Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मुडदे पडू द्यात; इंचभरही जागा देणार नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘‘आम्ही जमिनीचा मोबदला वाढवून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलोच नाही. त्यांनी मंत्रिमहोदयांशी चर्चा करून पर्यायी तोडगा काढावा, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, जिल्हाधिकारी आपल्याच तोऱ्यात. आमच्या जमिनी बारमाही बागायती असून, त्या कदापि देणार नाही. आमच्या प्रत्येक कुटुंबातील एक माणूस आत्महत्या करण्यास तयार आहे. आमचे मुडदे पडले तरी चालतील; पण आईला वाचविल्याशिवाय आम्ही राहणार नाही...!’’ हा निर्धार आहे शिवडे येथील शेतकऱ्यांचा. समृद्धी महामार्गासाठी एक इंचही जमीन न देण्याचा पवित्रा त्यांनी स्वीकारला असून, त्यामुळे प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया काही दिवस थांबविली जाण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गासाठी इगतपुरी तालुक्यात जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता सिन्नरमध्ये सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यास शिवडे येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शिवडे येथील शेतकरी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाजवळील सभागृहात येऊन बसले. प्रांताधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार मनोज खैरनार बैठकीला उपस्थित होते. मात्र, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. सुमारे अर्ध्या तासाने तेथे पोहोचले. प्रसिद्धिमाध्यमांनाही बैठकीला जाणीवपूर्वक बसू देण्यात आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी समृद्धी मार्ग कसा फायदेशीर आहे, याची शेतकऱ्यांना माहिती दिली. मात्र, आम्ही जमीन देणारच नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत जिल्हाधिकारी नव्हते. कोणत्याही परिस्थितीत मोजणी होणारच, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकरी संतापले. प्रशासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष रंगला. या प्रकल्पासाठी जाणाऱ्या जमिनी बागायती असून शेतकरी भूमिहीन होतील. गावातून मार्ग न्यायचाच असेल तर अलाइन्मेंट बदलावी, असा प्रस्तावही शेतकऱ्यांनी दिला. मात्र, प्रशासन आपल्या अडेलतट्टू भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर संतप्त शेतकरी सभागृहातून बाहेर पडले. मोजणीसाठी अधिकाऱ्यांना गावात प्रवेश करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. सामुदायिक आत्महत्येचा इशारा देऊन शेतकरी बैठकीतून बाहेर पडले. त्यामुळे हा प्रश्न चिघळण्याची शक्यता बळावली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हा रस्ता जिरायती क्षेत्रातून नेणार असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. आमच्या जमिनी बागायती आहेत. पोलिसांचा वापर करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू आहे. आंदोलन केले म्हणून पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. ओझर ते आडगाव चार वेळा फिरविले. रात्रभर उपाशी ठेवले. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो.
- उल्हास वाघ, ग्रामस्थ

दोन नेत्यांच्या हव्यासापोटी हजारो कुटुंबे उद््ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही. भलेही आम्ही गोळ्या झेलू. मातेसाठी प्राण देऊ; पण जमिनी देणार नाही.
- दिलीप हारक

सरकार आणि अधिकारी ब्रिटिशांपेक्षा वाईट वागते आहे. नुकसानभरपाई काय देणार हेदेखील सांगत नाही. नोटीस लावली जात नाही. त्यामुळे मुंबईजवळ एक मोठे आंदोलन आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय सर्वेक्षण करू नये, अशी आमची मागणी आहे.
- विश्वनाथ पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाडच्या उपनगराध्यक्षांचे पद रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे निफाड येथील नगरपंचयातीच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांनी काढले आहे. यात शिवसेनेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जावेद शेख यांच्यासह भाजपचे लक्ष्मी पवार, एकनाथ तळवाडे, मंगला वाघ, तर शिवसेनेचे आनंद बिवाल यांचा समावेश आहे.

शासकीय जागेत अतिक्रमण केल्याने या नगरसेवकांच्या विरोधात मोहन जाधव, साहेबराव बर्डे, अरुण झोटिंग, दिनकर धारराव, गणेश कुंदे यांनी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या ४४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याचे तक्रारकर्त्यांनी सप्रमाण निदर्शनास आणून स्याने उपनगराध्यक्षांसह पाच जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवून त्यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.

जागांवर अतिक्रमण करून निवास करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने मोहन जाधव यांच्यासह पाच जणांनी २७ नोव्हेंबर २०१५ रोजी या नगरसेवकांविरुद्ध थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निफाड नगरपंचयातीच्या नगरसेवकांनी केलेल्या अतिक्रमणाची दखल घेत उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर २०१६ रोजी या प्रकरणी आठ आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर मोहन जाधव यांच्यासह पाच जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी बगाटे यांच्यासमोर झाली. या सुनावणीत लक्ष्मी पवार या शासकीय जागेवर, एकनाथ तळवाडे गायरान जमिनीवर, आनंद बिवाल गायरान व बेघर लोकांच्या वस्तीच्या जागेत राहत असल्याचे सुनावणीत सिद्ध झाले. मंगला वाघ यांनीही बेघरांच्या जागेत वस्ती थाटल्याचे सिद्ध झाले, तर उपनगराध्यक्ष जावेद शेख हे आप्तांच्या अतिक्रमित जागेवर राहत असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांना अप्पर जिल्हाधिकारी बगाटे यांनी अपात्र ठरविले असून, त्यांनी केलेली अतिक्रमणांवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार हटविण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

आमच्याविरोधात असलेल्या तक्रारीचा निकाल देताना कागदपत्रांचा चुकीचा संदर्भ लावण्यात आला आहे. माझ्या स्वतःच्या नावावर अतिक्रमण नसताना, शिवाय नगरपंचायतीने तसे स्पष्ट केले असतानाही माझ्याविरोधात निकाल दिला असून, या विरोधात न्यायालयात अपील करणार असल्याचे जावेद शेख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचत जावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्याकडील वाचलेले एक पुस्तक द्यावे आणि मांडून ठेवलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक घेऊन जावे, अशी अनोखी योजना ‘ग्रंथ तुमच्या दारी’च्या माध्यमातून मंगळवारी सुरू करण्यात आली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतील या अनोख्या उपक्रमाचे उद्‍घाटन नगरसेविका हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विनायक रानडे, लोकेश शेवडे, अरूण नेवासकर, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, विलास लोणारी, सचिन शिंदे, हर्षवर्धन कडेपूरकर, अजय निकम, विनायक जोशी उपस्थित होते. हेमलता पाटील म्हणाल्या की, वाचून झालेल्या पुस्तकांचा यानिमित्ताने उपयोग होणार आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू होत असल्याचा आनंद असल्याचेही पाटील म्हणाल्या.

टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम झाला. या उपक्रमात दर्जेदार साहित्याची शेकडो पुस्तके उपलब्ध असून, वाचकांनी स्वत:ला आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जावे व स्वत:चे एक पुस्तक देऊन जावे. त्यातून आपल्याला मिळालेला पुस्तक वाचनाचा आनंद इतरांनाही मिळावा हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे अनेक वाचकांच्या घरी वाचून झालेल्या पुस्तकांना नवीन वाचक मिळतील आणि स्वत:चीही ग्रंथ समृद्धी वाढेल. ही योजना रविवार, २३ एप्रिल २०१७ पर्यंत असून जगभर हा दिवस थोर नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन व जागतिक वाचकदिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच ‘पुस्तक घ्यावे.. पुस्तक घ्यावे व अखंड वाचीत जावे’ हा विचार रूजविणे यामागे आहे. कालांतराने ही योजना संपूर्ण नाशिकमध्ये फिरविण्यात येणार आहे.

या पुस्तकांचा समावेश

रवीन्द्र भावांजली : डॉ. राम म्हैसाळकर, गोलपिठा : नामदेव ढसाळ, पतंजल योगदर्शन : स्वामी आनंदऋषीजी, आर्त मनाचे : संतोष हुदलीकर, पिता पुत्र : रमेश सूर्यवंशी, मी भरून पावले आहे : मेहरूल‌िया दलवाई, चालू घडामोडी : ग. वि. शेवाळकर, प्रकाशाची दारे : वि.वा.शिरवाडकर, यशवंत चिंतनिका, अनंत कान्हेरे : म.बा.कुलकर्णी, परिघाबाहेर : उषा तांबे यांसह काही धार्मिक पुस्तकांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्त नोटांचे करायचे काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चलनातून बाद झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या खऱ्या; मात्र या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न पोलिसांना सतावतो आहे. त्यांनी या प्रकरणी आयकर (इन्कम टॅक्स) विभागासह कोर्टालाही पत्र दिले असून, येथून काय प्रतिसाद मिळतो, याची वाट पाहण्याचे काम पोलिस करीत आहे.

मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी पाच संशयितांना जेरबंद करीत त्यांच्याकडून या नोटा जप्त केल्या. या प्रकरणामागे कृष्णा होळकर हा प्रमुख सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. उर्वरित चार सराफ व्यावसायिक असून, या सर्वांची चौकशी पोलिसांनी केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर तसेच नोटा बदलून देण्याची मर्यादा संपल्यानंतर इतका मोठा नोटांचा साठा सापडल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होते आहे. संशयितांकडून जप्त केलेल्या नोटांमध्ये पाचशेच्या १३ हजार ५०० नोटा आढळून आल्या आहेत. ६७ लाख ५० हजार रुपये मूल्याच्या या नोटा आहेत. एक हजाराच्या तीन हजार २४५ नोटा आढळून आल्या. या नोटांचे मूल्य ३२ लाख ४५ हजार रुपये एवढे आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांचे करायचे काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. पोलिसांनी सदर कारवाई झाल्यानंतर लागलीच इन्कम टॅक्स विभागाला पत्र दिले. सदर विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून काळा पैसा असेल तर तशी तक्रार देणे अपेक्षित असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मंगळवारी रात्रीपर्यंत इन्कम टॅक्स विभागाकडून संपर्क साधण्यात आला नव्हता, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या रोकडचे काय करावे, या बाबतचे एक पत्र कोर्टाला देण्यात आले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कारण गुलदस्त्यात

अगदी कानाकोपऱ्यात सापडलेली एखादी एक हजार किंवा पाचशे रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मेहनत घेतली. ३१ मार्च रोजी मुंबईतील भारतीय रिर्झव्ह बँकेसमोर नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. दुसरीकडे संशयित मात्र तब्बल एक कोटी रुपये दाबून बसले. सर्वांच्या दृष्टीने ही फारच महत्त्वाची बाब असून, त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

‘एनआरआय’ची चर्चा

गुन्ह्यात पोलिसांनी कृष्णा हनुमंत होळकर (५०, रा. गंगापूर गाव, ता. राहुरी), सागर सुभाष कुलथे (३०) आणि योगेश रवींद्र नागरे (३२, दोघेही रा. द्वारका, नाशिक), मिलिंद नारायण कुलथे (४०), शिवाजी दिंगबर मैंद (३५, दोघेही रा. संगमनेर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले होते. कृष्णा होळकर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून, अन्य चौघे सराफ व्यावसायिक आहेत. होळकर स्वतः किंवा त्याचा एक नातेवाईक भारतीय परदेशी नागरिक असल्याची चर्चा आहे. भारतीय परदेशी नागरिकांना नोटा बदलून देण्यासाठी जूनपर्यंत आवकाश असून, त्या अनुषंगाने हे रॅकेट सुरू असल्याचे सांगितले जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीस हायकोर्टाची दोन आठवडे मनाई

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या वतीने वृक्षतोड करण्याच्या मोहीमेला हायकोर्टाने आणखी दोन आठवडे अंतरिम मनाई दिली आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे महापालिकेने सोमवारी पुनर्लागवड आणि नवीन वृक्षारोपणासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले. पालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर अभ्यास करण्यासाठी याचिका कर्त्यांकडून दोन आठवड्यांची मुदत मागण्यात आली. त्यामुळे हायकोर्टाने याचिका कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत, वृक्षतोड करण्यास अजून दोन आठवडे स्थगिती कायम ठेवली आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींना दिलासा मिळाला आहे.

