Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आवक वाढली, दरांत घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला लवकर पिकू लागला आहे. त्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मागणी स्थिर असल्यामुळे दरात घसरण होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवक ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. त्याच प्रमाणात दरांमध्ये घसरण झाली आहे.

थंडी सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मर्यादित होती. थंडीच्या मोसमात रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचा दर्जाही चांगला होता. मात्र, ढगाळ हवामान येताच भाजीपाला पिकण्याचे प्रमाण वाढले. भाजीपाल्याची मागणी आणि त्याचा पुरवठा यांच्यात तफावत होऊ लागल्यामुळे त्याच्या दरात घसरण सुरू झाली. वांगी पिकाचे दोन दिवसांपूर्वीचे दर ४० ते ७५ रुपये प्रतिकिलो होते, ते सोमवारी २० ते ४० रुपये असे कमी झाले. दुधी भोपळ्याचीही परिस्थिती अशीच झाली असून, दर ३ ते ७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

--

उत्पादन खर्च वाढणार

भाजीपाला पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले होते. त्यानंतर पिकांची वाढ चांगली होऊ लागली असतानाच ढगाळ वातावरणाने उत्पादनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. रोग-किडींची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशक व कीडनाशकांच्या फवारण्यांचा खर्च वाढणार आहे. या वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडणार असल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत.

---

सोमवारची आवक आणि दर

--

भाजीपाला...........आवक (क्विंटलमध्ये)............मिळालेला दर (प्रतिकिलो)

टोमॅटो.................१६९२...............................१२ ते ४१

वांगी..................११७..................................२० ते ४०

फ्लॉवर...............२९७...................................७ ते १२

कोबी..................४५०...................................८ ते १६

शिमला मिरची.....२५८...................................३१ ते ५६

दुधी भोपळा.........७६८....................................३ ते ७

कारले ................३७८...................................१६ ते २८

दोडका.................१९३ ..................................१६ ते २९

गिलके................२२ .....................................१२ ते २०

भेंडी...................१५.......................................१६ ते ३३

गवार.................४० .....................................३० ते ६०

काकडी...............७३४.....................................७ ते १५

-------------------

पालेभाज्या ...............आवक (जुडी).............दर (प्रतिजुडी)

कोथिंबीर...................५५,६००......................११ ते ३०

मेथी.........................८२,३००.......................६ ते १४

शेपू...........................१०,२००.......................१४ ते २०

कांदापात.....................२५,८००......................१० ते २५

---

वातावरणाने धास्तावले शेतकरी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

खरिपाच्या हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर सावरत असलेले शेतकरी आता ढगाळ वातावरणामुळे धास्तावले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश द्राक्षपीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. पाऊस झाल्यास द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

द्राक्षबागेच्या ऑक्टोबर छाटणीच्या वेळी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. खरिपाच्या सोयबीन, भुईमूग, मका आदी पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीला तोंड देत त्यातून सावरत रब्बीच्या हंगामाच्या पेरण्यांची कामे उरकण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. रब्बीच्या ज्या काही पेरण्या झालेल्या आहेत, ती पिके डोकावत असताना पाऊस आल्यास त्यांचे नुकसान होईल, या विचाराने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रतीक्षेत असलेली कर्जमाफी, जिल्हा सहकारी बँकेत अडकलेले पैसे, कृषिपंपांची वीजबिले भरण्यासाठी लागलेला तगादा यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडलेला असताना आता बदलत्या वातावरणामुळे त्याची अवस्था बिकट झाली आहे.

द्राक्षबागांवर संकट

जिल्ह्यातील नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षासारख्या नाजूक पिकावर बदलत्या वातावरणाचा लवकर परिणाम होत असतो. थंडीनंतर अचानक ढगाळ वातावरण झाल्यामुळे द्राक्षांच्या वाढीवर विपरित परिणाम आणि रोग-किडींचा प्रादुर्भाव अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यापासून वाचविण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. परतीच्या पावसाच्या वेळीही अतिरिक्त फवारण्यांच्या खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडला होता. आता आणखी फवारण्या कराव्या लागत असल्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे.

ग्रामीण भागातही फटका

घोटी ः इगतपुरी व घोटी परिसरातही ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले आहेत. सोमवारी दुपारी दोनपर्यंत तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही. पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असल्याने थंडीची तीव्रता वाढली होती. साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक पावसाचा शिडकावा झाल्याने जोराचा पाऊस येतो की काय, अशी चिंता शेतकरीवर्गात पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगराध्यक्षपदासाठी अद्याप एकच अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरचा नगरपालिका निवडणुकीसाठी दहा डिसेंबर रोजी मतदान आणि ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अवघ्या २१ दिवस बाकी आहेत. सोमवारी नगराध्यक्षपदासाठी बाळकृष्ण कमळाकर झोले यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. तर प्रभागातील १७ जागांसाठी अवघे तीन अर्ज आले आहेत.

सन २००२च्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाळकृष्‍ण झोले यांनी अपक्ष उमेदवारी करत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र लढण्याची उमेद कायम ठेवत त्यांनी आपला अर्ज दाखल केला.

पक्षश्रेष्ठींचा तळ

जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, निरीक्षक, पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे तळ ठोकला आहे. उमेदवारी निश्च‌ित करण्यासाठी बैठका आणि गुप्त खलबते सुरू आहेत. परस्परांना शह देत असतांना युद्धाच्या आधीच तहाची बोलणी अशी परिस्थ‌िती निर्माण झाली आहे.

मनधरणी सुरू

त्र्यंबक येथे निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पदरी अपयश येते याचा धसका घेऊन काही जागांवर उमेदवार उभे करतांना पक्षनेत्यांना त्यांची मनधरणी करण्याची देखील वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा महोत्सवाच्या तयारीस सुरुवात

$
0
0

सिन्नरला दि. २६ डिसेंबरपासून रंगणार थरार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येथील आडवा फाटा परिसरातील मैदानावर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा तालिम संघ यांच्या मान्यतेने क्रीडा महोत्सवांतर्गत दि. २६ डिसेंबरपासून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा व आमदार चषक कुस्ती स्पर्धा या जिल्हास्तरीय स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धांसाठी खेळाचे मैदान तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि. २०) आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हा समन्वयक उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणूबाई डावरे, गटनेते संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्य जगन पाटील भाबड, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नाशिक जिल्ह्याचे पुरूष व महिलांचे संघ निवडणार असून, हे संघ १ ते ४ डिसेंबरदरम्यान कराड, सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी

नाशिक जिल्हा तालिम संघाच्या वतीने ४० वी कुमार व ६१ वी पुरूष आमदार राजाभाऊ वाजे चषक जिल्हा अजिंक्य व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी होणार असून, पुरूष गट वजन (गादी) १० गट व १० गट (माती) प्रत्येक तालुक्यातून ३० खेळाडु ५० प्रशिक्षक व्यवस्थापक व पंच असतील. तर २८ नोव्हेंबरला दु. ४.०० वाजता वजने होतील तसेच २९ नोव्हेंबरला सकाळी ८.०० वाजता कुस्त्या सुरू होतील. स्पर्धा यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव, कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, सहसचिव महाराष्ट्र राज्य प्रकाश बोराडे, जिल्हा समन्वयक उदय सांगळे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, सहकार्यवाह प्रकाश भाबड राज्य संघटनेचे सहकार्यवाह प्रकाश बोर्‍हाडे, विलास पाटील आदी परिश्रम घेत आहेत.


