Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ग्रंथपेटी निघाली अॅटलांटाला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'किताबे कुछ कहना चाहती है' ही उक्ती आपण बोलताना अनेक वेळा वापरतो मात्र खरेच पुस्तकांना तुम्हाला काही सांगायचे आहे याची जाणीव होऊन ग्रंथमित्र विनायक रानडे यांनी नाशिकमध्ये सुरू केलेल्या ग्रंथपेटी योजनेचा वारू चौखुर उधळला आहे. जिल्ह्यातून राज्यात, राज्यातून देशात व देशातून अगदी परदेशात गेलेली ग्रंथपेटी योजना आता अमेरिकेतील अॅटलांटा येथे सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकची पुस्तके अमेरिकावारी करणार असून, अमेरिकेतील मराठी अभिजनांमध्ये आता नाशिकचा झेंडा रोवला जाणार आहे.

वय, वेळ व अंतर या कारणांमुळे ज्यांना पुस्तकापर्यंत पोहोचता येत नाही अशांसाठी २००९ मध्ये नाशकात ग्रंथपेटी या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. ११ पेट्यांनी झालेला हा शुभारंभ सहा वर्षांमध्ये ६०० पेट्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 'ग्रंथ तुमच्या दारी' ही मूळ संकल्पना मराठी वाचकांना दर्जेदार मराठी पुस्तके वाचायला मिळावी या उद्देशाने निर्माण झाली. १०० पुस्तकांच्या ११ पेट्यांनी सुरुवात झालेल्या या उपक्रमात दर चार महिन्यांनी पुस्तके बदलली जातील असा शिरस्ता सुरुवातीला होता. वाचनालयात ग्रंथांची समृध्दी रहावी यासाठी ज्याचा वाढदिवस असेल त्या प्रत्येकाने वाढदिवसाला किमान एक पुस्तक घेता येईल एवढी देणगी प्रतिष्ठानला द्यावी, असे सुरुवातीला आवाहन करण्यात आले. परंतु, कालांतराने यात अधिक पैसे जमू लागले. लोक एकसष्टी, पंच्याहत्तरी निमित्ताने निधी द्यायला लागले. या निधीचा फायदा वाचकांना व्हावा यासाठी ग्रंथपेटीची कल्पना आली. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या या ११ पेट्यांची उलाढाल आता ६०० पेट्यांपर्यंत जात सव्वाकोटी रुपयांची पुस्तके संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, सिल्वासा, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा येथील वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. नाशिकमध्ये या उपक्रमासाठी विजय संकलेचा, डॉ. कुणाल गुप्ते, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. विनया ठकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

परदेशातील मराठी वाचकांना ही पुस्तके वाचायला मिळावीत यासाठी दुबई, युरोपातील नेदरलँड व जपानमधील टोकिओलाही योजना राबविण्यात आली. तेथे या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता अमेरिकेतील अॅटलांटा शहरात या योजनेचे पाऊल पडत आहे. वाचनसंस्कृती लयाला जात आहे असे चित्र सगळीकडे असताना कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जगव्यापी वाचकांना पुस्तके देण्याची ही पध्दत रूढ करून एक आदर्श निमाण केला आहे. महाराष्ट्र मंडळ अॅटलांटा व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम अमेरिकेतील अॅटलांटा शहरात होत आहे. त्यासाठी त्यांना हर्षल पाराशरे या अॅटलांटा स्थित मूळ नाशिककर युवकाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

''ग्रंथपेटी अॅटलांटाला जाणार याचा मला फारच आनंद झाला आहे. हा उपक्रम सुरू केला तेव्हा असे वाटले नव्हते की, त्याचा इतका विस्तार होईल. एखादी चांगली गोष्ट रुजायला फारसा वेळ लागत नाही हेच यावरून सिध्द होते. कुसुमाग्रजांच्या मनातील वाचन चळवळ प्रतिष्ठान पूर्ण करीत आहे याचाही आनंद आहे.''

-विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट नाशिक आता एका क्लिकवर !

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्टसिटीच्या दिशेने झेपावणाऱ्या नाशिकच्या शिरपेचात मंगळवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पालिकेचा कारभार ऑनलाइन व पारदर्शक करणारे स्मार्ट नाशिक अॅप आणि पेपरलेस कारभाराची संगणकीय प्रणालीचे लोकार्पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी आणि समस्या सोडविण्यासह विविध प्रकारचा कर भरणा, महत्त्वाची कागदपत्रे थेट घरबसल्या सोडविता येणार आहेत. सोबतच फेसबुक, युट्युब ट्विटरच्या माध्यमातून स्मार्ट संवाद साधता येणार आहे. या स्मार्ट प्रणालींमुळे नाशिक आता एका क्लिकवर आले आहे.

केंद्रशासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाल्याने महापालिकेने स्मार्ट कारभाराच्या दिशेन पाऊले टाकावयास सुरुवात केली आहे. प्रशासनामध्ये गतिमानता व पारदर्शकता आणण्याकरीता विविध प्रकारचे अद्ययावत असे मोबाइल अॅप्लिकेशन व संगणकीय कार्यप्रणाली विकसित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अगोदरच पाऊल टाकले असून, गतीमान कारभार व पारदर्शक कारभार दर्शवणारे स्मार्ट नाशिक व संगणकीय प्रणाली विकस‌ति करून तिचे लोकार्पणही केले आहे.

डॉ. गेडाम यांनी या अॅपचे मंगळवारी नाशिककरांसमोर सादरीकरण केले. नाशिककरांना आता एका क्लिकवर थेट पालिकेशी संवाद साधता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांग‌तिले. या स्मार्ट अॅपमुळे महापालिकेचा कारभार हा पारदर्शी व नागरिकांच्या हिताचा होणार असल्याचा दावाही डॉ. गेडाम यांनी केला आहे.

काय आहे अॅपमध्ये?

