Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पुरस्कारांमुळे वाढते जबाबदारी

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
चांगल्या कार्याला प्रोत्साहन म्हणून पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांमुळे पुरस्कारार्थींची जबाबदारी वाढते. यापुढील काळात आणखी जोमाने काम करून सामाजिक बांधिलकी जपा, असे आवाहन यशवतराव पाटील यांनी सोमवारी केले.

नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने आयोजित गोदारत्न आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, श्रीकांत बेणी, ज्येष्ठ पत्रकार पां. भा. करंजकर, पद्माकर पाटील, भानुदास शौचे आदी मान्यवर उपस्थ‌ित होते. यावेळी संघाच्या वतीने हभप इंद्रायणी मोरे, मनोहर जगताप, हेमंत शिंदे, विलास काकडे, सुरेश नारायणे, कैलास सूर्यवंशी, उद्धव मोरे, अनुराधा तारगे आदी २९ जणांना गोदारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच रमेश कडलग, शंकरराव बर्वे, नितीन घोडके, चंद्रकांत वाघुलीकर, सुरेश बागुल यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. सरल धारणकर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुप्रसिध्द लेखिका डॉ. सरल धारणकर यांचे राम जानकी अपार्टमेंट, चैतन्य नगर, निर्मला कॉन्व्हेंटजवळ येथील घरात शनिवारी (दि. ९) पहाटे निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. नाशिक अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
डॉ. धारणकरांचा नाशिक हा अभ्यासाचा व आवडीचा विषय होता. त्या इतिहास या विषयाच्या प्राध्यापिका होत्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी गाइड म्हणून त्या काम पहात होत्या. तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी सदस्य म्हणून त्या निवडून गेलेल्या होत्या. भारतीय इतिहास संकलन समिती संस्थेच्या कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. तसेच कित्येक वर्षे डॉ. धारणकर या पुस्तक मित्र मंडळाच्या अध्यक्ष होत्या. उत्तमोत्तम पुस्तकांवर त्यांनी वक्ते बोलावून त्यांना बोलते केले होते. सावानाच्या बी लिब केंद्राच्या त्या काही वर्षे प्रमुख होत्या. डॉ. धारणकर यांनी नाशिक तसेच इतर विषयांवरही पुस्तके लिहिलेली असून दादासाहेब बिडकर, नाशिक मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे ही पुस्तके गाजलेली आहेत. भारतीय इतिहास संकलन समिती संस्था व सावानाच्या वतीने गुरूवारी, १४ सप्टेंबर रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पंचवटीतील सराईत गुन्हेगाराची हत्या करणाऱ्या तिघा संशयितांना जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हत्येची घटना २०१४ मध्ये घडली होती.
पंचवटीतील सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ उर्फ डोण्या (३२, रा. गणेशवाडी, नाशिक) याची धारदार हत्याराने खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. शर्मा यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.
योगेश गांगुर्डे (सातूपर), प्रितम चांगले (रा. गणेशवाडी, पंचवटी) आणि सागर खैरनार (रा. मखमलाबाद नाका, पंचवटी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेशवाडीतील सप्तशृंगी देवी मंदिराजवळील भुजबळ बँकेखाली ५ जानेवारी २०१४ रोजी हत्या करण्यात आली होती. घटनेच्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरोपी योगेश गांगुर्डे, प्रितम चांगले व सागर खैरनार हे तिघे इंडिका कारमधून आले. त्यांनी सचिन उर्फ डोण्या मोकळ यास फोन करून बोलावून घेतले. पूर्ववैमनस्यातून तिघांनी चॉपर, चाकू व कोयत्याने मोकळवर वार केले. आरोपींच्या अचानक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोकळला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदेश पवार यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी वरील तिघा आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. पंचवटी पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी तपास सुरू करीत तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा यांच्या कोर्टात खटला सुरू झाल्यानंतर अॅड. प्रमोद पाटील यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले. कोर्टासमोर सबळ पुरावे सादर झाल्याने तिघांना कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेप तसेच आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर रोडवर ५० हजारांची लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
जेहान सर्कल परिसरात गुंजनसिंह यांच्या चारचाकीची काच फोडून ५० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबारा बाजेच्या सुमारास घडली. या घटनेमागे इराणी टीमचे चोरटे असल्याचे मानले जात आहे.
गाडीचा कट लागण्याचा बहाणा करून दोन जणांनी सिंह यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली. चारचाकी बाजूला लावत विचारणा करण्यासाठी गेलेल्या सिंह यांच्या गाडीची काच फोडत पुढील भागात ठेवलेले ५० हजार रुपये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गायब केले. गाडीची काच फोडत असताना बाजूला असलेल्या इमारतीतील रहिवाशाने चोरट्यांना हटकले. मात्र, काही क्षणात गाडीची काच फोडत त्यांनी रोकड लंपास केली. दरम्यान, संबधित चोरट्यांकडून बँकेच्या बाजूला पाहणी करून चोरीसाठी सावज शोधले जात असल्याने पोलिसांचा संशय आहे. चोरीची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक महेश देवीकर यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्यांची माहिती घेत त्यांचा इराणी टीमकडून पाठलाग केला जाते. वळणावर तुमच्या गाडीने कट मारला असे सांगून हुज्जत घातली जाते. संबधित चारचाकीचालक गाडी बाजूला लावत विचारपूस करण्यासाठी गेला की अन्य दोघे गाडीची काच फोडून मिळेल ती रक्कम लंपास केली जात असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेला जबर मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
रविवार कारंजा परिसरात राहणाऱ्या विवाहित महिला प्रियंका विशाल लाड (३२) यांना त्यांच्याच कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी प्रियंका यांच्या पतीसह तिघांची अटकेनंतर जामीनावर सुटका झाली.

