Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कर्जपुरवठ्याऐवजी कर्मचाऱ्यांची चिंता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक संकटात सापडलेली जिल्हा बँक वाचेल की नाही यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झोप उडाली असताना बँकेचे राखणदार असलेले संचालक मात्र आपल्या कोट्यातील चारशे कंत्राटी कर्मचारी वाचवण्यासाठी धडपडत आहेत. जिल्हा बँकेला वाचवण्याऐवजी नोकरभरती प्रकरणात स्वत:च उखळ पांढरे करून घेण्याचा घाट संचालकांनी बँकेच्या आर्थिक संकटकाळातही घातला आहे.

शुक्रवारच्या बैठकीत बँकेच्या वसुलीच्या नावाखाली बोलविलेल्या मासिक बैठकीत संचालकांनी मागच्या दरवाजाने चक्क कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेत घेण्याच्या अर्जाच्या नोंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे न्यायप्रविष्ठ बाब असतानाही संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करण्याऐवजी कोट्यातील कर्मचाऱ्यांना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. त्यामुळे संचालकांच्या या कृतीचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध करून संताप व्यक्त केला आहे.

नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि संचालक मंडळ हे पदभार घेतल्यापासून विविध कारणांनी चर्चेत आहेत. विविध प्रकारची खरेदी असो की नोकरभरती त्यात बँकेचेच अधिक नुकसान झाले आहे. सध्या तर बँक आर्थिक दृष्टचक्रात सापडली आहे. शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज देण्यासाठी बँकेकडे दमडीही शिल्लक नाही. तर कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनीही कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांना आर्थिक मदतीसाठी शासनाकडे हात पसरावे लागले आहेत. शुक्रवारी संचालकमंडळाची बैठक झाली. त्यात रडकुंडीला आलेल्या ठेवीदारांना, नोकरदारांना त्यांचे हक्काचे पैसे कसे परत द्यायचे, पाच लाख सभासद शेतक-यांच्या खरीपाच्या पीककर्जाचं नियोजन कसं करायचे याबाबत बैठकीत चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र ते करण्याऐवजी संचालक मंडळांनं वादग्रस्त ठरलेल्या आणि न्यायालयीन चौकशीत अडकलेल्या ४०० अंशत: कर्मचा-यांच्या भरतीची नोंद कामकाजात करून घेण्यात धन्यता मानली. बँकेवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता असताना घाईगडबडीत जाताजाता स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी संचालक मंडळाने नोकरभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोट्यासाठी धडपड

प्रत्येक संचालकाला कोटा देऊन गैरव्यवहार करीत ही नोकरभरती झाल्याची तक्रार दोघा आमदारांनी सहकार खात्याकडे केली होती. त्यानंतर त्यास स्थगिती देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरण जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, कामगारांना २४० दिवस झाल्याने त्यांनी कायम करण्याचा अर्ज बँकेकडे केला. प्रशासनानेही तत्परतेने हा अर्ज बोर्डाच्या बैठकीत ठेवला मग संचालकांनाही तातडीने त्याची नोंद करून घेतली. ही प्रक्रिया सोपी असली ,तरी यामागे मोठे आर्थिक गणित असल्याची चर्चा आहे. प्रत्येक संचालकाला कोटा देवून ही भरती झाल्याचा आरोपही झाला आहे. ही भरती रद्द झाल्यास संचालकांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगारांना कायम करण्यासाठी धडपड सुरू आहे.


जिल्हा बँकेने आता कोणतीही भरती केलेली नाही. दीड वर्षापूर्वी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांसाठीची ही नियमित प्रक्रिया आहे. वकिलाच्या सूचनेनुसार केवळ या कर्मचाऱ्यांच्या अर्जाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीचा कोणताच विषय नाही.

- परवेझ कोकणी, प्रवक्ता, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलसंधारणाची स्पर्धा दिलासादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भूगर्भातून पाणी उपसा करण्याची जशी स्पर्धा सुरू आहे, तशीच स्पर्धा आता जलसंधारणात करण्याची वेळ आली आहे. मात्र, ही स्पर्धा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे, असा विश्वास जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील जलयुक्त कामांचा शनिवारी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. झोडगे येथे ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ योजनेच शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते. त्याच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे सीइओ दीपककुमार मीना, पंचायत समिती गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, कृषी अधिकारी गोकुळ देवरे, लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता बी. व्ही. देसले, दादाजी शेजवळ, सुवर्णा देसाई आदी उपस्थित होते.

