Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांना रोखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृध्दी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भगूर येथील सभेला जात असलेल्या सहा शेतकऱ्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवित ताब्यात घेतले. सरकार पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करीत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडावे, अशी मागणी करीत देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनच्या आवारात मोठ्या संख्येने शेतकरी जमले. त्यामुळे काहीवेळ गोंधळाची परिस्थ‌िती निर्माण झाली.

जन्मोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. भगूर येथे सावरकरांच्या जन्मस्थळी हा जाहीर कार्यक्रम होता. आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांपुढे मांडता याव्यात यासाठी बाधित शेतकरी आणि त्यांची संघर्ष समिती दोन दिवसांपासून भाजप पदाधिकारी आणि पोलिसांकडे पाठपुरावा करीत होती. परंतु, चर्चेसाठी त्यांना निश्च‌ित वेळ देण्यात आली नाही. भेट होईल की नाही याबाबत साशंक असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भगूर येथील सभेला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. सभास्थळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली. सुमारे १०० शेतकऱ्यांचा जमाव येथे जमला. त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवडे येथील ज्ञानेश्वर चव्हाणके या शेतकऱ्यासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये दिवसभर बसवून ठेवले. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांच्या या कारवाईचा समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीने निषेध नोंदविला.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

भगूरपासून अवघ्या १० ते १५ किलोमीटरवर पांढुर्ली आणि शिवडे ही गावे आहेत. या परिसरातून समृध्दी महामार्ग जात असून तेथेच त्यास अधिक विरोध होतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका मांडतात, समृध्दी महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या समस्या याविषयी काय बोलतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. सिन्नरसह इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भगूर येथे आले होते. परंतु, पोलिसांनी पिटाळून लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

चर्चेसाठी गेस्ट हाऊसवर या असे आम्हाला सांगितले जाते. त्याचवेळी शेतकऱ्यांचा एकमेकांशी संपर्क होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना पोलिस ताब्यात घेतात. सरकार व प्रशासनाच्या अशा रणनीतीतून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप सरकारला जनतेशी संवाद साधायचा आहे का असा प्रश्न उपस्थ‌ित होतो.
- राजू देसले, निमंत्रक शेतकरी संघर्ष समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शेतकऱ्यांशी संपाबाबत चर्चा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्जमाफीसह विविध मुद्यावर राज्यातील शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली असून हा शेतकरी संप मागे घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर चर्चा करत असून त्यावर तोडगा काढला जाईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

समृद्धी महामार्गात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे पाच वर्षात चित्र बदलण्याची क्षमता असून शेतकऱ्यांच्या समाधानाशिवाय व जबरदस्तीने जमीन संपादित करणार नाही. समृद्धी महामार्गाची केवळ ३० हेक्टर क्षेत्राचीच मोजणी शिल्लक असून मोजणीशिवाय चर्चा कशी होणार? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. महापालिका कार्यालयात बैठकीनंतर मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शेतकरी संपाबाबत कृषिमंत्री स्वतः शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. काही शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून काहींना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनशील आहे. समृद्धी महामार्गासाठी सातशेपैकी ६७० किलोमीटर मार्गाची मोजणी झाली आहे. केवळ ३० किलोमीटरचे अंतर शिल्लक असून त्यासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवेदन न स्वीकारता मुख्यमंत्री परतले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना उद्‍ध्वस्त करणारा समृध्दी महामार्ग रद्द करावा तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू असलेला अत्याचार त्वरित थांबवावा, अशा मागणीचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांमागे फिरणाऱ्या शेतकऱ्यांची रविवारी घोर निराशा केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा दूरच त्यांनी निवेदनही न स्वीकारल्याचा आरोप समृध्दी महामार्ग संघर्ष समितीने केला आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पोलिसांनी‌ही चर्चा घडवून आणू, असे आश्वासने देत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दलही नाराजी व्यक्त होते आहे.

नागपूर ते मुंबई महामार्गासाठी राज्यात हजारो हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातून १०१ किलोमीटरचा महामार्ग जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील बागायती जमिनी संपादित करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जातो आहे. इगतपुरी तालुक्यातील मोठे क्षेत्र यापूर्वीही विविध प्रकल्पांसाठी संपादित झाल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा समितीचा प्रयत्न होता. जमीन मोजणीसाठी पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. समृध्दी महामार्गाला लेखी हरकती घेऊनही त्याची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. समृध्दी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा पोलिसांनी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यांच्यावर चाप्टर केसेस दाखल केल्या अशी कैफियत या निवेदनातून मांडण्यात आली होती.

सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसर बागायती आहे. त्यावर एक हजारहून अधिक शेतकऱ्यांची उपजिविका अवलंबून आहे. समृध्दी महामार्गामुळे सामाजिक, आर्थिक प्रश्न निर्माण झाले असून नवीन महामार्ग रद्द करून आहे. त्याच मार्गाचे रुंदीकरण करावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे या निवेदनाद्वारे ठेवण्याचा समितीचा प्रयत्न होता. परंतु, भगूरपासून गेस्ट हाऊसपर्यंत वारंवार पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांची भेट होऊ न शकल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.

‘राष्ट्रवादी’च्या महिला पदाधिकाऱ्यांकडूनही निषेध

नाशिक : जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमुक्ती, भगूर शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आपणास अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांना दिलेले आपले निवेदन वाहनातून बाहेर फेकण्यात आल्याचा दावाही बलकवडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना मनोरंजनाच्या कार्यक्रमास हजेरी लावण्यास वेळ मिळतो; परंतु आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा समजून घेण्यास वेळ नाही, असा आरोप करीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी गोरख बलकवडे, विशाल बलकवडे, सायरा शेख, मुन्ना अन्सारी, प्रशांत बच्छाव, शहराध्यक्ष मुन्ना दोंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब, १८ हजार कोटींची मागणी!