प्रियंका यांना त्यांचा पती विशाल, प्रियसी सुभदा खांडेकर आणि नंदकुमार देशपांडे यांनी जबर मारहाण केल्याची
तक्रार प्रियका यांचे वडिल रमेश पाटोळे यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनला दिली. यानंतर पोलिस दलातील निर्भया टिमच्या अधिकारी सारिका आहिराव यांनी प्रियंका यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले. तसेच आरोपी विशाल यास सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले. गंभीर दुखापत झालेल्या प्रियंका यांना त्यांचे वडील पाटोळे यांनी नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. दरम्यान, विशाल यास पोलिसांनी कोर्टात हजर केले. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उभीधोंडची वाटचाल टंचाईमुक्तीकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पेठ तालुक्यातील उभीधोंड गावात विविध यंत्रणांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामांमुळे चांगला पाणीसाठा निर्माण झाला असून गावाची वाटचाल टंचाईमुक्तीकडे सुरू आहे.
गावातील गावतळे गळतीमुळे पावसाळ्यानंतर दोन-तीन दिवसात कोरडे होत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्यासाठी समस्या निर्माण होत असे. दोन वर्षांपूर्वी गावात टँकरही सुरू होता. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावाची निवड झाल्यावर मग्रारोहयो, कृषी विभाग, वन विभाग आदी यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाची विविध कामे घेण्यात आली. ग्रामपंचायतीने या कामांसाठी पुढाकार घेतला. गावतळ्यातील गाळ काढल्याने ६ टीसीएमने पाणीक्षमता वाढली. तळ्यातील गळती रोखण्यासाठी मातीचा थर देण्यात आला असून सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. एकूण ४३६ मनुष्य दिवस एवढे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले. त्यासाठी एक लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आला. प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीचे कामासाठी सहकार्य मिळाले.

शिवारात जिरणार पाणी
वन विभागाने पाच ठिकाणी वनतळे निर्माण केल्याने शिवारातच पाणी जिरणार आहे. या कामावर सुमारे १५ लाख खर्च करण्यात आला. डोंगरमाथ्यावर सीसीटीचीही कामे घेण्यात आल्याने माथा ते पायथा पाणी अडविण्यात आले. कृषी विभागाने ५ हेक्टर क्षेत्रावर मजगीची कामे केली. तसेच ३ हेक्टरवर खोल सलग समतल चर खोदण्यात आले. त्यासाठी ३ लाख रुपये खर्च करण्यात आला. यातून १६ टीसीएम साठवण क्षमता निर्माण झाली. जलयुक्त शिवार योजनेने गावातील पाणीसमस्या कायमची दूर होईल, असा ग्रामस्थाना विश्वास वाटत असल्याचे ग्रामसेवक दीपक कोतवाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटख्यासाठी झाडांचा बळी

