Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चैत्रपालवी कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी भाषेचा महिमा हा मराठीदिनापुरता न राहता वर्षभर मराठीचे गोडवे गायले जावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या चैत्रपालवी कार्यक्रमाचे दुसरे पुष्प रविवारी गुंफण्यात आले. या वेळी प्रसिद्ध संगीतकार संजय गिते यांनी विविध गीते सादर केली.

बारमाही मराठी या शीर्षकाने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी सुरू झालेला हा कार्यक्रम आता वर्षभर सुरू राहणार असून, त्यानिमित्ताने रसिकांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. दर महिन्याला मराठीबाबत एक नवीन प्रयोग करून तो रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना संजय गिते यांची आहे. यातील प्रत्येक पुष्पात ऋतूनुसार गाणी व कविता सादर करण्यात येणार आहेत.

रविवारी झालेल्या कार्यक्रमात सोर्स म्युझिक अॅकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सूर निरागस हो, मिटुनी लोचने, चैत्र मास आला, बुद्धी दे, हिरवा निसर्ग, ऋतुरंग उधळी, ही गुलाबी हवा, वाऱ्यावरती गंध पसरला, माझ्या देवीचा रहिवास, कोलंबसाचे गर्वगीत ही गाणी व कविता सादर झाल्या. यातील दोन कविता नाशिकचे कवी विनय पाठारे यांच्या होत्या. त्याला संगीत संजय गिते यांनी दिलेले होते. कार्यक्रमास आयटी तज्ज्ञ सुनील खांडबहाले उपस्थित होते.

पियाली घोष, निषाद गिते, सोनल निकम, राहन दाणी, निशांत भोसले यांनी गीतगायन केले. तबल्यावर नंदकुमार जोशी, गिटारवर संकेत बराडिया, संवादिनीवर संजय गिते यांनी साथसंगत केली. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माध्यमिक शिक्षक संघाचा रडीचा खेळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहर माध्यमिक संघाच्या कार्यकारिणीत सामावून न घेतल्याने कार्यकारिणीच्या निवडणुकीत वादंग झाल्याचा प्रकार सारडा कन्या विद्यालयात शनिवारी घडला. संघाच्या अध्यक्षपदी शशांक मदाने यांची निवड करण्यात आली. मात्र, या निवडीवर संघटनेचे मोहन चकोर व एस. बी. शिरसाठ यांनी नूतन कार्यकारिणीच्या निवडीवर आक्षेप घेतला. परिणामी, रविवारी पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या बैठकीत या संघटनेचे अध्यक्षपद मोहन चकोर यांना देण्यात आले आहे. या बाबी सामंजस्याने घडल्याच्या प्रतिक्रिया संघाचे सभासद देत असले तर खुद्द मदाने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत झालेला हा रडीचा खेळ शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा राजकारणाला प्राधान्य देत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवडणूक माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संघाची २०१७ ते २०२० या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यासाठी पाच जणांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यामध्ये माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिवाजीराव निरगुडे, एस. के. टिळे, सी. पी. कुशारे, ई. के. कांगणे यांचा समावेश होता. या समितीने अध्यक्षपदी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे शशांक मदाने, उपाध्यक्षपदी नीलेश ठाकूर, विद्या अहिरे, सचिव बी. के. सानप, सहसचिव एन. डी. सूर्यवंशी, कोशाध्यक्षपदी तौसीफ शेख यांची निवड करण्यात आली. या निवडीवर काही सभासदांनी आक्षेप घेतल्याने सभेत काहीशी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती पाहता, रविवारी पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या बैठकीत अध्यक्षच बदलण्यात आले. मदाने यांना बाजूला सारत चकोर यांना हे पद देण्यात आले. याविषयी काही शिक्षक सभासदांशी संवाद साधला असता, मदाने यांनी सामंजस्याने हे पद दूर सारले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याविषयी मदाने यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या रडीच्या खेळावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षकांसमोर आज अनेक प्रश्न, समस्या उभ्या असताना अध्यक्षपदावरून वाद निर्माण करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अध्यक्षपदासाठी नाव जाहीर करून नंतर ते बदलणे अन्यायकारक व अपमानास्पद आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लेट्स टॉक’ने दिला सकारात्मकतेचा संदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘आव्हाने प्रत्येकाच्या जगण्यात असतात. त्यांना पाठ दाखवून पळवाट शोधणे म्हणजे जीवन नाही, तर त्यांचा सामना करून त्यांच्यावर मात करण्याचा अन् सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग म्हणजे जीवन,’ असा सकारात्मकतेचा संदेश नाशिक सायकॅट्रिक असोसिएशनतर्फे झालेल्या ‘डिप्रेशन : लेट्स टॉक’ या उपक्रमाने नागरिकांना दिला.

