकांमधून व्यक्त होते आहे.

\B...

शाळांमध्येही लवकरच नियंत्रण समिती \B

शालेय मुलांमधील वाढत्या व्यसनाधिनतेस आळा घालण्यासाठी यापुढे सर्व शाळांना शालेय स्तरावर तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करावी लागणार आहे. शाळांना वेगळी समिती बनविणे शक्य नसल्यास शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेच्या निकषपूर्ततेचा आढावा अहवाल स्वरूपात अद्ययावत ठेवावा लागणार आहे. यासाठी समितीच्या मासिक बैठका आयोजित केल्या जाव्यात या आशयाचे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत.

काही वर्षांमध्ये शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढते आहे. याचे परिणाम विचारात घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमधील शाळांना तंबाखूमुक्तीसाठी दक्ष रहावे लागणार आहे. 'तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान' राबविण्याबाबत सलाम मुंबई फाउंडेशनचे सहकार्य शासन घेत असून, या अभियानासाठी फाउंडेशनने नुकताच शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

या अभियानांतर्गत शाळांकडून अपेक्षित असणाऱ्या सहकाऱ्याबाबत शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्याध्यापकांना शाळेत तंबाखू सेवनास बंदी असल्याची सूचना काढावी लागेल. या सूचनेची एक प्रत शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावी लागेल. धूम्रपान व तंबाखू निषिध्द क्षेत्राबाबत पक्के फलक शाळेच्या आवारात लावले जावेत, तंबाखूचे दुष्परिणाम व संबंधित कायद्याच्या जागरासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासह आरोग्यतज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर राखण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य विक्रीवरही पूर्णत: बंदी आहे. याबाबतचा फलकही शाळेला प्रवेशद्वारावर लावावा लागणार आहे. हे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर शाळेने प्रवेशद्वारावर 'तंबाखूमुक्त शाळा' असे फलकही लावणे बंधनकारक केले आहे. हे अभियान योग्य दिशेने राबविले गेल्यास तंबाखूमुक्त शाळांच्या दिशेने एक पाऊल पडेल, असा विश्वास सलाम मुंबई फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 'मटा' शी बोलताना व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधेयकाची डॉक्टरांकडून होळी

$
0
0

चारशे डॉक्टरांनी पाळला संप

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने मांडलेले आणि लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास तीव्र विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या चारशे डॉक्टरांनी बुधवारी सर्व दवाखाने बंद ठेवून संप पाळला. या विधेयकाची होळी करून निषेध करण्यात आला.

सध्या अस्तित्वात असलेला भारतीय वैद्यक परिषद कायदा आणि प्रस्तावित विधेयक दोन्हींची उद्दिष्टे सारखीच असल्याने नवीन कायद्याची गरजच काय, असा प्रश्न डॉक्टरांनी या संपातून उपस्थित केला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या विधेयकानुसार भारतीय वैद्यक परिषदेचे प्रातिनिधिक अस्तित्व संपुष्टात येणार असून, नव्या आयोगात शासननियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार आहे. फक्त पाच राज्यांना एकावेळी प्रतिनिधित्व मिळणार असल्याने इतर राज्ये, विद्यापीठे आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना अजिबात थारा नाही. सध्या १३४ सदस्य असलेल्या परिषदेचे कार्य २५ जणांवर येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सरकारला विरोध करण्याची शक्तीही या परिषदेत राहणार नाही. याशिवाय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील फक्त पन्नास टक्के जागांचे शुल्क नियमन सरकार करणार असल्याने वैद्यकीय शिक्षण ही फक्त धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. याशिवाय, विधेयकाच्या उद्दिष्टांमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उच्च राखण्याचे गृहितक आहे, परंतु आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्यासाठी सदर शास्त्राचे पदवीधारक असण्याची अटच काढून टाकण्यात आली आहे. हे अनाकलनीय असून, समाजाचं आरोग्य चांगले राखण्यासाठी आम्ही बांधील आहोत. म्हणून हा विरोध सुरू असल्याचे आयएमएतर्फे सांगण्यात आले. यादिवशी केवळ अत्यवस्थ रुग्णांना तपासण्यात आले. आंदोलनात आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, उपाध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, सचिव डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. किरण शिंदे, डॉ. गीतांजली गोंदकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून ४४ मुलाखती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप शिवसेनेकडून सुरू असलेल्या मेगाभरतीमुळे ओहोटी लागलेल्या काँग्रेसच्या बुधवारी नाशिकमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या असून, १५ मतदारसंघासाठी ४४ इच्छुकांनी मुलाखती दिल्याचा दावा निरीक्षक आमदार भाई जगताप आणि डॉ. उल्हास पाटील यांनी केला.