स्मार्ट नाशिक मोबाइल अॅप्ल‌किेशनमध्ये सामाजिक बांधिलकीतून समाविष्ट ऐच्छ‌कि रक्तदात्यांच्या सूची व त्याचे फायदे तसेच Know Our Works नावाचे मोबाइल अॅप्ल‌किेशन व बायोमेट्रीक सेल्फी अटेंडन्स कार्यप्रणाली, तक्रार निवारण कार्यप्रणाली, ऑटोडिसीआर कार्यप्रणाली, घंटागाडी जीपीएस कार्यप्रणाली, ऑनलाइन कर भरणा, ऑनलाइन जन्म नोंदणी प्रमाणपत्र कार्यप्रणाली, मनपा हेल्पलाइन कार्यप्रणाली, वेब जी.आय.एस. कार्यप्रणाली, प्रस्तावित नागरी सुविधा केंद्रे, स्पॉट बिलिंग कार्यप्रणाली स्मार्ट अॅपवर असणार आहे. सोबतच महापौर, आयुक्त, पदाधिकारी, नगरसेवक, पोलिस, हॉस्प‌ि‌‌टल्स, अॅम्बुलन्स आणि ब्लड बँकेचे इमर्जन्सी नंबरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. टच डायलिंगची सोयही यावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाबद्दल ५ वर्षांनंतर विचारा!: राज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये मनसेने केलेली कामे आता दिसायला लागली आहेत. शहर कसे असावे हा माझ्या आवडीचा विषय आहे. विचारण्यापेक्षा आणि टीका करण्यापेक्षा अजून थोडा वेळ थांबा. विकासाच्या अनेक योजना अजून येणार असून, पाच वर्षांनंतर नाशिकचे अनुकरण इतर शहरे करतील. पाच वर्षानंतर ठाकरेंना विकासाचे विचारा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीकाकारांना ठणकावले. एकदा महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या, डॉ. प्रवीण गेडामांसारखे दहा अधिकारी मिळाले तर महाराष्ट्र ठिकठाक कसा होत नाही ते बघतो, असा दावाही त्यांनी केला.

महापालिकेच्या स्मार्ट सिटी अॅप आणि संगणकीय कार्यप्रणालीचे लोकार्पण राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनसे नेते बाळा नांदगावकरसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या शैलीत महापालिकेच्या कामकाजाचे कौतुक केले. पालिकेचे काम उत्तम आहे. नाशिकसारखी व्यवस्था कुठेच नाही. महापौर, आयुक्तांसह सर्वांनाच त्याचे श्रेय आहे. चांगले काम असेल तर नाशिककरांनाही धन्यवाद दिले पाहिजे. मात्र, आमच्यावर टीकाच जास्त होते. कुठे आहे विकास असे विचारले जाते. पोर व्हायला सुद्धा नऊ महिने लागतात. त्यामुळे थोडा वेळ अजून थांबा. पाच वर्षांत नाशिकचा कायापालट झालेला असेल, असा दावा ठाकरेंनी केला. नाशिकमध्ये आज उत्तम कामे सुरू आहेत. कामात पारदर्शकता असल्याचा हा पुरावा आहे. अजून अनेक कंपन्या नाशिकमध्ये येत आहेत. शहराचा विकास करणे माझ्या आवडीचा विषय आहे. अजून अनेक प्रकल्प नाशिकमध्ये दिसतील. रिकाम्या जागांवर खेळाचे मैदाने विकसित केले जाणार आहे. सायकल ट्रॅक, जिनिव्हा फाऊंटन, म्युझियम, मुकणेचे काम मार्गी लागले आहे. एक चांगले शहर म्हणून नाशिक पुढे येणार आहे. नाशिकचे अनुकरण इतर शहरे करतील, त्यासाठी तुमचे सहकार्य लागेल. शाबासकीची थाप द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

संधीसाधूच जास्त

ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच कुंभमेळ्याने केली. कुंभमेळा चालू असल्याने अनेक साधूंना भेटलो. आमच्या क्षेत्रात सगळेच संधीसाधू आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यातच साधू भेटतात असे सांगून सध्याच्या राजकीय स्थितीवर उपरोधिक टोला लगावला. तसेच कुंभमेळ्यातील कामांवर साधू-महंत खूश असल्याची पाठही त्यांनी थोपटून घेतली.

बांबू हटवा

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात केलेल्या बल्ली बॅरिकेडसवरही त्यांनी टीका केली. आज शहरात सर्वत्र बांबू घालून ठेवले आहेत. बघावे तिथे बांबू, सर्वत्र बांबूच दिसत असल्याचे सांगून १८ तारखेनंतर ते तत्काळ काढा आणि स्वच्छ व सुदंर नाशिक करा, असे सांगून फ्लायओव्हरखाली लवकरच जॉगिंग ट्रॅक होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बाळासाहेब आणि शस्र

महापालिकेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर शस्रास्र संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे मदत करणार असून, त्यांच्याकडील पुरातन शस्रे दे या संग्रहालयाला भेट देणार आहेत. बाळासाहेब आणि शस्रास्रांचा थेट संबध आहे. त्यांच्या संग्रहालयात शस्रे हवीच असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राजपेक्षा डॉ. गेडाम हिट

आपल्या ठाकरी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरेंच्या कार्यक्रमात शिट्ट्या आणि टाळ्यांचा सर्वाधिक वर्षाव होत असतो. मात्र, कालिदास कलामंदिरात उलटेच चित्र पहायला मिळाले. या कार्यक्रमात ठाकरेंपेक्षा सर्वाधिक टाळ्या या डॉ. गेडाम यांनी मिळवल्या. अॅप आणि संगणकीय कार्यप्रणाली सादर करताना त्यांच्यातील फिचर बघून दर्शकही आवाक झाले. त्यांनी गेडाम यांच्या सादरीकरणाला चांगला प्रतिसाद देत त्यांच्या प्रत्येक चांगल्या योजनेला टाळ्यांची दाद दिली. राज यांच्या भाषणादरम्यान व्यत्यय शक्यतो प्रेक्षकही सहन करत नाहीत. मात्र, गेडाम यांनी तब्बल अर्धा तासाच्यावर सादरीकरण करताना विरोधाची एकही टाळी वाजली नाही.

अधिकारी-पदाधिकाऱ्यांना श्रेय

राज ठाकरेंनी या कार्यक्रमात महापालिकेतील सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांना चांगल्या योजनांचे व कामाचे श्रेय दिले. महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, आयुक्त डॉ. गेडाम, सलीम शेख, राहुल ढिकले, शशिकांत जाधव, अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, अनिल चव्हाण, सुनील खुने, यू. बी पवार, आर. के. पवार, प्रशांत मगर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावून लोकांसमोर त्यांच्या कार्याचे श्रेय त्यांना देण्याचा मोठेपणा राज यांनी दाखवला.

