Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शहरातील स्मार्ट रोडचा आराखडा जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 'स्मार्ट रोड' म्हणून विकसित केल्या जाणाऱ्या अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्याचे त्रिस्तरीय सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या बैठकीत एक किलोमीटर शंभर मीटर अंतराच्या या रस्त्याचा प्रारूप आराखडा गुरुवारी सादर करण्यात आला. सर्व्हेक्षणात या स्मार्ट रोडसाठी तीन एकेरी मार्ग तयार केले जाणार असून, अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाक्यापर्यंत चार इंटिलिजंट सिग्नल यंत्रणा उभारण्याबरोबरच सीसीटीव्ही, वाय-फाय सुविधा, सायकल ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बेंचेस अशा सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाक्यापर्यंतचा १.१ किलोमीटरचा रस्ता हा स्मार्ट रोड म्हणून विकस‌ति केला जाणार आहे. या स्मार्ट रोडच्या विकासासाठी महापालिकेने केपीएमजी या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेच्या प्रतिनिधींकडून हा आराखडा गुरुवारी स्मार्ट सिटीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीस नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ प्रकाश थवील, शहर अभियंता यू. बी. पवार, अर्बन प्लॅनर कांचन बोधले, प्रकल्प अभियंता मनोहर पोकळे, कंपनी सेक्रेटरी महेंद्र शिंदे, आयटी हेड प्रमोद गुर्जर, मुख्य लेखाधिकारी बी. जी. निर्मळ तसेच महावितरण, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

‘स्मार्ट रोड’च्या प्रारूप आराखड्यात सुचविलेल्या पर्यायांवर विचार करण्यासाठी शहर वाहतूक शाखा, एसटी महामंडळ, पोल‌सि आदींसमवेत संयुक्त बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर तीन वन-वेसारख्या पर्यायांची चाचणी

घेतली जाणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी तसेच रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाचा विचार करून, त्यांना काय सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, यासंबंधी यादी तयार करण्यात आली. त्यानुसार 'स्मार्ट रोड'चे संकल्पनाचित्र तयार करण्यात आले आहे. प्रत्येकी १६ तासांच्या या सर्वेक्षणात अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या दरम्यान अस्तित्वात असलेले सिग्नल, चौक, मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची संख्या, रिक्षा स्टॅण्ड, रस्त्यालगतच्या झाडांची संख्या, आदींचाही विचार करण्यात आला.

तीन एकेरी मार्ग

सीबीएस, एम. जी. रोडवरील वर्दळ कमी करण्यासाठी तीन एकेरी मार्ग सुचविण्यात आले आहेत. त्या सीबीएस ते त्र्यंबक नाका, शालिमार ते सीबीएस, महाबळ चौक ते महात्मा गांधी रस्ता असे रस्ते एकेरी केले जाणार आहेत. म्हणजेच शालिमारकडून सीबीएसकडे जाण्यासाठी शिवाजीरोडकडे न वळता सार्वजनिक वाचनालय, महाबळ चौक, महात्मा गांधी रस्ता व पुढे सीबीएसकडे जाता येईल. अशोकस्तंभ येथील वाहतूक कमी करण्यासाठी गंगापूररोडकडून रामवाडी पुलाकडे जाण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील रस्त्याच्या वापराचा पर्याय देण्यात आला.

स्मार्ट रोडची वैशिष्ट्ये

अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान फूटपाथ

ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस,

स्मार्ट किऑस्क, ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध

संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे,

स्मार्ट पोल, वाय-फाय सुविधा, सोलर पॅनल

रस्त्याच्या दुतर्फा एक मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक

भूम‌गित विद्युततारांची व्यवस्था

दुचाकी पार्किंगची स्वंतत्र व्यवस्था

दुतर्फा डक्ट तयार केले जाणार

तीनही चौकांत इंटेलिजंट ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवाशांची लूट करू नका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दिवाळीत पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, या उद्देशाने राज्यातील सर्व प्रवासी व स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस तसेच मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास संप मागे घेईपर्यंत मान्यता देण्यात आली आहे. पण दिवाळी सणाच्या तोंडावर जास्त भाडे आकारणी न करता जास्त फेऱ्या मारून प्रवाशांची सेवा करा, त्यातून तुम्हाला फायदा मिळेल. प्रवाशांकडून जास्त भाडे आकारून लूट करू नका, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केल्या.

आरटीओ कार्यालयात ट्रान्सपोर्ट, टॅक्सी आणि रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भरत कळसकर, परिवहन विभागाच्या वतीने यामिनी जोशी यांच्यासह चौधरी यात्रा कंपनीचे ब्रिजमोहन चौधरी, छावा संघटनेचे राजेंद्र वाघले, टॅक्सी युनियनचे नंदू पवार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रिजमोहन चौधरी यांनी धुळे येथील आगाराजवळ गाड्या भरताना अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्याकडे केली असता त्यांनी तत्काळ फोनवरून संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तेथे इन्स्पेक्टर व पोल‌िस नेमणूक करण्यास सांगितले. याशिवाय सर्व वाहतूक संघटनांनी प्रवासी सेवा म्हणून कार्य करावे. कोणाचीही लूट होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

यामिनी जोशी यांनी सिन्नर, ठाणगाव, घोटी, सिन्नर, मनमाड, नांदगाव, नांदगाव, चाळीसगाव, मालेगाव अशा विविध ठिकाणी एसटी महामंडळाच्या फेऱ्या असतात. प्रवासी वाहनांबरोबर एसटीदेखील फुल असतात. अशा मार्गावर गाड्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तेथे फेऱ्या वाढवण्याच्या व गरज पडल्यास गाड्यांची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. संपाच्या काळात युनियनच्या लोकांनीदेखील संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. प्रवाशांची लूट बऱ्याचदा खासगी वाहनधारकांकडून केली जात असल्याची माहिती दिली.