एकेकाळी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी मेनरोडवरील काँग्रेस कार्यालयात इच्छुकांच्या रांगा लागत असताना बुधवारी मात्र पक्षाच्या मुलाखतीस अल्प प्रतिसाद मिळाला. शहरात इच्छुकांचा भरणा अधिक असला तरी, ग्रामीण भागातून मात्र तीन मतदारसंघांतून इच्छुक मुलाखतींसाठी फिरकलेच नसल्याचे चित्र होते. त्यामुळे प्रथमच काँग्रेसच्या मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी नसल्याने कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान, जिल्ह्यातील दोन्ही आमदारांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली होती.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू असतानाच, काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील १५ मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या. निरीक्षक आमदार जगताप आणि डॉ. पाटील यांनी सकाळी दहा वाजता शहरातील तीन मतदारसंघांसाठी मुलाखती सुरू केल्या. शहरातील पश्चिम मतदारसंघातून लक्ष्मण जायभावे, केशव अण्णा पाटील यांनी तर, नाशिक पूर्व मतदारसंघातून मुलाखतीसाठी विजय राऊत, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी मुलाखती दिल्या. नाशिक मध्य मतदारसंघात गटनेते शाहू खैरे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे आदींसह चार इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे समजते. देवळाली मतदारसंघातून किरण जाधव, नंदकुमार कर्डक यांनी मुलाखत दिली. त्यानंतर ग्रामीणच्या मुलाखती सुरू झाल्या. मात्र, ग्रामीणमधून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र होते. मुलाखतींसाठी इच्छुकांना जिल्हाध्यक्षांनी कळविलेले नसल्याने अनेकांना फोन करून बोलाविले जात होते. दिंडोरीचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांनी तर मतदारसंघातील १० इच्छुकांची यादीच निरीक्षकांकडे देऊन टाकल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दावा ठोकलेल्या नांदगाव, निफाड, येवला या मतदारसंघांतील इच्छुक मुलाखतींसाठी उपस्थित नसल्याचे बोलले जात आहे. चांदवड देवळा मतदारसंघातून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संपत वक्ते यांनी मुलाखत दिली. मालेगाव बाह्य मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मुलाखत दिली तर, ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी मुलाखत दिली. मुलाखतीस अल्पसा प्रतिसाद असतानाही आमदार जगताप यांनी १५ विधानसभा मतदारसंघासाठी ४४ जणांनी मुलाखती दिल्याचे सांगितले. मुलाखती घेऊन सदर अहवाल प्रदेशला सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उल्हास पाटील, डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, युवक शहराध्यक्ष स्वप्निल पाटील, वत्सला खैरे, हेमलता पाटील, डॉ. सुचेता बच्छाव, दिनेश बच्छाव, दिंगबर गिते उपस्थित होते.

गावित, शेख यांची हजेरी

राज्यातील काँग्रेस आमदारांचे आऊटगोईंग सुरू असल्याने नाशिकमधील दोन्ही आमदारांकडे लक्ष लागून होते. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आमदार गावित यांनी दुपारी येऊन या मतदारसंघातून मुलाखत दिली. याशिवाय जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित यांनीही मुलाखत दिली. मालेगाव मध्यमधून आमदार आसिफ शेख यांनी मुलाखत दिली. या दोन्ही मतदारसंघातून एक-एकच इच्छुक होते. त्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसला हवेत ७ मतदारसंघ

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जिल्ह्यात राष्ट्रवादी १०, तर काँग्रेसच्या वाट्याला ५ मतदारसंघ आहेत. मात्र, यंदा मतदारसंघात आदलाबदल करण्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय जागावाटपात ७ मतदारसंघ काँग्रेसला सोडले जावेत, अशी आग्रही मागणी राहणार असल्याचे आमदार भाई जगताप यांनी सांगितले. यात नाशिक मध्य, नाशिक पूर्व, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव मध्य, सिन्नर हे मतदारसंघ पक्षाकडे होते. याशिवाय चांदवड-देवळासह आणखी एक मतदारसंघ मागितला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-

भाजपची पातळी खालावली

भाजपच्या मेगाभरतीवर विचारले असता, आमदार जगताप यांनी विरोधकांच्या आमदारांना दमदाटी करून तसेच दहशत दाखवून भाजप प्रवेश केले जात असल्याचा आरोप केला. नेत्यांना ईडीच्या धमक्या देऊन दहशत पसरविली जात असून, प्रवेशासाठी मजबूर केले जात आहे. सत्तेसाठी राजकारणाची पातळी कधी नव्हे ती इतकी घसरलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दोन्ही शाळांना महापालिकेची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील आनंदवली येथील महापालिका शाळा व मराठा हायस्कूल या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू घडल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन अधिकारी देविदास महाजन यांनी दोन्ही शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मराठा हायस्कूलमध्ये जयेश अवतार या १२ वर्षीय मुलाचा शाळेतील लोखंडी कपाट अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता. तर आनंदवली येथील महापालिकेच्या शाळेतील अक्षय साठे या सात वर्षीय बालकाचा शिक्षिकेनी आधारकार्ड आणण्यासाठी पाठविले असता, खड्डयातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांनंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी देविदास महाजन यांनी नोटीस बजावल्या. शालेय व्यवस्थापनानी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आनंदवली येथील शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक कैलास नामदेव ठाकरे आणि संबंधित शिक्षिका मंदा महारू बागूल यांना नोटीस बजावली आहे. शाळा सुरू असताना विद्यार्थी बाहेर का गेला, परिपाठानंतर विद्यार्थी वर्गात जाणे अपेक्षित असताना तो शाळेबाहेर कसा गेला, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