डॉ. गेडामांच्या कार्याचे कौतुक

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या चांगल्या आणि पारदर्शक कामाचे राज ठाकरेंनी चांगलेच कौतुक केले. अन्य महापालिकांमध्ये काय चालते ते बघा. परंतु, गेडाम यांच्या पारदर्शक कारभारामुळे व या अॅपमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. राज्यात सत्ता मिळाली तर आणि डॉ. गेडामांसारखे दहा अधिकारी आपल्याला मिळाले तर महाराष्ट्राला ठिकठाक करून दाखवतो असे सांगत गेडाम यांच्या उत्तम व पारदर्शक कारभाराची पावतीच त्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर लिपिकासह शिपायाला अटक

$
0
0

नाशिक : वडिलोपार्जित शेतीच्या रेकॉर्डची नक्कल देण्यासाठी ७०० रुपयांची मागणी करून ती शिपायाद्वारे स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपिकासह संबंधित शिपायाला ताब्यात घेतले. पेठ तहसील कार्यालयाच्या आवारात बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

प्रवीण रमेश पवार असे त्या लिपिकाचे तर मनोहर किसन चौधरी असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे. पेठ तालुक्यातील खिरकाडे येथे तक्रारदाराची वडिलोपार्जित शेती आहे. शेत गट क्रमांक २७ व २८ चे सन १९६८ पासूनच्या रेकॉर्डच्या नकला मिळाव्यात यासाठी तक्रारदाराने माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी पवार याची भेट घेतली. नक्कला देण्यासाठी तक्रारदाराने ७०० रुपयांची लाच मागितली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी अन् चाराप्रश्न भेडसावणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळ आणि चांदवड तालुका यांचे जवळचे नाते असल्याचे वर्षानुवर्षे पहायला मिळते. यंदाही दुष्काळाचे सावट असल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी आत्महत्येच्या तालुक्यात घडलेल्या घटना दुष्काळाची भीषणता दाखवतात.

पावसाळा संपत आला तरी चांदवड तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने परिस्थिती बिकट आहे. शेतीत धन्याबरोबर राबणाऱ्या जनावरांचे पाणी आणि चाऱ्याअभावी हाल होत आहेत. पाऊस अत्यल्प पडल्याने चांदवड शहरासह तालुक्याला पाणीटंचाईचा फटका बसला असून, तालुक्यातील अनेक वस्त्या, गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांची दुरवस्था झाली. मात्र, आता रब्बी पिकांसाठी पावसाने धाऊन यावे, अशी अपेक्षा बळीराजा करीत आहे.

पाण्याअभावी पिके करपली

चांदवड तालुक्यात पावसाने दगा दिल्याने पिकांची अवस्था वाईट झाली आहे. मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग या पिकांची अक्षरशः वाट लागली आहे. एकूण ९३२१ हेक्टर क्षेत्रापैकी ८१२० हेक्टर बाजरी पाण्याअभावी बाधित झाली आहे. तर, ३९६२ हेक्टरपैकी ३३५४ हेक्टर मूग पाण्याअभावी उद्ध्वस्त झाला आहे. सोयाबीनसह विविध पिके पाणी नसल्याने मातीमोल होण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येते. सुकलेल्या पिकांचे साम्राज्य आणि हताश शेतकरी हे चांदवड तालुक्यातील चित्र मन सुन्न करून टाकणारे आहे. पावसाने खरीप तर असाच गेला मात्र रब्बीचे काय ही चिंता बळीराजाला लागून राहिली आहे. पिकांना गरज असताना महत्त्वाच्या अवस्थेत पाऊस आलाच नाही. त्यामुळे पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

पिके गेली त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागचा समस्यांचा ससेमिरा काही सुटलेला नाही. पाणी नाही, चारा नाही मग जनावरांचे काय करायचे ही चिंता त्यांना भेडसावत आहे. तालुक्यात पाणी आणि चारा या प्रश्नाने डोकेवर काढल्याने या समस्या दूर करण्यासाठी प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले जाते. यामुळे तात्पुरता आधार मिळणार आहे.

तालुक्यातील धरणे कोरडीच

खोकड तलाव, राहुड डॅम, केदराई तसेच जांबूटके येथील पाणीसाठा हे प्रमुख जलस्त्रोत. मात्र, बहुतांश धरणे कोरडी असल्याने पाणीटंचाईचे सावट आहे. गेल्या आठवड्यात बरा पाऊस झाल्याने थोडा फार दिलासा मिळाला. मात्र, तरी ही चांदवड तालुक्यात बोपाने कुंडानेसह काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सहा टँकरने तालुक्यात सहा गावे आणि २२ वाड्यांना पाणी पुरवले जात आहे. त्यापैकी हिरापूर, जोपूळ परिसरात पाऊस पडल्याने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर चांदवड तालुक्यातील स्थिती गंभीर होण्याची चिन्हे असून, तालुका टंचाई आढावा बैठकीत आमदार राहुल आहेर यांनी प्रशासनाने त्वरित उपाय योजण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या पर्वणीसाठी रेल्वे सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

१८ सप्टेंबरच्या तिसऱ्या पर्वणीसाठी मध्य रेल्वेने जय्यत तयारी केली आहे. सध्याच्या ५६ मेल एक्सप्रेसना द्वितीय वर्गाचे जादा डबे जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रेल्वेने कुंभ स्पेशल रेल्वेगाड्या आधीच सुरू केल्या आहेत. त्यांना दुसऱ्या पर्वणीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, मालधक्क्यावर या गाड्यांची प्रतीक्षा करताना भाविकांचा उद्रेक झाला होता. हे लक्षात घेऊन रेल्वेने १८ सप्टेंबरला २७, तर १९ सप्टेंबरला २९ रेल्वेगाड्यांना जादा डबे जोडण्याचे ठरविले आहे. हे डबे नाशिकरोडलाच उघडण्यात येतील. एलटीटी-गोरखूपर, एलटीटी-आसरापूर, सीएसटी-नागपूर, सीएसटी-हावडा, सीएसटी-फिरोजपूर, सीएसटी-नांदेड, एलटीटी-मुझ्झपरपूर आदी गाड्यांचा त्यात समावेश आहे. काही गाड्यांना एक तर काही गाड्यांना दहापर्यंत डबे जोडण्यात येतील.

