Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बाजारात वाढली फळांची रेलचेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाजारात फळांची आवक वाढू लागल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. सफरचंदपासून पपईपर्यंत सर्वच फळ बाजारात उपलब्‍ध असून, दरही थोडे कमी झाले आहेत. यामुळे फळांनाही चांगली मागणी आहे.

नोव्हेंबरपासून साधारणतः फळांची आवक वाढण्यास सुरुवात होते. अर्ली द्राक्षही बाजारात आले आहेत. पपई, बोर, सीताफळ, चिक्कू या फळांची बाजारात रेलचेल वाढली आहे. सफरचंदचे दरही थोडे कमी झाले असून, ८० ते १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सीताफळांची बाजारात आवक मोठ्या प्रमाणात असून, दर ४० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. बोरही बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यात गोडवा कमी असल्याने मागणी कमी असल्याने दरही कमी आहेत. बोर २० ते २५ रुपये किलोने विक्री होत आहेत.

अर्ली द्राक्ष बाजारात दाखल झाले असले तरी निर्यातीवर जास्त भर दिला जात आहे. स्‍थानिक बाजारपेठेत द्राक्ष उपलब्‍ध असले तरी दर सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर आहेत. किलोला द्राक्षाला दोनशे रुपये दर मिळत आहे. डिसेंबर म‌हिन्यात द्राक्षांची आवक वाढून स्‍थानिक बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होतील. केळी, किवी या बारमाही फळांचे दर कायम आहेत. बाजारात टरबूचेही आगमन झाले आहे. परंतु, आवक खूपच कमी आहे. पेरूचीही आवक बाजारात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पेरु ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. येत्या काही दिवसात आवक वाढून दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

फळांचे किलोचे दर
सफरचंद - ८० ते १२०
चिक्कू - ६०
पपई - ३०
केळी - ३०
पेरू - ६० ते ८०
बोर - २० ते २५
किवी - ४० रुपये नग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरव्यागार पालेभाज्यांचा बहर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

थंडीचा मोसम सुरू झाला आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे. बाजार समितीचे आवार रोजच सायंकाळच्या लिलावासाठी तुडूंब भरू लागले आहे. हिरव्यागार कोवळ्या पालेभाज्यांनी मार्केटला बहर आला आहे.

गेल्या तीन महिन्यात विक्रमी दर मिळविणाऱ्या पालेभाज्यांचे दर सध्या खाली येऊ लागले आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे कमी झालेली लागवड आणि त्यानंतर पावसाळ्यात खरिप हंगामात जोरदार पावसांच्या सरींमुळे पालेभाज्यांचे उत्पादन घटले होते. मागणी वाढत असल्याने पालेभाज्यांचा विशेषतः गावठी कोथिंबीरच्या दरांनी उच्चांक गाठला होता.

थंडी सुरू झाल्यानंतर भाजीपाला पिकांना पोषक हवामान मिळत असल्याने त्यांचा वाढ चांगली होते. भाजीपाल्यावर रोग-कीडींचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात होतो. त्यामुळे या काळात बुरशीनाशके व किडनाशके यांच्या फवारण्या फारच कमी प्रमाणात केल्या जातात. पालेभाज्यांना हिवाळ्यात चांगला बहर येतो. मेथीसारखी पालेभाजी हिवाळ्यात पोषक मानली जाते. या काळात मेथी चांगली बहरते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातील वातावरण मानवत नसल्याने मेथीची आवक कमी होत असते. ती हिवाळ्यात वाढते; सध्या कोथिंबीरीपेक्षाही मेथीची आवक जास्त होत आहे. कोथिंबीरीचे दर यंदा वर्षी उन्हाळा तसेच पावसाळ्यात वाढतच राहिले होते. ते आता कमी झाले आहे. हिवाळ्यात पडणाऱ्या दवामुळे शेपू पिवळी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी सकाळी दव झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कांदापातीचा दर्जा उत्तम असल्याचे ग्राहकांचे मत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव होतात. सध्या सुमारे दोन ते अडीच लाख पालेभाज्यांच्या जुड्या विक्रीस येत आहेत. आवक वाढलेली असल्याने पालेभाज्यांसाठी मार्केटचे आवार कमी पडू लागली आहे. पालेभाज्या लिलावासाठी उघड्या ठेवण्यासाठी मोकळी जागा व्हावी, यासाठी वाहनांची पार्किंग बाजारापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही हिवाळ्यात पालेभाज्यांची आवक टिकून राहणार असल्याचे दिसते. नाशिकच्या पालेभाज्यांचा दर्जा चांगला असल्याने मुंबई आणि गुजरात दोन्ही ठिकाणच्या मार्केटमध्ये त्यांना चांगली मागणी असते. आवक वाढलेली असली तरी दर चांगले मिळत आहेत.
- चंद्रकांत निकम, अडतदार

पालेभाज्या ...................दर (प्रति किलोत)
कोथिंबीर (गावठी)...........१५ ते २५
कोथिंबीर (छानी).............१० ते १५
मेथी...............................५ ते १५
शेपू................................१० ते १८
कांदापात.........................१० ते २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेटसाठी ४० टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिल्यांदाच झालेल्या सिनेट निवडणुकीसाठी रविवारी नाशिकसह नगर आणि पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर एकत्रितपणे सुमारे ४० टक्के मतदान झाले असल्याची माहिती विविध उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मिळाली.

विद्यापीठ प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही. या मतदानात तीनही जिल्ह्यांमध्ये नाशिकमधून सर्वाधिक प्रतिसाद मतदारांकडून मिळाला आहे. तर पुण्यातही मतदानाचा टक्का यंदाच्या निवडणूकीत वाढला आहे.

सिनेटवरील १० जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांनी क्षमता पणाला लावली. तीनही जिल्ह्यातून सुमारे ४९ हजार मतदारांनी नोंदणी केली होती. पैकी सुमारे २१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शहर आणि जिल्ह्यातही २१ केंद्रांवर मतदान झाले. मतदानास रविवारी सकाळी ७ वाजेपासून सुरुवात करण्यात आली. मतदानासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. आता उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणीद्वारे निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे.

नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणुकीत नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सुमारे १० हजारांवर मतदार नाशिक जिल्ह्यातून होते. पैकी सुमारे साडेचार ते पाच हजार मतदान एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाल्याचा अंदाज आहे. या पाठोपाठ पुण्यातील मतदानाची आकडेवारी गत सिनेट निवडणुकांच्या तुलनेत वाढली आहे. गेल्या वेळी सिनेटसाठी पुणे जिल्ह्यात अवघे १५ टक्के मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी सुमारे ३० टक्क्यांपर्यंत नोंदविले जाण्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्याचा प्रतिसाद आहे.

जिल्ह्यातून ५ हजारावर मतदान

जिल्ह्यात सुमारे १० हजार मतदार आहेत. पैकी या मतदानासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एका केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. शहरासाठी ६ केंद्र देण्यात आली होती. यामध्ये भोसला कॉलेज (गंगापूररोड), के. के. वाघ कॉलेज (पंचवटी), व्ही. एन. नाईक कॉलेज (कॅनडा कॉर्नर), बिटको कॉलेज (नाशिक), एचपीटी कॉलेज (कॉलेजरोड) आणि शांताराम बापू वावरे कॉलेज (सिडको) या केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली.

