Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हृदयविकाराने पोलिसाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आडगाव येथील नाशिक ग्रामीण मुख्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्याचा अचानक छातीत दुखून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
विजय म्हसू महाले असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या महाले सध्या आडगाव येथील पोलिस मुख्यालयात नेमणुकीस होते. बुधवारी कर्तव्यावर असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. यानंतर, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ऐन दिवाळीत हा दुर्दैवी प्रकार घडल्याने महाले कुटुंबीयासह पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अवकाळी पावसाने खरीप हंगामात काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. आता पाऊस थांबला असला तरी जमिनीच्या ओलाव्यात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांच्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. ही शंखी गोगलगाय आकाराने मोठी असून कोवळ्या पिकांना फस्त करीत असल्याने बळीराजापुढे नवीन संकट उभे ठाकले आहे.

परतीचा पाऊस एवढे दिवस कधीच पडला नसल्याचे जुने-जाणते शेतकरीही सांगत आहेत. ऐन दिवाळीत असा पाऊस आयुष्यात कधी बघितला नसल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. या पावसाने काढणीसाठी आलेल्या भात, सोयाबीन, भुईमूग, उडीद, बाजरी, मूग यासारखी पिके शेतातच सडू लागली आहेत. कांद्यांच्या कोवळ्या रोपांचे नुकसान झाले. द्राक्ष पिक वाचविण्यासाठी वेळीअवेळी फवारण्या कराव्या लागल्या. अशा परिस्थितीत जी काही पिके शेतात तग धरून आहेत. त्या पिकांवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून या शंखी गोगलगायींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसत आहे.

यंदाच्या हंगामात पिकांवर हुमणी या किडीचा जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रादुर्भाव वाढला होता. जमीनीच्या खाली नजरेआड असलेल्या या किडीने पिकाचे रोप नष्ट झाल्यानंतरच कळत असल्यामुळे भुईमूग, मका, मूग यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. तिचा बंदोबस्त करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले. पिकांच्या उत्पादनात मोठी गट या हुमणीमुळे येणार असल्याचे बोलले जाते. काढणीस तयार असलेली पिकेही पावसामुळे काढणीस लांबणीवर पडलेली आहे.

नुकसान टाळायचे तरी कसे?
एरवी जून-जुलैमध्ये प्रादुर्भाव होणाऱ्या शंखी गोगलगायी यंदा ऑक्टोबरमध्ये दिसायला लागल्याने शेत पिकांना जास्त धोका निर्माण होऊ लागला आहे. अगोदर उत्पादन खर्चाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या शंखी गोगलगायीने अधिक संकटात टाकण्याची भिती निर्माण केली आहे. सध्या कसेबशा वाचलेल्या भाजीपाला पिकांवरच ही शंखी गोगलगाय हल्ला करू शकते. त्यामुळे या पिकांचे नुकसान कसे टाळता येईल, याकडे शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा उतरला रस्त्यात करंट

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

रायगड चौकातील शिवनेरी गार्डन ते मोती चौक या मुख्य रस्त्यात गुरुवारी अचानक वीजपुरवठा उतरल्याने शॉक बसून एक मुलगा जखमी झाला. काही दिवसांपूर्वी सिडकोत वीजतारा भूमिगत करण्यात आल्या. मात्र, वीजतारांच्या जोडणी कामात भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

दिवाळसणात लक्ष्मीपूजनाची सर्वत्र धावपळ सुरू असताना शिवनेरी गार्डन ते मोती चौक या रस्त्यावर एका मुलास घराबाहेरील ओट्याला विजेचा धक्‍का लागला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. येथील वीजतार तुटलेली असल्याने घराबाहेरील ओट्यावर व रस्त्यात वीजपुरवठा सुरू असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी तातडीने नगरसेवकांशी संपर्क साधला. शिवसेनेचे नगरसेवक श्याम साबळे आणि नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळी जाऊन तेथे वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. वीजतारा भूमिगत करण्याचे काम योग्य प्रकारे न झाल्याने वीजपुरवठा सुरू असल्याचे लक्षात आले. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तेथील तुटलेल्या वायरींची पाहणी केली. वीजतारा तुटलेल्या असल्याने शॉक लागल्याचे स्पष्ट झाले.

सिडकोत वारंवार असे प्रकार घडत असून, चालू आठवड्यातील ही पाचवी घटना असल्याची माहिती नगरसेवक साबळे यांनी दिली. दरम्यान, नगरसेवक बडगुजर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. संबंधित ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने हे काम केले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

--

दुर्घटनांनतरदेखील दुर्लक्ष

काही महिन्यांपूर्वी सिडकोतच रस्त्यात वीजपुरवठा उतरून एका गायीचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही सदर कामांच्या चौकशीची मागणीही करण्यात आली होती. महापालिकेने महावितरणवर आरोप केला होता. मात्र, यातून नंतर काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. आता नागरिकांना पुन्हा विजेचे शॉक लागत असल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत.

---

रस्त्यात किंवा नागरिकांच्या घराबाहेर विजेचा पुरवठा उतरणे ही अत्यंत धक्‍कादायक बाब आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सदरचे काम हे विज वितरण कंपनीने केले असल्याचे लक्षात आले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

-सुधाकर बडगुजर, नगरसेवक

--

वीज वितरण कंपनीने केलेले काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून, या कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे. नागरिकांच्या दाराजवळ उघड्या केबल दिसून येत असतानाही कंपनी यावर काहीही तोडगा काढत नाही. आयुक्‍तांशी चर्चा करून त्यांनी या भागाची पाहणी करावी, अशी मागणी करणार आहे.

-श्याम साबळे, नगरसेवक

-------

(मटा भूमिका)

--

सार्वजनिक सुरक्षेचा विषय आपल्याकडे अत्यंत बेजबाबदारपणे हाताळला जाणे तसे काही नवीन नाही. तथापि, भूमिगत वीजप्रवाह जर नागरिकांच्या जिवाशीच खेळत असेल, तर यात तातडीने सुधारणा करणे व संबंधितांवर कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते. सिडको हा भाग अत्यंत दाटीवाटीने उभा राहिला असून, येथील भूमिगत वीजतारांचा विषय गेली काही वर्षे सतत गाजत आहे. विजेचा धक्का बसून काही दिवसांपूर्वीच एका गायीला प्राणास मुकावे लागले. तेव्हा बरेच आकांडतांडव केले गेले. असे असताना पुन्हा एका मुलास विजेचा धक्का बसल्याने आता कुणाच्या मरण्याची वाट न पाहता संबंधित विभागांनी यावर उपाय शोधायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ विक्रेत्यांना झटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धूमधडाक्यात साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीदेखील खरेदीचा बार उडाल्याचे दिसून आले. वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अॅप्लायन्सेस, फर्निचर खरेदी आदींच्या खरेदीला किंवा आगाऊ बुकिंगला अनेकांनी प्राधान्य दिले. सकाळपासूनच बाजारापेठा गजबजून गेल्या होत्या. लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठीही ग्राहकांची लगबग पाहायला मिळाली. लक्ष्मीची मूर्ती व पूजेला लागणारे साहित्य घेण्यासाठी दिवसभर बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होती.

