Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तिघे बडतर्फे, एकाचे निलंबन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त व भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. डिझेल घोटाळ्याप्रकरणी विभागीय चौकशीत दोषी आढळलेल्या अग्निशमन विभागातील वाहनचालकावरदेखील बडतर्फीची कारवाई प्रस्तावित केल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच एसीबीच्या उपअधीक्षकाची फसवणूक केल्याप्रकरणी महिला कर्मचारी संत्रा बोध यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राखीव जागांवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. बारा कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याची माहिती तपासणीत समोर आल्यानंतर प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वाढीव मुदत दिली होती. या मुदतीनंतरही जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या वाहनचालक अशोक दिनकर दळवी व बिगारी यशोदा गंगाधर जाधव या दोघा कर्मचाऱ्यांवर आयुक्त मुंढे यांनी बडतर्फीची कारवाई अंतिम केली आहे. त्याचप्रमाणे डिझेलचा अपहार केल्याप्रकरणी अग्निशमन विभागातील वाहनचालक रवींद्र भोळे विभागीय चौकशीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावरदेखील बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे मनपा प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मालकीच्या सदनिकेवर परस्पर गृहकर्ज काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महापालिका कर्मचारी संत्रा बोध या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी केली जाणार असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजकीय पक्षांचा यंत्र चाचणीला ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदान यंत्रे मॅनेज केली जात असल्याचा शंखनाद राजकीय पक्षांकडून केला जातो. मात्र, निवडणूक आयोगाने पाठविलेले अद्ययावत बॅलेट आणि कंट्रोल युनिट नेमके कसे काम करते हे जाणून घेण्यात स्वारस्य नसल्याचे शहरातील राजकीय पक्षांनी मंगळवारी दाखवून दिले. निवडणूक शाखेने या यंत्रांची प्राथमिक चाचणी पहाण्यास निमंत्रित करूनही शिवसेना वगळता एकाही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी फिरकला नाही. सत्तेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या राजकीय पक्षांची ही उदासिनता चर्चेचा विषय ठरली आहे.

मोदी सरकारच्या विरोधात अनेक राजकीय पक्ष एकवटण्यास सुरुवात झाली आहे. मतदान यंत्रांमध्ये घोळ असल्यानेच भाजपचा विजयाचा वारू चौखुर उधळत असल्याची टीका यापूर्वी काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी सातत्याने केली आहे. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगही अधिक सक्रीय झाला आहे. मतदानासाठी वापरण्यात येणारे बॅलेट आणि कंट्रोल युनिट त्या-त्या जिल्ह्यांमध्ये दाखल होऊ लागले आहेत. नाशिकमध्येही निवडूक आयोगाची अद्ययावत यंत्रे दाखल झाली असून त्यांची प्राथमिक चाचणी मंगळवारी अंबड येथील वेअर हाउसमध्ये घेण्यात येणार होती. त्यासाठी निवडणूक आयोगाचे २० इंजिनीयर आले आहेत. हे यंत्र नेमके कसे काम करते, त्यामध्ये काय करता येऊ शकते व काय करता येऊ शकत नाही याबाबतची माहिती दिली जाणार होती. इतकेच नव्हे तर ही यंत्र हाताळण्याची व शंकांचे निरसन करवून घेण्याची संधीही राजकीय पक्षांना मिळणार होती. सकाळी ११ वाजता घेण्यात येणार असलेल्या या चाचणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली. परंतु, शिवसेनेचा एक कार्यकर्ता वगळता अन्य कोणत्याच पक्षाचा पदाधिकारी या चाचणीकडे फिरकला नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून दाखविण्यात आलेल्या या अनास्थेबद्दल प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध सिगारेटचा ‘धूर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्यासाठी घातक असल्याचा कोणताही वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेट पाकिटांची सातपूरला सर्रास विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत स्थानिक पोलिस आणि याच भागात कार्यालय असलेल्या अन्न व औषध प्रशासनानेदेखील कानावर हात ठेवले आहेत.

अवघ्या ३० रुपयांमध्ये मिळणाऱ्या या सिगारेट पाकिटांच्या मोहात अनेक कामगार पडले असून, त्यामुळे अवैध सिगारेटच्या नादात कामगारांचे आयुष्यच धोक्यात आले आहे. याविरोधात पोलिसांसह संबंधित विभागाने कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

