Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कुपोषितांना ‘कांगारू मदर केअर’ची ऊब

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबारमधून कुपोषणाची समस्या उखडून काढण्यासाठी ‘कांगारू मदर केअर’ या उपक्रमाला लक्षण‌ीय यश मिळाले आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील कमी वजनाचे बाळांचे जन्माचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. ‘कांगारू मदर केअर’च्या प्रयत्नांमुळे येत्या काळात नंदूरबार जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाच्या वाढत्या समस्यामुळे गेल्या काही वर्षांत शेकडो बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटना, टाटा ट्रस्ट व युनिसेफकडून ‘कांगारू मदर केअर’(KMC) हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जन्मतः कमी वजानाच्या बालकांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यात ‘कांगारू मदर केअर’ला यश आले आहे.

‘कांगारू मदर केअर’बाबत माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीने याबाबत सविस्तर आढावा घेतला. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कमी वजनाचे बालक जन्माला येत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे युन‌िसेफच्या माध्यमातून अशा बालकांची प्रकृती सुधारण्यासाठी ‘कांगारु मदर केअर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याद्वारे जिल्ह्यातील गाव पातळीवर अंगणवाडी सेविकांसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून जिल्ह्यातील शेकडो बालक व माता यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला.

आदिवासी भागातील महिला प्रसृती झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाचे वजन कमी भरते. कारण गरोदरपणात मातेला आवश्यक पौष्ट‌िक अन्न आहारातून मिळत नाही. तसेच काही वेळा कमी वयात लग्न होणे, दोन मुलामंधील अंतर कमी असणे, यासह अन्य कारणांमुळे मुलांचे वजन कमी भरते. मात्र आता शासनासह जागतिक आरोग्य संघटनांनी याकडे लक्ष वेधून पुढाकार घेत प्रयत्न सुरू केले आहेत. आणि त्यात बरेच यश हाती येत असल्याचा दावाही युनिसेफकडून करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अंगात येणं’ समजून घेताना...

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

श्रावणमास सरत नाही तोच गणपतीबाप्पांचे आगमन होते. बाप्पांना निरोप देऊन अवघा पंधरवडा सरतो अन् नवरात्रीचे चैतन्यपर्व अवतरते! नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या पूजाविधीसोबत व्रतवैकल्ये, हळदी-कुंकू, लक्ष्मीचे उपवास, नवस, गरबा, दांडिया असे कार्यक्रम जोरात सुरू होतात. अशा भक्तिमय वातावरणातच एक सामान्य, पण काहीसा वेगळा प्रकारही दिसतो तो म्हणजे अंगात येणं. हा नेमका काय प्रकार आहे, हे उलगडण्याचा हा प्रयत्न...

--

स्त्रियांच्याच अंगात देवी येते असा समज समाजात दृढ आहे. मात्र, अंगात येणं ही स्थिती पुरुषांमध्येही अनेकदा जाणवते. घटस्थापनेदिवशी ग्रामदेवीच्या मंदिरात पहाटेच्या काकड आरतीवेळी घडलेली घटना याचे जिवंत उदाहरण बनते. पहाटे देवीची आरती सुरू झाल्यावर मंदिराच्या आवारात चाळिशीत स्त्री हळूहळू घुमत अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. केस मोकळे सोडून जोरजोरात घुमत अस्पष्ट भाषेत हुंकार देत ती बोलत होती. अंगात देवी आली म्हणत प्रचंड गर्दी तिला वाट देत होती. इतर स्त्रिया तिच्या ओटीत फुलं वाहत कपाळी हळद-कुंकू लावत तिला नमस्कार करत होत्या. ही स्त्री मंदिराच्या सभामंडपात आली तेव्हा पंचवीस वर्षे वय असलेला मुलगा तिला पाहून चक्कर येत खाली बसला. तो बसल्यानंतर रांगत्या बाळाप्रमाणे चालू लागला. हळूहळू तोही मान हलवू लागला. अस्पष्ट हुंकारात वाघाची डरकाळी फोडत तो त्या स्त्रीमागून जात होता. या दोघांना पाहून सर्वच त्यांना नमस्कार करीत होते. तेवढ्यात आरती संपली पुजाऱ्यांनी यांना प्रसाद दिल्यावर ही दोघेही शांत झाली. मात्र, त्यांना मागील दहा मिनिटांत काय झालं याची पुसटशीही कल्पना नव्हती.

--

मनाच्या अवस्थेचे प्रतिबिंब

अंगात येणे याबाबत समाजात धार्मिक भावभावना, परंपरा दिसतात. मात्र, अंगात येणे ही मनाची विशिष्ट अवस्था असते. हा एक आजार असल्याचे सिद्ध झाले आहे. अशिक्षित, कौटुंबिक समस्या असलेल्या किंवा समाजात न मिसळणाऱ्या एकलकोंड्या व्यक्तींमध्ये अंगात येण्याचे प्रमाण अधिक जाणवते. स्वतःकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांची बुद्धी हे कृत्य करायला भाग पाडते. हा आजार पझेशन सिंड्रोम प्रकारात मोडतो. पझेशन सिंड्रोम म्हणजे मनाचे खेळ. यात अशिक्षित मनुष्याच्या मनात मानसिक भावनेशी संबंध असलेले खेळ अधिक रंगतात. पझेशन सिंड्रोममध्ये गुरफटलेल्या व्यक्ती त्यांच्या मनातील खळबळ कोणाकडे व्यक्त करू शकत नाहीत. कोंडमारा सहन करण्याची त्यांची इच्छा संपल्यावर त्यांच्या अबोध मनाची अवस्था या क्रियेचा (अंगात येणे) शस्त्र म्हणून वापर करते. पझेशन सिंड्रोम असलेला व्यक्ती अधूनमधून एखाद्या वेगळ्याच चरित्रासोबत जोडला जातो. या चरित्रासंबंधित वर्तनही करीत आपल्या इच्छा व्यक्त करतो. काही काळात तो पूर्ववत होतो, पण मधील काळातील वर्तन व त्याच्या स्थितीबद्दल तो अनभिज्ञ असतो.

--

मानसिक भ्रमातून इच्छापूर्ती

अंगात येण्याच्या घटना अशिक्षित, समाजविरहित राहणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष यांच्याबाबतीत घडतात. या व्यक्ती सतत एकच विचार करीत असतात. यामुळे भावनिक व अंधश्रद्धाळू विचार त्यांच्या मनात येतात. पारंपरिक मतांचा, संस्कारांचा बडगा याला कारण असतो. ज्या व्यक्तींच्या अंगात येते त्यांना विशेषत: स्वयंभू देवळे, देवीची आरती, लखलखाट, धूप, पालखी, नवरात्रीचा मंडप, लालभडक कुंकू, हिरवा शालू, त्रिशूळ, समोरच्याच्या अंगात येणे अशी परिस्थिती कारणीभूत ठरताना दिसते. काही वेळा व्यक्ती भ्रमिष्ट होते, बेताल होते, याला मनोरुग्ण अवस्था म्हणतात. हा सौम्य प्रकार नसून, याला न्यूरॉसिस संबोधले जाते. अनेकदा अंगात आलेल्या व्यक्तींची ओटी भरली किंवा प्रसाद देत कपाळी कुंकू लावल्यास ते नॉर्मल होतात. हा सर्व प्रकार त्यांच्या मानसिक भ्रमामुळे घडतो. अंगात आलेली व्यक्ती हव्या असणाऱ्या वस्तू किंवा इतर गोष्टींची जी मागणी करेल ती पुरविली जाते. यातून पझेशन सिंड्रोम असलेली व्यक्ती नकळतपणे मनातील इच्छा पूर्ण करून घेते. हा प्रकार ग्रामीण भागात बुवाबाजीच्या आहारी गेलेल्यांमध्ये बघायला मिळतो.