७४ हजार प्र‍वासी रवाना

कुंभमेळा आटोपून परतणाऱ्या भाविकांची नाशिकरोड रेल्वे स्थानकातील गर्दी ओसरली आहे. मालधक्काही रिकामा झाला आहे. गर्दी आवरताना रेल्वे सुरक्षा अधिकारी व पोलिसांची कसोटी लागली. मंगळवारी (ता.१५) एकाच दिवसात ७४ हजार प्रवाशांना रेल्वेमध्ये सुखरुप बसवून रवाना करण्यात आल्याची माहिती लोहमार्गचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबल यांनी दिली. एवढे प्रवासी एकाच दिवशी रेल्वेत बसविणे हे एक आव्हानच होते. रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने समन्वय राखत हे आव्हान पेलले. १८ सप्टेंबरला तिसऱ्या पर्वणीसाठी भाविक येण्यास प्रारंभ झाला आहे. येणाऱ्यांना चौथ्या फ्लॅटफार्मवर उतरवण्याचे आणि परतीच्या भाविकांना मालधक्का मार्गेच प्रवेश देण्याचे नियोजन कायम आहे. भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यात बदल करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता क्रॉसिंग नव्हे, जिवाशी खेळच!

$
0
0

अंबड गावात शाळेसमोरचा प्रकार

म. टा. प्रतिनिधी, सि़डको

अंबड गावात महापालिकेच्या शाळा क्रमांक ७२ व ७३ समोरील रस्ता क्रॉसिंग करणे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतत आहे. वाहनांमधून मार्ग काढत जीव मूठीत धरूनच विद्यार्थ्यांना रस्ता पार करावा लागतो. वेळोवेळी मागणी करूनही दुभाजक टाकले जात नसल्याने एखादा मोठा अपघात होण्याची महापालिका वाट बघते आहे काय, असा सवाल स्थानिकांनी केला आहे.

स्थानिक नगरसेवकांनीही विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षित ओलांडता यावा यासाठी रस्ते दुभाजकाची मागणी केलेली आहे. मात्र, त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. भविष्यात मोठा अपघात घडल्यास महापालिकेला जबाबदार धरू, असा इशारा नगरसेवक उत्तम दोंदे यांनी दिला आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना चांगल्या वातावरणात चांगले शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने शाळेच्या सुंदर इमारती उभारल्या आहेत. अंबड गावातही देखणी इमारत बांधण्यात आली आहे. गावाच्या परिसरातील व विशेषकरून स्लम भागातील सर्वाधिक विद्यार्थी शाळेत येत असतात. त्यातच दोन सत्रात भरणाऱ्या या शाळेत रोजच हजारो विद्यार्थी येत असतात. परंतु, शाळेत येतांना व शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना जिवाशी खेळ करतच रस्ता पार करावा लागतो. शाळा भरतांना किंवा शाळा सुटल्यानंतर शाळेतील शिपाई अथवा शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देताना दिसत नाहीत. शाळा सुटण्यावेळी किमान पोलिस हवालदार तरी नेमावा अशी मागणी पालकवर्गांकडून होत आहे. मोल मजुरी करणाऱ्यांची ही सर्व मुले महापालिकेच्या शाळेत शिक्षणासाठी येत असतात. आई व वडील दोघेही कामावर जात असल्याने मुलांना एकटेच घरी जावे लागते.

अंबड एमआयडीसीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच महापालिकेची शाळा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक टाकण्यात यावा अशी पालकांसह नगरसेवकांचीही मागणी आहे. परंतु, आरटीओच्या नियमांचे कारण सांगत महापालिका टाळाटाळ करत आहे. भविष्यात याठिकाणी मोठा अपघात झाल्यास महापालिका जबाबदारी घेणार का?

उत्तम दोंदे, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ५१

महापालिकेच्या शाळेत मोलमजुरी करणाऱ्यांची मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतात. शाळेजवळील रस्ता ओलाडतांना नेहमीच किरकोळ अपघात होतात. यासाठी रस्त्यांवर दोनही बाजूला गतिरोधक बसविण्याची गरज आहे. वेळप्रसंगी आम्ही आंदोलनही करू.

साहेबराव दातिर, सामाजिक कार्यकर्ते, अंबडगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

’घरवापसी’वर काथ्याकूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरवापसीचा उपक्रम चांगला आहे; मात्र त्याचा वेग दुपटीने वाढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन धर्मजागरण समन्वय विभागाचे क्षेत्रीय प्रमुख शरदराव ढोले यांनी केले. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमधील पंचवटी कॉलेज प्रांगणात आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते.

व्यासपीठावर स्वामी लक्ष्मणदास महाराज, स्वामी ब्रह्मगिरी महाराज, स्वामी सिद्धेश्वर महाराज, संत रविदास महाराज, स्वामी परमानंद बाबा महाराज, स्वामी योगीराज महाराज, स्वामी साकेत बिहारीदास महाराज, स्वामी सच्चिदानंद गुरुसखा महाराज, स्वामी सुजीतदासजी महाराज, स्वामी विठ्ठल महाराज सोमवंशी, स्वामी शिवाजी महाराज नवल, स्वामी कैलास महाराज ढगे, पूजनीय बालकदास महाराज, महामंडलेश्वर ज्ञानानंद महाराज, स्वामी रामनरेश दास महाराज, स्वामी जनार्दन हरिजी, स्वामी प्रबोधानानंद गिरी, स्वामी नागेश्वर गोस्वामी, महंत शिवसुंदर भारती, संत दुर्गादास महाराज, स्वामी गंगाराम महाराज, महंत डॉ.अमृतदासजी महाराज आदि उपस्थित होते. यावेळी प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात, प्रांत धर्मजागरण प्रमुख हेमंतराव हरहरे, अखिल भारतीय धर्म जागरण विभाग प्रमुख श्री मुकुंदराव पणशीकर , तसेच अ. भा. धर्मजागरण सहप्रमुख श्री राजेंद्रसिंहजी, क्षेत्रीय धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले हे उपस्थित होते.

कुंभमेळा सार्थकी

महामंडलेश्वर विद्यानंदजी महाराज यांनी त्यांच्या भाषणात घरवापसी करून पुन्हा परतलेल्या मंडळींचे स्वागत करतानाच समाजाने त्यांचा स्वीकार करायला हवा असे आवाहन केले. या संमेलनामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. वनवासींच्या प्रतिभेचे दर्शन यात चांगले घडले असून राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतसेवक समाजाचे पूर्णानंदजी महाराज यांनी हिंदुत्वाचा विजय निश्चित आहे असे सांगून आम्हाला साधनसामुग्री कमी पडत असली तरी आम्ही चांगला लढा देत आहोत, असे स्पष्ट केले. प्रारंभी वनवासींनी लोककलांचे दर्शन घडविले. त्यानंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोंदू साधू-बाबांना चाप लावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदू धर्माला कलंकित करणाऱ्या भोंदू साधू-बाबांना रोखण्यासाठी सिंहस्थपर्वात हिंदू संघटनांचे संघटीत आंदोलनास चालू करण्यात आल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दिली. नाशिक येथील 'निर्माण हाऊस' येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी सनातनचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव, तसेच हिंदू जनजागृती समितीचेमहाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित होते.

डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, की प्राचीन काळापासून साधू-संतांना हिंदू धर्म आणि संस्कृती यांचे वाहक म्हणून समाजात आदराचे स्थान आहे. कलियुगाचा महिमा पहाता, सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार आणि बजबजपुरी माजलेली आहे. तशात या धार्मिक क्षेत्राचा स्वार्थी आणि लोभी लोकांनी उपयोग करून घेतला नसता, तर नवलच! पवित्र अशा भगव्या वस्त्रांच्या आडून अशा भोंदू साधूंनी भाविकांची लुबाडणूक चालू केली आहे. हे भोंदू साधू-संत भक्तांकडे पैशांचा आग्रह धरून ते न दिल्यास त्याला शाप देण्याची धमकी देतात. विद्यमान 'राधे मां'चे सिनेमातील गाण्यांवर नाचणे असो, आधुनिक कपडे घालून, गॉगल लावून दिखावा करणे असो वा स्वतःच्या अंगात देव येतो, असे सांगून लोकांची फसवणूक करणे असो, अशा तथाकथित साधू-संतांच्या वर्तनाने हिंदू धर्म टिंगलटवाळीचे कारण बनत आहे. तसेच अहिंदु आणि धर्मद्रोही नास्तिकतावादी यांना हिंदू धर्मावर टीका करण्याची संधी मिळत आहे. याचा परिणाम म्हणून खऱ्या श्रद्धाळूंचाही साधना, अध्यात्म आणि धर्म यांवरील विश्‍वास उडत आहे; म्हणूनच धर्मरक्षणासाठी

'राष्ट्रीय हिंदू आंदोलना'च्या माध्यमातून समविचारी हिंदू संघटना अशा भोंदू बुवा-साधू-बाबांना रोखण्यासाठी कार्य करणार आहेत. या मोहिमेचा आरंभ नाशिक येथील सिंहस्थपर्वापासून केला जाणार आहे.

तक्रारीसाठी पुढे या!

या मोहिमेच्या प्रत्यक्ष कृतीविषयी माहिती सांगतांना डॉ. पिंगळे म्हणाले, ''भोंदू साधू-संत आढळल्यास त्यांचा संबंधित आखाडा, तसेच आखाडा परिषद यांच्याकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत. तसेच या तक्रारींचा पाठपुरावाही करणार आहोत. त्याचप्रमाणे पैशांच्या मागणीसाठी धमकी देणाऱ्या साधू-बाबांवर पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. यासंदर्भातील माहिती hinduandolan२०१५@gmail.com या ई-मेल पपत्त्यावर कळवू शकतात.'' या पत्रकार परिषदेत 'भोंदू बाबांपासून सावधान' या सनातन-निर्मित ग्रंथाचे प्रकाशन डॉ. चारुदत्त पिंगळे, नंदकुमार जाधव व सुनील घनवट यांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी सव्वाशे तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'स्मार्ट सिटी' या महत्वाकांक्षी योजनेत समाविष्ट नाशिककरांना महापालिकेशी थेट संपर्क साधण्याच्या उद्देशाने निर्मित स्मार्ट नाशिक अॅप पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजारावर नागरिकांनी डाऊनलोड केले. पहिल्याच दिवशी शहराशी संबंधित विविध विषयांवर सव्वाशेपेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या.

महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित कामातील अनियमितपणा आणि पारदर्शकता जपण्याच्या उद्देशासाठी स्मार्ट नाशिक अॅप महत्वाचे आहे. व देशातील कुठल्याही राज्य किंवा शहरात या धर्तीवर अॅप उपलब्ध नाही. 'स्मार्ट मोबाइल' मध्ये विनामूल्य अॅप डाऊनलोडींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून पालिकेच्या प्रत्येक विभागाशी संबंधित तक्रारही नोंदविता येणार आहे. तक्रारदाराने तक्रार नोंदविल्यानंतर या तक्रारीचे स्टेटसही तक्रारकर्त्याला कळविण्यात येणार आहे. विविध विकासकामे, दाखले, घरपट्टी व पाणीपट्टीची देयके भरणे, जबाबदार अधिकारी आदी विषयांची माहिती नागरिकांना घेता येणार आहे.

आयुक्तांचा मोबाईल का नाही?

अनेक नागरिकांनी तक्रारी करतानाच, महापालिका आयुक्तांच्या मोबाईल क्रमांकाची मागणी केली आहे. नागरिकांना संबंधित विभागांशी संपर्क साधणे सोपे जावे यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांचा केवळ कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक नागरिकांना उपलब्ध आहेत. आयुक्तांचा मोबाईल क्रमांक अॅपमध्ये का देण्यात आलेला नाही? अशी विचारणा करणारे तक्रारीचे सूरही यात मांडण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश भक्तांवरील निर्बंध शिथिल

$
0
0

पोलिस प्रशासनाची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लाडक्या गणपती बाप्पाचे आज (दि. १७) उत्साहात आगमन होणार आहे. सिंहस्थातील तिसऱ्या पर्वणीच्या एक दिवस आधीच गणरायाची प्रतिष्ठापना होणार असली तरी गणेश भक्तांवर कुठल्याही जाचक अटी लादल्या जाणार नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीड दिवसांच्या गणेशाचे रामकुंड वगळता अन्य सर्व घाटांवर विसर्जन करता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

विघ्नहर्ता गणरायाचे आज, गुरुवारी जल्लोषात आगमन होत आहे. सिंहस्थातच बाप्पा भक्तांच्या भेटीसाठी शहरात चैतन्य संचारले आहे. प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्याच दिवशी सिंहस्थातील तिसरी महत्त्वाची पर्वणी आहे. त्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक नाशिकनगरीत दाखल होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या गर्दीने रस्ते ओसांडून वाहण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी रस्त्यालगतच्या तसेच, शहरातील मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पर्वणीच्या दुसऱ्या दिवसांपर्यंत मंडळांच्या देखाव्यांची रंगत वाढणार नसली तरी त्यानंतर मात्र गणेश भक्तांना या उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.

