Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

$
0
0

शहरात विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी

टीम मटा

छत्रपती संभाजी महाराज यांची ३६० व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी सामाजिक संस्थांकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

‘राजेंवर मालिका व्हावी’

नाशिक : छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती युवा पिढीला व्हावी आणि त्यांच्या कार्याचा गौरवास्पद इतिहास सर्वसामान्यांना समजावा याकरिता एखादी मालिका तयार व्हायला हवी, असे प्रतिपादन महापालिकेचे स्थायी समिती सभापती शिवाजीराव गांगुर्डे यांनी सार्वजनिक वाचनालयात छत्रपती संभाजी महाराज यांची ३६० व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य अबाधित राहावे याकरिता अपार कष्ट घेतले, प्रचंड यातना सोसल्या. मुघलसम्राट औरंगजेब याचे हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याचे स्वप्न अखेरच्या क्षणापर्यंत हाणून पाडले. त्यामुळे संभाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास नवीन पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे.

यावेळी सावानाच्या वतीने शिवाजीराव गांगुर्डे यांचा सत्कार प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक नाट्यगृह सचिव डॉ. धर्माजी बोडके यांनी केले. सहसचिव अॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले. प्रसंगी संजय करंजकर, जयप्रकाश जातेगावकर, उदयकुमार मुंगी, प्रा. संगीता बाफना व शंकरराव बर्वे आदी उपस्थित होते.

आडगावात अभिवादन

आडगाव : धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आडगाव मधील ग्रामस्थांच्या वतीने आडगाव मारुती मंदिर सभागृहात संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या वेळी दिव्या शिंदे ,गार्गी शिंदे या दोन बालिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी उमेश शिंदे ,पोपट लभडे, बालाजी माळोदे, राजेश शिंदे, मधुकर नवले, एकनाथ मते, ज्ञानेश्वर शिंदे , संजय शिंदे, संजय माळोदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकरोडला आदरांजली

नाशिकरोड : पंचवटी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिकरोड येथील राहुल औटे, संतोष गायधनी, स्वप्नील पाळंदे, पुरुषोत्तम कोरडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात याप्रसंगी विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

जुने नाशकात कार्यक्रम

आडगाव : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिळेश्वर फ्रेंड्स सर्कल व एन. एस. जी. फाउंडेशनतर्फे जुने नाशिक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त जुने नाशिक (डिंगराळी) येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. धर्मवीर संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणातील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. तसेच राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले, अशी माहिती किरण पानकर यांनी दिली. प्रसंगी प्रफुल्ल पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी रोहित चव्हाण, सागर दवंडे, सचिन बिडकर, सूर्यकांत भांगरे, किरण मानके, संतोष ढमाले, राकेश जाधव, अमोल भडके, हर्षल पवार, विजय भडांगे, सुरेश निमबाले, रितेश पखाले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् पोलिसांनी दिले पक्ष्यांना जीवदान

$
0
0

१० बगळे व ४ पानकोंबड्यांना केले पक्षमित्राच्या स्वाधीन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सध्या उष्णता जास्त असल्याने पक्षी गार वाटेल असा निवारा शोधतात. पाण्यासाठीही वणवण भटकत असतात. अशावेळी पक्षी निवारा, पाणी न मिळाल्यास तडफडून पडतात. अनेक पक्षी निफाड येथील पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या पिंपळ व लिंबाच्या झाडावर येऊन बसतात. त्याचे प्रमाण उन्हामुळे वाढले असून, गेल्या काही दिवसांत या झाडांवर आलेल्या किंवा यावरून पडलेल्या पक्ष्यांना पोलिस निरीक्षकांनी पक्षीमित्र बिरजू पठाण यांच्या स्वाधीन केले आहे. यावरून पोलिसांचे पक्षीप्रेम अधोरेखित झाले आहे.

वाढत्या उन्हामुळे माणसाची लाहीलाही होत असतांना प्राण्यांनाही पाण्यामुळे कासावीस व्हावे लागत आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांचीही अवस्था बिकटच आहे. निफाड पोलिस स्टेशनच्या परिसरात असलेल्या झाडांवर अशा पक्ष्यांची रोजच हजेरी असते.

उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून गेल्या काही दिवसांत या झाडावर जखमी अवस्थेत असलेले १० बगळे व ४ पानकोंबड्या या खाली कोसळल्या होत्या. ही घटना येथील पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच येथील पत्रामित्राला बोलावून घेतले. तसेच येथील नगरसेवक दिलीप कापसेंसोबत हवालदार कोळपे, हवालदार गांगुर्डे, नंदू कापसे, श्याम गोळे, श्याम पगारे आदींनी या जखमी पक्ष्यांना पक्षीमित्र बिरजू पठाण यांच्या स्वाधीन केले. पठाण यांनी या सर्व पक्ष्यांची तीन चार दिवस उपचार करून ते बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा आकाशात भरारी घेण्यासाठी सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांमुळे भाविकांची त्र्यंबकला वाढली गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सुटी लागताच त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. त्यात वाढ होत असून, त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देतांना अडचणी येत आहे. यामध्ये चप्पल ठेवण्यासाठीदेखील जागा मिळत नसावी हे विशेष. बॅग, मोबाइल आदी सांभाळण्यासाठी खासगी लॉकर सेवा मिळते त्याकरिता भाविकांना काही रुपयांचा भुर्दंड बसतो. त्याची व्यवस्था देवस्थान ट्रस्ट करत नाही, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना किमान चप्पल ठेवण्यासाठी तरी जागा आणि कर्मचारी पुरविल्यास सेवा घडेल. मात्र याचा हेतूपुरस्कर विसर पडला आहे, असेच दिसते. मंदिराचे प्रवेशद्वारावर अस्ताव्यस्त पडलेला चपलांचा ढिगारा, तेथे दर्शन घेऊन परतलेले भाविक चपला शोधतात तेव्हा झालेल्या उलथापालथीत नेमकी आपलीच जोडी शोधणे अवघड होऊन बसते, अशीच काहीशी परिस्थिती सध्या दररोज पहावयास मिळत आहे.