--

योग्य उपायांनी नियंत्रण शक्य

अंगात येणे या समस्येवर योग्य उपचार करून मात करणे शक्य आहे. सायकोथेरेपीअंतर्गत अंगात येणाऱ्या व्यक्तीला समविचारी व्यक्तींपासून दूर ठेवायला हवे. त्या व्यक्तीची कौटुंबिक बाजू विचारत घ्यावी. संमोहनाद्वारे मनपरिवर्तनाचा प्रयत्न करावा. मनात येणारे विचार व वर्तणूक हे सर्व भ्रमाचे प्रकार असल्याचे समजून सांगावे. साध्या डॉक्टरकडे यावरचे उपचार नाहीत. त्यामुळे पुन्हा मांत्रिक-तांत्रिकचे पेच समोर उभे राहतात. म्हणून अशा समस्येप्रसंगी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मेडिटेशनचाही प्रभावी वापर करता येतो. अंगात येणे हा प्रकार सर्रास होत असल्याने अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. यात अशिक्षितांसोबत मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषदेखील गुंतत असल्याने यावर समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांनी फुलली कालिका यात्रा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या मुंबई नाका ‌परिसरातील श्री कालिका देवीच्या दर्शनासाठी शनिवारी भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढल्याचे दिसून आले. शनिवारी संध्याकाळी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कालिका देवी मंदिराच्या नवरात्रोत्सवास पुरातन परंपरा आहे. शनिवारी तिसरी माळ असल्याने दर्शन, धार्मिक विधींसोबतच यात्रा परिसरही भाविकांच्या गर्दीने चांगलाच बहरला आहे. शनिवार आणि रविवारी आलेल्या सुटीमुळे भाविकांच्या गर्दीमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनीही सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. याशिवाय शहरातील विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही स्वयंसेवक म्हणून गर्दीच्या नियोजनासाठी योगदान देत आहेत. यात्रोत्सव काळात या मंदिरात दिवसाकाठी सुमारे दोन लाखांवर भाविक दर्शन घेऊन जातात. शहरासोबतच उत्तर महाराष्ट्रातून या मंदिरात उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. हे लक्षात घेऊन मंदिर समितीनेही नियोजन केले आहे. मंदिराच्या आवारात भाविकांसाठी पादत्राणांसह मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी येथे पुरेशे सुरक्षा रक्षक आणि पोलिस कर्मचारीही तैनात असून, वाढत्या गर्दीवर सुमारे ३२ सीसीटीव्ही कॅमेरे वॉच ठेवून आहेत. येथे येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे.

यात्रेत विविध प्रकारचे स्टॉल्स लागले असून, अबालवृध्दांची यात्रेत उपस्थिती आहे. दूरहून दिसणाऱ्या रहाट पाळण्यांसह खेळण्या, विविध गृहपोयोगी वस्तू, कौशल्यपूर्ण खेळ, खाद्यपदार्थ आदींची रेलचेल आहे. यात्रामार्गावर वाहनांना बंदी करण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय अळ्यांचे केंद्र

$
0
0

भैरवनाथ नगरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; आरोग्य धोक्यात

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक शहराच्या मुकुटात केंद्र सरकारने हागणदारी मुक्तीचा मानाचा तुरा खोवला असला तरी शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीकडे पालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पंचकच्या भैरवनाथ नगरातील सार्वजनिक शौचालयातील सर्व युनिटमध्ये पाणी तुंबल्याने या शौचालयाची अवस्था अक्षरशः ओकारी आणणारी झाली आहे. या शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत डेंग्यूच्या अळ्यांनी थैमान घातले असल्याचा दावाही या भागातील योगेश मुळाणे, गणेश बोराडे, तानाजी सातपुते या स्थानिक नागरिकांनी केला आहे.

नाशिक शहर नुकतेच केंद्र सरकारने 'हागणदारी मुक्त' घोषित केले आहे. परंतु, शहराच्या विविध भागात मात्र 'मुक्त हागणदारी' सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ मधील पंचक परिसरातील भैरवनाथ नगरातील सार्वजनिक शौचालय देखभालीअभावी अक्षरशः खराब पाण्याने तुंबले असून, नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचविधी आटोपत आहेत. या शौचालयाच्या पाण्याच्या टाकीतही डेंग्यूच्या अळ्या निर्माण झाल्या असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

शौचालयात तुंबले पाणी

या सार्वजनिक शौचालयातील तुंबलेले पाणी गेल्या काही दिवसांपासून मुख्य रस्त्यावर आले असल्याने या भागातील नागरिक उग्र दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. या सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेस पालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभागाचे दुर्लक्षच जबाबदार असल्याचा आरोप नगरातील स्थानिक नागरिकांनी केला आहे. या दुर्गंधीकडे तातडीने लक्ष देत याठिकाणाची स्वच्छता करीत येत्याकाळात याठिकाणी मनपा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अस्वच्छतेचे ग्रहण कायम

शुक्रवारी, शहरात पालिका प्रशासनाने महास्वच्छता अभियान राबविले. परंतु, दुसरीकडे शहरातील बहुतेक सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीकडे पालिका प्रशासन डोळेझाक करित आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक रस्त्यावरच शौचविधी उरकत असल्याचे चित्र काल पंचक परिसरात बघायला मिळाले. भैरवनाथ नगरातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाल्याने सर्व युनिट तुंबलेले असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीकडे पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडून साफ दुर्लक्ष होत आहे. बाहेरील पाण्याच्या टाकीतही डेंगुच्या अळ्या झाल्या आहेत. तुंबलेले पाणी रस्त्यावर वाहत असून, नागरिकांना त्रास होत आहे.

-गणेश बोराडे, स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीचे अधिकारी रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एमआयडीसी फाइल गहाळ प्रकरणात उद्योजक इंद्रपालसिंग सहाणी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर एमआयडीसीच्या अनेक तत्कालिन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तब्बल १० महिन्यांनंतर या प्रकरणात पोलिसांनी तपास करून कारवाई केली. त्यामुळे त्यातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांनी कडक कारवाईच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

औद्योगिक वापरासाठी असलेल्या भूखंडावर व्यापारी वापर करणाऱ्या सहाणी यांना एमआडीसीने १ कोटी ४५ लाख ७१ हजार ६२८ रुपये भरण्याचे आदेश ५ डिसेंबर २०१६ ला दिले होते. शासकीय ऑड‌िट झाल्यानंतर ही रक्कम काढण्यात आली होती. पण ही कारवाई होण्याची कुणकुण लागताच त्याअगोदर ही फाइल गहाळ करून हे प्रकरण मिटवण्याचे उद्योग कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले होते. त्यातून पुढे पोलिस तक्रार झाली.

सखोल चौकशीची गरज

या प्रकरणात एमआयडीने एका भूमापकला अगोदरच निलंबीत केले आहे. तर एकाची बदली केली आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहे. फाईल गहाळ करण्याच्या प्रकरणाबरोबरच अनेक कागदपत्र एमआयडीसीतून अशाच पध्दतीने गहाळ झाल्याचे बोलले जात आहे. त्याची चौकशी केल्यास त्यातून अनेक प्रकारही उघडकीस येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगीचा जयघोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

उदे गं अंबे उदे, जय माता दी, सप्तशृंगमाता की जय... या जयघोषात सप्तशृंगगडावर शनिवारी तिसऱ्या माळेला हजारो भाविकांनी भगवतीचे मनोभावे दर्शन घेतले. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवसांचे औचित्य साधून भाविकांची मांदियाळी गडावर दिसून येत आहे.

शनिवारी पहाटेपासूनच उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील, तसेच अन्य राज्यांतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता सपत्निक पूजा झाली. जिल्हा न्यायाधीश ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती नंदेश्वर, न्यायाधीश बोधनकर, देशमुख, बुक्के आदींनीही महापूजा केली. देवस्थानचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.

निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या सप्तशृंगगडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाने घेतलेल्या प्लास्टिकमुक्तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, तसेच ग्रामस्थ पुढाकार घेताना दिसून येत आहेत. त्यात गिरीश गवळी, राजेश गवळी, संदीप बेनके आदींचा समावेश आहे. कळवणचे पोलिस उपअधीक्षक देवीदास पाटील, निरीक्षक सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

---

जगदंबेच्या दर्शनासाठी रांगा

येवला ः येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र कोटमगावात शनिवारी तिसऱ्या माळेला हजारो भाविकांनी आई जगदंबेचे दर्शन घेतले. सकाळी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. येवला शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत नारंदी नदीच्या तीरावर वसलेल्या श्रीक्षेत्र कोटमगावात नवरात्रोत्सवात भरणारी यात्रादेखील अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरत असून, शनिवारी मोठ्या संख्येने भाविकांनी यात्रेचाही आनंद लुटला. रविवारी सुटीमुळे गर्दी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

--

भाविकांनी फुलले चांदवड

मनमाड ः चांदवड निवासिनी, राजराजेश्वरी, कुलस्वामिनी अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या चांदवड येथील रेणुकामातेच्या नवरात्रोत्सवाने परिसरात चैतन्य अवतरले आहे. राज्यभरातील हजारो भाविकांच्या गर्दीने चांदवड शहर व देवी मंदिर परिसर फुलून गेला असून, शनिवारी तिसऱ्या माळेला हजारो भाविकांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले.

