Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आरटीओ हॅकिंग प्रकरणी संशयितांची संख्या वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) ऑटोमेटिक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरमधील (एव्हीईएस) सिस्टिम हॅक केल्या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
हॅकिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी दीपक गिरधरलाल पटेल यास मंगळवारी अटक केली. त्यास बुधवारी कोर्टाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. मुदत संपल्याने त्यास कोर्टात गुरूवारी पुन्हा हजर केले. दोन्ही बाजुचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने पटेलला न्यायालयीन कोठडी सुनावली. ‘आरटीओ’तील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रात एमएच १५ इजी ४५२१ व एमएच १५ इजी ४६२१ ही दोन वाहने तपासणीसाठी न आणता त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे व यासाठी आपला लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर केल्याचे व्यवसाय मोटार परिवहन निरीक्षक हेमंत हेमाडे यांच्या १९ ऑगस्ट रोजी लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता सदर वाहने सौम्या अर्थमुव्हर्स या नावाने खरेदी करण्यात आल्याचे समोर आले. तसेच ही दोन्ही वाहने महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा फायनान्सने जप्त केल्यानंतर संशयित दीपक पटेल याने खरेदी केलेली वाहने तपासणीसाठी न आणता त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र तयार केल्याचे उघड झाले. मात्र, पटेल याने हे काम करून घेतले असून, प्रत्यक्ष हॅकिंगची कृती त्याने केलेली नाही.

सदर दोन्ही वाहने जप्त करण्यात आली. या गुन्ह्यात हॅकिंगचे काम नक्की कोणी व कसे केले यावर सध्या काम सुरू आहे. पटेलने मध्यस्थामार्फत सर्टिफिकेट मिळवले असून, त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. लवकरच कटाचा हा गुन्हा पूर्णतः स्पष्ट होईल. हॅकिंग प्रकरणात नक्की किती संशयिताचा सहभाग आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
- अनिल पवार,
वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणाचा दर्जा सुधारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि पालक यांच्यातील फीवाढीचा मुद्दा नेहमीच समोर येत आहे. पालक शिक्षक सभा, कार्यकारी समिती, शाळा व्यवस्थापन यांनी एकमताने फी विषयावर तोडगा निघाला पाहिजे. मुख्याध्यापकांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. मात्र, या शाळांचे मुख्याध्यापकच व्यवस्थापनाच्या तावडीत आहेत, असा टोला प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मुख्याध्यापकांना लागवला.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात गुरुवारी खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा झाली. खासगी प्राथमिक अनुदानित विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, सर्व माध्यमांच्या व मंडळांच्या शाळांसाठी ही सभा घेण्यात आली. याप्रसंगी शुल्कवाढीवरून सातत्याने निर्माण होणाऱ्या मुद्द्यांविषयी शिक्षणाधिकारी म्हसकर बोलत होते. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांच्या व्यवस्थापनाला याविषयी सूचित केले पाहिजे, असे ते म्हणाले. कोणत्याही शाळेची फी सर्वसामान्य मुलांनाही परवडेल अशा प्रकारची असणे आवश्यक आहे. आपला देश कायद्याने चालणारा आहे. त्यामुळे शाळांची फीदेखील त्याचप्रमाणे असावी. आजच्या काळात शाळांना मान्यता मिळवणे सोपे झाले असून अशा स्पर्धेत आपली शाळा टिकवायची असेल तर शिक्षणाचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यम शाळांकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यांमध्येही मोठी गफलत असून सरकारी व्यवस्थेने ठरवून दिलेला फॉरमॅटही शाळा वापरत नाही. अशा कामांनी संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून योग्य पद्धतीने कामकाज करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

निवडक विषयांवर चर्चा
सभेत अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षण, शालेय पोषण आहार, परिवहन समिती, तक्रार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या शाळांबाबत, अनधिकृत शाळा, वर्ग, संचमान्यता, सरल, वृक्षारोपण आदी विषय या सभेसाठी ठरविण्यात आले. मात्र, यातील निवडक विषयांवरच चर्चा करण्यात आल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाकडून घेण्यात आला.

शिक्षक विरुद्ध शिक्षण विभाग
महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे सचिव नंदलाल धांडे यांनी यावेळी शिक्षक सभा बोलावताना महासंघाला विश्वासात घेतले पाहिजे, असे यावेळी शिक्षण विभागाला सुनावले. इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमाची बैठक एकत्रित न घेता वेगवेगळ्या घेण्यात याव्यात, शालेय पोषण आहाराचे अनुदान, अशा मागण्या करत त्यांनी थकित वेतनेतर अनुदान देण्यात यावे लवकरात लवकर मिळाले नाही तर शिक्षण विभागातच आंदोलन करू, असा इशारा दिला. यावर शिक्षणाधिकारी म्हसकर यांनी यापुढे महासंघानीच बैठकांसाठी हॉलचे व बैठकींचे नियोजन करावे, असे प्रत्युतर दिल्याने शिक्षक विरुद्ध शिक्षण विभाग असे चित्र उपस्थित झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा गुंडाळली, ‘महाराजा’!

$
0
0

नाशिक : खासगी विमान सेवा देणाऱ्या कंपन्या ओझरकडे ढुंकून पाहत नसल्याने साऱ्यांची मदार सरकारी कंपनी एअर इंडियावर आहे. मात्र, ‘एअर इंडिया’तही खासगीकरणाचे वारे सध्या वाहत असल्याने कंपनीने नव्या सेवांचे नियोजन गुंडाळले आहे. त्यामुळे ‘महाराजा’ची सेवा आताच काय, पण नजीकच्या काळातही सुरू होणे अशक्यच आहे.