$
0
0

नाशिक : शहराच्या विकासासाठी महापालिका प्रशासननाकडून दोन हजार १७३ कोटींचा विकास आराखडा सादर केला असतांनाही, दत्तक नाशिकच्या विकासासाठी महापौर रंजना भानसी यांनी मुख्यमंत्र्याकडे चक्क १८ हजार कोटींच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महापौरांच्या या अवाढव्य मागणीमुळे मुख्यमंत्र्यासह सत्ताधारी भाजप पदाधिकारीही भांबावले. या भल्या मोठ्या मागणीमुळे मुख्यमंत्र्यानी आर्थिक मदतीचा हात आखडता घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

दत्तक नाशिकच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणीस यांनी रविवारी महापालिकेला भेट देत सद्यस्थितीचा आढावा घेतला. नाशिकच्या विकासासाठी पाच वर्षात नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, प्रशासनाने दोन हजार १७३ कोटींचा कृती आराखडा तयार केला होता. बैठकीत या आराखडा सादरीकरणानंतर महापौर भानसी यांनी मुख्यत्र्यांकडे शहराच्या विकासाठी भरीव अशी १८ हजार कोटी रुपयांची मागणी केली. यात मेट्रो रेल्वेसाठी दहा हजार कोटी, रिंगरोड उड्डाणपूलासाठी एक हजार कोटी, जैवविविधता संर्वधनासाठी पाचशे कोटी, सीसीटीव्ही पाचशे कोटी, मलनिस्सारणसाठी एक हजार कोटी, भूसंपादन कामासाठी एक हजार कोटी, साधुग्राम जागा आरक्षणासाठी अडीच हजार कोटी, विद्युत विभागासाठी एक हजार कोटींची मागणी केली आहे. तसेच जलसंपदाकडून पाणीपट्टीपोटी आकारण्यात येणारे ५२ कोटी माफ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापौरांच्या या भल्या मोठ्या आर्थिक मदतीच्या पत्राकडे पाहिल्यावर मुख्यमंत्र्याचे भुवया उंचावल्या. याउलट मुख्यमंत्र्यानी महापौरांना उपदेशाचे डोस पाजत, लंडनच्या महापौरांचा दाखला देत, स्वतःच्या सोर्सेसमधून शहर विकास करण्याचा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठे गल्लीत आनंदाची लयलूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनांची गर्दी, प्रदूषण, रोजच्या धावपळीचा ताण याला कंटाळलेल्या नाशिककरांची रविवारची सकाळ धम्माल मनोरंजक ठरली. खुल्या रस्त्यावरील उपक्रमाद्वारे नृत्य, गाणी, कलाकुसर, खेळ, सोबतीला पुरेपूर एनर्जी देणारा झुम्बा अशा एक ना अनेक गोष्टींमधून मिळणारा आनंद अनेकांनी लुटला. निमित्त होते महाराष्ट्र टाइम्स आयोजित हॅप्पी स्ट्रीट्स या उपक्रमाचे. रविवारी हॅप्पी स्ट्रीट्स सीझन ३ चे चौथे व या वर्षीचा शेवटचे पर्व जल्लोषात पार पडले.

अभिनेता चिन्मय उदगीरकर, तुषार संकलेचा आदी मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत काठे गल्लीतील बनकर चौक परिसरात नाशिककर आनंदाची लयलूट करण्यात हरखून गेले होते. नाच, गाणे, खेळ खेळणे, चित्र, रांगोळी काढणे, कलाकृती बनविणे किंवा फोटोज काढणे अशा अनेक गोष्टींची पुरेपूर मजा यावेळी लुटण्यात आली.

‘झुम्बा’च्या तालावर ठेका

झुम्बा इन्स्ट्रक्टर पूनम आचार्य, श्रद्धा जोशी, प्रतीक हिंगमिरे यांच्या स्टेप्सचे अनुकरण करत चिमुकल्यांपासून साठी पार केलेल्या आजी-आजोबांनीदेखील ठेका धरला. सिद्धी ठोंबरे हिचा बॅले डान्स अन् स्नेहित कुरुपच्या पॉपिंग अनिमेशनच्या सोलो डान्सची झलकही या वेळी बघायला मिळाली.

--

या उपक्रमांनी वेधले लक्ष

गिटारवादन, बासरीवादन, नेल आर्ट, मेंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, क्विलिंग आर्ट, कॅलिग्राफी, मॅजिक शो अशा अनेक उपक्रमांनी यावेळी लक्ष वेधून घेतले.

--

चिन्मयची उत्स्फूर्त दाद

हॅप्पी स्ट्रीट्समध्ये नाशिककरांचा ओसंडता उत्साह, कमालीचे टॅलेंट अन् धम्माल मस्ती पाहून अभिनेता चिन्मय उदगीरकर हरखून गेला होता. चिन्मयने नाशिककरांसोबत सगळ्या अॅक्टिव्हिटीजची मज्जा लुटली. तरुणींनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला गर्दी केली होती. यावेळी बोलताना तो म्हणाला, की नाशिकचे टॅलेंट अप्रतिम आहे. हॅप्पी स्ट्रीट्स हे एक व्यासपीठ आहे. याचा फायदा करून घेत तुम्ही खूप संधी मिळवू शकता. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरणारा आहे.

--

हे ठरले बेस्टम् बेस्ट!

रविवारी हॅप्पी स्ट्रीट्ससवर बेस्ट कॉम्पिटिशन घेण्यात आली. यात बेस्ट डान्स- राज बंबानी, बेस्ट स्माइल- सृष्टी तेजाळे, बेस्ट ड्रेस- सोनल ठाकूर, बेस्ट एनर्जेटfक पर्सनॅलिटी- पूनम ठाकूर आणि बेस्ट टॅलेंट- स्मिता ठाकरे यांनी बाजी मारली. त्यांना जावेद अलींच्या लाइव्ह इन कॉन्सर्टचे ‘कपल पास’ देऊन गौरविण्यात आले.