\Bआज बैठक \B

शहरात दोन दिवस सलग शालेय विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यामुळे गुरुवारी (दि. १) सर्व मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात आली आहे. विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्यावर यावर चर्चा करण्यात येणार आहे. पोलिस मुख्यालय वसाहतीमध्ये असलेल्या शाळा क्रमांक १६ मध्ये दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या मेगाभरतीची खिल्ली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय मेगाभरतीची नाशिकमध्ये अज्ञाताकडून खिल्ली उडवणारे पोस्टर लावण्यात आले आहे. 'भाजमध्ये प्रवेश देणे आहे' असा चिमटा काढणारे फलक बुधवारी मध्यरात्रीनंतर लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. 'ईडी व इन्कम टॅक्स नोटीस असलेल्यांना प्राधान्य देण्यासह भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास प्रथम पसंती, सहकार क्षेत्र बुडवण्याचा अनुभव असायला हवा', अशा उपरोधिक अटी-शर्तीही या फलकांवर टाकण्यात आल्याने भाजपकडून हे फलक काढण्यासाठी धावपळ सुरू झाली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजप सेनेत जाणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. बुधवारी राष्ट्रवादीच्या तीन तर काँग्रेसच्या एका आमदारांचा भाजप प्रवेश ठरला होता. त्यामुळे भाजपमध्ये सुरू असलेली मेगाभरती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते, त्याच नेत्यांना पायघड्या टाकल्या जात आहेत. एकामागोमाग नेते जात असल्याने सोशल मीडियावर भाजपची खिल्ली उडवली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, काँग्रेसचे मुंबईतले आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ आदी मंडळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणि पुण्यात भाजपच्या या भरतीवर टीका करणारे पोस्टर झळकले होते. बुधवारी नाशिकमध्येही भाजपवर टीका करणारे फलक लावण्यात आले. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून हे फलक लावून भाजपला टोला लगावल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपला मिळतेजुळते रंग या फलकांवर वापरण्यात आल्याने बघणाऱ्याला हे फलक प्रथमदर्शनी भाजपनेच लावलेले असल्याचा भास होतो.

येथे लावले पोस्टर

शहरातील व्ही. एन. नाईक कॉलेजसमोर, एबीबी सर्कल परिसर, मुंबई नाका वयावर हे फलक झळकवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फलकांवर भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचा मोबाइल क्रमांक टाकण्यात आला आहे. या फलकबाजीला भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळते हे बघणे आता औसुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नंदिनी झाली प्रवाही

$
0
0

सातपूर : सातपूर गावातून वाहणारी नंदिनी नदी दुथडीभरून वाहती झाली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाण्याचा जोर वाढल्याने नदी किनारी असलेला घाण, कचराही पाण्यामुळे वाहून गेला. नदीपात्राच्या बाहेर पाणी गेले नसल्याने महादेववाडी, स्वारबाबानगर, कांबळेवाडी आदी ठिकाणी घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी किनारी राहणाऱ्यांनी सर्तक रहावे, असा इशारा महापालिकेच्या सातपूर विभागाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादीतील नाव तपासून घ्या!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत आपले नाव आहे का, नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याची खात्री करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी ही खात्री करावी असेही त्यांनी म्हटले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीसंदर्भात नाशिक जिल्हा निवडणूक शाखेकडून विविध प्रयत्न केले जात असून, त्यासाठी मोहीम घेण्यात आली आहे. या सर्व प्रयत्नांना मतदारांनी आवश्यक सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा निवडणूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या मतदार यादीच्या शुद्धीकरण मोहिमांमधून आजपर्यंत जवळपास ४५ हजार मयत व दुबार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. लवकरच हा आकडा ५० हजारांच्या वर जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णहाल

$
0
0

केवळ आपत्कालीन रुग्णांवर उपचार; शेकडो रुग्णांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

नुकतेच लोकसभेत एनएमसी बिल पारीत करण्यात आले. या बिलाविरोधात जळगाव आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. देशभरात ‘आयएमए’ या संघटनेतर्फे बुधवारी (दि. ३१) सकाळी पहाटे ६ वाजेपासून गुरुवार (दि. १) सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांचा बंद पुकारण्यात आला. डॉक्टरांच्या या संपामुळे जळगाव जिल्ह्यात रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. खासगी दवाखाने बंद असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच महापालिका रुग्णालयांवरील ताण वाढला होता. या संपात जिल्ह्यातील ६०० डॉक्टर सहभागी झाले होते.