दररोज देवीची पालखी, महाभिषेक, आरती आदी उपक्रम होत आहेत. यंदा देवी मंदिरात हजाराहून अधिक महिला घटी बसल्या आहेत. चार प्रशस्त हॉल त्यासाठी उपलब्ध अाहेत. नवरात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शनरांगेदरम्यान बेंचेस, सीसीटीव्ही यंत्रणा, दर्शनासाठी दोन स्वतंत्र जिने आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, यात्रोत्सवादरम्यान विविध खेळणी, वस्तूंच्या दुकानांचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सव काळात मंदिर परिसरात पोलिस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, पी. डी. सुराणा कॉलेजचे स्वयंसेवक भाविकांना सहकार्य करीत आहेत.

व्यवस्थापक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, मुख्य पुजारी तानाजी अहिरराव, पुरोहित प्रकाश वैद्य, हरेंद्र वैद्य, नंदकुमार वैद्य, विजय जोशी, नारायण कुमावत, दीपक कुमावत, खंडू आहेर, हरिभाऊ कासव, काळू पवार आदी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्लॅमरस माहोलमध्ये ठेका...

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

नवरात्री म्हटली, की रात्री उशिरापर्यंत चालणारा दांडिया रास, गरबा आणि या सर्वांवर ताल धरणारी तरुणाई, असे चित्र डोळ्यासमोर येते. शहरातील विविध भागात मोकळ्या मैदानात किंवा चौकाचौकांत अशा प्रकारच्या दांडिया रासचे आयोजन विविध मंडळांकडून केले जाते. मात्र, आता दांडिया रासला ग्लॅमरस लूक प्राप्त होत असून, तो मोकळ्या मैदानात न भरविता बंदिस्त लॉन्समध्ये भरविला जात आहे. त्याचे पासेस अनेकांना न परवडणारे असले, तरी अशा ग्लॅमरस माहोलमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई ठेका धरताना दिसून येत आहे.

दांडियाला अलीकडे मोठ्या प्रमाणात इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी पारंपरिक दांडियाला कुठेतरी ब्रेक लागल्याची भावना असंख्य दांडियाप्रेमींकडून व्यक्त होत आहे. पारंपरिक दांडिया मोकळ्या पटांगणात किंवा चौकात न भरविण्याची अनेक कारणे आहेत. यातील मुख्य मुद्दा म्हणजे सुरक्षाव्यवस्था. दांडिया खेळण्यासाठी तरुणी व महिला मोठ्या संख्येने येत असतात. मोकळ्या पटांगणात या सर्वांना सुरक्षा पुरविणे अवघड होते. त्यातून छेडछाड, चेनस्नॅचिंगसारखे प्रकार घडतात. त्याचप्रमाणे नोंदणीकृत मंडळांनाच कार्यक्रमासाठी मिळणारी परवानगी, डीजेवर आलेली बंदी अन् ऑर्केस्टाचा न परवडणारा खर्च आदी बाबीही त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

सार्वजनिक दांडिया रासचे आयोजन करणाऱ्या अनेकांनी पारंपरिक दांडियाला छेद देत व्यावहारिक दृष्टिकोन ठेवत बंदिस्त दांडियाला पसंती दिली आहे. यामध्ये दांडियाचे पासेस विक्री केले जातात. जमा होणाऱ्या पैशातून दांडियासाठी लागणारा सर्व खर्च भागतो अन् आयोजकांनादेखील चांगले पैसे मिळतात. त्याचबरोबर लॉन्समध्ये किंवा बंदिस्त जागेत बाउन्सर नेमलेले असल्याने सुरक्षेचा प्रश्नदेखील सुटतो.

--

सुरक्षा आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून आम्ही बंदिस्त जागेत दांडिया रासचे आयोजन केले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणारा दांडिया रास सुरक्षित ठरत आहे. दांडियाप्रेमींना विविध सुविधा पुरविणेदेखील त्यामुळे शक्य होत आहे.

-शुभांगी कछवा, अायोजक

---

शहरासह उपनगरांत धमाल

शहरातील गंगापूररोड, पंचवटी, सिडको, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सातपूर परिसरात आयोजित दांडिया रास अन् गरब्यामुळे नवरात्रोत्सवाची रंगत वाढत असल्याचे दिसून येत आहे. रविवारच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री सर्वच ठिकाणचे दांडिया रास हाऊसफुल्ल असल्याचे दिसून आले. मैदाने व चौकांत भरणाऱ्या दांडिया रासचे प्रमाण यंदा काहीसे घटले असून, विविध लॉन्स, तसेच अन्य बंदिस्त ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दांडिया रास अन् गरब्यात तरुणाई विविध पारंपरिक गीतांच्या तालावर ठेका धरताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे तरुणाईसोबतच मध्यमवयीन स्त्री-पुरुषही त्यात आघाडीवर अाहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यवीरांचा प्रेरणास्रोत भगूरची रेणुका देवी

$
0
0

विजय गोळेसर

--

देवीच्या साडेतीन पीठांमध्ये रेणुका देवीचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. रेणुका देवीची अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी नाशिकजवळच्या भगूर येथील देवी मंदिर रेणुका देवीचे मंदिर म्हणूनच ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरासमोर असलेली बारव किंवा विहीर. या बारवेत स्नान केल्यावर त्वचाविकार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भगूरच्या पंचक्रोशीतील भाविक तर यासाठी भगूरला येतातच, परंतु मुंबई-पुण्याकडचे भाविकही येथे येतात. भगूर हे गाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. देश पारतंत्र्यात असताना ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे!’ हे अजरामर स्फूर्तिगीत लिहिणाऱ्या सावरकरांच्या भगूरची देवी आजही तेवढीच प्रेरणादायी आहे.

--

नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासूनच भगूरच्या देवीला भाविकांची मोठी गर्दी होते. पुरातन काळात दंडकारण्याच्या या भागात भृगू ऋषींचा आश्रम होता. त्यावरूनच या भागाला ‘भगूर’ हे नाव पडले आहे, असे म्हणतात. राम, लक्ष्मण, सीता वनवासात असताना येथे आले होते. रामाने या देवीची पूजा केली होती, असे म्हणतात. अलीकडच्या काळात एका भाविक महिलेला दृष्टांत झाल्यावर जमिनीतून स्वयंभू अष्टभुजा देवी निघाली तीच ही रेणुका देवी.

नाशिक-भगूर रस्त्यावरच देवीचे प्रशस्त मंदिर आहे. २०१२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. देवीचे मूळ मंदिर दीडशे-दोनशे वर्षांचे असावे. धटिंगण नावाच्या दानशूर व्यापाऱ्याने हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख मंदिराच्या भिंतीवरील कोनशिलेवर केलेला आहे. मंदिर संगमरवरी असून, स्वच्छ व प्रशस्त आहे. इतर मंदिरांत देवाचा गाभारा वेगळा व लहान असतो. येथे मात्र मोठ्या सभामंडपातच देवीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे भाविकांची संख्या कितीही वाढली, तरी गर्दी जाणवत नाही. मंदिरात प्रवेश केल्याबरोबर देवीची प्रसन्न मूर्ती नजरेस पडते.

मंदिराच्या आसपास व रस्त्याच्या दुतर्फा फुले, माळा, नारळ, कुंकू, ओटीचे साहित्य, हिरव्या साड्या, बांगड्या, चांदीचे पत्रे आदींची अनेक दुकाने आहेत.

