Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हॅकिंग प्रकरणी आणखी एका महिलेची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून त्याद्वारे अश्लील मेसेज पसवल्याप्रकरणी आणखी एका महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सायबर पोलिस स्टेशनकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची संख्या ३१ झाली असून, यात २९ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, संशयितांच्या मागावर दोन पथके असली तरी तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरतो आहे.

व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक हॅक करून त्याद्वारे अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका संशयिताने शहरातील तब्बल ३१ नागरिकांच्या खात्यावर अतिक्रमण केल्याची बाब समोर आली आहे. हॅकरने वन टाइम पासवर्डच्या मदतीने २९ महिलांसह दोन पुरुषांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले. याच पद्धतीने त्याने काही फेसबुक अकाउंटवरदेखील डल्ला मारला. हॅक केलेल्या अकाउंटवरून हॅकरने कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा फ्रेंडलिस्टमधील महिलांना अश्लील मेसेज पाठवले. असाच प्रकार पुणे, तसेच इतर काही जिल्ह्यांत घडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकरणी अज्ञात हॅकरविरोधात सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हॅकरच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की हॅकरचा शोध सुरू असून, अद्याप तो सापडलेला नाही. मात्र, लवकरच त्याला अटक होईल. तक्रारदारांची संख्या ३१ झाली असून, इतर जिल्ह्यांतील प्रकाराबाबत तक्रार आली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या नागरिकांनी ओटीपीबाबत कोणालाही अगदी कुटुंबातील सदस्यांनादेखील माहिती देऊ नये, तसेच व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे. दरम्यान, एखाद्या नागरिकाचे व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक अकाउंट हॅक झालेले असल्यास त्यांनी त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल फोनच जेव्हा शिक्षक बनतो...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील मराठी माध्यमातून पाचवी ते दहावीच्या वर्गांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरच्या घरी गणित व विज्ञानाचा संपूर्ण अभ्यास मोबाइलच्या माध्यमातून करता आला तर..? ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे शेषगिरी चिकेरूर यांनी. मोबाइल फोनच्या माध्यमातून अथवा घरात संगणक असल्यास त्याद्वारे हा अभ्यास करता यावा आणि शाळेत शिकवतात त्याच पद्धतीने उत्कृष्ट शिक्षकांनी त्यांना प्रत्यक्ष शिकवावे यासाठी ‘माझा क्लास अर्थात, कोचिंग क्लास चोवीस तास’ हा अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.

महाराष्ट्रातील एसएससी बोर्डाकडे नोंदणीकृत शाळांमध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकतात. मात्र, गेल्या पाच वर्षांत गणित अथवा विज्ञान अथवा दोन्ही विषयांतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २४ लाखांच्या वर आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षकांचा लाभ मिळालेला नाही. ग्रामीण भागातील सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांची तर फारच दयनीय अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर ‘माझा क्लास’ हा प्रकल्प महाराष्ट्रातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान प्रत्यक्ष व उत्तम शिक्षकांकडून घरच्या घरी शिकण्याची अनमोल संधी देणारा आहे. भांबावून टाकणारे अॅनिमेशन, बालिश संवाद वगैरे अनाकलनीय गोष्टी टाळून अगदी वर्गात शिकवतात, तसेच माझा क्लासमध्ये शिक्षक शिकवितात.

या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत सशक्तपणे उतरण्याचा आत्मविश्वास प्राप्त होणार आहे. चांगले शिक्षकच नसलेल्या महाराष्ट्रातील हजारो शाळांमधील विद्यार्थ्यांना आता या प्रकल्पातून उत्तम शिक्षक त्यांच्या घरीच मिळणार आहेत. महाराष्ट्रातील मराठी माध्यमातील विद्यार्थी, शाळा, महिला बचतगट, शिक्षणप्रेमी व्यावसायिक, शैक्षणिक साहित्य वितरक यांनी या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी mazaclass.com या वेबसाइटवर भेट देण्याचे आवाहन ‌शेषगिरी चिकेरूर यांनी केले आहे.

--

विद्यार्थ्यांची दमछाक थांबणार

या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे. त्यांची शाळेव्यतिरिक्त क्लाससाठी होणारी दमछाक थांबणार आहे. तो वेळ त्यांना मैदानी खेळांसाठी देता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सवडीनुसार आणि ते जेथे असतील तेथे अभ्यास करता येणार आहे. विशेष म्हणजे न समजलेले प्रकरण पुन्हा-पुन्हा अभ्यासता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिअल इस्टेटमध्ये उत्साह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्याची सातव्या वेतन आयोगाची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारल्याने घरभाडे भत्ता, पेन्शनरांसाठीचा वैद्यकीय भत्ता, अपंग कर्मचाऱ्यांसाठीचा नियमित उपस्थिती भत्ता तसेच प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या जवानांसाठीच्या भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. १ जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे लाभ सुरू झाले आहेत. यामुळे नाशिक शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत कर्मचारी संघटनांच्या चर्चेनंतर आयोगाने याबाबत केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या होत्या. सातव्या आयोगाने निश्चित केलेल्या भत्त्यांच्या देण्यामध्ये १४४८ कोटींची वाढ झाली आहे. ३४ लाख केंद्रीय कर्मचारी व १४ लाख संरक्षण दलांतील कर्मचारी-जवानांना भत्ते वाढीचा लाभ मिळणार आहे. नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारे विविध विभाग आहेत.

टू बीएचकेला मागणी

२५ ते ३० लाख रुपयांपर्यंत असलेल्या वन आणि टू बीएचके फ्लॅटला शहरात मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यास ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारी भत्तेवाढ ही आनंददायी बाब आहे. अनेक ग्राहक सध्या घराची चौकशी करीत आहेत. बजेट फ्लॅटला मागणी आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

- जयेश ठक्कर, माजी अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटरी क्लबचे कार्य देवदूताप्रमाणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. या कार्यात भर घालण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हावे. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपल्या वर्तुळाच्या बाहेर जात मैत्रीचे संबंध वाढवावेत. प्रसंगी विविध संस्था व उद्योजकांकडून मदत मिळवून आपले कार्य अव्याहत सुरू ठेवावे, असा संदेश रोटरीचे माजी प्रांतपाल दीपक शिकारपूर यांनी दिला.

देवळाली रोटरी क्लबचा ६७ वा पदग्रहण सोहळा येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल प्रा. सुनील सौंदणकर, मावळते अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडिअर अनिल गर्ग, इनरव्हील अध्यक्षा शैलजा गर्ग, सचिव मोहनदास कामत आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मावळते अध्यक्ष गर्ग यांनी अध्यक्षपदाची सूत्रे निवृत्त कर्नल अशोक शिरगावकर यांच्याकडे, तर सचिवपदाची सूत्रे मोहनदास कामत यांनी राजू कटारे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर माजी अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरजित सिंग यांनी अध्यक्षपदाची शपथ दिली. मावळत्या अध्यक्षांनी गतवर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला. नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपण भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. रोटरीच्या प्रांतापालांच्या संदेशाचे वाचन प्रा. सौंदणकर यांनी केले. त्यानंतर वार्षिक अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास माजी प्रांतपाल दादा देशमुख, गायिका गीता माळी, अशोक आडके, डॉ. आवेश पलोड, ओंकार महाले, रोहित सागोरे, राजेंद्र पवार, तानाजी जाधव आदींसह रोटरी व इनरव्हील क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