घाईत असलेले भाविक दोनशे रुपये मोजून थेट दर्शनाची पावती घेतात मात्र त्यांनादेखील अशी उन्हात रांग लावावी लागते. मंदिरासमोरील चौक आणि रस्त्यावर दुकानदारी थाटल्याने असे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत नगरपालिका आणि पोलिस यांनी समन्वयाने हा पसारा हटविण्याची गरज आहे. गर्भगृहातील पार्वती माता प्राणप्रतिष्ठा पूर्वतयारी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सरकारला फुटत नाही पाझर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

महाराष्ट्रात आजपर्यंत चाळीस हजार शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्या तरी सरकारला पाझर फुटत नाही. हे देशातील सत्तर टक्के शेतकऱ्यांचे दुर्दैव असून सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्मक्लेश यात्रेत व एक जूनपासूनच्या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी केले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासाठी पुणे ते मुंबई काढण्यात येणार आहे. ही यात्रा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात येत असून, दि. २२ मे रोजी महात्मा फुले यांना वंदन करून फुले वाड्यापासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. तरी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी निघालेल्या आत्मक्लेश यात्रेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही वडघुलेंनी केले. नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर या शनी महाराज देवस्थान परिसरात आयोजित जिल्हा कार्यकारिणी बेठक व तालुका शेतकरी मेळाव्यात हंसराज वडघुले बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार होते. याप्रसंगी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव मोरे, डोंगरआप्पा पगार आदी मान्यवर उपस्थित होते.

सरकारला धडा शिकवा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संप पुकारला आहे. या संपात शेतकऱ्यांनी सहभागी होताना फक्त आपल्या परिवाराची गरज असेल इतकेच धान्य व भाजीपाला पिकवायचा आहे. तसेच मुंबर्इ पुणे व इतरही शहरात जाणारा भाजीपाला, दुध, धान्य या शेतमालाचा पुरवठा थांबवायचा आहे. जोपर्यंत शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही शहरात दूध व भाजीपाला जाऊ द्यायचा नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी करावा असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक नीलेश चव्हाण यांनी तर अशोक जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतिपद मनसेकडे?

$
0
0

भाजपला तीन; शिवसेनेला दोन सदस्यांची गरज

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एक प्रभागात चार सदस्य अशी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सातपूर विभागात भाजप ९, शिवसेना ८, मनसे २ तर आरपीआयने १ जागेवर विजय संपादन केला होता. यानंतर महापालिकेच्या सातपूर सभापती पदाच्या जागेवर मनसेने दावा केला आहे. तर भाजपला सभापतिपदासाठी दोन तर शिवसेनेला तीन जागा लागणार आहेत. यात आरपीआय शिवसेनेसोबत जाणार असल्याने मनसे मात्र भाजपच्या गोट्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सातपूर विभागात मनसेचे योगेश शेवरे यांना सभापती होण्याचा मान मिळणार आहे.

सातपूर प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला दोन जागांची, तर शिवसेनेलाही दोन जागेची गरज असणार आहे. आरपीआयच्या लोंढे शिवसेनेकडे असल्याने मनसेवरच भाजप व शिवसेनेची मदार असणार आहे. यामुळे सभापतिपदासाठी लागणाऱ्या ११ जागांच्या बलाबलसाठी ही रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये आता शेख नव्याने निवडून आलेले नगरसेवक मनसेचे शेवरे यांना सभापती पदावर बसविण्याच्या तयारीत आहेत. तसेच या पदावर मनसेनेच पहिला हक्क सांगितला असल्याचे नगरसेवक शेख यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

महापालिकेच्या सातपूर विभागात सभापतीपदासाठी सुरू असलेली ही रस्सीखेच चांगलीच रंगात आली आहे. यामध्ये आता या पदावर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी मनसेकडून या पदासाठी जमवाजमव सुरू आहे. तर भाजप आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी पुढे सरसावले आहे.

अशा परिस्थितीत शिवसेनेला आरपीआयच्या एक सदस्य सोबतीला घेऊनही त्यांना आणखी दोन नगरसेवकांचे समर्थन लागणार आहे. प्रत्येक पक्षाला सातपूर विभागाच्या सभापतिपदासाठी आपला जोर लावावा लागत आहे, असे चित्र आहे. या प्रभागातून सभापतिपदासाठी प्रत्येक पक्षाने अजून दावेदारांची नावे दिली नसली तरी, येत्या दिवसांत ते जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवाय अचानक नवीन चेहरा समोर येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मनसेने केलेल्या दाव्यामुळे आता नवीन सभापती हा मनसेचा होणार की दुसऱ्या पक्षाचा हे लवकरच कळेल. दुसरीकडे शिवसेनेसोबत आरपीआय जाणार आहे, तर मनसे भाजपसोबत घरोबा करून सभापतिपद आपल्याकडे खेचते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या विभागात शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांच्यासोबत संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे हे निवडून आले आहेत. तर भाजपचे दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, डॉ. वर्षा भालेराव हे निवडून आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांचे वेतन अडकले जिल्हा बँकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आयकर विभागाला देण्यात येणारी ४४ लाखांवर रक्कम एनडीसीसी बँकेने अद्याप न भरल्याने कर्मचाऱ्यांना घाम फुटला आहे. प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयकर भरूनही कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपयांचा आयकर थकल्याने आयकर खात्याने याप्रकरणी संबंधितावर कारवाईची तयारी सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

सद्यस्थितीला जिल्हा बँकेचे धनादेश जिल्हाभरात कुठेच आणि कोणत्याच बँकेत वटत नसल्याने यासंदर्भात विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने, शाखा कुलूप लावून बंद करणे, कर्मचाऱ्यांना कोंडणे, खातेदाराने पैसे मिळत नाही म्हणून स्वतःहून कोंडून घेणे असे प्रकार घडत आहेत. अनेक सरकारी कारभार जिल्हा बँकेमार्फतच चालतात तसेच तालुकास्तरावरील अनेक खात्यांचे कारभारसुद्धा यामार्फतच होतात. त्यातच निवृत्ती वेतनधारक वयोवृद्ध पैसे नसल्याने अंथरुणाला खिळले असून, अनेकांच्या कुटुंबात लग्नकार्यासाठी हक्काचा पैसा काढता येत नसल्याने अश्रू पुसायला कोणी नाही.जिल्हा बँकेच्या इगतपुरी शाखेत २२ मार्च रोजीच विहित धनादेशाद्वारे वर्ग करण्यात आले होते.