मॉल्समध्ये झुंबड

सिन्नर फाटा ः दिवाळी सणानिमित्त मॉल्समध्ये होम अॅप्लायन्सेसच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिसून आले. मात्र, रिटेलर विक्रेत्यांकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरविल्याने रिटेलर विक्रेत्यांना ‘लक्ष्मी’ने लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलाच हुलकावणी दिली.

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नागरिकांनी होम अॅप्लायन्सेस खरेदी करण्यासाठी विविध मॉल्समध्ये मोठी गर्दी केली होती. दिवाळीनिमित्त विविध होम अॅप्लायन्सेसच्या खरेदीवर विविध कंपन्यांनी भरघोस सूटसह विविध ऑफर्स दिल्याने नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. फ्रीज, वॉशिंग मशिन, मायक्रोवोव्हन, मिक्सर, ग्राइंडर, डिश वॉशर, एलईडी यांसारख्या होम अॅप्लायन्सेसची मोठ्या

प्रमाणात खरेदी झाली. काही कंपन्यांनी मोबाइल रिचार्ज, गिफ्टस, लकी ड्रॉ, गिफ्ट व्हाऊचर्स अशा विविध प्रकारच्या ऑफर्स दिल्या.

सातपूरला गर्दी

सातपूर ः सातपूर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारपेठ सजली होती. सर्वत्र मोठी गर्दी पाहायला मिळाली. गंगापूररोडला आकाशवाणी केंद्राच्या बाजूला, आनंदवली गाव, गंगापूरगाव व सातपूर भागात सातपूर गाव, सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर आदी भागात लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. क्लब हाऊसवर फटाके विक्री केंद्रावर फटाके घेण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. मोठा आवाज करणारे फटाके यावर्षी अनेक विक्रेत्यांनी ठेवलेच नसल्याचे सांगितले.

--


फर्निचर खरेदीची साधली संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोफा कम बेड, डिझायनर बेड, डायनिंग टेबल, लेटेस्ट डिझायनर कबर्ड, असे आकर्षक फर्निचर, तसेच उत्तम दर्जाचे गार्डन फर्निचर खरेदी करण्याची संधी नागरिकांनी दिवाळीनिमित्ताने गुरुवारी साधली. सुटीचे औचित्य साधत अनेकांनी खरेदीसाठी सहकुटुंब

गर्दी केली होती.

शालिमार, गंजमाळ, गडकरी चौक, त्रिमूर्ती चौक अशा विविध ठिकाणी फर्निचरची दुकाने असून, तेथे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घरातील खिडक्यांच्या सजावटीसाठी प्लेन रोलर ब्लाइंड, प्रिंटेड चीक, वेनेशन, बांबू, रोमन फॅब्रिक, झेब्रा ब्लाइंड, शाही कार्विंग सोफासेट, आकर्षक झोपाळे अशा विविध वस्तूंनादेखील मागणी होती. विविध रंगी व वैविध्यपूर्ण नक्षीकाम असलेल्या शाही कार्विंग सोफासेटला नागरिकांची पसंती मिळाली. २५ हजारांपासून अडीच लाखांपर्यंत हे सोफासेट असून, त्यासाठी अनेक जण इन्स्टॉलमेंटचा पर्यायही उपयोगात आणताना दिसत आहेत.

प्लाय टिकवूड व इंडियन वूड ग्राहकाला हव्या त्या आकारात उपलब्ध करून देण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने ग्राहकांना मनासारखे फर्निचर मिळवताना आनंद झाला होता.


---

अॉटोमोबाइल क्षेत्राला दिवाळीने तारले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या ऑटोमोबाइल क्षेत्राला दसऱ्यापाठोपाठ दिवाळीनेही तारले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कार आणि दुचाकी विक्रीत मोठी उलाढाल झाली असून, दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांत सुमारे ४५ कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झाली आहे. पाडवा, तसेच भाऊबीजेच्या दोन दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गत वर्षीच्या तुलनेत कार विक्रीत २०, तर दुचाकी विक्रीत ३० टक्के वाढ झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपावलीच्या पहिल्या तीन दिवसांत जवळपास ६०० पॅसेंजर कारची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत ४८० कारची विक्री झाली होती. दुचाकी विक्रीलाही दिवाळीने बूस्ट दिला. गत वर्षी दोन हजार २५० दुचाकींची विक्री झाली होती. तेच, यंदा पहिल्या तीन दिवसांतच जवळपास तीन हजार दुचाकी रस्त्यावर उतरल्या आहेत. आगामी दोन दिवसांत दुचाकी विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता एका विक्रेत्याने वर्तविली. दोन दिवसांत उलाढालीचा आकडा ५० कोटी रुपयांच्या पुढे सरकण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपूजनाने अवतरले चैतन्य

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दीपमाळांची रोषणाई, पणत्यांचा झगमगाट, दारासमोरच्या रांगोळ्या, फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी (दि. १९) लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने घराघरांत, दुकानात, कार्यालयात लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मंद‌िरांमध्येही स्त्रीसूक्त व महालक्ष्मीच्या पाठाचे आयोजन करण्यात आले.

लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बुधवार (दि. १८)पासून शहरातील बाजारपेठा फुलल्या होत्या. गुरुवारीही खरेदीचा ओघ कायम होता. पूजेसाठी लागणाऱ्या केरसुण्या, मीठ, झेंडूची फुले यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. शहरातील रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, अशोक स्तंभ, महात्मा गांधीरोड, सातपूर कॉलनी, सातपूर गाव, सिडकोतील स्टेट बॅँक परिसर, नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली त्याचप्रमाणे देवळालीगाव येथे फुले विक्रेत्यांनी पहाटेपासून झेंडू व अन्य फुलांच्या विक्रीची दुकाने मांडली होती.