कामगार वसाहत असलेल्या सातपूरच्या अशोकनगर, श्रमिकनगर यासह परिसरातील विविध टपऱ्यांवर रुली रिव्हर आणि इतरही काही सिगारेटची उत्पादने सहजासहजी मिळतात. यातील रुली रिव्हर या सिगारेटच्या पाकिटावर कोणताही वैधानिक इशारा छापण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करणारी तंबाखूजन्य उत्पादने आपोआप बेकायदेशीर ठरतात. यापूर्वी पोलिसांनी 'एफडीए'सह कारवाई करीत लाखो रुपयांची अशी अवैध सिगारेटची पाकिटे जप्त केली आहेत. काही महिन्यांपूर्वी तर टपरीसमोर अथवा सार्वजनिक ठिकाणी झुरका मारणाऱ्यांवरदेखील पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाईचा अहवाल पोलिस महासंचालकांना सादर करण्याचे आदेश होते. आता मात्र याबाबतची सर्व कारवाईची थंडावली असून, उलट अवैध सिगारेट विक्रीचा जोर वाढला आहे. सातपूरसह श्रमिकनगर परिसरात सहजतेने मिळणाऱ्या रुली रिव्हर या सिगारटेच्या पाकिटाची किंमत अवघी ३० रुपये आहे. या अवैध सिगारेटच्या पाकिटांवर एक बारकोड असून, तो स्कॅन केला असता फक्त काही आकडे समोर येतात. वास्तविक स्कॅन केल्याबरोबर उत्पादकाचे नाव, उत्पादन कोठे झाले व इतर माहिती येणे अपेक्षित आहे. मात्र, या आकडेवारीने त्याच्या अवैधपणावर शिक्कमोर्तब होत आहे. कामगार भागात स्वस्तात मिळणाऱ्या सिगारेटला तरुणांकडून मागणी वाढत आहे.

--

स्वस्तात मिळतोय कॅन्सर!

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३ (कोटपा) या कायद्याची अंमलबजावणी हा मोठा संशोधनाचा भाग ठरतो. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणाने होत नसल्याने तस्करांचे फावते. अगदी तीन रुपयांमध्ये 'कॅन्सर' विकला जात असल्याची प्रतिक्रिया या भागातील सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जाते आहे.

--

शहर पोलिसांकडून याबाबत सातत्याने कारवाई सुरू असते. सातपूरचा प्रकार नवीन असण्याची शक्यता आहे. त्याचे धागेदोरे समोर आणून सर्वांवर कारवाई करण्यात येईल.

-श्रीकृष्ण कोकोटे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांकडून अंजनाबाईंच्या आरोग्यसेवेला शाबासकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘हर घर पोषण आहार, त्योहार’ अंतर्गत मंगळवारी (दि. ११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्यसेविका यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये राज्यातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त भागापैकी एक आदिवासीबहूल नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेविका अंजना परमार यांच्या सेवेला पंतप्रधानांनी शाबासकी देत दुर्गम भागातील तरंगत्या दवाखान्याचे कौतुक केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांच्याशी व्हिडीओ, कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी नंदुरबार महिला कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मराठीतून ‘आपण कसे आहात आणि गणपती उत्सवाची तयारी कशी सुरू आहे’ याची विचारणा केली. नंदुरबार येथील प्रसिद्ध चौधरींचा चहा घेण्यासाठी आपण नंदुरबार यायचो, याचा उल्लेख करीत त्यांनी नंदुरबारमधल्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी आरोग्य सेविका अंजना परमार यांनी पंतप्रधानांना संवाद साधतांना, नंदुरबार जिल्हा हा मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवर असून, या भागातून नर्मदा सरोवर प्रकल्प असून पहाडी भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक पाड्यात राहतात. अशा लोकांना पावसाच्या दिवसांत आरोग्याची सुविधा देताना अडचणी निर्माण होतात. जून ते ऑक्टोबर महिन्यात या परिसरात एकूण ३३ गावांसह ६५ पाड्यांवर राहणाऱ्या सोळा हजार लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केला जात असल्याचे परमार म्हणाल्या. दररोज दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांचे मोदींजींनी अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी सातपुडा पर्वत रांगातील अंधश्रद्धेचे जाळे दूर करत आधुनिक विज्ञान घरोघरी पोहचवणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील महिला कर्मचाऱ्यांच्या कामाला शाबासकीची पावती दिली.

असे कार्य करतो तरंगता दवाखाना

सरदार सरोवरच्या परिसरातील ३३ गावे व ६५ पाड्यांसाठी आरोग्य विभागातर्फे तीन जलतरंग दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देतात. आरोग्य सुविधा देण्यासाठी एक बोटीला १० गावांचा कार्यक्रम निश्चित करून देण्यात येतो. या बोटीवरील कर्मचारी पाच दिवस नर्मदा सरोवरातील गावांना आरोग्य सुविधा पुरवितात. गेल्या पाच महिन्यांत तरंगता दवाखान्याच्या माध्यमातून ६१० लहान मुले, १३ हजार ३८३ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले असून, लहान मुलांना लसीकरणही करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद अवस्थेत पत्नीचा खून

$
0
0

हतनूर गावातील घटना; पतीला अटक

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे पतीनेच पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. मनीषा योगेश तायडे (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती योगेश अशोक तायडे (वय ३२, रा. सावतर निंभोंरा ता. भुसावळ ह. मु. हतनूर ता. भुसावळ) यास अटक करण्यात आली.