आयकर विभागाला उत्तर कोण देणार?

आयकर विभागाच्या ‘फॉर्म नंबर २४ क्यू’नुसार इगतपुरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यातील वेतनातून चालू आर्थिक वर्षातील आयकराची रक्कम मार्च महिन्यात जमा होणे आवश्यक होते. मात्र आता मे महिना उजाडला तरी रक्कम वर्ग न झाल्याने उद्भवणाऱ्या कारवाईला कोण जबाबदार राहील आणि दंडात्मक कारवाईला कोण उत्तर देईल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे

-----------------------------

बँकेच्या प्रशासकीय आणि अंतर्गत कारभारामुळे समस्या उद्भवत असून, तो हळूहळू सुरळीत होईल. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनासाठी तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून नवीन खाते नंबर व पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत या कार्यालयाकडे सादर करावी.

- शिवाजी आहिरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावला शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील बेजगाव येथील तरुण शेतकऱ्याने रविवारी (दि. १४) चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी याप्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

येथील मुरलीधर भीमा लहाने (३२) या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह गावात चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आला. लहाने यांचे गेल्यावर्षी लग्न झाले होते. त्याची पत्नी माहेरी लग्नाला गेली होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चुलते असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला औद्योगिक धोरणाची उत्सुकता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतातील औद्योगिक धोरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात महिला औद्योगिक धोरण लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत एका कार्यक्रमात दिल्यामुळे नाशिकच्या उद्योजिकांनी याचे स्वागत केले आहे. नाशिकमध्ये शंभरहून अधिक उद्योजिका आहेत. त्यातील मोठ्या उद्योगात संख्या कमी असली, तरी लघु उद्योगांमध्ये ती मोठी आहे. पण, शासनाने महिला उद्योग धोरण जाहीर केल्यानंतर त्यातून अनेक महिला पुढे येतील व त्यांना बळ मिळेल, अशी अपेक्षा असंख्य उद्योजिकांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत भारतीय औद्योगिक महासंघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्योगमंत्री देसाई यांनी महाराष्ट्र हे महिला औद्योगिक धोरण निश्चित करणारे भारतातील पहिले राज्य आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योगासाठी एक खिडकी (मैत्री) योजनेतून सेवा दिली जाते. लघु व मध्यम उद्योगांमधील शंभर कोटींपर्यंतचे भागभांडवल असलेल्या उद्योगांनाही एक खिडकी (मैत्री)कडून सर्वतोपरी सेवा दिली जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

--

समानतेसाठीचे पाऊल

उद्योजकांमध्ये महिलांचा सहभाग असला, तरी त्यांच्यासाठी विशेष योजना नाही. महिलांचा सहभाग उद्योग क्षेत्रातही समसमान असावा यासाठी हे धोरण असल्यामुळे महिलांना त्याचा विशेष आनंद आहे. पण, या धोरणात नेमके काय असेल व त्यातून महिलांना काय लाभ मिळेल, याची उत्सुकताही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेपत्ता महिलेची भोपाळला विक्री?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकलहरे येथील पहाडीबाबा झोपडपट्टीत राहणाऱ्या आशा सुरेश बोरुळे ही महिला एक एप्रिलपासून हरविल्याची तिच्या कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, आता आशाला पळवून नेत तिची मध्य प्रदेशातील भोपाळ येथे विक्री केल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

आशा या ४२ वर्षीय महिलेची पहाडीबाबा झोपडपट्टीत शेजारीच राहणाऱ्या बेबीबाई (पूर्ण नाव माहित नाही) या महिलेशी ओळख होती. बेबीबाईने आशाचा विश्वास संपादन करून तिला एक-दोन वेळा बाहेरगावीही नेले होते. आशाबरोबरच बेबीबाई हीदेखील एक एप्रिलपासून गायब आहे. आशाला बेबीबाईसोबत जातांना परिसरातील अन्य महिलांनी पाहिले होते. यादिवशी बेबीबाईने आशाला नाशिकरोड रेल्वे स्टेशनला नेले. तेथून त्या दोघी कल्याणला गेल्या. त्यानंतर काही दिवसांनी बेबीबाई पुन्हा एकलहरे येथे आली. परंतु, आशा न दिसल्याने तिच्या कुटुंबीयांनी बेबीबाईकडे चौकशी केली. ‘आशा कल्याणला असून ती दोन दिवसांनी येणार असल्याचे बेबीबाईने उत्तर दिल्याचे आशाच्या कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर बेबीबाई एकलहरे येथून पसार झाली. आशा न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी कल्याणमध्ये राहणाऱ्या तिच्या भावाकडे चौकशी केली. मात्र, आशा कल्याणला आली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर महिनाभरात बेबीबाई एकलहरे येथे आली असता आशाच्या कुटुंबीयांनी बेबीला पकडून नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणले. तेथे झालेल्या चौकशीत आशा व आपण भोपाळला गेल्याचे बेबीबाईने सांगितले. परंतु, आशाचे पुढे काय झाले? असे विचारले असता बेबीबाईने कानावर हात ठेवले. या प्रकाराने आशाच्या गायब होण्यामागचे गूढ वाढले आहे.