व्यवस्थापन गटातून ९९ टक्के मतदान

व्यवस्थापन गटातून संस्थाचालकांचे एकूण २२९ मतदान होते. पैकी २२७ मतदान झाले आहे. ही आकडेवारी सुमारे ९९ टक्क्यांच्या घरात आहे. पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि या विद्यापीठाशी संलग्न कॉलेजेसची संख्या नाशिक जिल्ह्यातून लक्षणीय आहे. त्यानुसार या जिल्ह्याला अधिसभेत योग्य प्रतिनिधित्वाची गरज आहे. त्यादृष्टीने या निवडणुकीपासून नाशिककर आशा बाळगून आहेत. या निवडणुकीसाठी नाशिकमधून व्यवस्थापन गटातून अशोक सावंत हे रिंगणात आहेत. पदवीधर सदस्य पदासाठी एकता पॅनलच्या वतीने ‘मविप्र’चे डॉ. तानाजी वाघ, राखीव गटातून ‘मविप्र’च्या तीसगांव शाळेतील मुख्याध्यापक विश्वनाथ पाडवी, व्ही. एन. नाईक संस्थेचे विजय सोनवणे तर प्रगती पॅनलच्या वतीने हेमंत दिघोळे हे रिंगणात आहेत. जयकर ग्रुप प्रणित विद्यापीठ विकास मंडळातर्फे अॅड. बाकेराव बस्ते हे उमेदवार नाशिकचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नृत्यानुष्ठान’ने फेडले डोळ्यांचे पारणे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नृत्यानुष्ठानाचे तिसरे पुष्प तन्वी पालव आणि भक्ती देशपांडे या कथक नृत्यांगनांनी गुंफले. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम झाला.

शहरातील कीर्ती कला मंदिर या कथक नृत्य संस्थेच्या दरवर्षी होत असलेल्या पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाने यंदा २५ वे वर्ष साजरे केले. त्यानिमित्ताने संचालिका रेखा नाडगौडा यांनी नृत्यानुष्ठान म्हणून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी २५ गुरूंच्या २५ शिष्यांची नृत्यप्रस्तुती नाशिकच्या रसिकांसाठी झाली. यात तिसरे नृत्य प्रस्तुत झाले.

प्रथम प्रस्तुती गुरू लता वाकलकर यांच्या शिष्या तन्वी पालव यांची होती. त्यांनी दुर्गास्तुतीने नृत्याचा प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा रुद्र ताल, परंपरेनुसार थाट, आमद, परण, चक्रदार, परण, रेला सादर केले. अभिनयात पारंपरित ठुमरी तन्वी पालव यांनी पेश केली. ‘ए री सखी मोरे पिया घर आये’ या ठुमरीवर त्यांनी नृत्य सादर केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गुरू विद्याहरी देशापांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी नृत्य सादर केले. गणेश परणने त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा ४ ताल की सवारी सादर केला. अभिनयात गिरिजादेवींची चैती ‘यँही थैय्या मोतिया हैरा गयी’ सादर केली. त्यानंतर तीन तालमध्ये होरी सादर केली.

कार्यक्रमासाठी तबल्यावर विवेक मिश्रा, गायन व संवादिनीवर रसिका जानोरकर, बासरीवर हिमांशू गिंडे तर पढंतवर विद्याहरी देशपांडे यांनी साथसंगत केली. प्रारंभी मुकुंद पानसे, जगदीश फडके, रेखा नाडगौडा, अदिती पानसे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. रेणुका येवलेकर यांनी निवेदन केले. यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नृत्यानुष्ठानाचे पहिले व दुसरे पुष्प रसिक प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादात झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणारे संशयित जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव शहरातील घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी घरफोडीच्या गुन्ह्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित केले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयित आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे मालेगाव पथकातील अधिकारी व कर्मचारी कुसुंबा रोड, सलीमनगर भागात गस्त घालताना पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना सराईत गुन्हेगारांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून जिशान नफिस अहमद (२२, सलीमनगर) यास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आसीफ अली सईद अहमद (रमजानपुरा) इमरान शहा अरमान शहा उर्फ इम्मु (सलीमनगर), वसीम (पूर्ण नाव नाही. रा. सलीमनगर) यांची नावे समोर आली. या सर्वांनी सोयगावरोड, मालेगाव कॅम्प परिसरात १५ दिवसांपूर्वी घरफोडी केल्याची कबुली दिली. यातील आसीफ अली सईद अहमद यास सलीमनगर भागात जेरबंद केले.

आसीफच्या ताब्यात तीन फोन, एक लॅपटॉप, एक पिस्तुलासारखे दिसणारे लायटर, एक एअरगन, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने, लोखंडी टॉम असा एक लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर संशयित सराईत असून, एअरगनचा वापर करून त्यांनी मोबाइल हिसकावून नेल्याचे गुन्हे केले आहेत. दरम्यान, याच पथकाने सोयगाव परिसतान राहुल मोतीराम पाटील (२८, ओमकार कॉलनी, सोयगाव) व एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. संशयितांनी हे मोबाइल सोयगाव येथील मोबाइल शॉपी फोडून चोरी केले होते.

पोलिस अधीक्षकांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा चांगलाच धसका ग्रामीण पोलिस दलाने घेतल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीगावातील तरुणीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देवळालीगावातील तरुणीने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी विजय शिरसाठ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता. लवकरच तिचा विवाह होणार होता. परंतु, त्याआधीच तिने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे देवळालीगावात हळहळ व्यक्त होत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकलेले नाही. उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वैष्णवीवर शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारकार्ड अभावी नोकरी संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ आधार कार्ड अपडेट नसल्याने नोकरदारांवर रोजगार गमावण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नवीन नोकरीसाठी निवडल्या जाणाऱ्या नोकरदारांना पीएफ नोंदणीसाठी अपडेटेड आधारकार्डच सक्तीचे असून ते मिळविण्यासाठी वणवण करण्याची वेळ या नोकरदारांवर आली आहे.

आधारकार्ड ही आता प्रत्येक भारतीय नागरिकाची विशिष्ट ओळख बनली आहे. प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड सक्तीचे होत असल्याने ते अपडेट ठेवणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे आधारकार्ड अपडेशनसाठी प्रत्येकाचीच धावपळ सुरू असल्याचे पहावयास मिळते आहे. खासगी आधार सेंटर्सबद्दलचे तक्रारी वाढू लागल्याने शहरातील असे सर्वच खासगी आधार सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना आधार संबंधीची कामे मार्गी लावता यावीत यासाठी सरकारी कार्यालये, महापालिकेच्या शाळांमध्ये आधार सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. परंतु, गर्दी अधिक आणि आधार केंद्रांची संख्या तोकडी यामुळे नागरिकांची वणवण काही कमी होऊ शकलेली नाही. भविष्य निर्वाह निधी कार्यालयानेही (पीएफ) जन्मतारखेचा पूर्ण उल्लेख असलेलीच आधारकार्ड स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन नोकरीवर रुजू होऊ पहाणाऱ्यांनाही या निर्णयाचा फटका बसू लागला आहे. पूर्वी काढलेल्या आधारकार्डवर केवळ जन्म वर्षाचा उल्लेख आहे. नवीन ठिकाणी रुजू होण्यापूर्वी नोकरदारांना कंपनीच्या मानव संसाधन (एचआर) विभागामार्फत पीएफची कार्यवाही पूर्ण करून द्यावी लागते. परंतु, अनेकांच्या आधारकार्डवर केवळ जन्मवर्षाचाच उल्लेख असल्याने त्यांना रूजू करवून घेताना आमचीच कोंडी होऊ लागल्याची माहिती सातपूर औद्योग‌िक वसाहतीमधील एका कंपनीच्या एच आर अधिकाऱ्याने दिली.