सर्व पूर्तता आवश्यक
पंचवटी ः नव्या विकास आराखड्यानुसार पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षरोपणास मोठ्या प्रमाणात जागा ठेवावी लागणार आहे. विकासकाला प्लॉटचा विकास करताना रस्ते, पथदीप, भूम‌िगत गटारी, रेनवॉटर हार्वेस्ट‌िंग या सर्व बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्याशिवाय बांधकामासाठी परवानगी मिळणार नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विवेक जायखेडकर यांनी केले. रोटरी क्लब आफ नाशिक यांच्यातर्फे डेव्हलपमेंट कंट्रोल अॅण्ड प्रमोशन रेग्युलेश्न फॉर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. रोटरी हॉल येथे झालेल्या कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष अनिल सुकेणकर, सचिव राधेय येवले, अजय राका, सुरेखा राजपूत आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्यांचे मानले आभार
सिन्नर फाटा : नाशिकरोड येथील भारत प्रतिभुती मुदर्णालय व चलार्थ पत्र मुद्रणालय कामगारांना सातवा वेतन आयोग मंजूर केल्याबद्दल आयएसपी मजदूर संघाचे माजी जनरल सेक्रेटरी रामभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थराज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल यांची नवी दिल्लीत नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांच्या वतीने मेघवाल यांचे आभार मानले. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित होते. प्रेसच्या आपला पॅनलचे रामभाऊ जगताप, अशोक गायधनी, हरिभाऊ ढिकले, विष्णू काळे आदींनी यापूर्वीही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व अर्थराज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेतली होती.

उपाध्यक्षासह दोन नगरसेवकांना नोटीस

देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या अध्यक्षांनी विद्यमान उपाध्यक्षांसह दोन नगरसेवकांना अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस दिल्याचे माह‌िती अधिकारात समोर आले आहे. छावणी परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर आढाव. नगरसेवक सचिन ठाकरे, नगरसेविका प्रभावती धिवरे या तीन लोकप्रतिन‌िधींना मागील महिन्यात छावणी प्रशासनाने नियमानुसार मंजूर कामापेक्षा वाढीव बांधकाम करताना अनधिकृतपणे बांधकाम काम केल्याचे नोटिशीत म्हटले आहे. प्रशासनाने तीनही लोकप्रतिन‌िधींचे वाढीव बांधकामासंदर्भात लेखी उत्तर मिळाले असून, प्रशासनाने त्यांना दुसऱ्यांदा नोटीस दिली आहे. छावणी परिषद २००६ च्या नियमान्वये कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिन धावले; डबे राहिले मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसच्या मधल्या बोग्यांचे कपलिंग (जोड) निघाल्याने रेल्वे मनमाड स्थानकातून निघालेल्या १६ डब्यांच्या रेल्वे इंजिनाचे केवळ तीनच डबे पुढे निघून गेल्याची घटना मंगळवारी सव्वापाचच्या सुमारास घडली. इंजिनाला जोडून असलेले तीन डबे चाळीस फूट पुढे निघून गेल्यानंतर कळले, की उर्वरित तेरा डबे मनमाड स्थानकातच राहिले! यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला, तर रेल्वे फलाटावर प्रवाशांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.

हा सर्व प्रकार रेल्वे गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने रेल्वेचालकाशी संपर्क साधून पुढे गेलेली गाडी पुन्हा मागे रेल्वे स्थानकात घेतली व चालकाने कपलिंग निघालेले डबे जोडून नंतर रेल्वे मार्गस्थ झाली. या बाबत मिळालेली माहिती अशी, की १६ डब्यांची नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस सायंकाळी पाच वाजता मनमाड स्थानकात आली व काही काळ थांबल्यानंतर सव्वापाचच्या सुमारास मुंबईकडे निघाली. मात्र, या गाडीचे इंजिनासह चार डबेच पुढे गेले. उर्वरित १३ डबे रेल्वे स्थानकातच राहिले. इंजिन थेट ३० ते ४० फूट अंतरावर रेल्वे बंधाऱ्याच्या पुढे निघून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच प्रवाशांचा गोंधळ उडाला, तर रेल्वे गार्डने हा प्रकार लक्षात येताच वॉकीटॉकीवरून रेल्वेचालकाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गाडी पुन्हा रेल्वे स्थानकात आणण्यात आली. चालकाने इतर तंत्रज्ञांच्या मदतीने डबे जोडल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. गाडी स्थानकातून बाहेर पडली तेव्हा जास्त वेग नव्हता. वेळीच माहिती दिल्याने ती माघारी आणता आली. ती आणखी काही फूट पुढे गेली असती तर गाडी मागे आणणेदेखील जिकिरीचे ठरले असते. गाडी निघाल्यानंतर जोरात झटका बसला, की कपलिंग निघू शकते, असे रेल्वेचालकाचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समता सप्ताहात योजनांची माहिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्ताने सुरू असलेल्या सामाजिक समता सप्ताहात नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्‍घाटन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती प्राची वाजे यांच्या हस्ते झाले.