रॅकेट असल्याचा कुटुंबीयांचा दावा

बेबीबाई ही महिलांना फूस लावून पळवून नेणे आणि त्यांची परप्रांतात देह व्यापार करणाऱ्या टोळीच्या हवाली करण्याचे काम करीत असल्याचा संशय आशाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. आशाला अशाच टोळीच्या हवाली केल्याचाही त्यांचा आरोप आहे. बेबीबाईने फूस लावत आशाला रेल्वेने भुसावळपर्यंत नेले. तेथून पुढे दुसरी महिलेने तिला नेत अपहरण करून तिची मध्य प्रदेशात विक्री केल्याचा आरोप त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगांव खांब एसटीपीसाठी सक्तीने भूसंपादन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अमृत योजनेअंतर्गत पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्रासाठी मिळालेला ७५ कोटींचा निधी परत जाऊ नये म्हणून मलनिस्सारण केंद्राच्या प्रस्तावित जागेचे भूसंपादन बळपूर्वक करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत. भूसंपादन मोबदल्याची ८ कोटींची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावालादेखील स्थायीने मंजुरी दिली. दरम्यान, आर्थिक परिस्थितीचे कारण देत स्थायी समितीने भूसंपादनाचे उर्वरित सुमारे २६ कोटी रुपयांचे प्रस्ताव फेटाळत प्रशासनाकडे परत पाठविले आहेत. भूसंपादनाबाबत प्राधान्यक्रम ठरवावा, संपादनासाठी कॅश क्रेड‌िट काढण्यात यावे, त्यानंतरच प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले आहेत.

स्थायी समितीची बैठक सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. पिंपळगाव खांब येथे महापालिकेच्या माध्यमातून ३२ एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारले जात आहे. यासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अमृत योजनेच्या टप्पा २ अंतर्गत या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ५ हेक्टर जागेच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र संबंधित जागा मालकाने जागा देण्यास नकार देत महापालिकेविरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे. परंतु, सदर प्रकरणात भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे जम‌िनीचे भूसंपादन करता येऊ शकते. अमृत योजनेअंतर्गत या एसटीपीला मंजुरी मिळाली असून, तो वेळेत पूर्ण झाला नाही तर मात्र निधी परत जाऊ शकतो. असे झाले तर या प्रकल्पाच्या उभारणीसाठीच्या सर्व खर्चाची जबाबदारी महापालिकेच्या उचलावी लागेल. त्यामुळे या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी, अशी सूचना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्थायी सभेत केली. यावर सभापती गांगुर्डे यांनी सदर प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत असल्याचे जाहीर करीत प्रकल्प लवकर उभारण्यासाठी बळपूर्वक भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच यासाठी लागणारी रक्कमही तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाककडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा एसटीपीचा प्रश्न मार्गी लागू शकतो.


२६ कोटींचे प्रस्ताव फेटाळले

पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्राच्या प्रस्तावासह स्थायी समितीच्या विषयपटलावरील आणखी २६ कोटींचे भूसंपादनाचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले होते. परंतु, पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने या भूसंपादनाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचे आदेश देत सर्व प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविण्याची सूचना सदस्यांकडून करण्यात आली. त्यामुळे हे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. सोबतच भूसंपादनासाठी प्राधान्यक्रम ठरवण्याचे आणि भूसंपादनासाठी कॅश क्रेड‌िट देण्याच्या सूचना यावेळी सभापतींनी दिल्या.

गंगापूरसाठी सल्लागार नियुक्त

अमृत योजनेअंतर्गत गंगापूर गाव येथे १८ एमएलडी प्रतिदिन क्षमेतेचे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येत आहे. या मलनिस्सारण केंद्राच्या उभारणीसाठी ४० कोटी रुपयेही मंजूर झाले आहेत. त्यामुळे या केंद्रासाठी मे. यश इंजिनीअरिंग कन्सल्टंट प्रा. लि. औरंगाबाद या मक्तेदार संस्थेला सल्लागार नियुक्त करण्याच्या १८.३० लाख रुपये खर्चाच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे गंगापूर एसटीपीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान घसरल्याने काहीसा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्म्याचा सामना करणाऱ्या नाशिककरांना मे महिन्यातील काही दिवस दिलासादायक ठरत आहेत. तापमानात चढ-उतार होत असल्याने कधी तीव्र झळांचा त्रास करावा लागत असला, तरी काही वेळा ढगाळ वातावरणाचा अनुभवही घेता येत आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांत तापमानात चार अंशांची घट झाली असून, सोमवारी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शहरवासीयांना काहीसा दिलास मिळाला आहे.

थंड हवेचे ठिकाण अशी नाशिकची असलेली ओळख यंदाच्या उन्हाळ्याने पुसून टाकली. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याबरोबरच अनेक दिवस ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या अखेरपासूनच उन्हाच्या चटक्यांचा नाशिककरांना सामना करावा लागला. त्याचवेळी एप्रिल, मे महिन्यात उन्हाची काय परिस्थिती असेल, याबाबत नाशिककरांमध्ये चर्चा रंगत होत्या. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला वाढत जाणारा उन्हाचा तडाखा बसू लागला. मात्र, मे महिन्याच्या मध्यावर वातावरणातील चढ-उताराने काही दिवस दिलासा मिळाला आहे. शिवाय, तापमानात घसरण झाल्याने उन्हाचा तडाखाही कमी जाणवत आहे.

--

पाच दिवसांतील स्थिती

--

दिनांक कमाल तापमान

१५ मे ३६.२

१४ मे ३६.५

१३ मे ४०

१२ मे ४१.२

११ मे ३९.३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी खरेदीचा आता भाजपकडून घाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील दोनशे कोटींचा वादग्रस्त एलईडी खरेदीचा प्रस्ताव भ्रष्टाचारामुळे शासन दरबारी पडलेला असतानाच सत्ताधारी भाजपने नव्याने २५ कोटी रुपयांच्या एलईडी दिवे खरेदीचा घाट घातला आहे. शहरातील पाच हजार पथदिपांवर दिवे नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव मांडण्याच्या हालचाली सत्ताधारी भाजपने सुरू केल्या आहेत. या २५ कोटींच्या एलईडी दिवे खरेदीसाठी बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद करणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली.

