Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांद्या उत्पादकाच्या गांधीगिरीची चौकशी

$
0
0

मनीऑर्डरची पीएमओ कार्यालयाकडून दखल

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी २९ नोव्हेंबर रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात साडेसात क्विंटल कांदा विक्री केलेल्यानंतर हाती आलेल्या एक हजार ६४ रुपयांची मनीऑर्डर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविली होती. त्यांच्या या गांधीगिरीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. पीएमओ कार्यालयाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला संबंधित शेतकरी आणि एकूणच नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी संजय साठे यांची सोमवारी रात्री फोनवरून चौकशी केली.

राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण आहे. त्यामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होणार असल्याचे गृहीत धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी साडेसात क्विंटल कांदा लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार निफाड येथे विक्रीसाठी आणला त्याला. त्यांच्या कांद्याला दीड रुपया किलो असा भाव मिळाला होता. त्यातून उत्पादन खर्च तर दूर वाहतूक खर्चही वसूल होणार नसल्याने हताश झालेल्या साठे यांनी गांधीगिरी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कांद्या विक्रीतून आलेले एक हजार ६४ रुपये २९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नावे मनीऑर्डर केले. हताश शेतकऱ्याच्या या मनीऑर्डरने दिल्लीतील पीएमओ कार्यालयात देखील चर्चा सुरू झाली. त्यानंतर दिल्लीहून तातडीने संबंधित शेतकऱ्याची चौकशी करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सोमवारी रात्री उशिरा साठे यांची कांद्याला मिळालेल्या बाजार भावाची चौकशी केली. साठे यांच्यामागे काही राजकीय पाठिंबा आहे का याची खात्री करण्यासाठी नैताळे येथील माजी सरपंच व पत्रकारांकडून साठे यांची चौकशी करण्यात आली.

'उन्हाळ कांदा' पडलेलाच

मंगळवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात कोणतीही सुधारणा झालेली नाही. कमीत कमी १५१, जास्तीत जास्त ६११ तर सरासरी ३५० रुपये असा भाव मिळाला. लाल कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नाही. कमीत कमी ४००, जास्तीत जास्त १२९२ व सरासरी ९२५ रु भाव मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी प्रॅक्टिसवर दंडाचा ‘उपचार’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सेवेत कार्यरत असतानाही खासगी प्रॅक्टिस करणारे पालिका सेवेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांना प्रभारी आयुक्तांनी दणका देत, त्यांच्याकडून २ लाख ३९ हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. बिटको रुग्णालयात कार्यरत असतानाही डॉ. फुलकर हे खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचा आरोप नगरसेवक मुशीर सैय्यद यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर विभागीय चौकशीत डॉ. फुलकर दोषी आढळून आले.

डॉ. फुलकर हे सध्या कथडा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असून, त्याअगोदर बिटको रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. बिटको रुग्णालयात कार्यरत असतानाही, ते खासगी प्रॅक्टिस करीत असल्याची तक्रार स्थायी समितीत मुशीर सैय्यद यांनी केली होती. सैय्यद यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांनी त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर डॉ. फुलकर यांची विभागीय चौकशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून, सैय्यद यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेच्या सेवेत कार्यरत असतानाही, त्यांनी खासगी प्रॅक्टिस केली म्हणून त्यांच्याकडून दोन लाख ३९ हजारांचा दंड वसूल करण्याची शिफारस चौकशी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यासंदर्भातील कारवाईची फाइल आयुक्त कार्यालयाकडेही पाठवण्यात आली होती. दरम्यानच्या काळात तुकाराम मुंढे यांची बदली झाली. त्यामुळे फुलकरांवरील कारवाईला उशीर झाला. परंतु, मंगळवारी प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी डॉ. फुलकर यांच्यावरील दंडात्मक कारवाईच्या फाइलवर सही केली. त्यामुळे फुलकर यांच्याकडून आता दोन लाख ३९ हजारांची वसुली होणार आहे.

अन्य डॉक्टरांना चाप

महापालिका तसेच सरकारच्या सेवेत कार्यरत राहून अनेक डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचे चित्र आहे. जिल्हा रुग्णालय व मनपाच्या रुग्णालयातील डॉक्टर सर्रास प्रॅक्टिस करीत असतानाही, त्यांच्यावर कारवाई होत नसे. परंतु, सैय्यद यांच्या तक्रारीनंतर डॉ. फुलकर यांच्यावर झालेली कारवाई ही अन्य डॉक्टरांसाठी धडा ठरणार आहे. निदान या कारवाईनंतर तरी मनपा रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर पूर्णवेळ पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा देतील, अशी अपेक्षा नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचव्या मजल्यावरून पडून महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने वॉचमन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकरोडच्या आशीर्वाद बस स्टॉपसमोरील इमारतीत घडली. उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आशीर्वाद बस स्टॉपसमोर निर्माणाधिन सोसायटी आहे. या सोसायटीत काम करणारी गोपाळ कांबळे (३६, रा. आशीर्वाद बस स्टॉप) ही महिला इमारतीला पाणी मारत होती. पाचव्या मजल्यावर पाणी मारत असताना नळीला पीळ बसला होता. हे तिच्या लक्षात आले नाही. तिने जोरात नळी ओढल्याने तिचा तोल गेला. पाचव्या मजल्यावरून ती खाली कोसळली. नागरिकांनी त्वरित तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. परिसरातील अलिकडची अशी दुसरी घटना आहे. जयभवानीरोडला दिवाळीच्या आधी साफसफाई करताना एक महिला तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