‍यंदा आरोग्यदिनानिमित्त डिप्रेशन ही संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेने निवडली आहे. या संकल्पनेच्या प्रबोधनासाठी नाशिक सायकॅट्रिक असोसिएशनच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात या उपक्रमाचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीष सुळे यांनी प्रास्ताविक केले. ‘नैराश्य’ या आजाराचे समाजात वाढत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे धोक्यात आलेले मानवी जीवन या विषयावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. गतिमान जीवनशैलीत मनाचेही आरोग्य जपायला हवे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. सायकॅट्रिक असोसिएशनच्या वतीने डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. जयंत ढाके, डॉ. नीलेश भिरूड, डॉ. नीलेश जेजूरकर, डॉ. ज्योती उगले, डॉ. विलास चकोर, डॉ. हेमंत सोनानीस, डॉ. बीएसव्हीएस प्रसाद, डॉ. मुकेश दौंड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायगाव ग्रामसभेत कर्जमाफीचा ठराव

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

अनेकदा दुष्काळाच्या अवकळा सोसतानाच शेतमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव, डोक्यावरचं कर्ज अशा बोजाखाली पिचलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी सध्या राज्यभरात ठिकठिकाणी बळीराजाचा आवाज बुलंद होत आहे. यातच येवला तालुक्यातील सायगाव गावात शुक्रवारी (दि. ७) गावकऱ्यांनी या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी एल्गार केला. गावच्या रोकडोबा पारावर सकाळी झालेल्या विशेष ग्रामसभेत जमलेल्या ग्रामस्थांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीसाठीचा ठराव केला.

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधी पक्षांसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सध्या राज्य सरकारवर दबाव वाढवला आहे. राज्याच्या अनेक भागात वेगवेगळी आंदोलने अन् इतर मार्गांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय. याच अनुषंगाने राज्य शासनापर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची मागणी पोहचविण्यासाठी कर्जमाफीसाठीची विषेश ग्रामसभा शुक्रवारी येवला तालुक्यातील सायगावमध्ये झाली. नव्हे तर नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारची ही पहिलीच विशेष ग्रामसभा आहे. सरपंच योगिता भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी क्षेत्रधारक शेतकऱ्यांमध्ये लहानमोठा असा कोणताही भेदभाव न करता संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा ठराव करण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी शक्य नसेल तर किमान एकरी पंचवीस हजार रूपये अनुदान स्वरूपात मदत करण्याची मागणी भागूनाथ उशीर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर एनडीसीसीच्या येवला शाखेस टाळे

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शिक्षकांचे हक्काचे वेतन बँकेवरील निर्बंधांमुळे हाती पडत नसल्याने सटाण्यापाठोपाठ येवल्यातील नाराज शिक्षकही एनडीसीसी बँकेच्या येवला शाखेस टाळे ठोकण्याच्या तयारीत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून बँकेकडे शिक्षकांचे हक्काचे वेतन देण्यासाठी गंगाजळी नाही. परिणामी रोजच्या आर्थिक व्यवहारांचीही परवड होत असल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जबरेश्वर शाखेसह अन्य शाखांकडून येवला तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे पगार चार महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शुक्रवारपर्यंत हे पगार न झाल्यास शनिवारी (दि. १५) येवल्यातील जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह जबरेश्वर शाखेला कुलूप ठोकण्याचा एकमुखी निर्णय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांच्या समन्वय समितीसभेत घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदनही दिले जाणार आहे.

शिक्षकांसमोर उभ्या असलेल्या या समस्येतून मार्ग काढण्यासाठी समन्वय समितीची बैठक एन्झोकेम विद्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चांगदेव कुळधर होते. हक्काचा पगार वेळेवर झालाच पाहिजे, पगार राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे यासाठी कृतीयुक्त आंदोलन करावे लागेल. सरकारकडे दाद मागावी लागेल, अन्यथा आपल्या वेतनाबाबत अधिक त्रास वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले वेतन आल्यावर आपला पैसा इतरत्र वळवून आपणास पगार मिळतच नाही. सर्वांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे. यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे. प्रा.राजेंद्र गायकवाड, अण्णासाहेब काटे, प्रा.एम,पी.गायकवाड , दिगंबर नारायणे , दत्तकुमार उटावळे, माणिक मढवई यांचेसह शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाच्या बांधकामासाठी मातीमिश्रित वाळू

