Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झेडपीचे उमेदवार अब्जाधीश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील निमगाव गटात भाजपकडून उमेदवारी करणारे जगन्नाथ दशरथ हिरे यांची मालमत्ता तब्बल १७१ कोटींची आहे. ते राज्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. राज्यातील पहिल्या १० श्रीमंत उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.

राज्यात १३ जिल्हा परिषदांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत २,९५६ पैकी १,९२९ उमेदवारांच्या मालमत्तेचा गोषवारा एडीआरच्या वेबसाईटवर प्राप्त झाला आहे. यामध्ये ४८० उमेदवार कोट्याधीश असून त्यापैकी १० उमेदवारांची संपत्ती प्रत्येकी २८ कोटींहून अधिक आहे. राजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींची संपत्ती हा सामान्य नागरिकांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरला आहे. डोळे विस्फारतील एवढी संपत्ती उमेदवारांकडे असते. यंदा प्रथमच या संपत्तीचा तपशील मतदान केंद्राबाहेर लावणे निवडणूक आयोगाने प्रशासनाला अनिवार्य केले. राज्यात मंगळवारी, २१ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. ६५४ जागांसाठी दोन हजार ९५६ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. त्यापैकी १ हजार ९२० उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण महाराष्ट्र

इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केले आहे. त्यानुसार, २८ कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मालेगावातील निमगाव गटात भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या जगन्नाथ हिरे यांनी आपली मालमत्ता १७० कोटी ९९ लाख ८५ हजार ४१४ रुपये इतकी असल्याचे जाहीर मेले आहे. त्यामध्ये १६९ कोटी ८१ लाख ५५ हजार ७४४ रुपयांची

स्थावर मालमत्ता आहे. तर एक कोटी १८ लाख २९ हजार ६७० रुपये ही चल मालमत्ता असल्याचे दर्शविण्यात आले आहे. याखेरीज नाशिक जिल्ह्यात आणखी दोन उमेदवार करोडपती आहेत.

सौंदाणे गटातील भाजपच्याच उमेदवार मनीषा रत्नाकर पवार यांची मालमत्ता ५६ कोटी ५३ लाख ४९ हजार ५८६ रुपये एवढी असून त्यांच्यावर नऊ कोटी ४० लाखाचे कर्ज आहे. तर पालखेड गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी दिलीप बनकर यांची मालमत्ता ३६ कोटी ५९ लाख ५३ हजार ४३५ रुपये एवढी दर्शविण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन तर सातारा जिल्ह्यातील दोन उमेदवार कोट्याधीश आहेत. पुणे आणि रायगडातील प्रत्येकी एक उमेदवार कोट्याधीश आहेत.

राष्ट्रवादी सर्वाधिक श्रीमंत
पक्षनिहाय विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक चार उमेदवार कोट्याधीश असून त्याखालोखाल भाजपचे तीन उमेदवारांनी आपली संपत्ती काही कोटींमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. दोन अपक्ष तर काँग्रेसच्या एका उमेदवाराकडे ३२ कोटी ८० लाख रुपयांची संपत्ती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेकायदा दवाखान्यात गर्भपाताचा गोरखधंदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अवघे तीस हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरचे प‌ितळ उघडे पडले आहे. ओझर आणि मुंबई नाका अशा दोन ठिकाणी सदर डॉक्टर बऱ्याच दिवसांपासून हा उद्योग करीत असल्याचे समोर आले असून, पोलिसांच्या चौकशीनंतर मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. बेकायदा दवाखान्यात चुकीच्या पध्दतीने गर्भपात झालेल्या एका महिलेवर सुरू झालेल्या उपचारानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
डॉ. बळीराम निंबा शिंदे असे संशयित डॉक्टरचे नाव असून, त्याचे मुंबई नाका परिसरात शिंदे हॉस्पिटल नावाचा बेकायदा दवाखाना आहे. बेकायदा गर्भपात रोखण्यासाठी महापालिकेतर्फे सातत्याने हॉस्पिटलची तपासणी केली जाते. १७ फेब्रुवारी रोजी आरोग्याधिकारी डॉ. विजय नथुजी डेकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आरती शेखर चिरमाडे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. प्रशांत शेटे आदींचे पथक संशयित डॉक्टर शिंदे यांच्या दवाखान्यात पोहचले होते. मात्र, येथे आंतररूग्ण पेशंट नसून, फक्त संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत पेशंट तपासले जातात, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. एवढेच नव्हे तर तपासणी पथकास इमारतीची पाहणी करण्यास मज्जाव केला. मात्र, तपासणी पथकाने शिंद यांचा विरोध मोडून काढत आपले काम केले. यात सदर दवाखाना किंवा हॉस्पिटलची नोंदणी नसून, पहिल्या मजल्यावर एक महिला उपचार घेत असल्याचे दिसले. सदर महिला पेशंटच्या रिपोर्टबाबत विचारणा केली असता तिच्या पोटात रक्ताची गाठ झाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. मात्र, यावेळी महिला पेशंटने तपास पथकास उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणी सुरू असताना संशयास्पद व्यक्तींची संख्या वाढल्याने महापालिका डॉक्टरांनी तेथून काढता पाय घेतला व याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. यानंतर, महापालिका प्रशासनाने संबंध‌ित महिला पेशंटवर तातडीने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. विजय थोरात (एम. एस. सर्जन), डॉ. सचिन जाधव (रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ. विजय पिंचा (भूलतज्ज्ञ) यांना नोटीस देऊन बोलावून घेतले. अर्थात, या डॉक्टरांनी इमर्जन्सीमुळे उपचार करण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, या डॉक्टरांच्या चौकशी व लेखी जबाबानुसार डॉ. शिंदे हे बेकायदेशीर गर्भलिंग व गर्भपात करीत असल्याचा ठाम विश्वास महापालिका डॉक्टरांना झाला. त्यानुसार, महापालिका पथक पोलिसांसह शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिंदे हॉस्पिटल येथे पोहचले. यावेळी उपस्थित काही कर्मचाऱ्यांनी महिला पेशंटला झाला प्रकार सांगू नये, यासाठी दमबाजी करीत डॉ. शिंदे यांना पाचारण केले. मात्र, शिंदे आले नाहीत. यानंतर, महापालिका डॉक्टरांनी संबंध‌ित महिलेस उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटल सील करण्याची प्रक्रिया सुरू असताना डॉ. शिंदे यांनी तेथे येऊन महापालिका डॉक्टरांना शिवीगाळ करीत गोंधळ घातला. याप्रकरणी डॉ. विजय डेकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. शिंदे यांच्या विरोधात बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात करणे, सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ करणे, तसेच मुंबई सुश्रूषा अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ओझर येथे गर्भपात
डॉ. शिंदे यांचे ओझर येथे हॉस्पिटल आहे. याच ठिकाणी गर्भपात केला जात असल्याचे महापालिका प्रशासनाच्या चौकशीत पुढे आले आहे. अवघ्या ३० हजार रुपयांमध्ये असुरक्षित पध्दतीने गर्भपात केला गेला. यामुळे महिलेच्या जीवावर बेतले होते. महापालिका तपासणी पथकाने वेळेवर पोहचून संबंध‌ित महिलेवर उपचार केले नसते तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. डॉ. शिंदे हा उद्योग बऱ्याच दिवसांपासून करीत असल्याचा संशय आहे.