$
0
0

मालेगाव : दहिदी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मंगळवारी एक शेतमजूर जखमी झाला. समाधान कचवे यांच्या शेतात काम करणाऱ्या लक्ष्मण धनाजी सोनवणे (वय २५) असे जखमी झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. दुपारी लक्ष्मण काम करीत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तहसीलदार ज्योती देवरे यांनी पिंजरा लावण्याच्या सूचना केल्यानंतर वनविभागाने दहिदी परिसरात पिंजरा लावला आहे.

...

तिघांना अटक

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटण्याच्या इराद्याने त्यांना जादूचे प्रयोग वा वेगवेगळ्या क्लृप्त्या दाखवून गुंगवून ठेवणाऱ्या तिघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने मंगळवारी सकाळी रंगेहाथ अटक केली. तिघांची कसून चौकशी केली असता, हा सर्व लुटीचा व बनवाबनवीचा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी अयूब हसन मदारी, अफजल नवाब मदारी, जाकीर नवाब मदारी (रा. लक्कडकोट, ता. येवला) या तिघांना अटक केली आहे.

...

अनोळखी बॅग सापडली

मनमाड : पुणे-भुसावळ एक्स्प्रेसमध्ये अनोळखी बॅग सापडली होती. मनमाड रेल्वे पोलिसांनी बॅगमालकाचा शोध घेऊन त्यास परत केली. ही बॅग के. एम. मेमाणे (कोची) यांची असून, ती याच एक्स्प्रेसमधून पुणे ते पनवेल प्रवासात हरवली असल्याचे तपासात समोर आले. रोख रक्कम, मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे या बॅगमध्ये आढळून आली.

....

सिन्नरला घरफोडी

सिन्नर : शहरातील शिवाजीनगर भागातील जय मल्हार कॉलनीत राहत असलेल्या अलका माधव भोईर (वय ३९) यांच्या राहत्या घरात १ ते ३ डिसेंबर दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. त्यात नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र व १२ हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही असा एकूण २१ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याबाबत अलका भोईर यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

..

स्कॉर्पिओतून रक्कम लंपास

सिन्नर : स्कॉर्पिओची काच फोडून अज्ञात चोरट्याने साडेतीन लाखांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी घडली. शिवडा येथील व्यापारी प्रभाकर तुकाराम हारक यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास सिन्नर शहरातील बँकेतून साडेतीन लाखांची रक्कम काढून ती स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवली. त्यानंतर ते कारसह शासकीय विश्रामगृहाजवळील अपना गॅरेज वाहनांचे पार्ट घेण्यासाठी गेले. कारमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून पैशांची बॅग लंपास केली. याबाबत त्यांनी सिन्नर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात उद्या दुष्काळ पाहणी

$
0
0

केंद्रीय पथक मेहुणे गावाला देणार भेट

...

नाशिकची स्थिती

- चार तालुक्यांत गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ

- १७ महसुली मंडळांतही दुष्काळी जाहीर

- १०१ टँकर ३७६ गाव-वाड्यांची भागवताहेत तहान

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक बुधवार (दि. ५) पासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. गुरुवारी (दि. ६) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबा आणि मेहुणे या दोन गावांना हे पथक भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर मुंबईत बैठक घेऊन केंद्र सरकारला अहवाल सोपविणार आहे. केंद्रीय पथक पाहणीसाठी येत असल्याने भरीव मदतीद्वारे दुष्काळी परिस्थितीवर फुंकर घातली जाईल, अशा आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवीत झाल्या आहेत.

राज्यात बहुतांश भागात सरासरीहूनही कमी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांना दुष्काळी जाहीर केले आहे. राज्यात ११२ तालुक्यांमध्ये गंभीर, तर ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी ४ तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याखेरीज १७ महसुली मंडळांतही दुष्काळी जाहीर केली आहेत. पाणीटंचाईवर प्रशासनाने टँकरचा उतारा शोधला असून, १०१ टँकर ३७६ गाव-वाड्यांची तहान भागवित आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे. तेथील जळगाव निंबा आणि मेहुणे गावातील पीक परिस्थितीची, भूजल पातळीची पाहणी हे पथक करणार आहे. गुरुवारी दुपारी साडेतीन ते सव्वापाच या कालावधीत ही पाहणी होणार असून, त्यानंतर हे पथक नाशिकच्या सरकारी विश्रामगृहात मुक्कामासाठी येणार आहे. या पथकामध्ये आर. डी. देशपांडे, ए. के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना आणि छावी झा यांचा समावेश आहे. हे पथक ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल सादर करेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शेतकरी पत्नीला मिळणार विम्याची रक्कम

$
0
0

दोन लाखांची भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपघात झाला त्यावेळी चूक नव्हती. मग, वाहन परवाना होता की नव्हता किंवा परवान्याची मुदत संपली अशी तांत्रिक कारणे पुढे करून विमा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हा ग्राहक मंचाने तक्रारदास व्याजासह दोन लाख रुपये अदा करण्याचे आदेश इन्शूरन्स कंपनीला दिले.