--

अशी आहे नवनिर्वाचित कार्यकारिणी

अध्यक्ष- निवृत्त कर्नल अशोक शिरगावकर, उपाध्यक्ष- हितेश कारिया, सचिव- राजू कटारे, सहसचिव- नंदिनी कारिया, कोशाध्यक्ष- अनंत अथनी, क्लब करस्पॉडन्स- निवृत्त कर्नल अरुण आनंद, इलेक्टेड प्रेसिडेंट- डॉ. प्रवीण जाधव, डायरेक्टर कमिटी- महाराज बिरमानी, विजय शेट्टी, जे. सुंदरामन, डॉ. अरुण स्वादी, निवृत्त कर्नल सुरजित सिंग, अण्णा नगरकर, मनोज कल्याणकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णांच्या दातृत्वाने ‘कोंडी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत ७५ लाखांच्या नगरसेवक निधीवरून महापौर आणि प्रशासनात संघर्ष सुरू असतानाच सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पदाधिकारी म्हणून मिळालेला दोन कोटींचा निधी भाजप नगरसेवकांमध्ये वाटून दिला आहे. भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच लाखांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. परिणामी आतापर्यंत निधीसाठी भांडत असलेल्या नगरसेवकांच्या ताटात थेट पाटलांच्या दातृत्वाने पाच लाखांचा निधी मिळाल्याने नगरसेवक भारावले आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींची मात्र गोची झाली आहे. नगरसेवकांना निधी दिला नाही, तर दिनकर पाटीलच हिरो होण्याची भीती आता अन्य पदाधिकाऱ्यांना सतावू लागली आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती डामाडोल असल्याने नगरसेवक निधीवरून सध्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. स्थायी समितीने ४० लाखांचा निधी दिला असताना महापौरांनी तो ७५ लाखांपर्यंत वाढविला. परंतु, प्रशासनाने एवढा निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नगरसेवक हतबल झाले आहेत. निवडून येऊन चार महिने झाले, तरी दमडीचेही काम झालेले नाही. त्यामुळे प्रभागात फिरतानाही अडचणी येत आहेत. महासभेने नुकताच बजेट मंजूर केले. त्यात महापौरांसाठी पाच कोटी, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना प्रत्येकी तीन कोटी, सभागृह नेत्यांना दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांना हा निधी विकासकामांसाठी दिला जातो. सभागृह नेता म्हणून मिळालेला दोन कोटींचा निधी दिनकर पाटील यांनी आपल्या प्रभागात खर्च करण्याऐवजी तो भाजपच्या ६६ नगरसेवकांना वाटून दिला आहे. प्रत्येक प्रभागात पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात भाजपच्या नगरसेवकांना पत्र देण्यात आले आहे. पाटील यांच्या दातृत्वामुळे नगरसेवक मात्र खूश झाले आहेत.

इकडे आड तिकडे विहीर

पाटील यांना कार्यपद्धतीवरून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडूनच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. त्याला पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीने उत्तर दिले आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींनी पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवले नाही, तर नगरसेवकांमध्ये झीरो होण्याचा धोका आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका मालामाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ताधारकासांठी महापालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेला एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. केवळ तीन महिन्यांतच महापालिकेच्या तिजोरीत सवलतीपोटी ३८ कोटी ३३ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी तीन महिन्यांत २१ कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे चालू वर्षात १७ कोटी ३३ लाख रुपये अधिक जमा झाले आहेत. ऑनलाइन भरणाही चांगलाच वाढला असून, त्यातून सात कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या एकूण मिळकतधारकांपैकी ३० टक्के मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. त्यामुळे सवलत योजना चालू वर्षी महापालिकेला चांगलीच पावली आहे.

नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरण्यासाठी पाच, तीन आणि दोन टक्के अशी सवलत योजना सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मेमध्ये भरल्यास तीन टक्के आणि जून महिन्यामध्ये भरल्यास बिलात दोन टक्के सवलत दिली जाते. गेल्या वर्षी तीन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत २१ कोटी ५३ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, या वर्षी तीन महिन्यांत केवळ ३८ कोटी ३३ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा १७ कोटी रुपये अधिक मिळाले असून, सवलत योजनेतील आतापर्यंची ही सर्वांत जास्त रक्कम आहे. पश्चिम विभागात सर्वाधिक ११ कोटी रुपये मिळाले असून, पंचवटीत सर्वांत कमी प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी सवलत योजनेचा लाभ ५४ हजार ६८१ मिळकतधारकांनी घेतला होता. यावर्षी मात्र लाभ घेणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. चालू वर्षी तीन महिन्यांतच एक लाख १२ हजार नागरिकांनी तीन महिन्यांत कर भरला असून, एकूण मिळकतींच्या ३० टक्के नागरिकांनी वेळेआधीच महापालिकेच्या तिजोरीत कर भरला आहे. त्यामुळे महापालिका पहिल्या तिमाहीतच मालामाल झाली आहे.

--

ऑनलाइनमध्ये तिपटीने वाढ

तीन महिन्यांत सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्या एक लाख १२ हजार मिळकतधारकांपैकी तब्बल २६ हजार ४७१ नागरिकांनी ऑनलाइन कर भरला आहे. गेल्या वर्षी हा आकडा दहा हजारांच्या आसपास होता. चालू वर्षात त्यात तिपटीने वाढ झाली आहे. या ऑनलाइन योजनेतून महापालिकेला ६ कोटी ८६ लाख रुपये मिळाले आहेत. त्यातून महापालिकेला ४ लाख ६७ हजार रुपयांचे रिबेट द्यावे लागले आहे.

--

विभागनिहाय प्रतिसाद असा

--

विभाग जमा रक्कम (रुपयांत)

--

नाशिक पश्चिम १० कोटी ९३ लाख

नाशिकरोड ६ कोटी ५१ लाख

नवीन नाशिक ६ कोटी ३९ लाख

नाशिक पूर्व ५ कोटी ८० लाख

सातपूर ४ कोटी ६९ लाख

पंचवटी ३ कोटी ९८ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपाची तपासणी

$
0
0

ठाणे पोलिसांच्या पथकाची धुळ्यात कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल विक्री करताना मापात पाप होत असल्याच्या तक्रारी सर्वत्र येत असल्याने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने राज्यभरातील खासगी पेट्रोल पंप तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात ठाण्यासह औरंगाबाद येथील तपासणीनंतर शनिवारी (दि. १) या पथकाने धुळ्यातील मालेगावरोडलगत क्रॉसिंगवर असलेल्या श्रीराम पेट्रोल पंपावर येऊन सकाळीपासून तपासणीला सुरू केली. यासाठी पंपावर असलेल्या चारही युनिटचे कव्हर काढून आतील मशिनरीची बारकाईने तपासणी केली.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय व्ही. जॉन, पोलिस उपनिरीक्षक शरद पंजे, यांच्यासह पथकासह धुळे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील, महेंद्र कापुरे, नितीन मोहने, विजय सोनवणे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यात भेसळ रोखणारे पथक पेट्रोल पंपावरील यंत्रसामुग्रीची कसून तपासणी करीत होते. पेट्रोल वितरीत करताना लिटरमागे ५० ते १०० मिली. पेट्रोल कमी देऊन पेट्रोल चोरी केली जात असल्याची मुख्य तक्रार असून, त्या अनुषंगाने ही तपासणी केली जात होती. धुळ्यातील श्रीराम पेट्रोल पंपावर छापा टाकल्यानंतर दुपारी उशिरापर्यंत ही तपासणी सुरूच होती. शहराच्या मध्यवर्ती भागात हा पंप असल्याने नागरिकांनी पंपावर काय सुरू आहे हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. या तपासणीत नेमके काय आढळले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. त्याबाबत माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार

दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगण्यासाठी आत्मबळाचे अधिष्ठान लागते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अध्यात्म व विज्ञान हातात हात घालून जगत असतात. डॉक्टर विनित वानखेडे यांनीही विज्ञानाधिष्ठित असताना आध्यात्मिक अधिष्ठान ठेवले असल्याने त्यांना मिळालेले आत्मबळ हे जगण्याचे बळ देऊन गेले. आशावाद निर्माण झाला आणि कॅन्सरसारख्या आजारातून बरे झाले, असे प्रतिपादन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.