--

कॉलेजरोड ते काठे गल्ली…

‘मटा’च्या हॅप्पी स्ट्रीट्स या अभिनव उपक्रमाची कॉलेजरोडपासून या सुरुवात झाली होती. त्यानंतर नाशिकरोड, इंदिरानगरवासीयांनी त्याची मजा लुटली. रविवारी काठे गल्लीतील धम्माल परफॉर्मन्सनंतर हॅप्पी स्ट्रीट्स सीझन ३ चा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरती, मेट्रोला मुख्यमंत्र्यांचा ठेंगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातून महापालिकेच्या पदरी भरपूर दान मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांची या दौऱ्यातून घोर निराशा झाली आहे. महापालिकेतील नोकरभरती, डीसीपीआर, मेट्रो सेवा, सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनीच नाशिककरांना ठेंगा दाखवला आहे. केवळ तांत्रिक पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवत अन्य कामे आऊटसोर्सिंगने करण्याचा सल्ला त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. शहर बससेवा खासगीकरणातून चालवण्याच्या विषयावर सल्लागार संस्थेची नेमणूक, अॅपबेस बससेवा सुरू करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच डीसीपीआरचा प्रलंबित प्रश्नही नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून सोडवू असे आश्वासन देत, आर्थिक मदतीसाठी सरकारवर विसंबून न राहण्याचा सल्लाही त्यांनी पालिकेला दिला. विकासकामांसाठी पालिकेला स्वतःच्या उत्पन्नाचे स्‍त्रोत उभे करण्याचा सल्ला देऊन त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच ठेंगा दाखवला आहे.

महापालिका निवडणुकांच्या शेवटच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. या एका घोषणेमुळे पालिकेत भाजपचे कमळ फुलले होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्वतः पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. स्थायी समितीच्या सभागृहात तासभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी प्रशासनाच्या वतीने पालिकेने तयार केलेल्या दोन हजार १७३ कोटींच्या विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन करण्यात आले. महापौर रंजना भानसी यांनी शहराच्या विकासकामांसाठी तब्बल १८ हजार कोटींची मागणी केली.

गंगापूर धरणावर सोलर प्रोजेक्ट उभारण्यासाठी २० एकर जागा देण्याची मागणी पालिकेच्या वतीने करण्यात आली, त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे गंगापूर धरणाजवळ सोलर प्रोजेक्ट उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. तर पिंपळगाव खांब येथील एसटीपीसाठी आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. त्यावर मनीषा म्हैसकर यांनी जागा ताब्यात घेण्याचा सल्ला पालिकेला दिला. तसेच शहरात एलईडी लावण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. परंतु, या मागणीलाही ठेंगा दाखवण्यात आला. डीएसए संस्थेकडून मोफत एलईडी बसवून घेण्याचा सल्ला सत्ताधाऱ्यांना देण्यात आला.

महापालिकेत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून नोकरभरतीला परवानगी देण्याची मागणी महापौरांकडून करण्यात आली. त्यावर केवळ तांत्रिक पदे भरता येतील असे सांगत लोकांचा पैसा कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करणे योग्य नसल्याचे सांगत कामांचे आऊटसोर्सिंग करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. सोबतच डीसीपीआरमुळे अडकलेला कपाट प्रश्न सोडविण्यासाठी क्रेडाई आणि महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावावरही तोडगा निघालेला नाही. या प्रस्तावावर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी देत वेळ मारून नेली. नाशिकच्या विकासाला चालना मिळेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

बससेवा, मेट्रो नाहीच

मुख्यमंत्र्यांनी शहरातील वाहतूक सेवा सक्षमीकरण करण्यावर विशेष भर दिला. महामंडळाने बससेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर बससेवा महापालिका चालविण्यास तयार असल्याचे प्रशासनाने सांग‌ितले. सार्वजनिक वाहतुकीसाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करून ‘अॅपबेस’ बससेवा सुरू करण्याचा विचार करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास शासनातर्फे जमीन विनामूल्य देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात शहर बससेवा सुरळीत झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात मेट्रोचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगत बससेवेचे खासगीकरण करण्याचा सल्लाही सत्ताधाऱ्यांना दिला.

उत्पन्नाबाबत उपदेशाचे डोस

मुख्यमंत्री नाशिक महापालिकेला आर्थिक मदत करण्यासंदर्भात मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दोन हजार १७३ कोटींचा आराखडा सादर करण्यात आला. महापौरांनी मेट्रोसह विविध कामांसाठी १८ हजार कोटींचा निधी मागितला. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हा निधी देण्याऐवजी उपदेशाचे डोसच पाजले. पालिकेचा आराखडा पूर्ण करण्यासाठी पालिका किती निधी उभा करू शकते, याचा अहवाल देण्याचे आदेश देऊन निधीचा गॅप राह‌िल्यास तो राज्यसरकार देईल असे सांगत मदतीवर बोळवण केली. पालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढवून स्वतःची विकासकामे पूर्ण करण्याचेही त्यांनी सुचविले.

स्वच्छतेत टॉप टेनमध्ये आणू

यावेळी मुख्यमंत्री नाशिक शहराला वर्षभरात देशातील दहा स्वच्छ शहरांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करू अशी घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात नाशिकला वर्षभरात पहिल्या दहा शहरांमध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी मदत राज्यसरकारच्या वतीने महापालिकेला केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पहिल्या दहा शहरांत नाशिकला आणण्याचे काम हे कठीण असले तरी, आम्ही ते पूर्ण करू असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चार बाबींना प्राधान्य

मुख्यमंत्र्यांनी आपल्या बैठकीत सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक वाहतूक या चार मूलभूत बाबींवर महापालिकेने लक्ष केंद्रीत करावे असा सल्ला दिला. ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यावर प्रक्रीया करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासंदर्भात विद्यमान क्षमता वाढविण्याचा महापालिकेने प्रयत्न करावा, असे सांगत विविध उपाययोजना करण्यासाठी आराखडा सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्र्यांनी गोदाकाठी झालेल्या जाहीर सभेत गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस पावले उचलण्याची घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. पालिकेच्या बैठकीत गोदावरीच्या विषयावर चर्चा झाली असली, तरी ठोस मदतीची घोषणा झाली नाही. त्यामुळे गोदावरीचीही निराशा झाली आहे.

