Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘एमपीए’वर ड्रोनच्या घिरट्या

$
0
0

पोलिसांसह प्रशासनाची भंबेरी; महात्मानगरच्या दिशेला धावपळ

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) या संवदेनशील इमारतीच्या व परिसरात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एका संशयास्पद ड्रोनने तब्बल पाच मिनिटे घिरट्या घातल्या. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच धावपळ उडाली. पोलिसांनी लागलीच त्या ड्रोनचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणतेही धागेदोरे त्यांच्या हाती लागले नाहीत.

राज्यातील महत्त्वाचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या 'एमपीए'वर सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी हे ड्रोन पाहण्यास मिळाले. 'एमपीए'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पाच मिनिटे हे ड्रोन 'एमपीए' परिसरात घिरट्या घालत होते. यानंतर संशयास्पद ड्रोन महात्मानगरच्या दिशेने गेले. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी महात्मानगरच्या दिशेने धाव घेतली. वेगवेगळ्या पथकाने महात्मानगरसह सर्वच परिसर पिंजून काढला. मात्र, रात्री उशिरापर्यंत ड्रोनचे कोणतेही धागेदोरे हाती लागले नाही. पोलिसांनी शहरात ज्या व्यक्ती ड्रोनचा वापर करतात त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केली.

रेकी की चुकीने कृती?

१०० एकर जागेत असलेल्या 'एमपीए'मध्ये ८०० प्रशिक्षणार्थी व पोलिस अधिकारी नेहमीच प्रशिक्षण घेण्याच्या कामात व्यस्त असतात. सुरक्षेच्या दृष्टीने 'एमपीए' संवेदनशील ठरते. २०११ च्या सुमारास बिलाल शेख या संशयित दहशतवाद्याने 'एमपीए'ची रेकी केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. सातपूरमध्ये अटक केलेल्या बिलालकडे स्फोटके व एमपीएसह शहरातील काही संवदेनशील ठिकाणांचे फोटोग्राफ्स मिळाले होते. यानंतर 'एमपीए'च्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मात्र, आजच्या घटनेने 'एमपीए'च्या सुरक्षेबाबत नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात अनेक फोटोग्राफर्स तसेच हौशी व्यक्ती ड्रोनचा वापर करतात. त्यापैकी कोणी हे कृत्य केले का याचा शोध पोलिस घेत आहे. मात्र, ड्रोनचा वापरकर्ता सापडल्याशिवाय यावर प्रकाश पडू शकणार नाही.

'एमपीए'चे पोलिसांना पत्र

'एमपीए'मध्ये शुक्रवारी सकाळी खात्यातंर्गत पोलिस उपनिरीक्षकांची परीक्षा होणार होती. त्यामुळे 'एमपीए'मध्ये मोठी गजबज होती. त्यामुळे या ड्रोनवर कोणाची तरी नजर पडली. या घटनेची गंभीर दखल घेत 'एमपीए' व्यवस्थापनाने शहर पोलिसांना सुरक्षेबाबत पत्र दिले आहे. यात आजच्या घटनेची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. आज झालेला प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी काय उपाययोजना राबविण्यात याव्यात यावर वरिष्ठ पातळीवर खल सुरू झाला आहे.

ड्रोन वापराच्या नियमांकडे दुर्लक्ष

ड्रोन्स खरेदीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. अगदी ऑनलाइन सुद्धा ते खरेदी करता येतात. ड्रोन्समधील कॅमेऱ्यांच्या मदतीने होणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोग्राफीला मागणी असल्याने ड्रोन्सचा बाजारही तेजीत आला आहे. मात्र, ड्रोन्स हवेत उडविण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावीच लागते. आज झालेल्या घटनेत अशी कोणतीही परवानगी गंगापूर पोलिस, 'एमपीए' किंवा पोलिस आयुक्तालय यांच्याकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हे ड्रोन 'एमपीए' येथे दिसून येताच पोलिसांनी कार्यवाही सुरू केली.

सदर घटनेचा तपास शहर पोलिसांसह राज्य अन्वेषण विभागामार्फत सुरू करण्यात आला आहे. गंगापूर पोलिसांच्या पथकांनी 'एमपीए'च्या आजुबाजुला तपास केला. मात्र, ड्रोनचा पत्ता मिळाला नाही. 'एमपीए'बाबत हा प्रकार पुन्हा घडणार नाही, याबाबत काय उपाययोजना करता येतील याचा विचार सुरू आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाच्या ९ डिसेंबरच्यापरीक्षा १६ डिसेंबरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शुक्रवारी (दि.९) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १६ डिसेंबर रोजी या परीक्षा होणार आहेत. धुळे महापालिकेच्या निवडणुकीमुळे हा बदल करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०१८ च्या सत्रातील लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत. ९ डिसेंबर २०१८ रोजी विविध विद्याशाखांच्या विविध विषयांच्या लेखी परीक्षा आहेत. ९ डिसेंबर रोजी धुळे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आयोजित केली असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावे, विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून या परीक्षा आता रविवारी १६ डिसेंबर रोजी मूळ वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेवर व ज्या-त्या परीक्षा केंद्रावर आयोजित पूर्व नियोजित वेळेनुसार व सत्रानुसार होणार आहेत, तशी माहिती संलग्न महाविद्यालयांना कळविण्यात आली. या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक भ. प्र. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीए बटालियन’मध्ये १६ पासून सैन्य भरती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लष्कराची प्रमुख छावणी असलेल्या देवळाली कॅम्प भागातील टेरिटोरियल आर्मी (टीए)च्या ११६ इन्फ्रट्री बटालियनमध्ये ७४ सोल्जर व १० ट्रेडमनच्या पदांसाठी १६ ते १८ डिसेंबरदरम्यान भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मेजर आकाशदीप सिंग यांनी ही माहिती दिली.