डॉ. विनित वानखेडे लिखित ‘कॅन्सरच्या वादळातून ऊर्मी जगण्याची...’ या पुस्तकाचे प्रकाशन फादर दिब्रिटो यांच्या हस्ते शनिवारी झाले. रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम झाला.

फादर दिब्रिटो म्हणाले, की दृश्यजगाच्या पलीकडे एक अदृश्य जग आहे. तेथे शरीर, मन व आत्मा या तीन गोष्टींचा संबंध येतो. उपचार शरीरावर होत असले तरी विज्ञानाने आता हे सिद्ध केले आहे, की ८० टक्के आजार मनाचे असतात. त्यामुळे मनावर उपचार करावे लागतात, तसेच आत्म्याला विश्वासात घ्यावे लागते. डॉ. वानखेडे यांच्या पुस्तकातून हेच दिसून येते.

‘कॅन्सरच्या वादळातून ऊर्मी जगण्याची...’ हे पुस्तक म्हणजे अध्यात्म व विज्ञान यांच्या सहयोगाची यशस्वी कथा सांगते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खूप उत्पात झाला. याच काळात खूप लोक अध्यात्माकडे वळले. विज्ञान सर्व प्रश्न सोडवू शकते, असाच तोपर्यंत सर्वांचा समज होता. मात्र, विसाव्या शतकात झालेल्या उलथापालथीनंतर अध्यात्माशिवाय तरणोपाय नाही, असे सर्वांच्याच लक्षात आले. अध्यात्माशिवाय विज्ञान पांगळे ठरतेय आणि विज्ञानाशिवाय अध्यात्म आंधळे ठरतेय हे सर्वांच्याच लक्षात आले. स्वत: डॉ. वानखेडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ते त्या परमशक्तीला शरण गेले. एकदा का या शक्तीला शरण गेले, की ती तुम्हाला दुबळे राहू देत नाही. जगण्याची ऊर्मी देते. तीच ऊर्मी डॉक्टरांना मिळाली आहे, असेही फादर दिब्रिटो म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर डॉ. अरुण स्वादी, डॉ. राज नगरकर, अंजना वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विनित वानखेडे यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली. हर्षवर्धन बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. मनोगत आशुतोष राठोड, डॉ. शैलेश बोंदार्डे यांनी व्यक्त केली. अमित त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता नवोमी वानखेडे यांच्या विशेष गीताने झाली. डॉ. सु. म. वानखेडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसपोर्टच्या टेंडरला लाभेना प्रतिसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअरपोर्टच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणाऱ्या बसपोर्टच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. महामार्ग बस स्थानकावर १४९ कोटी रुपये खर्च करून हे बसपोर्ट खासगीकरणातून उभे केले जाणार आहे. पण, त्यासाठी विकसक पुढे न आल्यामुळे ११ जुलैपर्यंत टेंडर भरण्याची नव्याने मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर हे टेंडर १४ जुलैला उघडले जाणार आहे.

एसटी महामंडळावर एक पैशाचाही बोजा न पडता खासगीकरणाच्या माध्यमातून या अत्याधुनिक बसपोर्टची बांधणी केली जाणार आहे. राज्यात बसगाड्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या १३ मोठ्या बस आगारांची त्यात निवड करण्यात आली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू यांच्या कल्पनेतून हे आधुनिक बसपोर्ट तयार होणार आहे. या बसपोर्टमुळे बसच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. टेंडर प्रक्रिया पार करून आलेल्या कंपनीला बसपोर्ट विकसित करण्याच्या मोबदल्यात व्यापार संकुल उभारण्यास एसटी महामंडळाच्या आगारांची जागा देण्यात येईल. त्याची देखभाल ३० वर्षे संबंधित कंपनीलाच करावी लागणार आहे.

आगारांचे अत्याधुनिक स्वरूप

हे बसपोर्ट बस आगारांचे अत्याधुनिक स्वरूप असेल. प्रवासी आणि बसगाड्यांना जाण्या-येण्यासाठी वेगळे मार्ग केले जाणार आहेत. त्यामुळे बसपोर्टमध्ये कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही. यात अधिक प्रशस्त प्रतीक्षालय उभारण्यात येणार आहे. तेथेच प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढच्या दोन वर्षांत पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा मानस अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनमहोत्सवाला प्रारंभ

$
0
0

टीम मटा

राज्य शासनाच्या वतीने १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपणाचा संकल्प सोडण्यात आला.

मालेगाव परिक्षेत्रात

दहा लाख वृक्ष लागवड

मालेगाव ः वनपरिक्षेत्रात ९ लाख ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या महोत्सवाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. वनपरिक्षेत्रातील दहीदी येथे वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांच्या हस्ते मुख्य वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी उपविभागीय वनधिकारी जगदीश येडलावर, नगरसेवक तानाजी देशमुख, पंचायत समिती सदस्य जगदीश मालपुरे, सरपंच राजेंद्र कचवे उपस्थित होते. या वन महोत्सवाअंतर्गत तालुक्यातील वेगवेगळ्या १७ ठिकाणी ४६ केंद्रांवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. मुंगसे येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. मालेगाव महापालिकेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. फातमा गार्डन येथे महापौर रशीद शेख, आयुक्त संगीता धायगुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. येथील के. बी. एच. एस. एस. ट्रस्ट संचलित भायगाव रोड जाजुवाडी येथील वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी प्रसाद हिरे, इंदिराताई हिरे यांचे मार्गदर्शन लाभले. शाह विद्यालयात कौशल्य विकसन जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शरद चमनलाल पटनी, प्राचार्य संजय बेलन उपस्थित होते.

न्यायाधीशांनी केले वृक्षारोपण

मनमाड ः येथील न्यायालय आवारात न्यायाधीश स्वाती फुलबांधे यांनी वृक्षारोपण केले. रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. ए. टेकवानी, वकील संघाचे अध्यक्ष व्ही. एम. कासार, सचिव सुधाकर मोरे, मोहन माळवतकर, एन जी बापट उपस्थित होते. नांदगाव तालुक्यातील सारताळे येथील आश्रमशाळेत हरित सेना उपक्रम कार्यक्रमात वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती सुभाष कुटे, जिल्हा परिषदेचे साकोरा गटाचे सदस्य रमेश बोरसे, ग्रामीण विकास संस्थेचे सरचिटणीस रमेश पगार आदी उपस्थित होते. एकलव्य प्राथमिक, कै. बाबूलाल देवचंद पगार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

झाडांचा वाढदिवस देवळ्यात साजरा

कळवण ः कृषिदिनानिमित्त दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते मात्र त्यांचे संगोपन व निगा नियमित राखली जावी याउद्देशाने अमृतकार पतसंस्थेने वृक्षलागवडीचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन देवळा येथील सहाय्यक निबंधक संजय गीते यांनी केले. कृषिदिनाचे औचित्य साधून देवळा येथील अमृतकार पतसंस्थेने मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करून पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावर्षीही नवीन वृक्षांची लागवड करीत असताना मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करून त्यांचे पुढील काळात चांगल्या प्रकारे संगोपन करण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत कोठावदे यांनी यावेळी दिली. यावेळी सहाय्यक निबंधक संजय गीते, सहकार अधिकारी सतीश देवघरे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बागलाणमध्ये उत्साह

सटाणा ः वन विभाग व सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तालुक्यात बागलाणच्या आमदार दीप‌किा चव्हाण यांच्या हस्ते मुळाणे, भाक्षी, फोफीर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यात दोन लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक वनीकरण विभागासह तालुका वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, माजी आमदार संजय चव्हाण उपस्थित होते. सटाणा नगर परिषदेकडून शहरात वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. भाक्षी रस्त्यावरील वृंदावन कॉलनी येथे सुयश क्लासेसचे संचालक बी. के. पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा निर्मला भदाणे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, गटनेते संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.