पुढील दोन तीन दिवस नो व्हेईकल झोनमध्ये फोर व्हीलर्सचा वापर टाळावा, असे आवाहन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले आहे. नो व्हेईकल झोन परिसरात गणेश भक्तांना वाजत गाजत पायी मिरवणूक काढता येणार आहे. उत्सवाच्या तिसऱ्या दिवसापासून मोठ्या मंडळांबाहेर पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सर्व घाटांवर होणार विसर्जन

बरेचसे गणेश भक्त घरगुती गणेशाचे दीड दिवसात विसर्जन करतात. विसर्जनाच्या दिवशीच तिसरी पर्वणी असल्याने भाविकांची घाटांवर गर्दी असणार आहे. तरीही भाविकांना गणेशाचे विसर्जन करता येईल, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी चारचाकी वाहनांचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वोत्तम प्रॉपर्टीत नाशिक ठरले दुसरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोत्तम दुसरे शहर हे नाशिक ठरले आहे. देशपातळीवरील १९ टायर टू सिटींच्या करण्यात आलेल्या पाहणीत कोचीने पहिले तर नाशिकने दुसरे स्थान पटकावल्याचे निदर्शनास आले आहे. घरांची मागणी, पुरवठा, दर्जा आणि इतर बाबींच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यानिमित्ताने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

सेकंड होम म्हणून परिचीत असलेले नाशिक हे सर्वोत्तम प्रॉपर्टी डेस्टिनेशन असल्याचे यापूर्वी अनेकदा सांगण्यात आले आहे. मुंबई-पुण्यासह अन्य शहरातील नागरिकही नाशिकमध्ये वास्तव्य करण्यास इच्छूक आहेत. खासकरुन सेवानिवृत्तीनंतर नाशकात स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. आता एका राष्ट्रीय सर्वेक्षणात नाशिकच्या रिअल इस्टेटवर मोहोर उमटली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात ऑनलाइन कार्यरत असलेल्या एका मोठ्या संस्थेने देशातील एकूण १९ टायर टू शहरांचे सर्वेक्षण पूर्ण केले. त्यात कोची हे पहिल्या क्रमांकावर आहे.

टायर टू शहरांमधील रिअल इस्टेटमध्ये एकूण ३२ हजार ६०० कोटी रुपयांची उलाढात होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदी-विक्री, घरांच्या किंमती, मागणी, पुरवठा, विक्री न झालेली घरे, नवीन प्रकल्पांचा ट्रेंड अशा विविध निकषांचा अभ्यास करण्यात आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक असून, त्यानंतर विशाखापट्टणम, बडोदा, त्रिवेंद्रम, जयपूर, मंगळुरु, इंदौर, गोवा आणि कोईमतूरचा समावेश आहे.

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आल्हाददायक हवामान ही नाशिकची बलस्थाने आहेत. त्याचबरोबर दर्जेदार घरांचा पुरवठा व ग्राहकांचा विश्वास या जोरावर येत्या काळात नाशिक नक्कीच पहिल्या क्रमांकावर जाईल.

-जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैदिक हिंदू धर्म सर्वांत महान

$
0
0

साध्वी अमित ज्योतीजी महाराज यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या भारतात अनेक जाती, पंथ आहेत; पण एकच असा सनातन वैदिक हिंदू धर्म महान धर्म आहे. आपला धर्म सोडून कोणी दुसऱ्या धर्मात गेला तर त्याला कधीही सन्मान आणि अन्य फायदा होणार नाही, असे प्रतिपादन जैन साध्वी अमितज्योतीजी महाराज आणि अंतर्ज्योतीजी महाराज यांनी केले. पंचवटी कॉलेजच्या प्रांगणात आयोजित देशपातळीवरील भव्य वनवासी संमेलनात ते बोलत होते.

देशरक्षणासाठी, समाज रक्षण,संस्कृती रक्षणासाठी परधर्मात गेलेल्या लोकांना घरवापसी कार्यक्रम राबवून हिंदू धर्मात परत आणणे ही आज गरजेची गोष्ट आहे. धर्म जगेगा तो विश्व जागेगा, या उक्तीप्रमाणे विश्व कल्याणासाठी हिंदू संस्कृती वाढविणे व रुजविणे ही काळाची गरज आहे. असे मत वनवासी संमेलनाचे समन्वयक आचार्य महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद यांनी समारोपाच्या भाषणात मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनंतराव कुलकर्णी यांनी केले.

सूत्रसंचालन अ.भा. धर्म जागरण विभाग सह प्रमुख राजेंद्र सिह्जी यांनी केले. महामंडलेश्वर अमृतदासजी महाराज, महामंडलेश्वर जनार्दंनजी महाराज, गोरखपुरचे ब्रह्मचारी रामानुजाचार्यजी, कुरुक्षेत्र येथील दिव्यानंद्जी, आचार्य महामंडलेश्वर हभप लहवितकर महाराज,राजकोटचे घनश्यामदास महाराज, पूज्य गोपालाचार्यजी महाराज, अतुल महाराज, मध्य प्रदेशातील रमणगिरी महाराज, नाशिकचे रामदासजी महाराज, प्रांत संघचालक नाना जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विना तारण आता मुद्रा लोन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरुंना अर्थसहाय्य देण्यासाठी मुद्रा लोन ही योजना सुरू करण्यात आली असून, येत्या २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात यासाठी विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेमुळे व्यवसाय, उत्पादन किंवा सेवा देणाऱ्यांना ५० हजारापासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.

बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना देशभरात सुरु करण्यात आली आहे. केवळ एक पानी अर्ज आणि संबंधित व्यक्तीच्या रहिवासी व ओळखपुराव्याद्वारे (केवायसी) आणि कुठल्याही तारण किंवा जामीनदाराशिवाय या योजने अंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेची माहिती बँक ऑफ महाराष्ट्रचे रिजनल मॅनेजर प्रताप मोहंती यांनी पत्रकार परिषदेत दिली.