ओझर विमानतळाची धावपट्टी सर्वाधिक लांबीची आहे. या ठिकाणी नाइट लँडिंग, पार्किंगसाठी मुबलक जागा, अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलची उपलब्धता या आणि अशा कितीतरी बाबी सकारात्मक असल्या तरी खासगी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. वारंवार आवाहन करून आणि ऑनलाइन सर्वेक्षणाचे अहवाल देऊनही फायदा झालेला नाही. शिवाय हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांची दोन वेळा ओझर येथे बैठकही घेतली. त्यांना आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. असे असतानाही खासगी विमान कंपन्यांनी दाद दिलेली नाही. त्यामुळे सरकारी कंपनी असलेल्या एअर इंडियाची केवळ ओझरला सेवा मिळेल, असे चित्र निर्माण झाले. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी एअर इंडियाकडे पाठपुरावा केला.
आपलीच उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिक-मुंबई ही विमानसेवा फेब्रुवारी २०१६ पासून सुरू करण्याची घोषणा ६ नोव्हेंबर २०१५ रोजी एअर इंडियाने केली. मात्र, पायलट उपलब्ध नसल्याने ही सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे पत्र एअर इंडियाने १० फेब्रुवारी २०१६ रोजी ‘एचएएल’ला दिले. त्यानंतर आठवड्यातून सहा दिवस सेवा देण्यास २७ मार्चपासून प्रारंभ करण्यात येईल, असे कंपनीने जाहीर केले. त्याचे टाइम टेबलही दिले. हा मुहूर्तही हुकला. विमान उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे येत्या १५ एप्रिलपासून सेवा सुरू केली जाईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले. मात्र, मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने एअर इंडियाने एटीआर-७२-६०० हे नाशिक सेवेसाठी राखीव ठेवलेले विमान भोपाळ-रायपूर-पुणे या सेवेसाठी वापरण्याचा निर्णय २३ मे २०१६ रोजी घेतला. एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनीकुमार लोहाणी यांच्याकडे ‘निमा’चे पदाधिकारी आणि खासदार गोडसे यांनी पुन्हा पाठपुरावा केला. त्याची दखल घेत मार्च २०१७ मध्ये पुन्हा एअर इंडियाने सेवा देण्याचे जाहीर केले. या साऱ्या निर्णयांच्या गमजा झाल्यानंतरही एअर इंडियाच्या सेवेची अद्याप प्रतीक्षाच आहे. आता चित्र पूर्णतः उलटे झाले आहे. केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण, कंपनी पांढरा हत्ती बनली आहे. डोक्यावर ५२ हजार कोटी रुपयांचे कर्ज तर वर्षाकाठी चार हजार कोटी रुपयांचे व्याज अशी कंपनीची आर्थिक अवस्था आहे. शिवाय खासगीकरणाच्या वाऱ्यांमुळे नव्या सेवांचे नियोजन पूर्णतः थंडावले आहे. त्यास एअर इंडियातील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. या साऱ्या धावपळीत सरकारी आणि अन्य रेट्यामुळे नाशिक सेवा सुरू केली आणि त्यास प्रतिसाद नाही लाभला तर खासगीकरणानंतर होणाऱ्या चौकशीला कोण सामोरे जाईल, अशी भीती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे ओझरचे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा शांत राहिलेच बरे, असे वातावरण एअर इंडियामध्ये आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या सेवेनंतर आता सरकारी कंपनीच्या सेवेच्याही आशा धूसर झाल्या आहेत.

सर्वतोपरी मदत करू
ओझरला सेवा देणाऱ्या विमान कंपनीला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी ‘एचएएल’ने दर्शविली आहे. सद्यस्थितीत ओझरहून दुबईला शेळ्यांची निर्यात होत आहे. या कार्गो सेवेला आम्ही पूर्णतः मदत करीत आहोत. रात्री प्रवासी सेवा देणाऱ्यांनाही आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी आम्ही दर्शविली आहे. कंपन्यांनी त्यांचे प्रस्ताव द्यावेत, असे आवाहन ‘एचएएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलस्वराज’पासून नाशिक वंचित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
जलस्वराज योजना दुसऱ्या टप्प्यात राज्यातील केवळ १२ जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार आहे. यात नाशिक विभागातील केवळ जळगाव व नगर या दोनच जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. नाशिक, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त तालुक्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत कामांसाठीची दहा टक्के लोकवर्गणीची अटही रद्द करण्यात आली आहे.
सरकारच्या जलस्वराज्य या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे राज्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त गावांच्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना केली जाते. चालू वर्षापासून जलस्वराज योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे. नाशिक विभागातील नगर व जळगाव या दोनच जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील पात्र गावांची निवड अंतिम टप्प्यात आहे. ही निवड प्रक्रिया पूर्ण होताच चार गटांत योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

लोकवर्गणीची अट रद्द
जलस्वराज योजनेतील कामांसाठी पहिल्या टप्प्यात असलेली दहा टक्के लोकवर्गणीची अट दुसऱ्या टप्प्यात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेंअंतर्गत करावयाची कामे आता स्थानिक राजकीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपातून मुक्त झाली आहेत. दुस-या टप्प्यातील कामांसाठीचा १०० टक्के निधी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राज्य सरकारच करणार आहे. जलस्वराज योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागासाठी हागणदारी मुक्तीच्या ठरावाची अट समाविष्ट करण्यात आली आहे. दोन हजार ते २५ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावांची योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवड करण्यात येणार आहे.

स्थानिक ठेकेदारांचा पत्ता कट
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने ही योजना राबविली जात असल्याने यात मोठ्या स्किम्सचा समावेश राहणार आहे. या सर्व स्किम्सचे ऑनलाइन इ-टेंडर भरावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील बड्या कंपन्या या योजनेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेतील कामे काही कोटींच्या निधीची असल्याने स्थानिक ठेकेदारांचा पत्ता कट झाला आहे. परिणामी स्थानिक ठेकेदारांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम होणार आहे.

चार गटांमध्ये कामे
जलस्वराज्यचा दुसरा टप्पा निमशहरी गावे, टंचाईग्रस्त गावे, पाणी गुणवत्ता बाधित व जलनिर्धारण स्तर अशा चार गटांत राबविला जाणार आहे. निमशहरी गावांमधील कामांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण देखरेख ठेवणार आहे. तर जिल्हा परिषदेचा ग्रामिण पाणीपुरवठा विभाग टंचाईग्रस्त गावे या गटावर नियंत्रण करणार आहे. उर्वरित दोन्ही गटांतील कामे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा नियंत्रित करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवाची वाटचाल साधेपणातून डिजिटलकडे

$
0
0

- स्वामी संविदानंद सरस्वती
नाशिक शहराचा विस्तार हा छोटा आणि शहराची नागरी वस्तीही कमी होती. पण कालानुरूप शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत गेली. अनेक वर्षापासून उत्साहाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो; पण आता मात्र गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरूप बदलून डिजिटल होत आहे.