झोडगे येथील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीचे निवेदन शिंदे यांना दिले. प्रगतीशील शेतकरी गुलाबराव देसाई यांच्या शेतानजीक सुरू असलेल्या सिमेंट प्लग बंधारा क्र १ च्या कामाची पाहणी केल्यानंतर शिंदे म्हणाले, जिल्ह्यात एकूण ५९ कामे या योजनेतंगर्त होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोनशे किलो भांग जप्त

$
0
0

धुळे : इंदूरकडून धुळ्याकडे खासगी कारमधून भांगची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वाहनाची तपासणी केली असता सोमवारी (दि. १) सायंकाळी एका इंडिगो (क्र. एमएच ३९ जे १४७८) कारमधून कोरड्या भांगची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या गाडीतून दोनशे किलो कोरडी भांग जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांकडून गाडीसह ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ रवींद्र राणा (रा. माधवपुरा पालाबाजार) आणि त्याचा जोडीदार राजेशभाऊ यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील राजेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला. चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे प्रेमराज पाटील यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर लिपिक बेडसेंचे निलंबन

$
0
0

शिक्षण उपसंचालकांकडून कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी गेल्या काही वर्षापासून खासगी व्यक्तीची कार्यालयातील कामांसाठी नियुक्ती केली होती. तर गेल्या काही वर्षांपासून बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक नियुक्तीचे प्रस्ताव मंजूर केले होते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक कागदपत्रांची अफरातफर करून आर्थिक फायदा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपिक बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘मटा’नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच बेडसे यांच्याविरोधात आमदार अनिल गोटेंसह शिक्षक संघटना व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी लिपिक रवींद्र बेडसे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यात लाच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कार्यालयातील लिपिक रवींद्र बेडसे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील पत्रव्यवहार, आमदार अनिल गोटे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केलेली तक्रार तसेच अनुसूचित जाती जमाती संघटना, नारायण पाटील, परशुराम पाकळे, संग्राम पाटील यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत लिपीक बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नेमण्यात आले आहे.

बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून जयहिंद शाळेतील शिक्षिका पुष्पा पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणदेखील सुरू केले होते. याप्रकरणी बेडसे यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय खेळाडूंना सवलतीचे गुण मिळावेत

$
0
0

धुळे : सरकार निर्णयानुसार ४२ खेळांव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने याबाबत इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरसकट सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा प्रशासनाला खेळाडूंनी दिले आहे.

निवेदनात, इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही शालेय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले आहे. सरावासाठी अभ्यासाचा वेळ खर्च केला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर इतर मुले आमची अवहेलना करतील, यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

यावेळी निवेदन देतांना जिल्ह्यातील खेळाडू ममता फटकाळ, दिपाली जोहरी, हर्षदा पाटील, रोहित गायकवाड, अश्विन पाटील, सोनू राजपूत आदी खेळाडू तथा क्रीडा शिक्षक मिनलकुमार वळवी, पंकज पाठक, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, प्रशिक्षक राकेश माळी, जगदीश वंजारी, जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपूर नगर परिषदेला ३ कोटींचे बक्षिस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरपूर नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी रुपयांचे बक्षिस देऊन गुरुवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांना मुंबई येथे गौरविण्यात आले.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली जात असून, सुरुवातीस संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत शिरपूर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातत्याने अतिशय चांगले काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार दि. २० एप्रिलला नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्याबाबत पहिल्या

नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट ब वर्ग नगर परिषदांमधून शिरपूर वरवाडे नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मुंबईला नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. याबद्दल शिरपूर शहरातील समस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी धुळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि. १०) बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर धुळ्यात येत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह पांझरा नदी काठावरील दुतर्फा रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. याशिवाय इतरही कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे.