नुकतेच लोकसभेत पारीत केलेल्या एनएमसी बिलाच्या विरोधात देशभरात ‘आयएमए’तर्फे बुधवारी सकाळी पहाटे ६ वाजेपासून गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंतचा २४ तासाचा बंद पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी जवळजवळ सर्व खासगी हॉस्पिटल बंद होते. ओपीडी बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल झालेत. ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थांना संपाची कल्पना नसल्याने ते जळगावात उपचारासाठी आले होते. मात्र, त्यांना माघारी परतावे लागले. दवाखाने बंद असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची सकाळपासून गर्दी झाली होती. ओपीडीत लक्षणीय वाढ होऊन महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये देखील नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती.

रुग्णहाल अन् नातेवाईकही बेहाल
डॉक्टरांचा संप असल्यामुळे जिल्ह्यातून आलेल्या तसेच शहरातील रुग्णाचे चांगलेच हाल झालेत. तपासणी व उपचारासाठी अनेक रुग्णांना त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. मात्र, ओपीडी बंद असल्याचे सांगितल्याने रुग्णांना घरी परत न्यावे लागले. उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना मात्र नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेऊन गेले. तेथे गर्दी असल्याने रुग्णांचे चांगलेच हाल झालेत. त्यांच्यासोबत असलेले नातेवाइकांची फिरफिर होत असल्याने तेदेखील वैतागले होते.

सिव्हिलच्या ओपीडीत ३५० रुग्ण
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या आजारात वाढ झाली आहे. थंडी तापाचेही रुग्ण वाढले आहेत. याच काळात आयएमने संप पुकारल्याने रुग्णांची चांगलीच फिरफिर झाली. खासगी रुग्णालये बंद असल्याने रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे वळले. त्यामुळे दररोज सकाळी २०० ते २५० रुग्णांची असणारी ओपीडी बुधवारी दुपारी ३५० रुग्णांपर्यंत पोहचली होती. तसेच सायंकाळीदेखील रुग्णांची संख्या जास्त राहील, असा अंदाज सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवा सुरू
डॉक्टरांचा बंद असला तरी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या तसेच आयसीयूमधील रुग्णांवर उपचार सुरू होते. तसेच ज्या महिला डिलिवरीसाठी आल्या त्यांच्यावरदेखील उपचार करण्यात येत आहेत. लखवा, हृदयविकार अशा आपत्कालीन रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आयएमचे सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिली.

आयएमएकडून निदर्शने
१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यातील आयएमएचे सर्व सभासदांचे दवाखाने बंद होते. फक्त अत्यवस्थ रुग्णांनाच तपासण्यात आले तर इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आयएमएचे सर्व सदस्य व. वा. वाचनालायजवळील आयएमए सभागृहात एकत्र जमले होते. या वेळी डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाविरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने मांडलेले आणि लोकसभेत संमत झालेले राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास इंडियन मेडिकल असोसिएशन या आधुनिक वैद्यक शास्त्राच्या डॉक्टरांच्या संघटनेचा ठाम विरोध आहे. खरे तर सध्या अस्तित्वात असलेला भारतीय वैद्यक परिषद कायदा आणि प्रस्तावित विधेयक दोहोंची उद्दीष्टे सारखीच आहेत. मग नवीन कायद्याची गरजच काय, असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला.

निषेधाच्या फलकासह घोषणाबाजी
डॉक्टरांच्या हातात या विधेयकाला विरोध दर्शविणारे फलक होते. यावेळी अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. अनुप येवले, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. विवेक पाटील, डॉ. तुषार बेंडाळे, डॉ. भरत बोरोले, डॉ. नीलेश चांडक, डॉ. स्वप्नील कोठारी, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. पवन चांडक आदी उपस्थित होते. आयएमएतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये संघटनेमधील जिल्हाभरातून सुमारे ६०० खासगी डॉक्‍टरांनी आपली ओपीडी व वैद्यकीय सेवा बंद करून सहभाग घेतल्याची माहिती ‘आयएमए’कडून देण्यात आली.


धुळ्यातही रुग्णालये बंद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नॅशनल मेडिकल कमिशन बिलाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे बुधवारी (दि. ३१) देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. यात जिल्ह्यातील डॉक्टरांनीदेखील सहभागी होत आपापले रुग्णालय बंद ठेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शेने केली.