पूर्वी गणेशोत्सवात पारंपारिक धार्मिक, सांस्कृतिक देखावे, कार्यक्रम यावर अधिक भर दिला जात होता. गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम म्हणजे दहा दिवस शहराला मेजवानी असत. गणेशोत्सव हा अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जात असे. पण त्याची जागा आता कानठळ्या बसविणाऱ्या डीजेवर वाजविल्या जाणाऱ्या फिल्मी गाण्यांनी घातली आहे. ही गाणी आजच्या तरुणाईला भूरळ घालत असल्याचे दिसते. पूर्वी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात असे. धांगडधिंगाणा, डीजेचा कर्णकर्कश आवाज यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाणही कमी होते. गणेश स्थापनेच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व जाती-धर्मातील लोक सहभागी होत. शिवाय पारंपारिक वाद्य, ढोल, लेझीम, मर्दानी खेळ यांना विशेष प्राधन्य दिले जात असे.
शहरातील मेनरोड, भद्रकाली, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, सराफ बाजार, सोमवारपेठ, बुधवार पेठ, चौक मंडई, कथडा, पंचवटीमध्ये सरदार चौक, नागचौक, काट्या मारुती चौक, मालवीय चौक, शनीचौक, मखमलाबाद नाका, दिंडोरी नाका, पेठरोड या ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून चांगल्या प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक देखावे सादर केले जात असे.
गणेशमूर्ती या शाडू मातीमध्ये बनविलेल्याच असायच्या. त्यामुळे मूर्तींचे तत्काळ विसर्जित होत असे. आता मात्र पीओपी, केमिकलचा वापर केलेल्या मूर्तींची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय विसर्जन स्थळीही अस्वच्छतेमुळे पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. नदीचे पावित्र्य राखणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेतली जाते; पण प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून प्रदूषण टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

(संकलन : अभिजीत राऊत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐंशी हजार मालमत्ताधारकांची नकारघंटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू केले असून, त्याला एकीकडे सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना काही मालमत्ताधारकांकडून विरोध होत आहे. या सर्वेक्षणात तब्बल ५६ हजार मालमत्ता नव्याने आढळून आल्या आहेत. परंतु, जवळपास ८० हजार मालमत्ताधारकांनी मालमत्तांच्या मोजणीस नकार दिला आहे. विशेष म्हणजे यात शासकीय कार्यालये, हॉस्प‌िटल्स, शैक्षणिक संस्थांचा समावेश असून, काही मालमत्ता या बंद आहेत. विरोध आणि बंदमुळे या मालमत्तांच्या मोजणीस नकार देणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या मालमत्ताधारकांना नोट‌िसा पाठवण्यात येणार असून, दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पालिकेची आर्थिक स्थिती डामाडोल असल्याने उत्पन्नवाढीसाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेच्या दप्तरी सद्यःस्थितीत सुमारे चार लाख मालमत्तांची नोंद आहे. परंतु, शहराचा वाढता विस्तार पाहता मालमत्तांची संख्या पाच लाख असल्याचा पालिकेला अंदाज आहे. त्यातून पालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होऊ शकतो. त्यासाठीच महापालिकेने मिळकत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी नवी दिल्लीच्या जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेकडून गेल्या डिसेंबरपासून सर्वेक्षणाचे काम सुरू असून, आतापर्यंत तीन लाख ६० हजार मालमत्तांची तपासणी झाली आहे. त्यात ५६ हजार नोंदणी नसलेल्या मालमत्ता असून, त्यांच्याकडून वसुलीसाठी नोटीस बजावली जात आहे.

पालिकेच्या मालमत्ता सर्व्हेक्षणाला मालमत्ताधारकांकडूनही विरोध होत आहे. विशेषतः शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, संस्था यांचा समावेश आहे. सर्व्हेक्षण पथकाला प्रवेश नाकारणे, मोजणीस विरोध करणे अशा कारणांमुळे जवळपास ७५ ते ८० हजार मालमत्तांचे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांवर कारवाईची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. या मालमत्ताधारकांना पालिकेच्या नियमानुसार नोटीस दिली जाणार असून, त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मालमत्ताधारकांच्या विरोधकामुळे सर्वेक्षण पथकांचे काम वाढणार असल्याने त्यांचाही दंड वसूल करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू आहे. त्यामुळे या मालमत्ताधारकांना मोठा झटका बसणार आहे.

बांधकाम तफावतीमुळे विरोध

हॉस्प‌िटल्स, शैक्षणिक संस्था यांच्या बांधकामाचे मंजूर नकाशे व प्रत्यक्षात बांधकाम यात मोठी तफावत आहे. त्यामुळे या संस्थांकडून थेट मालमत्ता सर्वेक्षणालाच नकार दिला जात आहे. शासकीय कार्यालयांनी पालिकेवरच दादागिरी करत, मोजणीस नकार दिला आहे. या तीनही प्रकारच्या मालमत्तांची मोजणी होऊन त्यांच्यावर वसुली झाली तर यातून पालिकेला मोठा आर्थिक महसूल मिळणार आहे. या संस्थांकडून मालमत्तांची माहिती लपवून पालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पडसाद’च्या बालकांना गणेशदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सण-उत्सवांपासून काहीशा दूर राहणाऱ्या मूकबधिर बालकांनाही गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी शहर पोलिस आयुक्तालयातर्फे पडसाद मूकबधिर विद्यालयातील बालकांना शहरातील गणेश मंडळांच्या देखाव्यांचे दर्शन घडविण्यात आले.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या विशेष सफरीत बालकांनी बी. डी. भालेकर मैदानावरील गणेश मंडळांची आरास, देखावे पाहत रहाटपाळण्यांसह खेळांचाही आनंद लुटला.

गणरायाच्या आगमनापासूनच गणेशभक्त हरखून जातात. शहरातील मंडळेही या काळात आरास आणि देखाव्यांच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सामाजिक उपक्रम, तसेच संदेश देणारे हे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. मात्र, दिव्यांग आणि मूकबधिर या उत्सवापासून चार हात दूर राहतात. रस्त्यावरील गर्दी आणि वाहनव्यवस्था यामुळे पालकही मुलांना बाहेर आणण्यासाठी फारसे इच्छुक नसतात. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी पोलिसांच्या मदतीने या मुलांसाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला.