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नांदूरमध्यमेश्वर धरणातून निघालेल्या वैजापूर कालव्यावरील दिंडोरी तास शिवारात नांदूरमध्यमेश्वर-निफाड मार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी मातीमिश्रित वाळू वापरली जात आहे. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष पगारे यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. तसेच त्यांनी बांधकाम विभागाला निवेदनही दिले आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून कोपरगावकडे पाणी घेऊन जाण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी कालवा तयार केला गेला. या कालव्यावर निफाड नांदूरमध्यमेश्वर या रस्त्यावर दिंडोरी तास येथील तासकर वस्तीजवळ कालव्यावर रस्ता आहे. कालवा आणि रस्ता जीर्ण झाल्याने या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाच्या काँक्रिटिकरणासाठी आणलेली वाळूत मोठ्या प्रमाणात मातीमिश्रित केली आहे. ही बाब बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्ग, कामावरील देखरेख करणारे अधिकारी यांना वाळूत माती मिक्स असल्याचे सांगितले. परंतु, तरीही याकडे दुर्लक्ष केले गेले. तरी याकडे तातडीने लक्ष देत हे काम बांधकाम विभागाने चांगल्या वाळूने करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर फडकला कीर्तिध्वज

0
0

परंपरा जोपासत भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकवण्यात आला. रविवारी (द‌ि. ९) दुपारी या ध्वजाची पूजा जिल्हा न्यायाधीश नंदेश्वर, धर्मदाय सह आयुक्त प्रदीप घुगे, सप्तशृंग देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर गावातून मिरवणूक काढत तिची सांगता पहिल्या पायरीजवळ करण्यात आली. मध्यरात्री १२ वाजता गवळी परिवाराने हा कीर्तिध्वज गडाच्या उंच माथ्यावर दिमाखात फडकवला गेला.

यावेळी कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कळवणचे पोलिस निरीक्षक सुजय घाडगे, पोलिस पाटील शशिकांत बेनके, उपसरपंच गिरीश गवळी, संदीप बेनके, राजेंद्र गवळी, गणेश बर्डे आदींसह मान्यवर व मानकरी परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सुमारे पाचशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची प्राचीन परंपरा या किर्तीध्वजाला असल्याने भाविक भक्तांसाठी कुतुहूल असणारा ध्वज लावण्याचा हा मान वंश परंपरेने कळवण तालुक्यातल्या दरेगाव (व) येथील एकनाथ गवळी पाटील कुटुंबाकडे आहे. वर्षातून दोनवेळा होणाऱ्या यात्रोत्सवाच्या वेळी एकनाथ लक्ष्मण गवळी व गवळी परिवारातील सदस्यांकडून हा कीर्तिध्वज गडाच्या शिखरावर फडकवला जातो.

आदिमाया सप्तशृंगी देवीचे स्थान हे कळवण तालुक्यातील नांदुरी गडावर असून डोंगर कपारीत असणाऱ्या मंदिरात देवीची मूर्ती आहे. वंशपरंपरेने आणि देवीच्या आशिर्वादाने चालत आलेली ही प्रथा आमच्यासाठी श्रद्धेची असून वयाच्या दहाव्या वर्षापासून कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसमवेत आपण ध्वज लावण्यासाठी जात असल्याचे एकनाथ गवळी सांगतात. सध्या एकनाथ गवळी यांच्यासोबत रमेश गवळी, दत्तू गवळी, काशिनाथ कृष्णा गवळी, सोमनाथ गवळी, गोकुळ गवळी हे सदस्य कीर्तिध्वज लावण्यासाठी जातात.

दीड लाखांवर भाविक

गडावर खान्देशातून भाविकांचा महापूर लोटला असून, रविवारी (दि. ९) गडावर पहिल्या पायरीपासून बाऱ्या लागलेल्या होत्या. अंदाजे दीड लाखाच्या वर भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. देवस्थानामार्फत ठिकठिकाणी पाण्याची व मोफत भोजनाची व्यवस्था केलेली असल्यामुळे भाविकांना कुठेही अडचण भासत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे तहसील कार्यालयातील भिंती बाेलू लागल्या

0
0

जमीन विक्रीबाबत मार्गदर्शनाचा स्तुत्य उपक्रम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जमिनीची खरेदी-विक्री करताना कोणती काळजी घ्यावी, ग्रामीण भागात शेतीसह घराच्या वाटणीवरून होणारे वादविवाद टाळण्यासाठी येथील प्रांताधिकारी कार्यालय तहसील या दोन्ही कार्यालयांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. 'गोष्टीरूपी जमीन व्यवहारांची नीती' या शीर्षकाखाली प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संकल्पनेतून महसुली बोध कथांच्या फोटो फ्रेम लावण्यात आल्या आहेत. या बोधकथांमधून जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना काय करावे, काय करू नये, हे समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रांताधिकारी मिसाळ यांनी यापूर्वी हा प्रयोग जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे राबविला होता.