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
गुटखा आणि पानामधील काथसाठी पेठ, सुरगाणा पट्ट्यातील खैरांच्या झाडांवर तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे. ही झाडे तोडून टोळ्यांच्या मदतीने गुजरातमध्ये पाठवली जातात. तेथून प्रक्रिया करून देशभरात गुटख्यासाठी पाठवली जातात, असे सूत्रांनी सांगितले.
सुरगाणा वनक्षेत्रात खैराची झाडे तोडून गुजरातमध्ये तस्करी करणाऱ्या स्थानिक गणेश वाघमारेसह गुजरातच्या प्रवीणभाई पटेल आणि संताभाई काळात सुरगाणा वनखात्याने अटक केली. त्यांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती वनखात्याला मिळाली. राजकीय दबाव आणि कठोर शिक्षेचा अभाव यामुळे हे तस्कर दोन-चार वर्षे शिक्षा भोगून पुन्हा याच उद्योगात येतात. पानामध्ये वापरला जाणारा कात हा खैराच्या झाडाच्या गाभापासून तयार होतो. काही झाडे शंभर वर्षांपूर्वीची आहेत. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबक, हरसूल, पेठ, सुरगाणा तसेच कोकणपट्ट्यात खैराची झाडे आहेत.

वन जमिनींवर अतिक्रमण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनहक्क कायदा आल्यानंतर सुरगाण्यासह अन्य तालुक्यात काही आदिवासींनी वन जमिनीवर अतिक्रमण केले. बळकावलेले क्षेत्र वाढविण्यासाठी शेतीच्या नावाखाली झाडे तोडली जातात. त्यामुळे साग व खैराच्या लागडवडीसाठी जागा राहिलेली नाही. आता तस्करांची वक्रदृष्टी पडल्यामुळे खैराची आहे ती झाडे टिकवणेही अवघड झाले आहे.

गुजरातमध्ये संरक्षण
गुजरातमध्ये वनजमिनीवर अतिक्रमण कमी आहे. वनखात्यावर राजकीय दबाव फारसा येत नाही. लोक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक आहेत. नाशिक जिल्ह्यात असे सहकार्य चांदवड, कळवण, दिंडोरी भागातील लोकांचे मिळते. त्यामुळे तेथे वनसंपदा टिकून आहे.

गरज कडक कायद्याची
लाकडांची अवैध वाहतूक हा अजामीनपात्र गुन्हा आहे. खैराची झाडे परिपक्व होण्यास ५० ते १०० वर्षे लागतात. मात्र, इलेक्ट्रिक करवतीने ती कापण्यास काही सेकंद पुरसे ठरतात. तस्कर सापडलेच तरी शिक्षा फारतर दोन वर्षांपर्यंतच होते. दंडही पाच हजार रुपयांच्या पलिकडे नाही. शिक्षेची तरतूद वाढवावी, कायदा कडक करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सूत्रबध्द कार्यवाही
खैराची झाडे तोडणाऱ्या टोळ्या आवाज न करणाऱ्या इलेक्ट्रिक करवतीचा वापरतात. तस्करांच्या गाड्यांच्या नंबर प्लेटच नव्हे तर चॅसीनंबरही बनावट असतात. गाडी पकडली गेली तरी मूळ मालकाचा शोध लागत नाही. तस्करीच्या गाड्यांच्या पुढे मोटारसायकली असतात. वनकर्मचारी, पोलिस नसल्याची खात्री केल्यानंतर ते ट्रकचालकाला निरोप देतात. नंतर गाड्या गुजरातला रवाना होतात. आरोपींना पकडण्यात वनकर्मचाऱ्यांना गुजरात पोलिसांचे सहकार्य मिळत नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

बडे व्यापारी मोकाट
गुजरातमध्ये झाडे तोडणे अवघड असल्याने तेथील व्यापारी पेठ, सुरगाणा, हरसूल, त्र्यंबक, इगतपुरी परिसरातील गरीब लोकांना हाताशी धरून खैराची झाडे तोडतात. खैराची लाकडे गुजरातला नेल्यावर व्यापारी ती वैध करून घेतात. नंतर ही लाकडे गुटख्याच्या फॅक्टरीत नेली जातात. गुजरातमध्ये गुटखाविक्रीवर बंदी आहे. मात्र, त्याची निर्मिती केली जाते. त्यासाठी खैराची लाकडे वापरली जातात. वापीमधून मुंबईकडे व तेथून ती देशभरात पाठवली जातात. हे काम करणारी प्रशिक्षित टोळीच असून मुंबईपर्यंत मोठे व्यापारी गुंतले आहेत. ते कधीच पकडले जात नाहीत.