५० हजार रुपयांपर्यंत शिशु, ५० हजार ते ५ लाखांपर्यंत किशोर तर ५ ते १० लाख मर्यादा असलेल्या तरुण या तीन प्रकारच्या योजना मुद्रा योजनेत आहेत. ५ कोटी रुपयांचे कर्ज आम्ही वितरीत करीत असल्याचे ते म्हणाले. ज्यांना मुद्रा कर्जाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुठल्याही शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, बँकेच्यावतीने तीन जणांना मुद्रा कार्ड प्रदान करण्यात आले. त्यात सूक्ष्म उद्योजिका तृप्ती दीक्षित, पतंजलीचे उत्पादन विकणारे भूषण लहामगे व मोबाईल शॉप टाकण्यासाठी रविंद्र भोर यांना अर्थसहाय्य मिळाले आहे.

पाच ऑटोमेटिक शाखा

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी ३ शाखा सुरू असून, नाशिक शहरात नाशिक शहर, कॉलेज कॅम्पस, कॅनडा कॉर्नर, मालेगाव आणि नाशिकरोड या पाच ठिकाणी या शाखा येत्या मार्च महिन्यापर्यंत सुरू करणार असल्याचे मोहंती यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक वादातून तरुणाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठक्कर बसस्थानक परिसरात बुधवारी मध्यरात्री चौघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सरकारवाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

ठक्कर बाजार बसस्थानकाजवळील तुळजा हॉटेलसमोर मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. राहुल उर्फ गुणाजी गणपत जाधव (३६, रा. सीबीएस) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात किशोर नागरे गंभीर जखमी झाला आहे. संशयित परेश मोरे आणि जखमी नागरे यांच्यात मंगळवारी (दि.१५) सकाळी आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाला होता. तो मिटवण्यासाठी मृत जाधव व त्याच्या साथीदारांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर जाधवसह नागरे, हिरालाल कृष्णा ठोंबरे, (वय ३२, रा. मल्हारखान, अशोकस्तंभ), किरण कुलकर्णी, सागर परदेशी, विकी दिवे जेवणासाठी तुळजा हॉटेलमध्ये गेले होते. पाठोपाठ संशयितही तेथे आले. तेथे किशोर आणि संशयित परेश यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही गटात पुन्हा वाद उफाळला. संशयित व्यंकटेश मोरे, परेश मोरे व त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी धारदार शस्त्रांनी नागरे, जाधव, ठोंबरे व परदेशी यांच्यावर वार केले. त्यात जाधवच्या डोक्यात व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर नागरे, ठोंबरे आणि परदेशी जखमी झाले. त्यांच्यावरही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संशयित पसार झाले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र, जाधव यांचा मृत्यू झाला होता.

सरकारवाडा पोलिसांनी मोरे बंधूंसह अन्य काही संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत कळताच जाधव व नागरे याच्या मित्रपरिवाराने हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. पोलिस उपआयुक्त अविनाश बारगळ, सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

या प्रकरणातील संशयित व्यंकटेश मोरे याच्यावर खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या मोहन चांगले आणि सोनवणे दुहेरी खूनप्रकरणातही तो संशयित होता. मात्र, तो निर्दोष सुटला. मृत जाधव याच्यावर कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्ह्यात चाकू आणि चॉपर सारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला. संशयितांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पथक पाठविण्यात आले आहे. या घटनेतील संशयितांना लवरकच ताब्यात घेतले जाईल. मुदतीपेक्षा अधिक वेळ हॉटेल खुले होते, असे प्रथमदर्शनी दिसते. याबाबत शहानिशा केली जाईल. तसे असल्यास हॉटेलसंबंधीचे परवाने रद्द करावेत, असा प्रस्ताव आम्ही जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहोत.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कुंभमेळ्याचे नियोजन चुकले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. सिंहस्थाचे नियोजन योग्य प्रकारे झाले असते तर साधू महंतांना चांगल्या पाण्यात अंघोळ करता आली असती. योग्य नियोजन झाले नसल्याने साधू-महंताना प्रदूषित पाण्यात अंघोळ करावी लागली, असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुबोधकांत सहाय यांनी केला.

सहाय यांनी बुधवारी साधुग्राम येथील पुरी पिठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साधुग्राममधील विविध साधू-महंतांच्या भेटी घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मंगळवारी रात्री सुबोधकांत सहाय यांचे नाशिक येथे आगमन झाले. बुधवारी सकाळी त्यांनी रामकुंड येथे जाऊन गंगापूजन केले. तेथे पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांशी

चर्चा करुन शाही स्नानाबद्दल माहिती जाणून घेतली. त्यानंतर शंकराचार्य अधोक्षजानंद यांच्या साधुग्राम येथील पंडालला भेट दिली. तेथे कुटुंबियांच्या हस्ते हवनपूजन केले. यावेळी सहाय म्हणाले, की सिंहस्थाचे नियोजन व्यवस्थित झालेले नाही. जागोजागी कर्मचाऱ्यांचे ढीग आहेत. अनेक ठिकाणी पाण्यात प्रदूषण होत आहे. मोदी सरकारला नियोजनाची चांगली संधी होती. या संधीचा फायदा उठवून चांगले नियोजन करता आले असते. नियोजन न झाल्याने साधू महंतांना प्रदूषित पाण्यात स्नान करावे लागले. सरकारने दिलेल्या पैशाचा विनियोग चांगला व्हायला हवा होता, असा टोलाही सहाय यांनी लगावला. त्यानंतर सहाय यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उज्जैन येथे होणाऱ्या कुंभमेळ्याविषयी माहिती घेतली. सहाय यांनी विविध आखाड्यांनाही भेटी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नितीशकुमारांविरोधात साधू-महंतांचा शंखनाद

$
0
0

हिंदू मठाच्या मुद्यावरून १५ दिवसांची मुदत

Vijay.mahale@timesgroup.com

नाशिक : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना धार्मिक मुद्यांवरून साधू - महंतांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी बिहारमधील मठांचा मुद्दा पुढे केला आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यास नितीशकुमारांना त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. अगोदरच विधानसभा निवडणुकीत भाजपचा सामना करणाऱ्या नितीशकुमारांसमोरील अडचणी वाढल्याचे मानले जात आहे.