ग्रामीण भागात शेत जमिनींची खरेदी-विक्री, गहाण खत, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, जमिनीची वाटणी, सावकारी व्यवहार, कर्ज प्रकरणातून अनेक वेळा वादविवाद होतात. त्यातून काही वेळा गुन्हेही दाखल होतात. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी हे माहिती व्हावे, या उद्देशाने प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमासाठी गणेश मिसाळ यांना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळण्यास मदत होत असल्याची स्थिती आहे. याबाबत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या असून, निश्चितच शेतकरी बांधवांना जमीनविषयक कायदे नियम यांची माहिती होऊन त्यांची फसवणूक होणार नाही, असे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी माहिती देतांना सांगितले.

शेतकऱ्यांना फायदा

सांगली येथील जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी सामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेत गोष्टीरूपात जमीन व्यवहारांवर आधारित ९१ कथांचे लिखाण केलेले आहे. त्यांनी 'जमीन व्यवहार नीती' हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील मार्मिक कथांपैकी मोजक्या २५ कथांची निवड करून त्यांच्या ७५ फोटो फ्रेम तयार करून त्या काही दिवसांपूर्वीच प्रांताधिकारी धुळ्यासह साक्री येथील तहसील कार्यालयाच्या भिंतींवर लावण्यात आल्या आहेत. या प्रत्येक कथेच्या खाली कथेतून कोणता बोध घ्यावा याचीही माहिती देण्यात आली आहे. कामानिमित्ताने प्रांताधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांनी या कथा वाचून बोध घ्यावा, हा यामागील दृष्टिकोन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भैरवनाथांच्या यात्रोत्सवातून दिला सामाजिक संदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्साहात साजरी झाली. पहाटे पाच वाजता आमदार राजाभाऊ वाजे यांनी श्री भैरवनाथ महाराजांच्या रथाची पूजा करून रथ यात्रेचा प्रारंभ केला. या यात्रेतील कावडधारकांनी विविध सामाजिक संदेश देवून भाविकांचे लक्ष वेधले. तसेच काहींनी राजकारण्यांनाही लक्ष करत सरस्वती नदीची स्वच्छता मोहीम कधी होणार असा सवाल केला आहे.

सिन्नरच्या विडी कामगारांनी दिलेल्या निधीतून आकर्ष रथ तयार करण्यात आला आहे. या रथातून महाराजांच्या मुकुटाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्रंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा साजरी झाली.

तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आपल्या बैलजोडीच्या सहाय्याने रथ ओढण्यात आला. वाढत्या दुष्काळाच्या झळांमुळे रथ ओढण्यासाठी बैलजोडीची कमतरता आढळून आली. नाशिकवेसमार्गे या रथाचे मार्गक्रमण सुरू होऊन गंगावेस, लाल चौक, महालक्ष्मी रोड, शिवाजी चौक, वावी वेस, लोंढे गल्ली, तानाजी चौक, गावठा, पुन्हा शिवाजी चौकमार्गे गणेश पेठेतून संध्याकाळी सात वाजता हा रथ पुन्हा मंदिरात आणण्यात आला. हजारो कावडधारकांनी श्री भैरवनाथांवर अभिषेक केला. घराघरातून भैरवनाथांना पुरणपोळीचा नैवद्य अर्पण करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बुद्धिबळ संघटनेला ‘एएमसीए’ची संलग्नता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑल इंडिया चेस फेडरेशनशी (एआयसीएफ) संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील ऑल मराठी चेस असोसिएशनने (एएमसीए) नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेला सोमवारी संलग्नता बहाल केली. एएमसीएचे सचिव संजय केडगे यांनी तसे पत्र संघटनेला दिले असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल देवधर, उपाध्यक्षपदी सुधीर पगार, सचिवपदी मिलिंद कुलकर्णी यांच्यासह नऊ जणांच्या कार्यकारिणीलाही एएमसीएने मान्यता दिली आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारिणीत जुन्या विश्वस्तांसह नव्या सदस्यांचा समावेश करीत नुकतीच सर्वांच्या संमतीने समतोल अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचेही संघटनेने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

संघटनेची कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष ः अनिल देवधर, उपाध्यक्ष ः सुधीर पगार, सचिव ः मिलिंद कुलकर्णी, सहसचिव ः हेमंत फडणीस, खजिनदार ः डॉ. आशीष लेंडे, सहखजिनदार ः संदीप नागरे, सदस्य ः अनिल राठी, प्रवीण वालझाडे, तालुका प्रतिनिधी ः ओमकार जाधव.