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन दोन महिने झाले तरी विकासकामांचा प्रकाश पडत नसल्याने सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेतील एलईडी खरेदीतील दोनशे कोटींच्या घोटाळ्याचा वाद राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. हा वादग्रस्त एलईडीचा घोटाळा खोदून दोषींना शिक्षा होईल, असे भाजपच्या काळात अपेक्षित होते. परंतु, भाजपने हा एलईडी घोटाळा वादात असतांनाच आता नव्याने शहरात २५ कोटींचे एलईडी दिवे खरेदीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील पाच हजार पथदिपांवर अंधार असल्याचे सांगून त्यांच्यावर एलईडी दिवे बसवण्याचा दावा महापौर रंजना भानसी यांनी केला आहे. अनेक नागरिकांच्या असून, त्यामुळे दिवे बसविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र तरतूदही करण्यात येणार असून, महिनाभरात खरेदीचे अध्यादेशही दिले जाणार आहेत.

स्वच्छता आऊटसोर्सिंगने

नोकरभरतीला राज्य सरकारने हिरवा कंदील दिलेला नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांवर भार येत आहे. यांत्रिकी झाडू खरेदीला सफाई कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे महापौरांनी आता स्वच्छतेचे काम आऊटसोर्सिंगद्वारे करण्याचा मानस व्यक्त केला आहे. ठेकेदारी किंवा मानधनावर कर्मचारी भरून स्वच्छतेचे काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे पालिकेतील खासगीकरणाचे वारे जोमाने वाहण्यास सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाजपंचे बिलाचा ‘शॉक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

वीज वितरण कंपनीच्या अंदाजपंचे कारभारामुळे अनेकांना अव्वाच्या सव्वा बिले येत असल्याच्या तक्रारी देवळाली कॅम्प परिसरातून करण्यात येत आहेत. येथील जुनी स्टेशनवाडी परिसरात राहणाऱ्या भीमराव दगडू खडताळे या अतिसामान्य ग्राहकाला एप्रिल महिन्याचे चक्क २८ हजार ६९० रुपयांचे वीजबिल आले आहे. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांना धक्काच बसला आहे.

जानेवारी ते मार्चदरम्यान वीज वितरण कंपनीकडून खडताळे यांना साधारणपणे २०० रुपयांचे वीजबिल आलेले आहे. मात्र, एप्रिल महिन्याचा बिलाचा आकडा पाहून त्यांच्यासह कुटुंबीय चक्रावले आहेत. विशेष म्हणजे कंपनीकडून याच ग्राहकाला मोबाइलवर मेसेजद्वारे आलेल्या बिलाची रक्कम १६३० रुपये एवढी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकाला नेमका प्रकार काय आहे, तेच समजेनासे झाले आहे. देवळाली परिसरातील अनेक नागरिकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, गत महिन्याच्या तुलनेत या महिन्यात अनेकांनी जास्तीच्या रकमेची वीजबिले आली असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याशिवाय काही भागात १५ तारीख उलटून गेली, तरी असंख्य नागरिकांना वीजबिलेच मिळालेली नाहीत. त्यामुळे उशिरा बिल भरल्यास ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही महिन्यापासून अंदाजपंचे वाढविलेला भार, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना देवळाली परिसरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. एकमद अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. त्यातही नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. अनेकदा ग्राहकांनी फोन केल्यास तक्रार निवारण केंद्रावरचा फोनही उचलला जात नाही, अशा तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत.

--

रीडिंग घेण्यात कानकूच

उन्हाळा सुरू झाला, की सर्वसाधारणपणे वीजवापर वाढत असतो. या गोष्टीचा फायदा घेत खासगी कंत्राटदार प्रत्यक्ष ग्राहकाच्या घरापर्यंत न जाता रीडिंग घेत असल्याचा आरोपही परिसरातून केला जात आहे. याशिवाय अनेकदा महिना उलटून गेला, तरी रीडिंग घेतले जात नाही. उशिरा रीडिंग घेतले, की बिलाची रक्कम वाढते. त्यामुळे अनेक ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

--

आम्ही सर्वसाधारण झोपडीवजा घरामध्ये राहत आहोत. किरकोळ विद्युत उपकरणे वगळता घरात वीजवापर होत नाही. त्यामुळे २८ हजारांच्या बिलामुळे घरातील सदस्यांना शॉकच बसला आहे.

-राहुल खडताळे, नागरिक

--

चुकीच्या अथवा वाढीव वीजबिलांसंदर्भात योग्य ती तपासणी करण्यात येईल. संबंधित बिले चुकीची आढळल्यास वाणिज्य विभागामार्फत ती दुरुस्त करून देण्यात येतील.

-आर. व्ही. जाधव, अधिकारी, वीज कंपनी, देवळाली कॅम्प

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कोठडीतील संशयिताचे पलायन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरफोडीच्या गुन्ह्यातील चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिस स्टेशनमधून पोबारा केला. ही घटना सोमवारी सांयकाळच्या सुमारास घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, ग्रामीण पोलिसांसह शहर पोलिस फरार संशयिताचा शोध घेत आहेत.

संभाजी विलास कावळे (२३, रा. औदुंबर प्लाझा, औदुंबरनगर, अंबड लिंकरोड) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. लाखलगाव परिसरातील गौरव पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या सात संशयितांमध्ये कावळेचा सहभाग होता. याच गुन्ह्यात इतर संशयितासह कावळेला क्राइम ब्रँचच्या पथकाने आठ दिवसांपूर्वी अटक केली होती. मातोरी (ता. नाशिक) येथे घरफोडी केल्याचीही कबुली कावळेने दिली होती. मातोरी प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनने कोर्टाकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने तालुका पोलिस स्टेशनच्या पथकाने सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कावळेचा सेंट्रल जेलमधून ताबा घेतला. दुपारच्या सुमारास त्यास कोर्टात हजर केले. सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यानंतर, चौकशीसाठी कावळेला तालुका पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तेथे कोठडी नसल्याने कावळेला एका कोपऱ्यात बसवण्यात आले. सायंकाळी त्याने हातातील बेडी उघडून स्टेशनच्या मागील बाजूने धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बॉटनिकल’मधील झाडांना फुटला कंठ!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहराचे नवनिर्माण करण्याच्या हेतूने महापालिका निवडणूकीपूर्वी पांडवलेणीच्या मागील बाजूस नेहरू उद्यानात साकारलेल्या बॉटनिकल गार्डनचे गाजावाजा करून उद्‌घाटन करण्यात आले होते. येथील लेझर शोमधील बोलकी झाडे सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरत होती. मात्र, हा लेझर शो पंधरा दिवसांपासून बंद पडल्याने नागरिकांचा हिरमोड होत होता. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत लेझर शो बंद झाल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्‍त केली होती. मात्र, आता हा शो पुन्हा सुरू झाला असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