दिवसभर घराघरांत फुलांचे हार, गाड्यांची सजावट सुरू होती. त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणाऱ्या लाह्या, बत्तासे व बोळक्याची खरेदी महिलांकडून केली जात होती. बहुतांश नागरिकांनी दिवसभर मुहूर्त असला, तरी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले. रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनीही नेहमीच्या प्रथेप्रमाणे सायंकाळी लक्ष्मीपूजन व चोपडी पूजन केले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

सकाळी अनेक महिलांनी आपल्या घरासमोर मोठ्या रांगोळ्या काढल्या त्याचप्रमाणे पुरुष मंडळीदेखील घराच्या दारांना तोरण बांधताना दिसत होती. पूर्वी घराघरात फराळ तयार केला जात असे, त्यासाठी आधीपासून तयारी करावी लागत होती. मात्र, सध्याच्या जमान्यात घरातील स्त्रियांना नोकरीमुळे वेळ नसल्याने अनेकांनी फराळाचे जिन्नस बाहेरूनच खरेदी करणे पसंत केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत फराळाच्या खरेदीचा ओघ कायम होता. जुन्या पोलिस आयुक्तालयाजवळ असलेल्या तिबेटियन मार्केटमध्येही कपडे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रोजच्या वस्तूंसोबतच अनेकांनी थंडीचे कपडेही खरेदी केले.

---

बॅँका, संस्थांमध्ये झाले लक्ष्मीपूजन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडसह परिसरात लक्ष्मीपूजन उत्साहात झाले. व्यापारीबांधव, दुकानदार व व्यावसायिकांनी लक्ष्मीची मूर्ती आणून पूजा केली. घरोघरी लक्ष्मीपूजन पारंपरिक उत्साहात झाले. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने नाशिकरोड उजळून निघाले होते.

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेत अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सपत्नीक लक्ष्मीपूजन केले. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, अशोक जाधव, सीईओ एकनाथ कदम आदींसह अधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. बिझनेस बँकेतही लक्ष्मीपूजन उत्साहात झाले. अध्यक्ष वसंत नगरकर यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातही लक्ष्मीपूजन झाले. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था, व्यापारी प्रतिष्ठान, दुकाने तसेच घरोघरी लक्ष्मीपूजन उत्साहात झाले.

---

‘महापालिकेचे संकट टळून समृद्धी येऊ दे’

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिकेमध्ये काल मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यात आले. पालिकेच्या कोषागारातील तिजोरीचे पूजन महापौर रंजना भानसी व त्यांचे पती पोपटराव भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. पालिकेचे आर्थिक संकट टळून आर्थिक भरभराट येऊ दे, असे साकडे त्यांनी यावेळी लक्ष्मीला घातले.

राजीव गांधी भवनातील कोषगार येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर. एम. बहिरम, शहर अभियंता उत्तम पवार, मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर, मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन, गुलाब गावित, बाळासाहेब शिंदे, नितीन गंभीरे, अतुल भानसी, दीपाली भानसी, अजय कमोद, हंसराज वर्मा, वैभव मोटकरी, गोकुळ राऊत, अजय शिरसाठ, संतोष कान्हे, विरसिंग कामे, हुसेन पठाण, विशाल घागरे तसेच मनपा पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ बाजारही लखलखला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने बाजारपेठेवर काय परिणाम होतो, याची चिंता व्यापारीवर्गात होती. पण प्रत्यक्षात दिवाळीच्या प्रमुख दिवसांमध्ये सोन्याच्या बाजारालाही झळाळी मिळाल्याचे चित्र होते. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सुवर्णखरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे दिवसभरात सकाळपासूनच्या विविध खास मुहूर्तांवर नागरिकांनी सोनेखरेदीचा योग साधला.

सराफ बाजारासह शहर आणि उपनगरांतील सर्व सुवर्णपेढ्यांमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक सराफांनी विशिष्ट रकमेच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू किंवा सूट दिली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ३० हजार ५०० रुपये, तर चांदीसाठी किलोमागे ४० हजार रुपये होता.

गेल्या वर्षी दिवाळीनंतर केंद्र्र सरकारने नोटबंदीची घोषणा केल्यानंतर बाजारपेठेवर काही कालावधीसाठी याचा विपरित परिणाम झाला होता. यानंतर काही महिन्यांत लागू झालेल्या जीएसटीमुळे मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत व्यापाऱ्यांना धास्तीच होती. हे चित्र बदलण्याची अपेक्षा दसऱ्यापासून होती. यानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दसऱ्यापासून सराफ व्यावसायिकांनी अनेक युक्त्या वापरल्या. यामध्ये सुवर्णखरेदीच्या योजना जाहीर करण्यापासून तर विशिष्ट खरेदीवरील सूट किंवा भेटवस्तूंची बरसात यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांसाठी लागल्या रांगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने फटाक्यांचे गाळे निवासी क्षेत्रात टाकण्यास बंदी आणल्याने विक्रेत्यांमध्ये गाळे लावताना संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे शहरात उशिराने गाळे लागून नागरिकांना फटाके खरेदी करता आले नाहीत. दिवाळीच्या तोंडावर ऐनवेळी फटाक्यांची दुकाने खुली झाल्याने गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागरिकांनी काही ठिकाणी फटाके खरेदी करण्यासाठी चक्क रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.

एेन दिवाळीच्या तोंडावर अने स्टॅाल्स सुरू झाल्याने अशा अनेक स्टॉल्सवर रांगा लागल्याचे चित्र शहरात दिसून आले. मात्र, डोंगरे वसतिगृहावर असलेल्या गाळ्यांमध्ये शुकशुकाट होता. त्याचप्रमाणे नाशिकरोड व गोल्फ क्लब येथे लावण्यात आलेल्या गाळ्यामध्ये रांगा नव्हत्या. परंतु, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

बंदोबस्त अन् मांडव

गुरुवारी मागणी अचानक वाढल्याने काही दुकानांवर अक्षरशः रांगा लागल्या. या रांगा काबूत ठेवण्साठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. नागरिक रांगेत फटाके घेत असल्याचे दृश्य पहिल्यादा पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. ठक्कर बाजार येथे असलेल्या एका विक्रेत्याकडे रांगा लागल्याने लोकांना त्रास होऊ नये म्हणून खास मांडव टाकला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉपिंगचा फिव्हर कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला पसंती दिली असून, शहरात असलेल्या अनेक दुकानांमधून मोबाइल आणि लॅपटॉपची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

भारतीय संस्कृतीत मुहूर्तावर चांगल्या वस्तू खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने खरेदीबरोबरच विविध लहान-मोठ्या वस्तू खरेदी करण्यास पसंती दिली जाते. शहरभरात मोबाइल, लॅपटॉप, टॅब, कॅमेरा अशा वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. विक्रेत्यांनी सणासुदीच्या काळात मोठ्या ऑफर दिल्या असल्याने याचा पुरेपूर लाभ घेत ग्राहकांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.