पडसाद या मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोबत घेतले. गुरुवारी सायंकाळी बी. डी. भालेकर मैदानावर पोलिस बॅण्ड पथकाच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयुक्तांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खेळणींचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मुलांना शहरातील गणेशोत्सवाची सफर घडविण्यात आली. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त राजू भुजबळ आदींसह इतर अधिकाऱ्यांनी मुलांना आनंद लुटता यावा यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमामुळे निरागस बालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव फुलले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेळ्यांची विक्रमी निर्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कार्गो विमानाद्वारे जिवंत शेळ्यांची भारतातील सर्वांत मोठी निर्यात ओझर विमानतळावरून झाली आहे. यंदाच्या हंगामात तब्बल ४५ हजार शेळ्या दुबईत विक्रीसाठी गेल्या आहेत. ओझरपाठोपाठ हैदराबाद आणि अमृतसरमधूनही शेळ्यांची निर्यात यंदा सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढील काळात शेळ्या निर्यातीचा उद्योग बहरण्याची चिन्हे आहेत.

सर्वसाधारणपणे समुद्रमार्गे आखाती देशात होणाऱ्या शेळ्यांच्या निर्यातीला फाटा देत गेल्या वर्षी ओझर विमानतळावरून कार्गो विमानाद्वारे निर्यात सुरू झाली. ही मुहूर्तमेढ निर्यात क्षेत्रासाठी अतिशय मोलाची ठरली आहे. गेल्या वर्षी आठ कार्गो विमानांद्वारे १३ ते १४ हजार शेळ्यांची निर्यात यशस्वी झाली. त्यामुळे यंदाच्या हंगामात एक लाख शेळ्यांच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. गेल्या चार जुलै रोजी या निर्यातीस प्रारंभ झाला. युक्रेनच्या आयएल ७० या विमानाद्वारे ही निर्यात करण्यात आली. सर्वसाधारणपणे एका विमानात १४०० च्या आसपास शेळ्यांची निर्यात होऊ शकली. यंदाच्या हंगामातील शेवटची निर्यात शुक्रवारी (१ सप्टेंबर) ओझर विमानतळावरून झाली. यंदा कार्गो विमानाच्या तब्बल ३४ फेऱ्यांद्वारे जवळपास ४५ हजार शेळ्यांची निर्यात झाली आहे. भारतातील ही आजवरची सर्वाधिक निर्यात आहे. तशी माहिती सानप अॅग्रो अॅनिमल्सचे संचालक हेमंत सानप यांनी थेट दुबईमधूनच ‘मटा’शी बोलताना दिली आहे. दुबईमध्ये शुक्रवारीच बकरी ईद साजरी करण्यात येत असल्याने तेथील बाजारात भारतीय आणि खासकरून नाशिकच्या शेळ्यांची विक्री सर्वाधिक होत असल्याचे सानप यांनी सांगितले.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), कार्गो कंपनी हॅलकॉन, सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अमिगो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, सोव्हिका लॉजिस्टिक प्रा. लि.तर्फे ही निर्यात झाली आहे. हवाई कार्गोद्वारे जिवंत शेळ्यांची धाडसी निर्यात यशस्वी ठरली असून, या पुढील काळात शेळ्यांबरोबरच इतर निर्यातीलाही चालना मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुन्हा उघडणार मद्याचे द्वार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीतील ज्या दारू दुकानांचे २०१७- १८ या वर्षासाठी नूतनीकरण झाले ती दुकाने तत्काळ सुरू करा, असे आदेश नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले. त्याचप्रमाणे जे परवाने रद्द झाले, त्यांचेही नूतनीकरण करता येईल, असे सांगितल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३१२ च्या आसपास दुकाने पुन्हा सुरू होणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या संदर्भातील ५ सप्टेंबरपर्यंत दिशानिर्देश जाहीर करावेत, असे निर्देशही दिल्यामुळे ही दुकाने गणेश विसर्जनानंतर पुन्हा सुरू होणार आहेत. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती हद्दीतील दुकानांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

जिल्ह्यात यापूर्वी दोन महापालिका, नऊ नगरपालिका व सहा नगरपंचायत हद्दीत ५७७ दुकाने होती. मात्र, एक एप्रिलनंतर यातील अवघी २५६ दुकाने सुरू होती. त्यामुळे तब्बल ३१२ दुकाने बंद झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील पाचशे मीटरपर्यंतचा दारूबंदीचा निर्णय शहराच्या हद्दीत लागू होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर नागपूर खंडपीठाने विदर्भातील पाचशेवर बारमालक व दारू विक्रेत्यांच्या याचिकेवर हा निकाल दिला आहे. सुरू होणाऱ्या ३१२ दुकानांत वाइन शॉपची ७३ दुकाने होती; पण त्यातील ४२ सुरू होती. आता उर्वरित ३१ दुकानेही सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे ३०४ परमिट रूमपैकी अवघे १२९ परमिट रूम सुरू होते. आता बंद पडलेले १७५ परमिट रूम पुन्हा सुरू होतील. बीअर शॉपी आधी ६७ होते. मात्र, त्यातील केवळ ४० सुरू होते. आता त्यातील २७ पुन्हा सुरू होणार आहेत. देशी दारूचीही १३३ दुकाने आधी सुरू होती. सरकारच्या निर्णयानंतर त्यातील ५४ राहिली. आता त्यातील ७९ पुन्हा सुरू होणार आहेत.

महामार्गाची फक्त १२१ दुकाने सुरू राहणार

सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री सुरू करण्यास बंदी घातल्यानंतर जिल्ह्यातील १,११६ पैकी तब्बल ७६३ दुकाने बंद करण्यात आली. नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील ४३ दुकाने सुरू झाली, तर ३७ दुकानांनी स्थलांतर केल्याने सुरू असलेल्या दुकानांची संख्या ३५३ वरून ४३३ इतकी झाली. आता यातील ३१२ दुकाने सुरू झाल्यानंतर महामार्गालगतची अवघी १२१ दुकाने बंद राहणार आहेत.