‘मेक इन नाशिक’ आमचे नाही.

‘मेक इन नाशिक’साठी आपण काय प्रयत्न कराल, या प्रश्नाच्या उत्तरावर मुख्यमंत्र्यांनी ‘मेक इन नाशिक’ हा प्रोजेक्ट सरकारचा नसल्याचा खुलासा केला. पंरतु, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत या कार्यक्रमानंतर लगेचच गुंतणवूक येईल, असा आशावाद करणे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांग‌ितले. उद्योजकांना आकर्षित करण्याचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म असून, उद्योग शहरात आले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना जाणार एक लाख पत्रे

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, धुळे

शिंदखेडा येथे शिवसेनेच्या जिल्हा ग्रामीणचे सहसंपर्कप्रमुख कारभारी आहेर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील गावागावातून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसंदर्भातील पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासोबतच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून एक लाख पत्रे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, विधानसभा संघटक छोटू पाटील, विश्वनाथ पाटील, कल्याण बागल, चेतन राजपूत, मंगेश पवार, सर्जेराव पाटील, तालुका संघटिका ज्योती पाटील उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात चर्चा करण्यात आली. शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदारसंघातील गावांमधून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती संदर्भातील पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदखेड्यातून एक लाख पत्रे पाठविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट खतविक्रीबाबत त्र्यंबकेश्वरात गुन्हा

$
0
0

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असताना बनावट खत व्रिकी रॅकेट सक्रीय झाल्याचे उघड झाले आहे. बनावट खत व्रिकी करणारे सिन्नर तालुक्यातील असून, फिरती व्हॅन घेऊन शेतकऱ्यांना गंडा घालण्याचा धंदा उघडकीस आला आहे. याबाबत बनावट खतविक्री करणाऱ्यांविरुद्ध पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांनी बनावट खत ताब्यात घेऊन हरसुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सावरपाडा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांनी फिरत्या विक्रेत्याकडून सम्राट डीएपी खत खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी याबाबत शहानिशा होण्याकरिता वरिष्ठ कार्यालयास कळविले. विभागीय कृषी सहसंचालक कैलास मोते व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी टी. एन. जगताप यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देत संयुक्त चौकशी करण्यात आली. यात नॅचरल पोटॅश ४४४ बॅग आणि सम्राट २३ बॅग असे अंदाजे ३ लाख ९७ हजार किमतीचे खत जप्त केले. हा ताब्यात घेतलेला माल प्रयोगशाळेत तपासला असता खत म्हणून व्रिकी करीत आर्थिक फसवणूक केल्याचे आढळून आलेे. त्यामुळे खत नियंत्रक कायदा १९८५ प्रमाणे व अत्यावश्यक वस्तू अधिनियमाचे उल्लंघन केल्याने दत्तात्रेय गाडेकर व अशोक मामलीक सदगीर (रा. सिन्नर) व सत्यम अॅग्रो इंडस्ट्रीज (भेंडाळी ता. निफाड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाळिंब बागेवर चालविली कुऱ्हाड

$
0
0

संपात सहभागी होण्यासाठी बळीराजाचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येत्या १ जूनपासून शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी संपावर जात आहेत. या संपात सहभागी होण्यासाठी निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात उभ्या डाळिंबाच्या बागेला कुऱ्हाड लावत बागच तोडून टाकली आहे. हेमंत अंबादास चौधरी (रा. दिक्षी, ता. निफाड) असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो व त्यांचा पत्नी सोनाली हेमंत चौधरी यांच्या मालकीची गट नंबर १७९-१८१ या गटातील भरपूर प्रमाणात डाळिंब असलेली बाग १ जूनच्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी तोडली आहे.

हेमंत चौधरी हे पदवीधर शेतकरी असून, त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती व्यवसाय करण्यास सुरुवात केली. ते २०१३ पासून नवीन काही तरी शेतीत करावे या दृष्टीने त्यांनी डाळिंब बाग लावली. सुरुवातीला सरकारच्या फळरोप वाटिकातून भगवा जातीचे रोपे घेतली मात्र सदरचे रोपेही अत्यंत कमी दर्जाचे व भेसळ निघाल्याने एक वर्ष वाया गेले.

स्वखर्चाने तयार केले शेततळे

या भागात गेली दहा वर्षे कृषी सहाय्यक नसल्याने वीस लाख रुपये स्वतः खर्च करून पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभे केले. तसेच डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ केली मात्र दरवर्षी उत्पादन वर आधारित बाजारभाव मिळत नव्हता. शेतकरी व ग्राहक यांच्या भावात मोठी तफावत होती. दरवर्षी भावात होत असलेली घसरण तसेच व्यापाऱ्यांनी घेतलेला माल व ग्राहकाला विकलेला यात फार मोठा फरक पडत होता. या सर्व गोष्टींबरोबर उत्पादनावर आधारित आजपर्यंत दर मिळाला नाही. उलट उत्पादन घेताना दरवर्षी खर्च वाढत गेला. त्यामुळे दरवर्षी तोट्यात चाललेला शेती व्यवसायाला वैतागून तसेच सर्व शेतकरी वर्गाने संपाचा निर्णय घेतल्याने फक्त स्वतःपुरते पिकवायचे का? यासाठी त्यांनी आपल्या शेतातील तीन एकर डाळींब तोडण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्याला डाळिंबाचे किलोमागे ५० रुपये मिळतात आणि ग्राहकांपर्यंत त्याचा भाव २०० रुपये किलो होतो. त्यामुळे माझ्याकडे आता ३ एकर असून, प्रत्येक वर्षी तो तोडून फक्त ३ एकर ठेवणार आणि स्वतः ग्राहकांपर्यंत पोहचवून पैसे मिळवणार.