विविध ऑफर्स

दिवाळी सारख्या मोठ्या सणांना खरेदी करण्याची जणू एक परंपराच बनली असून, ग्राहकांचा खरेदीकडे असलेला कल विक्रेत्यांनीही चांगलाच हेरलेला असतो. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या. मोबाइल खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी शून्य टक्के व्याजदराने लोन उपलब्ध करुन दिले होते. काही ठिकाणी ‘नो जीएसटी’, ‘एक रुपये भरा आणि खरेदी करा’, अशा ऑफर्स देण्यात आल्या होत्या.


जीएसटीचा परिणाम नाही

शहरातील लहानमोठ्या सर्वच व्यावसायिकांनी शोरुम्ससमोर आकर्षक सजावट करुन मोबाइल लॅपटॉपसारख्या वस्तू ग्राहकांच्या नजरेस चटकन पडतील अशी मांडणी केली होती. शिवाय, अनेक विक्रेत्यांनी वस्तू खरेदीवर भेटवस्तू जाहीर केल्याने अशा दुकानांकडे ग्राहकांनी विशेष पसंती दिली. त्यामुळे इलेक्ट्रॉन‌िक्स वस्तू खरेदीत ग्राहकवर्गाचा उत्साह दिसून आला. परिणामी, मोठी आर्थिक उलाढाल शहरात झाली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्यांनी सवलतीचा वर्षाव केला आहे. यामध्ये रोख डिस्काऊंट ते हमखास गिफ्ट अशा योजना राबविण्यात येत आहेत. खरेदीदारांकडून फ्रिज, एलईडी, वॉशिंग मशिन, मोबाइल, ओव्हन आणि एसीची मागणी आहे. जीएसटीचा कोणताही परिणाम इलेक्‍ट्रॉनिक वस्तुंच्या किंमतीवर झालेला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदाही मागणी कायम

दिवाळीमध्ये सोने, चांदी, वाहन खरेदीबरोबच इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची खरेदी नेहमी केली जात असते. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बाजार गजबजला आहे. गेल्या वर्षी नोटाबंदी झाल्यानंतर जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा वापरून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इलेक्क्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली होती. या पार्श्वभूमीवर यावर्षी मागणी कमी राहण्याची शक्यता होती. मात्र, तशी परिस्थिती नाही. नेहमीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंना यावर्षीही मागणी आहे.

गॅझेट्सची चलती

मॉलमध्येही इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत. इलेक्क्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी विविध बँका, वित्त कंपन्या सुलभ हप्त्याने कर्ज उपलब्ध करून देत आहेत. त्याचाही नागरिकांना फायदा होत आहे. विविध कंपन्यांच्या २४ इंचीपासून ५० इंचापर्यंत एलईडी टीव्ही, एलसीडी टीव्ही १५ हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. चायनीज कंपन्यांचे स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध आहेत. ड्युएल कॅमेरा, ड्युएल सिम, सेल्फीसाठी खास बनविण्यासाठी आलेला जास्त डाटा साठवण्याची क्षमता असलेल्या मोबाइलला मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेची दक्षिण भारतदर्शन प्रवास योजना

0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

दक्षिण भारत दर्शन म्हटले, की हजारो रुपये प्रवासासाठी आणि राहण्याखाण्यासाठी खर्च करावे लागतात. अनेक जण खर्चाअभावी दर्शनीय स्थळांना भेट देण्यास कानकूच करतात. नेमकी हीच बाब आयआरसीटीसीने हेरून नाशिककरांच्या आवाक्यात बसणारी व खासगी यात्रा कंपन्यांच्या प्रवासी योजनांना तोडीस तोड असणारी प्रवास योजना जाहीर केली आहे.

दक्षिण भारतदर्शन करू इच्छिणाऱ्या नाशिकमधील पर्यटकांसाठी नाशिकरोड रेल्वे स्थानक येथून २ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरदरम्यान केवळ ७५६० रुपये प्रतिव्यक्ती भरून या दक्षिण भारतदर्शन योजनेत आपला समावेश करण्याची संधी आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिली आहे.

भारतीय रेल्वेकडून नाशिकमधून थेट दक्षिण भारतामधील प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी असा कार्यक्रम प्रथमच जाहीर झाला असल्याने त्यास कसा प्रतिसाद लाभतो याकडे साऱ्या नाशिककरांचे लक्ष लागले आहे. या प्रवास योजनेत समाविष्ट होणाऱ्या पर्यटकांकरिता द्वितीय श्रेणी स्लीपर कोचद्वारे ७ रात्र व ८ दिवसांचा प्रवास व पर्यटनस्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान नाश्ता, दोन वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण समाविष्ट असून, पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी टुरिस्ट बसची व्यवस्था व स्थळानजीक रात्रीची सार्वजनिक निवास व्यवस्था असणार आहे. नाशिकसह मुंबई-पुणे येथूनही या प्रवास योजनेत सहभाग घेता येणार आहे.

--

प्रवासाचा मार्ग व स्थळे अशी

नाशिक येथून रेल्वेने प्रवास सुरू होऊन कल्याण-पुणे-सोलापूर-गुलबर्गा वाडी (कर्नाटक) असा रेल्वे प्रवास मार्ग आहे. रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या या सात दिवसांच्या प्रवासात दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता नाशिक येथून प्रस्थान करण्यात येणार आहे. दि. ३ रोजी रेणीगुंठा येथून तिरुपती बालाजी दर्शन व मुक्काम, दि. ४ रोजी सकाळी पद्मावती देवी मंदिर दर्शन करून कन्याकुमारीकडे रवाना, दि. ५ रोजी कन्याकुमारी येथे सूर्यास्त व रात्रीचा मुक्काम करून दि.६ रोजी सकाळी विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम दर्शन करून रामेश्वरकडे प्रस्थान, दि. ७ रोजी रामेश्वरम मंदिर दर्शन करून मदुराई येथे मीनाक्षी मंदिर दर्शन करून परतीचा प्रवास सुरू होऊन दि. ८ रोजी रेल्वेने पुन्हा नाशिककडे प्रस्थानासाठी प्रवास सुरू करून दि. ९ रोजी नाशिकरोड येथे पोहोचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन मुहूर्तांपैकी एक बलिप्रतिपदा- पाडवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा व‌िख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाला हरव‌िण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राह‌िले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखव‌िली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आण‌ि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा श‌िल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्व‌िष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला, की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.