स्पर्धेचे स्वरूप

दिवसा व सायंकाळी प्रकाशझोतात सामने होणार

पुरूषांचे चार तर महिलांचे दोन मैदानात सामने

प्रेक्षकांसाठी ६००० आसनक्षमतेची गॅलरी

तालुक्यातून पुरुषांचे ४८, महिलांचे १८ कबड्डी संघ

कबड्डीचे ७९२ खेळाडूंसह १२० प्रशिक्षक व व्यवस्थापक, ५० पंच, ५० पदाधिकारी सहभागी

स्पर्धेत पुरुषांचे साखळीचे ७२ व बाद पद्धतीचे ११ असे ८९ सामने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनोव्हातच उघडले सोनोग्राफी सेंटर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्त्री भ्रूणहत्येविरोधात सरकारने कठोर कायदा केल्यानंतरही काही सोनोग्राफी चालकांकडून बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान केले जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे चोरी लक्षात येऊ नये, यासाठी नानाविध क्लृप्त्या लढवल्या जात असून, सातपूरला एका डॉक्टरने चक्क इनोव्हा कारमध्ये सोनोग्राफी केंद्र सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने तब्बल दोन महिने पाळत ठेवून या संबंधित डॉक्टरचे पितळ उघडकीस आणले आहे. आदिवासी भागातील महिलांची कारमध्येच तपासणी करून गर्भलिंग निदान करण्याचा उद्योग असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. संबंधित डॉ. तुषार पाटीलच्या सातपूरमधील सोनोग्राफी केंद्राची नोंदणी निलंबित केली आहे. त्याचबरोबर त्याच्या विरोधात न्यायालयीन दावा दाखल करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

पीसीपीएनडीटी अॅक्ट १९९४ व सुधारित २००३ नुसार गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, डॉक्टर आणि सोनोग्राफी चालकांकडून त्यांचे सर्रास उल्लंघन केले जात असून, असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. या संदर्भातील कायदा कडक झाल्याने काही डॉक्टरांकडून यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. सातपूरमधील एमएचबी कॉलनीत शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटर म्हणून डॉ. पाटील याचे सोनोग्राफी केंद्र आहे. डॉ. पाटील आपल्या इनोव्हा कार (एचएच १५/बीडब्लू ५९४९) या वाहनात सोनोग्राफीद्वारे गर्भलिंग निदान करीत असल्याची तक्रार पीसीपीएनडीटी अॅक्ट १९९४ व सुधारित २००३ नुसार महापालिका कार्यक्षेत्रात कार्यरत ‘आमची मुलगी’ या वेबसाइटवर फेब्रुवारीत प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत महापालिकेच्या डॉ. आरती चिरमाडे, डॉ. विजय देवकर व डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या पथकाने डॉ. पाटील याचे सोनोग्राफी केंद्र, तसेच इनोव्हा कारवर पाळत ठेवली. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या इनोव्हा कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत रुग्णांची सोनोग्राफी करण्यासाठी लागणारे, गादी, दोन प्रोब, सोनी व्हिडीओग्राफिक प्रिंटर, लॅपटॉप, गादी, दोन उशा, वेगवेगळे वायर कनेक्टेड, यूपीएस, की बोर्ड, सोनोग्राफी जेल, टिश्यू पेपर आदी साहित्य आढळून आले. हे साहित्य त्याने त्रंबकेश्वर येथील नोंदणीक़त केंद्रावरून आणल्याचे आढळून आले.

या कृत्याद्वारे डॉ. पाटील यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने महापालिकेने डॉ. पाटील याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी नोटिशीला सादर केलेला खुलासा व त्याचे म्हणणे सल्लागार समितीवर सादर केले असता खुलासा असमाधानकारक असल्याने त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त संचालक, पुणे तथा राज्य समुचित अधिकारी यांनीही कारवाई करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले. त्यानुसार डॉ. तुषार पाटील याच्या शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटरमधील सोनोग्राफी मशीन डॉ. आरती चिरमाडे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, अॅड. सुवर्णा शेफाळ यांनी पंचांच्या समक्ष आज सील केले. या केंद्राची नोंदणी निलंबित करण्यात आली असून, लवकरच त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारे यांनी दिली. त्यामुळे डॉ. पाटील याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘आमची मुलगी’वर तक्रार

पीसीपीएनडीटी अॅक्ट १९९४ व सुधारित २००३ नुसार नागरिकांच्या तक्रारीसाठी व गुप्त माहितीसाठी महापालिकेकडून आमची मुलगी ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइटवरच अज्ञात व्यक्तीकडून संबंधित डॉक्टरच्या कृत्यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे डॉ. पाटील याच्यावर तीन महिने पाळत ठेवण्यात आली. डॉ. चिरमाडे यांच्या पथकाने नियोजबद्ध पाठपुरावा करून सापळा रचत डॉक्टरचे पितळ उघडे केले आहे.

ग्रामीण भागावर लक्ष

गर्भलिंगसंदर्भातील नियम आता कडक झाल्याने व शहरी भागात यंत्रणांचा वॉच अधिक राहत असल्याने ग्रामीण भागात गर्भलिंग करणे सोपे जाते. त्यामुळे ग्रामीण भागात थेट वाहनामध्येच गर्भाची तपासणी करण्याचा क्‍लृप्ती डॉ. पाटील याने लढवली होती. डॉ. पाटील याचे नाशिकसह त्र्यंबकेश्वर व चांदवड येथे अधिकृत सेंटर्स आहेत. त्याद्वारे नाशिकसह त्र्यंबकेश्‍वर, जव्हार, मोखाडा, चांदवड आदी तालुक्‍यांतील अतिग्रामीण व आदिवासी भागातील महिलांची तपासणी केली जात असल्याचा संशय पथकाला आहे. त्यामुळे सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदूकधारी सुरक्षारक्षक दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने पालिका मुख्यालयाची सुरक्षा खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी सुरू केली आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल संस्थेचे ४५ खासगी सुरक्षारक्षक पालिकेत दाखल झाले असून, त्यांनी सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे गनधारी सुरक्षारक्षक पालिकेच्या द्वारावरच तैनात करण्यात आले आहेत. खासगी सुरक्षारक्षकांकडे सुरक्षा सोपवण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी नगरसेवकांसह नागरिकांची या सुरक्षारक्षकांसोबत खडाजंगी उडाली.