लोकसभेत नॅशनल मेडिकल कमिशन बिलाला मंजुरी देण्यात आली. लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस मानावा लागेल असे ‘आयएमए’ने मत व्यक्त केले आहे. हे विधेयक अन्यायकारक, जाचक व सर्वसामान्यांच्या विरोधात असून, या विधेयकात कलम ३२ अन्वये सुमारे साडेतीन लाख अपात्र उमेदवारांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची अनुमती दिली जाणार आहे. विधेयकामुळे ज्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही त्यांना औषधे देण्याची संधी मिळणार आहे. कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडरच्या नावाखाली मॉडर्न मेडिसीनशी संलग्न असलेल्यांना औषध देण्याचा परवाना मिळेल. त्यामुळे भोंदूगिरी करणारे तथाकथित बोगस डॉक्टरांनाही औषधे लिहून देण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या भोंदगिरीला शासकीय परवाना मिळवून देणारा हा कायदा सर्व सामान्यांच्या जिवाशी खेळ करणारा आहे, असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आव्हाने निर्माण करणाऱ्या या कायद्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध व्यक्त केला आहे. या वेळी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. योगेश बोरसे यांच्यासह असंख्य डॉक्टर्स सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकचा डीपी दडपला?

$
0
0

दोन महिन्यांनंतर अधिसूचना हाती; शहरात शंकाकुशंका

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या विकास आराखड्याकडे (डीपी) संपूर्ण त्र्यंबक नगरीचे लक्ष लागले होते त्या आराखड्याची अधिसूचना निघून दोन महिने उलटले तरीही त्र्यंबककरांना याची तसूभरही खबर न लागू दिल्याने शहरात गुरुवारी उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्र्यंबक विकास आराखड्याचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल सध्या त्र्यंबकेश्वरच्या सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नगर विकास खात्याने २७ मे २०१९ रोजीच या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर दोन महिने हा आराखडा का दाबून ठेवण्यात आला, तसेच तो नाशिक येथील नगर रचना कार्यालयात का पडून होता, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

त्र्यंबकेश्वर शहराची विकास योजना तयार करण्याचे काम ऑगस्ट २०१६ पासून सुरू होते. त्यावरून बरेच वादविवाद झाले आणि दोन वेळा हा डीपी सादर करावा लागला. मात्र गेल्या वर्षापासून डीपीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असता त्याची सूचना गुप्तपणे निघाल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही अधिसूचना कोणत्याही वेब पोर्टलवर ह सापडत नाही. काहींनी दुपारनंतर नगरपालिका कार्यालयात संपर्क साधला असता शहर अभियंता यांनी अधिसूचनेची प्रत नाशिक नगर रचना कार्यालयातून आणली. तसेच अद्याप नकाशा मिळालेला नाही तो एक महिन्याने मिळेल असे नगर रचनाकडून सांगण्यात येत असल्यामुळे शहरात विविध प्रकारच्या शंका उपस्थित होत आहेत. तसेच त्र्यंबकमधील काही नगरसेवक मात्र डीपी मंजूर नसल्याचे सांगून मंत्रालयात खेटा घालत होते. यावर कडी म्हणजे अगदी कालपरवा पर्यंत येथे आलेले राजकीय पदाधिकारी तर मुख्यमंत्र्यांच्या कानावर डीपी रखडल्याचे घालणार असल्याचे अश्वासन देत होते. त्यामुळे डीपीबाबत एवढी गुप्तता का पाळण्यात आली, असा मुद्दा आता उपस्थित होत आहे.

हरकती जैसे थे

प्रारूप योजना जाहीर झाल्यानंतर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या हरकतींवर सुणावणीही झाली. त्यानंतर पालिका सभागृहाने एकमताने ठराव देत काही बदल सुचविले होते. मात्र आता सुचविलेले बदलही डीपीत दिसत नाही. शहर विकास योजनेची ही ३० क्रमांकाची नोटीस आहे. त्यावर काही हरकती घेता येतात की नाही याबाबत नागरिकांना अनभिज्ञ ठेवण्यात आले व त्याकरिता दोन महिने ही अधिसूचना दडवून ठेवण्यात आली असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

न्यायालयात जाणार

नाशिकहून पुणे आणि तेथून नगर विकास मंत्रालय असा डीपी योजनेचा प्रवास होत असताना दलालांचे जाळे तयार झाले होते. बाधित जमीन मालकांना गाठून आरक्षण काढायचे का? अशी विचारणा सुरू होती. एकूणच या डीपीत काहीतरी गडबड असावी म्हणूनच डीपी मंजुरीची अधिसूचना अशी गुपचुपपणे बाहेर आली असावी. शहर विकास योजनेचे शहराच्या सर्वच घटकावर दुरगामी परिणाम होतात. त्यामुळे काही नागरिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.