येथील धोंडीरोडवरील टीए पॅराच्या मैदानावर होणाऱ्या भरतीप्रक्रियेत आठ राज्यांसह तीन केंद्रशासित प्रदेशांतील पात्र उमेदवार सहभागी होऊ शकतील. दि. १६ रोजी महाराष्ट्राबाहेरील झोन ४ मधील उमेदवार, दि. १७ रोजी नाशिक वगळता महाराष्ट्र, तर दि. १८ रोजी केवळ नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांना सहभागी होता येईल. दिलेल्या तारखेनुसार संबंधित भागातील उमेदवारांसाठी देवळालीच्या आनंदरोड मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे सकाळी ६ वाजता प्रक्रिया सुरू होईल. या भरतीप्रक्रियेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, गोवा, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी येथील उमेदवारांना सहभागी होता येईल. सोल्जर व ट्रेडमन पदासाठी वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षे असून, सामान्य सोल्जरसाठी किमान दहावी उत्तीर्ण, ४५ टक्के सरासरी गुण, तर क्लार्क पदासाठी बारावी किंवा दहावीमध्ये इंग्रजी, गणित, अकाउंट, बुककीपिंग विषयांमध्ये सरासरी ५० टक्के गुण अनिवार्य आहेत. पदवीधर उमेदवारांनादेखील वरील निकष व टायपिंग टेस्ट आवश्यक आहे. हाऊसकीपर (आठवी) वगळता स्वयंपाकी, हेअर ड्रेसर, धोबी या पदांसाठी दहावीसह संबंधित कामामध्ये प्रावीण्य असले पाहिजे. निर्धारित शारीरिक पात्रताही अनिवार्य असून, इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रे व २० पासपोर्ट फोटो सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेय ठेवीदारांसाठी ऑनलाइन अर्ज

$
0
0

मटा इम्पॅक्ट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय फसवणूक प्रकरणी माहिती देण्यासाठी हजारो ठेवीदारांची रोज गर्दी होत आहे. त्यातच अर्ज मिळवण्यापासूनच ठेवीदारांची वणवण होत असल्याने हा अर्ज व त्यासंबंधी माहिती ऑनलाइन देण्याबाबत 'मटा'ने पाठपुरावा केला. त्यानुसार शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा अर्ज https://nashikpolice.com या वेबसाइटवर अपलोड केला आहे. यामुळे ठेवीदारांना घरबसल्या फॉर्म मिळणार असून, अर्ज भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह तो सादर करता येईल.

गंगापूर रोडवरील पोलिस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक १७ येथे ठेवीदारांकडून हे अर्ज तपासून स्वीकारण्याचे काम सुरू आहे. मैत्रेय गुन्ह्यातील मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॅटर्सस अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रियल्टर्स अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेले ठेवीदार येथे अर्ज सादर करू शकतात. मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा. लि. या कंपनीचे अर्ज ग्रामीण पोलिस दलाच्या आडगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा ठेवीदारांना जमा करायचे आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य पातळीवर सुरू असून, ठेवीदारांकडून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे व जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना काही महिन्यांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ठेवीदारांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू होताच वरील दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तान्त 'मटा'ने प्रसिद्ध केला. ठेवीदारांची गर्दी लक्षात घेता विहित अर्ज ऑनलाइन असावा, यासाठी 'मटा'ने पाठपुरावा केला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तातडीने याबाबत विचारविनिमय करून तो अर्ज नाशिक पोलिसांच्या https://nashikpolice.com या वेबसाइटवर टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा अर्ज आता या वेबसाइटवर डाव्या बाजूला दिसतो आहे. हा अर्ज भरून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून ठेवीदार घरूनच तयारीत येऊ शकतात. यामुळे ठेवीदारांचा वेळ वाचेल, शिवाय पोलिसांवरील ताणही कमी होऊ शकतो. आजमितीस अर्ज स्वीकारण्यासाठी चार पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अनेक एजंट आपल्याकडील ठेवीदारांचे अर्ज संकलित करून थेट जमा करीत आहे. शनिवारी दिवसभरात जवळपास १००० ते १२०० अर्ज दाखल करून घेण्यात आले. आजसुद्धा ठेवीदारांची मोठी गर्दी पोलिस मुख्यालयाच्या आवारात उसळलेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसलेला प्रयोग म्हणजे ‘एक होता बांबुकाका’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यक्ती या जीवनाला घाबरत नाहीत, तर मरणाला घाबरतात. त्या पैकी एक असलेला बांबुकाका हा मरणावर प्रेम करणारा असतो विनोदी अंगाने प्रेमाला जवळ करणारा बांबुकाका कसा आहे हे 'एक होता बांबुकाका' या नाटकातून दाखवण्यात आले. मात्र, तांत्रिक अंगाचा आभाव, शासनाकडून स्टेज मिळते म्हणून नाचून घ्यायचे त्यातला प्रकार व कोणतीही तयारी नसताना सादर केलेला प्रयोग असे या नाटकाबद्दल म्हणता येईल. तांत्रिक अंगासाठी तीन-तीन लोक कार्यरत असताना लेव्हलला मास्किंग लावणे जमू नये, ही या नाटकाची शोकांतिका ठरली.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू आहे. आर.एम ग्रुपच्या वतीने हे नाटक गुरूवारी सकाळी सादर करण्यात आले. 'टवाळा आवडे विनोद' असे कायम म्हटले जाते. गेल्या अनेक वर्षात राज्यनाट्य स्पर्धेत विनोदी नाटक सादर झालेच नव्हते त्याची सर 'एक होता बांबुकाका' या नाटकाने भरुन काढली. 'एक होता बांबुकाका' हे नाटक पूर्णपणे विनोदी असून, नाटकाचे कथानक हे बांबुकाका नामक एका सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या विविध घटनांचे पैलू उलगडणारे आहे. आपल्या अवतीभवती जगण्यावर प्रेम करणारी अनेक माणसे असतात. पण मरणावर प्रेम करणारी मोजकीच असतात. त्यातलाच एक म्हणजे, हा बांबुकाका!