या घटनेतील आरोपी योगेश व मनीषाचा सुमारे नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता तर लग्नापासून आरोपी पती पत्नीचा छळ करीत होता तर या दरम्यानच्या काळात त्याने पत्नीला अनेकदा मारझोडही केली होती. दोन महिन्यांपूर्वीच त्याने जुनी कुरापत काढून पत्नीच्या डोळ्यावर मारहाण केल्याने तिला कमी दिसत असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आरोपी पतीने मद्यधूंद अवस्थेत दोरीने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला व पहाटे घराबाहेर येऊन आई-वडिलांना पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. याबाबत पोलिस पाटलांनी वरणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक सचिन सानप व सहकारी घटनास्थळी रवाना झाले. मात्र, मृत विवाहितेने फाशी घेतल्याचे कुठलेही व्रण व मृतदेह लटकला नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांना संशय बळावला. यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून विवाहितेच्या पश्‍चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

तरुणाचा गळफास
जळगाव : शहरातील कांचन नगर भागात असलेल्या संतोषी माता किराणा दुकानाजवळ रमेश अशोक ठाकरे (वय २५, रा. कांचन नगर, दर्गामागे) हे पत्नी आरती ठाकरेसोबत राहतात. त्यांना एक वर्षाचा मुलगा असून, ठाकरे कुटुंबीय दगडू निंबा सपकाळे यांच्या घरात भाड्याने राहत आहे. दारूच्या व्यसनाला पत्नी आरतीसोबत दररोज भांडण होत होते. रमेश ठाकरे हे मंगळवारी सकाळी दारून पिऊन आल्यानंतर पत्नी आरतीसोबत भांडणाला सुरुवात झाली. दररोजच्या या कटकटीमुळे मी कंटाळली असे आरती सांगून बाळ घरात सोडून त्यांचे जेठ यांच्याकडे गेल्या. या वेळी रमेश ठाकरे यांनी दारूच्या नशेत घर बंद करून पार्टेशनच्या खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. पत्नी आरती घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरती ठाकरे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लाचखोर लेखापाल ताब्यात
धुळे : साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत शिक्षकाने त्याचे ८४ हजारांचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी साक्री पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडे दाखल केले होते. हे मंजूर करण्यासाठी पंचायत समितीमधील लेखापाल प्रदीप साबळे आणि लिपिक नंदू खैरनार या दोघांनी शिक्षकाकडे लाचेची मागणी केली आणि तडजोडीअंती दोन हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना मंगळवारी दुपारी लाच घेतांना रंगेहाथ पकडून कारवाई केली. ही कारवाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या पथकाने केली.

चाकूचा धाक दाखवत लूट
रावेर : तालुक्यातील अहिरवाडी येथील बाहेरपूरा भागात महिलेस चाकूचा धाक दाखवून ८० हजार रोख रकमेसह दोन लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अहिरवाडी येथील बाहेरपूरा भागातील रहिवासी रवींद्र रघुनाथ चौधरी यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दोन लाख २० हजारांचा ऐवज लुटून नेला. रवींद्र चौधरी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर त्याचा मुलगा राहुल हा बाजूच्या खोलीत झोपला होता. राहूलच्या खोलीला चोरट्यांनी बाहेरून कडी लावून वत्सलाबाई यांनी चाकू व लोखंडी वस्तूचा धाक दाखवत १ लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे राणी हार, अंगठी, टापसे, बाल्या, मणी, मंगलोर व शोकेसमधून ८० हजार रुपये रोख रक्कम लुटून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुगंधी फुलांनी दरवळला बाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाला गुरुपासून (दि. १३) प्रारंभ होत असून सजावटीसाठी सुगंधी फुलांना पसंती दिली जात आहे. नैसर्गिक सजावटीसाठी फुलं हा अतिशय उत्तम पर्याय असून सजावटीसाठी याचा अधिकाधिक वापर केला जातो. गौरी-गणपतीच्या काळात सजावटीला विशेष प्राधान्य दिले जात असल्याने आपसूकच सुगंधी फुलांची मागणी वाढते. यंदाही हे चित्र कायम असून फुलबाजार गर्दीने गजबजला आहे.