पाटविहीर येथे मार्गदर्शन

कळवण ः पाटविहीर येथील जि. प. शाळेत पंचायत समिती सदस्य मीनाक्षी चौरे, सरपंच श्रावण पालवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. त्यानंतर शालेय परिसरासह गावात वृक्षारोपण करण्यात आले. माजी सरपंच शिवाजी चौरे, आर. एस. भोये, उपस्थित होते.

दिंडोरीत कृषी दिन

दिंडोरी ः येथील पंचायत समिती आवारात वृक्षारोप करण्यात आले. यावेळी सभापती एकनाथ गायकवाड, विलास सोनवणे, वसंतराव थेटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅप आहे तुजपाशी, पण...

$
0
0

व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर अशा सोशल मीडियाचा बोलबाला फक्त नवीन पिढीपुरता मर्यादित नाही. तंत्रज्ञानातील सुलभता, इंटरनेटचा सहज वापर यामुळे साठी पार केलेली व्यक्तीही सोशल मीडियाचा विरंगुळा म्हणून वापर करतात. कम्युनिकेशन ‘सुलभ’ व्हावे म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातून व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्लिकेशनचा वापर केला जातो. आवड असो किंवा नसो, ८० टक्के नागरिक या घटकांशी जोडले गेले आहेत. अगदी दोन मिनिटे मेसेज टोन वाजला नाही तर अस्वस्थ होणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आढळून येतात. काही महिन्यांपूर्वी पुणे किंवा तत्सम शहरातून एक मुलगी बेपत्ता झाल्याचा मेसेज फोटोसह व्हायरल झाला होता. पोलिस, तसेच नातेवाइकांनी काही तासांत मुलीला शोधून काढले. मात्र, व्हॉट्सअॅपवर सामाजिक पुळका ठेवणाऱ्या महाभागांनी हा मेसेज पुढील काही दिवस फिरवत ठेवला. कोणतीही खातरजमा नाही, विचारपूस नाही. एकाने फॉरवर्ड केला म्हणून दुसऱ्याने करायचा ही प्रवृत्ती त्रासदायकच नाही तर धोकादायक ठरते. दुर्दैवाने प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारख्या जागतिक व्यासपीठावर आपल्यापुरता विचार करतो. फेसबुक हॅक होण्याचा प्रकार निश्चित नवीन नाही. उपद्व्यापी हॅकर अधूनमधून खळबळ उडवून देतात. दहशतवादी संघटनादेखील या आयुधांचा खुबीने वापर करतात. मात्र, व्हॉट्सअॅपसारखे अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर हॅक होण्याचा शहरातील नव्हे, तर देशातील पहिलाच प्रकार असावा. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार ३० नागरिकांना हॅकरने झटका दिला आहे. त्यात २८ महिला किंवा तरुणींचा समावेश आहे.

महिलांचे अकाउंट हॅककरून त्याद्वारे कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना अश्लील मेसेज किंवा फोटोग्राफ्स हॅकरने पाठवले. या मानसिकतेची नक्की व्याख्या सांगता येणार नाही. मात्र, हा मानसिक आजार नक्कीच असला पाहिजे. आपल्याकडील ज्ञानाचा वाईट वापर करून फक्त खळबळ उडवून देण्याच्या नादात हॅकरला काय समाधान मिळाले? आज ना उद्या पोलिस हे कृत्य करणाऱ्याच्या मुसक्या आवळतील. आयटी क्षेत्रातील वाढता रोजगार अनेक तरुणांना या क्षेत्राकडे आकर्षित करतो आहे. सर्वांनाच रोजगार मिळतो असे नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करण्यासाठी तरुणांना भरपूर वेळ मिळतो. अशा वेळी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपला पाल्य नेमकी कशाच्या आहारी जातोय, तो मोबाइलवर काय बघतोय याकडे पालकांनी लक्ष ठेवायला हवे. प्रत्येक समस्येचे उत्तर पोलिसांच्या गळी उतरवून नामानिराळे राहता येऊ शकत नाही. वन टाइम पासवर्ड (ओटीपी) हा तसा परवलीचा शब्द. विविध अॅप्लिकेशन किंवा स्मार्ट फोन सहजतेने हातळणाऱ्या व्यक्तींना ओटीपीचा वापर करावा लागतो. वन टाइम पासवर्ड हा गोपनीय, तसेच वैयक्तिक वापरासाठी असतो. तशी सूचना ओटीपी मेसेजमध्ये असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्याचा परिणामदेखील सर्वांसमोर आहे. स्मार्ट फोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सतत आपला पाठलाग केला जातो. आपल्या त्रुटी शोधल्या जातात. या त्रुटी भेदण्यात हॅकरला यश मिळाले, की आपली मालमत्ता आपली राहत नाही. पोलिस आणि हॅकरचा तपास हा नंतरचा भाग आहे. वास्तविक हॅकरला रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारख्या यंत्रणा सदैव प्रयत्नशील असतात. तेही हॅकिंगचा अभ्यास करून संभाव्य त्रुटी-धोके दूर करण्यासाठी सिक्युरिटी फीचर्स अपडेट करतात. दुर्दैवाने बहुतांश यूजर्स याकडे दुर्लक्ष करतात. सिक्युरिटी फीचर्सचा व्यवस्थित वापर करण्यासाठी तेवढे सजग असायला हवे. व्हॉट्सअॅप सुरू केल्यानंतर सेटिंगमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन हा पर्याय असतो. हा पर्याय वापरात आणल्यानंतर व्हॉट्सअॅप सुरू करताना पिनकोड टाकावा लागतो. पिनकोड टाकल्याशिवाय हॅकर तर दूरच, पण स्वत:लाही ते सुरू करता येत नाही. हा प्रकार क्षणिक त्रासदायक असला तरी मोठी सुरक्षितता प्रदान करणारा ठरतो. फेसबुकमध्येही सुरक्षितता देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

आपण आपले मानतो अशी एकही वस्तू आपली नाही. धार्मिक दृष्टिकोनातून हाच सार अनेक पिढ्यांनी पुढील पिढ्यांमध्ये रुजवला. किंबहुना तीच आपली जीवनशैली मानली. तो काळ आता सरला. हे माझे ते माझे, किंबहुना माझ्या मालकीचे ही संकल्पना जोर धरू लागली आहे. तंत्रज्ञानात हा अहंकार उपयोगी नाही. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारखे आयुध कधी उलटतील हे मास हॅकिंगच्या एका घटनेने दाखवून दिले आहे. व्हॉट्सअॅपचा वापर अनेक सुरक्षा एजन्सीजदेखील करतात. हॅकिंगच्या प्रकारामुळे यातील सुरक्षिततेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सायबर पोलिस काळाची गरज