या नाटकाचे लेखन राजेंद्र पोळ यांनी केले. दिग्दर्शन आणि नेपथ्य विक्रम गवांदे यांचे होते. नेपथ्य सहाय्य मोहन ठाकरे, दिपक लोखंडे, पार्श्वसंगीत संदीप महाजन, प्रकाश योजना रवी रहाणे यांनी केली. रंगभूषा-स्वराली गर्गे, केशभूषा-अपूर्वा देशपांडे, वेषभूषा केतकी कुलकर्णी, अंकिता मुसळे, दिपीका मारु यांची होती. या नाटकाची निर्मिती प्रकाश साळवे व धृवकुमार तेजाळे यांची होती. रंगमंच सहाय्य मनोज खैरनार, संतोष झेंडे, जितू चव्हाण व सुनील तांबे यांचे होते. सौदामिनी- स्वराली गर्गे, रामा हेलपटवार- राहुल साबळे, बांबुकाका- रोहीत भारती, गांवकरी- केतकी कुलकर्णी, संपदा कानवडे, रेश्मा गवळी, अपूर्वा देशपांडे, आश्विनी काकडे, शशी भरत, मोहीत कुलकर्णी, अमेय कुलकर्णी, प्रतीक डबीर, जयप्रकाश पुरोहीत, मयुर जावळे, आर्चित बाविस्कर यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लस-तीन फास्ट

$
0
0

खंडेराव टेकडीवर

यात्रोत्सवाची तयारी

देवळाली कॅम्प : देवळालीतील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडेराव टेकडीवर चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव होणार आहे. टेकडीवरील मंदिराची रंगरंगोटी सिरू असून, गाभारा, खंडेराव महाराज, म्हाळसा-बाणाईच्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्यात आले आहे. उत्तम पाटील अनेक वर्षांपासून सेवाभाव जपत रंगकाम करीत आहेत. मंदिराचे विश्वस्त आमले परिवाराच्या वतीने यात्रेच्या दिवशी सकाळी विश्वस्तांच्या हस्ते पूजाअभिषेक झाल्यानंतर भगूर येथून आमले यांच्या निवास्थानापासून पालखीची मिरवणूक काढण्यात येते. त्या नंतर मंदिरात महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.

उपनगरमध्ये गुटखा जप्त

जेलरोड : उपनगर पोलिसांनी २३ लाख ६५ हजारांचा गुटखा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. आयशर ट्रकमधून (जीजे २७/व्ही ८०२८) ५० पोत्यांमधून विमल नावाचा हा गुटखा गुजरातहून पुण्याकडे नेला जात होता. तो पुण्याला कोणाच्या ताब्यात देण्यात येणार होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. या कारवाईने गुटखा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. ट्रकचालक संतोष परमानंद यादव (वय २५, रा. ओधव सर्कल सोन्याची चाळ, अहमदाबाद) याची चौकशी केली असता ट्रकमध्ये केशरयुक्त विमल पानमसाल्याची १९,८०० पाकिटे, व्ही-१ तंबाखूची १०,२०० पाकिटे असा एकूण २३ लाख ६५ हजारांचा गुटखा जप्त केला.