अण्णा भाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. आरणे, अपंग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शंकर नागरे, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संगीता पराते, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. सावंत आदी उपस्थित होते. लाभार्थींना योजनांच्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या. समीर क्षत्रीय, सुभाष फड, एम. एम. गांगुर्डे, व्ही. एस. ताके, एन. आर. नागरे, मधुकर डावरे, ओमेश पवार, एन. व्ही. खांडवी, व्ही. जी. भावसार, मंगेश शेलार, शंतनू सावकार यांनी संयोजन केले. एस. बी. त्रिभूवन यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विद्यापीठाच्या पेपरमध्ये मराठीचे ‘पाणीपत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी भाषा ही वळवावी तशी वळते, असे म्हटले जात असले तरी तिचा ठेका घेऊन ठेवलेल्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेतच अक्षम्य अशा चुका होणार असतील तर मराठीजनांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे असा सवाल उपस्थित होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसवायबीएच्या प्रश्नपत्रिकेत मराठी भाषेचे ‘पाणीपत’ झाल्याचे प्रश्नपत्रिकेत दिसून आले आहे. अत्यंत सोपे आणि प्रचलित शब्द चुकल्याचे निदर्शनास आले. पानिपतऐवजी 'पाणीपत', पानतावणेऐवजी ‘पानतापणे’ असे बरेचसे शब्द चुकीचे वापरण्यात आले असून, ते विद्यार्थ्यांच्याही लक्षात आले नाहीत हे केवढे दुर्दैव आहे!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विषयांच्या लेखी परीक्षा सध्या घेतल्या जात आहेत. एस.वाय.बी.ए.ची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली असता मराठी भाषेचे ‘पानिपत’ झाल्याचे दिसून आले. सारांश लेखनाच्या उताऱ्यात मन:पूर्वकऐवजी ‘मन:पून’, अफाटऐवजी ‘अकाट’, पानिपतऐवजी ‘पाणीपत’, पानतावणेऐवजी ‘पानतापणे’, दूरदृष्टीऐवजी ‘दूरदृष्टा’, नैराश्यऐवजी ‘नेराश्य’, व्यवहारऐवजी ‘व्यावाहार’ अशा ‘नवीन’ शब्दांची मेजवानी विद्यापीठाच्या मराठी विभागाने विद्यार्थ्यांना दिली. याशिवाय आवश्यक तेथे विरामचिन्हांचा वापर प्रश्नपत्रिकेत करण्यात आला नसल्याचेही दिसून आले.

याच विषयाच्या बहिर्गत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतही अशाच काही चुका झाल्याचे दिसून आले. वीसऐवजी ‘बीस’, न्यूयॉर्कऐवजी ‘न्यूयार्क’ अशा चुका झाल्या आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून एकीकडे मागणी केली जात असताना विद्यापीठ पातळीवर मराठी भाषेचे पानिपत आणि 'पाणीपत' होत असल्याची ही शोकांतिकाच आहे. शब्द चुकले असल्याची तक्रार एकाही विद्यार्थ्याने केली नाही, मराठी भाषा शिक्षणाच्या दर्जा आणि गुणवत्तेची ही आणखी एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लव्हबर्डस’चा चिवचिवाट थांबेना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी प्रेमीयुगलांचे सुरू असलेले चाळे काही कमी होऊ शकलेले नाही. तरुणाईच्या या अविवेकी आणि अनिर्बंध वागण्यावर पालकांसह स्थानिक प्रशासन, पोलिस यांपैकी कुणाचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी प्रेमीयुगल सार्वजनिक ठिकाणी दिवसाढवळ्या चाळे करतात. त्यांना कोणी जाब विचारला तर त्यालाच धमकाविण्यापर्यंत त्यांची मजल जाते. भाई लोकांचे बॅकिंग असल्याने हे लवबर्डस अधिकच निर्ढावलेले आहेत. चुकीचे पाऊल टाकण्याची मुलींमध्ये वाढलेले प्रवृत्तीही घातक ठरत आहे.

महापालिकेची उद्याने ही त्यांची आश्रयस्थाने ठरलेली आहेत. नाशिकरोडच्या सोमानी गार्डनमध्ये तर दुपारी बारा वाजेनंतर कॉलेज तरुण-तरुणींचेच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांचीही गर्दी दिसून येते. मुली तोंडाला स्कार्फ बांधून या मुलांच्या बाइकवर बसून निर्जन ठिकाणी जातात. सोमानी गार्डनमध्ये सायंकाळी गर्दी असतानाही प्रेमीयुगुले बसलेली असतात. त्यामुळे चांगल्या घरच्या महिला-मुलींनाच अवघडल्या सारखे होते. मुक्तिधाम, जेलरोड, उपनगर, देवळालीगाव, गोदाघाट आदी ठिकाणी महापालिकेची गार्डन ओसाड पडलेली असतात. तेथेही प्रेमवीरांची संख्या जास्त असते.

पोलिस कारवाई हवी

नाशिकरोडला शैक्षणिगक संस्थांना गुंड मुलांनी टार्गेट केल्याने शिक्षक व संस्थाचालक हैराण झाल्या आहेत. के. जे.
मेहता हायस्कूल, महिला कॉलेज, बिटको कॉलेज, उपनगरची शाळा, कन्या शाळा, बिटको गर्ल्स हायस्कूल आदी ठिकाणी शाळा सुटण्याच्यावेळी हे गुंड मुलींची रिक्षात किंवा दुचाकीवर वाट पाहतात. तिचा पाठलाग करून अश्लिल चाळे करतात. या गुंडाना राजकीय नेत्यांचे बॅकिंग असल्याने कोणी तक्रार करत नाही. पोलिसांनीच शाळा, कॉलेज सुटण्या व भरण्याच्यावेळी गस्त घातल्यास गुंडांवर वचक बसू शकेल.

कायदा सुव्यवस्था धोक्यात

वर्षभरापूर्वी मुलींवरून नाशिकरोडला कॉलेजसमोर अल्पवयीन मुलांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. तर प्रेससमोर बसलेल्या प्रेमीयुगलाला नागरिकांनी हटकल्याने युवकाने रात्री कॉलनीवर हल्ला केला होता. त्यात दोन स्थानिक तरुणांचा मृत्यू झाला होता. रोकडोबावाडीत तीन वर्षापूर्वी एका प्रेमीयुगलाला शेतात मारहाण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. जेलरोड, देवळालीगाव, टाकळी व उपनगरला मुलींच्या भानगडीवरून खून झाले होते. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

बदलती तरुणाई

पाल्या घर सोडल्यावर खरच शाळा-कॉलेजात जातो का? तो मोबाइल, इंटरनेटवर काय करतो, याची कुटुंबीयांकडून माहिती घेतली जात नसल्याने तरुणाईचे भावते. काही मुले नेते मंडळींच्या नादी लागतात. दहावीचे पेपर सुरू होण्यापूर्वी तीन-चार मुले रेल्वे स्टेशनला पेट्रोल चोरी करताना पकडले गेले होते. तीन महिन्यापूर्वी दहावीच्या मुलांनीच गुंड मुलाचा खून केला होता. गेल्या ‘व्हॅलेटाईन डे’ला जेलरोडच्या तीन शालेय मुली पळून गेल्या होत्या. त्यांच्याकडे महागडे मोबाइल असल्याची त्यांच्याच पालकांना माहिती नव्हते. द्वारका येथे अकरावीतील मुलीला रागावले म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने आईचाच खून केल्याची घटना चार वर्षापूर्वी घडली होती.