भारतीय संस्कृतीतील विविध सण उत्सवांमध्ये विशेष आकर्षक ठरते ती खऱ्या फुलांची सजावट. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रुपात ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरत असतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी झुंबड दिसून येत आहे. झेंडू, शेवंती, अॅस्टर, गुलाब हे प्रकार तर फुलबाजारात ठिकठिकाणी दिसून येत आहेत. रंगीबेरंगी फुलांना बाजारालाही उत्साह, चैतन्याचे वातावरण असून फुलांचा दरवळ सर्वत्र पसरला आहे. नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरांमधून मुख्यत्वे फुले आणली जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

असे आहेत दर (प्रतिकिलो)

गुलाब तुकडा : २०० रुपये

शेवंती : १६० ते २०० रुपये

अॅस्टर : १६० ते २०० रुपये

झेंडू : ८० ते १०० रुपये

गुलाब : १५ ते २५ रुपये (प्रति नग)

लिली - २० रुपये (गुच्छ)

सण उत्सवांमुळे फुलांना मागणी चांगली आहे. दरांमध्ये नेहमीच्या तुलनेत वाढ झाली आहे. पूर्वी शेवंती १२० रुपये किलो होती आता ती १६० ते २०० रुपये किलो आहे.

- मीराबाई दिवे, फुल विक्रेत्या

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्ल्यूचे १२ दिवसांत तीन मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाने पाठ फिरवली असली तरी, थंड हवामानामुळे शहरात आता डेंग्यूसह स्वाइन फ्ल्यूनेही जोरदार दस्तक दिली आहे. बदलत्या हवामानामुळे शहरात स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, सप्टेंबर महिन्यातील बारा दिवसांत तीन जणांचा स्वाइन फ्ल्यूने बळी घेतला आहे. ३० जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत स्वाइन फ्ल्यूचे ४६ रुग्ण आढळले असून, त्यात सप्टेंबर महिन्यातील ३० जणांचा समावेश आहे. दोन आठवड्यातच स्वाइन फ्ल्यूच्या उद्रेकामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

शहरात सध्या डेंग्यूने थैमान घातले असून, ऑगस्टमध्ये आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ३६८ संशयीत रुग्ण आढळून आले असून, बाधीत रुग्णांचा आकडा १४८ पर्यंत गेला आहे. त्यामुळे शहराचे आरोग्य रामभरोसे असतानाच, आता स्वाइन फ्ल्यूचाही उद्रेक वाढला आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान शहरात ४६ रुग्णांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचे आढळले आहे. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्ल्यूच्या उपचारांसाठी हजारो रुग्ण दाखल झाले आहेत. परंतु, रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांची आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप केला जात आहे. शहरात स्वाइन फ्ल्यूने आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवासाठी भाविक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. गर्दीमुळे स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. नागरिकांना गर्दीपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. जयराम कोठारी यांनी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् मुंढे बाप्पाला पावले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालयांमध्ये देवदेवतांच्या प्रतिमा, मूर्ती काढून टाकण्याचे आदेश देणाऱ्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे गणपती बाप्पाला मात्र पावले आहेत. मुंढेंनी अखेरीस पालिका मुख्यालयात गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. पालिकेच्या मंडळानेदेखील रितसर मंडपाची परवानगी घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुख्यालयातील गणेशोत्सवाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. दरम्यान, नाशिकरोड, सिडको, पश्‍चिम विभागीय कार्यालयात गणेश मंडप टाकण्यास परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयुक्त मुंढेंनी पदभार घेतल्यानंतर पालिकेच्या विविध कार्यालयांमधे फेरफटका मारल्यानंतर या कार्यालयांमध्ये टेबलावर देवी देवतांच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत. त्यामुळे शासकीय परिपत्रकाचा आधार घेत, मुंढेंनी या सगळ्या प्रतिमा काढून टाकण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे शहर अभियंत्यांच्या कार्यालयात असलेली गणेश मूर्तीही त्यांनी हटवली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर मुंढेंनी आपल्या वाहनातील गणेशमूर्तीही काढून टाकली होती. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या वादात महापालिकेच्या मुख्यालयासह सहा विभागांमध्ये गणेशोत्सव साजरा होईल की नाही, यावर चर्चा सुरू होती. पालिका मुख्यालयासह मेनरोड कार्यालयात मानाचा गणपती बसविला जातो. यंदा तेथे गणेशोत्सव साजरा होईल की नाही याबाबत वाद निर्माण झाला होता. परंतु, उत्सव साजरा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची परवानगी मागितली व तत्काळ मिळाल्याने उत्सवाच्या तोंडावर निर्माण होणाऱ्या वादावर पडदा पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हृदयविकाराने जवानाचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

खालप (ता. देवळा) येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले विजय काशिनाथ निकम (वय ३८) यांचे सेवेत कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