या प्रकरणी ग्राहक मंचात मागील वर्षापासून सुनावणी सुरू होती. नांदगाव येथे राहणाऱ्या त्र्यंबक गोसावी (वय ४५) या शेतकऱ्याचा १ मे २०१६ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या दुचाकीस दुसऱ्या एक वाहनाने धडक दिल्याने गोसावी यांचा मृत्यू झाला होता. त्या दरम्यान सरकारने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंढे अपघात विमा काढला होता. या विम्यास गोसावी पात्र असल्याने गोसावी यांच्या पत्नी सुनीता यांनी संबंधित नॅशनल इन्शूरन्स कंपनीकडे मोबादला मागितला. मात्र, गोसावी यांच्या लायसन्सची मुदत संपल्याचे कारण पुढे करीत कंपनीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सुनीता गोसावी यांनी अॅड. हार्दिक देसाई यांच्यावतीने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. यात देसाई यांनी हायकोर्ट आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगात झालेल्या आदेशांची कारणमीमांसा केली. एखादा व्यक्ती परवाना नसताना किंवा परवान्याची मुदत संपली असताना वाहन चालिवताना अपघात झाला आणि त्यात या व्यक्तीची कोणतीही चूक नसले तर त्यास दोषी ठरविण्याचा वा त्याची मदत नाकरण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अॅड. देसाई यांनी स्पष्ट केले. या युक्तिवादानुसार ग्राहक मंचाने गोसावी कुटुंबास दोन लाख रुपये आणि दावा दाखल झाल्यापासून त्यावरील व्याज तसेच खर्चापोटी १२ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाश्वताकडे नेणारे ‘अखेरचं बेट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हिंसा, शह, सत्तासंघर्ष, एकमेकांच्या संस्कृतीवर होणारे हल्ले, स्वार्थापोटी निसर्गाची केलेली अपरिमित हानी, अतिरेकी धर्मांधता, जगावर राज्य करण्याची पिपासू इच्छाशक्ती, त्यातूनच जन्मणारा उन्माद यामुळे संपूर्ण मानवजात तिच्या विनाशाकडे चालली आहे. कुठे निसर्गाचा कोप होऊन महाप्रलय आलाय, कुठे धार्मिक हिंसाचार झालाय तर कुठे बंडखोरी त्यामुळे एकमेव असे सुंद्रज बेट उरले आहे, हे अखेरचं बेट आहे. असा अशय घेऊन आलेले नाटक मंगळवारी सादर झाले.

राज्य नाट्य स्पर्धेत विजय शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था प्रस्तूत, सक्षम क्रिएशन्स निर्मित दोन अंकी प्रायोगिक नाटक अखेरचं बेट सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही नाट्यस्पर्धा सुरू आहे. सुंद्रज बेटावर अनादी काळापासून विवेकी, नीतिमान सत्ता करणारी म्हातारी असून, तिला आदि-अंत नाही. ती निसर्गाचे एक रूप आहे. महाप्रलयानंतर हे बेट उद्ध्वस्त झाले. परंतु, तरीही या बेटावर राज्य करण्यासाठी उत्सुक असलेला आतंकी बंडखोर डारोबा आणि म्हातारी दोघेच जीवंत आहेत. दोघांमध्ये संघर्ष उडून म्हातारी डारोबाला कुत्रा बनवते. त्याचवेळी बेटावर एक गर्भवती मृगजा व म्हातारा आपले प्राण वाचविण्यासाठी येतात. म्हातारी त्यांना आधार देते. पुढे या मृगजाचे डारोबावर प्रेम जडते, ती त्याला सांगते की या म्हाताऱ्याने तिचे अपहरण करून आणले आहे. त्याच्या लक्षात येते की हा म्हातारा बंडखोर सेनापती कुर्यासूर आहे, त्यामुळे तो जास्त घाबरतो. परंतु, म्हातारीला हरविण्यासाठी ते दोघे एकत्र येतात. मृगजा त्याची पत्नी आहे हे डारोबाच्या लक्षात येते. कुर्यासूर म्हातारीचा काटा काढतो, त्यामुळे डारोबा माणूस होतो. घाबरून कुर्यासूर त्याला पुन्हा कुत्रा बनवतो. याचवेळी मृगजा मागून हल्ला करीत कुर्यासूराचा खातमा करते. आता मृगजामध्ये म्हातारीचा संचार झालेला असतो कारण ती शाश्वत असते. पुढे मृगजा अनेक आदिवासींचा जीव वाचवते आणि हे अखेरचे बेट सुंदर, समृध्द करते.

नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सुधीर कुलकर्णी यांचे होते. नेपथ्य सुयोग देशपांडे, प्रकाशयोजना बाळकृष्ण तिडके, संगीत दिग्दर्शन केदार रत्नपारखी, वेशभूषा मोनाली ठाकूर, भाग्यश्री पाटील, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात समीक्षा कुलकर्णी, प्रतिभा वाघ, गौरव वाघ, सानिका गांगुर्डे, सविता जोशी, गुणवंत वाघ, प्रतीक विसपुते, तेजस्विनी गायकवाड, कृतार्थ कन्सारा, अजय तारगे, भैरवी कुलकर्णी यांनी भूमिका केल्या.

---

आजचे नाटक

विसर्जन

विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च सेंटर

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराच्या धडकेत पोलिस जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. यात शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक चारचे पोलिस कर्मचारी वैभव शिंदे (३४) हे जखमी झाल्याची घटना नाशिकरोड येथे सोमवारी सायंकाळी घडली. शिंदे यांनी दुचाकीस्वार ज्ञानेश्वर गोविंद गवळी (रा. टाकळीगाव) याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सोमवारी सायंकाळी पोलिस शिपाई नेहमीप्रमाणे नाशिकरोड पोलिस स्टेशनसमोर उड्डाणपुलाखाली हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांसह काळ्या रंगाच्या (फिल्म) काचा असणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर गोविंद गवळी हा दुचाकीस्वार त्याच्याकडील होंडा शाइन या दुचाकीवरुन (एमएच १५, डीव्ही ७९५४) भरधाव वेगाने बिटको चौकाकडून शिवाजी पुतळ्याच्या दिशेने जात होता. त्याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते, म्हणून पोलिस शिपाई वैभव शिंदे यांनी त्यास थांबण्याचा इशारा केला. परंतु, दुचाकीस्वार गवळी याने शिंदे यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात शिंदे यांना धडक दुचाकीची धडक बसली. यात शिंदे यांच्यासह दुचाकीस्वार ज्ञानेश्वर गवळी व त्याचा मित्र असे तिघेही खाली पडले. शिंदे यांच्या दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ येथील जयराम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिस्त, समन्वयाचे आव्हान

$
0
0

गमे गुरुवारी स्वीकारणार आयुक्तपदाची सूत्रे

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकप्रतिनिधींशी समन्वय न राखल्यानेच अवघ्या नऊ महिन्यांत तुकाराम मुंढेंची बदली झाली. यामुळे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर भाजपच्या लोकप्रतिनिधींसोबत समन्वय साधून विकास करावा लागणार आहे. मुंढेंनी लावलेली प्रशासकीय शिस्त कायम ठेवण्यासह स्मार्ट सिटीचा रुतलेला गाडा पुढे नेण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. भाजपलाही गमेंसोबत समन्वय साधून शहर विकासाचा गाडा पुढे न्यावा लागणार आहे.

महापालिकेच्या आयुक्तपदावरून २२ नोव्हेंबर रोजी तुकाराम मुंढेंची तडकाफडकी बदली झाली होती. मुंढेंच्या रिक्त जागेवर राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. परंतु, मुंढेंच्या बदलीच्या दिवशी गमेंच्या नियुक्तीचे आदेश निघाले नव्हते. त्यामुळे आयुक्तपदी कोण याची चर्चा सुरू झाली होती. अश्विनी जोशी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच मुंढे समर्थकांनी मुंढेंची बदली रद्द व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू करीत मोर्चाही काढला होता. त्यामुळे सरकारचीच कोंडी झाली होती. परंतु, गमे यांच्याकडे निवडणूक आयोगाशी संबंधित काम असल्याने तसेच, विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने त्यांच्या बदलीचे आदेश थांबल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. अधिवेशन आटोपून चार दिवस उलटले तरी गमेंचे आदेश निघाले नसल्याने पुन्हा चर्चांना ऊत आला होता. अखेर मंगळवारी राज्य सरकारने गमेंच्या बदलीचे आदेश काढत उस्मानाबादवरून नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती केली.

..

बारा दिवसांनंतर मिळाले आयुक्त

बारा दिवसांनंतर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाला आहे. गमे हे बुधवारी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार सोडणार असून, गुरुवारी मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार घेण्याची शक्यता आहे. दीपा मुधोळ मुंढे यांची उस्मानबादच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मुधोळ-मुंढे यांच्याकडे पदभार द्यायचा की अन्य अधिकाऱ्यांकडे याबाबत औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांशी चर्चा करून पदभारासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे गमेंनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

...