महापालिकेने पालिकेच्या मुख्यालय,विभागीय कार्यालय तसेच आयुक्तांच्या निवासस्थानाची सुरक्षा खासगी सुरक्षारक्षकांकडे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी वर्षाला दीड कोटींची तरतूद करण्यात आली असून, मुंबईतल्या शासनमान्य संस्थेकडे काम सोपवण्यात आले आहे. संस्थेकडून ४५ सुरक्षारक्षक पुरवले जाणार असून, त्यात आठ गनधारी सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीवरून वादही निर्माण झाला होता. परंतु, आमदार बच्चू कडूंच्या वादामुळे सत्ताधाऱ्यांनी त्याला हिरवा कंद‌िल दर्शवला. आता हे खासगी सुरक्षारक्षक पालिकेत दाखल झाले आहेत. त्यांना पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह अन्य तीन द्वारांवरही तैनात करण्यात आले आहे. आतमध्ये मुख्य प्रवेशद्वारावर एक गनधारी सुरक्षारक्षक तैनात आहे. स्थायी समिती सभापतींनी केवळ आयुक्त कार्यालयातच गनधारी सुरक्षारक्षक ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाची पायमल्ली करत, थेट गेटवरच गनधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याने वादावादी होण्याची शक्यता आहे.

नागरिकांसह नगरसेवकांना फटका

पालिकेच्या सुरक्षेसाठी हे सुरक्षारक्षक नियुक्त केले असले तरी, त्याचा फटका नगरसेवकांनाही बसला. पहिल्या दिवशी दोन पक्षांच्या गटनेत्यांना तपासणीच्या जाचातून जावे लागले. त्यावेळी या सुरक्षारक्षकांसोबत वादही झाला. परंतु, नियम असल्याने त्यांनीही समंजसपणे हा विषय घेतला. काही नागरिकांसोबतही सुरक्षारक्षकांचे खटके उडाले. काही सुरक्षारक्षकांनी उद्धटपणे नागरिकांशी संवाद साधला. त्यावरूनही वाद झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव, येवल्यात ‘पद्मावती’ला विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगा

पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाला संपूर्ण देशभरातील विविध संघटनाकडून विरोध होत असताना शहरात देखील सर्वपक्षीय नेते व राजपूत महासंघाच्या वतीने सोमवारी सिमेनाचे पोस्टर जाळून प्रदर्शनास विरोध दर्शव‌िण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष दीपक पवार यांच्यासह डॉ. अद्वय हिरे, बाजार समिती सभापती प्रसाद हिरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, शांताराम लाठर, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सदस्य अरुण पाटील आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहरातील अपर जिल्हाधिकारी कार्यालायाबाहेर या सिनेमाला विरोध करण्यासाठी निदर्शन करण्यात येवून नायब तहसीलदार राजेंद्र सायंकर यांना निवेदन देण्यात आले. शहरात पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्यात येवू नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास, कायद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोल‌िस व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलद बुद्धिबळ स्पर्धेत खंडेलवाल अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉटविनिक चेस स्कूल व चेस विकी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत स्पर्श खंडेलवाल, सिद्धांत पटवर्धन, हर्ष डोडल, सार्थक रहातळ, समीक्षा जाधव हे अव्वल ठरले. या स्पर्धा देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या ऋग्वेद सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या.

बॉटविनिक चेस स्कूलचे सुनील शर्मा व सनदी लेखापाल विनय बेळे यांच्या अभिनव कल्पनेतून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध वयोगटात १७५ स्पर्धकांनी विक्रमी सहभाग नोंदवला होता. यात २३ आंतरराष्ट्रीय मानांकन खेळाडूंचा समावेश होता. पंच म्हणून मंगेश गंभीरे व प्रवीण मांदळे यांनी काम पाहिले. यावेळी मंगेश गंभीरे, विनायक वाडिले, सचिन निरंतर, विकी ठाकूर, सचिन व्यवहारे, विक्रम माळवणकर, डॉ. रेखा जाधव, संजय वाघ, गौरव देशपांडे, अनिल राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

९ वर्षाखालील गट : समीक्षा जाधव (विजयी), ओम चौधरी (द्वितीय), सार्थक भापकर (तृतीय)

११ वर्षाखालील गट : सार्थक रहातळ (विजयी), शुभम चांडक (द्वितीय), क्रिश चोपडा (तृतीय)

१३ वर्षाखालील गट : हर्ष डोडल (विजयी), श्रेयस आव्हाड (उपविजयी), स्वप्नील गोरे (तृतीय)

१५ वर्षाखालील गट : सिद्धार्थ पटवर्धन (विजयी), आयुष राजहंस (उपविजयी), प्रितेश जाधव (तृतीय)

खुला गट : स्पर्श खंडेलवाल (विजयी), धनश्री राठी (उपविजयी), अतुल पवार (तृतीय), वरुण वाघ (चतुर्थ), तन्मय महाले (पाचवा), सुश्रुत कागदे (सहावा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ डिसेंबरपासून उडणार विमान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बहुप्रतिक्षीत विमानसेवा अखेर येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तशी लेखी माहिती हवाई वाहतूक मंत्रालयाने खासदार गोडसे यांना दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वादात सापडलेली नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे ही सेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रादेशिक विमानसेवा योजना (उडान) अंतर्गत देशातील विविध विमानतळांवरुन सेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. त्याअंतर्गत नाशिक (ओझर) येथून मुंबई आणि पुणे या शहरांसाठी सेवा प्रस्तावित आहे. केंद्राच्या या योजनेत एअर डेक्कन कंपनीने बोली लावली होती. त्यात त्यांची निवड करण्यात आली. पण, ही सेवा सुरू होत नसल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी वारंवार पाठपुरावा केला. मुंबई विमानतळावर एअर स्लॉट उपलब्ध होत नसल्याचे कारण देण्यात येत होते. अखेर गोडसे यांनी दिल्लीत हवाई वाहतूक मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. येत्या १५ डिसेंबरपर्यंत सेवा सुरू केली जाईल, असे लेखी आश्वासन मंत्रालयाने दिले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी लि., एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन आणि संबंधितांची बैठक घेण्यात आली. त्यानुसार मुंबई विमानतळावर नाशिक विमावसेवेसाठी वेळ उपलब्ध करुन देण्याचे निश्चित झाले. म्हणूनच येत्या १५ डिसेंबरपासून नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा सुरू केली जाईल, असे लेखी पत्र मंत्रालयाच्या सहसचिव उषा पढी यांनी खासदार गोडसे यांना दिले आहे. त्यामुळे आता १५ डिसेंबरपासून नाशिकला सेवा सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.

विमानसेवा १५ डिसेंबरपासून सुरू होईल, असे पत्र मंत्रालयाने दिले आहे. यापूर्वीही घोषणा झाल्या आहेत. म्हणून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होईपर्यंत पाठपुरावा करणारच आहे.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नी हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बोरगड कॉलनीतील शिवामृत सोसायटीत २८ सप्टेंबर २०१४ रोजी ही घटना घडली होती.