विजय निकम हे २००३ पासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. राजोरी सेक्टर ( गजना ) येथे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि. ११) त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि. १४) खालप येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, शासकीय यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. खालप येथील सामाजिक कार्यकर्ते संजय निकम यांचे ते बंधू होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या मिळवा गणपती बाप्पांची मूर्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला आवडली असेल अन् गर्दीत जाऊन खरेदी करणे शक्य नसेल तर अशा गणेश भक्तांसाठी नाशिकमधील रँचोंनी बाप्पांला घरापर्यंत आणण्याासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शक्कल लढवित Indfest.com नावाची वेबसाइट तयार केली आहे. त्यावर नाशिकच्या दुकानांमधील आकर्षक आणि इको फ्रेंडली गणेश मूर्ती डिस्पे केल्या आहेत. ऑनलाइन बुक केल्यास या मूर्ती तुम्हाला घरबसल्या मिळू शकणार आहे. नाशिककरांचा या सुविधेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानामुळे गणेशोत्सव बदलत आहे. गणपत्ती बाप्पाला घरपोच आणून देण्याची सुविधाही आता ऑनलाइन झाली असून नाशिकच्या के. के. वाघ इंजिनीअरिंगच्या १४ जणांच्या टिमने ही करामत केली आहे. बाप्पांची मूर्ती घरी आणण्यासाठी बाजारात जायचे नसेल, तुम्हाला वेळ नसेल, तर तुमचा आवडता बाप्पा घरपोच देण्याची सुविधा या रँचोंनी उपलब्ध करून दिली आहे. इंजिनीअरिंगच्या या तरुणांनी indfest.com नावाची वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटवर नाशिकच्या वेगवेगळ्या दुकानांमधल्या आकर्षक गणेश मूर्तीचे फोटो काढून, तसेच त्यांची लांबी-रुंदी-उंची, त्यांचा रंग, फेट्याचा रंग, पितांबराचा रंग अशी संपूर्ण माहिती डिस्प्ले करण्यात आली आहे. केतन नवले आणि त्यांच्या १४ जणांच्या टीमने ही अनोखी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मूर्तीसोबत पूजा साहित्यही

वेबसाइटवर वेगवेगळ्या कॅटॅगरीज केल्या आहेत. यात शाडू माती, लालबाग राजा, बाल गणेश, दगडू शेठ, लोडवर टेकलेले, दागिने घातलेले अशा बाप्पांच्या अशा अनेक मूर्ती आहेत. शाडूच्या मातीचे गणपतीही तुम्हाला या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. यासोबतच इको फ्रेंडली डेकोरेशनचं साहित्य आणि पूजा साहित्यही उपलब्ध असेल. विशेष म्हणजे कॅश ऑन डिलेव्हरी आणि 'पेटीएम'ची सोय असल्याने नाशिककरांनी या वेबसाइटला चांगला प्रतिसाद दिला आहे.

''अभ्यासासोबत समाजसेवाही करता यावी, हिंदू सण हायटेक होऊन सर्वांनाच त्याचा आनंद घेता यावा यासाठी ही संकल्पना राबवली. त्यासाठी फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे. गणपती मूर्ती घरी मिळाल्यावरही पैसे देऊ शकतात.'' - केतन नवले, सदस्य, टिम इंडोफेस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यावे गणराया!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विघ्नहर्ता गणेशाचे आज आगमन होणार असून, त्याच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुकिंग करून ठेवलेल्या गणेशाचे आज घरा-घरांमध्ये तसेच मंडळांच्या मंडपात आगमन होणार आहे. अनेक मंडळांचे देखावेही पूर्ण झाले आहेत.

शहरातील प्रमुख असलेल्या रविवार कारंजा गणेशोत्सव मंडाळाची प्राणप्रतिष्ठा पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते होणार आहे. त्याअगोदर श्रींची तिवंधा येथील बाळू संगमनेरकर यांच्या घरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संध्याकाळपासून देखावे भाविकांसाठी खुले होणार आहेत.

बाप्पाचे आगमन होणार असल्याने शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलल्या असून गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी सराफ बाजार, रविवार कारंजा तसेच नाशिकरोड, जेलरोड पाटीदार भवन येथेही गर्दी होत आहे. अनेक नागरिकांनी सोमवारपासूनच मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. मूर्तींबरोबरच पूजेचे सामान, पाट, वस्त्र, पाच फळे यांनाही चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे गणपतीच्या पूजेला लागणारी पत्री विक्रीस आली आहे. घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक मंडळांच्या तयारीला वेग आला आहे. मंडळांचे मंडप उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आले असून, सर्व भक्त बाप्पांच्या आगमानाची आतुरतेने वाट बघत आहे.