वादग्रस्त आरक्षण

सन १९९३ च्या योजनेतील काही आरक्षणे कायम

भौगालिक दृष्ट्या शक्य नसलेल्या जागेवर आरक्षण

डोंगर उताराच्या जमिनी रहिवासी क्षेत्र दाखविले

नदीकाठापासून १०० मीटर सोडणे आवश्यक असताना केवळ २४ मीटर अंतर सोडले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरूबाग हॉटेलमध्ये मद्यपींचा धुडघूस

$
0
0

नाशिक : पिंपळगाव खांब ते पाथर्डी मार्गावर असलेल्या पेरूबाग हॉटेलमध्ये जमलेल्या टोळक्याने मालकास मारहाण करीत धुडघूस घातला. ही घटना बुधवारी (दि.३१) घडली. जयदिप खंडू दातीर (रा. अंबडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दातीर यांनी भागीदारीत पिंपळगाव खांब आणि पाथर्डी या दोन गावांच्या सरहद्दीवर पेरूची बाग नावाचे हॉटेल सुरू केले आहे. आषाढी अमावस्या असल्याने बुधवारी (दि. ३१) हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी होती. त्यात सिडकोतील काही तरुण होते. महाराणा चौकातील संदीप गोपीचंद दोंदे व सिद्धार्थ किशोर दोंदे या संशयितांच्या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणातून वाद घातला. या टोळक्याने काउंटरवर बसलेले दातीर यांचे भागीदार रामप्रसाद पसाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करीत थेट मारहाण केली. संशयितांनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड करीत नुकसान केले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : पोलिसाच्या डोक्यात फोडले नारळ

वाहन तपासणीदरम्यान मद्यधुंद दुचाकीस्वाराने मला का अडविले, असा प्रश्न करीत थेट वाहतूक पोलिसाच्या डोक्यातच नारळ फोडले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे. रवींद्र दामोदर मोरे (४९, रा. गजानन पार्क सिन्नर फाटा) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी सुकदेव सदाशिव अहिरे यांनी तक्रार दिली. आहिरे हे बुधवारी (दि. ३१) रात्री आठ वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा पोलिस चौकीसमोर नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणीचे काम करीत होते. मद्याच्या धुंदीत हनुमान मंदिरात देवदर्शनासाठी जाणाऱ्या संशयित दुचाकीस्वारास पोलिसांनी अडविले. वाहन अडविल्याच्या कारणातून संशयिताने वाद घालण्यास सुरुवात केली. 'तू माझी मोटारसायकल का अडविली, तुला अधिकार आहे का, तुला माहित नाही मी कोण आहे,' असे म्हणत मोरे याने अहिरे यांना लाथ मारली. यावेळी संशयीताने हातातील नारळ अहिरे यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. संशयिताविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा यंत्रणेला बूस्ट

$
0
0

सक्षमीकरणासाठी २२६ कोटींचा प्रस्ताव; 'एमजीपी'कडून तांत्रिक मान्यता

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ४५ टक्के पाणीगळती रोखण्यासह नवीन वसाहतींमध्ये जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी महापालिकेने पाठविलेल्या ३४४ कोटींच्या आराखड्यापैकी २२६ कोटींच्या सुधारीत आराखड्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) तांत्रिक मान्यता दिली आहे. शहरात नवीन जलकुंभ उभारणीसह सिव्हील कामांच्या ११८ कोटींचा खर्च मात्र महापालिकेनेच करावा, अशा सूचना 'एमजीपी'ने केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने सुधारीत २२६ कोटींचा आराखडा आता शासनाकडे आर्थिक मान्यतेसाठी पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. अमृत योजनेतून निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याने शहरात नव्याने २६५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यासह पाच जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत वाढ होणार आहे.

तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या काळात झालेल्या वॉटर ऑडिटमध्ये शहरात ४५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते. त्यासाठी शहरातील जुन्या पाइपलाइन बदलण्यासह नव्या वस्त्यांमध्ये नवीन पाइपलाइन टाकणे, जलकुंभांची संख्या वाढवणे, पाचही जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याची शिफारस केली होती. परंतु, या कामासाठी सुमारे १२०० कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे टप्प्याटप्य्याने पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तालयात घेतलेल्या बैठकीत नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी ३०० कोटींचा निधी अमृत योजनेमधून मिळ‌वून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शहरातील पाणीगळती रोखण्यासह पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत तीनशे कोटी रुपयांचा आराखडा शासनामार्फत 'एमजीपी'कडे सादर करण्यात आला होता. या आराखड्याची तांत्रिक तपासणी केल्यानंतर 'एमजीपी'ने या आराखड्याला तांत्रिक मान्यता दिली. परंतु, यातील नवीन जलकुंभ उभारण्यासह ११८ कोटींच्या सिव्हील कामांना कात्री लावली आहे. केवळ नवीन जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवणे, नवीन जलवाहिन्या टाकण्यासह पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी २२६ कोटी ३३ लाखांच्या सुधारीत आराखड्याला तांत्रिक मान्यता दिली. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सदरचा नवीन सुधारीत आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठविण्याची तयारी केली आहे. शासनाकडे सादर झाल्यानंतर जवळपास २२६ कोटींचा निधी महापालिकेला तत्काळ अमृत योजनेतून मंजूर होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्यासह यंत्रणेच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

...