अरुण पांडुरंग मुकणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांच्या कोर्टात झाली तर सरकारी पक्षातर्फे अॅड. दीपशिखा भिडे-भांड यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कडंक्टर म्हणून काम करणारा आरोपी मुकणे हा पत्नी रंजनासह बोरगड कॉलनीतील शिवामृत सोसायटीत राहत होता. लग्न झाल्यानंतर मुकणे सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे मुकणे दाम्पत्यात नेहमीच वाद होत होते. याचमुळे एक दिवशी रंजना म्हसरूळ येथे राहणाऱ्या वडील लक्ष्मण रामा पोटींदे यांच्याकडे निघून गेली. या दरम्यान स्वावलंबी होण्यासाठी तिने नोकरी सुरू केली. मात्र, मुलगी किती दिवस असे काम करणार याची विवचंना असलेल्या पोटींदे यांनी अरुणला भेटून त्याची समजूत काढली. यामुळे २८ सप्टेंबर २०१४ रोजी अरुण रंजनाला घेऊन घरी परतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी मुलगी फोन का उचलत नाही? म्हणून काळजीत सापडलेले पोटींदे तिच्या घरी गेले. मुलीचा खून करून अरुण फरार झाल्याचे पोटींदेच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली. या खटल्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारी वकील अॅड. पौर्णिमा नाईक यांनी १४ साक्षीदार तपासून आरोपी मुकणेविरोधात सबळ पुरावे सादर केले. तर अ‍ॅड. दीपशिक्षा भिडे-भांड यांनी युक्तीवाद केला. साक्षीदारांमध्ये फिर्यादी पोटींदे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. गायधनी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. कोर्टासमोर सबळ पुरावे उभे राहिल्याने अरुणला दोषी ठरवत कोर्टाने जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

रचला आत्महत्येचा बनाव
आरोपी अरुणने रंजनाचा गळा आवळून खून केला होता. मृत झालेल्या रंजनाच्या गळ्याला गळफास आवळून तिनेच आत्महत्या केल्याचा बनाव रचून अरुणने घरातून धूम ठोकली होती. मात्र, पोलिसांचा तपास, समोर आलेले वैद्यकीय पुरावे यामुळे अरुणचे पितळ उघडे पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पणन मंडळाच्या निर्णयाकडे लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पणन मंडळाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, तरी बाजार समितीवर प्रशासक नेमला जावा, त्यावर आपलीच नियुक्ती व्हावी यासाठी काही मंडळींकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पणन मंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.

बाजार समितीतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटिसा पाठविल्या होत्या. त्यावर बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त का करू नये, असा प्रश्न विचारण्यात आला होता. संचालकांना लेखी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्याचा लेखी अहवाल पणन मंडळाकडे पाठविण्यात आलेला आहे. पणन मंडळाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.

गेली वर्ष-दीड वर्षांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती वेगवेगळ्या कारणांनी कायम कुप्रसिद्ध झाली आहे. बाजार समितीतील आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधकांकडे आल्या. त्यामुळे समितीच्या संचालकांना नोटिसा पाठवून त्यांना लेखी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यासाठी त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्याकडे त्यावर सुनावणी झाली. युक्तीवादही झाले, त्यांनी तो अहवाल पणन मंडळाकडे पाठविला आहे. या अहवालावर शुक्रवारी (दि. १७) रोजी चर्चा झाली. मात्र, बरखास्तीबाबत कुठलाही निर्णय अद्याप प्राप्त झालेला नाही.

बाजार समितीच्या संचालकांना नोटिसा मिळाल्यानंतर सभापती देविदास पिंगळे यांना राजीनामा देणे भाग पाडले. त्यानंतर सभापती शिवाजी चुंभळे यांची निवड करण्यात आली. बरखास्तीची टांगती तलवार असताना बाजार समितीत पदांसाठी रेलचेल सुरू होती. उपसभापतीच्या निवडीवरून बराच वादावादी झाली. यानंतर व्यापाऱ्यांना गाळ्यासंबंधी नोटिसा, गाळे सील करण्याचे प्रकार, जिल्हा उपनिबंधकांना प्रस्ताव न पाठविता नवे गाळे तयार करण्याचा घातलेला घाट, त्यावर उपनिबंधकांनी आणलेली स्थगिती यांच्यामुळे बाजार समिती गाजतच आहे.

पालकमंत्र्यांकडे फिल्डींग
बाजार समिती बरखास्त होणारच असे गृहित धरून त्यावर प्रशासक किंवा प्रशासक मंडळाची नियुक्ती केली जाईल, अशी अपेक्षा अनेकांना लागून राहिली आहे. त्यावर शासनाकडून आपलीच नियुक्ती व्हावी यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालण्याचे प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रातून ३०६ कोटीचे कर्ज वाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उद्योगांना सहज कर्जपुरवठा व्हावा या उद्देशाने सुरू झालेल्या मुद्रा योजनेतून या आर्थिक वर्षातील सात महिन्यात ३०६ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर होऊन यातील २९६ कोटी २० लाख कर्ज अद्यापपर्यंत वाटप झाले. जिल्ह्यातील ६१ हजार ६३८ बेरोजगारांना हे कर्ज मिळाले आहे. विशेष म्हणजे या कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँका बरोबरच खासगी बँका, मायक्रो फायनान्स, स्मॉल फायनान्स बँक यांचा टक्काही वाढला आहे.

देशातील लघू आणि सूक्ष्म उद्योगांना सहज कर्जपुरवठा व्हावा या उद्देशाने प्रारंभ झालेल्या या योजनेत शिशु, किशोर व तरुण असे तीन विभाग केले असून त्यात कर्ज देण्याची मर्यादा निश्चित केली आहे. ५० हजाराची मर्यादा असलेल्या शिशु योजनेतून ५७ हजार ३०९ जणांना १४४ कोटी ३३ लाख कर्ज तर ५० हजार ते ५ लाखपर्यंत कर्ज मिळणाऱ्या किशोर योजनेतून ३ हजार ३६३ बेरोजगारांना ८५ कोटी ५४ लाख रुपये कर्जवाटप मंजूर करण्यात आले. तसेच पाच लाख ते १० लाख रुपये कर्ज मर्यादा असणाऱ्या तरुण योजनेतून ९६६ बेरोजगारांना ७६ कोटी ९७ लाख रुपये कर्जमंजूर करण्यत आले आहे. मुद्रा बँक रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असून या कर्जाची ५० टक्के जबाबदारी मुद्रावर आहे. या योजनेत गेल्या आर्थिक वर्षात १ लाख २२ हजार कोटी टार्गेट होते. त्यानंतर यावर्षी त्यात दुप्पटीने वाढ करून ते २ लाख ४४ हजार कोटी करण्यात आले आहे.