बॉटनिकल गार्डनमधील बोलक्या झाडांच्या लेझर शोच्या आकर्षणामुळेच या ठिकाणी नागरिक, पर्यटकांची गर्दी होत होती. परंतु, हा लेझर शोच बंद झाल्याने नागरिकांचा हिरमोड होत होता. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन पुण्यातील तंत्रज्ञांच्या सहकार्याने हा लेझर शो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर रविवारी या लेझर शोची चाचणी घेतल्यानंतर हा शो पूर्ववत सुरू झाला असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

शालेय सुटीच्या काळात लहान-थोरांची गर्दी वाढलेली असतानाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने बॉटनिकल गार्डनचे आकर्षण ठरलेला बोलक्या झाडांचा लेझर शो बंद पडला होता. त्याची दुरुस्ती करण्यात आली असली, तरी त्यात अनेक दिवस गेल्याने बॉटनिकल गार्डनला भेट देणाऱ्या दर्शकांचा भ्रमनिरास होत होता. मात्र, आता हा शो पुन्हा सुरू झाल्याने येथे पर्यटकांची संख्या निश्चितच वाढेल, असे येथील व्यवस्थापनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

--

विनातिकीटची मजा

विशेष म्हणजे रविवारी चाचणी घेण्यात येत असताना आलेल्या पर्यटकांना विनातिकीट हा शो दाखविण्यात आला. असंख्य पर्यटक, नागरिकांनी या विनातिकीट शोची मजा लुटली. शो सुरू झाल्यानंतर येथील गर्दी वाढल्याचेदेखील रविवारी व सोमवारी दिसून आले. येथील झाडे पुन्हा बोलकी झाल्याने पर्यटक, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापतिपदी सरोज आहिरे बिनविरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका सरोज आहिरे यांची तर उपसभापतिपदी कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांनी माघार घेतल्याने सभापतिपदाची निवड बिनविरोध होऊ शकली. दरम्यान, शिवसेनेच्या उमेदवारामुळे भाजपला फाटाफुटीची भीती वाटल्याने भाजपने बहुमत असतानाही व्हीप बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी दुपारी चार वाजता विभागीय अप्पर महसूल आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया झाली. भाजपचे पाच तर शिवसेनेचे तीन सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव सदस्य असल्याने भाजपचे स्पष्ट बहुमत होते. सभापती व उपसभापतिपदाच्या उमेदवारांसह भाग्यश्री ढोमसे, प्रियंका घाटे, शीतल माळोदे प्रथम हजर झाल्या. शिवसेनेच्या उमेदवार नयना गांगुर्डे यांच्या व्यतिरिक्त विरोधातील शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, पूनम मोगरे उपस्थित झाल्या. सर्वात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन सभागृहात उपस्थित झाल्या. विरोधातील सर्व सदस्य हजर होण्याच्या आतच नयना गांगुर्डे यांनी माघारीचा अर्ज मागे घेऊन सरोज आहिरे यांचा मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर कावेरी घुगे यांच्या विरोधात उमेदवारच नसल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.


समितीसाठी बजेटच्या पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या पाच टक्के निधीबरोबरच विविध प्रकल्पांसाठी शासनाकडून निधी आणला जाईल. तसेच अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाईल.

- सरोज आहिरे, सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटमार करणारे दोन तासांत जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोघा तरुणांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून मोबाइलसह सोन्याचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी दोन तासात जेरबंद केले. लुटीच्या घटनेनंतर संशयित कॉलेजरोड परिसरात फिरत होते. पंपिंग स्टेशन रस्त्यावर रविवारी (दि.१४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास लुटीची घटना घडली होती.

विसे चौक परिसरातून गणेश विष्णू सरकाते, विशाल दिपक अहिरे, प्रथमेश पगारे हे मित्र रविवारी दुपारी दुचाकीने (एमएच १५, डीएन ६९४२) सोमेश्वलकडे निघाले होते. पपिंग स्टेशनमार्गे ते विसे चौक येथे आले. यावेळी संशयित आरोपी सारनाथ गणकवार (२८, रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी) याने त्याच्या साथिदारासह दुचाकी आडवी लावत दोघांना थांबवले. तसेच सुमित याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून धमकावत तीन मोबाइल, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, एक हजाराची रोकड लुटून पळ काढला. यावेळी सुमीतने मोबाइल देण्यास नकार दिला. मात्र, चाकूचा धाक दाखवत तसेच मारहाण करीत संशयिताने दोघांकडील १५ हजार, तीन हजार तसेच ८०० रुपयांचे मोबाइल तसेच तीन हजार रुपयांचे सोन्याचे ओमपान असा मुद्देमाल घेऊन गंगापूर नाक्याच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी दोघा मित्रांनी जुना गंगापूर नाक्याच्या सिग्नलपर्यंत संशयित आरोपींचा पाठलाग केला. मात्र, सिग्नलचा दिवा हिरवा झाल्याने संशयित पुढे निघून गेले. पाठीमागून आलेल्या गणेश व सुमित येईपर्यंत सिग्नल पुन्हा लाल झाला. त्यामुळे या दोघांना चोरट्याचा पुढे पाठलाग करता आला नाही. या दोघांनी लागलीच सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठले. तिथे झाल्या प्रकाराची माहिती सांगितली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी लागलीच त्वरित एक शोधपथक तयार केले. दुसरीकडे, त्यांनी आपल्यासोबत साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन खासगी वाहनाने तपास सुरू केला. कॉलेजरोड परिसरात शोध सुरू असताना संशयित आरोपी गणकवार बिग बाजारजवळ सापडला. पोलिसांनी लागलीच त्याच्या मुसक्या आवळल्या. गणकवारचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिस त्याच्या मागावर आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचे समजते.