सोशल मीडियाचे भूत

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, स्मार्ट फोनवरील व्हॉट्सअॅप, फेसबुक सारख्या सोशल मीडियाद्वारे मुले-मुली दिवसरात्रभर चॅटिंग करतात. त्यातून मैत्री व त्यातून फसवणूक होते. चुकीची पाऊल पडते. त्यामुळे पालकांनीच त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

00
पेलिकन पार्क प्रश्नी मुख्यमंत्र्यांना साकडे

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात महापालिकेने १७ एकर जागेवर उभारलेले पेलिकन पार्क बंद पडून या पार्कच्या जागेला कचरा डेपेाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे पार्क खुले करण्यासह तेथील मोक्याच्या जागेवर नव्याने काय प्रकल्प उभारता येईल, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साकडे घालण्यात येणार आहे. यासाठी नाशिकमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

सिडको परिसरातील पेलिकन पार्कचा प्रश्न सोडण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जात आहे. यापूर्वीही या पार्कच्या आवारात उपोषणाचा मार्गही सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे यांनी स्वीकारला होता. पेलिकन पार्कची अतिशय दुरावस्था झालेली असून येथील वृक्षतोडीही दिवसेंदिवस वाढतच आहे. तेथील खेळ्यांचे साहित्य गंजले असून त्याची चोरट्यांनी चोरीही करून भंगारमध्ये विकले आहेत. ही जागा सध्या मद्यपी आणि जुंगऱ्यांचा अड्डा बनली आहे. या पार्कच्या आजूबाजूने राहणाऱ्या नागरिकांना विषारी प्राण्यांचा मोठ्या स्वरूपात त्रास सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी तर येथे बिबट्याचे दर्शन परिसरातील नागरिकांना घडले होते. पेलिकन पार्कचा तिढा सुटावा म्हणून यापूर्वी अनेक राजकारण्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.

राजकारण थांबेल का?

निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरातच केली जाते. सिडकोला प्रत्येक निवडणुकीत पेलिकनचा प्रश्न साडविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही हा प्रश्न सोडविता आलेला नाही. पेलिकन पार्क असलेल्या प्रभागातील तीन नगरसेवक भाजपाचे आहे. आमदारही भाजपच्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात अंगाची लाहीलाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, मंगळवारी नाशिकचे ३९.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. मालेगावचे तापमान ४०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, दोन दिवसांत उन्हाचा तडाखा अधिक वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत तापमानाचा पारा चाळीशी ओलांडण्याची शक्यता आहे. जळगावात ४१ अंश सेल्सिअस तापमान असून, उत्तर महाराष्ट्रात ते सर्वाधिक नोंदले गेले आहे.

यंदा उन्हाची दाहकता हैराण करून सोडणार, अशी भीती आतापासूनच वाटू लागली आहे. तापमानात सातत्याने चढ- उतार होत असून, मंगळवारी ३९.९ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. किमान तापमान १७.० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मालेगावात तापमानाचा पारा वाढला असून, मंगळवारी ४०.८ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. १९ अंश सेल्सिअस एवढी किमान तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये सोमवारी हेच तापमान ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. पुढील दोन दिवसांत म्हणजेच १४ आणि १५ एप्रिलला मालेगावचे तापमान ४२ अंशांपर्यंत, तर नाशिकचे तापमान ४० अंशांच्यावर पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा जोतिबा फुले हेच खरे ज्ञानसूर्य

$
0
0

प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांचे प्रतिपादन

देवळाली कॅम्प : खऱ्या अर्थाने दीन दलितांच्या शिक्षणाचा वसा घेऊन उभे आयुष्य आपल्या पत्नीसह शिक्षणासाठी वेचणारे महात्मा जोतिराव फुले हे खऱ्या अर्थाने आजच्या पिढीसाठी ज्ञानसूर्य असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांनी केले.

याप्रसंगी कॉलेजच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण त्यांच्या हस्ते करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रा. सुनीता आडके, प्रा. भास्कर ढोके, प्रा. विलास कोरडे, प्रा. शशिकांत अमृतकर आदींसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिवकल्याण मंडळ

शिवकल्याण कला क्रिडा व सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे महात्मा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निशिकांत पगारे, अध्यक्ष नितीन कोळेकर, अॅड. अमोल घुगे, सचिन बरलिकर, प्रकाश बर्वे, शाम गोसावी, कल्पेश जैन यांसह सदस्य उपस्थित होते.

सातपूरला कार्यक्रम

सातपूर : शेतकऱ्यांचे कैवारी व स्त्री शिक्षणाला मानाचे स्थान देणारे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मंगळवारी (दि. ११) सातपूर भागात उत्साहात साजरी करण्यात आली. सातपूर गावात मारूती मंदिराच्या प्रांगणात नगरसेवक सलीम शेख, संतोष गायकवाड, गोकुळ निगळ आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुलेंना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सातपूर गावचे भूमिपूत्र दीपक मौले, विजय भंदुरे यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गुरू शिष्यांची जयंती दरवर्षी साजरी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, अमोल पाटील यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्यास अभिवादन करत जयंती उत्सव साजरा केला. शहरातील विविध संस्थांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजप्रगतीसाठी एकसंध राहा

$
0
0

डॉ. कैलास कमोद यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

समाजापेक्षा कोणीही व्यक्ती मोठा नसतो त्यामुळे समाजाबरोबर इतर समाजाला बरोबर घेऊन चालले पाहिजे तेव्हाच तो यशस्वी होऊ शकतो.समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकसंध राहणे गरजेचे आहे, असे मत ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद यांनी व्यक्त केले. समाज एकत्र आल्याने त्याचा फायदा छोट्या घटकाला होतो. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या विकासात योगदान देणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

माळी समाज सेवा समितीच्या वतीने महात्मा जोतिराव फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्ताने सोमवारी (दि. १०) सायंकाळी फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे कावळा चित्रपट व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद तर प्रमुख पाहुणे म्हणून निफाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, सटाणा नगराध्यक्ष सुनील मोरे, वसंत खैरनार, माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी, मनीष जाधव, अरुण काळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना उपमहापौर प्रथमेश गीते यांनी सामाजिक जीवनात काम करताना समाजाचा पाठिंबा फार गरजेचा असल्याचे सांगितले. स्वागत उत्तमराव बडदे यांनी केलेतर प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेंद्र जाधव यांनी केले तर आभार वसंत अहिरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र विधाते, प्रमोद आहेर, प्रणव शिंदे, प्रवीण जेजुरकर, महेश गायकवाड, सचिन दप्तरे यांनी परिश्रम घेतले.