करवसुली बारगळली

नाशिकरोड : राखेची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांच्या तीव्र विरोधामुळे विशेष स्वच्छता कर आकारणी मोहीम गुंडाळण्याची नामुष्की एकलहरे ग्रामपंचायत प्रशासनावर शनिवारी आली. राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून ग्रामपंचायत कर अधिनियमानुसार विशेष स्वच्छता कर आकारण्याचे नियोजन एकलहरे ग्रामपंचायतीने केले होते. स्थानिक राख व्यावसायिकांचा कर आकारणीस झालेला विरोध आणि पोलिसांनी बंदोबस्त देण्यास दिलेला नकार या कारणांनी ग्रामपंचायतीचे कर आकारणीचे मनसुबे पहिल्याच दिवशी उधळले. आता ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरावर ढगाळ वातावरणाचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत. किमान तापमानातही मोठी घसरण होत असून थंडी, गारठ्याचे प्रमाण वाढत आहे. शहरात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरणाचे सावट निर्माण झाल्याने थंडीत अजूनच वाढ झाली असून, शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे.

शहरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी ३० नोव्हेंबर रोजी या ऋतुतील १०.८ किमान तापमानाची नोंद झाली. १ डिसेंबरला कमाल तापमान २६.१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस इतके होते. २८ नोव्हेंबर रोजी कमाल तापमान २९.८ तर किमान तापमान ११.६ इतके होते. या तापमानांमध्ये अल्प फरक असला तरी शनिवारी दिवसभर शहरावर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडीमध्ये वाढ झाली होती. एरवी पहाटे व रात्री येणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव शहरवासीयांना दिवसभर येत होता. ढगाळ वातावरणामुळे पचनशक्ती कमी होत असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८२ शाळांमध्ये २७ हजार लसीकरण

$
0
0

नाशिक : गोवर उच्चाटन व रुबेला आजारावरील नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या चार दिवसात ८२ शाळांमधील २५ हजार १९० व मनपा रुग्णालयांमध्ये २३३५ बालकांना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील सुमारे ४ लाख ९० हजार २१८ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी पाच आठवड्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात सर्व शाळांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असून, त्यानंतर आंगणवाड्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय, मनपा दवाखाने व सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही सदर लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या मोहिमेत मनपाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सेविका, नर्सेस, आशा, अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षक यांचा सहभाग प्राप्त झालेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंकर महाराज पालखी

$
0
0

श्री सदगुरू शंकर महाराज पायी पालखी सोहळ्याचे शनिवारी नाशिक येथे आगमन झाले. मुंबईनाका, त्र्यंबकनाका, शालिमार, मेनरोड, सराफ बाजारमार्गे ही पालखी मुरलीधर गल्लीतील विठ्ठल मंदीरात पोहोचली. तेथे सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रविवारी दुपारी अडीचपर्यंत भाविकांना येथे दर्शनाचा लाभ घेता येणार असून, त्यानंतर पालखी ओझरकडे मार्गस्थ होणार आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबिराचे नांदुरीत आज उद्घाटन

$
0
0

महाआरोग्य शिबिराचे

नांदुरीत आज उद्घाटन

मुख्यमंत्री, पालकमंत्री राहणार उपस्थित

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील नांदुरी येथे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी रविवारी, २ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

कळवण, सुरगाणा, बागलाण, देवळा, आणि दिंडोरी तालुक्यातील गरजू रुग्ण या शिबिरात सहभागी होणार असून, पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार हे शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. शिबिराच्या पूर्वतयारीबाबत शनिवारी नांदुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाशिबिराचे संयोजक रामेश्वर नाईक, आमदार डॉ. राहुल आहेर शिबिराच्या नियोजनाबाबत माहिती दिली. नियोजनाच्या धर्तीवर अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उप विभागीय अधिकारी पंकज सिंहा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, पालकमंत्र्यांचे विशेष सचिव संदीप जाधव आदी नांदुरी येथील अटल मैदानावर शनिवारी उपस्थित होते.

२० नोव्हेंबरपासून रुग्णांची पूर्व तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात करण्यात आली. तसेच २५ नोव्हेंबरपासून प्रत्येक गावात घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. नाशिक येथे झालेल्या शिबिरात आदिवासी भागातील रुग्ण येऊ शकले नाहीत, त्यांना नामांकित डॉक्टरांमार्फत उपचाराची चांगली संधी या शिबिरातून उपलब्ध होणार आहे. जवळपास दोन लाख रुग्णांच्या आरोग्याची तपासणी या शिबिरात होईल, अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. अधिकाधिक रुग्णांना शिबिराचा लाभ व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव घरपट्टीवर खल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या, परंतु कराच्या फेऱ्यात नसलेल्या ६२ हजार मिळकतींना दंडात्मक कारवाईसह घरपट्टी आकारणीच्या नोटिसा मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर शहरात असंतोष उसळला आहे. मिळकतधारकांचा असंतोष पाहून महापौर व सभागृह नेत्यांनी याबाबत सोमवारी (दि. ३) बैठक बोलावून दिलासा देण्याची भाषा सुरू केली आहे.