उस्मानाबादमध्ये धडाकेबाज कामगिरी

नंदुरबारप्रमाणेच गमे यांनी उस्मानाबादमध्येही धडाकेबाज कामगिरी केली. उस्मानाबादच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शिर्डीच्या धर्तीवर अॅक्सेस कार्डद्वारे दर्शन घेण्याचा नियम गमे यांनी लागू केला. त्यानंतर व्हीआयपी दर्शन बंद करून भाविकांना सशुल्क दर्शनाची ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेत त्याची अंमलबजावणी केली. स्वत:च्या कुटुंबालाही व्हीआयपी दर्शनाचा लाभ न देता सशुल्क दर्शनाची शिस्त त्यांनी घालून दिली. कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसंधारणाची कामे त्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतली. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी गमेंनी पुढाकार घेतल्याने ते अल्पावधीत लोकप्रिय ठरले होते. कुठल्याही फाइल्स पेंडिंग न ठेवणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य असून, प्रसिद्धीपासून ते नेहमीच दूर राहिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी नेत्यांचा एल्गार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही राज्यातील आदिवासींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असून, बोगस आदिवासींना संरक्षण दिले जात आहे. त्यातच धनगर आरक्षणावरून आदिवासींची कोडी करण्यात येत असल्याने राज्यातील आदिवासींनी आता सरकाविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण करणार आहेत. आदिवासी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विचारविनिमय करून पुढील धोरण ठरविण्यासाठी त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची गुरुवारी (दि. ६) नाशिकमध्ये बैठक बोलावली आहे.

राज्यात आदिवासींची हेळसांड सुरू असून, आदिवासी विभाग निष्क्रिय झाला आहे. धनगर आरक्षणावरून आदिवासींचीच कोंडी केली जात आहे. भाजपकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असतानाही सरकारकडूनच आदिवासींवर अन्याय केला जात आहे. आदिवासी विभागाकडून राज्यातील आश्रमशाळांसह आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविले जात नाहीत. आदिवासी विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डाच बनला आहे. त्यामुळे एकूणच भाजपने आदिवासी समाजाची फसवणूक केल्याची भावना आदिवासींमध्ये आहे. त्यामुळे राज्यातील आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी राज्यातील सर्व आदिवासी नेत्यांची बैठक चव्हाणांनी बोलावली आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही सरकारी नोकरीतील बोगस आदिवासी हटविले जात नसल्याचा मुद्दा, धनगर आरक्षण, आदिवासी युवकांचे प्रश्न, आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न यासह आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीस माजीमंत्री मधुकर पिचड, माजीमंत्री पद्माकर वळवी यांच्यासह आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, आदिवासी विकास महामंडळ संचालक, तसेच अहमदनगर, नंदुरबार, नाशिक, ठाणे, नवापूर, नागपूर जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रमुख आदिवासी नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीकडे राज्यातील आदिवासी बांधवांसह प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे.

..

चव्हाण भाजपवर नाराज

भाजपचे खासदार असतानाही चव्हाण यांनी अनेक वेळा आदिवासी विभागाच्या कामकाजावर टीका केली आहे. त्यामुळे चव्हाण भाजपवरच नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव आणण्यासाठी चव्हाण यांनी थेट राज्यातील आदिवासींचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. चव्हाण हे तीनवेळा भाजपचे खासदार राहिले असतानाही त्यांच्याकडे भाजपने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून ते भाजपवगळता अन्य पक्षांशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात मालेगावच्या व्यापाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

ताहाराबाद रस्त्यावर वीरगावजवळ कार चालकाचा ताबा सुटून कार झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील व्यापारी संजय रमणभाई आमीन (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. मालेगाव येथे वास्तव्यास असलेले व मूळचे गुजरातचे आमीन कुटुंबीय गुजरातमधील एका नातलगाच्या साखरपुड्याला गेले होते. गुजरातहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या त्यांच्या होंडा सिटी कार अपघात झाल. कार चालकाला पहाटे डुलकी आल्याने वीरगाव परिसरात कार झाडावर आदळली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात कारमध्ये बसलेले संजय आमीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ध्रुव आमीन (वय १५) आणि वडील रमनभाई अमीन (वय ७०), चालक पार्थ आमीन हे किरकोळ जखमी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर परिषद, ठेकेदाराची माघार

$
0
0

त्र्यंबकमधील सफाई कर्मचाऱ्यांना घेतले कामावर

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेने कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामागारांना १५ पैकी १० कामागारांना ठेकेदाराने ताबडतोब आणि उर्वरित ५ महिला कामगार एक जानेवारी २०१९ पासून कामावर घेणार असे आश्वासन दिल्यामुळे रविवारपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आले.