--

बळीचे राज्य येवो...

पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

--

व्यापाऱ्यांसाठी नववर्ष

पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारीलोक वर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.

--

दिवाळसण

पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीचे औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.

---

स्नेहबंध वृद्धिंगत करणारी

भाऊबीज

--

भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेह वृद्धिंगत करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीया अर्थात, यमद्वितीया या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाहीत, अशी अाख्यायिका आहे. त्यामुळेच हा दिवस भाऊ-बहिणीच्या नात्याला समर्पित दिवस समजला जातो. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी येतो. बहीण भावाला गोड-धोड जेवू घालते. सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस ओवाळते. त्यानंतर बहीण भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. पाडवा झाल्यानंतर स्त्रियांना भाऊबीजेसाठी माहेराची ओढ लागते. आपल्या बंधुरायाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना यावेळी केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरचा ‘प्रसाद’ रखडला

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरचा प्रसाद रखडण्यास राज्याच्या पर्टयनखात्याची उदसीनता कारणीभूत ठरली आहे. केंद्र शासनान पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये ञ्यंबकेश्वर परिसर विकासाठी ‘प्रसाद योजना’ म्हणून देऊ केले. मात्र आता राज्य पर्यटनाने पूर्वीचा निधीच खर्च केलेला नाही म्हणून ही योजनाच रखडली आहे.

मागील वर्षी केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून महाराष्ट्रातून एकमेव त्रंबकेश्वरची निवड ‘प्रसाद’ या योजनेतंर्गत करण्यात आली आहे. त्या संदर्भात तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करून स्थानिक संस्था, लोकप्रतिनिधींसोबत पर्यटकांना काय सुविधा हव्या आहेत व योजनेतंर्गत निकषाप्रमाणे काय सुविधा देवू शकते यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी बैठका घेतल्या. अंदाजे २०२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा केंद्र शासनाच्या समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्यामध्ये यापैकी पहिल्या टप्प्यातील ५०.५३ कोटींपैकी ३७.५० कोटी आराखड्यास मान्यता देण्यात आली. निधी वर्ग करतांन लक्षात आले की, केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून यापूर्वी देण्यात आलेला महाराष्ट्र् शासनाच्या पर्यटन विभागाकडे निधी अखर्चित असल्या कारणाने केंद्र शासन निधी वर्ग करू शकत नाही.

त्या अखर्चित निधीमध्ये जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे ६.४७ कोटी तसेच नागपूर धापेवाडा ४.४६ कोटी व भंडारा-गोंदिया-नागपूर रु ७.५८ कोटी असे महाराष्ट्र् राज्याच्या पर्यटन विभागाकडे एकूण १८.७४ कोटी अखर्चित आहेत. जोपर्यंत ते खर्चीत होत नाही व त्याचे युटिलायझेशन सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत केंद्र शासन निधी प्रसाद योजनेसाठी वर्ग करू शकत नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचा ‘प्रसाद’ रखडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ चेहऱ्यावर उमटला दिवाळीचा आनंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलतांना एक दीप लावू उशाशी त्यांच्या झोपताना’, या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितेतील ओळी नांदगावमध्ये मूर्त स्वरूपात अवतरल्या. निमित्त होते आदिवासी भागात जाऊन तेथील अंधारमय आयुष्यात प्रकाशाचा दीप लावण्याच्या नांदगाव युवा फाऊंडेशनच्या उपक्रमाचे.

आनंद व समाधान तसेच कपडे फराळ यांच्यापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांसाठी कपडे व फराळ पोहचवून युवा फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाने आदिवासी मुले ज्येष्ठ नागरिक यांच्या चेहऱ्यावर हसू पेरले.

‘एक हात मदतीचा’ या दिवाळी उपक्रमांतर्गत युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेने नांदगाव शहरातील विविध भागात आज संकलन केलेले कपडे व फराळ तहसीलदार चंद्रकांत देवगुणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे, डॉ. उदय मेघावत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आदिवासी वर्गांसाठी माणुसकीच्या भावनेतून युवा फाउंडेशनने आवाहन केले. कपडे फराळाचे पदार्थ देण्याबाबतच्या या आवाहनाला नांदगांवकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कपडे, फराळ संकलन करून शहरातील विविध उपेक्षित घटकांपर्यंत पोहचविण्यात आले स्मशानभूमी जवळील आदिवासी वस्ती व कैलास नगर जवळील वस्तीवर दिवाळी साजरी करण्यात आली. युवा फाउंडेशनचे सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल तहसीलदार देवगुणे व डॉ. बोरसे यांनी कौतुक केले. युवाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच त्यांच्या प्रयत्नांना कृतीमय साथ देणारे नांदगावकर यांची अनोखी दिवाळी सर्वत्र आधिक प्रकाशमयी ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् त्याला गवसला हरविलेला ‘सूर’

0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet: jitendratarte@MT

नाशिक : कुठल्याही प्रकारच्या पाणवठ्यावर सूर मारण्यात श्रीकांतचा (नाव बदलले आहे) बालपणापासून हातखंडा. शालेय वयातच तर त्याच्याकडे राष्ट्रीय जलतरण खेळाडू म्हणून बघितले जात होते. पण एके दिवशी त्याने नेहमीच्याच आत्मविश्वासाने सूर मारला अन् त्याची ती उडी अपघातास कारणीभूत ठरली.

प्रशिक्षकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यावेळी श्रीकांतला दवाखान्यात दाखल केले. उपचार झाल्यानंतर तो काही दिवसात बराही झाला. पण एके दिवशी रुटीन चेकअपसाठी गेला असताना डॉक्टरांच्या तोंडून आलेल्या शब्दांनी त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. डॉक्टरांच्या रिपोर्टस अनालिसिस नुसार श्रीकांतच्या पोहण्यावर बंधन नव्हते; मात्र पूर्वीच्या चपळाईने तो स्पर्धा म्हणून पोहण्यात उतरू शकण्यास आता असमर्थ होता. पोहणे हे ज्याचे जीवन बनले होते. अशा उमेदीच्या मुलासाठी डॉक्टरांचा हा रिमार्क स्वप्नांना सुरूंग लावणारा होता. यानंतर श्रीकांत एकलकोंडा बनत गेला. त्याच्यात वाढणारी अबोलताही पालकांना धास्तावणारी होती. अभ्यासात त्याने गुण मिळविले पण इतर कुठल्याही गोष्टीत त्याला रस वाटेनासा झाला.