मटा भूमिका
गर्भलिंग तपासणीविरोधात सरकारने कठोर कायदे केलेले असताना व बीड घटनेनंतर अनेक डॉक्टरांना जेलची हवा खावी लागल्यानंतरही वैद्यकीय व्यवसायातील लोक सुधारण्यास तयार नाहीत, हेच डॉ. शिंदे प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यांनी कायदा भंग करतानाच तपासणी करण्यास आलेल्यांना धमकावले देखील. हे म्हणजे चोर, तर चोर वर शिरजोर या प्रकारातील झाले. हे महाशय डॉक्टर नसून, कसाई आहेत याची प्रचिती आली. समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या अशा डॉक्टरांविरोधात त्यांच्या संघटनांनी सुध्दा आता ठामपणे उभे ठाकले पाहिजे; अन्यथा आधीच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला वैद्यक व्यवसाय पुरता बदनाम होईल. रुग्णाच्या विश्वासाला तडा जाणार नाही एवढीही काळजी पैशांसाठी अंध झालेले डॉक्टर घेणार नसतील तर अशांची जागा ही तुरुंगातच आहे, हे त्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे, तरच त्यांना जरब बसू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर विभागात ९२४ कर्मचारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच एका प्रभागात चार उमेदवार अशी निवडणूक होत आहे. त्यातच सर्वच पक्षांनी उमेदवार दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांची सोमवारी मतदान साहित्य घेण्यासाठी लगबग दिसून आली. सातपूर विभागात प्रभाग ८, ९, १० व ११ हे प्रभाग आहेत. या चार प्रभागांसाठी १५४ मतदान केंद्रांवर पोलिसांसह ९२४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातपूर क्लब हाऊस येथेच गुरुवारी, २३ फेब्रुवारी रोजी सातपूर विभागाची मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी सांगितले.

मतदान केंद्रच बंद

मतदानाचे साहित्य घेऊन अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेल्या ठिकाणी हजर झाले होते. यात सातपूर कॉलनीतील आठ हजारात असलेल्या मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी गेले असता, केंद्रच बंद असल्याचे समोर आले. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना फोन केल्यावर केंद्र उघडण्यात आले. मात्र, केंद्रात टेबल व खुर्च्यांची व्यवस्था नसल्याचेही समोर आले. काही केंद्रांवर वीजपुरवठाच नसल्याचेही समोर आले.

दृष्टिक्षेपात सातपूर विभाग

१५४ मतदान केंद्रे
९२४ कर्मचारी
२३ फेब्रुवारीला सातपूर क्लब हाऊसमध्ये मतमोजणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याद्यांच्या घोळामुळे वाढला संभ्रम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या मतदार याद्यांमधील नावांचा घोळ शेवटी मतदानाच्या आदल्या दिवशी पुन्हा उफाळून आला आहे. नाशिकरोड व पंचवटीत अनेक ठिकाणी नावे शोधण्यासाठी मतदारांना तारेवरची कसरत करावी लागत असून, अनेक मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात असल्याचे समोर आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नाशिक रोड येथे काही बुथ ऐनवेळी बदलण्यात येऊन मतदान चिठ्ठ्यांचे चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी असून नागरिकांसाठी सोमवारचा दिवस नावे शोधण्यासाठी त्रासदायक ठरला.
महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होत असून प्रशासनाने मतदार यांद्यामध्ये घातलेल्या गोंधळाने उमेदवारांसह मतदारही त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने मतदारांना आपली नावे शोधण्यासाठी व हरकती घेण्यासाठी आठ दिवसांचा वेळ दिला होता. परंतु, या वेळेत निष्काळजीपणा केल्याचा फटका मतदारांना बसत आहे.
फ्लेक्सवर झळकल्या कुंडल्या
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे महापालिकेने प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या कुंडल्या मांडल्या आहेत. त्यासाठीची व्यवस्था सोमवारीच पूर्ण करण्यात आली. उमेदवाराचे शिक्षण, संपत्ती आणि त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती फ्लेक्साद्वारे प्रत्येक केंद्रावर लावण्यात आली आहे.
चिठ्ठ्या मिळाल्या नाहीत
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेने राजकीय पक्षांसोबतच मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठ्या वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सहा विभागांत ९०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. गेल्या आठवड्यापासून मतदान चिठ्ठ्या वाटपाचे काम सुरू असले तरी निवडक लोकांकडेच या चिठ्ठ्या पोहचल्या आहेत.
मतदान केंद्राबाहेर मदत कक्ष
ज्या मतदारांना चिठ्ठ्या मिळाल्या नाहीत, ऑनलाइन सर्चमध्ये नाव सापडले नाही अशा मतदारांसाठी महापालिका प्रत्येक मतदान केंद्राबाहेर एक मदत कक्ष सुरू करणार आहे. या ठिकाणी जाऊन नागरिक आपले मतदान शोधू शकतात.
पती-पत्नीचाही केंद्रबदल
मतदार यादीतल्या गोंधळाचा फटका कुटुंबांतील सदस्यांनाही बसला आहे. अनेक प्रभागांमध्ये पतीचे मतदान एका केंद्रावर तर दुसऱ्या मतदान केंद्रावर पत्नीचे मतदान दाखवण्यात आले आहे. काही ठिकाणी पती व पत्नीचे प्रभागही बदलण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवमतदारांनो, सेल्फी पाठवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सनेही पुढाकार घेतला आहे. मंगळवारी मतदान झाल्यानंतर या नवमतदारांनी त्यांचा सेल्फी आणि त्यांच्या मतदार कार्डाचा फोटो ‘मटा’कडे पाठवायचे आहे. यातील निवडक सेल्फीज््ना ‘मटा’मध्ये प्रसिद्धी दिली जाणार आहे.
मतदान करण्याची पहिलीच वेळ असलेल्या नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आज (२१ फेब्रुवारी) मतदान केंद्रांवर याची प्रचितीही येणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्याचा व त्यातून योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. मतदान केल्यानंतर सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेण्डही हल्ली जोरात असल्याने नवमतदारांमध्ये त्याची क्रेझ प्रामुख्याने दिसून येईल. अशाच मतदारांसाठी ‘मटा’नेही पुढाकार घेतला आहे. पहिल्यांदाच मतदान केलेल्या व्यक्तींना आपला सेल्फी ‘मटा’कडे पाठवता येणार असून त्यास प्रसिद्धीदेखील दिली जाणार आहे.
मतदान करुन आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. प्रत्येकासाठीच पहिल्यांदा मतदान करणे हा औत्स्युकाचा विषय असतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉलेज कट्ट्यावरही तरुणांच्या याविषयी गप्पा रंगलेल्या दिसून आल्या. त्यामुळे नवमतदारांना पहिल्यांदा मतदान करण्याविषयी वाटत असलेला उत्साहही दिसून आला होता. मतदान केल्यानंतर प्रत्येकाला आपण आपला हक्क कसा बजावला हे इतरांना दाखविण्यातही आनंद मिळत असतो. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर सेल्फी टाकण्यासाठीही प्राधान्य दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाभरात आज मतपरीक्षा

$
0
0

टीम मटा

राज्यासह जिल्ह्यात आज (दि. २१) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, निवडणूक कामाची तयारी सोमवारी (दि. २०) दिवसभर प्रत्येक मतदान केंद्रांवर सुरू होती. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी आज (दि. २१) मतदान होणार आहे. निवडणुककामी असलेले कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर एक दिवसाअाधीच पोहोचले आहेत. या मतदानाच्या वेळी कोणतीही अनूचित घटना होऊ नये यासाठी जिल्ह्यात पोलिसांनी चांगलाच फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

यंत्रणा सज्ज

कळवण : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून संपूर्ण तालुक्यात १५५ मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी याप्रमाणे

९३० कर्मचाऱ्यांसह राखीव ९६ असे १,०२६ कर्मचारी सोमवारी (दि. २०) आपापल्या मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत.