गच्चीवरून मोबाइल चोरी

कुटुंबीय झोपी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी गच्चीवर चढून महागडा मोबाइल पळविल्याची घटना सिडकोत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश वसंतराव दुसाने (रा. अचानक चौक, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. दुसाने कुटुंबीय रविवारी रात्री झोपण्यासाठी गच्चीवर गेले असता चोरीचा प्रकार घडला. सर्व झोपत असल्याची संधी साधत चोरट्यांनी उशी जवळ ठेवलेला २२ हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार हळदे करीत आहेत.

झंवरला २० पर्यंत कोठडी

सिन्नर फाटा : येथील नेहे मळा परिसरात चिमुरडीवरील बलात्कार प्रकणातील आरोपी सुभाष झंवर याची नाशिकच्या विशेष न्यायालयाने शनिवार २० मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. झंवर यास अटकेनंतर नाशिकरोड पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर झंवर याला संतप्त जमावाने बिटको चौकात बेदम चोप दिला होता.

शालिमारला जुगारी गजाआड

सतत वर्दळ असलेल्या शालिमार चौकात पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या तिघा जुगारींच्या पोलिसांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली. जुगारींच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे कर्मचारी श्रीकांत साळवे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शालिमार चौकातील हॉटेल हॉली डे प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस पथकाने छापा टाकला असता सिडकोतील राकेश कोळपकर व त्याचे दोन साथीदार जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून एक हजार २६० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

माऊलीनगरला चेन स्नॅचिंग

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना माऊलीनगर भागात रविवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा संतोष अहिरे (३२, रा. रघुपती सोसायटी, विद्युतभवन) या रविवारी रात्री शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. माऊलीनगर भागातील कॉलनीरोडने आहिरे पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक खोडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरिपावर पीककर्जाचे संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कृषी विभागाने चांगल्या पावसाच्या शक्यतेवर आधारित खरिपाचे नियोजन केले आह. मात्र, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पिककर्ज वाटपासाठी फुटकी कवडीही उपलब्ध नसल्याने यंदाच्या खरीप हंगामाचे नियोजित उद्दिष्ट्य साध्य होणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी यंदाही चांगली राहणार असल्याचा अंदाज असल्याने कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत तीन टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याचे जास्त उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळातील ५५ दिवसांत १०२ टक्के पाऊस झाला होता. यंदाही ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ तीन टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षीच्या २८ हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा २८ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. खताची मागणी गेल्या वर्षीच्या ७.२२ लाख वरून यंदा ११.१० लाख मेट्रीक टनवर पोचली आहे. तर ३ लाख ५हजार ३८५ क्विंटल बियाण्याची मागणी केलेली आहे. यंदा ४५ लाख ८५ हजार २९४ बी. टी. कापसाच्या पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे.

विभागातील ५ हजार २०८ गावांतील २८.५८ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप बहरणार आहे. यंदाच्या खरीप नियोजनानुसार भात, मका, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात वाढ तर ज्वारी व बाजरी या पिकांखालील क्षेत्रात घट होणार आहे. गेल्या वर्षीच्या खरिपाच्या तुलनेत यंदा तृणधान्याच्या पेरणीत दोन टक्के तर कडधान्याच्या पेरणीत चार टक्के वाढ प्रस्तावित आहे. २०१७ च्या खरिपातील गुणनियंत्रणासाठी विभागस्तरावर १, जिल्हास्तरावर ५ व तालुकास्तरावर ५४ अशी एकूण ६० भरारी पथके स्थापन केली आहेत.

कृषीचे नियोजन कोलमडणार?

शेतकऱ्यांना वेळेवर अर्थ सहाय्य मिळावे, यासाठी विविध वित्तीय संस्था प्रतिनिधींशी मेळावेही झाले. एक मे रोजीच्या ग्रामसभेतही या अभियानाबद्दल माहिती देण्यात आली. विभागात जिल्हा बँकेकडून ३७९७.९६ कोटी रुपये इतके पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले. मात्र नाशिक जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने कृषी विभागाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी अद्याप शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या ज्येष्ठांच्या जीवनात फुलली ‘खुशी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

स्वतःच्या घरी संपत्ती अन् समृद्धी सर्व काही पुरेसे असूनही केवळ रक्ताच्या नात्यांनीच अव्हेरल्याने ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाच्या आश्रयाला असलेल्या ६५ ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सोमवारी ‘खुशी’ फुलली. जागतिक कुटूंब दिनाच्या दिवशी नाशिकच्या ‘मानव उत्थान मंच’ ने ‘खुशी’ प्रकल्पाचा श्रीगणेशा केल्याने या ज्येष्ठांची कौटूंबिक स्नेह व प्रेमाची उणीव भरुन निघाली.

नाशिकच्या ‘मानव उत्थान मंच’च्या वतीने सामनगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात जागतिक कुटूंब दिनी ‘खुशी’ प्रकल्पाची सुरुवात झाली. माधवी घुमसाना, मानसी राका, ज्युलिएस ठकोरिया, अजिंक्य जाधव या आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या व चंदर नरसिंघानी या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून ‘खुशी’ हा प्रकल्प आकाराला आला आहे. सोमवारी या प्रकल्पाच्या लोगोचे पेंटिंग करुन या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना मानव उत्थान मंचच्या कार्यकर्त्यांनी नाश्‍ता दिला. ज्येष्ठ महिलांच्या हातावर मेहेंदी काढली.