नाशिक विभागीय महसूल आयुक्तालय

सिन्नर फाटा : येथील महसूल आयुक्तालयात अप्पर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ११)महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महसूल उपायुक्त डॉ. संजय कोलते, प्रशासन उपायुक्त सुखदेव बनकर, पुनर्वसन उपायुक्त ज्ञानेश्वर खिलारी, करमणूक उपायुक्त वाघमोडे, तहसीलदार सुनंदा मोहिते, मंजुषा घाटगे आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिसूर्याला अभिवादन

$
0
0

टीम मटा

स्त्री शिक्षणाचे आद्य जनक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. ११) शहरात विविध शासकीय कार्यालये, मनपा, शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था तसेच शाळा, कॉलेजेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.


मनपा कार्यालय

सिन्नर फाटा : मनपाच्या विभागीय कार्यालयाच्यावतीने येथील मनपा शाळेतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, पंडित आवारे, संतोष साळवे यांच्यासह संतू पाटील, रमेश थोरात, श्रावण लांडे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

साधना इंग्लिश स्कूल

एकलहरे रोडवरील साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या कार्यक्रमास संतोष साळवे, मुख्याध्यापिका सुवर्णा बंगेरा, नितीन जगझाप आदी उपस्थित होते.

वास्को चौक

शहरातील वास्को चौकातही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक रमेश धोंगडे, बिझनेस बँकेचे संचालक पुरुषोत्तम फुलसुंदर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

महावितरण कार्यालय

महावितरण परिमंडळ कार्यालयात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा फुलेंचे विचार बुद्धीवादी व वास्तववादी असल्यानेच ते चिरकाल टिकून आहेत. अस्पृष्यता दूर करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

शिक्षणाविषयीचे विचार त्यांनी प्रथम कृतीत आणण्याचे केलेले धाडस आजही अनुकरणीय असल्याचे दीपक कुमठेकर म्हणाले.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता बी. बी. खंदारे, शहर अधीक्षक अभियंता अनिल चव्हाण, कार्यकारी अभियंता हरि ढावरे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक पी. एन. फुलकर, व्यवस्थापक सुरेश रोकडे, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाणे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. ११) क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बागवान पुरा येथील महालक्ष्मी चाळीत असलेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व राष्ट्रवादी पक्षाचे मनपा गटनेते गजानन शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गटनेते गजानन शेलार यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याबाबत माहिती दिली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मुख्तार शेख, शहर उपाध्यक्ष पद्माकर पाटील, शहर सरचिटणीस संजय खैरनार, शहर चिटणीस आबा आमले, संजय साबळे, नगरसेविका शोभा साबळे, सुषमा पगारे, समीना मेमन, जाकीर शेख, असिफ जानोरीकर, सुरेश आव्हाड, संजय तेजाळे, दिलीप दोंदे, रवी जाधव, रमेश पाटोळे, पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्याबद्दलची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेने गोठविली ६० हजार खाती!

$
0
0

नाशिक : राज्य सरकारने कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना झुलवत ठेवले असतानाच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदार असलेल्या ६० हजार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भांडवल पर्याप्तता नऊ टक्क्यांच्या खाली घसरल्याचे कारण देत शेतकऱ्यांची बँक खातीच कर्जाशी लीन करून घेतल्याने खाते गोठवल्यात जमा आहेत. त्यामुळे खात्यावर असलेली उरलीसुरली २५ ते ५० हजारांची रक्कमही शेतकऱ्यांना काढता येत नाही. शेतकऱ्यांच्या चालू खात्यातील रकमा व त्यांच्या बँकेतील मुदतठेवी असे सुमारे १६५ कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. कोणत्याही शेतकऱ्याची रक्कम कर्जाकडे वळती केली जाणार नसल्याचे सांगत संचालक सारवासारव करीत आहेत.

वाढत्या एनपीएमुळे आजारी पडलेली जिल्हा बँक दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय राजवटीत कशीबशी वाचली होती; परंतु ही राजवट जाताच आलेल्या संचालकांच्या कारकिर्दीमुळे बँक पुन्हा आर्थिक संकटात सापडली आहे. काही संचालकांनी बेकायदेशीर कामकाज व आपल्याच तालुक्यांवर केलेली कर्जाची उधळपट्टी आता बँकेच्या अंगलट आली असून, मागील आर्थिक वर्षात कर्जवसुलीच झाली नसल्याने बँकेला टाळे लावण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी बँकेने साडेपाच लाख खातेदारांना तब्बल १,७१९ कोटींचे कर्जवाटप केले होते. मात्र, दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांनी बँकेत कर्जाची परतफेडच केलेली नाही. वर्षभरात १७१९ कोटींपैकी २०० कोटींचीच जेमतेम वसुली झाली आहे. त्यात नोटाबंदीच्या काळात ३७१ कोटींच्या झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे बँकेच्या संकटात भरच पडली आहे.

काय आहे नियम?

दुहेरी कोंडी झाल्याने बँकेने आता आपली मान सोडवून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा बँकेचे ३७१ कोटी रुपये बदलून देण्यास आरबीआयने नकार दिल्यानंतर बँकेची भांडवल पर्याप्तता ९ टक्क्यांच्या खाली गेली आहे. त्यामुळे बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कमही त्यांच्या कर्जाशी जोडली आहे. याचा अर्थ, ज्यांनी कर्ज घेतले, पण फेड केली नाही; मात्र अशांच्या खात्यावर रक्कम अथवा मुदतठेवी असतील तर कर्जखाती वळविण्याच्या दृष्टीने सावधगिरीचे पहिले पाऊल आहे. उद्या कर्जफेड झालीच नाही, तर ही रक्कम बँक कर्जखात्यात वळवू शकते, असा बँकिंगचा नियमही आहे.