प्रशासकीय इमारत आवारात उभारलेल्या कर्मचारी प्रशिक्षण हॉलमध्ये निवडणूक निर्भय व बिनचूक होण्यासाठी केंद्रप्रमुख व कर्मचाऱ्यांची जबाबदारीची २० मिनिटांची प्रात्यक्षिक परीक्षा वर्ग तहसीलदार कैलास चावडे व निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण डी. यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानंतर ठरलेल्या मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना बसेसने सोडण्यात आले. यासाठी २० बसेस वापरण्यात आल्या. तसेच मतदान काळात काही अनुचित प्रकार घडला तर काय काळजी घ्यावी. व जवळ असलेल्या पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.


बहुरंगी लढतींकडे लक्ष

निफाड : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लढती या बहुरंगी होत असून या लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या वेळी तालुक्यातील १० पैकी ८ गट खुले, ओबीसी झाल्याने उमेदवारांची मोठी संख्या यावेळी पाहायला मिळाली. प्रचाराच्या सुरुवातीला मेळावे आणि बैठका यांचा धडाका लावलेल्या शिवसेनेला नंतर तिकिट वाटपात मानापमान झाल्याने बंडखोरी निर्माण झाल्याने सेनेपुढे या निवडणुकीत गेल्या वेळी जिंकलेले ५ गट शाबूत ठेवण्याचे आव्हान आहे. लासलगाव बाजार समिती आणि शेतकरी संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजेंद्र डोखळे, सुभाष कराड यांची बांधलेली मोट ऐन निवडणुकीच्या काळात तुटल्याने ज्याच्या बळावर विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यावर पाणी फिरल्याने त्यांना ही लढाई अवघड आहे. राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी आपल्या पत्नी मंदाकिनी यांना पुन्हा पालखेड गटातून उतरवले आहे. जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी ५१ तर पंचायत समितीच्या २० गणांसाठी ८९ उमेदवार रिंगणात आहेत. १५२२६२ स्त्री व १५६३०० पुरुष असे एकूण ३ लाख २८ हजार ५६२ मतदार मतदान करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात १६७ मतदान केंद्रे सज्ज

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषदेच्या पाच गटांसह पंचायत समितीच्या दहा गणातील निवडणुकीसाठी आज (दि. २१) होणाऱ्या मतदानासाठी येवला तालुक्यातील एकूण १६७ केंद्रे सज्ज झाली आहेत. मतदानासाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे तसेच इतर साहित्य घेऊन मतदान केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकारी, शिपाई असा मोठा ताफा पोलिस बंदोबस्तात सोमवारी (दि. २०) सायंकाळपर्यंत तालुक्यातील गावोगावच्या प्रत्येक मतदान केंद्रांवर पोहचला आहे. येवल्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणेचा अकराशेच्यावर फौजफाटा तैनात केला गेला आहे.

मतदानासाठी नियुक्त केले गेलेले अधिकारी, कर्मचारी यांची सोमवारी, सकाळपासूनच येवला तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी तहसीलच्या आवारात ‘मॉकपोल’चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यानंतर मतदान यंत्रे व इतर सर्व साहित्य घेऊन अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या २२ बसेस, ४० जीप्स अशा एकूण ६२ वाहनांमधून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले.

प्रत्येक मतदान केंद्रावर गट व गणासाठी स्वतंत्र एक याप्रमाणे दोन ‘इव्हीएम’ वापरले जाणार असून प्रत्येक केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ४ मतदान अधिकारी, १ शिपाई तसेच पोलिस कर्मचारी अशी यंत्रणा ठेवण्यात आली आहे. येवला तालुक्यात एकूण १,००२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यात एकूण २२ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त असून निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम यांनी दिली.

दीड लाख मतदार

येवला तालुक्यातील ‘झेडपी’ च्या पाच गटात १९, तर पंचायत समितीच्या दहा गणात ४५ असे एकूण ६४ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला एकूण एकूण १ लाख ५० हजार ६०४ मतदारांच्या हाती असणार आहे. मतदान यंत्रावर गटासाठी शुभ्र मतपत्रिका, तर गणासाठी गुलाबी मतपत्रिका लावण्यात आलेली आहे. मशीनवर ‘नोटा’चा पर्यायदेखील मतदारांना उपलब्ध आहे.मतदान सुरळीत व निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणा सज्ज आहे. अंदरसूल, नगरसूल, राजापूर, ममदापूर, गुजरखेडे, पाटोदा, मुखेड, नागडे या ठिकाणांच्या मतदान केंद्रांचा संवेदनशील यादीत समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत ८८ उमेदवारांचे भवितव्य होणार सीलबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यात पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गण असे १५ जागांसाठी असे ८८ उमेदवारांची भवितव्य आज मतदान यंत्रात सीलबंद होणार आहे. पाच गटासाठी २९ उमेदवार तर १० गणासाठी ५९ उमेदवारांमध्ये आज चुरशीचे मतदान होणार आहे.

इगतपुरी तालुक्यात पाच गट व दहा गणासाठी एकूण १,५०,६७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात शिरसाठे गटात २९४१० मतदार असून शिरसाठे गणात १५५०१, तर खंबाळे गणात १३९०९ मतदार आहेत. वाडीव-हे गटात ३१६०३ मतदार असून वाडीव-हे गणात १५०२२, नांदगाव बु. गणात १६५८१ मतदार आहेत. घोटी गटात ३०१०९ मतदार असून, घोटी गणात १६१९३, तर मुंढेगाव गणात १३९१६ मतदार आहे. नांदगाव सदो गटात २८३५३ मतदार असून नांदगाव सदो गणात १३७६३, व काळूस्ते गणात १५४९० मतदार आहेत. खेड गटात ३११९७ मतदार असून, खेड गणात १५५५१, टाकेद गणात १५६४६ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी १६६ एकूण मतदान केंद्रे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल पाटील तर सहाय्यक अधिकारी म्हणून अनिल पुरे काम पाहत आहे. अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय घोगरे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर हिंदीतही झाले असते कम्प्युटर प्रोग्रामिंग

$
0
0

प्रश्न : जगात असंख्य धर्म, पंथ, संप्रदाय असताना अभ्यासासाठी हिंदू संस्कृतीची निवड आपण का केली?

उत्तर : मला जगाच्या पाठीवरील उत्कृष्ट जीवनपद्धती अभ्यासायची होती. तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर माझ्या व्याख्यातील उत्कृष्टतेची मुल्ये हिंदू जीवन पद्धतीत मला सापडली. हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनपद्धती आहे, तुम्हाला कुणावर विश्वास ठेवण्यापासून ही संस्कृती रोखत नाही की कुणावरही विश्वास न ठेवता बुद्धिवादी जगण्याचा पुरस्कार करते, इतकी टोकाची लवचिकता बघून ‘हिंदूइझम’ च्या अभ्यासाकडे मी ओढले गेले.

प्रश्न : सद्यस्थितीत भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबद्दल काय वाटते?

उत्तर : जगाच्या पाठीवरील मातब्बर देशांपैकी भारताची गणना आता होऊ लागल्याचे अनेकांचे मत आहे. पण आशियातील तुल्यबळ चीनसारख्या राष्ट्राप्रमाणे भारत महासत्ता बनण्यासाठी आक्रमक नाही. भारत हा प्राचीन काळी महासत्ता होताच. अन् हे स्वप्न लवकरच साकार होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे.

प्रश्न : माणूस माणसांपासून दुरावतोय. संस्कृतीचा वारसा सांगणारा भारतही यात बसतो का?