कर्मचाऱ्यांची गस्त
वनखात्याचे दोन ते तीन गाव मिळून एक बीट तयार होते. एका बीटासाठी एक वनरक्षक असतो. तीन बीट मिळून एक वनपाल तर चार बीटांच्या एका परिमंडळासाठी वनाधिकारी असतो. चार ते सहा परिमंडळ मिळून वनक्षेत्रपाल असतो. वनक्षेत्रपालाच्या अधिकाराखाली चार वनाधिकारी व कर्मचारी मिळून ४० ते ५० जणांचा स्टाफ असतो. त्यांच्या सहाय्याने मोठ्या परिक्षेत्रातील खैरांच्या झाडांचे रक्षण करणे अवघड असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षासह दोन दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर परिसरातून चोरट्यांनी एका अ‍ॅटोरिक्षासह दोन दुचाकी चोरी केल्यात. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
नागचौकातील जोशीवाड्यात राहणारे कृष्णा अशोक शिंदे यांची रिक्षा (एमएच १५ झेड ६४४१) चोरी झाली. जुना आडगाव नाक्यावरील सावली आईस्क्रीम कारखान्याजवळ १५ ऑगस्ट रोजी त्यांनी रिक्षा पार्क केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत. वाहनचोरीची दुसरी घटना सीबीएस परिसरात घडली. विकी रामदास बागुल (रा. गणेश चौक, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकी मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सीबीएस भागात गेला होता. सीबीएस चौकातील व्होडाफोन स्टोअर्स समोर दुचाकी (एमएच १५ डीबी २९४३) पार्क करून तो मोबाइल दुकानात गेला असता चोरट्यांनी काही मिनिटातच त्यांची दुचाकी पळवून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. दरम्यान, इंदिरानगर परिसरातील गितांजली सोसायटीत राहणाऱ्या महेंद्र सुभाष बागुल यांची पल्सर (एमएच १८ एयू ४६०७) शुक्रवारी (दि. ८) रात्री त्यांच्या घरासमोरून चोरी झाली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार भामरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोहिंग्या मुस्लिमप्रश्नी भारताने हस्तक्षेप करावा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
म्यानमार (बर्मा) येथून विस्थापित केल्या जाणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नात भारताने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जमाते उलेमा-ए-हिंद संघटनेने केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटल्यानुसार भारत मानवतावादी मूल्य जतन करणारा महत्त्वाचा देश आहे. देशातील मानवतेवर विश्वास ठेऊन मोठा मुस्लिम समुदाय देशात राहतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाने जमाते उमेला हिंद संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे योगदान दिले. म्यानमार देशात तेथील रोहिंग्या मुस्लिमाचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन सुरू आहे. त्यांना देशात आसरा दिला जावा. म्यानमार देशात तेथील सशस्त्र दबावातून मुस्लिमांचे स्थलांतर घडविले जात आहे. विशेषःत रोहिंग्या मुस्लिमांबाबत हा विषय गंभीर आहे. त्यामुळे रोहिंग्या मुस्लिम समाजाच्या विस्थापनाच्या विषयावर भारताने जागतीक पातळीवर म्यानमारच्या राजदूतांमाफर्त या विषयात हस्तक्षेप करावा व हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी खेडकर यांच्याकडे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एपीआय’च्या अंगावर घातली दुचाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना एका दुचाकीस्वाराने थेट सहायक पोलिस निरीक्षकाच्या (एपीआय) अंगावर दुचाकी घातली. ही घटना सातपूर आयटीआय सिग्नलवर घडली. यात वाहतूक शाखेच्या युनिट तीनचे सहाय्यक निरीक्षक सुरेश भाले जखमी झाले. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणणे तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
वाहतूक शाखेचे कानिफनाख तुकाराम मोटकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. युनिट तीनचे सहाय्यक निरीक्षक सुरेश भाले आपल्या पथकासह आयटीआय सिग्नल भागात रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करीत असताना हा प्रकार घडला. विनाहेल्मेट भरधाव येणाऱ्या (एमएच ४१ एक्यू १४५०) वरील दुचाकीस्वारास पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव दुचाकीस्वाराने थेट पोलिस पथकावर दुचाकी घालून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रसंगावधान राखत अन्य कर्मचारी बाजूला झाले. परंतु, पुढे कारवाई करणाऱ्या भाले यांना दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात भाले यांच्या डोक्यास आणि पायास गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दुचाकीस्वार मयूर विजय देवरे (२०, रा. उमराणे, ता. देवळा) याच्याविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्वारका परिसरातील कांदा बटाटा भवन परिसरात जुगार खेळणाऱ्या सात जुगारींना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून सुमारे अडीच हजार रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कांदा बटाटा भवन पाठीमागील भिंतीजवळ काही युवक पत्त्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी गौरव गांगुर्डे (रा. वडाळा नाका) व त्याचे सहा साथीदार जुगार खेळताना आढळून आले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून पर्स लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
चार चाकी वाहनाची काच फोडून चोरट्यांनी पर्स चोरी केली. ही घटना तुपसाखरे लॉन्स परिसरात घडली. पर्समध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिने, घड्याळ, मोबाइल व महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे २५ हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
विलास शंकर सोळंके (रा. किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ) यांच्या फिर्यादीनुसार, सोळंके कुटुंबीय रविवारी तुपसाखरे लॉन्स येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. लॉन्सच्या पार्किंगमध्ये लावलेल्या त्यांच्या स्कार्पिओ (एमएच १८ एजे ९११९) गाडीची चोरट्यांनी काच फोडून चालकापाठीमागील आसनावर ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्समध्ये रोकडसह सोन्या चांदीचे दागिने, मोबाइल, घड्याळ व महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज होता. घटनेचा अधिक तपास ससहायक पोलिस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रौढ झाले मन जरा नादान कर...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव


माणुसकी, प्रेम, विरह..आणि बरेच काही आपल्या मुशायऱ्यातून मांडत गजलकारांनी मालेगावकरांच्या मनात घर केले. येथील काकाणी वाचनालयाचे ग्रंथम‌त्रि दत्ता गवांदे व्यासपीठ, दिवंगत अध्यक्ष स. गो. उर्फ बाबुकाका चिंधडे, गंगूताई चिंधडे स्मृत्यर्थ आणि ब्रह्मकमळ साहित्य समूह मुंबई आयोजित मराठी गझल मुशायऱ्याने विविधांगी विषयांना हात घालत रसिकांपस तृप्त केले.


गझल मुशायऱ्यात ज्येष्ठ कवी गझलकार खलील मोमीन होते. त्यांच्यासह मुशायऱ्यात मोमीन, जयदीप विघ्ने, विशाल राजगुरू, वीरेंद्र बेडसे, रावसाहेब कुवर, काश्मीरा पाटील, विशाखा, ऐजाज शेख, संतोष कांबळे, कमलाकर देसले यांनी आपल्या गझल सादर केल्या. नरेंद्र गिरीधर आणि विशाखा यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

माणूस होण्याचा मी घेतो अवसर नक्की, मला ईश्वरा करुणेचा दे पाझर नक्की, या मतलाने गझलकार कमलाकर देसले यांनी गझल मुशायऱ्याला सुरुवात केली. समकालीन प्रश्नांची नोंद घेणाऱ्या, ‘किंचाळ्यांनी आख्खी शाळा रडली तर मग शहर असावे समजून घ्या पेशावर नक्की’

या शेरने श्रोते अंतर्मुख झाले. गझलकार रावसाहेब कुवर यांच्या आईची थोरवी सांगणाऱ्या, ‘दिसली बाई, मला आठवे माझी आई

मी चष्म्याची काच कधीही बदलत नाही’, शेरने गझल मैफलीला हळवे केले. काश्मीरा पाटील यांनी कशावर गझल लिहावी याचे उत्तर देणारी

‘काळजातल्या हव्याहव्याशा प्रासावरती गझल लिहावी’, ही गझल ऐकवली गझलकार जयदीप विघ्ने यांचा, ‘वय जरासे छाटुनी नुकसान कर, प्रौढ झाले मन जरा नादान कर’, हा शेर ज्येष्ठ नागरिकांना हळवा करताच रसिकांची दाद मिळवून गेला. तर जीवनाला सकारात्मक विचार देणारी गझल सादर करतांना विशाल राजगुरू यांनी सादर केलेला ‘दगडामधुनी एक रोपटे उगवत आहे, आयुष्याला कसे जगावे सांगत आहे’,

हा शेर श्रोत्यांना खूपच आवडला. शिकल्यासवरल्या समाजाच्या अंध दृष्टिकोनाचा पर्दाफाश करणारी ‘जे बरोबर नेमके ते चूक दिसते’ ही गझल संतोष कांबळे यांनी सादर केली. ऐजाज शेख यांनी सादर केलेल्या तरन्नुमला मालेगावकर रसिकांनी दाद दिली. वीरेंद्र बेडसे यांच्या गझलेतील