चार महिन्यांत घट

सुरू असलेल्या ४३३ दुकानांत झालेल्या विक्रीतून चार महिन्यांची आकडेवारी समोर आली आहे. त्यात बंद दुकानांमुळे मद्यविक्रीमध्ये चार महिन्यांत घट झाली. देशी, विदेशी व बीअर व वाइन विक्रीत घट झाली आहे. गेल्या चार महिन्यांत बीअर विक्रीत तब्बल ३० टक्के, विदेशी दारूत २०.६९ टक्के, देशी दारूच्या विक्रीत १२, तर वाइन विक्रीमध्ये अवघी ७ टक्के घट झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोन वेगवेगळ्या घटनांत १४ वर्षीय मुलासह तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी मुंबई नाका आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तेजस कैलास वाघचौरे (वय १४, ओअॅसिस सोसायटी, बाजीरावनगर, तिडके कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तेजस याने राहत्या घरातील छतास सुताच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. वडील कैलास वाघचौरे यांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तरुणाची आत्महत्या

आत्महत्येची दुसरी घटना पंचवटीतील एरंडवाडीत घडली. ज्ञानेश्‍वर भगवान जाधव (वय ३५, रा. एरंडवाडी, पेठ फाटा,) याने गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरात दोरीने गळफास घेतला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन फी देऊनही सुविधा मिळेनात!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेत भाविक पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नाची गंगा वाहत असताना मूलभूत सुविधांचा दुष्काळ मात्र कायम आहे. श्रावण महिन्यात पालिकेला नऊ लाख रुपये वाहनप्रवेश फी मिळाली. भाविकांकडून अशी रोख वसुली होत असताना त्यांना सुविधा देण्यात मात्र हात आखडता घेतला जात आहे.

शहरात स्वच्छता, दिवाबत्ती आणि स्वच्छतागृह या सुविधा भाविकांना पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. येथे आल्याचा भुर्दंड मात्र त्यांना मोजावा लागतो. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरदेखील १९७८ पर्यंत भाविकांना स्थानिक स्वराज्य संस्थेस कर द्यावा लागत असायचा. ११ जानेवारी १९७८ नंतर हा कर रद्द झाला आणि यात्राकर अनुदान सुरू झाले. या वर्षासाठी सव्वा कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. या व्यतिरिक्त यात्रा कालावधीत नगरपालिका व्यावसायिक गाळे, यात्रा पटांगण यांच्या माध्यमातून चांगली कमाई करीत असते. शहरात व्यावसायिक गाळ्यांची संख्या मंदिर आणि परिसरात मोठ्या संख्येने आहे. या व्यावसायिक गाळ्यांचे वार्षिक भाडे कोटींच्या घरात आहे. उत्पनाचे विविध स्त्रोत असताना नगरपालिका पूर्वीच्या जकात नाक्यावर आलेल्या वाहनांकडून वाहन प्रवेश फी वसूल करत असते.

शहरात सिंहस्थ २००३ च्या नियोजनात वाहनतळ साकारले. त्यानंतर सिंहस्थ २०१५ मध्ये त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र आजही येथे वाहने उभे करणे सुरक्षित नाही. मध्यंतरी येथून वाहनाची चोरीही झाली होती. तेव्हा वाहन विमा कंपनीने नगरपालिकेविरुध्द ग्राहक न्यायालयात धाव घेऊन तीन लाख रुपये भरपाईचा आदेश मिळविला. तेव्हापासून नगरपालिका प्रशासनाने वाहनास देणाऱ्या पावतीवर वाहनतळ फी असा शब्द कमी केला आणि प्रवेश फी असे नवे नामाभिदान त्या पावतीला दिले. सध्या मशिनद्वारे या पावत्या देण्यात येतात.

वाहन प्रकारानुसार दर

वाहनाच्या प्रकारानुसार तीस रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आकारणी होत असते. दिवसाला कमीतकमी १५,००० रुपये या टोल नाक्यावर प्राप्त होत असतात. श्रावण महिन्यात नगरपालिकेस नऊ लाख रुपये मिळाले, तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दीड लाख रुपये वाहनांच्या टोल फीमधून मिळाले. नगरपालिका वाहनांना कर लावत असेल आणि तो वसूल करीत असेल, तर त्याच्या बदल्यात काय सुविधा देतात हे अद्यापही समजलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेगोंधळाचा चौथ दिवस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्यरेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागत असल्यामुळे वाहतूक शुक्रवारी चौथ्या दिवशीही विस्कळीतच होती. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. आजही (दि. 2) अनेक गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. रविवारी सर्व वाहतूक पूर्ववत होण्याची रेल्वेला आशा आहे. मुंबईला नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या नाशिककरांची पंचवटी दोन दिवसांच्या ब्रेकनंतर कालपासून सुरू झाली असली, तरी राज्यराणी आणि गोदावरीला यार्डातच थांबावे लागले आहे. त्यामुळे पंचवटीवर मोठा ताण आला आहे.

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनासह सहा डबे आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान चार दिवसांपूर्वी घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातग्रस्त भागात धोका पत्करून सध्या सिंगल लाइनवर वाहतूक सुरू आहे. या भागात दुरुस्तीसाठी शुक्रवारी छोटा मेगाब्लॉक घेण्यात आला.

सिंगलवरच भिस्त

वाशिंदजवळ अपघातस्थळी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चौथ्या दिवशीही ते सुरूच होते. महसूल बुडत असल्याने आणि प्रवाशांचा उद्रेक होण्याची भीती असल्याने या टप्प्यात नाशिकहून मुंबईला येणाऱ्या रेल्वेगाड्या सिंगल लाइनवर चालविल्या जात आहेत. येथे गाडी ताशी पंचवीस कि. मी. वेगानेच चालवावी लागत आहे. त्यामुळे मुंबईला गाड्या विलंबाने पोहचत आहेत. मुंबईहून नाशिकला येणारा डाऊनचा मार्ग सुरळीत झाला असल्याने तेवढाच दिलासा रेल्वेला मिळाला आहे.

शुक्रवारी रद्द झालेल्या गाड्या

शुक्रवारी राज्यराणी, गोदावरी, सेवाग्राम, पंजाब, हरिद्वार, पुष्पक, पटना-पाटलीपुत्र, एलटीटी लखनऊ, नागपूर दुरांतो, अमृतसर फिरोजपूर, हटिया, रांची, देवगिरी, तपोवन, नंदीग्राम, ज्ञानेश्वरी सिकंदराबाद आदी गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. भुसावळ-पुणे ही गाडी नाशिकऐवजी दौंडमार्गेच धावत आहे. तसेच तुलसी, हावडा, पंजाब आदी गाड्या याच मार्गावरुन मुंबईला धावत आहेत. त्यामुळे त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागत आहे. कसारा-आसनगाव लोकल सुरू झाल्याने त्यामार्गे कल्याण-ठाणे-मुंबई पोहचण्याची सोय झाली आहे.