आधारकेंद्राची शोधाशोध

नोकरी सोडून अन्य ठिकाणी रुजू करू पहाणाऱ्यांना ऐनवेळी आधारकार्ड अपडेटसाठी धावाधाव करावी लागते आहे. खासगी केंद्र बंद असल्याने त्यांना सरकारी कार्यालयांमधील आधारकेंद्रांची शोधाशोध करावी लागत आहे. नोकरदारांपासून कंपन्यांच्या एचआर विभागातील सर्वांनाच या प्रक्रियेमुळे अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवडते क्षेत्रच यशाचा मंत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बालपणापासून ज्या क्षेत्राची आवड आहे, त्यासाठी लागणाऱ्या कलागुणांचा विकास विद्यार्थ्यांनी करावा. आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य मधुकर जगताप यांनी केले.

संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात आयोजित करिअर फेअरच्या उद््घाटनप्रसंगी जगताप बोलत होते. मानव विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे, शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, डॉ. सारंग इंगळे, करिअर फेअरप्रमुख मालन कराळे, प्राचार्य प्र. ला. ठोके यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकाश कोल्हे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. वसंत जोशी व शोभना भिडे यांच्या उपस्थितीत या फेअरचा समारोप झाला. स्वाती धारकर, विद्या महाले, स्वप्ना मालपाठक, रुपाली झोडगेकर यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप वाणी, उमाकांत वाकलकर, ज्ञानेश्वर रंधे, विजय कुमावत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रेखा हिरे व शकुंतला परदेशी यांनी आभार मानले. माजी मुख्याध्यापक उदय शेवतेकर, शरद निकम, माजी शिक्षक नरेश महाजन, सुहासिनी साने, चंद्रकला जोशी, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा मंगला जाधव आदी उपस्थित होते.


माजी विद्यार्थ्यांच्या ‘टिप्स’

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वीतेचा मंत्र विद्यार्थ्यांना सांगितला. नाट्य कलावंत व दिग्दर्शक महेश डोकफोडे यांची मुलाखत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य व कवी प्रशांत केंदळे यांनी घेतली. ज्या विद्यार्थ्यांना अभिनयाची आवड आहे त्यांना नाट्य क्षेत्र व चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे डोकफोडे यांनी सांगितले. ‘महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांची मुलाखत वृत्त निवेदक विशाल परदेशी यांनी घेतली. पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असल्याची माहिती तनपुरे यांनी दिली. ते म्हणाले, की समाजाला न्याय देण्यासाठी पत्रकारिता हे उत्तम माध्यम आहे. पत्रकारांना कोणताही विषय वर्ज्य नसतो. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी व जिद्द पाहिजे. विशाल परदेशी यांनी काही राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढून विद्यार्थ्यांची दाद मिळविली. नालंदा कॅपिटल मुंबईचे संचालक मुकुंद धोंडगे यांची मुलाखत आकाशवाणीचे निवेदक धनेश जोशी यांनी घेतली. उच्च न्यायालयाचे वकील प्रवर्तक पाठक यांची मुलाखत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टोअर रूम झाले पुन्हा स्वच्छतागृह!

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ या वृत्त मालिकेअंतर्गत डोंगरे वसतिगृहालगत असलेल्या क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कॉलेजमधील स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला. त्याची गंभीर दखल संस्थेने घेतली असून तातडीने सर्व स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, स्टोअर रूम बनलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करुन ते विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी ‘मटा’ने ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ ही मोहीम हाती घेतली आहे. याच अंतर्गत शहर परिसरातील विविध कॉलेज कॅम्पसमध्ये महिला स्वच्छतागृहांची सद्यस्थिती काय आहे, यावर प्रकाश टाकणारी वृत्त मालिका सध्या प्रकाशित केली जात आहे. त्याचअंतर्गत गेल्या आठवड्यात के.व्ही.एन नाईक शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमधील स्वच्छतागृहांच्या स्थितीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याची गंभीर दखल संस्थेचे पदाधिकारी कोंडाजी आव्हाड, तानाजी जायभावे आणि अन्य संचालकांनी घेतली. कॅम्पसमधील सर्व स्वच्छतागृहे ठेकेदाराकडून दररोज स्वच्छ करण्यात यावेत, असे निर्देश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांना दिले आहेत. तसेच, संबंधित ठेकेदारालाही समज देण्यात आली आहे. सर्व स्वच्छतागृहांची अचानक तपासणी करण्यात यावी, असेही या पदाधिकाऱ्यांनी कॉलेज प्रशासनाला सांगितले आहे. स्वच्छतागृहे नियम‌ित स्वच्छ असणे आवश्यक आहे. स्वच्छतागृह हे विद्यार्थिनींच्या आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच त्यांचे आरोग्य जपण्यासाठी स्वच्छतागृहांची देखभाल योग्य केली जाईल. तसेच, त्यांच्या विविध तक्रारी तसेच अडचणी सोडविण्यासाठी प्राचार्यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थिनींनी तत्काळ प्राचार्यांकडे माहिती द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिगरमोसमीचे ढग दाटले!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेल्या बिगरमोसमी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला असून, द्राक्षबागांसह कांदा, गहू, भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. निफाड, सटाणासह अन्य भागांत ढगाळ वातावरण, तर नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांवर डावणीबरोबरच भुरी, मिलिबग्जचाही धोका वाढला आहे, तर भात पिकाची सोंगणी अंतिम टप्प्यात असतानाच पावसामुळे प्रतवारी खराब होण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.

शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत बिगरमोसमी पावसाने सोमवारी हजेरी लावली. शहरात सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर दिवसभर ढगाळ वातावरणाने शहरासह जिल्ह्यावर मांडव धरला. कमाल तापमान २८, तर किमान तापमान १७ अंश सेल्स‌िअसपर्यंत गेल्याने थंडीचा जोर ओसरला आहे.

यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे धरणे भरली असून, बहुतांश शेतकऱ्यांची शेतीसाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे भाव आहेत. एकीकडे अशी सुखावह परिस्थ‌िती असताना निसर्गाचा लहरीपणा बेमोसमी पावसाच्या माध्यमातून जिल्हावासियांना अस्वस्थ करू लागला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बेमोसमी पावसाने जिल्ह्यात धुडगूस घातला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परिणामी समाधानकारक मोसमी पाऊस होऊनही दिवाळीत उत्साह मावळला. या बेमोसमी पावसामूळे झालेल्या नुकसानाची भरपाई अजून मिळाली नसताना आता पुन्हा बेमोसमी पावसाची चेतावनी देणारे ढग शहर आणि जिल्ह्यावर मांडव धरू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पाऊस‌ हजेरी लावणार असे चिन्ह दिसत होते. सोमवारी सकाळी ढग दाटून आल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. सकाळ‌ी सव्वा दहाच्या सुमारास पावसाचे थेंब पडू लागले. तर अकराच्या सुमारास हलक्या सरींनी शहरात हजेरी लावली. दिवसभरात कमाल तापमान २७.९ तर किमान तापमान १७.६ अंश सेल्स‌ियस नोंदविले गेले. आद्रता देखील ८६ टक्के नोंदविण्यात आली.