‘तिने मज चुंबण्याआधी तिला मी बोललो, एकच कशाला ठेवते वेडे निखाऱ्यावर निखाऱ्याला’, या शेरला तर श्रोत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. विशाखा यांच्या, ‘तुझं भविष्य पाहू’ या मुक्तछंद कवितेने मैफिलीला अंतर्मुख केले. अध्यक्षीय समारोपात सादर केलेल्या खालील मोमीन यांच्या ‘वेदना दे ती व्यथा निष्ठा हवी आहे, मागते त्याच्याकडे ती जो कवी आहे’या शेराच्या मैफिलीची सांगता झाली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुशायऱ्याला वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह, अॅड. मिलिंद चिंधडे, शोभा बडवे, डॉ. दिलीप भामरे, डॉ. सुनीता भामरे, सुरेंद्र टिपरे उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहेबराव पगार उपनगराध्यक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी साहेबराव पगार यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत नगरसेवकपदी घनःश्याम कोठावदे व नासिर शेख यांची निवड करण्यात आली.

नगरपंचायतचे विद्यमान उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी नगराध्यक्षा सुनिता पगार यांच्याकडे उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

या पदासाठी पाणीपुरवठा सभापती साहेबराव पगार यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी सामाजिक कार्यकर्ते घनःश्याम कोठावदे व नासिर शेख यांची आज निवड करण्यात आली. या निवडीसंदर्भात भाजप गटनेते सुधाकर पगार यांनी आक्षेप घेत तहसीलदार कैलास चावडे व मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्याकडे लेखी तक्रार केली. चावडे यांनी स्पष्टीकरण करुन आक्षेप फेटाळून लावले. यावेळी नगराध्यक्षा पगार, गटनेते कौतिक पगार, बाळासाहेब जाधव, जयेश पगार, अतुल पगार, सुधाकर पगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बागलाण तालुक्यासाठी जलअभियान राबविणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील शेती सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी जलअभियान राबविण्यासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी केले.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपसभापती राघो अहिरे, तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे यांचा सत्कार समितीचे सभापती रमेश देवरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृहात करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. तुषार शेवाळे बोलत होते.

डॉ. शेवाळे म्हणाले, बागलाण तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. शासनपातळीवर मार्गी लागणे शक्य असले तरीही लोकसहभागातून आपण या कामासाठी पुढाकार घेणार आहोत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत राजकीय जोडे बाजुला ठेवून समाजाची व संस्थेची प्रगती करणे हा आपला मानस आहे.

तसेच तळागावाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकासमांना गती देणार आहे. विकासात राजकारण येणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्यात येईल. तालुक्यासह परिसरातील शैक्षणिक समस्यांवरही विशेष लक्ष देण्यात येईल, असेही अश्वासन शेवाळे यांनी दिले.

रमेश देवरे म्हणाले, बाजार समितीच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीमध्ये शेतकरी निवास उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी जिल्हा बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. संस्थेच्या प्रशासकीय खर्चात तब्बल ४५ लक्ष रुपये बचत केल्याचे यावेळी देवरे यांनी नमूद केले.

याप्रसंगी मविप्र उपसभापती राघो अहिरे, मविप्र संचालक डॉ. प्रशांत देवरे यांची भाषणे झालीत. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, बाजार समितीचे संचालक लालचंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, अ‍ॅड. वसंत सोनवणे, शरद शेवाळे, अतुल पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतेसाठी सोमवारी मोहीम

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत ६९ रुग्ण स्वाईन फ्लूमुळे दगावले असून राज्यात याबाबतीत नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वाईन फ्लूचा धोका ओळखून १८ सप्टेंबरला विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जिल्ह्यात चालू वर्षात ३८८ स्वाईन फ्लू रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यापैकी ६९ जणांचा मृत्यू झाला. गतवर्षी ही संख्या कितीतरी पटींनी वाढली आहे. महापालिका हद्दीत २४ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अहवालात नमूद केले आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २० रुग्ण दगावली असून जिल्ह्याबाहेरील १८ रुग्ण दगावले आहेत. सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये दाखल होणारे रुग्ण महापालिका रुग्णालयातूनच येत असल्याचेही पुढे आले आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे मृत्यू वाढत असल्याने सरकारने प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