प्रवाशांचा संताप

गाड्यांना विलंब होत असल्याने मनमाड आणि भुसावळ येथील प्रवाशांनी स्थानकप्रमुखांना घेराव घातला. या प्रवाशांची मुंबईला जाणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांमध्ये सोय करण्याची तयारी रेल्वेने दर्शवूनही प्रवाशांचा राग शमला नाही. नाशिकरोड स्थानकात डहाणूचे कुटुंब तीसपेक्षा जास्त तास अडकून पडले आहे. हरिद्वार एक्स्प्रेसला वीस तास विलंब झाल्यामुळे नाशिकरोडला आलेल्या या प्रवाशांचेही हाल झाले आहेत. मनमाडला अडकून पडलेले अनेक प्रवासी रस्तामार्गाने नाशिकला आले. तेथे आल्यावर त्यांनी रद्द झालेल्या गाडीचे तिकीटाचे पैसे मागितल्यावर त्यांचे बोर्डिंग तिकडचे असल्याने त्यांना पुन्हा मनमाडला पाठविण्यात आले. रिफंडसाठीही गर्दी आता कमी झाली आहे. अधिकारी, कर्मचारी प्रवाशांची मदत करत आहेत. मदत कक्षामध्ये प्रवाशांना मार्गदर्शन केले जात आहे.

पुष्पक सुरतमार्गे मुंबईला

शुक्रवारी पुष्पक एक्स्प्रेस भुसावळ स्थानकातच थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, प्रवासी आक्रमक झाल्याने प्रशासन नरमले व गाडी मार्गस्थ झाली. शुक्रवारी गाडी लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस सकाळी ११.३० वाजता भुसावळ रेल्वेस्थानकावर आली. ही गाडी येथून पुढे मुंबईकडे जाणार नसल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांना या गाडीतून खाली उतरवून दुसऱ्या गाडीत बसण्याचे सांगण्यात आले. प्रवाशांनी नकार देत स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाजवळ गोंधळ घातला. शेवटी पुष्पक पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे उद्या रंगणार चित्रकला, मोदक स्पर्धा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘मटा कल्चर क्लब’तर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, तसेच खास महिलांसाठी मोदक मेकिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ३) दुपारी २ वाजता पार्कसाइड होम, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलसमोर, बळी मंदिराजवळ, हनुमाननगर, मुंबई-आग्रा हायवे, पंचवटी या ठिकाणी या दोन्ही स्पर्धा होणार आहेत.

विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धांतील प्रथम क्रमांकांच्या विजेत्यांना सात हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, द्वितीय क्रमांकास चार हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे. हे गिफ्ट व्हाउचर योगेश इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून दिले जातील. त्याचप्रमाणे या सर्व विजेत्यांना सह्याद्री हॉस्पिटलतर्फे फॅमिली हेल्थ चेकअप व्हाउचरसुद्धा दिले जातील.

दहा झटपट रेसिपी वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर जिंकण्याची संधीही सहभागींना मिळणार आहे. सणासुदीच्या काळात झटपट तयार होतील अशा विविध पाककृती कशा तयार करायच्या याविषयी डेमो वर्कशॉपसुद्धा दुपारी ३ वाजता पार्कसाइड होम या ठिकाणी होणार आहे. कोमल सूर्यवंशी या व्हेजी नगेट, इन्स्टंट चोको लावा केक, इन्स्टंट ब्रेड दहीवडा या आणि अशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपी करून दाखविणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा आणि वर्कशॉपसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

त्याचप्रमाणे दहा झटपट रेसिपी वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर जिंकण्याची संधीही मिळणार आहे. सायंकाळी ५ वाजता चित्रकला स्पर्धा आणि मोदक मेकिंग कॉम्पिटिशनमधील विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क ः ६६३७९८७, ७०४०७६२२५४.


स्पर्धेसाठीचे नियम व अटी...

चित्रकला स्पर्धा ः पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धेचा विषय गणेशोत्सव हा आहे. स्पर्धेचा कालावधी २ तासांचा राहील. विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य घरून आणावयाचे आहे. फक्त ड्रॉइंग पेपर स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध होतील. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

मोदक मेकिंग कॉम्पिटिशन ः स्पर्धेला येताना स्पर्धकांनी मोदक बनवून आणावेत. मोदक स्पर्धकांनी स्वतः बनविलेले असावेत. स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार नाही. स्पर्धेसाठी मोदक तिखट किंवा गोड कुठल्याही प्रकारचे चालतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य असून, परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर डेक्कनचे तळ्यात-मळ्यात

$
0
0

नाशिक ः ‘उडे देश का आम आदमी’ या घोषवाक्यानुसार आणि ‘उडान’ या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेली एअर डेक्कनची विमानसेवा तळ्यात-मळ्यातच आहे. ही सेवा नक्की कधी सुरू होणार याबाबत कंपनीने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला अद्याप कुठलेही पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे एअर डेक्कनचे ‘उडान’ कधी होणार हा प्रश्नच आहे.