समुपदेशकांची गाठ पडल्यानंतर श्रीकांत अन् त्यांचे अनौपचारिक गप्पांचे सत्र नकळत बहरत गेले. त्यांनी त्याच्या पूर्वायुष्यातील आनंदी आणि स्फूर्ती देणाऱ्या घटनांना हात घालत त्याला बोलते केले. त्या सत्रात तो इतका बोलत गेला की सुमारे दोन ते तीन तास त्याने विषयाला विराम घेतला नाही. इतक्या कालावधीत स्वत:मध्ये दडलेलं चैतन्य, सुप्तगुण, इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा आदी गुणांची त्याने भरभरून मांडणी केली. त्याच्या जीवनातनं हरवलेली चमक पुन्हा त्याच्या डोळ्यात दिसू लागल्यानंतर समुपदेशकांनी त्याला थांबवलं अन् नवी प्रेरणा देत त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

एखादा क्रिकेटर मैदानापासून काही कारणाने दूर गेला तरीही तो उत्कृष्ट समालोचक बनू शकतो. तसाच एखादा ‘मेन स्ट्रीम स्वीमर’ स्पर्धात्मक पोहण्यापासून दूर गेला तरीही तो उत्कृष्ट प्रशिक्षक किंवा क्रीडा समुपदेशकही बनून अनेकांच्या करिअरला आकार देऊ शकतो. मनाने पंगू बनण्याचं कारण नाही, समुपदेशकांकडून या चर्चेत मिळालेल्या गुरूमंत्रावर श्रीकांतनं काम करण्यास लगेच सुरुवात केली. वर्षभरानंतर त्याला पुन्हा सूर गवसलेला. अभ्यासातल्या गुणांमध्ये टक्क्यांची नव्वदी गाठणारा श्रीकांत आता शंभर टक्के नवे ध्येय गाठण्यासाठी पंखात नवी उमेद भरू पाहतो आहे. तुमच्यात जे चांगलं आहे, त्याला खतपाणी घालून फुलवा आणि स्वत: मोठे होताना इतरांच्याही उपयोगी तुमचं आयुष्य पडू द्या, असाच संदेश श्रीकांतच्या समुपदेशकांनी या ‘केस स्टडी’निमित्त ‘मटा’कडे मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सण बाजारात दिवाळीचे पारंपरिक रंग

0
0

तुषार देसले, मालेगाव

दिवाळी निमित्ताने शहरात सर्वत्र विद्युत रोषणाईचा झगमगाट असला तरी तालुक्यातील आठवडे बाजारांमध्ये ग्रामीण भागातील दिवाळीच्या खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. शहरी आणि मॉलच्या संस्कृतीत आजही पारंपरिक दिवाळीचा रंग या ग्रामीण भागातील सणबाजारांनी जपला आहे.

शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. तालुक्यातील झोडगे, सौंदाणे, कळवाडी, दाभाडी आदी प्रमुख गावांमध्ये दिवाळीच्या दरम्यान येणाऱ्या आठवडे बाजारात देखील ग्रामीण भागातील लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तालुक्यातील झोडगे येथे गुरुवारी हा सण बाजार भरला होता. यंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला असला तरी परतीच्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असले तरी वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

दिवाळी निमित्ताने खास दुकाने लावण्यात आली होती. यात लक्ष्मीपूजनासाठी महालक्ष्मीच्या मूर्ती, पणत्या, केरसुणी, रांगोळी आदींच्या दुकानावर महिलांची गर्दी होती. तर कपडे, फटाके, खेळणी खरेदीसाठी बच्चे कंपनीने दुकानांवर गोंगाट केला होता. पोळ्यानंतर देखील शेतात लागणारे साहित्य खरेदी करण्यास देखील पसंती मिळत होती. तालुक्यातील माळमाथा परिसरातील ४२ खेड्यांचा प्रमुख बाजारापेठ

झोडगे असल्याने परिसरातील

बहुसंख्य लोक येथे खरेदीसाठी येतात त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल आठवडे बाजारात होत असते, तर दिवाळी निमित्ताने सण बाजार भरतो त्यामुळे व्यापारी देखील खुश होते.

पारंपरिक वस्तूंना मागणी

दिवाळीसाठी शहरात हल्ली विद्युत दिवे किंवा चायना लायटिंगला पसंती असते. ग्रामीण भागात मात्र मातीपासून बनवलेल्या पणत्या दिवे खरेदी केले जातात. ते स्वस्त देखील मिळतात. लक्ष्मीपूजनसाठी केरसुणी, मूर्ती, टोपल्या याच सण बाजारात मिळत असतात यासाठी शहरातून देखील मागणी असते. आकाशकंदील देखील कागदी किंवा घरगुती बनावटीचे असतात. शहरातील रेडिमेड फराळचा ट्रेंड मात्र ग्रामीण भागात देखील येत आहे. शहरातील राजस्थानी, गुजराथी हलवाई यासाठी खास आठवडाभर गावात दुकाने लावत आहेत. ग्रामीण भागात जत्राच...

ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडे बाजाराला सण उत्सव काळात ‘सण बाजार’ म्हटले जाते. एरवी दैनंदिन खरेदीपेक्षा वेगळे असे जत्रेचे स्वरूपच या आठवडे बाजारात या दिवाळीचा दिवसात त असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाची वेळ चुकली!

0
0

टीम मटा

एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप गुरुवारी तिसऱ्या दिवशी देखील कायम होता. कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय असल्या तरी त्यांची वेळ चुकल्याची प्रतिक्रिया आता प्रवाशांकडून उमटत आहे. वर्षभरापासून ज्या सणाची वाट पाहत होते, त्याच सणाला घर गाठण्यासाठी रडकुंडीला येण्याची वेळ आपल्यावर प्रवाशांवर आली आहे.
मालेगाव आगाराचे

५० लाखांचे नुकसान

मालेगाव : तीन दिवसांच्या संपाने मात्र मालेगाव आगाराला चांगलाच आर्थिक फटका बसला असून नुकसानीचे आकडे ५० लाखांच्या घरात पोचल्याचा अंदाज आहे. चौथ्यादिवशीही संप कायम राहिल्याने खाजगी वाहतूकदारांनी आपली वाहने रस्त्यावर उतारावल्याने प्रवाशांची गैरसोय कमी झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या आदल्याच दिवशी अनेकांनी गावी जाणे पसंत केल्याने गुरुवारी तुलनेत प्रवाशांची गर्दी कमी होती.

पेपर वितरकांचे हाल

भल्या पहाटे गावागावात पोचणारी एसटी आणि त्यासोबत येणारी वृत्तपत्रांची पार्सल हे समीकरण ठरलेले आहे. मात्र चार दिवसातील संपामुळे या पेपर वितरकांचे हाल झाले आहेत. बसेस बंद झाल्याने खासगी टॅक्सीने पेपर पार्सल पोचते करावे लागत असून, अनेक खेडेगावात खाजगी वाहतूक जात नसल्याने वृत्तपत्र पोहचू शकले नाही.

आनंदावर विरजण

कळवण : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असतांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप त्यांच्या न्याय हक्कासाठी असला तरी त्याची वेळ चुकल्याची भावना सर्वसामान्य जनता, प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

ऐन दिवाळीच्या काळात हा संप पुकारण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत असले, तरी खाजगी वाहतूक व्यावसायीकांची दिवाळी जोरात आहे. काही प्रमाणात भाडेवाढ आकारून कळवण तालुक्याच्या बाहेर व तालुक्यात येण्यासाठी तशी फारशी अडचण कुणालाही जाणवत नाही. लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक भूर्दंड बसत असल्याने त्यांचा मनस्ताप होत आहे. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे वाहतुकीचे हाल होत आहेत. आर्थिक झळही बसत आहे. काही खेड्यातील नागरिकांना असाही कधी एसटीचा काहीही फायदा होत नाही. कारण केवळ सकाळी शाळकरी मुलांसाठी बस येत असल्याने नंतर गावातीलच खासगी वाहनाने कुठेही जावे लागते. कळवण बस स्थानक आवारात अनेक खासगी वाहने उभी असून, तालुक्यात व तालुक्याबाहेर जाण्यासाठी वाहनधारकांची रेलचेल दिसून येत आहे.



सप्तशृंग गडावर गर्दी मंदावली

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर खासगी वाहतुकीद्वारे भाविकांची गर्दी होत आहे. एसटी बसच्या संपामुळे गडावरील गर्दी मंदावल्याचे चित्र आहे. मुक्कामी येणाऱ्या भाविकांची थोडी दैना उडत आहे. मात्र खासगी वाहनांच्या सेवेमुळे देवी दर्शन घडत असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गावाकडे जायची सोय नाही…

त्र्यंबकेश्वर : एसटी बसच्या संपाने काळी पिवळीची दिवाळी साजरी होत आहे. शहरात कामानिमिताने गेलेले दिवाळीसाठी घराकडे परतत असताना त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिक-त्र्यंबक वाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गावाकडे जाणाऱ्या खासगी वाहतुकीच्या गाड्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अक्षरशः पायी वाट धरावी लागत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बसचा संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ आदी तालुक्यात खासगी वाहनांचे जाळे कमी असल्याने बस हाच एकमेव पर्याय आहे. मात्र संपामुळे या भागात जाणाऱ्या प्रवाशांचे खूप होत आहेत. मुंबई, नाशिक आदी ठिकाणी नोकरी निमित्ताने गेलेले या भागातील मूळ रहिवाशी गावाकड दिवाळीसाठी परतत आहेत. मात्र गावाकडे जायची सोय नसल्यामुळे त्यांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. काहींनी गावातील मित्रांना बोलावून कसेबसे घर गाठले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीनंतर फुटणार राजकीय आपटबार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनंतर नाशकात भाजप आणि मनसेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याने दोन्ही पक्षात चांगलेच राजकीय आपटबार फुटणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ४ नोव्हेंबरनंतर नाशिकमध्ये पक्षाच्या राजकीय बांधणीसाठी तळ ठोकणार आहेत.

मनसेला संजीवनी देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. तर दिवाळीनंतर मंत्रीमंडळाच्या विस्तारात नाशिकला स्थान मिळणार असल्याची चर्चा असल्याने भाजपच्या तीनही आमदारांमध्ये रस्सीखेच रंगणार आहे. सद्यस्थितीत आमदार बाळासाहेब सानप आणि प्रा. देवयानी फरांदे यांच्या नावाची चर्चा असली तरी, ऐनवेळी आश्चर्यकारक नावेही पुढे येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांना पोलिसांकडून मिळणार ओळखपत्र

0
0

arvind.jadhav @timesgroup.com
नाशिक

आयुष्याच्या संध्याकाळी मदतीचा हात शोधणाऱ्या शहरातील सुमारे तीन लाख ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकल‌ित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पुढील आठवड्यात प्रतिनिधीक स्वरूपात पोलिसामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांची माहिती मध्यवर्ती ठिकाणी संकल‌ित केली जाणार असून, एका क्लिकसरशी पोलिस ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधू शकतील. विशेष म्हणजे यासाठी एक विशेष सेलही पोलिसांमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

शहरातीलच नव्हे तर जगभरात ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा समाजाकडून ज्येष्ठ नागरिकांना विविध कारणांमुळे उपेक्षीत ठेवण्यात येते. दुसरीकडे बदललेल्या जीवनशैलीचा थेट परिणाम कधीकाळी कुटुंबांचा आधारवड राहिलेल्या व्यक्तीवर पडतो. करियर असो की कौटुंबिक वाद, बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना एकटे किंवा जोडीदारासोबत राहण्याशिवाय पर्याय नसतो. मग अशा व्यक्ती विविध मंडळे किंवा सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देतात.

ज्येष्ठ नागरिकांनी अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेत. त्यांच्याकडे माहितीही भरपूर असते. मात्र, त्याचा समाजाकडून तेवढ्या प्रमाणात उपयोग करून घेतला जात नाही. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी एक विशेष सेल सुरू केला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. या बाबत बोलताना सिंगल म्हणाले, विविध कार्यक्रमांसाठी, कधीतरी वेगळ्या कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क येतो. त्यांच्यातील उत्साह, ज्ञान अधोरेखीत होते. त्यांच्या काही समस्याही दिसून येतात. या पार्श्वभूमीवर आम्ही नियोजन आखले. समाजातील २० टक्के लोकसंख्या पोलिसांशी जोडणे महत्त्वाचे होते. त्यामुळे सध्या आम्ही शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांना सोबत घेतले. या नागरिकांची माहिती संकलित केली. या आधारे आम्ही एक ओळखपत्र तयार करीत असून, पुढील आठवड्यात ते वितरीत करण्याचे काम सुरू होईल. यानिमित्ताने मोठा समुह पोलिसांशी जोडला जाईल.