उत्तर : झगमगत्या प्रगतीने माणसाची मने सांधली गेलेली नाहीत, हे खरयं. याचे पडसाद विकसित राष्ट्रांमध्ये पूर्वीपासूनच अधिक आहेत. युनायटेड नेशन्स याच प्रयत्नांचा भाग म्हणून दुभंगलेल्या दोन राष्ट्रांमध्ये मध्यस्थी करून समन्वय साधू पाहत आहेत. पण् विरोधाभास असा की मध्यस्थी करणारे राष्ट्र त्यांची कुटूंबही एकत्रित आणू शकत नाही. त्या तुलनेत भारतातील कुटूंब व्यवस्था आणि इथली नाती अद्यापही मजबूत आहेत.

प्रश्न : हिंदूइझमच्या अभ्यासासाठी भारतीयत्व स्वीकारलं, आश्चर्य वाटते?

उत्तर : हो, अनेकांना याचे कुतूहल अन् आश्चर्य आहे. मात्र , तत्त्वज्ञानातील जे सत्य आहे. त्या सत्याचा शोध जगाच्या पाठीवर भारत देशातच पूर्ण होतो, हे आजवर अनेक दिग्गजांनी मांडले आहे. या उद्धारासाठी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भारतात यावेच लागले असते. मग आणखी वेळ कशासाठी घालवू म्हणून भारतीय युवकासोबतच संसार थाटून हा अभ्यास सुरू केला.

प्रश्न : जागतिकीकरणात भाषांची सरमिसळ होत आहे. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. हा प्रवाह भारतीयांना कुठे घेऊन जाईल ?

उत्तर : माणसाने जागतिकीकरणाच्या काळात अधिकाधिक भाषा आत्मसात कराव्यात पण त्याने मातृभाषेवरील प्रेम कमी होऊ देऊ नये. ज्या इतिहासकालिन गौरवशाली भारताचे गोडवे आपण गातो तेथे पुन्हा पोहचण्यासाठी भारतीय भाषांप्रती आदर अत्यंत महत्वाचा आहे. इंग्रजीही बोलाच पण् गरज असेल तेथेच बोला.

प्रश्न : कम्प्युटर प्रोग्रामिंग भारताला हिंदीतही शक्य झाले असते, असे आपले मत आहे.

उत्तर : होय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये भारताचा दबदबा आहे. इंग्रज भारतात आल्यानेच त्यांनी दिलेल्या इंग्रजीमुळे हे शक्य झाले आहे. मात्र, माझं याउलट मत आहे. इंग्रज भारतात आले नसते तर भारतीयांनी हिंदीत कम्प्युटर प्रोग्रामिंग करून हिंदीला वैश्विक भाषा बनविले असते.

प्रश्न : ऑलम्पिकसारख्या खेळांमध्ये भारत कुठेच नाही.

उत्तर : ज्या देशात तलवारबाजीचे शास्त्र ‘कलारीयापट्टू’ किंवा पंजाबमधील तुफान घोडेस्वारी ‘होला मोहल्ला’ आजही जिवंत आहे.

प्रश्न : भारतातील योगशास्त्र आणि आयुर्वेदाची भुरळ आपणास पडली.

उत्तर : आधुनिक विज्ञानासही मानवी मेंदूचे कोडे उलगडलेले नाही. शास्त्रज्ञांच्या दृष्टीने मानवी मेंदू हा एक चमत्कार आहे. अशा क्लिष्ट मेंदूच्या मर्यादेपलिकडचे ज्ञान देऊन परिणामकारकता घडवून आणणे हे भारतीय योगशास्त्र आणि आयुर्वेदासारख्या ज्ञानशाखांचे काम प्राचीन काळापासून सुरू आहे.

प्रश्न : भारतातील स्लम, बलात्कार, टॉयलेट्सची दूरवस्था या मुद्द्यांकडे आपण लक्ष वेधतात त्याबद्दल.

उत्तर : कुठल्याही देशात काही तरी समस्या निश्चित असतात. आंतरराष्ट्रीय स्तराला भारताची गौरवशाली परंपरा, या देशाच्या क्षमता, समृद्धी मी सांगते त्यावेळी पर्यटक विश्वास ठेवून भारताकडे आकर्षित होतात. तेव्हा त्यांना दुसऱ्या बाजूची माहिती देणेही गरजेचे ठरते. याचा अर्थ देशाची प्रतिमा हनन करण्याचा यात दृष्टीकोन नाही पण एक भारतीय या नात्याने परदेशी पाहूण्यांसोबत पारदर्शक राहणे हाही मला एक भारतीय संस्कार वाटतो.

शब्दांकन : जितेंद्र तरटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे भवितव्य होणार मतदान यंत्रांमध्ये बंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर गुरुवारी, २३ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी आज मतदान होत असून, तब्बल ८२१ उमेदवारांचे नशीब आज बॅलेटमध्ये बंद होणार आहे. सुमारे १० लाख ७३ हजार ४०७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठीची तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, शहरात १४०७ मतदान केंद्र तयार करण्यात आली असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेसाठी प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी मतदान होत असल्याने मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. पालिकेच्या ३१ प्रभागांमध्ये बहुतांश ठिकाणी चौरंगी आणि पंचरंगी लढती होत असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या आरोपांची चिखलफेक थांबली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे आणि भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेऊन निवडणूक प्रचारात शेवटच्या टप्प्यात रंग भरला. आचारसंहिता लागू होताच नाशिकरोडला पहिली राजकीय हत्या झाली होती. परंतु, त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्याने निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा सुव्यवस्था राखली असली तरी, मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेला आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय तयारी पूर्ण

नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३३८, तर गणांतील १४६ जागांसाठी ६७६ असे एकूण एक हजार ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणीतून उघड होणार आहे. जिल्ह्यात २५३ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

शहरासह जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल साडेचार हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात, शहर पोलिसांसह बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या पोलिसांचा तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांचा सामवेश आहे. अगदी छोट्या घटनांची गंभीर दखल घेतली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ, स्ट्राय‌ि‌किंग फोर्ससह सुमारे सात हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.


आपले भवितव्य चांगले करायचे असेल, तर प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवायलाच हवा. मी मतदान करणार असून, नाशिककरांनीही निर्भयपणे मतदान करावे.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मतदान हा लोकशाहीच्या रचनेतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. योग्य उमेदवारास निवडून देण्याची जनतेची जबाबदारी आहे. विचार करा, योग्य उमेदवारच निवडून द्या.

डॉ. विजय काकतकर, अस्थिरोग तज्ज्ञ

शहर विकासाची व सरकार पातळीवर जे काही चांगले, वाईट बदल घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देण्याची अमूल्य संधी मतदानातून मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करायला हवे.

- चिन्मय उदगीरकर, अभिनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजापुढे ठेवला तरुणाने नवा आदर्श

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार येथील विशाल शिरीष वारुळे याने साखरपुड्यातच लग्न लावून आपल्या समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. शहरातील शिरीष ताराचंद वारुळे यांचा मुलगा विशाल वारुळे यांचा साखरपुडा नाशिक येथील रहिवासी सुनील उमाजी वाघ यांची कन्या दीपाली हिच्याशी नाशिक येथे आयोजित केला होता.