खेळाडूंच्या सवलतींचा मार्ग मोकळा

यापूर्वी जिल्ह्यात संघटनेशिवाय स्पर्धा होत होत्या. त्यामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान होत होते. स्पर्धा अधिकृत की अनधिकृत याबाबत संभ्रम होता. आता संघटनेला अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे पालक व खेळाडूंचा संभ्रम दूर झाला आहे. त्यामुळे यापुढे ज्यांना स्पर्धा घ्यावयाच्या असतील, त्यांनी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची अधिकृत मान्यता घ्यावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. या मान्यतेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंचा २५ मार्क्स व इतर सवलतींचाही मार्ग मोकळा झाला आहे. आता नाशिकच्या खेळाडूंना डोनर एंट्री भरण्याची गरज राहणार नसल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे. संघटनेची लवकरच बैठक होऊन त्यात पुढील कार्यक्रमांची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींच्या चॉइस नंबरसाठी ‘आरटीओ’कडून मालिका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी या क्रमांकाचे शुल्काबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आली आहे. आकर्षक क्रमांक घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज ११ एप्रिल सकाळी १०.३० ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. पहिल्या दिवशी दुचाकी वाहनधारकांनी आकर्षक क्रमांक घेतले नाहीत तर

दुसऱ्या दिवशी चारचाकी वाहनधारकांना तिप्पट शुल्क आकारून अर्ज सादर करता येतील.

अर्जासोबत केंद्रीय पत्त्याच्या पुराव्याची उदा. आधारकार्ड, वीजबील, घरपट्टी साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. ज्यांचे नावे वाहन असेल त्याच नावाने अर्ज सादर करावा. तसेच अर्जासोबत अर्जदाराने फोटो ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादींची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल, पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेच्या किंवा शेड्युल बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नावे भरणे तसेच त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

एकदा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक बदलून किंवा रद्द करता येणार नाही, एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचे डिमांड ड्राफ्ट बंद पाकीटात सादर करावेत. जो अर्जदार विहित शुल्कापेक्षा अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करेल, त्यास सदर पसंतीचा क्रमांक देण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी ब्रिगेडतर्फे ‘जोडे मारो’ आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मराठी जनतेचे अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्मृतीदिनी ढोल वाजविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या राज्याच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे व राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध दर्शविणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांच्या निषेधार्थ जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या वतीने या दोन्ही नेत्यांच्या निषेधाचे निवेदन महसूल उपायुक्त डॉ. संजय कोलते यांना देण्यात आले.

येथील बिटको चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंत्री विनोद तावडे व आमदार प्रशांत बंब यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध नोंदविला. छत्रपती शिवरायांचा स्मृतीदिन हा समस्त मराठी जनतेसाठी खऱ्या अर्थाने दु:खाचा दिवस असतो. असे असूनही या घटनेच्या तिथीचा जाणीवपूर्वक वाद निर्माण करून त्यादिवशी ढोलवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची मंत्री विनोद तावडे यांची कृती विकृतीचे लक्षण असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पारंपरिक वाद्यांचा मिरवणुकीत वापर करा’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक हे अतिशय शांतताप्रिय शहर आहे. मिरवणुकांमध्ये ध्वनीक्षेपकांमुळे ध्वनीप्रदूषण होऊ नये यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी केले. शहर शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, पोलिस उपायुक्त दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.

आयुक्त सिंगल म्हणाले, की सण-उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जनतेचीही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना नागरिकांना उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी पोलिस विभाग दक्ष राहील. सण-उत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या पोलिस मित्रांचा सन्मान करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

समाजकंटकांकडे पोलीस विभागाचे विशेष लक्ष राहील, असेही त्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकरांचे कार्य आणि महानता लक्षात घेता शुभेच्छाफलकांवर कार्यकर्त्यांनी छायाचित्रे टाकू नये, असे आवाहन आमदार फरांदे यांनी केले.

आमदार हिरे यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन केले. परीक्षा सुरू असल्याने ध्वनीक्षेपकाचा आवाज कमी राहील यांची दक्षता मंडळांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. महापौर रंजना भानसी यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तक योजनेचा आजपासून प्रारंभ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकतर्फे सुरू असलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतील एका अनोख्या उपक्रमाची मंगळवारपासून (दि. ११) सुरूवात होणार असून ‘पुस्तक घ्यावे.. पुस्तक द्यावे’ अशी ही आगळीवेगळी योजना आहे. या योजनेचे शिल्पकार ग्रंथमित्र विनायक रानडे आहेत.

या योजनेचा शुभारंभ सायंकाळी ५ वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान, जलतरण तलावाजवळ, टिळकवाडी येथे होणार आहे. या उपक्रमात दर्जेदार साहित्याची शेकडो पुस्तके उपलब्ध असून वाचकांनी स्वत:ला आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जावे व स्वत:चे एक पुस्तक देऊन जावे. त्यातून आपल्याला मिळालेला पुस्तक वाचनाचा आनंद इतरांनाही मिळावा असा या मागील उद्देश आहे. त्यामुळे अनेक वाचकांच्या घरी वाचून झालेल्या पुस्तकांना नवीन वाचक मिळतील आणि स्वत:चीही ग्रंथ समृद्धी वाढेल. ही योजना रविवार, २३ एप्रिल २०१७ पर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर्धन क्षेत्राबाबत हरकतींसाठी आवाहन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक जिल्ह्याच्या सुधारित प्रादेशिक योजनेअंतर्गत गोवर्धन गावाच्या शिवारातील १९.२३ हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र
‘यलो झोन’मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे आला आहे. नगररचना विभागामार्फत या प्रस्तावाबाबत काही हरकती असल्यास त्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्याची सुधारित प्रादेशिक योजना सरकारने जून २०१३ मध्ये मंजूर केलेली आहे. या योजनेनुसार नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथील गट. नंबर ३७(पै), ३८(पै), ३९ व ४० मधील १९.२३ हेक्टर क्षेत्र या शेती विभागात समाविष्ट आहे. या मंजूर प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम १५४ अन्वये वेळोवेळी जमीन वापराच्या फेरबदलाचे आदेश सरकारने दिले आहेत. या कामी सरकारने प्रस्ताव छानणी समितीही गठित केली आहे. त्यानुसार या योजनेतील वरिल शेतजमीनीचे क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नगररचना विभागाकडून या फेरबदलाबाबत नागरिकांकडून लेखी हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या फेरबदलाचा नकाशा सहाय्यक संचालक नगरचना विभाग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्य सूत्रधार कृष्णा होळकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चलनातून बाद झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या नोटा शहरात आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवली. संशयितांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. या नोटांमागे कृष्णा होळकर प्रमुख सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यात चार सराफ व्यावसायिकांचा समावेश आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे, सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे आणि उपनिरीक्षक महेश हिरे यांनी द्वारका चौकात सकाळी दहापासून सापळा रचण्यात आला होता. दुपारी बारा वाजेच्या सुमारास वडाळ्याकडून झायलो कार (एमएच १५/टीएस ९५८६) द्वारका सर्कलच्या दिशेने येऊन थांबली तर विरुद्ध दिशेने एका सुझुकी अॅक्सेस मोपेड दुचाकीवरून मुख्य संशयित कृष्णा होळकर आला.

वाहनामधील संशयित होळकर याच्याशी बोलणी करीत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांना संशय आला. पोलिसांचे एक वाहन त्यांच्या दिशेने जात असताना संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोहोबाजूने पोलिस आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात यश आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटांचे अनेक बंडले आढळून आली. वाहनामधील चौघांसह होळकरला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पाचशेच्या नोटा अधिक

या नोटांची मोजणी केली असता ९९ लाख ९५ हजार एवढी ही रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे. जप्त केलेल्या नोटांमध्ये पाचशेच्याच नोटांचा भरणा अधिक आहे. पाचशेच्या १३ हजार ५०० नोटा आढळून आल्या आहेत. ६७ लाख ५० हजार रुपये मूल्याच्या या नोटा आहेत. एक हजाराच्या तीन हजार २४५ नोटा आढळून आल्या. या नोटांचे मूल्य ३२ लाख ४५ हजार रुपये एवढे आहे. या नोटा संबंधित सराफ व्यावसायिकांच्याच असाव्यात, असा पोलिसांचा संशय आहे.

आता लक्ष आयकरच्या कारवाईकडे

सुमारे एक कोटींच्या जुन्या नोटा पकडल्यानंतर पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. संबंधित संशयितांची माहिती या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत तपासून एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे कोठून आली याची माहिती मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून या प्रकरणाशी संबंधित कोणती माहिती पुढे येते याकडे आता लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव स्टॅण्डवर वाइन शॉपची डोकेदुखी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महामार्गावरील वाइन शॉप बंद झाल्यामुळे मालेगाव स्टॅण्ड येथील वाइन शॉपवर प्रचंड गर्दी होत आहे. त्याचा त्रास येथील रहिवाशांना विशेषत: महिलांना सोसावा लागत असल्याने येथील वाइन शॉप बंद करण्याची मागणीसाठी येथील नागरिकांनी बैठक घेतली. यात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतचे दारू दुकाने, परमिट रुम, बार वाइन शॉप बंद करण्याचे आदेश दिल्याने अनेक वाइन शॉप आणि बार बंद झाले. ज्या ठिकाणची दारू दुकाने बंद झाली आहेत. तेथील नागरिकांनी या आदेशाचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला.