त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी येथे शंकराचार्य शिबिर सुरू आहे. यात देशभरातील साधू - महंतांनी सहभाग घेतला आहे. शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद या शिबिराच्या अध्यक्षस्थानी आहेत. शिबिरात हिंदू धर्माशी संबंधित १३ ठरावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये बिहारमधील मठांचा मुद्दा महंत हरिनारायण आनंदजी यांनी उपस्थित केला. बिहारमधील मठांकडे दुर्लक्ष केले जात असून त्यासाठी राज्यातील नितीशकुमार सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या १५ वर्षात राज्यात बिहारमध्ये सुमारे ३५० मठ उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. राज्यातील अन्य धर्मियांच्या वास्तू उभारणीबाबत सरकार अनुकुल असते. मग हिंदूंबाबतच असा अन्याय का? असा मुद्दा आनंदजी यांनी शिबिरात उपस्थित केला.

मठांचे अधिकार संकुचित

बिहारमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या मठांच्या अधिकारांबाबतही शिबिरामध्ये उहापोह करण्यात आला. मठांवर राज्य सरकारच्या प्रतिनिधीचे नियंत्रण असल्याची दुखरी बाजू हरिनारायण आनंदजी यांनी मांडली. मठांच्या नियंत्रणाखालील जमिनींचा चांगल्या कामासाठी उपयोग करता येत नाही, त्या जमिनी विकसित करता येत नाही, अशीही व्यथा त्यांनी मांडली. शेजारील उत्तर प्रदेश किंवा राजस्थानमध्ये हिंदू मठांची स्थिती तुलनेने चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी, त्र्यंबक दुष्काळग्रस्तांच्या यादीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

शासनाच्या यापूर्वीच्या धोरणानुसार गेल्या दहा वर्षांत तीन उत्तम उत्पन्नाची सरासरी हे उत्पन्न समजून ५० पैशांच्या आतील नजर आणेवारीच्या गावांना शासनाच्या विविध सोयी सवलतींचा लाभ मिळत होता. मात्र आता नवीन परिपत्रकानुसार ६७ पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांनाही आता शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार इगतपुरी व त्र्यंबक तालुक्याला लाभ होणार आहे, अशी माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यात गेल्या महिन्यापासून ठेंगा दाखविल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तथा तालुक्यात पाण्याची व पिकांची भयानक परिस्थिती असतांनाही या दोन्ही तालुक्यांवर चुकीच्या आणेवारी पद्धतीमुळे या तालुक्यांवर दुजाभाव व अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत शासनाला जाणीव करुन दिली होती. अखेर शासनाने या मागणीची दखल घेत व परिस्थितीचे अवलोकन करून आपल्या निर्णयात सुधारणा केली असून, त्याबाबतचे नवीन परिपत्रक १५ सप्टेंबर २०१५ रोजी जारी केले आहे. यानुसार मागील पाच वर्षांच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना सोयी सवलती लागू करण्यात येणार आहे. या नवीन निकषात व परिपत्रकाप्रमाणे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका बसत असल्याने आता या दोन्ही तालुक्याला त्याचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिकॅथलॉन आऊटलेटला राज ठाकरेंची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विल्होळी येथील स्पोर्टस् हब म्हणून नावारूपाला आलेले स्पोर्टस् आऊटलेट डिकॅथलॉनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली. डिकॅथलॉनला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट देऊन आऊटलेटची माहिती घेतली.

विल्होळी नाशिकमध्ये सुरू झालेल्या डिकॅथलॉन या आऊटलेटमध्ये सर्व प्रकारच्या खेळांचे उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या आऊटलेटची माहिती जाऊन घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दालनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी डिकॅथलॉन दालनाचे व्यवस्थापक कुणाल धनवंत आणि निखील कुलकर्णी यांनी राज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच राज यांनी संपूर्ण डिकॅथलॉन दालनाच्या विविध खेळ प्रकारांची आणि खेळांच्या साहित्यांची माहिती दालनाच्या व्यवस्थापकांकडून जाणून घेतली. या दालनात ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, क्रिकेट, जिम, योगा, स्विमिंग, हायकिंग, फुटबॉल सारख्या खेळांचे सा‌हित्य ग्राहकांना तंत्रशुध्द माहिती देऊन उपलब्ध केले जात आहेत. त्यासाठी या आऊटलेटमध्ये खेळाचे आणि खेळ साहित्यांचे विशेष तज्ज्ञ मंडळी देखील नेमण्यात आले आहेत. यावेळी मनसे पक्षनेते अविनाश अभ्यंकर, शारीरिक प्रशिक्षण विभागाचे प्रमुख संघटक डॉ. ऋषी शेरेकर, सरचिटणीस विशाल परदेशी, जिल्हा सल्लागार तुषार वाघमारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाला फुल मार्क्स!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या दुसऱ्या पर्वणीत नाशिकमध्ये दाखल झालेल्या लाखो नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनाला फुल्ल मार्क्स दिल्याचे निष्कर्ष गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जर्नालिझम विभागाच्या विद्यार्थ्यांच्या पाहणी अहवालात पुन्हा सामोरे आले आहेत. पहिल्या पर्वणीच्या निष्कर्षांशी हे निष्कर्ष मिळते जुळते आहेत.

विशेषत: पोलिस, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवक यांच्या संबंधित हे निष्कर्ष आहेत. गोदेच्या स्वच्छतेबाबत ८० टक्के भाविकांनी समाधान व्यक्त केले होते. दुसऱ्या पर्वणीत हे उत्तर देणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढून ८६ टक्क्यांवर गेले. भाविकांना सहकार्य करणाऱ्या नागरिकांमध्ये ७१ हून ७७ टक्क्यांवर हे प्रमाण गेले आहे. स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांकडून भाविकांना होणाऱ्या मदतीचे प्रमाण स्थिर म्हणजे ६७ ते ६७ टक्के राहिले आहे.

आरोग्य विभागाच्या सेवेमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निष्कर्ष या पाहणीत मिळाले. गेल्या पर्वणीत या विभागाच्या सेवेबद्दल अवघ्या ५० टक्के भाविकांनी अनुकूल मत व्यक्त केले होते. आता हे प्रमाण ७३ टक्क्यांच्या घरात आहे. पहिल्या पर्वणीदरम्यान जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याचे मत ५१ टक्के नागरिकांनी व्यक्त केले होते. आता हे प्रमाण ५९ टक्क्यांवर आहे. वाहतूक व्यवस्थेविषयी भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. अभ्यासाचा भाग म्हणून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथून ३०० भाविकांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. यामध्ये देशभरासह विदेशातून येणाऱ्या नागरिकांकडूनही प्रश्नावली भरून घेण्यात आली. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख वृंदा भार्गवे, कौमुदी परांजपे व प्रा. रमेश शेजवळ यांनी या सर्व्हेक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images