प्रवाशांना काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास आरटीओ पोर्टल, पीएमओ पोर्टल, फोन वरून किंवा ई-मेल वर तक्रारी केल्यास त्याची तत्काळ दखल घेऊन सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याची माहिती परिवहन कळसकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅपने फसवले, एसटीने अडवले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅपचा फसवा मेसेज वाचून देवळाली कॅम्प येथे भारतीय सैन्यात पॅरो कमांडो भरतीसाठी आलेल्या साक्रीच्या दहा तरुणांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. फसव्या मेसेजमुळे नोकरी तर मिळाली नाहीच पण, एसटीच्या संपामुळे हे तरुण नाशकातच अडकले. पण, या संकटात खासगी बस कपंनीने माणुसकीचा हात देत त्यांना घरांपर्यंत मोफत पोहचवण्याचा सुखद धक्का देत या तरुणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

साक्री तालुक्यातील आयचाडे या गावातील हे दहा तरुण रविवारी एसटीने नाशिकला आले. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या मेसेजमध्ये दिलेल्या स्थळी हे तरुण देवळाली कॅम्प येथे गेले. त्यावेळी त्यांना हा मेसज फसवा असल्याचे लक्षात आले. येथील अधिकाऱ्यांनी अशी कोणतीच भरती नसल्याचे सांगितल्यानंतर ते पुरते निराश झाले. त्यांच्यासारखेत अनेक तरुणही येथे आले होते. पण, साक्रीच्या तरुणांचे संकट त्यापेक्षा वेगळे होते. त्यांच्याकडे येण्यासाठी व खाण्यापिण्यासाठी पैसे होते. रविवारीच हे पैसे संपल्यामुळे त्यांना घरी जाण्याचा मार्गच बंद झाला. पैशांशिवाय पर्याय नाही म्हणून या तरुणांनी कामाचा शोध सुरू केला व त्यांना एका कारखान्यात कामही मिळाले. ३०० रुपये रोजावर या तरुणांनी रोजंदारीने काम सुरू केल्यानंतर त्यांना तीन दिवसांचे ९०० रुपये मिळाले. त्यातून काही खर्चही झाले. त्यानंतर हे तरुण बुधवारी पुन्हा गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर एसटीचा संप असल्याचे कळले. यामुळे ्यांची अडचण झाली. त्यामुळे पुढे कसे जायचे यावर त्यांनी अधिकारी व पोलिसांशी संपर्क साधला. माध्यम प्रतिनिधींनाही ते भेटले व त्यातून त्यांची आपबिती समोर आली. त्यानंतर या तरुणांची ही कहाणी ऐकून एका खासगी बस कंपनीने त्यांना मोफत पोहचवण्याचा निर्णय घेतला व तरुणांना हायसे वाटले. मेसेजमुळे फसल्यामुळे कसे हाल झाले असे सांगत चुडामन महाले, भाऊसाहेब साबळे, प्रदीप शेलार, भाऊसाहेब बच्छाव या तरुणांनी तीन दिवसांतील घटनाही सांगितल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे बसस्थानकात प्रवासीच नाहीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून काम बंद करून संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपाला सलग दुसरा दिवस उजाडूनदेखील परिवहन मंत्र्यांसह सरकारने याबाबत कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये परिवहन मंत्र्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, बुधवारी (दि. १८) संपाच्या दुसऱ्या दिवशीही राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातील ७८० बसेस नऊ आगारांमध्ये उभ्या होत्या. तर दोन दिवसांत दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. ऐन दिवाळी सणाच्या हंगामी कालावधीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान कर्मचाऱ्यांच्या संपामुळे झाले आहे. एकीकडे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर आहेत तर दुसरीकडे महामंडळाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यातून नेमका मार्ग कधी निघेल याकडे आता लक्ष लागून आहे.

निर्णयावर प्रवाशांचे भवितव्य अवलंबून

बुधवारी संपाच्या दुसऱ्या दिवशीदेखील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता सरकार व परिवहन मंत्री रावते काय निर्णय घेतात यावर प्रवाशांचे भवितव्य अवलंबून आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या आगारात निदर्शने करीत मागण्या मान्य कराव्या, अशा घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या संपाचा बुधवारी दुसरा दिवस होता. मात्र सोमवारपासून सुरू झालेल्या संपामुळे एसटी बससेवा रद्द करण्यात आल्याचे प्रवाशांनादेखील समजल्याने बुधवारी धुळे आगारात कर्मचारी व्यतिरिक्त एकही प्रवाशी दिसला नाही. तर खासगी प्रवाशी वाहनधारकांना आरटीओ विभागाने मंगळवारी बळजबरीने धुळे आगारात वाहने आणण्यास सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाकेविक्रीत यंदा घट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गत काही वर्षांपासून दिवाळी आली की, फटाक्यांच्या खरेदी-विक्रीत मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा सरकारनेच फटाके फोडण्यावर बंदी आणल्याने यावर्षी फटाक्यांच्या खरेदीत चांगलीच घट दिसून येत आहे. जवळपास ७० टक्के ग्राहक घटल्याचे चित्र आहे.

फटाके वाजविण्याच्या वेळेवर आलेले बंधन, पोलिसांची कारवाई, ध्वनी व वायू प्रदूषणाबाबत विविध स्तरांतून होणारी जागरूकता यामुळे या प्रकारच्या फटाक्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. दिवाळीनिमित्त यावर्षीही नाशिकसह शहराच्या अन्य भागात फटाके विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. मात्र, फटाके खरेदी करण्यासाठी दरवर्षीपेक्षा ग्राहकांची संख्या रोडावली आहे. अनेक नागरिक केवळ फुलबाजा, पाऊस, आकाशात आतषबाजी करीत फुटणारे फटाके, रोषणाईचे फटाके किंवा कमी आवाजाचे फटाके विकत घेत आहेत.


आवाजी फटाक्यांना मागणी नाही

लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, ताजमहाल, लवंगी बॉम्ब अशा कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांकडे ग्राहकांचा कल कमी दिसून येत आहे. आकाशात फुटणारे फटाके आकर्षित करणारे असल्याने त्याकडे ग्राहकांचा कल जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुतळी बॉम्बची मागणी मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यावर्षी बाजारात नया-नया प्यार, सिल्व्हर एड हे आकाशात फुटणारे फटाके नव्याने आले आहेत. आवाजविरहित फटाक्यांची मागणी ग्राहकांकडून होत आहे. अनेक ग्राहक फुलबाज्या व पाऊस, भूईचक्र या प्रकारच्या फटाक्यांना पसंती देत आहेत, असे देवळालीतील फटाके विक्रेते सुम‌ित कांडेकर यांनी सांगितले. प्रदूषणाचा आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता यावर्षी आम्ही पाऊस आणि फुलबाजेच विकत घेतले असल्याची प्रतिक्रिया खरेदीसाठी आलेले अभिजित टिळे यांनी दिली.

लष्कराच्या ऑउटलेटला पसंती

सध्या जीएसटी आणि महागाई दोन्ही बघता सर्वसामान्य माणसाने फटाके विकत घेणे तरी परवडणारे नाही. त्यातच देवळाली परिसरात लष्कराच्या वतीने रेस्ट कॅम्परोड भागात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या फटाके विक्री केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे. कारण शहरातील अन्य फटाके विक्री केंद्रांपेक्षा ३० टक्के कमी दराने येथे फटाके उपलब्ध असतात.

जास्त आवाजाचे फटाके फोडण्यापेक्षा लोकांच्या आरोग्याचा विचार करून बिनआवाजी फटाके फोडावेत. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल.

- प्रमोद आडके, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गम गावांचा संपर्क तुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परिवहन विभागाने सोमवारपासून पुकारलेल्या संपाने जिल्ह्यातील काही गावांचा जणू संपर्क तुटला आहे. खासगी वाहतूकदारांनी मागणी असलेल्या मार्गांवर सेवा सुरू केल्याने तुरळक प्रवासी असलेल्या भागाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून गावी जात असलेले प्रवासी तालुक्याच्या ठिकाणी येऊन पोहचले असले तरी त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गाव त‌थिे एसटी ही योजना राबविली त्यामुळे ज्या भागात वीज पोहचली नाही, अशा अत‌दिुर्गम भागात एसटीने चांगले बस्तान बसवले. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या प्रकारची दळणवळण सेवा मिळू लागली. गावात नियम‌ति एसटी येत असल्याने गावकऱ्यांनीही एसटीला पर्याय शोधला नाही व महामंडळानेही पर्यायी साधन शोधण्याची संधी दिली नाही. महामंडळाची सेवा तत्पर असल्याने लोक आजही महामंडळाच्या सेवेवर अवलंबून होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून एसटीच्या भरवशावर असलेले नागरिक हवालद‌लि झाले असून, गावात एसटी येत नसल्याने अनेकजण मिळेल त्या वाहनाने शहाराकडे येत आहेत. ग्रामीण भागात टमटम किंवा काळ्या-पि‍वळ्या टॅक्सीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होत असते. मात्र शहरात वाहतुकीची साधने कमी पडत असल्याने ग्रामीण भागातील टॅक्सीचालकांनी जास्त पौशाच्या अपेक्षेने शहराकडे कूच केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील येजा पूर्णपणे कोलमडली आहे. नाशिक ते दिंडोरी, नाशिक ते त्र्यंबकेश्वर, नाशिक ते सिन्नर अशी टॅक्सी सेवा सुरू आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर ते पह‌निे, सिन्नर ते गुळवंच अशा भागातील एसटी सेवा बंद असल्याने अनेक नागरिकांना टूव्हीलरने प्रवास करावा लागतो आहे. रोज ज्या वाहनाने प्रवास करतो ती वाहनेही दिसेनाशी झाली आहेत. आरटीओने नाशिक जिल्ह्यातून इतर गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हलच्या माध्यमातून सोय उपलब्ध करुन दिली. मात्र, खेड्यात जाण्यासाठी वाहने नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

रोज आम्ही लखमापूरहून नाशिकला अपडाऊन करतो. नाशिक ते दिंडोरी प्रवास व्यवस्थ‌ति होतो. मात्र, दिंडोरीहून लखमापूरला जाण्यासाठी गाड्या नाहीत. आरटीओने ग्रामीण भागातदेखील लक्ष द्यावे.

- एकनाथ देशमुख, लखमापूर

मी ज्येष्ठ नागरिक असून मला एसटीची सवलत आहे. मात्र, आज मला नाशिक ते सटाणा शंभर रुपये पूर्ण भाडे असताना खासगी गाडीवाल्याने दोनशे रुपये आकारले.

- पोपटराव सोनवणे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकुंड्यांची अखेर प्रशासनाकडून स्वच्छता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

शहरातील मध्यवर्ती भागासह आठही वॉर्डांमध्ये कचऱ्याचे ढिगारे दिसत होते. ऐन दिवाळीच्या काळात देवळाली शहराचे बकाल स्वरूप पुन्हा डोके वर काढू लागले असल्याचे वृत्त बुधवारी (दि. १८) 'मटा'ने 'देवळालीत कचराच कचरा' मथळ्याखाली प्रकाशित केले होते.

या बातमीनंतर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने तातडीने संबंधित आरोग्य विभागाकडून शहरातील रस्त्यांवरील कचरा कुंड्या स्वच्छ करीत वॉर्डांमध्ये स्वच्छता केली. तातडीने ही स्वच्छता झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता दिवाळी स्वच्छतेने पार पडेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. देवळालीच्या लामरोड, संसरी नाका, वॉर्ड क्रं. १ मधील आनंद रोड तसेच पोलिस स्थानकासमोरच्या कचरा कुंड्यांमध्ये कचरा भरून वाहत होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शहर स्वच्छ दिसावे याकरिता कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी 'मटा'च्या वृत्ताची दखल आरोग्य विभागाचे आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे यांना आदेश देत तत्काळ शहरातील सर्वच कचराकुंडी स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेण्याबाबत सूचित केले. त्यानुसार सकाळपासून कामावर लागलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ व सुंदर करण्यास प्रारंभ करीत दुपारपर्यंत सर्व कचरा कुंड्या व तेथील परिसर स्वच्छ केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएएलची दिवाळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एचएएलकडे असलेली कामे दोन वर्षांत संपत असली तरी सुखोई ३० अत्याधुनिकरणाच्या प्रोजेक्टमुळे २०५० पर्यंत एचएएलमध्ये काम सुरू राहणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बुधवारी येथे दिली. सोबतच एचएएलच्या खासगीकरणाचे सूतोवाचही त्यांनी केले. एचएएलमध्ये संरक्षण उत्पादन वाढविण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितलेे.

भामरे म्हणाले, की संरक्षण क्षेत्रात संशोधन, विकास, उत्पादन वाढविण्यासाठी खासगी संरक्षण क्षेत्रालाही बळ दिले जाणार आहे. या क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून खासगी गुंतवणुकीला केंद्र सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. सरकारने डिफेन्स इंडस्ट्रीयल लायसनिंग पॉलिसीत बदल केला असून, खासगी क्षेत्राला संरक्षण सामग्री उत्पादनात सहभागी करून घेतले जात आहे. संरक्षण उत्पादनासाठी खासगी उद्योजकांना उत्पादनात सहभागी करून घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या तीन वर्षांत त्यात वाढ झाली आहे. एचएएलसह अन्य पब्लिक सेक्टरमधील अन्य संरक्षण कंपन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी खासगी क्षेत्राला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी सरकारने चार सेगमेंट केले असून, त्यात लढाऊ विमाने, टॅंक, हेलिकॉप्टर, सबमरीन यांचा समावेश आहे. यातील जवळपास ४० टक्के कामे आऊटसोर्सिंग केली जाणार आहेत.

ओझर येथील एचएएलमधील कामे ही दोन वर्षांत संपणार असली तरी कामगारांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या कारखान्यात सध्या सुखोई ३० ही १२ लढाऊ विमाने वर्षाला देखभाल व दुरुस्ती (एमआरओ)साठी आणली जातात.

परंतु, त्यात वाढ करून विमानांची संख्या ३० पर्यंत नेली जाणार असल्याने एचएएलला सन २०५० पर्यंत कामे मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एचएएल बंद पडेल, अशी चर्चा करणे योग्य नाही. तेथे अधिकाधिक कामे आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट

केल्याने एचएएलला मोठा दिलासा मिळणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात डिफेन्स क्लस्टर

संरक्षण क्षेत्राशी निगडीत जवळपास ४० टक्के उत्पादनाचे काम हे आऊटसोर्सिंगने करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे डिफेन्स क्लस्टरला चालना मिळणार असून, उत्तर महाराष्ट्रात डिफेन्स क्लस्टर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामाध्यमातून लहान लहान उद्योगांना काम मिळून रोजगार निर्मितीही वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे. मेक इंडियाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मॅन्युफॅक्चरिंग लिस्टमध्ये बदल केला असून, संरक्षण उत्पादनाचा परवाना मिळणे आता सोपे केले आहे. त्यात जास्तीत जास्त उद्योगांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ओझरमध्ये फिफ्थ जनरेशन विमान?

भारताने पाचव्या पिढीतील लढाऊ विमान निर्मितीसाठी प्रयत्न केला असून, या क्षेत्रात देशात येवू घालणारा मोठा प्रोजेक्ट हा ओझरमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करू, असे भामरे यांनी स्पष्ट केले आहे. लढाऊ विमान आणि अत्याधुनिक

हेलिकॉप्टर निर्मिती प्रोजेक्ट संरक्षण मंत्रालयाकडे आला तर तो उत्तर महाराष्ट्रात सुरू करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. विशेषतः हा प्रोजेक्ट एचएएलमध्ये सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

डोकलामचा विजय मोठा

पतंप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याला प्राधान्य दिले असून, डोकलाममध्ये चीनने ते मान्य केले आहे. त्यामुळे डोकलामचा विजय हा सर्वात मोठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैन्य हे सर्वात ताकदवान असून, आपल्यापेक्षा पाकिस्तान सैन्याची मोठी हानी होत आहे. पाकिस्तानकडूनच भारतीय सेनेचे प्रत्युत्तर थांबवण्यासाठी विनंती केली जात असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बस डेपोतच मुक्कामी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

एसटीच्या संपामुळे मालेगाव तालुक्यात खासगी वाहतूक जोरात सुरू होती. या दोन दिवसाच्या संपाने मालेगाव आगाराचे १६ लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी देखील संप सुरू असल्याने ऐन दिवाळीत बसस्थानकात शुकशुकाट पाहायला मिळाला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोल‌सि बंदोबस्त कायम होता. सकाळच्या सत्रात केवळ मालेगाव-नाशिक-मालेगाव अशा सहा फेऱ्या वगळता सर्वच फेऱ्या रद्द झाल्या. यामुळे आगाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान संपात सहभागी झालेल्या कर्माचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबत जाहीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र संपाबाबत कर्मचारी ठाम असल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकशिवाय पर्याय उरलेला नाही. दुसऱ्या दिवशी देखील खासगी कंपन्यांच्या लक्झरींतून प्रवास सुरू होता.

पिंपळगावातही शुकशुकाट

पिंपळगाव बसवंत ः पिंपळगाव बसवंत आगारातील २७० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. पिंपळगाव बसवंत बसस्थानकात बसच येत नसल्यामुळे स्थानकात शुकशुकाट आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी आगाराच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून जोरदार निदर्शने केली. दरम्यान पिंपळगावचे माजी सरपंच व एसटी महामंडाळाचे माजी संचालक भास्कर बनकर यांनी बुधवारी सकाही आगारातील कार्मचाऱ्यांची भेट घातली. याबाबत निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या मध्यस्तीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून कार्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही बनकर यांनी दिली.

कळवणच्या

बाजारावर परिणाम

कळवण : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या कालच्या दुसऱ्या दिवशीही कळवण आगारातून एकही बस धावली नाही. या संपाच्या कळवणच्या आठवडे बाजारावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या असहकार आंदोलनामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.
खासगी वाहतूकदारांना आले अच्छे दिन!

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड, चांदवड व नांदगावमध्ये एसटी महामंडळाच्या संपाचा प्रभाव दुसऱ्या दिवशी देखील दिसून आला. या आगारातून बुधवारी एकही बस रवाना झाली नाही. त्यामुळे खाजगी वाहतूकदार प्रवाशांच्या या अडचणीचा फायदा घेत जास्त दराने भाडे आकारत आहेत.

नांदगाव डेपोतून बुधवारी एकही बस न गेल्याने तब्बल दोनशे फेऱ्या रद्द झाल्या. मनमाड डेपोतून देखील एकही बस इतरत्र गेली नाही. ३० ते ४० रुपये बस भाडे असलेल्या टप्यापर्यंत खासगी वाहतूकदार ६० ते ७० रुपये आकारत आहेत. मनमाडहून, येवला, कोपरगाव, शिर्डीकडे जाण्यासाठी काळीपिवळी व्हॅन, अॅपेरिक्षाला जास्त मागणी आहे. एका टप्पाच्या प्रवासासाठी देखील २५ ते ३० रुपये जादा दर आकारल्याची तक्रार प्रवासी करीत होते. मनमाड-नाशिक बस भाडे ९५ रुपये, तर नांदगाव-नाशिक बसभाडे १२७ रुपये असताना खासगी वाहनदारांनी संपाचा फायदा उठवत २०० ते २२० रुपये भाडे आकारल्याचे प्रवाशी सांगत आहेत. कळवण, देवळा, सटाणा, लासलगाव व मनमाडकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. बसस्थानकात शुकशुकाट आहे. गुरुवारी तरी संप मागे मिटावा, अशी आशा आता प्रवाशांना लागली आहे. बुधवारीही मनमाड रेल्वेस्थानकात नाशिक, जळगाव, चाळीसगाव जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाच्या दिवाळीत माहेर कसं गाठायचं…?

$
0
0

कैलास येवला, सटाणा

एसटीचा संप कधी मिटणार, काही समजत नाही, आता कसं करायचं, कसं निघायचं, कुणासोबत आणि कसं जायचं, यंदा दिवाळीत माहेरी कसं जायचं, अशा असंख्य प्रश्नांचा कल्लोळ सध्या सासुरवाशीनींच्या मनात घोळ घालत आहे. माहेरी जाण्यासाठी त्यांचा जीव तुटत आहेत. उद्यापर्यंत संप मिटू दे, अशी प्रार्थना त्या आता करीत आहेत.

ऐन दिवाळीत एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. या संपामुळे यंदा माहेराला जाण्यासासाठी मुकणार की काय अशी भीती आता विवाह‌तिांना वाटू लागली आहे. ग्रामीण भागातील महिला मात्र भावाच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत. काहींचे माहेर भारदस्त असल्यामुळे त्यांच्या दारात चारचाकी येवून त्यांना घेवूनही गेली आहे. मात्र काहींना बसचाच आधार असल्यामुळे त्या महिलांचा जीव कासावीस होत आहे.

मामाचे गाव लांबणीवर?

दिवाळीत मामाच्या गावाला जायचे स्वप्न रंगविणाऱ्या बच्चे कंपनीला काय उत्तर द्यावे असा प्रश्न आता घरातील कर्त्या पुरुषांना पडला आहे. रोजच सोमवारपासून भरून ठेवलेल्या बॅगा मात्र तशाच घरात पडून आहेत. त्यामुळे लहान मुलांनाही आता हा संप कधी मिटणार याची चिंता सतावत आहे.

मुलीसाठी मायबाप आसुसले

सासरी असलेल्या महिला, तसेन नोकरीनिमित्ताने बाहेर गावी असलेल्या महिल्या लक्ष्मीपूजनांनतर भाऊबिजेसाठी माहेरी जाण्याची परंपरा आहे. माहेरीही मुलगी येणार म्हणून सगळे वाट पाहत असतात. मात्र यंदा एसटीच्या संपामुळे मुलीची दिवाळी सासरीच होणार का, अशी भीती तिच्या आईवडीलांना वाटत आहे.

रोजगार बुडाला

या संपामुळे बसस्थानकात पाणी, चॉकलेट्स, बिस्कीट, कुरकुरे आदी विक्रेत्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या या विक्रेत्यांच्या दिवाळी मात्र यंदा संपामुळे झाकोळली जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून संप असल्यामुळे दहा रुपये देखील हातात आले नसल्याचे हे विक्रेते सांगत आहेत.

बस स्थानकांतूनच वाहतूक

सटाणा तालुक्यात कोठेही जाण्यासाठी नियमित अवैध वाहतूक सध्या वैध झाली आहे. बसस्थानकांपासून लांब उभी असणारी ही वाहने आता तर रुबाबात बसस्थानकांतून प्रवासी भरत असल्याचे चित्र सटाणा बसस्थानकात आहे. नाशिक जाणाऱ्या प्रवाशांकडून एका व्यक्तीसाठी थेट २०० ते २५० रुपये भाडे आकारत आहेत. सटाणा-मालेगाव प्रवाशी वाहतूक मात्र सुरळीत व नियमित भाडे आकारून होत आहे. खासगी वाहतूकदार सटाणा-नाशिक प्रवासासाठी १०२ रुपयांऐवजी दोनशे रुपये आकारात आहेत. मात्र दुसरे साधन नसल्यामुळे प्रवाशांचाही नाईलाज झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच असल्याने नोकरदारांसह व्यावसायीकांचेही हाल होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब रंगले दिवाळी अंकांत

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राचे व मराठी भाषेचे आगळे वैभव...म्हणूनच हे वैभव जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न मनमाड येथील प्राथमिक शिक्षक अनिल शिनकर व त्यांचे कुटुंबीय गेल्या सात ते आठ वर्षांपासून करीत आहेत. दिवाळी अंक आपल्या घरी संग्रही ठेवण्याच्या ध्यासापोटी आपल्या खिशाला कातर लावून आजवर त्यांनी थोडे थोडके नव्हे, ते तब्बल अडीच हजाराहून अधिक दिवाळी अंक संग्रही ठेवले आहेत. मराठी भाषेची थोरवी गाणारे हे दिवाळी अंक सांभाळून ठेवून त्याची व्यवस्थित निगा

ठेवण्यात शिनकर यांचे अवघे कुटुंब प्रयत्न करीत आहे. सध्या नवीन दिवाळी अंक त्यांच्या या संग्रहालयात येत असून, ‘कुटुंब रंगले दिवाळी अंकात’ असे चित्र शिनकर यांच्या घरात सध्या आहे.

शिनकर यांची दिवाळी अंकांच्या प्रती असलेली आदराची भावना व व्यापक दृष्टीकोन पाहून साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्यांना आपल्याकडचे दिवाळी अंक भेट म्हणून पण दिले आहेत. मातृभाषेचा गौरव आणि मराठीतील विविधांगी साहित्य सर्वांसमोर आणण्याची तळमळ यामुळे शिनकर यांचे दिवाळी अंक प्रेम लक्षवेधी ठरत आहे. या दिवाळी अंकातील विविध विषयांवरील माहितीचा संदर्भ म्हणून इतरांना उपयोग व्हावा, यासाठी देखील या प्राथमिक शिक्षकाचे व कुटुंबियांचे प्रयत्न आहेत.

वेळोवळी जमविले अंक

बाहेरगावी गेल्यानंतर प्रथम दिवाळी अंक कुठे मिळतील? याचा शोध सुरू होतो. पेपर स्टॉलपासून ते रद्दीच्या दुकानापर्यंत व ओळखीच्या मंडळींसून ते अपरिचितांच्या कॉलनी कॉलनीत हिंडून दिवाळी अंक मिळवण्याची मोहीम तब्बल सात ते आठ वर्षांपासून अव्याहत निष्ठेने सुरूच आहे. आजवर साहित्य, आरोग्य, धार्मिक, स्त्री विषयक, बालसाहित्य आदी प्रकारचे अडीच हजार दिवाळी अंक अनिल शिनकर यांच्या संग्रहात आहेत.

अनेकांनी केले सहकार्य

घराची एक खोली या दिवाळी अंकांनी भरली आहे. चाळीसगाव, धुळे, नाशिक, मनमाड येथून बरेच दिवाळी अंक त्यांनी जमा केले आहेत. त्यांच्या संग्रहासाठी भरघोस दिवाळी अंक देऊन ज्येष्ठ कवी खलील मोमीन, जनार्दन देवरे, प्रा. भाऊसाहेब कुशारे, शरद जोशी या सर्वांनी मौलिक सहकार्य केले आहे.

कुटुंब राखते निगा

दिवाळी अंक नुसते गोळा केलेले नाहीत, तर ते भविष्यात नव्याने कोणाच्या उपयोगी येतील, संदर्भ ग्रंथ म्हणून कोणाला कामी येतील यासाठी हे दिवाळी अंक नियमितपणे पुसण्याचे, त्यांची निगा राखण्याचे काम शिनकर यांची छोटी मुलगी सेजल मनापासून करते. अंकांच्या नोंदी व देखरेख ठेवण्याचे काम मोठी मुलगी सायली करते. शिनकर व त्यांच्या पत्नी हे दिवाळी अंक जपत आहेत.

असा जडला छंद

मनमाड येथे राहणारे व येवला तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अभिनव शैक्षणिक प्रयोग करणारे प्राथमिक शिक्षक अनिल शिनकर यांना २०१० मध्ये दिवाळी अंक संकलित करण्याचा छंद जडला. तेव्हापासून मातृभाषेतील साहित्याचा गोडवा जवळ साठवून त्याची गोडी समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचव‌ण्यिासाठी शिनकर व त्यांच्या कुटुंबियांची अथक धडपड सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाला दिलासा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत कर्जमुक्तीचा लाभ मिळत असल्याने त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहकार सहनिबंधक मिलिंद भालेराव आदी उपस्थित होते.

भामरे म्हणाले, गारपीट, दुष्काळ आणि अवेळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला. कर्जाच्या चक्रातून बळीराजाची सुटका करण्यासाठी सरकारने कर्जमाफी जाहीर केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला असून, ते नव्या उमेदीने शेती करतील आणि कृषीक्षेत्राच्या विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्यांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात केवळ १६ टक्के सिंचन होते. शेतीचे नियोजनच चुकल्याचे लक्षात आल्यामुळे हे सिंचन वाढविण्यासाठी भाजप सरकारने शाश्वत कार्यक्रम हाती घेतला असून, त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे २० लाख हेक्टर क्षेत्र ओेलिताखाली आले असून, १५ हजार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दावा भामरे यांनी केला.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून राज्यातील २६ प्रकल्पांना प्राधान्याने आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. त्यामुळे अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातून एक लाख ७४ हजार ५२५ शेतकरी कुटुंबाचे अर्ज ऑनलाइन प्राप्त झाल्याची माहिती गावडे यांनी दिली. राज्यस्तरीय कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

शहीद मिल‌िंद यांच्या पत्नीला लष्करात नोकरी!

नाशिक : काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एअर कमांडो मिल‌िंद खैरनार यांच्या पत्नीने लष्करात नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्यास नियमाप्रमाणे नोकरी दिली जाईल, असे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले. संरक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे मिल‌िंद खैरनार यांचे पूर्ण वेतन त्याच्या पत्नीला दिले जाणार आहे. सोबतच त्यांनी नोकरीची इच्छा व्यक्त केली तर स्वाती महाडीक प्रमाणेच नियमांची तपासणी करून त्यांनाही नोकरी दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच गुरुवारी आपण मिल‌िंद यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना डॉ. भामरे यांनी ही ग्वाही दिली. मिलिंद खैरनार त्यांच्या कुटूंबाला लष्कराच्या नियमाप्रमाणे सर्व ती मदत केली जाणार आहे. मिल‌िंदचे पूर्ण वेतनही त्यांच्या पत्नीला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणाऱ्यांच्या कोठडीमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहिती अधिकारात वैयक्तिक माहितीची मागणी करून त्याद्वारे तब्बल एक लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथीत तिघा संशयित पत्रकारांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने दोन दिवसांची वाढ केली. संशयित आरोपींनी यापूर्वी असे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी रात्री तिघा संशयितांना अटक केली होती.

स्टिफन अँथोनी आढाव (३७, स्वारबाबानगर, सातपूर), मायकल जॉन खरात (३०, रा. इंगळेनगर, जेलरोड) व त्यांचा मित्र सचिन रघुनाथ तुपे (रा. स्वारबाबानगर, सातपूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. प्रहार या स्थानिक वृत्त वाहिनीचे पत्रकार, कॅमेरामन म्हणून काम करणाऱ्या तिघांनी खंडणी उकळण्याचा उद्योग केला होता. या प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक हरिश्‍चंद्र पगार तक्रार दिली आहे. कथित पत्रकार मायकल खरात याने माहितीच्या अधिकारात काही वैयक्तिक स्वरूपाची माहिती मागविली होती. माहिती समोर येऊ द्यायची नसल्यास पगार यांनी एक लाख रुपयांची खंडणी द्यावी, अशी धमकी मायकलने दिली. याबाबत तडजोड होऊन ही रक्कम २० हजार रुपये इतकी निश्चित झाले. मात्र, संशयित आरोपींच्या मागणीबाबत अधीक्षक पगार यांनी मुंबईनाका पोलिस स्टेशनकडे तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातच पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांच्या चौकशीसाठी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत गुरूवारी संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी तसेच बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने संशयितांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. संशयित आरोपींनी यापूर्वी पत्रकारितेच्याआड अनेक ठिकाणाहून खंडणी उकळल्याचा पोलिसांचा अंदाज असून, त्यादृष्टीकोनातून पुरावे संकलित केले जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅकिंगचा तपास कमिटीमार्फत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) ऑटोमेटिक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरमधील (एव्हीइएस) मधील हॅकिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी शहर पोलिस एक कमिटी नियुक्त करणार आहे. यात ‘आरटीओ’तील अधिकाऱ्याचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. सदर प्रकरणाच्या तपासाबाबत ‘मटा’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

मार्च ते ऑगस्ट या कालावधीत ‘आरटीओ’तील सिस्टिम हॅक करून त्याद्वारे तब्बल ६८६ फिटनेस सर्टिफिकेटचे वाटप झाल्याची बाब ‘आरटीओ’नेच समोर आणली. संबंधित वाहनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. यावर उत्तर मिळाले नाही तर फिटनेस सर्टिफिकेट रद्द करण्याचा इशारा ‘आरटीओ’ने दिला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले, की ‘आरटीओ’ने केलेल्या तपासात एवढी मोठी अनियमितता आढळली असेल तर त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना का दिली नाही? असा प्रश्न पडतो. ‘आरटीओ’च्या या भूमिकेमुळे संदेह निर्माण झाला असून, या प्रकरणाचा सर्वच अंगाने तपास सुरू असल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्याने केला. दुसरीकडे, ‘आरटीओ’ने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी २०१५ पासून माहिती मागितली होती. ती त्यांना देण्यात आली असून, त्यात त्यांनी काहीही तपास केला नसल्याचा गंभीर आरोप ‘आरटीओ’ अधिकाऱ्याने केला आहे. याबाबत पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, पोलिसाकडे डम्प डाटा देण्यात आला. त्यात हजारो वाहनांना दिलेल्या सर्टिफिकेटची माहिती आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी खरोखर याबाबतची माहिती समोर आणली असेल तर त्यांनी ती तपास यंत्रणेला म्हणजे सायबर पोलिसांना देणे अपेक्षित आहे. दरम्यान, आम्ही त्यांना एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये माहिती देण्यास सांगितले. पंरतु, दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीनंतरही ‘आरटीओ’कडून सकारत्मक प्रतिसाद मिळालेला नाही. अद्याप अशी कोणतीही माहिती सायबर पोलिसांना प्राप्त झालेली नसल्याचे अन्य एका पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आरटीओ आणि पोलिसांत सुरू असलेल्या या कलगीतुऱ्याबाबत ‘मटा’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन पोलिस आयुक्तांनी तपासकामाचा आढावा घेतला. तसेच, सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तज्ज्ञाची कमिटी नेमण्याचे आदेश दिले आहेत.

माहितीचे आदानप्रदान व्हावे

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की या गुन्ह्याचे विश्लेषण तांत्रिक स्वरूपात करावे लागणार आहे. काही कारणास्तव आरटीओची माहिती मिळाली नसेल तर पुढील तपास करण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कमिटीत ‘आरटीओ’तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘आरटीओ’चा अधिकारी थेट तपास कामात सहभागी झाल्यास तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या माहितीचे अदानप्रदान सहज होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दुचाकी चोरी सुसाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातील चार दुचाकी चोरट्यांनी चोरी केल्या. या प्रकरणी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
अभिजीत बाळकृष्ण साळुंके (रा.तळेनगर, रामवाडी) हे गुरूवारी (१२) डीकेनगर भागात गेले होते. समर्थनगर वाचनालयासमोर त्यांनी आपली दुचाकी (एमएच १५ डिपी ६००६) उभी केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक महाले करीत आहेत. वाहनचोरीची दुसरी घटना पंचक गावात घडली. लताबाई बोराडे यांच्या चाळीत राहणारे सत्यम रामकरण यादव यांची होंडा शाईन (एमएच १५ एफजी २७८३) सोमवारी (१६) त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत. दरम्यान, वाहनचोरीची आणखी एक घटना जेलरोड भागात घडली. मनोज विलासराव माळवे (रा.अशोका पार्क, एमएसईबी कॅलनी, शिवाजीनगर) यांची दुचाकी (एमएच १५ एफ झेड ५५८०) सोमवारी (दि. १६) दुपारी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरी झाली. घटनेचा अधिक तपास उपनगर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. सिडकोतील अनिल शंकरराव मोरे (रा.गौरवशांती सोसा. शुभम पार्क जवळ) यांची बुलेट (एमएच ४१ टी १३३३) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. १७) घडली असून, या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक घुगे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंटर्नल परीक्षा अन् तणाव