विविध सोयी सुविधा उभारणार

‘खुशी’ प्रकल्पाद्वारे ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात वास्तव्यास असणाऱ्या ज्येष्ठांसाठी या ठिकाणी विविध सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत. या कामासाठी घोटी येथील जिंदाल कंपनीतील कामगारांसह दिल्ली व दुबई येथील नागरिकांनी आर्थिक मदत केली आहे. ‘खुशी’च्या पहिल्या टप्प्यात या वृद्धाश्रमातील इमारतींच्या रंगरंगोटीसह आकर्षक गार्डन उभारले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक इमारतीभोवती वृक्षांची लागवड केली जाणार आहे. ज्येष्ठांच्या करमणुकीसाठी एक अॅक्ट‌िव्ह‌िटी सेंटरही उभारले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक साहित्यही सोमवारी ‘मानव उत्थान‘मंच’ने वृद्धाश्रमाला दिले. ‘खुशी’च्या दुसऱ्या टप्प्यात या वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठांची महिन्यातून एकदा सहल, जेवण, वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले जाणार असल्याची माहिती जसवीर सिंग यांनी दिली.


‘खुशी’साठी यांनी दिला निधी

‘मदर्स डे’ निमित्ताने हिना पटेल, सीमा चौधरी, दक्षा भामरे, अफशा ताहेरी, दीप्ती चिटणीस, सुजाता खत्री, नीती चौहाण, अर्चना गुप्ता, पिंकी शर्मा, मीना बिस्ट, सरोज ज्याला, मंजू गोयल, ज्योती शर्मा, रीना ग्रोव्हर, बिन्नी शानी, लक्ष्मी मेहरा, अंजली गोस्वामी, शुभम गांजरे, रिचा शिंदे, नीरज कदम आदींनी ‘खुशी’ साठी स्वखुशीने निधी दिला. याप्रसंगी जगबीरसिंग, सचिन पाटील, निर्मल गोदा अभियानचे नितीन शुक्ला, नितीन राऊत, जितेंद्र भावे, ‘आवास’च्या भारती जाधव, सुनंदा जाधव, नेहा राऊत, पंकज जोशी, सौरभ चव्हाण, राजू बेहरा आदींनीही या उपक्रमात सहभागी होऊन ज्येष्ठांच्या जीवनात ‘खुशी’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे जगणे सुखकर नसल्याचे बघून वाईट वाटे. त्यांची एकटेपणाची जाणीव दूर व्हावी व ते खूश रहावेत यासाठी ‘खुशी’ उपक्रमाचे नियोजन केले.

-मानसी राका, आर्किटेक्चर विद्यार्थिनी

वृद्धाश्रमातील नागरिकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. उच्च शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर या ज्येष्ठांच्या जीवनात ‘खुशी’ भरण्यासाठी करणार आहे.

-माधवी घुमसाना, आर्किटेक्चर विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियुक्तीवरून सेनेत यादवी

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित १९ मेच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेतील यादवी उफाळून आली आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदी अॅड. शिवाजी सहाणे यांना परस्पर हटवून नगरसेवक प्रवीण तिदमे यांची नियुक्ती केल्याने पक्षात नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी मंत्री बबन घोलप यांनी ही नियुक्ती केली असली तरी, अशी नियुक्ती झालेली नाही. नवीन अध्यक्षाची नियुक्ती लवकरच करू, असे अॅड. सहाणे यांनी स्पष्ट केले आहे.

म्युनिसिपल कर्मचारी-कामगार हि शिवसेनेची अंगिकृत संघटना असून महापालिकेतील सर्वात मोठी संघटना आहे. महापालिका स्थापनेपासून कार्यरत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत अनेक प्रश्‍न सुटले आहे. माजी मंत्री बबन घोलप हे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. माजी नगरसेवक अशोक गवळी यांच्या निधनानंतर २०१२ मध्ये तत्कालिन नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे यांच्याकडे संघटनेची सूत्रे देण्यात आली. महापालिका निवडणूक न लढविल्याने अॅड. सहाणे राजकारणाच्या बाहेर असले तरी अद्यापही ते संघटनेचे अधिकृत अध्यक्ष आहेत. संघटनेच्या घटनेनुसार अध्यक्षपदावर अन्य सदस्यांची नियुक्ती करायची झाल्यास आधी बैठक बोलवावी लागते. त्यात प्रस्ताव सादर करून पदाधिकारी त्यातून नव्या अध्यक्षांची निवड करतात. मात्र, नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे सोमवारी अचानक सूत्रे सोपविण्यात आल्याने संघटनेत खळबळ उडाली. तिदमे यांच्यासह संघटनेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत विसपुते यांची वर्णी लागली आहे. या दोन्ही पदांची ‌नियुक्ती भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या आदेशाने केल्याचे नियुक्तीपत्र मााजी मंत्री बबन घोलप यांच्या हस्ते तिदमे यांना देण्यात आले. परंतु, या नव्या निवडीबाबत अॅड. सहाणे यांना कोणतीही माहिती नाही.

सदरची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा अॅड. सहाणे यांनी केला आहे. त्यामुळे निवडीच्या या प्रकारावरून शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढली आहे. ज्येष्ठ नेत्यांना सुध्दा निवडीची माहिती नाही. ‘एचएएल’मधील कामगार संघटनेचा अनुभव असल्याने तिदमे यांची निवड केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सहाणे यांना हटविण्यामागे अंतर्गत राजकारण असून त्यास महापालिकेच्या नाशिकरोडमधील निवडणूकीतील जय-पराजय कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

वादाची मुहूर्तावर पेरणी

महापालिका निवडणुकीत एबी फॉर्म वाटपावेळी शिवसेनेत ‘फ्री-स्टाइल’ झाली होती. तेव्हापासून सुरू असलेली धूसफुस अजूनही दिसून येत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटबाजीमुळे महापालिका निवडणुकीत

नाशिकरोड येथे शिवसेनेच्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला होता. उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. १९) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुद्दाम हा वाद उकरून काढल्याची चर्चा आहे. महापालिकेतील सध्याच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देवून शिवसेना डिस्टर्ब करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. ठाकरे ही गटबाजी कशी मोडतात, याकडे लक्ष लागून आहे.

माझ्या व्यावसायिक कारणामुळे यापुढे संघटनेचा अध्यक्ष राहणे मला शक्य नाही. नवीन अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करण्याबाबतचा निर्णय हे विद्यमान अध्यक्ष या नात्याने ज्येष्ठ आणि संस्थापक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला जाईल.
- अॅड. शिवाजी सहाणे, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images