शहर पोलिसांनी एक मे रोजी सायबर पोलिस स्टेशन सुरू केले. साधारणतः‍ दीडदोन महिन्यांच्या कालावधीत या पोलिस स्टेशनमध्ये ११ गुन्हे दाखल झाले. यातील सात गुन्हे फक्त महिलांची सोशल मीडियावर बदनामी करण्याशी संबंधित आहे. बदनामीकारक मजकूर, फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याचे हे प्रकार पोलिसांनी शोधून काढले आहेत. एक मात्र खरे, की तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामांसाठी होतो, तितकाच तो वाईट बाबींसाठीदेखील होतो आहे. अनेक घटना तर पोलिसांपर्यंत पोहोचतदेखील नाहीत. त्यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल साइट्स किंवा अॅप्लिकेशनचा वापर करताना आपणही तांत्रिकदृष्ट्या तेवढेच सजग असायला हवे. शहर पोलिसांनी सुरू केलेले सायबर पोलिस स्टेशन ही शहराच्या दृष्टीने जमेची बाजू ठरते आहे. तंत्रज्ञानाचा पदोपदी वापर होतो आहे. रोज हजारो कोटी रुपयांचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतात. स्मार्टफोनमधील अॅप्लिकेशन आपली माहिती वेळोवेळी थर्ड पार्टींना विकत असतात. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक हॅक होणे ही मोठी घटना नाही. सायबरविश्व त्याहून मोठे आणि अनाकलनीय ठरते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पाठपुरावा करून सुरू केलेले सायबर पोलिस स्टेशन नक्कीच विशेष बाब ठरते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्यासह त्यांची टीम आपले काम चोख बजवताना दिसते. अद्याप गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. हा व्याप जसा वाढेल तसे तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करणे ही पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने भविष्यात कळीचा मुद्दा ठरू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंतवैद्यकाने कम्युनिटी एज्युकेशन बळकट करावे

$
0
0

प्रामाणिकपणा, मेहनतीची तयारी आणि समर्पण भाव या तीन गुणांच्या आधारावर उत्तम डेंटिस्ट घडू शकतो. या गुणांचा समुच्चय साधून दंतशास्त्रात करिअर करण्याची स्वप्न बघत असाल तर तुम्हाला उत्तम भविष्य आहे, असा संदेश महात्मा गांधी विद्यामंदिरच्या पंचवटी डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय भावसार यांनी ‘मटा’ शी बोलताना दिला.

डेंटिस्ट विद्याशाखेतील स्पर्धा वाढीला लागली आहे. येथे करिअरसाठी उत्तम संधी आहेत?

स्पर्धा वाढली म्हणजे संधी घटतात, असा अर्थ गृहीत धरून चालणार नाही. अलिकडील एक ते दोन दशकात मेडिकल ट्रिटमेंटच्या पलिकडे जाऊन डेंटिस्ट या स्वतंत्र शाखेकडे रुग्ण बघू लागले आहेत. हे प्रमाणही एकूण समाजाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. शिवाय उपचारांसोबतच सौंदर्यशास्त्र म्हणूनही या विषयाचे महत्त्व वाढते आहे. परिणामी करिअरच्या संधी वाढीला लागल्या आहेत.

वैद्यकीय शाखेत येण्यासाठी अभ्यासाचा मूळ पाया कच्चा नको...

मानवी आरोग्याशी थेट संबंध असणारी ही शाखा आणि त्यातील व्यवसाय ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे या शाखेकडे येताना अभ्यासाच्या मुद्द्याशी कुठल्याही टप्प्यावर तडजोड करून चालत नाहीच. यासाठीच आमच्याकडील विद्यार्थ्यांवर सुरुवातीपासून विशेष मेहनत घेतली जाते. याच्याच परिणामी संस्थेतील २५ विद्यार्थ्यांनी यंदा ‘नीट’ परीक्षा क्रॅक करून एमबीबीएसला प्रवेश घेण्याच्या तयारीत आहे. कुठल्याही संस्थेसाठी ही अभिमानास्पद आकडेवारी आहे.

गेल्या वर्षातील काही अचिव्हमेंट्स सांगता येतील?

गेल्या वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी हे आमच्या संस्थेतील होते. याशिवाय बायोकेमेस्ट्री, फार्माकॉलॉजी, प्रॉस्थॉडॉन्टिक्स या विषयांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकही मिळविले.

वैद्यकीय शाखेच्या अभ्यासाचे स्वरूप व्यापक आहे; तरीही इतर उपक्रमांमध्ये आपले विद्यार्थी सहभागी होतात का?

तीन वर्षांपासून आमच्या कॉलेजने विद्यापीठ स्तरावर स्पोर्टसमध्ये ठसा उमटविला आहे. एक विद्यार्थिनी आंतरराष्‍ट्रीय स्तरावर बुध्दीबळात खेळते. याशिवाय स्पोर्टस आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत बाजी मारली आहे.

संस्थेचे काही सामाजिक दायित्वही आहे. त्यादृष्टीने काही प्रयत्न?

मेडिकल कॉलेजची ओपीडीही मोठी आहे. रोज सुमारे ५०० रुग्णांना सेवा दिली जाण्याइतकी व्यवस्था आहे. याशिवाय जे रुग्ण आमच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो. यासाठी कॉलेजची मोबाइल डेंटल व्हॅन आहे. या माध्यमातून गरजू रुग्णांपर्यंत जाऊन मोफत उपचार दिले जातात.

इतरांनी प्रेरणा घ्यावा असा आपला काही उपक्रम?

समाजामध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. यातही प्रामुख्याने तंबाखूसारख्या पदार्थांच्या सेवनाने हे प्रमाण वाढीला लागते आहे. यावर आळा बसविण्यसाठी कॉलेजने काही वर्षापासून अँटी टोबॅको कॅम्पेन हाती घेतली आहे. या अंतर्गत पथनाट्यापासून ते शक्य त्या माध्यमाद्वारे तंबाखूमुक्तीचा संदेश समाजास देण्यात येतो.

यंदा आपल्याकडे काही नवीन अभ्यासक्रम?

उत्तर : यंदापासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पीएच.डी.चा अभ्यासक्रम सुरू केला आहे. वैद्यकीय शाखेतून थेट पीएच.डी. करण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. या अगोदर पीएच.डी.चा मार्ग विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवीतून जात होता. ‘प्रॉस्थॉडॉन्टिक्स’ या विषयातील पीएच.डी.चे केंद्र आमच्या कॉलेजमध्ये सुरू झाले आहे. या विषयाचा पीएच.डी. गाईड म्हणूनही माझ्याकडे जबाबदारी आली आहे.


भावी डॉक्टरांच्या स्कील डेव्हलपमेंटसाठी काही विशेष प्रयत्न?

डेन्टल ही विद्याशाखा बहुतांशी स्कीलवर अवलंबून आहे. परिणामी मेडिकलच्या विद्यार्थ्यापेक्षा डेंटल विद्याशाखेचा विद्यार्थी लवकर समाजाभिमुख होतो. त्याची पदवी पूर्ण होण्याअगोदरपासून त्याचा रुग्णांशी संपर्क येतो. पर्यायाने संवादासह आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण सांभाळण्याची त्याची कौशल्य लवकर विकसित होतात. मात्र, या विद्याशाखेत संशोधनाची आणखी गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना संशोधनास प्रेरणा देण्यासोबतच ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ सारख्या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येते.


दंतवैद्यक शाखेसमोरील आव्हाने काय?

पाश्चात्य देशांच्या तुलनेत बदलत्या तंत्रज्ञासोबत स्पर्धा करणे व कम्युनिटी एज्युकेशनची दरी भरून काढणे ही महत्त्वाची आव्हाने आहेत. एकूण समाजापैकी अवघा १० टक्के समाज अद्याप डेंटिस्टकडे जातो. शक्यतो मेडिकल ट्रिटमेंटला एकूण समाजाचे प्राधान्य आहे. दातांचेही स्वतंत्र आरोग्य असते हे समजावून सांगणे म्हणजे कम्युनिटी एज्युकेशन सारख्या संकल्पनेसाठी समाजात मोठी जागरुकता उभी करण्याचे आव्हान या विद्याशाखेसमोर आहे.


नवीन डॉक्टर्स व समाजास काय संदेश द्याल?