पंचवटीत परिसरातील बहुतांशी दारू दुकाने आणि बार हे महामार्गालगत असल्याने ती बंद करावी लागली आहे. मात्र, जुना मुंबई-आग्रा महामार्ग असलेल्या मालेगाव स्टॅण्ड परिसरातील दोन देशी दारू दुकान, एक वाइन शॉप आणि एक बिअर बार यांना अभय मिळाले आहे. त्याचा दुष्परिणाम येथील रहिवाशांना सोसावा लागत आहे. परिसरातील सर्वच दारू दुकाने बंद झाल्याने दारू घेण्यासाठी मद्यपी सकाळपासूनच मालेगाव स्टॅण्ड परिसरात गर्दी करीत आहेत. त्यांची वाहने भर रस्त्यात उभी करून दारू घेण्यासाठी रांगा लावतात. परिणामी रस्त्यावर वाहतूक ठप्प होते.

दारु दुकानाशेजारी असलेल्या जनरल स्टोअर्समध्ये महिलांना विविध वस्तू घेण्यासाठी जायचे असते. त्यांची दारू घेण्यासाठी आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून छेडछाड करण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे या परिसरातील महिलांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. या समस्यांनी त्रस्त झालेल्या महिला आणि स्थानिक नागरिकांनी रविवारी रात्री हनुमान मंदिर येथे बैठक घेऊन दारू दुकान बंद करण्यासाठी चर्चा केली. बैठकीस राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीचे अध्यक्ष गणेश कदम, महानगर प्रमुख दीप्ती गायकवाड, नगरसेविका विमल पाटील, सागर बैरागी, स्वप्निल येवले, रामेश्वर लोखंडे, मुरलीधर अलई आदी उपस्थित होते.

... तर ठिय्या आंदोलन करू

दारूमुळे अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यासाठी सरकाराने सरसकट दारूबंदी करण्याची गरज आहे. मालेगाव स्टॅण्ड येथील दारू दुकानाच्या परवान्याचे नुतनीकरण उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कसे देतात? याविषयी जाब विचारू, असे दीप्ती गायकवाड यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देऊनही हे दारू दुकान बंद केले नाही, तर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे बैठकीत ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूबंदीसाठी नाशिकरोडला आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सुप्रीम कोर्टाच्या दारूबंदीच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीतर्फे नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त एकनाथ डवले तसेच नाशिकरोड रेल्वे स्टेशनप्रमुख एम. बी. सक्सेना यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात दारूबंदी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आठ दिवसात समिती स्थापन करावी, समितीत दारूबंदी आंदोलनातील ३६ जिल्ह्यांचे प्रतिनिधी घ्यावेत, धार्मिक स्थळांच्या पाचशे मीटर परिसरात दारूबंदी लागू करावी, मद्याशी निगडीत नवीन परवाने देऊ नयेत, परवानाधारकालाच दारू दुकांनामध्ये मद्य पिण्यास परवानगी द्यावी, गावांमध्ये वाइन शॉप सुरू करण्यासाठी ग्रामपचंयातीच्या ठरावासह ग्रामसभेत ५० टक्के महिलांची परवानागी हवी, गावांमध्ये अवैध मद्य विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने मंजूर केलेल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना त्वरित करावी, २०१९ पर्यंत दारूबंदीसाठी टप्प्याटप्प्याने पाऊले उचलावीत, दारूमुळे उद्‍ध्वस्त झालेल्या कुटुंबांची जबाबदारी सरकारने घ्यावी, अवैध दारूविक्रीस जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अवैध दारू तयार करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षेची तरतूद व्हावी व जबाबदार पोलिस निरीक्षकासह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, आदी मागण्या निवेदनात आहेत. आंदोलनात सुभाष वाघ, माधवी पाटील, वैशाली मोजाड, पूजा चांघुलकर, दीप्ती पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते मालकीवरून खो-खो

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील दारूविक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर महानगरात रस्त्याच्या मालकीवरून प्रशासनाने घातलेल्या गोंधळामुळे दारूविक्रेत्यांना चांगलीच झिंग आली आहे. कोेर्टाच्या आदेशातून पळवाटा शोधण्याच्या अनेक क्लृप्त्या देशभरात काढल्या जात असताना नाशिकचे दुकानदारही आता मागे नाही.