--

नवसाला पावणारी देवी

भगूरची देवी नवसाला पावते अशी अनेकांची दृढ श्रद्धा आहे. मुला-मुलींचे विवाह जुळणे, मूलबाळ होणे, आजार दूर होणे, कटकटी, भांडणे मिटणे, कोर्ट-कचेऱ्यांतील कामे सुरळीत होणे, शेती पिकणे, भरपूर उत्पन्न मिळणे अशा असंख्य मागण्या भाविक देवीपुढे मांडतात आणि त्या पूर्ण झाल्यावर येथे नवस फेडायला येतात. नवरात्रात घटी बसणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्याही येथे लक्षणीय असते. नवरात्रात पहिल्या माळेला पहाटे ५ वाजता घटस्थापना केली जाते. यावर्षी चंद्रकांत बाळकृष्ण चिंगरे यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली. अष्टमीला होमहवन केले जाते. नवमीला कुळधर्म करतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. नवरात्रीनंतर कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते.

--

यात्रोत्सवात मोठी आर्थिक उलाढाल

दर वर्षी नवरात्रात भगूरच्या देवीची मोठी यात्रा भरते. भगूरच्या पंचक्रोशीत देवीची ही यात्रा प्रसिद्ध आहे. वर्षभर लोक या यात्रेची वाट पाहतात. मंदिराच्या समोर व आसपास मोकळे पटांगण आहे. त्यावर अनेक प्रकारची खाण्या-पिण्याची, घरगुती वस्तू, साहित्य, लहान मुलांसाठी खेळणी व खाऊची दुकाने लागलेली असतात. मोठाले रहाटपाळणे, टोराटोरा, जायंट व्हील, मौतका कुँअा, हास्यदरबार, तसेच चिनी मातीच्या कपबशा, डिश, स्टीलची भांडी, महिलांची सौंदर्यप्रसाधने, कपडे, पर्स, बांगड्या, बेल्ट, पाकीट, किचेन्स अशा नानाविध वस्तूंची दुकाने या ठिकाणी दर वर्षी लागतात. त्यामुळे या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होते. यात्रेत देवळाली कॅम्प परिसरात रहाणारे मिलिटरीतील विविध जातिधर्मांचे अधिकारी, कर्मचारी, फौजी, जवान सहकुटुंब फिरताना दिसतात. त्यांच्यामुळेही यात्रेतील अर्थचक्राला बऱ्यापैकी गती मिळते.

--

त्वचाविकार बरे करणारी बारव!

मंदिराच्या समोरच ४०-५० फूट अंतरावर देवीची दगडी पायऱ्यांची बारव (विहीर) आहे. बरेच भाविक या बारवेत स्नान करूनच देवीच्या दर्शनाला जातात. या बारवेचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा जिवंत झरा येथे आहे. त्यामुळे मोटारीने पाणी उपसल्याबरोबर नवीन ताज्या पाण्याने बारव त्वरित भरते. पाणी बऱ्यापैकी स्वच्छ दिसते. बारवेतील या पाण्यात स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगरपासून नागपूर, वर्धा, सातारा, कोल्हापूरसह पुणे, मुंबईपर्यंतचे भाविक येथे स्नानासाठी येतात. देवीपुढील दिव्यातील तेलही त्वचारोगावरील औषध म्हणून भाविक श्रद्धेने लावतात, असे सांगितले जाते. त्वचारोग, त्वचाविकार बरे व्हावेत यासाठी भाविक देवीला नवस करतात आणि ते बरे झाल्यावर येथे नवस फेडायला येतात. यावेळी चांदीचा पत्रा देवीला वाहण्याची प्रथा येथे आहे.

--

देवीची वैशिष्ट्ये...

भगूरच्या रेणुका देवीची मूर्ती पूर्णाकृती अष्टभुजाधारी आहे. पुराणानुसार भृगू ऋषींनी दारणा नदीकाठी रेणुकामाता मंदिराची स्थापना केली. त्यावेळी तिला तपोवनाची देवी म्हणत असत. देवीसमोर सिंह आणि कासव यांच्या प्रतिमा आहेत. मंदिरासमोर बारव आणि भुयारी मार्ग आहे.

--

१९४१ मध्ये जीर्णोद्धार

सन १९४१मध्ये कपडा व्यापारी धटिंगण यांच्या पूर्वजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. लष्कराच्या हद्दीत हे मंदिर आहे. पूर्वीचे कौलारू मंदिर खूपच लहान होते. भाविकांच्या आर्थिक मदतीने मंदिर समितीने २००२ मध्ये मंदिराचे नूतनीकरण केले. २०१२ साली मंदिराचे कलशपूजन, वास्तूपूजन व शतचंडी महायाग करण्यात आला. मंदिरात देवीसमोर अखंड नंदादीप तेवत असतो. नंदादीपातील तेलाचा त्वचारोग बरे होण्यास उपयोग होतो, मंदिरासमोरील बारवेच्या पाण्याने स्नान केल्यास त्वचाविकार बरे होतात, अशी श्रद्धा आहे. देवीदास चिंगरे, दामोदर चिंगरे व चंद्रकांत चिंगरे हे देवीचे पुजारी आहेत.

--

श्री रेणुका (भगवती) देवी मंदिर ट्रस्ट

ट्रस्टी : पां. भा. करंजकर, प्रभाकर ओझरकर, देवीदास चिंगरे, जीर्णोद्धार समिती : श्रीनिवास लोया (अध्यक्ष), नंदकिशोर कासट (खजिनदार), रमेश शर्मा (सेक्रेटरी), नंदलाल लाहोटी (सहसेक्रेटरी), सदस्य : रामेश्वर मालाणी, मदनलाल झंवर, उत्तमराव कासार, किरण पाळदे, वासूशेठ श्रॉफ, बळवंत गोडसे, दिलीप संकलेचा, रमेश इंदाणी, दामोदर चिंगरे, चंद्रकांत चिंगरे. सहकार्य : आर्किटेकट दत्ता नाथे, प्रशांत नाथे, सुप्रिया नाथे, कायदेविषयक सल्लागार : अॅड. रमेश मालपाणी, अॅड. अशोक खुटाडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बीएचआर’च्या ठेवीदारांना दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रासह बहूराज्यात शाखा असलेल्या व २०१४ पासून गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या सुमारे १५० कोटींच्या ठेवीदारांना लवकरच दिलासा मिळणार आहे. राज्यातील व जळगाव जिल्ह्यातील मालमत्ता विक्रीसाठी केंद्रीय स्तरावर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्याचे आदेश गृह खात्याचे उपसचिव यांच्यावतीने जारी करण्यात आल्याची माहिती ठेवेदार संघटनेचे विवेक ठाकरे यांनी दिली.

पुण्यातील घोले रोड शाखेत १६०० कोटींच्या बेनामी ठेवीच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेल्या बीएचआर मल्टिस्टेट पतसंस्थेच्या १३ संचालकांवर राज्यभरातील विविध ५४ पोलिसांमध्ये एमपीआयडी कायदयातंर्गत गुन्हे दाखल असून सर्व १३ संशयीत आरोपी संचालक फेब्रुवारी २०१५ पासून पोल‌सि कोठडीत आहेत.

एमपीआयडी कायद्याप्रमाणे या मालमत्ताची अनुसूची जाहीर करणे व लिलावातून विक्री करण्याचे अधिकार त्या-त्या जिल्ह्याच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना होते मात्र एकापेक्षा जास्त गुन्हे असल्याने गुंतागुंत समोर आली होती. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने एकच सक्षम अधिकारी प्राधिकृत करण्याचा आदेश निर्गमित करण्यात येऊन एमपीआयडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यापुढे मुंबई शहर जिल्हाधिकारी त्यांच्या अधिनस्त उपजिल्हाधिकारी यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता प्राधिकृत होणारे उपजिल्हाधिकारी हे पोलीस व सीआयडी मालमत्तांची लिलाव करून ठेवी परत करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनेचोरीचा २४ तासांत छडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसंवत

पिंपळगाव येथील सराफी दुकानातील चोरी गेलेल्या चार कोटी रुपयांच्या दागिन्यांचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. संशयितांकडून तीन कोटी रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आलेे. विशेष म्हणजे गोतेखोराने ३५ फुट पाण्यात उतरून सोने शोधले.