असे झाले कर्जवाटप

बँक प्रकार........लाभार्थी........कर्ज मंजूर......कर्ज वाटप
- एसबीआय....८१२........३० कोटी ८९ लाख....३० कोटी ६९ लाख
- इतर राष्ट्रीयकृत बँका....४,४०२....८३ कोटी ३७ लाख....७७ कोटी ७२ लाख
- खासगी बँका....८,५०२........६९ कोटी ९० लाख....६९ कोटी ८६ लाख
- रिजनल रुरल बँक....४९....१ कोटी ४३ लाख....१ कोटी ४३ लाख
- मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट....४०,८५६....९५ कोटी ७९ लाख....९१ कोटी ४ हजार
- स्मॉल फायनान्स बँक....७,०१७....२५ कोटी ४७ लाख....२५ कोटी ४० लाख

मुद्रामधून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आले आहे. अभ्यासपूर्ण व योग्य माहिती घेऊन बँकेत गेल्यास बँक प्रतिसाद देते. यावेळेस कर्जाचे टार्गेटही केंद्र सरकारने दुप्पट केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जात आहे. त्यातून बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.
- प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष, भाजप उद्योग आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयाचे मळभ घोंगावणारी ‘ती रात्र’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मानवी मन मोठे विचित्र आहे या मनावर संशय पिशाच्चाने कब्जा केला की माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. तो कधी सारासार विचार करतो, स्वत:ची समजूतही घालतो पण संशयपिशाच्च काही त्याचा पिच्छा सोडत नाही. अशावेळी माणूस आपले स्वत:चे व जोडीदाराचेही मनस्वास्थ्य घालवून बसतो. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर तर होतोच परंतु संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याची झळ बसते. हे सांगणारे ‘ती रात्र’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी दीपक मंडळ संस्थेच्या सांस्कृतिक विभागातर्फे ‘ती रात्र’ हे नाटक सादर करण्यात आले. राजन व रजनी यांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेले आहे. दोघेही संसारात रममाण आहेत. रजनी दिसायला देखणी असल्याने राजनला तर अस्मान ठेंगणे झाले आहे; मात्र बरोबरच त्याच्या मनात संशयदेखील आहे. तो सतत रजनीवर संशय घेत असतो. त्यामुळे ती त्याला डिटेक्टिव्ह म्हणते. त्याचे संशयाचे भूत इतके बळावते की तो तिला प्रकाश नावाने फोन करायला लागतो, त्याच्या नावाने ग्रीटिंग्ज पाठवतो, किचनमध्ये गिफ्ट ठेवतो; परंतु रजनीला तेव्हा झटका बसतो जेव्हा राजन हा प्रकाश नावाच्या एका तरूणाला घरी पाठवतो व तिचा पूर्वायुष्यातील प्रियकर असल्याचे सांगतो. ती त्याला बधत नाही. मात्र, टेलिफोनला असलेल्या रेकॉर्डरवरून तिला राजनच्या मनात काय सुरू आहे ते कळते. त्यामुळे ती घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येते.

मनाचा हा गुंता सोडविण्यासाठी राजन एका तज्ज्ञ व्यक्तीला शरण जातो. इथे सुशिक्षित नायकाच्या बाबतीत एक गोष्ट सकारात्मक असते की तो कुठल्याही अंधश्रद्धेकडे न वळता शास्त्रीय आधार घेतो, ही जमेची बाजू. वेळीच तो आपला संसार सावरतो. संसारावरचे मळभ दूर होते. जोडीदारांचा परस्परांवरील विश्वास दृढ होतो. एकमेकांवरील विश्वास हाच खरा सहजीवनाचा मुख्य आधार अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केले होते. दिग्दर्शन गिरीश जुन्नरे यांचे होते. निर्मिती विजय शिंगणे यांची होती. रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा शेखर शिंपी यांची होती. नेपथ्य आनंद ढाकिफळे, संगीत राजा पुंडलिक, संगीत सहाय्य प्रतिक्षा एकबोटे, प्रकाशयोजना सुरेश गायधनी यांची होती. रंगमंच सहाय्य चैतन्य गायधनी, मृणाल राजगुरू, वेदांत हातवळणे, अनिकेत इनामदार यांचे होते. विशेष सहकार्य भरत भालेराव, स्वरूप बागूल, हेमंत देशपांडे, एकनाथ सातपूरकर, अरुण आवटे यांचे होते. नाटकात कुंतक गायधनी, स्वराली हरदास, विनीत पैठणे आणि कौस्तुभ एकबोटे यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : अॅनिमल प्लॅनेट
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह
वेळ सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुळवू इंग्रजीशी नातं

$
0
0

डॉ. प्रीती जोशी

संवाद कुशलतेसाठी सर्वांत महत्त्वाचं माध्यम म्हणजे भाषा हे होय. जगात अनेकविध भाषा बोलल्या जातात. पण ‘ग्लोबल’ भाषेचा मान हा फक्त इंग्रजी भाषेलाच मिळाला आहे.

म्हणूनच ‘English is a window to the world', असं म्हटलं जातं. इंग्रजी ही जागतिक ‘lingua franca’ (लिंक लँगवेज) आहे आणि भारतातही इंग्रजी भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे.

जर आधुनिक जगाचा भाग बनायचं असेल, जगाच्या वेगासोबत धावायचं असेल तर इंग्रजी भाषेला पर्याय नाही. म्हणूनच इंग्रजी भाषा आत्मसात करायची असेल तर भाषेच्या चारही कौशल्यावर Listening, Speaking, Reading and Writing (LSRW) यांवर प्रभूत्व मिळवायचा प्रयत्न करायला हवा. याबरोबरच Accuracy आणि Fluency या दोन्ही बाबींवर देखील लक्ष द्यायला हवं.

हे करत असताना भाषेतील बारकावे, रचना समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. यातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे ‘Vocabulary’ अर्थात शब्दसंग्रह हा होय. महात्मा गांधी इंग्रजी भाषेच्या शब्दसंग्रहाबद्दल म्हणतात की, “English language is so elastic that you can find another word to say the same thing.” म्हणूनच जर शब्दसाठा वाढवायचा असेल तर आपण खालील पर्यायांचा विचार करू शकतो.

शब्दकोश (Dictionary), ज्ञानकोश (Thesaurus) आणि Activators चा वापर शब्दकोश आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ, उच्चार, त्याची जातकुळी, (parts of speech) इत्यादींची माहिती देत असतो तर Thesaurus आपल्याला त्या शब्दाचा समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यांबरोबरच acceptable collocations (परंपरागत शब्दसंघटन) याची माहिती पुरवतो.
उदाहरणार्थ- handsome / beautiful / good looking हे समानार्थी शब्द आहेत पण ‘handsome boy’ असंच आपण म्हणू शकतो. ‘handsome girl’ असं म्हणणं चुकीचं ठरत.

Framing Lexical Webs (शब्दजाळे) हा ही शब्दसाठा वाढवण्यासाठी एका दुसरा महत्त्वाचा पर्याय आहे. एखाद्या विशिष्ट गोष्टीशी, क्रियेशी संबंधित शब्दजाळे तयार करणं त्यासाठी गरजेचं आहे.

उदाहरणार्थ, १. Cricket : boundary, bowled, bails, maiden over, umpire, leg spin, stadium इत्यादी.

२. walk – stroll, plod, hobble, prowl, march, stride, limp इत्यादी
Word Games हा ही शब्दसाठा वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. यामध्ये आपण crossword, anagrams (rearranging letters), blogger, cryptograms, scrabble इ. यांचा वापर करू शकतो. असे हे शब्द आपल्याला भाषा समजून घेण्याबरोबरच आपली विचारधारा, आपल्या कल्पना, आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत अतिशय स्वच्छपणे व योग्य पद्धतीने पोहोचवण्यासाठी मदत करतात. योग्य शब्द निवडीचा प्रभाव आपल्या आजूबाजूच्या लोकांवर प्रभाव पडतो याबरोबर त्यामुळे आपली व्यक्त होण्याची क्षमताही वाढते.

खरंतर भाषा आणि विचार हे परस्पर पूरक आहेत. म्हणजेच आपण विचार करताना योग्य शब्दांची निवड केली तर आपल्याला जे म्हणायचे आहे ते आपण अतिशय प्रभावीपणे मांडू शकतो. यासाठी भाषेतील शब्दसंग्रह वाढवण्यासाठी घालवलेला वेळ हा सत्कारणी लावलेला वेळ ठरतो आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो.
(लेखिका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरतीसाठी सर्वपक्षीय एकजूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे कारण देत, नोकरभरतीला विरोध करणाऱ्या प्रशासनाला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकजूट करत वैद्यकीय विभागाच्या आऊटसोर्सिंगच्या प्रस्तावावरून चांगलेच घेरले. मंजूर नसलेली आस्थापनेवरील पदेही आऊटसोर्सिंगद्वारे भरण्याच्या तयारीत असलेल्या प्रशासनाची कोंडी करत, आऊटसोर्सिंगच्या प्रस्तावाची सभागृहात चिरफाड करण्यात आली. वैद्यकीय विभागाचा २६५ पदे भरण्याचा प्रस्ताव महासभेने हाणून पाडत सदरील प्रस्ताव पुन्हा मागे घेण्यास भाग पाडले. आऊटसोर्सिंगच्या प्रस्तावावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकजूट दाखवत, नोकरभरतीचा आग्रह लावून धरला. त्यामुळे महापौरांनी अखेरीस सदरील प्रस्ताव दुरूस्तीसह सभागृहावर ठेवण्याचे आदेश देत, रोस्टरनुसार नोकरभरती करावी असे आदेश दिले.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या महासभेत आऊटसोर्सिंगच्या विषयावरून पुन्हा प्रशासनाची कोंडी झाली. गेल्या वेळी उद्यान निरीक्षकांच्या पदांच्या भरतीचा वाद कायम असतानाच, मंगळवारी पुन्हा वैद्यकीय विभागीतल २६५ पदे आऊटसोर्सिंगने भरण्यासाठी ५ कोटी ५८ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, नगरसेवक गुरम‌ित बग्गा यांनी या प्रस्तावाची कोंडी करत, प्रशासनालाच तोंडघशी पाडले. सदरील प्रस्तावात महासभेच्या आस्थापनेवर मंजूर नसलेली बायोमेड‌िकल इंजिनीअर्सची पदेही भरण्याचा समावेश होता. त्यावर बग्गा यांनी प्रशासन तसेच वैद्यकीय विभागाची कोंडी करत ही पदे भरता येत नसल्याचे सांग‌ितले. प्रशासनानेही तसाच निर्वाळा दिल्याने नगरसेवक नोकरभरतीच्या मागणीवर आक्रमक झाले. आस्थापनेवरील पदे आऊटसोर्सिंगने भरता येत नसल्याचा दावा नगरसेवकांनी केला. आऊटसोर्सिंगच्या भरतीमुळे आरक्षणावर अन्याय होत असल्याचा दावा बग्गा यांनी केला. त्यावर ३२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २५५ पदे आरक्षणानुसार भरली जातील, असा दावा प्रभारी आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी केला. त्यावर अर्धी पदे मानधनावर आणि अर्धी पदे आऊटसोर्सिंगने कशी भरली जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही आऊटसोर्सिंगच्या प्रस्तावास विरोध करत आस्थापना खर्चाचे भोकाड आता बंद करा, असा सल्ला दिला. महत्वाचे डॉकेट जादा विषयात आलेच कसे, असा सवाल करत आऊटसोर्सिंगच्या नावाखाली स्थानिक भूम‌िपुत्रांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नोकरभरती झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी डॉकेट दुरुस्तीची मागणी केली. राहुल दिवे, गजानान शेलार, दिनकर आढाव यांनी या प्रस्तावाला विरोध केला. दिनकर आढाव यांनी तर थेट प्रशासनावर हल्लाबोल करत प्रशासनाची नोकरभरतीची मानसिकता नसल्याचा आरोप केला. प्रशासन दिशाभूल करत असून नोकरभरती संदर्भात गोलमाल भूमिका घेत असल्याचा आरोप केला. दिनकर पाटील, शाहू खैरे यांनीही विरोध करत, सर्व रिक्त जागा मानधनावर भरण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी सदरील प्रस्ताव पुन्हा माघारी पाठवत, रिक्त पदे ही रोस्टरनुसार भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिकेत नोकरभरतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दीड हजार पदे रिक्त

महापालिकेतील महत्त्वाच्या रिक्त पदांबाबत गुरम‌ित बग्गा यांनी प्रशासनालाच आरसा दाखवला. महत्त्वाचे पद सहा मह‌िन्यांपेक्षा जास्त वेळ रिक्त ठेवता येत नसतानाही, शहर अभियंता, नगरसचिव, वैद्यकीय अधिकारी, दोन उपायुक्त पदे, चार सहाय्यक आयुक्तपदांसह जवळपास महत्त्वाची ४५ पदे सहा महीन्यांपेक्षा जास्त काळ रिक्त असल्याचा दाखला त्यांनी सभागृहात दिला. पालिकेत मंजूर ७०९० पदांपैकी सध्या ५११६ पदेच भरली असून दीड हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचा दावा त्यांनी केला.

आऊटसोर्सिंग शब्द काढा

प्रभारी आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी वैद्यकीय विभागाच्या आऊटसोर्सिंगचे डॉकेट मंजूर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. स्वच्छता सर्व्हेक्षण असल्याने व वैद्यकीय विभागाचे रिक्त पदे असल्याने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. सदस्यांचा आऊटसोर्सिंगला विरोध पाहता आऊटसोर्सिंगऐवजी ‘मानधन’ शब्द वापरा, अशी विनंती केली. परंतु, ही पदे मानधनावर भरता येत नसल्याचे प्रशासनाने लक्षात आणून दिल्यावर त्यांनीही मग शांत राहणेच पसंत केले.