विशेष म्हणजे यात त्यांच्या व कुटुंबियाचे मोबाइल क्रमांक, पूर्ण पत्ता व इतर माहिती नमूद केलेली असेल. हा सर्व डेटा मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्यात आला असून, एका क्लिकसरशी आम्हाला संबंध‌ित व्यक्तीची सर्व माहिती उपलब्ध होईल. एवढेच नव्हे तर या मोठ्या समुहाशी थेट संवाद साधता येईल. या माध्यमातून वृध्दांना येणाऱ्या समस्यांवर देखील उत्तर शोधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिक मंडळाशी थेट संबंध नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती देखील स्थानिक पोलिस स्टेशनच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. नागरिक आणि पोलिसांचा संवाद सुरू ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके फोडण्यास मनाई केल्यानं खून

0
0

पंकज काकुळीद । धुळे

फटाके फोडण्यास मनाई केल्यामुळं झालेल्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना धुळ्यातील मनमाडजीन परिसरात घडली आहे. दिनेश प्रल्हाद चौधरी असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे.

काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारोळा रोडजवळच्या परिसरात काही तरुण फटाके फोडत होते. दिनेशनं त्यांना फटाके फोडण्यास मज्जाव केला. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की फटाके फोडणाऱ्या तरुणांनी दिनेशवर हल्ला चढवला. त्यांच्यातील एकानं धारदार गुप्तीनं दिनेशच्या पोटावर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादात हल्लेखोर तरुणांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश व त्याच्या मित्रांमध्ये याआधीही वाद झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठीच त्यांनी दिनेशवर वार केले असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात ‘एसटी’ कर्मचाऱ्यांनी केले मुंडण

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । येवला

एरवी वर्षभर चांगलेच गजबजणाऱ्या येवला बसस्थानकात ‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या बेमुदत संपामुळे संपूर्णतः शुकशुकाट दिसून आला. एसटीच्या चालक व वाहकांसह वर्कशॉप कर्मचारी, तसेच सर्वच कार्यालयीन कर्मचारी या बेमुदत संपात उतरले असल्याने संपाच्या शुक्रवारच्या चौथ्या दिवशी देखील येवला आगाराची एकही बस ना आगाराच्या बाहेर पडली, ना नेहमीप्रमाणे एकाही बसची बेल वाजली. गुरुवारी दुपारी येवला आगाराच्या बाहेर एकत्रित जमा झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासन तसेच एसटी प्रशासन यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करतानाच काही कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मुंडण देखील करून घेतले.

‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे येवला बसस्थानक सलग चौथ्या दिवशीही अक्षरशः ओस पडले होते. संपाच्या शुक्रवारच्या चौथ्या दिवशी देखील कुठलाही चालक अथवा कंडक्टर बसमध्ये न चढल्याने आगारात उभ्या असलेल्या एकाही बसचे चाक जागचे हलले नाही. शेकडो बसेसच्या आवागमनासह दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशांच्या वर्दळीने एरवी नेहमीच गजबजणारे नाशिक-औरंगाबाद व नगर-मनमाड या दोन मुख्य राज्य महामार्गावरील येवला बसस्थानकात निरव शांतता पसरली आहे. स्थानकाच्या आवारात पोलिसांनी बंदोबस्त असून तिथे एक पोलीस व्हॅन उभी करून ठेवण्यात आलेली आहे. एकही बस अथवा प्रवाशी नसल्याने स्थानकातील उपहारगृह तसेच इतर व्यावसायिकांना बंदचा मोठा फटका बसला आहे. अनेक दुकानदारांनी तर सध्या आपली दुकाने बंद ठेवणेच पसंत केल्याचे दिसत आहे.



आपल्या मागण्यांकडे राज्य शासन तसेच राज्य परिवहन महामंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यासाठी शुक्रवारी दुपारी देखील येवला आगारातील चालक, वाहक तसेच इतर कर्मचारी आगाराच्या प्रवेशद्वारावर एकत्र जमा झाले होते. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सचिव बाळासाहेब गांगुर्डे यांच्या नेतृवाखाली काही कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मुंडण करून घेत परिवहन मंत्री तसेच एसटी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. ‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत संपून जवळपास १७ महिने उलटूनही नवीन करार तसेच वेतन आयोगाबाबत शासनाची व प्रशासनाची भूमिका ठोस नसल्यानेच बेमुदत संपाच्या आजच्या शुक्रवारच्या सलग चौथ्या दिवशी देखील शंभर टक्के बंद आहे.



खरेतर १७ महिन्यांपूर्वीच समिती नेमून, चर्चा करून, बैठका घेवून ठोस निर्णय घेतला असता तर, आज ‘एसटी’ कर्मचाऱ्यांवर संपाची वेळ आली नसती, असे यावेळी गांगुर्डे यांनी स्पष्ट केले. बेमुदत संपाबाबत तोडगा काढण्याऐवजी जेलमध्ये टाकण्याची वा बडतर्फीची भाषा, निलंबनाच्या कारवाईसह गुन्हे दाखल करण्याची धमकीची भाषा नक्कीच शोभणारी नाही, असा टोला देखील यावेळी गांगुर्डे यांनी लगावला. एसटी कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी मिळणारा ८ ते १० हजार रुपये पगार व सर्व कपात होवून त्यातील हाती पडणारे अवघे २ ते ५ हजार रुपये अन्याकारक असल्याचे सर्वसामान्य जनतेसह कुणीही मान्य करेल, असेही यावेळी कामगार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

लाल पिवळे खोकडे, त्यात दोन माकडे
घालायला दोन फाटके खाकी कपडे
खायला दोन शिळे तुकडे
झोपायला एक किंवा दोन बाकडे...


अशी आम्हा ‘एसटी’ कर्मचाऱ्यांची अवस्था झाली असल्याची नाराजी यावेळी ‘एसटी’च्या येवला आगारातील कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके फोडण्यास मनाई केल्याने खून

0
0

धुळे : फटाके फोडण्यास मनाई केल्यामुळे झालेल्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना धुळ्यातील मनमाडजीन परिसरात घडली आहे. दिनेश प्रल्हाद चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारोळा रोडजवळच्या परिसरात काही तरुण फटाके फोडत होते. दिनेशने त्यांना फटाके फोडण्यास मज्जाव केला. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, फटाके फोडणाऱ्या तरुणांनी दिनेशवर हल्ला चढवला. त्यांच्यातील एकानं धारदार गुप्तीनं दिनेशच्या पोटावर वार केला. त्यात तो गंभीर जखमी झा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images