द्राक्षबागांना भुरी, मिलिबग्जचा धोका

निफाड ः गेल्या दोन- तीन दिवसांपासून झालेल्या गडद ढगाळ हवामानाने द्राक्षबागांना धोका निर्माण झाला आहे. सर्वच अवस्थेतील द्राक्षबागांना डाऊनीचा प्रादुर्भाव झाला आहे. द्राक्षमणी फुगवणीची प्रक्रिया सुरू झाली‌ असतानाच भुरी, तसेच मिलिबग्जचाही धोका निर्माण झाला आहे. ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांवर प्रतिकार म्हणून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशके फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.

भात पिकाची प्रतवारी खराब

त्र्यंबकेश्वर ः खरीप हंगामाचा कालावधी वाढला आणि गरीभाते सोंगणीस उशीर झाला आहे. भाताच्या सोंगणी अंतिम टप्प्यात असताना तो भिजण्याची शक्यता वाढली आहे. यंदा भात पीक रोगाला बळी पडले आहे, अशातच अवकाळी पावसाने त्याची प्रतवारी खराब होणार आहे. सततच्या ढगाळ वातावरणाने रोगराई वाढत असून, खरीप अथवा बागायती पिके आणि फळबागा यांना हे वातावरण घातक ठरत आहे.

या पिकांना बसणार फटका

द्राक्षबाग ः डावणीचा प्रादुर्भाव, भुरी, मिलीबग्जचाही धोका

कांदा ः ढगाळ वातावरणामुळे मावा रोगाचा धोका

गहू ः मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची धोका

भात ः पिकाची प्रतवारी खराब होण्याची चिन्हे

सध्या लाल कांदा काढणी सुरू आहे. ढगाळ हवामानामुळे लगेच काही परिणाम होणार नाही; पण हे वातावरण असेच चार- पाच दिवस राहिले तर कांद्यावर मावा रोग येऊ शकतो आणि पाऊस जर झाला तर शेतात असलेल्या कांद्याच्या पातीत पाणी जाऊन ते पाणी जमिनीतील कांद्यापर्यंत गेल्यावर कांदा खराब होण्याचा धोका आहे.

- संजय कुंदे, कांदा उत्पादक

रब्बी पिकांना या वातावरणामुळे धोका निर्माण झाला असून, पिकांना फटका बसणार आहे. शेतकरी वर्गाला अधिक काळजीपूर्वक रब्बी पिके सांभाळावी लागणार आहेत. द्राक्ष बागांना डावनीने घेरले आहे.

- नाना बच्छाव, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजावर घोंगावतेय संकट

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या तीनचार दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी होऊन ढगाळ वातावरण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सकाळी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाल्याने द्राक्ष बागाईतदारांच्या पोटात भूरी व डाऊनीच्या भितीने गोळा उभा राहीला आहे. ढगाळ वातावरणामुळे वेळेवर गहू पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता कुंदेवाडी निफाड येथील गहू संशोधन केंद्राचे डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

कांद्यावरही परिणाम

सटाणा ः शहर व तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने रब्बी पिकांना त्याचा मोठा परिणाम होणार आहे. मोसम खोऱ्यातील द्राक्ष बागांना डावणीच्या प्रादुर्भाव मुळे मोठा फटका बसला आहे. सटाणा बाजार समिती आवारात आज मोठ्या प्रमाणात कांदा विक्री साठी असतांना शेतकरी वर्गाने लिलावासाठी घाई गर्दी केली होती. तर अनेक शेतकरी आच्छादन घेण्यासाठी बाजारात दाखल झाले होते. कांदाही यामुळे संकटात सापडणार आहे.

त्र्यंबक, घोटीत भात भिजण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर ः खरीप हंगामाचा कालावधी वाढला आणि गरी भाते सोंगणीस उशीर झाला आहे. भातांच्या सोंगण्या अंत‌मि टप्प्यांत असून भरून आलेले आभाळ कोसळल्यास शेतात असलेले तयार भात भिजण्याची शक्यता वाढली आहे.

हे प्रयोग करा

माव्याच्या प्रादुर्भाव झाल्यास गव्हावर थायोमिथाक्झाम १ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी अशी फवारणी करावी

जे शेतकरी जैविक कीडनियंत्रण पद्धतीचा वापर करतात त्यांनी मेटॅरायझीम एनिसोप्ली वा व्हर्टिसिलियम लेकॅनी ४० ग्राम प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी

द्राक्ष बागांवर भूरी व डाऊनी मिल्ड्यू रो असेल तर डायमिथोमार्फ २०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी

भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॅकोनॅझोल किंवा ट्रेट्राकोनॅझोल २०० मिली २०० लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करावी


रब्बी पिकांना या वातावरणामुळे धोका निर्माण झाला आहे. पिकांना फटका बसणार आहे. शेतकरी वर्गाला अधिक काळजीपूर्वक रब्बी पिके सांभाळावी लागणार आहेत.

- नाना बच्छाव, कृषी तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांनी दिली एफआयआरची धमकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापलिकेच्या नूतन इमारतीच्या सभागृहात सोमवारी प्रथमच झालेली महासभा चांगलीच वादळी झाली. उपमहापौर सखाराम घोडके व आयुक्त संगीता धायगुडे यांच्यात खडाजंगी झाली. घोडके यांनी प्रलंबित कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयुक्त धायगुडे यांनी ‘तुमच्यावर एफआयआर दाखल करील’ असे विधान केल्याने सर्वच सत्ताधारी नगरसवेक संतप्त झाले. त्यांनी आयुक्तांच्या पुढील हौदात धाव घेत विधान मागे घ्या, अशी मागणी लावून धरल्याने सत्ताधारी व आयुक्त यांच्यात वाद विकोपाला गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

येथील महापालिकेच्या नव्या सभागृहात सोमवारी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महासभेच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांवर चर्चा सुरू होण्यापूर्वीच उपमहापौर सखाराम घोडके यांनी प्रशासनाकडून कोणतेही काम वेळेत होत नसल्याची तक्रार केली. निष्क्रिय प्रशासनामुळेच पालिकेवर ही वेळ आली आहे. एका पीठ गिरणीसाठीचा ना हरकत दाखला मिळण्यास सुद्धा तीन ते सहा महिन्याचा कालावधी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच प्रशासनावर जादूटोणा झाला आहे का, असे विधान करीत आयुक्त धायगुडे यांना जाब विचारला. संतप्त आयुक्तांनी देखील प्रलंबित कामांची यादी द्यावी दोन दिवसात कामे मार्गी लावते, असे आश्वासन दिले. यावर संतप्त झालेले घोडके व सत्ताधारी नगरसेवक यांनी हौदात धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला. तसेच शब्द जपून वापरा,

एफआयआर दखल करण्याचे विधान आयुक्तांनी केल्याने उपमहापौर घोडके, डॉ. खालिद परवेज, नीलेश आहेर, ताहेर शेख, युनुस इसा यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक आक्रमक झाले. विधान मागे घेवून आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. अखेर आयुक्त धायगुडे यांनी माझ्या ऐकण्यात चुकी झाली. आय एम सॉरी फॉर डेट, अशा शब्दात माफी मागितल्याने वादावर पडदा पडला.