रविवारी सकाळी उपोषण सुरू झाले होते. मंगळवारी पहाटे चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे पोलिसांनी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे त्र्यंबकेश्वर नगरपालिका कार्यालयात हजर झाल्या. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, सर्व सभापती, नगरसेवक, सफाईचा ठेका घेतलेले ठेकेदार यांच्याशी चर्चा झाली. सकाळी सुरू झालेली चर्चा दुपारपर्यंत सुरू होती. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या शिष्टाईला अखेर यश आले. त्यानंतर दहा कामगारांना कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर सेविका त्रिवेणी तुंगार-सोनवणे यांनी कामगारांची पीएफ रक्कम मिळवून देण्याचे अश्वासन दिले. भाजप शहराध्यक्ष नगरसेवक शामराव गंगापुत्र यांनी कामगारांना विमा संरक्षण देण्यासाठी स्वत: खर्च करणार असल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साल्हेरजवळ आढळल्या शिवकालीन स्मृतीशिळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावरील इनामदार आळीतील बुरुजाजवळ शिवकालीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना गर्द झाडीत मराठा धाटणीची ही स्मृतीशिळा सापडली. सूरत लुटीनंतर साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी असलेले छत्रपती शिवाजी महाराज व साल्हेरच्या ऐतिहासिक लढाईच्या इतिहासाला या स्मृतीशिळेच्या माध्यमातून उजाळा मिळणार आहे.

बागलाण तालुक्यात तब्बल सोळा किल्ले असून गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल व दुरूस्तीअभावी या किल्ल्यांची वाताहत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या येथील दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून गेल्या ४ वर्षांपासून साल्हेर व मुल्हेर या गडकोटांवर स्वच्छता करून संवर्धनाचे काम सुरू आहे. सध्या साल्हेर गडाच्या पायथ्याशी असलेल्या चंदनबारीवरील केशरबागेत अनेक प्राचीन मंदिरे भग्न अवस्थेत आहेत. मंगळवारी किल्ल्याखालील प्राचीन गावात इनामदार आळीतील बुरुजाची स्वच्छता करण्यासाठी जात असताना दुर्गविरांना गर्द झाडीत मराठा धाटणीची ही स्मृतीशिळा सापडली. मात्र काटेरी झाडे झुडुपांमुळे त्यापर्यंत पोहोचणे अवघड होते. त्या जागेपर्यंत जाण्याचा मार्ग बनविल्यानंतर जमिनीत अर्धवट गाडलेले घरांचे जोते दिसले. दुर्गवीरांनी ही जागा स्वच्छ करताच त्यांना एका पाठोपाठ तीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले. या मोहिमेत दुर्गवीर प्रतिष्ठानचे हेमंत सोनवणे, प्रवीण खैरनार, रोहित जाधव, किशोर झोपळे, सुमीत साबळे, उत्तम झोपळे यांच्यासह साल्हेर भटकंतीस आलेले नाशिक येथील युवक-युवती सहभागी होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांचा ‘जनआक्रोश'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

'पिण्याला पाणी, जनावरांना चारा मिळालाच पाहिजे', 'हाताला काम, बचत गटांना कर्ज मिळालेच पाहिजे', आदी जोरदार घोषणा देत येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त उत्तरपूर्व भागातील शेकडो महिलांनी मंगळवारी दुपारी येवला तहसीलसमोर विविध मागण्यांसाठी 'जनआक्रोश' केला.

शहरातील विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भाऊसाहेब गरुड, सुनीता बोठे, शोभा जाधव, संजय पगारे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.

येवला तहसीलबाहेर मोर्चातील महिलांनी विविध मागण्यांस्तव जोरदार घोषणाबाजी करत जवळपास पाऊण तास ठिय्या दिला. यावेळी भाऊसाहेब गरुड, संजय पगारे, प्रभाकर गायकवाड, शोभा सोनवणे, बाळासाहेब कसबे, सुनीता बोठे यांच्यासह शिवसेनेच्या नगरसूल गटातील जिल्हा परिषद सदस्या सविता पवार यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूंची माहिती न दिल्याने दोघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भाडेकरूंची माहिती न दिल्याबद्दल देवळाली कॅम्प पोलिसांनी सह्याद्रीनगर व संसरी येथील दोन घरमालकांवर कारवाई केली आहे. पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ गावले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांनी सांगितले की, प्रत्येक घरमालकाने त्यांच्याकडे असणारे भाडेकरू यांची माहिती पोलिस स्टेशनला देणे बंधनकारक आहे. पोलिस आयुक्तांनी देवळाली हद्दीतील घरांना भेटी देऊन तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव, हवालदार मेहबूब सैय्यद, कॉन्स्टेबल सचिन गावले आदींनी घरमालकांकडे भेट देऊन माहिती घेतली असता सह्याद्रीनगर येथील इम्रान अन्सारी व संसरी येथील प्रदीप गोडसे यांनी देवळाली कॅम्प पोलिसांकडे त्यांच्या घरातील भाडेकरूंची माहिती सादर न केल्याने कारवाई केली. नाशिकरोड कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास कोर्टाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते.