संजय देवराम वाघ (वय ३२, रा. परसूल, ता. चांदवड), गोपीनाथ दत्तु बरकरे (परसुल, ता. चांदवड) आणि एका अल्पवयीन संशयितास या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. चोरीची घटना २१ सप्टेंबर रोजी पिंपळगाव बसवंत येथील अशोक चोपडा यांच्या मालकीच्या श्रीनिवास ज्वेलर्स येथे घडली होती. चोपडा यांचा मोठा वाडा असून, त्यातच दुकान आणि राहण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित संजय वाघ हा स्ट्राँग रूम उघडण्याचे व बंद करण्याचे काम करीत असे. मालकाचे आजारपण आणि त्यातून होणाऱ्या दुर्लक्षामुळे दुकानात नक्की किती सोने होते याचा मागमुसही चोपडा यांना नव्हता. चोपडा कुटुंबियाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे वाघने बरकलेसह दुकानात साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मदतीला घेत चोरीचा प्लॅन आखला. तिघांनी मिळून तब्बल १० किलो ४७५ग्रॅम वजनाचे आणि तीन कोटी १६ लाख, ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. विशेष म्हणजे संशयितांनी सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर सोबत घेतले त्यानंतर हा सर्व मुद्देमाल परसूल येथील गोपीनाथ बरकले यांच्या मदतीने एका विहीरीत तसेच विहीरीजवळ लपवला. घटनेचे गांर्भीय ओळखून पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, सहायक पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे व पथकाने तपास सुरू केला. त्यात, चोरीच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कामावर आलेल्या अल्पवयीन मुलाने उडावाउडवीची उत्तरे दिली आणि गुन्हा उघडकीस आला. ३५ फुट पाणी असलेल्या विह‌रिीत टाकलेले दागिने गोतेखोराच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. दोन कोटी २० लाख रुपयांचे आणि ७ किलो २१ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

कुलूप लावलेच नाही…

संजय अनेक दिवसांपासून श्रीनिवास ज्वेलर्समध्ये काम करत होता. गुरुवारी सांयकाळी दुकानाचे काम आटोपल्यानंतर शटर, दरवाजे कुलूप न लावता तसेच ठेवले तर लॉकरची चावी जमा न करता स्वःतकडे ठेवली. पूर्व नियोजनानूसार चोपडा परिवार झोपेत असतांना घरात प्रवेश करून सोने चोरून पोबार केला.

तपास पथकाने सर्व कौशल्य लावून गुन्ह्याचा छडा लावला. यामुळे तपास पथकाला १५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे. तपासात आणखी काही बाबी स्पष्ट होणार आहे.

- संजय दराडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ लाखांचे स्पिरिट जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यात दारूबंदी असताना पश्चिम बंगालमधून आलेल्या टँकरमधून छोट्या मालवाहू गाडीत स्पिरिट काढले जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी (दि. २३) कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला असून, तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या कारवाईपैकी ही मोठी कामगिरी असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे राज्यात दारूबंदी असताना दारूसह त्यासाठी लागणाऱ्या स्पिरिटची नेहमीच महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमारेषेवरील धुळे जिल्ह्यातील हाडाखेड चेक पोस्ट जवळून होते. दरम्यान, शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाची गस्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर होती. यादरम्यान त्यांना हाडाखेड परिसरातील हॉटेल जय माता दी जवळील मोकळ्या जागेत स्पिरिट उतरवत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पथकाने तत्काळ त्याठिकाणी जावून छापा मारून टँकर क्रमांक (पीबी ०६ एके ८६२६) यामधून स्पिरिट महिन्द्रा मॅक्स मिनी (एमएच १८ डब्लू ६२१६) व्हॅनमध्ये उतरविण्यात येत होते. पथकाने यावेळी मुद्देमाल हस्तगत करीत टँकरचालक सरवनसिंग स्वर्णसिंग सखू (रा. चंबाखुर्दे, पंजाब) आणि विजय लालसिंग पावरा व त्याचा साथीदार (दोन्ही रा. सुळे ता. शिरपूर) या तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे जिल्हा अधीक्षक मनोहर अंचुळे, निरीक्षक व्ही. बी. पवार, अनिल बिडकर, डी. एम. चकोर, शांतीलाल देवरे, के. एम. गोसावी, गिरीष पाटील, गोरख पाटील, प्रमोद भडागे, प्रशांत बोरसे, अमोल धनगर या पथकाने केली आहे.

वनरक्षकाचा मृत्यू

जळगाव : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांवरील लंगडा आंबा (ता. यावल) येथील वन्यजीव विभागाच्या फिरत्या गस्तीवर पथकातील वनरक्षक विनोद गणेश कांबळे (वय २८, मूळ रा. बिलोली, जि. नांदेड) यांचा शासकीय कर्तव्यावर असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. याबाबत राजू तडवी यांनी रावेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी लागत नसल्याने शिक्षणासाठी वडिलांनी घेतलेल्या कर्जामुळे नैराश्यातून तालुक्यातील पळसोद येथील युवकाने शनिवारी (दि. २३) शेतात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी घडली. दिगंबर भगवान पाटील (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. दिगंबर शनिवारी, आजीसोबत शेतात कापूस वेचण्याचे काम करत होता. आयटीआयच्या त्याच्या शिक्षणासाठी त्याचे वडील भगवान पाटील यांनी खासगी कर्ज घेतले होते. ते अद्याप फिटलेले नव्हते. दुसरीकडे आयटीआय उत्तीर्ण होवूनही त्याला रोजगाराची संधी मिळाली नव्हती. त्यातच आपल्या शिक्षणासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फिटत नसल्याच्या वैफल्याने तो मानसिकरित्या हतबल झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजची कविता रटाळ, निरस अन् कोरडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आजची कविता रटाळ, कोरडी व निरस वाटते. निर्मिती करता येते, त्यांनीच कविता करावी. आजची कविता ही मुक्तछंदाची असते. त्याला माझा विरोध नाही. पण त्यात प्रतिमा, लय, ताल, यमक दिसत नाही. ज्याला चांगली कविता लिहता येते, तोच मुक्तछंदातही कविता लिहू शकतो असे सांगत ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी नवकवींचे कान टोचले.

‘कविता काल आज उद्या’ या विषयावरील परिसंवादात नियोजित अध्यक्ष वसंत डहाके आजारी असल्यामुळे विठ्ठल वाघ यांनी ऐनवेळी कमान सांभाळत एकतर्फी कवितेचे ऑपरेशन केले. त्यामुळे या विषयावरील परिसंवाद झालाच नाही. कवितेवर मार्मिक भाष्य करताना विठ्ठल वाघ यांनी संतांच्या कवितेपासून आजच्या कवितेचा प्रवास उलगडत रसिकांना मंत्रमुग्ध केले. जो कविता लिहतो त्यालाच कविता कळत नाही. वाड्मयमध्ये लेखन प्रकार आहे. पण, कविता यात वेगळी ठरते. विशेष गोष्ट असल्याशिवाय कविता होऊच शकत नाही. कविता हा नाटकाचा उतारा किंवा प्रवासवर्णन नाही असे सांगत त्यांनी कविता कशी रटाळ असते यासाठी काही नवकवीच्या कविताही सादर केल्या.

आमटेंची आठवण

कवितेत स्थानिक प्रतिमा येत असतात. पण, एकदा मी प्रकाश आमटेंकडे गेलो व तेथे मुलांसमोर प्राध्यापकी थाटात कष्टाचे महत्त्व सांगतांना बहिणाबाईंच्या कविता सांगितल्या. त्यात भाकर, जातं असे वर्णन येत होते. पण, येथील लहान मुले मख्ख बसले त्यांनी मला दादही दिली नाही. त्यामुळे प्रकाशला विचारले, की यांना कळाले नाही का? त्यावर आमटे बोलले त्यांना भाकरच माहित नाही. त्यांच्याकडे मातीच्या भांड्यावर स्वयंपाक करतात व त्यात तांदूळच असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना ग्रंथदिंडीने झाले वातावरण मंगलमय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लेझिम झांजांचा आवाज, बोल बजरंग बली की जयचा जयघोष, उंच दिमाखात फडकणारे ध्वज आणि वेगवेगळ्या चित्ररथातून देण्यात आलेले विविध संदेश असा उत्साही माहोल जमून आला होता सावाना ग्रंथदिंडीत.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यानिमित्ताने कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापूसन सावानाच्या बालभवनातर्फे भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला. या ग्रंथदिंडीतील पालखीत धर्मसिंधू, तुकाराम महाराजांची गाथा, नामदेव महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, कुसुमाग्रजांचे विशाखा, विंदा करंदीकरांचे कवितासंग्रह ठेवण्यात आले होते. पेठे हायस्कूल, माध्यमिक विद्यालय, उंटवाडी, मराठा हायस्कूल, ज्योती विद्यालय, छत्रपती हायस्कूल, न्यू मराठा हायस्कूल, बिटको बॉईज हायस्कूल, व्ही. एन. नाईक संस्था या शाळांमधील चित्ररथ, लेझिम पथक, ढोलपथक, ध्वजपथक, कीर्तनकार, समूहगान, बेटी बचाव, पाणी बचाव याबाबत संदेश देणाऱ्या फलकांचा दिंडीत समावेश होता. कुसुमाग्रज निवासस्थान ते टिळकवाडी, सीबीएस, शिवाजी रोड, शालीमारमार्गे, धुमाळ पॉईंट, महात्मा गांधी रोड सिग्नलमार्गे सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथदिंडीचा समारोप झाला. नाशिक शहरातील विविध मान्यवर व साहित्यिक या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते. दिंडीमध्ये सावाना जिल्हा मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्गवेड्यांचा कळसूबाई शिखरावर देवीचा जागर