साक्री रोडलगत सिंचन भवनामागे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच ७५ कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या पांझरा काठावरील दोन्ही बाजूच्या रस्ते कामाचाही शुभारंभ यावेळी करण्यात येणार असल्याचे आमदार गोटे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील डॉ. जगन्नाथ वाणींचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील विधायक चळवळीतील अग्रणी डॉ. जगन्नाथ वाणी (वय ८३) यांचे शनिवारी (दि. ६ मे) कॅनडामध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी १०.२२ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. कॅनडामधील कॅलगरी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ केले यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

खान्देशात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांनी डॉ. वाणी सर्वांना परिचित होते. त्यांना २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. ‘देवराई’ या मराठी चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यावर उपचारांनी मात करीत चार ते पाच वर्षे त्यांनी काढली. अशाही अवस्थेत ते मायदेशी येऊन संस्थेचे कामकाज पाहत होते. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत ते हिरिरीने सहभागी होत असत. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी कमलिनी वाणी यांचे निधन झाले. डॉ. वाणी यांच्या आजारपणात त्यांची बहीण पुष्पलता शिरुडे आणि बंधू चंद्रकांत केले नुकतेच त्यांना कॅनडात जाऊन भेटले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच डॉ. वाणी यांनी जगाचा निरोप घेतला.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले

डॉ. वाणी हे राष्ट्रसेवा दलाचे सैनिक होते. त्यांच्यावर सेवा दलातून झालेल्या संस्काराचे त्यांनी सोने केले. परदेशात स्थायिक असूनही मायदेशाकडे अर्थात धुळ्याकडे त्यांचे नेहमी लक्ष असे. त्यांनी स्थापन केलेली वैशिष्ट्यपूर्ण संस्था ही त्याचीच पावती आहे. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या रूपाने एक बहुआयामी व विधायक दृष्टीचे व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना खान्देशातून व्यक्त होत आहे.

डॉ. वाणींचा अल्प परिचय

- डॉ. वाणी यांनी शालेय शिक्षण धुळ्यात, उच्चशिक्षण पुण्यात व विद्यावाचस्पती ही पदवी कॅनडात घेतली.

- धुळ्यातील कृषी महाविद्यालय आणि पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील कालखंड सोडला तर त्यांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द कॅनडातच गेली.

- १९९६ मध्ये ते कॅलगरी विद्यापीठातून निवृत्त झाले.

- २०१२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही विमाशास्त्रीय विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी चालना दिली.

- मनोरुग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात अनेक उपक्रम राबविले.

- का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, स्किझोफ्रेनिया सोसायटीची स्थापना त्यांनी पुण्यात केली.

- शारदा नेत्रालय, बधभ्र पुनर्वसन संस्था असे विविध उपक्रम सुरू केले.

- कॅनडात वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी संस्थेची स्थापना केली.

- कॅलगरीत जागतिक संगीत अभ्यासक्रमदेखील त्यांनी सुरू केला.

- कॅनडात महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली.

- जनजागृतीसाठी ‘देवराई’, ‘एक कप च्या’ आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

- अनेक ग्रंथ प्रकाशन, अनेकविध पुरस्कार हे त्यांचे संचित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसंग्रामचा इशारा

$
0
0

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा उधळून लावणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी निवेदन देऊन दिला. तसेच शहराचे आमदार अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसंग्राम पक्षाने प्रसिद्धपत्रक काढून राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे. कोणाला व्यासपीठावर बसवायचे हा आमचा निर्णय असल्याचे त्यात म्ह‌टले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सोमवारी (दि. ८) जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आमदार गोटेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुंडाला व्यासपीठावर बसविल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. याला उत्तर म्हणून लोकसंग्राम पक्षाने एक प्रसिद्धपत्रक काढले आहे. यात व्यासपीठावर कोणाला बसवायचे हा आमचा अधिकार आहे. तुमचा काय संबंध? असे म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोरेंवर निशाणा साधला आहे. ‘सभा उधळायला दोन पायावर याल आणि जाताना कशावर जाल?’ याचा विचार करा, असेही यात म्हटले आहे. पत्रकावर दिलीप साळूंखे, अमोल सूर्यवंशी, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अपघातांत ९ ठार, १७ गंभीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत नऊ जण ठार, तर १७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. साक्री तालुक्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्याजवळ विचित्र असा तिहेरी अपघात झाला. यात चार जण ठार झाले. तर धुळ्याजवळील गुरुद्वाराजवळ झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी पिंपळनेरहून साक्री जात असताना रस्त्यावर असलेले खड्डे चुकविताना समोरून येणाऱ्या रिक्षावर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागून भरधाव वेगाने आलेली मोटारसायकल आदळली. त्या धडकेने मोटारसायकलच्या टाकीतून पेट्रोल पडून आग लागली. या आगीमु‍ळे मोटारसायकल व पिकअप गाडी जळाली. तर दुसरा अपघात टाटा सुमो ट्रकवर आदळल्याने झाला. या अपघातात सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले. यात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे चुकवणे जीवावर बेतले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्यावर महिन्द्रा पिकअप मालवाहू गाडी (एमएच १८/एए ७५२१) पिंपळनेरहून साक्रीकडे जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना समोरील अॅपे रिक्षावर (एमएच १८/१९३६) वर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागे भरधाव येणारी विनाक्रमांकाची मोटारसायकल पिकअप गाडीवर आदळली.