प्रामाणिकपणा, समर्पित वृत्ती आणि मेहनतीशिवाय भविष्य नाही. याशिवाय समाजाने डॉक्टरांकडे बघताना पूर्वग्रह दूषितपणा, अपूर्ण माहिती किंवा अफवांना बळी पडून त्यांच्यावर हल्ला करण्यासारखी पावले उचलू नयेत. डॉक्टरांचीही बाजू समाजाने समजावून घ्यायला हवी.

शब्दांकन : जितेंद्र तरटे
Jitendra.tarte@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटी डेटाची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

राज्यभरातील इंजिनीअरिंग आणि फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी इमानेइतबारे राज्य सरकारची सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती असलेला लाखभर विद्यार्थ्यांचा डेटा शिक्षणसंस्थांना विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

या प्रकरणी तंत्रशिक्षण संचलनालय (डीटीई) आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) या संस्थांकडे पालकांची संशयाची सुई वळते आहे. दरम्यान, पालकांनी डीटीईकडे तक्रारीही दाखल केल्या आहेत. काही वर्षांपासून इंजिनीअरिंग कॉलेजेसच्या समोर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीही राज्यभरात इंजिनीअरिंगच्या सुमारे १ लाख ४३ हजारांपैकी तब्बल ७९ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. परिणामी अनेक संस्थांसमोर अस्तित्व टिकविण्याचेही आव्हान आहे. या शैक्षणिक संस्थांना सद्यस्थितीत विद्यार्थी मिळविण्यासाठी मार्केटिंगवर भर द्यावी लागत आहे.

तरीही डेटा लिक?

सीईटीचा अर्ज विद्यार्थ्यांनी ‘डीटीई’च्या वेबसाईटवरून भरला होता. ‘डीटीई’ या प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाची जबाबदारी बाह्य संस्थेवर सोपविते. यामुळे ही माहिती प्राथमिक संस्था म्हणनू केवळ ‘डीटीई’ आणि या पाठोपाठची संस्था म्हणून ‘एमकेसीएल’कडे असताना खासगी मार्केटिंग कंपन्यांकडे हा डेटा कसा लिक झाला याबाबत शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे.

२० हजारात लाखभर विद्यार्थ्यांची माहिती!

यंदा इंजिनीअरिंगसाठी (पीसीएम गट) सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार होती. पैकी १ लाख १९ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. तर राज्यात इंजिनीअरिंगच्या १ लाख ३२ हजार जागा आहेत. परिणामी, किमान २० हजारांवर जागा रिक्त रहाण्याचे चित्र आत्ताच स्पष्ट आहे. ही तफावत आणखी वाढण्याचा अंदाज घेता शैक्षणिक संस्थाही धास्तावल्या आहेत. याच संधीचा फायदा उचलत काही खाजगी संस्थांनी ‘डीटीई’कडे ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून हा जमा असलेला सुमारे लाखभर विद्यार्थ्यांची वैयक्तीक माहिती मिळविली आहे. विद्यार्थ्याचा संवर्ग, मोबाइल क्रमांक, इ मेल आयडी आदी माहिती कॉलेजला उपलब्ध करून देण्याचे आमिष या खासगी संस्था एसएमएस तंत्राद्वारे दाखवत आहेत. हा डेटा २० हजारात सुमारे लाखभर विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारीही ‘डीटीई’कडे आहेत.

असा आहे सीईटीचा डेटा

नाशिक जिल्ह्यातून नोंदणी २१ हजार
नाशिक जिल्हाभरातून प्रविष्ट २० हजार ५७६
जळगावमधून प्रविष्ट १२ हजार ९५
धुळे जिल्ह्यातून प्रविष्ट ७ हजार ८४०
नंदुरबार जिल्ह्यातून प्रविष्ट ५ हजार ६९०
नाशिक विभागातून प्रविष्ट ४६ हजार २०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिसांचे अवैध धंद्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिसांनी घोटी, इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जुगार अड्डे तसेच अवैध मद्य विक्री ठिकाणांवर छापे मारीत संशयितांना जेरबंद केले. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्र्यंबकेश्वर शहरालगतच्या महामार्गावरील ढाब्यावर होणाऱ्या मद्यविक्रीबाबत चौकशी करीत असताना पोलिस निरीक्षक किशोल नवले यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खंबाळे शिवारातील हॉटेल जय मल्हार येथे छापा मारला. या ठिकाणी गोरख शिवराम मोरे (रा. खंबाळे, ता. त्र्यंबकेश्वर) हा विना परवाना देशी विदेशी मद्याच्या बॉटल्स जवळ बाळगताना सापडला. त्याच्याकडून ३४ बॉटल्स जप्त करण्यात आल्या. खंबाळे शिवारातील हॉटेल नवरंग येथेही पोलिसांनी कारवाई केली. येथे अनिल दामू वाघ (२०, रा. अळवंड, ता. त्र्यंबकेश्वर) याच्याकडे एक हजार ९७० रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. या दोघांविरोधात मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे घोटी-सिन्नर रोडवरील भरविहिर शिवारातील हॉटेल विसावा येथे पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी देशी विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या हेमंत बारकू सहाणे (संभाजीनगर, घोटी) याच्याकडून पोलिसांनी २४ बॉटल्स जप्त केल्या. ही सर्व कारवाई शुक्रवारी, ३० जून रोजी करण्यात आली. यानंतर, शनिवारी (दि. १ जुलै) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गावातील इंदिरानगर परिसरात छापा टाकून इसमोद्दीन जाउद्दीन सैय्यद उर्फ अज्जु यास पकडले. हा संशयित मटका खेळताना तसेच खेळवताना मिळून आला. त्याच्याकडील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा दोन हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी निफाड, येवला, बसवंत पिंपळगाव, मनमाड या ठिकाणी देखील कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

अनधिकृत हुक्का पार्लरला दणका

सहायक पोलिस निरीक्षक जे. बी. गिरी आणि त्यांच्या पथकाने चांदशी गावासमोर असलेल्या शॅक रेस्टॉरंट येथे छापा मारला. या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असल्याप्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापक राजू विष्णु जगताप यास अटक केली. हॉटेलच्या बाजूस हुक्का पार्लर सुरू होता. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये सिगारेट अॅण्ड ऑदर टोबॅको प्रोडक्ट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावरील संदीप फाउंडेशनच्या होस्टेलमध्ये १९ वर्षीय तरुणीने ओढणीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अपर्णा रमेश जाधव (रा. इंद्रायणी अपार्टमेंट, डहाणू) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. ती संदीप फाउंडेशन शिक्षण घेत होती.

अपर्णाने रविवारी (दि. २) दुपारी दोन वाजेपूर्वी होस्टेलच्या खोलीत दरवाजा आतून बंद करून घेतला. तिच्या रुममेटने दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा उघडत गेला नाही म्हणून त्यांनी हास्टेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. होस्टेल प्रशासनाने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने त्र्यंब पोलिसांना याबाबत माहिती दिली.

त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मागदर्शनाने उपनिरीक्षक अकुले, नाईक ए. जी. जाधव, हवालदार रमेश पाटील आदींसह पथक संदीप फाउंडेशन येथे तातडीने पोहचले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अपर्णाने छताला ओढणीच्या सहायाने गळफास लावलेला आढळून आला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीला आला. अपर्णाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. संदीप फाउंडेशनमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिस या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. शिक्षणात गुणांच्या स्पर्धेत विद्यार्थी बळी जातात म्हणून शासकीय पातळीवर विविध प्रकारे अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत, मात्र, तरीही स्पर्धेचे मायाजाल कमी होत नसल्याने येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वीच्या ओळखीचा फायदा घेत घरात घुसलेल्या संशयित आरोपीने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयिताविरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अली (पूर्व नाव पत्ता नाही) असे संशयित आरोपीचे नाव आहे. भारतनगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपीचे आणि या कुटुंबाची पूर्वीपासून ओळख आहे. याचा फायदा घेत २९ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संशयित पीडित मुलीच्या घरात घुसला. तिथे त्याने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. तसेच अश्लिल शिवीगाळ करून पळून गेला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड करीत आहे.