$
0
0

विजय बारगजे, घोटी

इगतपुरी तालुक्यातील घोटीतील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २१ वर्षांपासून नवरात्रोत्सवात कळसूबाईच्या शिखरावर अखंडितपणे जाण्याचा शिरस्ता यंदाही कायम ठेवला. नवरात्रोत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक कारणांमुळेही २१ वर्षांत आजपर्यंत २५१ वेळा कळसूबाईच्या शिखरावर जाण्याचा विक्रम भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या तरुणांनी केला आहे.

महाराष्ट्रातलाच नव्हे, तर देशातील हा पहिलाच विक्रम ठरावा असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. शरीराची साथ, देवीचा आशीर्वाद व सकारात्मक साथ हा त्रिवेणी संगम कायम राहिला तर हा शिरस्ता पुढेही कायम राहील, असा निर्धार या तरुणांनी व्यक्त केला आहे.

--

१९९७मध्ये झाला श्रीगणेशा

गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा वसा घेऊन गेली २१ वर्षे या कार्यात झोकून देणाऱ्या तरुणांच्या आगळ्यावेगळ्या छंदाची ख्याती राज्यभर पसरली आहे. पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपणासह एकात्मतेचा संदेश देणारे हे तरुण तालुकाभर कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. १९९७ मध्ये घोटी (ता. इगतपुरी) येथील गडकिल्ल्यांची स्वतः चढाई करून सफरीचा आनंद घेणारे ध्येयवेडे युवक भागीरथ मराडे आणि अन्य दोघे युवक सतत सर्वांत उंच असणाऱ्या कळसूबाई शिखरावर जायचे. चढाई करताना ते डोंगरावर असणारी अस्वच्छता दूर करीत उपयुक्त झाडांची लागवड करायचे. यासह त्या-त्या ठिकाणी काहींनी केलेले विद्रुपीकरण दूर करीत शक्य तेवढे निर्मळ करायचे. मराडे यांचा आदर्श घेत ३५ युवक या कार्यात सहभाग घ्यायला लागले. त्याच वर्षी या ध्येयवेड्या युवकांनी कळसूबाई मित्रमंडळाची स्थापना केली. घोटी या बाजारपेठेत दर सोमवारी सुटी घेतली जाते. सुटीचा फायदा घेऊन या मंडळाचे सर्व युवक दर सोमवारी कुठल्या तरी गडकिल्ल्यावर चढाई करतात. स्वखर्चाने करीत असलेल्या या उपक्रमातून ते वृक्षारोपण करून त्यांचे जतनही करीत आहेत. गड-किल्ले आणि डोंगरावर वाढलेले घाणीचे साम्राज्य, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा स्वयंप्रेरणेने दूर करीत स्वच्छतेचा संदेश ते देत आहेत.

--

सूर्योदयापूर्वीच मंदिरात सेवा

गेल्या अठरा वर्षांपासून दर वर्षी नवरात्रीमध्ये हे युवक रोजच कळसूबाई शिखरावर निसर्गाची तमा न बाळगता चढाई करीत आहेत. कुठल्याही गड-किल्ल्यावर चढण्याची सुरुवात करण्याअगोदर विधिपूर्वक पूजन करण्यात येते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वांत उंच असणाऱ्या कळसूबाई शिखरावर एकदा कोणी गेला तर आजारी पडल्याशिवाय राहत नाही अन् हे युवक नवरात्रीत सलग नऊ दिवस चढाई करून आपला उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडतात. त्यामुळे त्यांचा हा उपक्रम सर्वदूर कौतुकाचा विषय ठरला आहे. तालुक्यातील अनेक युवक-युवती यात सहभागी होत असतात. नवरात्रोत्सव काळात सुरू केलेली पर्यावरणरक्षणाची परंपरा या युवकांनी आजही जपली असून, हे युवक नित्यनियमाने यावर्षीही कळसूबाई शिखरावर जाऊन मंदिर व शिखर परिसराची स्वच्छता करून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्याची धडपड करीत अाहेत. हे ध्येयवेडे युवक आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी नवरात्रीतील नऊ दिवस उपवास करून भल्या पहाटेच १६४६ मीटर उंचीच्या अंतराचे हे शिखर मोठ्या उत्साहाने पादाक्रांत करतात. सूर्योदय होण्यापूर्वी मंदिराजवळ पोहोचून सूर्याची पहिली किरणे मंदिरावर पडताच कळसूबाई मातेची आरती घेऊन मातेच्या चरणी नतमस्तक होत पुन्हा त्याच उत्साहाने खाली उतरतात. हा क्रम नऊ दिवस तितक्याच उत्साहाने होतो. यंदादेखील गुरुवारी (दि. २१) सकाळी शिखरावर घटस्थापना करून पहिल्या माळेला सुरुवात केली.

--

या ध्येयवेड्यांचा सहभाग

या उपक्रमात घोटी कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, सोमनाथ भगत, अशोक हेमके, बाळू आरोटे, प्रशांत जाधव, गजानन चव्हाण, नीलेश आंबेकर, बालाजी तुंबारे, प्रवीण भटाटे, शिवा जाधव, देवीदास पाखरे, किसन दराने, उमेश रावळ, पंढरीनाथ दुर्गुडे, ज्ञानेश्वर मांडे, संतोष म्हसणे, रमेश हेमके, नितीन भागवत, सोनू गिते, श्रवण सोपे, गोरख लगडे, जालिंदर घाणे, निवृत्ती खाडे, कैलास धिंडळे, चेतन छत्रे, शिवदास जोशी, भगवान तोकडे, किसन दराने आदींचा नित्यनेमाने सहभाग राहतो. पाच वर्षांपासून हे युवक नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला आणि गुढीपाडव्याच्या दिवशीही या शिखरावर जातात.

--

राज्यातील सर्वांत उंच शिखर असलेल्या कळसूबाई मातेच्या भक्तीच्या ओढीमुळे नवरात्रात शिखर सर करण्याचा पायंडा आम्ही पाडला आहे. या उपक्रमात मंदिर परिसर व शिखराचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेस यावर्षीही युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यापुढेही हा उपक्रम सुरू राहील.

-भगीरथ मराडे, अध्यक्ष, कळसूबाई मित्रमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकुंडीच्या जागेवर वृक्षारोपण

$
0
0

देवळाली कॅम्प : देवळालीच्या लेव्हिट मार्केटच्या मागील बाजूस असलेली कचराकुंडीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने कचराकुंडी हटविण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. यानंतर त्याजागी प्रशासनाने स्वच्छता केली. येथील व्यावसायिक व दुकानदारांनी एकत्र येत याठिकाणी वृक्षारोपण केले आहे.

कचराकुंडीमुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मार्केट परिसर व कचराकुंडीच्या जागी प्रशासनाने स्वच्छता केल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मोकळ्या करण्यात आलेल्या जागेवर शिवसेना विधानसभा संघटक हनुमंता देवकर यांच्यासह परिसरातील व्यावसायिकांनी एकत्र येत भिंतीलगत सहा वृक्षांची लागवड केली. यावेळी रामचंद्र डावरे, सुरेश पाटील, शाम जाधव, संजय पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्यात गट-तट नसावेत

$
0
0

जिल्हा साहित्यिक मेळाव्यात अभिनेते अनासपुरे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आमची पिढी गोंधळलेली आहे. डिजिटल क्रांतीने आम्ही गोंधळून गेलो आहोत. भारत व इंडियाचा संबंध कसा लावावा हे आम्हाला कळत नाही. हे सांगण्याचे काम साहित्यिकच चांगले करू शकतो. मात्र, त्याने निर्भिडपणे लिहिले पाहिजे. त्यासाठी आधी साहित्यात गट-तट नसावेत, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अनासपुरे पुढे म्हणाले, की साहित्यात जसे गट-तट होऊ नये तसेच शेतकऱ्यांमध्येही प्रादेशिक फुटीची चिन्हे दिसू लागली आहेत. विदर्भातील शेतकऱ्याला वाटते की कोकणातला शेतकरी फार आरामात आहे. कुणाला वाटते उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पॅकजेस घेण्याची सवयच लागली आहे. असे वाद होणे हे भीतीदायक आहे. अखंड शेतकरी एकच आहे. एकच संस्कृती आहे. वाचनाविषयी बोलताना अनासपुरे म्हणाले, की वाचन एकांगी असल्यावर चुकीचा अभिनिवेश येतो. त्यामुळे सर्व बाजूंनी वाचावे. चांगले पुस्तक कोणते, त्याची यादी द्या असे सरांना सांगितल्यावर दहा पाने वाचल्यावर पुढे वाचावेसे वाटेल ते पुस्तक चांगले, दहा पानांच्या आत कंटाळा आला की ते पुस्तक खाली ठेवून द्यावे असे साधे सोपे गणित सरांनी शिकवल्याचे अनासपुरे म्हणाले. साहित्य खूप काही बोलते, वाचन माणसाला गुंतवून ठेवते. हे वाचनपर्व निष्ठेने जोपासले असते तर पुतळ्यांवर झाला एवढा खर्च करावा लागला नसता.

जातीअंत करू या असे पहिलीच्या पुस्तकात म्हणायचे आणि दाखल्यावर मात्र पहिल्यांदा जात विचारून घ्यायची अशी पध्दत आपल्याकडे आहे. आजची माध्यमे तेज होत चालली आहेत. इतकी की आता बोलत असलेले लगेचच कुठेतरी येईल अशीही व्यवस्था आज आहे. दररोज नित्यनूतन साहित्यिक जन्माला येत आहेत. हे देखील धोक्याचे आहे. ही संस्कृती व ही परंपरा टिकवणारी माणसे एकमेकांना जोडली जाणे जास्त महत्त्वाचे आहे आणि ते काम साहित्यिकच करू शकतो.

यावेळी व्यासपीठावर सहायक जिल्हाधिकारी अमोल एडगे, आदिवासी विकास आयुक्त आर. जी. कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सुप्रसिध्द कवी विठ्ठल वाघ, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कवयित्री रेखा भांडारे, गंगूबाई धामणकर तसेच सावाना जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे माजी अध्यक्ष, सावानाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दत्ता पाटील म्हणाले, की तरुण पिढी व रंगकर्मींचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. अध्यक्ष होण्याची शक्यता प्रत्येक रंगकर्मीत ठासून भरलेली असताना मी जरा जास्तच भाग्यवान आहे. बंडखोरीच्या तत्त्वज्ञानावर वाटचाल झाली आहे. या दीपमाळेतील एक सामान्य माणूस असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. माजी अध्यक्षांच्या वतीने उत्तम कांबळे यांनी प्रतिनिधीक स्वरूपात सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, की संख्या व गुणवत्तेने दोन दिवस साहित्याचा जागर मेळाव्यात होतो. प्रतिभावंतांना पंख परसवण्याची जागा ही सावाना मेळाव्यात आहे.

प्रारंभी रागिणी कामतीकर यांच्या स्वरात सरस्वती स्तोत्र व गगन सदन तेजोमय, मोगरा फुलले हे गीत झाले. दीपप्रज्ज्वलन आणि कुसुमाग्रज, डॉ. अ. वा. वर्टी, कवी गोविंद आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी तीन महिन्यांत लायब्ररी ऑन व्हिल उपक्रम सुरू करणार तसेच वस्तुसंग्रहालय लवकरच नव्या जागेत स्थलांतरीत करणार व १० हजार पोथ्या नव्या जागेत नेणार, असे सांगितले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक म. सु. पाटील यांचे शुभेच्छापत्र वाचून दाखविण्यात आले. डॉ. वेदश्री थिगळे व किशोर पाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.

साहित्यात कडवटपणा येत चालला आहे

आताच्या साहित्यात कडवटपणा येत चाललेला आहे. लेखकाने यातना सहन केलेल्या असतात वेदनेशिवाय व यातनेशिवाय लिखाण होत नाही. मात्र हा संक्रमणाचा काळ आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. आम्ही एक होता कार्व्हरसारखे पुस्तक वाचून घडलो. मात्र त्याकाळी दुखण्याचे भांडवल करण्याची पध्दत नव्हती. आता मात्र ते वाढले आहे. नेमाडेंचा देशीवाद मला भावला तसेच गंगाधर गाडगीळांचे साहित्यही मला आपले वाटत गेले. वाचनात वर्ज्य काही नसावे या मताचा आहे, असे अनासपुरे यांनी नमूद केले.

तरुण पिढी संदिग्ध

ज्यांनी मनातील सांगितले, ज्यांचे अंतरंगात थिजवून घ्यावेसे वाटले. त्यांचे कौतुक झाल्याचे ऐकिवात नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचे कोणी कौतुक केले. आता मात्र असे होता कामा नये. दत्ता पाटील अध्यक्ष झाले तर त्यांचे भाषण छापील प्रती करून वाटावे कारण तरुण पिढीला काय हवेय ते त्यातून कळेल. आजची तरुण पिढी संदिग्ध वातावरणात आहे. रिअल हिरो शोधण्यात त्यांचा वेळ वाया जातोय त्यापेक्षा रिअल हिरो शोधण्याचे तंत्र आपण प्रत्येक पिढीला दिले पाहिजे. जिल्हास्तरीय मेळावे झाले पाहिजे त्यातूनच दडलेले परिस शोधता येतील असेही अनासपुरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेन्सॉर बोर्ड रद्द करायला हवे

$
0
0

अतुल पेठे यांचे परखड मत

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सेन्सॉर बोर्ड इंग्रजांसारखेच आहे. विशेष म्हणजे ते फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्येच काम करते. उद्याचे मराठी नाटक चांगले चालावे असे वाटत असेल, तर सर्वप्रथम सेन्सॉर बोर्ड रद्द करा, असे परखड मत ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केले. नाटक संपल्यामुळे लेखक, नाटककार संपतच आहेत. नाट्यक्षेत्राला बळ देण्यासाठी सरकारने प्रभावी योजना राबविल्या नाहीत, तर शेतकऱ्यांप्रमाणेच नाट्यकलावंतांनाही आत्महत्या कराव्या लागतील अशी भीती त्यांन‌ी व्यक्त केली.

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यानिमित्त मु. श. औरंगाबादकर सभागृहात आयोजित ‘नाटक काल आज आणि उद्या’ या विषयावर पेठे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाटकककार योगेश सोमण, अध्यक्ष दत्ता पाटील आदी मान्यवर उपस्थ‌ति होते. यावेळी पेठे यांनी अत्यंत परखड शैलीमध्ये समाजातील विविध घटकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, की शेतकरी शेतात राबतो तसा मी नाटकात राबणारा माणूस आहे. नाटक करायचे असेल तर नोकरी करायलाच हवी. कारण नाटकातून अर्थार्जन करून प्रपंच चालविणे हल्ली कठीण होऊन बसले आहे. मराठी नाटक कायम पुरोगामी राहिले. विचारप्रवण करणारे नाटक लिहिणे ही मराठी रंगभूमीची खासियत आहे. कोणतीही कलाकृती अशी असावी की ती पाहून, ऐकून हादरा बसला पाहिजे. कलाकृती पाहणाऱ्यात मानसिक, बौध्दिक आणि वैचारिक क्रांती घडायला हवी तीच खरी कलाकृती ठरते. नाटक वाढावे असे वाटत असेल तर धार्मिक उन्मादावर नाट्यक्षेत्रातील मंडळींनी लक्ष ठेवायला हवे. सरकारने नाट्यक्षेत्राला बळ देण्यासाठी योजना आखायला हवी, अशी अपेक्षा पेठे यांनी व्यक्त केली. जागतिक दृष्टिकोनाचे भान असलेले नाटक येत नाही तोपर्यंत नाटक वाढणार नाही असे मत पेठे यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रेक्षकांना नाट्यगृहात आणणे कठीण