मोटारसायकलचे पेट्रोल बाहेर आल्याने काही क्षणातच मोटारसायकलसह पिकअपला आगीने वेढले. यात मोटारसायकलवरील संतोष प्रकाश डांबरे (वय २५), एकनाथ अप्पा माळीच (३५, दोन्ही रा. चिकसे ता. साक्री) आणि अॅपे रिक्षामधील संतोष नाना मोरे (६५), वसंत राघो अहिरराव (६८, रा. धाडणे, ता. साक्री) हे मृत्युमुखी पडले. जखमींमध्ये वंदना उत्तम बोरसे (वय ३५), मंगलाबाई वसंत गायकवाड (४०), सयाजी कैलास पवार (१२), उत्तम मन्साराम बोरसे (४५), जिभाऊ मालजी पवार (४०), जंगलू रामजी मालचे (४०), अविनाश भटू भदाणे (३२, सर्व रा. धाडणे ता. साक्री) यांचा समावेश आहे.


वधू-वर जखमी

दुसरी घटना शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ घडली. टाटा सुमो वाहन ट्रकवर आदळल्याने सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले, तर आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वर आणि वधूचा समावेश आहे. या अपघातात साजिदाबानो मुमताज अली (वय१७, रा. अजमेरानगर, चाळीसगाव रोड), जमिनाबानो रज्जब अली (३५, रा. तला मशिदीजवळ वडजाई रोड), रोजीनाबानो युनूस अन्सारी (१२ रा.फिरदोसनगर तिरंगा चौक), आमिन अहमद रज्जब अली (रा.फिरदोसनगर तिरंगाचौक), अदनान कलीम अन्सारी (८, फिरदोसनगर तिरंगाचौक) सर्वजण धुळे शहरातील राहणारे आहेत. जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी (दि. ९) सायंकाळी ओव्हरटेक करताना टाटा सुमो वाहन उभ्या असलेल्या डंपरवर आदळल्याने याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ऐंशी फुटी रोडलगत फिरदोस नगरातील नवविवाहित जोडप्यासह नातेवाईक मंडळी मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पीरबाबा दर्गावर दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला. यामध्ये सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर सुमो वाहन आदळले आणि तब्बल शंभर फुटांपर्यंत पलटी घेत गेले.

या अपघातातील सर्व मृत हे धुळे शहरातील राहणारे आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये महिला, मुली आणि मुलांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ हिरे मेडिकल कॉलेज आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी महामार्गावर उभ्या असलेल्या डंपर चालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अट्टल चोरट्यांना अटक

जळगाव : जिल्हा पेठ परिसरातील चोपडा मार्केटमधील सिगारेटच्या गोडावून मधून चोरट्यांनी २६ जानेवारीला ५२ लाख ९६ हजार रुपये किमतीचे ६७ सिगारेटचे बॅाक्स चोरून नेले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी पनवेल येथून तीन संशयितांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग युनिटमध्ये भ्रष्टाचार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील अपंग युनिट बंद झाल्यानंतर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत सामावून घेण्यासाठी सरकारने आदेश दिले होते. मात्र कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्या करण्यात आलेल्या नाहीत. धुळ्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची हीच परिस्थिती असून, प्रत्यक्षात कोणतेही काम आदेशाप्रमाणे झालेले नाही, असा धुळे जिल्हा परिषदेच्या बैठकीत सदस्य किरण पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी यासंदर्भात चौकशी समिती नियुक्त केल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि. १०) अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती मधुकर गर्दे, नूतन पाटील, लीलावती बेडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे उपस्थित होते.