१५० ठिकाणी स्वच्छता
स्वाईन फ्लू विषयावर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी तातडीने महापालिका यंत्रणेची बैठक बोलावली. विशेष स्वच्छता मोहीम १८ सप्टेंबर रोजी राबविण्याच्या तसेच जनजागृतीच्या सूचना देण्यात आल्या. शहरात अस्वच्छ असलेली १५० ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सातपूर, सिडको, जुने नाशिक पंचवटी, नाशिकरोड व शहरातील झोपडपट्टयांचा समावेश आहे. या स्वच्छता अभियानात महापालिका, विविध सामाज‌िक व धार्मिक संस्था, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रबोधन फेरीद्वारे जनजागृती केली जाणार आहे. सप्टेंबरनंतर डेंग्यूचे प्रमाणही वाढते. त्यामुळे या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे राधाकृष्णन यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी कळवावित ठिकाणे
तीन महिन्यातून एकदा अशी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वाईन फ्यूचे रुग्ण महापालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर आढळतात. जेथे स्वच्छताच होत नाही व डासांचा प्रादुर्भाव अधिक असतो अशी ठिकाणे नागरिकांनी आवर्जुन कळवावीत.
- राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बौद्ध समाज आधुनिकतेशी मेळ राखणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाशी निगडीत गरजांशी मेळ खाणारा गौतम बुद्धांचा बौद्ध हा एकमेव धर्म आहे, असे मत प्रसिद्ध लेखक राजा ढाले यांनी येथे व्यक्त केले. येथील बिटको कॉलेजमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशा’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

राजा ढाले म्हणाले, की माणूस केंद्रस्थानी असलेली बौद्ध धर्मात मांडलेली दहा तत्वे डॉ. आंबेडकरांनी जगापुढे मांडली. २० व्या शतकात बुद्धांचा धम्म त्यांनीच जनमाणसात रुजवला. बुद्धांचा पाली भाषेतील संदेशही त्यांनी मुळापासून अभ्यासला, तो जगापुढे मांडला. बुद्धांच्या धम्मातील अध्यात्मिक व भौतिक परिघ किती व्यापक आहे. ते सोप्या भाषेत त्यांच्यामुळेच जनमाणसाला समजला.
याप्रसंगी उपस्थित डॉ. डेव्हीड ब्लेंडिल यांनीही मानववंशशास्त्राचे विश्लेषण केले. धार्मिक रुढी व परंपरा, राहणीमान, संस्कृती व मैत्री, नाती, आर्थिक नियोजनाचा अभ्यास म्हणजे मानववंशशास्त्र असे त्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकरांचे कोलंबिया विद्यापिठातील शिक्षण व तेथील त्यांचे अनुभव व अभ्यासक्रमाबाबतही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. डॉ. फँक टेडिस्को यावेळी म्हणाले, की भारतीय समाज पूर्वीपासूनच परंपरावादी विचारांचा पुरस्कर्ता होता. या समाजाला प्रगतीसाठी शिक्षणाची आवश्यकता होती. म्हणून डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाच्या प्रश्नाकडे राष्ट्रीय दृष्टीकोनातून पाहिले. ऐतिहासिक व विश्लेषणात्मक पद्धतीने संशोधन व शिक्षण आणि समाजहित यांच्या सहसंबंध असल्याचे डॉ. आंबेडकर मानत असेही डॉ. फ्रँक टेडिस्को म्हणाले.

परिषदेत एकूण सात तांत्रिक सत्र झाली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, व्हँग ह्यु-जी (कॅलिफोर्निया), प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान (औरंगाबाद), डॉ. फ्रँक टेडिस्को (फ्लोरिडा), रांची विद्यापिठातील डॉ. पारस चौधरी, बिहारच्या जे. पी. विद्यापिठातील डॉ. केदारनाथ, गुजरातमधील गांधीनगर विद्यापिठाचे समन्वयक डॉ. बी. जगन्नाथन, राजा ढाले, डॉ. डेव्हिड ब्लंडेल (कॅलिफोर्निया) यांच्या उपस्थितीत एकूण ८८ संशोधक प्राध्यापकांनी आपले प्रबंध सादर केले. समारोप समारंभास परिषदेचे संचालक प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, कॉलेज विकास समिती सदस्य मुकुंद कोकीळ, निमंत्रक डॉ. इंदिरा आठवले उपस्थित होते. डॉ. विजया धनेश्वर व प्रा. शायोंती तलवार यांनी या सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावरील पाणीसंकट टळणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील वणी येथील श्री सप्तशृंगी देवी गडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाची गळती थांबविण्यासह व तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यास फेब्रवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे गडावरील पाणीटंचाईचे सावट दूर होण्यास पुढचे वर्ष तरी उजाडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गडावरील पाणीटंचाईबाबत भाविक व गड ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडास भवानी पाझर तलावातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाझर तलावास गळती असल्याने ३० ते ३५ टक्के पाणी वाया जाते. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला असल्याने तलावातील साठवण क्षमताही कमी झाली आहे. गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी बरोबरच गडावरील लोकसंख्या वाढत आहे. त्याप्रमाणात तलावातील पाणी गरजेपेक्षा कमी पडत होते. उन्हाळा सुरू होताच गडावरील रहिवाशी व न्यासास दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. परिणामी टंचाई काळात ग्रामस्थ, हॉटेल व्यवसाय‌किांबरोबरच ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच गिरीश गवळी व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी तलावाची गळती थांबविणे व तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