चंगू-मंगूचे होऊन जाऊ द्या!

महासभेत सदस्य बोलत असताना महापौरांना वारंवार सल्ले देण्यासाठी महापौरांच्या आसनाजवळ जाणारे सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांचा राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी चांगलाच समाचार घेतला. फाळके स्मारकाच्या ठेक्याच्या वाढीव बिलासंदर्भात शेलार बोलत असताना पाटील आणि मोरुस्कर हे महापौरांच्या आसनाजवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यामुळे शेलार यांनी संतप्त होऊन भाषणच थांबवले. त्यावर ‘चंगू-मंगूचे होऊन जाऊ द्या’ असा टोला त्यांनी लगावल्याने हास्याचे फवारे उडाले. परंतु, पाटील आणि मोरुस्कर यांनी शेलार यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, त्यांची ज्येष्ठता काढली. त्यावर शेलार यांनी सभागृहाच्या नियमाकडे बोट दाखवत खरी-खोटी सुनावली. महापौरांनी हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिल्याने वातावरण निवळले. मोरुस्कर यांनी शेलार यांना सदस्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, अशा कानपिचक्या दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मावती चित्रपटाविरोधात मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राजपूत समाजाच्या भावना लक्षात घेता सरकारने पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा इशारा धुळे तालुका राजपूत समाजातर्फे देण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २१) राजपूत समाजातर्फे शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर पद्मावती चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी चित्रपट निर्माते संजय भन्साळी यांच्या निषेधातही घोषणाबाजी करण्यात आली.

शहरातील महाराणा प्रताप चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर राजपूत समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. या वेळी उदेसिंग जमादार, सुनील जमादार, नरेंद्र जमादार, जसपालसिंह सिसोदिया, अंकुश देवरे, एकनाथ देवरे, कौतिक राजपूत, अजय राजपूत यांच्यासह राजपूत समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मावती या चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांना महाराणी पद्मावती चित्रपट निर्मिती केली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून महाराणी पद्मावती व राजपूत समाजाच्या इतिहासाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यातून महाराणी पद्मावती यांची बदनामी करण्यात आली असून, यामुळे संपूर्ण राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटातील वादग्रस्त दृश्य त्वरित वगळण्यात यावी. याशिवाय राजपूत समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादन घटणार!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

ऐन बहराच्या मोसमात निसर्गाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकले आहे. बदलत्या निसर्गाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे अर्थचक्र बिघडणार आहे. यावर्षी द्राक्षाचे उत्पादन कमी होणार आहे. उत्पन्न कमी असल्याने सहाजिकच चांगला भावही मिळणार आहे.

मागील वर्षी निर्यातदार द्राक्ष उत्पादकांना सुरुवातीला १०० रुपये भाव मिळाला. नंतर चिलीची द्राक्ष आल्याने ३० ते ४० रुपये असा दर मिळाला होता. यावर्षी ६० रुपये किलो असा भाव मिळाला तरी तो भाव उत्पादकांना परवडेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या द्राक्ष हंगामात विलंबाने खरड छाटण्या झाल्या. परिणामी काड्या परिपक्व होऊ शकल्या नाही. त्यामुळे ऑक्टोबर छाटणी केलेल्या द्राक्षबागेतील द्राक्षमाल अपेक्षित प्रमाणात निघाला नाही. तर काही ठिकाणी द्राक्षघड जिरण्याचे प्रकार झाले. त्यामुळे उपलब्ध द्राक्षमालांचे संगोपन करण्यासाठी उत्पादकांची कसरत सुरू आहे.

महिनाभरापूर्वी परतीच्या पावसाने द्राक्षबागांवर डावणी, घडकुज या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तसेच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्ष संकटकात सापडले आहेत. सरासरी ३० टक्के द्राक्ष उत्पादनाला फटका बसला आहे. थंडीच्या कमी-अधिक प्रमाणामुळे द्राक्ष प्रत्यक्ष बाजारपेठेत येई पार्यंत बिकट वाट आहे. स्वाभाविकपणे कमी उत्पादनाला बाजारपेठेत चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक बाळगून आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे उत्पादकांची झोप उडाली आहे. ढग निवळले नाही तर करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकरोडवर अखेर ‘झेब्रा’ क्रॉसिंग

$
0
0

अक्षय सराफ, कॉलेज क्लब रिपोर्टर

त्र्यंबकरोडवरील संदीप फाऊंडेशनसमोर जीवघेणा अपघात झाल्यानंतर विविध सरकारी यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. याठिकाणी पोलिसांनी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारले आहेत.

या रस्त्यावर संदीप फाऊंडेशन, सपकाळ नॉलेज हब, ब्रह्मा व्हॅली, त्र्यंबक विद्यामंदिर या शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमधून सहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी सकाळी साडेनऊ ते साडेदहा व साडेचार ते साडेपाच या कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस कॉलेज बस तसेच वैयक्तिक वाहनाने प्रवास करणारे विद्यार्थी यामुळे या रस्त्यावर मोठी गर्दी असते.

संदीप फाऊंडेशनमध्ये जाताना किंवा बाहेर येताना विद्यार्थ्यांना दुभाजक ओलांडण्याची कसरत करावी लागते. यामुळे याठिकाणी जास्तच वाहनकोंडी होते. पुढे शाळा किंवा कॉलेज असल्याचा फलक बांधकाम विभागातर्फे त्र्यंबकरोडवर ठिकठिकाणी लावण्यात आलेला नाही. तसेच गतिरोधकदेखील नाहीत. यामुळे वाहनावर नियंत्रण न राहिल्याने संदीप फाऊंडेशन, सपकाळ कॉलेज चौफुली या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात. संदीप फाऊंडेशनसमोर याआधी देखील २-३ गंभीर अपघात घडले आहेत. गेल्या आठवड्यात संदीप फाऊंडेशनसमोर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात हर्षिका सुर्वे या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संदीप फाऊंडेशनसमोर गतिरोधक, कायमस्वरुपी पोल‌िस कर्मचाऱ्याची नियुक्ती, पुढे कॉलेज असल्याचा फलक व झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांची मागणी विद्यार्थी, नागरिक व मनसे तालुकाप्रमुख रमेश खांडबहाले यांनी केली होती. पोलिसांनी एक कर्मचारी काही दिवसांपूर्वीच नियुक्त केला आहे. बांधकाम विभागाने आता झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारले आहेत. गतिरोधक, दिशादर्शक आणि पुढे शाळा कॉलेज असल्याचे सूचना फलक लावण्यात आले नाहीत. या उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.

संदीप फाउंडेशनसमोर झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांची आखणी करण्यात आली. या रस्त्यावर गतिरोधक व दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे.