प्रादेशिक विमानसेवा बळकट करणे, विमानतळ असलेल्या शहरांमध्ये विमानसेवा देणे आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या विकासाला चालना देणे या हेतूने केंद्र सरकारने ‘उडान’ ही योजना आणली आहे. याअंतर्गत विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातूनच दक्षिणेतील एअर डेक्कन या कंपनीने नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सेवा देण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली. म्हणूनच केंद्र सरकारने या योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या यादीत एअर डेक्कनचाही समावेश केला. सप्टेंबरपर्यंत एअर डेक्कनची सेवा सुरू होईल, असे केंद्र सरकारने ३० मार्च रोजी स्पष्ट केले. अवघ्या २५०० रुपयांत नाशिक-मुंबई किंवा नाशिक-पुणे ही सेवा मिळणार असल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या. महाराष्ट्राबाहेरील नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सूरत, इंदूर यासारख्या शहरांसाठी सेवा मिळण्याची नाशिककरांची मागणी आहे. असे असताना एअर डेक्कनकडून मुंबई आणि पुण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. तो मंजूरही झाला. त्यामुळे ही सेवा सुरू झाली तरी पुढच्या टप्प्यात अन्य शहरांच्या सेवा सुरू होतील, असा आशावाद आहे. प्रत्यक्षात एअर डेक्कनची मुंबई आणि पुणे ही सेवाही अधांतरीच राहील की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सप्टेंबर महिना सुरू झाला तरी एअर डेक्कनकडून सेवा देण्याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. तरीही सप्टेंबर महिन्यात सेवा सुरू होईल, अशी शक्यता काहींकडून वर्तविली जात असली तरी प्रत्यक्षात एअर डेक्कनकडे या सेवेचा कुठलाही आराखडा तयार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. शिवाय एअर डेक्कनने सेवेबाबत ओझर एचएएलशी अद्याप कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळे त्यांची सेवा कधी सुरू होणार हे अनिश्चितच आहे. कंपनीने सेवांसाठी बुकिंगही सुरू केलेले नाही किंवा सेवांचे शेड्यूलही जाहीर केलेले नाही. त्यामुळे सप्टेंबरअखेरीपर्यंत तरी ही सेवा मिळणे अवघड आहे, असे हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. कंपनीच्या वतीने अधिकृत माहिती लवकरच सादर केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कंपनीकडे सेवा देण्याबाबत कुठलेच नियोजन नसल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, ‘उडान’वर असलेली नाशिककरांची भिस्तही डळमळीतच आहे.

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटजागृतीसाठी अवतरले गणराय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेट घालण्याबाबत आणि वाहतूक नियमांच्या पालनाबाबत जनजागृती करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयोग राबवणाऱ्या शहर पोलिसांसोबत शुक्रवारी चक्क गणराय अवतरले. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांनी गणरायाची एक विशेष आरती केल्यानंतरच वाहनचालकाची सुटका करण्यात आली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत जवळपास ६०० जणांना सहभाग घ्यावा लागला. या मोहिमेची चांगली चर्चा शहरात रंगली.

बेशिस्त वाहनचालकांना आवर घालण्यासाठी वाहतूक पोलिस सातत्याने दंडात्मक कारवाई करतात. वर्षाकाठी दोन ते तीन कोटी रुपयांचा दंड होतो. हजारो वाहनचालकांकडून दंड वसूल होत असताना बेशिस्त वाहतुकीला फरक मात्र पडत नाही. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस वेगवेगळे उपक्रम राबवून वाहनचालकांचे प्रबोधन करतात. शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलिस गणरायाची वेशभूषा केलेल्यांना सोबत घेऊन गंगापूररोडवरील पोलिस आयुक्तालय, शरणपूर पोलिस चौकी सिग्नलजवळ, त्र्यंबक नाका सिग्नल तसेच अन्य काही ठिकाणी येऊन थांबले. हेल्मेट परिधान न केलेल्या वाहनचालकांना थांबवण्यात आले. झेब्रा क्रॉस‌िंगचा नियम मोडणारे, सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांना गणरायाच्या आरतीसाठी थांबवण्यात आले. यात महिला चालकांचादेखील समावेश होता. नियमाचे पालन न करणाऱ्या चालकांकडून पोलिसांनी दंडाची रक्कम वसूल करण्याऐवजी चक्क रस्ते वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. वाहनचालकांनी हेल्मेट घालण्याची विनंती करीत पोलिसांनी त्याचे महत्त्व उदाहरणासह पटवून दिले. त्यानंतर वाहनचालकाच्या हाती तयार करण्यात आलेल्या खास आरतीचा कागद देण्यात आला. ज्या वाहनचालकांनी आरती म्हटली, त्यांना पोलिसांनी त्वरीत सोडून दिले.

वाहनचालकांनी म्हटली ही आरती

जय देव जय गणपती देवा, स्वतःच्या सुरक्षतेसाठी मला हेल्मेट वापरण्याची सद्बुध्दी दे, जय देव जय गणपती देवा, हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन, झेब्राला थांबेन, शिस्त मी पाळीन. जय देवा जय गणपती देवा, पी पी पों पों बंद मी ठेवीन, सीट बेल्ट लावीन, सुखरूप राहीन. जय देवा, जय देवा गणपती देवा..


गणराया, सद््बुद्धी द्या

या मोहिमेबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले की, गणपती ही बुद्धिची देवता आहे. गणरायाच्या आगमनाचा एक चांगला परिणाम समाजावर होतो. या पार्श्वभूमीवर शहरातील वेगवेगळ्या भागात आम्ही मोहीम राबवली. हेल्मेट वापरणे, झेब्रा क्रॉसिंगचे नियम पाळणे, सीट बेल्ट लावणे असे अगदी साधे नियम वाहनचालकांनी पाळण्याची बुद्धी गणरायाने द्यावी, असा या मागे उद्देश असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले. अनेक चालक आरशाला हेल्मेट लावून वाहन चालवतात. अशा वाहनचालकांच्या मानसिकतेत सुधारणा तरी कशी होणार, असा उद्विग्न सवाल देवरे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूर येथील पालिकेचे क्लब हाउस चकाकणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

येथील धूळ खात पडलेल्या क्लब हाउसला रंगरंगोटी करण्यात येणार असून, पडून असलेली इमारतही खेळांडूसाठी खुली करण्यात येणार आहे. सभापती माधुरी बोलकर व महापालिकेचे बांधकाम उपअभियंता संजय पाटील यांनी ‘मटा’ला ही माहिती दिली.

महापालिकेने एमआयडीसीत क्लब हाउसची उभारणी केली आहे. परंतु, तेथील दोन इमारतींपैकी एका इमारतीचा वापरच होत नसल्याने ती धूळ खात पडून असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सभापती माधुरी बोलकर व नगरसेविका पल्लवी पाटील यांनी महापालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्यांना बरोबर घेत क्लब हाउसची पाहणी केल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

सातपूर एमआयडीसीतील क्लब हाउसच्या दोन इमारतींपैकी एका इमारतीत बॅडमिंटन, टेबल टेनिस व शूटिंग क्लब सुरू आहे. परंतु, दुसरी इमारत धूळ खात पडून असल्याने तिचा योग्य वापर व्हावा, अशी मागणी खेळाडूंनी केली होती. त्यानंतर ‘मटा’ने क्लब हाउसबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यावर सभापतींनी पाहणी केली. आगामी काही दिवसांत पडून असलेल्या इमारतीचा हॉल खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सभापती बोलकर यांनी ‘मटा’ला सांगितले. परिसरात स्वच्छता करण्याचे आदेशही सभापतींनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षा पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी चौकाचौकांत पोलिसांचा ताफा तैनात असला तरीही त्यांना वाहनचालक जुमानत नसल्याचे चित्र शुक्रवारी त्र्यंबक नाका सिग्नलवर पाहायला मिळाले. तब्बल वीसपेक्षा अधिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून एका रिक्षेने पोबारा केला. पोलिस मात्र हतबलपणे पसार होणारी रिक्षा पाहत होते.