'टेनंट अॅप' वापराबाबत उदासीनता

भाडेकरूंची माहिती देण्यासाठी पोलिसांनी 'टेनंट अॅप' सुरू केले आहे. मात्र, याबाबतीत देवळालीकर उदासीन आहेत. यात अग्रेसर नाशिकरोड परिसर असून देवळालीमध्ये अवघ्या तीन जणांनी या अॅपद्वारे माहिती सादर केली आहे. त्यानंतर आडगाव, अंबड, इंदिरानगर, सातपूर आणि म्हसरूळ या पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांची संख्या तुलनेत चांगली आहे. देवळाली परिसरात विविध बंगले व फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर भाडेकरू आहेत. घरमालकांनी कारवाई टाळण्यासाठी भाडेकरूंची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गैरहजर राहिल्याने अधिकारी निलंबित

$
0
0

धुळ्यात निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापालिकेसह सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. सुमारे पाच हजारांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राबता आहे. संबंधितांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत. मात्र, या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यामुळे साक्री पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे. बी. पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काढले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीतील मतदान, मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत रविवार दि. २ डिसेंबरला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग झाला. या प्रशिक्षणाला गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. साक्री पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे. बी. पवार (कृषी) यांची एका मतदान केंद्रावर मतदार अधिकारी म्हणून नियुक्ती असतांनाही ते प्रशिक्षणाला गैरहजर राहिले. त्यांनी निवडणूक कामी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले असून, कामात हलगर्जीपणा केला आहे. ही बाब कार्यालयीन शिस्तीविरुद्ध व निवडणुकीच्या कामाच्या कर्तव्यात कसूर करणारी आहे, असा ठपका ठेवून जे. बी. पवार यांना सेवेतून निलंबित करीत असल्याचे आयुक्त देशमुख यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी दि. १ डिसेंबरपासून करण्यात यावी व त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावल-मलिकांचे एकमेकांवर आरोप

$
0
0

धुळे महापालिका निवडणुकीत रंगत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुंबई शॉप फेस्टिव्हलचे टेंडर एक वर्षाचे असताना ऐनवेळी पाच वर्षाचे करण्यात आले. त्यात सरकारचे २० कोटींचे नुकसान झाले. आशुतोष राठोड या अधिकाऱ्याच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला असून, सचिव गौतम यांनी संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून सूचित केले आहे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लुटमार केली जात आहे. यामुळेच मंत्री जयकुमार रावल यांच्या काळात पर्यटन विभागाच्या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी धुळ्यात केला. या वेळी ईशादभाई जहागिरदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मलिक म्हणाले की, भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा आणि त्या पैशातून सत्ता मिळवायची, असा एक कलमी कार्यक्रम भाजपचा आहे. वाल्याचा वाल्मीकी करण्याची ताकद भाजपात असल्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणतात. त्यामुळेच मुंबईतल्या गँग भाजपासाठी काम करीत आहेत, असा टोलाही मलिक यांनी लगावला. भाजपने महाजन, भामरे आणि रावल या मंत्र्यांकडे निवडणुकीची धुरा सोपविली आहे. मात्र, हे मंत्री भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करीत आहेत. यासंदर्भात आमच्या पक्षाने निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे तक्रार केली असून, पोलिस अधिकारी हेमंत पाटील यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशीही मागणी मलिक यांनी केली.

विकासाचा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते हैराण

राष्ट्रवादी काँग्रेसने मागील काळात कोणतेही विकासाचे काम केले नाही, विकासाचा मुद्दा नसल्याने नवाब मलिक व राष्ट्रवादीचे नेते हैराण झाले असल्याने असे हास्यास्पद आरोप करीत आहेत. नवाब मलिक यांचा दोंडाईचा येथील कार्यकर्त्यांचा अद्ययावत मशिनरीयुक्त कत्तलखाना भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही बंद केला. त्यामुळे त्यांचा त्रागा झाला असल्याचा टोला राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे. दोंडाईचा येथील कत्तलखाना नवाब मलिक हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालवत होते. दररोज १०० जनावरांची याठिकाणी कत्तल केली जात होती. त्यामुळे पालिकेवर आमची सत्ता येताच तत्काळ हा कत्तलखाना बंद करण्याबाबतचा ठराव केला, असे मंत्री रावल म्हणाले. कोर्टातदेखील आम्ही लढलो असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून कत्तलखान्यात एकाही जनावराची कत्तल झाली नाही. त्यांनी हायकोर्टात जाऊन आता ‘स्टे’ घेतला आहे. त्यामुळे मलिकांचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे, असे मंत्री जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केळझरच्या आवर्तनाने रब्बीला जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

केळझर (गोपाळसागर) धरणातून आरम नदी पात्रात बुधवारी (दि. ५) रब्बी हंगामासाठी पाण्याचे पाहिले आवर्तन सोडण्यात आल्याने आरम खोऱ्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

रब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बुधवारी सकाळी धरणातून १७० क्यूसेकच्या प्रवाहाने आरम नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणावर पश्चिम भागातील ३८ गावांसह सटाणा शहराचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते. रब्बी हंगामात सुमारे दोन हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा आदी पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. आरम नदिपात्रात पाणी आवर्तन सोडल्यामुळे नादीकाठावरील पाणीपुरवठाच्या विहिरींनाही फायदा होतो या पाणी आवर्तनामुळे रबी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार असून, दुसरे आवर्तन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शेतीसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या आवर्तनातून साधारण अंदाजे दीडशे दलघफू पाणी सोडले जाणार आहे. उर्वरित शेवटचे अणि तिसरे आवर्तन १५ मे च्या दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्यासाठी सटाणा शहर व परिसारातील गावांच्या मागन्यानुसार सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता एस. एस. पाटील, आर. आर. निकुंभ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुकणे’च्या पाण्याची प्रतीक्षाच!