भंगाराची चोरी

पेठरोडवरील एसटी वर्कशॉपमधून चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपये किंमतीचे कॉपर, तांबे व इतर धातूंचे भंगार चोरी केले. यापूर्वी वर्कशॉपमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास प्राधन्य देण्याची आवश्यकता आहे. अरविंद सिताराम कहार यांच्या फिर्यादीनुसार, पेठरोडवरील एसटी वर्कशॉपमध्ये तांब्याचे स्क्रॅप मटेरियल गोडावूनमध्ये ठेवण्यात येते. विशेष म्हणजे सर्व मुद्देमालाची मोजणी करून तो सिलबंद केलेला असतो. २८ जून ते २९ जून या काळात चोरट्यांनी अॅटो स्क्रॅप गोडावूनच्या शटरच्या खिडकीचे गज तोडून, काचा फोडून त्यावाटे आत प्रवेश केला. तसेच, तब्बल एक लाख रुपयांचे स्क्रॅप धातूचे भंगार चोरी केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बेडवाल करीत आहे.

प्लॉट विक्रीतून फसवणूक

प्लॉट विक्री करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन ते परत न करणाऱ्या तिघा जणांविरोधात अंबड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमलदीप गुरूदास देवरे, मंगेश रत्नाकर वाघमारे आणि राजू आंबादास दहिजे (रा. कृष्ण अपार्ट. वासननगर, पाथर्डी फाटा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी प्रिया शंकरभाई कापसे (२८, वरदलक्ष्मी अपार्ट, कामटवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. कापसे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी त्यांना युनायटेड सिटी प्रोजेक्टमधील राजूर बहुला येथील गट क्रमांक १३१/१३ मधील १७१ चौरसमीटर प्लॉट विक्री करण्याचे आमिष दाखवले होते. तसेच ऑगस्ट २०१३ च्या सुमारास कापसे यांनी करारनामा करून १५ लाख ३३ हजार ८७० रुपये दिले. मात्र, काहीच दिवसात संशयितांनी प्लॉट विक्री करणार नसल्याचे सांगत कापसे यांना चार लाख रुपये परत केले. उर्वरित नऊ लाख ४४ हजार रुपयांची रक्कम मात्र अद्यापपर्यंत परत केली नाही. प्लॉटही मिळत नाही आणि संशयित पैसेही परत देत नसल्याने कापसे यांनी अंबड पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली.

अपघातात महिलेचा मृत्यू

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेस अज्ञान वाहनाने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास नागझिरा नाल्याजवळ, देवळाली कॅम्प येथे झाली. मीराबाई विजू सानप (४५, रा. शिकलकरी वस्ती, सिन्नर फाटा, ना. रोड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मीराबाई यांना पहाटेच्या सुमारास भरधाव वाहनाने जोराची धडक दिली.

जुगार अड्ड्यावर छापा

वडाळा गावातील महापालिका शाळेच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारीत पोलिसांनी ११ जणांना जेरबंद केले. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. आयूब अब्बास शेख (रा. केबीएच शाळेसमोर, वडाळागाव) असे मुख्य संशयिताचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या १० साथिदारांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. वडाळा गावातील गौसिया मशिदीसमोरील महापालिकेच्या शाळेच्या मोकळ्या जागेत हा अड्डा सुरू होता. पोलिसांनी १९ हजार ८४० रुपयांची रोकड तसेच जुगाराचे साहित्य हस्तगत केले. या प्रकरणी पोलिस नाईक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार पठाण करीत आहे.

लॉटरी सेंटरवर छापा
भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्लीतील आंनद एजन्सीसमोर असलेल्या शुभ लॉटरी दुकानात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी संतोष जयराम चौधरी (३८, वज्रेश्वरीनगर, दिंडोरी रोड) आणि त्याच्या १० साथिदारांना जेरबंद केले. ही कारवाई ३० जून रोजी रात्री पाऊणे अकरा वाजेच्या सुमारास झाली. घटनास्थळावरून कॉम्प्युटर, रोकड आणि इतर साहित्य असा ६१ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयित चौधरी या ठिकाणी मिलन मटका नावाचा जुगार खेळताना आणि खेळवताना मिळून आला. या प्रकरणी पोलिस शिपाई निंबाळकर यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आली. अधिक तपास पीएसआय जोनवाल करीत आहे.

अपघातात दोघे ठार

घोटी : घोटी-सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात रविवारी सकाळी कंटेनर-ट्रक अपघातात कंटेनरचालकासह दोन जण ठार झाले. या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. कैलासकुमार माली असे ठार झालेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे. त्यासह अन्य मृताचे नाव कळू शकले नाही. सकाळी साडेआठच्या सुमारास सिन्नरहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर आणि मुंबईहून सिन्नरच्या दिशेने जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील घरफोडीत २५ तोळे सोने लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील सुंदरबन कॉलनीत झालेल्या घरफोडीत सुमारे २५ तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये असे सुमारे पाच लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मयूर प्रकाश सांब्रे (३०, रा. आरव्ही व्हिला, सुंदरबन कॉलनी) यांनी या प्रकरणी पोलीसांत फिर्याद दिली आहे. सांब्रे हे २९ जूनपासून अहमदनगर येथे गेले असतांना त्याच्या घरी चोरी झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने, २५ हजार रुपये रोख रक्‍कम व एक मोबाइल असा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.

वाढत्या घरफोड्यांनी नागरिक हैराण
सध्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भरदिवसा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घरफोडी झाली होती, त्यानंतर हे घरफोडीचे सत्र सुरूच असून पोलिसांना अद्याप या घरफोडीतील संशयितांना पकडण्यात यश न आल्याने आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे. पोलिसांकडून हद्दीत गस्तच होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून वारंवार होणाऱ्या घरफोड्याबाबत पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या हातावर तुरी

$
0
0

नाशिक ः बनावट नोटा छापून त्या वितरित करण्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपींपैकी एकाने टॉयलेटच्या खिडकीचे गज वाकवून धूम ठोकली. ही घटना रविवारी (दि. २) सकाळी आठ वाजेच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या कार्यालयात घडली. पोलिसांच्या सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली गावात संशयितास जेरबंद करण्यात आले.

कांतीलाल यशवंत मोकाशी (रा. खर्डी, ता. शहापूर, जि. ठाणे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला क्राइम ब्रँचच्या युनिट एकने शनिवारी (दि. १) रात्री त्याच्या साथिदारांसह पाथर्डी फाटा येथून अटक केली होती. संशयित आरोपीकडे मोठ्या स्वरूपात बनावट आढळून आल्याने या नोटा कुठे छापल्या, कोठे वितरित करण्यात आल्या. अशा प्रश्नाची उत्तरे पोलिसांना शोधायची होती. अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून क्राइम ब्रँचच्या पथकाने मोकाशी व अन्य एका संशयितास मुख्यालयातील युनिट एकच्या कार्यालयात आणले. उर्वरित दोघा संशयितांना घेऊन एक पथक रात्री खर्डीकडे रवाना झाले. युनिट एकच्या कार्यालयात मोकाशीसह अन्य एकाची प्राथमिक चौकशी सुरू होती. सकाळच्या सुमारास मोकाशीने जुलाब सुरू झाल्याचे सांगत टॉयलेट गाठले. मात्र, या दरम्यान टॉयलेटच्या खिडकीचे गज वाकवून त्याने धूम ठोकली.