बैठकीत अपंग युनिटचा विषय सदस्य किरण पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी, गतिमंद मुलांच्या बुद्धीमत्तेनुसार त्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्या यासाठी राज्यात अपंग युनिट स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. मात्र कालांतराने हे युनिट बंद झाले. त्यामुळे युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामावून घेण्याच्या सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोप किरण पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे याप्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी त्यांनी केली. बैठकीत तसा ठराव जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारित करून चौकशी समितीमध्ये सदस्य किरण पाटील, मधुकर गर्दे, विलास बिरारी यांचा समावेश केला आहे.



नोकरीसाठी लाखो रुपये

जिल्ह्यातील अपंग युनिट सद्यस्थितीत बंद आहे. मात्र अपंग युनिटमध्ये सामावून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. लाखो रुपये देऊनही युनिट बंद पडलेले आहे. तर कर्मचारी सेवेपासून वंचित झाले. ज्यांनी कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये नोकरीस लावण्यासाठी घेतले ते मालामाल झाले आहेत. त्यामुळे सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी अपंग युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांताधिकारी, तहसीलदारांविरूद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

वाळू ठेकेदार आणि बेजबाबदार महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावातील युवकाचा तापी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला होता. हा मृत्यू अवैध वाळू उत्खननामुळे झाला असल्याचा दावा करून शिंदखेडा न्यायालयाने प्रांताधिकारी, दोन तहसीलदार, दोन तलाठी, दोन मंडलाधिकारी आणि तीन वाळू ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

तापी नदीलगत शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथे वाळू ठेका मंजूर आहे. यासह ठेकेदारांनी शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील तापी नदी पात्रालगत अवैधपणे वाळूचे उत्खनन सुरू केले. परिणामी ५० फूट मोठा खड्डा तयार होऊन पाणी साचून त्यात पडून अक्कडसे येथील सतीश छोटू सैंदाणे (वय १९) हा तरुण मृत झाला होता. त्यामुळे संबंधित तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी वाळू उपशाबाबत अटीशर्तीचा भंग होत असतांना, अधिकाऱ्यांकडून देखरेख, कर्तव्यबजावणीत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याकडे फिर्यादीने न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार किशोर भगवान कोळी यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकारी, ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. ठेकेदाराने वाळूच्या ठेक्याची जागा आणि त्यांनी केलेल्या उल्लंघन, अटीशर्तीचा भंग याबाबतही तपास करून लवकरच दोषींना अटक करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक देविदास भोज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोधलेनगरला घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बोधलेनगर परिसरात घराच्या किचनचे गज वाकवून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिणे तसेच रोकड असा ४१ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

या प्रकरणी नितीन कोळशीराम गवई (रा. यशवंतनगर, बोधलेनगर) यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. गवई कुटुंबिय ९ मेपासून बाहेरगावी लग्नासाठी गेले होते.

या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी किचनच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. तसेच कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा ४१ हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. शनिवारी लग्नावरून परत आल्यानंतर गवई कुटुंबाच्या ही बाब निदर्शनास आली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरिक्षक शिंदे करत आहेत.

डीजेप्रकरणी गुन्हा

नाशिक : हळदी समारंभात नियमाकडे दुर्लक्ष करून डीजे वाजवल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्यातील तरतुदींसह कलम २९०, २९१ आणि मुंबई पोलिस अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राहुल संजय माने (१९, घोलपवाडा, देवळाली गाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. १२ मे रोजी रात्री उत्कर्षनगर, पीटीसीसमोर, त्र्यंबकरोड येथे हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोठ्या आवाजात डीजे वाजवण्याचे काम सुरू होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी मानेविरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास हवालदार गायकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या पर्यटनासाठी बारा कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. नाशिकच्या पर्यटनाला महत्त्व देण्यासाठी आतापर्यंत १२ कोटींचा निधी दिल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले.

आमदार सीमा हिरे यांनी सोमेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात रावल बोलत होते. याप्रसंगी जलसंधारण तथा गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पूजा करीत सोमेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सोमेश्वर मंदिर परिसराचा विकास व्हावा, अशी पर्यटकांची मागणी होती. पर्यटनाचा विकास व्हावा, या हेतून राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सर्वाधिक पर्यटकांची पसंती असलेल्या नाशिकच्या पर्यटन विकासासाठी १२ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नाशिकच्या तीन भाजपच्या आमदारांना पर्यटन विभागाकडून निधी दिला आहे. भविष्यातही नाशिकच्या पर्यटन विकासाला अधिक निधी देणार जाणार आहे, असेही रावल यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सोमेश्वर मंदिर स्ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, विजय साने, सुरेश पाटील, महेश हिरे आदी उपस्थित होते.