पाठपुराव्याला यश

स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने तलावाच्या कामासाठी २ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर करीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. सध्या भवानी तलाव तुडुंब भरलेला असून, किमान जानेवारी २०१८ पर्यंत सप्तशृंगी गडास पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सदर प्रस्तावित कामाची लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आर. पी. धुम, अभियंता ए. व्ही. महाजन, ठेकेदार एम. डी. लोखंडे यांनी सोमवारी पाहाणी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, शांताराम सदगीर, ग्रामविकास अधिकारी जाधव उपस्थित होते.

काळी माती तलावात टाकणार

तलाव जोपर्यंत रिकामा होत नाही, तोपर्यंत काम करणे शक्य नसल्याचे अभियंता धुम यांनी सांगितले. तलावाची गळती थांबविण्यासाठी तलावात दुसऱ्या ठिकाणाहून काळी माती आणून टाकावी लागणार आहे. सदर कामादरम्यान गडावरील ग्रामस्थांबरोबरच भाविकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर तलावाची क्षमता व गळती थांबल्यास गडावर वर्षभर पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध राहाणार असल्याने गडावरील पुढील काही वर्षे तरी पाणीटंचाई दूर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड स्टेशनवर मालगाडीला आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
मनमाड रेल्वे स्टेशनवर इंधन भरलेल्या मालगाडीच्या एका डब्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात प्रवाशांची घबराट उडाली. शेजारील निवासी वसाहती जळून खाक होण्याचा धोका असताना रेल्वे कर्मचारी अग्निशामक दल यांच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
मालगाडीच्या डब्याला लागलेली आग लवकर विझली नसती तर इंधनाचे सर्व डबे पेटून मोठी दुर्घटना घडली असती. यावेळी स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म चारवर धर्माबाद एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्म पाचवर भुसावळ-मुंबई पॅसेंजर इतर प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या. आग विझल्याने प्रवासी वाचले. संबंधित मालगाडी प्लॅटफॉर्म चार आणि पाचच्या मधोमध उभी होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून पेट्रोल घेऊन मिरजकडे जाणाऱ्या मालगाडीच्या एका टँकरला मनमाड रेल्वे स्टेशनवर आग लागली. मालगाडीच्या सर्व ५० टँकर्समध्ये पेट्रोल होते. त्यामुळे वेळीच आग आटोक्यात आली नसती तर रेल्वे स्टेशनसोबत परिसरातील वसाहती जळून बेचिराख होण्याची भीती होती. घाबरलेल्या प्रवाशांची पळापळ झाली. रेल्वे स्टेशनला खेटून असलेल्या वसाहतीमध्ये घबराट पसरली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरवर पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुदैवाने संभाव्य अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशवंत शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशवंत शेतमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनास उपाययोजना सूचवण्यासाठी गठीत केलेल्या समितीची तिसरी बैठक नाशिक येथे झाली.
बैठकीत पणन मंडळाचे कार्यकारी संचालक व समितीचे अध्यक्ष, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, सह्याद्री अॅग्रो फार्मचे संचालक विलास शिंदे, महाग्रेप्सचे अध्यक्ष सोपान कांचन, महाअनारचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, आयएनआय फर्मचे अध्यक्ष पंकज खंडेलवाल, शेतकरी प्रतिनिधी अंकुश पडवळे, पणन मंडळाचे सरव्यवस्थापक तसेच समितीचे सचिव दीपक शिंदे हे उपस्थित होते. या बैठकीत तीन महिन्यात अहवाल देण्याचा निर्णय़ घेण्यात आला.

सह्याद्री अॅग्रो फार्म येथे झालेल्या या बैठकीत समितीने विविध उत्पादनक करणाऱ्या ६० हून अधिक शेतकऱ्यांना आमंत्रित केले होते. त्यांच्यावर दुपारी दोन वाजता सविस्तर चर्चा केल्यानंतर आता हा अहवाल तयार केला जाणार आहे. यानंतरही बैठक ९ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे होणार असून त्यानंतर ती कोकणात होईल. या नंतरचा सर्व अहवाल शासनास पाठवून त्यानंतर शासनाचे कृषी धोरण निश्चित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>