२६५ किमीच्या जलवाहिन्यांची होणार कामे

अमृतमधून निधी मंजूर झाल्यानंतर प्रथम शहरातील जुन्या पाइपलाइन बदलणे, नवीन वसाहतींमध्ये पाइपलाइन टाकणे आदी कामे केली जातील. पाणीपुरवठा योजनेत शहरातील नवीन वसाहतींमध्ये २६५ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. जलकुंभाचे पाणी वितरण क्षेत्र निश्‍चित करून पाण्याचा हिशेब लावण्यासाठी बल्कमीटर व व्हॉल्व्ह बसविले जातील. बारा बंगला, पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राचे आधुनिकीकरण तसेच शिवाजीनगर, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्राच्या क्षमतेत वाढ केली जाणार आहे.

....

अमृत योजनेतील कामे मंजूर रक्कम

जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे - ४२ कोटी ८४ लाख रुपये

नवीन वसाहतींमध्ये पाइपलाइन टाकणे - १०० कोटी रुपये

जुन्या पाइपलाइन बदलणे - ५६ कोटी ७९ लाख रुपये

बल्क मीटर, व्हॉल्व्ह बदलणे - २५ कोटी ४७ लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आषाढ अमावस्या तळीरामांना ‘बाधली’

$
0
0

तब्बल १०१ जण पोलिसांच्या सापडले तावडीत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आषाढ अमावस्येचा आनंद घेणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी तब्बल १०१ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. या सर्वांना पुढील कारवाईसाठी कोर्टात पाठवण्यात आले आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणांवर मद्यपी वाहनचालकांवर कारवाई होण्याचा हा उच्चांकच ठरू शकतो. पोलिसांनी बुधवारी (दि. ३१) रात्री १० वाजेनंतर ही मोहीम हाती घेतली होती.

या कारवाईत मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीतील तडीपार पोलिसांच्या हाती लागला तर, ९० टवाळखोरांवरही कारवाई करण्यात आली. आषाढ अमावस्येचे (गटारी) निमित्त साधत मद्यप्राशन आणि मांसाहाराला मोठ्या प्रमाणावर प्राधन्य दिले जाते. यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची तसेच गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजेपासूनच शहरातील वेगवेगळ्या प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी तर झोपडपट्टी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीतील विरेंद्र यशपाल शर्मा हा तडीपार असलेला व्यक्ती शहरातच वास्तव्यास असल्याचे पुढे आले. तळीरामांचा उपद्रव टाळण्यासाठी सायंकाळपासून सुरू केलेल्या नाकाबंदीत ३८० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात ८२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात १६ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. याबरोबरच चौकाचौकात टवाळखोरी करणाऱ्या ९० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. हॉटेल,लॉजिंग आणि ढाबे तपासणी, कोटपा अशा विविध कलमानुसार पोलिसांनी कारवाई केल्याने समाजकंटकांचे धाबे दणाणले. नांदूर नाका, सिन्नर फाटा, म्हसरूळ, राऊ हॉटेल, अंबड टी पॉईंट, पाथर्डी फाटा, संसरी नाका आदी महत्त्वपूर्ण चौकात ही कारवाई करण्यात आली.

..

अशी झाली कारवाई

३८० वाहनांची तपासणी

८२ चालकांना दंड

१६४०० रुपयांचा दंड वसूल

९० टवाळखोरींना पोलिसी दणका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रज्ञान जागराचा फिनटेकमधून संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशन (निटा)व महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने नाशिकच्या नेटविन इन्फोसोल्यूशन्स अंबड येथे फिनटेक यात्रा २०१९ आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील १९ शहरांमध्ये वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ५०० स्टार्टअपशी संपर्क साधून १० हजार किलोमीटर्सचा पल्ला गाठणारी ही यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा व राष्ट्रीय पेमेंटस् कारपोरेशनचा फिनटेक यात्रेचा सहभाग असतो. वित्तीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व प्रकारच्या स्टार्टअपशी संपर्क साधून त्यांना सहाय्य करत भांडवल व इतर गरजांसाठी ही यात्रा प्रयत्नशील आहे. या यात्रेचे नाशिकमध्ये गुरुवारी आगमन झाले.

यात्रेत विविध स्टार्टअपने सहभाग घेतला. यामध्ये विमानतळावरील साहित्य वाहतुकीसंदर्भात कार्यरत असलेल्या इंजिनियस पार्क टेक्नॉलॉजीचे संस्थापक विक्रम बोडके, ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या महाबंधन स्टार्टअपचे सुधीर गोराडे, प्रिझमिक रिफ्लेक्शन या अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या युजर एक्सपिरिअन्स डिझाईन स्टुडिओचे संचालक विशाल जाधव यांचा सहभाग होता.