जादा पाच कोटींच्या निधीची मागणी

मतदारसंघात विविध विकासकामे केली जात असल्याचे आमदार हिरे यांनी उभी केली असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. यात पुरातन सोमेश्वर महादेवाच्या मंदिराचाही विकास व्हावा, अशी सातत्याने मागणी भक्तांची तसेच पर्यटनकांची होती. यासाठी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करून सोमेश्वर मंदिराच्या विकासासाठी निधी मिळविला. पहिल्या टप्प्यात सोमेश्वर मंदिरासमोर सभागृह व घाटचे सुशोभिकरण केले जाणार आहे. उर्वरित भागाच्या विकासासाठीदेखील पाच कोटींचा निधी पर्यटन विभागाकडे मागितल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले.

काळाराम मंदिरास रावल यांची भेट

पंचवटी : राज्याच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत काळाराम मंदिराचा विकास करण्यात येणार असून, यासाठी पाच कोटी निधी मंजूर झाला आहे. विकास कामांतर्गत केल्या जाणाऱ्या आराखड्याची माहिती घेण्यासाठी पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी काळाराम मंदिराची पाहणी करीत मंदिरात दर्शन घेतले. मंदिर ट्रस्टच्या वतीने रावल यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्री गुरुजी’चे पॅरामेडिकल कॉलेज

$
0
0



म. टा. प्रतिनिधी , नाशिक

व्यवसायाभिमुख, अल्पकालीन आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असलेले पॅरामेडिकल कोर्सेसचे उद्‍घाटन विख्यात रिलायबल ऑटोटेकचे डायरेक्टर आणि सीईओ राजेंद्र बागवे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. वसंतराव पवार स्मृती वैद्यकीय कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

रूढ पद्धतीने शिक्षण घेतलेल्या तरुणपिढीला रोजगार मिळणे अवघड झाले आहे. या समस्यांवर उपाय म्हणून श्रीगुरुजी रुग्णालय संचालित भारत सेवक समाज कम्युनिटी कॉलेज कोर्सेस सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्‍घाटक राजेंद्र बागवे, प्रमुख पाहुण्या डॉ. मृणाल पाटील यांच्यासह श्रीगुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर, कार्यवाह प्रवीण बुरकुले, बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या संस्थापक सदस्या डॉ. मंजू कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गेल्या नऊ वर्षातील श्री गुरुजी रुग्णालयाचा प्रवास कॅन्सरतज्ज्ञ डॉ. गिरीश बेद्रे यांनी उलगडून दाखविला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीकांत पंडित यांनी केले. सरकारी दवाखाने, खासगी दवाखाने, डायलेसिस सेंटर्स, रेडिओलॉजी सेंटर्स अशा अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी त्यांना उपलब्ध होतील. तसेच होम-केअर नर्सिंग व खाजगी रुग्णसेवा अशा अनेक स्वयंरोजगाराच्या संधीदेखील मिळतील, असे त्यांनी सांगितले.

डॉ. जयेश ढाके यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. राजेंद्र बागवे यांनी आपल्या भाषणात प्रशिक्षणार्थी स्वतःचे योगदान शोधता शोधता संपूर्ण हॉस्पिटलच्या गुणवत्तेत आणि सेवेत महत्त्वाची भूमिका पार पडू शकतो आणि तो संस्कार एखाद्या संस्थेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहराचा होतो हे त्यांनी एका उदाहरणासह पटवून सांगितले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर आणि देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथीद्वारे उत्तम रुग्णसेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

होमिओपॅथीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांची उत्तम सेवा होत आहे. राज्यात होमिओपॅथीच्या जागा वाढविण्याबाबत तसेच होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील. त्याबाबत आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिली.

राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समिती आणि फेडरेशनतर्फे ब्रह्मा रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. हेमंत सरवारे, डॉ. स्वप्नील महाजन, डॉ. निलेश जाधव, डॉ. प्रकाश राणे आदी उपस्थित होते. यावेळी सावरा म्हणाले क‌ी, होमिओपॅथीचा लाभ अधिकाधिक जनतेला व्हायला हवा. राज्यात होमिओपॅथीच्या जागा वाढविण्याबाबतही संबंधित मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. केंद्र सरकारशी संबंधित विविध मुद्यांबाबत राज्य सरकारतर्फे शिफारस करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानसारख्या विविध योजना सुरू केल्या आहेत. इंट्रीग्रटेड मेडिकल हब सुरू करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला असून त्यात ५० जागा होमिओपॅथीसाठी आहेत. होमिओपॅथीचे चांगले प्रशिक्षण अधिकाधिक डॉक्टरांना मिळायला हवे, अशी सरकारची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

नुकतेच नाशिक येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरांतर्गत २१ हजार ७०० शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णसेवेसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना वैद्यकीय क्षेत्रातून साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धरण परिसरातील जलप्रदूषण रोखावे’

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात घरगुती पाण्याची बचत, पाणी साठवण व संकलन, पाणी अपव्यय टाळणे, टंचाई भागात पाणी वितरण व्यवस्था व उपाययोजना करणे, शाळा व कॉलेजात जलजागृती रॅलीचे आयोजन करणे अशा एक ना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाकडून जलजागृती केली जात आहे. मात्र, धरण परिसरात होणाऱ्या जल प्रदूषणाबाबत जलसंपदा विभाग अनभिज्ञ असल्याची टीका जलयुक्त शिवार समिती सदस्य तथा जलतज्ज्ञ डॉ. किशोर कुंवर यांनी केली.

जलसंपदाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्रक डॉ. कंवर यांनी जारी केले आहे. गावे उन्हाळ्यात पाणी आटल्यानंतर धरण परिसरातील जो गाळपेरा करतात त्यामुळे धरणातील जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धरणाच्या चारही बाजूंना तेलासारखा तवंग निर्माण होत आहे. या प्रदूषणामुळे धरणातील जलजीवन तर विस्कळीत झालेच आहे. परंतु, मानवी जीवनावरही याचा भविष्यात मोठा दुष्परिणाम होणार आहे. धरण परिसरातील गाळपेऱ्यात कोबी व फ्लावरची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. या दोन्ही पिकांसाठी रासायनिक फवारणी दिवसाआड करावी लागते. रासायनिक औषधामधील नायट्रेट नावाचा घटक पाण्यात सूक्ष्मपणे विरघळत असल्याने धरणातील जलचर प्राण्यांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. तसेच या नायट्रेटमुळे जन्माला येणाऱ्या अपत्याला ब्ल्यू बेबी सिंड्रोम (जन्मत: निळसर त्वचा) नावाचा आजार होण्याची शक्यता आहे. धरण हे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असल्याने जलजागृती करताना विभागाने गाळपेऱ्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे त्यांनी सूचविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकानुसार करा योग्य पाणीनियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणात होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करण्याची नितांत गरज आहे. पिकानुसार पाणी वापराचे योग्य नियोजन करा, असे आवाहन राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी रविवारी शेतकऱ्यांना केले.

सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रा. शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, कार्यकारी अभियंता राजेश शिंदे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सरपंच संजय नागरे, अर्जुन बोडके आदी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले की, पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरते आहे. अनेक मान्यवर व्यक्ती आणि संस्थांनी या अभियानाशी स्वत:ला जोडून घेतले आहे. परिणामी अभियानातील लोकसहभाग वाढत असून अभियानामुळे शिवारात पाणी दिसू लागले आहे. भूजल पातळीत वाढ होण्यासही त्यामुळे मदत होते आहे. सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी ही योजना वरदान ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. धरणातील पाणीसाठा वाढावा आणि शेतकऱ्यांना सुपिक गाळ मिळावा यासाठी सरकारने सुरू केलेली ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजना जनतेचीच योजना असून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वडझिरे येथे सहा विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या १७ पैकी १५ कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर ८४ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यात २०१५-१६ मध्ये ३१ गावात आणि २०१६-१७ मध्ये २१ गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झाली आहेत. वडझिरे गावातील युवा मित्र संघटनेतर्फे चार किलोमीटर नाल्याचे खोलीकरण करण्यात येणार असून या सर्व कामांचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

शेतीत काळानुरूप बदल गरजेचा

पारंपरिक पध्दतीने शेती करण्याची प्रचलित पध्दती आजही सर्वदूर वापरली जाते. मात्र, काळानुरूप त्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. जमिनीचा कस तसेच पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन शेतीमध्ये कोणती पिके घ्यावीत याचे नियोजन व्हायला हवे. यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करायला हवा. ‘जलयुक्त’च्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवे, अशी अपेक्षा मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>