-हेमंत चौधरी, डाळिंब उत्पादक शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्यांचा मंगळवारी देशव्यापी बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने (एआयओसीडी) संपूर्ण भारतात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणाऱ्या ऑनलाइन फार्मसी व केंद्र सरकारच्या स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पब्लिक नोटिसीच्या विरोधात मंगळवारी (दि. ३० मे) रोजी संपूर्ण देशात बंदचे आवाहन केले आहे. राज्य केमिस्ट संघटनेचे ५५ हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होतील, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी दिली आहे.

याबाबत संघटनेने, राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू असून, याद्वारे नार्कोटिक्स ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकादायक औषधांची ऑनलाइन विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे. मात्र, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान ऑनलाइन औषध विक्रीबाबत अनेक वेळा गंभीर बाबींची साशंकता व्यक्त केल्यावरही राज्य व प्रशासन याबाबत गंभीर नाही. सरकार देशात ई-फार्मसी व ई-पोर्टल लागू करण्याची योजना आखत असल्यामुळे देशातील औषध विक्रेते आंदोलनात्मक भूमिका घेत आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

ज्या प्रगत देशांनी ऑनलाईन फार्मसी व्यवसायास मान्यता दिली, अशा अनेक देशांमध्ये सायबर क्राईममुळे त्याचे दुष्परिणामदेखील समोर आलेले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. देशभरातील ८ लाख औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय औषधी संघटनेचे (एआयओसीडी) अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगल्या ऋणानुबंधांची रुजवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नगाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असे म्हटले जाते. परंतु, त्यासाठी मानवी प्रयत्नही तितकेच गरजेचे असतात. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि अनुपम शादी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब्राह्मण समाजाचा वधू-वर मेळावा हा असाच एक स्तुत्य प्रयत्न असून, याद्वारे निश्चितच चांगल्या ऋणानुबंधांची रुजवात होईल, असे प्रतिपादन अभिनेता चिन्मय उदगीरकर याने केले.

‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि अनुपम शादी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी त्र्यंबकरोड येथील हॉटेल एमराल्ड पार्क येथे आयोजित वेडिंग टाइम्स स्वयंवरमध्ये तो बोलत होता. चिन्मय म्हणाला, की जेव्हा अशा मोठ्या संस्था एकत्र येऊन समाजपयोगी उपक्रम हाती घेतात, तेव्हा त्या कार्याला नक्कीच चांगले यश लाभते. त्यामुळे या वेडिंग टाइम्स स्वयंवरमध्ये सहभागी झालेल्या अधिकाधिक उपवर वधू-वरांच्या लग्नगाठी निश्चितच जुळतील.

अनुपम शादी डॉट कॉमचे संचालक संजय लोळगे या उपक्रमाबाबत म्हणाले, की अनुपम शादी डॉट कॉमने ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सोबत सलग पाच सीझन वेडिंग स्वयंवर आयोजित केले आहे. त्याद्वारे असंख्य जोडपी विवाहबंधनात बांधली गेली आहेत.

‘टाइम्स ग्रुप’च्या नाशिक रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख म्हणाल्या, की वेडिंग टाइम्स स्वयंवरद्वारे उपवर वधू-वरांना अनुरूप साथीदाराची निवड करता यावी यासाठी एक चांगले व्यासपीठ उभे करून दिले जाते. यापूर्वीप्रमाणेच यंदाच्या मेळाव्यातही अनेकांचे शुभमंगल होईल.

या मेळाव्यास ब्राह्मण समाजातील उपवर वधू-वरांची लक्षणीय उपस्थिती होती. पालकांसह अन्य मान्यवरदेखील यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींच्या शिक्षणाला ‘तैनवाला’चे बळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरजू मुली शिक्षणापासून वंचित न राहता उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन त्यांना स्वावलंबी बनावावे व समाजापुढे आदर्श निर्माण करावा, या उद्देशान तैनवाला फाउंडेशनने मुलींसाठी शैक्षणिक मदतीचा उपक्रम सुरू केला आहे. शैक्षणिक क्षेत्राद्वारे भवितव्य घडवू पाहणाऱ्या या विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देण्याचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून केले जात आहे. या उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
उच्च शिक्षण घेण्याची गुणवत्ता असतानाही सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुलींना आर्थिक व सामाजिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा मुलींना शिक्षणापासून मुकावे लागू नये, या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. सॅमसोनाइट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश तैनवाला व त्यांच्या पत्नी शोभा तैनवाला यांच्या संकल्पनेतून तैनवाला फाउंडेशनच्या माध्यमातून बारावीनंतरच्या शैक्षणिक खर्चासाठी मुलींना विशेष अर्थसहाय्य करण्यात येते. याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मुलींना बारावीच्या परीक्षेत कमीतकमी ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य आहे. त्याबरोबरच या मुली कोणत्याही शिष्यवृत्ती व सरकारी मदत योजनेची लाभधारक नसावी. तिचे पालक नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावेत व कुटुंबाचे एकूण उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे. या अटी पूर्ण करणाऱ्या होतकरू मुलींची निवड करण्यात येऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी ९८८१०९६३१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी अशा २५ मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले जाते. या योजनेचा शंभराहून अधिक मुलींनी लाभ घेतल्याचे तैनवालातर्ते सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूपदेवीला आज रास्ता रोको

$
0
0

शेतकरी संपाबाबत समिती आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी १ जूनपासून संपावर जाणार असून, आज (दि. २९) त्यासाठी तूपदेवीला रास्ता रोको होणार आहे. यामध्ये संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली जाणार असून, यासह इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी एक जूनपासून संपावर जात आहेत.