शहरातील गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मंडळांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, काही मंडळांचे देखावे पूर्ण झाले आहे. काही मंडळाच्या देखाव्यांची रंगरंगोटी सुरू आहे. बी. डी. भालेकर मैदानाजवळील मंडळांनी आपली कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. काही मंडळांचे देखावे विद्युत रोषणाईचे तर काही चलतचित्रांचे आहेत. त्यांनीही आपल्या कामाला सुरुवात केली आहे. पंचवटी, मेनरोड, भद्रकाली, जुने नाशिक, रविवारपेठ, अशोक स्तंभ परिसरात कामे पूर्णत्वास येत आहेत. परंतु, शहराच्या उपनगरांमध्ये हा वेग कमी आहे. काही मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु काही मंडळाचे देखावे मोठे असल्याने उशिराने उघडण्यात येतील असे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

शहरात चैतन्य

गणपतीला लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी रविवार कारंजा परिसरात गर्दी झाली असून, वाहतूक जाम होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. महात्मा गांधी रोड ते नेहरू चौक हे अंतर कापण्यासाठी पादचाऱ्यांना किमान अर्धा ते पाऊण तास लागत आहे. अशीच परिस्थिती मेनरोड परिसरात आहे. येथे गणपतीच्या आराशीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. फुल विक्रेते, गणपतीला लागणारे पाट, पत्री यासाठी रविवार कारंजा, बोहोरपट्टी, सराफबाजार येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पूजेचे सामान खरेदी करण्यासाठी रविवार कारंजावर असलेल्या सर्व दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिस सज्ज!

$
0
0

\Bपोलिस अधीक्षक दराडे यांचे मत; गणेशोत्सवासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित\B

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनीक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी सामाजिक कार्य करण्यासाठी पुढे यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. कोर्टाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई होणारच, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिला.

गणपती बाप्पांच्या आगमानाच्या पूर्वसंध्येला तालुका पोलिस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गतवर्षी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते. तर ३९ मंडळावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. यंदाही ध्वनी प्रदूषणाबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट असून, नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले. ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांकडे ६० ध्वनीमापन यंत्रे आहेत. यावेळी अपर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे उपस्थित होते. एक गाव एक गणपती या संकल्पेनस ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बाराशेपैकी एक हजारावर गावांमध्ये ही संकल्पना पूर्णत्वास येणार आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा

मालेगाव शहरात २५ सीसीटीव्ही तर चार मोक्याच्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे असणार आहेत. या व्यक्तिरिक्त जिल्ह्याच्या इतर भागात १४० मंडळांच्या ठिकाणी तसेच विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

--

असा असेल बंदोबस्त

१ पोलिस अधीक्षक

२ अपर पोलिस अधीक्षक

११ पोलिस उपअधीक्षक

४५ पोलिस निरीक्षक

१२५ एपीआय अथवा पीएसआय

२८०० पोलिस कर्मचारी

१४०० होमगार्ड्स

दोन राज्य राखीव दलाच्या कंपन्या

जलद कृती दल, दंगल नियंत्रण पथक, घातपात विरोधी पथक, स्ट्रायकिंग फोर्स

पोलिस मित्र व ग्रामरक्षक दल सदस्य

--

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

हद्दपारी-७१

दारूबंदी-४६

टवाळखोर-१२२५

सराईत गुन्हेगार-४०

--

डीजे मुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आला असून, तो विद्यार्थी, तरूणांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- संजय दराडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्माकोलच्या मखरांची जप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर मखर खरेदी करण्यासाठी भक्तांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्य बाजारपेठेत झालेल्या गर्दीत थर्माकोलच्या मखरांची विक्री केली जाणार होती. मेनरोड परिसरातील गोदामात थर्माकोलच्या मखरांचा मोठा साठा असल्याची माहिती महापालिका प्रशासनास मिळाली. पालिका प्रशासनाने या मखरांची विक्री होण्यापूर्वीच गोदामावर छापा टाकत सर्व मखरांची जप्ती केली. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत थर्माकोलच्या मखरांची विक्री होऊ शकली नाही.

यंदापासून प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही मेनरोड परिसरातील चित्रमंदिर सिनेमागृहाच्या पाठीमागे असणाऱ्या गोदामात थर्माकोलच्या मखरांचा साठा करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर या मखरांची विक्री होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पश्चिम विभागाला मिळाली. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी गोदामावर लक्ष ठेवून होते. परिसरातील विक्रेत्यांच्या हालचालींवर देखील महापालिकेने बारिक लक्ष ठेवले. त्या गोदामात थर्माकोलच्या मखरांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याचे महापालिका प्रशासनाच्या लक्षात आले. मखरांची विक्री होत असल्याची खात्री करण्यासाठी महापालिकेच्या पश्चिम विभागाने गोदामात खोटे गिऱ्हाईक पाठवले. त्या गोदामात थर्माकोलच्या मखरांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिकेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांसह आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामावर छापा टाकला. या कारवाईत गोदामातील दीडशेहून अधिक मखर पालिका प्रशासनाने जप्त केले. तसेच गोदाम व्यावसायिकाला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.