साखरपुडा समारंभाच्या कार्यक्रम होत असताना फक्त एक मंगळसूत्र व सात फेऱ्यांची कमतरता होती, अशी भावना वधू व वराकडील नातेवाईकांनी व्यक्ती केली. यावर मुलाचे वडील शिरीष ताराचंद वारुळे व मुलीचे वडील सुनील वाघ तसेच नंदुरबार येथील माजी नगरसेवक किशोर सोनवणे, प्रा.गोपाल शिरसाठ, तात्या मगर, नाशिक येथील राजेंद्र अहिरे यांच्या मध्यस्थीने साखरपुड्यात लग्न करण्याचा विचार केला आणि साखरपुडा कार्यक्रमातच विवाह सोहळा पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चांगले आरोग्य ही विकासाची गुरूकिल्ली’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या वतीने प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून चांगले आरोग्य हीच विकासाची खरी गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी लामकानी (ता. धुळे) येथे केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय, जळगावच्या वतीने लामकानी येथे राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जनतेने सुद्धा आरोग्याच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्याची गरज आहे. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील यांनी उपस्थितांना आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनोज सोनोने यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निमित्ताने सकाळी गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला सरपंच नाना पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला. रॅलीत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम चव्हाण, क्षेत्रीय प्रचार सहाय्यक उल्हास कोल्हे, आर. एम. सोनसळ उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावरील या अभियानास आता विविध राज्यातील ग्रामीण भागांत पोहचवण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचेही देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळ, आक्षेप अन् शाब्दिक चकमकी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेसाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजेपासूनच मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासांमध्ये उत्साही मतदारांची उपस्थिती चांगली होती. मात्र गर्दी वाढल्यानंतर समोर येत गेलेला मतदारयाद्यांमधील गोंधळ, एकाच कुटुंबातील सदस्यांचे विविध केंद्रांवर विभागलेले मतदान, काही ठिकाणी पोलिसांशी उडणारे खटके, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या बेकायदेशीर कारवायांवर लक्ष ठेवून असलेल्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी होणारा गोंधळ, घेतला जाणारा आक्षेप, काही ठिकाणी निर्माण झालेला प्रासंगिक तणाव अशा घडामोडींमध्ये मंगळवारी मतदानाचा दिवस पार पडला. या वातावरणामुळे मतदान झाल्यानंतर अनेकांनी सुस्कारा सोडला.

मतदानास मंगळवारी सकाळी सुरुवात होण्याअगोदरपासूनच शहर आणि परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. मतदान केंद्राच्या आत गर्दी करू पाहणाऱ्या उमेदवारांना पोलिसांनी पहिल्यांदाच फैरीवर घेत केंद्राबाहेर थांबण्याचा इशारा दिला. पोलिसांची ही आक्रमक भूमिका पाहून सुरुवातीपासून कार्यकर्तेही दबून राहिले. मात्र, काही केंद्रांवर मतदारयाद्यांमधील गोंधळामुळे मतदारांच्या पदरी मनस्तापच पडला.

शहरातील विविध बूथवरील चित्र सकाळपासून मात्र वेगवेगळे होते. कुठे मतदात्यांची तुरळक गर्दी तर कुठे बूथचा परिसर गर्दीने व्यापला होता. गर्दीचा लोंढा वाढल्यानंतर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन, तर कुठे मतदारयाद्यांमधील गोंधळ नागरिकांच्या नाराजीचे निमित्त बनला.

ऊन वाढले, ओघ घटला

दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे २० टक्के मतदान झाले होते. यानंतर जेवणाची वेळ आणि उन्हाचा वाढता तडाखा यामुळे गर्दीचा ओघही मंदावल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रांवर होते. काही दिवसांपासून शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. याचाही परिणाम दुपारच्या सुमाराला मतदात्यांच्या उत्साहावर काही प्रमाणात दिसून आला. दुपारी तीन वाजेनंतर पुन्हा हळूहळू गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती. अखेरच्या तासाभराच्या कालावधीत मतदात्यांनी केंद्राबाहेर पुन्हा रांगा लावल्या. वॉर्डामधील दात्यांनी मतदान करावे, यासाठी विविध पक्ष अन् संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घरन् घर पिंजून काढले.

उन्हात पायपीट; शाब्दिक चकमकी

बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी लवकर मतदान करण्याचा उत्साह दाखविला. मात्र, दुपारनंतर आलेल्या अनेक ज्येष्ठांसह यादीतील नावे इतरत्र भरकटलेल्या उमेदवारांना मात्र केंद्रावर भर उन्हामध्ये पायपीट करावी लागली. मतदान केंद्रापासून २०० मीटरवर वाहने उभी करण्याचे निर्देश होते. काहींनी मात्र ज्येष्ठांच्या सुविधेसाठी हा नियम बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर यास पोलिसांनी अटकाव केला, तर काहींनी गाडी पार्किंगहून वाद घातला. यामुळे मतदार आणि पोलिसांच्या शाब्दिक चकमकीही उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.

कर्मचाऱ्यांचीही ओढाताण

शहरातील विविध मतदान केंद्रांवर उडालेला मतदारयाद्यांचा गोंधळ, काहींची चुकलेली मतदान केंद्रे, तर काहींची नावेच गहाळ झाल्याचा प्रकार, काहींचे यादीतील नाव असताना केंद्रावरील यादीत मात्र दुसऱ्याच मतदाराचे ऐनवेळी सापडलेले नाव यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फटका निवडणूक कर्मचाऱ्यांनाही बसला. नागरिकांनी या कर्मचाऱ्यांभोवतीच गोंधळ घातला. याशिवाय दूरदूरच्या वॉर्डांमध्ये असणाऱ्या नेमणुका, उन्हाचा वाढता कडाका यामुळे कर्मचाऱ्यांचीही ओढाताण झाली.

नवमतदारांचा उत्साह

निवडणुकीदरम्यान नवमतदारांचा चांगलाच उत्साह दिसून आला. एरवी सोशल मीडियावरून कमेंट्स करण्यात धन्यता मानणाऱ्या मतदारांनी मतदानप्रक्रियेचा प्रथमच अनुभव घेतला. नवमतदारांनी उत्साहापोटी दुपारी १२ वाजेअगोदरच मतदान केल्याचे चित्र होते. मतदान केल्यानंतर शाईच्या बोटासह काढलेले वैयक्तिक, ग्रुप सेल्फी सोशल मीडियावरून फिरविण्यात आले. नवमतदारांसोबतच उच्चशिक्षित मतदारांनीही सकाळी लवकरच मतदान करून घेण्यात धन्यता मानली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीदर्शन!

$
0
0


रायबा-सायबानं सुटेकचा सुस्कारा सोडला होता... ज्या दिवसाची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती, तो दिवस सुरळीत पार पडला होता... पण, एवढी मेहनत करूनही मतांचा टक्का न वाढल्यानं सगळ्याच वर्कर मंडळींना प्रचंड वाईट वाटत होतं... कॅन्डिडेट मंडळींनी लाखो रुपयांचा चुराडा करूनही मोठी संख्या असलेला मतदारराजा केंद्रापर्यंत न आल्यानं नाराजी व्यक्त होत होती...

रायबा : शेवटी विषय टक्क्यावरच येऊन थांबला राव... वाटत होतं यंदा सत्तर टक्के तरी वोटिंग होईल... पण, एवढं काठोकाठ प्रयत्न करूनही लोकं बाहेर पडलीच नाही...

सायबा : गेल्या वेळी बी एवढाच टक्का होता की... रविवारचं मतदान टाळूनही उपयोग झाला नाही... पण, या गोंधळाला सरकार बी जबाबदार आहे... लई लोकांची नावंच यादीतून गहाळ झाली होती... लोकं म्हणत होते, काही लोकांनीच यादीची शाळा केली...

रायबा : होय... होय... यादीची गडबड झालीच... एका ठिकाणी सहाशे नावं एकगठ्ठा गायब झाली... कुठंतरी पाणी मुरतंय राव... शोध घ्यायला पाहिजे ह्या कारस्थानाचा....

सायबा : कुणी काय करणार नाही... इलेक्शन पार पडलं की सगळं विसरून जातील... आमच्याकडं एका केंद्रावर एक जण व्होटिंग करायला आला... पण त्याच्या नावानं आधीच कुणीतरी मतदान केलं होतं.... त्यानं लई त्रागा केला पण, कर्मचाऱ्यांनी दमदाटी करीत सरळ त्याला बाहेर काढलं... लई ठिकाणी असं घडलं...