जलवाहिनीचा सर्वे चुकीचा?

अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात येणारे जलवाहिनीचा सर्वे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला असल्याने पुन्हा सर्वे करण्यात येणार असल्याबाबत उपमहापौर घोडके यांनी प्रश्न उपस्थित केला. यामुळे पालिकेचे अर्थीक नुकसान होणार असल्याने त्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावर महापालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी जलवाहिनीसाठी करण्यात आलेला सर्वे चुकीचा नसून नवा सर्वे करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

वॉटर ग्रेसचा ठेका होणार रद्द?

सभागृहात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या विशेष महासभेचे इतिवृत्तवर गटबंधन आघाडीचे बुलंद इक्बाल यांनी आक्षेप घेत उपसूचना आणली. मात्र महापौर शेख यांनी ती फेटाळून लावली. शहरातील कचरा संकलन ठेवा दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने ठेका रद्द करण्याचा विषय गाजला. यावरून सर्वच नगरसेवकांनी तक्रारी केल्या. धायगुडे यांनी संबधित कंपनीचा ठेका रद्द केला तरी त्यानंतर शहरातील कचरा संकलनाची पर्यायी व्यवस्था पालिकेला उभी करणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर येत्या दोन महिन्यात चौकशी करून महासभेपुढे अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर शेख यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडची यंदा दोनच आवर्तने

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

पालखेड डाव्या कालव्याची अवघी दोनच आवर्तने यंदा शेती सिंचनासाठी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात झाला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील शेती क्षेत्राला बसणार आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचे पिक नियोजन धोक्यात आले असून, धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतांना तीन आवर्तने मिळण्याच्या आशेवर पाणी फेरले आहे.

शेतकरी शेती सिंचनासाठी उपाशी राहणार असल्याची स्थिती आहे. कालवा सल्लगार समितीची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री शिवतारे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील विधानपरिषद सभागृहात पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातून आमदार नरहरी झिरवाळ यांचेसह अधीक्षक अभियंता राजेश मोरे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश भाट, येवला तालुक्यातील बळीराज्य पाणीवापर सहकारी संस्थांच्या संघाचे अध्यक्ष संतू पाटील झांबरे, उपाध्यक्ष सुरेश कदम उपस्थित होते.

बैठकीत संतू झांबरे व सुरेश कदम यांनी पालखेड डाव्या कालव्याची तीन आवर्तने देण्याची मागणी केली. अधिकारी वर्गांशी आपण चर्चा करून प्रासंगिक आरक्षणाचे पाणी बचत झाल्यास तिसरे आवर्तन देता येते का? यावर विचार करता येईल, असे जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले. अखेर पालखेड पाणी नियोजनात दोन आवर्तानावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यावेळी पाणी वापर संस्थेच्या वतीने भूमिका स्पष्ट करतांना, झांबरे आणि कदम यांनी सांगितले, सन २०१५ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पालखेड धरणातून डावा कालव्याला शेती सिंचनासाठी एकही पाणी आवर्तन मिळाले नाही. यामुळे २०१५ या वर्षी कुठलेही पिक हाती न आल्याने शेतकरी हतबल झाला होता. शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.

गेल्या वर्षी डिसेंबर २०१६ च्या पहिल्या आठवड्यात कालवा सल्लागार समितीच्या नाशिक येथील बैठकीत शेती सिंचनासाठी देखील दोन पाणी आवर्तने जाहीर झाली. परंतु पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळाले नाही. यंदा देखील शेती जिवंत ठेवण्यासाठी पाणीसाठा धरण क्षेत्रात शंभर टक्के उपलब्ध आहे. तीन आवर्तने देऊन पूर्ण क्षमतेने पाणी द्या, अशी जोरदार मागणी येवल्याच्या शिष्ठमंडळाने केली असतानाही केवळ दोन आवर्तने मंजूर झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था

$
0
0

वाट स्वच्छ आरोग्याची

मटा मालिका भाग ८

ठिकाण ः बिटको कॉलेज

--

अपुऱ्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था


टीम मटा

नाशिकरोड परिसरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको कॉलेज कॅम्पसमध्ये स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहांची अवस्था बिकट आहे. स्वच्छतागृहे विद्यार्थिनींच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याशिवाय नियमित स्वच्छता आणि सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनचीही येथे वानवा आहे.

--

नाशिकरोड येथे चांडक-बिटको कॉलेज हे नाशिकरोडचे सर्वांत मोठे कॉलेज आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे हे कॉलेज असून, ज्युनिअर कॉलेजमध्ये तीन हजार, तर सीनिअर कॉलेजमध्ये साडेचार हजार असे सुमारे साडेसात हजार विद्यार्थी येथे आहेत. यात विद्यार्थिनींची संख्या निम्म्याहून अधिक आहे. याच संस्थेचे शेजारी कोठारी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट व एम. एस. गोसावी पॉलिटेक्निक कॉलेज आहे.

--

पुरेशा स्वच्छतेचा अभाव

बिटको कॉलेजात नाशिकरोड, विहितगाव उपनगर, जेलरोड, दसक, सामनगाव, एकलहरे, देवळाली कॅम्प परिसराबरोबरच शिंदे, पळसे, भगूर, लहवित, सिन्नर असे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे असली, तरी त्यांची संख्या विद्यार्थ्यांच्या मानाने अपुरी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थिनींशी संवाद साधला असता स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. मुलींसाठी एक टायलेट रूम आहे. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता केली जात नाही. काही वेळा येथे पाणी असते, तर काही वेळा नसते. अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोठारी मॅनेजमेंट, गोसावी पॉलिटेक्निक, बीबीए इमारतीत स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. मात्र, त्यांची अवस्था फारशी समाधानकारक नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. ‘नॅक’च्या पार्श्वमूमीवर बिटकोमध्ये नवीन स्वच्छतागृह बांधावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

--

महिला कॉलेजात कमोडच नाही

नाशिकरोडला फक्त महिलांसाठी असलेले एकमेव कॉलेज म्हणजे बिंदू रामराव देशमुख महिला कॉलेज होय. येथे कनिष्ठ आरंभ कॉलेज, तर वरिष्ठ महिला कॉलेज अशी स्वतंत्र कॉलेजेस आहेत. अकरावी-बारावीसाठी आरंभ कॉलेज असून, त्यामध्ये मुलींबरोबरच मुलांनाही प्रवेश आहे. महिला कॉलेजमध्ये एफवाय ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण दिले जाते. येथे फक्त मुली आहेत. आरंभ कॉलेजमध्ये दोन हजार विद्यार्थी असून, महिला कॉलेजात साडेनऊशे विद्यार्थिनी आहेत. शिंदे, पळसे, लहवित, वडनेर, नायगाव, मनमाड, विंचूर, एकलहरे, देवळाली कॅम्प, चेहेडी, जेलरोड, उपनगर येथून विद्यार्थिनी महिला कॉलेजात शिक्षणासाठी येतात. येथे अपंग विद्यार्थिनींसाठी कमोडची सुविधा नाही

--

जागेची अडचण

महिला कॉलेजात एकच स्वच्छतागृह असून, त्यात पाच भांडी आहेत. त्यांची नियमित स्वच्छता केली जाते, असा व्यवस्थापनाचा दावा आहे. मात्र, विद्यार्थिनींच्या तक्रारी आहेत. स्वच्छतागृहांची निगा नियमित राखावी, पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, अशी विद्यार्थिनींची मागणी आहे. ठेकेदार स्वच्छतेचे काम व्यवस्थित करत नाही. कॉलेज प्रशासनाचे म्हणणे असे, की मुलींसाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याची इच्छा आहे. परंतु, जागेची टंचाई आहे. जागा उपलब्ध झाल्यास स्वच्छतागृहांची संख्या वाढविता येईल.