विविध वाहिन्यांमुळे मराठी प्रेक्षक घरात बसून राहिला आहे. त्याला नाट्यगृहापर्यंत आणणे मोठे आव्हान असल्याचे मत योगेश सोमण यांनी यावेळी व्यक्त केले. दरवर्षी ७० ते ८० नाटकं तयार होतात. त्यापैकी सात ते आठ नाटकं जेमतेम व्यवसाय करतात. दोन नाटकं सुपरहिट ठरतात तर अन्य नाटकं बंद पडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत खांदेपालट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालटाचे वारे सुरू झाले असून, नाशिकच्या प्रभारी पदावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांना हटविण्यात आले आहे. या पदाची धुरा आता माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली असून, पाटील नियुक्तीनंतर लगेचच अॅक्टिव्ह झाले आहेत. आज, रविवारी (दि. २४) त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

तीन महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पक्षातील बदलाचे संकेत मिळाले होते. नाशिकचे प्रभारीपद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वर्षभरापासून होते. परंतु, त्यांनी ठाण्यातील व्यापामुळे फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे पक्षाला जिल्हा परिषदेसह महापालिकेत फटका सहन करावा लागला. त्यामुळे पक्षाने आता प्रभारीपदाची भाकरी फिरवली असून, शहर व जिल्ह्याचे प्रभारीपद आव्हाड यांच्याकडून काढून घेत थेट जयंत पाटील यांच्याकडे सोपवले आहे. पाटील हे शिस्तप्रिय व स्पष्टवक्ते असल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद थांबवून शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला त्यांच्याकडून बळकटी मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांची नाशिकच्या प्रभारीपदाची नियुक्ती होताच, त्यांनी नाशिकच्या कामकाजाला सुरुवात केली आहे. आज ते नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दुपारी राष्ट्रवादी भवनात शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. पाटील यांच्या नियुक्तीने ग्रामीण भागात अपेक्षित असलेला बहुप्रतीक्षित खांदेपालट आता होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला किती उभारी देतात, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनयकुशल ‘अंजली’

$
0
0

मुंबईच्या तुलनेत नाशिकसारख्या अत्यंत छोट्या शहरातून एका मराठमोळ्या सामान्य कुटुंबातली मुलगी पारंपरिक वारसा नसताना वयाच्या तिशीतच ‘ऑस्कर’वारीला निघते... याशिवाय सुपरस्टार रजनीकांत या बड्या अभिनेत्यासोबतही ती काम करते... हे अंजली पाटील या तरुण अभिनेत्रीचे यश ज्यांनी ‘सिने इंडस्ट्री’ ठाऊक आहे त्यांना नक्कीच थक्क करणारे ठरते. ‘न्यूटन’ या चित्रपटाच्या माध्यमातून अंजली जणू नाशिकलाच ऑस्करवारी घडविण्याच्या मार्गावर आहे.

नाशिकरोड येथील र. ज. बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने करिअरसाठी अभिनयाचे क्षेत्र निश्चित केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून अभ्यासक्रम पूर्ण करीत दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पुढील शिक्षण तिने पूर्ण केले. अंजलीने २०११ मध्ये जाहिरात क्षेत्रापासून करिअरची सुरुवात केली. सन २०१३ मध्ये ‘ना बंगारू तल्ली’ या तेलुगू चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची ती मानकरी ठरली. अंजलीने साकारलेल्या आजवरच्या भूमिकाही कणखर म्हणून सिने समीक्षकांकडून वाखाणल्या गेल्या. इतकेच नव्हे, तर तिच्या कलेची तुलना दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशीही केली जातेय. ‘माझं आयुष्य मी विशिष्ट चौकटीत आखलेलं नाही,’ असं म्हणणारी ही अभिनेत्री मनाला रुचेल अन् व्यक्तिमत्त्वाला पचेल ती संहिता साकारण्यास तत्पर आहे. पुरस्कारांच्याही पलीकडे अभिनयास एका उंचीवर न्यायचे आहे, हा तिचा विचारच तिच्या ध्येयाची उंची सांगून जातो. अंजलीचं व्यक्तिमत्त्व वैयक्तिक आयुष्यात अत्यंत समतोल आहे. तिला बड्या समारंभांमध्ये सहभागी व्हायला आवडत नाही. अंतर्मुख असणाऱ्या या अभिनेत्रीला आकर्षण असेल, तर ग्लॅमरच्या दुनियेपेक्षा जगापासून अलिप्त भासणाऱ्या हिमालयाचे. खरी प्रतिभा आणि खरे कलावंत असणारे दिग्गज अभिनेते जवळून अनुभवताना त्यांच्यातील खरा मोठेपणा या अभिनेत्रीला प्रेरणा देतो. त्यांचं मोठेपण मान्य करण्याची अंजलीची भूमिका लहान वयात मोठ्या यशानंतरही तिची पावले जमिनीवरच असल्याचे सिद्ध करते. अभिनयाच्या क्षेत्रात वावरताना तिने भाषिक चौकटी कधीच तोडल्या आहेत. ती आता थोडी फारसी आणि फ्रेंच भाषाही शिकली असून, सध्या ती तमिळ शिकत आहे. याशिवाय रायडिंग अन् बाइक चालविण्याच्या वेडापायी तिने मनाली ते लडाख असा साहसी बाइक प्रवासही केलेला आहे.

--

अन्य भाषांतही ठसा

सिनेसृष्टीत सांभाळून घेणारा कुणी बापमाणूस पाठीशी असल्याशिवाय निभाव लागणे तसे कठीणच. त्यातच या इंडस्ट्रीत ठसा उमटवू बघणारी ‘ती’ अतिसामान्य पार्श्वभूमीची असली, तर तिने केवळ साइड रोलच करावेत किंवा वाट बदलून दुसरे क्षेत्र निवडावे, असे गृहितक अनेक जण आत्मविश्वासाने मांडतात. पण, नाशिकसारख्या शहरातून सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या अंजली पाटील या अभिनेत्रीने केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी, इंग्रजी, मल्याळी, तेलुगू, तमिळ, सिंहली या दाक्षिणात्य भाषांमधील अभिनयातही ठसा उमटविला आहे.

--

(शब्दांकन : जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लब सदस्य बनायचंय?

$
0
0

फक्त १९९ रुपयांमध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी

म टा प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब म्हणजे नाशिककरांना मनोरंजनाच्या जगात नेणारा तुमचा खास सोबती. फक्त चित्रपट, नाटकांपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना अवघ्या कला जगताची सफर घडवून आणणारा कल्चर क्लब हा सोबती सदस्यांना मिळाला आहे. ही सोबत आणखी रंगतदार बनविण्यासाठी आजच महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मध्ये सहभागी व्हा.

नवरात्रीनिमित्त कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी खास ऑफर देण्यात येत आहे. फक्त १९९ रुपयांमध्ये कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि वर्षभर आनंद लुटा विविध कलात्मक, सांगीतिक कार्यक्रमांचा.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाटक, सांगीतिक कार्यक्रम, हॅप्पी स्ट्रीट, श्रावण क्विन असो किंवा झुंबा डान्स, खाऊचा डब्बा, गेट टुगेदर असे विविध कार्यक्रम याअंतर्गत आयोजित केले जातात. यंदाही कल्चर क्लब सदस्यांसाठी लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किट्टी पार्टी, गानतंत्र स्पर्धा, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निवल, मोदक मेकिंग कॉम्पिटिशन, चित्रकला स्पर्धा, मँगो फेस्टिवल, नवरंग नवरात्रीचे, एज्युकेशनल सेमिनार, क्विझ कॉन्टेस्ट, संगीत मैफिली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद कल्चर क्लब सदस्यांना वर्षभर घेता येणार आहे. तसेच तुमच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मटा कल्चर क्लब व्यासपीठही उपलब्ध करून देणार आहे.

नाटकांसारख्या कार्यक्रमांनाही मटा कल्चर क्लबकडून सदस्यांना विशेष सवलत देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि तयार व्हा मनोरंजन जगताची सफर करण्यासाठी.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर किंवा (०२५३) ६६३७९८७, ९५५२५६६८४२ या क्रमांकावर संपर्क करा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images