$
0
0

'हेडवर्क'चे काम लांबणीवर; मार्चमध्ये लागणार मुहूर्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक कारणामुळे लांबणीवर पडल्याने या पाण्यासाठी नाशिककरांना आता मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुकणे पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असले तरी धरणातील पंपिंग स्टेशनच्या 'हेडवर्क'चे काम अपूर्ण आहे. 'हेडवर्क'सह यंत्रसामुग्री बसवण्यासाठी कीमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुकणेचे पाणी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची चिन्हे आहेत.

शहराला सध्या गंगापूर धरण व काही प्रमाणात दारणा नदीपात्रावरील चेहेडी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. परंतु, या दोन्ही ठिकाणांहून पाणीपुरवठा होत असला तरी अनेक भागांत असमान पाणीपुरवठा होवून पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पाणीटंचाई सोडविण्यासह शहराची २०४१ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या वाढ लक्षात घेता पालिकेने नियोजन करीत मुकणे पाणीपुरवठा योजना तयार केली होती. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत २६० कोटींची मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, धरणात पंपिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित १० टक्के काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणीपुरवठ्याची चाचणी व जलसंपदासमवेतचा पाणी उचलण्याचा करार होईल. त्यानंतरच प्रत्यक्ष मुकणे योजनेचे पाणी नाशिककरांना पिण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. पहिल्या टप्प्यात १३७ दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे नियोजन असून, टप्प्याटप्प्याने ४०० दशलक्ष लिटरपर्यंत क्षमतावाढ केली जाणार आहे.

जलपातळीचा अडसर

मुकणे धरणातून थेट १८ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकत विल्होळी जकात नाक्यापर्यंत हे पाणी आणण्यात येणार आहे. विल्होळी येथे जलशुद्दीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, येथून पाण्याचे वितरण होणार आहे. जानेवारी २०१६ मध्ये हे काम सुरू होवून या कामाची मुदत जुलै २०१८ पर्यंतच होती. मात्र, दर पावसाळ्यात वाढणारी धरणातील जलपातळी पंपिंग स्टेशनच्या हेडवर्कच्या कामात अडथळा ठरत असल्याने हे काम लांबले. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, आता जानेवारी २०१९ पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणजी सामन्यासाठी तीन खेळपट्ट्या

$
0
0

बीसीसीआयचे पथक येणार पाहणीसाठी

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्यासाठी लागणाऱ्या खेळपट्टीचे काम सुरू झाले आहे. नाशिकचे तज्ज्ञ रतन कुयटे यांच्या मागर्दशनाखाली तीन खेळपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे.

बीसीसीआयच्या वतीने महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या पाच सामन्यांपैकी एक सामना नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार असून, त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

१४ ते १७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सामन्यासाठी अद्यावत अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन खेळपट्टी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या तयार झाल्यानंतर ८ डिसेंबर रोजी बीसीसीआयच्या तज्ज्ञांचे पथक पाहणी करणार असून त्यानंतर त्यातून एका खेळपट्टीच्या सामन्यासाठी निवड केली जाणार आहे. या रणजी सामन्यासाठी बीसीसीआयचे पश्चिम विभागाचे ग्राउंड क्युरेटर रमेश म्हामूनकर यांनी शनिवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची पाहणी केली. त्यांनी मैदानाच्या हिरवळीवर समाधान व्यक्त केले तसेच खेळपट्टी चांगली असून, सामन्याच्या तयारीसाठी योग्य सूचना केल्या. तसेच सामन्यासाठी आवश्यक साधनसामुग्री, रोलर्स, ग्रास कटिंग मशिन व इतर साहित्याबाबत माहिती घेतली. त्याचप्रमाणे खेळाडूंची ड्रेसिंग रूम व इतर व्यवस्था यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे रणजी सामन्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आवश्यक सूचना केल्या. रमेश म्हमूनकर हे ८ डिसेंबर रोजी येणार असून, पुन्हा येथील कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. जोपर्यंत सामने होत नाहीत तोपर्यंत हे पथक येथेच तळ ठोकून राहणार आहे. यासाठी खेळाडूंसाठी व प्रेक्षकांना बसण्यासाठी मंडप उभारणी काम सुरू करण्यात आले असून, जिल्हाधिकारी तथा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राधाकृष्णन बी. यांनी मैदानाची तयारी, दोन्ही संघाचे राहण्याची व्यवस्था, भारतीय संघात प्रतिनिधित्व करणारे खेळाडू इत्यादी बाबत चर्चा केली. त्याचप्रमाणे रणजी सामन्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आवश्यक सूचना केल्या. या सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू तसेच आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रकडून केदार जाधव तर सौराष्ट्रकडून जयदीप उनाडकट यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव यालाही घरच्या मैदानावर नाशिककरांना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images