--

बिटको कॉलेजात चार हजारांवर विद्यार्थी आहेत. त्यामध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यांच्या तुलनेत स्वच्छतागृहे अपुरी पडत आहेत. ही संख्या तातडीने वाढविण्याची गरज आहे. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी.

-ऋतुजा आचार्य, विद्यार्थिनी

--

बिटको कॉलेजमध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थिनी शिकण्यासाठी येतात. विद्यार्थिनींसाठी नाशिकरोडला सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे मुलींची भिस्त कॉलेजातील स्वच्छतागृहांवर आहे. येथे संख्या कमी असल्यामुळे गर्दी होते. तरी स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी.

-गायत्री शिंदे, विद्यार्थिनी

--

आरंभ कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी नवीन स्वच्छतागृहांची अत्यंत गरज आहे. सध्याची स्वच्छतागृहे स्वच्छ नाहीत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्थेने त्वरित नवीन स्वच्छतागृह बांधावे, जेणेकरून हा प्रश्न निकाली निघेल.

-पूजा शिंदे, विद्यार्थिनी

--

संस्थेचे पदाधिकारी म्हणतात...

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की बिटको कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे आहेत. त्यांची नियमितपणे स्वच्छता केली जाते. विद्यार्थिनींच्या आरोग्याला बाधा होणार नाही याची काळजी घेतली जाते. काही समस्या असतील तर त्या दूर केल्या जातील. विद्यार्थिनींनी यासंदर्भात प्राचार्यांशी संपर्क साधावा. विद्यार्थिनींच्या आरोग्याला आमचे पहिले प्राधान्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भातशेती परवडणार तरी कशी?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, घोटी

भाताचे आगार असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भात सोंगणी अंतिम टप्प्यांत आली आहे. परतीचा पावसाने वाचलेले भात पीक किडरोगाच्या प्रादुर्भावात आले होते. ते कसेबसे वाचवून शेतकरी सध्या भात सोंगणी करीत आहे. मात्र दरवर्षी वाढता खर्च आणि हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ घालताना शेतकरी मेटाकुटीस येत आहे.

तालुक्यात सर्वत्र भातपिकास मोठ्या प्रमाणात रोगराईने ग्रासले असल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. शेतकरी अगोदर परतीच्या पावसाने हैराण होता. आता डोळ्यासमोर पिकाचा झालेला पाचोळा पाहून हवालदिल झाला आहे. वाढलेल्या मजुरीचा खर्च पाहता सोंगणी करणे देखील तोट्याचे होतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गतवर्षी जुलै २०१६ मध्ये झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पंचायत समिती कृषी विभाग तालुक्यात सुरक्षित फवारणी कशी करावी याचा चित्ररथ काढून मिरवत आहे. मात्र अतिपावसाने आलेल्या संकटाला कसे तोंड देणार? याचे उत्तर त्यांच्याकडे मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. भातशेती पेरणीपासून ते सोंगणीपर्यंतचा खर्च दिवसोंदिवस वाढत आहे. त्यामध्ये यावेळेस औषधांच्या खर्चाचा भुर्दंड बसल्यामुळे तोटा वाढला आहे. एकरी खर्च यांत्रिक शेतीने वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाकिया पैसा लाया

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची शाखा आता देशभरात सुरू झाल्या असून, त्यात पोस्टमनमार्फत घरपोच पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. या बँकेमार्फत आधार रिलेबल पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्यात सरकारच्या विविध योजनांचे पैसेही मिळणार आहेत. ग्रामीण भागात याचा मोठा फायदा होणार आहे. यात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी दिली. ३१ मार्चपर्यंत राज्यात ४२ बँका सुरू होणार असून, त्यात ही सुविधा आहे.

उपनगर येथे महाराष्ट्र व गोव्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ट्रेनिंग सेंटरच्या उद््घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, इंडियन पोस्ट पेमेंट बँक सुरू झाल्यानंतर अनेक पेमेंट देण्याच्या सुविधाही ऑनलाइन होतील. त्यासाठी काही आताच सुरू केल्या आहेत. पोस्टाने अत्याधुनिक सुविधा सुरू केल्यामुळे पोस्टाचे काम वाढले आहे. अनेकांना आमचे काम कमी झाले असे वाटत असले तरी त्यात वाढ झाली आहे. स्पीड पोस्ट व विविध सुविधांमुळे पोस्टाने आता अत्याधुनिक तंत्राचा वापर सुरू केला आहे. मुंबईमध्ये आम्ही पोस्टमनला जीप दिल्या आहेत, तर काही ठिकाणी मोटारसायकल दिल्या आहेत.

महाराष्ट्र सर्कलचा वाटा २० टक्के

देशाच्या पोस्टाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्र सर्कलचा वाटा २० टक्के असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र सर्कलमध्ये महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा समावेश आहे. या सर्कलमध्ये ४८ डिव्ह‌िजन ऑफ‌िस असल्याचेही त्यांनी सांगितले.


नाशिकमध्ये पोस्ट बँक

नाशिकमध्येसुद्धा इंडियन पोस्ट पेमेंट बँक होणार असून, त्यासाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशभर या बँका सुरू होणार असून, त्यामुळे सर्वत्र त्याचा फायदा होणार आहे.

पोस्टात मिळणार ‘आधार’

राज्यातील १३०० पोस्ट कार्यालयांत आधार कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी बायोमेट्रिक उपकरण तसेच संगणक कनेक्‍टिव्हिटी यांसारख्या सुविधा टपाल कार्यालयात असणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत याबाबतच्या पूर्तता करण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. नाशिकच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये आधार संबंधित ट्रेनिंगनेच सुरुवात करण्यात आली आहे. पोस्टाच्या कार्यालयांत नवीन कार्ड तर मिळतीलच, पण जुन्या आधार कार्डांतील माहितीत बदलही करता येणार असल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी दिली.

उपनगर येथे महाराष्ट्र व गोव्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ट्रेनिंग सेंटरच्या उद््घाटन सोहळ्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, पोस्टाच्या या सुविधेमध्ये आधार कार्डावरील नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकात बदल करण्याची सुविधा सर्वांना उपलब्ध होणार आहे. ट्रेनिंग सेंटरची माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सर्कलमध्ये असणारे महाराष्ट्र व गोवा राज्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना गुजरातमधील बडोदा येथे ट्रेनिंग दिले जात होते. आता ही सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यात नाशिकची निवड झाली आहे. पोस्ट खात्याने विविध योजना सुरू केल्या असून, त्यात नवनवे सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याचे ट्रेनिंग येथे दिले जाणार आहे.