- प्रतीक सोनार, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीकडे शिक्षकांनी फिरवली पाठ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार नोंदणीनंतर प्रारुप मतदार याद्या प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय, विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसह सर्व तहसील कार्यालयांत या प्रारुप मतदार याद्या मतदारांना बघण्यासाठी उपलब्ध करुण देण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीनुसार विभागात ४५ हजार ६३५ इतक्या मतदारांचीच नोंदणी झाली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीकडे शिक्षकवर्गाने पाठ फिरवली असल्याचे एकूण मतदार नोंदणीतून उघड झाले आहे.

राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदार यादी करण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. दि.१ नोव्हेंबर २०१७ या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघासाठीची प्रारुप मतदार यादी प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. मंगळवारी ही प्रारुप मतदार यादी मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि.२१ डिसेंबर २०१७ पर्यंत या प्रारुप मतदार यादीतील दुरुस्तीबाबतचे दावे अथवा हरकती संबंधित जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांत स्वीकारण्यात येणार असल्याचे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

दहा हजारांनी घट

यावेळच्या शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीकडे शिक्षकवर्गाने पाठ फिरवली असल्याचे एकूण मतदार नोंदणीतून उघड झाले आहे. यावेळी नाशिक विभागातून ४५ हजार ६३५ शिक्षकांनी मतदार नोंदणी विहित वेळेत केली आहे. गेल्या वेळच्या निवडाणुकीवेळी मतदार संख्या सुमारे ५६ हजार इतकी होती. यावेळी मात्र शिक्षकांनी मतदार नोंदणीकडे पाठ फिरविल्याने प्रारुप मतदार यादीतील मतदार संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातच सुमारे दहा हजार शिक्षक मतदार घटले आहेत.

महिला मतदारसंख्या कमी

विभागात महिला शिक्षक मतदारांची नोंदणी केवळ १० हजार ५५६ इतकीच झाली आहे. वास्तविक महिला शिक्षिकांची संख्या याहून कितीतरी पटींनी जास्त आहे. नंदुरबार, धुळे व जळगाव या तीन जिल्ह्यांत तर महिला शिक्षिका मतदारांची नोंदणी दोन हजाराच्या खालीच आहे. पुरुष शिक्षक मतदारांची नोंदणी महिला मतदारांच्या नोंदणीच्या तीन पट जास्त झालेली असल्याचे प्रारुप मतदार यादीतुन उघड झाले आहे. लोकशाहीचा आत्मा असलेल्या सार्वजनिक निवडणुकीतील उच्च शिक्षित अशा महिला शिक्षिकांचा सहभाग अजूनही अल्प असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’त कचरादहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रदूषण होऊ नये म्हणून उघड्यावर कचरा पेटविण्यास सरकारने मनाई केली असतानाही शासकीय कार्यालयाच्या आवारातच कचरा पेटविण्याचा प्रकार मंगळवारी घडला. आरटीओ कार्यालयाच्या आवारात हा पेटविलेला कचरा विझविण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्याची वेळ आली होती.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने अशा प्रकारे कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी करून त्यांना नोटीस दिली आहे. हा कचरा कुणी पेटविला याची शहानिशा करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

उघड्यावर कचरा पेटविल्यामुळे वायू प्रदूषण होते, ते टाळण्यासाठी कचरा पेटविण्यावर प्रतिबंध घातलेले आहेत. मात्र, असे असतानाही अजूनही ठिकठिकाणी कचरा पेटविण्याचे प्रकार घडत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात असलेल्या वृक्षांचा पालापाचोळा पडलेला असतो. तसेच, भिंतीलगत कचरा टाकला जातो. हा कचरा मंगळवारी पेटविण्यात आला होता. तो नेमका कुणी टाकला आणि कुणी पेटविला याबाबत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगण्यास टाळाटाळ केली. पेटविलेल्या कचऱ्यामुळे कार्यालयाच्या परिसरातील गवतानेही पेट घेतला होता. त्यामुळे अग्निशामन दलाची गाडी बोलावून हा पेटलेला कचरा विझविण्यात आला. कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या टपऱ्यावाल्यांपैकी कुणीतरी हा कचरा पेटविला असेल, असेही सांगण्यात आले. हा कचरा कुणी पेटविला याचा शोध घेऊन ते महापालिकेला कळवावे अन्यथा त्याचा शोध महापालिका घेईलच, असे सांगत महापालिका आरोग्य विभागाचे निरीक्षक संजय गोसावी यांनी या कार्यालयाला नोटीस बजावली आहे.

--

कारवाई व्हायलाच हवी

या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूला विविध व्यावसायिकांच्या टपऱ्या आहेत. त्यांच्यातील कुणीही या परिसरात कचरा टाकतात, असे येथील कर्मचारी व अधिकारी सांगतात. बाहेरची व्यक्ती येथे कचरा टाकीत असेल, तर त्यांना रोखण्याचे काम आरटीओचे आहे, मात्र, त्यांना रोखण्यात येत नसल्यामुळे जर असा प्रकार घडत असेल, तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाइल्डलाइनतर्फे बालहक्क दिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्डलाइन १०९८ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय मुलींचे अनुरक्षण गृह येथे बालहक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय उपायुक्त बी. टी. पोखरकर यांनी बालहक्क दिनाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
‘संयुक्त राष्ट्र परिषदेने २० नोव्हेंबर १९८९ साली बाल हक्क संहिता मंजूर केली. या संहितेच्या व्याख्येनुसार १८ वर्षांखालील व्यक्ती म्हणजे मूल. ही संहिता म्हणजे मुलांच्या हक्कांची अतिशय काटेकोर आणि योग्य भाषेत केलेली सविस्तर यादी आहे. ढोबळमानाने ही यादी मुलांचा जगण्याचा हक्क, विकासाचा हक्क, सहभागाचा हक्क आणि सुरक्षिततेचा हक्क अशी चार भागात विभागता येते. बालकांच्या या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी बाल हक्क दिन साजरा केला जातो’, अशी माहिती विभागीय उपआयुक्त बी. टी. पोखरकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शासकीय अंधशाळेतील मुलांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मुलामुलींचे बालगृह, आधाराश्रम, रमाबाई आंबेडकर विद्यालय, सारडा कन्या विद्यालय, अनुरक्षण गृह, अवेकनिंग जागृती, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प या शाळा व संस्थांमधील मुलांनी एकपात्री नाटक, सामुदायिक नाटक, काव्यवाचन, नृत्य सादर असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी सर्व संस्थांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी बालदिन सप्ताहात झालेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
यावेळी आठवण लॉन्सचे संचालक नागेश चव्हाण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. पी. पाटील, अनुरक्षण गृह अधिक्षिका एस. डी. गांगुर्डे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनील दुसाने, योगिता जोशी, बाल न्याय मंडळाच्या सदस्या सुनंडा रोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गणेश कानवडे यांनी केले. सूत्रसंचालन चाइल्डलाइनच्या शहर समन्वयक प्रणिता तपकिरे यांनी केले, तर केंद्र समन्वयक प्रवीण आहेर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images