म. टा. प्रतिनिधी, नाशिक अंतराळ संशोधन व विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर काम करणाऱ्या नॅशनल स्पेस सोसायटीचे लोकल चॅप्टर नाशिकला सुरू करण्यात आले आहे. भारतातील कोलकाता व चंडिगड येथे संस्थेचे केंद्र असून, महाराष्ट्रात पूर्णवेळ कार्यान्वित असलेले लोकल चॅप्टर यानिमित्त नाशिकला सुरू झाले आहे. नाशिक स्पेस सोसायटी नाशिक इंडिया चॅप्टर या नावाने हे केंद्र ओळखले जाणार आहे. इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ अविनाश शिरोडे यांची या चॅप्टरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चॅप्टरचा नाशिकमधील विद्यार्थ्यांना लाभ होणार असून, विशेषत: अंतराळ क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लब महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्राविषयी जनजागृती करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. अंतराळ क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, विविध स्पर्धा, कार्यशाळाही याअंतर्गत घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अध्यक्ष अविनाश शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. शहरात प्रथमच अंतराळ क्षेत्रातील शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होणार आहे. नाशिकमध्ये प्रथमच अवकाश संशोधनाचा प्रसार होणार आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत शालेय विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाची ओळख व्हावी यासाठी अॅस्ट्रॉनॉमी क्लब सुरू करण्यात आला आहे. लवकरच विद्यार्थ्यांची नोंदणीप्रक्रिया सुरू होणार आहे. - अविनाश शिरुडे, अध्यक्ष, नॅशनल स्पेस सोसायटी लोकल चॅप्टर नाशिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट