Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांद्याची आवक वाढली

$
0
0

प्रतिक्विंटलमागे १५० रुपयांनी दरात वाढ

म. टा. वृत्तसेवा निफाड

कांद्याच्या भावात सलग आठव्या दिवशी सुरू असलेली वाढ गुरुवारीही कायम दिसून आली. लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये बुधवारच्या तुलनेत १५० रुपये प्रतिक्विंटल जादा दर मिळाला. भाववाढ होत असल्याने कांद्याची आवकही वाढली आहे.

यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा खराब झाला. परिणामी महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३०० रुपयांच्या आसपास असलेल्या कांद्याने आता हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक गुरुवारी वाढली.

जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक म्हणजे ३४ हजार ५३० क्विंटल कांदा आवक पिंपळगाव बाजार समितीत होती. तेथे सरासरी सर्वाधिक एक हजार ३०१ रुपये पुकारला गेला तर जास्तीत जास्त १४६६ रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीमध्ये २६ हजार ६०० क्विंटल आवक होती. जास्तीत जास्त १४८३ तर सरासरी १२५१ रुपये प्रतिक्विंटल दर होता. पिंपळगाव, लासलगाव, विंचूर, निफाड, उमराणा, चांदवड, वनी, दिंडोरी या कांदा मार्केटमध्ये गुरुवारी एकूण एक लाख ९ हजार ७०२ क्विंटल आवक होती.

निर्यातीला द्या अनुदान

इतर राज्यासह परदेशातही सध्या कांद्याला मागणी वाढली आहे. दुबई, कोलंबो, बांगलादेशासह अजून काही छोट्या देशातही लासलगावच्या कांद्याची निर्यात सुरू आहे. परंतु, ही निर्यात अपेक्षित उद्दिष्टाइतकी नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे कांदा निर्यातमूल्य शून्य डॉलर असले तरीही निर्यातीला पाच टक्के प्रोत्साहन अनुदान केलेली आहे. लासलगाव बाजार समितीच्या वतीनेही निर्यातीला प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केलेली आहे.

टप्प्या-टप्प्याने आणा माल

लासलगाव बाजार समितीच्या मुख्य व दुय्यम बाजार आवारांवर दिवसेंदिवस कांदा आवकेत वाढ होत आहे. त्यामुळे कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्यासाठी शेतकऱ्यांनी टप्या-टप्याने बाजार समितीमध्ये माल विक्रीस आणावा, असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती संदीप दरेकर यांनी केले आहे.

मागणीत वाढ

राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला असून येत्या १५ ते २० दिवसात तेथील कांदा संपणार आहे. तसेच तामीळनाडूतील कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. रमजानचे उपवास संपल्याने देशांतर्गत व परदेशात कांद्याची मागणी वाढल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या कांदा बाजारभावात तेजी निर्माण झाल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी घाई करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककर संभ्रमात

$
0
0

- पुरेशी जनजागृती न झाल्याचा परिणाम

- सोशल नेटवर्किंगवरील संदेशांमुळे गोंधळात भर

- प्लास्टिक संकलन केंद्रांचा शोध सुरूच

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई/नाशिक

प्लास्टिकबंदी लागू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे, मात्र नाशिककरांमध्ये याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुरेशी जनजागृती न झाल्याने कोणत्या पद्धतीचा प्लास्टिकवापर चालेल किंवा कोणते प्लास्टिक बाळगले तर दंडात्मक कारवाई होईल, या संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. प्लास्टिकच्या ५० मायक्रॉनवरील पिशव्या वापरल्या तर चालतीत, मॉलमध्ये मिळणाऱ्या किंवा सामानाच्या मोठ्या पिशव्या वापरल्या तर चालतील, अशा पद्धतीचेही संदेश सोशल नेटवर्किंगवरून फिरत असल्याने आणि सुरुवातीच्या काळात यातील कोणत्याच माहितीला अधिकृतरीत्या चुकीचे न ठरवल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

उद्या, शनिवारी २३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू होत आहे. घरातील प्लास्टिकच्या पिशव्या संकलन केंद्रांमध्ये जमा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिलेली असतानाही अनेक नाशिककर शेवटच्या क्षणी जागे झाले आहेत. नाशिकमध्ये प्लास्टिक संकलन केंद्रे कुठे आहेत, याची बहुतांश नागरिकांना माहिती नाही. त्यातही सुरुवातीला जाड्या प्लास्टिकच्या पिशव्या चालतील, अशा चर्चा होत असताना राज्य सरकार किंवा महापालिका कोणाकडूनही याचे खंडन करणारी जनजागृती न झाल्याने पातळ प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यासाठी अनेकांनी वापरल्या आणि जाड पिशव्या कशाला टाकायच्या म्हणून घरातच ठेवून दिल्या, असेही चित्र आहे. त्यातच हे पावसाचे दिवस असल्याने अनेकांनी बॅगा, पर्समधील सामान भिजू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या जवळ बाळगल्याचेही आढळते.

संकलन केंद्रे रिकामीच

केवळ दुकानामध्ये मिळणारे सामान, भाज्या, धान्य यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात असे नाही, तर कानातले, क्लिप्स ते इतर प्लास्टिकचे मग, बादली, कपड्यांचे चाप, डबे यासाठीही प्लास्टिकचेच वेष्टण उपलब्ध असते. या वस्तूही प्लास्टिकच्या आवरणातून बाहेर आलेल्या दिसत नाहीत. हातगाडीवरून हे सामान विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये तर या संदर्भात फारशी जाणीव-जागृतीही नाही. प्लास्टिकबंदीसंदर्भात ठिकठिकाणी फलक, विविध माध्यमांतून होणाऱ्या जाहिराती याचा मारा झाला असता तर अधिक लोकांपर्यंत या बंदीची माहिती पोहोचली असती. ही माहिती न पोहोचल्याने प्लास्टिक संकलन केंद्रांमध्येही प्लास्टिक पिशव्या फारशा संकलित झालेल्या नाहीत.

नाशिककरांनाही होणार दंड

नाशिक : राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केल्यानंतर त्याच्या विल्हेवाटीसाठी २३ जूनची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत महापालिका हद्दीत केवळ विक्रेत्यांवरच दंडात्मक कारवाई होत होती. आता मात्र बंदी लागू झाल्याने नाशिककरांवरही दंडात्मक कारवाई होईल. यासाठी ५ हजारांचा दंड केला जाणार असून, महापालिकेच्या वतीने सहा विभागीय कार्यालयांमध्ये या कारवाईसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कविताच... माझी कबर’चे रविवारी प्रकाशन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या 'कविताच... माझी कबर' या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता मु. श. औरंगाबादकर सभागृह सार्वजनिक वाचनालय, शालिमार येथे होणार आहे.

ख्यातनाम कवी वसंत आबाजी डहाके व डॉ. प्रभा गणोरकर यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन होत असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकदादा पाटील आहेत. याप्रसंगी कवी अरुण शेवते, डॉ. रमेश पाटील, शशिकांत गुळुमकर, सुरेश हिंगलासपूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संजय चौधरी यांचा माझं इवलं हस्ताक्षर या पहिल्या कविता संग्रहाचं रसिकांनी जोरदार स्वागत केले होते. २००५ मध्ये हा संग्रह प्रकाशित झाला आहे. साध्या सोप्या भाषेत जगण्याविषयीचं प्रवाही चिंतन चौधरी यांच्या कवितेत आहे. मराठी कवितेच्या परंपरेत वैशिष्ट्यपूर्ण कविता लिहिणाऱ्या कवींमध्ये संजय चौधरी यांचे नाव घेतले जाते. कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभास अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथाली प्रकाशन व संजय चौधरी मित्र परिवाराने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदभरती संभ्रमाचा परिणाम

$
0
0

डीटीएड, बी. एड कॉलेजेस जुळवताहेत प्रवेशाची समीकरणे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२०१२ पासून रेंगाळलेल्या शिक्षक भरतीचा परिणाम भावी गुरूजी घडविणाऱ्या डीटीएड आणि बी.एड. अभ्यासक्रमांना मिळणाऱ्या प्रतिसादावरही होत असल्याचे चित्र आहे.

शासनाने नुकतीच पदभरतीची घोषणा केली होती; मात्र त्यात शिक्षक पदाचा उल्लेख नव्हता. यामुळे या पदवी व पदविकाधारकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर लवकरच राज्यात सुमारे २४ हजार रिक्त पदांपैकी सुमारे १८ हजारावर शिक्षक भरण्याची तयारी दाखविली होती. मात्र सद्यस्थितीत शासकीय स्तरावरून या वृत्ताला आधार नाही. या संभाव्य जागांबाबत शासनाने तपशील जाहीर करावा, असा सूर आता या पदवीधारकांनी आळवला आहे.

याच महिन्यात बी. एड. पदासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी एन्ट्रन्स सेलला चांगलीच प्रतीक्षा करावी लागली. यातच आता या अभ्यासक्रमाचा कालावधीही वाढत असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. त्यात टीईटी व अभियोग्यता चाचणीसारख्या परीक्षा सलग काही वर्षांपासून घेऊन त्या विद्यार्थ्यांनाही अद्याप सरकारने सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली नाही. परिणामी, या पदव्यांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ घटत असल्याने विद्यार्थीसंख्येचा समतोल साधण्यासाठी कॉलेजांनाचा प्रयत्न करावे लागत आहेत. डीटीएड अभ्यासक्रमांची स्थिती मात्र जास्त त्रासदायक आहेत. काही ठिकाणी कॉलेजांवर विद्यार्थीसंख्येअभावी टाळे लावण्याची वेळ आली आहे.

पवित्र पोर्टलच घडवू शकेल बदल

शासनाने शिक्षक भरती लवकरच करण्याचे आश्वासन वेळावेळी उमेदवारांना दिले आहे. या पदभरतीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. या पोर्टलद्वारे होणारी शिक्षणसेवकांची भरती ही पारदर्शक पद्धतीने होईल, असा शासनाचा दावा आहे. यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी व शिक्षण निरीक्षक आदी घटकांचे जिल्हानिहाय प्रशिक्षण वर्गही सुरू झाले आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून प्रलंबित असलेल्या भरतीला गती मिळाल्यास या अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद पुन्हा वाढीला लागेल, असा आशावाद या अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या कॉलेजांना आहे.

रिक्त जागांचा तपशील जाहीर होण्यास अवकाश

सद्यस्थितीत पवित्र पोर्टलबाबत संबंधित घटकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरातील शाळांना पासवर्ड व आयडी पुरविण्यात येणार आहे. याच्या आधारे शाळेचे व्यवस्थापन त्यांच्याकडील पदभरतीसाठी आवश्यक त्या पदांची संख्या पोर्टलवर अपलोड करेल. या प्रक्रियेत ज्यावेळी सर्व शाळांचा समावेश होईल, त्यावेळीच राज्यभरातील एकूण रिक्तसंख्येवर प्रकाश पडू शकणार आहे. दरम्यानच्या कालावधीत पवित्र पोर्टल लवकर सुरू करून टीईटी व अभियोग्यता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी उमेदवारांच्या वतीने करण्यात येत आहे.

लोगो : शाळा / कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच महिलांचे दागिने ओरबाडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. २१) दुपारी दीड वाजता शिवाजीनगर येथील जनता विद्यालयाच्या बोर्डाजवळ एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे लॉकेट दोन अज्ञात व्यक्तींनी ओरबाडून धूम ठोकली. याच व्यक्तींनी आणखी चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे.

पुष्पावती भिकाजी कुलथे (वय ७९, रा. बोधलेनगर) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील जनता विद्यालयाजवळून पायी जात होत्या. त्याच वेळी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ओमपान असलेले लॉकेट ओरबाडून नेले. या दोघांनी हेल्मेट परिधान केलेले होते. दोघांनीही निळ्या रंगाचे शर्ट परिधान केलेले होते. कुलथे यांनी आरडाओरड केल्यावर आजूबाजूचे नागरीक गोळा झाले. परंतु, तोपर्यंत दागिने लुटणारे फरार झाले. याशिवाय उपनगर येथील कन्हैया स्वीट्सजवळ सुनीता प्रभाकर टर्ले, विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ जयश्री मंगेश गुबाडे, डावखरवाडी येथे मधुरा तुकाराम कुसाळे आणि म्हसोबा मंदिर येथे सायली विजय महाले या चार महिलांच्या गळ्यातील दागिनेही ओरबाडल्याची माहिती या फिर्यादीत दिली आहे. या चारही घटनांतील चेन स्नॅचर्स नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेले होते व निळ्या रंगाचे शर्ट परिधान केलेले होते. या साम्यामुळे या पाचही घटनांतील महिलांचे सोन्याचे दागिने संबंधित व्यक्तींनीच लुटले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनांतील लुटारूंचा शोध घेण्यासाठी उपनगर पोलिस ठाण्याचे एक पथक श्रीरामपूर येथे रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रभाकर रायते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशवासीयांचा योगाभ्यास

$
0
0

जळगावसह जिल्ह्यातही विविध कार्यक्रम; शाळांमध्ये उत्साह

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभरात गुरुवारी (दि. २१) चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्योदयापासून जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध संस्थांतर्फे तसेच शाळा, कॉलेजेस, शासकीय कार्यालयांमध्ये योगाचे प्रात्यक्षिके करण्यात आली.

लहान मुलांसह ज्येष्ठांना योग गुरूंकडून मार्गदर्शन, प्रात्यक्षिके बरोबरच उपस्थितांकडून करून घेण्यात आले. दररोज नियमित योग केल्यास शारीरिक व मानसिक काय फायदे होतात याचे विवेचन कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आले. या योग दिनी दैनंदिन योग करण्याचा निश्चयही अनेकांनी केला. सकाळपासून जिल्ह्यात तसेच शहरातील वातावरण योगमय झाले होते. जळगावात जिल्हा क्रीडा संकुल, काव्य रत्नावली चौकात शेकडो, अबालवृद्ध या कार्यक्रमात सहभागी झाले. जळगावातील काव्य रत्नावली चौकात सकाळी सामूहिक योगाभ्यास घेण्यात आला.

काव्य रत्नावली चौकात रिदमिक योग
काव्यरत्नावली चौकात भवरलाल अॅण्ड कांताबार्इ जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी रिदमिक योगाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. योगशिक्षिका हेतल पिंपरिया व डॉ. आदित्य जहागिरदार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या वेळी जळगावातील सुमारे ३४२ नागरिकांनी सहभाग घेतला.

गोदावरी फाउंडेशन
गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये योगदिनानिमित्त योगाभ्यासाचे धडे गिरविण्यात आले. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, भुसावळ, सावदा येथील सीबीएसई स्कूल, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, डॉ. वर्षा पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालय, विधी आणि विज्ञान महाविद्यालय, या शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे धडे गिरविण्यात आले. संस्थांमधील विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही योगाभ्यास करून योगदिन उत्साहात साजरा केला.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवारी योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. पदवीप्रदान सभागृहात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासाठी योग प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर, कुलसचिव भ. भा. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जे. बी. नाईक, राष्ट्रीय छात्रसेनचे कर्नल दिलीप पांडे, कर्नल अॅलेक्स जोसेफ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. गीतांजली भंगाळे यांनी योगासनाबाबत माहिती दिली तर श्रद्धा व्यास या विद्यार्थिनीने योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखविले. या वेळी एनसीसी बटालियन अठराचे विद्यार्थी, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठ उपअभियंता राजेश पाटील, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील तसेच विद्यार्थी विकास विभागाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

श्री स्वामी समर्थ विद्यालय
येथील स्वामी समर्थ विद्यालय व योगा कल्चर असोसिएशनकडून राष्ट्रीय खेळाडू राधिका सुधीर पाटील हिने विद्यार्थांना योगाबद्दल माहिती देऊन वेगवेगळे आसने करून दाखवली. या प्रसंगी संघटनेचे सचिव अश्रय सोनवणे, प्रवीण पाटील, मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, हर्षाली पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

धुळ्यात सामूहिक योगा उपक्रम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुवारी शहरातील पोलिस मुख्यालय मैदानावर आयोजित केलेल्या सामूहिक योगा उपक्रमात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या योगा उपक्रमाचे आयोजन पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्यास धुळे यांच्यावतीने करण्यात आले होते. जागतिक योग दिनाचे महत्त्व भारत स्वाभिमान न्याय धुळेचे जिल्हा प्रभारी प्रीतमसिंह ठाकूर यांनी विशद केले. तर पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी डॉ. राजेंद्र निकुंभ यांनी उपस्थितांकडून योगासने करवून घेतली. तत्पूर्वी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा अधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस, नगरसेविका प्रतिभा चौधरी, हिरामण गवळी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मान्यवरांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित नागरिकांनी योगासने केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंगमागे इराणी टोळी?

$
0
0

संशयितांच्या शोधासाठी श्रीरामपूरला पथक रवाना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात प्रथमच एकाच भागात आणि वेळातच तब्बल पाच चेन स्नॅचिंग झाल्याचा प्रकार उलगडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक श्रीरामपूरकडे रवाना झाले असून चेन स्नॅचिंगमध्ये इराणी टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शहरात जानेवारी ते मे महिन्याअखेरपर्यंत चेन स्नॅचिंगचे ३७ गुन्हे झाले. २०१७ मध्ये याच काळात ४७ गुन्हे झाले होते. गुन्ह्याचा तपासाचा विचार करता मागील वर्षी पोलिसांचे प्रदर्शन फार चांगले नव्हते. ४७ पैकी फक्त नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले होते. यंदा मात्र चेन स्नॅचर्सला कोंडीत पकडणाऱ्या पोलिसांनी ३७ पैकी ४१ टक्क्यांच्या सरासरीने १५ गुन्हे उघडकीस आणले. मागील महिन्याभरात पाच तर जूनच्या सुरुवातीलाच कॅनडा कॉर्नर येथे चेन स्नॅचिंगचा एक गुन्हा घडला होता. कॅनडा कॉर्नर येथे ७३ वर्षांच्या वृद्धेला टार्गेट करीत चोरट्यांनी तिच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला होता. सरासरीच्या तुलनेत चेन स्नॅचिंग कमी होत असल्याचा परिणाम पोलिसांच्या नाकाबंदीवर झाला. ठिकठिकाणी होणारी नाकाबंदी मागील काही दिवसांपासून लागत नव्हती. याचाच फायदा गुरूवारी चोरट्यांनी उचलला. काही मिनिटांत नाशिक-पुणे महामार्गावर तब्बल पाच महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन लुटून दुचाकीस्वार चोरटे फरार झाले. या घटनेची दखल घेत सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी हजर झाले.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार चोरटे शहराबाहेरील आहेत. कल्याणच्या आंबिवली परिसरात इराणी टोळ्यांचे वास्तव्य असून, श्रीरामपूर येथे त्यांचे सातत्याने येणे जाणे असते. अनेकदा हे चोरटे दुचाकीवर येतात आणि चेन स्नॅचिंग करून पुढे श्रीरामपूर येथे पोहचतात. श्रीरामपूर येथील इराणी टोळीतील सदस्य सुद्धा असाच फंडा वापरतात.

एंट्री-एक्झीट पॉइंटचा पुन्हा विचार

क्राइम ब्रँचचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले, की स्नॅचर्स टोळीचा तपास सुरू आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा तपास लवकरच पूर्ण होईल. चेन स्नॅचिंग रोखणे आणि तपास करणे अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत असून, त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. चोरट्यांनी गुरूवारी काही मिनिटांत संधी साधली. शहरातील एंट्री आणि एक्झीट पॉइंटबाबत पुन्हा विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी दारूचे अड्डे उद्धवस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी (दि. २१) विशेष मोहीम राबवित वाडिवऱ्हे आणि घोटी परिसरातील गावठी दारूच्या हातभट्या उद्धवस्त केल्या. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यात एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे. गावठी दारूसह रसायनासह तब्बल साडे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये संबंधी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

वाडिवऱ्हे परिसरातील दाराणा नदीपात्र परिसरात हातभट्या सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी कृष्णनगर-पारवेवाडी भागातील नदी किनारी छापे टाकून देवराम गंगाराम पारवे आणि अशोक कचरू पारवे (रा. दोघे कृष्णनगर-पारवेवाडी) यांना अटक केली. दोघांच्या हातभट्या नष्ट करण्यात आल्या. सशयितांच्या ताब्यातून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ५०० लिटर नवसागर मिश्रीत रसायन, २० लिटर गावठी दारू, २५ प्लास्टिक व पत्र्याचे ड्रम, अ‍ॅल्युमिनिअम पातेले असा सुमारे दोन लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

पिंपळगाव मोर शिवारातील मोरांचा डोंगराच्या पायथ्याशी दुसरी कारवाई करण्यात आली. याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता नंदू मेंगाळ आणि मोहन तांबडू भले (रा. दोघे बोरीची वाडी) तसेच अल्पवयीन युवक हातभट्टीवर गावठी दारूची निर्मिती करतांना आढळून आले. संशयिताच्या ताब्यातून १२ हजार ४०० लिटर नवसागर मिश्रीत रसायन, ५० लिटर गावठी दारू, ६२ प्लास्टिक व पत्र्याचे ड्रम आणि अ‍ॅल्युमिनिअमचे पातेले असा सुमारे सहा लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तीन गुन्हे दाखल

या प्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय नवनाथ गुरूळे, हवालदार राजू दिवटे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंद्रे, पोलिस नाईक जालिंदर खराटे, शिपाई संदीप हांडगे, सचिन पिंगळ, लहू भावनाथ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुद्ध पाण्यासाठी जबाबदारी निश्चित

$
0
0

जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून मार्गदर्शन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. याकामी दुर्लक्ष केल्यास किंवा दूषित पाण्यामुळे गावात साथ उद्भवल्यास ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची आढावा बैठक शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे व प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते यांनी नाशिक येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. डॉ. गिते म्हणाले, की जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्व गावातील, अंगणवाडी व शाळांमधील जलकुंभ व हातपंप यांची स्वच्छता करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तसेच टाक्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

कुपोषणाबाबत आढावा घेताना डॉ. गिते यांनी पुन्हा सर्वेक्षण करून वंचित बालके शोधण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ११ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व घरकुल पूर्ण करावयाचे असून, सन २०१८-१९ चे घरकुल देखील १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाने मोहीम स्वरुपात काम करण्याचे आवाहन गिते यांनी केले. आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध योजनांचा घेतला आढावा

महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी ग्राम बाल विकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहार संहिता याबाबत आढावा घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायतमधील जनसुविधेची कामे, घरकुल इ. योजनाची अपूर्ण बांधकामे याबाबत आढावा घेऊन सर्व काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅकवॉटरवर मद्यपींची जत्रा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या गंगापूर धरणाच्या परिसरात मद्यपी तरुणांची जणू जत्राच भरत असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसभर ओल्या पार्ट्या झडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, या प्रकारांबाबत तक्रारी करूनही शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या धरण परिसराच्या सुरक्षेकडे यंत्रणांचा कानाडोळ होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू होत असल्याचा घटना घडत आहेत. मात्र, तरीही गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात तरुणाई मद्याच्या पार्ट्या करून धरणात डुंबक्या मारताना दिसत आहे. त्यामुळे येथे बाटल्यांचा खच पडत असल्याचे चित्र असून, यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण राहील, असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराकडे सरकारचा कुठलाही विभाग लक्ष घालीत नसल्याने शहरवासीयांचे पिण्याचे पाणी दूषित होत असून, पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असे असतानादेखील शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वरदान ठरलेल्या गंगापूर धरणाच्या परिसरात तरुणाईच्या ओल्या पार्ट्या जोमात सुरू असल्याचे पाहायला मिळते. प्रशासनाकडून धरण परिसरात जाण्यास बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर तरुणांची गर्दी होत असल्याने यावर कारवाई करणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे महापालिका स्वच्छ नाशिक सुंदर नाशिकचा नारा देत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या परिसरात मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या व फेकलेले खाद्यपदार्थांचा खच पाहायला मिळतो. तरुणांसोबत आलेल्या तरुणीदेखील कुठलाही विचार न करता पार्टीत सहभागी होताना दिसतात. त्यामुळे आपले पाल्य नेमके कोठे असतात याबाबत शहरवासीयांनीदेखील योग्य माहिती ठेवायला हवी, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे गंगापूर धरणाचे पावित्र्य नष्ट करू पाहणाऱ्या येथील उघड्यावरील मद्याच्या पार्ट्यांना आळा घालण्याची मागणी परिसरातून होतआहे.

शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तरुणांच्या ओल्या पार्ट्या रंगत आहेत. मात्र, सरकारच्या कुठल्याही याकडे विभागाचे लक्ष नसल्याने धरण परिसरात बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. येथे येणाऱ्यांना अटकाव केला जावा.

-ज्ञानेश्वर गांगुर्डे, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे थकविल्यानेव्यापाऱ्याची जमीन जप्त

$
0
0

मालेगाव : मुंगसे येथील जय भोलेनाथ ट्रेडर्सचा कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी याने तालुक्यातील ७७७ कांदा उत्पादकांची दोन कोटींहून अधिक रक्कम थकवली आहे. या प्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी जमीन महसूल थकबाकी वसुलीच्या (आरआरसी) कार्यप्रणालीनुसार कठोर पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याप्रकरणी सूर्यवंशीच्या पत्नीच्या नावे असलेली मुंगसे शिवारातील १ हेक्टर ८२ आर जमीन शुक्रवारी जप्त केल्याची माहिती देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, सचिव अशोक देसले उपस्थित होते. गेल्या वर्षी सूर्यवंशीने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून तो बांग्लादेशी व्यापारी व पिंपळगाव येथील युनूस नामक व्यापाऱ्यास विकला होता. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी बाजार समितीचे पथक बांग्लादेशमध्ये जाऊन रिकाम्या हाताने परतले होते. अखेर हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेले. याविषयी देवरे यांनी सांगितले, की अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार २० जून रोजी सूर्यवंशीच्या घरून दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता थेट त्याच्या पत्नीच्या नावे मुंगसे येथील शेतजमीन जप्तीची कारवाई करण्यात आली. आता या जमिनीचा जाहीर लिलाव करण्याचा प्रस्ताव सोमवारी प्रांत अजय मोरे यांना देणार असल्याचे देवरे यांनी सांगितले. या लिलावातून जमा होणारी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल. पिंपळगाव येथील व्यापारी युनूसबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार आहे. सुनील देवरे यांनी सांगितले की, या कारवाईसोबतच सूर्यवंशी याचा जमीनदार अग्रवाल याच्यावरही आरआरसीनुसार कारवाई करण्याबाबत प्राधिकरणला पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड-भुसावळ शटल महिनाभर बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी नाशिकरोड-भुसावळ शटल तांत्रिक कारणास्तव शनिवारपासून (दि.२३) २० जुलैपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेने कळिवली आहे. नाशिकरोड ते भुसावळ दरम्यान देवळाली-पासून भुसावळपर्यंत ही रेल्वेगाडी धावत असते. पहाटे साडेचारला ही गाडी देवळालीला असते. तेथून पावणेपाचला सुटते. पाचला ही गाडी नाशिकरोडला येते. तेथून दहा मिनीटांनी ती भुसावळकडे निघते. गाडीला कायम गर्दी असते. महिनाभर ही गाडी बंद असल्याने भुसावळकडे जाणाऱ्या आणि रात्री नाशिकरोडकडे येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. नाशिकरोड ते भुसावळ दरम्यान रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती केली जाणार आहे. ती महिनाभर चालणार आहे. त्यामुळे २३ जून ते २० जुलै अशी महिनाभर ही रेल्वेगाडी बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी अन्य रेल्वेगाड्या वेळेत धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अन्य धावणाऱ्या गाड्यांच्या वेळेदरम्यान रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती केली जाणार आहे.

भुसावळ शटल बंद असल्यामुळे नाशिकमधील खान्देशी बांधवांची तसेच खान्देशातून नाशिकमध्ये येणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. पहाटे ही गाडी सुटते. त्यामुळे भुसावळला लवकर जाता येते. तसेच तिकडून रात्री सुटते. त्यामुळे या गाडीला कायम चांगला प्रतिसाद असतो.

अन्य गाड्यांचा आधार

भुसावळला जाण्यासाठी नाशिकरोडहून गीतांजली ही सुपरफास्ट गाडी सकाळी साडेनऊला, तर काशी एक्स्प्रेस दहा वाजता असते. या गाडीखेरीज मुंबई-भुसावळ पॅसेंजर अकरा वाजता नाशिकरोडला येते. रत्नागिरी एक्स्प्रेस सव्वाअकराला, पवन एक्स्प्रेस दुपारी तीनला, कामायनी एक्स्प्रेस पावणेचारला तर मंगला सायंकाळी सव्वापाचला आहे. सव्वासहाला पुणे-भुसावळ ही गाडी आहे. पावणेसातला सेवाग्राम एक्स्प्रेस आहे. यानंतरही अन्य गाड्या आहेत. मात्र, देवळाली-भुसावळ पॅसेंजर ही जिव्हाळ्याची व सोयीची आहे. ती बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीसगावच्या अमितचा कान्स फेस्टिवलमध्ये डंका

$
0
0

gautam.sancheti@timesgroup.com

@sanchetigMT

--

नाशिक : जागतिक पातळीवरील कान्स लायन इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ क्रिएटीव्हीटीमध्ये मराठमोळ्या अमित पाटे याच्या स्नॅप्टीविटी कंपनीने तब्बल दोन सुवर्ण लायन ऑस्कर पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे कान्समध्ये मराठी व्यक्तीचा प्रथमच डंका वाजला आहे. लंडन येथे राहणारा अमित हा चाळीसगावचा असून, तो 'नासा गर्ल' स्वीटी पाटेचा भाऊ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्पोर्ट टेक्नॉलॉजीमध्ये मोबाइल श्रेणीकरिता हे दोन सुवर्ण पुरस्कार त्याच्या कंपनीला मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवताना त्याने गुगल, अॅपल, टोयोटा, ऑडी, वेरिझॉन, पी अँड जी, ऑरेन्ज, नायकी, केफसी, कॅटबरी, ईअेका, द टाइम्स यासारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकले आहे.

अमित हा स्नॅप्टीविटी कंपनीचा संस्थापक व सीईओ आहे. या कंपनीला मिळालेले ऑस्कर पुरस्कार वेगवेगळ्या श्रेणीत आहेत. पहिला पुरस्कार मोबाइल टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठी आहे. दुसरा पुरस्कार हा सोशल या श्रेणीत रिअल टाईम रिस्पॉन्ससाठी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्रीडा व संगीतप्रेमी चाहत्यांना स्मार्ट फोनऐवजी लाइव्ह गेमला गुंतवून ठेवणारे तंत्र आहे. आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), सेन्सर व लाइव्ह डेटाचा वापर करून त्याचे जिवंत क्षण टिपले जातात. उच्च गती रोबोटिक कॅमेरे खेळपट्टीवर चालविण्याऐवजी क्रीडाप्रेमी चाहत्यांवर फोकस करून जिवंत क्रीडाप्रकाराचा त्यांचा अनुभव वाढविला जातो. सेल्फी काढण्याच्या नादात खेळाचा, संगीताचा खरा आनंद अनुभवता येत नाही. पण स्नॅप्टीविटीच्या या तंत्रामुळे आता हे शक्य झाले आहे.

एकाचवेळी क्रीडा व संगीताचा आनंद

क्रीडाप्रेमी, संगीतप्रेमी आपल्या महत्त्वाच्या क्षणांना प्राप्त करून आठवणीत साठवून ठेवू शकतात व त्याचबरोबर थेट क्रीडा व संगीत कार्यक्रमातही एकाच वेळेस सहभागी होऊ शकतात. यामुळे ब्रँड्सला प्रामाणिकपणे सोशल मीडियावर त्यांच्या प्रेक्षकांच्या संभाषणाला योग्य किमत देता येते. विशेष म्हणजे त्यांच्या समुदायाचा एक भाग बनणे शक्य होते. एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, वेम्बली स्टेडियम, इतिहाद स्टेडियम (मॅनकेटी एफसी) आणि ऑरेंज वेलॉड्रोम (फ्रान्स) सारख्या जगातील अग्रगण्य स्टेडियम्स सध्या स्नॅप्टीविटीचे तंत्रज्ञान वापरत आहेत.

या अगोदरही पुरस्कार

अमित पाटे यांनी यापूर्वी नोकियाकडून इनोव्हेशन चायलेंज हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच, त्यांना यंग अॅचिव्हर अॅवॉर्ड ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या स्नॅप्टीविटी कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रात ब्रिटिश सरकारची तसेच अनेक कॉम्प्युटर क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांची मान्यता प्राप्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिटको’तील समस्या सोडवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

बिटको रुग्णालयाच्या समस्या सोडविण्यासंदर्भात मनसेच्या नाशिकरोड विभागातर्फे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की बिटको रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर, नाक, कान, घसा, त्वचारोजतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. सायंकाळी ओपीडी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. परंतु, त्या संबंधीचे कोणतेही फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना याची माहिती नाही. या सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. फुलकर यांनी लवकरच सर्व विषयांवर योग्य निर्णय घेतला जाईल व संबंधित विषय महापालिका आयुक्तांकडे मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. सायंकाळी ओपीडी सुरू झाली आहे. त्याचाफलक लवकरच लावण्यात येईल, असे आश्वासनही डॉ. फुलकर यांनी दिले. यावेळी विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे, संतोष सहाणे, असलम मणियार, संतोष क्षीरसागर, प्रवीण पवार, साहेबराव खर्जुल, नितीन पंडित, सचिन चव्हाण, संजय पगारे, विलास कदम, उमेश भोई, अतुल धोंगडे, शशिकांत चौधरी,नितीन धानापुणे, पंकज सोनवणे, संदीप आहेर, रवी जाधव, तुषार वाडिले, प्रशांत बारगळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वराहमालकांना अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निपाह आणि स्वाइन फ्लूसारख्या आजाराच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी, तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी महापालिकेने शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या वराहपालनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात वराह आढळल्यास त्यांना पकडून ठार मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून केली जाणार असून, यासंदर्भात महापालिकेने सहा विभागांत पथके तयार केली असून, त्यांच्यामार्फत थेट वराह पकडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे वराहमालकांनी शहरातील वराहांचे तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या मुंबई प्रांतिक अधिनियम, १९४९ च्या कलम १४ व २२ व त्याचे पोटकलम ३ प्रमाणे महापालिका हद्दीत वराहपालन करता येत नाही. तरीही मोठ्या प्रमाणावर वराहपालन सुरू आहे. शहरात सुमारे ६०० ते ७०० च्या आसपास वराहांची संख्या आहे. वराहांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होते. तसेच, स्वाइन फ्लूच्या प्रसाराला ते कारणीभूत ठरतात. त्यामुळे वराहांबाबत महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. परंतु, वराह पकडण्याची यंत्रणा पालिकेकडे नसल्याने त्याच्यावर कारवाई होत नव्हती. सध्या निपाहच्या व्हायरसमुळे अगोदरच नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी शहर स्वच्छतेसाठी शहरात वराह फिरण्यास व पालनास पूर्णपणे बंदी घातली आहे.

तक्रारी करण्याचे आवाहन

पुढील आठवड्यापासून शहरात वराह आढळून आल्यास त्यांना थेट पकडून ठार मारण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना महापालिकेने काढली असून, वराहमालकांना सध्या शहराच्या हद्दीत असलेल्या वराहांना तातडीने शहराबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. बंदीनंतरही शहरात वराह आढळल्यास एनएमसी ई-कनेक्ट अॅपवर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वराहपालन करणाऱ्यांनी वराह स्थलांतर केले नाहीत, तर त्यांना इंजेक्ट करून ठार मारू किंवा त्याचे हार्ट ब्रेक करून मारू असा इशारा पालिकेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पाटील यांची नार्को टेस्ट करा’

$
0
0

'पाटील यांची नार्को टेस्ट करा'

अमळनेर : भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या व्हायरल झालेल्या कथित क्‍लिपबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह जिल्हा बॅंकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील, भाजपचे लालचंद सैनानी या तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा तस्कर कंजर व उदय वाघ यांची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी अनिल पाटील यानी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व आठवीसाठी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत इयत्ता पाचवीचा निकाल २३.०९ टक्के, तर आठवीचा निकाल १२.६४ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्यासाठी ३० जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून २४ हजार १२२ विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १८ हजार ५५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे त्यांनी संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये ३० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक एका पेपरच्या गुण पडताळणीसाठी ५० रुपये या प्रमाणे रक्कम ऑनलाइन पध्दतीने भरणे आवश्यक आहे. ३० दिवसांपर्यंत गुणपडताळणीचा निर्णय कळविण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ च्या आकाशात रंगले नाशिककर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्त्री जीवनात तिला वठवाव्या लागणाऱ्या भूमिका नेमक्या कशा होत्या, रंगभूमीवर तिचा प्रवास कसा राहिला, विविध नाटककारांनी स्त्री चित्रण कसे केले याचा प्रातिनिधिक आणि विचारप्रवृत्त करणारा प्रवास चितारणारे 'ती : आकाश आणि अवकाश' हे नाटक काळ जनस्थान फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात आले.

पत्रकार असणाऱ्या दोन स्त्रिया आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून रंगभूमीवरील स्त्री जीवनाचा आढावा असा विषय घेतात आणि तो विषयच प्रत्यक्ष नाटकाचा विषय होतो हेच सादर झालेल्या 'ती'चे वैशिष्ट्य होते. अपर्णा क्षेमकल्याणी आणि पल्लवी पटवर्धन यांनी पत्रकराची भूमिका करून संगीत शारदा ते अलविदा या प्रातिनिधिक नाट्यकृतींना एका सूत्रात बांधले. मराठी नाट्यकलेचा प्रारंभ ते आधुनिक काळ असा व्यापक पट या नाटकातून नाशिककरांपुढे उभा राहिला. विद्या करंजीकर, नेहा जोशी, प्रांजली बिरारी, प्राजक्ता अत्रे, सुमुखी अथणी, हेमा जोशी, रागिणी कामतीकर, कीर्ती भवाळकर, धनश्री क्षीरसागर, लक्ष्मी पिंपळे, पल्लवी पटवर्धन, श्रीया जोशी, अपर्णा क्षेमकल्याणी, प्रिया तुळजापूरकर, विद्या देशपांडे, रेखा केतकर, आदिती मोराणकर, नुपूर सावजी यांनी वेगवेगळे प्रवेश सादर केले.

दिग्दर्शन व संगीत सुनील देशपांडे यांचे, तर संगीत साथ सुभाष दसककर, नितीन पवार, ईश्वरी दसककर यांची होती. नेपथ्य आनंद ढाकीफळे, प्रकाशयोजना विनोद राठोड व ईश्वर जगताप, वेशभूषा स्नेहल एकबोटे, रंगभूषा माणिक कानडे, ललित निकम यांची होती.

--

आज उत्सव नात्यांचा

आज (दि. २३) सायंकाळी ६ वाजता जनस्थान फेस्टिव्हलच्या पाचव्या आणि सांगतेच्या दिवशी 'उत्सव नात्यांचा' हा नृत्याचा कार्यक्रम परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून सक्रिय; जिल्हावासी सुखावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढत असून मान्सून सक्रिय झाला आहे. शुक्रवारी संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २५ जूनपासून पाऊस अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (दि. २३) जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

संततधार पावसाने हजेरी लावल्याने शहरवासी सुखावले आहेत. आद्रा नक्षत्रामध्ये प्रवेशताच जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात होऊ लागली आहे. शुक्रवारी दुपारी पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरींनी नाशिककरांना भिजविले. दुपारी एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहराच्या बहुतांश भागात दुपारी तीनपर्यंत मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. खऱ्या अर्थाने मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. शहरात शुक्रवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडेपाच यावेळेत ३.४ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

ग्रामीण भागात पावसाचा वाढला जोर

गुरुवारी सकाळी साडेआठ ते शुक्रवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात १२१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ८०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गुरुवारी दिवसभरात चांदवड तालुक्यातील काही मंडळांमध्ये ४० मिमी पावसाची नोंद झाली. चांदवड तालुक्यात २८ मिमी पाऊस झाला. येवल्यात ४४ मिमी तर नांदगावात १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मालेगावात गुरुवारी १५ मिमी पावसाची नोंद झाली असून शुक्रवारी देखील मालेगावात जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर २ जुलैपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या जातिभेदाने देशाच्या अखंडत्वाला धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील वातावरण गेल्या चार वर्षांत दूषित झाले असून, जातिभेदही पसरला आहे. विविधतेत एकता ही आपल्या देशाची खरी ताकद आहे. मात्र, अशा वातावरणाने व वाढत्या जातिभेदाने देशाच्या अखंडत्वालाच धोका पोहोचला आहे, अशी खंत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

काँग्रेस कार्यकर्ता जागर अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआय (नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया) व नाशिक जिल्हा एनएसयूआयतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. त्या वेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती दे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की आज शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही राजकारण शिरल्याने या क्षेत्राची वाताहत होत आहे. जात, धर्माच्या नावाखाली विद्यार्थ्यांनाही वेठीस धरले जात आहे. या दूषित व्यवस्थेला बदलण्यासाठी व देशाला निर्माण झालेला धोका वेळीच प्रतिबंधित करण्यासाठी आजची युवा पिढी कार्य करू शकते, ते त्यांनी जरूर करावे. जर कोणी जात, धर्माचा आधार घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा आपल्या लोकशाही संकटात आणत असेल तर त्या विरोधात एक होऊन लोकशाहीचे रक्षण करावे. दहावी, बारावीच्या परीक्षांमधील यशस्वितांनी खूप शिकून देशासाठी कार्य करण्याचे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले. माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये नाशिकमधील विविध कॉलेजांमध्ये प्रथम पाच आलेल्या सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या वेळी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पाणगव्हाणे, आमदार निर्मला गावित, प्रदेश सचिव अश्विनी बोरस्ते, महिला शहराध्यक्षा वत्सला खैरे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, काँग्रेसच्या ममता पाटील आदी उपस्थित होते.

\B

यांचा विशेष सन्मान\B

भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नुकतेच नियुक्त झालेले अनंद देशमुख, दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारी रसिका शिंदे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अनुजा उगले व बेसबॉलमध्ये सुवर्णपदक मिळवलेले प्रवीण धोंगडे यांनाही या कार्यक्रमात विशेष सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images