त्याचा फटका जवळपास जिल्ह्यातील ६० हजार शेतकऱ्यांना बसला असून, त्यांच्या खात्यावर खरिपासाठी ठेवलेली १६५ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना काढण्यास मज्जाव केला जात आहे. एवढेच नव्हे, तर थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मुदतठेवीही गोठविल्या आहेत. त्यामुळे ऐन खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना आपल्याच पैशांसाठी बँकेकडे भीक मागण्याची वेळ आली आहे. एकीकडे कर्जमाफी नाही आणि दुसरीकडे संकटकाळासाठी साठवलेली थोडीशी रक्कमही गोठवल्याने शेतकरी ऐन खरिपाच्या तोंडावर सकंटात सापडले आहेत. या गर्तेतून शेतकरी बाहेर पडले नाहीत, तर नाशिकमधील शेती अन् शेतकरी उद््ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींची अळीमिळी...

जिल्हा बँकेवर एक खासदार, तीन आमदार, पाच माजी आमदार असे विविध पक्षांतील वजनदार संचालक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेली जिल्हा बँक आर्थिक अरिष्टाकडे जात असताना, या मंडळींनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कर्जमाफीसाठी टाहो फोडला जात असताना, जिल्हा बँक वाचवण्यासाठी मात्र प्रयत्न होताना दिसत नाहीत. भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या बँकेला टाळे लावण्याच्या तयारीत असतानाही सत्ताधारी पक्षातील आमदार व खासदारांची अळीमिळीची भूमिका संशयास्पद ठरली आहे. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे दोघेही शिवसेनेचे असून, एकीकडे त्यांचा पक्ष शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाषा करीत असताना येथे तर शेतकऱ्यांची खातीच कोरी करण्याची तयारी अवलंबल्याने संताप व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहनमंत्र्यांनी दिले परवाना रद्दचे आदेश्‍ा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

येथील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर रिक्षाचालकाने बसचालकाला केलेल्या मारहाणीचे खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित रिक्षाचालकाचा परवाना, अनुज्ञप्ती प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच बसस्थानकाबाहेरील अनधिकृत रिक्षा थांबा हटविण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर गेल्या शनिवारी सकाळी कर्तव्य बजावणाऱ्या बसचालकास रिक्षाचालकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या मारहाणीत चालक जखमी झाला तर वाहकासही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेत संबंधित रिक्षाचालकाचा रिक्षा परवाना रद्द करण्यात यावा तसेच त्यास दिलेले अनुज्ञप्ती प्रमाणपत्रही रद्द करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मंत्री रावते यांनी या घटनेची माहिती जाणून घेताना बसस्थानकाबाहेर असलेल्या अनधिकृत रिक्षा थांबा हटवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड परिसर निळाईने व्यापला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी नाशिकरोडला जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रमुख रस्त्यांवर कमानी उभारण्यात आल्या आहेत.

उड्डाणपूल, घरे, चौक, दुभाजकांमध्ये न‌िळे ध्वज डौलत असून, परिसर निळाईने व्यापला आहे. वाहनांवरही निळे ध्वज फडकत आहेत. रेल्वेस्टेशन येथील आंबेडकर पुतळ्यावर रोषणाई करण्यात आली आहे.

नाशिकरोडचा आंबेडकर जयंती उत्सव प्रसिध्द आहे. उपनगर, गांधीनगर, जयभवानी रोड, सिन्नर फाटा, जेलरोड, कॅनॉलरोड आदी ठिकाणी उत्सव समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. १३ एप्रिलला मध्यरात्रीपासूनच आंबेडकर पुतळा येथे ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्ते अभिवादनासाठी येतात. १४ एप्रिलला सकाळपासून कार्यक्रम सुरू होतील. सायंकाळी सार्वजनिक मंडळे चित्ररथांची मिरवणूक काढून आंबेडकर पुतळा येथे जाऊन पुष्पहार अर्पण करतील. परिसरात शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळांनी आकर्षक देखावे केले आहेत. त्यातून स्त्री भ्रुणहत्या, पाणी वाचवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण याबाबत प्रबोधन केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिस्तंभाची झाली स्वच्छता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडच्या दुर्गा उद्यान रस्त्यावर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या क्रांतिस्तंभ व आजबाजूची स्वच्छता करून हा परिसर चकाचक करण्यात आला आहे. या क्रांतिस्तंभाच्या देखभालीकडे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच येथे स्वच्छता करण्यात आल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकरोडच्या दुर्गा उद्यान रस्त्यावर नाशिकरोड परिसरातील ज्या स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याच्या कारणावरून ब्रिटिशांनी तुरुंगात डांबले होते, अशा २७ स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ क्रांतिस्तंभ उभारण्यात आला आहे. या क्रांतिस्तंभावर २७ स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांचा शिलालेख आहे. या क्रांतिस्तंभाच्या देखभालीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याने येथे कचरा साचला होता. येथील उद्यानाचाही स्वच्छतेअभावी उकिरडा झाला होता. ‘मटा’तील वृत्तानंतर हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. हा क्रांतिस्तंभ ऐतिहासिक ठेवा आहे. या प्रेरणास्रोताच्या साफसफाईच्या कामात सातत्य ठेवायला हवे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

--

तडे दुरुस्ती केव्हा?

या क्रांतिस्तंभाची स्वच्छता उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी तातडीने केली असली तरी या क्रांतिस्तंभाला पडलेल्या तड्यांमुळे तो कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्रांतिस्तंभावरील तड्यांची दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक बेटांच्या तोडफोडीवर आक्षेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका क्षेत्रात सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान प्रायोजकांच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून तयार करण्यात आलेली वाहतूक बेटे तोडण्याच्या भाजपच्या भूमिकेवर मनसेने आक्षेप घेतला आहे. प्रायोजकांनी लाखो रुपये खर्च करून तयार केलेली वाहतूक बेटे तोडू नयेत, अशी मागणी मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी केली आहे. सिग्नल बसविण्यात पक्षाची हरकत नसली तरी, सिग्नलच्या नावाखाली शहराचे विद्रुपीकरण होत असल्यास ते योग्य नाही. याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र देवून वाहतूक बेटे वाचविण्याची मागणी शेख यांनी केली आहे.