'छुपके' थर्माकोल विक्री

थर्माकोल आणि प्लास्टिक बंदी असल्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुठ्ठा, लाकूड आणि फोमपासून तयार केलेल्या मखरांची विक्री तेजीत होती. मात्र, गणेशोत्सावाच्या एक दिवस अगोदर शहरातील काही बाजारपेठांमध्ये छुप्या पद्धतीने थर्माकोलच्या मखरांची विक्री होताना दिसली. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाकडे नागरिकांचा कल असल्याने थर्माकोलचे मखर खरेदीस फारशी पसंती नव्हती. पण, थर्माकोल बंदीच्या नियमाला धाब्यावर बसवत काही विक्रेत्यांनी मखरांची छुप्या पद्धतीने विक्री केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लू दोघांचा मृत्यू

$
0
0

स्वाइन फ्लू दोघांचा मृत्यू

नाशिक : स्वाइन फ्लू आजाराने संदीप सोळस, (वय ६०, रा. शिरसगाव ता. निफाड) आणि सुरेश थोरात (वय ४२, रा. आघार, ता. मालेगाव) या रुग्णांचा मृत्यू झाला. हे दोघेही रुग्ण जिल्हा रूग्णालयातील स्वाइन फ्लू दक्षता कक्षात उपचार घेत होते. उपचारादरम्यान या रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू

$
0
0

दिंडोरी : तालुक्यातील कोराटे येथे मनोज शिवाजी शिंदे (वय ३७ वर्षे) या शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

कोराटे येथील मनोज शिवाजी शिंदे हे सकाळी डेअरीत दूध जमा करून आल्यानंतर आपल्या शेतातील विहिरीत मोटारीचा पाइप बांधण्यासाठी पत्नीसोबत गेले होते. त्यांच्या पत्नी पाइप धरून होत्या मनोज शिंदे हे विहिरीत मोटरच्या फाउंडेशनवर उभे होते. पाइप बांधताना पाय घसरून शिंदे विहिरीत पडले. हे बघताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड सुरू केली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, शेतकरी येईपर्यंत वेळ झाला. तोपर्यंत शिंदे हे पाण्यात बुडाले होते.

कोराटे गावातील शेतकरी व गावकऱ्यांनी शिंदे यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांचा मृतदेह दिंडोरी येथे शवविच्छेदन करून शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिंडोरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनोज शिंदे हे घरातील कर्ते पुरुष होते, त्यांच्या मृत्यूने शिंदे कुटुंबीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेतल विश्वकर्माला सबज्युनियरचे विजेतेपद

$
0
0

…महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या हेतल विश्वकर्माने सब ज्युनीअर (१३ वर्षाखालील) गटाचे विजेतेपद मिळविले.

हेतलने उप-उपांत्यपर्व फेरीत नागपूरच्या अनन्या गाडगीळचा पराभव केला. तर उपउपांत्य फेरीत नागपूरच्याच आरती चौघुलेंचा २१-९ आणि २१-१२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर उपांत्य फेरीत मुंबईच्या आर्य कोरगावकर हिच्याविरुद्ध खेळतांना हेतलने २१-१७ असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. हेतलची अंतिम लढत या गटात प्रथम मानांकन मिळालेल्या अलिशा नाईक हिच्याविरुद्ध झाली. अत्यंत्य चुरशीच्या झालेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये हेतलला अलिशाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये हेतलने पिछाडी भरून काढत बरोबरी साधली. हेतलने सुंदर ड्रॉपच्या वापर करून हा सेट २३-२१ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा सेट २१-१६ असा जिंकून सब-ज्युनियर गटाचे महाराष्ट्राचे विजेतेपद पटकावले. हेतल विश्वकर्मा ही न्यू इरा शाळेत शिकत असून ती तीन वर्षांपासून गंगापूर रोड येथील शिवसत्य क्रीडा मंडळात मकरंद देव यांच्याकडे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा ‘यश’जयपुरात चमकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जयपूर (राजस्थान) येथे पार पडलेल्या एमआरएफ सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकच्या यश पवारने चौथ्या फेरीत उत्कृष्ठ कामगिरी करीत दोन गटांत तिसरे स्थान मिळविले. जयपूर मधील मानसरोवर परिसरात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धात्मक असलेल्या ट्रॅकवर आधी पाऊस पडल्याने स्पर्धकांसाठी आव्हानात्मक चुरस निर्माण झाली होती. स्पर्धेत नाशिकच्या यश पवारने फॉरेन ओपन गटात तिसरे स्थान तसेच प्राइवेट फॉरेन गटात तिसरे स्थान मिळवले. प्राइव्हेट फॉरेन गटात दुसऱ्या एका अवघड वळणावरती छोटा अपघात होऊन सुद्धा यशने अंतिम फेरीत तिसरे स्थान पक्के केले. तो वयाच्या १२ वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. त्याला वडील मोहन पवार, सुरज कुटे, गणेश लोखंडे, बाळू बेंडाळे, श्रीकांत चव्हाण (पुणे) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्क्वॉश रॅकेट स्पर्धेवर मुंबईचे वर्चस्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा स्क्वॉश रॅकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय स्क्वॉश रॅकेट स्पर्धेवर मुंबई विभागाने वर्चस्व राखले. नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षे मुलाची अंतिम लढत मोहीत भट आणि आकाश गुप्ता या दोन्हीही मुंबईच्या खेळाडूंमध्ये झाली. मोहीत भटने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