रायबा : बोगस बी चाललंय म्हणायचं...

सायबा : बोगस बी झालं अन् लोकांनी नोटा बी घेतल्या... मतांचा उघड सौदा होत होता... काहींनी हजार, तर काहींनी दोन हजार रुपये फुली घेतली... बरं काही मंडळींनी पाच-पाच कॅन्डिडेटकडून पैसे घेतले... तेही उघड उघड!

रायबा : तरीच संध्याकाळी काही केंद्रांवर गर्दी झाली... ज्यांनी थेट नोटा घेतल्या नाहीत, त्यांनी पार्ट्यांचा बार उडवला... सोमवारची अख्खी रात्र काही लोकांनी जागून काढली...

सायबा : ज्यांना लक्ष्मीदर्शन झालं नाही, त्यांनी केंद्रावर बी दर्शन दिलं नाही म्हणं... त्यामुळंच वोटिंग वाढलं नाही असं मला वाटतंय...

रायबा : शेवटी सगळीच निराशा झाली... यंत्रणेनं लोकांची निराशा केली अन् लोकांनी मग पाठ फिरवून कॅन्डिडेटची निराशा केली... केवढी थट्टा झाली म्हणायची!

(वर्कर मंडळींची पुरती निराशा झाली होती... महिनाभराच्या काळात त्यांची रोजगाराची तेवढी सोय झाली होती... काहींची चंगळही झाली होता... शेवटच्या दिवशी माणसं वाहून वर्कर जाम झाले होते... अंग दुखत असल्यानं आता उद्या दुपारी बारापर्यंत अंथरूण सोडायचं नाही, असा निर्धार अनेकांनी केला होता... अनेक कॅन्डिडेट्सनेही फोन स्वीच ऑफ करून ठेवले होते... एकदम काउंटिंगलाच फोन ऑन होणार होते.)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टी नाकारल्याने कामगारांचे मतदान हुकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने ज्या ठिकाणी मतदान असेल त्या ठिकाणचे कारखाने बंद ठेवून कामागारांना सुटी द्यावी, असे आदेश कंपन्यांना दिले होते. मात्र, नाशिकमधील औद्योगिक वसाहतींतील अनेक कंपन्यांनी कामगारांना वेळेवर सुटी न दिल्याने असंख्य कामगारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

सुशिक्षित मतदार मतदान करीत नाहीत, अशी नेहमी ओरड केली जाते. त्यासाठी राज्य सरकारने यंदा शनिवार-रविवारी या दिवशी मतदान न घेता मंगळवारी मतदान नियोजित केले होते. सुटीच्या दिवशी लोक घराबाहेर पडण्यास कंटाळा करतात म्हणून मतदानाला खास सुटी जाहीर केली होती. मतदानाच्या दिवशी कंपन्यांनी पूर्ण दिवस सुटी द्यावी अथवा काम सुरू होण्याअगोदर किंवा काम संपण्याच्या वेळेआधी दोन तास सुटी द्यावी असे आदेश दिले होते. मात्र, सरकारच्या या आदेशाला काही कंपन्यांनी केराची टोपली दाखवली आहे. या आदेशाची काही छोट्या कंपन्यांनी अंमलबजावणी करून कामगारांना सुटी दिली. मात्र, अनेक मोठ्या कंपन्यांनी नियम धाब्यावर बसून सर्व शिफ्टमध्ये काम सुरू ठेवले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्याचा आरोप अनेक कामगारांनी करून यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

दिलासा अन् दुर्लक्ष

मायको, मायलन, जिंदाल या कंपन्यांनी मतदानासाठी दोन तास सुटी जाहीर केली. मात्र, अंबड, सातपूर, सिन्नर येथील अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना मतदानापासून वंचित ठेवले. सिन्नरमधील काही कंपन्यांनी आपल्या कामगारांना मतदानासाठी चार वाजता सुटी दिली. नाशिक ते सिन्नर हे अंतर कापण्यास एक तासाचा कालावधी लागतो. सायंकाळच्या वेळेत रहदारी असल्याने कधी हे अंतर कापण्यास दीड तास लागल्याने कामगार साडेपाच वाजता घरी पोहोचले, त्यावेळी मतदानाची वेळ संपून गेली होती. त्यामुळे कामगारांना मतदान करता आले नाही. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कावर गदा आणल्याने अशा कंपन्यांवर कामगार आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. अनेक कंपन्यांनी सुरुवातीला मतदानासाठी सवलत जाहीर केली होती. मात्र, एेनवेळी कामगारांशी असहकार्य केल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याच्या तक्रारी आहेत.

निवडणूक आयोग छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करीत असतो. त्यांच्या ही बाब निदर्शनास कशी आली नाही? सकाळपासून अनेक कंपन्यांमधील कामगारांनी आमच्याशी संपर्क साधून तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दोषी कंपन्यांची नावे देण्यात येणार आहेत. या कंपन्यांच्या सवलती काढून त्यांच्या व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणार आहे.

-डॉ. डी.एल. कराड, कामगार नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यादीतील गोंधळाने मतदार जेरीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून निघालेल्या नाशिककरांना यंत्रणेने मतदार यादीत घातलेल्या गोंधळाचा मोठा फटका बसला. महापालिका क्षेत्रात जवळपास आठ ते दहा टक्के मतदारांच्या नावांमध्ये गोंधळ घालण्यासह थेट नावेच स्थलांतरीत करण्यात आल्याने मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नावांचे बूथ बदलण्यासह प्रभाग बदलण्याचा प्रताप यंत्रणेने केल्याचे समोर आले. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर नावे शोधण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. म्हसरूळ येथील जवळपास पाचशे ते सहाशे नागरिकांची नाव गायब झाल्याने संतप्त नागरिकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत, रास्ता रोको आंदोलन केले.प्रभाग क्र.१,३, १३, १४, १५, १६,३० या प्रभागातील याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाला होता.

नाशिकरोडला रात्रीतून बदलली ३५ केंद्रे

नाशिकरोड : नाशिकरोडला मतदानासाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी चारनंतर मतदारांची त्सुनामी आली असताना मतदार याद्यांतील घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. प्रभाग २०, २१ मध्ये तब्बल ३५ मतदान केंद्रे रात्रीतून बदलल्याचे कळविण्यात आल्याने उमेदवारांनी रात्रीतून नव्या मतदार स्लीप तयार करुन वाटल्या.आम्रपाली झोपडपट्टी वसाहतीमधील मतदान के. एन. केला व जेलरोड टाकीवर असते. त्यांना उपनगरच्या इच्छामणी शाळेत मतदान करावे लागले. प्रभाग २० व २१ मध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला. ३५ मतदान केंद्र रात्रीतून बदलल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेवादरांना कळवली. त्यावर उमेदवारांनी तातडीने हालचाल करत सकाळपर्यंत नवीन स्लीपा तयार करुन वाटप केल्या. तरीही मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी वणवण फिरावे लागले. त्यामुळे काही उमेदवारांनी मतदारांसाठी वाहनाची सोय केली.नेहरुनगरमधील मतदान विखरून शिखरेवाडी, जेतवननगर आदी भागात मतदान गेले. त्यामुळेही मतदारांची मोठी दमछाक झाली. प्रभाग २१ मध्ये नऊ मतदान केंद्रे बदलली. देवळालीगावातील आठवडे बाजार शाळेच्या मतदान केंद्रात सात बूथवर सकाळी काहीच गर्दी नव्हती. दुपारी चारनंतर अर्थपूर्ण घडामोडी घडल्याने या केंद्रावर प्रचंड गर्दी झाली.