सहा विभागांत पहिल्या टप्प्यात ३० हजार मिळकतधारकांना नोटिसांचे वाटप पूर्ण झाले असून, घरपट्टीच्या नोटिसा हातात पडल्यानंतर नागरिकांना शॉकच बसला आहे. खासगी सर्वेक्षकाच्या आधारे मिळालेल्या माहितीची कोणतीही शहानिशा न करताच या नोटिसा बजावल्याचे समोर आले असून, नोटिसांबाबतचा असंतोष बघता आता प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनीही याबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकूडन अपिलाची संधी असल्याचे सांगितले जात आहे, तर महापौर व सभागृह नेत्यांनी याबाबत बैठक घेण्याचे सूचित केले आहे.

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात नव्याने सापडलेल्या ६२ हजारपैकी ३० हजार मिळकतींची पडताळणी पूर्ण झाली असून, या मिळकतींना विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावण्यास आल्या आहेत. उर्वरित पडताळणी होत असलेल्या ३२ हजार मिळकतींनाही नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. या मिळकतींकडून सहा वर्षांच्या पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी वसूल केली जात असून, तशा नोटिसाच मिळकतधारकांना पाठविण्यात आल्या आहेत. परंतु, या नोटिसा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी एकतर्फी लागू केलेल्या करयोग्य मूल्य दरानुसार आकारण्यात आल्याने मिळकतधारकांना मोठा शॉकच बसला आहे. मिळकत सर्वेक्षणात आढळेल्या मिळकती सरसकट अनधिकृत ठरवून त्यांना अनधिकृत दराप्रमाणे घरपट्टीची आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे एका फ्लॅटला साधारण ८० हजार ते सव्वालाखापर्यंतच्या नोटिसा दिल्या जात असून, मिळकतधारकांना आपली बाजू मांडण्यासाठी २१ दिवसांची संधी देण्यात आली आहे. संबंधित मिळकतधारकांनी २१ दिवसांत अपिल दाखल केले नाही, तर त्यांच्याकडून बजावलेल्या नोटिशीच किंमत वसूल केली जाणार आहे. त्यामुळे या नोटिसा मिळाल्यानंतर शहरातील मिळकतधारकांमध्ये असंतोष उसळला आहे.

--

नगरसेवकांनाही भरली धडकी

महापालिकेच्या कर संकलन विभागाने मिळकतींची कोणतीही पडताळणी व शहानिशा न करताच मिळकतधारकांना नोटिसा बजावल्याचे समोर येत आहे. खासगी कंपनीच्या सर्वेक्षणाच्या आधारावरच नोटिसा बजावल्या असून, त्यात आता अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. एकाच इमारतीतील मिळकतधारकांची मिळकत सारखी असताना त्यांना वेगवेगळ्या कर आकारणीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत दाखल असलेल्या इमारतींनाही अनधिकृत ठरवत त्यांच्याकडून पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी वसूल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चुकीच्या नोटिसा हातात पडताच नागरिकांकडून थेट नगरसेवकांनाच लक्ष्य करण्यात आल्याने या नोटिसांची धडकी आता नगरसेवकांनाही भरली असून, त्यांनी पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

---

बिल्डरांचे खापर मिळकतधारकांवर

बिल्डरांनी नगररचना विभागाकडे प्लॅन दाखल केल्यानुसार बांधकाम केले नसल्याचे बहुसंख्य मिळकतींमध्ये समोर आले आहे. सर्वेक्षणात संबंधित बांधकाम नकाशापेक्षा जास्त बांधकाम आढळले असल्याने महापालिकेने या इमारतीच अनधिकृत ठरवत त्यांच्याकडून तीनपट दंडात्मक व पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी लागू केली आहे. बिल्डर मिळकत विकून मोकळे झाले असले, तरी नोटिसा आणि वाढीव घरपट्टीच्या जाचात मात्र मिळकतधारक अडकले आहेत. एकीकडे बॅँकांचे हप्ते, तर दुसरीकडे महापालिकेची लाख ते दीड लाखाची घरपट्टी आता कशी भरायची, अशा पेचात मिळकतधारक अडकले आहेत.

--

घरपट्टीच्या नोटिसा मिळाल्यानंतर नागरिक व नगरसेवकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. आम्ही नागरिकांसोबत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नवीन मिळकतींना बजावल्या जाणाऱ्या नोटिसांबाबत सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, त्यात नागरिकांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करू.

-रंजना भानसी, महापौर

--

या मिळकतींसदर्भात महासभेने मंजूर केलेल्या ठरावाऐवजी आयुक्तांनी त्यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात घरपट्ट्या आल्या आहेत. परंतु, यासंदर्भात योग्य तो तोडगा समन्वयाने काढून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

-दिनकर पाटील, सभागृह नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुरेसा वेळ दिलेला असताना तुम्ही तयारी करून आला नाहीत. आता दोन दिवसांची मुदत देत असून, ३ डिसेंबर रोजी तुम्ही आपले म्हणणे मांडले नाही, तर कोर्ट या प्रकरणाचा एकतर्फी निकाल देईल, अशा शब्दात जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. जी. गिमेकर यांनी सरकारी व महापालिकेच्या वकिलांना सुनावले.

'माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो', असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भीडे यांच्याविरूध्द महापालिकेने कोर्टात खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी ७ डिसेंबर रोजी होणार आहे. या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टाने भीडे यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. याच प्रक्रियेवर भीडे यांच्यावतीने अॅड. अविनाश भीडे यांनी बोट ठेऊन जिल्हा व सत्र न्यायालयात हरकत घेतली आहे. याबाबत यापूर्वी सुनावणी देखील झाली. त्यात कोर्टाने १ डिसेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. मात्र, आज सुनावणी सुरू होताच सरकारी पक्षाने युक्तीवादाची तयारी पूर्ण झालेली नसून, त्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त करीत ३ डिसेंबरपर्यंत तयारी करून तुमचे म्हणणे मांडा अन्यथा कोर्टाला आपला निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्तपावन मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चित्तपावन महिला मंडळाचा सहावा वर्धापनदिन गोळे कॉलनीतील काका गद्रे मंगल कार्यालयात शनिवारी उत्साहात पार पडला. नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. जाखडी यांचा अंतराळ क्षेत्रातील प्रवास मैथिली गोखले यांनी मुलाखतीतून उलगडला. 'नासा' या संशोधन केंद्रात काम करताना आलेले अनुभव यावेळी या मुलाखतीतून समोर आला. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण तारांगणामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही माहिती दिली. विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्राविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने तारांगण प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी आधाराश्रम संस्थेचे अध्यक्ष विजय दातार यांना संस्थेसाठी रुपये पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळातील जान्हवी नातू, मंगला जोगळेकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिकस्थळांचे फेरसर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्त्यावरील तसेच मोकळ्या भुखंडावरील धार्मिकस्थळांवरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर महापालिकेकडून सर्व ५७४ धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेडून समिती नियुक्त केली जाणार असून, या समितीसाठी सोमवारी पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील कारवाईला स्थगिती देत, या धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सभागृह नेते दिनकर पाटील यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेवून नव्याने नियोजन करण्याच्या अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव यांना सुचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने धार्मिकस्थळांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी सन २००९ पूर्वीचे व नंतरचे असे दोन भागात वर्गीकरण केले आहे. परंतु, या सर्वेक्षणानंतर धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांना विश्वासात न घेताच, कारवाई केली. त्यामुळे धार्मिकस्थळांवर कारवाईची वेळ ओढावली आहे. महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात २००९ पूर्वीची ७२ आणि २००९ नंतरची ५०३ अशा एकूण ५७५ धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्तांनी थेट उच्च न्याालयात धाव घेतली. न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देत, पुन्हा नियमानुसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एक समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीकडून धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केले जाणार असून, त्यासंदर्भात शनिवारी चर्चा करण्यात आली. आता या समितीत कोण असावे, याबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक बोलविण्यात आली आहे.

बैठकीनंतर धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण होवून विश्वस्तांना या सर्व ५७५ धार्मिक स्थळांबाबत आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. समितीकडून प्रथम मोकळ्या भुखंडावरील १० टक्‍क्‍यांपुढील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर सर्वेक्षणाला व्यापक प्रसिद्धी देवून हरकती व सुचना मागवून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप करावे यासह विविध मागण्यांसाठी ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएलतर्फे सोमवारपासून (ता. ३) देशव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेकडो बीएसएनएल कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बीएसएनएल कर्मचाऱ्यांना देय असलेला तिसरा वेतन करार लागू करण्याबाबत, तसेच बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम देण्यासबंधी आश्वासन दिले होते. मात्र, आठ महिने उलटूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम न मिळाल्याने ग्राहकांना अपेक्षित वेगवान इंटरनेट सेवा देता येत नाही. कर्मचाऱ्यांचे हक्क व ग्राहकांना वेगवान फोर-जी सेवा मिळावी, पेन्शन रिव्हिजन, पेन्शन अंशदान मूळ वेतनावर व्हावी यासह विविध मागण्यांसाठी 'बीएसएनएल'´मधील सर्व युनियन अँड असोसिएशनद्वारे देशव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा संप १०० टक्के यशस्वी करावा, असे आवाहन मधुकर सांगळे, शशिकांत भदाणे, राजेंद्र लहाने, दिलीप गोडसे, गौरव सोनार, गणेश बोरसे, अनिल आखाडे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपीच्या कामकाजावर सदस्यांकडून संताप व्यक्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या सभेत विषयांवर निर्णयच होत नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. या सभेत स्थायी समितीचे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी स्थायी समितीत निर्णय होत नसेल तर आम्ही यावे की नाही, असा उद्विग्न सवाल उपस्थित केला. तर बाळासाहेब क्षिरसागर व यतीन कदम या सदस्यांनी अजेंठा एक दिवस अगोदर मिळत असल्याचे सांगत कामकाजावरच प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या सदस्यांनी घाईघाईने चर्चा नको असे सांगत सभा तहकूबची मागणी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सभा तहकूब केली.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी २.३० वाजता स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण समितीच्या सभापती सुनीता चारोस्कर, झेडपीचे सीईओ डॉ. नरेश गीतेंसह खातेप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी सभेचे विषय वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेले परिपत्रकही विभागावार वाचन करण्यास सुरुवात झाली. पण, डॉ. कुंभार्डे यांनी सभा जर घाईघाईत घेणार असेल तर ती तहकूब करावी, असे सांगितले. नांदुरी येथे असलेल्या महाआरोग्य शिबिराची बैठक असल्यामुळे सीईओंना तेथे जावे लागणार असल्याचे सांगत ही सभा नंतर घेण्याची मागणी करण्यात आली. या सभेला स्थायी समितीच्या आठ सदस्यांपैकी चार सदस्य उपस्थित होते.