$
0
0

इंटर्नल परीक्षा अन् तणाव

शालेय वातावरण संपवून विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. सुरवातीपासूनच त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवेशासाठी होणारी धावपळ, त्यापोटी होणारा त्रास, आवडत्या कॉलेजात प्रवेश मिळेल का, याबाबत नसणारी शाश्वती, अशी मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करून विद्यार्थी कसाबसा अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळवतो खरा. इथपर्यंत ठिक असतं. कॉलेज डेज एन्जॉय करण्याच्या या दिवसांना एव्हाना कुणाची तरी नजर लागली की काय असे वाटायला लागते. इंटरनल परीक्षेचं निमित्त होतं. वर्षभर विद्यार्थी जे काही लेक्चर करतात ना त्यात खूप गोष्टी लक्षात येतात. ज्या अपेक्षेने तो प्रवेश घेतो त्या अपेक्षा भंग व्हायला लागतात. या प्रवेशासाठी विद्यार्थ्याने अन् त्याच्या पालकांनी हर प्रकारच्या खस्ता खाऊन कशीबशी फी भरलेली असते. अशात अध्यापन पद्धतीतच विद्यार्थ्याला दोष जाणवत असेल तर त्याला दर्जाहीनतेबाबत आवाज उठवूशी वाटतो. पण विद्यार्थी कसा काही बोलणार ना? कारण त्याच्या इंटरनल परीक्षांचे मार्कस कॉलेजच्याच हाती. या भीतीने आहे ती स्थिती अनेकजण निमूटपणे सहन करतात. मुंह मांगी फी भरूनसुद्धा कुणाला काही बोलण्याचा धर्म नाही. या चडीचूप वातावरणातूनही अनेकांना नैराश्य येते. सुरूवातीला आवडणारे हेच कॉलेज आता नावडीचे होते. सर्व गोष्टी हक्काच्या असूनही मागता येत नाही. या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना समजत नाही करावं काय? कारण बाहेरच्या क्लासेस साठी सगळ्यांकडेच पैसा नसतो.

जसं इयत्ता नववीच्या इंटरर्नलस बंद करून त्यांना फक्त थिअरी १०० गुणांची देणार आहेत, तसेच सर्व अभ्यासक्रमांच्या बाबतीत बाबतीत विचार शिक्षण व्यवस्थेने विचार करावा. याने कॉलेजचा गुणांक कदाचित कमी होऊ शकतो, पण कॉलेजमधून पास होणारे विद्यार्थी हुशारच असतील..!- गणेश डोंगरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारची काच फोडून लॅपटॉप चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पार्क केलल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरी केला. ही घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
कौशल भरतकुमार शहा (रा. ठक्करनगर, शरणपूररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहा बुधवारी (दि. १८) कामानिमित्त पाथर्डी फाटा परिसरात गेले होते. महामार्गावरील फोर्ड शोरूम समोर त्यांनी आपली कार (एमएच १५ ईएक्स ४६६८) पार्क केली. तसेच कामासाठी ते निघून गेले. या दरम्यान चोरट्याने पार्क केलेल्या कारच्या खिडकीची काच फोडून आसनावर ठेवलेला २५ हजाराचा लॅपटॉप चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार पार्किंगच्या कारणावरून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कार पार्क करण्याच्या जागेवरून हाणामारी झाल्याचा प्रकार अंबड लिंकरोडवरील जाधव संकुल येथे घडला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गौरव भारत गायकवाड (रा. जाधव संकुल, अंबड लिंकरोड) यास अटक केली आहे.
हाणामारीची घटना मंगळवारी (दि. १७) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या ठिकाणी राहणारे विशाल प्रकाश साळुंखे घराजवळच कार पार्किंग करीत असताना हा प्रकार घडला. तिथे आलेल्या संशयित गौरवने कार पार्किंग करू नका, असे सांगितले. यावर मी नेहमी कार पार्क करतो, तिथे वाळू का टाकली? असा प्रश्न विशालने उपस्थित केला. यानंतर संशयित आरोपी गौरवने त्यास शिवीगाळ करून त्यास मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितास बुधवारी (दि. १८) सकाळी अटक केली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाळारोडवर जुगारी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडाळारोड परिसरातील शिवाजीवाडी भागात शाळेच्या आवारात जुगार खेळणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
किशोर जगन्नाथ शिंगाडे, अमोल प्रकाश बाबर (रा. दोघे भारतनगर, शिवाजीवाडी) आणि सोनू ज्ञानेश्वर बेंडकुळे (रा. जत्रा हॉटेलजवळ) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. संशयित बुधवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिवाजीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मोकळ्या जागेत जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. संशयीत पत्त्यांवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून साडे सातशे रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर जावयाला सासरच्यांकडून चोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कौटुंबिक न्यायालयाच्या परवानगीने मुलास भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांस त्यांच्या सासरकडील मंडळींनी जबर मारहाण केल्याची घटना नाशिकरोड येथील खर्जुल मळा परिसरात घडली. डॉक्टर असलेल्या जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासू-सासऱ्यांसह इतरांविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. योगेश शिवाजी घोटेकर (रा. व्यंकटेश दर्शन अपार्टमेंट, जेलरोड) असे मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचा २०१० मध्ये खर्जुल मळ्यातील सूर्यकांत परशुराम सावंत यांच्या शीतल या मुलीशी विवाह झाला. या दाम्पत्यास पाच वर्षांचा मुलगाही आहे. घरजावई व्हावे ही पत्नीच्या मागणी मान्य न केल्याने त्यांच्या वाद निर्माण झाला. तेव्हापासून शीतल आई-वडिलांकडे माहेरी राहते. हा वाद नंतर कौटुंबिक न्यायालयातही गेला. पत्नीसोबत राहणाऱ्या आपल्या मुलास भेटण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने डॉ. घोटेकर खर्जुल मळळ्यात पत्नीच्या आई-वडिलांच्या घरी गेले. यावेळी कुरापत काढून डॉ. घोटेकर यांना त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांसह इतरांनी मारहाण केल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नाशिकरोड पोलिसांनी डॉ. घोटेकर यांचे सासरे सूर्यकांत सावंत, सासू इंदुमती, पत्नी शीतल, मेव्हणा सनी, मेव्हणी माधुरी आणि तुषार तुपे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images