म्हसरूळ येथील शेकडो मतदारांना फटका
पंचवटीः म्हसरूळ परिसरातील वडनगर परिसरातील हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्या मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. या नागरिकांनी गोंधळ घालत दिंडोरी रोडवर रास्ता रोकोचा प्रयत्न केला.
वडनगर हा भाग प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे. मतदार यादीत नाव नसल्याचे येथील मतदारांना मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर कळाले. त्यामुळे या मतदारांचा प्रचंड संताप झाला. हळूहळू मतदानापासून वंचित राहणाऱ्या मतदारांची संख्या वाढत गेली. त्यांनी केलेल्या गोंधळामुळे दिंडोरी रोडवरची वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना समाजाविण्याचा प्रयत्न केला, तरीही मतदारांचे समाधान झाले नाही. संताप अनावर झालेल्या या मतदारांनी ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
प्रभाग क्रमांक एकमधील वडनगर या भागात सुमारे एक हजार मतदार असून, त्यातील सर्वच मतदारांनी विधानसभेच्या वेळी मतदान केलेले आहे. ही वस्ती पंचवीस वर्षांपूर्वीची आहे. असे असताना येथील मतदारांची नावे यादीत नसल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. या मतदार यादीत नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांचे नाव आहे. मात्र जुन्या मतदारांची नावे गायब झाली आहेत. काही मयत नावेही तशीच आहेत. मात्र ज्यांना मतदान करायचे आहे, अशा व्यक्तींची नावेच नसल्यामुळे येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गोरक्षनगर आणि ओमनगर या भागातील निम्म्याहून अधिक नागरिकांची नावे गायब झाली आहेत.
या मतदारांनी म्हसरूळ येथील शाळेत असलेल्या बूथवर प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी या मतदारांची समजूत काढीत त्यांना मतदान केंद्रापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक निवडणूक अधिकारी ए. पी. वाघ हे म्हसरूळला आल्यानंतर त्यांना मतदारांनी घेराव घातला आणि जाब विचारला. मात्र त्यांना या मतदारांची कशी समजूत काढायची हा प्रश्न पडला. जुन्या मतदार यादीनुसार मतदान करू द्या, असेही हे मतदार सांगत होते. पुन्हा मतदान घेण्याच्या सूचनाही काही मतदार करीत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना मतदारांची नावे गायब झाल्याचे कळताच ते म्हसरूळ येथे दाखल झाले. त्यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला.

उमेदवार पत्रिका थेट मतदान केंद्रात

नाशिक : महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रात एकीकडे मतदारांना उमेदवारांचे चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या नेण्यास प्रतिबंध केला जात असताना काही मतदान केंद्रात उमेदवारांचे चिन्ह असलेल्या मतपत्रिकाच ठेवल्याचे समोर आले. मुख्य निवडणूक आयुक्त दीपक कपूर यांच्या आदेशानेच त्या ठेवल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. मतदारांचे प्रबोधन व्हावे हा हेतू यंत्रणेचा असला तरी, त्यातून थेट कोणाला मतदार करावे हे इंगीत साध्य होत असल्याने आचारसंहितेचा भंग झाला. हा प्रकार चुकीचा असल्याचे लक्षात आल्यावर तो बंद करण्यात आला.

बाराशेपैकी पाचशे नावे गायब
नाशिकः नाशिक तालुक्यातील गणेश गाव (त्र्यंबक) येथे पाचशे मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मतदानापासून वंचित राहावे लागल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गणेश गावात १२२४ मतदार आहेत. परंतु त्यापैकी केवळ ७२४ ग्रामस्थांचीच नावे मतदार यादीत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काही ग्रामस्थांनी आपली नावे शोधण्यासाठी पिंपळगाव, शिवणगाव, गंगा म्हाळूंगीपर्यंत धाव घेतली. तेथील मतदान केंद्रांवर पोहोचून नावांचा शोध घेतला. परंतु तेथेही त्यांची निराशाच झाली. मतदार ओळखपत्र, आधारकार्ड अशी सर्व कागदपत्रे जवळ बाळगूनही यादीमध्ये नाव नसल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

बोगस मतदान
पंचवटी प्रभाग तीनमध्ये श्रीकृष्ण नगर व्यायामशाळा व नर्गिस दत्त कन्या विद्यालय येथील काही मतदारांचे मतदान आधीच कोणीतरी केल्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. वनिता खैरे तीन वाजेच्या सुमारास मतदानासाठी आल्या पण त्यांचे मतदान आधीच झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच ठिकाणी कैलास गुळवे यांच्या नावापुढे महिलेचा फोटो असल्याने त्यांनाही वंचित रहावे लागले.

नावे नाहीत अन् कुटुंबीयांचीही फाटाफूट
नाशिक ः मतदार यादीतील गोंधळाचा मोठा फटका मतदारांना बसला आहे. प्रभाग क्रमांक २४मध्ये राहणारे संजय भुजबळ यांच्या कुटुंबियांची नावेही मतदार यादीतून गायब झाली. संजय आणि त्यांच्या पत्नी मीनाक्षी या दोघांची नावे यादीत नसल्याचे भुजबळ कुटुंबियांनी सांगितले. माझ्या आई-वडिलांचे नाव प्रभाग २४मध्ये तर बंधू आणि वहिनींचे नाव प्रभाग ७ मध्ये असल्याचे दिसून आले. एकत्र कुटुंब असताना अशी फाटाफूट का, असा प्रश्न संजय यांनी उपस्थित केला.
प्रभाग एकमध्ये राहणाऱ्या जाधव कुटुंबियांवरही असाच अन्याय झाला. माधुरी जाधव यांचे नाव प्रभाग क्रमांक एकच्या यादीत तर त्यांचे पती कल्याण जाधव यांचे नाव प्रभाग क्रमांक सहाच्या यादीत आढळून आले. त्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी मतदानास जावे लागले. सातपूरमधील प्रभाग क्रमांक दहामध्ये राहणाऱ्या ब्राह्मणकर कुटुंबात एकूण १४ मतदार आहेत. यातील केवळ एका मतदाराचे नाव प्रभाग दहामध्ये होते. तर अन्य १३ जणांची नावे प्रभाग क्रमांक नऊमध्ये होती. त्यातही विविध केंद्रांवर ही नावे असल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागला. सिडकोतील प्रभाग २५मध्ये राहणाऱ्या डॉ. सुनील आणि स्वप्ना ठाकूर यांचे नाव प्रभाग २५मध्ये होते. मात्र, त्यांच्या आई-वडिलांचे नाव प्रभाग २४मध्ये दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानातही म‌हिलांचे पडले पाऊल पुढे!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वय वर्षे ९८... परंतु मतदानाचा उत्साह तरूणांसारखा दांडगा. मतदानासाठी कोणत्याही गाडीचा अथवा कोणत्याही काठीचा आधर न घेता, स्वत: चालत येत मतदान केले ते विठाबाई अंधारे यांनी. यंदा महिलांचा मतदानाचा टक्का पुरूषांपेक्षा नेहमीसारखा वाढताच राहिला.

मतदान करणे म्हणजे आपला हक्क आहे असे ब्रीद स्वत:शी पक्के करीत महिलांनी घरातील काम आपण जितके मन लावून करतो तितकेच देशाला उभारणीचे कामही मन लावून करू शकतो हे यंदाच्या निवडणुकीत दाखवून दिले. सकाळी साडेसात वाजेपासून महिलांनी मतदानासाठी गर्दी केली होती. यात वयोवृध्द महिलांचे प्रमाण तुलनेने जास्त होते. प्रचंड ऊन असताना व अंगाची काहिली होत असताना वृध्दांनी मतदान केले. विशेष म्हणजे त्यांना घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या उमेदवारांच्या गाड्यादेखील त्यांनी नाकारल्या आणि आपापल्या गाड्यावर मतदान स्थळी येत मतदानाला प्राधान्य दिले.