अजेंठा दिला बस स्टॅण्डवर

कोणत्याही सभेचा अजेंठा हा सदस्यांना सात दिवस अगोदर मिळायला हवा. पण, या अजेंठा एक दिवस अगोदर मिळाला असल्याचे स्थायी समिती सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी इतिवृत्त मिळत नाही. ठरावाच्या नकला दिल्या जात नसल्याचे सांगितले. यानंतर यतिन कदम यांनी मला तर स्टॅण्डवर अजेंठा घेण्यासाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबत चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी देत अजेंठा व इतिवृत्त सदस्यांना देण्याचे आदेश दिले.

स्वतंत्र दिवस द्या

स्थायी समितीची बैठक महत्त्वाची असते. पण, ती दुपारी घेतली जाते. त्यामुळे ती दिवसभर असावी. त्यासाठी सकाळची वेळ नियोजीत करावी, अशी मागणी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आप’ची ‘मिस कॉल’ मोहीम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने मिस कॉल क्रमांक जाहीर करत महाराष्ट्रातील युवकांना जोडण्याची मोहिमेला सुरुवात केली आहे.

'आप'तर्फे पोस्टर्स-बॅनर्स व सोशल मीडियाद्वारे या मोहिमेचा प्रचार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी ९९२०५५७५५७ या क्रमांकावर युवकांनी मिस कॉल द्यावा, असे आवाहन या आघाडीचे नाशिकचे अध्यक्ष योगेश कापसे व उपाध्यक्ष स्वप्नील घिया यांनी केले आहे. पक्षाच्या युवा आघाडीने प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये युवा आघाडीच्या समित्या घोषित करण्यात आल्या आहेत. विधानसभा आणि बूथ स्तरावरील बांधणीला सुरुवात झाली असून, 'मिस कॉल' मोहिमेद्वारे अधिकाधिक युवकांना या प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्याचा पक्षाचा मानस आहे. भ्रष्टाचार, जातीवाद व घराणेशाहीला तडा देत युवकांसाठी सक्षम पर्याय म्हणून पुढे येण्यासाठी या मिस कॉल मोहिमेची सुरुवात केली गेल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरामय व्याख्यान

$
0
0

'निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक'

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दैनंदिन बदलत्या जीवनशैलीचा विपरित परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे अनेक आजारांना मनुष्याला सामोरे जावे लागते, अशावेळी तणावमुक्त व निरोगी आयुष्यासाठी ध्यानधारणा, प्रणायम व नियमित व्यायाम या गोष्टी आवश्यक आहेत, असे प्रतिपादन डॉ. हेमंत ओत्सवाल यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात निरामय आरोग्य या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

जीवनातील वाढणाऱ्या तणावामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या आजारांची निर्मिती आपल्या शरीरात होत असते. अशा विविध जीवघेण्या आजारांपासून आपले शरीर व मन दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व पोषक आहार आवश्यक असल्याचेही डॉ. ओत्सवाल यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सादरीकरणातून आरोग्य विषयक माहिती दिली. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राजाराम माने, अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावडे, दिलीप स्वामी, सुकदेव बनकर, प्रवीण पुरी आदी उपस्थित होते. विभागीय आायुक्त राजाराम माने यांच्या संकल्पनेतून निरामय आरोग्य या विषयावर डॉ. हेमंत ओत्सवाल यांनी व्याख्यान दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय हॉस्पिटलचे प्रश्न दुर्लक्षित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये वर्षाकाठी साडेचार ते पाच हजार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय ओपीडीसाठी येणाऱ्या पेशंट्सची संख्याही मोठी आहे. संदर्भची वार्षिक उलाढाल ८० ते १०० कोटी रुपयांच्या घरात असताना या हॉस्पिटलबाबत लोकप्रतिनिधींची मात्र उदासिनता आहेत. हॉस्पिटलमधून खासगी हॉस्पिटलमध्ये रेफर केलेल्या पेशंटची संख्या लक्षात घेता हा आकडा आणखी वाढू शकतो.

कॅन्सर, ह्दय रोग, किडनी विकार अशा गंभीर आणि महागड्या आजारांच्या उपचारासाठी गोरगरीबांना सरकारतर्फे कमी खर्चात अथवा मोफत उपचार मिळावे यासाठी संदर्भ सेवा या विभागीय हॉस्पिटलची पायाभरणी तत्कालीन आरोग्य मंत्री दौलतराव आहेर यांनी आपल्या कार्यकाळात केली होती. त्या काळातील अत्यंत महागडी व गोरगरीबांना दुर्लक्ष ठरणारी सर्व यंत्रणा हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आली. आहेरांचे हे स्वप्न पूर्णत्वास गेले. या हॉस्पिटलमध्ये नाशिकसह अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यातील पेशंट येतात. इतकेच नव्हे; तर मराठवाडा विभागातील पेशंटही मोठ्या संख्येने गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी येतात.