तसेच वाहनांमार्फत डिजिटल जाहिरातींचे प्रदर्शन करणाऱ्या अॅप्लिकेशन स्क्वेअरचे योगेश आहेर, कृषी अॅग्रीटेक या शेतकऱ्यांना शेतीविषयक संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांशी जोडून त्यांचे मार्गदर्शन मिळवणाऱ्या कंपनीचे संस्थापक कृष्णा हांडगे, रुरल केरेव्हेनचे संस्थापक निकेश इंगळे, उपक्रमाचे समन्वयक म्हणून विनजीत टेक्नॉलॉजीचे निखिल देवरे व निटाचे विशाल जाधव यांनी देखील काम पाहिले. या उपक्रमासाठी 'निटा'चे पदाधिकारी अध्यक्ष अरविंद महापात्र, उपाध्यक्ष हृषिकेश वाकदकर, खजिनदार गिरीश पगारे, नदीम शेख, सुधीर गोराडे, विशाल जाधव आदींनी परिश्रम घेतले.

स्टार्टअपला मदत

अभिषांत पंत यांनी स्थापन केलेली फिनटेक यात्रा दरवर्षी १० हजार किलोमीटरचा प्रवास करते. या प्रवासात वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या स्टार्टअपची एक पूरक व्यवस्था भारतात तयार करू पहात आहे. यातच या स्टार्टअपचा प्रवास वेगाने करण्यासाठी त्यांचा सहयोग एनसीपीआय, फुलरटन, फिनाब्लर सारख्या सामुदायिक भागिदारांशी केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीचा ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ दिल्लीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा परिषदेची व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना जिल्ह्यात यशस्वी झाल्यास ती देशभर राबवू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यावेळी पंतप्रधानांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना जिल्हा परिषदेने तयार केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सामाजिक बांधिलकी (सीएसआर) या उपक्रमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून १०० शाळांमध्ये हा उपक्रम सुरुवातीला राबविला जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी झेडपीच्या अध्यक्षा सांगळे यांनी खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, उदय सांगळे यांच्यासमवेत पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत या उपक्रमाचे संगणकाद्वारे सादरीकरण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच नाशिक जिल्ह्याने याची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पद्धतीने व्हर्च्युअल क्लासरूमचा उपक्रम राबविण्याचे आश्वासन यावेळी दिले.

प्रकल्प तीन महिन्यांत

शहर व गाव यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूमचा प्रयोग नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. हा उपक्रम नाशिक जिल्ह्यात पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न असल्याचे शीतल सांगळे यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले.

--

अशी आहे संकल्पना

या उपक्रमासााठी चार कोटी रुपयांपर्यंतचा निधी सामाजिक बांधिलकी (सीएसआर) उपक्रमांतर्गत जमा करण्यात येणार आहे. यातून निवडलेल्या शाळांना व्हर्च्युअल क्लासरूमसाठी संगणक, एलईडी देण्यात येणार आहेत. नाशिकच्या केंद्रातून एकाच वेळी विविध तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त हवालदाराच्याबेपत्ता पत्नीचा शोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील सहा नंबर नाका परिसरातील मँग्नोलिया गार्डनमध्ये राहत असलेले निवृत्त लष्करी हवालदार सूर्यकांत गठडी (वय ४९) यांची पत्नी उमा गठडी (४५) बारा दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये २० जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिस सहकार्य करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी माहिती दिली, की संबंधित लष्करी हवालदार गठडी यांच्या पत्नीचा शोध घेण्यात आला असून, त्या पुणे येथे त्यांच्या नातेवाइकाच्या घरी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महिनाभर धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने घराबाहेर असलेले सूर्यकांत गठडी यांना न सांगता त्या गेल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनविरोधात मालेगावी आंदोलन अवैध भारनियमन विरोधात आवामी पार्टीचे आ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील रसूलपुरा भागातील रहिवाशांना वारंवार भारनियमनाचा सामना करावा लागत असल्याने हे भारनियमन बंद करावे तसेच या भागात वीजवितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या अवैध कामांची चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील अवामी पार्टीने शहरात मोर्चा काढला. अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांच्या नेतृत्वात शहरातील मोतीभवन या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. कार्यकारी अभियंता यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रसूलपुरा भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून येथील रहिवाशांना वारंवार भारानियमनाच्या अडचणींचा सामना करावा लागतो. या परिसरातील रहिवाशांना वीज वितरण कंपनीच्या कोणत्याही शासकीय योजनेचे लाभ मिळालेला नाही. उलट या परिसरात काही धनाढ्य लोकांनी कारखाने उभारले असून, कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी या कारखानादारांसाठी विजेचे रोहित्रे बसवून दिले असून अवैध कामे सुरू असल्याचा आरोप यावेळी रिजवान यांनी केला. याप्रकरणी चौकशी करावी दोषी असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व भारनियमन थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images