शहरातील अनेक बूथवर प्रथम महिलांचीच गर्दी अधिकतेने दिसून आली. सकाळी जाऊन मतदान केल्यावर आपण आपल्या रोजच्या कामाला मोकळे या भावनेने दहाच्या आत मतदान उरकून टाकू म्हणून महिलांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरूणींमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. कोणतेही काम सेल‌िब्रेट करण्याचे आपले तंत्र न विसरता मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर लगेचच सेल्फी काढून फेसबूकवर टाकणाऱ्या तरूणींची संख्याही लक्षणीय होती. गृहिणींनीदेखील मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी प्राधान्य दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या टप्प्यात पोलिसांचा विजय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पहिला टप्प्यात बंदोबस्ताचे योग्य नियोजन करून पोलिसांनी बाजी मारली आहे. किरकोळ घटनांचा अपवाद वगळता कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात पोलिस यशस्वी ठरले. कुठे आक्रमक तर कुठे संयमी भुमिका घेत पोलिसांनी मतदान यशस्वी केले. मतमोजणीच्यादृष्टीने अशाच पध्दतीने नियोजन असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीचा रंग भरत गेला तसा पैसा आणि मद्य यांच्या दुरोपयोगबाबत चिंता निर्माण झाली. विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली. यामुळे मतदानाच्या दिवशी भानगडी होतील, अशी चर्चा होती. मात्र, पोलिस आयुक्त सिंगल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चर्चा व्यर्थ ठरवत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली. पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी २४ तास चोख बंदोबस्त ठेवला. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांकडून बंदोबस्तासाठी काम सुरू होते. बॅरकेडिंग, वाहतूक मार्गात करण्यात आलेले बदल, स्ट्रायकिंग फोर्सचा सुनियोजीत वापर, यानंतर शक्तीप्रदर्शन अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत पोलिसांनी समाजकंटकांना डोके वर काढू दिले नाही.

पोलिस आयुक्त सिंगल म्हणाले,‘बंदोबस्ताबाबत अनेक दिवसांपासून खलबते सुरू होती. मनुष्यबळाचा वापर कसा आणि केव्हा करायचा याचा आराखडा ठरला होता. आमचे सर्व नियोजन बरोबर आणि एकापाठोपाठ एक लागू करण्यात आले. आमच्याकडे सातत्याने फोन कॉल्स, एसएमएस तसेच व्हॉटसअॅपवर वेगवेगळी माहिती येत होती. या माहितीची खातरजमा त्वरीत करण्यात आली. त्यामुळे अफवा पसरण्यास संधी मिळाली नाही, असे सिंगल यांनी स्पष्ट केले.

मतमोजणीच्या दिवसापर्यंत काय घडामोडी घडतात याकडे आमचे लक्ष होते. त्यानुसार, मतमोजणीची ठिकाणे आणि मतमोजणीनंतर काय पडसाद उमटतील, याचाही विचार आम्ही केला आहे. आम्हाचा सर्व आराखडा निश्च‌ित असून, मतमोजणी प्रक्रिया शांततेच पार पडेल.

- डॉ. रवींद्र सिंघल,

पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर-सिडकोत शांतता

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर / सिडको

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सिडको व सातपूर विभागात पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यंदा दोन्ही विभागात मतदानाचा टक्का वाढला असल्याचे समोर आले आहे. दोन्ही विभागात किरकोळ घटना वगळता सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. काही केंद्रांवर मतदारांचे नावे न सापडत नसल्याने अनेकांना घरचा रस्ता धरवा लागला. तर दुपारी तीननंतर सर्वच केंद्रांवर अचानक गर्दीचा ओघ वाढल्याने साडेपाचनंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती.

उद्योगांनी नाकारली सुटी

मतदानाचा टक्का वाढवा यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर केली होती. परंतू अनेक उद्योगांनी सुटी न दिल्याने कामगारांना त्रास सहन करावा लागला. यामुळे बहुतांश कामगारवस्तीचा भाग असलेल्या सातपूर विभागात दुपारी चारनंतर केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.

बूथवर अनावश्यक गर्दी

सिडको व सातपूर विभागात अनेक उमेदवारांच्या बूथवर अनावश्यक कार्यकर्त्यांची गर्दी पहायला मिळाली. गर्दीला बाजूला करण्यासाठी पोलिसांनाच पुढे व्हावे लागले.

लोंढेंचे तोंड सुटले

तब्बल चारवेळा नगरसेवक झालेले प्रकाश लोंढे यांचा मतदानाच्या‌ दिवशी तोंडावरील ताबा सुटल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

सिडकोत वाहन जप्त

सिडको विभागातील सहा प्रभागांमध्ये सर्वच मतदान केंद्रांवर अल्पसा प्रतिसाद दिसून आला. सकाळच्या पहिल्या दोन तासाच्या टप्प्यात सिडकोत केवळ साडेसात टक्के मतदान झाले होते. सकाळीच सिडको परिसरातील जनता विद्यालय या मतदान केंद्राकडे जाणाऱ्या अॅपे गाडीतून काही नागरिक जात असल्याचे पोल‌िसांच्या लक्षात आल्याने पोल‌िसांनी ही गाडी जप्त केली. तर सिडकोतील प्रभाग २८ मध्ये भाजपाचे उमेदवार याज्ञिक शिंदे हे घरी पैसे वाटप असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे उमेदवार दिपक दातीर यांनी थेट त्यांच्या घरात कार्यकर्त्यांसह गेल्याने याठिकाणी बराच काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र असे होत नसल्याने त्यांना तेथून परतावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लक्ष्मी’चे झाले ‘मायक्रो मॅनेजमेंट’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. दिवसभर पैशांची मोठी उलाढाल झाली. दोन ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्ते जेरबंद करीत गुन्हे दाखल केले, तर पैसेवाटपाच्या अफवांचा बाजारसुध्दा गरम राहिला. उमेदवारांनी पैसे वाटप करताना मोठ्या नोटांचा खुबीने वापर केला. लक्ष्मीचे मायक्रो मॅनेजमेंट सुरळीत झाल्याने संध्याकाळच्या सुमारास मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदारांना लक्ष्मीदर्शन झाले. भद्रकाली आणि मुंबई नाका येथे पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भद्रकालीतील पंचशीलनगरमध्ये पैसे वाटप करीत असलेल्या कार्यकर्त्यास १० हजार रुपयांसह पोलिसांनी पकडले. एका आघाडीच्या उमेदवारांचे पैसे वाटप करीत असल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दुसरीकडे मुंबईनाका पोलिसांनी मिल‌िंदनगर, भारतनगर झोपडपट्टीत काही संशयितांना अटक केली. या ठिकाणांहून २५ हजार रुपये जप्त करण्यात आले. दोन्ही ठिकाणी मिळून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर ३५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
दरम्यान, पैसे वाटपाबाबत शहरात दिवसभर अफवांचे पेव फुटलेले होते. पोलिसांना खबर मिळताच कारवाई केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही. उमेदवारांनी दोन हजार रुपयांच्या नोटांचा खुबीने वापर केला. कार्यकर्त्यांना मतदारांचे टार्गेट व १० ते २० हजार रुपयांची रक्कम दिली जात होती. एक काम संपले की मगच पुन्हा पैसे हाती दिले जात होते. यामुळे लक्ष्मीदर्शनाचा खेळ दिवसभर शांततेत मात्र दमाने सुरू राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. संध्याकाळी मतदानाचा आकडा वाढण्यामागेही हेच कारण असल्याचे सूत्रांनी सां‌ंगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images