सध्या १० वर्षांपूर्वी बसवलेली ही यंत्रणा आता कालौघात जुनी ठरते आहे. कम्प्युटराईज्ड यंत्रणा असल्याने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा फरक वर्षागणिक वाढतच जाईल. कोट्यवधी रुपयांची ही यंत्रणा गोरगरीबांना वरदान ठरते. दुर्दैवाने याकडे सर्वच स्तरातून दुर्लक्ष होते आहे. या हॉस्पिटलवर नाशिक व औरंगाबाद विभागातील लाखो पेशंट अवलंबून असताना लोकप्रतिनिधींची मात्र डोळेझाक होते. कधीतरी एखाद्य दुसऱ्या लोकप्रतिनिधीचा फोन कॉल येतो. मात्र, त्यात जवळच्या पेशंटच्या बेड पुरताच विषय मर्यादीत असतो. मध्यतंरी आमदार देवयानी फरांदे यांनी निधी मिळवून दिला खरा पण या निधीचा वापर नवीन इमारतीच्या उभारणीसाठी होणार आहे. आहे त्या सुविधांचा विचार यात झालेला नाही. वास्तविक संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या उपचारापोटी महिन्याकाठी किमान ७० लाखांचे उत्पन्न सरकार दरबारी जमा होते. म्हणजेच वर्षाकाठी हा आकडा ८४ कोटींच्या पुढे सरकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर येथील आरोग्य सुविधा पुरविल्या जात असताना शासनाचे हॉस्पिटलकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसते.

विभागातील सर्वच लोकप्रतिनिधींची हॉस्पिटलबाबत उदासिनता आहेत. यामुळे हॉस्पिटलमध्ये सरळ सरळ मनमानी होत असून, शस्त्रक्रियेतील अनियमितता आणि पेशंटला मिळणाऱ्या उपचारांमध्ये सोयीचे काम होताना दिसते. मूळात कालबाह्य होत असलेली यंत्रणा सक्षम करणे आणि उपचारांच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या कोट्यवधींच्या काळ्या पैशांना ब्रेक लागणे महत्त्वाचे आहे.

डॉ. आहेर यांची भूमिका महत्त्वाची

संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये आर्थिक कारणांमुळे सुरू असलेली अनागोंदी लपून राहिलेली नाही. यात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच आमदार डॉ. राहुल आहेर यांची भूमिका महत्त्वाची ठरते. डॉ. आहेर नेहमी या हॉस्पिटलच्या कामकाजाशी निगडीत असतात. त्यामुळे डॉ. आहेर यांच्यासह प्रशासनाने गैरप्रकार करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवून गोरगरीबांसाठी आरोग्याचा राजमार्ग ठरणाऱ्या संदर्भ सेवा हॉस्पिटलला अधोगतीपासून वाचवावे, अशी मागणी करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरच मराठी शाळा टिकतील

$
0
0

साने गुरुजी संस्थेचा

वर्धापनदिन उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मराठी माध्यमांच्या शाळांकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. शिक्षकांनी आपली भूमिका योग्यरितीने पार पाडल्यास भविष्यात या शाळांचे भवितव्य उज्ज्वल राहील, या शाळांना चालना मिळेल. शासनाचे आजचे शैक्षणिक धोरण मराठी शाळांना मारक असून शाळा टिकवायच्या असतील तर शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण अध्यापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन न्यू् एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी केले.

नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा ५७ वा वर्धापन दिन के. जे. मेहता हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात झाला. त्यावेळी वैशंपायन बोलत होते. संस्थेचे सचिव प्रवीण जोशी, अध्यक्ष गणपतराव मुठाळ, खजिनदार मिलिंद शिवप्रसाद पांडे, विश्वस्त अनिल अरिंगळे, प्राचार्या अश्विनी दापोरकर आदी यावेळी उपस्थित होते. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना गौरविण्यात आले. सुरेखा दळवी आणि संदीप लेंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वैशंपायन म्हणाले की, आजच्या काळात शिक्षण संस्था चालवणे अवघड झाले आहे. संस्थेच्या प्रगतीत शिक्षकांबरोबर पालकांची भूमिकाही महत्त्वाची असते. पदाधिकारी आणि शिक्षकांच्या समन्वयातून शिक्षण संस्थेचे कार्य उभे राहते. साने गुरुजी संस्थेला मेहता व केला कुटुंबियांच्या दातृत्वाचा मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे या संस्थेची जडणघडण जोमाने होत आहे. प्रा. मंगेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. साधना धोंगडे यांनी प्रास्तविक केले. डी. बी. वाकचौरे, करुणा आव्हाड, सुधाकर चोपडे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images