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल आम्ही करीत असलो तरी मालकी आमची नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) रस्ते हस्तांतरीत केल्यामुळे मालक महापालिकाच असल्याचे म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व अबकारी कर खात्यानेही मालकी स्पष्ट केल्यानंतर कोर्टाच्या निर्णयानुसार परवानगी देण्याची भूमिका घेतल्यामुळे दारूदुकानदारांना भूर्दंड बसतो आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नाशिकमध्ये ७० टक्क्यांहून अधिक दुकाने बंद झाल्याने सामान्य माणूस सुखावला आहे. तर दारूविक्रेते पळवाटा शोधत आहे. काही दुकानदार निर्णय कसा फटका बसला हे सांगत आहेत. त्यामुळे हस्तांतरण व मालकीचा मुद्दा या दुकानदारांसाठी कळीचा ठरला आहे. दारूविक्रत्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपले प्रश्न मांडल. चर्चेदरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणते रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित केले याची माहिती दारूविक्रेत्यांना दिली. तर महापालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या मालकीच्या प्रश्नावरची उत्तरेही त्यांनी समोर ठेवली. पण या हस्तांतरण व वर्गीकरण या क्लिष्ट शब्दांनी दारू विक्रेते गोंधळून गेले आहेत.

नियमांचा चुकीचा अर्थ

राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग या ठिकाणी होत असलेल्या दारूविक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष काढत सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे दारूविक्री करण्यास बंदी घातली आहे. पण या मार्गासह इतरही दुकानांवर चुकीच्या माहितीच्या आधारे दुकान बंद केल्याचे दारूविक्रत्यांचे म्हणणे आहे.


घोळात घोळ!

विक्रेत्याचा परवाना हा १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी असतो. त्यानंतर ३१ मार्च रोजी या परवान्याचे रीतसर नूतनीकरण करावे लागते. पण कोर्टाने प्रतिबंध घातल्याने जिल्ह्यातील ७० टक्के दुकानांचे परवाना नूतनीकरण करण्यात आलेले नाहीत. त्यात या दुकानांची संख्याही मोठी आहे. या सर्वातून सरकारचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडणार आहे. त्यामुळे प्रशासनाची गोची झालेली आहे. नेमके काय करावे, याची भूमिकाही स्पष्ट नाही. त्यामुळे घोळात घोळ वाढवून अनुत्तरीत ठेवण्याचा प्रकार दारुविक्रेत्यांना न पिताच नशा आणणारा ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक वादात पत्नीची हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

वडाळागावात पती-पत्नींमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात पतीने पोटात चाकू भोसकून पत्नीला गंभीर जखमी केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना जखमी महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी पती जीवाजी भुजंग पहाडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सुरेखा जीवाजी पहाडे (२८) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा जीवाजी पहाडे यांच्यासोबत विवाह झालेला होता. अनेक दिवसांपासून त्या दोघांमध्ये कौटुंबिक वाद-विवाद होत असे. दोघांमध्ये सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कडक्याचे भांडण झाले. यात जीवाजी याने रागाच्या भरात घरातीलच चाकूच्या सहाय्याने पत्नीला भोसकले. यामुळे सुरेखा या गंभीर जखमी झाल्या. सुरेखा यांना त्यांच्या दिराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना सुरेखा यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला करीत पती जीवाजी याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पहाडे कुटुंबीय हे मूळचे परभणी येथील आहेत. गेल्या काही वर्षांपासून वडाळागावातील सावित्रीफुले वसाहत येथे ते रहात होते. हे दोघेही मोलमोजरीचे करून कुटुंब चालवित होते.

सावकार कुटुंबीयांना न्यायालयीन कोठडी

सातपूर : कामगारनगर भागातील गुरूकुल सोसायटीत राहणाऱ्या विवाहिता आरती सावकार आत्महत्येप्रकरणी सातपूर पोलिसांनी पती गौरव, सासरे आप्पासाहेब व सासू सुनीता गौरव यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी सावकार कुटुंबीयांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी अशोक पवार यांनी दिली.

दरम्यान, आरतीचे वडील भगवानराव पाटील यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची भेट घेत आत्महत्या नसून खूनच असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरती आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. पोलिसांच्या तपासात अनेक संशयास्पद बाबी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विजेच्या शॉकने दुचाकी जळाली

सातपूर : श्रमिकनगरच्या संगम रोहाऊसेसमध्ये राहणाऱ्या प्रशांत मनोहरसिंह यांची दुचाकी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास विजेच्या शॉकमुळे जळाली. याबाबत सिंह यानी सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. घराच्या बाहेरील पार्किंगमध्ये दुचाकीला अचानक विजेच्या शॉकने आग लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images