पोलिस मुख्यालयच्या मधोमध असलेल्या युनिटच्या कार्यालयातून संशयिताने धूम ठोकल्याची माहिती समजताच पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलिसांच्या दोन ते तीन पथकांनी रेल्वे स्टेशन, बसस्टॉप तसेच शहरातील इतर काही भाग पिंजून काढला. दरम्यान, फरार संशयित मोकाशी इगतपुरी तालुक्यात गेल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार, एका पथकाने म्हसुर्ली गावात दडून बसलेल्या मोकाशीला जेरबंद केले.

२२४ नुसार गुन्हा

पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी मोकाशीविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पुन्हा मोकाशीस अटक झाल्यानंतर त्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. एवढेच नव्हे तर अशा कलमानुसार गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीला सेंट्रल जेलमध्येही अधिक ‘सुरक्षित’ ठेवण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभरच्या बनावट नोटांचे रॅकेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाचशे, हजार किंवा दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांची छपाई सर्वश्रृत आहे. मात्र, आता १०० रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात असल्याचे समोर आले आहे. तब्बल पाऊणे दोन लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा छापून वितरित करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला क्राइम ब्रँचच्या युनिट एकने जेरबंद केले आहे. पाथर्डी फाटा परिसरात शनिवारी (दि. १) रात्री सापळा रचून संशयितांना जेरबंद करण्यात आले.

प्रशांत विनयाक खरात (रा. आसनगाव, शहापूर जि. ठाणे), राजेंद्र परदेशी (रा. खर्डी, शहापूर जि. ठाणे), उत्तम गोळे (रा. शहापूर जि. ठाणे) आणि कांतीलाल यशवंत मोकाशी (रा. खर्डी, ता. शहापूर, जिल्हा ठाणे) अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. बनावट नोटांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळा येथे सापळा रचला. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास संशयास्पद इंडिका कार शिवाजी पुतळा येथे आल्यानंतर क्राइम ब्रँचच्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळल्यात. वाहनांची तपासणी केली असता पोलिसांना १०० रुपयांच्या बनावट नोटांचे १७ बंडल सापडले. एक लाख ७० हजार २०० रुपये किंमती दराच्या या बनावट नोटा विक्री करण्यात येणार होत्या. साधारणतः एक बनावट ५० रुपये दराने विक्री केली जाणार होती. सर्व संशयित ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील रहिवाशी असून, संशयितांनी यापूर्वी शहरात बनावट नोटांची विक्री केली असावी, अशी शक्यता व्यक्त होते आहे. या प्रकरणी पोलिस नाईक दिलीप मोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये कलम ४८९ मधील अ, ब आणि क या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास क्राइम ब्रँचचे एपीआय मोहिते करीत आहे. दरम्यान, संशयित आरोपींनी खर्डी येथेच बनावट नोटा छापल्या असाव्यात, अशी शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे एक पथक खर्डी येथे रवाना झाले आहे.

छोट्या नोटांकडे द्या लक्ष!
ग्राहक साधारणतः पाचशे किंवा दोन हजाराच्या मोठ्या दराच्या नोटा पारखून घेतात. त्यातुलनेत ५० किंवा १०० रुपयांच्या नोटांकडे दुर्लक्ष होते. याचाच फायदा घेऊन समाजकंटकांनी आपला मोर्चा या छोट्या किमतीच्या नोटांकडे वळवला आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकरोड पोलिसांनी ५० रुपये दरांच्या बनावट नोटा छापणाऱ्यास जेरबंद केले होते. आता, क्राइम ब्रँचने ही टोळी पकडली आहे. चलनात अशा बनावट नोटांचा वापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक : सोनालीला व्हायचंय आयएएस अधिकारी...!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

वडील संतोष एका खासगी सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड. अनेक वर्षांपासून अगदी मेहनती रिक्षाचालक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. मात्र ब्रेन ट्युमरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासल्याने त्यांना रिक्षा सोडावी लागली. त्यांनी ‘सिक्युरिटी गार्ड’ म्हणून काम करण्याचा निश्चय केला. घरी कसला आधार नाही. याशिवाय दोन लहान बहिणींचं शिक्षणंही सुरू आहे. त्यासाठी पैसा कमी पडू नये म्हणून आईही घरकाम करून वडिलांना मदत करतेय. अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची जाण ठेवून सोनाली कुंवरने दहावीत ९२.२० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची परीक्षा देत आयएएस अधिकारी होण्याचे सोनालीचे स्वप्न आहे. सोनालीने आतापर्यंत ज्या ज्या शालेय परीक्षा दिल्या, त्यात ती अव्वल आली आहे. यापुढेही स्पर्धा परीक्षा देत कलेक्टर किंवा तत्सम मोठ्या अधिकारीपदावर काम करण्याचे तिचे ध्येय आहे.

सोनाली संतोष कुंवर ही भगूर येथील नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी. तिच्या जन्मापासूनच तिचे वडील या परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत. संतोष यांना वृद्ध वडील व दोन भाऊ. ते आपला प्रपंच चालविण्यासाठी नोकरी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवितात.

कुंवर कुटुंबातील धार्मिक वातावरण आणि कुणाच्याही मदतीला धावून जाण्याची वृत्ती, यामुळे या परिसरातील घराघरांत ते परिचित आहेत. अगदी १२ बाय १५ च्या खोलीमध्ये आपल्या वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित घरातील एका माडीवर त्यांनी अतिशय हलाखीचे दिवस काढत कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात. रिक्षाचालकाचा व्यवसाय २०१४ पासून ब्रेन ट्युमरसारख्या आजारामुळे सोडून दिला. पत्नी व आपल्या तीन मुलींसह त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांनी ‘सिक्युरिटी गार्ड’सारख्या कामात स्वतःला झोकून दिले आहे. दिवस-रात्र नशिबी आलेल्या आजाराशी झुंज देत ईश्वराने पदरी टाकलेल्या तिन्ही मुलींचा सांभाळ करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा परिस्थितीतही सोनालीने खचून न जाता दहावीत ९२.२० टक्के गुण मिळविले आहेत.

सोनालीसोबत दोन लहान बहिणी आहेत. दोन नंबरची पूजा दहावीत शिक्षण घेतेय, तर लहान बहीण विद्या सहावीमध्ये नूतन विद्यामंदिरात शिक्षण घेत आहे. दोघीही अभ्यासात हुशार आहेत. त्यांनाही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून यशाची भरारी घेण्याची इच्छा आहे. सकाळी लवकर उठून आईला घरकामात मदत करून अभ्यासाला सुरुवात करायची. रात्री उशिरापर्यंत मन लावून अभ्यास करायचा. कुंवर यांच्या घरी मनोरंजनासाठी कुठलेही साधन नाही. त्यामुळे अभ्यास हेच तिने सर्वस्व मानले. चिकाटीने अभ्यास एके अभ्यास करीत तिने सर्व विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळवत नेत्रदीपक यश मिळविले. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे पुढच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न तिच्यापुढे आहे. सध्या तिने अकरावी सायन्समध्ये नूतन विद्यामंदिरातच अॅडमिशन घेतले आहे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपीएससी किंवा यूपीएससीची परीक्षा देत आयएएस अधिकारी होणार असल्याचे सोनाली सांगते. सोनालीने आतापर्यंत ज्या-ज्या शालेय परीक्षा दिल्या, त्यात ती एक किंवा दोन क्रमांकाने उत्तीर्ण होत गेली. यापुढेही स्पर्धा परीक्षा देत कलेक्टर किंवा तत्सम मोठ्या अधिकारीपदावर काम करण्याचे तिचे ध्येय आहे. आपल्या कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी ती आतापासूनच झटून अभ्यासाला सुरुवात करणार आहे. सोनालीच्या पंखांना बळ देण्यासाठी आपल्या दातृत्वाची गरज आहे. यातून सोनालीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images