सरकारला इशारा देण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तूपदेवी येथे आज (दि. २९) दुपारी अकरा वाजता रास्ता रोको करणार असल्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. तसेच १ जूनपासून शेतकऱ्यांनी बैठकीत संपावर जाण्यासाठी एकमुखी शपथ घेतली. कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ पडतो. शेतमाल पिकतच नाही अधिक कष्ट करूनही पिके पिकवली शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नसतो, भाव पडण्यासाठी सरकार शेतमालाची आयात करते, काही शेती पिकावर निर्यात बंदी लावल्याने परिणामी शेतपिकाचा भाव मिळत नाही या सर्व कारणांमुळे शेतकरी आता संपावर जाणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळेस संपात सहभागी होण्याचे मार्ग स्पष्ट करून यामध्ये शेतातमध्ये बियाण्याची पेरणी करायची नाही, दुग्धपालन व्यवसायातून मिळणारे दुध बाजारात विकायचे नाही, शेतात पिकत असलेला भाजीपाला व अन्नधान्य कोणाला विकायचे नाही. तसेच शेतमजुरांनी शेतात कामाला जायचे नाही, असेही सांगण्यात आले.

याबाबत अनेकदा आंदोलने झाली पण सरकारला जाग येत नाही. त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेत असल्याचे नवनाथ कोठुळे यांनी सांगितले. या वेळी तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह तालुक्यातील सर्वच नेत्यांनी किसान क्रांतीचा संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. रस्ता रोकोचे निवेदन त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनला देण्यात आले असून, यावेळी नवनाथ कोठुळे, पुरुषोत्तम कडलग, भूषण अडसरे, ज्ञानेश्वर सोनावणे, शिवाजी कसबे, संतोष मिंडे, शांताराम पोरजे, श्रीराम कोठुळे, भाऊसाहेब कोठुळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाशेवर पोलिसांच्या होणार बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर तसेच ग्रामीण पोलिस दलातील शेकडो कर्मचाऱ्यांचे लक्ष प्रशासकीय बदल्यांकडे लागले आहे. विशेषतः ठाण मांडून बसलेल्या ‘कलेक्टरां’बाबत पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल काय निर्णय घेतात, याची उत्सुकता सर्वांना आहे. दोन दिवसांत बदल्यांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे हेदेखील ३० मे रोजी पदभार सोडणार असून, त्या अनुषंगाने बदल्यांबाबत चर्चा आहे.
पोलिस स्टेशनमध्ये फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाच वर्षांनी तर साइड ब्रँच म्हणजे एसबी, मुख्यालय अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली होते. साधारणतः दरवर्षी एक तृत‌यिांश कर्मचाऱ्यांची बदली होते. शहर पोलिस दलात जवळपास दोन हजार ५०० कर्मचारी असून, त्यातील जवळपास ६०० ते ६५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्ष‌ति आहे. ग्रामीण पोलिस दलदेखील या निकषानुसार यादी तयार करीत असून, शहर आणि ग्रामीण पोलिस दलाच्या अंतिम याद्या दोन दिवसात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहर पोलिसांची हद्द आणि वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांबाबत पोलिस आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी चौघा कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळ देखील देण्यात आला होता. सराईत गुन्हेगारांशी वारंवार संबंध ठेवल्यावरून ही कारवाई करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर बदल्यांची यादी तयार होत असून, पोलिस स्टेशनसह मलईच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करावी, अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकुश शिंदे यांची प्रमोशनवर नागपूरला बदली झाली आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलीनंतर ते कायम होते. आता, ३० मे रोजी ते आपला पदभार सोडणार असून, तत्पूर्वीच बदलीची यादी तयार होणार असल्याने पोलिसांचे लक्ष याकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्साहाचा जलवा…

$
0
0

‘मटा॒’तर्फे काठे गल्लीतील हॅप्पी स्ट्रीट्स उपक्रमात सर्वच वयोगटांतील नाशिककरांच्या उत्साहाचा जलवा दिसून आला. प्रतीक व मीनाक्षी हिंगमिरे यांच्याकडून झुम्बा डान्सच्या स्टेप्स शिकताना अन् सिद्धी ठोंबरे हिची, तसेच नरेंद्र पुली व त्यांच्या शिष्यगणांची अदाकारी पाहताना नाशिककर हरखून गेले होते. शंकर कंडेरा यांच्या परफॉर्मन्सनंतर असंख्य नाशिककरांनी मिमिक्री व गझल सादर केल्या. रवींद्र जोशी यांच्या वेणुवंदना ग्रुपतर्फे बासरी वादन, तर हॅण्ड फाउंडेशनतर्फे रॉक बॅण्डचा परफॉर्मन्स सादर झाला. राजू दाणी व रचना आर्ट अॅकॅडमी ग्रुप यांनी नेल आर्ट, मेंदी, फेस पेंटिंग, कॅन्व्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकारांचे कलाकौशल्य सादर केले. एट वन एट टॅटूमार्फत अनेकांनी कार्टून्स, नेम्स, फेस टॅटूसह आय लव्ह यू मॉमचे टॅटू रेखाटून घेतले. बाहुबली टॅटूची विशेष क्रेझ होती. बचपनगलीत बालगोपाळांनी फुटबॉल, रोड सापशिडी, स्केटिंग, बॅडमिंटन, गोल्फ आदींचा आनंद ‘मटा’ व डिकेथलॉनच्या सहकार्याने लुटला. चिंतामण पगारे व नीलेश गायधनी यांनी सुलेखन कॅलिग्राफीचे पैलू उलगडले. प्रेमदा दांडेकर यांच्या वारली स्टाइलच्या स्ट्रीट रांगोळीला पसंती मिळाली. संकलेचा ग्रुपच्या सेल्फी पॉइंटवर अनेकांनी धमाल केली. स्मिता परदेशी यांनी कागदापासून विविध शोभेच्या वस्तू हाताने बनविण्याच्या टिप्स दिल्या. अथर्व काळेंच्या ग्रुपमार्फत टेलिस्कोपच्या मदतीने सूर्यदर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. इस्कॉन टेंपलचे प्रतिनिधी, तसेच भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी आदींनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. चैताली बागूल, निखिल जोशी, राजेंद्र जोपूळकर, तेजस बागुल, सुनंदा धामणे, ऋतुजा शिंदे, हर्षद औटे आदींनी या उपक्रमात धम्माल केल्याचे सांगितले.