मनसेच्या सत्ताकाळात शहरात सीएसआर उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक बेटे विकस‌ति करण्यात आली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या वाहतूक बेटांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती. या कंपन्यांसाठी या वाहतूक बेटांवर लाखो रुपये खर्च केले आहेत. परंतु महापालिकेतील सत्ताबदलानंतर या वाहतूक बेटांची दुर्दशा करून तेथे सिग्नल बसविले जात आहेत. त्याला मनसेचे गटनेते शेख यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांवर टीका केली आहे. सिग्नलच्या नावाखाली ही वाहतूक बेटे तोडण्यात येत आहेत. प्रत्यक्षात सिग्नल बसविण्यास मनसेचा विरोध नाही. परंतु सिग्नलच्या नावाखाली प्रायोजकांनी लाखो रुपये खर्च करून तयार केलेली वाहतूक बेटे पूर्णपणे उद‌्ध्वस्त करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. वाहतूक बेटांचा सुशोभित भाग हा तसाच ठेवून सिग्नल तयार करता येऊ शकतो. त्यासाठी पूर्णपणे वाहतूक बेट उद‌्ध्वस्त करण्याची आवश्यकता नाही. परंतु केवळ मनसेच्या असुयेपोटी सत्ताधारी वाहतूक बेटेच उद‌्ध्वस्त करत असल्याचा आरोप शेख यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केला आहे. ही वाहतूक बेटे आहे तशीच राहू द्यावीत, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संपाबाबत निफाड तालुक्यात हालचाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकरी विरोधात धोरणे राबवली जात असल्याने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नगर जिल्ह्यातील पुणतांबा शेतकरी शेतकरी संपावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव व लासलगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

खडकमाळेगावचे सरपंच साहेबराव कान्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी पुणतांबा येथील धनंजय जाधव, डोणगावचे धनंजय धोर्डे, भास्कर सुराळकर, किरण सुराळकर उपस्थित होते.

उद्योगधंदे व नोकरदारांप्रमाणे महागाई व परीस्थितीनुसार सरकारकडून लाभ दिले जातात. त्याप्रमाणे शेती हा पण एक मोठा उद्योग आसल्याने काळाची गरज ओळखून सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी,शंभर अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन योजना सुरू करण्याबाबतचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावर १ जूनपर्यंत सरकारने सकारात्मक पाऊन न उचलल्यास १ जूनपासून दूध, भाजीपाला, फळे व इतर शेतमाल विक्री बंद करून पेरणी थांबवून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. लासलगाव येथे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वखर्चातून साकारले दीपदानपात्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीचे पात्र स्वच्छ आणि निर्मळ असावे यासाठी प्रयत्न होत असताना येथील दीप विक्रेत्या महिलाही मागे राहिलेल्या नाहीत. नववर्षाच्या सुरुवातीला त्यांनी गोदापात्र स्वच्छ ठेवण्याचा संकल्प सोडला होता. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून स्वकमाईतील रक्कम बाजूला ठेवून दीपदानपात्र तयार केले. हे दीपदानपात्र रामकुंडातील गोमुखाजवळ ठेवून थेट रामकुंडात दीपदान करण्याऐवजी ते दीपदानपात्रात करावे, असे आवाहन भाविकांना केले जात असल्यामुळे असंख्य भाविकांकडून दीपदानपात्राच दिवे लावण्यात येत आहेत. त्यामुळे रामकुंडातील दीपदानामुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसत असल्याचे दिसून येत आहे.

रामकुंड परिसरात दीपविक्री करून कुटुंबाचा खर्च भागविणाऱ्या सुमारे वीस महिला आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या येथे दीपविक्री करण्याचे काम करीत आहेत. छोटे द्रोण, त्यात फुले आणि वात ठेवली जाते. ती वात पेटवून रामकुंडात सोडली जाते. पवित्र रामकुंड तीर्थावर येणाऱ्या भाविकांना दीपदान करण्याची इच्छा असते. दिवसभर विशेषतः सायंकाळच्या वेळी दीपदान करण्यासाठी स्थानिक, तसेच बाहेरगावांहून येणारे भाविक हमखास दीपदान करीत असतात.

या दीपदानामुळे रामकुंडात द्रोण, फुले, तेलाच्या वाती तरंगताना दिसून येत असत. येथील सफाई कामगार ते काढण्याचा प्रयत्नही करीत होते. तरीही येथील निर्माल्य कमी होत नव्हते. गोदापात्र स्वच्छ ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केल्यामुळे आणि प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे गोदापात्र स्वच्छ होत आहे. रामकुंड परिसरात येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेची जपणूक करीत प्रदूषणही होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी दीपदानपात्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे काम या दीपविक्रेत्या महिलांनी केले आहे. वस्त्रांतरगृहाच्या बाजूला दीपविक्री करणाऱ्या महिलांनीदेखील छोटे दीपदानपात्र तयार करून तेथे ठेवले आहे. या अनोख्या प्रयत्नामुळे रामकुंडावर दीपदानामुळे होणारे प्रदूषण थांबण्यास मदत झाली आहे.

--

विक्रेत्या महिलांचा पुढाकार

रामकुंड परिसरातील संगीता बोराटे, सुनंदा बनछोडे, जयश्री सांगळे, आरती दीक्षित, वैशाली वाघ, संगीता वाघ यांनी पुढाकार घेऊन दीड हजार रुपयांचे हे दीपदानपात्र तयार करून घेतले. ते पात्र रामकुंडाजवळ ठेवून त्यात पाणी भरून ठेवण्यात येते. भाविक दीपविक्रेत्या महिलांकडून जेव्हा दीप घेतात, तेव्हा या महिला दीप रामकुंडातील पाण्याला स्पर्श करून नंतर ते दीपदानपात्रात सोडण्यास सांगतात. हे दीपदानपात्र दिव्यांनी भरल्यावर त्यातील दिवे काढून घेण्याचे कामही याच महिला करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images