हेल्मेट परिधान करण्यासह वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी शहर पोलिसांनी शुक्रवारी उपक्रम हाती घेतला होता. त्यासाठी जवळपास ५० वाहतूक पोलिसांचा फौजफाटा त्र्यंबक नाका सिग्नल येथे जमला होता. एकीकडे प्रबोधन सुरू असताना दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांचा शोध सुरू होता. याच दरम्यान, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारी एक रिक्षा जाताना वाहतूक पोलिसांना दिसली. त्यांनी चालकाला रिक्षा थांबवण्याचा इशारा केला. मात्र, एवढ्या मोठ्या पोलिसांचा फौजफाटा असला तरी रिक्षाचालकाने या पोलिसांना जुमानले नाही. त्यांच्या नाकावर टिच्चून रिक्षाचालकाने आणखी अॅक्सिलेटर पिळले. पोलिस आडवे झाले तरी या मुजोर रिक्षाचालकाने पलायन केले. विशेष म्हणजे पुढे बसलेला पाचवा प्रवासी असताना रिक्षाचालकाने ही किमया साधली. पसार झालेली रिक्षा पोलिस मात्र निमूटपणे पाहत राहिले. या रिक्षाचा क्रमांक पोलिसांनी नोंद केला असून, त्याच्यावर काय कारवाई होते, हा आता औत्सुक्याचा विषय असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७३ गावांत थेट सरपंच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ७,५७६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत ७ आणि १४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात जिल्ह्यातील १७३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांचाही समावेश असल्यामुळे या निवडणुका लक्षवेधी ठरतील. यासाठी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. या निवडणुकीत एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल, तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीदेखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही.

फिकट निळी मतपत्रिका

पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील. अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट हिरवा, तर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असेल.

सातवी उत्तीर्ण आवश्यक

सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना सातवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक राहील.

आचारसंहिता लागू

या सर्व ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. त्याचप्रमाणे ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील. मात्र, निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासकामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाच्या दिवशी संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्थानिक सुटी जाहीर करतील.

पहिला टप्पा

नाशिक जिल्ह्यातल निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. ते २७ सप्टेंबर २०१७ पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नऊ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना लसूण, कांद्यावर मार्गदर्शन

$
0
0

राजस्थानच्या शेतकऱ्यांनी जाणून घेतले व्यवस्थापन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने चितेगाव (ता. निफाड) येथील संस्थेच्या वतीने राजस्थान येथील शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण या पिकाच्या उत्पादनासाठी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.२) या शिबिराचा समारोप होत आहे.

या पाच दिवसीय शिबिरासाठी राजस्थानातून कोटा, भिलवाडा, बुंदी या जिल्ह्यातील प्रत्येकी ३० प्रमाणे एकूण ९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. केंद्रीय कृषी विकास विभागाच्या आत्मा या योजनेंतर्गत यात सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षण शिबिरात लसूण आणि कांदा या पिकांच्या अधिक उत्पादक क्षमतेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. लसूण व कांद्याच्या जाती, लागवड, सिंचन पद्धत, व्यवस्थापन, ठिबक सिंचनाची पद्धत, रोग व कीटकांचे व्यवस्थापन, बीज उत्पादन अशा विविध बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.

या शिबिरात सहभागी शेतकऱ्यांना ही माहिती देतानाच त्यांच्या समस्या व अडचणी यावरही मार्गदर्शन केले जात आहे. या शिबिरात चितेगाव केंद्राचे सहाय्यक निदेशक डॉ. आर. पी. सिंग यांनी लसूण व कांद्याच्या व्हरायटी व त्यांची पीक घेण्याची पद्धत याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतक-यांच्या शंकांचे यावेळी समाधान करणत आले. आतापर्यंत चितेगाव या केंद्रातून कांद्याच्या नऊ, तर लसूणच्या सहा जातींची निर्मिती केली आहे. या सर्व जाती निर्यातक्षम व गुणवत्ताधारक आहेत. या वाणांविषयी शेतक-यांना माहिती दिली. यावेळी एनएचआरडीएफचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवेबाबत तूर्तास वेटिंगच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर बससेवेच्या फेऱ्या कमी करून एकीकडे परिवहन महामंडळाने महापालिकेवर दबाव वाढवला असतानाच, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मात्र आर्थिक स्थिती सध्या चांगली नसल्याचे सांगत, बससेवेबाबत हात झटकले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती व व्यवहार्यता तपासूनच बससेवेबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तूर्तास वर्षभर तरी बससेवेचा प्रश्न सुटणार नाही. महामंडळाने नागरिकांना वेठीस धरू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्य परिवहन महामंडळ आणि महापालिकेत सध्या शहर बससेवेचा वाद सुरू आहे. महामंडळाने बससेवा बंद करण्याची धमकी दिली आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने महापालिकेने सध्या तरी बससेवा चालविण्यास नकार दिला आहे. याची चाचपणी करण्यासाठी महापालिकेने सल्लागार नेमला आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपनेही याबाबत आस्तेकदमची भूमिका घेतली आहे. भाजपचे अध्यक्ष आमदार सानप यांनीही आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बससेवा तूर्तास महापालिकेला चालवणे शक्य होणार नाही, असे म्हटले आहे. आर्थिक स्थिती व व्यवहार्यता तपासूनच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

‘एसटीने नागरिकांना वेठीस धरू नये’

इंदूर, तसेच अन्य महापालिकांच्या बससेवेचा अभ्यास करून खासगीकरणातून बससेवा चालविण्याबाबतचीही चाचपणी भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तूर्तास तरी बससेवा महापालिका चालविणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाशिककरांवर कराचा बोजा पडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सांगत पर्यायांची चाचपणी केली जाईल. सोबतच महामंडळाकडून नागरिकांना छळण्याचे काम सुरू असून, महामंडळाने नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहन सानप यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images