(संकलन ः सौरभ बेंडाळे, स्वप्निल देवकर, लखन सावंत, हर्षल भट, रुचिका ढिकले)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातपंचायतीने केले समाजातून बहिष्कृत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील रावळगाव येथील नागपंथी डावरी गोसावी समाजाच्या कुटुंबीयांना जात पंचायतीने बहिष्कृत केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जात पंचायतीच्या जाचाविरोधात राजकपूर शिंदे यांच्या कुटुंबीयांनी लढा सुरू केला आहे.

रावळगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य राजकपूर शिंदे यांच्या सून हेमा सागर शिंदे यांनी कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरुद्ध शिंदे यांच्या चिरंजीव सागर याच्याशी विवाह केल्याने जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याची फिर्याद दिली आहे. २०१२ मध्ये हेमा व सागर शिंदे यांचा प्रेमसंबध झाला. ते दोघेही नागपंथी डवरी गोसावी समाजाचे आहेत. हेमा व सागरच्या प्रेमसंबंधाला व लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे ती घर सोडून रावळगाव येथे निघून आली. त्यावेळी सागरच्या वडिलांनी हेमाच्या कुटुंबीयांकडे त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला मात्र कुटुंबीयांनी त्यास विरोध कायम ठेवत जातपंचायतीत गेले. पुणे जिल्ह्यातील पाटस (ता. दौड) येथे तीन गावातील समाजाच्या लोकांची जातपंचायत बैठक होऊन यात त्यांना दोषी ठरवण्यात आले. जातपंचायतीच्या रितीरिवाजानुसार शिंदे कुटुंबीयांना दंड भरण्याचा लेखी आदेश दिला तसेच दंड न भरल्याने समाजातून बहिष्कृत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन’मध्ये यशकथांतून प्रेरणा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईत ३० व ३१ मे रोजी नेहरू सेंटरमध्ये होणाऱ्या ‘मेक इन नाशिक’च्या मेगा इव्हेंट कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. असले तरी त्यात सर्वात लक्षवेधी असणार आहे त्या सक्सेस स्टोरीजचे सादरीकरण. नाशिकच्या मातीतून काहींनी आपल्या व्यवसायाला थेट सातासमुद्रापार नेले तर काहींनी देशभरात आपले काम पोहचवले अशा यशस्वी उद्योजकांच्या या गोष्टी असणार आहे. यात नाशिकच्या पाच जणांची निवड करण्यात आली असून, ते त्यांच्याच शब्दात आपली स्टोरी सांगणार आहेत. याबरोबरच नाशिकचे महत्व पटवून देण्यासाठी हे उद्योजक एक प्रेझेन्टेशनही करणार आहेत.
या सक्सेस स्टोरीमध्ये पाच जणांची निवड करण्यात आली आहे. ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर पीयूष सोमाणी, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे विलास शिंदे व सुला वाईनचे नीरज अग्रवाल यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर अशोका ग्रुपचे अशोक कटारिया व ऋषभ इन्‍स्ट्रूमेंटचे नरेंद्र गोल‌यिा यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. जगभरातील उद्योजकांना नाशिकचे महत्त्व सांगण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू व्हावेत व १० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक व्हावी असे टार्गेट ठरवत या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात या सक्सेस स्टोरीज महत्वाच्या आहेत. या सक्सेस स्टोरीजबरोबरच एमआयडीसीच्या प्रेझेन्टेशनमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात नाशिकच्या औद्योगिक प्रगतीची माहिती देण्यात येणार आहे.

सह्याद्री फार्मर्सचे विलास शिंदे
ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन घडावे यासाठी विलास शिंदे यांनी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीची स्थापना केली. या कंपनीची २५० कोटीहून अधिक उलाढाल आहे. द्राक्ष निर्यातीत ही कंपनी आघाडीवर आहे. उत्पादन निर्मितीसोबतच विक्री, निर्यात आणि वितरण अशा विविध क्षेत्रांत शिंदे यांनी अनेक प्रयोग केले आहेत.

इएसडीएसचे पीयूष सोमाणी
इएसडीएस या कंपनीची सुरुवात २००५ साली नाशिक येथे झाली. त्यावेळी या कंपनीत अवघे १-२ संगणक आणि २० -३० कर्मचारी होते. क्लाऊड सर्व्हिस कंपनी म्हणून काम सुरू केल्यानंतर या कंपनीने अमेरिका, कॅनडा, अशा ठिकाणी सेंटर्स उघडले.

सुला वाइन्सचे नीरज अग्रवाल
भारतीय वाइनला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्यांत नीरज अग्रवाल यांचे नाव घेतले जाते. सुला वाइन्स म्हटले की त्यांची ओळख एका वाक्यात होते. नाशिकच्या वाइन्सने जगभर आपले वेगळेपण सिध्द केले, त्यात सुला वाइन्सचा वाटा निश्चितच मोठा आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमातून सुला वाइन्सने नाशिककडे पर्यटकही वळवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची झोळी रितीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक विधानाला भाळून भाजपच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकणाऱ्या नाशिककरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या भेटीत आर्थिक मदत देण्याऐवजी उपदेशाचेच डोस पाजले आहेत. शहर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी आर्थिक शिस्तीचा आग्रह धरल्याने मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा ठेवून असलेल्या सत्ताधाऱ्यांसह नाशिककरांचाही मोठा अपेक्षाभंग झाला आहे.

विकासासाठी स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत तयार करण्यासह नोकरभरती, मेट्रो आणि बससेवेचा प्रश्न त्यांनी फेटाळून लावल्याने सत्ताधारी भाजपची मोठी अडचण झाली आहे. महापालिकेने तयार केलेल्या २१७३ कोटींच्या विकास आराखड्यासाठीची रक्कमही महापालिकेलाच उभी करायचा सल्ला देत, शिल्लक गॅप भरण्याचे किरकोळ आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची झोळी रितीच ठेवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळून दौऱ्याचा खर्च जरी महापालिकेला दिला असता तरी मदत झाली असती, अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे.

महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. आपल्याला थेट मुख्यमंत्रीच पालक मिळत असल्याने नाशिककरांनीही मग थेट महापालिकेवर कमळ फुलवले. भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही मग नाशिककरांचे मतांचे दान वाया जाऊ नये म्हणून रविवारी थेट महापालिका गाठून पालकत्वाची भूमिका स्वीकारली. थेट मुख्यमंत्रीच पालक असल्याने सत्ताधाऱ्यांनी मग आर्थिक मदतीचा मोठा हात पसरवला. प्रशासनाने २१७३ कोटींचा आराखडा तयार केला, तर महापौरांनी वेगळ्या १८ हजार कोटींची मदत मागितली. मुख्यमंत्र्यांनीही महापालिकेच्या कंगालतेचा अंदाज घेतल्यानंतर आपला हात आखडता घेतला. जनतेच्या पैशांवर कर्मचाऱ्यांची भरती नको असे सांगत, सत्ताधारी आस लावून बसलेला नोकरभरतीचा विषय फेटाळला. मेट्रो सेवाही टोलवत सार्वजनिक वाहतूकव्यवस्था खासगीकरणातून करण्याचे संकेत दिले, तर महापालिकेने सादर केलेला आराखडा पूर्ण करण्यासाठी स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत, कर वाढविण्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाला दिले. महापालिकेचा हिस्सा व राज्याच्या योजनेतून निधी मिळाल्यानंतर शिल्लक गॅप सरकार भरेल, असे सांगून नाशिककरांची बोळवण केली. आर्थिक शिस्त लावण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. केवळ गंगापूर धरणालगत २० एकर जागा महापालिकेच्या पदरात पडली. हा एकमेव विषय वगळता नोकरभरती, मेट्रो, बससेवा, डीसीपीआर या महत्त्वाच्या प्रश्नांवर कोणताही तोडगा न निघाल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने नाशिककरांसह सत्ताधारी भाजपचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे आता दत्तक नाशिकचा विकास कसा होणार, अशी चिंता सत्ताधाऱ्यांसह नाशिककरांना सतावत आहे.

विसंबून राहू नका

मुख्यमंत्र्यांनी या वेळी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला आर्थिक शिस्तेचे धडे दिले. यासाठी त्यांनी चक्क लंडनच्या महापौरांचे उदाहरण दिले. लंडनचे महापौर स्वतः कॉफी तयार करून नागरिकांना देतात. त्यांचा आदर्श घेऊन महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत तयार करून स्वतःचा विकास करावा. सरकारवर विकासासाठी अवलंबून राहू नये, असा सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचीच आता पंचाईत झाली असून, ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी त्यांची अवस्था आहे.

दौऱ्याचा खर्चही वाया

दरम्यान, विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखा असून, मुख्यमंत्र्यांनी हा दौरा करण्याऐवजी दौऱ्याचा खर्च महापालिकेला दिला असता तरी चालले असते, अशी टीका केली आहे. विकासासाठी शहराला मोठे पॅकेज मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु मदतीऐवजी उपदेशाचे डोस ऐकावे लागले असून, नाशिककरांचीही घोर निराशा करणारा दौरा असल्याची टीका केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

मे महिन्यातील तापदायक उष्म्याने जिल्हावासीयांना हैराण केले आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्याने दिवसागणिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आजमितीस ६१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे.

समाधानकारक पाऊस आणि जलयुक्त शिवारच्या कामांमुळे यंदा ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहेत. परिणामी गत काही वर्षांच्या तुलनेत यंदा टँकरची मागणी कमी नोंदविण्यात आली असली तरी आता काही प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गतवर्षी धरणांमध्ये अवघा ७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा तो दुपटीहून अधिक शिल्लक आहे.

जिल्ह्यातील ९८ गावे आणि ९२ वाड्या अशा १९० गावांना सध्या २७ सरकारी आणि ३६ खासगी अशा एकूण ६३ टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. तर टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी आणि गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गतवर्षी याच कालावधीत १७९ गावे आणि ४०० वाड्या अशी ५७९ गावे तहानलेली होती. त्यांना १७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. तसेच ५९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. यंदा तुलनेने परिस्थिती समाधानकारक असून, बागलाण तालुक्यात सर्वाधिक १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबित बेडसेंनी फाइल्स नेल्या घरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक रवींद्र बेडसे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून, या कारवाईला मोठा कालावधी उलटला. मात्र अद्याप बेडसे यांच्याकडील कार्यभार हस्तांतरित करण्यात आलेला नाही. परिणामी धुळे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय कामावर मोठा परिणाम झाला आहे. बेडसे यांनी शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या अनेक फाईल्स सध्या टेबलवर नसून सरळ घरी घेऊन गेले आहेत. या प्रकरणाचीदेखील चौकशीची गरज आहे, अशी माहिती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘मटा’कडे बोलताना दिली.

धुळ्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतांचे अनेक प्रस्ताव रखडलेले आहेत. तर दुसरीकडे बेडसे यांनी त्यांच़ा वैयक्तिक स्वारस्य तसेच अर्थकारण लपलेल्या अनेक फाइल घरी घेऊन गेले आहेत, असेही बोलले जात आहे. या फाईल्स शिक्षणाधिकारी कार्यालयातच असणे आवश्यक आहे. मात्र यासंदर्भात खुद्द शिक्षणाधिकारीही अनभिज्ञ आहेत. असे असतांना त्या बेडसे यांनी घरी घेऊन जाणे ही बाब प्रशासकीय दस्तावेजांची चोरीच आहे. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी दररोज शिक्षणाधिकारी कार्यालयात कामकानिमित्त येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘मटा’कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images