असे आहे ट्रेनिंग सेंटर

या ट्रेनिंग सेंटरमध्ये एक कॉन्फरन्स हॉल, तीन कॉम्प्युटर लॅब, मेस व स्टाफ रूमसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दोन इमारतींत निवासाची व्यवस्थाही केली आहे. एका वेळेस ७२ जणांना ट्रेनिंग घेता येणार आहे. यावेळी औरंगाबद विभागाचे पोस्टमास्तर जनरल प्रणव कुमार, एपीएमजी एस. बी. व्यवहारे, मुंबईचे अधिकारी रुपेश सोनवणे, संतोष कुलकर्णी, नाशिक विभागाचे एसएसपीओ पी. जे. काखंडकी, एस. बी. लिंगायत, एस. आर. फडेक, एच. ई. खडकीकर यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक निवड ठरली महत्वाची

पोस्टाच्या १० एकर जागेत याअगोदर स्टॅम्प डेपो, स्टोअर डेपोसह निवासी इमारती आहेत. त्यात काही काम कमी झाल्यामुळे जागा उपलब्ध होती. त्यामुळे या जागेची निवड केली व हे कामही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात केले. पोस्टात बचत बँक, आरडी, मुदत ठेव, ज्येष्ठ नागरिक योजना, पीपीएफ, मंथली इन्कम स्किम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या, पीएफ या योजना आहेत. त्यातून ग्राहकांना चांगली सेवा देता यावी, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे प्रशिक्षित केले जाणार आहे.

मराठमोळे स्वागत

ट्रेनिंग सेंटरच्या उद््घाटन सोहळ्यात मराठमोळे स्वागत करण्यात आले. यावेळी गुलालवाडी ढोल पथकाने आपल्या कलेचा अविष्कार दाखवला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात कळवणचा कॉलेज तरुण ठार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

मोटरसायकल व ट्रक अपघातात कळवण महाविद्यालयातील विद्यार्थी जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत कळवण पोल‌िस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदव‌िण्यात आला आहे.

कळवणच्या गांधी चौकात राहणारा व कळवण महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकणारा किशोर नानाभाऊ पगार (वय २२) व गौरव जगदीश वाघ (वय १९) हे दोन्ही सकाळी ११ वाजेच्या सुमारास मानूर येथील कळवण महाविद्यालयात जात होते. बीएसएनएल केंद्रापुढील वळणावर समोरुन येणारा ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. यात किशोर मोटारसायकलवरून फेकला गेला. रक्तश्राव अधिक झाल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. गौरवच्या पाठीच्या मणक्याला मार लागला असून त्याला उपचारासाठी नाशिकला हलव‌िण्यात आले आहे.

मयत किशोर हा कळवण महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होता. सुंदर हस्ताक्षर व हुशार विद्यार्थी म्हणून तो सर्वांना परिचित होता. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो विद्यार्थ्यांनी कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तेथे मित्र परिवार व कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. सायंकाळी ४ वाजता शोकाकुल वातावरणात किशोरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कळवण पोल‌िस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल असून अधिक तपास निरीक्षक सुजय घाडगे, उपनिरीक्षक रमेश सोनजे व टीम करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींसाठी महासभाच तहकूब

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पारदर्शक कारभाराच्या टिमक्या वाजवणाऱ्या भाजपने सोमवारी महासभा नियमावलीची एैसीतैसी करत, नवा पायंडा पाडला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक असलेला भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याचे नगरसेवक पद वाचवण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांच्या आनंदोत्सवाचे कारण देत महासभा मंगळवारपर्यंत तहकूब केली आहे. विशेष म्हणजे किरकोळ कारणावरून नेहमी विरोध करणाऱ्या विरोधकांनीही सभागृहात ब्र शब्दही न काढता भाजपच्या अपारदर्शक कारभाराला मूक साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम ११ अन्वये शेट्टी सोमवारी अनुपस्थित राहीला असता तर, त्याचे सदस्यत्व रद्द झाले असते. त्यामुळे शेट्टीला मंगळवारी हजर करून त्याचे पद वाचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधील भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला पोलिसांनी २६ मे रोजी ज्वालिंदर उर्फ ज्वाल्या उगमुगले याच्या खुनाखाली अटक केली होती. त्यामुळे शेट्टी सहा महिन्यांपासून महासभेला गैरहजर राहिला आहे. नगरसेवक सलग सहा महिने महासभेला गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. शेट्टी हा १८ मे रोजीच्या महासभेला उपस्थित होते. परंतु २९ मे रोजी विशेष महासभेपासून तो अनुपस्थित आहे. नोव्हेंबर महिन्यातील महासभा सहावी असून, यात तो गैरहजर राह‌ल्यिास त्याचे नगरसेवक पद रद्द होवू शकते. परंतु कायदेशीर मार्ग काढण्यासाठी नगरसेवक शेट्टी याने अर्ज दिल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून केला जात आहे. येत्या तीस तारखेला सहा महिने पूर्ण होत आहे.सोमवारची महासभा पूर्ण झाली असती, तर नियमित महासभा डिसेंबर महिन्यात बोलवावी लागली असती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मधला मार्ग काढत, महासभा धार्मिक स्थळांच्या विषयाचा दाखला देत, एक दिवसासाठी तहकूब करण्याची खेळी खेळली. स्वीकृतचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महासभा तहकूबची घोषणा महापौरांनी केली. त्यामुळे शेट्टीला एक दिवसाचे अभय मिळाले आहे.

विरोधकांचीही साथ

महासभेत एरव्ही छोट्या विषयांवरून सभागृह डोक्‍यावर घेणाऱ्या विरोधकांची या विषयावरची बोटचेपी भूमिका संशयास्पद होती. महासभा तहकूबीची नियमावली असतांनाही, महापौरांनी सभा तहकूब करून लगेच मंगळवारी घेण्याचे जाहीर केले. या निर्णयाला प्रखर विरोधऐवजी विरोधकांनी केवळ औपचारीकता पूर्ण केली. विशेष म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या गटनेत्यांनी एकत्र येत लग्नतिथीचे कारण दिले व शुक्रवारी (ता. २४) सभा घेण्याची मागणी केली. त्यामुळे शेट्टींला वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्याची चर्चा रंगली होती.


सोमवारच्या महासभेवर रिकाम्या भूखंडावरील धार्मिक स्थळे नियमीत करण्याचा प्रस्ताव होता. प्रभारी आयुक्त महासभेला येवू शकले नसल्याने मंगळवारी महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

रंजना भानसी, महापौर

पारदर्शक कारभाराचा जप करणाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर येत आहे. कोणालाच विश्वासात न घेता महासभा तहकूब केली आहे. शेट्टीला वाचवण्याचा दुबळा प्रयत्न केला जात आहे.

अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावातील व्यक्तीनेच दिली खबर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील दसाणे येथे गत पंधरवाड्यात टाकलेल्या दरोड्याचा उलगडा करण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे. या दरोडाप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चार जणांमध्ये एक आरोपी दसाणेतीलच असल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

दसाणे येथील केवळ खैरनार व त्यांच्या पत्नी सुशीला खैरनार हे झोपते असतांना अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी घरात त्यांना मारहाण करून १२ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. घटेनेचे गांर्भीय लक्षात घेवून जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पाहणी केली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे व सटाणा पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी गुन्ह्याचा कसोशीने तपास सुरू केला. सोमनाथ गुलाब पवार (वय ३७ रा. जाखोड) यास ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील गारखेडा येथील सुनील काळे (२०) आकाश चव्हाण (२३) व दसाणे येथील दयाराम पवार (४५) यांचेसह इतर साथीदारांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दीड वर्षापासून पाळत

आरोपी दयाराम पवार दसाणे येथे वास्तव्यास असून त्याने संबंध‌ित शेतकऱ्याची माहिती गारखेडा येथील आपले साथीदार सुनील काळे व आकाश चव्हाण यांना दिली. तब्बल एक ते दीड वर्षापासून सदर शेतकऱ्याची माहिती घेवून दरोड्याचे नियोजन करीत होते. आरोपी सोमनाथ पवार याने दरोडा टाकून नेलेल्या पैशांतून खरेदी केलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

अन्सार कॉलनीत घरफोडी

मालेगाव : शहरातील अन्सार कॉलनीतील घरातून अज्ञात चोरट्यांनी आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार आएशानगर पोल‌िस ठाण्यात नोंदवली आहे. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी २ ते ४ च्या दरम्यान अन्सार चोरट्यांनी घरातून चार हजार रुपये रोख आणि चार हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. घर मालक फैजी मोहंमद आयुब (वय ६३) यांनी पोल‌िस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक एव्हरशाइनला सुवर्णपदक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सुरू असलेल्या तीन दिवसीय क्रिकेट महाकुंभात पिंप्री पँथर्स संघाने सर्वच आघाड्यांवर जोरदार कामगिरी करीत पहिल्या क्रमांकाचे प्लॅटिनम पदक मिळवले तर यजमान नाशिक एव्हरशाइनने सुवर्णपदक मिळवत स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. नागपूर ऑरेंज सिटीने सिल्वर तर थ्री के तमील्सने इलाईट पदकावर मोहर उमटवली.

इंटरनॅशनल फेलोशिप क्रिकेट लव्हिंग रोटरीयन व मंत्रा ग्रीन रिर्सोस यांच्या विद्यमाने या क्रिकेट महाकुंभाचे पारितोषिक वितरण मिसेस महाराष्ट्र आयकॉन पूनम बेडसे, आयएफसीआर वर्ल्डचे सेक्रेटरी केआरपी सारथी, आयएफसीआर इंडियाचे चेअरमन चित्तरंजन चौधरी, व्हाईस चेअरमन आर. नीलकंठ, आयएफसीआर वर्ल्डचे माजी चेअरमन रवीरमण, डीजीई इलेक्ट १९२० चे राजेंद्र भामरे यांच्या हस्ते गोल्फ क्लब मैदानावर झाले.

पिंप्री पँथर्स, नाशिक एव्हरशाइन, रायगड वॉरिअर्स, कुंभकोणम, पुणे ३१३१ या संघांनी साखळी फेरीपासूनच गुणतालिकेत वरच्या स्थानावर राहत स्पर्धेवर वर्चस्व राखले होते. मैत्रीपूर्ण वातावरणात होत असलेल्या या स्पर्धेत साखळी सामन्यानंतर गुणतालिकेत प्रथम आठ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. सर्वाधिक सरासरी असलेल्या पिंप्री पँथर्स आणि रायगड वॉरिअर्स संघांत प्लॅटिमन पदकासाठी लढत रंगली. त्यात पिंप्री पँथर्सने २० षटकांत १८३ धावांचा डोंगर उभारला. त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या रायगड वॉरिअर्स संघाचा डाव केवळ १३० धावांत आटोपला. यात पिंप्री पँथर्सचे शेखर दालमिया यांनी अष्टपैलू खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. त्याबद्दल त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

नाशिक एव्हरशाइन संघाने दुसऱ्या अंतिम सामन्यात कुंभकोणम संघासमोर तब्बल १९३ धावांचे लक्ष्य ठेवले. कुंभकोणम संघाला मोठे आव्हान असताना सुरुवातीपासूनच गळती लागल्याने त्यांचा दावा १३० धावांतच आटोपला. नाशिक एव्हरशाइनचे संतोष दिंडे यांनी ३० धावा आणि २ गडी बाद करताना अष्टपैलू कामगिरी करीत सामनावीर ठरले.

तिसऱ्या अंतिम सामन्यात नागपूर ऑरेंज सिटी संघाने आयएफसीआर पुणे ३१३१ चे १५२ धावांचे आव्हान केवळ १५.४ षटकांत पूर्ण करत सिल्वर मेडल पटकावले. तर अखेरच्या सामन्यात थ्री के तमिळ संघाने मद्रास सुपर किंग्सवर मोठा विजय मिळवत इलाइट पदक मिळवले. स्पर्धेत मॅन ऑफ द सिरिजचा पुरस्कार नाशिक एव्हरशाइनचे संतोष दिंडे यांना मिळाला. त्यांनी ५ सामन्यांत सर्व सामन्यात नाबाद राहत ९० धावा आणि ५ बळी मिळवले. पुणे ३१३१ चे ज्ञानेश्वर झेंडे यांनी ११८ धावा करीत सर्वोत्कृष्ट फलंदाज तर विनोद कर्डिले यांनी चार सामन्यात सात बळी मिळवत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. महाकुंभ यशस्वीतेसाठी आयएफसीआर डिस्ट्रीक्ट ३०३० चे चेअरमन तुषार चव्हाण, डॉ. यू. के. शर्मा, बाळा राठी, आशा वेणूगोपाल, संतोष दिंडे (सचिव), विनोद कर्डिले, संजय कलंत्री, महेश उपाध्ये, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. भूषण नेमाडे, विनोद जाधव, सचिन पाटील आदी परिश्रम घेत आहेत.
श्रीलंकेत रंगणार रोटरी क्रिकेट मिनी फेस्टिवल

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात श्रीलंकेत रोटरी क्रिकेट मिनी फेस्टिवल घेण्याची घोषणा आयएफसीआर इंडियाचे चेअरमन चित्तरंजन चौधरी यांनी केली. १९९७ मध्ये उदयास आलेल्या इंटरनॅशनल फेलोशिप क्रिकेट लव्हिंग रोटरी अंतर्गत १० देशांत वर्ल्ड रोटरी क्रिकेट फेस्टिवल घेतला जातो. सर्वच रोटरी क्लब्सना या फेस्टिवलमध्ये सहभागी करून घेण्याचा मानस यावेळी रिचर्ड यांनी व्यक्त केला. मैत्रीपूर्ण वातावरणात घेतल्या जाणाऱ्या या सामन्यांत रोटरी सदस्यांची जागतिक स्तरावर नोंद ठेवली जात असून, २००९ पासून बीसीसीआयच्या धर्तीवर नियोजन केले जात आहे. या क्लबचे भारतात ८०० तर जगभरात एकूण २००० सदस्य आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये श्रीलंकेत मिनी क्रिकेट फेस्टिवल तर २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images