१९ वर्षे मुलांच्या अंतिम लढतीत मुंबईच्या दीपक मंडलने सुरवातीपासून चांगला खेळ करत या सामन्यावर वर्चस्व राखून ही लढत सरळ दोन सेटमध्ये जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या १७ वर्षे वयोगटात अंतिम लढत मुंबईची अंजली सोनपाल आणि औरंगाबादची आर्या पाटील यांच्यात खेळविण्यात आली. या लढतीत राष्ट्रीय खेळाडू अंजलीने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

मुलीच्या १९ वर्षे गटात मुंबईची सुनीता पटेल आणि अमरावतीची संस्कृती उपक यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सुनीताने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक मकरंद देव, या स्पर्धेचे संयोजन सचिव संजय होळकर, स्पर्धा प्रमुख प्रकाश पवार, तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-अहमदाबाद विमानसेवा पुढील महिन्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ते दिल्ली विमानसेवा सुरू झाल्यानंतर नाशिककरांना नाशिक ते अहमदाबाद विमान सेवेची प्रतीक्षा होती. उडान योजनेच्या दुसऱ्या टप्पात नाशिक ते अहमदाबाद ही विमानसेवा ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. नाशिक आणि अहमदाबाद या दोन शहरांतील व्यापाराला यामुळे चालना मिळणार असल्याचे मत खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील नाशिक-अहमदाबाद विमानसेवा २८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. खासदार गोडसे यांनी उडान योजनेच्या उपसचिव उषा पाधी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटी दरम्यान ही माहिती पाधी यांनी दिली. टर्बो मेगा एअरवेज कंपनीमार्फत ही सेवा पुरविली जाणार आहे. ७२ प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानसेवेसाठी प्रवाशांकडून २०६० रुपये प्रवास भाडे आकारण्यात येणार आहे. नाशिक ते अहमदाबाद हा ३५९ किलोमीटरचा प्रवास १ तास १० मिनिटांत होणार आहे. दररोज दुपारी १२ वाजता अहमदाबाद विमानतळावरून विमानाचे टेकऑफ होईल. साधारण १ वाजून १० मिनिटांनी हे ओझर विमान तळावर पोहोचेल. नाशिक आणि अहमदाबाद येथील विमानतळावर टाइम स्लॉटची उपलब्धता पाहून विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध सिगारेट विक्रीवर ‘एफडीए’ची कारवाई

$
0
0

श्रमिकनगरमधील पानटपरी चालकांची झाडाझडती

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

आरोग्याला हानीकारक असलेल्या तसेच कुठल्याही प्रकारचे वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटच्या पाकिटांची सातपूर भागात खुलेआम विक्री केली जात

असल्याचे वृत्त 'मटा'ने मंगळवारी प्रसिद्ध केले. यानंतर अवैध सिगारेटच्या धुराची पोलिस व अन्न औषध प्रशासनाने (एफडीए) सातपूर परिसरात ठिकठिकाणी झाडाझडती करीत कारवाईचा दणका दिला.

गुप्त माहितीच्या आधारे श्रमिकनगर भागात एका पानटपरीवर रुली रिव्हर या प्रतिबंधित सिगारेट विक्री केली जात असल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना समजले. यानंतर पोलिसांनी श्रमिकनगरच्या माळी कॉलनी येथे जाऊन ६ बाय ४ च्या टपरीतून प्रतिबंधित सिगारेट जप्त केल्या. तसेच संबंधित सिगारेट विक्रेता किशोर चिंधडे यास पोलिसांनी माहितीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंधडे याच्याकडून एकूण ५४ सिगारेटची प्रतिबंधित पाकिटे ताब्यात घेण्यात आली आहेत. यात रुली रिव्हरसह इतरही प्रतिबंधित सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सिगारेट पाकिटांची किंमत ३ हजार दोनशे रुपये आहे. पोलिसांनी विना परवाना प्रतिबंधित सिगारेट विक्री अधिनियम २००८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कऱ्हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images